Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हात झाले काळे!

श
श्रीगुरुजी
गुरुवार, 03/12/2015 - 08:41
🗣 127 प्रतिसाद
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव बुधवारी कोळसा खाण घोटाळ्यात आरोपी म्हणून निश्चित झाले आहे. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात २००५ मध्ये कोळसा खाणींचे वाटप झाले होते. कुमारमंगलम बिर्ला यांच्या हिंदाल्को समूहास ओडिशातील तालिबारा दोन व तीनमधील खाणींचे वितरण करण्यात आले होते. यात गैरव्यवहार झाल्याचा ठपका सीबीआयने ठेवला होता. त्यात मनमोहन सिंग यांना आरोपी करण्यात आले नव्हते. गतवर्षी ऑगस्टमध्ये सीबीआयने सादर केलेला 'क्लोजर' अहवाल न स्वीकारता न्यायालयाने मनमोहन सिंग यांचा जबाब नोंदवण्याची सूचना केली होती. या पाश्र्वभूमीवर मनमोहन यांना बुधवारी विशेष न्यायालयाने 'आरोपी' म्हणून समन्स पाठवले. मनमोहन यांच्याव्यतिरिक्त उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला, माजी कोळसा सचिव पी. सी. पारख, िहदाल्कोचे दोन अधिकारी यांनाही गुन्हेगारी कट, फसवणूक या आरोपाखाली समन्स पाठवण्यात आले आहे. यापूर्वी दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना अशा प्रकारचे समन्स धाडण्यात आले होते. त्यापूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७१ मध्ये जिंकलेली निवडणुक निवडणुकीत सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्यामुळे अलाहाबाद उच्च न्यायलयाने रद्द करून त्यांना ६ वर्षे निवडणुक लढविण्यास बंदी घातली होती. न्यायालयाची पायरी चढावी लागणारे मनमोहन सिंग हे तिसरे पंतप्रधान. हे तीनही पंतप्रधान काँग्रेसचे आहेत यात काहीच आश्चर्य नाही. विशेष न्यायालयाचे म्हणण्यानुसार कोळसा खाणवाटपात सकृतदर्शनी गुन्हेगारी स्वरूपाची कृती झाल्याचे निदर्शनास येते. यात शुभेंदु अमिताभ, डी. भट्टाचार्य व कुमारमंगलम बिर्ला यांचा समावेश आहे. हिंदाल्कोला खाणवाटप करताना झुकते माप देण्यात आले. तत्कालीन कोळसा सचिव पी. सी. परख व कोळसा मंत्री मनमोहन सिंग यांच्या अप्रत्यक्ष प्रयत्नातून हिंदाल्कोला खाणवाटप झाल्याचे निदर्शनास येत असल्याचे न्यायाधीश भरत पराशर यांनी नमूद केले आहे. बिर्ला समुहातील हिंदाल्को कंपनीला ओरिसातील खाणवाटप करताना, कोळसामंत्री म्हणून डॉ. सिंग यांनी घेतलेल्या निर्णयाने प्रचलित सरकारी नियमांचा भंग झाल्याचा ठपका विशेष सीबीआय कोर्टाने ठेवला. सिंग यांच्या मान्यतेमुळेच हिंदाल्को कंपनीला अचानक प्रचंड नफा झाला आणि सरकारी कंपनीला मोठे नुकसान सोसावे लागले, असा ठपकाही कोर्टाने ठेवल्याने मनमोहन यांच्या स्वच्छ कारकिर्दीवर तुर्तास तरी लाभाचा डाग लागला. खुद्द सिंग, उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला, माजी कोळसा सचिव पी. सी. पारख, हिंदाल्कोचे दोन अधिकारी यांना आरोपी म्हणून ८ एप्रिल रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेशही कोर्टाने दिले.विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायमूर्ती भरत पराशर यांच्या निर्देशावरून डॉ. सिंग व अन्य पाच आरोपींवर गुन्हेगारी कट रचणे (कलम १२० ब), गुन्हेगारी स्वरूपाचा विश्वासघात (कलम ४०९) तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोप निश्चित केले आहेत. मनमोहन सिंग आणि पारख निवृत्त झाल्यामुळे त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत खटला चालविण्यासाठी परवानगी घेण्याची गरज नाही, असेही कोर्टाने स्पष्ट केले. नोकरशाही तसेच राजकीय माध्यमातून हिंदाल्कोला कोळसा खाणी मिळाव्या म्हणून कंपनीच्या शुभेंदू अमिताभ आणि भट्टाचार्य यांनी षडयंत्र रचले. कुमारमंगलम बिर्ला यांनी ते पुढे रेटले आणि कोळसा सचिव पी. सी. पारख व मनमोहन सिंग यांच्या माध्यमाने या षडयंत्राला अंतिम स्वरूप मिळाले, असा निष्कर्ष न्या. पराशर यांनी काढला. या प्रकरणात दोषी ठरल्यास आरोपींना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. दिवंगत नर​सिंह राव यांच्यानंतर प्रथमच फौजदारी खटल्याला सामोरे जाण्याची वेळ माजी पंतप्रधानांवर आली आहे. मात्र तरीही केवळ काँग्रेस व त्यांचे मित्रपक्षच नव्हे, तर विरोधकांनीही याबाबत वैयक्तिकरित्या मनमोहन यांच्यावर मात्र कोणताही संशय व्यक्त केलेला नाही. मनमोहन सिंगांना या प्रकरणातून काही वैयक्तिक लाभ झाला का हे महत्त्वाचे नसून या घोटाळ्यामुळे देशाचे प्रचंड नुकसान झाले आहे हेच जास्त महत्त्वाचे आहे. २-जी तरंगलहरींचे आपल्या हितसंबंधियांना खिरापतीसारखे वाटप करताना सरकारचे रू. १,७६,००० कोटी इतके नुकसान झाले असा अहवाल महालेखापालांनी यापूर्वीच दिला होता. लिलाव न करता आपल्या हितसंबंधियांना कोळसा खाणी दिल्यामुळे सुद्धा सरकारचे रू. १,८६,००० कोटी इतके प्रचंड नुकसान झाले हाही अहवाल महालेखापालांचाच. काँग्रेसने सुरवातीला या दोन्ही अहवालांची खिल्ली उडविली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री व कसलेले वकील कपिल सिब्बल यांनी तर तरंगलहरी वाटपात "झिरो लॉस" झाला, उलट त्यात फायदाच झाला अशी मखलाशी केली. तर दुसरे नामवंत वकील व केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पुढची पायरी गाठताना असे विधान केले की, "ज्या खाणवाटपामध्ये सरकारला नुकसान झाल्याचा आरोप होत आहे, त्या खाणीतला कोळसा अजून बाहेर काढलेलाच नाही. मग कोठे आहे तोटा?". अशी मखलाशी करून आपण स्वतःला व सरकारला हास्यास्पद बनवितो आहे हे या चाणाक्ष वकीलांच्या डोक्यातच आले नाही. २-जी तरंगलहरींचे वाटप व कोळसा खाणींचे वाटप हे लिलाव पद्धतीने झाले असते तर सरकारला कित्येक लाख कोटी रूपयांचा महसूल मिळाला असता. लिलाव न करता मनमानी पद्धतीने उद्योगपतींना व हितसंबंधियांना वाटप केल्याने हे पैसे सरकारच्या तिजोरीत न येता उद्योजकांच्याच खिशात गेले व देशाला प्रचंड तोटा झाला. सुदैवाने न्यायालयाने तरंगलहरी व खाणवाटपाचे परवाने रद्द करून त्यांचे वाटप लिलाव पद्धतीने करण्याचे आदेश दिले. त्यानंतर मोदी सरकारच्या काळात २-जी तरंगलहरी व परवाने रद्द केलेल्या २१८ खाणींपैकी फक्त थोड्या खाणींचे वाटप लिलाव पद्धतीने केल्यावर तब्बल २ लाख कोटी रूपयाहून अधिक रकमेची बोली लागलेली. जेव्हा सर्व २१८ खाणी लिलाव पद्धतीने विकल्या जातील तेव्हा सरकारच्या तिजोरीत तब्बल १५ लाख कोटी रूपये इतका महसूल मिळण्याची शक्यता आहे. मनमोहन सिंग सरकारने देशाचे नुकसान केले यात शंकाच नाही. ते स्वतः स्वच्छ असतील, परंतु त्यांच्याच अधिकाराने व त्यांच्यात अखत्यारीत देशाचे नुकसान झाले व ते शांतपणे नुकसान बघत राहिले असे दिसत आहे. देशाचे नुकसान थांबविण्याचे संपूर्ण आणि सर्वोच्च अधिकार हातात असताना गप्प बसून राहणे हा सुद्धा गुन्हाच आहे. स्वच्छ, अपघाताने राजकारणात आलेले, हाडाने राजकारणी नसलेले, सुसंस्कृत, मितभाषी, अर्थतज्ज्ञ इ. विशेषणांनी नटलेले मनमोहन सिंग न्यायालयासमोर आता स्वतःचा बचाव कसा करणार ते पहायचं. पूर्वी एका लेखात मनमोहन सिंगांबद्दल एक यथार्थ वाक्य आले होते.
Manmohan Singh has been overestimated as an economist and, at the same time, he has been underestimated as a politician.
प्रचंड घोटाळे उघडकीस येऊनसुद्धा ज्या तर्‍हेने मनमोहन सिंगांनी आपली खुर्ची १० वर्षे वाचविली त्यावरून वरील वाक्य सिद्ध होते. त्यांचे राजकीय गुरू नरसिंहराव यांनी याच तर्‍हेने आपली खुर्ची वाचविली होती. अत्यंत उपद्रवी व बेभरवशाचे असलेले सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी सातत्याने पाठपुरावा करून २-जी तरंगलहरी वाटपातील घोटाळा शोधून काढला. त्याचप्रमाणे भाजपचे महाराष्ट्रातील खासदार हंसराज अहीर यांनीदेखील सातत्याने पाठपुरावा करून कोळसा खाणवाटप घोटाळा शोधून काढला. याबद्दल हे दोघेही अभिनंदनास पात्र आहेत. "मी निश्चितच दुःखी आहे. पण हा जीवनाचाच एक भाग आहे. देशाच्या न्यायव्यवस्थेचा मी आदर करतो आणि कायद्याच्या प्रक्रियेला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे. निष्पक्ष चौकशीत सर्व पुराव्यांनिशी माझे निरपराधित्व सिद्ध होईल, अशी आशा आहे." अशी प्रतिक्रिया मनमोहन सिंगांनी दिली आहे. या प्रतिक्रियेवरून ते निश्चितच न्यायालयात जाऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील असं दिसतंय. परंतु या खटल्यात काँग्रेसच्या इतर अनेकांची नावे बाहेर येण्याची शक्यता आहे. तत्कालीन महालेखापाल विनोद राय यांनी आपल्या पुस्तकात "आपल्या अहवालात ठपका ठेवलेल्या युपीए सरकारमधील काही जणांची नावे वगळावीत" असा आपल्यावर दबाव येत होता असे स्पष्ट लिहिले आहे. मनमोहन सिंगांचे पूर्वीचे प्रसिद्धी प्रमुख संजय बारू यांनीही आपल्या पुस्तकात "तरंगलहरी व कोळसा खाण वाटपासाठी" पंतप्रधान कार्यालयावर कसा बाहेरुन दबाव येत होता याचीही सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे हा खटला सुरू होउ नये व मनमोहन सिंगांना न्यायालयात जावे लागू नये यासाठी काँग्रेस जीवापाड प्रयत्न करेल. काँग्रेसकडे चिदंबरम्, सिब्बल, खुर्शिद असे कसलेले वकील आहेत. मनमोहन सिंगांचे आरोपपत्रातील नाव वगळावे यासाठी सुरवातीला केंद्रीय गुप्तचर खात्याच्या विशेष न्यायालयाला विनंती करण्यात येईल. ती विनंती न्यायालयाने फेटाळली तर उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जातील. तिथेही विनंती मान्य नाही झाली तर सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येईल. असे एकापाठोपाठ एक अर्ज करून काँग्रेस या खटल्याचा प्रारंभ जास्तीतजास्त लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न सुरूच ठेवील. शेवटी काय होईल ते बघायचं. मात्र या निमित्ताने काँग्रेसचे भ्रष्टाचाराने काळेकुट्ट झालेले हात परत जनतेसमोर येत आहेत हेच महत्त्वाचं.

प्रतिक्रिया द्या
29158 वाचन

💬 प्रतिसाद (127)
आ
आजानुकर्ण Fri, 03/13/2015 - 15:21 नवीन
कपिलमुनी, या प्रश्नाची आणखी एक बाजू म्हणजे काँग्रेजी सरकारने हा निर्णय घेतला की बांगलादेशी घुसखोर, बिहारी स्थलांतरित इ. वगैरेंची बेकायदेशीर वस्ती व व्होटब्यांकेचे राजकारण याचे दावे केले जातात. गैरकाँग्रेजी सरकारने हा निर्णय घेतला की रहिवाश्यांवर अन्याय, कायद्याची गुंतागुंत असे मुद्दे पुढे आणता येतात. काँग्रेसची असते ती व्होटब्यांक आणि भाजपाचे असतात ते हक्काचे मतदार अशी वेगवेगळी लेबलं आजकाल लावली जातात असं कुठंतरी वाचलंय ब्वॉ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
H
hitesh Fri, 03/13/2015 - 15:25 नवीन
सर्कार भाजपाचे असले की श्रीगुर्जींचा चश्मा वेगळा असतो. सर्कार काँग्रेसचे असले की चश्मा वेगळा असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
व
विकास Fri, 03/13/2015 - 15:36 नवीन
या प्रश्नाची आणखी एक बाजू म्हणजे काँग्रेजी सरकारने हा निर्णय घेतला की बांगलादेशी घुसखोर, बिहारी स्थलांतरित इ. वगैरेंची बेकायदेशीर वस्ती व व्होटब्यांकेचे राजकारण याचे दावे केले जातात. यावरून आउटलूक साप्ताहीकातला विलासराव ठाकरे हा लेख आठवला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
म
मराठी_माणूस Fri, 03/13/2015 - 12:17 नवीन
त्या इमारतीत २५-३० वर्षे वास्तव्य केल्यावर बांधकाम अनधिकृत असल्याने रहिवाशांना बाहेर काढून इमारतीचे अनधिकृत मजले तोडून टाकणे योग्य नव्हते.
अनधिकृत झोपड्या मात्र कोणताही विलंब न करत तोडल्या जातात. त्यांचे संसार क्षणात रस्त्यावर येतात . त्यांचे किडुक मिडुक गोळा करण्याचा पण वेळ दिला जात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ड
डँबिस००७ Fri, 03/13/2015 - 12:14 नवीन
मनरेगा योजना ही चुकीच्या रित्या वापरली असल्याने बदनाम झालेली आहे, मनरेगासाठी काम काढायची, पैसे कॅश ने द्यायचे हे सर्व करताना पारदर्शीता कशी येईल ? प्रत्यक्ष मनरेगा योजना राबवताना काही राईट टु ईंनफॉर्मेशन अ‍ॅक्टीव्हीस्टना उ.प्रदेश मध्ये मारुन टाकले होते. कारण त्यांनी पैश्याचा गैर व्यवहार होतोय हे दाखवुन दिल होत, मेलेल्या लोकांच्या, नवजात बालकांच्या नावाने पैसे वाटले होते त्या योजनेच्या खाली. आणि प्रत्यक्षात काम करणार्या लोकांच्या हातात तुर्या !! जर २०२२ पर्यंत २० कोटी पक्की घरे लोकांना बांधुन द्यायची असतील किंवा कोट्यांनी शौचालये बांधायची असतील तर त्या प्रमाणात प्रशिक्षीत, कुशल, अकुशल वैगेरे मनुष्यबळ लागणारच आणि त्या वेळी मनरेगा सारखी योजना कामी येऊ शकेल, त्यातही केलेल्या कामचे पैसे हातात न देता त्या काम गाराच्या बँक खात्यात प्रत्यक्ष जमा झाले तर कॅश हाताळण्याच्या सर्व तोट्यापासुन ही वाचवता येईल. त्यामुळेच जन धन योजना ईतक्या मोठ्या प्रमाणावर राबवली गेली आहे. कोळसा घोटाळ्याचे परिणामः कोळसा घोटाळा पुढे येण्या अगोदर २०११- २०१२ साली भारतात २,५०,००० मेगावॅट ईतक्या क्षमतेच् ३००च्या वर विज निर्मिती प्रकल्पाचे उभारणीचे काम चालु होते. ह्या प्रकल्पात अनेक प्राईव्हेट प्रकल्प, प्राईव्हेट साखर कारखान्यांचे को-जेन प्रोजेक्ट होते, ज्या वेळी हा कोळसा घोटाळा पुढे आला त्या वेळी हे सगळे प्रोजेक्ट बंद झाले, कारण जर कोळसाच नाही तर कुठुन करणार विज निर्मिती ? ह्या शिवाय भारतात १५० वर्षापर्यंत जुने असे प्रकल्प आहेत ज्यांची एफीशीएंसी खुपच कमी (२५% ) आहे. काही थर्मल पॉवर प्लँटस ४ युनिट पैकी कधी ३ कधी २ च चालवु शकतात. त्यामुळे अश्या परिस्थीतीत तुम्हाला कोणता बाहेरच देश प्रकल्पासाठी पैसे पुरवणार ? कोळसा घोटाळा जरी कोर्टात असला तरीही कोळसा खाणीच्या लिलावावरची कोर्टाची बंदी काढणे हे महत्वाचे पाऊल होते. ते करुन भारतातल्या लोकांना आत्मविश्वास दिला,
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Fri, 03/13/2015 - 12:39 नवीन
सर्वांचेच हात काळे अस म्हणण चुकीच आहे. जर आताच्या सरकारला घरांना जिवदान देण्याबद्दल दोषी धरायच असेल तर पहीले त्या सरकारला दोष द्या ज्यांच्या सरकारात अशी घरे उभारली गेली. मग तिथेही काँग्रेसचेच तोंड काळे होते की ? १.५० कोटी लोकवस्ती असलेल्या मुंबईत ५०% पेक्षा जास्त लोक झोपड पट्टीत रहातात आणि त्या सर्व झोपडपट्ट्या अनधिकृतच की ? मग गेल्या कित्येक सरकारने १९९५ च्या पुर्वीच्या, २००० च्या पुर्वीच्या अश्या अनेक वस्त्यांना अधिकृत करुन घेतल होत. का ? कश्यासाठी ? हे सर्वांना माहिती आहेच !!
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 03/13/2015 - 12:45 नवीन
त्या साठीच सर्वांचेच हात काळे असे म्हणले. काँग्रेस सरकार , युती सरकार आणि सध्याचे सरकार यांनी एकच कित्ता गिरवला आहे. म्हणून काँग्रेसचे हात तोंड काळे आहेतच. आता खुश का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
प
प्रसाद गोडबोले Fri, 03/13/2015 - 13:48 नवीन
गुरुजी , पुढच्या निवडणुकीला उतरणार का भाजपा कडुन? पण आमचा आवडता पक्ष लोकसभेत आणि नंतर विधानसभेतही गळपटल्याने तुर्तास आम्ही राजकारणाच्या बाहेर आहोत , त्यामुळे तुम्हाला आमचा फुल्ल सपोर्ट !!
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 03/13/2015 - 15:52 नवीन
चांगली सूचना आहे. विचार करण्यायोग्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ड
डँबिस००७ Fri, 03/13/2015 - 15:50 नवीन
कपिल मुनी, आपल्या सर्वांना कदाचीत पक्षाची तोंड काळी म्हणताना आपली तोंडच काळी म्हणत आहोत ह्याचा विसर पडलेला आहे कारण ह्या सर्वाम्ना आपणच निवडून देत होतो.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 03/16/2015 - 10:15 नवीन
आपली तोंडच काळी म्हणत आहोत ह्याचा विसर पडलेला आहे
विसर काय पडायचा ! सरकार आपणच आपल्यातूनच निवडून देतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
ज
जानु Fri, 03/13/2015 - 16:11 नवीन
एकाने चुक केली तर दुसर्‍यालाही तशीच चुक करण्याची परवानगी नाही देता येत. कोठेतरी व केव्हातरी कोणालातरी या बाबत निर्णय घ्यावाच लागणार. मला तर कॅम्पा कोला मध्ये लोकांचीच चुक दिसते. तेथील घरे काही तुम्हा आम्हा सारख्यांच्या आवाक्यातील नव्हती. घर घेणारे गरजु असले तरी कागदपत्रे न बघताच काही कोट रुपये सोडणारे तर अजिबातच नाही. ते तर अधिक व्यवहारी. पण त्या सगळ्यांना हे माहीत होते की मनपा त सगळे काही जमविता येईल. पण कायद्यात अडकले. शेवटी मनासारखे झाले पण बोभाटा झाला तो झाला. भाजपाला यात काही व्यवस्था सुरु करता येण्या सारखी आहे पण तशी त्यांची तयारी नाही.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Fri, 03/13/2015 - 16:43 नवीन
बिल्डरकडून घरे घेणाऱ्यांना बिल्डरने कोणती कागदपत्रे महापालिकेला दाखवणे आवश्यक आहे हे माहीतच नसते. ग्राहकांवर या गोष्टीची जबाबदारी टाकणे शक्यच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जानु
ज
जानु Fri, 03/13/2015 - 17:02 नवीन
रजिष्ट्रेशन करतांना तर मनपाचे कागद लागतात ना. खरेदी काही हवेत होत नाही. ग्राहकाला हे समजतेच की काही तरी गडबड आहे. पुण्यात लोणी काळभोर येथे तिसर्‍या मजल्याच्या वर सरकारी बँका कर्ज देत नसत. (३-४ वर्षापुर्वी) कारण त्यांना कलेक्टर मंजुरी नसे. कँपा कोला तर दक्शिण मुंबई....
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Fri, 03/13/2015 - 17:19 नवीन
मनपाकडून वगैरे मिळालेल्या कागदात १० मजल्यांची परवानगी, १२ मजल्यांची परवानगी असे काही नसते. बिल्डरला किती एफएसआय मिळाला आहे त्याची माहिती असते. तो एफएसआय हवा तसा वापरण्याची बिल्डरला परवानगी असते. उदा. एखाद्या प्रकल्पातील शिल्लक एफएसआय बिल्डर दुसरीकडे वापरु शकतो. जर बिल्डरने परवानगी दिलेली आहे त्यापेक्षा जास्त एफएसआय वापरला तर ते मजले बेकायदेशीर होतात. बिल्डरचे इतर प्रकल्प, कुठल्या इमारतीत किती मजले बांधलेत, एफएसआय जास्त की कमी याची काहीही माहिती ग्राहकाला नसते. काही बँका कागदपत्रे तपासून घेतात पण त्यावर अवलंबून राहणे धोक्याचे आहे. बँकांना फक्त त्यांचे पैसे मिळाल्याशी कारण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जानु
H
hitesh Sat, 03/14/2015 - 00:22 नवीन
..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
स
सतीश कुडतरकर Sat, 03/14/2015 - 09:09 नवीन
बॅक टू कोळसा प्लीज
  • Log in or register to post comments
व
विकास Sun, 03/15/2015 - 15:02 नवीन
Image removed. (हात "त्यामानाने" काळे होत नाहीत हे या छायाचित्रावरून सिद्ध होते!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतीश कुडतरकर
स
सुधीर Mon, 03/16/2015 - 06:56 नवीन
आंगठ्याच्या बाजूचे बोट ब-यापैकी काळे झाले आहे... तूम्ही दुर्लक्ष करत आहात... ;) अवांतर: हंसराज अहिर यांची मुलाखत... http://khabar.ndtv.com/video/show/chalte-chalte/walk-the-talk-with-hansraj-ahir-359887 आणि आजच्या बिझनेस स्टॅ. ची पहिल्या पानावरची बातमी... http://www.business-standard.com/article/economy-policy/commercial-mining-of-coal-to-be-allowed-115031600063_1.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ह
हुप्प्या Sat, 03/14/2015 - 12:31 नवीन
मनमोहनसिंग या माणसाविषयी बोलताना आधी त्यांच्य साधेपणाची, प्रकांड बुद्धीमत्तेची, धुतल्या तांदळापेक्षा स्वच्छ प्रतिमेची तोंड फाटेपर्यंत तारीफ करुन मगच त्यांच्या तोंडाला कोळशाचे काळे फासायचे असा काही अजब संकेत बनला आहे. तो अनाकलनीय आहे. असा दृष्ट लागावी इतका सर्वगुणसंपन्न माणूस असेल तर कोर्टाला त्याच्यावर समन्स बजावण्याइतकी कारणे का बरे सापडली? ह्या माणूस म्हणे जगातला सर्वात श्रेष्ठ अर्थतज्ञ आहे. असो बापडा. पण इतकी वर्षे पंतप्रधान बनून त्याने आपल्या अथांग ज्ञानसागराचे किती पाणी देशाला पाजले हे मला न उलगडलेले कोडे आहे. इतका अचाट स्वच्छ चारित्र्याचा माणूस होता तर जेव्हा भ्रष्टाचारी माणसे त्याला मंत्रीमंडळात घुसवली जात होती तेव्हा स्वाभिमान दाखवून राजीनामा का नाही दिला ह्याने? का त्याच्या गुणसंपदेत स्वाभिमान काहीसा कमी आहे?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 03/15/2015 - 16:09 नवीन
कोळसा खाण वाटप लिलाव आणि २-जी तरंगलहरी वाटप लिलाव या दोन लिलावातून अंतिमतः सरकारच्या तिजोरीत तब्बल २१ लाख कोटी रूपये मिळण्याची शक्यता आहे. युपीए सरकारच्या काळात कोळसा खाणी आणि तरंगलहरी अक्षरशः खिरापतीसारख्या वाटल्या गेल्या होत्या. लिलाव केला असता तर इतका प्रचंड महसूल मिळेल हे या सरकारमधील मनमोहन सिंग, चिंदंबरम इ. अर्थविद्वानांना समजले नसेल यावर विश्वास बसणे अशक्य आहे. असे असूनसुद्धा व देशाचे प्रचंड नुकसान होत असूनसुद्धा हे का गप्प बसून राहिले हे एक गूढच आहे? लिलाव न करण्यामागे कोणाचे आदेश होते, कोणाचा दबाव होता, कोणाच्या फायद्यासाठी लिलाव केला गेला नाही इ. सर्व गोष्टी बाहेर येऊन दोषींना कठोर शिक्षा व्हायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ध
धर्मराजमुटके Sat, 03/14/2015 - 14:10 नवीन
जाने दो भाईयों ! हमारी भाषा मे म्हणते है ना की कोळसा कितना भी उगाळेंगा तो काळाच.
  • Log in or register to post comments
ज
जानु Sun, 03/15/2015 - 18:26 नवीन
बाकी हुप्प्या यांशी सहमत हा प्रश्न सतत पडतो की जर ममो ईतके सज्जन आहेत तर असे कोणते कारण की त्यांना आपल्यावरील एवढे हुकुम सहन केले, की आपण समजतो तसे नाही?
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 03/16/2015 - 18:51 नवीन
मी स्वतः कट्टर काँग्रेसविरोधी आहे. पण मनमोहनसिंग ह्यांना गोवणं हे खटकतयं मला खुप. हातात अधिकार असुनही त्यांनी ते वापरले नाहीत हे खरं आहे. योग्य त्या दोषींना शिक्षा व्हावी आणि मनमोहनसिंग ह्यांना निवृत्तीचं आयुष्य सुखासमाधानात आणि शांततेत जगता यावं हीचं इच्छा!!
  • Log in or register to post comments
व
विकास Mon, 03/16/2015 - 18:57 नवीन
सहमत. दुर्दैवाने त्यांच्याकडेच कोळसा खाते असल्याने ते जास्त अडकले गेले आहेत, केवळ पंतप्रधान म्हणूनच नव्हे. त्यांना जरी (भाजपा आणि इतरत्र) राजकीय विरोधक असले तरी शत्रू नाहीत. ते कदाचीत काँग्रेसमधेच मिळतील. विशेषतः नाकापर्यंत पाणी आल्यावर पिल्लाला ढकलून देणार्‍या माकडाच्या गोष्टीतल्या सारखे.. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 03/16/2015 - 18:59 नवीन
असंगाशी संग प्राणाशी गाठ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
श
श्रीगुरुजी Wed, 03/25/2015 - 16:38 नवीन
वरील लेखात असे लिहिले होते. ______________________________________________________________________________ "मी निश्चितच दुःखी आहे. पण हा जीवनाचाच एक भाग आहे. देशाच्या न्यायव्यवस्थेचा मी आदर करतो आणि कायद्याच्या प्रक्रियेला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे. निष्पक्ष चौकशीत सर्व पुराव्यांनिशी माझे निरपराधित्व सिद्ध होईल, अशी आशा आहे." अशी प्रतिक्रिया मनमोहन सिंगांनी दिली आहे. या प्रतिक्रियेवरून ते निश्चितच न्यायालयात जाऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील असं दिसतंय. परंतु या खटल्यात काँग्रेसच्या इतर अनेकांची नावे बाहेर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा खटला सुरू होउ नये व मनमोहन सिंगांना न्यायालयात जावे लागू नये यासाठी काँग्रेस जीवापाड प्रयत्न करेल. काँग्रेसकडे चिदंबरम्, सिब्बल, खुर्शिद असे कसलेले वकील आहेत. मनमोहन सिंगांचे आरोपपत्रातील नाव वगळावे यासाठी सुरवातीला केंद्रीय गुप्तचर खात्याच्या विशेष न्यायालयाला विनंती करण्यात येईल. ती विनंती न्यायालयाने फेटाळली तर उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जातील. तिथेही विनंती मान्य नाही झाली तर सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येईल. असे एकापाठोपाठ एक अर्ज करून काँग्रेस या खटल्याचा प्रारंभ जास्तीतजास्त लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न सुरूच ठेवील. ______________________________________________________________________ अपेक्षेप्रमाणे आपल्याविरूद्ध जारी करण्यात आलेल्या समन्सच्या विरोधात मनमोहन सिंगांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कोळसा खाणवाटप घोटाळा प्रकरणी विशेष न्यायालयाने 'आरोपी' करून न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिल्यानंतर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी विशेष न्यायालयाने दिलेले समन्स तातडीने रद्द करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. या याचिकेवर गुरुवारी तातडीने सुनावणी होण्याची शक्यता आहे. http://www.loksatta.com/desh-videsh-news/coal-scam-case-ex-pm-manmohan-singh-moves-sc-against-summon-1085237/ "देशाच्या न्यायव्यवस्थेचा मी आदर करतो आणि कायद्याच्या प्रक्रियेला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे. निष्पक्ष चौकशीत सर्व पुराव्यांनिशी माझे निरपराधित्व सिद्ध होईल, अशी आशा आहे." अशी प्रतिक्रिया मनमोहन सिंगांनी दिली होती, परंतु आता न्यायालयाला सामोरे जाण्याऐवजी ते न्यायालयात जाण्याची वेळच येऊ नये यासाठी समन्सच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. समन्सच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणे हा त्यांचा कायदेशीर हक्क आहे. परंतु आपण पूर्ण निर्दोष असल्याची त्यांची पूर्ण खात्री असेल तर त्यांनी न्यायालयात हजर राहून खटल्याला सामोरे जाऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करायला हवे होते. मुळात हा खटलाच उभा राहू नये यासाठी काँग्रेसचे धुरीण आटोकाट प्रयत्न करणार व त्यामुळेच आता थेट समन्सलाच आव्हान दिले गेले आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा