गांधीबाबा,त्याची अहिंसा आणी आपण ?
गांधी.......
काहीही म्हणा मित्रांनो,बापुने दिलेला अंहिसेच्या मंत्राला प्रत्यक्षातले अहिंसकच जास्त शिव्या घालताना दिसतात, आज जे जे गांधीच्या अंहिसेच्या आंदिलनाला शिव्या घालताना दिसतायेत त्यातिल किती जणांनी प्रत्यक्ष शस्त्र हातात धरले आहे,किंवा सशस्त्र आंदोलनाच्या बाता मारणार्यांपैकी कितीजणांनी आपल्या आजुबाजुला अथवा स्वतःवर होणार्या अन्यायाविरुद्ध स्वतः सशस्त्र प्रतिकार केला आहे.
मला खरच गंमत वाटते,माझ्या ६ वर्षाच्या लेकीला कळत की बापाचे पिस्तुल हातात घेताना ते पुर्ण रिकामे आहे की नाही हे विचारुनच त्याला हात लावावा,मग या गाढवांना का कळत नाही की अशा गोष्टींचे तोटे किती आहेत,बंदुकीच्या गोळीला हे माहिती नसते रे समोरचा कोन आहे,अथवा तलवारीच्या धारेला वेदना नसते,ती असते जिवंत प्राण्याला.आभासी जगात बाता मारण्यापेक्षा किती जणांनी रस्त्याने अथवा कॉलेजमध्ये आया बहिणींच्या छेडछेडाची विरोध केलाय. आमच्या रियल इस्टेट मधले चार टगे समोर उभे राहिले व त्यांनी कारण नसताना आया बहिणीवरुन शिव्या दिल्या तरी मान खाली घालुन जाणारी पांढरपेशी जमात,गांधींना शिव्या घालण्यात मात्र सगळ्यात पुढे असते.
दुर्देव आहे ज्या गांधीमुळे तुम्ही रक्ताचा एकही थेंब न सांडता सहज सत्तांतर करु शकता, तेच जर या देशात हुकुमशाही असती तर.....
अरे तुमच्या मालकीच्या जागेत फुटभर रस्ता काढण्याचाही हा देशातल्या सरकारला अधिकार नाही, येथे तुम्ही कितीही वरिष्ठ नेता अथवा अधिकार्याला कोर्टात खेचु शकता,खरच स्वतःच्या आंतरात्म्याला साक्षि ठेवुन सांगा हा पंचातला गांधीबाबा नसता तर हे शक्य झाले असते.
💬 प्रतिसाद
(85)
म
मृत्युन्जय
गुरुवार, 10/02/2014 - 09:55
नवीन
दुर्देव आहे ज्या गांधीमुळे तुम्ही रक्ताचा एकही थेंब न सांडता सहज सत्तांतर करु शकता, तेच जर या देशात हुकुमशाही असती तर.....
गांधी महान खरे पण स्वातंत्र्य त्यांच्यामुळे मिळाले असे मानणे हा प्रचंड मोठा मुर्खपणा आहे.
आमच्या रियल इस्टेट मधले चार टगे समोर उभे राहिले व त्यांनी कारण नसताना आया बहिणीवरुन शिव्या दिल्या तरी मान खाली घालुन जाणारी पांढरपेशी जमात,
यात चूक पांढरपेशा जमातीची नसून रियल एस्टेट मधल्या त्या हरामखोर टग्यांचा आहे याकडे का दुर्लक्ष करता. आयाबहिणीं वरुन शिव्या देउन दादागिरी करणारे बहुधा आभाळातुन टपकलेले असतात.
अरे तुमच्या मालकीच्या जागेत फुटभर रस्ता काढण्याचाही हा देशातल्या सरकारला अधिकार नाही,
खरे की काय? ऐकावे ते नवलच.
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
गुरुवार, 10/02/2014 - 14:05
नवीन
देशाला स्वातंत्र्य दुसर्या महायुद्धामुळे त्याने ब्रिटीश साम्राज्य मानसिक व आर्थिक दृष्ट्या खचले, त्याने मिळाले ,
गांधी व सुभाष ह्यांनी योग्य वेळी आपापल्या मार्गाने योग्य वेळ साधून ब्रिटीश साम्राज्यावर हल्ला चढवला ,
सरत शेवटी सत्तेचे लोणी नेहरू व जीना खाऊन तृप्त झाले.
जीना ह्यांच्या डायरेक्ट ऍक्शन ह्या बार्बारिक कृत्याच्या हाकेला
गांधी व त्यांची अहिंसा साफ विफल झाली , अल्पसंख्याक गटाने हिंसेच्या जोरावर बहुसंख्य समूहावर हा विजय मिळवला.
अरे ला कारे पहिल्याच वेळी म्हणणारा नेता त्यावेळी भारतात गांधी एवढे राजकीय महात्म्य राखून नव्हता.
पाकिस्तान झाल्यावर ह्यांची सत्तेची जागेची भूक भागेल अशी सुतराम शक्यता त्यावेळी त्यांच्या कृत्यातून दिसत नव्हती तेव्हा पाकिस्तानला संमती देण्यात काहीही अर्थ नव्हता.
पूर्वी गुजरात मध्ये २००२ पर्यंत साठीचे रोग जसे आलटून पालटून वर्षाआड येतात तश्या दंगली व्हायच्या , मात्र २००२ नंतर एकही दंगल आजतागायत झाली नाही ,
१९९२ नंतर मुंबईत झाली नाही , कारण
अरे ला कारे तो पर्यंत कोणी म्हटले नव्हते
दंगलीत सामान्य माणूस भरडला जातो म्हणून त्या होऊ नये असे वाटते. दुर्दैवाने युपी मध्ये त्या नियमित स्वरुपात होतात.
ज्या देशाल शोले सिनेमा आजही लोकप्रिय टिकवून आहे तेथे
हिंसा ही अहिंसेवर अनेकदा विजय मिळवतांना आपण वृत्त पत्रातून नित्यनियमाने वाचत असतो.
- Log in or register to post comments
उ
उदयन
Fri, 10/03/2014 - 10:18
नवीन
इतके विनोदी लिहित जाउ नका.. दंगल झाल्यात परंतु मिडीयाने दाखवल्या नाहीत काही दिवसांपुर्वी वडोदरा पेटलेले कुठे वाचले आहेत का सांगा जरा
इतका लाळघोटेपणा करु नये
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Sat, 10/04/2014 - 09:19
नवीन
बीबीसी हिंदीवर न्युज आली होती फोटोंसहीत.
आणी हो वडोदरा पेटलेले बिटलेले काही नव्हते हां !
मुळात दोन घटना घडल्या त्या काळात. एक मुस्लिम वि. मुस्लिम दुसरी मुस्लिम वि. हिन्दु
डिटेल्स हव्यातर त्यापन देतो.उगाच रक्त नका हो जाळु स्वतःच.
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
गुरुवार, 10/02/2014 - 10:07
नवीन
तुमचे विचार पटण्यासारखे आहेत. पण अहिंसेची महती सांगताना तुम्ही स्वतःकडे बंदूक असल्याचा उल्लेख केला आहे. ते रोचक वाटलं. ज्यासाठी तुम्ही बंदूक ठेवली आहे ते प्रॉब्लेम्स अहिंसेने सुटणार नाहीत असं तुम्हाला वाटलं का?
- Log in or register to post comments
ब
बाबा पाटील
गुरुवार, 10/02/2014 - 10:15
नवीन
मग काय रक्तरंजित क्रांती करायची होती,देश म्हणजे काय ? अथवा हा भारत देश याची तरी सिंधुपासुन कन्याकुमारीपर्यंत जाणिव होती का. गांधींनी देश स्वतंत्रच नाही तर एकत्र आणला,एका झेंड्या खाली आणला अन्यथा इथले राजे महाराजे, संस्थानिक यांनी काय काय केले असते याचा विचार करा गांधीबाबाने सामान्य माणसाला एक आत्मविश्वास दिला,तो खुल्या दिलाने मैदानात उतरला,स्त्रिया,शेतकरी,कामगार असे सगळेच लढ्यात उतरले, हे फक्त अहिंसेच्या मुळे,अन्यथा १८५७ लाच देश स्वतंत्र झाला असता नाही का ? ज्यात इंग्रजांइतकेच अत्याचार बंडवाल्यांनी केले. शस्त्र हाती असलेल्या जमावाला भान नसत सायबा,एक जुनी म्हण आहे क्रांती तिचीच पिल्ले खाते,याचा अनुभव भारतातही नक्कीच आला असता, असा आला देखिल,पण मर्यादित स्वरुपात होता. अभ्यास वाढवा हो.
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Fri, 10/03/2014 - 09:16
नवीन
सन्मानाने देश परत मिळवण्याचा एकमेव मार्ग सशस्त्र लढ्याचा होता. गांधींचे देशाच्या स्वातंत्र्य ल\ढ्यातील योगदान नाकारु पाहणारा मुर्ख असेल. तसेच स्वातंत्र्य त्यांच्यामुळे मिळाले असे म्हणणेही मुर्खपणाचे आहे. इंग्रजांनी गांधीजींना ५ दशके भीक घातली नाही. त्यापुढेही घातली नसती. परंतु दुसर्या महायुद्धानंतर त्यांना इतके देश सांभाळणे अवघड होउन बसले. शिवाय भारतात लुटायला फार काही उरले नव्हते. होते ते पुरते लुटुन झाले होते. बाकी लुटण्यासाठी स्वातंत्र्य देउनही सनदशीर मार्ग अस्तित्वात होते.
शिवाय दूसरर्या महायुद्धानंतर अमेरिकेने इंग्लंडवर त्यांच्या अधिपत्याखालील देशांना विशेषतः भारताला स्वातंत्र्य देण्याबाबत प्रचंड दबाव आणला. तसे केले असते तरच स्वतःची लोकशाहीचे संवर्धक म्हणून प्रौढी मिरवता आली असती. नाहितर ते आणी हिटलर एकाचा तराजूत गेले असते.
दूसरर्या महायुद्धानंतर इंग्लंड बेचिराखच झाला होता. एकावेळेस स्वदेश आणी दूरवरची संस्थाने यावर अंमल ठेवणे त्यांना आर्थैकदृष्ट्या शक्य नव्हते.
या सर्व कारणांंमुळे त्यांनी भारताला स्वातंत्र्य दिले. देशाला एकत्र आणणे आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्य करु शकतील अश्या लोकांची मोट बांधणे याचे श्रेय नि:संशयपणे गांधीजींचे.
दुसर्याला अभ्यास वाढवा असे सांगण्यापुर्वी स्वतः एवढा अभ्यास कराच पाटील.
शस्त्र हाती असलेल्या जमावाला भान नसत सायबा
शस्त्र हाती असलेल्या एकेकट्या माणसाला तरी भान असते का की शस्त्राची गर्मी अंगात गुर्मी आणते?
- Log in or register to post comments
क
काउबॉय
Fri, 10/10/2014 - 08:21
नवीन
पण ब्रिटन एव्हडा कमकुवत झाला होता तर सशस्त्र लढाच का उभारला गेला नाही ?
तसेच गांधी अस्तित्वात आले नसते तरीही महायुध्दानंतर ब्रिटनवर स्वातंत्र्य देण्याचा दबाव आला असता काय ? (मग एकुणच स्वातंत्र्य लढयातिलांचे स्वतंत्रतेत प्रत्यक्ष प्रभावी योगदान हा वेगळाच विषय उपस्थित होतो)
- प्रामाणिक उहापोह अपेक्षित.
- Log in or register to post comments
ब
बाबा पाटील
गुरुवार, 10/02/2014 - 10:16
नवीन
म्हणुनच अहिंसेच म्हणन पटतय. आणी त्याविषयी अधिकाराने बोलु शकतो.
- Log in or register to post comments
प
प्रतापराव
गुरुवार, 10/02/2014 - 13:32
नवीन
बाबा पाटील लेख अत्यंत आवडला. वास्तविक जीवनात नेभळटा सारखे जगणारे लोकच अहिंसेला शिव्या घालतात.भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सर्वात मोठे योगदान हे गांधीजीन्चेच होते. जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटीश सर्कार्विरुद्धात सशस्त्र लढा आपण कुठल्या आधारावर करणार होतो.जे नेते हिंसेच्या बाजूने होते त्यांना लोकांची सहानभूती होती मात्र लोकशक्ती कधीच त्यांच्या मागे उभी राहिली नाही. गांधीजींनी जो अहिंसेचा जादुई वापर केला त्यानेच सारा देश त्यांच्या पाठीशी उभा राहिला प्रत्येकाला गांधीजींच्या आंदोलनामुळे आपण हि स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग आहोत हे अनुभवता आले.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
गुरुवार, 10/02/2014 - 13:53
नवीन
अहो प्रतापराव ते सगळं खरं. पण गांधींनी कोलू ओढलाय का कधी?
- Log in or register to post comments
प
प्रतापराव
गुरुवार, 10/02/2014 - 14:14
नवीन
पण गांधीजींच्या लेखात सावरकरांना ओढून ताणून का आणले जातेय ते कळत नाही.
उद्या सावरकरांचे राष्ट्रकार्य ह्यावर लेख लिहला तर दुसरा म्हणेल कोलू ओढला ते ठीक आहे पण ते भगतसिहाप्रमाणे देशासाठी शहीद का झाले नाही.ह्या गोष्टीला काही अर्थ आहे का?
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
गुरुवार, 10/02/2014 - 14:17
नवीन
लोकांना इतके कळायला लागले तर काय घ्या. सगळीकडे जमेल तशी घाण करुन ठेवायची आणि मग मोदींचे स्वच्छ भारत आंदोलन अयशस्वी झाले असे ओरडत सुटायचे.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
गुरुवार, 10/02/2014 - 14:33
नवीन
हो मात्र गांधीजयंतीला गांधींमुळे स्वातंत्र्य मिळाले हा मूर्खपणा आहे एवढे ओरडत सुटायचे म्हणजे लोकांना जरा कळायला लागेल.
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Fri, 10/03/2014 - 09:02
नवीन
किमान गांधीजयंतीच्या धाग्यावर सावरकरांच्या नावाने ओकार्या नाही काढल्या तरी लोकांना कळायला लागेल. धागा गांधींबद्दल आहे तर त्यांच्याबद्दल बोला. त्यांना महान म्हटलेले तुम्हाला दिसले नाही. एखाद्याने गांधींवर काही टीका केली की लगेच लोकांना सावरकरांच्या नावाने ओकार्या का काढावाश्या वाटतात कोण जाणए? ते सुद्धा सावरकरांचा धाग्यात किंवा प्रतिसादात कुठेही उल्लेखही केलेला नसताना.
असो. विजयादशमीच्या शुभेच्छा.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Fri, 10/03/2014 - 11:45
नवीन
महाशय, या धाग्यावर गांधींना स्वातंत्र्याचे श्रेय देणे हा मूर्खपणा असल्याचा सर्वात पहिला प्रतिसाद तुमचा आहे. (थोडक्यात सुरुवात कोणी केली?) नंतर सावरकरांच्या नावाने ओकाऱ्या निघणार आहेत याचे स्वप्न पडले होते की काय? गांधींनी कोलू ओढला का या शब्दात सावरकरांची ओकारी कुठे दिसली? कोलू या शब्दावर सावरकरांचा कॉपीराईट आहे काय? सावरकर वगळता इतर कोणी कोलू ओढला नाही वाट्टं!
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Fri, 10/03/2014 - 12:32
नवीन
मी गांधींच्या धाग्यावर गांधींचे महानपण मान्य करुन योग्य त्या गोष्टीबद्दल प्रतिसाद दिला नव्हता, कोलू आणी सावरकरांचा काय संबंध असे तोंड वर करुन विचारणे म्हणजे सौ चूहे खाकर.....
कोणी गांधींवर टीका केली की सावरकरांवर पण टीका होणारच असे गृहीत का धरले पाहिजे म्हणे.
असो. सावरकरांच्या नावाने तुम्ही ओकार्या काढल्या असे मी तरी कुठे म्हणालो आहे? तुम्हाला काय स्वप्न पदले काय?
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Tue, 10/07/2014 - 14:05
नवीन
मधला केवळ हा शब्द खाल्लात काय हो? ड्राय डे चा एव्हढा परिणाम?
केवळ गांधींमुळे स्वातंत्र्य मिळाले हा मूर्खपणा आहे
- Log in or register to post comments
अ
असंका
गुरुवार, 10/02/2014 - 14:19
नवीन
काहीच अर्थ नाही. अशी तुलना होऊच शकत नाही.
(असं म्हणायची ही जागा नाही खरं, पण एकदम चपखल उदाहरण दिलंत!)
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
गुरुवार, 10/02/2014 - 14:32
नवीन
परफेक्ट.
- Log in or register to post comments
श
शिद
गुरुवार, 10/02/2014 - 14:35
नवीन
१००% सहमत.
तसेच "पण सावरकरांच्या लेखात गांधीजींना ओढून ताणून का आणले जातेय ते कळत नाही" हे सुद्धा लागू होतंय.
- Log in or register to post comments
अ
असंका
गुरुवार, 10/02/2014 - 13:43
नवीन
एवढं रोखठोक लिहिताल, तर धाग्यावर प्रतिक्रिया द्यायला कोण थांबेल? त्यात आणि फारच थोडक्यात आटोपतं घेतलंत. अजुन लिहा....
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
गुरुवार, 10/02/2014 - 14:29
नवीन
जरा विषयांतर होईल पण खरे तर मला जे वाटते ते चर्चा सत्रात एक धागा काढून आपले मत मांडावे असे मला वाटते पण ह्या विषयावर आज चर्चा नको , असे मला वाटते.
पण ओझरता उल्लेख करतांना असे म्हणतो ,
क्रांतिकारक असो किंवा गांधी ह्यांचा इंग्रजांशी लढा योग्य होता का
त्याचवेळी गाडगे महाराज , फुले , आंबेडकर , रानडे , कर्वे पिता पुत्र हे समाजात आपल्या परीने समाजात सुधारणा आणत होते.
हजारो वर्ष चालत आलेल्या अनेक रूढी व परंपरा कधी कायदा करून तर कधी लोकांचे मत परिवर्तन करून समाजात आणत होते,
सुशिक्षित समाज मिळालेले स्वातंत्र्य अधिक सक्षमतेने भोगू शकतो.
- Log in or register to post comments
अ
असंका
गुरुवार, 10/02/2014 - 14:37
नवीन
अर्थ काय घ्यायचा ह्याचा?
(तो जोक आठवला..किती वेळा वाटते! सरळ मिक्सरमधून काढावे?)
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Fri, 10/03/2014 - 13:48
नवीन
गांधींच्या धाग्यावर मृत्युंजय ह्यांच्या संपूर्ण प्रतिसादाला मी सहमत होईल अशी पुसटशी शंका सुध्धा माझ्या मनाला काळ परवा पर्यंत शिवली नव्हती पण आज ह्या प्रतिसादाला सहमत आह
फक्त त्यात थोडी भर घालू इच्छितो.
दुसर्या महायुद्धाचे फलित म्हणजे ब्रिटन मध्ये मजूर पक्षांची पहिल्यांदा सत्ता , आणि त्यांच्या जाहीरनाम्यात पूर्वीच भारताला स्वातंत्र्य देण्याचे म्हटले होते ,
दुसरा मुद्दा म्हणजे नुसती अमेरिका नाही तर रशिया सुद्धा वसाहतीवादाच्या विरोधात इंग्लंड वर दबाव आणला. ह्या तिन्ही देशाच्या प्रमुखांची युद्धानंतर च्या बैठकीत ह्या मुद्यांवर जोर दिला त्यामागे काही प्रमुख कारण माझ्या मते वेगळे होते.
मला असते वाटते की दुसर्या महायुद्धाचे फलित म्हणजे जागतिक पटलावर रशिया व अमेरिकेचा उदय ह्यात अमेरिकेला बाजारपेठ तर रशियाला आपली विचारसरणी जगावर लागायची होती किंबहुना अमेरिकाला जग आपल्या विचारसरणीत रानागावयाचे होते जर वसाहती देशांनी आपल्या वसाहती कायम ठेवल्या असत्या तर फ्रेंच व इंग्रज ह्यांनी दुसर्या महायुद्धाचे नुकसान वसाहतींच्या कडून वाट्टेल त्या मार्गाने भरून काढून परत आपले वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न केला असता दुसरा मुद्दा असा कि वसाहतीत इंग्रज व फ्रेंच लोकांनी असमतोल व्यापारी कायदे कायम ठेवले असते व अमेरिकेला आपले उत्पादन विकणे अशक्य झाले असते , सगळ्यात महत्वाचे म्हणजे युरोपवर पर्यायाने जगावर त्यांची पकड सैल झाली असती , ज्या दिवशी भारत इंग्रजांच्या हातातून निसटला तसे ब्रिटीश राजकीय सामर्थ्याला जगाच्या अवकाशात ग्रहण लागले ,आज ब्रिटन ची ओळख जगात अमेरिकन पोलिटीकल बीच अशी आहे ,
अवांतर
पोलिटीकल बीच हा केजीबी च्या शब्दकोशातील आवडता व महत्वाचा शब्द आहे , त्यांच्या अनुषंगाने एक लेख लिहिण्याचा मानस आहे पाहूया कधी वेळ मिळतो ते .
बाकी त्यांची एक पिढी नष्ट झाल्याने त्यांच्या लोकांची मानसिकता
पार ढासळली होती , जगात अधिकारी म्हणून ज्यास ते नाखूष होते कारण येथे त्यांनी युद्धात सर्वस्व गमावले होते.
अश्यावेळी लोहा गरम हे , मार दो हातोडा हाय ठाकूर च्या डायलॉग प्रमाणे गांधी ह्यांनी चळवळ उभारून मौका देख के चौकां मारला.पण ह्यात खरी सिक्सर मारली ती त्यांच्या अनुयायांनी सत्तेचा गोळा मटकावला व गांधीना मोडीत काढण्याचा प्रयत्न झाला , गांधीचे आपल्याच अनुयायांच्या विरोधात उपोषण केलेले पाहून ह्या लोकांनी कधीतरी मानाने गांधीवाद समजून आत्मसात केला होता का ह्यांची शंका येते ,
गांधीच्या समोर मोठी झालेली इंदू ने पुढे राजकारणात केलेले राडाकरण पाहता गांधी कुठेतरी अनुयायी घडविण्यात कमी पडले की मुद्दलात म्हणजे त्यांचे विचारच पराकोटीचे नैतिक व वास्तवाशी विसंगत होते म्हणून बदलत्या कालखंडात ते लोकांत जीरपले नाही.
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Fri, 10/03/2014 - 13:54
नवीन
@अर्थ काय घ्यायचा ह्याचा?
ह्याचा अर्थी सोपा आहे तुम्हाला नक्की काय आठवले हे मला माहिती नाही ह्या धाग्याचा विषय वेगळा आहे , व मला जो विषय अभिप्रेत आहे त्या बद्द्ल एकेकाळी समाजात चर्चा झालेली आहे.
टिळक विरुद्ध आगरकर असा वाद पूर्वी गाजला होता ह्यात आजची परिस्थिती व अजूनही अर्ध्याहून जास्त भारताचे १८ व्या शतकातील सामाजिक जीवन पाहता आगरकरांचे विचार मला अधिक महत्त्वाचे वाटतात.
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 10/02/2014 - 15:00
नवीन
आमच्या रियल इस्टेट मधले चार टगे समोर उभे राहिले व त्यांनी कारण नसताना आया बहिणीवरुन शिव्या दिल्या
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Fri, 10/03/2014 - 09:03
नवीन
१००% सहमत
- Log in or register to post comments
ब
बाबा पाटील
गुरुवार, 10/02/2014 - 15:12
नवीन
बादरायण संबध जोडु नका,माझ्या वैद्यकिय व्यवसायाचा माझ्या इतर गोष्टींशी काही संबध नाही, बाहेरच्या जगातल्या गोष्टी मी कुठल्याही परिस्थितीत दवाखाण्याच्या व घराच्या उंबर्याबाहेरच ठेवुन जातो, येथे मी माझ्या कुठल्याही व्यवसायाचा उल्लेख केला नसताना तुम्ही तो का जोडताय हे कळत नाहिये.
संपादक मंडळींना विनंती कृपया रेवतीताईंचा वरिल प्रतिसाद उडवावा अन्यथा माझा धागाच काढुन टाकावा.
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 10/02/2014 - 15:36
नवीन
काही हरकत नाही. संमंला वाटल्यास किंवा आपल्याला अस्वस्थता आली असल्यास माझा प्रतिसाद नक्कीच उडायला हवा.
तुम्हाला त्रास देण्याचा हेतू नाही, पण वाचक म्हणून आमच्या मनात प्रतिमा असते ते तरी आपल्याला समजेल अशी आशा! तुमच्या वैद्यकीय ज्ञानाचा मला आदर आहे.
- Log in or register to post comments
ज
जेपी
गुरुवार, 10/02/2014 - 16:15
नवीन
+1 टु रेवती आज्जी.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 10/02/2014 - 17:12
नवीन
>>> अरे तुमच्या मालकीच्या जागेत फुटभर रस्ता काढण्याचाही हा देशातल्या सरकारला अधिकार नाही, येथे तुम्ही कितीही वरिष्ठ नेता अथवा अधिकार्याला कोर्टात खेचु शकता,खरच स्वतःच्या आंतरात्म्याला साक्षि ठेवुन सांगा हा पंचातला गांधीबाबा नसता तर हे शक्य झाले असते.
नक्कीच शक्य झाले असते.
- Log in or register to post comments
अ
अवतार
गुरुवार, 10/02/2014 - 21:40
नवीन
हो. कदाचित शक्य झाले असते. इथे मूळ मुद्दा हा आहे की स्वातंत्र्य हे कोणाही एका व्यक्ती किंवा संघटनेमुळे मिळाले नसून या देशातील सर्व सामान्य जनतेच्या संघटित लढ्यातून मिळाले आहे. गांधींचे राजकीय महात्म्य हेच की त्यांनी हे सर्वात आधी ओळखले.
१८५७ च्या लढ्यात प्रथमच हिंदू आणि मुस्लिम विरुद्ध ब्रिटीश अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणूनच १८५७ नंतर ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक जनतेची हिंदू-मुस्लिम अशी विभागणी करायला सुरुवात केली. त्यातूनच मुस्लिमांना झुकते माप देणे, मुस्लिम राजकीय नेतृत्वाला पद्धतशीरपणे पुढे आणणे हे ब्रिटिशांचे सत्ता टिकविण्याचे सूत्र होते. हिंदू आणि मुस्लिम विरुद्ध ब्रिटीश हे समीकरण बदलून ब्रिटीश आणि मुस्लिम विरुद्ध हिंदू असे करणे हा त्यामागील प्रमुख उद्देश होता.
साधारणत: विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून कॉंग्रेसच्या नेत्यांना हे समीकरण बदलण्याची गरज वाटू लागली. त्यातूनच पुढे ब्रिटीश तुम्हाला जे देतील त्यापेक्षा अधिक आम्ही देऊ ही कॉंग्रेसच्या राजकारणाची दिशा राहिली. १९१५ मध्ये कॉंग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात लोकमान्य टिळकांच्या अध्यक्षतेखाली झालेला लखनौ करार ही त्याचीच परिणती होय. ह्या सर्व घडामोडी चालू असतांना गांधींचा भारतीय राजकारणात धड प्रवेश देखील झाला नव्हता. गांधींनी टिळकांच्या आणखी दोन पावले पुढे जाऊन मुस्लिमांच्या खिलाफत आंदोलनाचे नेतृत्वच खेचून आणले. ह्यात मानवता कमी आणि राजकीय शहाणपणाचा भाग अधिक होता. गांधींच्या मुस्लिम अनुनयाची ही पार्श्वभूमी आहे.
दुसरे महायुद्ध सुरु होणार हे साधारणत: १९३७ सालीच कॉंग्रेसच्या नेतृत्वाला कळून चुकले होते. त्यात अमेरिका युद्धात उतरली की जर्मनी-जपानचा पराभव निश्चित होणार हे कॉंग्रेसच्या नेतृत्वाचे अनुमान होते. शेवटी महायुद्ध हे केवळ सैन्याच्या बळावर लढले जात नाही. त्यापाठी युद्धसामुग्रीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे आणि प्रचंड मोठी प्रचार यंत्रणा राबवणे ह्या गोष्टींचा भक्कम आधार असावा लागतो. अमेरिका ब्रिटीशांच्या बाजूनेच युद्धात उतरणार हे स्पष्ट होते. ह्यामुळेच दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांना पाठींबा जाहीर करणे कॉंग्रेसच्या नेतृत्वाला भाग होते. अर्थातच त्या बदल्यात स्वातंत्र्य जाहीर करणे ही अट कॉंग्रेसने ब्रिटिशांना घातली. १९४२ मधे क्रिप्स मिशनच्या अपयशानंतर (ज्याचे वर्णन गांधी-नेहरू यांनी "पोस्ट डेटेड चेक" असे केले.) "चले जाव" आंदोलन कॉंग्रेसने सुरु केले.
हे आंदोलन जरी अपयशी ठरले तरी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या इशाऱ्यावर देशात आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते हे ब्रिटीशांच्या लक्षात आले. केवळ मुस्लिम लीगला हाताशी धरून कॉंग्रेसच्या तोंडाला पाने पुसता येणार नाहीत हे ब्रिटिशांना त्या आंदोलनातून जाणवले.
शेवटी फाळणी झाली. पण ती मुस्लिम लीग आणि ब्रिटीश ह्यांना हवी तशी न होता कॉंग्रेसला हवी तशी करावी लागली. "सुईच्या अग्रावर मावेल इतकी भूमीही देणार नाही" ह्या दुर्योधनाच्या अट्टाहासापायी हस्तिनापूरचे काय झाले हे सर्वांना माहित आहेच. "राष्ट्र किंवा भूमी" ह्यातून एकाची निवड करायची वेळ आली तर राष्ट्र टिकवणे हे अधिक महत्वाचे असते हे शिवाजी महाराजांना १६६५ मध्ये कळले होते, आंबेडकरांना देखील १९४० मधेच कळले होते. एकविसाव्या शतकातील पिढ्यांना ते कळावे एवढीच माफक अपेक्षा आहे.
धन्यवाद.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Fri, 10/03/2014 - 00:37
नवीन
गांधीजींच्या प्रत्येक कृतीमागे राजकीय शहाणपण होते हे निश्चित. मराठेशाही बुडाली आणि राज्यकर्ते वि. राज्यकर्ते असा संघर्ष ब्रिटीशांविरुद्ध पेटण्याची शक्यता निमाली. त्यानंतर पब्लीक वि. ब्रिटीश अशाच संघर्षाची शक्यता होती व त्यात धार्मीक रंग येणे स्वाभावीक होते. ब्रिटीशांनी याच पद्धतीने मध्यपूर्वेत बरच राजकारण केलें होतं.
काहि बाबतीत मतभेद.
दुसर्या महायुद्धाची कल्पना प्रत्यक्ष इंग्लंडला देखील नव्हती, हिटलरला देखील नव्हती. अमेरीका युद्धात उतरेल कि नाहि याची शाश्वती बराच काळ खुद्द चर्चील साहेबांना नव्हती. . काँग्रेसला तशी असण्याची शक्यता फार कमि आहे. जर्मनीने रशीयावर आक्रमण करण्यापुर्वी महायुद्धात जर्मनीचा पराभव होईल असे कुणालाच वाटत नव्हते. फ्रान्स पडल्यानंतर युद्ध फार काळ चालायची देखील आशा नव्हती. मांडवलीचा स्कोप खुप वेळपर्यंत होता. त्यामुळे युद्धात ब्रिटीशांचा विजय हा केवळ छाप-काट्याचा विषय होता, ते कन्फर्म नव्हतं. काँग्रेसचं "चले जाव" वगैरे सुभाष बाबुंच्या पराक्रमाला घाबरुन सुरु झालं. सुभाष बाबु जर खरच दिल्लीला धडकले असते तर संपूर्ण देश, काँग्रेस सहीत, त्यांच्या मागे गेला असता व नेहरुंना हात चोळणे आणि गांधीजींना आशिर्वाद देण्यापलिकडे काहिच ऑप्शन नसता. कदाचीत त्यानंतर फाळणी देखील झाली नसती, आणि झाली असती तरी गांधीजी+नेहरु कंपू+मुस्लीम लीग विरुद्ध सुभाष कंपू अशा संघर्षातुन झाली असती.
स्वातंत्र्य लढ्याला हे हिंसक-अहिंसकतेचं माप का लावतात हेच मला कळत नाहि. हिंसा या शब्दाऐवजी "सशस्त्र सैन्य पद्धतीने" असं म्हणायला हवं. ते प्रॅक्टीकली शक्य होतं काय? तर उत्तर आहे "होय". किंबहुना तेच प्रॅक्टीकली शक्य होतं आणि तोच एकमेव ऑप्शन होता. अन्यथा आज जे अण्णा हजारेंचं झालं तेच ब्रिटीशांनी गांधीजींचं केलं असतं आणि गांधीजींच्या पश्चात त्यांच्या तोलामोलाचा कुणीच नेता नसल्यामुळे त्यामार्गाची स्वातंत्र्याची चळवळ केवळ औपचारीकता म्हणुन उरली असती.
गांधीजींनी, काँग्रेसने संपूर्ण भारताला स्वातंत्र्य नावाची काहि चिजवस्तु असते व त्याकरता आपल्या शत्रुशी म्हणजेच ब्रिटीशांशी संघर्ष करायला लागणार हे पटवुन दिलं (कि ब्रिटीशांनीच ते तसं पटवु दिलं ??? ). तो गोवर्धन उचलायला प्रत्येकाने आपापली काठी लावण्याची प्रेरणा गांधीजींनीच मजबुत केली. पण अॅक्च्युअल गोवर्धन त्या काठ्यांनी उचललेला गेला नाहि. त्या संपूर्ण चित्रातुन हवेत विरुन जावा तसा खरा श्रीकृष्ण गायब झाला/करण्यात आला. असो.
- Log in or register to post comments
अ
अवतार
Fri, 10/03/2014 - 12:28
नवीन
सुभाषबाबूंचे महत्व अमान्य करण्याचा नतद्रष्टपणा मी करणार नाही. नेहरू की सुभाष यापैकी मला सुभाषच अधिक आवडतात. पण प्रत्यक्षात घडलेल्या ऐतिहासिक घटना हे वारंवार सिध्द करतात की तत्कालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचे विश्लेषण करण्यात नेहरू हे सुभाष यांच्यापेक्षा अधिक यशस्वी झाले. अर्थात दुसऱ्या महायुद्धाची कल्पना सुभाषना देखील आली होतीच. म्हणूनच त्याच वेळी ब्रिटिशांना कोंडीत पकडण्याची विनंती ते वारंवार गांधीजींना करत होते.
दुसऱ्या महायुद्धाची कल्पना इंग्लंडच्या नेतृत्वाला फार पूर्वीच आलेली होती. हिटलरने चेकोस्लोव्हाकिया गिळून टाकतांना इंग्लंड आणि फ्रांस यांनी चेकोस्लोव्हाकियाला दिलेले मदतीचे वचन सोयीस्करपणे विसरणे आणि जर्मनीच्या विरोधात दुसरी आघाडी उघडा या स्टालिनच्या हाकेला वाटण्याच्या अक्षता लावणे ह्या गोष्टी योगायोगाने घडलेल्या नाहीत. त्याचमुळे स्टालिनला अखेर जर्मनीबरोबर २३ ऑगस्ट १९३९ मध्ये अनाक्रमण करार करावा लागला. १० मार्च १९३९ ला स्टालिनचे भाषण झाले. त्यात त्याने पुढील उद्गार काढले आहेत.
३ सप्टेंबर १९३९ पासून इंग्लंड आणि फ्रांस ह्यांनी जर्मनी विरोधात युद्धाची घोषणा केली खरी. पण पुढच्या पंधरा दिवसांत एक गोळीही जर्मनी विरोधात झाडली गेली नाही. अखेर ह्या युद्धाला बैठे युद्ध असे म्हटले जाऊ लागले. पोलंड पडल्यानंतर ३ आठवड्यांनी इंग्लंडचे ४ डिव्हिजन सैन्य फ्रांस मध्ये आले होते. पुढचा दीड महिना हे सैन्य एकाच जागी बसून होते. ९ डिसेंबरला या सैन्यातील एक कोर्पोरल टेहळणी करतांना जर्मनांनी मारला. हाच फ्रान्समध्ये मरण पावलेला पहिला ब्रिटीश सैनिक! २६ डिव्हिजन जर्मन सैन्याविरुद्ध ११० डिव्हिजन सैन्य दोस्त राष्ट्रे जर्मनीच्या पिछाडीवर धाडू शकली असती तर जर्मनीचा युद्ध बनाव त्यावेळीच कोसळला असता, अशी कबुली खुद्द जर्मन अधिकाऱ्यांनी न्युरेम्बर्ग खटल्यात दिली होती.
हाच पराक्रम सुभाष हे कॉंग्रेसमध्ये असतांना देखील करू शकत होते. गांधींच्या विरोधात कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक त्यांनी जिंकली होती. पण तसे घडलेले नाही. गांधी की सुभाष असा प्रश्न आला तेव्हा बहुसंख्य कॉंग्रेस गांधींच्या मागे होती. नेहरू देखील गांधींच्या प्रत्येक निर्णयाशी सहमत नव्हते. पण गांधींच्या विरोधी जाऊन स्वत:चे राजकीय अस्तित्व टिकवता येणे कठीण आहे हे त्यांना कळले होते.
सशत्र सैन्य १८५७ च्या उठावात देखील उपलब्ध होते. कानपूर येथे नाना साहेब यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटीश स्त्रिया-मुलांची निर्घृण कत्तल देखील झाली होती.पण त्यानंतरही ब्रिटीश साम्राज्य ढासळले नाही. कारण ब्रिटीश साम्राज्यवादाविरोधात लढण्याची गरज आहे हे इथल्या सामान्य जनतेपुढे मांडण्यातच आले नाही. ते सर्वप्रथम गांधींनी मांडले. कॉंग्रेस ही केवळ दिल्ली आणि मुंबई येथील अधिवेशन इतकीच मर्यादित न राहता भारताच्या खेड्यापाड्यांत गांधीमुळेच पोचली.
भारत हा सात लाख खेड्यांचा देश आहे आणि त्या खेड्यांतील जनतेचा राजकारणात सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे, हे सूत्र ओळखून ते पक्के धरून ठेवणे हे गांधीजींच्या राजकारणाचे मर्म आहे. अधिवेशन आणि वाटाघाटी यांच्या पुढे जाऊन स्वातंत्र्याची चळवळ निर्माण होणे आवश्यक आहे देशभरातील जनतेला संघटित करून एकाच वेळी रस्त्यावर उतरवणे गरजेचे आहे हे गांधींनी प्रथम जाणले ह्यातच त्यांचे महात्म्य आहे. समजा गांधी नसते तर जनतेच्या असंतोषाचे प्रकटन करणारे इतर कोणीतरी नेतृत्व पुढे आले असतेच. ते नेतृत्व वैयक्तिक दृष्ट्या गांधींच्या तोलामोलाचे असले असते का हा प्रश्न निराळा. शेवटी गांधी हा एक माणूसच होता आणि त्या माणसाच्या चुका देखील स्पष्टपणे मांडल्याच पाहिजेत. पण त्यादेखील वास्तवाच्या आधारावरच मांडायला हव्यात. गांधींचे राजकीय आडाखे अनेकदा चुकलेले आहेत. पण सामान्य जनतेला वारंवार प्रत्यक्ष कृतीचा कार्यक्रम देऊन गांधींनी जितक्या वेळा रस्त्यावर उतरवले त्याच्या एक दशांशही जागृती इतर कोणतेही नेतृत्व करू शकले नाही हे देखील वास्तव आहे.
- Log in or register to post comments
ए
एस
Fri, 10/03/2014 - 12:31
नवीन
समतोल आणि माहितीपूर्ण प्रतिसाद.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Fri, 10/03/2014 - 15:48
नवीन
एक 'बैठे' युद्ध, युरोपीय युद्ध, ते ही जर्मन वि. रशीया असं होणार याची कल्पना सर्वांना येत होती. पण ब्रिटीशांची प्रचंड कोंडी होणारं महायुद्ध होणार असं कुणालाच वाटलं नव्हतं. तेजोंच्या हाती जपानी सत्ता येत पावेतो अमेरीका देखील या युद्धात उतरेल असं कोणाला वाटत नव्हतं. काँग्रेसचं तत्कालीन आंतरराष्ट्रीय राजकारण युरोपात भारताविषयी सहानुभूती निर्माण करण्या इतपतच होतं, इंग्लंडची कोंडी करणारं नव्हे. त्यामुळे नेहरुंचं याबाबतीतलं कर्तुत्व काय हे मला तरी माहित नाहि. आंतरराष्ट्रीय पातळीवर इंग्लंडची कोंडी करणारा प्रॅक्टीकल डाव सुभाषबाबु खेळले, नेहरु नाहि. स्वातंत्र्य मिळाल्यावर देखील नेहरुंनी काय मोठी आंतरराष्ट्रीय समजदारी दाखवली मला माहित नाहि.
सुभाषबाबु भारताबाहेर पडायचं एक कारण हे ही होतं कि त्यांना अपेक्षीत असं भव्य समर भारतात उभं राहु शकत नव्हतं ... त्याला गांधीजींची संमतीच नव्हती. पुढे कधितरी असं भव्य आंदोलन होईल याची खात्री सुभाषबाबुंना असती तर ते कदाचीत भारतातच राहाते.
सुभाषबाबुंनी काँग्रेस गांधीजींच्या पंखाखालुन पुष्कळसं मोकळं केलं होतं. पुढे इंग्रजांविरुद्ध सुभाषबाबु निर्णायक लढा देताना जनता गांधीजींप्रमाणे हायबर्नेट राहाण्यापेक्षा सुभाषबाबुंच्या मागे उभी राहिली असती. गांधींचा आदर, प्रभाव कमि होता म्हणुन नाहि, पण जनता आंदोलनाला तयार होतच होती.
१८५७ आणि महायुद्धाची सशस्त्र क्रांतीची तुलना करताच येत नाहि. २०व्या शतकात लढा देणारी जनता होती सांस्थानीक नव्हे.
गांधीजींनी सामान्य जनतेला स्वातंत्र्य लढ्याला उभं केलं हे निर्वीवाद. गांधीजींचा मार्ग अत्यंत माणुसकीचा होता/आहे हे ही खरं. पण तो मार्ग एखाद्या देशाची घडी बसवणारा मार्ग आहे, स्वातंत्र्यप्राप्तीचा नाहि... इंग्रजांसारख्या कावेबाज राष्ट्राशी लढताना तर अजीबात नाहि.
- Log in or register to post comments
ब
बाबा पाटील
Fri, 10/03/2014 - 16:09
नवीन
इंग्रजांनी भारतीय उद्योग धंद्याची पुर्ण वाट लावली होती, शस्त्र परवाना कायदा होता, युद्धे सक्षम शस्त्रांवर लढली जातात्,दगड गोट्यांनी नाही. भारतीयांच्या मालकीचा कुठला शस्त्र कारखाणा होया,कुठले हवाइदळ ,पायदळ अथवा आरमार होते, युद्ध खेळण्याकरिता कुठली साधन सामुग्री होती.
च्यायला वस्तुस्थितीचा थोडा तरी विचार करा राव,जपान पडल आणी आझाद हिंद फौज पराभुत झाली,युद्ध खेळायला अर्थव्यवस्था मजबुत लागते, इंग्रजांच्या विरोधात भारतीयांची काय अर्थव्यवस्था होती, १५० वर्षाच्या कालखंडात इंग्रजांनी तुम्हाला काय शिल्लक ठेवले होते.अबे स्वतंत्र झाल्यावर पहिला प्रश्न उपासमारीचा होता की या कोट्यावधींच्या तोंडात घास कुठुन भरवायचा. साधा हिशोब सांगा तुम्ही नोकरी करता आहात्,तुमची चिल्ली पिली तुमच्यावरच अवलंबुन आहेत आणी अचानक तुमची नोकरी गेली,त्याच वेळी तुमची कोनाबरोबर तरी जागेच्या वादावरुन जोरदार भांडण झाल तर तुम्ही काय कराल ? तुमची जागा त्याने बळकावलीय्,तुम्ही स्वबळाचा वापर करणार पण त्या साठीच पैस्याच पाठबळ कुठुन आणाल.
उपाशी पोटी राहुन युद्ध जिंकता येत नाही.आणी शस्त्र बळाखेरीज तर कधीच नाही,त्यावेळी चर्चा आणी अहिंसा हे दोनच पर्याय शिल्लक होते आणी गांधी बाबाने ते अमलात आणले.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Fri, 10/03/2014 - 16:52
नवीन
भारत वि. इंग्रज लढा प्रॅक्टीकली अशक्य तरी (वाटत) होता. गांधीमार्गाने मुद्दलात 'स्वातंत्र्य लढा' हि शक्यताच निकालात निघते.
जगाच्या पाठीवर जि काहि स्वातंत्र्ययुद्धे झाली त्यांची मूळ परिस्थिती भारतासारखीच होती. त्यातुन मार्ग काढुन कढा उभारणे हे त्या त्या एक्सपर्ट लोकांचं काम आहे. आपल्याला त्यात विजयाच्या शक्यता न दिसणं स्वाभावीक आहे. आपल्याला मंगळयानाचं प्लॅनींग देखील अशक्य वाटेल... कारण सरळ आहे... इट्स नॉट अवर डोमेन.
गांधीबाबाने उपलब्ध परिस्थीत शक्य तो मार्ग पत्करला यात त्यांचं शहाणपण निर्वीवाद आहे. पण त्यामार्गाने स्वातंत्र्य मिळालं, मिळु शकलं असतं... आय डोण्ट थींक सो. आणि त्यामुळे गांधीजींची महानता तिळभर तरी कमि होते... आय डोण्ट थिंक सो दॅट इदर.
- Log in or register to post comments
अ
अवतार
Fri, 10/03/2014 - 19:25
नवीन
प्रश्न निव्वळ गांधींच्या महानतेचा नसून गांधी आणि कॉंग्रेस नेतृत्वाने जे काही केले ते का केले हे समजून घेण्याचा आहे.
१९४२ च्या चले जाव आंदोलनात कॉंग्रेसच्या सर्व नेत्यांना ब्रिटिशांनी तुरुंगात टाकले. त्यानंतर देखील जनतेने काही काळ जमेल त्या मार्गाने हे आंदोलन चालूच ठेवले होते. महात्मा गांधी की जय ह्या घोषणा देऊन हातबॉम्ब फेकले जात होते. ब्रिटीशांच्या लाठीमार आणि गोळीबाराला न जुमानता जनता रस्त्यावर उतरू लागली होती. ही परिस्थिती अचानक निर्माण होत नाही. त्यासाठी पद्धतशीर मार्गाने वर्षानुवर्षे जनतेला लढ्यासाठी तयार करावे लागते. गांधींचा उदय झाला तेव्हा शस्त्रे तर सोडाच जनता ब्रिटीश राज्याला उघड विरोध करायलाही तयार नव्हती.
सशस्त्र क्रांतीत यशाची आठ आणे खात्री असेल तर उरलेल्या आठ आण्यांची शक्यता पडताळून पाहता येते हे टिळकांचे शब्द आहेत. ही खात्री त्यांना वाटत नव्हती म्हणूनच त्यांनी तो मार्ग टाळला. ही आठ आणे खात्री निर्माण करण्याचे श्रेय गांधींचे आहे. ही बदलती राजकीय परिस्थिती ओळखण्याएवढे ब्रिटीश चाणाक्ष होते. तुटेपर्यंत ताणून धरण्यापेक्षा आधीच सन्मानजनक माघार घेणे हे त्यांच्या हिताचे होते. शिवाय माघार घेताना भारताची स्वत:च्या भू-राजकीय धोरणाप्रमाणे फाळणी करणे हे देखील त्यांचे लक्ष्य होते. सशस्त्र संघर्षातून ना कॉंग्रेस, ना ब्रिटीश, ना मुस्लिम लीगचा फायदा होता. कारण त्या संघर्षाचे परिणाम नेमके काय होतील हे कोणीच सांगू शकत नव्हते. म्हणूनच या सर्वच पक्षांना इप्सित ध्येय गाठण्यासाठी स्थिर आणि शांततेच्या मार्गानेच सत्तांतर अपेक्षित होते. मात्र शांततेच्या मार्गाने हवे तसे पाकिस्तान मिळणार नाही हे लक्षात आल्यावरच मुस्लिम बहुल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर दंगली सुरु झाल्या. तरीही दोन तुकड्यांत विभागलेले पाकिस्तानच त्यांना स्वीकारावे लागले.
हिंसा किंवा अहिंसा हा दुय्यम प्रश्न होता. त्या लढ्यातून कोणाच्या हाती काय लागणार हा खरा प्रश्न होता. स्वातंत्र्य नेमके कशासाठी मिळवायचे हा महत्वाचा प्रश्न होता. भारत हे पाच हजार वर्षांची परंपरा असलेले राष्ट्र आहे हे वाक्य नेहरूंनी वापरले आहे. हे राष्ट्र टिकवण्यासाठी जे काही करावे लागले ते कॉंग्रेसच्या नेतृत्वाने केले. आझाद हिंद सेना आणि सुभाष ह्यांचे शौर्य आणि त्याग वादातीत आहेत. पण ह्या सर्व राजकीय वास्तवाच्या आधारावर त्यांची वाटचाल चालू होती असे म्हणणे धाडसाचे ठरेल.
गांधी आणि कॉंग्रेस नेतृत्वाचे श्रेय मान्य करणे हे त्यांच्या व्यक्तीपूजेसाठी नसून त्या काळातील राजकीय वास्तव समजून घेण्यासाठी महत्वाचे आहे. एनीवे, लेट्स अग्री टू डिसअग्री !
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Fri, 10/03/2014 - 21:14
नवीन
१९४२ चं आंदोलन गांधीजींची/काँग्रेसची स्वातंत्र्यप्राप्तीप्रित्यर्थ फायनल अशी स्वयंभू कृती होती का हाच मला पहिला डाऊट आहे. आणि तसं ते असेल तरी गांधी मार्गाच्या इतर आंदोलनांप्रमाणे त्याचीही परिणीती पेल्यातलं वादळ शमण्यात झाली. त्यापेक्षा वेगळं काहि घडणं अशक्यच होतं. गांधींनी आणि काँग्रेसने ते आंदोलन सुरु केलं ते इंग्रजांचा युद्धात अडकलेला पाय आणि सुभाषबाबुंना मिळणारा प्रचंड पाठिंबा या पार्श्वभूमीवर.
अर्थात. भारताची स्वतःची अशी सशस्त्र क्रांती सुभाषबाबुंच्या काळी देखील प्रॅक्टीकली फार अवघड होती (प्राप्त साधनांचा धांडोळा घेतल्यास जवळपास अशक्य) मग टिळकांच्या काळची तर बातच सोडा. स्वतः सुभाषबाबु देखील गांधीमार्गाचेच मरेपर्यंत अनुकरण करायला सज्ज होते. महायुद्ध झाले नसते तर सुभाषबाबुंनी स्वबळावर (थँक्स टु युती अॅण्ड आघाडी फॉर धीस वंडरफुल शब्द) सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करला असता असं खात्रीने म्हणता येत नाहि.
गांधीजींनी हि आठ आणे खात्री निर्माण केली हे निर्वीवाद. पण त्याचं श्रेय जातं महायुद्धाला. अन्यथा पुढील ५०-७५ वर्षं इंग्रज जागचा हालला नसता. या ५० वर्षात नॉर्थ इस्ट, द्रवीड, हैद्राबाद (ते तसंही "भारतात" नव्हतच), अवध, काश्मीर, पाकिस्तान (पूर्व-पश्चिम) कदाचीत पंजाब देखील, आणि उर्वरीत असा भारताचा राजकीय नकाशा तयार झाला असता... अगदी सांसदीय मार्गाने. तोपर्यंत गांधी अगोदरच निजधामाला गेलेले असते व दुसरा गांधी निर्माण व्हायचे चान्सेस फार म्हणजे फारच कमि होते. गांधींच्या कुठल्याच अनुयायात साबरमती किंवा सेवाग्राम पिठाची जबाबदारी घेण्याचं कौशल्य नव्हतं. त्यांचे वन ऑफ द सर्वोत्तम शिष्य जे सुभाषबाबु, परिस्थिती येताच गांधी मार्गाला त्यागायला तयार होते मग इतरांच्या मानसीक घडणीची काय कथा.
काँग्रेसने डेफीनेटली जे करायचं ते केलच. पण काँग्रेस म्हणजे गांधीमार्ग नव्हे. जो मार्ग सुभाषबाबुंनी पत्करला, पुरेशी शक्यता जाणवताच तोच मार्ग काँग्रेसने पत्करला असता. देशकारणाचे जे मोस्ट इंपोर्ट्ण्ट घटक, संसद-न्यायव्यवस्था-नागरी प्रशासन-पोलीस-सैन्य, त्यातल्या सांसदीय घटकाची पायाभरणी काँग्रेसने केलीच. व मार्ग कुठलाही असो, तशी पायाभरणी करावीच लागणार होती. नो एस्केप. सशस्त्र क्रांतीनंतर सुभाषबाबुंना देखील असलीच व्यवस्था अपेक्षीत होती.
तत्कालीन परिस्थीती लक्षात घेता सुभाषबाबुंची वाटचाल गांधीजी आणि कंपूपेक्षा जास्त प्रॅक्टीकल होती हा माझा कयास. किंबहुना कुणी अशी कॉन्स्पीरसी थेअरी काढली कि सुभाषबाबुंनी बाहेरुन सैन्य आणावे व गांधीजींनी आतुन आंदोलन करावे असाच प्लॅन होता, तर मला त्यात फार हास्यास्पद काहि वाटणार नाहि. महायुद्ध होऊन इंग्रज कमजोर झाले नसते आणि तरी ४०च्या दशकात गांधीमार्गाचे पुनर्संपादन झाले नसते तर ट्रॅडीशनल गांधीमार्ग स्वातंत्र्याचे आंदोलन पुढे नेण्यात असमर्थ होता असं मला वाटते.
सेम फॉर सुभाषबाबु.
असो.
- Log in or register to post comments
ब
बाबा पाटील
Fri, 10/03/2014 - 08:36
नवीन
१९१५ मध्ये कॉंग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात लोकमान्य टिळकांच्या अध्यक्षतेखाली झालेला लखनौ करार ही त्याचीच परिणती होय. आजच्या सगळ्या गोंधळाचे मुळ याच तर ठिकाणी आहे.त्याचबरोब १९०६ लॉर्ड मिंटोने मुस्लिम लिगला दिलेले प्रोत्साहन किंवा त्याच्यात पुढाकाराने तिची स्थापना झाली व इथुनच भारतीय समाजात प्रचंड दरी पडु लागली.दुर्देवान टिळकांसह तत्कालिन पुढार्यांना ही परिस्थिती हाताळता आली नाही असेच म्हणावे लागेल.गांधी बाबा तर त्यानंतर फार उशिरा जवळ जवळ १५ वर्षांनी राष्ट्रिय राजकारणात आले.तोपर्यंत समाज प्रग्लभ नव्हाता,कारण मुंबई प्रांत ,बंगाल ,पंजाब व काही प्रमाणात मद्रास प्रांत सोडला तर राजकिय नेतृत्व फारसे पुढे आले नाही.किंवा चळवळ ही फारसी पुढे नव्हती. बुद्धीवादी सोडले तर तळागाळातला समाज देखिल फारसा पुढे नव्हता.गांधींनी सर्व प्रथम हा दिन दलित वर्ग,स्त्रिया शेतकरी कामगार चळवळित आणले,हिच तर त्यांची महती,हा एकुनात भित्रा समाज फक्त अहिंसेच्याच धोरणाने पुढे येवु शकत होता,सशस्त्र क्रांतीने नाही.
क्रांतीकारक चळवळ सुद्धा कुठे मागे न्हवती पण १०३० नंतर त्यांचे नेतृत्व संपले,तसेल समाजातुन त्याला सक्रिय पाठिंबा बिल्कुल मिळाला नाही.लोक काँग्रेसच्या मागे उभे राहिले.सुभाष बाबुंना फारच मर्यादित यश मिळाले.इथे एक गोष्ट लक्षात घ्या, नेताजींची आझाद हिंद फौज ही ब्रिटिश सैन्यातुन फुटुन बाहेर पडलेली फौज नव्हती,तर जपान्यांना शरण आलेल्या सैन्याची रासबिहारींनी तयार केलेले सैन्य संघटन होते,ज्याचे नेतृत्व सुभाषबाबुंनी स्विकारले,त्याने जनतेत आत्मविष्वास नक्की आला पण हे सैन्य अपयशी ठरले.
मात्र चलेजाव चळवळीचा परिणामस्वरुप जेंव्हा तलवार युद्धनौकेवर बंड झाले,व सरहद्द प्रांतात ब्रिटीश-भारतिय सैन्याने आंदोलकांवर गोळिबार करण्यास नकार दिला तेंव्हा मात्र ब्रिटिशांची पायाखालची वाळु सरकली होती.
हा सर्व परिणाम १८८५ पासुन १९४२ पर्यंत सुरु असलेल्या चळवळिंचा होता.यात १९२० नंतर गांधीयुगाने सर्वात प्रखर संघर्ष केला होता.
दोन चार अधिकार्यांना ठार करुन स्वातंत्र मिळत नाही हो,नाहीतर पंजाब/कश्मिर्/आसाम/नागालँड कधीच स्वतंत्र झाले असते,स्वातंत्र्याकरिता लोकचळवळ बनावी लागते आणी ती गांधीबाबाच्या नेतॄत्वात भारतात झाली.या एकाच कारणास्त्व त्यांना श्रेय नक्कीच द्यायला हवे.
- Log in or register to post comments
क
काउबॉय
Fri, 10/03/2014 - 11:13
नवीन
क्या बात...! गांधिना स्वातंत्र्याचे क्रेडिट न देणे हे अजूनही गुलामी मानसिकता आणि लोकशाही प्रणालीवर अविश्वास असण्याचे द्योतक आहे हे शिरोमनींना क्ळेल तो सुदिन. आले मोठे अहिंसेचे टीकाकार.
डॉक तुम्ही अगदी मर्मावर बोट ठेवलय. विषयाला हात घातल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन.
- Log in or register to post comments
क
काउबॉय
Fri, 10/03/2014 - 11:16
नवीन
क्या बात...! गांधिना स्वातंत्र्याचे क्रेडिट न देणे हे
अजूनही गुलामी मानसिकता आणि लोकशाही प्रणालीवर
अविश्वास असण्याचे द्योतक आहे हे शिरोमनींना क्ळेल
तो सुदिन. आले मोठे अहिंसेचे टीकाकार.
डॉक तुम्ही अगदी मर्मावर बोट ठेवलय. विषयाला हात
घातल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 10/03/2014 - 16:33
नवीन
@. एकविसाव्या शतकातील पिढ्यांना ते कळावे एवढीच माफक अपेक्षा आहे.>>> प्रचंड टाळ्या !!!! अवतार बाबा की जय!!!
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
गुरुवार, 10/02/2014 - 22:00
नवीन
हे खरंच असेल तर काळजी वाटते. जर चुकून तुम्ही तिला सांगितलं की ते रिकामं आहे आणि तसं ते नसेल तर? लहान मुलांना अशा गोष्टी चुकूनही हाताला लागू देवू नयेत ही कळकळीची विनंती. तुम्ही तर हे तुमच्या संमतीनं होतंय असं सांगताय. दुसरं असं की शस्त्र हाताळायला लायसन्सरुपी कायदा आहे असा माझा समज आहे. तसं असेल तर गांधीजींच्या धाग्यावरच तुम्ही कायदा मोडल्याचं कबूल करताय. बाकी काहीही असो, तुमची मुलगी ही तुमची जबाबदारी असल्यानं तुम्ही या सूचनेचा गांभीर्यानं विचार करावा ही पुन्हा विनंती.
रेवती ताईंच्या मुद्द्याशी मी सहमत आहे. डॉक्टर हा पेशा शस्त्र धारण न करणार्यांचा आहे. तुमची भाषा आणि तुमचं वर्तन त्या पेशाशी साजेसं हवं. पेशंट हा डॉक्टरला देव समजतो (निदान माझी तरी डॉक्टरांकडे जाताना तशीच भावना असते). बाकी तुमची मर्जी.
- Log in or register to post comments
ब
बाबा पाटील
Fri, 10/03/2014 - 09:05
नवीन
डॉक्टरने फक्त वैद्यकिच करावी असा काही नियम आहे का ? माझी पुण्यापासुन ४० किमीवर शेती आहे, त्यामुळे मला बर्याचदा रात्री १० नंतर ओपिडी संपली की गावी जावे लागते, आजपर्यंत दोन वेळा तरी एका नाल्याजवळ माझी गाडी दगड टाकुन अडवण्याचा प्रयत्न झाला होता नशिबाने दोन्ही वेळेस माझ्याकडे बोलेरो असल्याने सरळ चारीत गाडी घालुन मला निघुन जाता आले,आमच्या भागातले चोर्/ दरोडेखोर काही गांधीवादी नाहित ते प्रथम दगडांचा मारा करतात नंतर जवळ आले की कटावण्या आणी तलावारींचे वार होतात्,इतक्या लवकर मरायची माझी तरी मानसिक तयारी नाही.पोलिस काही प्रत्येक ठिकाणी पोहचु शकत नाहीत,शेतघरही गावापासुन अडिच ते तिन किमी आहे,अशा वेळेस संरक्षणास दुसरा काहीही उपाय नसतो,आमच्या रानातल्या वस्ती च्या आसपास ७/८ घरे आहेत प्रत्येक घरात , दोन तीन कुत्री, व परवानाधारक शस्त्रे आहेत्,उस बागायताचा परिसर असल्याने त्याला काहीही पर्याय नाही.
दुसरी गोष्ट माझे इतरही काही व्यवसाय असल्याने बहुतेक मिटिंग अथवा भेट मी रात्री १० नंतर ठेवतो,रात्री घरी पोहचन्याचा वेळ कधीच फिक्स नसतो,त्यामुळे शस्त्र जवळ ठेवण्याशिवाय पर्याय नाही.
मी पेशंटशी कसा बोलतो कसा वागतो हे पाहण्यासाठी कृपा करुन तुम्ही माझ्या ओपीडीत भेट द्या,म्हणजे तुमच्या लक्षात येइल.
बाकी राहिल माझ्या लेकीच,ते पिल्लु स्टेट लेव्हल कराटे खेळतय्,ती शरिर व मनाने माझ्यापेक्षाही स्थिर आहे,मी जर तिच्या पासुन हे लपवुन ठेवल तर बालस्वभावानुसार ती नक्की ते पाहण्याचा प्रयत्न करनार्,त्यापेक्षा ते तिला हँडल कस करायच ते दाखवुन त्याच धोके समजावलेले कधीही चांगलेच ना.शिवाय ते फेकुन मारल तरी त्यातुन मिस फायर होणार नाही हे माहिती आहे, रेग्युलर शुटर सोडुन ते कुनालाही फायर करन शक्य नाही,त्यासाठी फार सराव लागतो. किंवा दुर्देवाने कधी वेळ आलीच तर ते कस वापराव हे माहिती पाहिजे ना. फुकट शहिद होण्याची मला तरी हौस नाही.
आणी असही काही वर्षांनी तिलाच हे सगळे उद्योग पहायचेत्,आत्ता पासुनच तिची मानसिक तयारी झाली तर पुढे अडचन होत नाही,किंवा काही अडत नाही. मी तिला बहुतेक सगळे गड किल्ले फिरुन आणलेत्,शिवाजी आणी कृश्न नुसता भिनलाय तिच्यात, तिच्या प्रत्येक टुर्नामेंटला मी तिच्याबरोबर फिरत असतो.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Fri, 10/03/2014 - 18:05
नवीन
तु एक नंबर झकास बापुस आहेस रे डॉक.
- Log in or register to post comments
भ
भृशुंडी
Fri, 10/03/2014 - 05:15
नवीन
लढ बापू... चालू द्या.
- Log in or register to post comments
ब
बाबा पाटील
Fri, 10/03/2014 - 09:18
नवीन
विषय गांधीबाबा आहे,बाबा पाटील नाही माझी एव्हडीच माहिती हवी असेल सगळे येवुन भेटा शेतावर जावु, चार पाच कोंबड्या कापु,दणकुन खा प्या आणी निवांत माझे रामायण एका.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »