Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुम्ही कोण म्हणून काय पुसता ?... तुम्ही असा... आस्तिक?... नास्तिक? ...???

ड
डॉ सुहास म्हात्रे
Tue, 07/29/2014 - 21:12
🗣 220 प्रतिसाद
"देव आहे की नाही ?" या प्रश्नाचे उत्तर शोधण्या-देण्यात जगभरच्या लोकांत अनंत काळापासून रणकंदन चालू आहे. शतकामागून शतके लोटली तरीपण या प्रश्नाचे नक्की उत्तर मिळण्याचे लक्षण दृष्टिपथात नाही. हे जग "देव आहे" असे म्हणणारे आस्तिक आणि "देव नाही" असे म्हणणारे नास्तिक असा दोन गटांत विभागलेले आहे असा सर्वसाधारण समज आहे. पण तो समज खरा आहे का ? कोणाला खरे ज्ञान आहे ? आणि मुख्य म्हणजे तुम्ही नक्की कोण आहात आस्तिक की नास्तिक ? चला पाहूया सापडतात का उत्तरे... जरा खोलवर विचार केला तर आस्तिक-नास्तिक हा प्रकार इतका सरळ-सोपा नाही हेच दिसून येते. हे दोन सरळसोट स्पष्ट गट नसून काळा आणि पांढरा या रंगांच्यामध्ये असलेल्या असंख्य करड्या रंगाच्या वर्णपटाप्रमाणेच आस्तिक-नास्तिकतेचा वर्णपट (स्पेक्ट्रम) समाजात असतो असेच दिसते. खरे किंवा प्रामाणिक आस्तिक आणि खरे किंवा प्रामाणिक नास्तिक ही त्या वर्णपटाची केवळ दोन टोके आहेत. चला तर मग ही टोके आणि त्यांमधील वर्णपटाचे केलेले ढोबळ गट पाहूया...

प्रामाणिक आस्तिक

१. या लोकांचा देव आहे या "संकल्पनेवर" दृढ आणि "प्रामाणिक" "विश्वास" असतो. २. त्यांचा हा विश्वास लहानमोठ्या स्वार्थासाठी नसतो अथवा असाहाय्यतेने किंवा सोयीचा म्हणून घेतलेला पवित्रा नसतो. ३. त्यांचा हा विश्वास त्यांच्यावर वाढत्या वयात झालेल्या कौटुंबिक अथवा सामाजिक परिस्थितीचा परिणाम असू शकतो. चालू असलेल्या संशोधनांत या विश्वासामागे त्या व्यक्तींच्या मेंदूची जडणघडण कारणीभूत असल्याचे शास्त्रीय पुरावे मिळत आहेत. ४. हे लोक: (अ) "माझा विश्वास आहे (I believe)" असे म्हणून डोळे मिटून धर्माने सांगितलेले आचरण करतात आणि / किंवा (आ) परम ज्ञानाच्या उपासनेच्या मार्गाने ज्ञानी होण्याचा प्रयत्न करतात आणि / किंवा (इ) पूजाअर्चा, नामस्मरण, कर्मकांडे इ मार्गांनी देव शोधण्याचा प्रयत्न करतात आणि / किंवा (ई) धर्माच्या मार्गाने ज्ञानी झालो की मुक्ती मिळून परमात्म्यात विलीन होणार असा विश्वास ठेवतात. म्हणजे एकूण या जगात असेपर्यंत आपण अज्ञानीच राहणार हेच एका अर्थाने कबूल करतात. ५. हे लोक देव ही "पुराव्याने सिद्ध झालेली गोष्ट" नसून "ज्यावर विश्वास आहे अशी गोष्ट" आहे असे कबूल करून आणि त्या देवावर बेतलेल्या धर्माला "विश्वास (belief)" असे संबोधून अवधानाने किंवा अनवधानाने "देव म्हणजे नक्की काय?" हे माहीत नाही असेच कबूल करतात. ६. शास्त्रात एक फार महत्त्वाचा दंडक आहे, तो म्हणजे : "एकाच गोष्टीला सिद्ध करण्यासाठी अनेक मान्य (सर्वमान्य नव्हे) सिद्धांत असणे हे ती गोष्ट नक्की कोणालाच माहीत नसल्याचे निदर्शक असते." म्हणजेच त्याबाबतीत आपल्याला कामचलाऊ ज्ञान असले तरी खर्‍या दृष्टीने आपण अज्ञानीच असतो. देव आणि धर्म ह्या दोन्हीहीबद्दलचे वैविध्यपूर्ण सिद्धांत या नियमात चपखल बसतात आणि मानव जात "देव" या संकल्पनेबद्दल अजूनही अज्ञानी आहे हेच सिद्ध करतात. ७. प्रामाणिक आस्तिक लोकांची संख्या किती हे सांगणं कठीण आहे... पण खूप कमी असते हे नक्की. थोडक्यात : प्रामाणिक आस्तिक लोक "अल्पसंख्य", "प्रामाणिक" आणि "अज्ञानी" असतात.

प्रामाणिक नास्तिक

या गटातिल लोकांचे गुणधर्म खालिलप्रमाणे असतातः १. या लोकांचा देव आहे या "संकल्पनेवर" दृढ आणि "खरोखरच प्रामाणिक" "अविश्वास" असतो. २. त्यांचा हा अविश्वास लहानमोठ्या स्वार्थासाठी अथवा असाहाय्यतेने अथवा सोयीचा म्हणून घेतलेला पवित्रा नसतो. ३. त्यांचा हा अविश्वास त्यांच्यावर वाढत्या वयात झालेला कौटुंबिक अथवा सामाजिक परिस्थितीचा परिणाम असू शकतो. चालू असलेल्या संशोधनांत या अविश्वासामागे त्या व्यक्तींच्या मेंदूची जडणघडण कारणीभूत असल्याचे शास्त्रीय पुरावे मिळत आहेत. ४. हे लोक: (अ) "माझा अविश्वास आहे (I do not believe)" असे म्हणत आस्तिक लोकांच्या म्हणण्याचे खंडन करत असतात. (आ) "देव आहे याचा शास्त्रीय पुरावा नाही" इतकेच त्यांना आपले म्हणणे खरे आहे हे म्हणण्यासाठी पुरेसे वाटते. त्यांचे म्हणणे शास्त्रीय आहे असे म्हणत असतानाच ते म्हणणे शास्त्रीय पद्धतीने सिद्ध करायला "देव नाही याचा शास्त्रीय पुरावा" सुद्धा जरूर आहे हा शास्त्रीय नियम ते सहजपणे विसरतात. आस्तिकांनी देवाच्या नावाने दिलेल्या आणि शास्त्रीय पद्धतीने उकल न होऊ शकणार्‍या सर्व गोष्टींना ते "अंधश्रद्धा" किंवा "याची भविष्यात शास्त्रीय कारणे मिळतील" असे म्हणून झटकून टाकतात. म्हणजे एकूण आपण देवाच्या बाबतीत पूर्णणे ज्ञानी नसल्याचे (पर्यायाने अज्ञानी असल्याचे) कबूल करतात. ५. हे लोक देव ही "पुराव्याने सिद्ध न झालेली गोष्ट" नसून "ज्यावर विश्वास नाही अशी गोष्ट" आहे असे कबूल करून आणि ते स्वत:ला "विश्वास नसणारे (non-believers)" असे संबोधून अवधानाने किंवा अनवधानाने "देव नाही हे नक्की माहीत नाही" असेच कबूल करतात. ६. प्रामाणिक आस्तिक लोकांची संख्या किती हे सांगणं कठीण आहे... पण खूप कमी असते हे नक्की. थोडक्यात : प्रामाणिक नास्तिक लोक "अल्पसंख्य", "प्रामाणिक" आणि "अज्ञानी" असतात. आतापर्यंत आपण पाहिलेला वर्णपट आणि त्याची दोन टोके खालच्या आकृतीत दाखवली आहेत...

 आस्तिक-नास्तिक वर्णपट : ०१

एकंदरीत वरची दोन्ही टोके एकूण समाजाचा फार फार लहान भाग असतात. तर मग "ह्या वर्णपटात बसणारे इतर लोकगट कोणते?" असा प्रश्न मनात येणे साहजिक आहे. चला तर एक एक करत सगळा वर्णपट उलगडून पाहूया...

धूर्त आस्तिक

या लोकांचे वर्णपटातले स्थान आस्तिक लोकांच्या टोकाजवळ असते. त्यांचे मूळ गुणधर्म असे: १. देव या संकल्पनेबद्दल आपण अज्ञानी आहोत हे या लोकांना पक्के ठाऊक असते. २. परंतू देव या संकल्पनेचा पाठपुरावा करण्याशी या लोकांचे महत्त्वाचे हितसंबद्ध जोडलेले असतात. तसे करण्यामुळे त्यांना होणारा फायदा खालील एक किंवा अनेक प्रकारचा असू शकतो: (अ) चरितार्थ चालणे (आ) आर्थिक फायदा (इ) सामाजिक फायदा (ई) राजकीय फायदा, इ. आणि हे हितसंबद्ध त्यांच्यासाठी सर्वोच्च असतात, देवाची भलावण हे केवळ एक साधन असते. ३. या लोकांमध्ये, देव ही संकल्पना (अगदी देवा-धर्माशी संबंध नसलेलाही) स्वार्थ साधण्याचे फार प्रभावी साधन म्हणून वापरण्याची विलक्षण हातोटी असते. मग तसे करताना 'देव', 'धर्म' आणि 'त्या देवा-धर्माची तत्त्वे' यांना चलाखीने हरताळ फासणे आणि वर त्या कृतीचे चलाखीने समर्थन करणे या गोष्टी हे लोक मोठ्या चलाखिने करतात... शिवाय तसे करताना भल्याबुर्‍या मार्गांचा अवलंब करून लोकमताचा पाठिंबा मिळविण्याचे कसब या लोकांत असते. ४. धर्मा-धर्मातल्या फरकांचाच नव्हे तर एकाच धर्मातल्या विविधतेचा फायदा हे लोक मोठ्या चलाखीने घेताना दिसतात... उदा. हल्लीच्या काळात शिवमंदिर बांधण्या ऐवजी साईबाबा मंदिर अथवा बालाजी मंदिर बांधणे हा जास्त फायदेशीर व्यवहार आहे हे त्यांना बरोबर कळते. ५. त्यांच्या वर नमूद केलेल्या गुणधर्मांमुळे, अर्थातच, हे लोक आर्थिक सुस्थितीत आणि सामाजिक व राजकीय सत्ताकेंद्रात अथवा सत्ताकेंद्राजवळ असल्यास आश्चर्य नाही. ६. यांची लोकसंख्या प्रामाणिक आस्तिकांपेक्षा जास्त असली तरी ती तितकीशी मोठीही असू शकत नाही... कारण त्यांचे इतके सगळे गुणधर्म एका व्यक्तित असणे तितकेसे सामान्य नसते ! थोडक्यात : धूर्त आस्तिक लोक "अल्पसंख्य नसलेले पण बहुसंख्यही नसलेले", "धूर्त " आणि "अज्ञानी" असतात. आपण अज्ञानी असल्याचे ते जाणतात.

धूर्त नास्तिक

या लोकांचे वर्णपटातले स्थान नास्तिक लोकांच्या टोकाजवळ असते. त्यांचे मूळ गुणधर्म असे: १. देव या संकल्पनेबद्दल आपण अज्ञानी आहोत हे या लोकांना पक्के ठाऊक असते. २. परंतू देव या संकल्पनेचा विरोध करण्याशी या लोकांचे महत्त्वाचे हितसंबद्ध जोडलेले असतात. तसे करण्यामुळे त्यांना होणारा फायदा खालील एक किंवा अनेक प्रकारचा असू शकतो: (अ) चरितार्थ चालणे (आ) आर्थिक फायदा (इ) सामाजिक फायदा (ई) राजकीय फायदा, (उ) देव-धर्माचा बदला घेतल्याचे वैयक्तिक समाधान इ. आणि हे हितसंबद्ध त्यांच्यासाठी सर्वोच्च असतात, देवाचा विरोध हे केवळ एक साधन असते. यातल्या शेवटच्या प्रकारात; देवाची खूप विनवणी करूनही झालेल्या प्रेमभंगामुळे आलेला देवाचा तिटकारा, प्रेम असलेल्या व्यक्तीबरोबर लग्न न होऊ शकल्याने आलेला त्या व्यक्तीच्या देवा-धर्माचा तिटकारा, इ अनेक उपप्रकार असू शकतात... यातल्या काही केसेस तात्कालीक असतात व बसलेल्या धक्क्यातून सावरल्यावर काही कालाने सुधारतात तर इतर काही कायम स्वरूपी असू शकतात. ३. या लोकांमध्ये, देव या संकल्पनेला विरोध करणे हे (अगदी देवा-धर्माशी संबंध नसलेलाही) स्वार्थ साधण्याचे फार प्रभावी साधन म्हणून वापरण्याची विलक्षण हातोटी असते. मग तसे करताना असंबद्ध / अतार्किक / उपहासपूर्ण वाद घालणे यात यांचा हातखंडा असतो. मुद्दा उलटवल्यावर तो भरकटवून भलतीकडे नेण्यात यांचा हात धरणे कठीण असते. कारण आपला मुद्दा जिंकणे हाच त्यांच्या लेखी मुख्य मुद्दा असतो... सत्य, सारासारविवेक वगैरे इतर सर्व गोष्टी त्यापुढे दुय्यम असतात. ४. धर्मा-धर्मातल्या फरकांचाच नव्हे तर हिंदू धर्मासारख्या एकाच धर्मातल्या विविधतेचा फायदा हे लोक मोठ्या चलाखीने घेताना दिसतात... एखाद्या धर्मातील उणीव (सर्व धर्मात असे काही ना काही असतेच) हेरून त्याचा फायदा घेण्यात हे लोक पटाईत असतात. मात्र असे करताना सोईस्कर नसणार्‍या वस्तुस्थितीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात यांचा हातखंडा असतो. ५. अर्थातच, हे लोक सामाजिक आणि राजकीय सत्ताकेंद्रात अथवा सत्ताकेंद्राजवळ असल्यास आश्चर्य नाही... किंबहुना आर्थिक फायदा, पदभार, मानसन्मान यांची खैरात करत अश्या प्रकारच्या तथाकथित विचारवंतांची फौज पदरी बाळगणे ही सत्ताकेंद्रांची एक महत्त्वपूर्ण गरज असते. ६. यांची लोकसंख्या प्रामाणिक नास्तिकांपेक्षा जास्त असली तरी ती तितकीशी मोठीही असू शकत नाही... कारण त्यांचे इतके सगळे गुणधर्म एका व्यक्तित असणे तितकेसे सामान्य नसते ! थोडक्यात : धूर्त नास्तिक लोक "अल्पसंख्य नसलेले पण बहुसंख्यही नसलेले", "धूर्त " आणि "अज्ञानी" असतात. आपण अज्ञानी असल्याचे ते जाणतात. आतापर्यंत आपण पाहिलेले गट सामील करून तयार झालेला वर्णपट खालच्या आकृतीत दाखवला आहे...

 आस्तिक-नास्तिक वर्णपट : ०२

आतापर्यंत आपण पाहिलेले सर्व लोकगट अल्पसंख्य आहेत. मग उरलेल्या मोठ्या समूहाचे काय?

धोका प्रबंधक

उरलेल्या बहुसंख्य लोकसमूहातील बहुतेक लोक "धोका प्रबंधक" या वर्गवारीत मोडतात. हे का ? याचे उत्तर त्यांच्या खालील गुणधर्मात सापडेल. १. देव या संकल्पनेबद्दल आपण अज्ञानी आहोत हे या लोकांना ठाऊक असते किंवा कमीत कमी देव या संकल्पनेबद्दल त्यांच्या मनात खात्री नसते. २. परंतू त्याचबरोबर हे सत्य उघडपणे मानणे सामाजिक अथवा राजकीय दृष्टीने फायद्याचे / सोयीचे नाही हे त्यांना पुरेपूर ठाऊक असते. त्याशिवाय आपले मत उघडपणे व्यक्त करण्यामुळे होणारे दुष्परिणाम भोगण्याची त्यांची तयारी नसते. ३. वरच्या १ व २ मधील वस्तुस्थितीमुळे हे लोक "त्यांच्या आजूबाजूच्या सर्वसाधारण सामाजिक-राजकीय प्रवाहाबरोबर वाहणे" हा कमीत कमी धोकादायक पर्याय स्वीकारतात. असे लोक कडक कम्युनिस्ट राजवटीत निधर्मी असल्यासारखे तर कडक धार्मिक राजवटीत कर्मठ धार्मिक असल्यासारखे "वागतात". ४. अर्थातच हे लोक सत्ताकेंद्रातले नसून त्यांच्या धार्मिक-सामाजिक-राजकीय सत्ताकेंद्राने ठरवलेल्या नियमांचे पालन करणारी आणि आपले नेहमीचे जीवन शक्य तेवढे निर्धोक ठेवण्याच्या प्रयत्नात असलेली सामान्य जनता असते. ५. जर देव खरोखरच असला तर आपलाही दंडवत त्याच्या नावे असावा, झाला तर फायदाच होईल असाही एक व्यावहारीक धार्मिक विचार यांच्या मनात असतो... हे सुद्धा त्यांचे एक प्रकारचे धोका प्रबंधनच असते ! ६. वरच्या सर्व वस्तुस्थितीमुळे आपले मत अथवा चेहरा नसलेल्या या बहुसंख्य अगतिक गटाला "धोका प्रबंधक" हेच नाव योग्य आहे. थोडक्यात : धोका प्रबंधक लोक "बहुसंख्य", "परिस्थितीशी जुळवून घेण्यात चलाख" आणि "अज्ञानी" असतात. आपण अज्ञानी असल्याचे ते जाणतात. आतापर्यंत आपला वर्णपट खालच्या आकृतीत दाखवला आहे तसा झाला आहे...

 आस्तिक-नास्तिक वर्णपट : ३

पण आतापर्यंत पाहिलेल्या सर्व गटांनी जरी बहुतेक सर्व लोकसंख्येचे वर्गीकरण झाले असले तरी एक छोटा पण फार महत्त्वाचा गट शिल्लक आहे.

अज्ञेयवादी

आपल्या या वर्णपटात बरोबर मध्यभागी बसणार्‍या या गटाचे गुणधर्म खालीलप्रमाणे असतात: १. देव या संकल्पनेबद्दल आपण अज्ञानी आहोत हे या लोकांना पक्के ठाऊक असते. २. आपले हे अज्ञान उघडपणे व्यक्त करायला या लोकांना भिती अथवा लाज वाटत नाही आणि त्यामुळे होऊ शकणार्‍या धोक्याला सामोरे जाण्याची त्यांची तयारी असते. ३. "देव आहे" आणि "देव नाही" या दोन्ही दाव्यांबद्दलचे आपले अज्ञान उघडपणे मान्य करण्याबरोबरच आस्तिक आणि नास्तिक या दोन्हीं गटांचे दावे शास्त्रिय कसोटीवर जोखून त्यातले योग्य ते सत्य / अर्धसत्य "आहे तसे" स्वीकारण्याची त्यांची तयारी असते. त्याचबरोबर भविष्यात मिळणारे नवीन सबळ पुरावे स्वीकारून आपले मत त्याप्रमाणे बदलत राहणे त्यांना गैरसोयीचे अथवा मानहानीचे वाटत नाही. ४. सत्य आणि शास्त्र यांच्यावर श्रद्धा असणारे हे लोक शात्रज्ञ म्हणून यशस्वी होत असले तरी त्याच कारणामुळे राजकारणाशी त्यांचे जमणे कठीण असते. त्यामुळे कर्मठ नास्तिक (उदा. कम्युनिस्ट), धूर्त आस्तिक, धूर्त नास्तिक, मिथ्या-धर्मनिरपेक्ष किंवा कर्मठ धार्मिक प्रकारच्या राजसत्तांशी त्यांचा संघर्ष होऊ शकतो. ५. "देव या संकल्पनेबद्दल मला सत्य माहीत नाही... मी अज्ञानी आहे" हे सत्य उघडपणे मानत असल्याने यांना अज्ञेयवादी (agnostic) म्हटले जाते. ६. अर्थातच अश्या गुणधर्मांचे लोक समाजात फारच थोड्या संख्येने असणे आश्चर्यकारक नाही. थोडक्यात : अज्ञेयवादी लोक "अल्पसंख्य", "आपल्या मतांसाठी परिस्थितीशी टक्कर देण्यासाठी तयार असणारे", "प्रामाणिक" आणि "अज्ञानी" असतात. आपण अज्ञानी असल्याचे ते जाणतात आणि तसे उघडपणे कबूल करतात. या गटाबरोबरच आपला वर्णपट पुरा होतो. पूर्ण वर्णपट खालच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे दिसतो:

 आस्तिक-नास्तिक वर्णपट : ०४

सारांश

हे वरचे विश्लेषण खालील तक्त्यात सारांशाने दाखवले आहे.

 आस्तिक-नास्तिक वर्णपट : गुणधर्म सारांश

तुम्ही कोण म्हणून काय पुसता ?... आता, तुम्हीच ठरवा तुम्ही कोण ते !

प्रतिक्रिया द्या
67667 वाचन

💬 प्रतिसाद (220)
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 08/02/2014 - 14:48 नवीन
असाच विचार मानवजातीने केला असता तर आपल्यात आणि पोटातल्या जंतांत फार फरक पडला नसता ना :) आपण मिपावर लिहीण्यासाठी कलफलकावर बोटे नाचवण्याऐवजी हंटर-गॅदरर अवस्थेत कुठेतरी कंदमुळांसाठी खोदकाम करत असतो किंवा एखाद्या प्राण्याच्या शिकारीसाठी त्याच्या मागावर धावत असतो ना ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
क
कवितानागेश Sat, 08/02/2014 - 14:52 नवीन
जंतेदेखिल उत्क्रांतीत त्यांच्या खालच्या पायरीवर असलेल्यांबद्दल अस्साच विचार करत असतील!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 08/02/2014 - 15:04 नवीन
शक्य आहे ! सद्या माणसाच्या मानसिकतेचा विचार चालू आहे !! जंताच्या मानसिकतेचा विचार कोणीतरी हाती घेईल तेव्हा काहीतरी समजेलच :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
प
प्यारे१ Sat, 08/02/2014 - 15:10 नवीन
ह्याचा व्यत्यास घेऊ या का? माणसांबद्दल सर कसा विचार करत असतील ????????? =)) विचार करत असतील तर? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
क
कवितानागेश Sat, 08/02/2014 - 20:01 नवीन
पण जंताला आणि माणसाला, एकमेकांच्या मानसिकतेचा अभ्यास करणं शक्य होईल का? अजून तर आपल्याला आपल्या बरोबरचे इतर प्राणी समजत नाहीत. अगदी 'माणूस' देखिल नाही. तिथे जंत कुठे समजणार? आणि 'देव' म्हणून कुठली सिस्टम असेल तर तीतरी कशी काय समजणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 08/03/2014 - 08:47 नवीन
अजून तर आपल्याला आपल्या बरोबरचे इतर प्राणी समजत नाहीत. अगदी 'माणूस' देखिल नाही. तिथे जंत कुठे समजणार? आणि 'देव' म्हणून कुठली सिस्टम असेल तर तीतरी कशी काय समजणार? या प्रतिसादानं तुम्ही आपण सारे अज्ञानी आहोत हे जाणलंत :) "आपल्याला एखाद्या गोष्टीचे काहीच / संपूर्ण ज्ञान नाही" हे समजणे ही त्या गोष्टीचे सखोल ज्ञान मिळवण्याची पहिली पायरी असते. अर्थात त्याच पायरीवर न थांबता ज्ञानार्जनाचे / शोधाचे प्रयत्न चालू ठेवले तरच आपण ज्ञानाच्या वरवरच्या पायर्‍यांवर जाऊ शकतो... पण, शिखरावर पोहोचू किंवा नाही हे तेथे गेल्याशिवाय कळणार नाही. थांबला तो (वैचारिक / बौधीक / आध्यात्मिक / धार्मिक / इ सर्व संदर्भात) संपला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
प
प्यारे१ Sun, 08/03/2014 - 12:04 नवीन
ज्ञान की माहिती? सगळ्यातली सगळी माहिती मिळणं सोडाच, एकाच विषयातली देखील १००% माहिती कुणाला असेल असं मला वाटत नाही. बरं ती मिळाली तरी त्याचं काय करायचं हे जोवर 'उमग'णार नाही तोवर उपयोग शून्य. असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
क
कवितानागेश Sun, 08/03/2014 - 12:14 नवीन
सध्या आपण 'माहिती'लाच ज्ञान म्हणत आहोत. खरे ज्ञान म्हणजे काय समजण्यासाठी धागा काढता येणार नाही. ती ज्याची त्यानी निस्तरायची गोष्ट आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Sun, 08/03/2014 - 12:37 नवीन
'तरण्याची गोष्ट' जास्त बरं काय गं? तू ज्ञानी आहेस असं सरांच्या बोधीवृक्ष क्लासमध्ये अर्धवटराव यशोधराला सांगताना मूकवाचकनं पाहिलं असं धन्या प्रगो आणि बॅमॅ बरोबर चहा पिताना म्हणाला. स्नेहा, इ ए, चौरा, अ आ सगळे चहाची ऑर्डर देऊन चहा यायची वाट बघत होते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 08/03/2014 - 12:37 नवीन
आतापर्यंत माहिती असणे ही पहिली पायरी आणि तिचा खरा अर्थ माहित होणे म्हणजे ज्ञान असेच समजत आहे. माहितीविना कैचे ज्ञान ? (ज्ञानात माहिती अध्याहृत असते असे समजणारा आणि त्याबाबतीत उगा केशदुभंग करत न बसणारा) इए :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Sun, 08/03/2014 - 13:05 नवीन
माहिती नसूनही ज्ञान 'होतं' कारण ते आत 'असतं'. माहिती शिवाय सुद्धा ज्ञान मिळू शकतं. बाकी ज्ञानात माहिती असते ह्याबाबत दुमत नाही. उदाहरणार्थः एखादा एकदम जंगलातला छान गाणारा आदिवासी असला तर त्याला तालासुराची माहिती नसली तरी ज्ञान असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
क
कवितानागेश Sun, 08/03/2014 - 13:30 नवीन
बरं मग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Sun, 08/03/2014 - 14:22 नवीन
चहाचं बघा जरा. लय झाल्या गफ्फा. त्याबरोबर काही च्याऊमाऊ पण. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 08/03/2014 - 14:52 नवीन
उदाहरणार्थः एखादा एकदम जंगलातला छान गाणारा आदिवासी असला तर त्याला तालासुराची माहिती नसली तरी ज्ञान असतं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
च
चित्रगुप्त Sun, 08/03/2014 - 13:42 नवीन
'आपणासि जाणावे आपण, या नाव ज्ञान' ... येर ती पोट भरायाची विद्या... असे समर्थ सांगून गेलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
प्यारे१ Sat, 08/02/2014 - 14:55 नवीन
'मेन इन ब्लॅक' मधली मांजरीच्या गळ्यात अडकवलेली गॅलक्सी आठवली. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
अ
अर्धवटराव Sun, 08/03/2014 - 16:07 नवीन
हेज् पार्टीकल शोधणार्‍या टीमने कल्पनातीत मेहनत करुन थेरॉटीकल फिजीक्स आणि एक्सपेरीमेण्टल फिजीक्सची अफलातून सांगड घालुन सर्न प्रयोगशाळेत एल.एच.सी बनवला. प्रोटॉनबीमचा मारा करुन हेज् पार्टीकल शोधुन काढले देखील. हे पार्टीकल जी.इ.व्ही युनीट मधे मोजतात. या मुलकणांना केंद्राशी ठेवुन इतर पार्टीकल तयार होतात व त्यापासुन पुढे सब-अ‍ॅटोमीक पार्टीकल-अ‍ॅटम, आणि विश्व अशी साधारण रचना भौतीकशास्त्राने मांडली आहे. यात गंमत अशी, कि जर हे मूलकण ११४ युनीटचे असतील तर तर त्यापासुन आपलं 'युनी'व्हर्स तयार व्हायची शक्यता असते आणि जर ते १५०च्या जवळपास असतील त्यापासुन 'मल्टीव्हर्स'ची शक्यता असते (संशोधकांच्या शब्दात सांगायचं तर आजवरचं सगळं फिजीक्सचं मुसळ केरात गेलं...सर्व मांडानी नव्याने करायला लागणार) प्रयोगांती हे मुलकण १२५ युनीटचे निघालेत (सध्यातरी). आजघडीला फीजीक्स एका दुभंगलेल्या रस्त्याच्या जोडबिंदुवर उभं आहे... युनीव्हर्स कि मल्टीव्हर्स हा आता पुढील शोध असणार आहे. पण नोंद घेण्यालायक एक गिष्ट अशी आहे कि १२५ युनीटचे असल्यामुळे हे मूलकण अजीबात 'स्टेबल' म्हणवता येत नाहि. त्यामुळे विश्व सतत ऑन द व्हर्ज ऑफ डीस्ट्रक्शन उभं आहे. आता त्या टीम मधला एक वैज्ञानीक म्हणतो कि याचा अर्थ काय असावा ? कुणीतरी 'मुद्दाम' या युनीटला हे पार्टीकल्स सेट केलेत, व आपल्याला जगायची संधी दिलीय? कि हि केवळ अपघातांची एक मालिका आहे (आणि तसं असेल तर इट्स ऑल क्रॅप... असं तो म्हणतो). अर्थात, त्यांच्याकरता हा केवळ थेअरीचा भाग... मिपावर सुरु असलेल्या घनघोर चर्चेमुळे हे सगळं आठवलं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
क
कवितानागेश Sun, 08/03/2014 - 17:20 नवीन
कदाचित आधी पुष्कळ वेळा वेगळी युनिट्स तयार होउन सगळी रचना पुन्हा पुन्हा कोसळली असेल आणि आता ह १२५ चा पुन्जका स्टेबल राहिल्यानी आहे ते तसे दिसतय आपल्याला.... पण तरीही ही थ्री डिमेन्शन्समधली युनिवर्स/मल्टिवर्सची थिअरी झाली. ३च्या वरच्या डिमेन्शन्सबद्दल अजून आपल्याला काहीही माहित नाही. (निदान मला तरी नाही!!) ;) शिवाय डिरॅकची अ‍ॅन्टीपार्टिकल थिअरी आहेच पुन्हा सगळे अश्याच 'ऑन द व्हर्ज ऑफ डीस्ट्रक्शन' वर आणून सोडायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
प
प्यारे१ Sun, 08/03/2014 - 17:33 नवीन
ए मी बोलू, मी बोलू? 'उपजे ते नासे' म्हणजे ज्याची उत्पत्ती झाली आहे त्याचा नाश होणार आहे हे जुन्या अडाणी लोकांना आधीच माहिती होतं. म्हणून समजा तुमचं युनिव्हर्स काही बिलियन वर्षं जरी टिकलं तरी ते जाणार असल्यानं त्यात आम्हाला इन्टरेस्ट नाही असं हे जुने अडाणी म्हणालेत. आम्हाला काही 'परमनंट' गोष्ट सांगा असं ते म्हणतात आणि नुसते म्हणत नाहीत तर आम्हाला त्याची अनुभूति आली आहे असंही म्हणतात. नवलच की! हे मिपावर शेजारी चित्रं लावलेले दोन अडाणी त्यातलेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
ट
टवाळ कार्टा Sun, 08/03/2014 - 17:54 नवीन
4th dimention is Time
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा