पुण्याचे उणे
(श्रीरंग जोशी यांनी चेपुवरील एक ढकल संदेश खफवर टाकला आहे पुण्याची महती सांगणारा ! त्यावरुन थोडे चिन्तन घडले, त्यातून हे मुक्तक प्रसवले आहे.)
पुण्याची मुम्बई झाली आहे हो ! छाती फुटेस्तोर पळावे लागते आज काल पुण्यात देखील!
आय टी वाल्यांनी वाट लावली आहे पुण्याची ! हिन्जवडी आणि हडपसर या दोनी दिशांना २४ तासाचा जाम करुन ठेवला आहे. घरांचे भाव गगनाला भिडले आहेत. इतके की, आता त्यांना देखील ते परवडेनासे झाले आहेत. मला व्यक्तिशः सकाळ संध्याकाळ दिड तास-दिड तास प्रवास करावा लागतो. आणि विकेण्डला देखील मुंबै च्या लोकांनी पुणे जाम करुन ठेवले आहे.
पुणे हे मुंबई नसल्याने हा असला भार पुण्याला पेलवत नाही. सार्वजनिक वाहतूकीचा बोजवारा उडाला आहे. लोकल ची सोय कधीच नव्हती आणि पी एम टी चालण्यापेक्षा त्या विषयावर वारेमाप बोलण्यासाठी अधिक प्रसिद्ध !
जुने कोथरुड आणि सिंहगड रस्ता भागातील सोसायटयातील अरुन्द रस्ते फक्त सायकली आणि स्कूटरी जाण्याच्या लायकिचे ! तिथे हल्ली मर्सिदेस आणि बीएमडब्ल्यु सारख्या अजस्त्र गाड्या पार्क करुन ठेवतात. पार्किगची पुण्यात महाबोंब आहे ! ती रस्त्यावर , सार्वजनिक ठिकाणी आणि सोसायट्यातदेखील आहे. पुढचे पानपत पुण्यातच पार्किन्ग वरुन होईल असा अन्दाज आहे.
पुणे अधिकाधिक बकाल होत चालले आहे. बकालपणा समावून घेण्याची मुंबईची सहनशीलता आणि सक्षमता पुण्यात नाही. दिवसेंदिवस पुणे अधिकाधिक व्याकुळ आणि केविलवाणे होत चालले आहे. शान गेली पुण्याची महाराजा !!
विद्येचे माहेरघर म्हणून पुण्याचा लौकिक ! तो काही नामांकित संस्थांमुळे होता आज त्यांची काय शान आहे ? सी ई ओ पी मध्ये पुण्याची किती अडमिशन्स होतात ? महाराष्ट्रातील? पुणे विद्यापिठीतील दर्जावर बोलायलाच नको! बोरी / दादोजी कोंडदेव पुतळा या प्रकरणांनी पुण्यातील शैक्षणिक वातावरण पुण्याच्याच कारभार्यांनी पार ढ्वळून काढले. हे वातावरण संशोधनाला पोषक वातावरण आहे काय? एस पी / फर्ग्युसन आपला दाब ठेवून आहेत पण एमआयटी , भारती , सिंबायसीस , सिंहगड, या खासगी संस्थानी पुण्याच्या शैक्षणिक विश्वावर आक्रमण केले आहे. त्या संस्था शिक्षणासाठी किती आणि अर्थकारणासाठी किती हा विषय इतका स्पष्ट आहे की त्याची चर्चा देखील होणार नाही. या अर्थकारणासाठी पुणे सोडाच अमराठी विद्यार्थ्यांचा भरणा पुण्यात वाढला. त्याबरोबर गुन्हेगारी आली. कसले विद्येचे माहेरघर ?
आणि सांस्कृतिक पुणे ?? किती नवीन लेखक / कवी / गायक पुण्यात गेल्या १५-२० वर्षात आले? सलील आणि संदिप खरे वगळता फारसे आशादायक काही नाही !! अपवाद असतील ही पण त्या अपवादाने नियमच सिद्ध होतो. सदाशिवात वसंतराव देशपांडे रहात होते, त्या माडीच्या खालून , रस्त्यावरुन जाताना देखील भारावल्यासारखे व्हायचे ! तीच गोष्ट नव्या पेठेतील भिमाण्णांच्या बंगल्याच्या आसपास ! आता काय शिल्लक आहे पुण्यात ?
पुण्याच्या गणेशोत्सवाबद्दल काय लिहू ? उत्सव कमी आणि धागडधिन्गा जास्त ! अनेक वेळा लिहून झाले आहे. गेली १० वर्षे पुण्यात आहे , एकदाही तिकडे फिरकायची हिम्मत झाली नाही.
पार वाट लागली आहे पुण्याची! पुणे , मुम्बईच्या वाटेवर आहे ! हे कमी की काय, पण हल्ली पुण्याचे हवामान ही बदलले आहे. पूर्वीचे आल्हाददायक पुणे, आता तितके आल्हाददायक राहीले नाही. पुण्यात देखील प्रचंड उकडते, मुम्बई सारखा आता रात्रभर पंखा लावावा लागतो.
हे सारे पाहून खर्या पुणेकराचा जीव कुळकुळतो. मनापासून वाईट वाट्ते . महाराजांच्या पुणे जहागीरीला पुन्हा एकदा सोन्याचा नांगर फिरवला जाण्याची आवश्यकता वाटते आहे.
अरे , कुठे नेऊन ठेवले आहे महाराष्ट्राचे पुणे !
... दुद दारात म्हस पिळून?असें हे भर रस्त्यावर अश्लींल काम पुण्यनगरीत होणें नाही... शिव, शिव. ते तसलें कोणत्यांतरी पुरांत करतात म्हणें. ;) +D