Welcome to misalpav.com
लेखक: प्रसाद गोडबोले | प्रसिद्ध:
( फार पुर्वी कधी तरी लिहिले होते हे ललित ! कालपरवा जुना ब्लॉग चाळत होतो तेव्हा सापडले ! पुनःप्रत्ययाचा आनंद जाहला ! तो थोडासा वाटुन घेता यावा म्हणुन इथे प्रकाशित करत आहे परत :) ) ************************************************************** सकाळचे साधारण साडेचार वाजलेत .
"प्रभाते मनी राम चिंतित जावा | पुढे वैखरी राम आधी वदावा । सदाचार हां थोर सांडू नये तो । जनी तो ची तो मानवी धन्य होतो ॥"
.....थंडीने कुडकुडणाऱ्या स्वरात उमटणारे काही श्लोक ...... असपष्ट धूसर सा संधीप्रकाश..आणि काही साखरझोप मोड़णारे गजर..... इतक्यात एक हाक

"जय जय रघुवीर समर्थ "

मग मी -" आज्जी ,चैतन्य आलाय ,आम्ही गडावर चाललोय , परत येवू की नाही माहीत नाही...." आज्जी -"जास्त नाटकं नको .....गडावर रहाणार असल तर फ़ोन करून कळवा " मी -" हां हां हां :D " "जय जय रघुवीर समर्थ " ******************************************************************************** "जय जय रघुवीर समर्थ " "जय जय रघुवीर समर्थ.....प्रसाद, दर वेळी लेट करतोस ...अता चल पटा पट ...नाहीतर प्रातः पूजा चुकेल." "सज्जनगडाचं ना काहीतरी गणितच वेगळ आहे". "काही तरी अनामिक ओढ़ आहे यार..." "हो यार ... अरे कधी तरी यार शिवथर घळित जायच आहे ." " हो. आणि निवांत वेळ काढून एकदा पावस ला जाऊं येवुया " It is the best place for saadhanaa !! अशाच काही तरी गप्पा होत होत आम्ही समर्थ महाद्वारापाशी येतो अन् गप्पांचा ओघ आपोआप थांबतो ...भक्तिभावाने आपोआप मान झुकते . कुठे तरी इतिहासात मन पार डुंबुन जातं..... " इथं समर्थ असतील तेव्हा काय जागा असेल ही !" यावर चैतान्याच उत्तर- "...................................................................." मी -" अरे बोल की " चैतन्य ...कुठेतरी खोल विचारात गढुन गेलेला -" ...............परब्रह्म आदिअंति अनुर्वाच्य ........" मी -" ..............................................." ************************************************************************** ध्यानमंदिर एक प्रकारचा 'गंभीर' अंधार अन् अशात समईच्या मंद प्रकाशाने उजळून निघालेली समर्थांची समाधी !! "आता सद्गुरु वर्णवेना । जेथे माया स्पर्शु शकेना । ते स्वरुप मज अज्ञाना । काय कळे ।। श्री राम ।। " तय गंभीर आवाजाने सार वातावरण भारुन टाकलय... "उपमे द्यावा जरी मेरु। तरी तो जड़ पाषाण कठोरु । तैसा नव्हे की सद्गुरु । कोमल दिनांचा ।। श्री राम ।।" हे सगळं इतक भावोत्कट की अंगावर रोमांच उभे राहिलेत ! हां अनुभव ही कसा कधी कोठे विरून जातो लक्षातच येत नाही !! "म्हणोनी सद्गुरु वर्णवेना । हे गे हेची माझी वर्णना । अंतर्स्थितिचिये खुणा । अंतर्निष्ठ ची जाणती । । श्री राम । ।" एक शब्दातीत शांतता ....एक अनुर्वाच्च आनंद ! ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ *********************************************************************************** मग आम्ही धाब्याच्या मारुती कड़े जातो ... समोर पसरलेला उरमोडीचा जलाशय . इथे का कोणास ठावुक पण मन पार अंतर्मग्न होता . बोलावासचाच वाटत नाही.....मगाचचे सद्गुरुस्तवनातले श्लोक मनात रेंगाळत रहातात .... समोर पसरलेल्या निळ्याशार जलाशयाकड़े बघत कधी भावसमाधि लागते कळतच नाही.... पण मग थोड्यावेळाने पोटातले कावळे कावकाव करायला लागले की आपोआप सामाधी मोडते.... मग भोजनप्रसादगृहात भोजनबंधुंच्या भाऊगर्दीत प्रसाद घेताना लक्षात येत की गडाच्या महाद्वाराशेजारी असं का लिहिलय..... "तू विवंचना मुक्त होण्याचे स्थान आहेस ....पण ....पुन्हा तूच विवंचना युक्त आहेस !!!!!" असो ! इतकंच बोलून सगळेच भक्त त्या विवंचना विसरून जातात ...आणि त्या सगळ्याच भक्तातले आम्हीही एक असतो! मग सरळ आम्ही श्रीधर कुटीत जातो ..... श्रीधर स्वामींच्या विचाराने आणखीनंच कसंसं होतं . " चैतन्य ,आपण असं ,श्रीधर स्वामींसारखं का नाही रे करू शकत ?" " तेवढी पुण्याई अजुन जमली नाही मित्रा !अजुन खूप लहान आहोत रे ! पण तुझं ही खरं आहे रे .... अजुन कित्ती दिवस दूर रहायचं बाप्पापासून ? अजुन कित्ती दिवस ? सद्गुरु सद्गुरु .......? " सद्गुरु विण जन्म निर्फळ। सद्गुरुविण दू:ख सकळ। सद्गुरु विण तळमळ। जाणार नाही ॥ श्रीराम॥ मग पुन्हा एकदा तीच गंभीर शांतता मनाला भारुन टाकते. पण मनात कुठेतरी खोलवर चालु असलेली विचारांची द्वंद्व चालूच रहातात . मग आम्ही दोघे ठार मुक्यासारखे चुपचाप गड उतरु लागतो . *********************************************************************************** संध्याकाळी घरी पोहचतो तेव्हा तस्साच तो संधीप्रकाश पुन्हा भरून राहिलेला असतो. आज्जी -" आलात का महाराज ! काय खायला काही पोहे ,उप्पीट करू ?" मी न कळत काही तरी उत्तर देवून जातो ! माझ्या ही लक्षात येत नाही ! आज्जी देवा पुढे दिवा लावते ...मग स्वयंपाक घरात जाते .... कंद्यापोह्याच्या वासाने पोटातले कावळे परत जागे होतात . आज्जी काहीतरी गुणगुणत पोहे आणून देते . आज्जी चे गुणगुणणारे शब्द स्पष्ट होता जातात ......
"कल्याण करी रामराया । देवराया ,कल्याण करी रामराया ॥ जनहित विवरी ,कल्याण करी रामराया ॥ "
************************************************************************************ ( अवांतर : सज्जनगड ! मनाच्या कोपर्‍यात कोठेतरी घर करुन बसलेला ! आज कोठुन तरी ह्याने डोके वर काढले . अन आठवणींचे मोरपीस कोणीतरी अलगद हातावरुन फिरवावे तसे काहीसे झाले ! असेच आमच्या बालपणीच्या मित्राविषयी - अजिंक्यतार्‍याविषयी - कधीतरी निवांतपणे - आठवणींना मोरपीस सापडल्यावर :) ) ( अन्यत्र अन्य नामाभिधानांनी पुर्वप्रकाशित )
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

म्हणजे ? म्हणजे आम्ही मनापासुन गोग्गोड असं काही लिहुच शकत नाही का ? असं काही तरी बोलु नका राव , आमचे सारे आडनाव बंधु आम्हाला एक्स्कम्युनिकेट करतील ना !! =))

कास पठार ठोसेघर करून दुपारी गडावर पोहोचलो तेव्हा खोलीसाठी नाव लिहून घेऊन लगेच "भोजन करून घ्या कक्ष बंद होण्याची वेळ झाली आहे ताब नंतर घ्या" अशी गोग्गोड तंबी मिळाल्याचे आठवतेय. एकादशी असल्याने गव्हाची खीर नव्हती परंतू वरी तांदुळ शेंगदाणे आमटी इत्यादी चविष्ट भोजन होते श्रमपरिहारासाठी घट्ट ताकही.वामकुक्षीनंतर गडफेरी केली.माझे आणि मित्राचे रामनाम,दाहबोध ,नित्याचरण वगैरे सोडून पक्षी दर्शनाची चाललेली चर्चा एक गुराखी मुलगा ऐकत होता.तो म्हणाला साप बघायचा आहे का? तिकडे गवतात आहे पाहा.मोठा काळा नाग होता.थोड्याच वेळात चारपाच सेवेकरी फेरीला आले.त्यांना विचारले-"हो नेहमीच फिरतात नाग,काही त्रास नाही."

खरडफळ्यावरून- सज्जनगडाच्या दरवाजाजवळचा नवा मठ (श्रीधरस्वामी यांचा) वेगळा आहे. जुना मठ मागे आहे. दोन्ही ठिकाणी राहण्या जेवण्याची सोय आहे.जुन्या मठात रामदास स्वामी आणि कल्याण यांच्या वस्तु आहेत.कल्याण जो हांडा खालून उरमोडी नदीचे पाणी भरून आणत तो आहे.त्यासाठी त्यांना पुरणाचा पौष्टिक खाऊ(खुराक) समर्थांनी देऊ केला होता.शिवाय रोजच्या नित्यकर्माच्या पठणातून सुट्टी दिली होती. तरीही समवयस्क शिष्यांची ती पोटदुखी होती. त्याला डाळगप्पु असे चिडवत-पुरणाचा गोळा गिळतो म्हणून.----आम्ही श्रीधरस्वामींच्या मठात संध्याकाळच्या नित्यकर्म आरतीस अर्धा तास व्यतितत केल्याबद्दल ओंजळभर उकडलेले शेंगदाणे प्रसाद म्हणून मिळाले आणि या वरच्या गोष्टीची पुन्हा आठवण झाली.-कल्याणाचे पितळी २ हांडे प्रतयेकी साठ लिटर्सचे आहेत.