सिंहलव्दीपाची सहल : ०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================सिगिरिया किंवा सिंहगिरिया (Lion Rock)
(मागील भागावरून पुढे चालू)..."सिंहप्रस्तराची अर्धीच उंची गाठली आहे आणि अजून बरेच काही पाहायचे बाकी आहे" याची जाणीव मार्गदर्शक करून देतो आणि गुहांतून खाली उतरून आपण दर्पणभित्तिकेच्या संरक्षणात पुढचे मार्गक्रमण सुरू करतो.
दर्पणभित्तिकेतला मार्ग संपला की तो प्रस्तराला वळसा घालून उजवीकडे वळतो. तेथून परत उभ्या चढाच्या पायर्यांचा टप्पा सुरू होतो. हा तुलनेने लहानसा टप्पा आपल्याला प्रस्तराच्या उत्तरकड्यावरील अर्ध्या उंचीवर असलेल्या एका पठारावर घेऊन जातो. या पायर्यांच्या डावीकडे, कड्याच्या अगदी टोकापर्यंत पोहोचलेल्या, एका उतारावरील उद्यानाचे अवशेष दिसतात.
पायर्या संपून या मध्यम आकाराच्या सिंहपठारावर पोहोचल्यावर समोर एक उंच भिंत येते. तिला वळसा घालून पुढे गेल्यावर सिगिरियातिल सर्वात अचाट आकर्षण, सिंहपायर्या... ज्याच्यामुळे या राजधानीला सिगिरिया (सिंहगिरिया) हे नाव पडले आहे ते... अचानक समोर येते...
सिगिरिया : प्रस्तराच्या उत्तरेकडून विहंगम दर्शन : (चित्राच्या मध्यावर उजवीकडे) पठारावर नेणार्या पायर्या, खालच्या उजव्या कोपर्यात उतारावरच्या उद्यानाचे अवशेष, सिंहपठार, सिंहपायर्या, तेथून प्रस्तरमाथ्यावर नेणार्या पायर्या आणि प्रस्तरमाथ्यावरचे आकाशमहालाचे अवशेष.
(श्रीलंकेच्या मध्यवर्ती सांस्कृतिक कोशाच्या प्रकाशनातून साभार)
सिंहपायर्या (Lion Staircase)
प्रस्तरमाथ्यावरील राजवाड्याकडे नेणार्या या पायर्यांना सिंहपायर्या म्हणतात कारण पूर्वी त्यांच्याभोवती, बसलेल्या सिंहाचे शीर व शरीराच्या पुढच्या काही भागाचे भव्य शिल्प होते. आताच्या अवशेषांवरून ही मूर्ती ३५ मीटर (हल्लीच्या १२-१३ मजल्यांच्या इमारतीइतकी) उंच, २१ मीटर रुंद व पुढून मागच्या कड्यापर्यंत ११ मीटर लांब होती असा अंदाज आहे. या शिल्पाच्या आत सिंहद्वाराचे व्यवस्थापन व संरक्षण करणारे कार्यालयही होते. सिंहपायर्यांत अनेक फसवी दारे होती व ती वेड्यावाकड्या जिन्यांच्या साहाय्याने मूर्तीतल्या वेगेवेगळ्या खोल्यांकडे व इतर बाह्य दारांकडे घेऊन जात असत. पायर्यांच्या तळाला चंद्रशीला आहे. काश्यपाच्या पराभवानंतर पाचव्या शतकाच्या शेवटी दुरवस्थेत गेलेले हे स्थापत्य नवव्या शतकापर्यंत (३०० वर्षांनंतरही) उत्तम अवस्थेत होते असे दर्पणभित्तिकेवरील एका काव्यात केलेल्या त्याच्या वर्णनावरून समजते. प्राचीन स्थापत्यकारांनी १५०० वर्षांपूर्वी बनवलेल्या या शिल्पाची त्यानंतर मात्र बरीच हानी झालेली आहे. सद्या त्या सिंहाचे अजस्र पंजे आणि पायर्यांच्या बाजूचे वीटकाम इतकेच अवशेष उरलेले आहेत. असे असले तरी त्या उरलेल्या अवशेषांवरून मूळ मूर्तीच्या भव्यतेचा सहज अंदाज येतो आणि थक्क व्हायला होते...
सिगिरिया : (त्यांच्या भव्यतेची कल्पना येण्यासाठी मानवाकृतींबरोबर) सिंहपायर्या
सिगिरिया : (त्यांच्या भव्यतेची कल्पना येण्यासाठी मानवाकृतींबरोबर) सिंहाचा उजवा पंजा
सिगिरिया : सिंहद्वाराच्या सद्याच्या अवशेषांच्या आधारे बनवलेले कल्पनाचित्र (जालावरून साभार)
सिगिरिया : सिंहप्रस्तरावरची चढाई (जालावरून साभार)
सिगिरिया : सिंहप्रस्तरावर चढाई करताना दिसणारे सिंहपठाराचे दृश्य
आकाशमहाल (सिंहप्रस्तरमाथ्यावरचा राजवाडा)
सिगिरिया शहराच्या मध्यबिंदूवर असलेल्या सिंहप्रस्तरमाथ्यावर उभे राहण्याचा अनुभव केवळ अवर्णनीय असतो. तिथल्या भन्नाट गार वार्यात उभे राहून आजूबाजूच्या हिरव्यागार परिसरावर नजर फिरवताना जणू हे सगळे आपलेच राज्य आहे असा एखादा विक्षिप्त विचारही मनाला शिवून जातो ! तळापासून २०० मीटर व समुद्रसपाटीपेक्षा ३६० मीटर उंचीवर असलेल्या या राजवाड्याला सार्थपणे आकाशमहाल असेही म्हणतात. आकाशमहालाचे अवशेष जरी मुख्यतः चौथर्यांच्या रूपात असले तरी हे चौथरे अजूनही उत्तम अवस्थेत आहेत व त्यांच्यावरून राजवाड्याच्या इमारतींच्या भव्यतेची व आजूबाजूच्या उद्यानांची कल्पना करता येते. हे श्रीलंकेतील आज शिल्लक असलेल्या प्राचीन राजवाड्यांपैकी सर्वात जुने व सर्वात जास्त चांगल्या अवस्थेत असलेले अवशेष आहेत. हे अवशेष असेच दर्शवितात की स्थापत्यकारांनी अंदाजे १.५ हेक्टर (३.७ एकर) क्षेत्रफळापैकी सर्व दिशांनी प्रस्तरमाथ्याचा कड्याच्या टोकापर्यंतचा वापरण्याजोगा प्रत्येक चौरस सेंटिमीटर वापरलेला आहे. (हे पाहून आजच्या आधुनिक शहरी स्थापत्यकारांचीही मान खाली जावी !) खालचे चित्र मी काय म्हणतो आहे याची चांगली कल्पना देईल...
सिगिरिया : प्रस्तराच्या दक्षिणेकडून विहंगम दर्शन : सिंहप्रस्तरमाथ्यावरचे अवशेष
(श्रीलंकेच्या मध्यवर्ती सांस्कृतिक कोशाच्या प्रकाशनातून साभार)
सिंहप्रस्तरमाथ्यावरचे आकाशमहालाचे अवशेष ०१
सिंहप्रस्तरमाथ्यावरचे आकाशमहालाचे अवशेष ०२
सिंहप्रस्तरमाथ्यावरचा तलाव (श्रीलंकेच्या मध्यवर्ती सांस्कृतिक कोशाच्या प्रकाशनातून साभार)
राजदरबार / धर्मसभागार (Assembly Hall)
सिंहप्रस्तरावरून उतरून खाली आल्यावर त्याच्या उतारावरच कातळात कोरून काढलेली सभागाराची जागा आहे. ही सर्व जागा आणि तेथिल आसन दोन्हीही एकाच कातळात कोरलेले आहे. ही जागा राजा काश्यपाच्या कारकीर्दीत राजदरबारासाठी आणि नंतर धार्मिक सभांसाठी वापरली जात असे. येथे जाण्यासाठी, सिंहप्रस्तराकडून जाणारा राजा व मंत्र्यांकरिता एक आणि इतरांना जाण्यासाठी मुख्य प्रवेशद्वाराकडून जाणारा एक, असे दोन मार्ग आहेत. कातळात कोरलेले खड्डे पाहून सभागाराचे छत लाकडी खांबांवर होते हे समजते. सभागाराच्या व आसनाच्या कोरीवकामातील सुबकता, कोरीवकाम करताना काही कोनांना दिलेली गोलाई आणि इतर नक्षीदार कलाकुसर पाहता हे सगळे काम कसबी कलाकारांनी केले असावे हे दिसून येते...
सिगीरिया : सभागार
समुपदेशकक्ष / साधनागळ (Discussion Room)
राजदरबाराच्या बाजूलाच कातळात एक छोट्या घळीसारखा भाग कोरलेला आहे. घळीच्या एकसंध कातळात एक दगडी आसन बनवलेले आहे. राजा काश्यप ही जागा राजदरबाराच्या अगोदर अथवा नंतर, मंत्री व इतर वरीष्ठ लोकांशी, खास सल्लामसलत करण्यासाठी वापरत असे. काश्यपाच्या अगोदरच्या व नंतरच्या काळात ती धार्मिक साधनेसाठी वापरली जात असे…
सिगिरिया : साधनाघळ
भुजंगफणाघळ (Cobra Hood Rock)
समुपदेशकक्षापासून थोड्याच अंतरावर असलेल्या या प्रस्तररचनेचे हे नाव तिच्या नागाच्या उभारलेल्या फण्यासारख्या आकारामुळे पडले आहे. फण्याच्या कोरीव आकाराचा काही भाग नैसर्गिक आघातांनी तुटून पडला आहे. या फण्याखालच्या भागात एक नैसर्गिक घळ आहे. येथील शिलालेखावरून हे ठिकाण काश्यपकालाच्या अगोदरपासून बौद्धभिक्कूंच्या वापरात होते...
सिगिरिया : भुजंगफणाघळ ०१
सिगिरिया : भुजंगफणाघळ ०२
सिगिरिया : भुजंगफणाघळीच्या भिंतीवरची नक्षी
Book traversal links for सिंहलव्दीपाची सहल : ०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments