Welcome to misalpav.com
लेखक: मार्मिक गोडसे | प्रसिद्ध:
शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी महिनाभर राहून मनसोक्त हुंदडायचे,मामेभाऊ व त्याच्या मित्रांबरोबर खेळायचे , टिंगलटवाळ्या करायच्या व सुट्टी संपली की ही आठवणींची शिदोरी घेवून आपल्या घरी परतायचे हा माझा दरवर्षीचा कार्यक्रम असे. अकरावीची वार्षिक परिक्षा संपल्यावर दरवर्षीप्रमाणे आजोळी गेलो. दुपारची वेळ असूनही घरात आजी आजोबांव्यतिरिक्त कोणीच नव्हते. मामेभाऊ-बहीण कोणीही घरात नव्ह्ते, प्रत्येकाने स्वतःला अभ्यासापासून ते पोहण्यापर्यंतच्या क्लासेसमध्ये गुंतवून घेतले होते. हातपाय धूवून फ्रेश होवून आजी-आजोंबांबरोबर थोडावेळ गप्पा मारल्या व बाहेर सटकलो. शेजारी मित्राच्या घरी गेलो तर तोही असाच कुठल्यातरी क्लासला गेला होता, बरोबरीचे कोणीही आजुबाजुला खेळताना दिसत नव्हते, फक्त चिल्लिपिल्ली मुले भर उन्हात खेळत होती. ते रखरखीत ऊन व आजुबाजूचे वातावरण मला अधिक उदास वाटू लागले,ह्याच उन्हात मित्रांबरोबर खेळताना असे कधीही जाणवले नव्हते. संध्याकाळी भावंडांबरोबर बाहेर मॉलमध्ये खरेदी,खादाडणे, इ.व्हायचे. एखाद दोन दिवस हे ठिक वाटले नंतर त्याचाही कंटाळा येवू लागला. अशी मजा मला माझ्या शहरातही मिळत होती. आजोळी मी ज्यासाठी आलो होतो त्या मजेला यंदा मी मुकलो होतो, पहिल्यांदा मी आजोळी कंटाळलो होतो. आजीआजोबांच्या आग्रहामुळे मी कसाबसा एक आठवडा आजोळी काढला. दरवर्षीप्रमाणे मला निरोप देण्यासाठी बस स्टँडवर आज कोणीही उपस्थीत नव्हते. गर्दी भरपूर होती. मुंबईला जाणारी बस आली. जो तो बसमध्ये चढण्यासाठी दरवाज्यात गर्दी करत होता, मीही त्यात सामील झालो. एव्हाना अर्धी गाडी भरली होती. मी पायरीवर पाय ठेवणार तितक्यात एका उंचपूर्‍या मजबूत देहयष्टीच्या माणसाने माझ्यासकट सगळ्यांना मागे ढकलून गाडीत शिरकाव केला. मी पुन्हा गाडीत चढण्याचा नाद सोडला व मागे जाऊन हताशपणे गाडीकडे बघत उभा राहिलो. तितक्यात त्या गाडीतील मागून दोन नंबरच्या खिडकीतून कोणीतरी हात काढून मला बोलवत होते. ते दूसरे तिसरे कोणीही नसून ज्यांनी मला ढकलले होते तेच गृह्स्थ होते. त्यांनी माझ्यासाठी जागा पकडली होती. गाडीत पाय ठेवायला जागा नव्हती कसाबसा मी मागे पोहोचलो. ए पोराला रस्ता द्या असे त्या गृह्स्थाने आपल्या खणखणीत आवाजात लोकांना फटकारले. आजुबाजुच्या प्रवाशांच्या चेहर्‍यावर नाराजीचे भाव स्पष्ट दिसत होते इतक्या गर्दीतही आपल्याला विनासायास बसायला मिळते ह्यामुळे मनातल्या मनात सुखावलो होतो. थँक्यु आजोबा असे म्हणुन मी बसलो. पांढरी टोपी, पांढरा सदरा व पायजामा वय अंदाजे ६५ च्या पुढे असावे. कोण लागत होते हे आजोबा आपले? का आपल्यासाठी जागा पकडली असेल? कंडक्टरने बेल वाजवली व गाडी सुरू झाली. गर्दीमुळे कंडक्टरला मागे यायला बराच वेळ लागणार होता. तरीही मी पाकिटातून तिकिटाचे नेमके पैसे काढून शर्टच्या खिशात ठेवणार तिततक्यात आजोबा म्हणाले तू तिकिट काढू नकोस तू माझ्याबरोबर आहे असे मी कंडक्टरला सांगीन. तू काळजी करू नकोस. स्वातंत्र्यसैनिकाबरोबर एक व्यक्ति मोफत प्रवास करू शकते हे माहित होते. परंतू आजोबांचे वय ८० च्या आसपासही वाटत नव्हते. मला तर लॉटरीच लागली असे वाटले. बाळ तू काय करतोस ? आजोबांनी विचारले. ११ वी कॉमर्सची परिक्षा दिली.- मी. कॉमर्स?? दहावीला कमी मार्क मिळाले का?- आजोबा. नाही- मी. मग सायन्सला का गेला नाही, करीअरच्या संधी इ. आजोबांचे लेक्चर सूरू झाले. त्यांच्या बोलण्यातून मला समजले की आजोबा एका खेड्यात जि.प. च्या शाळेत मुख्याध्यापक होते. गावी बर्‍यापैकी जमीन आहे. निवृत्तीनंतर शेतीत लक्ष घालू लागले. दोन मुले म.रा.वि.म मध्ये इंजिनिअर आहेत. एक मुलगा बी.एस्सी. अ‍ॅग्री. शेती करतो व एका साखर कारखान्याच्या बॉडीवर कुठल्याश्या मोठ्या पदावर आहे. हे सर्व ते मोठ्या अभिमानाने सांगत होते. आजोबांचे भारदस्त व्यक्तिमत्व व स्पष्टवक्तेपणामुळे मी भारावून गेलो होतो त्यांच्याविषयी आदर वाटू लागला होता. तुम्हाला कुठे जायचे आहे? सहज चौकशी म्हणून मी आजोबांना विचारले. आजोबा म्हणाले मुंबईला. मुंबईला कोणाकडे ? मी विचारले. आजोबांनी माझा डावा हात पकडला व त्यांच्या पोटाच्या उजव्या बाजूवर ठेवला. कडक झाकणासारखा हाताला स्पर्श झाला. मला काही समजले नाही हे आजोबांन कळाले. व त्याणीच सांगायला सुरवात केली. मला पोटाचा कॅन्सर आहे. टाटामध्ये ऑपरेशन करुन खराब झालेले आतडे काढून टाकले. मलविसर्जनाचा नैसर्गीक मार्ग नसल्यामुळे पोटाला छेद घेउन एक छोटी नळी आतड्याला जोडुन शरिराच्या बाहेर जोडली आहे. एक सक्शन पंप जोडून मल बाहेर काढून व नळी साफ करुन त्याला झाकण लावावे लागते. अधून मधून टाटाला यावे लागते उपचारासाठी. हे ऐकल्यावर मला आजोबांविषयी आदराबरोबर सहानुभूती वाटू लागली. मग तुम्ही प्रवासात सोबतीला कोणाला का नाही घेतले? मी विचारले. मला काय गरज कोणाला सोबतीला घ्यायची. मी ठणठणीत आहे, मला कोणाच्या आधाराची गरज नाही, थोड्या घुश्यातच आजोबा गरजले. गाडीत चढताना अनुभव घेतला होताच मी त्यांच्या फिटनेसचा. आजोबांनी बॅगेतून एक फाईल काढली. त्यात उपचारांची अनेक कागदपत्रे होती त्याच बरोबर अनेक राजकीय व्यक्तिंची शिफरसपत्रे होती. मुलाच्या ओळखीमुळे अल्पभुधारक असल्याचा दाखला होता. ज्यामुळे त्यांचे ऑपरेशनपासून औषधौपचार मोफत मिळाले होते. हे सर्व एक माजी शिक्षक मोठ्या अभिमानाने मला सांगत होते. कॅन्सरचा रुग्ण असल्यामुळे रुग्णाबरोबर एका व्यक्तीला मुळ गावापासून टाटा हॉस्पिटल पर्यंत एस.टी. प्रवास मोफत असल्याचे एक सवलतपत्र माझ्यापुढे धरले. माझ्यामुळे तुझे तिकिटाचे पैसे वाचतील त्यातील थोडे म्हणजे ४० रुपये तू मला दे. टॅक्सिवाला फुकटात थोडाच नेणार आहे मला? आजोबा म्हणाले. आता मला माझ्या मोफत प्रवासाचे गुपित उलगडले.मी एकटा आहे हे आजोबांनी (धूर्त) हेरले होते. मी सहज नकार देवू शकणार नाही सोपी शिकार आहे असेही वाटू शकले असेल. मी ह्या आमीषाला बळी पडलो तर एक प्रकारे मी भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले असे होइल. घरातून झालेल्या संस्काराचा अवमान केल्यासरखे होइल. कंडक्टर जवळ आला मी एक ठाण्याचे तिकिट काढले. ठाण्याचा का तू? म्हणुनच असा वेडेपणा केलास तू. आजोबांनी संतापाने मला टोमणा मारला. मी उठलो व बाजूच्या प्रवाशाला बसायला जागा दिली. त्या जागेवर बसण्याचा मला काहीही नैतिक अधिकार नव्हता.बाजूच्या प्रवाशांच्या नजरेतून ते मला जाणवत होते. थोड्याच वेळेपूर्वी ज्या वक्तीबद्दल मला आदर व सहनुभूती होती ती आता पुर्णपणे नष्ट पावली होती. कदाचीत मोफत उपचारांमुळे आजोबांना आजाराचे गांभिर्य समजले नसेल नाहीतर एक शिक्षक असूनही ते जर कॅन्सरसारख्या आजारातही लोभीपणा सोडू शकत नसतील व उलट भ्रष्टाचाराला जन्म देत असतील तर भावी पिढीला ते नक्किच चुकीचा संदेश देत आहेत.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

इतक्या साध्या गोष्टीतही भ्रष्टाचार आणि तोही एका माजी शिक्षकाने करावा? :(

सर्व भ्रष्ट लोकांना कॅन्सर होत नाही, हेच दु:ख आहे.

समजा जर त्यांनी तुमच्या़कडे पैसे मागितले नसते तर तुम्ही स्वखर्चाने तिकिट काढले असते का? किंवा तुमची जाग सोडली असती का?
मला तर लॉटरीच लागली असे वाटले.
कदाचित नाही. मॉरल हायग्राऊंड घेण्यात जी नशा आहे त्याला तोड नाही. आणि आपल्यापैकी बहुतांश ह्याला बळी पडतात.

हेच म्हणायला आलो होतो. स्वातंत्र्यसैनिकास स्वतःबरोबर एका व्यक्तिस विनाशुल्क नेण्याची मुभा असते, हे लेखकास माहिती आहे, तेव्हा त्यामागील कारणही माहिती असावे (ते हे की, ही व्यक्ति सदर वयोव्रुद्ध व्यक्तिचा सांभाळ करण्यासाठी तीजबरोबर जात आहे, तेव्हा तिचा प्रवास मोफत असावा). जोंवर त्या वृद्धाने लेखकाकडे पैसे मागितले नाहीत, तोंवर त्याला ह्या सवलतीचा गैरवापर करण्यात हरकत नव्हती. उलट त्याला अगदी 'लॉटरीच लागल्याचा आनंद झाला होता'. नैतिकतेची आठवण वृद्धाने 'मांडवळ' केली तेव्हाच झाली. मॉरल हायग्राऊंड घेण्यात जी नशा आहे त्याला तोड नाही. माह्या मते 'सिलेक्टीव्ह नैतिकता' हा खास मध्यमवर्गीय रोग आहे.

नैतिक मुद्द्यांवर लेखकाचे म्हणणे बरोबरच आहे. मात्र त्या वृद्धालाही मी लगेच भ्रष्टाचारी संधीसाधू माणसांच्या रांगेत नाही उभे करणार. पोटाचा कॅन्सर. एवढे अवघड दुखणे. प्रवास मोफत असला तरी औषधोपचार, हॉस्पिटलचा खर्च, डॉक्टरची फी, त्या अनुषंगाने येणार्‍या इतर आजारांचा व्याधींचा खर्च हे बघता ते गृहस्थ पै न पै वाचवण्याचा प्रयत्न करत असतील तर मला त्यांच्याविषयी सहानूभूती आहे. एका तिकिटाचे पैसे वाचले म्हणुन जर आपल्याला लॉटरी लागल्यासारखे वाटत असेल तर इतक्या अवघड आजारात, इतक्क्या वेदना सहन करणार्‍या आणि पाण्यासारखा पैसा कर्च करावा लागणार्‍या माणसाचा थोडे पैसे वाचविण्याचा विचार मला अनैतिक वाटण्याऐवजी करुण वाटला. त्या सद्ग्रुहस्थांवर योग्य ते उपचार होउन ते ठीक झाले असावीत अशी आशा आहे.

सहमत. तसेच त्यांनी कायद्याचे उल्लंघन केलेले दिसत नाही.
अनैतिक वाटण्याऐवजी करुण वाटला
बरोबर , ही त्यांची आर्थिक अगतिकता असु शकते

खरंय. समोरच्या व्यक्तीची एकंदर परिस्थती माहीत नसताना जजमेंटल होऊन न्यायनिवाडा करणे पटत नाही. (शिवाय आजोबा तिकीट स्पॉन्सर करत होते तेव्हा लेखकाला आनंद झालाच होता की!)

सिलेक्टीव्ह नैतिकता' हा खास मध्यमवर्गीय रोग आहे.हे मान्य नाही. हे उच्च वर्गातही दिसते किंवा निम्न वर्गातही दिसते. हेच तिकीट ४०० रुपये असते तर असे मॉरल हायग्राऊंड घेतले असते का हाही एक प्रश्न आहे. शेवटी माणूस हा स्वार्थीच असतो. पण फार किंमत द्यायला लागत नसेल तर नैतिकतेचे अधिष्ठान घ्यायला पुढे येतो. त्यामुळेच काही धंदेवाईक लोक म्हणतात कि प्रत्येक माणूस विकाऊ आहे फक्त किमतीत फरक असतो ते बहुतांशी खरे आहे असे वाटते.

धाग्याचे शीर्षक अगदी मार्मिक आहे रे मार्मिका.वर ईतर तज्ञांनी म्हंटल्याप्रमाणे आपण ,विशेष करून मराठी माणसे नको तेथे नैतिकता दाखवून स्वतःचेच नुकसान करून घेत असतो.करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्या,भाषेचे,धर्माचे,जातीचे राजकारण करणार्या पुढार्यांबद्दल आपण ब्र काढायला दचकतो व ४०-५० रुपयांच्या केसबद्दल तावातावाने चर्चा करतो.

@मृत्युन्जय व मराठी माणूस प्रतिसाद देण्यापूर्वी लेख जरा नीट वाचा. वाचायचा फारच कंटाळा आला असेल तर लेखाच्या शेवटचे वाक्य वाचले तरी चालेल. कदाचीत मोफत उपचारांमुळे आजोबांना आजाराचे गांभिर्य समजले नसेल नाहीतर एक शिक्षक असूनही ते जर कॅन्सरसारख्या आजारातही लोभीपणा सोडू शकत नसतील व उलट भ्रष्टाचाराला जन्म देत असतील तर भावी पिढीला ते नक्किच चुकीचा संदेश देत आहेत.

मला तर लॉटरीच लागली असे वाटले. सुट्टीतील मजेपासून गाडीत जागा मिळेपर्यंत कोणतीच गोष्ट मनासारखी होत नसताना अचानक इतर सारे प्रवासी सोडून एक अनोळखी व्यक्ती फक्त माझ्यासाठीच जागा पकडते काय व मोफतची ऑफर देते काय हे इतक्या वेगाने घडले की त्यावेळी क्षणभर मी गोंधळून गेलो होतो व खरोखरच मला लॉटरी लागल्यासारखे वाटले. त्यावेळी पैसे कमवायचे माझे वय नव्हते किंवा मी पैसे कमावत नव्हतो. लॉटरी १० रुपयाची लागली काय किंवा करोडोची लागली काय जी काय लागली ती आपल्याला स्वीकारावी लागते. इथे आजोबांची ऑफर स्वीकारुनही माझे ५० एक रुपये वाचत होते. त्या वयात ५० एक रु. म्ह्णजे खूपच झाले. तरीही मी ती ऑफर नाकारली ह्यातच सगळे काही आले. समजा मी कंडक्टरच्या तपासणीनंतर आजोबांना पैसे न देण्याचा भामटेपणा केला असता तर ? आजोबा एका खेड्यात जि.प. च्या शाळेत मुख्याध्यापक होते. गावी बर्‍यापैकी जमीन आहे. निवृत्तीनंतर शेतीत लक्ष घालू लागले. दोन मुले म.रा.वि.म मध्ये इंजिनिअर आहेत. एक मुलगा बी.एस्सी. अ‍ॅग्री. शेती करतो व एका साखर कारखान्याच्या बॉडीवर कुठल्याश्या मोठ्या पदावर आहे. हे सर्व ते मोठ्या अभिमानाने सांगत होते. जि.प. च्या निवृत्त शि़क्षकाला पेंशन नक्किच मिळत असणार. म्हणजे त्यांची आर्थिक बाजु कमकूवत नव्हती. मुले सांभाळत नाही असे एकदाही आजोबांच्या बोलण्यातून जाणवले नाही. सोबत कोणाला का घेतले नाही ह्या माझ्या प्रश्नाचा आजोबांना राग आल्याचे मला जाणवले. खरतर सोबतीला कोणी घेतले असते तर वरच्या कमाईला आजोबा मुकले असते. बरोबर , ही त्यांची आर्थिक अगतिकता असु शकते ह्या न्यायाने एखाद्या शिपायापासून तर अधिकार्‍यापर्यंत एखाद्याने लाच मागितली तर ती त्याची आर्थिक अगतिकता समजून त्याला माफ कारवे का? सीमेवरील जवानांनी आर्थिक अगतिकतीच्या नावाखाली शत्रुदेशाकडून पैसे घेवून अतीरेक्यांना आपल्या देशात घुसखोरी करून दिली, तस्करीकडे दुर्लक्ष केले तर त्याच्या कृतीचे आपण समर्थन करनार का? असे शि़क्षक आणी त्यांच्या कृतीचे समर्थक ह्या देशात असतील तर तो दिवसही फार दूर नाही.

तरुण धडधाकट माणसाने २०० रु वाचवले तर ती त्याला लागलेली लॉटरी. पण क्यान्सरच्या म्हातार्‍याने ४० रु कमावले तर तो लोभ ! वा वा ! ..( मी क्यान्सरच्या हास्पिटलातच डॉक्टरकी करतो.)

तरीही मी ती ऑफर नाकारली ह्यातच सगळे काही आले कमाल आहे! सुरूवातीसच तुम्ही ती ऑफर नाकारली नाहीत. आजोबांनी पैसे मागितल्यावर तुम्ही ती नाकारलीत, हे तुम्ही अजूनही अमान्य करताहात! वर माझ्या प्रतिसादास उत्तर देतांना सुबोध खर्‍यांनी म्हटले आहे "काही धंदेवाईक लोक म्हणतात कि प्रत्येक माणूस विकाऊ आहे फक्त किमतीत फरक असतो ते बहुतांशी खरे आहे असे वाटते". हे अगदी बरोबर आहे. पण उच्च व निम्नवर्गांतील माणसे नैतिकतेचा बाऊ करत नाहीत, मध्यमवर्गीय तसे करतात (They wear morality on their sleeve)-- आणी ते कुठपर्यंत? जेव्हा ती दुसर्‍यांना लागू करायची आहे, तिथपर्यंत. स्वतःच्या संदर्भात मग ही माणसे बहुधा (स्वतःच्या शिक्षणाचा [गैर]वापर करून) काही चलाख तर्क पुढे करून पळवाटा शोधत असतात. वरील प्रतिसाद हा हेच अधोरेखित करतो. "समजा मी कंडक्टरच्या तपासणीनंतर आजोबांना पैसे न देण्याचा भामटेपणा केला असता तर ?"

माझ्या प्रतिसादात मी लॉटरीविषयी स्पष्ट लिहिले आहे. एखाद्याची आर्थीक परिस्थीती चांगली असतानाही जर ती व्यक्ती सवलतीचा अशाप्रकारे गैरवापर करत असेल तर त्या कृतीस आपण काय म्हणाल?

त्यांनी कुठे नैतिकतेचा बाऊ केला आहे, असे तुमच्या लेखात आलेले नाही. माझी टिका तुमच्या नैतिक अधिष्ठानाबद्दल आहे.

त्यांची परिस्थिती सधन होती आणि तुमची नव्हती हे कशावरुन खरे मानायचे ? क्यान्सरचा खर्चच इतका प्रचंड असतो की एक नाही दोन पिढ्यांची कमाईही संपु शकते हे माहीत आहे का ?

हितेश राव गावी बर्‍यापैकी जमीन आहे. निवृत्तीनंतर शेतीत लक्ष घालू लागले. दोन मुले म.रा.वि.म मध्ये इंजिनिअर आहेत. एक मुलगा बी.एस्सी. अ‍ॅग्री. शेती करतो व एका साखर कारखान्याच्या बॉडीवर कुठल्याश्या मोठ्या पदावर आहे. हे सर्व ते मोठ्या अभिमानाने सांगत होते. मुलाच्या ओळखीमुळे अल्पभुधारक असल्याचा दाखला होता. ज्यामुळे त्यांचे ऑपरेशनपासून औषधौपचार मोफत मिळाले होते. क्यान्सरच्या म्हातार्‍याने ४० रु कमावले तर तो लोभ. आपण हे वाचले नाहीत असे वाटते. आपण कॅन्सर हास्पिटलातच डॉक्टरकी करतो. तर आपल्याला हे माहितही असावे कि हि कोलोस्टोमी बैग लावलेली आहे अशी ब्याग लावून माणसे वर्षनुवर्षे कोणताहि उपचार न घेता (पाच वर्षे नुसते फोल्लो अप वर असतात) व्यवस्थित राहतात. मग असे असताना ४० रुपयासाठी त्या माणसाने असे करावे यावरून गोडसे म्हणतात त्यात तथ्य असावे हे स्पष्टच आहे. एकदा एखाद्याला आरोपीच्या पिंजर्यात उभे केले कि कोणतेही बेफाट आरोप करायला मोकळीक मिळाली असे असू नये.

ह्या न्यायाने एखाद्या शिपायापासून तर अधिकार्‍यापर्यंत एखाद्याने लाच मागितली तर ती त्याची आर्थिक अगतिकता समजून त्याला माफ कारवे का? सीमेवरील जवानांनी आर्थिक अगतिकतीच्या नावाखाली शत्रुदेशाकडून पैसे घेवून अतीरेक्यांना आपल्या देशात घुसखोरी करून दिली, तस्करीकडे दुर्लक्ष केले तर त्याच्या कृतीचे आपण समर्थन करनार का?
वरील सर्व बेकायदेशीर तसेच देशद्रोही कृत्य आहे. तुम्ही वर्णन केलेली घटना त्याच कक्षेत येते असे तुम्हाला वाट्ते का ? आजोबांची पुर्ण पार्श्वभुमी माहीत नसल्यामुळे ती आर्थीक अगतिकता असु शकेल असे म्हटले आहे

बघा किती फाटे फुटले. आपलं म्हणणं योग्यच आहे की एक शिक्षक असं कसं वागु शकतो! पण लोकांनी उलट आपल्यालाच आरोपीच्या पिंजर्यात उभं केलंय. नेकी कर और दर्यामे डाल असं उगाच नाही म्हणत..

लेख नीट वाचून प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे धन्यवाद. लेखात आजोबांच्या आर्थीक स्थीतीचे वर्णन असतानाही बर्‍याच जणांनी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले व माझ्यावर मोरल हायग्राउंड चे आरोप केले. जे काय घडले ते माझ्यात व आजोबांमध्ये घडले होते त्यामुळे मी आजोबांची ऑफर नाकारून तिकीट काढून बाजूच्या ज्या प्रवाश्याला माझ्या (सॉरी) जागेवर बसायला दिले त्याला जर नेमके कारण माहीत नसेल तर मोरल हायग्राउंडचा प्रश्न येतो कुठे? आजोबांची प्रत्येक कृती ही प्री प्लॅन होती. त्यांना प्रत्येका गोष्ट मोफत हवी होती. ह्या उलट माझी स्थीती सुरवातीला गोंधळलेल्या स्वरूपाची होती. वेळीच सावरल्यामुळे मनात अपराधी भावना राहीली नही. निदान माझ्या कृतीमुळे आजोबा ह्यापुढे असे कृत्य करण्याचे धाडस करणार नाही. फुकटचे काहीही न घेण्याचे घरातून झालेले संस्कार वाया गेले नाही यातच मला आनंद आहे.

मार्मिक आपण नैतिकतेच्या नशेत जगत असला तरी आजोबांनीही जगाव अशी आपली अपेक्षा दिसते. आजोबांच वर्तन नैतिक निकषांवर योग्य नसेल ही पण क्षम्य आहे.कॅन्सर मुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्यावर ही परिणाम झाला असणारच ना!

घाटपांडे साहेब कॅंसर पोटाचा होता. डोक्याचा नव्हे. उत्तम आर्थिक स्थिती असूनही आणि इलाज फुकट मिळूनही असे करणारा माणूस अगतिक नव्हे तर लोभी आढळतो आहे. ( दिलेल्या लेखावरून)

वर मृत्युंजय यांची प्रतिक्रिया आपण वाचली असणार.
कॅंसर पोटाचा होता. डोक्याचा नव्हे.
मन व शरीर यांचा संबंध हा मी आपणास सांगण्याची गरजच नाही. नैतिकतेच्या नशेत काही लोक एखादी गोष्ट क्षम्य मानायला पण तयार नसतात.

आजोबा एका खेड्यात जि.प. च्या शाळेत मुख्याध्यापक होते. गावी बर्‍यापैकी जमीन आहे. निवृत्तीनंतर शेतीत लक्ष घालू लागले. दोन मुले म.रा.वि.म मध्ये इंजिनिअर आहेत. एक मुलगा बी.एस्सी. अ‍ॅग्री. शेती करतो व एका साखर कारखान्याच्या बॉडीवर कुठल्याश्या मोठ्या पदावर आहे.त्यात उपचारांची अनेक कागदपत्रे होती त्याच बरोबर अनेक राजकीय व्यक्तिंची शिफरसपत्रे होती. मुलाच्या ओळखीमुळे अल्पभुधारक असल्याचा दाखला होता. ज्यामुळे त्यांचे ऑपरेशनपासून औषधौपचार मोफत मिळाले होते. हे आपण वाचले नसावे किंवा मृत्युंजय यांनीही वाचले नाही का? पाण्यासारखा पैसा कर्च करावा लागणार्‍या माणसाचा थोडे पैसे वाचविण्याचा विचार मला अनैतिक वाटण्याऐवजी करुण वाटला.> असा प्रतिसाद लिहिला आहे म्हणून विचारतो आहे?

हे सगळ वाचलेले आहेच.मला आजोबांच्या विचारामागे कारुण्याची छटा दिसते, कुणाला ती अनैतिकतेची दिसते. दृष्टीचा फरक. मला आजोबांचे वर्तन योग्य नसले तरी क्षम्य वाटते कुणाला वाटत नाही. असो!

अशा क्षमाशील स्वभावाची जनता आहे म्हणूनच भ्रष्टाचार बोकाळला आहे. एखाद्या माणसाच्या चुकीच्या वागण्याला चुकीचे म्हणून त्यावर कडक शब्दात टीकाही करायची नाही का? असे करणे म्हणजे लगेच आजोबांना शिक्षा करणे नाहीय त्यामुळे त्यांना क्षमा करायची घाई नकोय. मुळात मला क्षम्य वाटते असे म्हणणे म्हणजे क्षमा करायचा अधिकार आपल्याकडे आहे अशी हायग्राउंड भूमिका घेणे नव्हे का? भ्रष्टाचार्‍यांना किमान मोकळेपणी शिव्यातरी देऊ द्या की हो. हेच जर सेक्सबद्दल काही असते तर एकजात सगळे तुटून पडले असते. इतर बाबतीतही तेवढीच कठोर नीतिमत्ता पाळली पाहिजे हे कधी वळणार आपल्याला?

@ प्रकाश घाटपांडे मार्मिक आपण नैतिकतेच्या नशेत जगत असला तरी आजोबांनीही जगाव अशी आपली अपेक्षा दिसते. एका शिक्षकाकडून (निवृत्त) अशी अपेक्षा करणे चूक आहे का? आणी हो,नैतीकततेची नशा नसते तर ते एक प्रकारचे ओझे असते त्यामुळे त्या व्यक्तीचे पाय नेहमीच जमिनीवर राहतात. मला आजोबांच्या विचारामागे कारुण्याची छटा दिसते एखाद्या व्यक्तीच्या राहणीमानावरून, बोलण्यातून व देहबोलीतून आपल्याला त्या व्यक्तीचा स्वभाव, आर्थिक स्थीती, हेतू ई.गोष्टींचा अंदाज येतो. जसे ती व्यक्ती मला गरिब (स्वभावाने/आर्थिकतेने) किंवा लबाड वाटली (स्वभावाने/व्यवहाराने) असे म्हणतो व त्याप्रमाणे त्या व्यक्तीशी वागतो. उदा. एखाद्या भिकार्‍याला भीक देण्यापुर्वी आपण त्या व्यक्तीचे राहणीमान,वय व शारीरिक स्थीतीचा अंदाज घेतो व निर्णय घेतो. त्यापमाणे मला आजोबांच्या आर्थिक परिस्थीतीचा व हेतूचा अंदाज आला होता. परंतू ते योग्य शब्दात मांडायचे कौशल्य माझ्यात नसल्यामुळे काही वाचकांना आजोबांच्या आर्थिक परिस्थीतीचा, औषधौपचारांचा व स्वभावाचा अंदाज आला नाही. उदा.१) आजोबा एका खेड्यात जि.प. च्या शाळेत मुख्याध्यापक होते. गावी बर्‍यापैकी जमीन आहे. निवृत्तीनंतर शेतीत लक्ष घालू लागले. दोन मुले म.रा.वि.म मध्ये इंजिनिअर आहेत. एक मुलगा बी.एस्सी. अ‍ॅग्री. शेती करतो व एका साखर कारखान्याच्या बॉडीवर कुठल्याश्या मोठ्या पदावर आहे. हे सर्व ते मोठ्या अभिमानाने सांगत होते. फक्त आणी फक्त गरीबीचे वर्णन. >२)टॅक्सिवाला फुकटात थोडाच नेणार आहे मला? अजेंडा शतप्रतिशत मोफतचा. >३)मला काय गरज कोणाला सोबतीला घ्यायची. मी ठणठणीत आहे, मला कोणाच्या आधाराची गरज नाही, थोड्या घुश्यातच आजोबा गरजले ४)ठाण्याचा का तू? म्हणुनच असा वेडेपणा केलास तू. आजोबांनी संतापाने मला टोमणा मारला. ह्याला कारुण्य म्हणतात हे मला ठाऊकच नव्हते.

माझा मुख्य मुद्दा एवढाच होता की आजोबांचे वर्तन योग्य नसले तरी क्षम्य आहे. आजारामुळे त्यांना द्यावी लागलेली/लागणारी शारिरिक, आर्थिक, मानसिक पातळीवरील किंमत पहाता जगण्याच्या लढ्यासाठी स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात केलेले ते वर्तन असते.आपल्याला (त्यात मी ही आलोच) त्याच्या सहअनुभूतीची बाब कदाचित जाणवणार नाही. बाकी देहबोलीतुन आपल्याला जे जाणवले त्याबद्दल माझे काहीच म्हणणे नाही.

शिक्षकाकडून (निवृत्त) अशी अपेक्षा करणे चूक आहे का
डॉक्टरांकडून , आयटी वाल्यांकडून , रि़क्षावाल्यांकडून , शिक्षकांकडून .. भलत्याच अपेक्षा बॉ!

@प्रकाश घाटपांडे आजारपणात इलाजासाठी येणार खर्च हा रुग्णाची आर्थिक परिस्थिती उत्तम असली तरी आर्थिक बाबच आहे कॉपी पेस्ट फक्त तुमच्यासाठी त्यात उपचारांची अनेक कागदपत्रे होती त्याच बरोबर अनेक राजकीय व्यक्तिंची शिफरसपत्रे होती. मुलाच्या ओळखीमुळे अल्पभुधारक असल्याचा दाखला होता. ज्यामुळे त्यांचे ऑपरेशनपासून औषधौपचार मोफत मिळाले होते कॅन्सरचा रुग्ण असल्यामुळे रुग्णाबरोबर एका व्यक्तीला मुळ गावापासून टाटा हॉस्पिटल पर्यंत एस.टी. प्रवास मोफत असल्याचे एक सवलतपत्र माझ्यापुढे धरले

इतक्या गर्दीतही आपल्याला विनासायास बसायला मिळते ह्यामुळे मनातल्या मनात सुखावलो होतो. थँक्यु आजोबा असे म्हणुन मी बसलो. पांढरी टोपी, पांढरा सदरा व पायजामा वय अंदाजे ६५ च्या पुढे असावे. कोण लागत होते हे आजोबा आपले? का आपल्यासाठी जागा पकडली असेल? कंडक्टरने बेल वाजवली व गाडी सुरू झाली. गर्दीमुळे कंडक्टरला मागे यायला बराच वेळ लागणार होता. तरीही मी पाकिटातून तिकिटाचे नेमके पैसे काढून शर्टच्या खिशात ठेवणार तिततक्यात आजोबा म्हणाले तू तिकिट काढू नकोस तू माझ्याबरोबर आहे असे मी कंडक्टरला सांगीन. तू काळजी करू नकोस. स्वातंत्र्यसैनिकाबरोबर एक व्यक्ति मोफत प्रवास करू शकते हे माहित होते. परंतू आजोबांचे वय ८० च्या आसपासही वाटत नव्हते. मला तर लॉटरीच लागली असे वाटले.
मार्मिकजी, आपण त्या आजोबांचा कँसर बाजूस ठेवू व त्यांची कृती, नैतिकताही बाजूस ठेवू आणि असे गृहित धरु की ते स्वातंत्र्यसैनिक होते तुम्ही विचार केलात तसे ( गेल्या ५ वर्षातली घटना आहे असे समजू अन्यथा आता स्वा.सै. दुर्मिळ झालेत त्यांच्या वयामुळे). आता, १. अजूनही तुम्हाला तुमच्या कृतीबद्दल "वेळीच सावरल्यामुळे मनात अपराधी भावना राहीली नही" असे म्हणावेसे वाटते काय ? २. स्वातंत्र्य -सैनिकाबरोबर एक जणास जी सवलत असते ती ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांना आधार म्हणून असते (कोणी साठीच्या आतला स्वातंत्र्यसैनिक भेटल्यास सांगा मला तसे. ) त्यामुळे परत तुमच्या कृतीबद्दलच तुमचे मत जाणून घ्ययला आवडेल. ३.
इतक्या गर्दीतही आपल्याला विनासायास बसायला मिळते ह्यामुळे मनातल्या मनात सुखावलो होतो.
इतर लोक जे तिथे उभे होते त्यांच्यामध्ये वयस्कर एखादा/दी तरी असेल मग कोणी तिर्‍हाईताने तुमची जागा पकडली म्हणून तुम्हाला तिथे बसण्याचा नैतिक अधिकार होता का ? त्यांच्यापैकी गरजू अशा कोणास जे तुमच्या आधी त्या जागेजवळ उभे होते त्यांनाही जागा देऊ केली असतीत तर ? त्याऐवजी तुम्हास जे सुखावलेपण वाटले त्यावर नक्कीच विचार व्हावा. ४. मला तर लॉटरीच लागली असे वाटले. हे तुमच्या मनातले सहज विचार आहेत त्यामुळे तुम्ही नाकारु नका अथवा स्पष्टीकरण देत बसू नका. हे चूक आहे आणि आजोबांच्या अथवा इतर कोणाच्या कृतीने ते बरोबर होत नाही. फुकटचे काहीही न घेण्याचे घरातून झालेले संस्कार वाया गेले नाही यातच मला आनंद आहे. संस्कार आहेतच हो कारण तुम्ही शांतपणे इथे चर्चा करताय पण सुधारणेस जागा आहे हे तरी समजून घ्या. इथे हा आनंद तुम्हीच ठरवलाय आणि तो हिरावून घेण्याची इच्छा नाही पण तुमचे वय कमी वाटतेय म्हणून तुम्हाला तुमच्याच कृतीबद्दल एक फेरविचार करावा असे सुचवतोय. उगीच स्वतःची पाठ परत परत स्वतःच थोपटून घेताय, एकदा तुमच्या कृतीबद्दल विचार तरी करा ना. भले इथे नका मांडू पण स्वतःशी तरी प्रामाणिकपणे पडताळणी करा.

लोकल ट्रेन मध्ये चढताना आपण एक गर्दीचा भाग होउन आजुबाजुच्या प्रवाशांचे वय न बघता कशीबशी जागा पकडतो, थोडे स्थिरावल्यावर आजूबाजूला एखादी वयस्कर व्यक्ती असल्यास आपण तीला बसायला देतो. खरे तर आपण वयस्करांना गाडीत चढण्यास प्राधान्य दिले पाहीजे मग पुढचा मुर्खपणा टाळता येइल. संस्कार आहेतच हो कारण तुम्ही शांतपणे इथे चर्चा करताय पण सुधारणेस जागा आहे हे तरी समजून घ्या. अवश्य अवश्य. ( गेल्या ५ वर्षातली घटना आहे असे समजू अन्यथा आता स्वा.सै. दुर्मिळ झालेत त्यांच्या वयामुळे). http://www.dnaindia.com/india/report-4695-freedom-fighters-are-fake-1009654 कसे पैदास होतात कुणास ठाऊक ? जाऊदे लहान तोंडी मोठा घास.