मरणकल्पना, आत्मा, पुनर्जन्म
.........
सजीव येई जन्मासी ।अटळ असे मृत्यू त्यासी ।जाणीव प्रत्येक व्यक्तीसी ।जी का असते सज्ञानी ॥१॥
अनुभव आणि निरीक्षण । परस्पर संवाद , वाचन । निष्कर्ष तर्काने शोधून । जाणीव विकसित होतसे ॥२॥
सजीवासी मृत्यू अटळ । प्राण्यांना नकळे सकळ । सज्ञानी मानव केवळ । या सत्यासी जाणतसे ॥३॥
व्याघ्र-सिंह- ससे-भेकरे । मेंढ्या-बकर्या-गाई-गुरे । मरणाधीन असती सारे । परि ते सत्य न जाणती ॥४ ॥
पुराणांतरी सात जण । अश्वत्थामा-बळी-बिभीषण । परशुराम-व्यास-हनुमान । तैसा कृप पैं सातवा ॥५॥
यांसी म्हणितले चिरंजीव ।कल्पना केवळ मानीव । त्या त्या काळी सजीव ।ते असतील सातही ॥६॥
परंतु काळीं सांप्रत । या सातांतील जिवंत । कोणीही नसे निश्चित । वैज्ञानिक सत्य हे ॥७॥
देव मानिले अजरामर । नाही मरण नसे आजार । स्वर्गीं तयांचा संचार । सारे कल्पित डोलारे ॥८॥
तैसेचि ते अमृतसत्त्व। नाही तयासी अस्तित्व । मानव इच्छिती अमरत्व । मानसिकता ऐसी दिसे ॥९॥
मरण अटळ सर्वां पटे । परी अंतरी भीती दाटे । मरणासंबंधी शब्द वाटे । अशुभ, अभद्र, अमंगळ ॥१०॥
मयत-प्रेत-मढे- स्मशान । चिता-मर्तिक आणि सरण । तिरडी-गोवर्या-मसण । ऐशा शब्दां घाबरती ॥११॥
दशक्रिया-अकरावे-बारावे । शब्द अपवित्र न उच्चारावे । शुभकार्यीं अवश्य टाळावे । पाळिती संकेत अलिखित॥१२॥
भान औचित्याचे असावे । भय शब्दांचे नसावे । कोठे काहीही बोलावे । ऐसा अनर्थ न घ्यावा ॥१३ ॥
घडण्याची जें निश्चिती । टाळणे न कोणा हाती । तयाविषयीं ऐसी भीती । वाटे कोण्या कारणे ?॥१४॥
विवेकी व्यक्तीस ऐसे भय ।अनावश्यक अशोभनीय । मरणी भयदायक काय ।घटना एक नैसर्गिक ॥१५ ॥
वेदकाळी वदले चार्वाक । मरणीं गूढ न काही एक । जीवनी भोगावे सुख । आनंदाने मनुजाने ॥१६॥
यद्यपि मरण नैसर्गिक । जगावे काळ अधिकाधिक । प्राणिमात्रासी प्रत्येक । स्वाभाविक ऊर्मी ही ॥१७ ॥
म्हणौनि मृत्यू अप्रिय । टाळण्या सजीव सक्रिय । परंतु मानवा मरणभय । कदापीही नसावे ॥१८॥
प्रत्येकासी येते मरण । याचे जैविक कारण । जीवशास्त्रज्ञां उमगले जाण । सर्वमान्य असे हे ॥१९ ॥
टेलोमियर-जिनोम-जीन । गुणसूत्रे पेशी विभाजन । जिनोम लांबी त्रुटीकरण । प्रकरण ऐसे बिकट हे ॥२० ॥
द्यावे इथेच सोडोन । परी ऐसे जाणोन । नैसर्गिक मरणाचे कारण । ज्ञात आता मानवा ॥२१ ॥
अटळ मरण नि:संदेह । कांही न उरे जाता देह । जगाचा ऐसा चिर विरह ।असह्य वाटे मनुजासी ॥२२॥
यास्तव आत्मा असे अमर । ऐसा रचिला विचार । नाशवंत केवळ शरीर ।आत्मा जन्मे पुन:पुन्हा ॥२३॥
आत्मयासी शस्त्र छेदीना ।आत्मयासी अग्नी जाळीना । आत्मयासी पाणी भिजवीना । ऐसी ख्याती आत्मयाची ॥२४॥
आत्मा नाही देहीं कोठे । आत्म्याचे अस्तित्वचि खोटे । परी श्रद्धाळूंसी सारे पटे । कारण अमरत्व इच्छिती ॥२५ ॥
शरीर म्हणजे मी नोहे । ओळख माझी आत्मा आहे । तो अमर म्हणौनि पाहे । मीही अमर जाहलो ॥२६॥
विचार करिता खोटे सारे । श्रद्धावंता वाटे खरे। जगी वेगे असत्य पसरे । सत्या लागे विलंब ॥२७॥
संतवाणी- कथा -कीर्तने । गोष्टी-गाणी- आख्याने । नाटके-चित्रपट-प्रवचने । अनेक माध्यमे प्रभावी ॥२८॥
यांद्वारे पुनर्जन्म संकल्पना ।सातत्याने जनमना--। वरती बिंबविली भावना । मनी ठसोनी दृढ झाली ॥२९॥
असोनी असत्य आघवे। सश्रद्ध मानिती भावे । शंका काही न उद्भवे । सत्यासत्याविषयींची ।।३० ॥
आहे का जर पुनर्जन्म । निश्चित होता गतजन्म । त्या जन्मीचे नाम-धाम । स्मरते काय कोणासी ॥३१॥
आपण प्रयत्न करावे । गतजन्मीचे काही आठवावे । तैसेचि परिचितां पुसावे । कोणा कांही स्मरते का ॥३२॥
याचे उत्तर प्रामाणिक । नकारार्थी देतील लोक । पुनर्जन्म आहे निरर्थक । ऐसेचि सिद्ध होतसे ॥३३॥
गतजन्मीचे काहीही । आठवते ना कोणाही । पुनर्जन्म कल्पना ही । सत्य कैसी मानावी ? ॥३४॥
अपत्यरूपे माता-पितरे । पुन्हा जन्मासी येती खरे । जनुक-संक्रमण आधारे । मानणे हे शक्य दिसे ॥३५ ॥
परंतु माता-पितयाचा । अर्ध-पुनर्जन्मचि साचा । अपत्यजनुकीं दोघांचा समान वाटा निश्चित ॥३६ ॥
जिवंतपणी माय-तात । अर्धपुनर्जन्म देखतात । अपत्य पाहते प्रत्यक्षात । गतजन्म दोन अर्धेची ॥३७ ॥
शरीरशास्त्रग्रंथी देख । आत्म्याचा ना नामोल्लेख । इंद्रियांचे कार्य हृदयादिक । तयांचे वर्णन परिपूर्ण ॥३८॥
शरीर अंतर्बाह्य अभ्यासिती ।शल्यकर्म यशस्वी करिती । परी आत्म्याचे ना नाम घेती । कधीही देहीं न दिसे तो ॥३९॥
यापरी आत्मा नाही नाही । कोणाच्याही हृदयीं देही । तैं पुनर्जन्म कोण घेई । असत्य पुनर्जन्म संकल्पना ॥४०॥
पहिला तैसाचि शेवटचा । एकचि जन्म प्रत्येकाचा । गतजन्म-पुनर्जन्म कोणाचा । शक्य नसे कालत्रयी ॥४१॥
जाणावे आपण सर्वांनी । शंका असली काही मनीं । विचारे विवर-विवरोनी । निरसन पूर्णत्वे करावे ॥४२॥
असे सत्य वैज्ञानिक । जाणिती मानिती जे विवेक । पूर्वग्रहपीडित भाविक । अज्ञानासी कवटाळिती ॥४३॥
आत्मा-पुनर्जन्म-संचित ।अज्ञान सारे खचित । यास्तव याची संगत । निश्चये आपण सोडावी ॥४४॥
वृथा भीती मरणाची ।काढून टाकावी अंतरीची । अंतिम घटना आयुष्याची । काही न राही नंतर ॥४५॥
अर्चिरादि मार्ग सूर्यलोक । चंद्रलोक-विद्युल्लोक । पितृयान- देवयान -ब्रह्मलोक ।कल्पित सार्या भरार्या ॥४६॥
जाणणे हे आवश्यक । मानव प्रजातीं जन्म एक । लाभला गेला निरर्थक । ऐसे होईल अन्यथा ॥४७॥
...................................................................................
दोन गोष्टींमधला फरक समजला तर विज्ञानातील बुवाबाजी टाळता येईल.+१०० "आम्हाला सगळं खात्रीने माहीत आहे (पक्षी, आम्ही ब्रम्हज्ञानी आहोत)." असा दावा करणारे आस्तिक/नास्तिक आणि धार्मिक/आधुनिक शास्त्रवाले इतके स्वमतांध असतात की दोघांनाही आपण बुवाबाजी करतो आहे हे दिसतच नाही ! :)"वृथा भीती मरणाची । काढून टाकावी अंतरीची ।"हे दुसर्याला सांगणे सोपे आहे. पण, कोणताही (आस्तिक, नास्तिक, अज्ञेयवादी किंवा इतर कोणताही) झेंडा हाती धरलेल्या मानवात जीवनाची आसक्ती नसणे हे अत्यंत अभावानेच दिसते. आपले आयुष्य आनंदाने उपभोगता यावे अशी जन्मभर इच्छा धरणारा मानव त्या आयुष्याचा शेवट आल्यावर... काही सन्माननिय अपवाद वगळता... कावराबावरा होतोच. मानवाला मरण अटळ आहे हे सगळ्यांनाच मान्य असते. पण मृत्युची भिती न बाळगणे बहुसंख्य माणसांच्या ताकदीपलिकडचे असते... ... आणि त्यात तसे फार वाईट काहीच नाही. कारण, "जगण्याची आसक्ती" हे मानवी प्रजातीला आतापर्यंत पृथ्वीवर टिकवून ठेवण्यासाठी एक फार महत्वाचे कारण ठरले आहे. इतर वेळेस वाघ असलेले, पण मरणाच्या भितीने चळचळा कापणारे किंवा मरणाच्या मार्गावर असताना त्या कल्पनेनेच गलितगात्र झालेले, खूप नास्ति़क पाहिले आहेत. :)5)लोकसंख्या वाढत आहे म्हणजेच आत्म्यांची संख्या सुद्धा वाढत आहे.पण आत्म्याचे विभाजन तर होऊ शकत नाही.मग हे वाढीव आत्मे कोठून येत आहेत? म्हणजे 1920 साली भारताची लोकसंख्या 40 कोटी होती म्हणजेच 40 कोटी आत्मे होते, आता ती लोकसंख्या 125 कोटी आहे,म्हणजे मधल्या काळात 85 कोटी नवीन आत्म्यांचं प्रोडक्शन झालं म्हणायचं?हँ, हे एकदम सोप्पाय ! या दुष्ट, क्रूर (आणि बरेच काही असलेल्या) मानवांनी स्वच्छता आणि आरोग्याच्या नावाखाली कीटकनाशके वापरून एकंदर किती कीटक मारले, आधुनिक वैद्यकाच्या नावाखाली अँटिबायोटिक्स वापरून एकंदर किती बॅक्टेरिया मारले आणि शिकारीच्या नावाखाली बंदुका वापरून एकंदर किती प्राणी मारले (आणि किती प्रजाती नामशेष केल्या) याचा हिशेब लावलात तर, गेला बाजार, टोटलमध्ये आत्मे कमी पडणे तर सोडाच, पण कित्ती कित्ती तरी आत्मे रिझर्वमध्ये नव्या जन्माची वाट पहात रांगेत उभे असतील हे नक्की पटेल. ;) =)) =))