शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर्यांचे अभिनंदन!
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर्यांचे अभिनंदन!
आत्ताच राजभवनात, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर्यांना अधिकृतपणे "महाराष्ट्र भूषण" ह्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने संमानीत केले. ज्यावेळेस महाराष्ट्रावर "डिसकव्हरी ऑफ इंडीया"कार नेहरू आणि तत्सम काँग्रेसी वैचारीक गुलामगिरीत जोखडले होते तेंव्हा गावोगाव अथक हिंडून शिवाजी बद्दल अधुनिक महाराष्ट्राला जाण करून दिली, प्रेम लावले आणि जनतेसमोर एक आदर्श उभा केला. त्यांच्या भाषणमालीका ऐकताना, केवळ शिवाजीबद्दलच नव्हे तर तमाम महाराष्ट्राबद्दल प्रेम तयार झाले. शिवाजी महाराजांचे सगळे पुतळे एकत्र करून जेव्हढे जमले नाही ते काम म्हणून नाही तर खरेच शिवाजीबद्दलचे प्रेम म्हणून त्यांनी आजन्म केले.
शिवाजी महाराजांबद्दल वाटेल ते लिहीणारे अनेक होऊन गेले आहेत. नेहरूंच्या १९३४ च्या "Glimpses of world history" पुस्तकातला उल्लेख असाच नकारात्मक होता. (उदा.: When only a boy of nineteen he started on his predatory career) अजून एक उदाहरणादाखल: (आऊटलूकच्या) विनोद मेहतांनी इंडिपेंडन्स नावाचे वर्तमानपत्र मुंबईत चालू केले त्यात उगाच जाता येता - यशवंतराव आणि शिवाजीमहाराजांसंदर्भात वाटेल ते लिहीले... प. बंगालमधले देखील असे काही इतिहासकार होते ज्यांनी शिवाजीबद्दल काही अंंशी का होईना नकारात्मक कधीकाळी लिहीले होते. अगदी जेम्स लेन प्रकरण जेंव्हा प्रकाशात आले तेंव्हा म्हणजे २००४ च्या सुमारास आउटलूक इंडीया मधे प्रकाशीत झालेल्या शिवाजी आणि सद्य राजकारणा संदर्भातील लेखाचे शिर्षक देखील बरेच काही सांगून जाते...
अशा या "बुद्धीवादी" काळात तसेच त्या आधी देखील महाराष्ट्रात अनेक चांगले (शिवाजी संदर्भात) इतिहासकार झाले पण जनसामान्यांपर्यंत जसे शास्त्रज्ञ पोचू शकत नाहीत तसेच इतिहासाचे मुलभूत संशोधन करणारे पोचू शकत नाहीत. तो त्यांचा दोष नसतो. त्यांचा स्वभाव असतो आणि म्हणूनच ते इतिहास संशोधन करू शकतात.
रा.स्व. संघ जे सहा उत्सव संघटना म्हणून साजरे करते त्यातील एक उत्सव हा "शिवराज्याभिषेक दिना"चा आहे. कारण काय तर, तत्कालीन पद्धती झुगारत शिवाजीने भोसला एम्पायर म्हणून राज्य तयार न करता, हिंदवी स्वराज्य म्हणून राज्य तयार केले आणि तमाम जनतेस एकत्र आणले. या मुळे किमान संघाच्या संपर्कात आलेली अमराठी जनतेस देखील शिवाजीबद्दल आत्मियता तयार झाली. अर्थात हे अजून एक कारण आहे ज्यामुळे स्युडोसेक्यूलर्स, रिअललेफ्टीस्ट्स आणि तथाकथीत बुद्धीवाद्यांना शिवाजीला वेगळे करायचे आहे अथवा शिवाजीचे महत्वच कमी करायचे आहे.
मात्र, इतिहासकार नसलेल्यांमधे दोन अशी व्यक्तीमत्वे होती ज्यातील एका व्यक्तीने शिवाजी जनमानसात पोचवला. तर त्यातील दुसरी व्यक्ती दुर्दैवाने त्या विषयावर ज्याला "समग्र" म्हणता येईल असे लेखन करण्याआधीच निवर्तली - ते म्हणजे नरहर कुरंदकर. त्यांचे पुस्तक वाचले नसले तर अवश्य वाचा. आणि दुसरे म्हणजे बाबासाहेब पुरंदरे. या दोघांनी शिवाजीला एक राज्यकर्ता म्हणून पाहीले. त्यातील चमत्कार बाजूला ठेवले. त्यांचे कर्तुत्व, त्यांच्या योद्धा आणि शासक म्हणून प्रतिक्रीया पहाताना त्या काळाचा संदर्भ घेऊन बघितल्या. अर्थात कुरंदकरांचे लेखन हे प्राद्यापकी असल्याने ते आवडू शकेल असा वर्ग मर्यादीतच राहीला असता. ती मर्यादा बाबासाहेबांना नव्हती. कारण त्यांनी त्यांच्याच शब्दात (स्वतःस इतिहासकार/इतिहाससंशोधक असे न संबोधिता) शाहीरी केली. शाहीराला कालानुरूप शब्दरचना आणि अलंकार त्यांनी वापरले, इतकेच.
जर पुरंदर्यांसारख्या शाहीराऐवजी असे नकारात्मक अथवा वर्गिकरण करणारे शाहीर त्यावेळेस तयार झाले असते तर महाराष्ट्राचे काय झाले असते कोण जाणे. आज मिळालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हे त्यांच्या या कार्यासंदर्भात दाखवलेली कृतज्ञता आहे.
'राजा शिवछत्रपती' या पुस्तकाचे मुख्य यश माझ्यामते मराठी घराघरातून महाराजांचा इतिहास सोप्या आणि लालित्यपूर्ण भाषेत पोचवणे हे आहे. ओघवत्या भाषेमुळे, संशोधन निबंधातला/लेखातला जडपणा टाळल्यामुळे ते लोकप्रिय झाले.+१०० इतिहास लालित्यपूर्ण भाषेत पोहोचवणे हे फार कमी इतिहास संशोधकांना जमते (जसे आधुनिक विज्ञान लोकांना समजेल असे सांगणारे वैज्ञानिक-संशोधक विरळा आहेत तसेच हे पण). इतिहास तोच असला तरी तो सद्यकालात लोकाभिमुख करण्याचे ... आणि मुख्य म्हणजे ते काम आपल्या हितसंबंधांना सोईस्कर अशी त्याची मोडतोड न करता करण्याचे.... श्रेय पुरंदरेंना नक्कीच देता येईल.