Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

करवंदं, उंबरं... मोदक आणि अर्थातच कोकण !

व
विशाल कुलकर्णी
Mon, 06/01/2015 - 12:07
💬 81
आपण खरंच नशीबवान आहोत. रोजच्या रामरगाड्याचा कंटाळा आलाय, थोडा बदल हवाय असे वाटले की फारशी धावपळ करावी लागत नाही. 'रजा मिळत नाही'यासारखी कारणे बायकोच्या तोंडावर फेकून तिचे वाकडे झालेले तोंड बघावे लागत नाही. कंटाळा आलाय तर दोन कपडे बॅगेत भरा आणि निघा.... सज्जनगड आहे, कोयनाडॅमचा परिसर आहे अगदीच एक-दोन दिवस हातात असतील आणि हाताशी स्वतःचे वाहन असेल तर मग कोकणही फार दूर नाही. गेल्या महिन्यात असेच झाले. बायकोला कधी नव्हे ते शनीवारची सुटी मिळाली तिच्या शाळेतून आणि रवीवार जोडून घेवून आम्ही दिवे आगारला कुच केले. सकाळी लवकरच घर सोडले. ताम्हिणीच्या रस्त्याला लागताना आजुबाजुचे कोरडे वातावरण बघून थोडा मुडऑफच झाला होता. पण जरा आत शिरल्यावर हळुहळू हिरवाई दिसायला सुरुवात झाली. त्यात एका ठिकाणी करवंदाची जाळी दिसली म्हणून थांबलो आणि मग हरवलेला मुड परतायला वेळ लागला नाही. प्रचि १ 1 प्रचि २ 2 खरेतर दिवेआगारला ज्यांच्याकडे उतरणार होतो त्या केळकरकाकुंना आधी फोन करून जेवायच्या वेळेपर्यंत पोचतो असे सांगितले होते. पण ताम्हिणी घाटातला हा रानमेवा पाहून काकुंना परत फोन केला आणि आता काय जेवायच्या वेळेपर्यंत पोहोचू असे वाटत नाही असे सांगुन टाकले. पण काकुंनी , "काळजी करु नका, तुम्ही चार वाजता पोहोचलात तरी गरम गरम जेवायला वाढेन" असे सांगितले आणि आम्ही निश्चिंत झालो. प्रचि ३ कच्ची-पक्की करवंदे 3 प्रचि ४ हि फळे भलतीच टेम्प्टींग वाटत होती, पण नक्की काय आहे ते माहीत नसल्याने तोंडात टाकायचा धीर झाला नाही. 4 प्रचि ५ उंबर 5 प्रचि ६ 6 प्रचि ७ 7 प्रचि ८ 8 आजुबाजुला फिरताना हे दोस्तही सापडले ... प्रचि ९ 9 प्रचि १० 10 प्रचि ११ 11 शेवटी अकरा-साडे अकराच्या दरम्यान नाईलाजानेच तिथून बाहेर पडलो आणि माणगावच्या दिशेने कुच केले. यानंतर मात्र अध्येमध्ये कुठेच थांबलो नाही. करवंदं, उंबरं खाऊन पोटही बर्‍यापैकी भरलेलं असल्यामुळे आता जेवायला मुक्काम पोस्ट दिवे आगार गाठायचे असेच ठरवले होते. त्यानुसार दोन वाजेपर्यंत दिवेआगारला पोचलो. केळकरांचे हे केळकर भोजन आणि निवासगृह काही फार उत्कृष्ट वगैरे कॅटेगरीतले नाहीये. खरेतर ते साधेच आहे अगदी. पण त्यामुळेच तिथे घरचा फिल येतो. महत्वाचे म्हणजे कोकणच्या गाभ्यात राहात असुनही, स्वतः अस्सल कोब्रा असुनही केळकर कुटुंबिय कोब्रांना लाज आणतात. चक्क अतिशय प्रेमाने, मायेन विचारपूस करतात. स्वतःचेच गाडे पुढे न रेटता तुमचे म्हणणे ऐकुन घेतात. आणि महत्वाचे म्हणजे 'हे असलं काही आमच्याकडे मिळत नाही' असे वस्सकन अंगावर न येता 'ते' कुठे मिळू शकेल हे प्रेमाने सांगतात. ( हे आणि ते म्हणजे मांसाहारी अन्न)." केळकरांकडे त्यांच्या घराव्यतिरीक्त सहा-सात जादा खोल्या आहेत त्या ते पर्यटकांसाठी भाड्याने देतात. प्रत्येक खोलीत दोन कॉट, गाद्या, पंखे यासारखे जुजबी सामान असते. एसीची चैन इथे नाही. पण तरीही लोक केळकरांकडे यायला धडपडतात. त्याचे कारण म्हणजे काकुंकडे मिळणारे उकडीचे मोदक. ते तसे कोकणात सगळीकडेच मिळतात हो, पण आंब्यांच्या दिवसात काकुंकडे खास हापुसचे शाही मोदक असतात आणि अप्रतिम चवीचं शुद्ध शाकाहारी जेवण .... प्रचि १२ 12 प्रचि १३ केळकर निवास 13 बरं खोलीत गरम होतय म्हणून तुमच्यावर कोणी खोलीतच बसून राहा म्हणून सक्ती नाही केलेली काही. केळकरांची छान दोन एकराची वाडी आहे. कुठेही जावून पथारी पसरा. दिवे आगारला गेले की समुद्रावर फिरणे तर होतेच. पण माझा मुख्य प्रोग्राम असतो, काकुंकडून एक चटई घ्यायची आणि वाडीत जावून तोंड वर करून पडायचे. एखादे पुस्तक आणि जोडीला कधी तलत, तर कधी वसंतराव, कधी आशाबाई तर कधी अख्तरीबेगम असतातच. सुख म्हणजे तरी दुसरे काय असते हो? प्रचि १४ 14 प्रचि १५ 15 केळकरांकडे पोचलो आणि गरमागरम जेवूनच घेतले आधी. माफ करा मोदकांचे फोटो काढायला वेळ नाही मिळाला. (खरेतर बायकोने मोबाईल आणि कॅमेरा दोन्ही काढून घेतला होता. आता आधी गपचूप, व्यवस्थीत जेव असा दम भरुन) तसेही समोरचे गरमागरम खास हापुसचे शाही मोदक पाहिल्यावर फोटो काढण्याचे भान आणि वेळही कुणाला होता म्हणा. केळकरांच्या वाडीत अजुनही बरंच काही आहे बरंका... प्रचि १६ फणस... 16 प्रचि १७ 17 प्रचि १८ 18 प्रचि १९ 19 प्रचि २० 20 प्रचि २१ 21 प्रचि २२ 22 प्रचि २३ 23 प्रचि २४ 24 प्रचि २५ 25 त्या दिवशीही संध्याकाळी समुद्रकिनार्‍यावर एक चक्कर झालीच. दिवे आगारच्या समुद्रकिनार्‍याची मात्र वाट लागलेली आहे आता. तिथे वॉटरस्पोर्ट्स सुरु झाल्यापासून सगळ्या किनार्‍यावर ती वाहने दिवसभर इकडून-तिकडे फिरत असतात. निवांतपणे समुद्रकिनार्‍यावर बसून सागराची गाज ऐकण्याचं सुख आता दिवे आगारमध्ये उपभोगता येत नाही. त्यासाठी मग तुम्हाला रात्री साडे सात-आठच्या नंतर बीचवर जावं लागतं. त्यावेळी लोकांची गर्दीही विरळ झालेली असते. त्यामुळे वॉटरस्पोर्ट्सवाल्यांचा धिंगाणाही कमी झालेला असतो. तरीही एखादा चुकार रेंगाळत असतोच शेवटची गिर्‍हाइके शोधत... प्रचि २५ 25 आम्ही सहा-साडे सहाच्या सुमारास गेलो होतो बीचवर. भास्कररावांना बाय-बाय केल्याशिवाय निघायचे नाही असे ठरवले होते. गर्दी कमी व्हायला लागली होती. प्रचि २६ 26 प्रचि २७ 27 प्रचि २८ 28 शेवटी भास्करराव अगदीच दिसेनासे झाल्यावर आम्हीही बीचचा निरोप घेवून परत केळकरांच्या घराकडे निघालो. मोदक वाट बघत होते. सकाळी लवकर उठून एक चक्कर समुद्रकिनार्‍यावर टाकायची, सुर्यनारायणाचे दर्शन घ्यायचे आणि मग साडे आठ-नऊच्या दरम्यान न्याहारी करून हरिहरेश्वराकडे प्रयाण करायचे. असा बेत होता. त्यानुसार सकाळी साडेपाच-सहाच्या दरम्यान समुद्रकिनार्‍यावर येवून हजर झालो. समुद्रकिनार्‍यावर तसा उजेड होता बर्‍यापैकी, पण अजून सुर्यनारायणाचे आगमन झालेले नव्हते. आमच्यासारखेच सकाळची शुद्ध हवा खायला आलेले काही रसिक लोक दिसत होते. काहींचा व्यायाम सुरू होता, तर काही जण नुसतेच या टोकापासून त्या टोकापर्यंत चालत होते. इतक्यात पुर्वा उजळायला लागली.. प्रचि २९ 29 पूर्वा उजळली तसे आसमंतही झळाळून निघाले.. प्रचि ३० 30 प्रचि ३१ 31 प्रचि ३२ 32 आणि तेवढ्यात सुर्यनारायणाने हजेरी लावलीच. प्रचि ३३ 33 प्रचि ३४ 34 आता काकुंच्या हातचे गरमागरम पोहे-उप्पीट जे असेल ते हाणायचे आणि हरिहरेश्वरला रवाना.... जाते-जाते एक सेल्फी हो जाये? 35 हरिहरेश्वरबद्दल पुन्हा कधीतरी... ! विशाल.

प्रतिक्रिया द्या
19760 वाचन

💬 प्रतिसाद (81)
ट
टवाळ कार्टा Mon, 06/01/2015 - 12:15 नवीन
हायला भन्नाट हाये हे सुख म्हणजे हेच्च हेच्च ते :)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 06/01/2015 - 12:15 नवीन
वाखू साठवलेली आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ग
गुनि Mon, 06/01/2015 - 12:18 नवीन
mast...mast .......mast
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Mon, 06/01/2015 - 12:20 नवीन
वाह ! काय छान लिहिले आहे आणि फोटो तर क्लासचं. फोटो क्र: ६ आणि फोटो क्रः २२ मधला Bokeh ईफेक्ट फार आवडला. कोकणातली ही मज्जा गेली कितीतरी वर्ष मिस करतेय मी ....
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 06/01/2015 - 12:22 नवीन
विशालराव, सर्वच फोटो खूप सुंदर आहेत. छान ट्रिप. दिवेआगरच्या रेतीवरील नक्षी फार भुरळ घालते छायाचित्रणास. माझे एक आवडते ठिकाण. पण आता इथेही त्या वॉटरस्पोर्ट्सवाल्यांचा धिंगाणा सुरू झालाय हे वाचून जरा वाईट वाटले.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 06/01/2015 - 12:30 नवीन
मनःपूर्वक आभार सायबा ! मला पण खुप वाईट वाटलं तो गोंधळ बघून, पण पर्याय नाही. कोकणचा कॅलिफोर्निया होइल न होइल पण हे मात्र होणारच होतं. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 06/01/2015 - 12:25 नवीन
कोकणात लोक्स फक्त समुद्रकिनारीच फिरतात...किंबहुना घाटावरच्या लोकांना समुद्राचेच जास्त आकर्षण असते. पण कोकण म्हणजे फक्त समुद्र नव्हे. कोकणात अजुनही खुप ठिकाणे आहेत जिथे समुद्र नाही तरीही ती सुंदर आहेत. हेदवी,डेरवण,चिपळुण,पावस,देवरुख आणि बरेच काही..जेवढे फिराल तेव्हढे कोकण उलगडत जाते.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 06/01/2015 - 14:17 नवीन
सहमत आहे राजेंद्रजी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे
क
कपिलमुनी Mon, 06/01/2015 - 12:27 नवीन
दिवेआगरच्या जवळ निवांत समुद्र अनुभवायचा असेल तर आरावी सर्वात उत्तम आहे. खूप सुंदर जागा ! आणि दिवेआगर ते आरावी रस्ता पण अप्रतिम ! पूर्णपणे नैसर्गिक आणि व्यापारीकरण न झालेला किनारा आहे.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 06/01/2015 - 12:31 नवीन
पुढच्यावेळी तिकडेच जाईन. पावसाळा होवून गेला की अजुन एक चक्कर होइलच. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
र
रवीराज Tue, 06/02/2015 - 04:01 नवीन
चांगल्या राहण्या-जेवण्याची सोय असलेल्या ठिकाणाबद्दल माहिती असेल तर द्या (संपर्क दुरध्वनी इ.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
र
रवीराज Tue, 06/02/2015 - 04:02 नवीन
चांगल्या राहण्या-जेवण्याची सोय असलेल्या ठिकाणाबद्दल माहिती असेल तर द्या (संपर्क दुरध्वनी इ.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Tue, 06/02/2015 - 08:57 नवीन
http://www.pratimaresorts.com/ http://www.tripadvisor.in/Hotel_Review-g2287416-d6163885-Reviews-Pratima_Beach_Resort-Diveagar_Maharashtra.html रहायची छान सोय आहे . एसी रूम्स आणि अगदी मागेच समुद्र !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रवीराज
ग
गणेशा Fri, 06/05/2015 - 08:24 नवीन
हो एकदम बरोबर.. आरावी ला खुपदा गेलो आहे.. कोणॅए नसते तेथे.. फक्त आपणच आपण .. काय मज्जा येते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
द
दमामि Mon, 06/01/2015 - 12:44 नवीन
ताम्हिणीच्या घाटात वाघ दिसला का हो?
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 06/01/2015 - 14:14 नवीन
ताम्हिणीच्या घाटात वाघ दिसला का हो? एकाचवेळेी दोन वाघ एका ठिकाणी दिसणे फार दुर्मीळ असते म्हणतात. ;) जोक्स अपार्ट पण नाही दिसला. माझ्या बरोबरची वाघीण बघून त्याला खरोखरीच्या मिसेस वाघीणीची आठवण झाली असेल आणि गुफेत लपून बसला असेल बिचारा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि
म
मुक्त विहारि Mon, 06/01/2015 - 15:27 नवीन
दमामि खालील लिंक बद्दल बोलत असावेत. http://www.esakal.com/esakal/20100719/4711632484305432417.htm
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
व
विशाल कुलकर्णी Tue, 06/02/2015 - 06:44 नवीन
मुवि, तो मुक्तपिठीय लेख मी वाचलेला आहे आधीच. म्हणुनच थोडा विनोद केला. बाकी मी मायबोलीवरसुद्धा असतो. पण सुरुवात माझी मिपापासुनच झालीय. गेली साडे सहा वर्षे मी मिपाचा सदस्य आहे. त्यामुळे हे सर्व इथेच पूर्वीच्या मिपावर शिकलोय. तरीही दमामिं दुखावले गेले असतील तर क्षमस्व. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
त
त्रिवेणी Mon, 06/01/2015 - 13:06 नवीन
ये त्या वि कां ता ला जा णा र आ हो त सो ज ळ ज ळ अं म ळ क मी झा ली.
  • Log in or register to post comments
प
पाटील हो Mon, 06/01/2015 - 13:14 नवीन
अप्रतिम वर्णन आणि फोटो तर खल्लास .
  • Log in or register to post comments
स
स्पा Mon, 06/01/2015 - 13:29 नवीन
अहाहा, एक सो एक प्र.ची मजा आ गया
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 06/01/2015 - 13:31 नवीन
अगदी उत्साह पुनर्भरण (बॅटरी रिचार्ज) सहल दिसतेय ही.लहानांसाठी काही साधे खेळ आहेत का (ते कंटाळायला नकोत ना?) कपीलमुनींकडून अधिक माहीती अपेक्षीत. प्रगटः सुंदर ठिकाण स्वगत: (ह्या विशाल्याने काही विषय ठेवलाय का बाकी मिपावरचा?)
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 06/01/2015 - 14:06 नवीन
लहानांसाठी काही साधे खेळ आहेत का भरपूर आहेत. घोडागाडी राईड आहे. चारचाकी मोटारसायकल्सच्या राईड्स आहेत. बोटींग आहे. अगदी पॅराग्लायडींगसुद्धा करता येते कारण त्यांचा एक सहाय्यक प्रत्येक खेळात बरोबर असतो. खरेतर पॅराग्लायडींगला लहान मुलेच जास्त दिसली. आणि बहुतेक सगळ्या राईडस ३००-३५० रुपये आहेत, त्यामुळे खिश्यालाही फारशी चाट लागत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
व
विशाल कुलकर्णी Mon, 06/01/2015 - 14:14 नवीन
धन्यवाद मंडळी !
  • Log in or register to post comments
स
स्नेहानिकेत Mon, 06/01/2015 - 14:24 नवीन
मस्त फोटो आणि वर्णन !!!!!!! मोदक आणि ते पण हापूस आंब्याचे...काय भन्नाट लागत असतील राव!!! हल्ली वॉटरस्पोर्ट्स जवळपास सगळ्याच समुद्रकिनार्‍यांवर बोकळले आहेत.निवांतपणे किनार्‍यावर फिरताच येत नाही।
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 06/01/2015 - 14:26 नवीन
छायाचित्र आणि वर्णन छान. करवंदे, उंबर, फुलं केवळ सुरेख. मला आवडतं दिवेआगर वर्षातून एक ट्रिप होतेच. पहिल्यांदा बनाना बोटीचा आणि प्याराग्लायडींगचा आनंद इथेच घेतला. रात्री आणि पहाटे जेव्हा कोणीच नसतं तेव्हा स्मुद्रगाज ऐकत कितीतरी वेळ इथे घातला आहे. भटकत राहा आणि सुख उपभोगत राहा. बाय द वे, केळकर काकू राहण्याचे आणि जेवणाचे किती पैसे घेतात ? म्हणजे पुढील वेळी गेलो तर तिथे राहीन. मागच्या वेळी राहिलो ते नाव विसरलो फोटो सापडला तर डकवतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 06/01/2015 - 14:41 नवीन
बाय द वे, केळकर काकू राहण्याचे आणि जेवणाचे किती पैसे घेतात ? एका खोलीचे भाडे २४ तासाला ५००/- रुपये फक्त. एका खोलीत दोन कॉट आणि एक ज्यादाची गादी असते. हवे असल्यास अजुनही गाद्या मिळु शकतात अगदी माफक शुल्क भरून. जेवणाचे एका वेळचे शंभर रुपये घेतात. मोदक हवे असतील तर त्याचा दर वेगळा असतो. प्रतिनग १० रुपये वगैरे असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मॅक Mon, 06/01/2015 - 14:52 नवीन
केवळ अप्रतिम फोटो........
  • Log in or register to post comments
न
निळूभाउ Mon, 06/01/2015 - 15:07 नवीन
वा वा, खरच लय भारी
  • Log in or register to post comments
अ
अजया Mon, 06/01/2015 - 15:57 नवीन
दिवे आगर खरंच वारंवार जावेसे वाटणारे ठिकाण आहे.फोटोही सुरेख.केळकरांकडे जेवलोय पण राहिलो नाहीये कधी. आरावी त्याच रस्त्यावर आहे का? तिथेही राहायची सोय आहे का?
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Mon, 06/01/2015 - 16:13 नवीन
मस्त ठिकाण आहे. जास्वंदिचे फोटो मस्त आले आहेत :)
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Mon, 06/01/2015 - 16:31 नवीन
सुंदर फोटो आवडले, कोंकणात येण्याचा विचार करतो आहे.
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Mon, 06/01/2015 - 16:50 नवीन
सुंदर फ़ोटो आणि त्याहीपेक्षा अतिशय मस्त निवेदन
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Mon, 06/01/2015 - 17:19 नवीन
अशक्य सुंदर फोटू आणि धागा! पुढच्या वेळी नक्की याच ठिकाणी जायचं नक्की केलंय !
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 06/01/2015 - 17:48 नवीन
वाहव्वा! मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्त फोटुसफारी हा सगळा भाग माझा तर अगदी रोजचा म्हणावा,असा माहितीतला. पन तरिही दिवेआगरचा किनारा -गेला,हे ऐकुन वैट्ट वाटलं. मी अनुभवलेला हा किनारा म्हणजे अत्यंत शांत निवांत होता. सकाळ /दुपारी, कुठे तरी एखादी बैलगाडी ,कोळी लोकं, त्यांचा मागुन मागुन धावणारं कुत्रं.. असली प्रादेशिक समांतर दृष्य तिथे दिसायची. आणि मूळ देखाव्यातली गोडी वाढवायची. सांजेला मात्र हा किनारा (पांढर्‍या वाळुचा ..) शांत असायचा . तिथे फक्त आपण आणि समुद्राचं गीतंगुंजन चाललेलं असायचं..त्यानी मन भरलं,की ते संगीत ऐकत ऐकत माघारी देवळाच्या बाजुला परत फिरायचं. आणि सगळं तसच कानात घेऊन हरेश्वरला परतायचं..(हरेश्वरचा किनाराही असाच काहि वर्षांपूर्वीपासून गजबजलेला होऊन गेलेला आहे...)
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Mon, 06/01/2015 - 18:10 नवीन
आम्हीपण २०१०-२०११ ला गेलो होतो. अगदी शांत किनारा होता दिवेआगार चा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
स
सूड Mon, 06/01/2015 - 20:10 नवीन
आताही शांतच आहे हो, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सोडून जायचं. आम्ही फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात गेलो होतो. आम्ही पाच टाळकी वगळता किनार्‍यावर शुकशुकाट होता. मस्त साडेअकरा बारा पर्यंत गप्पा टाकत बसलो आणि मग माघारी रुमवर आलो. ठिकाण मात्र पुन्हा पुन्हा जावं वाटावं असं आहे खरं!! केळकरांच्यात नाही गेलो, कारण केळकर काका-काकूंना म्हणे रात्री मोठ्यांदा गप्पा मारत बसलेलं आवडत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक एकटा एकटाच
व
विशाल कुलकर्णी Tue, 06/02/2015 - 06:47 नवीन
केळकर काका-काकूंना म्हणे रात्री मोठ्यांदा गप्पा मारत बसलेलं आवडत नाही. असं काही नाही. आम्ही तर मागच्या वेळी चक्क गाण्यांची मैफिल रंगवली होती. अर्थात आपल्या गप्पांचा किंवा गाण्यांचा तिथे उतरलेल्या इतर ग्राहकांना त्रास होणार असेल तर केळकरच काय कुठलाही हॉटेलमालत आक्षेप घेणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ज
जुइ Mon, 06/01/2015 - 19:50 नवीन
अप्रतिम फोटो!! दिवे आगार पाहायचे राहिले आहे, मात्र तुम्ही म्हणत आहात की आता बीच एवढे निवांत राहिले नाही :-( . केळकर काकूंच्या बागेचे आणि मोदकांचे वर्णन खासंच. फोटो टाकताना त्यांची रुंदी ६०० ठेवावी म्हणजे ते असे उजव्या बाजूच्या दुव्यांवर अतिक्रमण करीत नाहीत.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 06/01/2015 - 19:54 नवीन
निव्वळ हिरवंकंच. बाकी दिवेआगरचा रूपनारायण पाहिलास का? अद्भूत आहे एकदम.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 06/02/2015 - 08:59 नवीन
+१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 06/01/2015 - 20:32 नवीन
भन्नाट सफर आणि फोटो ! कोकणात कितीही वेळा जा, कधीच कंटाळा येत नाही.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 06/01/2015 - 20:32 नवीन
भन्नाट सफर आणि फोटो ! कोकणात कितीही वेळा जा, कधीच कंटाळा येत नाही.
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Mon, 06/01/2015 - 21:36 नवीन
अप्रतिम फोटो आणि काय सुरेख ते वर्णन. केळकरांकडे गेलेच पाहिजे. वा.खु. साठवुन ठेवली आहे. बाकी कोब्रांबद्दल च्या कॉमेंट्स बद्दल एक सौम्य निषेध ;)
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Tue, 06/02/2015 - 00:55 नवीन
अप्रतिम वर्णन. बरीच वर्षे दिवे आगारला जायचा प्लान करतोय. आता जेव्हा जाईन तेव्हा केळकर काकूंकडेच राहीन.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 06/02/2015 - 02:29 नवीन
छान फोटो!!!!
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Tue, 06/02/2015 - 02:53 नवीन
फारच सुरेख फोटोज. दिवे आगर माझे आवडते ठिकाण आहे. २००७ साली दोनदा गेलो होतो. आयुष्यात प्रथम समुद्र तिथेच पाहिला. दिवे आगरला जाताना रस्त्यात तुम्हाला जिथे फोटो काढावेसे वाटले तिथेच मलाही काढावेसे वाटले त्यापैकी हा एक Image removed. दिवे आगरच्या समुद्र किनार्‍यावरील एक अविस्मरणीय सुर्यास्त Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अभिरुप Tue, 06/02/2015 - 09:29 नवीन
एकदम झकास वर्णन...सुंदर प्रचि,सुरेख लेखानुभव सुद्धा... अगदी स्वतः कोकणात जाऊन आल्यासारखे वाटले. आता नक्की सहकुटुंब जाऊन येईन म्हणतो.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 06/02/2015 - 13:13 नवीन
लिहिणं आणि फोटो खास विशल्या स्टैल! मस्त आहे! रूपनारायण नाही पाहिलास का रे? दिवेआगरचं वैशिष्ट्य म्हणजे तिथली सारवून लख्ख ठेवलेली मोठ्ठी अंगणं. घर कसलंही असो. अंगण एकदम देखणं, गुळगुळीत!
  • Log in or register to post comments
स
स्वच्छंदी_मनोज Tue, 06/02/2015 - 13:54 नवीन
मस्त वर्णन आणी फोटो पण अफलातून.. पण फोटोंवर पावसाळ्याची का छाप आहे? तुम्ही गेलात तेव्हा घाटात पाऊस पडला काय? माझ्या खास आवडीच्या काही गावांपैकी दिवेआगर हे एक गाव आहे/होते (हो आता होते म्हणावे लागेल कारण अती-पर्यटन :( ). गेले अनेक वर्षांपासून दिवेआगरला जातोय. जेव्हा सुवर्णगणेशाचा शोध लागला नव्हता तेव्हापासून. तेव्हा दिवेआगर एक छान आणी शांत गाव होते. केव्हाही किनार्‍यावर जा एकप्रकारची शांतता असायची.. सुवर्णगणेशाच्या शोधानंतर गावातील लोकांना पर्यटनाची आणी त्याबरोबर येण्यार्‍या फायद्याची जाणीव झाली आणी चित्र हळूहळू बदलायला लागले..पण तरीसुद्धा हे गाव खास आवडीचे आहेच :). रुपनारायण (गावातील लोक सुंदरनारायण पण म्हणतात), उत्तरेश्वर मंदीर आता ASI ने पुन्हा बांधून काढलीत पण पुर्वीची पण सुरेखच होती.. गंडकी दगडातील सुंदरनारायण एवढी सुरेख मुर्ती फारच क्वचीत बघायला मिळते.. विष्णुदशावताराची कोरलेली रुपे ह्याचे नाव सार्थ करतात. खूप भटकंती केलीय या भागात. बाईक ने हरीहरेश्वर ते दिघी रस्ता अनेकवेळा पालथा घातलाय. सुवर्णगणेश्याच्या मंदीरासमोरच्या मैदानात कबड्डीच्या स्पर्धा खेळलोय आणी बरंच काही. दिवेआगरच्या पाखाड्यांमधून कृष्णजन्माष्टमीच्या वेळेला अनेकवेळा नाचलोय..ह्या उत्सवात दुपारी नाचायला सुरू करतात आणी प्रत्येक घराच्या अंगणात नाचतात त्यावेळी घरातून मोठ्या घाघरीतून नाचण्यार्‍यांच्या डोक्यावर गार पाणी ओतले जाते. जशी जशी संध्याकाळ आणी रात्र होते तशी घाघरींमधून गार पाण्याच्या ऐवजी गरम पाणी ओततात तेव्हा कसले भारी वाटते, अहा: :) त्याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद..
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा