मराठीची गळचेपी किंवा मराठीची हत्या, आपणच करत आहोत का?
विचारमथनाचा स्त्रोत : http://www.misalpav.com/node/35035
गेली ५ दशके मी या ना त्या रुपात भाषेचा वापर करतो.गुजरात, बिहार, कर्नाटक, तामिळनाडू ह्या राज्यांव्यतिरिक्त थोडे दिवस गल्फमध्ये पण पाट्या टाकत होतो.(पैसे मिळवायला जे काम करतो ते पाट्या टाकणे आणि मनाला समाधान करणारे काम करणे, म्हणजे कार्य करणे.ह्या विचारमंथनाचा काथ्याकूट परत कधी तरी....)
इकडे-तिकडे भटकतांना आलेले काही अनुभव.
सन १९७५ मी आणि किराणामाल वाला.दुकानदार मारवाडी आहे.दुकान नेहमीसारखेच अस्ताव्यस्त.
मी : दादा, २ किलो साखर आणि एक नारळ पाहिजे.
दुकानदार : खात्यावर टाकू की पैसे देणार?
मी : आईने पैसे दिले आहेत.
दुकानदार त्याच्या नोकराला मराठीत सांगतो आणि मला बिलाचे पैसे पण मराठीतच सांगतो.
==============================
सन २०१५, तेच दुकान आणि तोच दुकानदार.दुकान टापटीप.अगदी ६-सिग्माच्या प्रमाणे.
मी : १ किलो शेंगदाणे.
दुकानदार, शेंगदाण्याची १ किलोची पिशवी हातात ठेवतो आणि म्हणतो, "साब,ये देखो नया चावल आया है.सालभर भरनेका है तो बोलो.पैसा बाद में दो."
मी तांदूळाच्या गोणीची मागणी नोंदवतो.
दुकानदार नोकराला मारवाडी भाषेत, माझा पत्ता आणि किती वाजता घेवून जायचे.इत्यादी माहिती देतो.
१९७५ ते २०१५ पर्यंत ग्राहक आणि दुकानदार ह्यांच्यात काय फरक पडला ते सुज्ञांना सांगायला नकोच.
==================================================
१९७५ मी भाजी-बाजारात, आई बरोबर.
आई भाजीवाल्यांकडून भाजी घेतांना मराठीत बोलत होती.
------
सन २०१५ त्याच भाजी बाजारात , बायको बरोबर.
बायको भाजी वाल्याकडून हिंदीत बोलत होती.भाजीवाले बदलले.
=================================================
१९७५ ते २०१५ ह्या कालावधीत, रोजचा व्यवहार हिंदी भाषेत जास्त होतो आणि तो पण महाराष्ट्राच्या राजधानीत.मग तो बस प्रवास असो, किंवा रिक्षावाले, किंवा रेल्वे प्रवास.
तीच गत अन्न आणि औषधे पुरवणार्या दुकानांबाबतीत.
======================================
गुजरात, तामिळनाडू इथे मात्र अद्यापही रोजचे व्यवहार त्यांच्याच बोलीभाषेत होतात.
गल्फमधील प्रत्येक सेवा देणार्या लोकांना अरबी येत असतेच.अरबी लिहिता-वाचता येत नसले तरी.
माझे निरिक्षण : मराठीचा असो किंवा इतर कुठल्याही भाषेचा सार्वजनिक वापर, सेवा पुरवणार्या लोकांकडून जास्त होतो.आपण जर मराठीतच बोललो तर दुकानदार पण मराठीतच उत्तर द्यायचा प्रयत्न करतो.
असो,
बरेच दिवस ह्या विषयी मिपाकरांशी बोलायचे होते, म्हणून बोललो.मनांतले शल्य आपल्याच माणसांबरोबर बोलले की, मन पण जरा हलके होते.
वरील लेख वैयक्तिक वाटल्यास किंवा इतर भाषांचा अनादर करणारा वाटला, तर मी क्षमा मागतो.
पोरं कॉन्व्हेंटला टाकायची आणि मराठीची गळचेपी होतेय अशी ओरड करायची सध्या फॅशन आली आहे.या मतात किंचित अर्थ आहे पण ते पूर्णसत्य नाही हे स्वानुभवावरून सांगू शकेन. माध्यमिक शिक्षण संपल्यानंतर माझे मराठीत लिहिणे-शिकणे व काम करणे बंदच झाले. व्यवसायानुरूप घर सोडून इतर ठिकाणी मराठी वापरणे बंद झाले. तेव्हापासून, अनेक दशकांनी, चार एक वर्षांपूर्वी मिपावर लिहायला लागलो तेव्हा मी मराठीत सलग चार वाक्ये (अक्षरशः सलग चार वाक्ये) पहिल्यांदा लिहिली ! माझ्या मुलाचे बालवाडी ते उच्च्च शिक्षणापैकी निम्म्यापेक्षा जास्त शिक्षण परदेशी आणि अर्थातच इंग्लिशमधे झाले आहे. त्याला मराठी हा विषय शाळा-कॉलेजात कधीच नव्हता. पण घरात कटाक्षाने मराठीचा वापर असल्याने माझा मुलगा अस्खलित मराठी बोलतो हे मी अभिमानाने सांगून शकतो. पुल त्याचे आवडते लेखक आहेत. मराठी नाटक सिनेमांना तो नाक मुरडत नाही. किंबहुना, "बालगंधर्व" हा सिनेमा बघायला आवर्जून घेऊन जावून त्याने मला जरासा आश्चर्याचा धक्का दिला होता ! त्याच्या बोलण्यावरून, शाळा-कॉलेजात त्याला मराठी विषय कधीच नव्हता, यावर लोकांचा विश्वास बसत नाही. विशेषतः शास्त्रिय विषयावर चर्चा चाललेली नसली तर आमच्याकडून इंग्लिश व इंग्राजळेली मराठी विचार न करता "स्वाभाविकपणे" टाळली जाते. आजही दोन वेगवेगळ्या देशांतून एकमेकाशी बोलताना "आमची मराठी"च सहजपणे वापरली जाते. मराठीत शिकलेल्या अनेक पालकांच्या (त्यात माझे अनेक नातेवाईकही आलेच) मुलांना "आज तू पिंक ड्रेस घालून स्कूलमध्ये जा. ते टायगरचं पिक्चर घेतलंस ना मिसना शो करायला? टिफिन एंप्टी करून आणायचा हां." असं बोलताना ऐकली की हसू का वैषम्य वाटून घेऊ असा प्रश्न पडतो :(