Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विज्ञानदिनाच्या निमित्ताने

य
यनावाला
Sun, 02/28/2016 - 17:28
🗣 122 प्रतिसाद
विज्ञानदिनाच्या निमित्ताने ..... विज्ञान हे माणसाने संशोधित केलेल्या निसर्गनियमांचे, सत्यज्ञानाचे भांडार आहे. त्यात आपल्याला अचंबित करणार्‍या अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेतच. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही विषयावर, निरीक्षणांवर, सुसंगत विचार करून तर्कशुद्ध निष्कर्ष काढण्याची आणि ते शक्यतो प्रयोगाने सिद्ध करण्याची ती एक विचारसरणी आहे. वैज्ञानिकांनी ती विकसित केली आहे. या पद्धतीत कोणत्याही पूर्वग्रहाला थारा नाही. भावनेच्या गुंतवणुकीला स्थान नाही. कुणाच्याही अधिकारवाणीला मान्यता नाही. शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, यांची स्वीकृती नाही. शंका घ्यायच्या, त्यांची उत्तरे शोधायची, जे पटेल तेच तत्त्वत: सत्य मानायचे. तर्कशुद्ध निष्कर्ष काढायचे. मग ते आपल्याला आवडोत वा न आवडोत. कदाचित् ते आपल्या पूर्वानुभवांशी विसंगतही असतील. अशा परिस्थितीत आपल्या अनुभवांचे पुनरावलोकन करायचे. चिकित्सा करायची. आपण दोन उदाहरणे पाहू:- १)एकदा गॅलीलिओ आपल्या शिष्यांना म्हणाला, " झुकत्या मनोर्‍याच्या (टॉवर ऑफ पिसा) माथ्यावरून १किलो वस्तुमानाची वीट खाली सोडली तर पायथ्याशी यायला तिला जितका वेळ लागेल तितकाच वेळ २ किलोच्या विटेला लागेल." " ते कसे? अधिक जड वीट अधिक वेगाने कमी वेळात खाली येईल असे वाटते." शिष्य म्हणाले. " समजा मी मनोर्‍यावर उभा आहे. माझ्या डाव्या हातात १ किलोची वीट आहे.उजव्या हातातही १ किलोचीच वीट आहे. प्रथम ही वीट मी सोडली. ती तीन सेकंदांत खाली आली. आता डाव्या हातातील सोडली. तिला किती वेळ लागेल? " "तीन सेकंदच. ती १ किलोचीच आहे ना? " "ठीक. आता दोन हात जवळ आणतो. दोन विटांत चार बोटें अंतर ठेवून दोन्ही एकाच वेळी अशा उभ्या खाली सोडतो. आता काय होईल?" "दोन्ही विटा एकाच वेळी खाली येतील. त्यांच्यात चार बोटे अंतर ठेवा की अर्धे बोट ठेवा, वेळ बदलणार नाही." " छान! आता दोन विटा एकमेकींना चिकटूनच एकदम खाली सोडतो. काय होईल?" "दोन्ही एकाच वेळीं म्हणजे ३ सेकंदांतच खाली येतील." सगळे शिष्य एका सुरात म्हणाले. "हो ना? अरे एकमेकींना चिकटून ठेवलेल्या एक-एक किलोच्या दोन विटा म्हणजे म्हणजे २ किलोची एक वीट नव्हे काय? म्हणजे २ किलोची वीटसुद्धा तीन सेकंदांतच खाली येईल हे सिद्ध होत नाही का? विचार करा. " "अरेच्चा! खरेच की! ! पण तसे बुद्धीला पटत नाही." " तर आता मनोर्‍यावर जा आणि दक्षतापूर्वक प्रयोग करा.मी सांगितलेले तत्त्व खरे आहे की नाही ते ठरवा. माझी तर्कबुद्धी सांगते की ते खरे आहे. पण ते चुकीचे असूं शकेल." आपण जाणतो की गॅलीलिओचे तत्त्व अबाधित आहे. तर्कसुसंगत विचार करण्याची वैज्ञानिक पद्धती अशी असते. विज्ञानाचे अभूतपूर्व यश आणि अल्पकाळातील आश्चर्यजनक प्रगती यांच्या मुळाशी ही वैज्ञानिक पद्धत आहे. २) गंगाजल आणि यमुनाजल " हे पाहा इथे ठेवले आहे काचपात्र "अ", धारकता ३०० मिली. यात २५० मिली शुद्ध गंगाजल आहे." " कळले. ते दुसरे तसेच दिसणारे काचपात्र "ब" का? " " हो. त्यात २५० मिली शुद्ध यमुनाजल आहे." "ठीक. आता पुढे ?" " एका मोजपात्रात "ब" तील २० मिली य.ज. घेतले. ते "अ" तील गं.ज.मधे मिसळले. नंतर "अ" मधून नेमके २० मिली मिश्रण मोजपात्रात घेऊन "ब" मध्ये मिसळले." " समजले सगळे. आता दोन्ही पात्रांत मिश्रणे आहेत." " छान ! पण "अ" भांड्यात थोडे यमुनाजल आले आहे. तर "ब" त कांही गंगाजल गेले आहे. प्रश्न असा आहे की "अ" मधील य.ज. अधिक की "ब" मधील गं.ज. अधिक? की दोन्ही समान?" "समान नसावीत. कारण "अ" मध्ये २० मिली. शुद्ध यमुनाजल घातले, तर "ब" त २० मिली मिश्रण टाकले. या दोन कृती एकरूप नाहीत. त्यामुळे "अ" पात्रात आलेले यमुना जल हे "ब" पात्रात गेलेल्या गंगाजलाहून अधिक असावे असे मला वाटते. तरीपण निश्चितीसाठी काही अंकमोड करावी हे बरे." " असे म्हणता ? आता माझ्या प्रश्नांची विचारपूर्वक उत्तरे द्या. प्रारंभी आणि आता "अ" मधील द्रवाची पातळी तीच आहे ना? " "निश्चितच . २० मिली पाणी आले. २० मिली पाणी गेले." " प्रथम अ मध्ये य.ज. नव्हते. आता आहे. पातळी न बदलता ते "अ" पात्रात कसे मावले?" "अहो, अ पात्रातील काही गं.ज. गेले नाही का? त्यामुळे जागा झाली. त्यात य.ज. बसले." " वा ! छान. गेलेल्या गं.ज.पेक्षा आलेले य.ज. कमी किंवा अधिक असते तर द्रवाची पातळी बदलली असती ना? ती बदलली नाही. यावरून काय निष्कर्ष निघतो?" " जेवढे यमुनाजल आले तेवढेच गंगाजल गेले." " ते कुठे गेले? "ब" पात्रात ना? म्हणजे आता "अ" पात्रात जेवढे यमुनाजल आहे तेवढेच गंगाजल "ब" पात्रात आहे असे सिद्ध झाले. हो ना? " "हो. तसे पटते. पण ..." " अजून पण? बरे, बरे. अधिक सोपे करूया. ’अ" पात्रात २५० मिली शुद्ध गंगाजल,"ब" त तेवढेच यमुनाजल इथून परत विचार करू. समजा "अ" मधील पाण्याचे बिंदू गोठले. त्यांचे निळ्या रंगाचे छोटे छोटे एकाच आकाराचे १०,००० गं.ज.मणी झाले. तसेच "ब" मधील पाण्याचे पांढर्‍या रंगाचे १०,हजार य.ज. मणी झाले." " आता ही काय भानगड ? " " काही नाही. समजण्यासाठी केवळ कल्पना करायची." " हं ! कल्पना केली." " आता "ब" मधील २०० शुभ्र मणी काढून ते "अ" मधील मण्यांत मिसळले.पात्र हालवले. मग "अ" तील २००मिश्रमणी काढून ते "ब" पात्रात टाकले. आता दोन्ही पात्रांत प्रत्येकी १०,००० मणी आहेत." "कळले. कळले. "अ" पात्रात जितके य.ज.मणी आहेत तितकेच गं.ज. मणी "ब" भांड्यात आहेत. म्हणजे असलेच पाहिजेत." "समजले ना ?" "न समजायला काय झाले? सोपे तर आहे. पण ते भांडे हालवणे आवश्यक आहे का?" "शाबास ! कळलेच म्हणायचे सगळे." ** हे जग आहे तसे समजून घेणे , निसर्गाचे नियम शोधणे, निसर्गाच्या शक्तींचे आकलन करून घेणे, नैसर्गिक आपत्तींचे संभाव्य धोके ओळखून त्यांपासून मानवी जीवनाला सुरक्षित ठेवणे असा विज्ञानाचा प्रयत्‍न असतो. हे वैज्ञानिकांचे निसर्गाशी युद्ध नाही. निसर्गाला जाणून त्याच्याशी जुळवून घेत जीवन सुरक्षित ठेवण्याची धडपड आहे. अशा संकटातून आपल्याला वाचवणारा कोणी परमेश्वर असित्वात नाही. कितीही आळवणी करा, "धाव रे धाव आता" ! असे म्हणत कितीही काकुळतीला या, काहीही उपयोग होत नाही. संकटात धावून येणारा देव केवळ धर्मग्रंथातील काल्पनिक कथेत असतो. वास्तवात नसतो. माणसाने संशोधित केलेले विज्ञानच कामी येते. हे स्पष्ट झाले आहे. या प्रयत्‍नांत विज्ञान बर्‍याच अंशी यशस्वी ठरत आहे. आंध्रप्रदेशात आलेल्या पायलीन महावादळाच्या वेळी याची प्रचीती आली. संभाव्य वादळाचा अभ्यास, निरीक्षणे आणि गणिते करून वैज्ञानिकांनी तीन दिवस आधी शासनाला वादळाची पूर्वकल्पना दिली. त्यामुळे सहस्रावधी माणसांचे आणि गाई-गुरांचे प्राण वाचू शकले हा (२०१३)चा अनुभव आहे. ज्ञानप्राप्तीचा सध्या ज्ञात असलेला एकमेव विश्वासार्ह मार्ग म्हणजे ही वैज्ञानिक पद्धत. अन्य कोणत्याही मार्गाने सत्यज्ञान प्राप्त होत नाही. साक्षात्कार, आत्मानुभूती, समाधी, सद्गुरूने साधकाच्या डोक्यावर हात ठेवून तोंडाने मंत्र पुटपुटल्याने होणारे ज्ञानसंक्रमण (शक्तिपात) या सर्व भ्रामक गोष्टी आहेत. ज्याचा-त्याचा व्यक्तिनिष्ठ अनुभव म्हणजे सत्यज्ञान नव्हे. ते वस्तुनिष्ठ,सार्वत्रिक आणि स्थल-काल-व्यक्ति निरपेक्ष असावे लागते. वैज्ञानिक पद्धती परिपूर्ण नसेल पण गेल्या कांही शतकांत ती अधिकाधिक विकसित होत गेली आहे. विज्ञानाने अनेक सत्ये शोधून काढली आहेत. त्यांमुळे माणसाचे जीवन सुखी, सुविधापूर्ण आणि सुरक्षित झाले आहे. पण विज्ञानाने "अंतिम सत्य" शोधले आहे असा दावा कोणी करीत नाही. " माणूस परिपूर्ण नाही. म्हणून त्याचे संशोधन परिपूर्ण नाही. अंतिम नाही. त्यात सतत सुधारणा होत राहील. " असे वैज्ञानिक सांगतात. तर आमच्या धर्माला अंतिम सत्य गवसले आहे. (काय बरे असते हे अंतिम सत्य?) तो आकाशातील प्रभूचा संदेश आहे. तो अल्लाचा पैगाम आहे. तो प्रत्यक्ष भगवंताचा शब्द आहे. असे आध्यात्मिक लोक म्हणतात. विज्ञानाचा निसर्गाशी सतत संबंध येतो. निसर्गाच्या आश्चर्यकारक वैविध्याविषयीं विज्ञान आदर व्यक्त करते. निसर्गाच्या अभ्यासातून एखाद्या तत्त्वाचे, निसर्गनियमाचे आकलन झाले की वैज्ञानिकांना, निसर्गाच्या विराट रूपाशी एकरूप झाल्याचा प्रत्यय येतो. आणि ते आनंद व्यक्त करतात. या संदर्भात "हीरो राजाचा सुवर्ण मुकुट आणि आर्किमेडीज " ही सुपरिचित गोष्ट आठवते. पाण्याच्या टबात स्नान करताना आर्किमेडीजला एका निसर्गनियमचा साक्षात्कार झाला. त्यासरशी तो, "युरेका ! युरेका ! !" असे आनंदोद्गार काढीत निसर्गाला भेटण्यासाठी नैसर्गिक अवस्थेत बाहेर पडला. एका वैज्ञानिकाचा हा आनंदसोहळा होता. आपण ही गोष्ट शालेय पुस्तकात वाचतो. वर्गात शिकतो. पण आर्किमिडीजपुढे नेमकी कोणती समस्या होती ? त्याने ती कशी सोडविली? सुवर्णकाराने मुकुटातील सोन्यात हिणकस धातू मिसळला आहे हे राजदरबारातील विद्वानांना सप्रयोग कसे पटवून दिले ? या प्रश्नांचा विचार क्वचितच कोणी केला असेल. प्रत्येकाने स्वत:च्या मनाशी विचार करावा. आपल्याला तेव्हा समजले होते का? शिक्षकांनी कधी समजावून सांगितले होते का? तर्ककठोर विचार करणारे वैज्ञानिक भावनाशून्य असतात, असे काही जणांना वाटते. पण तसे नसते. किंबहुना प्रत्येक वैज्ञानिक हा संवदनशील असतोच. मात्र आपल्या भावनांवर तो बुद्धीचे नियंत्रण ठेवतो. भावनांच्या आहारी जात नाही. त्या अस्थानीं प्रकट करीत नाही. विज्ञान समजून घेणे अवघड असेल. अनेक वर्षे मनात जोपासलेल्या आपल्या आवडीच्या संकल्पना वैज्ञानिक शोधांमुळे खोट्या ठरल्या असतील .विज्ञानातून विकसित झालेल्या तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या वस्तू राज्यकर्त्यांना आणि उद्योजकांना उपलब्ध झाल्यावर त्या वस्तूंचा समाजविघातक असा दुरुपयोग होत असेल. पण विज्ञान जे सांगते ते करून दाखविते . प्रत्यक्षात आणते. हे कोणालाही मान्य करावेच लागेल. धर्ममार्तंड, योगगुरू, आध्यात्मिक गुरू असे लोक अनेक दावे करत असतात. अग्निहोत्र केल्याने वातावरण शुद्ध होते, हठयोगाने अष्टसिद्धी प्राप्त होतात, सूक्ष्म देह धारण करून अदृश्य होता येते. मंत्रजपाने अतींद्रिय शक्ती प्राप्त होते. दुसर्‍याच्या मनातील विचार जाणता येतात. मनसामर्थ्याने आपले विचार दूरस्थ व्यक्तीच्या मनात प्रकट करता येतात. ॐ काराच्या गुंजनाने प्रचंड ऊर्जा निर्माण होते. गायत्री मंत्राच्या जपाने अलौकिक शक्ती प्राप्त होते. अशा अनेक गोष्टी सांगतात. पण प्रत्यक्ष प्रयोग करून यांतील एकाची तरी प्रचीती दाखवा असे आव्हान दिल्यावर ,"हे धर्मग्रंथात लिहिले आहे, भगवंतांनी स्वमुखे वर्णिले आहे, त्रिकालज्ञ ऋषिमुनींनी सांगितले आहे," असे म्हणून गप्प बसतात. धर्ममार्तंड जे सांगतात , ग्रंथांत जे काही लिहिले आहे त्याचा कोणाला कधी अनुभव आल्याची विश्वासार्ह अशी एकही ऐतिहासिक नोंद नाही. आपल्या देशावर अनेक इस्लामी आक्रमणे झाली. त्यावेळी मंदिरांतील कैक मूर्ती आक्रमकांनी फोडल्या. पण कोण्या धर्माभिमान्याने योगसिद्धीचा, मंत्रजपाचा अथवा अन्य कोणत्या कर्मकांडाचा प्रयोग करून मूर्ती वाचविल्याचे अथवा भंग झालेली मूर्ती पुन: जोडल्याचे एकही उदाहरण नाही. विज्ञान आपला प्रत्येक नियम, प्रत्येक तत्त्व सिद्ध करून दाखविते. किंबहुना जे सिद्ध होऊ शकत नाही त्याला विज्ञानात स्थानच नसते. विज्ञानाला इतकी सफलता कशी मिळते? वैज्ञानिक ज्ञान इतके विश्वासार्ह का ठरते ? याचे प्रमुख कारण म्हणजे विज्ञानात अंगभूत असलेली स्वयं दोषनिवारण यंत्रणा. तसेच विज्ञानात सर्व प्रकारच्या शंकांचे, प्रश्नांचे स्वागत होते. विज्ञानात पवित्र ,पूजनीय, अपरिवर्तनीय असे काही नसते. नवनवीन कल्पनांना तिथे मुक्तद्वार असते. त्याच बरोबर प्रत्येक कल्पनेचे कठोर परीक्षणही होते. या सर्वांचा सुपरिणाम म्हणून विज्ञान अधिकाधिक विश्वासार्ह बनते. बहुसंख्य माणसांनी पवित्र मानलेल्या पिढ्यानुपिढ्या उराशी बाळगलेल्या श्रद्धा जेव्हा विज्ञाननिष्ठ विचारसरणीपुढे खोट्या ठरतात, माणसाच्या ऐहिक प्रगतीला बाधक ठरतात तेव्हा विज्ञानप्रेमी व्यक्ती त्या श्रद्धांवर टीका करतात. त्या अज्ञानातून जन्माला आलेल्या आहेत, माणसाने त्या सोडून द्यायला हव्या असे सांगतात. त्याने श्रद्धावंतांच्या भावना दुखावतात. खरे तर त्यांच्या श्रद्धा जर दृढ असतील,अतूट असतील तर त्यांना वैज्ञानिकांची टीका हास्यास्पद वाटायला हवी. त्यांनी त्या टीकेकडे दुर्लक्ष करायला हवे अथवा तिचा प्रतिवाद करायला हवा. पण तसे न होता त्यांच्या भावना दुखावतात. कारण वैज्ञानिकांचे तर्कशुद्ध म्हणणे त्यांच्या बुद्धीला पटते. पण पूर्वसंस्कारांमुळे त्यांची भावना ते मानत नाही. परिणामी हे खरे की ते खरे अशा द्विविधेत ते पडतात. त्यामुळे विज्ञान अहंकारी आहे, उद्दाम आहे आमच्या धार्मिक भावनांचा आदर ठेवीत नाही असे म्हणतात. खरे तर विज्ञान हे मानवतेचा एक अविभाज्य भाग आहे. आजचे तसेच भावी पिढ्यांचे जीवन अधिकाधिक सुविधापूर्ण , सुखी, समाधानी, आनंदी आणि सुरक्षित व्हावे, संस्कृती समृद्ध व्हावी, सर्वांची ऐहिक प्रगती व्हावी, अन्न-वस्त्र-निवारा-शिक्षण-आरोग्य या अत्यावश्यक प्राथमिक सुविधांपासून कुणीही वंचित राहू नये, निसर्गाचे संवर्धन करावे, पर्यावरणाचे संतुलन राखावे, ही विज्ञानाची प्राथमिक उद्दिष्टे आहेत. मात्र त्यासाठी भ्रामक, अज्ञानमूलक, गोष्टींच्या मागे न लागता विज्ञानसिद्ध, व्यावहारिक, उपयुक्त मार्गांचा अवलंब करावा असे विज्ञानाचे सांगणे असते. त्यांत अहंकार, उद्दामपणा नसतो. विज्ञान सांगते ते सत्यकथन असते. स्वातंत्र्य-समता-बंधुता-प्रेम या मूलभूत मानवी मूल्यांचा विज्ञान आदर करते. आपले विचार दुसर्‍यांवर लादावे असे विज्ञानाला कधीही वाटत नाही. मात्र इतरांना वैज्ञानिक विचार पटावे, त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करावा असे वैज्ञानिकांना अवश्य वाटते. माणूस परिपूर्ण नाही, त्याच्या हातून चुका होण्याचा संभव असतो याची जाणीव विज्ञानाला सदैव असते. प्रत्येक निसर्ग नियम माणसानेच शोधून काढला आहे. तो अंतिम नाही. अपरिवर्तनीय नाही. त्यात सुधारणा संभवतात. असेच विज्ञान मानते. प्रस्थापित विज्ञान नियमातील त्रुटी, मर्यादा निदर्शनाला आणणार्‍या, त्यांत सुधारणा घडवून आणणार्‍या वैज्ञानिकाचा विज्ञान स्वागत करते. सत्कार करते. याचे एक उदाहरण असे: न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत म्हणजे मानवी प्रजातीच्या प्रज्ञेची उत्तुंग झेप, अपूर्व उपलब्धी होय असे सार्थपणे मानले जाते. सूर्य-चंद्र ग्रहणे, कोणत्या दिवशी, नेमक्या कोणत्या वेळी, जगात कुठे, कशी दिसतील याची अचूक गणिते या सिद्धांताच्या आधारे आपण गेली तीनशे वर्षे करीत आहोत. याच नियमाच्या आधारे प्रक्षेपित केलेली आपली अंतराळयाने कित्येक महिने लक्षावधी किलोमिटरचा प्रवास करून ठराविक दिवशी, अवकाशातील नियोजित जागी पूर्व नियोजित कक्षेत , नेमक्या स्थानी पोहोचतात. यातील अचूकता आश्चर्यकारक, अचंबित करणारी आहे. आपण कोणता सिद्धांत मांडतो आहोत याची न्यूटनला पूर्ण कल्पना होती असेच म्हणावे लागते. न्यूटनची महानता शब्दातीत आहे. न्यूटनच्या या नियमापुढे वैज्ञानिक नतमस्तक झाले. पण त्यांनी त्याला तसे सोडले नाही. या नियमात कुठेतरी बारीक फट असेल का? त्रुटी असेल का? हा वैश्विक नियम सर्वकाळी, सर्वस्थळी, कोणत्याही परिस्थितीत अबाधित राहील का? याविषयी ते विचार करू लागले. वस्तूचा वेग अति प्रचंड असेल, गुरुत्वाकर्षण बल कित्येक पटीनी अधिक असेल तर न्यूटनचा नियम पूर्णांशाने खरा ठरणार नाही असे गणिते करून लक्षात आले. अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या सामान्य सापेक्षता सिद्धांत आणि विशेष सापेक्षता सिद्धांत यांचा जन्म या संशोधनातून झाला. प्रत्यक्ष खगोलीय निरीक्षणांतून या दोन नवीन सिद्धांतांना पुष्टी मिळाली. अंतराळ संशोधनाच्या गणितात न्यूटनचा नियम आजही उपयोगी पडतो. तोच वापरतात. पण असामान्य वेग आणि अतिबलवान गुरुत्वाकर्षण अशा क्वचित् आढळणार्‍या परिस्थितीत तो अपुरा पडतो. आईन्स्टाइनच्या सिद्धांतानुसार न्यूटनच्या गणितात सुधारणा करावी लागते. न्यूटनच्या महान सिद्धांतातील त्रुटी आणि त्याच्या मर्यादा आईन्स्टाइनने स्पष्ट केल्या. विज्ञान क्षेत्रात त्याचे केवढे तरी मोठे स्वागत झाले. आईनस्टाइनचे नाव अजरामर झाले. पण त्याचे हे सापेक्षतेचे सिद्धांत तरी त्रिकालाबाधित असतील का? वैज्ञानिक तसे मानत नाहीत. संशोधन चालू आहे. आता पुंज यामिकीच्या (क्वांटम मेकॅनिक्स) गणिताने पुढे काय नवीन आढळेल न कळे. "आमच्या धर्मग्रंथात काही चुका असू शकतील. त्रुटी आढळू शकतील." असे जगातील एकतरी धर्मगुरू कधी म्हणेल काय? कुठल्याही धार्मिकाला असे कधी वाटेल काय? "आम्ही अज्ञ बालके आहोत. हीन-दीन-पतित आहोत. दुर्बळ आहोत." असे देवापुढे म्हणायचे. जे श्रुति-स्मृति-पुराणोक्त आहे ते सगळे त्रिकालाबाधित सत्य मानायचे. आपण चिकित्सा करायचीच नाही. कोणी केली आणि श्रद्धेतील निरर्थकता सप्रमाण दाखवून दिली की आमच्या भावना दुखावल्या म्हणून चवताळून उठायचे आणि सत्य सांगणार्‍याचा जीव घ्यायला धावायचे. अशाने धर्मात सुधारणा होऊ शकेल काय? आजवर ज्या धार्मिक सुधारणा झाल्या त्या धर्म न मानणार्‍या समाजसुधारकांनी राज्यकर्त्यांकडून करवून घेतल्या. त्या सुधारणांना धर्मिकांनी कायम विरोध केला. अगदी सतीबंदी कायद्याला सुद्धा. आज विज्ञान हेच माणसाचे आशास्थान आहे. विकसनशील देशांना अंधश्रद्धा, दारिद्र्य, अज्ञान, मागासलेपणा, यांच्या विळख्यातून बाहेर बाहेर पडण्यासाठी विज्ञानाचा प्रसार,वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार , हाच एक विश्वसनीय मार्ग आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि नागरीकरणाला चालना मिळू शकेल. ज्या देशांत विज्ञानाचा अव्हेर करून देव-धर्माचे ,अंधश्रद्धांचे स्तोम माजते ते देश आर्थिकदृष्ट्या मागासलेले राहातात. भारतात हा धोका आज वाढत आहे. ................................................................................................................................
वर्गीकरण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
34538 वाचन

💬 प्रतिसाद (122)
ग
गामा पैलवान Mon, 03/07/2016 - 13:44 नवीन
तजो, इतके दिवस गुजरात पेटतं होतं म्हणता तुम्ही. तर इतके म्हणजे किती? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
प
प्रकाश घाटपांडे Sat, 03/05/2016 - 05:23 नवीन
सार्वजनिक क्षेत्रात वावरतांना काही किमान सचोटी नको का?
हवी ना! सचोटी ची नेमकी संकल्पना व किमान म्हणजे नेमकी किती या मुद्यांभोवती चर्चा फिरत राहते व मूळ लेखातील विवेचन दुर्लक्षित राहते. एनजीओ व त्याचे बदलते स्वरुप हा एक वेगळा विषय आहे. त्यावर आजचा सुधारक मासिकाने एक विशेषांक काढला होता. असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
सतिश गावडे Sun, 03/06/2016 - 15:58 नवीन
एनजीओ व त्याचे बदलते स्वरुप हा एक वेगळा विषय आहे. त्यावर आजचा सुधारक मासिकाने एक विशेषांक काढला होता.
काका, हा विशेषांक जालावर उपलब्ध आहे का? नसल्यास छापिल प्रत कुठे मिळेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Mon, 03/07/2016 - 05:32 नवीन
जालावर उपलब्ध नाही. पण माझ्या कडे आजच्या सुधारकचे पहिल्या अंकापासून सर्व अंक वर्षानुसार बाईंडिंग केलेले आहेत. माझ्याशी संपर्क साध
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Mon, 03/07/2016 - 18:56 नवीन
धन्यवाद काका. संपर्क साधण्यापेक्षा जमलं तर प्रत्यक्षच भेटू. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
ग
गामा पैलवान Wed, 03/02/2016 - 14:59 नवीन
तजो, >> विण्टरेस्टींग. अफलातून लॉजिक आहे. आय होप तुम्ही हे लॉजिक सर्व बाबतीत पाळता. दाभोलकर यांच्यासारखी जी माणसं समाजाला शहाणपणा शिकवू पाहतात, त्यांनी किमान स्वच्छ व कायदेशीर कारभार करावा. अन्यथा लोका सांगे ब्रह्मज्ञान अशी गत होते. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
मम्बाजी सर्वज्ञ Wed, 03/02/2016 - 16:22 नवीन
सहमत! पण विज्ञानाची पूजा करणे म्हणजे धर्मावर चाबूक ओढत सुटणे बरोबर वाटत नाही. हे म्हणजे अरविंदा ने नरेंद्राला 'माझी देशभक्ती तुझ्या देशभक्ती पेक्षा मोठी आहे' असे म्हणणे वाटते. असो. लेख आवडला. पहिले उदाहरण सोपे होते. दुसर्या उदाहरणाच्या शेवटा पर्यंत पोचता पोचता नक्की कशात काय गेले ते झेपले नाही. ते तीन भांड्यांच्या खाली १ नाणे लपवण्याच्या आणि मग भांडी फिरवण्याच्या खेळासारखे झाले जर. थोडे अजून सोपे केलेत तर लवकर समजेल. बाय द वे यनावाला साहेब, एक विनंती आहे. काहीही झाले कि देव देवतांच्या मागे तोफा घेऊन सुटण्या अगोदर एकदा शर्ली हेब्डो सारखी चित्रे काढून दाखवा. सहिष्णुता आणि असहिष्णुता म्हणजे काय हे लगेच कळेल. देश सोडायची गरजाही पडणार नाही!
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Wed, 03/02/2016 - 16:24 नवीन
मम्बाजि रॉक्स :)
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 03/02/2016 - 17:44 नवीन
+∞ -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
ग
गामा पैलवान Wed, 03/02/2016 - 18:04 नवीन
एस, >> पुराव्यादाखल काय दिलेय तर हिंदूजागृतीसारख्या फॅसिस्ट संस्थळावरचा लेख. वा! पुरावा धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात आहे. हिंजस फक्त उल्लेख करतेय. २०१० नंतर हिशोब दिलाय का परिवर्तन न्यासाने? पैसे खायचे ते खायचे आणि वर गप्पा प्रबोधनाच्या मारायच्या ! सुंदर धंदा (की धंदे). आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 03/02/2016 - 18:13 नवीन
हे इथे आहे नि ते तिथे आहे इतकेच फक्त तुमची ती जागृतीसमिती करू शकते. खरेच तसे असेल तर इथे हिशेब दाखवा म्हणजे दाभोलकरांनी पैसे खाल्लेत की नाही हे सिद्ध होईल. बादवे, मग न्यायालयाने काय निकाल दिला? की समितीने अजून तक्रारच दाखल केली नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 03/03/2016 - 04:55 नवीन
@बादवे, मग न्यायालयाने काय निकाल दिला? की समितीने अजून तक्रारच दाखल केली नाही?>> ते तसं काहीही होणार नाही. कारण मग दुसय्रानवर राळ उडवायला काही शिल्लक कसं राहणार? खरच सर्व बाबी पुर्ण केल्या तर सगळं स्वछपणे लोकांसमोर मांडावे लागेल. मग आली ना ह्यांची टनाटनी पंचाईत! असत्याशी हातमिळवणी केलेल्या या टवाळांकडून आपण अशी अपेक्षाहि ठेवता कामा नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ग
गामा पैलवान गुरुवार, 03/03/2016 - 13:46 नवीन
एस, >> की समितीने अजून तक्रारच दाखल केली नाही? समितीने कशाला तक्रार करायची? धर्मादाय आयुक्त झोपा काढताहेत? इतके पैसे खर्च करून प्रशासकीय डोलारा पोसायचा कशासाठी? फड्डेबाजांना रान मोकळं मिळावं म्हणून? पैसे खाणाऱ्यांची बाजू घेता नाही आली तर बघा जरा. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/03/2016 - 14:13 नवीन
समितीच्या कांगावेखोरपणाबद्दल धर्मादाय आयुक्तांना लक्ष द्यावंसं वाटलं नसेल. तुम्हाला विरोधी वाटणार्‍या व्यक्तीबद्दल कार्यवाही झाली नाही म्हनून आयुक्त झोपा काढतात काय अशी विधानं करण्याची मुभा मिळत नाही. ज्याने आरोप केला त्याला पुरावे द्यावे लागतात. मी ही असे म्हणु शकतो की गापै नावामागे जो इसम आहे तोच २६-११ च्या मास्टरमाइण्ड आहे तर ते खरेच मानले पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Fri, 03/04/2016 - 14:14 नवीन
तजो, त्याचं काय आहे की खरंतर हिंदूच झोपा काढताहेत. म्हणूनच धर्मादाय आयुक्तांनी झोपेचं सोंग घेऊ शकताहेत. माझी शब्दरचना जराशी चुकलीच. याचसाठी हिंदू जनजागृती समिती तिच्या नावाप्रमाणे हिंदूना जागं करतेय. ज्यांना झोपेचं सोंग प्रिय असतं ते कधीच जागे होत नसतात. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Fri, 03/04/2016 - 14:42 नवीन
आली का हरदासाची कथा मूळपदावर? इथे हिंदूंचा काय संबंध? गैरव्यवहार गैरव्यवहार आहे. ह्या हिंदुजनजागृतीचा सर्व व्यवहार स्वच्छ धुतल्या तांदलाचा आहे ह्यावर तुमचा विश्वास असेलच. त्याला कुठलाही धर्मादाय आयुक्त लागू असायचे गरज नसेल. तसेच इतकी मठं, मंदिरं, इत्यादी बोकाळलेत त्याबद्दल तुमची ही जनजागृती जागं करायचं काम करते का? उगा टुकार लॉजिक घेउन येत नका जाऊ हो. आम्हाला राहवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
प
प्रचेतस Fri, 03/04/2016 - 14:45 नवीन
तजो, कशाला वेळ घालवताय उगा, त्या कोडग्या सनातन्यांना काहीही फरक पडणार नाहीये माहिती आहे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Fri, 03/04/2016 - 15:12 नवीन
ओके वल्लीसर. तुम्ही म्हणताय ते बरोबर. निष्फळ चर्चेत राम नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अभ्या.. Fri, 03/04/2016 - 15:20 नवीन
अरे अरे जोकरसाब. शेवटी कशातही राम असावाच लागतो म्हणा की? (टेक्लाईट सरजी. चर्चा थांबवली तरी माझी कधीच हरकत नसते. ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Fri, 03/04/2016 - 16:26 नवीन
=)) =)) आम्ही never argue with stupid वाल्या कोटमधले स्टुपिड आहोत. आमच्याकडच्या अर्ग्युमेंटच्या एक्पिरियंसने आम्ही समोरच्याला हरवतो. स्टुपिडपनाच्या नाही. पण लक्षात कोण घेतो? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
य
यनावाला Fri, 03/04/2016 - 17:11 नवीन
डॉ.नरेन्द्र दाभोलकर यांच्यावर केलेला हा अरोप पूर्णतया बनावट आणि खोटा आहे. केवळ त्यांच्याविषयीच्या द्वेषभावनेने केलेला आहे. धर्मादय आयुक्तांकडे असा पुरावा असता तर वृत्तपत्रांत ही बातमी कधीच छापून आली असती. कुठल्याही प्रतिष्ठित वृत्तपत्रात डॉ.दाभोलकरांविरुद्ध एक ओळसुद्धा कधी छापून आलेली नाही. डॉ.दभोलकरांनी गेली सत्तावीस वर्षे समाजप्रबोधनाचे कार्य समर्पण भावनेने, निरपेक्षपणे केले. महाराष्ट्रातील सुबुद्ध जनता डॉक्टरांच्या कार्याचे मोल जाणते. ती त्यांची ऋणी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ग
गामा पैलवान Fri, 03/04/2016 - 17:53 नवीन
यनावाला, >> धर्मादय आयुक्तांकडे असा पुरावा असता तर वृत्तपत्रांत ही बातमी कधीच छापून आली असती. तुमचा वृत्तपत्रांवर भारीच भरवसा आहे. यालाच अंधळा विश्वास म्हणतात. उगीच कुठल्या बुवाबापूस नावे ठेवायला नकोत. दाभोलकरबापू की जय बोला. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
ग
गामा पैलवान Fri, 03/04/2016 - 17:53 नवीन
प्रचेतस, मला कोडगा व सनातनी म्हंटल्याबद्दल आभार. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ए
एस गुरुवार, 03/03/2016 - 14:39 नवीन
मी काय करावे व काय करू नये हे आपण सांगितले नाहीत तर जरा बरे होईल नाही का गामासाहेब? आ. खरोखरीचा न. एस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Fri, 03/04/2016 - 14:14 नवीन
एस, रागावलात माझ्यावर? काही अधिकउणं बोलून गेलो असेन तर आजिबात मला माफ करू नका. राग येणे ही जिवंतपणाची खूण आहे. जशी माझी चीड आली तशीच घोटाळेबाजांचीही येऊद्या. बस, इतकंच! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस Fri, 03/04/2016 - 15:40 नवीन
नक्कीच. फक्त कोण घोटाळेबाज आहे आणि कोण निर्दोष हे सनातन्यांच्या बेछूट व बिनबुडाच्या आरोपांवरून कुणी ठरवत नसते, इतके जरी आपण लक्षात ठेवले तरी पुरे आहे. आपणांस बाकी इतके फुटेज पुरेसे आहे. इत्यलम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
स्वधर्म गुरुवार, 03/03/2016 - 14:28 नवीन
गामा साहेब, अापले दाभोळकर यांच्या संदर्भाने खालील प्रतिसाद व मते वाचली. > दाभोलकरांच्या परिवर्तन न्यासामध्ये अनेक गैरप्रकार झाले आहेत. > तुम्ही धर्मादाय आयुक्तांकडे विचारणा करून परिवर्तन न्यासाचे हिशोब पाहायला मागवू शकता. हिंजसचे आरोप खरे का खोटे त्याचा प्रत्यक्ष पुरावा मिळेल. > चोराच्या संगतीत वावरणारा चोरच असतो. > दाभोलकर यांच्यासारखी जी माणसं समाजाला शहाणपणा शिकवू पाहतात, त्यांनी किमान स्वच्छ व कायदेशीर कारभार करावा. अन्यथा लोका सांगे ब्रह्मज्ञान अशी गत होते. अापल्या सर्वात पहिल्या प्रतिसादात अापण अादिशंकराचार्यांचा दाखला दिला अाहे. त्यांनी स्थापन केलेले मठ (पीठे) ही अाजही अत्यंत श्रध्येय अाहेत, व ती शंकराचार्यच चालवातात. २००४-२००५ मध्ये कांची पीठाच्या शंकराचार्यांवर नुसते अारोपच झाले नव्हते तर, त्यांना या प्रकरणात काही महिने अटकही झाली होती. कांची मठाची १९४ बॅंक खाती गोठवली गेली होती. दाभोळकरांवर हिंजस सारख्या संस्थेने फक्त ‘आरोप’ केले अाहेत,तर अापण त्यांच्याबाबत वर काय काय बोलला अाहात. तर वरील शंकराचार्य व पीठाबाबत अापले काय मत अाहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
स्वधर्म गुरुवार, 03/03/2016 - 15:04 नवीन
https://en.wikipedia.org/wiki/Sankararaman_murder_case http://timesofindia.indiatimes.com/india/Kanchi-Shankaracharya-released-from-jail/articleshow/987304.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
ग
गामा पैलवान Fri, 03/04/2016 - 14:14 नवीन
अवांतर : स्वधर्म, जयेंद्र सरस्वती आणि विजयेंद्र सरस्वती यांनी शंकररामन यांची हत्या केल्याचा फुटक्या कवडीइतकाही पुरावा नसलेली केस आहे. हे न्यायालयाचं म्हणणं आहे. सत्र न्यायालयाने पोलिसांवर 'विश्वास' ठेवून जयेंद्र सरस्वतींना आतच ठेवलं. मग मद्रास उच्च न्यायालयासमोर अर्ज सुनावणीला आला. तिथे पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या चिंधड्या उडाल्या. म्हणे जयेंद्र सरस्वतींनी आयसीआयसीआय ब्यांकेतून पैसे काढून हत्येची सुपारी दिली. च्यायला, मठाचं खातंच नाही त्या बँकेत! पोलिसांनी मग जमीन विकून आलेल्या पैशातून हत्येची सुपारी दिली म्हणून युक्तिवाद केला. तर तो पैसा मठाच्या खात्यावरच होता. हे 'पुरावे' पाहिल्यावर उच्च न्यायालयात साहजिकच जामीन संमत झाला. ज्या दिवशी त्यांना जामीन मिळाला त्याच दिवशी विजयेंद्र सरस्वतींना अटक करण्यात आली. त्याच आरोपांखाली. लक्षात येतंय ना कोण सूडबुद्धीने वागतंय ते? पुढे नऊदहा वर्षांनी २०१३ साली ही कसलाही दम नसलेली मुडदूस केस कोलमडली. जयेंद्र सरस्वती आणि विजयेंद्र सरस्वती दोघेही निर्दोष आहेत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
स
स्वधर्म Tue, 03/08/2016 - 07:39 नवीन
गामा साहेब, एका बाजूला शंकराचार्यांवर केस उभी राहिली, त्यांना अटक झाली. अनेक साक्षीदार फिरले, एकाचा खून झाला व शेवटी शंकराचार्यांवर अारोप शाबित होऊ न शकल्यामुळे त्यांची सुटका झाली. विशेष गोष्ट अशी की शंकराचार्यांवर खटला दाखल झाला तेंव्हा जयललिता मुख्यमंत्री होत्या व अटकेला परवानगी देताना जयललिता यांना दु:ख झाल्याचे त्यांनी म्हटले अाहे. त्यांची शंकराचार्यांना असलीच तर सहानुभूती होती. म्हणजे तसाच काही पुरावा असल्याशिवाय एवढ्या मोठ्या असामीला अटक होऊ शकेल काय? उलट दाभोळकर हे सतत सरकारशी संघर्षच करत अाले, तरीही सरकारजवळ त्यांना अटक व्हावी अगर निदान चौकशी सुरू व्हावी, इतकाही पुरावा सरकारला मिळू शकलेला नाही. तरिही तुंम्ही त्यांना सरळ अारोपीच्या पिंजर्यात उभे केलेत. जो न्याय शंकराचर्याला, तोच न्याय दाभोळकरांना लावावा असं अापणांस वाटत नाही का? श्रध्देमुळे (काहीजणांना) अाधार मिळत असेल, शांती लाभत असेल, पण जर त्यामुळे एका व्यक्तीला विनाकारण सहानुभूती व दुसर्या व्यक्तीचा विनाकारण (मते न पटल्याने) द्वेष होत असेल, तर श्रध्देच्य फायद्यापेक्षा तोटा मोठा अाहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
भ
भाऊंचे भाऊ गुरुवार, 03/03/2016 - 04:09 नवीन
कोणतीही व्यक्ती जोपर्यंत स्वत: मधे प्राण निर्माण करायचे रहस्य पूर्णपने जानत नाही तोपर्यंत तो आयुष्यात केंव्हा ना केंव्हा इच्छे अनिछ्चेने बाहय शक्तीला शरण जाणारच. कारण ती रचना निसर्गाने केली आहे आणी आर्ट ऑफ सर्वायविंगची ती मुलभुत ता आहे.... बाकी उलाला उलाला करणारे किती आले अन किती गेले त्याने ना विज्ञानाच्या विकासाला फरक पडला ना ईश्वर नामक बाह्य शक्तिला शरण जायच्या प्रवृत्तीला... असो तुमची चिकाटी सॉलिड आहे
  • Log in or register to post comments
त
तिमा गुरुवार, 03/03/2016 - 14:45 नवीन
तुम्ही पुढच्या लेखांत फक्त विज्ञानाची महती लिहा. धर्म, देव वगैरेची वाच्यताही करु नका. एक शास्त्रीय प्रयोग म्हणून. त्यानंतर कशा प्रकारच्या प्रतिक्रिया येतात, ते पहाणे मनोरंजक ठरेल.
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/03/2016 - 15:04 नवीन
अगदी अगदी. शंभरपट सहमती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
अ
अभ्या.. गुरुवार, 03/03/2016 - 19:30 नवीन
हे तर मला चित्र न वापरता बॅनर बनवायला सांगितल्यासारखे झाले. ;) . . . . जमेल म्हणा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
म
मम्बाजी सर्वज्ञ Fri, 03/04/2016 - 11:35 नवीन
सहमत. धर्माशी स्पर्धा करण्याच्या नादात आणि धर्म कसा चुकीच्या दिशेने नेतो हे दाखवण्याच्या नादात रस्ता चुकतो असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
ब
बाळ सप्रे Fri, 03/04/2016 - 12:20 नवीन
अगदी सहमत.. अगदी काँग्रेसच्या कारकीर्दीतल्या कुरापती काढणे टाळून केवळ विकास करून दाखवण्याइतके समर्पक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
स
सुधीर कांदळकर Sun, 03/06/2016 - 15:53 नवीन
तरीही वैज्ञानिक लिखाण करतांना धर्म वगैरे बाबींचा उल्लेख करून त्यांना आपण अवास्तव महत्त्व दिलेले आहे. अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचा अनाठायी उल्लेख करून महत्त्व वगैरे प्राप्त करून देऊं नये ही नम्र विनंती. आपला मार्ग आपण शांतपणे चोखाळावा. भलत्यांकडून नसत्या सुधारणेची अपेक्षा ठेवू नये.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sun, 03/06/2016 - 16:24 नवीन
मांडलेले मुद्दे अतिशय योग्य असले तरी इतका प्रखर बुद्धीवाद सार्‍यांनाच झेपणारा नाही. धर्म आणि श्रद्धा ही समाजाची गरज आहे. त्यामुळे श्रद्धांवर सरसकट टिका न करता धर्म आणि श्रद्धा कालसुसंगत कशा करता येतील, त्यातील अपप्रवृत्ती कशा दूर करता येतील हे पाहणे सध्याच्या काळात अधिक हितावह असेल. बहुतेक डॉ. दाभोलकरांना हे नेमकेपणाने उमगले होते. त्यामुळे त्यांनी समाजाला चुचकारत चुका दाखवून दिल्या. हेच त्यांच्या चळवळीच्या यशामागचे कारण असावे. ज्यांच्या हितसंबंधांना बाधा येते अशांनीच दाभोलकरांच्या कार्याला तीव्र विरोध केला. सर्वसामान्यांना त्यांच्या कार्याबद्दल आपुलकी आणि आदर होता. जनाधार नसता तर त्यांची चळवळ यशस्वी झालीच नसती. १६३२ साली गॅलिलिओने केलेल्या पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्याच्या विधानापासून आधुनिक विज्ञानयुगाची सुरुवात मानली तर मागच्या जवळपास ४०० वर्षात नवनविन शोध लागत असताना धर्म आणि श्रद्धा कालबाह्य व्हायला हव्या होत्या. मात्र आजचे चित्र बरोबर उलटे आहे. जसजसे माणसाचे निसर्गासंबंधीचे ज्ञान वाढत आहे तसतसा माणूस अधिकाधिक धार्मिक आणि सश्रद्ध होत आहे. याला तुमच्या माझ्यासारखे अपवाद जरी असले तरी ते सार्वत्रिक चित्र नाही. मंदिरांबाहेरच्या रांगा वाढत आहेत, मंदिरांच्या बाहेरील याचक जरी "दे माय पोटाला" म्हणत असले तरी मंदिरांच्या दानपेटया नोटांनी भरून वाहत आहेत. भक्त लोक देवाला इतका पैसा देत आहेत की तो मोजण्यासाठी यंत्र ठेवावी लागत आहेत, माणसं राबवावी लागत आहेत. नविन वाहन आणल्यानंतर त्याची देवाची पुजा करावी अशी पुजा होत आहे; अगदी त्या वाहनाचा भाग अन भाग सुटा करून तो कसे कार्य करतो हे सांगता आले तरीही. मांडायचा मुद्दा हा की अशा "एक घाव दोन तुकडे" लेखांनी अपेक्षित बदल घडणार नाही. उलट विरोध वाढेल. त्यासाठी या गोष्टींच्या मुळाशी गेले पाहीजे. त्यांची समाजाला असणारी गरज समजून घेतली पाहीजे. आणि मग विवेकाने परिवर्तनाच्या दिशेने पावलं टाकायला हवीत.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Sun, 03/06/2016 - 16:56 नवीन
प्रतिसादाचा एकंदरीत गाभा पटलेला आहे. फक्त एका बाबतीत प्रश्न आहे.
मागच्या जवळपास ४०० वर्षात नवनविन शोध लागत असताना धर्म आणि श्रद्धा कालबाह्य व्हायला हव्या होत्या. मात्र आजचे चित्र बरोबर उलटे आहे.
हे खरं आहे का? धर्मसत्ता मानवाच्या जीवनावर जितकी कणखर पकड घेऊन बसली होती ती खिळखिळी झाली आहे यात वादच नाही. त्याकाळी तुम्ही जर काही धर्मविरोधी वागत असाल तर चर्च तुम्हाला बोलवून इन्क्विझिशन नावाचा क्रूर छळ करू शकत असे. भारतात छळाऐवजी वाळीत टाकणं असे. सर्वच समाजांमध्ये धर्मसंस्थांचे हे दात आणि ही नखं झिजलेली आहेत, बोथट झालेली आहेत. त्यामुळे तत्त्वतः ज्यांना इच्छा नसूनही या जोखडात बांधले गेले अशांची संख्या कमी व्हायला हवी. कदाचित झालीही असेल, पण जे धार्मिक आणि सश्रद्ध आहेत त्यांची क्रयशक्ती वाढल्याने, आणि माध्यमांतून आपल्याला जास्त दिसत असल्यामुळे 'चित्र' उलट दिसत असेल. (म्हणजे समजा बलात्कारांची संख्या वाढत नसेल, कदाचित किंचित कमीच होत असेल आणि रिपोर्टिंगचं प्रमाण प्रचंड वाढलेलं असेल, तर रिपोर्टेड बलात्कार वाढताना दिसतील - तसं काहीसं.) मात्र हे मोजायचं कसं हे मला माहीत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ग
गामा पैलवान Sun, 03/06/2016 - 18:13 नवीन
राजेश घासकडवी, धर्म आणि धर्मसत्ता यांत महदंतर आहे. सामान्य भारतीय जेव्हा धर्माबद्दल बोलत असतो तेव्हा तो सेमेटिक धर्मसत्तेबद्दल बोलत नसतो. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
र
राजेश घासकडवी Sun, 03/06/2016 - 20:01 नवीन
ख्रिश्चॅनिटीची धर्मव्यवस्था नीट बांधून काढलेली आहे आणि हिंदू धर्माची व्यवस्था स्थानिक पातळीवर चालणारी आहे. या अर्थाने फरक आहे. त्यामुळे ख्रिश्चॅनिटीने क्रूसेड्स घडवले तसे हिंदू धर्मगुरूंना घडवणं शक्य नव्हतं. पण सर्वसामान्य माणसाला धर्मनियम पाळायला लावण्यासाठी धर्मसंस्था केंद्रीभूत आहे की वितरित आहे याने तितका फरक पडत नाही. स्थानिक पातळीवरही धर्म मोडणारांना वेगवेगळ्या पद्धतींनी ताळ्यावर आणता येतं. आणि हे उपाय वापरले गेलेले आहेत - सर्वच धर्मांत. माझा मुद्दा आहे की या जाचणाऱ्या दोऱ्या बऱ्याचशा सुटलेल्या आहेत, किंवा सैल झालेल्या आहेत. तरीही 'धर्मश्रद्धा वाढत आहेत' हे 'चित्र' किंवा परसेप्शन का दिसतं - ते खरं आहे म्हणून की आजकाल आपल्याला जास्त लांबवरच्या गोष्टी स्पष्ट दिसतात म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
सतिश गावडे Mon, 03/07/2016 - 05:10 नवीन
माझा धर्मसत्ता या विषयाचा विशेष अभ्यास नाही. मी जे लिहिलं आहे त्या सध्याचं व्यक्तीगत पातळीवरील चित्र आहे. तुम्ही म्हणताय तशा धर्मसत्ता नक्कीच खिळखिळ्या झाल्या आहेत. मात्र व्यक्तीगत पातळीवर लोक अधिकाधिक धर्म आणि श्रद्धेला जवळ करत आहेत. आपली सौरमाला आणि त्यातील सारे ग्रह यांचे बर्‍यापैकी ज्ञान आज सर्वसामान्यांना आहे. तरीही शनिवारी शनि मंदिरांसमोरील रांगा वाढत आहेत. लग्न जुळवताना आजही कुंडली ही लग्नासंबंधी बोलणी सुरु करण्याची पहिली पायरी आहे. महाराष्ट्राला बुवाबाजीवर आसुड ओढणारे संत आणि त्यानंतर समाजसुधारक लाभले तरीही आजही आपल्याकडे बाबा, बुवा, बापू आणि महाराज उदंड झाले आहेत. लोक शर्टला त्यांचे चित्र असणारे पेन आणि बिल्ले लावण्यात आणि घराच्या भींतीवर त्यांचे फ्रेम केलेले (काही वेळेला चक्क फोटोशॉप केलेले) फोटो लावण्यात धन्यता मानत आहेत. ही झाली दोन प्रातिनिधीक उदाहरणे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यातून जाणवते की जसजसे विज्ञान प्रगत होत आहे तसतसे लोक अधिकाधिक धर्म आणि श्रद्धेला जवळ करत आहेत. आणि हे करत असताना ते विज्ञानाने मिळणारे लाभ नाकारत नाहीत हे विशेष. किंबहूना लोक आज विज्ञानाला आपल्या श्रद्धेच्या कामी वापरत आहेत. तिरूपती मंदिराची ऑनलाईन बुकिंग सुविधा हे याचे उत्तम उदाहरण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
स
सप्तरंगी Mon, 03/07/2016 - 15:25 नवीन
यनावाला सर, लेख उत्तम आहे पण: " संस्कृती समृद्ध व्हावी, सर्वांची ऐहिक प्रगती व्हावी, अन्न-वस्त्र-निवारा-शिक्षण-आरोग्य या अत्यावश्यक प्राथमिक सुविधांपासून कुणीही वंचित राहू नये, निसर्गाचे संवर्धन करावे, पर्यावरणाचे संतुलन राखावे, ही विज्ञानाची प्राथमिक उद्दिष्टे आहेत." यातील काही भाग चुकीचे स्पष्टीकरण देणारा वाटतो. संस्कृतीचा (संस्कृती समृध्द होण्याचाही) आणि विज्ञानाचा काय संबंध? निसर्गाचे संवर्धन आणि पर्यावरणाचे संतुलन यात विज्ञानाचा कसा हातभार लागेल उलट पर्यावरणाचा ऱ्हासच होतो आहे ना विज्ञानाने? देव- धर्म पेक्षा , खर तर देव- धर्माच्या आहारी जाण्यापेक्षा, विज्ञान हाच प्रगतीचा मार्ग हे पटतेच पण हे सांगताना कदाचित आपण वेगळे काहीतरी दर्शवत आहात जे विषयाला धरून वाटत नाही, म्हणून पटत नाही.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Mon, 03/07/2016 - 19:13 नवीन
संस्कृतीचा (संस्कृती समृध्द होण्याचाही) आणि विज्ञानाचा काय संबंध?
मला वाटते संबंध आहे. एखादया छोटया-मोठया मानवी समुहाचे विशिष्ट पद्धतीचे आचरण किंवा जीवनशैली म्हणजे संस्कृती अशी संस्कृतीची ढोबळ व्याख्या करता येईल. ऐहिक प्रगती, अन्न-वस्त्र-निवारा-शिक्षण-आरोग्य या बाबी संस्कृतीचाच भाग आहेत. आणि या सार्‍या बाबींचा विज्ञानाशी थेट संबंध आहे. विज्ञान जितके प्रगत तितकी ऐहीक प्रगती जास्त; तसेच प्रगत विज्ञानाने अन्न-वस्त्र-निवारा-शिक्षण-आरोग्य या गोष्टींचा दर्जा निश्चितच उंचावतो. त्यामुळे विज्ञान आणि संस्कृतीचा नक्कीच संबंध आहे.
निसर्गाचे संवर्धन आणि पर्यावरणाचे संतुलन यात विज्ञानाचा कसा हातभार लागेल उलट पर्यावरणाचा ऱ्हासच होतो आहे ना विज्ञानाने?
विज्ञान निसर्गाचे संवर्धन आणि पर्यावरणाचे संतुलन यास हातभार लावते हे धाडसी विधान आहे. कदाचित धागालेखकच हा मुद्दा स्पष्ट करू शकतील. विज्ञानाने पर्यावरणाचा ऱ्हासच होतो हे आपल्या आजूबाजूला दिसते. आधुनिक सुविधांची निर्मिती करताना किंवा औद्योगिक विकास करताना तारतम्य बाळगून निसर्गाची कमीत कमी हानी कशी होईल हा विचार करता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सप्तरंगी
अ
अर्धवटराव Mon, 03/07/2016 - 19:43 नवीन
मला वाटतं अजीबात संबंध नाहि. सदर लेख मला सरळ सरळ आधुनीक बुवाबाजीचा प्रकार वाटतो. धर्म व्यवस्थेने माणसाचे प्रश्न सोडवण्याचा दावा केला. त्यातुन हितसंबंध जोपासणारी स्ट्रीम तयार झाली. त्याचे मक्तेदार तयार झाले. त्यातुन पुढे शोषणाची अव्याहत साखळी निर्माण झाली. हे सगळं कशामुळे झालं ? याचा उगम धर्माचा धर्मव्यवस्थेत होणार्‍या परिवर्तनात आहे. धर्म जेंव्हा "विषाचा धर्म शरीराला बाधा पोचवणे आहे, व औषधाचा धर्म रोगनिवारण आहे" इतका स्वच्छ असतो तेंव्हा तो माणासाला त्याचं प्रतिबेंब दाखवायचं काम चोख करत असतो. धर्मव्यवस्था जेंव्हा मानव कैवार आपल्या हाती घेते तिथे त्यात मानवी गुणादोष यायला लागतात. विज्ञानदिनाच्या निमीत्ताने विज्ञानाचं विज्ञानव्यवस्थेत संक्रमण करण्याची तीच खोड पुन्हा गिरवली जात आहे. धर्माचं धर्मव्यवस्थेत परिवर्तन व्हायला काहि काळ तरी जावा लागला. विज्ञानव्यवस्थेची निर्मीती कितीतरी वेगाने होईल. इतर सदोष व्यवस्थांना नावं ठेवायच्या कंड शमनार्थ आपण विज्ञानाचं बुवाबाजीकरण करत आहोत याचं भानच दिसत नाहि सो कॉल्ड विज्ञानवाद्यांना (किंबहुना विज्ञानाकरता विज्ञानवाद, विज्ञान'इझम' सारखी दुसरी घाणेरडी शिवी नाहि) मधुमक्षीका अन्नसाठवणुकीकरता मध गोळा करते व संरक्षणार्थ डंख मारते हा धर्म. मधात अमुक प्रकारचे ग्लुकोज असते व डंख मारल्याने अमुक प्रकारचं केमीकल इंजेक्ट होतं, हे विज्ञान. माणासाला मध मिळेल कि डंख हे माणूस मधमाशीला कसं हाताळतो यावर अवलंबुन आहे. त्याचा संबंध ना धर्माशी ना विज्ञानाशी. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
त
तर्राट जोकर Tue, 03/08/2016 - 03:52 नवीन
विज्ञानाचा संस्कृतीशी संबंध आहे पण तो समृद्ध होण्यात कितपत आहे ते शंकास्पद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
प
प्रकाश घाटपांडे Tue, 03/08/2016 - 05:03 नवीन
आम्हाला जे विज्ञान अभिप्रेत आहे तेच खरे विज्ञान तुम्ही म्हणता ते छद्मविज्ञान अशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भूमिका घेणारे अनेक विज्ञानधर्मी दिसतात. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान अशी व्याख्या मांडली जाते.मग त्यात अध्यात्माला ही विज्ञानात बसवता येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Tue, 03/08/2016 - 05:09 नवीन
सदर लेखात तेच होतय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
य
यनावाला Tue, 03/08/2016 - 09:07 नवीन
@सतीश गावडे & सप्तरंगी ...... सौंदर्य, कला, साहित्य इ.विषयीं समाजात विशिष्ट अभिरुची निर्माण होते. तदनुसार त्यांची निर्मितीही होते, तसेच काही कर्मकांडे, आचार-विचारांचे कांही संकेत-शिष्टाचार रूढ होतात. अशा गोष्टींच्या समुच्चयाला त्या समाजाची, त्याकाळची संस्कृती म्हणता येईल. "एखादया छोटया-मोठया मानवी समूहाचे विशिष्ट पद्धतीचे आचरण किंवा जीवनशैली म्हणजे संस्कृती अशी संस्कृतीची ढोबळ व्याख्या करता येईल." ही सतीश गावडे यांची व्याख्या मूलभूत आहे. समाजाला स्वास्थ्य लाभले, लोकांना मोकळा वेळ असला तर संस्कृती निर्माण होते. शेतीच्या शोधानंतर (हा निरीक्षणांधारित वैज्ञानिक शोधच होता.) माणसाला अन्नाची शाश्वती लाभली. त्याची अन्नशोधार्थ भटकंती थांबली. संस्कृतिनिर्मितीचा प्रारंभ झाला. पुढे वैज्ञानिक शोधांमुळे अनेक सुख-सुविधा निर्माण झाल्या .माणसांना अधिक मोकळा वेळ मिळू लागला. त्यामुळे संस्कृती विकसित झाली. बहरली. संस्कृतीच्या समृद्धीसाठी विज्ञानाचे योगदान मोठे आहे, यात संशय नाही. वैज्ञानिक शोध आणि त्यावर आद्धारित तंत्रज्ञान यांमुळे झालेल्या पर्यावरणरक्षणाची अनेक उदाहरणे देता येतील. सैपाकासाठी सौर चुलीच्या वापरामुळे वृक्षतोड कमी झाली. तसेच विजेसाठी सौरऊर्जा, पवनऊर्जा यांच्यामुळे प्रदूषण कमी झाले. या ऊर्जांचा वापर जगभर वाढत आहे. त्यांत अधिकाधिक सुधारणा होत अहेत. जगभराचा विचार केला तर क्रेडिट कार्डांमुळे कागदीचलन कमी झाले. तसेच ई-गवर्नन्स,ई-बुक्स इ.मुळे कागदाचा वापर मोठ्या प्रमाणात थांबला. झाडे वाचली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सप्तरंगी Tue, 03/08/2016 - 16:50 नवीन
पर्यावरणाबद्दल विचार केला, बर्याच अंशी पटले. कारण आपण विज्ञानाचा वापर योग्य रीतीने नाही केला म्हणून पर्यावरणाचा ऱ्हास होत असावा, directly विज्ञानामुळे नाही. तरीही अजून विचार करेन. पण संस्कृती संवर्धन वगैरे नाही पटत, ते उगीच लेखाच्या साच्यात फिट करता आहात असे वाटते, जेणेकरून आस्तिक लोकांना पटावे. कदाचित मला स्वत:ला संस्कृती संवर्धनाची फारशी गरज वाटत नसेल त्यामुळेही नसल पटत. बाकी लेख एकदम आवडला. अगदी A , B जार मधील concentration calculate करून पहिले. बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा