Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक वर्षानंतर . . .

श
श्रीगुरुजी
Mon, 05/25/2015 - 09:01
🗣 1265 प्रतिसाद
१६ मे २०१४ या दिवशी भारतात इतिहासाचे एक नवे पान लिहिले गेले. स्वतंत्र भारताच्या ६७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका तथाकथित उजव्या विचारांच्या, प्रतिगामी व जातीयवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविले. त्यापूर्वीच्या ६७ वर्षांपैकी जवळपास ५४-५५ वर्षे काँग्रेसकडे सत्ता होती. उर्वरीत १२-१३ वर्षांपैकी सुमारे ६ वर्षे भाजप आघाडीचे सरकार होते व ५-६ वर्षे जनता पक्ष, जनता दल इ. वेगवेगळ्या तथाकथित मध्यममार्गी, डाव्या, निधर्मी आघाड्यांचे सरकार होते. परंतु १६ मे २०१४ रोजी प्रथमच भारतीय जनता पक्ष या उजव्या, राष्ट्रवादी, जातीयवादी इ. तथाकथित विशेषणांनी नटलेल्या पक्षाने संपूर्ण बहुमत मिळवून इतिहास घडविला. भाजपला बहुमत मिळण्यास मुख्य २ गोष्टी कारणीभूत होत्या. त्या म्हणजे, (१) २००४-२०१४ या कालखंडातील भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले व अत्यंत निष्क्रीय असलेले व सर्व आघाड्यांवर पूर्ण अपयशी ठरलेले काँग्रेसचे सरकार आणि (२) भाजपकडे असलेले नरेंद्र मोदींचे अत्यंत प्रभावी व आक्रमक नेतृत्व. अत्यंत झंझावाती प्रचार करून मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका करून जनमत आपल्या बाजूला वळवून भाजपला इतिहासात प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवून दिले व जेमतेम ४४ जागा मिळून काँग्रेसचा अक्षरशः पालापाचोळा झाला. मोदींनी २६ मे २०१४ या दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेताना सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना सोहळ्यासाठी निमंत्रित करून एक अत्यंत वेगळा पायंडा पाडून आपले पररष्ट्र धोरण कसे वेगळे असणार आहे याची चुणू़क दाखविली. एक वर्षानंतर परिस्थितीत कोणते चांगलेवाईट बदल झाले, भारताला किती फायदातोटा झाला, देशाच्या आर्थिक/राजकीय/सामाजिक्/संरक्षण/परराष्ट्र धोरण इ. क्षेत्रात कोणते बरेवाईट बदल झाले याचा संक्षिप्त स्वरूपात आढावा या लेखाद्वारे घेत आहे.
आर्थिक
विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक-मर्यादेत वाढ, संरक्षण क्षेत्रात परकीय कंपन्यांना गुंतवणुकीची संधी, खाण उत्खनन कायद्यात आमूलाग्र बदल, रेल्वेसारख्या महाप्रचंड खात्यात खाजगी गुंतवणुकीला मुभा, राज्य सरकारांना अधिक निधी, अमेरिकेबरोबर अणुऊर्जा करार, कोळसा खाण उत्खननाचे आणि दूरसंचार तरंगलहरींचे लिलाव, चलनवाढीला अटकाव आणि मुख्य म्हणजे भ्रष्टाचारावर नियंत्रण ही या सरकारची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. २०१३-१४ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३०४ अब्ज डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. २०१४-१५ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३४१ डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. एका वर्षात परकीय चलनाची गंगाजळी १२% टक्क्यांनी वाढली. औद्योगिक उत्पादनात २०१३-१४ मध्ये ४.२% ची वाढ झाली होती. हीच वाढ २०१४-१५ या वर्षात ५% टक्के इतकी आहे. आयातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत ०.५ % टक्क्यांची घट झाली आहे, तर निर्यातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत २.० % टक्क्यांची घट झाली आहे भारताची अणु उर्जा क्षमता २०१३-१४ मध्ये ४,७८० मेगॅवॅट्स इतकी होती. २०१४-१५ मध्ये हीच क्षमता ५,७८० मेगॅवॅट्स इतकी झाली आहे. यात एकूण २१ % वाढ झालेली आहे. २०१४-१५ या वर्षात जीडीपी वाढीचा दर ७.४ % होता, शेती उत्पन्न वाढीचा दर १.१ % होता, कोळसा उत्पादन ८.२ % इतके वाढले. वीज उत्पादन - २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १०% वाढ झाली. थकीत कर्जे - सार्वजनिक बँकांच्या थकीत कर्जात २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १७% वाढ झाली. ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांच्या भेटीत मोदींनी ब्रिक्स बँकेची अभिनव कल्पना मांडली. ब्रिक्स बॅंक सुरू होऊन बॅकेचे सुरवातीचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे. मनमोहन सरकारने २-जी तरंगलहरी आणि कोळसा खाणी वाटप करताना देशाचे तब्बल ३ लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान केले होते. या दोन्ही प्रकरणात प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. न्यायालयाने २०४ कोळसा खाणींचे व २-जी तरंगलहरींचे वाटप रद्द करून लिलाव पद्धतीने त्यांचे वाटप करण्याचा आदेश दिला होता. गेल्या वर्षभरात ४० कोळसा खाणी व २-जी तरंगलहरी वाटपासाठी लिलाव केल्यामुळे देशाच्या तिजोरीत तब्बल २ लाख कोटींहून अधिक रक्कम जमा होणार आहे. उर्वरीत १६०+ खाणींच्या लिलावानंतर हीच रक्कम १५ लाख कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे या लिलावात सुरवातीपासूनच संपूर्ण पारदर्शकता आणलेली आहे. थेट परकीय गुंतवणूक २०१३-१४ या वर्षात २०.८ अब्ज डॉलर्स होती. २०१४-१५ या वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यात हीच गुंतवणूक २८.८ अब्ज डॉलर्स आहे. जनधन या नवीन योजनेंतर्गत नवीन १५ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. अनेक नागरिकांनी आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःच्या नावाचे बँक खाते उघडले आहे. प्रतिवर्ष फक्त १२ रूपये भरून २ लाखांचा अपघात विमा देण्याची केंद्र सरकारची नवीन योजना प्रचंड यशस्वी ठरली आहे. योजना सुरू केल्यापासून पहिल्या ९ दिवसातच ५.५७ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नागरिकांना मोफत गोष्टी देण्याचे पूर्वीच्या सरकारचे धोरण बदलून अल्प खर्चात नागरिकांच्या सहभागाने योजना सुरु करण्याची ही कल्पना अभिनव आहे. ५० वर्षाखालील नागरिकांना प्रतिवर्ष ३३० रूपये भरून जीवनविमा देण्याची अभिनव योजना देखील यशस्वी ठरली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून पहिल्या १८ दिवसांतच १.७४ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे दिल्या जाणार्‍या शेतकर्‍यांच्या नुकसानभरपाईच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. ५०% किंवा अधिक नुकसान असल्यासच भरपाई देण्याची पूर्वीची अट बदलून आता ३३% नुकसान असले तरी भरपाई देण्यात येईल. तसेच भरपाईची रक्कम दीडपट करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे. जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे. महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे. आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.
संरक्षण व परराष्ट्र धोरण
आपल्या शपथविधीला मोदींनी सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना बोलावून एक नवीन पायंडा पाडला. सार्क समूहातील भारत हा सर्वात मोठा देश. सार्क हे एक कुटुंब मानले तर भारताचे स्थान सर्वात मोठ्या भावाचे. एखाद्या देशमुखाच्या घरातील लग्नाला पंचक्रोशीतील सर्व गावाच्या पाटलांनी उपस्थित रहावे व देशमुखांचे स्थान मान्य करावे अशा स्वरूपाचा हा पायंडा होता. त्यानंतर लगेचच मोदींनी भूतानला व श्रीलंकेला भेट देऊन शेजारी राष्ट्रांशी संबंध वाढविण्यावर भर दिला. मोदींच्या प्रयत्नामुळे श्रीलंकेत फाशीची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील ५ कोळ्यांना श्रीलंकेने मुक्त करून भारतात परत पाठवून दिले. काही वर्षांपूर्वी मोदींनी चीनला भेट देऊन तस्करीच्या आरोपावरून तेथील तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या २१ पैकी ११ गुजराती व्यापार्‍यांना सोडवून आणण्याची यशस्वी शिष्टाई केली होती. मागील महिन्यात नेपाळमध्ये जबरदस्त भूकंप झाला. भारत सरकारने अत्यंत तातडीने नेपाळला मदत पाठवून दिलासा दिला. काही महिन्यांपूर्वी मालदीवमध्ये अचानक पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना भारत सरकारने तातडीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला. येमेन व इराकमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय अडकून पडले होते. भारताने ही परिस्थिती युद्धजन्य पातळीवर हाताळून बहुसंख्य भारतीयांना सुखरूप परत आणले. एवढेच नव्हे तर येमेन मध्ये अडकलेल्या ४१ देशांच्या ९०० हून अधिक नागरिकांना भारताने सुखरूप बाहेर काढले. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या फादर प्रेम यांना सरकारने सुखरूप भारतात परत येण्यास मदत केली. गतवर्षी सप्टेंबरमध्ये काश्मिरमध्ये भयानक पूर आलेला असताना केंद्र सरकारने तातडीने लष्कराच्या मदतीने नागरिकांना मदत केली होती. मोदी सरकारचे वैशिष्ट्य हे आहे की हे सरकार सर्वत्र व्हिजिबल आहे. पूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारचे कोठेही अस्तित्व जाणवत नव्हते. मात्र या सरकारचे सर्व क्षेत्रात ठळक व सकारात्मक अस्तित्व दिसत आहे. गेल्या वर्षात अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगला इ. देशातील ४ हजारहून अधिक हिंदू नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. यापूर्वीच्या वर्षात हाच आकडा १ हजारहून कमी होता. या देशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. भारत हा त्यांचा एकमेव आधार आहे. पूर्वीच्या सरकारने त्यांच्या बाबतीत आस्ते कदम धोरण ठेवले होते. या सरकारने मात्र त्यांना दिलासा दिला आहे. मोदी फ्रान्स दौर्‍यावर गेले असताना त्यांनी फ्रान्सबरोबर राफेल या आधुनिक लढाऊ विमानांच्या खरेदीचा करार केला. गेली अनेक वर्षे हा करार प्रलंबित होता. जुलै-ऑगस्ट २०१४ मध्ये सीमेवरील पाकिस्तानी सैन्याने नेहमीप्रमाणे अचानक गोळीबार सुरू केला. त्यात सीमाभागातील काही नागरिक मृत्युमुखी पडले. पाकिस्तान काही महिन्यांच्या अंतराने नियमितपणे असा गोळीबार करून नागरिकांचे प्राण घेत असते. या गोळीबाराविरूद्ध भारताची प्रतिक्रिया म्हणजे निषेधाचा खलिता पाठविणे. यावेळी प्रथमच भारतीय लष्कराला प्रतिगोळीबार करण्याची मुभा मिळाली. पाकिस्तानने गोळीबार सुरू केल्यावर प्रथमच भारतीय सैन्याने उलट गोळीबार करून जोरदार प्रत्त्युत्तर दिले ज्यात काही पाकिस्तानी सैनिक व नागरिक मरण पावले. भारताच्या जोरदार प्रतिकारामुळे आश्चर्यचकीत झालेल्या पाकिस्तानी लष्कराने गोळीबार थांबविला. त्यानंतर आजतगायत पाकिस्तानकडून विनाकारण गोळीबार होण्याचे प्रकार घडलेले नाहीत. ऑगस्टमध्ये भारत-पाकिस्तानची सचिव पातळीवर चर्चा होणार होती. परंतु चर्चेच्या काही दिवस आधी पाकिस्तानी राजदूताने हुरियतच्या फुटिरतावादी नेत्यांची भेट घेतल्याने भारताने तातडीने चर्चा रद्द करून एकाच वेळी भारताशी व फुटीरतावाद्यांशी चर्चा होऊ शकत नाही असा पाकिस्तानला जोरदार इशारा दिला. मोदींनी नुकतीच चीनला भेट दिली. ही भेट चीनच्या भूमीवरून चीनला स्पष्ट शब्दात इशारा दिल्यामुळे गाजली. इंडिया-टुडे या साप्ताहिकाने या इशार्‍याबद्दल असे म्हटले आहे. "In Modi, India has a PM who can look China in the eye". याच लेखात पुढील वाक्ये आहेत. Prime Minister Narendra Modi's recent visit to China will be remembered for will be his plain-speaking. And it is by no means a small achievement. For years, Indian political leaders have gone to China and said what the Chinese wanted to hear. Modi changed all that when he openly "stressed the need for China to reconsider its approach on some of the issues that hold us back from realising full potential of our partnership" and suggested that "China should take a strategic and long-term view of our relations". In his speech at the Tsinghua University too, Modi went beyond the rhetorical flourishes of Sino-Indian cooperation and pointed out the need to resolve the border dispute and in the interim, clarify the Line of Actual Control to "ensure that our relationships with other countries do not become a source of concern for each other". This is a significant shift in India's traditional defensiveness vis-a-vis China and should put the relationship on a firmer footing. चिनार यांचा ह्या सविस्तर प्रतिसादात भारताच्या परराष्ट्र धोरणांचे ठळक मुद्दे आलेले आहेत. २ वर्षांपूर्वी केदारनाथ येथील प्रलयात शेकडो भाविक मृत्युमुखी पडले होते. तत्कालीन राज्य सरकार ती परिस्थिती नीट हाताळू शकले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षात भारताने भारतात व विदेशात अशी परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. २००८ मध्ये अमेरिकेबरोबर अणुकरार झाल्यानंतर पुढे फारसे काही झाले नव्हते. मोदींनी आपल्या पहिल्या वर्षात ऑस्ट्रेलिया व कॅनडाला भेट देऊन युरेनियम पुरवठ्याबद्दल यशस्वी बोलणी केली. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेवर अजित डोवाल या अत्यंत कार्यक्षम अधिकार्‍याला आणण्यात आले आहे. "संरक्षण व परराष्ट्र धोरण" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ८ गुण.
भ्रष्टाचार निर्मूलन
गेल्या १ वर्षात एकही मोठा घोटाळा झालेला नाही हे या सरकारचे मोठे यश आहे. युपीएची १० वर्षांची कारकीर्द म्हणजे उच्चपदस्थांचा प्रचंड भ्रष्टाचार होता. युपीएतील अनेक मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले होते व त्यातून देशाचे प्रचंड नुकसान झाले. मनमोहन सिंग मूक राहून अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहनच देत होते. मोदींच्या कारकीर्दीत याला लगाम बसलेला दिसत आहे. 'मी भ्रष्टाचार करणार नाही व कोणाला करून देणार नाही' हे त्यांचे वचन पहिल्या वर्षात तरी सत्य झालेले दिसत आहे. मात्र भ्रष्टाचार्‍यांवरील कायदेशीर कारवाई मात्र पुरेशा वेगाने सुरू नाही. वड्राला खिरापतीसारख्या वाटलेल्या हरयाना व राजस्थानमधील जमिनी काढून घेण्यात आल्या. हरयानाने नुकतीच या जमीन व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. परंतु हे आधीच व्हायला हवे होते. महाराष्ट्रात छगन व समीर भुजबळांची चौकशी सुरू झाली आहे. आता तटकरे व अजित पवारांना समन्स गेले आहे. परंतु ही कारवाई अधिक वेगाने होणे अपेक्षित आहे. कोळसा घोटाळ्यातील जिंदाल व इतर काही नेत्यांवर व अधिकार्‍यांवर खटला दाखल झालेला आहे. मनमोहन सिंगांना देखील समन्स पाठविण्यात आले. "आपण न्यायालयात जाऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करू" असे माध्यमांसमोर सांगणार्‍या सिंगांनी प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयात जाऊन समन्सला स्थगिती मिळवून चौकशी दूर पळण्याचाच प्रयत्न केला आहे. देशाबाहेरील काळा पैसा भारतात आणण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. काळ्या पैशाला प्रतिबंध करण्यासाठी एक नवीन कायदा करण्यात आला आहे. "भ्रष्टाचार निर्मूलन" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ७ गुण.
राजकीय
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची घोडदौड सुरूच राहिली. हरयाना व झारखंडमध्ये स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात शिवसेनेचे ओढणे उतरवून स्वबळावर बहुमताच्या जवळ पक्ष पोहोचला. जम्मू-काश्मिरमध्ये प्रथमच भाजपने तब्बल २५ जागा मिळवून दुसरा क्रमांक मिळविला. दिल्लीत मात्र पक्षाचा दारूण पराभव झाला. आता लवकरच बिहार विधानसभेची निवडणुक आहे. त्यापाठोपाठ मे २०१६ मध्ये तामिळनाडू, केरळ, पाँडीचेरी, प. बंगाल व आसामची निवडणुक आहे. या राज्यात भाजपची परिस्थिती पूर्वीच्या तुलनेत नक्कीच सुधारली असेल. महाराष्ट्रात भाजपने अत्यंत चातुर्याने शिवसेनेला आपली जागा दाखवून देऊन युतीतला मोठा भाऊ कोण हे दाखवून दिले. महाराष्ट्रात ब्राह्मण, हरयानात जाट नसलेला व झारखंड मध्ये आदिवासी नसलेला मुख्यमंत्री देऊन जातीवर राजकारण होणार्‍या या राज्यात एक वेगळा पायंडा पाडला. जम्मू-काश्मिरमध्ये पीडीपी या पूर्ण वेगळी विचारसरणी असलेल्या पक्षाबरोबर सरकार स्थापन करून भाजपने एक वेगळाच प्रयोग केलेला आहे. यात भाजपकडे उपमुख्यमंत्रीपद, काही मंत्रीपदे व सभापतीपद आले आहे. पूर्वीच्या नॅकॉ-काँग्रेस सरकारने फुटिरतवादी मसर्रत आलमची स्थानबद्धता न वाढवता त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला होता. त्यामुळे तो सुटला. सुटल्यावर लगेचच त्याने भारतविरोधी कारवाया सुरू केल्यावर त्याच्यावर लगेचच कारवाई करण्यास पीडीपीची तयारी नव्हती. परंतु केंद्राच्या दबावानंतर त्याला पुन्हा स्थानबद्द करण्यात आले. हा एक नवीन प्रयोग आहे. हा प्रयोग कितपत यशस्वी/अयशस्वी होईल ते काही काळानंतर कळेलच. परंतु पीडीपी सारख्या फुटिरतावादी पक्षावर केंद्राच्या व राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून दबाव ठेवण्यास या प्रयोगाचा उपयोग होऊ शकेल असं आतातरी वाटतंय. दिल्लीत मात्र भाजपचा सुपडा साफ झाला. अत्यंत अवास्तव व अव्यावहारीक आश्वासने देऊन 'आआप'ने सत्ता मिळविली. प्रचंड बहुमत पाठीशी असूनसुद्धा केजरीवालांचा नाटकीपणा, पोरकटपणा, हेकेखोरपणा, हुकूमशाही वृत्ती अजिबात कमी झालेला नाही. त्यांचे विदूषकी चाळे अजूनही सुरुच आहेत. त्यांच्या नाटकापायी एका शेतकर्‍याचा फास लागून जीव गेला. केंद्राबरोबर ते कायम संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. एकंदरीत त्यांच्या मर्कटलीलांमुळे दिल्लीची जनता भरडली जाईल हे निश्चित. सप्टेंबर-ऑक्टोबर २०१५ मध्ये बिहार विधानसभेची निवडणुक होणार आहे. सध्या जनता दलाच्या अनेक तुकड्यांच्या विलिनीकरणाची चर्चा आहे. मागील वर्षी बिहारमध्ये झालेल्या १० विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी राजद, संजद व काँग्रेस ने युती करून १० पैकी ६ जागा जिंकल्या होत्या. परंतु प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीसाठी अशी युती प्रत्यक्षात येणे अवघड आहे. राजद व संजद या दोन्ही पक्षांना मुख्यमंत्रीपद हवे असल्याने दोन्ही पक्ष २४३ पैकी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न करेल व त्या भांडणातून अशी युती प्रत्यक्षात येणार नाही. राजद व संजद वेगवेगळेच स्वतंत्र लढतील. या दोघांपै़की कोणाबरोबर शय्यासोबत करायची हा काँग्रेसपुढे यक्षप्रश्न असेल. लालू हा सोनिया गांधींचा नीलाक्षतनय असल्याने शेवटी काँग्रेस राजदचाच मळ्वट भांगात भरेल असा अंदाज आहे. भाजप चातुर्याने जीतनराम मांझीला आपल्या आघाडीत सामील करून घेईल. शेवटी राजद्+काँग्रेस, संजद, भाजप+लोकजनशक्ती+मांझी+उपेंद्र कुशवाह असे तीन गट वेगवेगळे लढतील. डावे पक्ष बहुतेक राजदबरोबर जातील. अशा स्वतंत्र लढतील भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन च्या सर्वेक्षणानुसार राजद्+काँग्रेस्+संजद युती झाल्यास या युतीला १२६ व भाजप आघाडीला ११२ जागा मिळतील. परंतु राजद, काँग्रेस, संजद व भाजप आघाडी स्वतंत्रपणे लढल्यास भाजप आघाडीला १२६, संजद ६४, राजद ४२ व काँग्रेस २ अशी स्थिती असेल. दिल्ली असो, उ.प्र. असो वा बिहार, काँग्रेसचे अस्तित्व संपलेले आहे. दिल्लीत भाजपला पराभूत करण्यासाठी गुपचुप आआपला मदत करणे, बिहार मध्ये राजद किंवा संजदची सेज सजविणे, उ.प्र. मध्ये मुलायम किंवा मायावतीच्या पदराखाली लपणे एवढेच काँग्रेस करू शकते. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन सर्वेक्षणानुसार एक वर्षानंतर मोदींची जादू बरीचशी कायम आहे. आता निवडणुक झाल्यास एनडीए ३१७ (पूर्वी ३३६), युपीए ७३ (पूर्वी ६०) अशी परिस्थिती आहे. इतर काही वाहिन्यांनी (आयबीएन, आजतक इ.) देखील सर्वेक्षण केले. त्यांनी जागांचा अंदाज दिलेला नाही. परंतु मोदींच्या कामावर व सरकारवर बहुसंख्य जनता समाधानी असल्याचे दिसते. मे २०१६ मध्ये प.बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम व पाँडिचेरीच्या विधानसभा निवडणुका आहेत. बंगालमध्ये पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने ममता बॅनर्जी निवडून येण्याची शक्यता आहे. शारदा चिट फंड घोटाळ्याचा बंगाली जनतेवर काहीही परीणाम झालेला दिसत नाही. दुसर्‍या क्रमांकावर काँग्रेस असेल. तामिळनाडूत आता द्रमुकची पाळी आहे. केरळमध्ये डावे पक्ष निवडून येतील. आसाममध्ये अधांतरी विधानसभा असण्याची शक्यता आहे. या सर्व राज्यात पूर्वीच्या तुलनेत भाजपची कामगिरी सुधारलेली असेल. परंतु बहुमत मिळविण्यासाठी किंवा प्रमुख विरोधी पक्ष होण्यासाठी भाजपला अजून बराच काळ लागेल. एकंदरीत गेल्या वर्षभरात भाजपने राजकीय क्षेत्रात खूपच प्रगती केली आहे. राजकीय आघाडीवर भाजप सरकारला १० पैकी ८ गुण.
सामाजिक
गेल्या वर्षभरात एकही मोठी जातीय दंगल झाली नाही. यापूर्वी २०१३ मध्ये मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या जातीय दंगलीत ६० हून अधिक नागरिक मरण पावले होते. काही ठिकाणी चर्चवर ह्ल्ले झाले. काही हल्ल्यांमागे जातीय नसून पूर्ण वेगळी कारणे होती. मोदी मंत्रीमंडळातील गिरीराज सिंह, साक्षी महाराज इ. गणंगांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केली. वाहिन्यांनी टीआरपी वाढविण्यासाठी त्या वक्तव्यांना प्रचंड प्रसिद्धी देऊन आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. परंतु नुकत्याच झालेल्या वेगवेगळ्या वाहिन्यांच्या सर्वेक्षणानुसार अशा वक्तव्यांकडे बहुसंख्य नागरिकांनी दुर्लक्ष केलेले आहे. मोदींनी मात्र या वाचाळ मंत्र्यांच्या वक्तव्यावर सार्वजनिकरित्या मौन पाळले आहे. त्यांनी तातडीने पावले उचलून अशा मंत्र्यांना घरी बसविले पाहिजे. एकंदरीत सामाजिक जीवनात शांतता आहे. "सामाजिक" क्षेत्रासाठी या सरकारला १० पैकी ६ गुण.
विरोधी पक्षांची कामगिरी
संपूर्ण वर्षात विरोधी पक्षांची कामगिरी निराशाजनक राहिली. वर्षाच्या शेवटी भूमी अधिग्रहण कायद्याच्या निमित्ताने काही विरोधी पक्ष एकत्र येताना दिसले. परंतु काही विरोधी पक्ष अजूनही काँग्रेसपासून अंतर ठेवून आहेत. काँग्रेस अजूनही गांधी घराण्याच्या पदराखालून बाहेर येण्यास तयार नाही. राहुल गांधी अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या काळात तब्बल २ महिने परदेशात वास्तव्य करून आले. आपल्या परदेश दौर्‍यासाठी जाब विचारला जाईल हे ओळखून परदेशातील सूटबूट सोडून झब्बापायजमा परीधान करून आल्याआल्या दुसर्‍या दिवसापासून घसा ताणून मोदींवर टीका करणे सुरू केले आहे. त्याच्याबरोबरीने शेतकर्‍यांच्या घरी जाऊन भेटण्याचे पूर्वीचे नाटकही सुरू केले आहे. ते परदेशात विपश्यना करत होते म्हणे. परदेशात जाऊन २ महिन्यात ते ३ नवीन शब्द शिकले - किसान, मजदूर, गरीब. आता त्यांच्या प्रत्येक दुसर्‍या वाक्यात हे ३ शब्द असतात. पूर्वी कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात ते महिला सबलीकरण, नरेगा असे शब्द उच्चारायचे. आता विषय कोणताही असला तरी किसान, मजदूर आणि गरीब हे ३ शब्द असल्याशिवाय त्यांचे वाक्य पूर्ण होत नाही. लोकसभेत संपूर्ण निष्प्रभ ठरल्यावर राज्यसभेतल्या बहुमताच्या जोरावर काँग्रेसने महत्त्वाची विधेयके अडवून धरली आहेत. परंतु काही महिन्यातच भाजप काँग्रेसला मॅनेज करून ही विधेयके पास करून घेईल हे निश्चित. महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका शिवसेना पार पाडत आहे. मनसेचा अवतार समाप्त झाला आहे. काही वर्षांतच राष्ट्रवादी आणि शिवसेनाही संपुष्टात येण्याची शक्यता आहे. डाव्या पक्षांची सद्दी जवळपास संपुष्टात आली आहे. प्रकाश करातांच्या जागी येचुरी येऊनसुद्धा काहीही फरक पडणार नाही. जनता दलाचे छोटे छोटे तुकडे अस्तित्वहीन होण्याच्या मार्गावर असल्याने विलिनीकरण करून धुगधुगी टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आआपची नाटके व तमाशे सुरूच आहेत. एकंदरीत विरोधी पक्षांची अवस्था दयनीय आहे. विरोधी पक्षांच्या कामगिरीला १० पैकी २ गुण. _________________________________________________________________________________ मोदी सरकारची पावलें योग्य दिशेने पडतांना दिसत आहेत. पुरेसा वेग आलेला नाही कारण लोकांना शिस्तबद्ध रीत्या कामे भराभर उरकीत जाणे हेच ठाऊक नाही. तें अंगवळणी पडण्यास बराच वेळ लागेल. कृतीपेक्षा बडबड अधिक हे ही काही मंत्र्यांच्या/ खासदारांच्या बाबतीत आढळत आहे.त्याला वेसण घालणे आवश्यक आहे. मोदी सरकारची कामगिरी समाधानकारक, विकासाभिमुख आणि प्रामाणिक अशा शब्दात वर्णन करता येईल. गत सरकारच्या नाठाळ कामगिरीच्या पार्श्वभूमीवर या सरकारची कार्यक्षमता अधिकच खुलून दिसते. _________________________________________________________________________________ एक वर्षाच्या कामगिरीसाठी मोदी सरकारला ७/१० गुण. _________________________________________________________________________________
अच्छे दिन
माझी "अच्छे दिन" ची व्याख्या अशी आहे. भ्रष्टाचारमुक्त सरकार, कणखर सरकार, नवीन कल्पना घेऊन आलेले सरकार, इतरधर्मियांचे मतांसाठी लांगूलचालन न करणारे सरकार, पाकिस्तान व चीनसमोर नांगी न टाकता ताठ मानेने उभे राहिलेले सरकार, देशाला आर्थिक उन्नतीच्या मार्गावर न्यायला सुरूवात करणारे सरकार, नागरिकांच्या हिताची काळजी घेणारे सरकार ... असे सरकार सत्तेवर असेल तर अच्छे दिन येण्याची सुरूवात आहे असे मानता येईल. यापूर्वीचे सरकार हे कणाहीन व अकार्यक्षम सरकार होते. ते भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले होते. माझ्या मते मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अच्छे दिन येण्याची सुरूवात झाली आहे हे नक्की! _________________________________________________________________________________
तळटीप
विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर जवळपास ८ आठवडे मी मिपापासून दूर होतो (राहुल गांधीही एवढाच काळ भारतापासून दूर होते!!!). परत आल्यानंतर हा लेख लिहिला आहे. अजून बरेच मुद्दे आहेत, परंतु विस्तारभयास्तव लेख आटोपता घेतो. वाचकांनी प्रतिसाद दिले तर त्यातील योग्य त्या मुद्द्यांवर प्रतिसाद देईन. जर प्रतिसाद विषयाला धरून असेल, जर प्रतिसाद सभ्य असेल, जर प्रतिसाद योग्य त्या आकडेवारी व वस्तुस्थितीवर आधारीत असेल, तरच उत्तर देईन. जर प्रतिसाद व्यक्तिगत स्वरूपाचा असेल, जर प्रतिसाद उपहासात्मक व कुत्सित टोमणे अशा प्रकारचा असेल, जर प्रतिसाद द्वेषमूलक व पक्षपाती स्वरूपाचा असेल अशा प्रतिसादांकडे दुर्लक्ष केले जाईल. Now shoot _________________________________________________________________________________

प्रतिक्रिया द्या
309978 वाचन

💬 प्रतिसाद (1265)
श
श्रीगुरुजी Mon, 02/22/2016 - 08:32 नवीन
मुळात हरयाणात "जाट आरक्षण" आणि महाराष्ट्रात "मराठा आरक्षण" हे कॉंग्रेसने आपल्या मावळत्या काळात न्यायालयाकडून मान्यता मिळणार नाही हे स्पष्ट दिसत असूनहि "मतांवर डोळा" ठेवूनच दिले होते
. हा निर्णय विधानसभेत मंजूर करून न घेता आचारसंहिता सुरू होण्याआधी जेमतेम काही आठवडे याविषयी अध्यादेश काढला होता. जर या निर्णयाचा फायदा निवडणुकीत झाला तर पुन्हा एकदा ५ वर्षांकरिता सत्ता मिळेल आणि जर निवडणुक हरलो तर हे निर्णय रेटून न्यायची जबाबदारी नवीन सरकारवर येऊन पडेल. जर नवीन सरकारला ते शक्य झाले नाही तर त्यांच्यावर टीका करायला हे मोकळे आणि जर नवीन सरकारने निर्णयाचे विधेयकात रूपांतर करून ते मान्य करून घेतले तर आम्हीच हे आधी आणले होते असे म्हणून श्रेय घ्यायला हे मोकळे. अशी "दोन्ही हातात लाडू" परिस्थिती काँग्रेसने निर्माण केली होती. त्यांच्या दुर्दैवाने सत्ताही गेली आणि आरक्षणाचा निर्णयही न्यायालयाने रद्द केल्यामुळे नवीन सरकारवर दोषारोप झाले नाहीत. याबाबतील गुजरातच्या आनंदीबाई पटेल यांनी पटेल आरक्षण आंदोलन परिस्थिती अतिशय संयमाने हाताळली. पटेलांच्या दडपणाखाली आरक्षणाचे विधेयक आणून ते मंजूर करून घेतले असते तर ते न्यायालयात टिकले नसतेच. पण त्यामुळे गुजरातमधील इतर मागासवर्गीय जाती (क्षत्रिय, तेली इ.) भाजपच्या विरोधात गेल्या असत्या. त्यामुळे आरक्षणाची खोटी आश्वासने न देता त्यांनी दूरदर्शनवर भाषण देऊन "घटनेनुसार ५२% पेक्षा अधिक जागा राखीव ठेवणे शक्य नाही. जरी ते देण्याचा प्रयत्न केला तरी न्यायालयात तो निर्णय टिकणार नाही. पटेल हे इतर मागासवर्गियात मोडतात हा निर्णय राज्य सरकारने घ्यायचा नसून मागासवर्गीय आयोगाने घ्यायचा असतो. त्यांनी जरी तो निर्णय घेतला तरी तो न्यायालयात टिकणार नाही. त्यामुळे घटनात्मकदृष्ट्या पटलांना आरक्षण देणे शक्य होणार नाही." असे अगदी स्पष्ट व संयमित शब्दात सांगितले.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
न
नितिन थत्ते Sat, 03/05/2016 - 04:22 नवीन
भाजप-मोदी-भक्त असा प्रचार करत आहेत की मोदी पंतप्रधान झाल्यावरच जाट आरक्षण मागत आहेत. आणि यात काहीतरी डाव आहे असा समज करून देत आहेत. त्यांच्या माहितीसाठी..... https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=newssearch&cd=2&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwie2NzBuqfLAhUEC44KHZoPDbsQqQIIJCgAMAE&url=http%3A%2F%2Fwww.firstpost.com%2Findia%2Fas-jats-demand-reservation-hisar-in-haryana-remains-tense-237622.html&usg=AFQjCNFOa0PNLArVZwV9bNMOhpw0a4klYw https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=newssearch&cd=2&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwie2NzBuqfLAhUEC44KHZoPDbsQqQIIJCgAMAE&url=http%3A%2F%2Fwww.firstpost.com%2Findia%2Fas-jats-demand-reservation-hisar-in-haryana-remains-tense-237622.html&usg=AFQjCNFOa0PNLArVZwV9bNMOhpw0a4klYw
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 03/05/2016 - 09:27 नवीन
कोणते भाजप-मोदी-भक्त असा प्रचार करीत आहेत? जाट आरक्षण देण्याची मागणी जुनी आहे. २००५ मध्ये भूपिंदरसिंह हूडांनीच जाटांना आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासंबंधात अनेक वर्षे चालढकल केल्यावर २०१४ मध्ये निवडणुकीच्या तोंडावर जाटांना आरक्षण देण्याचा वटहुकूम काढण्यात आला. तो न्यायालयाने केव्हाच फेटाळला. आता पुन्हा एकदा ही मागणी वर आली आहे त्यामागे आरक्षण हे एकमेव कारण नाही. हरयानात अजाट मुख्यमंत्री झाल्याने नाराज झालेल्या जाटांनी आरक्षणाचे निमित्त करून मुख्यमंत्री खट्टर यांना घालविण्याकरिता हे आंदोलन सुरू केले आहे.
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Sat, 03/05/2016 - 18:59 नवीन
https://www.facebook.com/photo.php?fbid=772117659559925&set=gm.229601204054153&type=3
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 03/05/2016 - 19:29 नवीन
तिथे कोठे असं लिहिलंय? मुळात ते पान कोणत्यातरी मूर्ख माणसाचं दिसतंय आणि त्या पानावर एक-दोनच ओळी आहेत. त्याच्यात तर असं काही लिहिलेलं नाही.
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Sun, 03/06/2016 - 03:57 नवीन
अच्छा !!! इदं न मम.....
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्री गावसेना प्रमुख Sun, 03/06/2016 - 04:41 नवीन
फोटो मधले वाक्य खरेच विचार करण्याजोगे आहे
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
म
मार्मिक गोडसे Sun, 02/21/2016 - 16:29 नवीन
>> ह्या सर्व मध्ये भाजप आहे ना?
ह्याचं स्पष्ट उत्तर मिळेल असं वाटत नाही.
त
तर्राट जोकर Tue, 02/23/2016 - 15:54 नवीन
ह्याचा अर्थ काय? http://www.business-standard.com/article/economy-policy/investment-proposals-in-reverse-gear-116022300042_1.html
श
श्रीगुरुजी Wed, 02/24/2016 - 09:40 नवीन
औद्योगिक क्षेत्राव्यतिरिक्त इतर क्षेत्रांची आकडेवारी आहे का? (उदा. कृषि, पर्यटन इ.)? http://www.financialexpress.com/article/economy/commodity-crash-hits-industrial-investments/215249/
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Wed, 02/24/2016 - 09:53 नवीन
कुणी पक्षविरहीत, न्युट्रल विचार करणार्‍या अर्थ संबंधी जाणकार सदस्याने प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा आहे.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
श
शलभ Wed, 02/24/2016 - 10:40 नवीन
+१ तसेच विरोध सुद्धा पक्षविरहीत, न्युट्रल, मुद्द्यावर आधारित असावा. :)
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
स
सिद्धार्थ ४ Tue, 02/23/2016 - 16:07 नवीन
श्रीगुरुजी तुमचे बहुतसे मुद्दे पटले, पण म्हणावी तशी प्रगती आजही नाही. ह्या बाबत सरकार ने काही तरी करावे प्रतेक जाहिरातीत मोदींना प्रोजेक्ट करून काही साधणार नाही.
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/25/2016 - 10:27 नवीन
आज रेल्वे अंदाजपत्रक सादर झाले. उद्या प्रमुख मराठी वर्तमानपत्रातून खालील मथळ्यांच्या बातम्या असतील. "केंद्रीय रेल्वे अंदाजपत्रकात महाराष्ट्राच्या पदरात वाटाण्याच्या अक्षता" "सुरेश प्रभूंनी *करांच्या तोंडाला पाने पुसली" * च्या जागी लातूर, कोल्हापूर, मुंबईतल्या लोकल्स, मिरज, मराठवाडा यापैकी एक वा अधिक शब्द असतील. "रेल्वे अंदाजपत्रकावर शिवसेनेचा केंद्र सरकारला घरचा आहेर" . . . .
न
नाव आडनाव गुरुवार, 02/25/2016 - 10:40 नवीन
ह्याच बातम्या आधी यायच्या आणि उद्या येतील - ह्या दोन गोष्टिंत नक्की काय फरक असणार आहे? बायदवे, तुम्हाला आपच्या इमेल आयडी वरून उत्तर मिळालं. मला भाजपच्या इमेल आयडीवरून काहीच रिप्लाय नाही आला राव :( "२०२२ तक सबके लिए घर" चं कुठपर्यंत आलंय, काही आयड्या?
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
कपिलमुनी गुरुवार, 02/25/2016 - 14:20 नवीन
भलत्याच अपेक्षा बॉ !
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/25/2016 - 15:45 नवीन
भाजपच्या ईमेल आयडीवरून का उत्तर आले नाही याचे कारण मला माहित नाही. मी आआपच्या जाहिरातीतील दिशाभूल करणार्‍या दाव्यांबद्दल विचारले होते. त्यामुळेच कदाचित त्यांनी तातडीने उत्तर दिले असावे. तुम्ही कदाचित भाजपने केलेली दिशाभूल दाखवून दिली तर लगेच उत्तर येऊ शकेल. २०२२ पर्यंत सर्वांना घर या योजनेच्या प्रगतीबद्दल मला फारशी माहिती नाही. खालील संकेतस्थळावर यासंबंधी अधिकृत माहिती आहे. http://pmjandhanyojana.co.in/awas-yojana-housing-for-all-2022-scheme/ खालील धाग्यात यासंबधी अद्यावत माहिती उपलब्ध आहे. http://www.masterplansindia.com/tag/pradhan-mantri-awas-yojna
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
न
नाना स्कॉच Fri, 03/04/2016 - 00:31 नवीन
डॉट गॉव डॉट इन चं डॉट को डॉट इन झालं ह्यात भरपुर काही आलं. :)
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
न
नितिन थत्ते Sat, 03/05/2016 - 04:38 नवीन
रेल्वे मंत्र्यांनी भाडेवाढ न करता भाडेवाढ केली आहे हे कुणाला कळले आहे का? यापुढे लांब पल्ल्याच्या गाड्यांचे २०० किमीपेक्षा कमी अंतराचे अनारक्षित तिकीट मधल्या स्टेशनवरून मिळणार नाही. ज्या स्टेशनवर गाडी थांबते तिथूनच मिळणार. समजा देहूरोड हून ठाण्याला अनारक्षित यायचे असेल तर पिंपरीहून तिकीट काढून तळेगाव किंवा लोणावळ्याला यायचे. मग स्टेशनच्या बाहेर जाऊन तळेगाव/लोणावळा ते ठाणे असे तिकीट काढायचे. देहूरोडहून थेट ठाण्याचे तिकीट मिळणार नाही. भांडुपहून पुण्याला जायचे असेल तर आधी ठाण्याचे तिकीट काढून ठाण्याला यायचे. ठाण्याला स्टेशनच्या बाहेर येऊन पुण्याचे तिकीट काढायचे. मग परत स्टेशनात जाऊन गाडी पकडायची. मुंबई भागात सतत लोकल गाड्या असतात. पण पुणे भागात "कनेक्टिंग लोकल"ची व्याख्या सुद्धा बदलून घ्यावी लागेल. शिवाय देहूरोड ते ठाणे आणि तळेगाव ते ठाणे हे तिकीट सारख्याच रकमेचे असू शकेल. तसे झाले तर देहूरोड ते तळेगाव तिकीटाचे अतिरिक्त पैसे रेल्वेला मिळतील. भाडेवाड करायची असेल तर संसदेची मान्यता लागते. इथे प्रशासकीय युक्तीतून छुपी भाडेवाढ केली गेली आहे. बाकी या प्रकाराने जो वाढीव त्रास प्रवाशांना होणार आहे तो वेगळा. http://epaper.loksatta.com/738091/indian-express/03-03-2016#page/1/2
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
न
नितिन थत्ते Sat, 03/05/2016 - 04:40 नवीन
वरच्या प्रतिसादात पिंपरीहून ऐवजी देहूरोडहून तिकीट काढून असे वाचावे.
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
श
श्रीगुरुजी Fri, 02/26/2016 - 08:20 नवीन
मोदींना भेट मिळालेल्या कापडातून शिवलेल्या सुटावर "१५ लाखांचा सूट", "४ कोटींचा सूट" अशी प्रचंड टीका करणार्‍या खांग्रेसींच्या चष्म्यातून हे ७० लाखांचे हब्लोट स्विस लक्झरी घड्याळ सुटलेले दिसते. http://www.ndtv.com/karnataka-news/rs-70-lakh-watch-presents-troubled-times-for-siddaramaiah-1280111 स्वित्झर्लँडच्या हब्लोट लक्झरी घड्याळांचा कॅटलॉग इथे आहे. http://www.thewatchquote.com/List-Price-and-tariffs-for-Hublot-watches-No_54.htm
म
मोदक गुरुवार, 03/03/2016 - 10:54 नवीन
https://www.facebook.com/Modified.Governance/videos/986220401424606/ हे खरे आहे का?
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 03/03/2016 - 11:19 नवीन
नाही. आकड्यांचा खेळ आहे. http://www.hindustantimes.com/columns/have-we-grown-that-fast-making-sense-of-india-s-new-gdp-numbers/story-kl38vQ4aIDhsvEpDskKkMO.html
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/03/2016 - 20:51 नवीन
झी न्युज ची हेडलाईनः PM pays back Rahul in equal measure अंधभक्तीत आपण काय चुका करत आहोत हेही बिचार्‍यांना कळत नाही. इक्वल मेजर? म्हणजे राहुलच्या टिनपाट भाषणाच्याच लेवलचं मोदींनी भाषण केलं? की राहुलने मोदींच्या लेवलवर जाऊन भाषण केलं?
अ
अभिजित - १ Fri, 03/04/2016 - 15:56 नवीन
केवळ आपल्या विचारसरणीचे सरकार असल्याने काहीही खपवून घेणे चुकीचे आहे. http://www.loksatta.com/nagpur-news/financial-literacy-important-girish-kuber-1210538/ गिरीश कुबेर वेगळ्या विषयावर बोलत आहेत पण ते इथे पण लागू आहे. मी ओळखीच्या एका माणसा बरोबर भाजप निर्मित महागाई या वर बोलत होतो. हा कट्टर संघ कार्यकर्ता. त्याने महागाई भाजपच्या राज्यात वाढली आहे हे मान्य केले. पण त्याने अफलातून कारण दिले मला . तो म्हणाला कोन्ग्रेस चे लोक देशाचा पैसा खायचे. भाजप सरकार असे करत नाही. ( थोडक्यात ते बेपारी लोकांकडून पैसा घेतात आणि बेपारी जनतेची लुट करतात ती क्षम्य आहे असे त्याचे म्हणणे .. आहे कि नाही अफलातून युक्तिवाद ? )
न
नाना स्कॉच Fri, 03/04/2016 - 16:00 नवीन
ते म्हणतात ते(च) सगळे खरे असते! घाण अनुभव घेतलाय संघी दूतोंडी वाग्णुकीचा
↩ प्रतिसाद: अभिजित - १
अ
अर्धवटराव Fri, 03/04/2016 - 19:39 नवीन
एक वेळ राम गोपाल वर्मा कि आग सलग दोनदा सहन करेल, पण दुतोड्यांशी बोलण्यात वेळ घालवणार नाहि, असले भयंकर संघी भेटले आहेत. अर्थात, असं वात आणणारं बोलणारे जवळपास सर्वच विचारसरणीचे लोक भेटले आहेत.
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
न
नाना स्कॉच Sat, 03/05/2016 - 05:01 नवीन
सहमत आहे आपल्याशी, प्रत्येक विचारसरणी मधे असले नमुने आहेत, माझा अनुभव कमी आहे पण बहुतकरून जितका आहे संघी लोकांचा आहे, डाव्यांचा थोड़ा आहे ! दोघांत एकच समानशील सूत्र आहे , काहीही झाले की आपल्या फोल्ड मधे आपल्या विचारांच्या इफ़ेक्ट मधे जो माणूस नाही जो आपल्या स्फीयर मधे नाही पण प्रश्न विचारतो, त्याचा अधिक्षेप करणे, ओढून ताणुन त्याला हासणे, हे सगळे संघी अन डावे लोक करतात, संघी प्रश्नकर्त्या लोकांना "सिक्युलर" "फेक्युलर" वगैरे विशेषणे संबोधतात अन डावे त्यांची लाडकी शिवी उर्फ़ "bourgeoise" उर्फ़ बुर्झवा म्हणून हिणावतात. सामंतवादी म्हणून हीनवतात. दोन्ही पार्टी चं ब्रेनवॉशिंग तगड़े असते!
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
च
चिनार Sat, 03/05/2016 - 05:27 नवीन
बाकी काही असो ...पण रामगोपाल वर्मा की आग दोन वेळा पाहिल्यास तुम्हाला सहनशक्तीचा नोबेल पुरस्कार देण्याची मी शिफारीस नक्की करेल अर्धवटराव तुम आगे बढो..
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
श
श्रीगुरुजी Sat, 03/05/2016 - 08:42 नवीन
गिरीश कुबेर वेगळ्या विषयावर बोलत आहेत पण ते इथे पण लागू आहे. मी ओळखीच्या एका माणसा बरोबर भाजप निर्मित महागाई या वर बोलत होतो. हा कट्टर संघ कार्यकर्ता. त्याने महागाई भाजपच्या राज्यात वाढली आहे हे मान्य केले. पण त्याने अफलातून कारण दिले मला . तो म्हणाला कोन्ग्रेस चे लोक देशाचा पैसा खायचे. भाजप सरकार असे करत नाही. ( थोडक्यात ते बेपारी लोकांकडून पैसा घेतात आणि बेपारी जनतेची लुट करतात ती क्षम्य आहे असे त्याचे म्हणणे .. आहे कि नाही अफलातून युक्तिवाद ? )
हा संघ कार्यकर्ता असं म्हटला असेल तर तो मूर्ख आहे एवढंच मी म्हणेन.
↩ प्रतिसाद: अभिजित - १
त
तर्राट जोकर Sat, 03/05/2016 - 08:49 नवीन
सगळे तुमच्यासारखे नसतात हो. म्हणून तर तुम्हाला ओवरटाइम करायला लागतो.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 03/05/2016 - 09:28 नवीन
कसला ओव्हरटाईम?
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
श
श्री गावसेना प्रमुख Sat, 03/05/2016 - 10:15 नवीन
इथले तुमचे विरोधक id तुम्हाला सतवण्यासाठी केव्हाही प्रतिसाद देतात आणि तुम्हीही लगेच प्रतिवाद करतात,आता तुम्हाला प्रतिसाद देणारे काही ईदेशात राहतात काही भारतात, ईदेशातले दिवसा प्रतिसाद देतात पण ते तुम्हाला इथे इंडियात रात्री दिसतात ,म्हणून जोकर भाऊ सांगू ऱ्हायले कि तुम्ही ओव्हर टाईम करतात।टेन्शन लेनेका नही मास्तर
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 03/05/2016 - 10:08 नवीन
भारत सरकारचा एक स्तुत्य निर्णय - http://www.thehindu.com/news/international/no-indian-visas-for-us-religious-freedom-commission/article8312915.ece?utm_source=MostCommented&utm_medium=Homepage&utm_campaign=WidgetPromo
त
तर्राट जोकर Sat, 03/05/2016 - 10:25 नवीन
चांगला निर्णय. पेपरात वाचले त्याप्रमाणे २००९ मध्येही ह्याना विसा नाकारला होता. अमेरिकन लोकांनी स्वतःची धुणी धुवावीत. आमचं आम्ही पाहून घेउ म्हणा. बाकी ही बातमी ऐकुन मोदीविरोधक लगेच सरसावून 'मोदी घाबरतात काय' अशा अर्थाच प्रसवायला सुरु झालेत. अशा लोकांना उघडं पाडलं पाहिजे. भारताविरुद्ध कारस्थान करण्याचा अमेरिकेचा क्षुल्लकसा प्रयत्नही हाणून पाडणे आवश्यक.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
H
hmangeshrao Mon, 03/21/2016 - 14:45 नवीन
पीपीएफ चे व्याजदर घटवले
अ
अर्धवटराव Mon, 03/21/2016 - 20:37 नवीन
चीन-नेपाळ रेल्वे मार्ग लवकरच अस्तित्वात येणार असं दिसतय. मध्यंतरी भारत-पाक सीमेवर मधेशी समाजाचं जे काहि कांड झालं त्यामुळे भारतातुन नेपाळला होणारी सप्लाय चेन अडखळली होती व नेपाळमधे जीवनावष्यक गोष्टींची टंचाई जाणवायला लागली होती. अशी परिस्थीती परत येऊ नये म्हणुन नेपाळ चीनद्वारे नवीन सप्लाय चेन एस्टॅब्लीश करतोय. अर्थात, नेपाळ देशाला स्वतःचा फायदा जपावाच लागेल. त्यांची काहि चुक नाहि. पण आजपर्यंत नेपाळचें भारतावर असणारे अवलंबवीत्व यापुढे संपुष्टात येणार. ड्रॅगन याचा काय उपयोग करुन घेईल हे वेगळे सांगायला नकोच. आंतरराष्ट्रीय राजकारणात आपले फासे चुकीचे पडत आहेत कि काय...
न
नाना स्कॉच Tue, 03/22/2016 - 02:34 नवीन
भरपुर काम होते आहे ह्यात एक गंमत अशी आहे की आपण जे मधेसी आंदोलनाबद्दल बोलला आहात ते होऊनही नेपालला भारतीय पेट्रोलच हवे आहे, त्याचे कारण म्हणजे चीन ने रेलवे लिंक जरी स्थापित केली असली तरी तरी त्यांना प्रचंड हिमालय क्रॉस करावा लागतो आहे, म्हणजे रोड ट्रांसपोर्ट पेक्षा कमी ऑपरेशनल कॉस्ट्स मधे सामान जरी नेपाल मधे येत असले तरी त्याची किंमत आजही भारतातुन जाणाऱ्या सामना पेक्षा दीड ते दोन पट आहे, त्यामुळे सामान त्यांस भारतीयच हवे आहे!
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Tue, 03/22/2016 - 20:45 नवीन
पण इतक्या वर्षापासुन ड्रॅगन मागच्या दाराने एण्ट्री घ्यायचा प्रयत्न करत होता, आता उजागिरीने मुख्यप्रवेषद्वारातुन येईल. अर्थात, त्याला काहि ना काहि काटशह देईलच भारत. पण...
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
श
श्रीगुरुजी Tue, 03/22/2016 - 09:39 नवीन
निपचित पडलेला धागा जिवंत झालेलाच आहे, तर मी पण एक बातमी शेअर करतो. 'एक पद एक निवृत्तीवेतन' हा प्रश्न १९७३ पासून ४२ वर्षे लोंबकळत पडलेला होता. २०१५ मध्ये या प्रलंबित प्रश्नावर बर्‍यापैकी तोडगा काढण्यात आला. आतापर्यंत २० लाख निवृत्त सैनिकांपैकी १३ लाख सैनिकांना नवीन तोडग्यानुसार निवृत्तीवेतन सुरू झाले आहे. http://www.rediff.com/news/report/orop-13-lakh-veterans-have-got-new-pensions-rest-by-holi/20160322.htm
क
कपिलमुनी Tue, 03/22/2016 - 13:19 नवीन
बातम्या दोन्ही देत चला, पीपीएफ ची कल्याणकारी बातमी द्या. सेल्फी विथ डॉटरसोबत सुकन्या योजनेचा व्याजदर कमी झाल्याची बातमी येउ द्या :)
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 03/23/2016 - 08:18 नवीन
पीपीएफ चे व्याज दर आज ना उद्या कमी होणारच होते. व्याज दरातील घट अनेक वर्षांपासून प्रलंबित होती.मध्यंतरी बरीच वर्षे हा दर सरळ व्याजाने दसादशे ८% इतका होता. नंतर केव्हातरी तो दर ८.७% झाला (चूभूदेघे). आता परत ८.१% वर आला आहे.
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
द
दिवाकर देशमुख Tue, 03/29/2016 - 13:42 नवीन
शेवटी भाजप्यांचे लाळघोटे यावर पण समर्थनार्थ पोस्टी देऊ लागले
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
H
hmangeshrao Tue, 03/22/2016 - 13:29 नवीन
m महाराष्ट्राचे चार तुकडे करा ... आर एs एस
श
श्री गावसेना प्रमुख Tue, 03/22/2016 - 14:01 नवीन
PPF किंवा सुकन्या ह्या योजनेचा व्याजदर सरकारने जनतेला विचारून ठरवायला हवा,10%ते 50% इतका तर ठेवायला काहीच हरकत नाही,तसही सरकार क्रूड ऑइल चे भाव इतके कमी झालेले असतांना पेट्रोल डिझेल चे भाव कमी करीत नाहीये आणि त्याच्यात होणार इतका नफा इतका पैसा कोणता मंत्री खातोय हे सर्व जनतेला माहित व्हायला हवं।
क
कपिलमुनी Tue, 03/22/2016 - 19:37 नवीन
की असे प्रतिसाद येतात ,
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
त
तर्राट जोकर Tue, 03/22/2016 - 20:02 नवीन
=))
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
मार्मिक गोडसे Tue, 03/22/2016 - 15:07 नवीन
१) वर्तमान सरकारने सुवर्णव्यापार्‍यांच्या दबावाला बळी न पडता सोन्यावरील १ % अबकारी कर कायम ठेवला जे मागील सरकारला जमले नव्हते. २) पीपीएफ व्याजदराच्या निर्णयाचे खरे तर स्वागतच करायला हवे. ३) लबाडी करून 'आधार' बिल पास करून घेतले, काँग्रसला नक्कीच हायसे वाटले असेल. ४) बजेटमध्ये मनरेगाला ३८,५०० कोटीचा नीधी मंजूर करून मागील सरकारचे हे धोरण चुकीचे होते हा विद्यमान पंतप्रधानांचा दावा खोटा ठरला.
H
hmangeshrao Wed, 03/23/2016 - 12:48 नवीन
करा स्वागत !!!!!!!!!!!!!!!!!!!! तीन दिवस आधी पीपीएफ चे व्याजदर घटवले. आणि तीन दिवसांनंतर मल्ल्याचे कर्ज मोदी सरकारने माफ केले. आता त्या वाचलेल्या व्याजातुन केंद्र सरकार मल्ल्यासाठी पायघड्या खरेदी करेल.
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
द
दुर्गविहारी Wed, 03/30/2016 - 15:40 नवीन
पी पी एफ च्या व्याज दराविषयीच्या ह्या लिन्क छान माहिती देतात. मुख्य म्हणजे हा का घ्यावा लागला ह्याचे कारण ही कळते. निर्णय धमक कौतुकास्पद आणि व्याजदर चढ-उतारांना तयार राहा! उगीच टिका करण्यापूर्वी पूर्ण अभ्यास करा दादा द रेकर उर्फ मोगा खान
↩ प्रतिसाद: hmangeshrao
  • «
  • ‹
  • 18
  • 19
  • 20
  • 21
  • 22
  • 23
  • 24
  • 25
  • 26
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा