भारतातील आणिबाणीचा इतिहास व भवितव्य संबंधाने प्रश्न आणि उत्तरे
२५ जून इ.स. १९७५ मध्ये आज पासून बरोबर ४० वर्षांपुर्वी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणिबाणी (Emergency) लागू केली होती जी २१ महिन्यांनी वापस घेतली गेली. इंदिराजींची हि कारवाई त्यांच्या आणि भारतीय काँग्रेसच्या एकुण राजकीय वाटचालीतील मोठ्या विवाद्य गोष्टींपैकी एक गोष्ट ठरली. नवीन पिढ्यांना हा इतिहास खूपसा ठाऊक नाही. पण गेल्या आठवड्या भरापासून इतर विवीध माध्यमातून चर्चा चालू आहे, राष्ट्रीय व्यासपीठावर अगदी अडवाणी मोदींपासून बरेच जण या चर्चेत सहभागी झालेले दिसतात. इंग्रजी आणि हिंदी भाषेत या विषयावर जेवढी सविस्तर चर्चा आणि माहिती उपलब्ध होते तेवढ मराठीत होत नाही. तर त्या इतिहासा उजाळा देणारी माहिती या धाग्यातून मिपाकर सदस्यांच्या माध्यमातून मिळावी म्हणून हा धागा.
चर्चेची सुरवात होण्यास उपयूक्त असे काही प्रश्न मांडतो आहे. ज्यांना विषयाचे वाचन आहे त्यांना खालील प्रश्न अगदीच बाळबोध वाटू शकतील; तत्कालीन राष्ट्रीय राजकारण आणि आणिबाणी याची काहीच कल्पना नसलेल्यांनाही या विषयाची ओळख व्हावी म्हणून अगदी साधे साधे ही प्रश्न घेत आहे.
१) आणिबाणी म्हणजे काय ? कोणत्या परिस्थिती आणिबाणी न्याय्य असू शकते ?
२) इंदिरा गांधी कोण होत्या ?
३) त्यांनी आणिबाणी का लागू केली ?
४) आणिबाणीचा घटनाक्रम कसा होता ?
५) आणिबाणी विषयक कोणकोणती माहिती उपलब्ध आहे आणि कोणती माहिती उपलब्ध नाही
६) त्यांनी आणिबाणी करण्यास कोणती पार्श्वभूमी कारणीभूत ठरली ?
७) आणिबाणीस आंतरराष्ट्रीय राजकारणाचे आणि/अथवा अर्थशास्त्रीय पैलू होते का ? ते कोणते होते ?
८) आणिबाणीच्या काळात इंदिरा गांधीच्या विरोधात कोण कोण होते आणि का ?
९) आणिबाणीच्या काळात इंदिरा गांधी सोबत/बाजूने कोण कोण होते त्यांनी काय काय भूमिका पार पाडल्या ?
१०) आणिबाणीच्या काळातील कोणाकोणाच्या कोणकोणत्या कृतीवर कुणी आणि का टिका केली करतात? आणिबाणी विवाद्य का ठरली ?
११) आणिबाणीचे कुणी कुणी समर्थन केले आणि का ?
१२) भारतीय न्यायसंस्थेची त्याकाळातील आणि नंतरच्या काळातील भूमिका आणि न्यायसंस्थेच्या भूमिकेवर झालेले परिणाम कोणते ?
१३) आणिबाणीचे भारतीय लोकशाही भारतीय राजकारणावर कोणते परिणाम त्यानंतरच्या काळात कसे झाले ?
१२) आणिबाणी बद्दलची माहिती देणारी संशोधनात्मक लेखन झालेली पुस्तके, लेखमाला लेख; चरित्रे आणि आत्मचरित्रे आणि जेथे उपलब्ध असती तेथे त्यांचे दुवे ?
१३) आणिबाणीच्या संबंधाने उल्लेखनीय अवतरणे आणि विधाने.
१०) भारतीय लोकशाहीस भविष्यात पुन्हा एकाधिकारशाहीचा धोका असू शकेल का ? त्याचे स्वरूप कसे असू शकेल ? एकाधिकारशाहीचा धोका भविष्यात होऊ नये म्हणून भारतीय लोक, लोकशाहीचे आधारस्तंभ, राजकारण, नोकरशाही यांनी कोणत्यास्वरूपाची काळजी घ्यावयास हवी /
११) भारतात होऊन गेलेल्या आणिबाणी बद्दल शालेय शिक्षणातून माहिती दिली जावयास हवी का ? असेल तर त्या माहितीचे स्वरूप काय असावे ? शालेय शिक्षणातून माहिती दिली जाऊ नये असे वाटत असेल तर का ?
अजून थोडे प्रश्न !
१२) A. N. Ray अजित नाथ राय यांच्या न्यायालयीन नेमणूकीवरून काय वाद झाला आणि का ? अलाहाबाद उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या निकालांची आणीबाणि संदर्भाने चर्चा केली जाते आणि का ?
१३) जय प्रकाश नारायण कोण होते ? आमेरीकेत शिक्षण घेऊन अथवा राहून आलेल्या व्यक्ती सहसा मुक्त अर्थव्यवस्थेच्या समर्थक होतात जय प्रकाश नारायण तेथे जाऊन मार्क्सवादी होऊन कसे आले ?
१४) जय प्रकाश नारायण राजकारणातून बाहेर केव्हा पडले आणि राजकारणात वापस केव्हा आले आणि का ?
१५) जय प्रकाश नारायण यांना संपूर्ण क्रांती या संकल्पनेतून नेमके काय अभिप्रेत होते आणि बिहार चळवळीतून नेमके काय साधावयाचे होते ?
१६) जय प्रकाश नारायण हे उद्योग व्यवसयांच्या राष्ट्रीय करणाच्या बाजूने होते की विरोधात होते ?
१७) मोरारजी देसाई कोण होते ? त्यांनी नवनिर्माण आंदोलनाचे समर्थन का आणि कसे केले ? मोरारजी देसाई मुक्त अर्थव्यवस्थेचे समर्थक होते का मुलतः समाजवादीच होते ? राष्ट्रीय करणाचा विरोध करता करता मोरारजी देसाई समाजवाद्यांच्या कँपमध्ये कसे पोहोचले आणि कसे स्विकारले गेले ?
१७) नव निर्माण आंदोलन काय होते ? त्यांच्या मागण्या काय होत्या ?
१८) विद्यार्थ्यांना वसतीगृह खाणावळ दरात झालेल्या वाढीमुळे सुरू झालेल्या आंदोलन उर्वरीत समाजात का आणि कसे वाढले ?
१८) महाराष्ट्रातून मोरारजी देसाईंना या काळात कुणी कुणी समर्थन दिले आणि का ?
१९) आणिबाणी काळात काँग्रेस विरोधातील राष्ट्रीयकरणाचे विरोधक आणि समाजवादी यांनी एकमेकांसोबत घरोबा कसा काय केला ?
२०) आणिबाणीपुर्व चळवळीत आणि आणिबाणी काळात काँग्रेस विरोधातील धर्मनिरपेक्ष आणि धर्मनिरपेक्षतेचे टिकाकार यांनी एकमेकांसोबत कसे जमवून घेतले ?
२१) आणीबाणीस राष्ट्रपती, कॅबीनेट, आणि संसदेची मंजुरी कशी मिळवली गेली ?
२२) मिसा म्हणजे काय होते ?
💬 प्रतिसाद
(106)
स
सव्यसाची
Sat, 08/01/2015 - 07:41
नवीन
जबरदस्त सुरुवात. पुभाप्र.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Fri, 07/31/2015 - 16:30
नवीन
लेखमालिकेचा विषय आहे. येऊ द्या. पुभाप्र. पण असा प्रतिसाद म्हणून न लिहिता वेगळा लेख म्हणून लिहा ही विनंती.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sat, 08/01/2015 - 07:10
नवीन
धन्यवाद बोकोबा. मिसळपाववर आणीबाणीसंदर्भात सगळी माहिती एकाच लेखात मिळेल असे काहीतरी असावे असे मला नेहमी वाटत होते.त्या दृष्टीने प्रतिसाद लिहायला सुरवात केली आहे. तरीही सध्या हे प्रतिसाद बीट्स अॅन्ड पीसेसमध्ये लिहित आहे.लेखमालेसाठी स्वतःचे लेख लिहिण्यासाठी अजून रिफाईन करून लिहावे लागेल.ते पण करतोच. पण त्याला वेळ जाईल आणि तोपर्यंत आणीबाणीला ४० वर्षे पूर्ण होणे हे तात्कालिक कारण राहणार नाही.तेव्हा सध्या प्रतिसाद इथेच लिहितो आणि भविष्यात त्याची लेखमाला करता येते का ते पण बघतोच.
- Log in or register to post comments
ख
खेडूत
Sat, 08/01/2015 - 07:47
नवीन
उपयुक्त चर्चा . वाचतोय .
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sat, 08/01/2015 - 08:47
नवीन
आणीबाणीची पार्श्वभूमी-२-- गुजरातमधील आंदोलन
अहमदाबादमध्ये वस्त्रापूरजवळ लालभाई दलपतभाई कॉलेज ऑफ इंजिनिअरींग आहे. त्या कॉलेजच्या आसपास गुजरात युनिव्हर्सिटीमधील प्राध्यापकांची घरे आणि इसरोमध्ये नोकरीला असलेल्यांची घरे आहेत. एकूणच परिसर छान आहे.हे कॉलेज अहमदाबादमधील चांगल्या इंजिनिअरींग कॉलेजांपैकी आहे.तरीही कॉलेज म्हणाल तर ते बरेच nondescript आहे.या कॉलेजातील मेसचे दर वाढायचे निमित्त झाले आणि भारताचा राजकीय इतिहास ढवळून निघाला. मी अहमदाबादला दोन वर्षे राहणार हे ठरल्यानंतर एकदा तरी या कॉलेजमध्ये जाऊन यायचे हे ठरविले होते.एकदा ध्यानीमनी नसताना रिक्षा याच कॉलेजवरून गेली. त्या कॉलेजात विशेष असे काहीच नव्हते.इतर कोणत्याही कॉलेजात असतात त्या प्रकारची इमारत, आवार अशा प्रकारचे वातावरण होते. अशा एका कॉलेजमधील मेसचे दर वाढणे हे इतका मोठा भूकंप व्हायचे कारण होऊ शकेल हे सध्याच्या काळात अगदीच आश्चर्यकारक वाटते.
तेलावर अगदी लहानशी ठिणगी पडली तरी त्यातून लागलेली आग अक्राळविक्राळ स्वरूप धारण करू शकते.तेव्हा वाटू शकेल की ही लहानशी ठिणगी इतकी मोठी आग कशी लावू शकली? खरे तर आग त्या ठिणगीमुळे नाही तर तेलामुळे वाढते.ठिणगी ठरते निमित्तमात्र.कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे आंदोलन हे असेच निमित्त ठरले.आणि तेल होते पहिल्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे असलेली परिस्थिती.त्यातून चिमणभाई पटेलांचे काँग्रेस सरकार म्हणजे भ्रष्टाचार, नेपोटिझम इत्यादींचे कुरण आणि ज्या ज्या गोष्टी वाईट असू शकतात त्या सगळ्या गोष्टी चिमणभाईंच्या सरकारमध्ये होत्या असे चित्र नक्कीच उभे राहिले होते.
या कॉलेजातील मेसचे दर २०% ने वाढविले गेले.त्याविरूध्द विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले.विद्यार्थ्यांनी संप सुरू केला २० डिसेंबर १९७३ रोजी. ३ जानेवारी १९७४ रोजी विद्यार्थ्यांवर पोलिस कारवाई झाली आणि आंदोलक विद्यार्थ्यांबरोबर पोलिसांनी लाठीमार केला.काही विद्यार्थ्यांना अटकही झाली.या पोलिस कारवाईचा राज्यभरात निषेध झाला.त्याविरूध्द १० जानेवारी रोजी गुजरात बंद पुकारण्यात आला. मग कामगारवर्गही आंदोलनात उतरला.मागील प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे चिमणभाई पटेल हे व्यापार्यांकडून पक्षासाठी पैसे घेऊन धान्याची आणि तेलाची कृत्रिम टंचाई निर्माण करून भाव वाढवायच्या व्यापार्यांच्या कृतीकडे कानाडोळा करत होते हे चित्र होतेच.त्यामुळे रेशनच्या धान्याची दुकाने फोडायचे प्रकार गुजरातमध्ये झाले. २५ जानेवारीला दुसरा गुजरात बंद पुकारण्यात आला.यावेळी हिंसाचार झाला आणि राज्यातील ३३ शहरांमध्ये हिंसक घटना घडल्या आणि संचारबंदी लागू करण्यात आली. २८ जानेवारीला तर अहमदाबादमध्ये लष्कराला पाचारण करावे लागले.
(स्त्रोतः http://guruprasad.net/wp-content/uploads/2014/06/1974_gujarat_protests.jpg)
दरम्यानच्या काळात गुजरातमधील विद्यार्थी, कॉलेज आणि युनिव्हर्सिटीतील शिक्षक, वकील इत्यादींची नवनिर्माण समिती बनली. या समितीला सामान्यवर्गाचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला. गुजरातमधील आंदोलनात विद्यार्थी संघटनांचा पुढाकार होता.राजकारणी मंडळी त्यात सुरवातीला नव्हती.या समितीच्या कामात नरेंद्र मोदींचाही सहभाग होता. त्यावेळी ते अभाविपमध्ये होते.
(स्त्रोतः http://guruprasad.net/wp-content/uploads/2014/06/1974_modi_activist.jpg)
या समितीने मागण्या केल्या होत्या त्यातल्या काही मागण्यांमध्ये चुकीचे असे काहीच नव्हते असे वरकरणी वाटेल.पण त्या प्रत्यक्षात कशा आणायच्या याविषयी काहीच ठोस कार्यक्रम समितीकडे नव्हता. उदाहरणार्थ भ्रष्टाचाराचे उच्चाटन करा ही मागणी करायला ठिक आहे.पण ते कसे करणार याविषयी समितीकडे काहीच कार्यक्रम नव्हता.तसेच मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांनी राजीनामा द्यावा ही मागणी समितीने केली.जरी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला तरी पुढे काय? या प्रश्नांना त्या वातावरणात स्थान नव्हते. धान्याचा काळाबाजार रोखा ही पण एक मागणी होती.ती त्या काळच्या परिस्थितीत जनसामान्यांच्या हृदयाच्या तारा छेडणारी ठरली.त्यातूनच या आंदोलनाला सामान्यांचा पाठिंबा अधिक मिळत गेला.
आंदोलनात झालेला हिंसाचार आणि हाताबाहेर जाणारी परिस्थिती लक्षात घेऊन इंदिरा गांधींना नमते घेणे भाग पडले.शेवटी ९ फेब्रुवारी १९७४ रोजी चिमणभाई पटेलांना इंदिरा गांधींनी राजीनामा द्यायला सांगितले आणि विधानसभा बरखास्त न करता निलंबित अवस्थेत ठेवली.
१९७२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मोरारजी देसाईंच्या काँग्रेस (ओ) पक्षाचा धुव्वा उडाला होता.पक्षाला १६८ पैकी अवघ्या १५ जागा मिळाल्या होत्या तर इंदिरांच्या काँग्रेस (आर) ला १४० जागा होत्या.आंदोलनात उडी घ्यायला मोरारजींना चांगली संधी होती.त्यांच्या १५ आमदारांनी राजीनामे तर दिलेच.त्यानंतर जनसंघाच्या ३ आमदारांनी राजीनामे दिले. नवनिर्माण समितीच्या आंदोलनाच्या दडपणामुळे काही काँग्रेस आमदारांनीही राजीनामे दिले. तसेच गुजरात विधानसभा बरखास्त करा या मागणीसाठी मोरारजी देसाई १२ मार्च १९७४ पासून आमरण उपोषणाला बसले. इंदिरा गांधींना शेवटी ही पण मागणी मान्य करावी लागली आणि १६ मार्चला विधानसभा बरखास्त करण्यात आली. २० डिसेंबर १९७३ रोजी एल.डी.कॉलेजमधील आंदोलन सुरू झाल्यापासून १६ मार्चपर्यंत सुमारे १००० लोकांचा मृत्यू हिंसाचारात झाला.
इंदिरा गांधींच्या हातातून परिस्थिती जायला लागली त्यात या गुजरात आंदोलनाचा वाटा मोठा आहे. यानिमित्ताने काही गोष्टी लिहाव्याशा वाटतात.
दोन्ही बाजूंकडून ही परिस्थिती अधिक प्रगल्भतेने हाताळली जायला हवी होती. चिमणभाईंचे काँग्रेस सरकार म्हणजे भ्रष्टाचार आणि सगळ्या वाईट गोष्टींचा अर्क असे चित्र उभे राहिले होते ते काही १००% चुकीचे नक्कीच नव्हते.पंडित नेहरूंच्या काळात स्वातंत्र्यलढ्यातील मुल्यांचा परिणाम म्हणा की अन्य कोणत्याही कारणाने म्हणा परिस्थिती इतकी वाईट नव्हती. पण इंदिरांच्या काळात परिस्थिती अगदीच खालावली. संजय गांधींच्या मारूती साठी सरकारी यंत्रणा दावणीला धरली गेली.१९६७ नंतर काँग्रेस पक्षाने अनेक राज्यांमध्ये विरोधी आमदार फोडून आपली सरकारे बनवली होती. १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने पाण्यासारखा पैसा खर्च केला.त्यातूनच पक्षाची पैशाची गरज आणखी वाढली आणि सगळ्या लांड्यालबाड्यांकडे कानाडोळा झाला किंवा त्यांना राजाश्रय मिळाला. सत्ताधारी माजणे म्हणजे काय याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे १९७० च्या दशकातील इंदिरांची काँग्रेस होती. तरीही नवनिर्माण समितीने भ्रष्टाचार कमी करा अशा मागण्या कोणत्याही कार्यक्रमाशिवाय सादर करणे अयोग्य होते असे माझे मत आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्या ही मागणीही त्यातलीच.कितीही काहीही झाले तरी आपल्या पद्धतीत राज्य विधानसभेत बहुमत आहे तोपर्यंत मुख्यमंत्री सत्तेत राहू शकतात.अशा पध्दतीने मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणे कितपत योग्य आहे? आणि ते ही हिंसाचार करून?
इंदिरा गांधी या इतक्या खमक्या नेत्या असूनही त्यांनी अशा मागण्यांपुढे हात टेकले याचाच अर्थ परिस्थिती तितकी हाताबाहेर गेली होती. आणि अर्थातच मुळात इंदिरांची बाजूही १००% योग्य नव्हतीच. कारण राजकारणातील मूल्यांचा र्हास करायला त्या एका अर्थी जबाबदार होत्याच.त्याचे उट्टे नियतीने वेगळ्या पध्दतीने काढले असे म्हणायला हवे.
आता यापुढील प्रतिसादात बिहारमधील परिस्थितीविषयी लिहेन.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Mon, 08/03/2015 - 13:04
नवीन
एल्.डी.काॅलेजमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी गेलो असता तिथल्या प्राध्यापकांकडून या प्रसंगाचं वर्णन 'क्रांती' या शब्दातच ऐकलं होतं. मेसमध्ये जेवणा-या विद्यार्थ्यांना वाढीव पैसे भरल्याशिवाय जेवण द्यायला मेस व्यवस्थापनाने नकार दिला तेव्हा या विद्यार्थ्यांमध्ये आणि तिथल्या लोकांमध्ये बाचाबाची झाली आणि त्याचं पर्यवसान या विद्यार्थ्यांना rusticate करण्यात झालं. त्याच्या विरोधात सगळे विद्यार्थी उभे राहिले आणि प्राध्यापकांनीही त्याला पाठिंबा दिला. एल्.डी. हे सरकारी काॅलेज असल्यामुळे सरकारच्या शिक्षणविभागाचा तिथे सरळ संबंध होता. त्यांनीही ताठर भूमिका घेतली आणि तिथून हे आंदोलन चिघळत गेलं - असा त्याचा इतिहास ऐकला होता.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3