Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विज्ञानदिनाच्या निमित्ताने

य
यनावाला
Sun, 02/28/2016 - 17:28
🗣 122 प्रतिसाद
विज्ञानदिनाच्या निमित्ताने ..... विज्ञान हे माणसाने संशोधित केलेल्या निसर्गनियमांचे, सत्यज्ञानाचे भांडार आहे. त्यात आपल्याला अचंबित करणार्‍या अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेतच. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही विषयावर, निरीक्षणांवर, सुसंगत विचार करून तर्कशुद्ध निष्कर्ष काढण्याची आणि ते शक्यतो प्रयोगाने सिद्ध करण्याची ती एक विचारसरणी आहे. वैज्ञानिकांनी ती विकसित केली आहे. या पद्धतीत कोणत्याही पूर्वग्रहाला थारा नाही. भावनेच्या गुंतवणुकीला स्थान नाही. कुणाच्याही अधिकारवाणीला मान्यता नाही. शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, यांची स्वीकृती नाही. शंका घ्यायच्या, त्यांची उत्तरे शोधायची, जे पटेल तेच तत्त्वत: सत्य मानायचे. तर्कशुद्ध निष्कर्ष काढायचे. मग ते आपल्याला आवडोत वा न आवडोत. कदाचित् ते आपल्या पूर्वानुभवांशी विसंगतही असतील. अशा परिस्थितीत आपल्या अनुभवांचे पुनरावलोकन करायचे. चिकित्सा करायची. आपण दोन उदाहरणे पाहू:- १)एकदा गॅलीलिओ आपल्या शिष्यांना म्हणाला, " झुकत्या मनोर्‍याच्या (टॉवर ऑफ पिसा) माथ्यावरून १किलो वस्तुमानाची वीट खाली सोडली तर पायथ्याशी यायला तिला जितका वेळ लागेल तितकाच वेळ २ किलोच्या विटेला लागेल." " ते कसे? अधिक जड वीट अधिक वेगाने कमी वेळात खाली येईल असे वाटते." शिष्य म्हणाले. " समजा मी मनोर्‍यावर उभा आहे. माझ्या डाव्या हातात १ किलोची वीट आहे.उजव्या हातातही १ किलोचीच वीट आहे. प्रथम ही वीट मी सोडली. ती तीन सेकंदांत खाली आली. आता डाव्या हातातील सोडली. तिला किती वेळ लागेल? " "तीन सेकंदच. ती १ किलोचीच आहे ना? " "ठीक. आता दोन हात जवळ आणतो. दोन विटांत चार बोटें अंतर ठेवून दोन्ही एकाच वेळी अशा उभ्या खाली सोडतो. आता काय होईल?" "दोन्ही विटा एकाच वेळी खाली येतील. त्यांच्यात चार बोटे अंतर ठेवा की अर्धे बोट ठेवा, वेळ बदलणार नाही." " छान! आता दोन विटा एकमेकींना चिकटूनच एकदम खाली सोडतो. काय होईल?" "दोन्ही एकाच वेळीं म्हणजे ३ सेकंदांतच खाली येतील." सगळे शिष्य एका सुरात म्हणाले. "हो ना? अरे एकमेकींना चिकटून ठेवलेल्या एक-एक किलोच्या दोन विटा म्हणजे म्हणजे २ किलोची एक वीट नव्हे काय? म्हणजे २ किलोची वीटसुद्धा तीन सेकंदांतच खाली येईल हे सिद्ध होत नाही का? विचार करा. " "अरेच्चा! खरेच की! ! पण तसे बुद्धीला पटत नाही." " तर आता मनोर्‍यावर जा आणि दक्षतापूर्वक प्रयोग करा.मी सांगितलेले तत्त्व खरे आहे की नाही ते ठरवा. माझी तर्कबुद्धी सांगते की ते खरे आहे. पण ते चुकीचे असूं शकेल." आपण जाणतो की गॅलीलिओचे तत्त्व अबाधित आहे. तर्कसुसंगत विचार करण्याची वैज्ञानिक पद्धती अशी असते. विज्ञानाचे अभूतपूर्व यश आणि अल्पकाळातील आश्चर्यजनक प्रगती यांच्या मुळाशी ही वैज्ञानिक पद्धत आहे. २) गंगाजल आणि यमुनाजल " हे पाहा इथे ठेवले आहे काचपात्र "अ", धारकता ३०० मिली. यात २५० मिली शुद्ध गंगाजल आहे." " कळले. ते दुसरे तसेच दिसणारे काचपात्र "ब" का? " " हो. त्यात २५० मिली शुद्ध यमुनाजल आहे." "ठीक. आता पुढे ?" " एका मोजपात्रात "ब" तील २० मिली य.ज. घेतले. ते "अ" तील गं.ज.मधे मिसळले. नंतर "अ" मधून नेमके २० मिली मिश्रण मोजपात्रात घेऊन "ब" मध्ये मिसळले." " समजले सगळे. आता दोन्ही पात्रांत मिश्रणे आहेत." " छान ! पण "अ" भांड्यात थोडे यमुनाजल आले आहे. तर "ब" त कांही गंगाजल गेले आहे. प्रश्न असा आहे की "अ" मधील य.ज. अधिक की "ब" मधील गं.ज. अधिक? की दोन्ही समान?" "समान नसावीत. कारण "अ" मध्ये २० मिली. शुद्ध यमुनाजल घातले, तर "ब" त २० मिली मिश्रण टाकले. या दोन कृती एकरूप नाहीत. त्यामुळे "अ" पात्रात आलेले यमुना जल हे "ब" पात्रात गेलेल्या गंगाजलाहून अधिक असावे असे मला वाटते. तरीपण निश्चितीसाठी काही अंकमोड करावी हे बरे." " असे म्हणता ? आता माझ्या प्रश्नांची विचारपूर्वक उत्तरे द्या. प्रारंभी आणि आता "अ" मधील द्रवाची पातळी तीच आहे ना? " "निश्चितच . २० मिली पाणी आले. २० मिली पाणी गेले." " प्रथम अ मध्ये य.ज. नव्हते. आता आहे. पातळी न बदलता ते "अ" पात्रात कसे मावले?" "अहो, अ पात्रातील काही गं.ज. गेले नाही का? त्यामुळे जागा झाली. त्यात य.ज. बसले." " वा ! छान. गेलेल्या गं.ज.पेक्षा आलेले य.ज. कमी किंवा अधिक असते तर द्रवाची पातळी बदलली असती ना? ती बदलली नाही. यावरून काय निष्कर्ष निघतो?" " जेवढे यमुनाजल आले तेवढेच गंगाजल गेले." " ते कुठे गेले? "ब" पात्रात ना? म्हणजे आता "अ" पात्रात जेवढे यमुनाजल आहे तेवढेच गंगाजल "ब" पात्रात आहे असे सिद्ध झाले. हो ना? " "हो. तसे पटते. पण ..." " अजून पण? बरे, बरे. अधिक सोपे करूया. ’अ" पात्रात २५० मिली शुद्ध गंगाजल,"ब" त तेवढेच यमुनाजल इथून परत विचार करू. समजा "अ" मधील पाण्याचे बिंदू गोठले. त्यांचे निळ्या रंगाचे छोटे छोटे एकाच आकाराचे १०,००० गं.ज.मणी झाले. तसेच "ब" मधील पाण्याचे पांढर्‍या रंगाचे १०,हजार य.ज. मणी झाले." " आता ही काय भानगड ? " " काही नाही. समजण्यासाठी केवळ कल्पना करायची." " हं ! कल्पना केली." " आता "ब" मधील २०० शुभ्र मणी काढून ते "अ" मधील मण्यांत मिसळले.पात्र हालवले. मग "अ" तील २००मिश्रमणी काढून ते "ब" पात्रात टाकले. आता दोन्ही पात्रांत प्रत्येकी १०,००० मणी आहेत." "कळले. कळले. "अ" पात्रात जितके य.ज.मणी आहेत तितकेच गं.ज. मणी "ब" भांड्यात आहेत. म्हणजे असलेच पाहिजेत." "समजले ना ?" "न समजायला काय झाले? सोपे तर आहे. पण ते भांडे हालवणे आवश्यक आहे का?" "शाबास ! कळलेच म्हणायचे सगळे." ** हे जग आहे तसे समजून घेणे , निसर्गाचे नियम शोधणे, निसर्गाच्या शक्तींचे आकलन करून घेणे, नैसर्गिक आपत्तींचे संभाव्य धोके ओळखून त्यांपासून मानवी जीवनाला सुरक्षित ठेवणे असा विज्ञानाचा प्रयत्‍न असतो. हे वैज्ञानिकांचे निसर्गाशी युद्ध नाही. निसर्गाला जाणून त्याच्याशी जुळवून घेत जीवन सुरक्षित ठेवण्याची धडपड आहे. अशा संकटातून आपल्याला वाचवणारा कोणी परमेश्वर असित्वात नाही. कितीही आळवणी करा, "धाव रे धाव आता" ! असे म्हणत कितीही काकुळतीला या, काहीही उपयोग होत नाही. संकटात धावून येणारा देव केवळ धर्मग्रंथातील काल्पनिक कथेत असतो. वास्तवात नसतो. माणसाने संशोधित केलेले विज्ञानच कामी येते. हे स्पष्ट झाले आहे. या प्रयत्‍नांत विज्ञान बर्‍याच अंशी यशस्वी ठरत आहे. आंध्रप्रदेशात आलेल्या पायलीन महावादळाच्या वेळी याची प्रचीती आली. संभाव्य वादळाचा अभ्यास, निरीक्षणे आणि गणिते करून वैज्ञानिकांनी तीन दिवस आधी शासनाला वादळाची पूर्वकल्पना दिली. त्यामुळे सहस्रावधी माणसांचे आणि गाई-गुरांचे प्राण वाचू शकले हा (२०१३)चा अनुभव आहे. ज्ञानप्राप्तीचा सध्या ज्ञात असलेला एकमेव विश्वासार्ह मार्ग म्हणजे ही वैज्ञानिक पद्धत. अन्य कोणत्याही मार्गाने सत्यज्ञान प्राप्त होत नाही. साक्षात्कार, आत्मानुभूती, समाधी, सद्गुरूने साधकाच्या डोक्यावर हात ठेवून तोंडाने मंत्र पुटपुटल्याने होणारे ज्ञानसंक्रमण (शक्तिपात) या सर्व भ्रामक गोष्टी आहेत. ज्याचा-त्याचा व्यक्तिनिष्ठ अनुभव म्हणजे सत्यज्ञान नव्हे. ते वस्तुनिष्ठ,सार्वत्रिक आणि स्थल-काल-व्यक्ति निरपेक्ष असावे लागते. वैज्ञानिक पद्धती परिपूर्ण नसेल पण गेल्या कांही शतकांत ती अधिकाधिक विकसित होत गेली आहे. विज्ञानाने अनेक सत्ये शोधून काढली आहेत. त्यांमुळे माणसाचे जीवन सुखी, सुविधापूर्ण आणि सुरक्षित झाले आहे. पण विज्ञानाने "अंतिम सत्य" शोधले आहे असा दावा कोणी करीत नाही. " माणूस परिपूर्ण नाही. म्हणून त्याचे संशोधन परिपूर्ण नाही. अंतिम नाही. त्यात सतत सुधारणा होत राहील. " असे वैज्ञानिक सांगतात. तर आमच्या धर्माला अंतिम सत्य गवसले आहे. (काय बरे असते हे अंतिम सत्य?) तो आकाशातील प्रभूचा संदेश आहे. तो अल्लाचा पैगाम आहे. तो प्रत्यक्ष भगवंताचा शब्द आहे. असे आध्यात्मिक लोक म्हणतात. विज्ञानाचा निसर्गाशी सतत संबंध येतो. निसर्गाच्या आश्चर्यकारक वैविध्याविषयीं विज्ञान आदर व्यक्त करते. निसर्गाच्या अभ्यासातून एखाद्या तत्त्वाचे, निसर्गनियमाचे आकलन झाले की वैज्ञानिकांना, निसर्गाच्या विराट रूपाशी एकरूप झाल्याचा प्रत्यय येतो. आणि ते आनंद व्यक्त करतात. या संदर्भात "हीरो राजाचा सुवर्ण मुकुट आणि आर्किमेडीज " ही सुपरिचित गोष्ट आठवते. पाण्याच्या टबात स्नान करताना आर्किमेडीजला एका निसर्गनियमचा साक्षात्कार झाला. त्यासरशी तो, "युरेका ! युरेका ! !" असे आनंदोद्गार काढीत निसर्गाला भेटण्यासाठी नैसर्गिक अवस्थेत बाहेर पडला. एका वैज्ञानिकाचा हा आनंदसोहळा होता. आपण ही गोष्ट शालेय पुस्तकात वाचतो. वर्गात शिकतो. पण आर्किमिडीजपुढे नेमकी कोणती समस्या होती ? त्याने ती कशी सोडविली? सुवर्णकाराने मुकुटातील सोन्यात हिणकस धातू मिसळला आहे हे राजदरबारातील विद्वानांना सप्रयोग कसे पटवून दिले ? या प्रश्नांचा विचार क्वचितच कोणी केला असेल. प्रत्येकाने स्वत:च्या मनाशी विचार करावा. आपल्याला तेव्हा समजले होते का? शिक्षकांनी कधी समजावून सांगितले होते का? तर्ककठोर विचार करणारे वैज्ञानिक भावनाशून्य असतात, असे काही जणांना वाटते. पण तसे नसते. किंबहुना प्रत्येक वैज्ञानिक हा संवदनशील असतोच. मात्र आपल्या भावनांवर तो बुद्धीचे नियंत्रण ठेवतो. भावनांच्या आहारी जात नाही. त्या अस्थानीं प्रकट करीत नाही. विज्ञान समजून घेणे अवघड असेल. अनेक वर्षे मनात जोपासलेल्या आपल्या आवडीच्या संकल्पना वैज्ञानिक शोधांमुळे खोट्या ठरल्या असतील .विज्ञानातून विकसित झालेल्या तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या वस्तू राज्यकर्त्यांना आणि उद्योजकांना उपलब्ध झाल्यावर त्या वस्तूंचा समाजविघातक असा दुरुपयोग होत असेल. पण विज्ञान जे सांगते ते करून दाखविते . प्रत्यक्षात आणते. हे कोणालाही मान्य करावेच लागेल. धर्ममार्तंड, योगगुरू, आध्यात्मिक गुरू असे लोक अनेक दावे करत असतात. अग्निहोत्र केल्याने वातावरण शुद्ध होते, हठयोगाने अष्टसिद्धी प्राप्त होतात, सूक्ष्म देह धारण करून अदृश्य होता येते. मंत्रजपाने अतींद्रिय शक्ती प्राप्त होते. दुसर्‍याच्या मनातील विचार जाणता येतात. मनसामर्थ्याने आपले विचार दूरस्थ व्यक्तीच्या मनात प्रकट करता येतात. ॐ काराच्या गुंजनाने प्रचंड ऊर्जा निर्माण होते. गायत्री मंत्राच्या जपाने अलौकिक शक्ती प्राप्त होते. अशा अनेक गोष्टी सांगतात. पण प्रत्यक्ष प्रयोग करून यांतील एकाची तरी प्रचीती दाखवा असे आव्हान दिल्यावर ,"हे धर्मग्रंथात लिहिले आहे, भगवंतांनी स्वमुखे वर्णिले आहे, त्रिकालज्ञ ऋषिमुनींनी सांगितले आहे," असे म्हणून गप्प बसतात. धर्ममार्तंड जे सांगतात , ग्रंथांत जे काही लिहिले आहे त्याचा कोणाला कधी अनुभव आल्याची विश्वासार्ह अशी एकही ऐतिहासिक नोंद नाही. आपल्या देशावर अनेक इस्लामी आक्रमणे झाली. त्यावेळी मंदिरांतील कैक मूर्ती आक्रमकांनी फोडल्या. पण कोण्या धर्माभिमान्याने योगसिद्धीचा, मंत्रजपाचा अथवा अन्य कोणत्या कर्मकांडाचा प्रयोग करून मूर्ती वाचविल्याचे अथवा भंग झालेली मूर्ती पुन: जोडल्याचे एकही उदाहरण नाही. विज्ञान आपला प्रत्येक नियम, प्रत्येक तत्त्व सिद्ध करून दाखविते. किंबहुना जे सिद्ध होऊ शकत नाही त्याला विज्ञानात स्थानच नसते. विज्ञानाला इतकी सफलता कशी मिळते? वैज्ञानिक ज्ञान इतके विश्वासार्ह का ठरते ? याचे प्रमुख कारण म्हणजे विज्ञानात अंगभूत असलेली स्वयं दोषनिवारण यंत्रणा. तसेच विज्ञानात सर्व प्रकारच्या शंकांचे, प्रश्नांचे स्वागत होते. विज्ञानात पवित्र ,पूजनीय, अपरिवर्तनीय असे काही नसते. नवनवीन कल्पनांना तिथे मुक्तद्वार असते. त्याच बरोबर प्रत्येक कल्पनेचे कठोर परीक्षणही होते. या सर्वांचा सुपरिणाम म्हणून विज्ञान अधिकाधिक विश्वासार्ह बनते. बहुसंख्य माणसांनी पवित्र मानलेल्या पिढ्यानुपिढ्या उराशी बाळगलेल्या श्रद्धा जेव्हा विज्ञाननिष्ठ विचारसरणीपुढे खोट्या ठरतात, माणसाच्या ऐहिक प्रगतीला बाधक ठरतात तेव्हा विज्ञानप्रेमी व्यक्ती त्या श्रद्धांवर टीका करतात. त्या अज्ञानातून जन्माला आलेल्या आहेत, माणसाने त्या सोडून द्यायला हव्या असे सांगतात. त्याने श्रद्धावंतांच्या भावना दुखावतात. खरे तर त्यांच्या श्रद्धा जर दृढ असतील,अतूट असतील तर त्यांना वैज्ञानिकांची टीका हास्यास्पद वाटायला हवी. त्यांनी त्या टीकेकडे दुर्लक्ष करायला हवे अथवा तिचा प्रतिवाद करायला हवा. पण तसे न होता त्यांच्या भावना दुखावतात. कारण वैज्ञानिकांचे तर्कशुद्ध म्हणणे त्यांच्या बुद्धीला पटते. पण पूर्वसंस्कारांमुळे त्यांची भावना ते मानत नाही. परिणामी हे खरे की ते खरे अशा द्विविधेत ते पडतात. त्यामुळे विज्ञान अहंकारी आहे, उद्दाम आहे आमच्या धार्मिक भावनांचा आदर ठेवीत नाही असे म्हणतात. खरे तर विज्ञान हे मानवतेचा एक अविभाज्य भाग आहे. आजचे तसेच भावी पिढ्यांचे जीवन अधिकाधिक सुविधापूर्ण , सुखी, समाधानी, आनंदी आणि सुरक्षित व्हावे, संस्कृती समृद्ध व्हावी, सर्वांची ऐहिक प्रगती व्हावी, अन्न-वस्त्र-निवारा-शिक्षण-आरोग्य या अत्यावश्यक प्राथमिक सुविधांपासून कुणीही वंचित राहू नये, निसर्गाचे संवर्धन करावे, पर्यावरणाचे संतुलन राखावे, ही विज्ञानाची प्राथमिक उद्दिष्टे आहेत. मात्र त्यासाठी भ्रामक, अज्ञानमूलक, गोष्टींच्या मागे न लागता विज्ञानसिद्ध, व्यावहारिक, उपयुक्त मार्गांचा अवलंब करावा असे विज्ञानाचे सांगणे असते. त्यांत अहंकार, उद्दामपणा नसतो. विज्ञान सांगते ते सत्यकथन असते. स्वातंत्र्य-समता-बंधुता-प्रेम या मूलभूत मानवी मूल्यांचा विज्ञान आदर करते. आपले विचार दुसर्‍यांवर लादावे असे विज्ञानाला कधीही वाटत नाही. मात्र इतरांना वैज्ञानिक विचार पटावे, त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करावा असे वैज्ञानिकांना अवश्य वाटते. माणूस परिपूर्ण नाही, त्याच्या हातून चुका होण्याचा संभव असतो याची जाणीव विज्ञानाला सदैव असते. प्रत्येक निसर्ग नियम माणसानेच शोधून काढला आहे. तो अंतिम नाही. अपरिवर्तनीय नाही. त्यात सुधारणा संभवतात. असेच विज्ञान मानते. प्रस्थापित विज्ञान नियमातील त्रुटी, मर्यादा निदर्शनाला आणणार्‍या, त्यांत सुधारणा घडवून आणणार्‍या वैज्ञानिकाचा विज्ञान स्वागत करते. सत्कार करते. याचे एक उदाहरण असे: न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत म्हणजे मानवी प्रजातीच्या प्रज्ञेची उत्तुंग झेप, अपूर्व उपलब्धी होय असे सार्थपणे मानले जाते. सूर्य-चंद्र ग्रहणे, कोणत्या दिवशी, नेमक्या कोणत्या वेळी, जगात कुठे, कशी दिसतील याची अचूक गणिते या सिद्धांताच्या आधारे आपण गेली तीनशे वर्षे करीत आहोत. याच नियमाच्या आधारे प्रक्षेपित केलेली आपली अंतराळयाने कित्येक महिने लक्षावधी किलोमिटरचा प्रवास करून ठराविक दिवशी, अवकाशातील नियोजित जागी पूर्व नियोजित कक्षेत , नेमक्या स्थानी पोहोचतात. यातील अचूकता आश्चर्यकारक, अचंबित करणारी आहे. आपण कोणता सिद्धांत मांडतो आहोत याची न्यूटनला पूर्ण कल्पना होती असेच म्हणावे लागते. न्यूटनची महानता शब्दातीत आहे. न्यूटनच्या या नियमापुढे वैज्ञानिक नतमस्तक झाले. पण त्यांनी त्याला तसे सोडले नाही. या नियमात कुठेतरी बारीक फट असेल का? त्रुटी असेल का? हा वैश्विक नियम सर्वकाळी, सर्वस्थळी, कोणत्याही परिस्थितीत अबाधित राहील का? याविषयी ते विचार करू लागले. वस्तूचा वेग अति प्रचंड असेल, गुरुत्वाकर्षण बल कित्येक पटीनी अधिक असेल तर न्यूटनचा नियम पूर्णांशाने खरा ठरणार नाही असे गणिते करून लक्षात आले. अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या सामान्य सापेक्षता सिद्धांत आणि विशेष सापेक्षता सिद्धांत यांचा जन्म या संशोधनातून झाला. प्रत्यक्ष खगोलीय निरीक्षणांतून या दोन नवीन सिद्धांतांना पुष्टी मिळाली. अंतराळ संशोधनाच्या गणितात न्यूटनचा नियम आजही उपयोगी पडतो. तोच वापरतात. पण असामान्य वेग आणि अतिबलवान गुरुत्वाकर्षण अशा क्वचित् आढळणार्‍या परिस्थितीत तो अपुरा पडतो. आईन्स्टाइनच्या सिद्धांतानुसार न्यूटनच्या गणितात सुधारणा करावी लागते. न्यूटनच्या महान सिद्धांतातील त्रुटी आणि त्याच्या मर्यादा आईन्स्टाइनने स्पष्ट केल्या. विज्ञान क्षेत्रात त्याचे केवढे तरी मोठे स्वागत झाले. आईनस्टाइनचे नाव अजरामर झाले. पण त्याचे हे सापेक्षतेचे सिद्धांत तरी त्रिकालाबाधित असतील का? वैज्ञानिक तसे मानत नाहीत. संशोधन चालू आहे. आता पुंज यामिकीच्या (क्वांटम मेकॅनिक्स) गणिताने पुढे काय नवीन आढळेल न कळे. "आमच्या धर्मग्रंथात काही चुका असू शकतील. त्रुटी आढळू शकतील." असे जगातील एकतरी धर्मगुरू कधी म्हणेल काय? कुठल्याही धार्मिकाला असे कधी वाटेल काय? "आम्ही अज्ञ बालके आहोत. हीन-दीन-पतित आहोत. दुर्बळ आहोत." असे देवापुढे म्हणायचे. जे श्रुति-स्मृति-पुराणोक्त आहे ते सगळे त्रिकालाबाधित सत्य मानायचे. आपण चिकित्सा करायचीच नाही. कोणी केली आणि श्रद्धेतील निरर्थकता सप्रमाण दाखवून दिली की आमच्या भावना दुखावल्या म्हणून चवताळून उठायचे आणि सत्य सांगणार्‍याचा जीव घ्यायला धावायचे. अशाने धर्मात सुधारणा होऊ शकेल काय? आजवर ज्या धार्मिक सुधारणा झाल्या त्या धर्म न मानणार्‍या समाजसुधारकांनी राज्यकर्त्यांकडून करवून घेतल्या. त्या सुधारणांना धर्मिकांनी कायम विरोध केला. अगदी सतीबंदी कायद्याला सुद्धा. आज विज्ञान हेच माणसाचे आशास्थान आहे. विकसनशील देशांना अंधश्रद्धा, दारिद्र्य, अज्ञान, मागासलेपणा, यांच्या विळख्यातून बाहेर बाहेर पडण्यासाठी विज्ञानाचा प्रसार,वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार , हाच एक विश्वसनीय मार्ग आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि नागरीकरणाला चालना मिळू शकेल. ज्या देशांत विज्ञानाचा अव्हेर करून देव-धर्माचे ,अंधश्रद्धांचे स्तोम माजते ते देश आर्थिकदृष्ट्या मागासलेले राहातात. भारतात हा धोका आज वाढत आहे. ................................................................................................................................
वर्गीकरण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
34538 वाचन

💬 प्रतिसाद (122)
र
राजेश घासकडवी Tue, 03/08/2016 - 19:45 नवीन
संस्कृती संवर्धनाला विज्ञानाचा अप्रत्यक्ष हातभार कसा लागला आहे हे समजून घेण्यासाठी मी स्टीव्हन पिंकरचं पुस्तक 'द बेटर एंजेल्स ऑफ अवर नेचर' वाचा. मानवी समाजातली सर्वसामान्य हिंसा आणि तिचाच परिपाक असलेली युद्धं गेल्या काही शतकांत कशी कमी झालेली आहेत यावर अत्यंत सखोल अभ्यास करून लिहिलेलं पुस्तक आहे. याची कारण तो बहुतांशी सामाजिक देतो - समाजांचं एकीकरण (छोट्या छोट्या राज्यांपासून मोठ्या राष्ट्रांपर्यंत प्रवास), व्यापार-उदीमाची वाढ, लोकशाहीचा विस्तार, सार्वजनिक शिक्षणाचा प्रसार, जग लहान झाल्यामुळे एकमेकांशी झालेली ओळख वगैरे वगैरे. मात्र या सगळ्याच्या पायाशी वैज्ञानिक व तांत्रिक प्रगती हा महत्त्वाचा घटक आहे. जर ते आठशे पानांचं पुस्तक वाचावं की नाही असा विचार करत असाल तर हा वीस मिनिटांचा व्हीडियो जरूर पाहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सप्तरंगी
य
यनावाला गुरुवार, 03/10/2016 - 09:22 नवीन
श्री.राजेश यांनी दिलेल्या लिंकवरील भाषण ऐकले. स्टिव्हन पिंकर यांचे हे भाषण सर्वांनी ऐकावे असे आहे. त्यात मांडलेले विचार वास्तवावर आधारित असल्याने पटतात. मानव प्रजातीची वैचारिक वाटचाल अंधारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे, श्रद्धेकडून बुद्धीकडे, अविवेकापासून विवेकाकडे, हिंसेपासून अहिंसेकडे, उपासनेच्या देवाकडून नास्तिकतेकडे होणे क्रमप्राप्त आहे. स्वाभाविक आहे. मानवाच्या या प्रगतीचा आलेख म्हणजे सतत वरवर जाणारी सरळरेषा नव्हे. त्यात चढ-उतार आहेतच. पण मोठा कालखंड (शतक) घेतला तर प्रगती निश्चित दिसते. निसर्गत: आपोआप प्रगती होतेच. पण विज्ञानाची विस्मयकारक घोडदौड, समाजसुधारकांनी केलेले प्रबोधन, जनजागृती, या सर्वांच्या परिणामाने मानवप्रजातीच्या या प्रगतीने आता चांगला वेग घेतला आहे. बालपणापासून मनावर सतत होणार्‍या श्रद्धासंस्कारांचे ओझे आज ना उद्या फेकून देऊन माणूस स्वबुद्धीने विचार करणार हे निश्चित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
ग
गामा पैलवान गुरुवार, 03/10/2016 - 18:33 नवीन
यनावाला, >> बालपणापासून मनावर सतत होणार्‍या श्रद्धासंस्कारांचे ओझे आज ना उद्या फेकून देऊन माणूस स्वबुद्धीने विचार >> करणार हे निश्चित. हे वाक्य तुमची विज्ञानाप्रती असलेली दृढ श्रद्धाच अधोरेखित करतंय. तर मग प्रगती म्हणजे नक्की काय? आणि ती होण्यासठी श्रद्धा कशाला भिरकावून द्यायला हवीये? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
य
यनावाला Fri, 03/11/2016 - 16:30 नवीन
@श्री. गामा पैलवान माणसाची बुद्धी अपंग होण्याचे कारण म्हणजे त्याची श्रद्धाभावना. देव, धर्म आणि त्यांच्याशी निगडित असलेले विषय ही धार्मिकांची श्रद्धाक्षेत्रे असतात. धार्मिकांची बुद्धी अन्य क्षेत्रांत चांगली चालते. आर्थिक गुंतवणूक, खरेदी-विक्री, लग्न-कार्ये (पत्रिका, मंगळ, इ. सोडून) अशा गोष्टी ते विचारपूर्वक करतात. पण व्रते, अनुष्ठाने, अभिषेक, होमहवन, अंत्यसंस्कार,दहावे-बारावे-तेरावे-मासिकश्राद्ध अशा विषयांत त्यांची बुद्धी पांगळी होते. कारण ते विषय त्यांच्या श्रद्धाक्षेत्रातील आहेत. श्रद्धेने मन व्याप्त झाले की बुद्धी चालेनाशी होते.त्यामुळे समाज अप्रगत राहातो.म्हणून श्रद्धात्याग आवश्यक आहे.पूर्ण त्याग शक्य नसला तरी श्रद्धेवर बुद्धीचे नियंत्रण हवेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
प
प्रचेतस Fri, 03/11/2016 - 16:37 नवीन
कुरुंदकरांनाही तुम्ही पांगळ्या बुद्धीचे म्हणाल काय? घरातल्यांच्या इच्छेखातर त्यांनी स्वत:च्या मुलाची मुंज केली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
प
प्रकाश घाटपांडे Sat, 03/12/2016 - 06:50 नवीन
विवेकवाद विज्ञान आणि श्रद्धा हे मे.पु रेगे यांचे पुस्तक याबाबत जरुर वाचावे http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5617951503483211621?BookName=Vivekvad-Vidnyan-Ani-Shraddha त्यातील तिसरा विभाग मी अस्तिक का आहे? परंपरागत श्राद्ध देवाशी भांडण धार्मिक श्रद्धा व इश्वराचे अस्तित्व ही प्रकरणे जरुर वाचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
सतिश गावडे Sat, 03/12/2016 - 06:58 नवीन
धन्यवाद काका. मे.पु रेगेंचे नाव ऐकले होते. मात्र त्यांचे एकही पुस्तक आजवर माझ्या पाहण्यात आले नाही. हे पुस्तक जरूर वाचेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
य
यशोधरा Sat, 03/12/2016 - 07:01 नवीन
सुरेख पुस्तक आहे हे. जरुर वाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
प
प्रचेतस Sat, 03/12/2016 - 08:19 नवीन
नक्की वाचेन. धन्यवाद काका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यनावाला Sun, 03/13/2016 - 17:07 नवीन
श्री.प्रतेतस् लिहितात,
"कुरुंदकरांनाही तुम्ही पांगळ्या बुद्धीचे म्हणाल काय? घरातल्यांच्या इच्छेखातर त्यांनी स्वत:च्या मुलाची मुंज केली होती."
आपण समाजात, कुटुंबात राहातो. त्यामुळे आचारांच्याबाबतीत पूर्ण स्वतंत्र नसतो. (विचार पूर्णतया स्वतंत्र असू शकतात).व्यक्तीच्या विचार-आचारात एकवाक्यता हवी हे खरे. तरी कुतुंबीयांसाठी काही प्रसंगी आचारांना मुरड घालावी लागते. कुणा निरीश्वरवादी गृहस्थाने आपल्या नातेवाईकांसमवेत गणपतीची आरती म्हटली, प्रसाद ग्रहण केला म्हणून तो आस्तिक होत नाही. माझे वृद्ध आई-वडील गांवी असताना गणेशचतुर्थीच्या सणाला मी गावी जात असे. सकाळी लौकर स्नान करून, मुकटा नेसून, जानवे घालून पूजेसाठी सिद्ध होत असे. भटजी (द.कोकणात गुरुजी शब्द रूढ नाही.) आले की पूजेला बसायचे. ते केशवाय नम:।माधवाय नम:।गोविंदाय नम:। म्हणताना आचमने घ्यायची. ॐ प्राणाय स्वाहा।व्यानाय स्वाहा।उदानाय स्वाहा।समानाय स्वाहा।... च्या वेळी नाकावर बोटे ठेवून प्राणायाम दाखवायचा. आगमनार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसाम् कुर्वे घंटारवं तत्र देवताह्वान लक्षणम्। ऐकताना घंटा वाजवायची. ते माल्यादीनि सुगंधीनि पुष्पाणि प्रतिगृह्यताम् । म्हणत असताना फुले वाहायची.अशी पूजा केली आहे. मी बसलो नसतो तर वडील सकाळी आंघोळ करून पूजेला बसलेच असते. त्यांना त्रास झाला असता. तो टाळण्यासाठी हे कौटुंबिक कर्तव्य करणे आवश्यक होते. ते केल्याने विचारसरणी बदलत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
त
तर्राट जोकर Sun, 03/13/2016 - 17:19 नवीन
छान प्रतिसाद, आवडला व पटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
प
प्रचेतस Sun, 03/13/2016 - 17:25 नवीन
हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
प
प्रकाश घाटपांडे Mon, 03/14/2016 - 12:20 नवीन
श्रद्धेने मन व्याप्त झाले की बुद्धी चालेनाशी होते.त्यामुळे समाज अप्रगत राहातो.म्हणून श्रद्धात्याग आवश्यक आहे.पूर्ण त्याग शक्य नसला तरी श्रद्धेवर बुद्धीचे नियंत्रण हवेच.
यातील श्रद्धा त्याग आवश्यक आहे या मतावर मानसशास्त्रज्ञांची मतभिन्नता दिसून येते.बुद्ध्यांक जसा महत्वाचा आहे तसा भावनांक देखील महत्वाचा आहे.श्रद्धा ही बाब भावनेशी निगडीत आहे. फक्त बुद्धीवर चालणारे बायोकेमिकल रोबो भविष्यात निर्माण होतील ही कदाचित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
य
यनावाला Tue, 03/15/2016 - 09:55 नवीन
श्री.घाटपांडे लिहितात,
फक्त बुद्धीवर चालणारे बायोकेमिकल रोबो भविष्यात निर्माण होतील ही कदाचित.
प्रकाशजींनी हे बहुधा अनवधानाने लिहिले असावे. श्रद्धा ही अनेक मनोभावनांपैकी एक आहे. श्रद्धेच्या त्यागाने सर्व भावना संपतात असे मुळीच नाही. आनंद, सुख, दु:ख, द्वेष, करुणा, दया, सहसंवेदना, काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, दंभ, लोभ अशा अनेक मनोभावना आहेत. श्रद्धेचा त्याग केला तरी इतर भावना उरतातच. श्रद्धाविसर्जनाने माणूस भावनाशून्य होत नाही. रोबो होण्याचा प्रश्नच नाही. ... श्रद्धेची व्याख्या जाणली पाहिजे. जी गोष्ट इंद्रियानुभवाला येत नाही, तर्कबुद्धीला पटत नाही, जिचे अस्तित्व सिद्ध झालेले नाही, जिचा समावेश माणसाच्या अर्जित ज्ञानभांडारात नाही, अशी गोष्ट पूर्वसंस्कार, गातानुगतिकता, ग्रंथप्रामाण्य, इ.आधारे सत्य मानण्याची मनोवृत्ती म्हणजे श्रद्धा. उदा.:- "मंगळवारी येणार्‍या संकष्टीच्या दिवशी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले तर विशेष पुण्य लाभते." श्रद्धांचे विसर्जन करणे शक्य आहे. प्रमुख अडथळा असतो तो बालपणापासून मेंदूवर बिंबविलेल्या चुकीच्या संस्कारांचा. खरे तर प्रत्येक व्यक्ती जन्मत: नास्तिकच असते. बालपणी देवाविषयींचे संस्कार बिंबवले नाहीत तर देव म्हणून कोणी असतो असे त्या व्यक्तीला कधीही वाटणार नाही. वाटण्याचे कारणच नाही. पण देवाविषयींचे संस्कार होतातच. त्या पूर्व संस्कारांचे ओझे डोक्यावरून उतरवले की श्रद्धा संपल्या. मन म्हणजे सर्व भावभावनांचा समुच्चय. त्याचे विसर्जन संभवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Wed, 03/16/2016 - 05:55 नवीन
प्रकाशजींनी हे बहुधा अनवधानाने लिहिले असावे
नाही. विचारपूर्वक लिहिले आहे.भविष्यात असे बायोकेमिकल रोबो विज्ञानातील संशोधनाने शक्य होतील अशी माझी समजूत आहे.
श्रद्धा ही अनेक मनोभावनांपैकी एक आहे. श्रद्धेच्या त्यागाने सर्व भावना संपतात असे मुळीच नाही.
होय. त्याच बरोबर श्रद्धा, अश्रद्धा वा अंधश्रद्धा हे मेंदुचेच अविष्कार आहेत.श्रद्धा ही संकल्पना आहे ती व्याख्येत बंदिस्त करता येईल असे मला वाटत नाही.त्या निमित्त फार फार तर शब्दिच्छल होईल. आजच्या दै. सकाळ मधे श्रद्धा समजूत आणि विश्वास हे विश्वास सहस्त्रबुद्धे यांचे परिमळ सदरात असलेले स्फुट आहे. ते म्हणतात," श्रद्धा म्हणजे अशी समजूत की ज्यासाठी पुरावा नाही. जे कोणीतर सांगितले आहे, कोठेतरी लिहून ठेवले आहे त्यावरुन समजूत करुन घेणे" सुप्रसिद्ध साहित्यिक विजय तेंडुलकर एकदा म्हणाले होते ," माणुस अंधश्रद्ध असतो कारण अंधश्रद्ध असणे ही त्याची गरज असते." ( संदर्भ - तिमिरातून तेजाकडे पृष्ठ ३८४ ले. नरेंद्र दाभोलकर) मेंदुच्या मनात या पुस्तकात लेखक सुबोध जावडेकर म्हणतात," जगण्याच्या लढाईत अंधश्रद्धा आदिमानवाला उपयोगी पडल्या असणार. कठीण परिस्थितीत मनाला उभारी देण्याचे काम त्यांनी केल. कल्पना करा, लाखो करोडो वर्षांपुर्वी माणसाचा पूर्वज जंगलात एकटाच आहे. त्याच्या टोळीपासून त्याची ताटातूट झालीय.चहू दिशांना घनदाट काळोख. दुरुन वन्य प्राण्यांच्या डर्काळ्या कानावर येताहेत. आणि..... शेजारच्या झुडपातून कसली तरी खसखस ऐकू येते. या भीतीदायक परिस्थितीत कशाच्या आधारावर त्याने उभं राहावं? अशी एखादी गोष्ट ( लकी हाडूक? ) त्याच्यापाशी असेल आणी त्यामुळे आपण संकटातून तरुन जाउ अस त्याला वाटत असेल, तर त्याला बोल कसा लावणार? त्याच्या अंधविश्वासाच्या जोरावरच तो तगून राहिला आणि तो विश्वास नसणार्‍याने केवळ भीतीनंच 'राम' म्हटला. अशा अंधश्रद्ध आदिमानवाचे आपण वारस आहोत! अंधश्रद्धा समाजात का टिकून आहेत त्याच हे स्पष्टीकरण आहे, अंधश्रद्धेचे समर्थन नव्हे!" अंनिस अंधश्रद्धांची कारणे जी दिली जातात त्यात अज्ञान, अगतिकता, संस्कार ही कारणे आहेत. ही तर कारणे आहेतच पण हे अंधश्रद्धेचे जैविक कारण देखील आहे. त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. आदिमानवापासून हा फॅक्टर जैविकरित्या संक्रमित होत गेला आहे. दाभोलकरांनी जीवनाच्या खडबडीत रस्त्यावर अंधश्रद्धा शॉक अबसॉर्बर सारखे काम करतात असेच म्हटले आहे. आता काहींच्या दृष्टीने असलेल्या श्रद्धा या दुसर्‍याच्या दृष्टीने अंधश्रद्धा असतात हा भाग वेगळा. अंधश्रद्धा हा शब्द पिवळा पितांबर म्हणल्या सारखे आहे. त्यामुळे अंनिस वर जो आक्षेप असतो कि यांना अंधश्रद्धा निर्मूलन नसून श्रद्धा निर्मूलन करायचे आहे. एका अर्थाने ते खरेच आहे. श्रद्धा अंधश्रद्धा हा शब्दोच्छल कित्येक शतके चालू आहे इथुन पुढेही तो चालूच राहिल. तो काही निकाली लागणारा प्रश्न नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
स
सप्तरंगी गुरुवार, 03/17/2016 - 22:14 नवीन
वरील लिखाणावरून अंधश्रद्धा हे केवळ weakness चे लक्षण आहे हेच प्रतीत होते. strong व्यक्ती अशा अंधश्रद्धा बाळगण्यापेक्षा आणि त्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा (उदा. एक तास पूजा करणे ) दुसरे काहीतरी चांगले करण्यात वेळ घालवेल. आस्तिकता आणि भावनांक याचा काहीही संबंध नाही, उलट मी हे म्हणु शकते मी आंधळी श्रद्धा न ठेवल्याने भावनांक चांगला असु शकतो. तसा तर आस्तिक - नास्तिक वाद कधीच न संपणारा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
ग
गामा पैलवान Sat, 03/12/2016 - 08:44 नवीन
यनावाला, >> श्रद्धेने मन व्याप्त झाले की बुद्धी चालेनाशी होते. माझा अनुभव वेगळा आहे. बुद्धी वापरून श्रद्धा विकसित करता येते. मात्र तुम्ही म्हणता तसं श्रद्धेवर बुद्धीचं नियंत्रण हवंच, याच्याशी सहमत आहे. किंबहुना बुद्धीच्या सहाय्याने श्रद्धावर्धन केल्यास ती बुद्धीच्या अधीन राहते. असं माझं मत आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 03/15/2016 - 15:48 नवीन
यनावाला, तुमचं खालील विधान वाचलं : >> जी गोष्ट इंद्रियानुभवाला येत नाही, तर्कबुद्धीला पटत नाही, जिचे अस्तित्व सिद्ध झालेले नाही, जिचा >> समावेश माणसाच्या अर्जित ज्ञानभांडारात नाही, अशी गोष्ट पूर्वसंस्कार, गातानुगतिकता, ग्रंथप्रामाण्य, इ.आधारे >> सत्य मानण्याची मनोवृत्ती म्हणजे श्रद्धा. उदा.:- "मंगळवारी येणार्‍या संकष्टीच्या दिवशी सिद्धिविनायकाचे दर्शन >> घेतले तर विशेष पुण्य लाभते." यावरून एक घटना आठवली. इस्रोचे शास्त्रज्ञ नव्या अग्निबाणाची प्रतिकृती तिरुपतीच्या चरणी अर्पण करत. ही श्रद्धा आहे. मोहिमेचे संभाव्य यश वा अपयश इंद्रियांच्या अनुभवास आलेले नाही. मोहीम यशस्वी होईल की अपयशी याची तर्कबुद्धी लढवणे अशक्य आहे. अग्निबाण नवीन असल्याने त्याविषयी अर्जित ज्ञानभांडारात काहीच विदा उपलब्ध नाही. मोहिमेच्या यशापयशातून अर्जित ज्ञानभांडार वाढणार आहे. तर मग श्रद्धा असणं उचित की अनुचित? आ.न., -गा.पै. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Tue, 03/15/2016 - 16:15 नवीन
गंडलेला प्रतिसाद. इस्रोचे शास्त्रज्ञ नव्या अग्निबाणाची प्रतिकृती तिरुपतीच्या चरणी अर्पण करत. ही श्रद्धा आहे. >> हे शास्त्रज्ञांचे वागणे हिंदु संस्कृतीला, परंपरेला धरुन आहे. काही मानसिक चौकटी आपण तोडु शकत नाही. सगळ्या जगात अशा चालिरीती असतात. ह्यचा अर्थ ते वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे नाहीत असा होत नाही. मोहिमेचे संभाव्य यश वा अपयश इंद्रियांच्या अनुभवास आलेले नाही. मोहीम यशस्वी होईल की अपयशी याची तर्कबुद्धी लढवणे अशक्य आहे. अग्निबाण नवीन असल्याने त्याविषयी अर्जित ज्ञानभांडारात काहीच विदा उपलब्ध नाही. मोहिमेच्या यशापयशातून अर्जित ज्ञानभांडार वाढणार आहे. >> अतिशय अतिशय गंडलेलं लॉजिक. अग्निबाण म्हणजे जंगलातून काल पकडून आणलेला रानटी घोडा नव्हे. आजच्या अशा मोहिमा आणि चौदाव्या शतकातल्या स्पॅनिश दर्यावर्दींच्या मोहिमा ह्यात फरक आहे हे कळत असून कसं काय बुवा लिहिताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
प
प्रकाश घाटपांडे Wed, 03/16/2016 - 05:58 नवीन
मंगळयान मोहिम व बालाजी ही चर्चा या निमित्त आठवली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ह
होबासराव Tue, 03/15/2016 - 16:53 नवीन
काही मानसिक चौकटी आपण तोडु शकत नाही. सगळ्या जगात अशा चालिरीती असतात. येस्स. तजो बर्‍याच काळानंतर तुमच्या पुर्ण प्रतिसादाशि सहमति.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 03/15/2016 - 18:53 नवीन
तजो, १. >> आजच्या अशा मोहिमा आणि चौदाव्या शतकातल्या स्पॅनिश दर्यावर्दींच्या मोहिमा ह्यात फरक आहे तरीही अनिश्चितता कायमच आहे. २. >> काही मानसिक चौकटी आपण तोडु शकत नाही. सगळ्या जगात अशा चालिरीती असतात. >> ह्यचा अर्थ ते वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे नाहीत असा होत नाही. आहेतच मुळी ते वैज्ञानिक दृष्टी बाळगणारे. त्या ज्या न तुटणाऱ्या मानसिक चौकटी आहेत त्यालाच श्रद्धा म्हणतात. यनावाला नेमके त्यालाच बावळटपणा समजून चाललेत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा