Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शब्द का नाहीसे होतात

म
मित्रहो
Fri, 01/08/2016 - 15:35
🗣 68 प्रतिसाद
गाभा माझा एक मित्र डेहराडूनचा आहे, हिंदी साहीत्य वगेरे वाचनाऱ्यांपैकी आहे. पार्टीमधे त्याच्या तोंडून कवि निरज किंवा कवि प्रदीप यांच्या कविता ऐकने म्हणजे एक मेजवाणीच असते. एकदा सहज गप्पा मारीत असताना तो म्हणाला “हमारे भैय्या डेहराडूनमे अध्यापक है.” त्यातला अध्यापक हा शब्द चांगलाच लक्षात राहीला कारण हल्ली हा शब्द कोणी वापरीत नाही. हल्लीच्या टीचर, प्रोफसर च्या जमान्यात कुणी अध्यापक असे म्हणतच नाही. हाच नाही तर असे कितीतरी शब्द जे एकेकाळी वापरात होते ते आज नाहीसे झाले. एका मुलाखतीत प्रसून जोशीने म्हटले की हल्लीच्या वाचकांची शब्दसंपदा कमी झाली आहे. कदाचीत खरे असेल किंवा त्यात इतर भाषेतले शब्द आले असतील. तसाच एक शब्द त्याने पुनर्जीवित केला तो म्हणजे पाठशाला. गेले कित्येक वर्षे हा शब्द वापरात नव्हता तो वापरात आला तो मस्ती की पाठशाला या गाण्यामुळेच. मागे एका कार्यक्रमात संदीप खरे कविता वाचत असताना गवाक्ष हा शब्द आला. त्याने थांबून गवाक्ष म्हणजे खिडकी असे समजावून सांगितले. आज गवाक्षचा अर्थ सांगावा लागतो. माझ्या माहीतीप्रमाणे हा शब्द बोलीभाषेत फारसा नव्हता परंतु पूर्वीच्या कवितांमधे मात्र हा शब्द बऱ्याचदा असायचा. कदाचित वृत्तबंध कवितांमधे मात्रा वगेरेसाठी उपयोगी पडत असावा. आज मात्र त्या शब्दाचा साहीत्यातला वापर कमी झाला आहे. मुक्तछंद कवितांमधे खिडकी हा शब्द वापरणे जास्त सोयीस्कर वाटत असेल किंवा मीटरमधे बसवताना कडकीला खिडकीच जोडने योग्य वाटत असेल. माझी आज ‘कवाड लाव’ म्हणायची. लहाणपणी आम्ही तिच्या कवाड या शब्दाला हसायचो. मोठे झाल्यावर कळले मनाची कवाडे उघडे ठेवा हे म्हणणे कसे काव्यात्मक असते ते. आज मात्र कवाड हा शब्द गावाकडे पण फारसा वापरला जात नाही सारेच दार हाच शब्द वापरतात. आमच्या सारख्या अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेल्यांनी टोकून टोकून लोकांना दार असे म्हणायला भाग पाडले असेल. आजीचा आणखीन एक शब्द म्हणजे कडत. गरम पाण्याला कडत पाणी म्हणायची. आज हा शब्दही लुप्त झाल्यासारखाच आहे. हे फक्त मराठी हिंदीततच होते असे नाही तर इंग्रजीत सुद्धा असे घडते. ‘Thou too Brutus’ असे आजही जरे म्हटले जात असले तरी व्यवहारी असो किंवा साहीत्यिक इंग्रजी दोन्ही मधून ‘Thou’ हा शब्द केंव्हाच लुप्त झालेला आहे. आजच्या कॉर्पोरेट क्षेत्रात वापरल्या जानाऱ्या इंग्रजीवर अमेरीकन भाषेचा इतका प्रभाव आहे की त्यामुळे आज कॉर्पोरेट जगतातून ‘Gentlemen ’ हा शब्दही नाहीसा होतो की काय अशी भिती वाटते. जो तो ‘Guys, Folks’ करीत असतो. शब्द लुप्त का होतात? किंवा विस्मृतीत का जातात? इतर भाषेतले शब्द घेउन भाषा समृद्ध होत जाते किंवा कालाय तस्मै नमः ही जरी ढोबळ कारणे असली तरी मला वाटते प्रत्येक शब्द वापरातून नाहीसा होण्यामागे त्या शब्दाशी संबंधित काही खास कारणे असावीत. जसा प्रत्येक शब्दाच्या उत्पत्तीची काही खास कारणे असतात तशीच त्याच्या नाहीसे होण्यामागेही असावीत. तेंव्हा जाणकारांनी शब्द वापरातून का नाहीसे होतात? खरच काही खास कारणे असतात का? शब्दाचे संदर्भ संपतात का? यावर प्रकाश टाकावा. तसेच अशा विस्मृतीत गेलेल्या किंवा विस्मृतीत जाऊ शकनाऱ्या इतर अनेक शब्दांची उदाहरणे दिली तर उत्तमच. मित्रहो https://mitraho.wordpress.com
वर्गीकरण
भाषा
साहीत्य

प्रतिक्रिया द्या
12997 वाचन

💬 प्रतिसाद (68)
अ
अमित खोजे Fri, 01/08/2016 - 17:08 नवीन
छान लेख. 'कडत' हा शब्द 'कढत' (म्हणजे गरम) आहे असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Fri, 01/08/2016 - 18:27 नवीन
तो शब्द कढत असाच आहे. हल्ली हा शब्द कमी वापरात येतो. हे आणि असे बरेच बोली भाषेतले शब्द प्रमाण भाषा वापरायची म्हणून वापरल्या जात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमित खोजे
श
श्रीरंग_जोशी Fri, 01/08/2016 - 18:40 नवीन
बहुधा त्याचे क्रियापद 'कढवणे' असे असावे. तूप कढवले जाते. धाग्याचा विषय आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मित्रहो
स
स्रुजा Fri, 01/08/2016 - 22:57 नवीन
+१ धाग्याचा विषय छान आहे. कढत शब्द मी वापरते ब्वॉ.. मी गेल्या जमान्यातली आहे की काय मग? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
स
स्रुजा Fri, 01/08/2016 - 22:59 नवीन
बादवे, कढत पेक्षा ही गरम ला समानार्थी "उन" शब्द लुप्त झालाय. उन उन पाणी वगैरे म्हणायचे पूर्वी. अर्थात पुस्तकात च वाचलाय हा शब्द.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
आ
आदूबाळ Mon, 01/11/2016 - 14:27 नवीन
माझी आज्जी "कढत", "ऊन" आणि "गरम" हे तीन्ही शब्द वापरायची. "गरम" ती द्रवपदार्थांसाठी वापरत नसे. उदा० बटाटावडा गरम असू शके, पण पाणी "ऊन" किंवा "कढत" असायचं. त्यातही चहाचं आधण "कढत" असे, आणि आंघोळीचं पाणी "ऊन".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
च
चतुरंग Mon, 01/11/2016 - 15:31 नवीन
माझे आजोबाही आंघोळीच्या पाण्याला "ऊन पाणी" म्हणायचे. माझ्या माहिती प्रमाणे अगदी कडकडीत पाणी असेल तर कढत - यात विसण घालावे लागे, ऊन पाणी म्हणजे सोसवेल इतपत गरम. त्यानंतर कोमट, सोमट, काटामोड अशीही द्रवपदार्थांच्या तपमानाची उतरती भाजणी ऐकली आहे! :) -(बंबातल्या पाण्याने आंघोळ केलेला) रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
म
मित्रहो Sat, 01/09/2016 - 04:36 नवीन
तेल कढवणे चालत आणि कढत पाणी गेल्या जमानातले. फुलराणीतला संवाद आठवला. व्हत हे अशुद्ध तर तुम्हाला नव्हत कसे चालते हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
य
यशोधरा Sat, 01/09/2016 - 05:15 नवीन
पुस्तकी भाषेत नव्हते, नव्हे हे वापरतात अजूनही आणि बोलीभाषेत नव्हतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मित्रहो
म
मित्रहो Sat, 01/09/2016 - 14:30 नवीन
लेखी भाषेत जरी नव्हते वापरत असले तर साधारण शहरी माणसे बोलीभाषेत नव्हत वापरतात पण व्हत वापरत नाही तर होत असे म्हणतात. हाच संदर्भ घेउन हे वाक्य नाटकात येत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
प
पद्मावति Fri, 01/08/2016 - 18:15 नवीन
खूप मस्तं विषय आहे. छान मांडलाय. इंग्रजीत जसं आय बेग युवर पार्डन हा वाक्प्रचार आजकाल खूप कमी ऐकायला मिळतो. मराठीत उंबरा हाही शब्द बराच विसरल्यासारखा झालाय. हिंदीतही दाँया, बाँया हे शब्द नाहिसे झाले आहे लोक सरसकट राइट-लेफ्ट च म्हणतात.
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Fri, 01/08/2016 - 18:36 नवीन
म्हणजे उंबरठाच ना तसेच छपरी म्हणजे ओसरी हा शब्दही हल्ली वापरात येत नाही. मुळात वाडेच नष्ट झाले तर छपरी कुठे येनार. उध्वस्त झाले तरी किल्ले टिकले. शब्दही टिकला. काही दिवसांनी वाडा या शब्दाचा अर्थ फक्त शब्दकोशातच मिळेल. वाडे नष्टच होताहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
र
राही Mon, 01/11/2016 - 14:19 नवीन
उंबरा या शब्दामागची संकल्पना लोप पावली म्हणून तो शब्द अडगळीत जात आहे. पूर्वी उंबरा किंवा उंबरठा हा दरवाज्याच्या चौकटीचा भाग नसून ती वेगळी उंबराच्या झाडाची उंच जाड फळी असे. आता कधी प्लाय, कधी कडाप्पा, कधी ग्रॅनाईट, संगमरवर या प्रकारांतली पट्टी असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
ह
हुप्प्या Fri, 01/08/2016 - 18:50 नवीन
माझी आजी कपडे परटाकडे नेऊन दे असे म्हणायची. लाँड्रीपेक्षा परीट म्हणणे तिला सोपे वाटायचे. आज हा शब्द लुप्त झाला आहे. खरबूज ह्या फळाला चिबूड हा अस्सल मराठी शब्द आहे. पण अर्थात खरबूज ह्या फारसी शब्दात जी शान आहे ती चिबूडला नाही त्यामुळे तो शब्दही नष्ट झाला आहे. वेळापत्रक हा शब्दही ऐकलेला नाही. टाईमटेबल हा शब्द मराठीत रूढ झाला आहे. कालानुरुप प्रत्येक भाषेत शब्द जातात आणि येतात. पण भारतीय भाषा बोलणार्‍या लोकांना आपल्या भाषांविषयी न्यूनगंड आहे. आपल्या भाषेतील कुठल्याही शब्दांच्या ऐवजी इंग्रजी शब्द वापरणे म्हणजे आपण उच्चशिक्षित आहोत, जास्त सुसंस्कृत आहोत असे सिद्ध करणे असे बहुतेक लोकांना वाटते. त्यामुळे भारतीय भाषेतले शब्द नष्ट होऊन तिथे इंग्रजी शब्द येण्याची प्रक्रिया अन्य भाषांपेक्षा वेगवान आहे असे मला वाटते. मांसाहारी पदार्थांना कधी कुणी मराठी शब्द वापरताना ऐकले आहेत का? फिश, चिकन, मटन हेच शब्द सहज वापरले जातात. मासे, कोंबडी वा बोकड असे कुणी म्हटले तर त्याला बहुधा वाळित टाकतील! अँड, बट, ऑर हे शब्द सर्रास हिंदी शब्द असल्याप्रमाणे हिंदीत वापरले जातात तेव्हा संताप येतो. ह्याकरता अत्यंत चपखल सोपे हिंदी शब्द असताना तिथे इंग्रजीची भेसळ कशाला खपवून घ्यायची?
  • Log in or register to post comments
स
स्वच्छंदी_मनोज Mon, 01/11/2016 - 12:05 नवीन
खरबूज ह्या फळाला चिबूड हा अस्सल मराठी शब्द आहे. पण अर्थात खरबूज ह्या फारसी शब्दात जी शान आहे ती चिबूडला नाही त्यामुळे तो शब्दही नष्ट झाला आहे >>>>> खरबुज म्हणजे चिबुड नाय वो...खरबुज म्हणजे मस्कमेलॉन आणी चिबुड म्हणजे मॅशमेलॉन. दोन्ही आकारानी आणी चवीनी फार वेगळे आहेत हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
म
मित्रहो Mon, 01/11/2016 - 15:30 नवीन
आम्ही खरबुजला डांगर म्हणायचो, कलिंगडाला टरबुज. तसेच एक काकडीसारखे लंबोळे पण आकाराने मोठे फळ होते त्याला वाळूक म्हणायचो. त्याचा वेल असायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वच्छंदी_मनोज
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 01/11/2016 - 16:11 नवीन
खरबूजा सारखं दिसणारं एक फळ जे अतिशय पांचट लागतं खायला त्याला आम्ही शेंदाड म्हणतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वच्छंदी_मनोज
र
राही Mon, 01/11/2016 - 14:34 नवीन
परंपरागत मिश्राहार करणार्‍यांमध्ये अनेक शब्द आहेत. फक्त अभिजनभाषेमध्ये किंवा अभिव्यक्तीमध्ये काही सामाजिक व्यवस्थेमुळे किंवा व्यवस्थेतल्या त्रुटींमुळे ते आलेले नाहीत. 'ओल्ड मॅन अँड द सी'चे पुलंनी केलेले भाषांतर चांगले उतरले आहे. पण ते 'आपले' वाटत नाही. कारण मासेमारीच्या व्यवसायातले कोळ्यांच्या बोलीतले अनेक शब्द इंग्लिश शब्दांऐवजी पुलंनी चपखलपणे वापरले आहेत, पण पुन्हा तेच, सामाजिक व्यवस्थेमुळे काही व्यवसाय 'आपले' वाटत नाहीत, त्यातले व्यवहार प्रमाण भाषेत व्यक्त होऊ शकत नाहीत. व्यवस्थेतल्या त्रुटींमुळे भारतीय भाषांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांची अर्थवहनशीलता आणि अभिव्यक्तिक्षमता यांवर मर्यादा पडल्या आहेत. कोळ्यांचे शब्द वापरून लिहिलेली ही इंग्लिश कादंबरी जगभर गाजली, १९५४मध्ये हेमिंग्वेला नोबेल मिळण्यास कारणीभूत ठरली. आपल्याकडे अशी मान्यता आत्ता आत्ता कुठे येते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
म
मारवा Mon, 01/11/2016 - 15:26 नवीन
समुद्र मराठी साहीत्यात कीती कमी प्रमाणात येतो. व जो येतो तो फार कमी छोट्या परीघात येतो. यामागची सामाजिक कारणे हिमालयाच आपल्या मराठी नेणीवेला असलेल कौतुक आदी फार सुंदर विश्लेषण मार्मिक म्हणाव अस मॅनहोलमधला माणुस मध्ये आलेल आहे. त्यात त्यांनी मराठीत अशी कादंबरी का होऊ शकत नाही इ. इ. छान मांंडलय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
र
राही Mon, 01/11/2016 - 19:36 नवीन
'अक्षरांचा श्रमो केला' या पुस्तकात विलास सारंगांनी 'एका कोळियाने'वर टीका केली आहे, पण त्याचा केंद्रबिंदू वेगळाच आहे. विलास सारंगांचा पु.लं.वरचा लेख म्हणून उत्सुकतेने वाचला, पण निराशा झाली होती. आपल्याकडच्या फार मोठ्या सामाजिक आणि भाषिक वास्तवाच्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी त्यांना तपासता आली असती. असो. मराठी साहित्यात समुद्र येत नाही कारण तशी परंपरा दख्खन-पठारी वाङ्मय या मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहात नव्हती, कारण दख्खन पठाराचा समुद्राशी कधी संबंधच आला नव्हता. शिवाय जुन्या काळी आपल्याकडे समुद्रपर्यटनास बंदी होती. गेल्या साठ-सत्तर वर्षांत समुद्राची वर्णने साहित्यात येऊ लागली. 'सागरा प्राण तळमळला' ही कविता सागराला उद्देशून असली तरी तिचा बाज आणि उद्देश वेगळा आहे. बोटीवरचे वर्णन कदाचित प्रथम मराठीत आले ते 'रणांगण'मध्ये. त्यानंतर एकदम अनंत सामंत. अध्ये-मध्ये अत्यंत कृत्रिम अशी कोळीगीते. खरी कोळीगीते आत्ता आत्ता आली. ऑइल रिगवरच्या जीवनाचे वर्णन असणार्‍या एकदोन कादंबर्‍या आहेत. एक कदाचित अनिल कुसुरकरांची.(चूभूदेघे) पण तिचाही अंतःप्रवाह वेगळाच आहे. आत्ता आता कुठे मराठी लेखक व्यापक जीवनाला भिडू लागलेयत. तसे ग्रामीण आणि दलित साहित्याने मराठी साहित्याच्या कक्षा बर्‍यापैकी रुंदावल्या आहेत. पण तरी तो उपप्रवाह मानला जातो, मुख्य धारा नव्हे. समग्र मराठी जीवन कवेत घेणारे कसदार साहित्य अजून जन्मायचेच आहे बहुतेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
आ
आदूबाळ Mon, 01/11/2016 - 20:36 नवीन
जबरदस्त प्रतिसाद!
समग्र मराठी जीवन कवेत घेणारे कसदार साहित्य
हे नाही जन्मलं लवकर तरी चालेल, पण 'नातेसंबंध', 'तो आणि ती' या विषयांवर मराठी कथा/कादंबर्‍या लिहायला दहा वर्षं तरी बंदी घातली पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
अ
अर्धवटराव Mon, 01/11/2016 - 20:42 नवीन
तुमचे प्रतिसाद वाचणं म्हणजे मेजवानी असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
म
मारवा Tue, 01/12/2016 - 08:48 नवीन
राही जी सुंदर प्रतिसाद अर्धवटरावांशी सहमत आहे तुमचे प्रतिसाद वाचणे म्हणजे मेजवानीच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
फ
फेरफटका Fri, 01/08/2016 - 22:38 नवीन
शब्दांना नुसते शब्द म्हणून व्यवहारात फारसा अर्थ नसतो, शब्दकोषात असतो. व्यवहारात शब्दांना अर्थ संदर्भाने मिळतात. मांडे हा खाद्यप्रकार कालौघात लुप्त झाला तर 'मनात मांडे खाणे' हा वाक्प्रचारही हळू हळू नाहीसा होत जाईल. परीट वगैरे शब्द व्यवसायाशी निगडीत असले तरी, जातीवाचक झाल्यामुळे 'लॉन्ड्री' सारख्या व्यवसायाशी निगडीत शब्दाने त्या 'परीटाची' जागा घेतली. व्यापार-व्यवसायाच्या निमित्तानं जसं जग जवळ येत जातं तसं एका भाषेतले शब्द दुसर्या भाषेत जाणं हे अगदी स्वाभाविक आहे. शेवटी भाषा मानवनिर्मीत असल्यामुळे, माणसाच्या बदलत्या जीवनशैलीप्रमाणे भाषेतले बदल अपरिहार्य आहेत.
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Fri, 01/08/2016 - 23:00 नवीन
आवडलं आणि पटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेरफटका
म
मित्रहो Sat, 01/09/2016 - 04:40 नवीन
संदर्भ संपल्याने शब्द व्यवहारातून जातात हे पटत. कदाचित त्याच कारणाने तुमच्या आमच्या बोलण्यात वाक्यप्रचार किंवा म्हणी जास्त आढळत नाही. त्यांचे संदर्भ नाहीसे झाले. संदर्भ संपण्याबद्दल मात्र परीच कारणे आहेत. अध्यापक चे टिचर होने हा मात्र इंग्रजी स्वीकारण्याचा परिणाम एवढेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेरफटका
ह
हुप्प्या Sat, 01/09/2016 - 05:08 नवीन
परीट हा शब्द जातीवाचक आहे म्हणून नष्ट झाला हे आजिबात पटत नाही. मग न्हावी का नष्ट नाही झाला? सुतार वा लोहार हे शब्द इतके लुप्त झालेले नाहीत. सोनारही नाही. इंग्रजीच्या प्रभावामुळे साधे सोपे मराठी शब्द मराठी माणूस त्यागताना दिसतो ते वाईट. बाजारच्या ऐवजी मार्केटला जातो म्हणणे, खरेदीला शॉपिंग म्हणणे हे जास्त उच्चभ्रू समजले जाते हे वाईट. हातपाय धुवून येतोऐवजी फ्रेश होऊन येतो म्हणणे जास्त वरच्या दर्जाचे समजले जाणे हे वाईट. अपरिहार्य असले तरी त्याबद्दल दु:ख वाटणे मला स्वाभाविक वाटते.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Tue, 01/12/2016 - 08:12 नवीन
"बाजार" हा सुद्धा अमराठी शब्दच आहे ना? मराठीत बाजाराला "हाट" म्हणतात असे ऐकले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 01/09/2016 - 16:57 नवीन
भाषाशास्त्राचे अभ्यासक असे म्हणतात की भाषेचं एक वैशिष्टे संक्रमण. भाषा ही मानवाची निर्मिती आहे. भाषेचा वारसा एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे जात असतो. माणुस समाजात वावरत असतांना त्याच्या संस्कृतीचा जसा प्रवास चालु असतो तसाच त्याच्या भाषेचाही प्रवास चालु असतो. आणि तेव्हाच भाषा समृद्ध होत असते. भाषेत लवचिकपणा असला पाहिजे, नवे शब्द स्वीकारल्यामुळे भाषा समृद्ध होत असते. मानवी समुहाचा संस्कृतीचा जसजसा विकास होत जातो तसतसा भाषेचाही विकास होत जात असतो आणि नवनवे शब्द भाषेत येतात आणि जुने शब्द लोप पावतात. भाषेची गरज काय आहे त्यावर असे शब्द जन्माला येत असतात आणि काही लुप्त होतात. शब्दामधुन सहज संदेशन करता आले पाहिजे म्हणुन सोप्या शब्दांकडे माणसांचा जास्त कल असतो त्यामुळे नवे शब्द येत असतात त्याचबरोबर बोली आणि प्रमाणलेखनातील शब्दांच्या आग्रहामुळे काही शब्द लेखन आणि बोलण्यातून लुप्त होत जात असतात. शब्दांचे अर्थ बदलत नाही, आणि संदर्भही बदलत नाही फक्त भाषाव्यवहारातून ते शब्द मागे पडतात इतकाच तो अर्थ. उदा. मोबाईलचा शोध लागला आणि भाषेत भ्रमनध्वनी, मोबाईल, हँडसेट, असे शब्द आले. आणि त्यांचा भाषेत उपयोग व्हायला लागला. आणि जुने शब्द आणि त्यांचे अर्थ मागे पडले जसे - पोतं = गोणी घुटका = डोस टमरेल = डबा झंपर = चोळी झगा = ??? ( सांगा उत्तर ) [उत्तर बरोबर सांगितल्यास खरडवहीत. 'क्या बात जियो' अशी दाद मिळेल] -दिलीप बिरुटे मेरे यु चुप रहने से, नाराज न हो जाना कभी दिल से चाहने वाले अक्सर खामोश ही रहते है
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Sat, 01/09/2016 - 17:09 नवीन
म्हणजे फ्रॉक मराठी शब्द आठवत नाही. झबले लहान मुलांचे असते तोही योग्य वाटत नाही. माहीतीपूर्ण प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अ
अनिता Sat, 01/09/2016 - 20:52 नवीन
डगला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ज
जव्हेरगंज Sun, 01/10/2016 - 03:49 नवीन
झगा = स्कर्ट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
सौन्दर्य Sun, 01/10/2016 - 05:15 नवीन
जे शब्द आपण सतत ऐकतो ते आपोआपच आपल्या बोलण्यात येतात. मी बडोद्यात राहत असताना, बहुतेक महाराष्ट्रीयन कुटुंबात 'बादली'ला 'डोल' म्हणताना ऐकले आहे. लहानपणी जेव्हा इंग्रजी 'वॉशर' हा शब्द माहित नव्हता त्यावेळी त्याला 'वायसर' म्हणतात असेच वाटत होते. 'मांजरपाट' हा शब्द 'मँचेस्टर क्लॉथ' ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे असे वाचल्याचे आठवते. इंग्रजी शब्द 'टॅमरींड' (चिंच) हा 'तामर -ए - हिंद' (हिंदुस्थानचा खजूर) ह्या शब्दावरून बनला आहे असे देखील वाचले होते. गल्लीत झालेल्या दंगलीला, मारामारीला 'राईट झाली' असेह जे ऐकले होते त्यातील 'राईट' म्हणजे 'Riot' हे पुढे इंग्रजी शिकताना ध्यानात आले. पळीला 'डाव' म्हणताना हल्ली ऐकले नाही. हिंदीची प्राज्ञ, प्रवीण, वगैरे परीक्षा देताना 'फाईल'ला मूळ हिंदी शब्द 'मिसील'असा आहे हे कळल्यावर फार आश्चर्य वाटले होते. अशी अनेक उदाहरणे देता येतील. विषय चांगला आहे, अजून वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
अ
असंका Mon, 01/11/2016 - 12:16 नवीन
लहानपणी जेव्हा इंग्रजी 'वॉशर' हा शब्द माहित नव्हता त्यावेळी त्याला 'वायसर' म्हणतात असेच वाटत होते
खरंच का!!! मला तर आत्ता पहिल्यांदाच कळतंय!! मला वायसर हाच योग्य शब्द वाटायचा!! आणि एक म्हणजे फूटबॉल हा बहुतेक फुटवॉल्व्ह चा अपभ्रंश असावा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौन्दर्य
म
मारवा Sun, 01/10/2016 - 10:19 नवीन
धाग्याचा विषय छान आहे. धागा आवडला. नाहीसे झालेले शब्द ज्ञानेश्वरी सारखा जुना ग्रंथ वाचतांना फार मोठ्या प्रमाणावर सापडतात. कुठे कुठे पुर्ण शब्द नाहीसे म्हणजे वापरातुन निघुन गेलेले नसतात पण नगण्य वापर वा अर्थच पुर्णपणे बदलुन गेलेला आढळतो. काही शब्द आता आठवतात ते असे. दीठी शब्द नाहीसा नाही म्हणता येत पण वापर फारच कमी झालाय हल्ली. ग्रेस च्या कवितेत आढळतो तुरळकच दिसतो. सैंघ एक शब्द आहे. पिंपळाच्या वाळलेल्या पानात तंतुंची सैंघ सृष्टी दिसते अशा अर्थाची एक ओळ आहे ज्ञानेश्वरीत एक रतीचिया बेटा, आदळती कामाचिया लाटा, जेथ जीवफ़ेन संघाटा, सैंघ दिसे अशी ओवी आहे. हा सैंघ शब्द ही दिसत नाही वापरात. साइखेडीया ( चुकभुल देणे घेणे ) हा एक शब्द आहे कळसुत्री बाहुलीचा जो सुत्रधार असतो त्याला म्हणतात. आता सुत्रधार च म्हणतात बहुधा. मी तरी इतर कुठेच हा शब्द वापरलेला बघितला नाही ज्ञानेश्वरी व्यतिरीक्त. माहेवणी- गर्भवती स्त्री साठीचा शब्द , आकळणे , आडिळजे उल्लाळे घेणे सर्वच शब्द वापरातुन गेलेत. अर्थात ती जुनी भाषाच गेली तर शब्द ही वापरातुन जाणारच. पण अनेक सुंदर दमदार अर्थपुर्ण शब्द गेल्याच व त्याच्या जागी इतर भाषांतुन त्या शब्दा ऐवजी दुसरा शब्द घेतला गेल्याचा वापरात आल्याचा काहीसा खेद जरुर वाटतो. म्हणजे नसेलच आपल्या भाषेत वा असुन एक अधिकचा आला तर गोष्ट वेगळी. आपला मुळचा वापरण बंद केला आणि मग ..तर असो. काहींचे अर्थच आमुलाग्र बदलतात म्हणजे एक प्रकारे एक शब्द मेलाच की. उदा. थेर विषयी वाचलेल आठवतय हा मुळ बुद्धीस्ट मुनिं साठीचा आदरार्थी अर्थाने शब्द होता तो नंतर थेरडा काय थेर चालवलीत इ. डिरोगेटरी अर्थाने नंतरच्या काळात वापरात येत असलेला दिसतो. समाज या शब्दा चा रुट पण फारच वेगळा ( सामुहीक संभोग का काय अशा अर्थाने समन का काय पासुन अस काहीतरी) शरद पाटील यांच्या पुस्तकात आलेल आहे आता अचुकतेने आठवत नाही. चांडाळ इंटरेस्टींग आहे शुद्र पुरुष व ब्राह्मण स्त्री चा पुत्र हा शिवी अर्थाने वापरला जातो. निर्भत्सने साठी मुळ अस वेगळ सामाजिक इ.आहे. इंग्रजी त आपल्याकडुन पण शब्दांच योगदान आहेच ना. जगरनॉट जगन्नाथ रथ यात्रेतील प्रथे पासुन इंग्रजीत गेलेला शब्द आहे. डिक्शनरीत बघा रुट दाखवतो. तो रथ ओढतांना एकदा मग थांबवण अवघड असत तर असा फोर्स जो आता थांववण अवघड अशक्य आहे. जगरनॉट ऑफ स्वीडन्स इकॉनॉमिक प्रोग्रेस असा अर्थाने वापरला जातो. कराओके जॅपनीस मधुन इंग्रजीत गेलेला इ. भाषेप्रमाणे अर्थ भन्नाट बदलतो. क्या यार कैसा है तु ? कीती साधा सुधा प्रश्न सहज मित्राने मित्राला केलेला क्यो कहॉ गई थी ? अपने यार के साथ रंगरलीयॉ मनाने गई थी क्या ? किती विखार प्रश्नात आला बघा देवर हा द्विवर (दुसरा पती ) या मुळ अर्थाने पासुन पण तशा अर्थाने तो आता वापरला जात नाही संदर्भ - इरावती कर्वेंचा आहे. अजुन आठवेल तसे देतो.
  • Log in or register to post comments
र
राही Sun, 01/10/2016 - 17:58 नवीन
संस्कृतीमध्ये जेव्हा नवीन व्यवहार आणि संकल्पना जन्म घेतात तेव्हा त्या व्यक्त करण्यासाठी नवे शब्द टांकसाळावे (कॉइन या शब्दासाठी हेतुतः वापरला आहे हा शब्द.) लागतात. जिथे ही संकल्पनानिर्मिती होते, त्या भौगोलिक परिघातले शब्द प्रथम वापरले जातात आणि तेच शब्द इतरत्र रूढ होतात. जो भूभाग किंवा समाज नवनवीन संकल्पनांना, व्यवहारांना जन्म देतो, त्याची भाषा समृद्ध होते आणि संस्कृती बहरते. इतरांना अवघड आणि बोजड प्रतिशब्द शोधण्याचा किंवा कृत्रिमपणे बनवण्याचा आटापिटा करावा लागतो. एक चांगला विषय लेखाद्वारे हाताळला गेला आहे. जाता जाता : कढत हा शब्द 'कढ येणे' या क्रियेवरून बनला असावा. पदार्थ उकळताना कड कड असा आवाज येतो. (अलीकडे आपण रट रट म्हणतो पण पातळ द्रव पदार्थाच्या उकळण्याचा आवाज रट रट असा येत नाही. तो भात किंवा दाट आमटीसदृश पदार्थांचा येतो.) त्यावरून कढ येणे म्हणजे उकळणे आणि कढत म्हणजे उकळते किंवा तितके उष्ण असा अर्थ आला असावा. दु:खाचे कढ म्हणजे दु:ख उमळून वर येणे असे असावे. आपल्या पूर्वसूरींनी करून ठेवलेले ज्ञानेश्वरीतील मराठी, यादवकालीन मराठी यांवरील उत्तम शब्दकोश किंवा ग्रंथ सुदैवाने आज आपल्याला उपलब्ध आहेत.
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Mon, 01/11/2016 - 03:35 नवीन
हुप्प्या, फेरफटका, बिरुटे सर, सौंदर्य, मारवाजी, राही माहीतीपूर्ण प्रतिसादासाठी धन्यवाद आज इंग्रजी भाषेतले शब्द येत आहेत पूर्वी संस्कृत भाषेतले किंवा संस्कृतोदभव शब्द भाषेत यायचे. आज चारशे वर्षापूर्वीच्या बोली भाषेतले शब्द अगम्य वाटतात. इंग्रजीने तर कित्येक भाषेतले शब्द स्वीकारले आहेेत. मार्केट वरुन आठवल आमच्या गावात APMC मधे माल विकायला जाणे म्हणजे मार्केटात जाणे आणि आठवडी बाजारात खरेदी करायला जाणे म्हणजे बाजारात जाणे. वापरात फक्त शब्दच असतात असे नाही तर त्या शब्दाच्या अनुषंगाने वाक्यप्रचार, म्हणी भाषेत येतात. शब्दांचा वापर संपला की ते वाक्यप्रचार, म्हणींना अर्थ राहत नाही. वर मनातले मांडे चा उल्लेख आलेलाच आहे. आज आपल्या बोलीभाषेतून वाक्यप्रचार, म्हणी यांचा वापर बराच कमी झालेलला आहे. साधे पालथ्या घडावर पाणी म्हटले तर घडा म्हणजे काय ते समजावून द्यावे लागते. पोत हा शब्द आजही वापरतो. फक्त साठवण्यासाठी वापरनारी पिशवी म्हणूनच नाही तर मोजमापाचे परिमाण म्हणून सुद्धा. किती पोते तुरी झाल्या? मोजमापावरुन आठवले. शेर, पायली, कुडव, मण, खंडी ह्याचा वापर मोजमापासाठी कमी होत चालला आहे, तर मग शेरास सव्वाशेर चा अर्थ कसा कळनार. ज्ञानेश्वरीतल्या बऱ्याच शब्दांचा अर्थ समजण्यासाठी शब्दकोशाचा आधार घ्यावा लागतो. फक्त शब्दकोशात वाचून त्या शब्दांचे भावार्थ कितपत समजतात हा प्रश्नच आहे. त्या शब्दांच्या प्रयोजनामागे काही सामाजिक संदर्भ असतील आज ते सार आपल्याला कितपत कळते हा प्रश्नच आहे. आज पत्रावळी नाहीशा झाल्या, उकीरड्याचे dump yard झाले, खरकट, उष्ट हे शब्द संपलेत. उद्या उकीरड्यावरच्या पत्रावळीतले खरकट्याच्या बेशरम लाचार आनंद आणि टेलीफोन धुन मे हसने वाली ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच निरर्थक वाटने हे दुर्भाग्यपूर्ण असले तरीही तरी नवल नाही.
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Mon, 01/11/2016 - 05:45 नवीन
अंघोळीचे गरम पाणी थोडे थंड करण्यासाठी जे पाणी टाकतो त्याला इसान /विसान म्हणते आज्जी. याशिवाय बरेच शब्द नष्ट होत आहेत जसेकी, टक्कल करण्याला डुई करणे, कांद्याला पलांडू , शर्टला मनिला, बुटाला जोडा, गुडघ्याला ढोपर , दाट गवाताला आयचन , बल्बला गोळा, दुचाकीला फटफटी , पोस्ट अॉफिसला डाकघर ,बनियनला गंजीफ्रॉक, पँटला वीजार, बॕटरीला विजेरी, इतकेच काय नवीन पिढीला बऱ्याच वस्तू समजावून सांगणेच अवघड आहे जसेकी उखळ, जाते, घंगाळ, पाटा-वरवंटा ,अडकित्ता, चंची, कंदील , चिमणी , टेंभा, रवी/रई, तार , पिंगळा जोशी , वासुदेव इत्यादी तुर्तास पुरे!
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Mon, 01/11/2016 - 08:28 नवीन
याबरोबरच फ्लॉपी डिस्क, (होय तीच १.४४ यम्बी वाली), लोटस, वर्डस्टार (हे तर कुणाला आठवणार पण नाही) , ide cable, vga cable/port, हेपण शब्द नाहीसे होतील. मारीयो, पॕक मॕन, काँट्रा, sd fighter, icelander, बरफ (बर्फ नाही!) का पाणी , विष का अमृत , हत्तीची सोंड, कोकोनट गो ? , लिंगोर्चा, यातील मजा नाही कळणार नवीन पिढीला . एक रूपयात चार मिळणारी पाणीपुरी, चार आण्याला मिळणारी आईसकांडी, एक रूपयात मिळणारी गीता आईसक्रीम याची किंमत मॕकडी मधे सहज ५०० रूपये खर्च करणाऱ्या पिढीला बहुतेक नाहीच कळणार. असो ! रच्याकने अतिशय सुंदर लेख नॉस्ट्याल्जीक केला राव! -पंचविशीत म्हातारा झाल्याची फिलींग आलेला (उका)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
र
राही Mon, 01/11/2016 - 07:13 नवीन
वापरातून जात चाललेले आणखी काही शब्दः सरपण, पेंढा, पेंड, आंबोण, गोठा, गायरी, शेणगोठा, गवाणी, दावे, लोढणे, कासरा, गंजी. ठाणवई, दिवली, चूड, पलिता, काकडा (हा काकडआरतीपुरता उरलाय). सहाण, गंध, उगाळणे, सारवणे, पोतेरे, मातेरे चूल, वैल, कोठी, शिंके/शिंकाळे, फडताळ, घडवंची, खुंटी, गोखला/गोखली, उखळ, मुसळ, वहाणा, खडावा,पायताण, जुते, अंगरखा, सदरा, बाराबंदी, मंदिल, पंचा, धडुतं, लुगडं, दांड, धाबळी, वाकळ, कांबळ शेतीसंबंधी अनेक शब्द, स्वयंपाकक्रियेसंबंधी अनेक शब्द. उदा. आसडणे, पाखडणे, वैरणे, आधण, निर्जला, अधमुरं,भरडणं इ. पूर्वी गंध आणि औषधांच्या मात्रा उगाळण्याची पद्धतही वेगवेगळी होती. चंदनाचे कांड सहाणेवर गोल गोल उगाळायचे तर मात्रा ही एका मध्यबिंदूपासून उजवीकडे आणि नंतर त्याच रेषेत डावीकडे जाऊन पुन्हा मध्यबिंदूकडे अशी सरळ रेषेत उगाळायची असे. चंदन कुणी सरळ रेषेत उगाळले तर ते अपशकुनी समजत. कारण अर्थातच तसे उगाळणे म्हणजे अनारोग्य दर्शवणार्‍या औषधमात्रेची आठवण करून देणारे असे. खोबरे खवणताना बाहेरून सुरुवात करून मग करवंटीच्या आत पोचायचे असे. संस्कृती अनेक तर्‍हांनी, अनेक क्रियांमुळे बदलत असते ती अशी.
  • Log in or register to post comments
म
मयुरMK Mon, 01/11/2016 - 08:33 नवीन
गवाणी म्हणजे दावणी च ना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
ध
धनावडे Mon, 01/11/2016 - 15:32 नवीन
नाही गवाणी म्हणजे गुरांच्या पुढ्यात चारा टाकायची जागा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मयुरMK
म
मयुरMK Mon, 01/11/2016 - 16:18 नवीन
हा तेच त्या जागेला आमच्या गावी ( इचलकरंजी ) ''दावणी'' आसे संबोधतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनावडे
म
मित्रहो Mon, 01/11/2016 - 16:31 नवीन
असे म्हणायचे पण जो कुणी बैलांना पोसायचा त्याच्या दावणीतला बैल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मयुरMK
च
चतुरंग Mon, 01/11/2016 - 15:35 नवीन
"गवाणीतलं कुत्रं" असा वाक्प्रचार आलाय!:) (झारीतला)रंगाचार्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मयुरMK
र
राही Tue, 01/12/2016 - 06:52 नवीन
हा वाक्प्रचार डॉग इन द मॅन्जर(मेय्न्जर) या मुळातल्या ग्रीक नीतिकथेवरून आला आहे. कालांतराने ही फेबल ईसपच्या नीतिकथांत समाविष्ट झाली. मॅन्जर म्हणजे माणसाळलेल्या पशूंना खाद्य ठेवण्यासाठी पुढ्यात बांधलेला छोटा हौद. युरोपात तबेल्यात किंवा गोठ्यात असे हौद असत. अलीकडे गोठ्याला तबेला म्हणतात ते वेगळे. तो हिंदीचा प्रभाव. आणि तबेला मुळात stable-स्टेबल वरून आला. आपल्याकडे कदाचित गुरांना खाद्यासाठी हौद ही संकल्पना जुन्या काळी नसावी. आणि कुत्र्यासाठी हौद तर नसावाच. हा मॅन्जर शब्द गोवा-कारवार-सिंधुदुर्ग या भागात 'मांगर' या स्वरूपात सापडतो. पण आपल्याकडे प्राचीन साहित्यात खिल्लारांचे उल्लेख आहेत. गुरे पाळणे मोठ्या प्रमाणात केले जात होते असेल तर कदाचित हौदही असतीलच. हल्ली घरी गुरे पाळणे हे खर्चिक होत चालल्याने व्यावसायिक असे मोठे तबेलेच असतात आणि तिथे मात्र हे हौद असतात. गवाणीतले कुत्रे या नीतिकथेचा सारांश असा आहे की एक कुत्रे गुरांच्य किंवा घोड्यांच्या हौदात शिरते. पण तिथले खाणे त्याच्या उपयोगाचे नसल्याने तो ते खाऊ शकत नाही, मात्र भुंकून भुंकून तो इतरांना हैराण करतो, त्यांनाही ते अन्न तो खाऊ देत नाही. आपल्याला मिळत नाही ते इतरांनाही मिळू नये अशी कोती, मत्सरी वृत्ती दाखवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग Tue, 01/12/2016 - 14:04 नवीन
यामागचा रोचक इतिहास सांगितल्याबद्दल धन्यवाद! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
र
राही Mon, 01/11/2016 - 19:48 नवीन
दावणी म्हणजे गुरांची दावी बांधण्यासाठी उभारलेले रेलिंग. गोठ्यात गुरांना या रेलिंगला बांधतात. गुरांना बांधल्यावर दाव्याच्या लांबीइतक्या त्रिज्येत गुरे रेलिंगसमोर अर्धवर्तुळाकार फिरू शकतात. तिथेच चारा वगैरे टाकतात. या जागेला गवाणी म्हणतात. अर्थात प्रदेशानुसार अर्थ बदलतातही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मयुरMK
म
मित्रहो Tue, 01/12/2016 - 02:50 नवीन
खुंटा किंवा खुटा आणि दावणी यातला फरक काय. मला वाटत दावणीला अनेक गुर बांधता येतात खुंट्याला एकच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
र
राही Tue, 01/12/2016 - 04:57 नवीन
अगदी असेच. खुंटा/खुटा म्हणजे एक गुरुं बांधता येईल, दावणी म्हणजे अनेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मित्रहो
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा