Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काटा वजनाचा --४

स
सुबोध खरे
Tue, 02/02/2016 - 20:38
💬 73 प्रतिसाद
काटा वजनाचा -३ काटा वजनाचा --४ आतापर्यंत आपण वजन जास्त म्हणजे किती आणि ते का वाढते याची साधारण कारणे पाहिली काही लोक आपल्याला भरपूर खाताना दिसतात तरीही त्यांचे वजन वाढत नाही. याउलट बहुसंख्य स्थूल लोकांची एक तक्रार असते कि आम्ही एवढा डाएट करतो तरी आमचे वजन कमी होत नाही. या दोन्ही गोष्टीत थोडे फार तथ्य आहे याचे विवेचन. काही वैद्यकीय शास्त्रज्ञांनी एक सिद्धांत मांडला कि जसे आपल्या मेंदूत एक थर्मो स्टेट(THERMOSTAT) असतो जो शरीराचे तापमान स्थिर ठेवतो तसाच एक एडीपोस्टेट (ADIPOSTAT) असतो. याचे प्रत्यक्ष अस्तित्व अजून मिळालेले नाही परंतु हा सिद्धांत असे सांगतो कि आपल्या मेंदूच्या तळाशी असलेल्या HYPOTHALAMUS या मेंदूच्या भागात याचे अस्तित्व असते आणी हा एकदा एका वजनाला स्थिर(SET) झाला कि तो विशिष्ट मर्यादेत आपल्या शरीराचे वजन वाढू अथवा कमी होऊ देत नाही. जर आपले वजन ६० किलो असेल आणी आपण त्याला आवश्यक अशा २१०० कॅलरी इतके अन्न खात असू तर आपले वजन स्थिर राहील परंतु आपण जर २४०० कॅलरी इतके अन्न खालले तर हा एडीपोस्टेट आपल्या वरच्या ३०० कॅलरी वेगवेगळ्या स्वरुपात खर्च करून वजन स्थिर ठेवतो. यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली तपकिरी चरबी ( BROWN FAT) येथे मेंदू संकेत पाठवितो ज्यामुळे हि बरीचशी खाल्लेली अतिरिक्त चरबी (उर्जा) अक्षरशः जाळून टाकली जाते. याशिवाय आपली आतडी अतिरिक्त अन्न शोषण करण्या ऐवजी पुढे ढकलून देतात त्यामुळे स्थूल माणसे बरेच अन्न दुसर्या दिवशी अक्षरशः वाया घालवतात. यांच्या आतड्यातील जीवाणू पण याला जबाबदार आहेत असा एक सिद्धांत(THEORY) आहे. साधारण पणे आपले शरीर जेंव्हा एक ग्राम चरबी जाळते तेंव्हा साडेचार कॅलरी उर्जा या ए टी पी(ATP) मध्ये साठवून ठेवली जाते जी तुमच्या चयापचयासाठी(METABOLISM) साठी वापरली जाते आणी उरलेल्या साडेचार कॅलरी उष्णतेच्या रुपात बाहेर पडतात.जेंव्हा आपली तपकिरी चरबी ( BROWN FAT) काम करू लागते तेंव्हा एक ग्राम चरबीतील बहुतांश उर्जा हि उष्णतेच्या स्वरुपात बाहेर पडते आणी फारच थोडी उर्जा साठविली जाते. थोडक्यात तेच काम करायला आपले शरीर जास्त उर्जा खर्च करते. आपले शरीर साधारणपणे ५० % उर्जा कार्यक्षमतेचे (EFFICIENCY) असते आपण पाहिले असेल कि स्थूल माणसाना सदासर्वदा घाम येतो याचे एक कारण म्हणजे त्यांच्या शरीरावरील अतिरिक्त चरबीचा थर उष्णतारोधक असल्याने उर्जा बाहेर टाकत नाही आणी दुसरे कारण हि तपकिरी चरबी ( BROWN FAT) त्यांनी खाल्लेले "अतिरिक्त" अन्न जाळून वजन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करते. महत्त्वाचा मुद्दा -- आपले वजन जास्त असेल आणी आपलयाला थंड बसलेल असताना सुद्धा सतत घाम येत असेल तर त्याचा साधारण अर्थ असा आहे कि आपण आपल्या गरजेपेक्षा जास्त अन्न खात आहात. आता एखाद्या ६० किलो वजनाच्या व्यक्तीने आपल्या गरजेच्या पेक्षा बरेच जास्त अन्न बरेच दिवस (८०-१०० दिवस) खाल्ले तर काय होते आपला एडीपोस्टेट (ADIPOSTAT ) वरच्या बिंदूवर स्थिर होतो. म्हणजे ६० ऐवजी ६३ किलो वर स्थिर होतो. आता या व्यक्तीला रोजचे कामकाज चालविण्यासाठी २१०० ऐवजी २३०० कॅलरी चे अन्न लागते. असे बरेच जास्त अन्न बरेच दिवस खाणे चालू राहिले तर त्या व्यक्तीचे वजन वाढतच जाते. म्हणून वर्षभरात लोकांचे १०-१२ किलोने वजन सहज वाढते. केसरी ट्राव्हल्स सारख्या संस्थेत १५ दिवसांच्या सहलीला जाऊन आलेली माणसे ३-४ किलोने वजन वाढवून येतात कारण तेथे दिवसात ५ वेळेस मिळणारे सुग्रास जेवण आणि न्याहारी, नाश्ते. ते जवळजवळ ४५०० कॅलरी इतके असतात. आणि एकदा पैसे भरले आहेत तर का सोडा? खाउन घ्या अशी आपली वृत्ती. जेंव्हा हि व्यक्ती वजन कमी करायचा प्रयत्न करते तेंव्हा हाच एडीपोस्टेट (ADIPOSTAT) आपले वजन कमी होऊ देत नाही. आपण कमी कॅलरी चा आहार घेतो तेंव्हा आपले शरीर जास्त कार्यक्षम होते आणी एक गरम चरबी जाळल्यावर सहा ते सात कॅलरी ए टी पी मध्ये साठवते. थोडक्यात तेवढेच काम करण्यासाठी आपल्या शरीराला कमी उर्जा खर्च करायला लागते. यामुळे मिताहार सुरु केला तरी वजन सहज सहजी कमी होत नाही याउलट त्याच व्यक्तीला थंडी वाजू लागते. थंडी वाजली किती व्यक्ती अंगावर अधिक कपडे चढवून घेते आणी उर्जेचा अपव्यय कमी होतो. थोडक्यात आपले वजन कमी होत नाही. शिवाय आपली आतडी सुद्धा जास्त कार्यक्षम होतात आणी जास्त अन्न शोषून घेतात. म्हणजे जर पूर्वी ४०० ग्राम अन्नापैकी २०० ग्राम शोषले जात असे तर आता २४० ग्राम अन्न शोषले जाते. त्यामुळे आहार तुम्ही ४० ग्राम नि कमी केलात(१०%) तरी प्रत्यक्षात शोषलेले अन्न तेवढेच राहते (२०० ग्राम) चरबी बरोबर शरीरात बरेच पाणीसुद्धा साठवलेले असते. त्यामुळे जेंव्हा एखादी व्यक्तीने वजन कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण आणी व्यायाम केले असता सर्वात पहिल्यांदा हे पाणी बाहेर टाकले जाते. यामुळे आपले वजन ५ ते ८ % कमी होते हि स्थिती पहिल्या ३-४ आठवड्यात होते. म्हणजेच एखादी व्यक्ती ८० किलोची असेल तर तिचे वजन ७२ ते ७५ किलो पहिल्या एक महिन्यात सहज होते. पण दुर्दैवाने हा वजन कमी होण्याचा दर लगेचच मंदावतो आणी पुढचे ५ टक्के कमी करण्यासाठी तुम्हाला भगीरथ प्रयत्न करायला लागतो. बहुसंख्य लोक जे VLCC, तळवलकर सारख्या केंद्रात जातात तेथे पहिल्या एक महिन्यात दैदिप्यमान असा फरक वजनाच्या काट्यावर दिसतो. या नन्तर त्यांच्या व्यायामात खंड पडला कि हे ५-८% पाणी परत शोषले जाते आणी पुढच्या २-३ आठवड्यात वजन पुन्हा जैसे थे होते. दुर्दैवाने या कमी झालेल्या वजनाच्या उत्साहात लोक हे सर्वाना सांगत सुटतात कि वजन काय आरामात कमी होईल. मी गेल्या महिन्यात ८ किलो कमी केले होते . आणी याची पुनरावृत्ती मग परत २ -३वर्षांनी होते. बर्याच लोकांनी असे पाच आकड्यात पैसे तीन चार वेळेस खर्च केलेले असतात आणी त्यानंतर ते वजन कधी कमी होत नाही. and then they lived happily ever after with their original weight. हि गोष्ट VLCC किंवा तळवलकर मध्ये कोणीही तुम्हाला सांगत नाही. हेच तर त्यांच्या यशाचे गमक आहे. महत्त्वाचा मुद्दा -- एक महिन्यात ७-८ किलो वजन कमी करणे हा हेतू न ठेवता दर महिन्याला एक ते दीड किलो वजन कमी होईल या उद्देशाने आपण जायला हवे.म्हणजे वर्षभरात आपण १२-१५ किलो वजन कमी करू शकू. वजन जर एकदम कमी केले तर हवा गेलेल्या फुग्यासारख्या आपल्या चेहर्याला किंवा शरीराला सुरकुत्या पडतात. (गरोदर स्त्रियाना प्रसुतीनंतर पोटाच्या त्वचेवर अशाच सुरकुत्या पडतात). लक्षात ठेवा. एक ग्राम चरबी म्हणजे ९ कॅलरी ( KILOCALORIES) म्हणजे जर रोज आपण ५० ग्राम चरबी कमी करायची असेल तर आपल्याला ४५० कॅलरी व्यायामात किंवा आहारात कमी करून खर्च करायला पाहिजेत. असेच दुसर्या टोकाला असलेले बारीक लोक -- बारा महिने बत्तीस काळ हे लोक वाटेल ते खात असतात पण त्यातील बराच भाग शरीर शोषुनच घेत नाही त्यामुळे कितीही खाल्ले तरी "अंगी" लागत नाही. यांच्या आतड्यातील जीवाणू पण याला जबाबदार आहेत असा एक सिद्धांत(THEORY) आहे. शिवाय जे अन्न खातात त्यातील बरेचसे अन्न तपकिरी चरबी ( BROWN FAT) जाळण्यास मदत करते यामुळे हे लोक काही अंगी लावून घेत नाहीत आणी बर्याच वजनदार लोकांच्या हेव्याचे मानकरी होतात. क्रमशः

Book traversal links for काटा वजनाचा --४

  • ‹ काटा वजनाचा -३
  • Up
  • काटा वजनाचा --५ ›

प्रतिक्रिया द्या
37809 वाचन

💬 प्रतिसाद (73)
ए
एस Tue, 02/02/2016 - 23:22 नवीन
वाचतोय. पुभाप्र.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Wed, 02/03/2016 - 00:10 नवीन
एव्हढं सगळं रामायण घडतं होय... डॉ. साहेबांचा तर आपण पंखा आहोच... आता अजुनच स्पीड पकडली आहे.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Wed, 02/03/2016 - 00:13 नवीन
वजन कंट्रोल करण्याची हि जे थेरोटीकल यंत्रणा आहे ति केवळ वजनावर चेक ठेवते कि त्या अनुषंगाने चयापचयाचा पाठपुरावा देखील करते? म्हणजे जर त्या यंत्रणेला कळलं कि वजन कमि होत आहे तर ति केवळ अतिरिक्त चरबी जळु देणे वगैरे होऊ देते कि शरीरातील इतर यंत्रणांवर जास्तीचा भार द्यायला लागते?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 02/03/2016 - 07:48 नवीन
या यंत्रणेत वजन कमी होत आहे असे कळले तर वजन कायम टिकवण्यासाठी सर्व शरीरातील इतर प्रणाल्या सुद्धा कामाला लावल्या जातात. म्हणजे आतड्यात अन्न जास्त शोषले जाते आपले इंजिन जास्त कार्यक्षम होते (५० टक्क्याऐवजी ७० % पर्यंत), आपल्याला थंडी वाजू लागते कारण शरीरात कॅलरी जाळून जी उर्जा तयार होते ती कमी केली जाते. भूक लवकर आणि जास्त लागते. हि यंत्रणा आदिमानवाच्या काळापासून कार्यरत आहे जेंव्हा अन्नधान्य मुबलक नव्हतंच. तेंव्हा पुढचे अन्न मिळेपर्यंत असलेले अन्न जास्त योग्य प्रमाणात वापरले जावे हा त्यातील मूळ हेतू. गेल्या ४०-४५ वर्षात अन्नाचा पुरवठा मुबलक असला तरीही तुमच्या गुणसूत्रात किंवा जीन मध्ये बदल घडवून यायला हा कालावधी सूक्ष्म आहे. यामुळे अन्न भरपूर मिळते आहे तोवर वजन वाढत जाते. आणि आपणही दाबून खातोच आहोत. मग वाढलेले वजन कमी करायचा प्रसंग येतो तेंव्हा आपण मिताहार घेतो आणि पाचव्या दिवशी पार्टी करतो. मग चार दिवस शरीर या (conserve) अक्षय प्रणालीत गेलेले असते ते एकदम मिळालेले अन्न जास्तीत जास्त शोषून घेण्याचा प्रयत्न करते आणि आपल्या मिताहाराचा फज्जा उडतो. पण लक्षात कोण घेतो. हि गोष्ट बहुसंख्य आहार तज्ञ लक्षात घेत नाहीत किंवा लक्षात घेतले तरीही आपल्या ग्राहकाला नाराज का करा? त्यामुळे लोक वजन कमी करण्याच्या VLCC, तळवलकर, गोल्ड जिम आणी विविध आहार तज्ञ, मेदारी, आयुरस्लिम, न्युट्रलाईट(एमवे) आणी तत्सम आयुर्वेदिक गोळ्या कॅपसुल, पंचकर्म, वमन विरेचन, डी टोक्स ई. च्या वार्या करीत असतात AND THEN THEY LIVED HAPPILY EVER AFTER WITH THEIR WEIGHT असे चालू राहते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 02/04/2016 - 05:58 नवीन
डॉक्टरसाहेब, ह्या अवस्थेची बरीच रिपिटेशन्स झालीत. मिताहारात एकाही दिवसाची सुट झाली तर वजन वाढतांना अक्षरशः अनुभवलंय आणि नंतर परत तीच सायकल. तर जर एडीपोस्टेट वर सेट व्हायला ८०-१०० दिवस घेत असेल तर खाली यायला पुन्हा तितकेच दिवस घेतो का? जर तसे असेल तर जवळ जवळ ३ ३ महिन्यांच्या ३ ४ सायकलस मध्ये वजन कमी कराव लागेल अस वाटतय!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 02/04/2016 - 06:17 नवीन
वैद्य साहेब असे चक्राकार गतीने वजन कमी न करता सरळ वर्ष भर आणि त्यानंतर "कायम" आपले आहारावर "नियंत्रण" ठेवणे आवश्यक आहे. मी असे म्हटले कि लोक लगेच नकारात्मक भूमिकेत जातात आणि म्हणतात कि म्हणजे आम्ही आता काही खायचेच नाही का? मी स्वतः सगळ्या चरबीयुक्त गोष्टी खातो परंतु एका बैठकीत नाही.किंवा जर लग्नाला गेलो तर मी तेथे असलेल्या सर्व भाज्या किंवा भजी, कोथिम्बिर वडी पापड इ सर्व गोष्टी खातो परंतु रोटी, चपाती साधा भात मसाले भात इ काहीच खात नाही. आणि शेवटी रसमलाई, आईस्क्रीम इ गोष्टी आवर्जून खातो.परंतु "जरा" जरी पोट जास्त भरेल असे वाटले तेंव्हा थांबतो. सांगण्याचा उद्देश हा कि आपल्या कॅलरी मोजून मापून खाणे आवश्यक आहे. माझ्याकडे पाहणारे लोक मला सांगतात कि तुम्ही तर सर्व गोष्टी खाता आहात. मी त्यांना एकच सांगतो तुम्ही ५-६ पुर्या/ ३ रोट्या खाऊन वर साधा भात, जीरा राइस कशासाठी खाता? या वर त्यांचे उत्तर नसते. काही लोक पार्टीत मिळतात म्हणून चिकन मटण सारखे जड पदार्थ स्टार्टर म्हणून दाबून खातात मग "व्यवस्थित" जेवण वर शेवटी मिठाई आणि आईस्क्रीम. मला यांना सांगावेसे वाटते कि फुकट मिळतात म्हणून तुम्ही इतके खाता आणि शेवटी VLCC किंवा तळवलकर मध्ये ३०-३५ हजार रुपये मोजून वजन कमी करायचा प्रयत्न करता या ऐवजी पार्टीत अर्ध पोट भरेल एवढेच खा आणि याच पैशाचे हेच पदार्थ इतर वेळेस बाहेर मुद्दाम विकत आणून जेवण ऐवजी खा. हीच परिस्थिती सगळ्या जणांची आहे. पोट "व्यवस्थित" भरल्या शिवाय "समाधानच" होत नाही या वृत्तीतून बाहेर आल्याशिवाय आपले वजन कमी होणार नाही. शॉर्ट कट काम करीत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
अ
असंका गुरुवार, 02/04/2016 - 06:22 नवीन
VLCC किंवा तळवलकर मध्ये ३०-३५ हजार रुपये मोजून वजन कमी करायचा प्रयत्न करता या ऐवजी पार्टीत अर्ध पोट भरेल एवढेच खा आणि याच पैशाचे हेच पदार्थ इतर वेळेस बाहेर मुद्दाम विकत आणून जेवण ऐवजी खा.
_/\_ याला म्हणतात विजन...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 02/04/2016 - 09:57 नवीन
पोट "व्यवस्थित" भरल्या शिवाय "समाधानच" होत नाही या वृत्तीतून बाहेर आल्याशिवाय आपले वजन कमी होणार नाही. >> हे भरपूरदा वजन कमी करून शिकलोय ;) त्यामुळे आता वजन कमी झाल्यावरच समाधान मानायचं ठरवलंय! ते चक्राकार गतीने म्हणजे मला दर तीनेक महिन्यांनी एडीपोस्टेट कमी आल्यावर आहार व्यायाम तीव्रता बदलून वजन कमी कराव लागेल अश्या उद्देशाने लिहायचं होत. तर तस खरच होईल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ग
गवि गुरुवार, 02/04/2016 - 10:21 नवीन
पर्ल्स अॉफ विज्डम म्हणतात ते हेच. अत्यंत उपयोगी विवेचन. धन्यवाद डॉक्टरसाहेब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
न
नंदन Wed, 02/03/2016 - 01:29 नवीन
लेख आवडला. विज्ञान लेखमालेत शोभून दिसावा, असा लेख!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 02/03/2016 - 04:15 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments
ब
ब़जरबट्टू Wed, 02/03/2016 - 04:41 नवीन
छान लेख.. महत्वाची माहिती मिळतेय.. एकंदरीत माझा एडीपोस्टेट जोशात आहे तर.. :(
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 02/03/2016 - 04:41 नवीन
लेख आवडला . तपशीलवार मांडणी आणि सोप्या भाषेत विवेचन. रोज किमान किती चालले पाहिजे(चाळीशी पार मनुष्याने) आणि साधारण स्थूल व्य्क्तीने दोरीवरील उड्या हा व्यायाम करावा काय.? शंकायन पालक नाखु
  • Log in or register to post comments
र
राजाभाउ Wed, 02/03/2016 - 05:27 नवीन
हां असे होते होय. पण म्हणजे बर्याच दिवसांपर्यंत योग्य व्यायाम व डायट केले तर हा एडीपोस्टेट खालच्या बिंदुवर येउन स्थिर होत असेल ना ?
  • Log in or register to post comments
ब
ब़जरबट्टू Wed, 02/03/2016 - 08:31 नवीन
शरीराचे काम एकंदरीत बरेच किचकट आहे. खुप आहारतज्ञ एका विशिष्ट लयेत शरीराला पुरवठा करू नका असे सांगतात. शरीर या बाबतीत नेहमी Confuse रहावे असे म्हणतात. एकाच प्रकारचा व्यायाम किंवा कमी डायट केल्याने Body Plateaus होऊ शकतो. म्हणजे अशी अवस्था जिथे शरीर तुम्ही केलेल्या प्रयत्नांना काहीसुध्दा फ़रक दाखवत नाही.. व हा Body फ्लतेऔस तो तोडण्यासाठी प्रसंगी दणकून खावे लागते.. :) लय गम्मत आहे राव... - हवा खाउन वजन वाढलेला.. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ
र
राजाभाउ Wed, 02/03/2016 - 12:06 नवीन
हो या Body Plateaus बद्द्ल पुर्वी पण वाचले होते. आहारतज्ञ व व्यायाम तज्ञ यासाठी मग व्यायाम व आहार याचा pattern बदलतात. पण मग या बदलाचा एक नविन pattern नाही का तयार होणार ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू
ब
ब़जरबट्टू Fri, 02/05/2016 - 07:49 नवीन
सहसा Pattern रिपीट होणार नाही असे सुचवल्या जातात. सहसा सुरवातीला एका दिवस कार्डियो, एक दिवस पुर्ण शरीर, मग हळुहळु अप्पर, लोवर, मग एका एका मसल्स ला पिळल्या जाते, अजून त्यात वजनाचे टप्पे वाढवणे, कधी झुम्बा, कधी डान्स हे सर्व आहेच. शरीराला कोणत्या मसल्सचा आज बळी जाणार के कळू न देणे हे याचे टार्गेट असावे. आणि शरीर वर्षभराचे Pattern लक्षात ठेवता नसावे, फ़ारतर महिना.. आता मी आजवर महिन्याच्या वर जिमलाच गेलो नाही त्यामुळे माझा पास.. :) डा. खरे व खरे अनुभवी जे आहेत ते सांगतीलच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ
स
सुबोध खरे Fri, 02/05/2016 - 08:00 नवीन
आता मी आजवर महिन्याच्या वर जिमलाच गेलो नाही हि तर नेहमीचीच गोष्ट आहे आणि हे सर्व जिम वाल्यांना माहित असते. म्हणून एक महिन्याची फी तीन महिन्यांच्या फी सारखी असते. म्हणजे ज्याची मुळात मानसिक तयारी झालेली नाही त्याच्याकडून तीन महिन्याची फी वसूल केली जाते. आणि इतरांसाठी वर्षाची फी "स्वस्तात" दिल्यासारखी दाखवली जाते म्हणून लोक एक वर्षाचे पैसे भरतात. आणि साधारण तीन महिन्याच्या पुढे कोणी नियमित पणे जात नाही. कारण खालीलपैकी कोणतेही असू शकते. १) नाईट शिफ्ट आहे २) पावसाळा, उन्हाळा / हिवाळा सुरु झाला ३) टूर वर/ ऑन साईट गेलो आणि परत आल्यावर जमले नाही ४) मुलांच्या परीक्षा होत्या. ५) ताप आला, आजारी पडलो, ६) पायाला/ हाताला फ्राक्चर झालं. ७) खास काही कारण नाही/ आलास/ कंटाळा आला राहिली गोष्ट व्यायामाची. हे तर प्रार्थनेसारखे आहे. कोणत्या देवाची करता आणी कोणत्या मंदिरात,गुरुद्वारा, बुद्ध विहार, चर्च किंवा मशिदीत करता ते महत्त्वाचे नाही. करणे महत्त्वाचे आहे. नुसते चालणे, धावणे, पोहणे हे पुरेशा जोरात आणी पुरेसा वेळ केला तरीही पुरते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू
प
प्रसाद१९७१ Fri, 02/05/2016 - 09:36 नवीन
राहिली गोष्ट व्यायामाची. हे तर प्रार्थनेसारखे आहे. कोणत्या देवाची करता आणी कोणत्या मंदिरात,गुरुद्वारा, बुद्ध विहार, चर्च किंवा मशिदीत करता ते महत्त्वाचे नाही. करणे महत्त्वाचे आहे.
डॉक्टर साहेब - यनावालांनी हे वाक्य वाचले तर ते चिडतील. ज्यांना प्रार्थना करणेच मान्य नाही त्यांनी काय करायचे? ( ह.घ्या. हे.वे.सां.न. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
र
राजाभाउ Fri, 02/05/2016 - 11:00 नवीन
राहिली गोष्ट व्यायामाची. हे तर प्रार्थनेसारखे आहे. कोणत्या देवाची करता आणी कोणत्या मंदिरात,गुरुद्वारा, बुद्ध विहार, चर्च किंवा मशिदीत करता ते महत्त्वाचे नाही. करणे महत्त्वाचे आहे. नुसते चालणे, धावणे, पोहणे हे पुरेशा जोरात आणी पुरेसा वेळ केला तरीही पुरते.
हे बाकी बरोबर आहे, बर्याच दिवसांनतर पुन्हा जिम सुरु केले आहे. आहारा बद्दलच्या आपल्या सुचना अंमलात आणण्याचा प्रयत्न चालु आहे. योगसनांचा या बाबतीत (वजन कमी करणे) काही लाभ होतो का ? मनापासुन धन्यावाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
असा मी असामी Fri, 02/05/2016 - 11:01 नवीन
"नुसते चालणे, धावणे, पोहणे हे पुरेशा जोरात आणी पुरेसा वेळ केला तरीही पुरते." व्यक्तीदिठ प्रमाण कसे ओळखायचे खरे साहेब तुम्ही पुढच्या भागात सांगालच हे माहिती आहे तरी रहावले नाही म्हणुन विचारले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
य
यशोधरा Fri, 02/05/2016 - 14:34 नवीन
राहिली गोष्ट व्यायामाची. हे तर प्रार्थनेसारखे आहे. कोणत्या देवाची करता आणी कोणत्या
नास्तिकांनी आता व्यायाम केला नाही तर ह्याचा दोष तुम्हांलाच हो आता डॉ.! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 02/05/2016 - 16:19 नवीन
यशोधरा ताई असंही डॉक्टर शिव्या खातोच. कारण सांगितलेला आहार आणि व्यायाम नियमितपणे करणारे लोक शंभरात दोन पेक्षा जास्त नाहीत. अमुक तमुक डॉक्टर कडे मी वजन कमी करण्यासाठी इलाज करतो आहे हे मात्र उत्साहाने सांगितले जाते. परंतु पाच सहा महिन्यांनी वजन जैसे थे असल्यावर डॉक्टरची उपचार पद्धती चुकीची आहे हा शिक्का बसतोच. आणि हे ९८ लोक आम्ही "काहीच" खात नाही हे मात्र आवर्जून सांगतात. म्हणून मी कुणाही माणसाचं वजन कमी करण्यासाठी इलाज करायला जात नाही. आजच सकाळी माझ्याकडे एक जैन बाई आल्या होत्या वय ३२, उंची ५ फूट ३ इंच, वजन ११० किलो. त्यांच्याच शब्दात मी एक फुलका खाल्ला तरी माझं पोट भरून जातं आणि आमचा फुलका किती लहान असतो? पण हे वजन गेल्या ५-६ महिन्यातच वाढलं आहे. अगोदर मी तशी बारीक होते. तेंव्हा वजन फक्त ८७ किलो होतं. मी थंडपणे सांगितलं तुमच्या फ्यामिली डॉक्टर ना हा रिपोर्ट घेऊन जा आणि सांगा. वजन कमी करायला असा "जाता जाता" सल्ला देणं म्हणजे नाक्यावर सिगारेट प्यायला उभ्या राहिलेल्या ओळखीच्या माणसाने शेअर बाजारातील "टिप"देण्यासारखं असतं. या लेखाचा मूळ हेतू या विषयाबद्दल जागृती निर्माण करणं हा आहे. वैयक्तिक प्रश्नांसाठी आपल्या जवळच्या डॉक्टर/आहार तज्ञाला भेटणे आवश्यक आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Fri, 02/05/2016 - 16:35 नवीन
अहो डॉ, मी गंम्मत केली होती! चिलॅक्स!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सूड Fri, 02/05/2016 - 13:32 नवीन
सहसा Pattern रिपीट होणार नाही असे सुचवल्या जातात. सहसा सुरवातीला एका दिवस कार्डियो, एक दिवस पुर्ण शरीर, मग हळुहळु अप्पर, लोवर, मग एका एका मसल्स ला पिळल्या जाते, अजून त्यात वजनाचे टप्पे वाढवणे
फार थोड्या जिम्स मध्ये हे पाळलं जातं. बर्‍याचशा जिम मध्ये ट्रेनर्स मख्ख बसून असतात कारण तुम्ही पर्सनल ट्रेनिंगसाठी अ‍ॅडमिशन घेतलेलं नसतं. अशा वेळी साधारण तीनेक महिन्यांनी आपण ट्रेनर लोकांना आठवण करुन द्यावी लागते की शेड्युल बदलून द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू
स
सुबोध खरे Fri, 02/05/2016 - 16:25 नवीन
सूड राव जिमचे ट्रेनर तुम्हाला "असाच" सल्ला द्यायला लागले तर त्यांना पर्सनल ट्रेनर म्हणून कोण पैसा देईल? सरकारी बाबू जर काम करायला लागले तर त्यांना कामासाठी "पैसा" कोण देईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
प
पाषाणभेद Wed, 02/03/2016 - 06:33 नवीन
डॉ. वजन, उंची आणि कॅलरी या तिघांच्या संबंधीत काही तक्ता वैगेरे आहे काय हो? बाकी लेख छानच. वजन कमी करणार्‍यांचे दुकाने बसतील असा.
  • Log in or register to post comments
म
मन१ Wed, 02/03/2016 - 06:48 नवीन
लिहित रहा.
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Wed, 02/03/2016 - 06:53 नवीन
छान लेख! क्लिष्ट माहिती सोप्या अन् रंजक पद्धतीने सांगीतल्याबद्द्ल धन्यवाद .
  • Log in or register to post comments
म
मोदक Wed, 02/03/2016 - 07:32 नवीन
वाचतोय वाचतोय.. हे सगळे भाग संपल्यानंतर एक सहज सोपा सल्ले देणारा पण एक लेख लिहा.काय खाणे टाळावे, त्याऐवजी काय खावे? उदा. चिकन मटण बंद करून मासे खावेत किंवा ३ आईसक्रीमच्या संडे ऐवजी एकच अंजीर स्कूप खाणे वैग्रै वैग्रै. ;)
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 02/03/2016 - 07:35 नवीन
सायकलवर बसून हे सारं कसं खाणार याचं ज्याम कुतुहल आहे मला.!!! पळालेला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Wed, 02/03/2016 - 07:37 नवीन
:p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
अ
असंका Fri, 02/05/2016 - 09:24 नवीन
-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
स
सुबोध खरे Wed, 02/03/2016 - 07:53 नवीन
मोदक राव वजन कमी करणे हे इतके सहज सोपे असते तर वर लिहिल्याप्रमाणे पंचकर्म VLCC, तळवलकर, गोल्ड जिम आणी विविध आहार तज्ञ, मेदारी, आयुरस्लिम, न्युट्रलाईट(एमवे) यांची दुकाने केंव्हाच बंद झाली असती. जितके शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी आणी नफा कसा मिळवावा सोपे आहे हे तितकेच सहज सोपे आहे. वजन कमी करणे हे सरकारी रुग्णालय किंवा रेल्वे स्टेशन स्वच्छ ठेवण्य़ा सारखे आहे. त्यावर कायम काम करीत रहावे लागते. दोन गोळ्या घेऊन होणारे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
प
प्रकाश घाटपांडे Mon, 03/14/2016 - 09:50 नवीन
वजन कमी करणे हे सरकारी रुग्णालय किंवा रेल्वे स्टेशन स्वच्छ ठेवण्य़ा सारखे आहे. त्यावर कायम काम करीत रहावे लागते.
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ड
डोके.डी.डी. Wed, 02/03/2016 - 07:53 नवीन
खूपच अप्रतिम लेख. माझे पण वजन हल्ली खूप जास्त झाले आहे. वय २७ उंची १७८ सेमी आणि वजन ११० किलो ...... उपाय असेल तर सुचवा .
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Wed, 02/03/2016 - 08:13 नवीन
मला तर ताणच आला हा लेख वाचुन.. काका.. अहो वजन कमी न व्हायला शरीरच एवढे प्रयत्न करणार असेल तर कसं हो व्हायचं माझं!!! मी मुदलात काहीच प्रयत्न करणं सोडुन दिलंय ती गोष्ट वेगळी ;) लेख आवडला.. किमान शरीरात काय घडतय ते तरी समजलं.. उगाच निराश होण्यात अर्थ नाही. प्रयत्न करत रहावे हेच बरे..
  • Log in or register to post comments
स
स्पा Wed, 02/03/2016 - 08:47 नवीन
माझ्या कामाचे तर काहीच नाही यात , शेवटचा प्यारा वाचला फक्त ;)
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 02/03/2016 - 09:08 नवीन
वाचत आहे. नेहमीप्रमाणे सोप्या भाषेत छान समजून देत आहात.
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 02/03/2016 - 09:28 नवीन
एकंदरीत कायमचं वजन कमी करणं जवळजवळ अशक्य आहे असं या वर्णनातून दिसतं आहे. भरपूर जास्त वजन असलेल्यांपुढे, म्हणजे त्याच्यासहित हॅपिली एव्हरआफ्टर राहणं शक्य नसलेल्यांपुढे फक्त सर्जरी हाच त्यातल्यात्यात हमखास मार्ग आहे का?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 02/03/2016 - 15:04 नवीन
ग वि साहेब and then they lived happily ever after असे कधी प्रत्यक्षात असतं का? तसाच कोणीही स्थूल व्यक्ती आपल्या वजनाबद्दल समाधानी नसतं. परंतु त्यासाठी घ्यायला लागणाऱ्या कष्टांची बर्याच लोकांची तयारी नसते. म्हणून हा प्रश्न असतो. सर्जरी हा सोपा उपाय तर नाहीच नाही. खरं तर परिस्थिती हाताबाहेर गेल्यावरच सर्जरी करावी. सर्जरीचे आपले मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम आहेत. U-LIPO किंवा LIPOSUCTION या सुद्धा गोष्टी तितक्या सोप्या नाहीत. निराश होण्याची गरज नाही परंतु चट मंगनी पट शादी किंवा QUICKFIX उपाय आज तरी नाहीत. या सर्वांबद्दल पुढे येईलच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
प
पद्मावति Fri, 02/05/2016 - 17:55 नवीन
माझ्या एका मैत्रिणीच्या ओळखीतल्या मुलीने टमी टक सर्जरी ( यालाच बहुतेक liposuction म्हणतात)केली. तिला वाटले की ती आता काहीही न करता आपण बारीक दिसणार. पण डॉक्टरांनी तिला सर्जरी च्या आधी चार पाच महिने व्यायाम, चांगला आहाराच्या मदतीने वजन कमी करायला लावले. त्यांनी सांगितले की तिचं आधी नैसर्गिक उपायांनी पोट फ्लॅट झाल्याशिवाय ऑपरेशन करता येणार नाही. नंतर ऑपरेशन झाल्यानंतर सुध्धा तीला सांगितलं की आता तिचं वजन किंचीत पण वाढायला नको कारण नाहीतर त्या झालेल्या सर्जरी चा काही उपयोग नाही. त्यामुळे सर्जरी जरी केली तरीही व्यायाम आणि योग्य आहाराला पर्याय नाही. त्यापेक्षा सर्जरी टाळणेच योग्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 02/03/2016 - 09:39 नवीन
क्लिष्ट शास्त्रीय माहिती मूळ गाभ्याला धक्का न लावता एकदम सोप्या शब्दात लिहिली आहे ! हे कसबाचे काम आहे !
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 02/03/2016 - 10:05 नवीन
वाचतोय, पुभाप्र!!
  • Log in or register to post comments
म
मोहन Wed, 02/03/2016 - 11:41 नवीन
खुपच सुंदर व माहितीपूर्ण लेख . पु.भा .प्र.
  • Log in or register to post comments
अ
असा मी असामी Wed, 02/03/2016 - 12:34 नवीन
आता कळायला लागले आहे की रोज अर्धा ते एक तास चालुन सुध्धा वजनात फरक का पडत नाहि ते.महत्वाची माहिती मिळतेय.. आणि वाचतोय...
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 02/03/2016 - 15:05 नवीन
साहेब अर्धा तास मोटार सायकल फिरवली आणी त्यात दोन लिटर पेट्रोल टाकले तर टाकी रिकामी कशी होणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असा मी असामी
अ
असा मी असामी गुरुवार, 02/04/2016 - 06:49 नवीन
हा हा...खरे आहे. सध्या पेट्रोल कमी जात आहे पण आधीचा साठा भरपुर आहे. :) भरपुर शंका आहेत, पुढच्या लेखांमध्ये त्यावर उत्तर मिळेल अशी आशा आहे. नाही मिळाले तर विचारतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 02/05/2016 - 05:58 नवीन
सध्या पेट्रोल कमी जात आहे पण आधीचा साठा भरपुर आहे. बस, थोडा धीर धरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असा मी असामी
र
रंगासेठ Wed, 02/03/2016 - 13:05 नवीन
हाही भाग नेहेमीप्रमाणेच मस्त झालाय.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा