Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

थोरले बाजीराव

प
पालीचा खंडोबा १
Sat, 11/28/2015 - 12:32
🗣 66 प्रतिसाद
सध्या बाजीराव मस्तानी चित्रपटाची चर्चा जोरदार सुरु आहे. त्यात प्रेम महत्वाचे आहे असे प. पु. श्री संजयजी लीला भंसालीजी म्हणतात. म्हणोत बापुडे. पण महत्वाचा मुद्दा दुर्लक्षित राहतो ते. श्रीमंत बाजीरावांचे मराठी आणि त्याहून महत्वाचे म्हणजे भारतीय इतिहासातील योगदान. सर जदुनाथ सरकार फार मोठे इतिहासकार होवून गेले त्यांनी असे म्हंटले आहे कि छत्रपति शिवरायांनंतर मराठी इतिहासात जर कोणी पराक्रमी असेल तर ते बाजीराव साहेब होत. १७१९ साली वारसाहक्काने बाजीराव साहेबास पेशवेपदाची वस्त्रे मिळाली परंतु सातारा दरबारात त्यास विरोध होता. बाळाजी विश्वनाथांच्या प्रेमापोटी छत्रपति शाहू महाराजांनी बाजीराव साहेबास वस्त्रे दिली . तदनंतर बाजीराव साहेबांनी मागेवळुन वळुन पाहिले नाही . दिल्ली तख्त काबीज करणारा तो पहिला मराठी पुरुष होता. ब्रिटीश इतिहासकारांनी त्यांच्या विजयाचे श्रेय त्यांच्या हुशारी आणि रणनितिस दिले आहे. क्षणाचीही उसंत न घेता अविरत प्रवास करून अंतर वेळेआधी कापून बाजीरावशत्रूस शत्रूस चकित करत असे. निजामाचे सैन्य भारी असूनही त्यापेक्षा ३०% कमी फौजेसह त्यांनी निजामास टक्कर दिली आणि त्याचा पराभव केला. उत्तर हिंदुस्थानात मराठेशाहीचा विस्तार हा त्यांच्याच काळात झाला. शिंदे , होळकर, पवार, गायकवाड असे नामांकित सरदार त्य्नच्याच काळात उदयास आले. आपले दुर्दैव इतकेच कि इतक्या थोर योध्यास आपण जातीच्या चौकटीत अडकवून ठेवले. त्यांच्या युद्ध कौशल्याबद्दल त्यांच्या शत्रूंनी पण गौरव उद्गार काढले आहेत. त्यांच्या प्रत्येक लढायांचा अभ्यास केला आहे आणि केला जातो त्यांच्याच कारकिर्दीत वसई काबीज केली गेली आणि तेथील स्थानिकांची धर्मछळातुन सुटका करण्यात आली.

प्रतिक्रिया द्या
15794 वाचन

💬 प्रतिसाद (66)
ग
गॅरी ट्रुमन Sat, 11/28/2015 - 13:06 नवीन
१७१९ साली वारसाहक्काने बाजीराव साहेबास पेशवेपदाची वस्त्रे मिळाली
माझ्या माहितीप्रमाणे पहिले शाहू (संभाजीराजांचे पुत्र) हयात असेपर्यंत (१७४९ पर्यंत) पेशवाई ही वारसाहक्काने नव्हती. पेशवे म्हणजे पंतप्रधान.त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रपती पंतप्रधान म्हणून कोणालाही नेमू शकतो त्याप्रमाणे शाहूने सुरवातीला बाळाजी विश्वनाथला आणि बाळाजी गेल्यानंतर त्यांचे पुत्र बाजीराव यांना पेशवेपदी त्यांच्या अंगातील गुणांमुळे नेमले होते.पण पेशवाई ही वारसाहक्काने नव्हती. १७४० मध्ये बाजीराव गेल्यानंतर बाळाजी बाजीराव (नानासाहेब) पेशवे नेमतानाही पेशवेपदी कोणाला नेमायचे हा प्रश्न परत उभा राहिला.पण नानासाहेब त्या पदासाठी सर्वात लायक उमेदवार असल्यामुळे आणि अन्य कोणी लायक उमेदवार न मिळाल्यामुळे शाहूने परत बाजीरावपुत्राची पेशवेपदी नियुक्ती केली. नानासाहेब मोहिमेदरम्यान खर्चावर नियंत्रण ठेऊ शकत नसे आणि त्यामुळे मराठी राज्य कर्जात बुडत चालले होते म्हणून १७४७ मध्ये शाहूने नानासाहेबांना पेशवेपदावरून काढले होते हे पण वाचल्याचे आठवते*. पण पुढे अन्य कोणी लायक उमेदवार पेशवा म्हणून न मिळाल्यामुळे म्हणा की नानासाहेबांबरोबर समेट झाल्यामुळे म्हणा नानासाहेब परत पेशवेपदी आले. शाहूराजे गेल्यानंतर मात्र पेशवेपद हे वारसाहक्काने प्रस्थापित झाले. म्हणून पुढे माधवराव, नारायणराव, सवाई माधवराव, दुसरा बाजीराव अशी परंपरा चालू राहिली. *: शाळेत असताना मी कॅप्टन वासुदेव बेलवलकरांच्या पेशवाईवरील बर्‍याच कादंबर्‍या वाचल्या होत्या. त्यापैकी कुठल्यातरी एका कादंबरीत १७४७ मध्ये पेशवेपदावरून नानासाहेबांना काढले होते याविषयी गोपिकाबाई आणि नानासाहेबांमध्ये काही संवाद झाल्याचे लिहिले होते. अर्थात ही कादंबरी असल्यामुळे याच्या ऐतिहासिक सत्यासत्यतेविषयी कल्पना नाही. कादंबर्‍यांमध्ये मुळात इतिहासात नसलेली पात्रे (उदाहरणार्थ शेलारमामा, संभाजीने तथाकथित पळवून आणलेली गोदावरी वगैरे) बेमालूमपणे घुसडली जात असतील तर काल्पनिक घटनाही घुसडली जाणे अगदीच अशक्य नाही. तेव्हा या एका मुद्द्याची सत्यासत्यता पडताळून बघायला हवी.
आपले दुर्दैव इतकेच कि इतक्या थोर योध्यास आपण जातीच्या चौकटीत अडकवून ठेवले.
हेच भारताचे सर्वात मोठे दुर्दैव आहे.
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Sat, 11/28/2015 - 16:12 नवीन
*: शाळेत असताना मी कॅप्टन वासुदेव बेलवलकरांच्या पेशवाईवरील बर्‍याच कादंबर्‍या वाचल्या होत्या. त्यापैकी कुठल्यातरी एका कादंबरीत १७४७ मध्ये पेशवेपदावरून नानासाहेबांना काढले होते याविषयी गोपिकाबाई आणि नानासाहेबांमध्ये काही संवाद झाल्याचे लिहिले होते. अर्थात ही कादंबरी असल्यामुळे याच्या ऐतिहासिक सत्यासत्यतेविषयी कल्पना नाही. कादंबर्‍यांमध्ये मुळात इतिहासात नसलेली पात्रे (उदाहरणार्थ शेलारमामा, संभाजीने तथाकथित पळवून आणलेली गोदावरी वगैरे) बेमालूमपणे घुसडली जात असतील तर काल्पनिक घटनाही घुसडली जाणे अगदीच अशक्य नाही. तेव्हा या एका मुद्द्याची सत्यासत्यता पडताळून बघायला हवी.
हे मी देखील वाचल्याचे आठवते. तो संवाद देखील पानिपताच्या वेळचा आहे, विश्वासरावांना युद्धात पाठवताना त्याचं समर्थन करताना गोपिकाबाई म्हणतात की त्या वेळी जी स्थिती आली होती आपल्या मुलांच्या बाबतीत मी येऊ देणार नाही. आता नक्की आठवत नाही , पण पेशवाईची वस्त्रे काढुन घेण्यामागे अंतःपुरातील राजकारण कारणीभूत होतं असं काहीसं वाचलं आहे. त्यात छत्रपतींच्या राणीने छत्रपतींचा नानांवि रुद्ध मन वळवलं म्हणुन ते सगळं रामायण घडलं असं काहीसं. त्या काळात बाजीरावांचे जावई पेशवे होते असं ही वाचल्याचं आठवतंय. दौलतीवर कर्जं करुन येण्याबद्दल आणि मुलुख जिंकत जाऊन त्याची व्यवस्था न लावता तसेच पुढे जात जाणे या दोन्ही गोष्टी मुख्यतः रघुनाथरावांबद्दल वाचल्या आहेत. त्याला वचक लावला भाऊसाहेबांनी कारण ते राज्याचा जमाखर्च बघायचे आणि त्यात ते खुप काटेकोर होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Sat, 11/28/2015 - 16:49 नवीन
तो संवाद देखील पानिपताच्या वेळचा आहे,
हो बरोबर. त्यावेळी बेलवलकरांनी नानासाहेबांना पेशवेपदावरून काढले होते त्या काळाविषयी गोपिकाबाईंना "आपण ध्वजाशिवाय स्तंभ कसा असतो ते अनुभवले आहे" असे काहीसे म्हणताना रेखाटले आहे.
विश्वासरावांना युद्धात पाठवताना त्याचं समर्थन करताना गोपिकाबाई म्हणतात की त्या वेळी जी स्थिती आली होती आपल्या मुलांच्या बाबतीत मी येऊ देणार नाही.
याव्यतिरिक्त विश्वासरावांना पानिपतला पाठविण्यामागे गोपिकाबाईंचा एक दुसरा हेतूही होता असे अन्यत्र कुठेतरी वाचल्याचे आठवते. पानिपतला जायला पेशव्यांचे सैन्य निघाले १७६० मध्ये.त्याच्या ४० वर्षांपूर्वीपासून पेशव्यांच्या सैन्याला पराभव म्हणजे काय हे माहितच नव्हते.त्यामुळे शत्रू कोणीही असला तरी आपण जिंकणारच हा अतीआत्मविश्वास होताच (त्याच अतीआत्मविश्वासाखातर अब्दालीविरूध्द लढायला एवीतेवी उत्तर भारतात जाणारच आहोत मग जिंकून परत येताना काशीयात्राही करून यावी या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर बाजारबुणगे सदाशिवरावभाऊंच्या सैन्याबरोबर गेले होते). अशावेळी लढाईचे नेतृत्व सदाशिवरावभाऊंकडे गेले होते.आणि जिंकल्यानंतर सगळे श्रेय त्यांनाच मिळेल म्हणून त्या श्रेयामध्ये आपल्या मुलाचाही वाटा असावा म्हणून विश्वासरावांनाही अब्दालीविरूध्द लढायला पाठविले गेले आणि त्यात गोपिकाबाईंचा आग्रह होता. आणि दुर्दैवाने दोन रत्ने पानिपतमध्ये गळाली ती सदाशिवरावभाऊ आणि विश्वासराव हीच!! बाजीराव पेशव्यांच्या मस्तानी प्रकरणानंतर नानासाहेबांनी असे काही करू नये म्हणून चेक ठेवायला मोहिमेला नानासाहेब पेशव्यांबरोबर गोपिकाबाईंनी जायला सुरवात केली असेही वाचले आहे. त्यामुळे पेशवे कुटुंबियांच्या अन्य स्त्रियाही मोहिमेवर जाऊ लागल्या (त्याच प्रथेप्रमाणे पार्वतीबाईही सदाशिवरावभाऊंबरोबर पानिपतला गेल्या होत्या. आनंदीबाई रघुनाथरावांबरोबर अब्दालीविरूध्दच्या अटकेपार झेंडा फडकविलेल्या मोहिमेसाठी गेल्या होत्या की नाही हे माहित नाही). पुढे माधवराव पेशवे झाल्यानंतर त्यांनी गोपिकाबाईंचे भाऊ मल्हारराव रास्तेमामा यांना दंड ठोठावला त्याविरूध्द रागावून त्या शनीवारवाडा सोडून गेल्या. माधवरावांचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी निधन झाले त्यावेळीही त्या परत आल्या नव्हत्या. नंतर त्या नाशिकमध्ये अगदी दरिद्री अवस्थेत राहत होत्या आणि तिथेच त्यांचे निधन झाले असेही वाचले आहे. दरवेळी मी असेही वाचले आहे असे म्हणत आहे आणि पुस्तकांची नावे देत नाही कारण ही पुस्तके वाचून २२-२४ वर्षे उलटली आहेत.त्यावेळी शाळेत असताना पेशवाईवरील पुस्तकांचा फडशा पाडायचा मी अगदी रतीबच घातला होता. तो परत सुरू करावा असे म्हणतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
ग
गॅरी ट्रुमन Sat, 11/28/2015 - 16:51 नवीन
त्यावेळी बेलवलकरांनी नानासाहेबांना पेशवेपदावरून काढले होते त्या काळाविषयी गोपिकाबाईंना "आपण ध्वजाशिवाय स्तंभ कसा असतो ते अनुभवले आहे" असे काहीसे म्हणताना रेखाटले आहे.
वाक्यरचना चुकली. यावरून बेलवलकरांनी नानासाहेबांना पेशवेपदावरून काढले होते असाही अर्थ निघत आहे :) हे वाक्य--- "त्यावेळी नानासाहेबांना पेशवेपदावरून काढले होते त्या काळाविषयी गोपिकाबाईंना "आपण ध्वजाशिवाय स्तंभ कसा असतो ते अनुभवले आहे" असे काहीसे म्हणताना बेलवलकरांनी रेखाटले आहे." असे हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
स
स्रुजा Sat, 11/28/2015 - 17:48 नवीन
:) तंतोतंत. पण,
च्या ४० वर्षांपूर्वीपासून पेशव्यांच्या सैन्याला पराभव म्हणजे काय हे माहितच नव्हते.त्यामुळे शत्रू कोणीही असला तरी आपण जिंकणारच हा अतीआत्मविश्वास होताच
या आधी दत्ताजी शिंदे बुराडी घाटाच्या लढाईत हारल्याने आणि नजीबाने गोड गोड बोलुन रघुनाथरावांना फशी केलेले असल्याने अब्दालीच्या ताकदीची निदान भाऊ आणि नानांना कल्पना होतीच. अब्दालीकडे असलेल्या आधुनिक युधास्त्रांचा विचार करुन च इब्राहिमखान गारद्याची तुकडी भाऊंनी बरोबर घ्यायचा निर्णय घेतला. मात्र बरोबर असलेल्या बाजारबुणग्यांमुळे , होळकरांच्या गनिमी काव्यासाठी ( खरं तर गारद्यांच्या नव्या युद्ध नीतीला विरोध करायच्या या एकमेव हेतुने, अन्यथा होळकरांसारख्या मुरलेल्या आणि उत्तर भारतात अनेक स्वार्‍यांचा अनुभव असलेल्या योद्ध्याकडुन सखल प्रदेशात गनिमी काव्याचा आग्रह अज्ञानातुन आलेला असेल हे पटत नाही) असलेल्या आठमुठेपणामुळे अमुल्य वेळ वाया गेला आणि "पानिपत" घडलं. निजामाच्या स्वारीत त्याला पुण्याच्या धनिकांचे पत्ते दिले म्हणुन रास्त्यांना दंड ठोठावला होता. आणि गोपिकाबाई त्यानंतर शनिवारवाडा सोडुन गेल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
म
माहितगार Mon, 11/30/2015 - 10:01 नवीन
हि अख्खी उपचर्चा कादंबरीवर अवलंबून आहे ? आंतरजालावर साधार संदर्भ सहज शोधण्या जोगे नसले की लोक कादंबर्‍यावर विसंबावयास लागतात. मराठी आंतरजालावर प्रॉपर संदर्भ स्रोतांची कमतरता या निमीत्ताने अधोरेखीत होते किंवा कसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
म
महासंग्राम Mon, 11/30/2015 - 10:09 नवीन
इतिहासाची सुवर्ण पाने इथे बरीच माहिती आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
स
सतिश गावडे Mon, 11/30/2015 - 16:56 नवीन
शेलारमामा काल्पनिक पात्र आहे याला ऐतिहासिक आधार आहे का? तसं असेल तर या पात्राचा पहिला उल्लेख "गड आला पण..." कादम्बरीत आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
र
रमेश आठवले Mon, 11/30/2015 - 19:33 नवीन
काही दिवसापूर्वी झी २४ तास वर बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या काही भाषणातील उतारे ऐकवण्यात आले. त्यापैकी एका भाषणात बाळासाहेब असे सांगतात की बाबासाहेब पुरंदरे यांच्या मते शेलार मामा हि व्यक्ति अस्तित्वात नव्हती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ट
टवाळ कार्टा Mon, 11/30/2015 - 19:42 नवीन
हा पुरावा???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले
र
रमेश आठवले Mon, 11/30/2015 - 20:33 नवीन
संशोधन करा टवाळकी सोडा. झी २४ तासची विडीओ लायब्ररी ,बाळासाहेबांची भाषणे आणि पुरंदरे यांचे लिखाण यांच्यात संशोधन करा अथवा स्वत: पुरंदरे यांच्याशी चर्चा करा . मग लिहा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Tue, 12/01/2015 - 08:24 नवीन
ह्यँ...हे तर आम्चा ब्यॅट्यॅपण करेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले
ब
बॅटमॅन Tue, 12/01/2015 - 08:00 नवीन
जरा पाहून सांगतो गावडे सर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
म
मृत्युन्जय गुरुवार, 12/03/2015 - 07:06 नवीन
शेलारमामा हे पात्र काल्पनिक आहे की नाही ते माहिती नाही कारण शेलार मामांबद्दल बर्‍याच वेळा वाचले आहे. पण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक खात्याने तरी बहुधा त्यांचे अस्तित्व नाकारले असावे कारण सिंहगडावरच्या तानाजी मालुसरेंच्या पुतळ्यापाशी तरी उदेभानुला तानाजीनेच मारले असे लिहिले आहे. मी लहानपणापासुन जे वाचले आहे त्यानुसार उदेभानुने तानाजींना मारले आणी मग शेलारमामांनी तानाजीला मारले पण तानाजींच्या समाधीवर मात्र शेलारमामांचा उल्लेख पुर्ण टाळला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
म
मी-सौरभ गुरुवार, 12/03/2015 - 13:32 नवीन
शेलार मामांनी ऊदेभानाला मारले असे वाचले आहे बरं का.:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Fri, 12/04/2015 - 07:05 नवीन
अर्र. गल्तीसे मिष्टेक हुइ गवा. शेलारमामाणी उदेभानाला मारले असेच वाचावे माझ्या प्रतिसादात देखील :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ
प
प्रचेतस Fri, 12/04/2015 - 04:20 नवीन
तानाजी मालुसरेंच्या पुतळ्यापाशी तानाजीचा वीरगळ आहे बरं का. अगदी तिथे शेजारीच असून लोक फक्त पुतळ्याचे दर्शन घेतेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Fri, 12/04/2015 - 07:07 नवीन
व्हय काय? नोटिश नव्हता क्येला अजुन्पत्तुर. पुढच्या टाइमाला बघतो. पण त्ये उदेभानूला मारले कोनी? तानाजी ने की शेलारमामाने. शेलारमामानं मारलं असल तर त्याचा उल्लेख का न्हाई?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Fri, 12/04/2015 - 07:33 नवीन
कुणी मारलं ते खरंच माहीत नाही. दोघांनी एकमेकांना मारलं असेच उल्लेख आहेत. शेलारमामाने मात्र नंतर पळणार्‍या मावळ्यांना थोपवून धरले आणि सिंहगड घेतला असेच वाचले आहे. बॅट्या कदाचित सांगू शकेल. बाकी हा तो वीरगळ Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
पक्षी Mon, 12/07/2015 - 17:13 नवीन
शेलारमामाने मात्र नंतर पळणार्‍या मावळ्यांना थोपवून धरले आणि सिंहगड घेतला असेच वाचले आहे.
नंतर पळणार्‍या मावळ्यांना, सूर्याजी मालुसरे ह्यांनी थोपवले, असे वाचण्यात आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
च
चाणक्य Sat, 11/28/2015 - 13:51 नवीन
पेशव्यांबद्दल अजून माहिती वाचण्यास उत्सुक. जाणकारांच्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत. लेख आवडला हेवेसांनल.अजून माहिती असेल तर येउद्या.
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Mon, 11/30/2015 - 10:07 नवीन
href="http://www.kaustubhkasture.in/2013/08/blog-post_3142.html" title="इतिहासाची सुवर्ण पाने "> इथे पेशवाईबद्द्ल बरच काही वाचता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य
च
चाणक्य Mon, 11/30/2015 - 16:16 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
प
पर्ण Sat, 11/28/2015 - 14:03 नवीन
श्रीराम साठे यांचे पेशवे हि कादंबरी वाचावी यात सगळ्या पेशव्यांचा उल्लेख आहे असे ऐकले आहे... मला वाचावयास मिळाल्यास मी नक्की माहिती देईन... तसेच खंडोबा यांचा इतिहास चांगला आहे तर माझी अशी विनंती आहे कि त्यांनी पेशव्यांची अधिक माहिती इथे द्यावी...
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Mon, 11/30/2015 - 16:39 नवीन
प्रमोद ओक यांनी पेशवे घराण्याचा कुलवृत्तांत या नावाचे पुस्तक लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्ण
D
DEADPOOL Sat, 11/28/2015 - 15:06 नवीन
निजामाचे सैन्य भारी असूनही त्यापेक्षा ३०% कमी फौजेसह त्यांनी निजामास टक्कर दिली आणि त्याचा पराभव केला. >>>>>>> यापेक्षा बरीच कमी फौज बाजीरावांकडे होती. हीच सुप्रसिद्ध पालखेडची लढाई, जी कधी लढलीच गेली नाही. ब्रिटिश सोसायटीच्या सर्वकालीन टॉप 10 मध्ये मध्ये ही द्वितीय क्रमांकाची लढाई!
  • Log in or register to post comments
स
समीर_happy go lucky Sat, 11/28/2015 - 16:19 नवीन
वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी स्वराज्याचा पेशवा झालेला हो! अवघं चाळीसच वर्षांचं शापित आयुष्य आणि त्यातही केवळ वीसच वर्षांची कारकीर्द लाभलेला हा अचाट योद्धा! त्या वीसच वर्षांच्या काळात त्याने हिंदवी स्वराज्याचं हिंदवी साम्राज्य केलं! जो संकल्प थोरल्या महाराजांनी मनी धरला होता, या रणधीराने तो पूर्तीस नेला. महाराष्ट्रास वाकुल्या दाखवत ४०० वर्षे खिजवणारी दिल्ली जाळली, लुटली आणि फस्तच नव्हे, तर अंकित केली ती याच बाजीरावाने ! कर्तबगार पेशव्याची आज जयंती. यानिमित्ताने आज हा मस्तानीपल्याडचा बाजीराव आठवूया. अभिमानाने फुलून जाऊया!!!! आपल्याला एखाद्या थोराच्या वैयक्तिक आयुष्यात इतका काही वेड्यागत रस असतो की, बाजीराव म्हटल्यावर आठवते ती फक्त मस्तानी. या मस्तानीचं गारुड एवढं काही गडद आहे की, त्यापलीकडचा बाजीराव आम्हाला नुसता ऐकूनही ठाऊक नसतो. वास्तविक बाजीराव हा शतकानुशतकांतून कधीतरीच उदित होणारा निष्णात सेनापती, साक्षात रणपंडित!! ४० वर्षांचं आयुष्य, २० वर्षांची कारकीर्द आणि ४१ लढाया; करा कल्पना!! या ४१ लढायांपैकी एकसुद्धा लढाई न हरलेला नरपुंगव होता बाजीराव!! ४१ वेळा अजिंक्य राहिलेल्या आणि तेही आपल्या शिवप्रभूंच्या हिंदवी स्वराज्यासाठी युद्ध करत अजिंक्य राहिलेल्या महारथीचा आपल्याला किती अभिमान वाटला पाहिजे! पण आम्ही करंटे मात्र बाजीरावाला प्रेमवीर म्हणून रंगवतो… नाहीतर मग त्याची जात पाहतो! वस्तुत: महापुरुषांची ‘जात’ नसते पाहायची, तर त्यांनी जनसामान्यांच्या मनामनात पेटवलेली अभिमानाची ‘वात’ आणि त्यायोगे सबंध समाजाने टाकलेली ‘कात’ पाहायची असते. हे आपण जेव्हा शिकू तेव्हाच इतिहास नावाचा खजिना आपल्या खर्‍या स्वरूपात खुला होतो. उदाहरणार्थ – ब्रिटिश फिल्डमार्शल Bernard Montgomery याने आपल्या History of Warfare ग्रंथात बाजीरावाने लढलेल्या पालखेडच्या युद्धाचं वर्णन ‘A masterpiece of strategic mobility’ या गौरवपूर्ण शब्दांत केलंय! मुळात दख्खनचा प्रांतपाल म्हणून आलेल्या आणि नंतर स्वत:चीच असफजाही राजवट सुरू केलेल्या निजामाने मराठ्यांच्या कोल्हापूर आणि सातारा गाद्यांमधील दुफळीचा फायदा घेत १७१९ चा सय्यद बंधूंशी झालेला मराठ्यांचा करार मानायला नकार दिला. वर शहाणा कोल्हापूरचे संभाजी आणि सातारचे शाहू दोघांनाही म्हणू लागला ‘‘तुमच्यातला खरा छत्रपती कोण ते मी ठरवून देतो आणि त्यालाच कराराप्रमाणे चौथाई-सरदेशमुखी घेता येईल.’’ पंतप्रतिनिधींच्या कारस्थानामुळे कोल्हापूरचे संभाजी निजामाला सामील झालेले. महाराष्ट्राला लागलेला दुहीचा शाप, दुसरे काय! पण शाहूंनी मात्र या अपमानास्पद गोष्टींना थारा द्यायचा नाही असं ठरवलं आणि त्यावेळी कर्नाटकच्या मोहिमेवर असलेल्या बाजीरावांना पाचारण केलं. या काळात निजाम स्वत: ऐवजखानासोबत पुणे जिल्ह्यात धुमाकूळ घालत होता, त्याचा सरदार तुर्कताजखान नाशिक व संगमनेर भागात धुडगूस घालत होता आणि रंभाजी निंबाळकर सातार्‍यावर बरसत होता. स्वराज्यावर असं चहूबाजूंनी संकट आलेलं असताना राऊंनी एक अनोखाच निर्णय घेतला. १७२७ च्या दसर्‍याला त्यांनी जे सीमोल्लंघन केलं ते विद्युतवेगाने थेट औरंगाबादच्या दिशेने आणि काही समजायच्या आतच गोदावरीपल्याडच्या निजामी प्रांताचा पार चुथडा करून टाकला. गडबडून गेलेला निजाम सारे सोडून बाजीरावांच्या मागे! बाजीराव मात्र वायुवेगाने हालचाली करत संचार करत होते. वाटेत लागणारा निजामाचा सर्व मुलूख फस्त करत होते. बाजीरावांचा रोख पाहून निजामाला वाटले की, ते बुर्‍हाणपूरवर हल्ला करणार. येडा सगळी तयारी करून बसला, तर बाजीराव त्याला वाईट चकवा देत पार भरूचला उगवले!! वर अफवा पसरवून दिल्या की, निजामशी हातमिळवणी करून मी गुजरातवर आक्रमण करतोय. निजामाशी उभा दावा असलेला अलिमोहनचा सुभेदार सरबुलंदखान हबकला, तर बाजीरावांनी त्याला अभय दिल्याचे नाटक केले. कशात काही नसताना निजाम हकनाक बदनाम झाला. तळतळून त्याने पुणे प्रांत बेचिराख करून टाकला. संभाजींना छत्रपती घोषित केले. हेतू केवळ एकच की, बाजीराव खुल्या मैदानात यावेत. कारण निजामाचा सगळा भर तोफखान्यावर. त्याच्या वेगाला मर्यादा. बाजीराव सडे स्वारी करणारे, मिळेल ती चटणी-भाकर खाणारे आणि परमुलूख लुटून रसद मिळवणारे. त्यामुळे त्यांच्या हालचाली जलद! ते कशाला निजामाला भीक घालताहेत? उलट निजाम पुण्यावर आहे म्हटल्यावर बाजीराव थेट औरंगाबादच्या दिशेने निघाले. पन्नाशी उलटलेला पाताळयंत्री निजाम दुसर्‍यांदा अवघ्या पंचविशीतल्या राऊस्वामींच्या डावाला बळी पडला! आपला सारा तोफखाना मागे नगरलाच ठेवण्याशिवाय त्याला गत्यंतरच उरले नाही. तसाच औरंगाबादच्या दिशेने धावला! नियती खळखळून हसली असेल त्यावेळी!! २५ फेब्रुवारी १७२८. अतिप्रचंड सैन्य घेऊन आलेल्या निजामाने अवघ्या पंचवीस सहस्र सैन्यासोबत लढणार्‍या पंचविशीतल्या तरुण पोरासमोर बिनशर्त शरणागती पत्करली. बाजीरावांनी मेहेरबानी करून अत्यंत अपमानास्पद अवस्थेत जायला वाट करून दिली त्याला. पुढे ६ मार्चला मुंगी-पैठणच्या शमानुसार त्याला मराठ्यांची चौथाई-सरदेशमुखी तर परत द्यावीच लागली, शिवाय मान तुकवून शाहूंनाच छत्रपती म्हणून स्वीकारावे लागले!! चातुर्याने हालचाली केल्या तर आपले कमीतकमी नुकसान करून रणमैदानात काय काय चमत्कार करून दाखवता येतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही पालखेडची न झालेली लढाई!! शिवरायांच्या युद्धनीतीचा विकास या हालचालींमध्ये दिसून येतो. बाजीरावांनी या युद्धाचे ठिकाणही स्वत:च ठरवले, वेळही स्वत:च ठरवली आणि कावेबाज म्हणून समजल्या गेलेला निजामाला आपल्या तालावर अक्षरश: हवे तसे नाचवले! याच मोहिमेने बाजीरावांचा आणि मराठेशाहीचा डंका सर्वत्र वाजण्यास सुरुवात झाली. लेखक ---- ऍड. विक्रम श्रीराम एडके !!!! बाजीराव पेशव्यांना मानाचा मुजरा !!!! भन्साळीला प्रमोट करण्याऐवजी हे प्रमोट करू.प्रबोधन तरी होईल!
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Mon, 11/30/2015 - 16:05 नवीन
____/\____ समीरभाऊ, उत्तम असे लेखन प्रतिसादातून शेअर केल्याबद्दल धन्यवाद! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीर_happy go lucky
म
मित्रहो गुरुवार, 12/03/2015 - 12:03 नवीन
प्रतिसाद प्रचंड आवडला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीर_happy go lucky
व
वेल्लाभट Mon, 12/07/2015 - 12:38 नवीन
अ फ ला तू न! आपण (इन जनरल) करंटेच की आपल्याला बाजीरावांबद्दल अभिमान सोडा, पुरेशी माहितीही नाही. आणि आपल्याच माणसांनी आपल्याच माणसांचे पाय कसे ओढावेत याचं उदाहरण म्हणजे बाजीराव पेशवे. आज कदाचित भारत एक वेगळा काळ बघत असता; जर बाजीराव पेशवे आणिक काही वर्ष जगले असते. असो. तुमच्या प्रतिसादाबद्दल तुमचे अनेक अनेक आभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीर_happy go lucky
य
याॅर्कर Sat, 11/28/2015 - 16:28 नवीन
यानिमित्ताने आज हा मस्तानीपल्याडचा बाजीराव आठवूया. अभिमानाने फुलून जाऊया!!!! That's Great
  • Log in or register to post comments
ह
हरीहर Sat, 11/28/2015 - 18:16 नवीन
संजय भन्साळी सारख्या उथळ माणसावरून सुरु झालेली पण जाणकारांच्या प्रतिसादांमुळे उत्तम दर्जेदार चर्चा आवडली
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Sun, 11/29/2015 - 07:26 नवीन
बाजीरावांचे मोठेपण म्हणण्यापेक्षा एकंदरीतच पेशव्यांचे मोठेपण हे दुर्लक्षितच राहिले. तब्बल १५० वर्ष राज्य करणार्‍या आणि वेळोवेळी ते वाढवणार्‍याबद्दल मराठी जनामध्ये कृतड्ञना तर सोडाच कधी कधी विखारही जाणवतो. पेशव्यांचे नेमके मोठेपण काय होते याचा उहापोह कधीतरी नक्की करु या. मराठा प्रेमी, द्वारकानाथ
  • Log in or register to post comments
प
पालीचा खंडोबा १ Mon, 11/30/2015 - 09:33 नवीन
दिल्लीचा वजीर "मोहम्मद खान बंगेश" छत्रसाल बुंदेल्यावर चालून आला. तेव्हा त्याच्या समोर छत्रसालला शरणागती पत्करावी लागली. बंगेश हा औरंगजेबाच्या हाताखाली शिकलेला असल्याने शिस्त व चिकाटी हे गुण त्यात पुरेपूर उतरले होते. त्याने ८० वर्षांच्या छत्रसालला छावणीत बंदिस्त केले. मात्र छत्रसाल बुंदेला बंगेशचे बारसे जेवला होता, आपण शरण आलोय असे भासवून त्याने हेरांमार्फत बाजीरावाला एक पत्र पाठवले. कारण दिल्लीला ताळ्यावर आणेल असा तोच एकच परमप्रतापी पुरुष भारतात होता. "जग द्वै उपजे ब्राह्मण, भृगु औ बाजीराव। उन ढाई रजपुतियां, इन ढाई तुरकाव॥" - याचा अर्थ जगात २ ब्राह्मण नावाजले गेले. एक परशुराम ज्याने - उन्मत्त क्षत्रिय सत्ताधीशांना बुडविले, तर दुसरा बाजीराव पेशवा ज्याने तुर्कांची तीच स्थिती केली. याच पत्रात त्याने "जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज॥ बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज॥ असा "गजांतमोक्षाचा" हवाला देऊन बाजीरावाकडे मदतीची याचना केली. पत्र मिळाल्यावर टाकोटाक ३५-४० हजारांची फ़ौज घेउन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालून गेला. ही हालचाल इतकी त्वरेने केली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला काहीच समजले नाहि. बेसावध बंगेश एका गढीत अडकला. बाजीरावाच्या झंजावातापुढे मोगल हैराण झाले. या मदतीने खुश होउन छत्रसालने वार्षिक बत्तीस लाखाचे उत्पन्न असलेला मुलूख बाजीरावास नजर केला. इतकेच नव्हे तर आपल्या अनेक उपपत्नींपैकी एकीची मुलगी "मस्तानी" बाजीरावास दिली[ संदर्भ हवा ]. बुंदेल्यांचे व मराठ्यांचे रक्तसंबध जुळावेत असा यामागचा हेतू असावा.. या शिवाय बाजीरावास "काशीबाई" ही प्रथम पत्नी होतीच. काशीबाईपासून बाजीरावास रामचंद्र ऊर्फ रघुनाथराव पेशवा, जनार्दन व बाळाजी ऊर्फ नाना पेशवा असे ३, तर मस्तानीकडून समशेरबहाद्दर ऊर्फ कृष्णराव असे एकूण ४ पुत्र झाले. कर्मठ ब्राह्मणांनी मस्तानी मुसलमान असल्याने बाजीरावावर बहिष्कार घातला होता, पण बाजीरावाचा दराराच जबर होता, त्याने कोणालाच जुमानले नाही. मस्तानीकरीता शनिवारवाड्यातच महाल बांधून घेतला होता. चिमाजी अप्पा हा बाजीरावाचा धाकटा भाऊ. याने देखील कोकण किनार्‍यावर मराठी सत्तेचा भगवा फडकवत ठेवला. बाजीरावाला शोभेल असाच त्याचा हा धाकटा भाऊ होता. बाजीरावाने दिल्लीस आणि चिमाजीने पोर्तुगीजांना त्यांची जागा दाखवून दिली. या लढाईत चिमाजीने पोर्तुगीजांकडून ७ शहरे, ४ बंदरे, २ लढाऊ टेकड्या आणि ३४० गावे जिंकून घेतल्याचा उल्लेख मिळतो. वसईची लढाई ही चिमाजीला कीर्तीच्या अत्युच्च शिखरावर घेऊन गेली. त्याची जाणीव ठेवून चिमाजीने वसईजवळच "वज्रेश्वरी" देवीचे सुंदर मंदिर बांधले. बाजीराव आणि चिमाजीने खरेच मराठी सत्तेचा दबदबा दख्खन पासून रुमशेपावतो पसरवला. मरहट्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडून गेली. २७ फेब्रुवारी १७४० रोजी नासिरजंग विरुद्ध लढाई जिंकून मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण हे बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून, नर्मदा तीरावर रावेरखेडी या गावी विषमज्वराने २८ एप्रिल १७४०(वैशाख शुद्ध शके १६६२) रोजी पहाटे थोरले बाजीराव वारले. बाजीराव हे ६ फूट उंच होते, असा उल्लेख आहे. उंची बरोबरच त्यांचे हातही बरेच लांब होते, भक्कम पिळदार शरीरयष्टी, तांबूस गौरवर्ण, निकोप प्रकृती, कोणीहि मोहित व्हाव असा चेहरा, तेजस्वी कांती, न्यायनिष्ठुर स्वभाव, असे उमदे व्यक्तिमत्व असल्याने कोणावरही त्यांची सहज छाप पडे. भपकेबाज पोशाखाचा त्यांना तिटकारा होता, स्वत: बाजीराव पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे वापरीत. स्वत:ची कामे शक्यतो स्वत: करण्यावर त्यांचा भर होता, नोकराशिवाय त्यांचे अडत नसे. त्यांचे खाजगी ४ घोडे होते - निळा, गंगा, सारंगा आणि अबलख. ते त्यांचे दाणावैरण पाणी स्वत: बघत. खोटेपणा, अन्याय, ऐषाराम त्यांना अजिबात खपत नसे. उभ सैन्य त्यांच्या करड्या शिस्तीत तयार झा्ले होते. थोरले बाजीराव हे अपराजित सेनापती होते.
  • Log in or register to post comments
ट
टुकुल Mon, 11/30/2015 - 11:46 नवीन
सुंदर माहीती..धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पालीचा खंडोबा १
अ
अभ्या.. Mon, 11/30/2015 - 15:51 नवीन
तुम्ही त्या नितीन बानगुडे पाटलांसारखे बाजीचरित्रावर कार्यक्रम करायचा का विचार करत नाहीत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पालीचा खंडोबा १
म
मना सज्जना Mon, 11/30/2015 - 15:49 नवीन
उभ सैन्य त्यांच्या करड्या शिस्तीत तयार झा्ले होते. थोरले बाजीराव हे अपराजित सेनापती होते.
  • Log in or register to post comments
र
रुपी Wed, 12/02/2015 - 01:45 नवीन
प्रतिसादांतील चर्चेतून छा माहिती मिळत आहे!
  • Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर गुरुवार, 12/03/2015 - 06:44 नवीन
आपल्या 20 वर्षीच्या कारर्किदित एकही लढाई न हारलेले अपराजित याेद्धा थोरले बाजीराव पेशवे त्यांच्या पराक्रमाने चर्चिले न जाता मस्तानीमुळे चर्चिले जातात हे थोरले बाजीरावांचे तसेच महाराष्ट्राचे दुर्देव आहे. त्यांचे मध्यप्रदेशात रावेरखेडी येथे असणारे समाधी स्थळ बर्याच जणांना माहितही नाही. मराठ्यांचे साम्राज्य दक्षिण ते दिल्लीपर्यंत पसरविणारे थोरले बाजीराव पेशव्यांचे नाव आदराने घ्यावे लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा पाया रचला आणि बाजीरावांनी त्यावर कळस चढविला असे म्हटले तर अतिशयोक्ति होणार नाही. हिंदू जोधाबाईला पत्नी करून घेणारा सम्राट अकबर सर्वत्र चर्चिला जातो, पण मुस्लिम मस्तानीला पत्नी म्हणून घरी आणणारे थोरले बाजीराव पेशवे मात्र उपेक्षित ठरविले जातात. बाजीरावाची महाराष्ट्रात उपेक्षा झाली तरी जगाच्या इतिहासात मात्र ते उपेक्षित राहिले नाहीत. "अ कन्साईज हिस्ट्री ऑफ वॉरफेअर" या युद्धशास्त्रावर आधारीत ग्रंथात फिल्ड मार्शल मॉंटगोमरी यांनी थोरले बाजीराव पेशवेंचा गौरव केला.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Fri, 12/04/2015 - 05:58 नवीन
बाजीरावाची महाराष्ट्रात उपेक्षा झाली तरी जगाच्या इतिहासात मात्र ते उपेक्षित राहिले नाहीत. "अ कन्साईज हिस्ट्री ऑफ वॉरफेअर" या युद्धशास्त्रावर आधारीत ग्रंथात फिल्ड मार्शल मॉंटगोमरी यांनी थोरले बाजीराव पेशवेंचा गौरव केला.
हेला काका - बाजीरावाची महती पटण्यासाठी तुम्हाला साहेबांचा शिक्का लागावा ह्या सारखे दुर्दैव नाही. आणि मॉंटगोमरी साहेबांची बर्‍याच वेळेला खिल्लीच उडवली जाते एक जनरल म्हणुन हे वेगळेच.
जाता मस्तानीमुळे चर्चिले जातात हे थोरले बाजीरावांचे तसेच महाराष्ट्राचे दुर्देव आहे
ह्यात दुर्दैव काय आहे? कदाचित बाजीरावांना सुद्धा युद्धा पेक्षा मस्तानी प्रकरण भारी पडले असावे. युद्ध करणे, अंगवस्त्र ठेवणे हे त्याकाळी कॉमन होते, पण बाजीरावांनी एकदम बंडखोर पावित्रा घेतला त्यामुळे त्याचीच चर्चा जास्त होणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
व
विलासराव Fri, 12/04/2015 - 08:23 नवीन
मी नर्मदा परिक्रमेत रावेरखेड़ीला भेट देऊन बाजीरावांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. तिथे त्यांचा "लू" ने मृत्यु झाल्याचे वाचल्याचे आठवतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
उ
उगा काहितरीच गुरुवार, 12/03/2015 - 09:22 नवीन
लेख व जवळजवळ सगळ्याच प्रतिक्रिया आवडल्या .
  • Log in or register to post comments
अ
अजया गुरुवार, 12/03/2015 - 09:31 नवीन
प्रतिसादांसह लेख आवडला.
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 12/03/2015 - 11:26 नवीन
लेख आणि बरेच प्रतिसाद आवडले.
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ गुरुवार, 12/03/2015 - 13:36 नवीन
ईथले प्रतिसाद कायाआप्पा वर फिरतात की ऊलटे ??? कुणी प्रकाश टा़कू शकेल का??
  • Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर Fri, 12/04/2015 - 07:32 नवीन
@ प्रसाद यात साहेबाचा शिक्का घेण्याची काय गरज? एवढे पराक्रमी, लढाईत स्वत: लढणारे, शिवाजी महारांजाचे साम्राज्य दिल्लीपर्यंत पसरविणारे, एकही लढाई न हारलेले पहिले बाजीराव फक्त मस्तानी मुळे आठवतात हे दुर्देव आहे. कर्मठ ब्राह्मणांनी मस्तानीमुळेे बाजीरावांवर बहिष्कार घातला होता, पण बाजीरावाचा दराराच जबर होता, त्यांनी कोणालाच जुमानले नाही. मस्तानीकरीता शनिवारवाड्यातच महाल बांधून घेतला होता. असा बंडखोरपणा केला नसता तर मस्तानीचा त्याग करावा लागला असता.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 12/05/2015 - 08:58 नवीन
कर्मठ ब्राह्मणांनी मस्तानीमुळेे बाजीरावांवर बहिष्कार घातला होता
हे काही एकमेव कारण होते असे वाटत नाही. अनेक बंद केलेले कुलाचार, बंद केलेले दान-धर्म ह्यांचा देखील रोष वाढण्यामागे बराच हातभार होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
अ
अनिरुद्ध.वैद्य Mon, 12/07/2015 - 11:37 नवीन
हे प्रकरण मस्तानीमुळे नाही उद्भवले. मुख्य कारण बाजीरावानंतर मस्तानीच्या मुलांना राज्य मिळू नये हे होते. हे सगळे साधारण १७३६ नंतर उद्भवले जेव्हा राघोबादादा आणि कृष्णसिंह ( होय, बाजीराव मस्तानीच्या मुलाचे नाव कृष्णसिंह होते ;) समशेर बहादूर नंतर मिळालेले) मुंजीस योग्य वयात आले. मुंज होऊन ते आपसूकच भट घराण्यात दाखल झाले असते आणि सत्तेत हिस्सेकरी वाढले असते. कर्मठ ब्राम्हणांना हाताशी धरणारे शनिवारवाड्यातीलच राजकारण होते. एकदा का मुंजीचा अधिकार नाकारला की आपसूकच काटा दूर होऊन काशीबाईंच्या मुलांचा मार्ग प्रशस्त झाला असता. बाकि, रूढी परंपरा न पाळणे आदींविषयी खुद्द शाहू महाराजांनीच पेशव्याच्या कुटुंबियांना 'समजावून' होते की राउंना न दुखवणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
ह
हेमंत लाटकर Mon, 12/07/2015 - 12:38 नवीन
मुख्य कारण बाजीरावानंतर मस्तानीच्या मुलाला राज्य मिळू नये.
हे कारण नाही. त्याकाळात वडिलानंतर पद मोठ्या मुलाला देण्याची पद्धत होती. नानासाहेब हे मोठे असल्यामुळे तसेच लायक असल्यामुळे पेशवेपद त्यांनाच मिळाले असते. खरे कारण मस्तानी मुस्लिम होती हेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
म
मालोजीराव Mon, 12/07/2015 - 12:59 नवीन
त्याकाळात वडिलानंतर पद मोठ्या मुलाला देण्याची पद्धत होती. नानासाहेब हे मोठे असल्यामुळे तसेच लायक असल्यामुळे पेशवेपद त्यांनाच मिळाले असते.
नानासाहेबांपर्यंत पेशवा पद वंशपरंपरागत नव्हते, त्यांच्यापासून ते झाले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा