Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शेअर बाजार – काही IPO कथा

प
प्रसाद भागवत
Sun, 11/22/2015 - 13:09
🗣 128 प्रतिसाद
लेखक माल्कम ग्लॅड्वेल यांनी आपल्या 'Outliers' नावाच्या पुस्तकांत '10,000 hours rule' अशी एक संकल्पना मांडली, ज्यानुसार एखाद्याने कोणत्याही गोष्टीकरिता आपले 10,000 तास खर्च केल्याशिवाय त्याला त्या गोष्टीत प्राविण्य मिळत नाही.....या न्यायाने तर मी एव्हाना बाजाराविषयक सर्वज्ञच असावयास हवे, पण ..... मात्र एवढे खरे, की कोणास ज्ञान देणे वा 'यशोकथा' सांगणे नाही, पण उपयुक्त ठरावे असे काही अनुभव सांगण्याची माझी पात्रता असावी असे मी मानतो, आणि प्रसंग व्यक्तीगत स्वरुपाचे आहेत हे मान्य करुनही, त्यातील तर्क महत्वाचे व आजही लागु असल्याने येथे ते देण्याचे धाडस करतो आहे सन 1991 मधे महाविद्यालयीन शिक्षणाचे निमित्ताने मुंबईत गेल्यावर माझा या जादुई अर्थविश्वाशी संबंध आला. बाजारांत दररोज उलाढाली करणारा सकाळच्या 9.01 च्या फास्ट गोरेगांव लोकल मधील एक समवयस्क गुजराथी तरुणांचा ग्रुप...त्यांच्या मुळे खरे तर मी या वाटेकडे आकर्षित झालो. अर्थात वातावणांत हर्षद मेहता नावाची तगडी चुंबकीय शक्तीही होतीच. मनाचा हिय्या करुन एके दिवशी जीजीभॉय टॉवर्सच्या लिफ्ट्मध्ये शिरलो तेंव्हा 13व्या मजल्याच्या क्रमांकाऐवजी फक्त '--'असे लिहिलेले, ही त्या गर्दीमध्येही मनांत नोंदली गेलेली पहिली गोष्ट.!! पुढे प्रामुख्याने BSES(आत्ताची रिलायन्स इन्फ्रा),SBI, बिनानी झिंक अशा शेअर्सच्या नवीन इश्शुज मधुन फायदा मिळवला. मात्र ह्या क्षेत्राकडे व्यवसाय म्हणुन पहायला लागलो ते पुण्याला सुदर्शन केमिकल्स लि. मध्ये नोकरीला लागल्यावरच. सुरवातीस तेथेही निवडक IPO मध्ये सहकार्यांना अर्ज करायला लावणे, हाच माझा प्राधान्यक्रम होता. 1999 मध्ये पुण्याच्याच ‘KPIT Infosystems Ltd’ ने 90 रु. किंमतीने IPO जाहीर केला. मी ही एक चांगली संधी आहे याची खात्री असल्याने सुदर्शन मधील माझ्या वरिष्ठांकडुन अर्ज भरुन घ्यावे या विचारात होतो. दुपारीच आमच्या कंपनीतील 5/6 मॅनेजर्स कॉफी मशीनजवळ गप्पा मारताना मला दिसले. कंपनीतील वातावरण तसे खेळीमेळीचे व अगदी अनौपचारिक असे, मी ही संधी साधुन तेथे पोहोचलो आणि हळुच विषय काढला. आमच्या EDP विभागाचे प्रमुख आणि तीव्र बौद्धिक क्षमता असलेले एक व्यवस्थापकही तेथे होते. त्यांनी मला प्रश्न विचारला "साहेब(?)..आपल्याला काय माहिती आहे या कंपनीचे कामकाज आणि त्याच्या दर्जा बद्दल??" मी चाचरत काहीतरी पुटपुटलो. तो जमानाच असा होता की Information Technology वा Computer याबद्दल मलाच काय, माझ्या वरिष्ठांनाही क्वचितच माहिती होती. झाले..पुढचे 10/15 मिनिटे झाडाझडती होवुन ही कंपनी कशी दुय्यम आणि सुमार दर्जाची कामे करते हे विस्ताराने सांगितले गेले. मी व्दिधा मनाने माझ्या टेबलाशी आलो. मात्र संध्याकाळी सकाळचा प्रसंग आणि माझ्या मनातील घालमेल माझ्या व्यवसायांतील एक जेष्ठ मार्गदर्शक व्यक्तीला सांगितली आणि 'अर्ज करु की नको??" असा सल्ला विचारला. ते हसले आणि म्हणाले "XX सर या विषयांत 'Last word' आहेत या बद्दल वाद नाही, सबब ते म्हणतात हे खरेच असले पाहिजे..पण तुला एक सांगतो, या शेअरला भाव किती मिळायला हवा हे सरांसारखे विद्वान नाही तर तु, मी, तुझे मित्र यांच्यासारखे सामान्य लोक ठरवणार आहेत..जसे हे बघ ना..मी येथे प्रभात रोडला रहातो, अगदी लिज्जत पापड बनविणार्या कारखान्यासमोर, सहाजिकच 'अतिपरिचयामुळे' म्हणा, किंवा तोच तोच गंध सतत आल्याने म्हणा... आम्ही ते पापड कधीही खात नाही. पण म्हणुन कंपनीचा खप कमी झालाय का??..तेंव्हा खुशाल अर्ज कर"..मी आश्वस्त होवुन अर्ज केले. त्यातही नशीबाचा भाग म्हणजे या इश्शुला 40 पट अधिक प्रतिसाद मिळुनही मला हे शेअर्स मिळाले आणि 90 रु. ला मिळालेले शेअर्स 200 रु. च्या पलिकडे विकुन मी घरांतील फर्निचर केले. 2003 मध्ये जेंव्हा 'मारुति लि' चा पब्लीक इश्शु बाजारांत आला तेंव्हा आलेला अनुभव मात्र एकदम उलटा होता. ह्या इश्शुचे फॉर्म्स घेवुन मी काही निवडक क्लायंट्स कडे जायचो आणि 'बघा...चांगली कंपनी आहे' वगैरे पोपट्पंची करायला सुरवात करायचो, तोच ज्या कोणा साहेबांकडे मारुतीची गाडी असायची, ते मलाच उलट ती गाडी किती चांगली चालते, रिलाएबल कशी आहे, कोणताही त्रास नाही ई. गोष्टी सागायचे, '......अर्ज करायलाच हवा' असे म्हणुन फॉर्म भरायचे. हा प्रकार पाहुन मीही ओढुन ताणुन चंद्रबळ आणले आणि चक्क ओव्हरड्राफ्ट वापरुन मोठ्या रकमेचा अर्ज भरला. सांगावयास आनंद वाटतो की मारुति 800 नव्हे पण एखादी उत्तम टु व्हीलर घेता येइल एवढा फायदा महिनाभरांतच झाला. (केवळ माहितीसाठी - त्या वेळी अर्ज केलेल्या जवळपास प्रत्येकाला मारुतिचे शेअर्स फक्त रु 125 मध्ये मिळाले होते. मध्यंतरीचा भाव रु. 4700+ होता.) IPO पुराणामधीलच मला हटकून आठवणारी आणखी एक गोष्ट सांगतो..... 29 जुलै हा उद्योगक्षेत्रांतील ध्रुवतारा भारतरत्न श्री. जे. आर. डी टाटांचा जन्मदिवस,आणि माझ्या कन्येचाही... सन 2004 मध्ये हा मुहुर्त साधून टाटा समुहातील सर्वात मोठी कंपनी TCS ने आपला बहुचर्चित पब्लिक इश्शु बाजारंत आणला. मी माझी, कुटुंबातील सदस्यांचे वाढ्दिवशी खरेदी करावयाची, पद्धत म्हणुन TCS साठी दोन वेगळे अर्ज भरले. त्याच बरोबर व्यवसायाचा एक भाग म्हणुन पुण्यांतील एक यशस्वी व्यावसयिक म्हणुन नामांकित असलेल्या माझ्या 'एक्स-बॉस'कडेही पोहोचलो. "या...प्रसाद या, इकडे कसे काय?? कसे काय चाललेय??".. सरांनी मिठ्ठासपणे चौकशी केली.(सर कधीच कोणाचाही उल्लेख एकेरीने करित नसत, अगदी ज्युनियरचाही) मी लगेच TCS च्या फॉर्म्सचे भेंडोळे काढुन त्यांना अर्ज करण्याची विनंती केली. थोडेसे विचारमग्न झाल्याचे दाखवत साहेबांनी विचारले..' किती रुपयाला आहे हो एक शेअर??'..'900ला सर" - मी..."10रु.चा एक शेअर 900 घ्यायचा.??"- साहेब, "नाही सर, शेअर 10 रु चा नाही,...01 रु.चा आहे"… मी मध्येच त्यांचा गैरसमज दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला (खरे तर मार्केटिंग कसे करु नये याचा उत्तम नमुनाच सादर केला !!!) "अहो, काय सांगताय काय?? इथे आम्ही नेहमीपेक्षा 2/5रु जास्त नफा घ्यायला गेलो तर बाजारांत कोलाहल होतो आणि कोण घेणार हो 01 रु. चा शेअर 900ला ??..असे सल्ले देताना नीट अभ्यास केला आहे् ना तुम्ही?? लक्षांत ठेवा, नवीनच आहात तुमच्या व्यवसायांत अजुन.. एवढ्या महाग किंमतीला या शेअरसाठी अर्ज करण्याचा माझा बिलकुल विचार नाही. आणि तुम्हीही जरा सावधपणेच करा..." "साहेबांनी माझ्याबद्दलच्या काळजीपोटीच सल्ला दिला. अर्थात मी 'बाबा वाक्यं..बॉसं वाक्य प्रमाणम..' विचारसरणी मानणारा नसल्याने 02 अर्ज केलेच आणि मला 35 शेअर्सही मिळाले. 850 रु ला मिळालेल्या या शेअरने पहिल्याच दिवशी बाजारांत जवळपास 1200 रु चा भाव दाखवला. नंतर मिळालेला एकास एक बोनस लक्षांत घेता 2004 साली गुंतविलेल्या उण्यापुर्या 30,000 रुपयांचे कालचे बाजारमुल्य रु 3,50,000 पेक्षा अधिक आहे. आणखी एक सांगावयाची गोष्ट म्हणजे गेल्या 05 वर्षांत या कंपनीने कधीही 2000% पेक्षा कमी (होय 2000% च) डिव्हीडंड दिलेला नाही. अर्थात केवळ IPO च्याच माध्यमातुन फायदा मिळवता येतो असे मात्र बिलकुलच नाही. किंबहुना 'वाट पाहीन पण IPO नेच कमवीन" असे असण्याचे अजिबात कारण नाही.... मध्यंतरी सोशल मिडियात विप्रो कंपनीचे 1980 साली घेतलेले 100 शेअर्स बोनस व स्प्लिट्स मुळे 96,00,000 एवढे वाढुन मुळ 10,000 रु. गुंतवणुकीचे मुल्य 30 वर्षात(2010 साली) 455 कोटी झाले असा एक पोस्ट फिरत होता…… आणि ही अन्य अनेक पोस्टप्रमाणे अफवा वा अतिशयोक्ती नव्हती तर वस्तुस्थिती होती. !! कॅस्ट्रॉल या (आता डीलिस्ट झालेल्या) कंपनीने 1990-2012 दरम्यान तब्बल 10 वेळा बोनस दिले, 'मदरसन सुमी लि.' ही अशीच एक कंपनी...जिने 1997-2015 या काळांत 07 वेळा बोनस शेअर्स वाटले. ईन्फोसिसनेही बोनसवाटपाची अशीच चमकदार कामगिरी आजपर्यत 07 वेळा केली आहे. ITC ने 1978 पासुन 07 वेळा तर कोलगेट(ई)ने 1982 पासुन 06 वेळा बोनस शेअरची भेट दिली, आणी या प्रत्येकाने याशिवाय दरवर्षीच्या घसघसीत लाभांश दिलाच आहे. जाता जाता....'एशियन पेंटस'च्या ताज्या वार्षिक अहवालात लिहिल्याप्रमाणे 1983 साली घेतलेल्या एका शेअरचे आता 184 शेअर्स झाले आहेत. आणि या कालांत गुतवलेल्या 1000 रु.चे मुल्य 31 मार्च 2015 रोजी रुपये 65,00,000 च्या आसपास आहे……. यादी खुप मोठी आहे विस्तारभयास्तव आटोपतो. ….एकदा एका भल्या पहाटे एक निरिश्वरवादी तरुण गौतम बुद्धांची भेट घ्यायला आला. त्याला पहाताक्षणीच बुद्धांनी तो काय विचारणार हे ओळखलेच होते, त्याने बुद्धांना 'तो' नेहमीचा प्रश्न विचारलाच ‘..ईश्वर खरेच आहे का?" "होय,आहे"..उपासनामग्न बुद्ध शांतपणे उत्तरले. तो निघुन गेला. नंतर एके दिवशी एक पापभिरु सज्जन बुद्धांना नेमका हाच प्रश्न विचारते झाले 'खरेच ईश्वर आहे का?" यावेळी मात्र बुद्धांनी तितक्याच तटस्थपणे उत्तर दिले - "नाही" .....हे सज्जनही विचारमग्न होवुन निघुन गेले. पुढे काही दिवसांनी आणखी एक भाविक बुद्धांना म्हणाला "महात्मन, मी गोंधळुन गेलो आहे, अनेक जण असे मानतात की परमेश्वर नाहीच मुळी, उलट बरेच लोक परमेश्वरावरच प्रगाढ विश्वास ठेवतात. आपल्याला काय वाटते ?? तो आहे की नाही?? कृपया मला मार्गदर्शन करावे."....यावर भगवान बुद्धांनी आपल्या अर्धोन्मेलित डोळ्यांतुन त्या साधकाकडे पहात एक प्रसन्न मंद्स्मित केले, आशिर्वाद दिला आणि काहीही न बोलता ते दुसर्या भिक्षुकडे वळले...बुद्धांनी उच्चारलेला शब्द-नी-शब्द लक्षपुर्वक ऐकणार्या त्यांचा एका पट्टशिष्याला मात्र रहावले नाही आणि सावकाशीने ह्या तीनही प्रसंगांची आठवण बुद्धांना देत त्याने विचारले "भगवान, तीन साधकांना तीन वेगळी उत्तरे?? आपण असे का केलेत ??".....यावर हसुन भगवान म्हणाले "अरे, मी काहीही वेगळे केलेले नाही. उत्तरांचे बाह्य स्वरुप वेगळे असेलही पण हेतु एकच आहे, प्रत्येकाला त्यांच्या कोषांतुन बाहेर काढुन विचा्र करण्यास प्रवृत्त करणे, जेणे करुन ते माझ्यासारख्या त्रयस्थाऐवजी स्वतःच सत्याचा अनुभव घेवु शकतील.. सांगावयाचा मुद्दा हा, तुम्ही भगवान बुद्ध असा की माझ्यासारखा सामान्य पामर, काही प्रश्नच असे असतात की जे तुम्हाला वारंवार विचारले जातात..रोज प्रातःसमयी अतिव प्रेमाने विचारला जाणार्या "ईतका वेळ त्या पेपरांत डोळे खुपसुन काय वाचतोयस ?? अशा केवळ दुर्लक्षिण्यायोग्य प्रश्नांबरोबरच व्यवसायानिमित्ताने "शेअर बाजारातुन चांगले रिटर्न्स मिळतील का?? 'बाजारांत गुंतवणुक करावी का?? असे प्रश्न मला वारंवार विचारले जातात. मी भगवान बुद्धांएवढा स्थितप्रज्ञ व तत्वचिंतक नसल्याने कधी हसुन तर कधी वैतागुन उत्तर देत असतो आणि तेही वेगवेगळे नव्हे तर एक आणि एकच. ते म्हणजे……….. "होय, दीर्घकालीन गुंतवणुकीकरीता शेअरबाजारास पर्याय नाही!!!' अर्थात पहिल्यांदाच सांगितल्याप्रमाणे मी स्वतःला गुंतवणुक क्षेत्रातील तज्ञ वगैरे अजिबातच समजत नाही मात्र माझ्यापुरत्या आखलेल्या भविष्यदिशा थोड्क्यांत पुढीलप्रमाणे सांगता येतील. - (१) Will not Invest for Short Term. Will not Save for Long Term...(२) बाजारांत नियमितपणाने गुंतवणुक करेन (३) शेअरबाजारांत गुंतवणुकीची सुरवात करणेपुर्वी किमान 06 महिने पुरेल एवढा आणिबाणी निधी बाजुला ठेवेन (४) केवळ पुर्ण माहितीवर आधारित निर्णयच घेइन, भावनावश होवुन वा घाई गडबडीने व्यवहार करणार नाही (५) उपलब्ध पर्यांयांची सखोल माहिती घेइन. उदा. फिक्स डीपॉझिट ऐवजी लिक्विड फंड्स वा टॅक्स वाचविण्याकरिता ELSS.... चार्ल्स डार्विनने म्हटले आहे की ‘It is NOT the strongest of the species that survives, NOR the most intelligent, but the ones most responsive to change …’ तेंव्हा बद्ल घडविणे अपरिहार्य्च आहे तर उशीर कशाला?? चला, येत्या नव्या संवतापासुनच बदलाला सामोरे जावुया !!!

Book traversal links for शेअर बाजार – काही IPO कथा

  • ‹ शेअरबाजार; प्रासंगिक - तांत्रिक विष्लेषणाच्या नजरेतुन काही रचना
  • Up
  • शेअरबाजार : 'डिस्काऊण्ट...पहावा मिळवुन' !!! ›

प्रतिक्रिया द्या
70141 वाचन

💬 प्रतिसाद (128)
प
प्रसाद भागवत Wed, 08/24/2016 - 07:11 नवीन
या IPO बद्दल बोलायचे तर मी थोडा संभ्रमांत होतो. आम्ही गेले दोन वर्षांपासुन RBL चे शेअर्स Pre IPO Placements च्या माध्यमांतुन खरेदी केले आहेत आणि ती किंमत अधिक आकर्षक असल्याने मला IPO ची किंमत थोडी अवास्तव वाटली. मात्र एकुण प्रतिसाद पहाता आता मला ती योग्य वाटु लागली आहे. येथील काही जणांनी मला वैयक्तिकपणे विचारले होते त्यांना मी 'Can apply for one lot.. Listing likely at 250/260. Fully valued.. No windfall gains seen..' असे माझे मत सांगितले आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ray
R
ray Wed, 08/24/2016 - 18:19 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद भागवत
क
कायरा Mon, 08/29/2016 - 08:35 नवीन
मी सध्या निवृत्त आहे. मला काही पैसे शेअर्स मध्ये गुंतवायचे आहेत. आपण कृपया मला मार्गदर्शन करणार का.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद भागवत Tue, 08/30/2016 - 09:12 नवीन
मार्गदर्शन वगैरे शब्द फारच मोठे..पण माझ्या कल्पना समजावयास मला आवडेल. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कायरा
प
प्रसाद भागवत Wed, 09/07/2016 - 07:20 नवीन
सुनो, सुनो, सुनो, बा-अदब, बा-मुलहिजा, होशियार... आफताब-ए-निवेश, खलिफा-ए-पब्लिक ईश्शु, दीने आलम नुमाईंदा, शाहे सुलतान NSE और BSE के खुद के पब्लिक ईंश्शु तशरीफ ला रहे हैSSSSS ... उम्मीद करते है की हमारे दोस्तो मे से हर खासो-आम दोनो काबिले एहतिरामोंका गर्मजोशी से ईस्तकबाल करेगा... - प्रसाद भागवत
  • Log in or register to post comments
आ
आनंदराव Wed, 09/07/2016 - 09:14 नवीन
लक्ष ठेवून आहे. एल अ‍ॅण्ड टी चा आणखीन एक आय पी ओ येतोय, त्याबद्दल ही सांगा
  • Log in or register to post comments
आ
आनंदराव Wed, 09/07/2016 - 09:14 नवीन
लक्ष ठेवून आहे. एल अ‍ॅण्ड टी चा आणखीन एक आय पी ओ येतोय, त्याबद्दल ही सांगा
  • Log in or register to post comments
स
सुखी Tue, 09/13/2016 - 12:20 नवीन
L&T technologies चा IPO आलाय, २ रुपयाचां शेअर ८५०-८६० या मध्ये मिळेल. घ्यावा का?
NSE और BSE के खुद के पब्लिक ईंश्शु तशरीफ ला रहे हैSSSSS
हा कधी येतो आहे?
  • Log in or register to post comments
प
प्रसाद भागवत Wed, 09/14/2016 - 06:07 नवीन
श्री. सुखी साहेब, L&T Infotech च्या निराशाजनक लिस्टींगमुळे ह्या वेळी ह्या वेळी किंमत थोडीशी स्वस्त आहे असे वाटते, मात्र तरीही L&T technologies च्या IPO कडुन मला जास्त अपेक्षा नाहीत.. ICICIPru Life हा मात्र एक चांगला IPO आहे असे मला व्यक्तीशः वाटते..बहुतेक सर्व जागतिक बाजारांत Insurence जे एक अत्यंत महत्वाचे क्षेत्र असते, भारतीय बाजारांत या निमित्ताने प्रथमच अशी आघाडीची विमा कंपनी लिस्ट होत आहे.. सहाजिकच ती लवकरच सर्व महत्वाच्या निर्देशांकांत समाविष्ट असेल, बहुतेक मोठे म्युच्युअल फंडस ती स्वतःच्या फोलियोंत ठेवतील. निदान माझ्या पहाण्यांत तरी एखाद्या महत्वाच्या क्षेत्रांत अशी पहिल्यांदाच लिस्ट झालेली कंपनी नेहमीच जोरदार यशस्वी झाली आहे... याशिवाय कंपनीचे बिझ्नेस मॉडेल, व्यवसायांतील स्थान हे उत्तम आहे. हीच गोष्ट BSE/NSE बद्दलही लागु होते. (आता दोघांत कोण हा प्रश्न आहे पण सध्यातरी दोघेही IPO IPO बाजार गाजवतील असे वाटते).. हे दोन्ही IPO लवकरच अपेक्षीत आहेत. बाकी तांत्रिक बाबींची पुर्तता झाल्याचे कळते फक्त तारीख जाहीर होणे बाकी आहे. डिस्क्लेमर -ICICIPru Life, BSE, NSE, HDFCLife, ICICILombard (आणि नुकतीच लिस्ट झालेली RBL बेंक) या सर्वच कंपन्यांचे बरेच शेअर्स मी आणि माझे क्लायंटस यांच्याकडे Pre IPO माध्यमांतुन घेतले गेले आहेत. सबब ही पोस्ट या कंपनींत गुंतवणुकीची शिफारस म्हणुम न समजता माझे वैयक्तिक मत म्हणुन समजावी. आपला आर्थिक निर्णय केवळ या पोस्टवर विसंबुन घेवु नये.
  • Log in or register to post comments
स
सुखी Wed, 09/14/2016 - 12:15 नवीन
प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद भागवत
म
मराठी_माणूस गुरुवार, 09/29/2016 - 10:24 नवीन
ICICIPru Life चे लिस्टींग निराशाजनक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद भागवत
प
प्रसाद भागवत गुरुवार, 10/06/2016 - 08:20 नवीन
दुर्दैवाने हो.. या बाबत मी WA वर लगेचच पोस्ट केला होता, येथे करावयाचा राहिला. असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
श
श्रीगुरुजी गुरुवार, 09/29/2016 - 12:14 नवीन
गेल्या काही वर्षांपासून आयपीओ च्या मागे लागणं थांबवलं आहे. आयपीओतून फार काही हाती लागत नाही. समजा एखादा समभाग खूप चांगला असेल व तो आयपीओतून मिळाला नसेल तरी तो लिस्टिंगनंतर मिळू शकतो. बहुसंख्य आयपीओतील समभागांची किंमत खूपच फुगवलेली असते. त्यामुळे आयपीओतून समभाग मिळाले तरी आपण आधीच जास्त किंमत मोजलेली असते. आयपीओ साठी पैसे जवळपास ३ आठवडे अडकून राहतात हा एक वेगळा तोटा.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे गुरुवार, 10/06/2016 - 12:21 नवीन
सद्वचन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
प्रसाद भागवत गुरुवार, 10/06/2016 - 08:18 नवीन
बाकी मुद्द्यांवर लिहित नाही पण ...आयपीओ साठी पैसे जवळपास ३ आठवडे अडकून राहतात हा एक वेगळा तोटा. अशी स्थिती आत राहिली नाही हे नमुद करतो
  • Log in or register to post comments
म
मोहन गुरुवार, 10/06/2016 - 08:36 नवीन
कोल इंडियाच्या बाय ब्याक ऑफर बद्द्ल आपले मत जाणून घेण्यास आवडेल.
  • Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन गुरुवार, 10/06/2016 - 11:56 नवीन
अगदी हाच प्रश्न मला पडला आहे , ऑफर आताच्या प्राइज पेक्षा १० रु. जास्त आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहन
प
प्रसाद भागवत गुरुवार, 10/06/2016 - 12:20 नवीन
सर्वसाधारणतः असे बायबॅक हे काही मर्यादित प्रमाणांतच असते, उदा येथे ते ५% च आहे. त्यामुळॅ होणार्या फायद्यावर मर्यादा येते. त्याहुनही महत्वाचे म्हणजे शेअर्स बाजारांत विकल्यास त्या व्यवहारास 'मार्केट ट्रेड' मानले जावुन त्यावर STT लागु होते आणि मग एका वर्षानंतर होणारा नफा करमुक्त असतो.. उलट, असे कपनीला परत केलेल शेअर्स हे कायद्याने हस्तांतर म्हणुन मानले जाते मात्र तो 'ऑफ मार्केट ट्रेड' होतो आणि त्यावर नियमाने कॅपिटल गेन्स तॅकस लागु होतो. अगदी एक वर्षापेक्षा जास्त काळ झाला असेल तरीही.. आता समजा एखाद्याने हे कोलचे शेअर्स 2010 मध्ये IPO मधुन 245 रुपयांना घेतले असतीत व बायबॅकच्या 10रु.च्या आसपास मिळणारी अधिक किंमत पाहुन तसे बायबॅक केल्यास त्याना यावर (335-245=90) एवढा कॅपिटल गेन होईल ज्यावर त्यांना टॅक्स (15%) भरावा लागेल. हेच शेअर्स बाजारांत विकल्यास किंमत कमी मिळेल पण नफा करमुक्त असेल.. सबब अशी बायबेक्स आपली आपली आकडेमोड करुन करावी.. मला तरी ती क्वचितच आकर्षक वाटतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन
म
माझीही शॅम्पेन गुरुवार, 10/06/2016 - 12:55 नवीन
खूप धन्यवाद !! म्हणजे मी कंपनीची ऑफर सध्या तरी धुडकावतो (तस केल तर चालत ना :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद भागवत
म
मोहन गुरुवार, 10/06/2016 - 14:10 नवीन
धन्यवाद प्रसाद सर !
  • Log in or register to post comments
प
प्रसाद भागवत Wed, 01/04/2017 - 15:27 नवीन
*Upcoming IPO* *BSE INDIA Ltd* Issue Opens *23th January* 2017 Issue Closes *25th January* 2017  Price Band : will update shortly. Face value: Rs. *2*/- per Equity Share Price Band *Tentative*: Rs.800- Rs.850
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Wed, 01/04/2017 - 16:43 नवीन
बी.एस.ई वर कर्ज फार नाही आणि कॅश फ्लो सुध्दा बर्‍यापैकी स्टेबल आहेत. भविष्याचा विचार करता हा बर्‍यापैकी चांगला शेअर होऊ शकेल असे वाटते. तेव्हा मला या शेअरमध्ये पैसे गुंतवायचे आहेत. तरीही ८००-८५० हा दर थोडा जास्त वाटत आहे का? बी.एस.ई चा डायल्युटेड ई.पी.एस साधारण १२ रूपये आहे. तेव्हा ८००-८५० रूपये म्हणजे पी/ई ७० च्या आसपास झाला. आज एम.सी.एक्स चा पी/ई ५५ च्या आसपास आहे. या शेअरची लिस्टिंगच्या वेळी पी/ई अजूनही कमी होता असे वाटते. तेव्हा ८००-८५० इतका दर असेल तर हा शेअर महाग लिस्ट होत आहे का? म्हणजे आय.पी.ओ मध्येच पैसे गुंतवावेत की शेअर थोडा पडायची (६५० पर्यंत यायची) वाट बघावी हे समजत नाही. मदरसन सुमी, मारूती, इन्फोसिस, क्रिसिल इत्यादी शेअर्सने शेअरधारकांना चांगल्यापैकी श्रीमंत केले आहे. अशी कुठची संधी सुटू नये असेही वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद भागवत
प
प्रसाद भागवत गुरुवार, 01/05/2017 - 05:21 नवीन
बाजारात सर्वाधिक महत्वाचे तत्वज्ञान आहे 'भाव हाच देव'. बाजारांतील प्रतिसाद पहाता चांगला भाव मिळेल असे दिसते. या निकषावर हा घ्यावा.. मिळाल्यास आपले सगळे वा शक्य तेवढे मुद्दल काढुन घावे. (अर्थात हे माझे व्यक्तिगत मत. कसलीही हमी नाही) बाकी कीस काढ्णे आवश्यक वाटत नाही. ... असे मी मागेच लिहिले आहे. पी/ई वगैरे निकष महत्वाचे आहेत पण निर्णायक नाहीत. एम.सी.एक्स व बीएससी यांची तशी तुलनाही apples to oranges प्रकारातच मोडेल. हे पहाता पी/ई सरख्या तांत्रिक मुद्द्यांपेक्षा पाठोपाठ येणार्या NSE च्या शेअरचे तुलनात्मक प्राईसिंग किंवा 20 जानेवारीच्या सत्ताग्रहणानंतर श्रीमान ट्रंप साहेबाचे वागणे किंवा यु.पी मधील स्थिती.. अशे घटक जास्त महत्वाचे ठरतील.. बाकी अंदाज अपना अपना
  • Log in or register to post comments
प
प्रसाद भागवत Sat, 04/22/2017 - 17:13 नवीन
बाजारांत येणारे IPOs याबद्दल एव्हाना पुरेसा उहापोह झाला असेलच तर मी बाजारातील नवीन ट्रेंड 'Pre-IPO' खरेदीबद्दल लिहु ईच्छितो. बाजारांत IPO आणु ईच्छिणाऱ्या कंपन्या या संभाव्य विक्री करिता कोणीतरी underwriters नेमतात.. असे underwriters वा कंपनीच्या जवळील सुत्रांकडुन संभाव्य समभाग विक्रीची वातावरण निर्मिती (Market making) म्हणुन अगदी निवड्क पद्धतीने Pre IPO या सदराखाली शेअर्स विकले जातात. अनेकदा ESOPs वा अशाच पद्ध्तीने शेअर्स मिळालेले भागधारक आपले शेअर्स विकतात. महत्वाचे म्हणजे यात काहीही बेकायदा,चुकीचे अथवा अनैतिक नाही. ही अगदी नियमित्पणे होणारी आणि १००% सनदशीर गोष्ट आहे. अशा खरेदी /विक्रीच्या व्यवहारांचा फायदा म्हणजे आपल्याला शेअर्स मिळतील किंवा नाही अशी द्विधा नसते, शेअर्स हमखास मिळतात आणि बहुधा ते नियोजित IPOच्या तुलनेने सवलतीच्या दराने मिळतात. बिल्डर्स आपली योजना सादर करण्यापुर्वी काही फ्लॅट्स Pre Launch पधतीने विकतो ..हे अगदी तस्सेच आहे. या व्यवहारांत असणारे संभाव्य धोके म्हणजे पारदर्शकतेचा अभाव..येथे किंमत ही बाजारांत ठरत नसुन ती आपला मध्यस्थ सांगत असतो..सबब ती योग्य की अयोग्य याचा निर्णय घेणे हे जिकिरीचे असते, कोणातीही कॉन्ट्रॅक्ट नोट मिळत नाही. त्यामुळे मध्यस्थाची विश्वासार्हता ही फार तपासुन घ्यावी लागते. दुसरे म्हणजे असे Pre IPO घेतलेले समभाग सेबीच्या नियमानुसार IPOच्या बाजारातील नोंदणीनंतर 01 वर्ष विकता येत नाहीत वा हस्तांतरीत करता येत नाहीत. अर्थात हे समभाग पब्लीक ईश्शुआधी विकता येता हे सांगितलेच आहे, शिवाय आधीच सांगितल्यास IPOचा हिस्सा म्हणुन त्या दराने विकता येतात. मात्र तसे न केल्यास मग 'लॉक-ईन' सुरु होतो. अशा व्यवहारातुनन केलेली खरेदी विक्री ही off market सदरांत मोडते आणि ती कायदेशीर असली तरी यातुन उत्पन्न होणारा भांडावली नफा हा करप्रणालीत केलेल्या नव्या बदलांप्रमाणे करपात्र होईल . अर्थात करआकारणी सवलतीच्या दराने असेल असे म्हटले जाते. माझ स्वतःचा अनुभव सांगावयाचा तर मी या प्रकारे RBL Bank (pre IPO rate125/Current rate 500) ICICIPru Life (225/400) BSE (500/1000) हे शेअर्स विकत घेतले होते जे बाजारांत आता लिस्ट झाले आहेत. याशिवाय बाजारांत अजुन नोंदणी न झालेल्या Fino Paytech (140) , Bharti Telecom (105), HBD Financial Services(340) Indofil Industries (750), Tata Technologies (2400) यांचे शेअर्स मी (कंसातील भावाने) घेतले आहेत. तेंव्हा अशी काहीशी न मळलेली वाट चोखाळण्याचा स्वभाव असणार्या मंडळींना माझ्या शुभेच्छा!!! महत्वाचे - हा पोस्ट केवळ 'सदस्यांना नविन माहिती मिळावी' या उद्देशाने आहे. यातील कोणताही समभाग एखाद्याने विकत घ्यावा याची ही शिफारस समजु नये. हे वा अन्य समभाग विकत घेतल्यास त्यांची बाजारात नोद कधी होईल, किती किंमतीला होईल, किती फायदा होईल अथवा फायदा होईलच याचीही कसलीही हमी मी देत नाही.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Mon, 04/24/2017 - 08:12 नवीन
त्यामुळे मध्यस्थाची विश्वासार्हता ही फार तपासुन घ्यावी लागते.
हे मध्यस्थ कोण असतात, ते आपल्या पर्यंत कसे पोहचतात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद भागवत
र
राघवेंद्र Tue, 04/25/2017 - 17:12 नवीन
प्रसादजी, खूप छान माहिती. "Diluted शेअर्स चे मूल्य" बद्दल थोडी माहिती मिळेल का मला हा प्रकार कळत नाही आहे आणि एखादे नजीकचे उदाहरण असेल अतिउत्तम.
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र Tue, 04/25/2017 - 17:18 नवीन
आपण एखाद्या कंपनीचा शेअर १०० रुपयाला घेतो आणि बाजारात कंपनीचे क्ष शेअर आहेत. कंपनी अधिक य शेअर बाजारात एम्पॉई स्टॉक, बॉण्डच्या माध्यमातून आणते तेंव्हा शेअर किंमत कमी होऊ शकते. असे वाचले आहे पण तुमच्या भाषेत सांगितले तर सगळ्यांनाच नीट कळेल.
  • Log in or register to post comments
A
Anand More Wed, 04/26/2017 - 04:23 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा