अहंकार कमी कसा करावा?
माणूस मोठा की त्याचा अहंकार, असा प्रश्न विचारला तर साहजिकच उत्तर असेल माणूस. अनेकदा हे आपल्याला कळत असतं पण वळत नाही, आपण स्वतःपेक्षा या 'अहं' ला जीवापाड जास्त जपतो.
या अहंकाररूपी शत्रूला आपल्या मनातून, जगण्यातून हद्दपार करण्याऐवजी आपण त्याचे कोडकौतुक करतो, त्याला डोक्यावर बसवून मिरवतो, खतपाणी घालून वाढवतो, जोपासतो. मात्र त्यानंतर हा अहं आपल्यालाच डोईजड कधी होऊ लागतो कळतही नाही, त्यापायी आपण इतरांशी शत्रुत्व पत्करत राहतोच, अणि त्याहून वाईट म्हणजे स्वतःचेही शत्रू बनत जातो.
आपण स्वतःपुरता विचार केला तरी आपल्याला जाणवेल, आपल्यात अहंकार आहे की नाही.. असेल तर का आहे..
कशाबद्दल आहे.. नसेल तर अतिउत्तम. अशी निर्विकार, नि:स्वार्थी भावावस्था फार थोड्या लोकांना प्राप्त करता येते.
सहसा सामान्यात सामान्य माणूस म्हटला तरी त्याच्यात कसला न कसला अहंकार असतो. आपल्यात काही चांगले गुण असतील तर त्याचा थोडाफार अभिमान असणे वाईट नाही, एखाद्याकडे तसेच कर्तृत्व असेल तर तो अहंकार त्याला शोभतोही, मात्र अती अहंकारी व्यक्ति इतर लोकांपासून, समाजापासून वेगळी पडत जाण्याची शक्यता जास्त असते.
फक्त उदाहरण म्हणून इथलाच अलीकडील एक अनुभव सांगेन, येथील एका विभागाकडून लेखमालेसाठी लेख लिहीण्याबद्दल विचारणा झाली होती, विषय जिव्हाळ्याचा असल्याने मीही आनंदाने होकार दिला. नंतर त्या विभागातील काही सदस्यांबरोबर माझे किरकोळ मतभेद झाले, अशावेळेस आपल्यातील 'इगो' नामक प्रकार येता जाता दुखावून घ्यायला बसलेलाच असतो त्याप्रमाणे तो दुखावला गेला आणि मी तो लेख लिहू शकणार नाही असे त्यांना कळवून टाकले.
इथे माझ्याकडून काही वेगळ्याच व्यक्तिंचा राग तिसर्याच गोष्टीवर, गरज नसतांना, संदर्भ नसतांना काढला गेला,
फक्त 'अहं' मुळे. यात चूक पूर्णपणे माझी होती, नुकसानही माझेच होणार होते, तसे ते झालेच.
अर्थात तो लेख मी काही झाले तरी लिहीणार होते, त्याप्रमाणे तो लिहीला, प्रकाशितही केला, त्याचे समाधान आहेच,
मात्र केवळ इगोला महत्व देऊन एक अतिशय उत्तम संधी हातातून घालवली याचे दु:ख त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे.
(वरील उदाहरण हे फक्त प्रातिनिधीक म्हणून दिले आहे, तो लेखाचा आणि चर्चेचा विषय नाही.)
माणसाचे व्यक्तिमत्व म्हणजे फक्त त्याचे वागणे बोलणे दिसणे इतकेच नसून, त्याचे 'असणे' ही महत्वाचे. हे असणे सुधारण्यासाठी, आपल्यातील सर्व दुर्गुण मिटवून सर्वार्थाने निर्विकार होण्यासाठी काय करावे..?
हा अहं जो माणसाचा फार मोठा शत्रू आहे, ज्यापायी माणूस इतरांपासून, स्वतःपासूनही दूर जात असतो, स्वतःला हरवून बसतो, तो अहं हळूहळू, थोडाथोडा करत एक दिवस पूर्णपणे मिटवण्यासाठी, 'स्व' खर्या अर्थाने गवसण्यासाठी काय करावे ?
आपल्याला माहित आहे की आपण या विशाल अवकाशातील मात्र एक अतिसूक्ष्म कण आहोत ज्याच्या असण्या-नसण्याने या चराचर सृष्टीला, अखिल ब्रम्हांडाला काहीएक फरक पडणार नाही, तर मग हा वृथा अहंकार कशासाठी...
आपण सर्वज्ञानी नाही हे व्यवस्थित कळत असतांनाही आपण तसे आहोत हे कायम स्वतःला आणि इतरांनाही पटवून देण्याचा अट्टाहास कशासाठी...
अहंकार नष्ट कसा करावा आणि त्यावर विजय कसा मिळवावा ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बारिश... :- Yaariyan