Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शेतकर्यांचे हित होईल का ? शेतकरी स्वतः काय करू शकतो?

न
नाखु
Wed, 05/25/2016 - 06:05
🗣 77 प्रतिसाद
कालच लोकसत्तमध्ये एक बातमी वाचनात आली.कृषी उत्पन्न बाजार समीतीचे नियंत्रण हटवून्/शिथील करण्याचे सरकारने ठरविले आहे. त्यामुळे शेतकरी थेट ग्राहकाला आपला भाजीपाला (कांदे बटाट्यासह विकू शकतो).अता या अनुषंगाने आणखी एक बातमी दोन दिवसांपुर्वी वाचनात आली
देविदास मारुती परमाने असे या शेतकऱ्याचे नाव आहे. 10 मे रोजी त्यांनी 952 किलो कांदा पुण्याच्या बाजारात विक्रीस पाठविला होता. 18 गोणी भरून पाठविलेल्या या कांद्याला प्रति 10 किलोला 16 रुपये म्हणजे प्रति किलोला एक रुपया 60 पैसे इतका भाव मिळाला. त्यानुसार शेतकऱ्याच्या मालाचे मूल्य एक हजार 523 रुपये 20 पैसे इतके झाले. या रकमेतून अडत्याने त्याची 91 रुपये 35 पैसे अडत कापून घेतली. हमालीचे 59 रुपये, भराईचे 18 रुपये 55 पैसे इतका खर्च बाजारात झाला, तर माल वाहतुकीचा 1 हजार 320 रुपये इतका खर्च त्याला द्यावा लागला. हा व इतर सर्व खर्च कांद्याच्या पैशांतून वजा केला तर शेतकऱ्याच्या हातात केवळ एक रुपयाच आला.
सविस्तर बातमी इथे कालच लोकसत्ताने एक चांगला (कधी कधी असे सुखद धक्के द्यायची सवय आहे लोकसत्ताला) या प्रश्नाची चहुअंगाने उहा पोह करणारा अग्रलेख छापला आहे. अग्रलेख दुवा
हा दलालांचा अडथळा दूर करून भाजीपाला, फळे आणि कांदा-बटाटा एपीएमसीच्या नियंत्रणातून मुक्त करण्याची सूचना केंद्र सरकारची. काही राज्यांनी ती पाळलीही. महाराष्ट्रात मात्र घोडय़ाने पेंड खाल्ली. सरकार सांगते, की व्यापारी आणि माथाडी कामगार यांच्या विरोधामुळे हा निर्णय बारगळला. खरे तर सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही पक्षांचे अनेक आमदार एपीएमसीवर असल्यानंतर तो निर्णय बारगळणारच होता. पण आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उचल खाल्ली आहे. यासाठी लवकरच ते अध्यादेश काढणार आहेत. त्यालाही जोरदार आणि संघटित विरोध होईलच. माथाडी कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न यातून कसा निर्माण होईल हेही सांगितले जाईल. म्हणजे घाम गाळून शेती पिकवणारा शेतकरी मेला तरी चालेल, पण त्याच्या जिवावर जगणारे जगले पाहिजेत असा हा युक्तिवाद.
अता या दोन्ही बातम्या वाचल्याबरोबर आणखी एका बातमीने लक्ष्य वेधून घेतले (चार आण्याचा शेतकरी नसून या बातम्या वाचायची/पाठपुराव्याची खोड काही सुटेना) माथाडी/आडते/मापाडी संघटनांनी याला कडाडून विरोध केला आहे. अता सजग/सुजाण मिपाकरांनी यात त्यांना काय वाटते ते मत्/शिफारस द्यावे. साधारण मते/अनुभव्/सल्ला या मुद्द्यांवर असावा म्हणजे राजकीय हाणामारी/हेत्वारोप टाळता येतील.
  • आंध्रा मध्ये रयतु बाजार आहे काय? तो नक्की कसा चालतो (हैद्राबाद्वासी मिपाकरांना माहीत असेल तर त्यांनी अनुभव द्यावेत)
  • चंदीगड व हरियाणा पंजाब येथेही याची अंमल्बजावणी झाली आहे,कुणी चंदीगडमधील मित्रांकडून माहीती मिळवून इथे टाकली तर चांगले होईल.
  • मुंबईत थेट विक्री केंन्द्रे चालू केली होती ती का बंद पडली असावीत.
  • मोठ्या सोसायटी (किमान ५० ते ६०० सदनिका असलेले) या करीता काय करू शकतात शेतकरी गटाशी संपर्क करून (त्याकरीता सोसायटीतील कुणी न कुणी तरी गावाकडे घर-जमीन-संपर्क असलेले असेल्च) बचत गट धर्तीवर शेतकरी समूह गट स्थापन करून त्यांचे द्वारे सुनियोजीत विक्री केंद्रे उभारता येतील. सहकारी संकुलातील एखाद्याला रोजगार मिळू शकेल का?
  • शेतकर्यांना त्यांच्या उत्पादनाचा रास्त भाव मिळालाच पाहिजे पण त्याच्या अनावश्यक बोजा ग्राहकावर पडता कामा नये.(शहरातील सग्ळेच मॉल मध्ये भाजी घेत नाहीत). प्रतिसाद किमान असा तरी असावा
वरील उदाहरणातील कांदा किरकोळ बाजारात (कंपनी कँन्टीन/मेस ई ला) सुद्धा किमान ३-४ रू किलोने विकला गेला असता. या धाग्यावर यांचेहीसहर्ष स्वागत आहे. जलयुक्त शिवारवर काही अभिप्राय्/मत दिले नाही तरी हरकत नाही पण इथे तरी त्यांनी+त्यांच्या मिपा समर्थकांनी मौनात राहू नये ही अपेक्षा. श्री चिगो यांनी सध्या कार्यरत असलेल्या स्थानावर नक्की कसा बाजार चाल्तो ते सांगावे आणि अश्या प्रतिसादासाठी मी त्यांचा एक लिखाण चाहता आहे. अकृषीक शहरी नाखु
वर्गीकरण
समाजकारण बातमी

प्रतिक्रिया द्या
30952 वाचन

💬 प्रतिसाद (77)
न
नाखु गुरुवार, 05/26/2016 - 06:10 नवीन

बाजार समित्यांचा ‘बाजार’ उठणारच...! -

Thursday, May 26, 2016 AT 06:30 AM (IST) Tags: mumbai, maharashtra, market rate कायद्यातील दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण - आता प्रतीक्षा मंत्रिमंडळाच्या मंजुरीची मुंबई - कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील लुटमारीला कायमची मूठमाती देण्यासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यातील दुरुस्तीला सर्व संबंधित विभागांनी सहमती दिली असून, येत्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कार्यक्षेत्र बाजार समिती आवारापर्यंत मर्यादित करणारा पणन विभागाचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मंजूर होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी बाजार (National Agriculture Market) संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी बाजार समिती क्षेत्र सीमित करणे आवश्यक ठरले आहे. केंद्राने अर्थसंकल्पात या संबंधीची घोषणा केली आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोंदीनी सर्व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय कृषी बाजार योजनेचा आढावा घेतला होता. त्यामध्येच खुद्द पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा या महत्त्वपूर्ण योजनेत सहभाग का नाही, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याचबरोबरच गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान कार्यालयाकडून राज्य सरकारकडे केलेला पत्रव्यवहार आणि त्यावरील कार्यवाहीची विचारणा करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यानंतर तातडीने पणन विभागाला कामाला लावल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. फळे आणि भाजीपाला विनियमनमुक्ती ही साधी प्रशासकीय बाब आहे. पंरतु राष्ट्रीय कृषी बाजारामधे राज्याचे स्थान बळकट करण्यासाठी सध्याच्या महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियमात बदल करण्याचे सरकारने निश्चित केले आहे. त्यानुसार पणन विभागाचा प्रस्ताव तयार करून बाजार समिती अधिनियमात कृषी उत्पन्न बाजार समितींच्या कार्यक्षेत्राची तरदूत रद्द करून राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कार्यक्षेत्र संबंधित बाजार समिती आवारापुरते मर्यादित ठेवले जाणार आहे. पणन विभागाच्या या प्रस्तावाला विधी व न्याय आणि इतर संबंधित वित्त विभागांनी मंजुरी दिली आहे. सध्याच्या घटकेला मंजूर प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे येत्या मंगळवारी (ता. ३१ मे २०१६) मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर या कायदा दुरुस्तीला अध्यादेशाचे स्वरूप देऊन राज्यभरात नव्या कायद्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. आगमी विधिमंडळाच्या पावसाळी आधिवेशनात या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होणार आहे. बाजार समिती कायदा दुरुस्तीने काय होणार ? सध्याच्या कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियम १९६३ ने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. उदा. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिचीचे कार्यक्षेत्र मुंबई महानगर क्षेत्र आहे. त्यामुळे या क्षेत्रात विक्रीसाठी येणाऱ्या शेतमालावर बाजार समिती सेस आणि इतर शुल्क वसूल करून नियमन करते. कायद्यातील दुरुस्तीमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे क्षेत्र हे फक्त वाशी (तुर्भे) येथील समितीचा आवार राहील. त्यामुळे मुंबई शहरात मुक्तपणे शेतमाल ने-आण आणि विक्री करणे शक्य होईल. शहरात विक्री न झालेला शेतमाल किंवा बाजार समिती अधिक दर देत असेल, तर शेतकरी थेट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल नेतील. समितीच्या प्रवेशद्वारावर संबंधित सेस आणि नियमन प्रक्रिया होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध पर्याय उपलब्ध होतील. परिणामी बाजार समित्या अधिक कार्यक्षम आणि कार्यप्रवण होतील, असा सरकारचा मानस आहे. कायद्यातील दुरुस्तीमुळे प्रशासकीय बाब असलेली फळे आणि भाजीपाल्याची विनियमनमुक्ती आपोआपच अमलात येईल, असे पणन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/26/2016 - 06:14 नवीन
कॉलींग टू श्री गंगाधर मुटे -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sat, 06/11/2016 - 19:37 नवीन
सध्या पुणे जिल्हयात शेतीभागात दौरे सुरू आहेत. अनेक कांदा उत्पादक शेतकर्‍यांशी रोज गाठभेट होत आहे तरी ह्या विषयावर बोलण्यास अजून पुरेसा अभ्यास नाही. तरी निरिक्षण आणि नोंदी कळवतो. कांदा पिकवणार्‍या जुन्नर तालुक्यातल्या शेतकर्‍यांनी मागच्या दोन-तीन वर्षात कांदापिकातून भरगच्च कमाई करुन टोलेजंग बंगले बांधलेले, बुलेटी घेतलेल्या मी बघत आहे. त्यामुळे आज कोणीही कांदा उत्पादक भाव पडले म्हणून रडत असेल तर माझ्याकडे तरी सहानुभूतीची भावना नाही. हजारो टनांनी कांदा बराकींमधे साठलेला आहे. दिवाळीच्या सुमारास तो बाहेर येईलच. आता जो कांदा बाजारात येतोय तो कमी प्रतीचा, जास्त न टिकणारा असल्याने भाव मिळत नाही. वरील बातमीतही कांदा कमी प्रतीचा असल्याने भाव मिळाला नाही असे बातमीतून कळते. कांद्याच्या अनेक प्रती व जाती आहेत. उत्तम कांदा चांगला भाव मिळवतोच. पण मागे दोन तीन वर्षात भाव वधारल्याने अनेकांनी लागवड करुन बाजारात आवक वाढवली ज्यामुळे भावांवर परिणाम झाला असावा असा अंदाज आहे. सध्या टोमॅटोचे भाव वधारले आहेत. घाऊक बाजारात वीस किलोचा क्रेट सुमारे ९५० ते ११५० च्या दरम्यान विकला जात आहे. ह्याला कारण सिन्जेन्टा कंपनीचे १०५७ जातीचे बियाणे लागवडीच्या काळातच भयंकर उष्मा, तापमान वाढ झाल्याने नीट रुजले नाही व त्यामुळे सुमारे ७०-८० टक्के लागवड अयशस्वी झाली. ह्यात अनेक शेतकर्‍यांनी तीन तीन दा लागवड करुनही रोपे रुजली नाहीत. रुजली तिच्यावर पाने आकसणे हा प्रकार झाला. त्यामुळे अपेक्षित उत्पादन झालेच नाही. सध्या जुन्नर भागात हजारो एकर क्षेत्रावर फक्त टोमॅटो पिकाचे साम्राज्य आहे. कारण नॉर्मली ४००-६०० च्या आसपास मिळणारा भाव आज दुप्पट झाल्याने शेतकरी रिस्क घेऊन प्रचंड खर्च करण्याची तयारी ठेवून आहेत. अर्धा एकर टोमॅटो लागवड असणारास फक्त एक लाख रुपये गुंतवणुकीवर तीन-चार महीन्यात पाच ते सात लाख रुपये कमवण्याची संधी आहे. अशा अवस्थेत प्रचंड खर्च करुन उत्तम पिक मोठ्या प्रमाणात एकाच वेळी बाजारात आले तर भाव पडून खर्चही वसूल न होण्याचा धोका आहेच. हा झाला रिस्क बिझनेसचा शेतीचा फंडा. आता दुसरं उदाहरण जे नाखु यांच्या प्रश्नाबद्दल. चाकण-शिक्रापूर रोडवर बहूळ नावाचे गाव आहे. इथे श्रीयुत वाडेकर यांनी काही समविचारी तरुणांना सोबत घेऊन सुमारे साडेतीनशे शेतकर्‍यांची प्रायवेट लिमिटेड कंपनी स्थापन केली आहे. ह्या उपक्रमात ते जैविक शेतीवर भर देत आहेत. त्यांची खते व अन्य निविष्ठा स्वतः तयार करुन खर्च कमी करण्याकडे लक्ष आहे. शेतीतून येणारे विविध उत्पादन स्वतः पुण्यातल्या सतरा सोसायट्यांमधे थेट विक्री करत आहेत. ह्यांना मी स्वतः भेटलो आहे. उत्तम कारभार चाललेला आहे. इतर शेतकर्‍यांनी अनुकरण करण्यास हरकत नाही.
  • Log in or register to post comments
प
पिंगू Sun, 06/12/2016 - 11:23 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
र
रंगासेठ गुरुवार, 06/23/2016 - 12:40 नवीन
श्रीयुत वाडेकर यांच्या या उपक्रमाबद्दल आणखी वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ख
खटपट्या Sat, 06/11/2016 - 23:11 नवीन
मी कोकणातला त्यामुळे कांदा शेतीबद्द्ल मला जास्त माहीत नाही. पण लेख पोटतीडकीने लीहीलाय हे जाणवते. को़कणातील आंबा बागायतदारांची पण थोड्याफार प्रमाणात हीच अवस्था आहे. माझ्या भावाच्या बागेतील आंब्याची पेटी २०० रु.ला उचलली जाउन मुंबईत ती १५०० रू. ला विकली जाते ते पाहून जीव जळतो. ट्रक करुन थेट बागेतून आंबे उचलून मुंबै/ठाण्यात आणण्याचा प्रयत्न केल्यास बाजारसमीतीचे लोक्स नाक्यानाक्यावर त्रास देतात.
मोठ्या सोसायटी (किमान ५० ते ६०० सदनिका असलेले) या करीता काय करू शकतात शेतकरी गटाशी संपर्क करून (त्याकरीता सोसायटीतील कुणी न कुणी तरी गावाकडे घर-जमीन-संपर्क असलेले असेल्च) बचत गट धर्तीवर शेतकरी समूह गट स्थापन करून त्यांचे द्वारे सुनियोजीत विक्री केंद्रे उभारता येतील. सहकारी संकुलातील एखाद्याला रोजगार मिळू शकेल का?
याबाबत विचार करता येइल...
  • Log in or register to post comments
D
damn Sat, 06/11/2016 - 23:57 नवीन
बाजार समितीच्या लोकांचा नाक्यांवरील त्रास कसा टाळता येउ शकेल??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या Sun, 06/12/2016 - 00:39 नवीन
पहील्यांदा या लोकांना गाड्या अडवण्याचा अधिकार आहे की नाही पहावा लागेल. बरेच ट्रकचालक बिचारे अशिक्षीत असतात. थोड्या धमकीने घाबरतात. कोणत्या कायद्या अंतर्गत हे गाड्या अडवतात ते पहावे लागेल. मधेमधे तर प्रायव्हेट बससुद्धा हे लोक चेक करत होते असे ऐकले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: damn
प
पिंगू Sun, 06/12/2016 - 11:19 नवीन
कसं आहे ना. जेव्हा ट्रक मध्ये कुठलाही माल लादला जातो, तेव्हा त्याच्या पावत्या बनवल्या पाहिजेत आणि त्या असल्या की आपण शेतमालाची कायदेशीर वाहतूक करत आहोत, हे सिद्ध करता येते. योग्य कागदपत्रे असल्यावर नाक्यावरचे लोक काय पोलिससुद्धा काहीही खुस्पट काढू शकत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या Sun, 06/12/2016 - 18:37 नवीन
ओके पिंगू साहेब. पण स्वतःच्या बागेतून काढलेले आंबे ट्रकमधे चढवताना कसली पावती बनवायची ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू
प
पिंगू Wed, 06/15/2016 - 14:47 नवीन
सर्वप्रथम खालील पावत्या बनवाव्यातः १. डिलिवरी चलन (तुमच्या नावाने आणि ज्या शहरात ज्या पार्टीकडे जाईल त्यांच्या नावाने) २. value declaration statement ज्यात ट्रकमध्ये असलेल्या मालाची किंमत ठरवून दिलेली असते. जकात प्रकरणात ही पावती अतिशय महत्वाची ठरते. वरील दोन पावत्या पुर्‍या झाल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 06/12/2016 - 09:46 नवीन
कांदा संबंधी बातमी बद्दल डांगे साहेब बोलले आहेतच, मला वाटते त्यावर मी अधिक काही बोलु शकणार नाही. तरीही मला वाटते शेतकरी मंडळी ला फ़क्त कायदेशीर अधिकार देऊन (त्यांचा माल विकायचा) जास्त काही फायदा होणार नाही, जर आपण शेतकरी मंडळीला शेतीमाल प्रक्रिया/ कापणीपश्चात तंत्र ह्यात शॉर्ट टर्म कोर्सेज देऊ शकलो तर अजुन जास्त फायदा होईल. म्हणजे बघा उदाहरण म्हणून मला बहुदा नगर जिल्हा इथली एक केसस्टडी आठवते आहे कुठलेतरी गाव होते तिथल्या शेतकरी मंडळीने रानाच्या बांधावर शेवगा शेंग झाडे लागवड केली होती, सुरुवातीला असेच समितीला पाठवणे झाले तेव्हा लागवड कमी होती, झालेले फायदे पाहुन गावात शेवगा शेंग पीक एकदम वाढले तसे त्या शेतकऱ्यांनी diversify केले अन शेंगा नीट सोलुन त्याची बोटा इतकी पेरं करुन ती पॉलिथीन रॅप करुन पंचतारांकित हॉटेल्स वगैरेला देणे सुरु केले, त्या आघाडीवर सुद्धा जेव्हा stagnation आले तेव्हा ह्यांनी लोकवर्गणी मधुन एक pasturization अन canning प्रकल्प काढला अन ती बोटभर पेरं मीठाच्या पाण्यात उकडून मीठाच्या गार पाण्यात (brine) मधे कॅन करुन परदेशी पाठवणे सुरु केले होते, ह्याचे जर शिक्षण देता आले तर उत्तम होईल असे वाटते मला.
  • Log in or register to post comments
प
पिंगू Sun, 06/12/2016 - 11:08 नवीन
+१ सोन्याबापू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
र
रंगासेठ गुरुवार, 06/23/2016 - 12:42 नवीन
भारी केस स्टडी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
प
पिंगू Sun, 06/12/2016 - 11:14 नवीन
एखा अल्पभूधारक शेतकरी जो दिवसामागे काही थोडा शेतीमाल उत्पन्न काढतो, तो या आधी सुद्धा किरकोळ बाजारात बसून माल विकू शकत होता. पण एकरांमध्ये जमिन असणारे आणि दिवसामागे टनांमध्ये शेतीमाल उत्पादन करणार्‍याला बाजार समिती शिवाय सध्या तरी पर्याय नाही. एकतर त्याला बाजारसमितीमधील नोंदणीकृत व्यापार्‍यांनाच मिळेल त्या भावात माल विकावा लागेल किंवा स्वतः प्रक्रिया करुन शेतमाल साठवून किरकोळ बाजारात विकावा लागेल. आणि दुर्दैवाने आपल्या इथल्या शेतकर्‍यांनी प्रक्रिया उद्योगाकडे दुर्लक्ष केले आहे.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Sun, 06/12/2016 - 11:25 नवीन
स्वतःच्या कुटुंबियांच पोट भरेल इतकच पिकवावं, थोडे फार कपडे लत्ते घेता आले की झालं. बास. १० पोती गहू, तांदूळ, अन वर्षभर भाजीपाला. स्वतः पिकवावा अन स्वतच खावं. उरल सुरल विकून टाकाव. दोन वर्ष सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा उद्योग केला, तर सगळे सुतासारखे सरळ होतील.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Sun, 06/12/2016 - 11:32 नवीन
शेतकरी मजुरी, बियाणं, खतं, हत्यारं, वाहनं याचा पैसा हे कुठुन आणणार? बर वैद्यकीय खर्च,शाळा पोरांचं शिक्षण हा खर्च कसा करणार? अन्न की एकमेव गरज नाही माणसाची. सगळे लोक शेतकर्‍यावर अवलंबून आहेत आणि शेतकरी इतर कोणावर अवलंबून नाही ही अत्यंत चुकीची समजूत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
स
संदीप डांगे Sun, 06/12/2016 - 11:57 नवीन
सहमत आहे ढेरेसाहेब. शेती हा उद्योग फक्त शेतकर्‍यांवर अवलंबून आहे ही फार चुकीची समजूत आहे. शेतकरी हा एका मोठ्या सप्लाय चेनमधला फक्त एक छोटासा घटक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 06/16/2016 - 07:04 नवीन
. वरील माझे विधान निव्वळ हताशेपोटी आलेले आहेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
च
चौकटराजा Sun, 06/12/2016 - 11:36 नवीन
ग्राहक म्हणून अनुभव असा आहे की मंडईत मिळणार्‍या भावापेक्षा एक रूपयादेखील कमी भावाने कोणी विकणारा मला आजतागायत आढललेला नाही. चिंचवड येथे एम आय डी सी च्या कार्यालयाजवळ एक शेतीमालाचा मॉल आहे. बाहेर पाटी आहे की थेट शेतकर्‍याकडून ग्राहकाकडे तरी भावात काही फरक नाही. आकुर्डी येथे दर शनिवारी संध्याकाळी थेट शेतकरी ते ग्राहक अशी जाहिरात केलेला आठवडा बाजार भरतो भावात काहीही फरक नाही. कोण या शेतकृयांच्या हिताच्या नादी लागणार? नक्की थेट शेतकरी माल घेऊन बाजारात विक्रेता म्हणून येतो का याबद्द्ल दाट शंका आहे. आज पावेतो थेट दूधवाल्याकडून २१ वा २५ रू लिटरने दूध कोणी विकत घेतले आहे काय ? असेल तर त्या दूधवाल्याचा पत्ता द्या ! भाव चढला की निर्दयपणे ग्राहकाची लूट करायची व आपटला की लिलाव बंद पाडायचे हा कोणता न्याय ? मुळात सर्वानी वाटून वाटून पिके घ्यावीत कांदा, स्त्रॉबेरी, टमाटो उस व कापूस हे जुगार आहेत. जमले तर बंगला नाहीतर .......
  • Log in or register to post comments
ए
एक सामान्य मानव Sun, 06/12/2016 - 12:02 नवीन
चौकटराजा +१०००१ अगदी अस्साच अनुभव माझ्या मित्राला आंबे मोहोत्सवात आला. एपीएमसीमधे ३०० ते ३५० मधे अत्यंत सुंदर आंबे विश्वासु विक्रेत्याकडे मिळत असताना दादरला आंबे मोहोत्सवात दर ६०० ते ६५० होता. तरीही शेतकर्याला मदत म्हणून आंबे घेतले तर खराब निघाले. आमचा नेहमीचा विक्रेता खराब निघाले तर पैसे परत देतो इथे तेही नाही. म्हणून हे प्रयोग अयशस्वी होत असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
स
संदीप डांगे Sun, 06/12/2016 - 12:27 नवीन
तुमची भूमिका रास्त आहे. शेतकरी टू ग्राहक ह्या थेट व्यवहारात फक्त शेतकर्‍याचा वाढीव फायदा आहे. (जो कृउबास च्या सौजन्याने मिळत नाही) तसेच ग्राहकांना प्रतवारी केलेला शेतमाल मिळेल अशी ही व्यवस्था नसल्याने ग्राहकांचे नुकसान आहे. शेतकरी टू ग्राहक ह्यांच्यात मध्यस्थ आवश्यक आहेच. मुद्दा फक्त माकडाने किती लोणी खावे हाच आहे. बाकी शेतीची व्यवस्था सगळीच अनागोंदी आहे. कोणी कोणती पिके घ्यावीत ह्यावर कोणी निर्बंध आणू शकणार नाही. भाव चढणे-पडणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, त्यात ग्राहकाने दया-माया असण्याची अपेक्षा करणे खरेतर गैर आहे. त्याचबरोबर भाव पडल्यावर शेतकर्‍याने रडगाणी गाणेही गैर आहे. चौकस बुद्धी, चौफेर नजर, जागृत मानस असणे ही आताच्या शेतकर्‍याची खरी गरज आहे. बाजारात कोणत्या मालाची आवक जास्त आहे, सिजन काय आहे, वातावरण काय आहे, कोणत्या मालाला जास्त डिमांड असणार हे सगळे आपसुक आतापर्यंत सर्व शेतकर्‍यांना कळत असेल असा आपल्यासारख्या नॉन-शेतकर्‍यांचा समज असतो. पण प्रत्यक्षात अशी परिस्थिती नाही हे बघून मी खरंच अस्वस्थ झालो. हुशार शेतकरी खरोखर कमावत आहेत व मूर्ख गमावत आहेत. बाकी, ऊसाचे आर्थिक गणित मला कळले ते असे: एक एकर शेतात सुमारे शंभर टन ऊस पिकतो - भरपुर पाणी असेल तर - टनाला चार हजार ते साडेचार हजार भाव मिळतो. साडेचार लाख रुपयातून खर्च जातो सुमारे ७० ते ८० हजार. बाकीचा निव्वळ नफा. वर रोज रोज मेहनतीची गरज नाही. राजकारणं खेळायला मोक्कार वेळ. गांजाच्या नशेसारखी ऊसशेती करणार्‍या शेतकर्‍यांना (दुष्काळाच्या काळातही) ऊसापासून परावॄत्त करणे किती कठिण आहे हे ह्या गणितावरुन कळेल. सद्यस्थितीत पाणी कमी असल्याने एकरी २०-२५ टन ऊस निघत आहे अशी खबर आहे. खर्च मात्र वर सांगितला तेवढाच. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यातर आश्चर्य वाटायला नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
अ
अभ्या.. Sun, 06/12/2016 - 13:51 नवीन
संदीपराव, उसाचे टनेज रेकॉर्ड ११० वगैरे असले तरी तेवढे पडत नाही. रेट पण तेवढा नाहीये. मिळते ते पण तीनचार टप्प्यात. त्यात बर्‍याच गाळण्या आहेत. अगदी सलीपबाय(चीटबॉय) पासून ते उसतोडणी मुकादमापरयंत. सगळे रीतीरिवाजाने झाले तर नॉर्मली १.५० ते २.२० पर्यंत फायदा पडतो. थोडे का होईना घरचे मनुष्यबळ गुंतत असतेच. अगदीच निवांत बसून घरच्याघरी पैसे फक्त चेअरमनला मिळत असावेत. ;) बाकी हुशार कमवतात हे मात्र अगदी खरेय. माझ्या एका मित्राचा हायवेच्या हॉटेलधाब्यावाल्यांसोबत टायप अस्ल्यासारखा आहे. रोज गावाकडे दिवस्भर तो कांदे आणि लिंबू गोळा करतो. स्वतःच्या शेतात उस सोडून त्याने फक्त भाज्यांवर लक्ष घातलेय. एक छोटा हत्ती आहे. सकाळी सगळ्यांकडे दूधाचा वरवा असल्यासारखा टाकत जातो. एक दिवसाआड पैसे बोली. संगट सीझननुसार मेथी, पालक आदी साठी अजून एक गाडी घेतोय. हॉटेलवाल्यांना मार्केट रेट माहीत अस्ल्याने जास्त भावात विकता येत नाहीत पण त्यांची गावातली फेरी वाचते. एकदम बराच माल जातो. एकेक हॉटेलवाला १००-१२५ लिंबं तरी घेतोच. मनुष्यबळ जास्त गुंतत नाही. मार्केटात न जाता डायरेक्ट हयवेवर गेल्याने डिझेलचा खर्च परवडतो. मस्त चाललेय त्याचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 06/13/2016 - 17:08 नवीन
माझी ऐकिव माहिती फक्त. खरं खोटं अजून माहित नाही नक्की. मला माहिती पुरवणारा ऊसउत्पादकांवर खार खाणारा असू शकतो. ;) योग्य तप्शील मिळाला की (म्हणजे ऊस नक्की किती पाणी पितो, कोणाचे भले होते, स्टार्ट टू एन्ड काय लाइफसायकल आहे हे सगळे फस्ट हॅण्ड कळल्यावर) अधिक चर्चा करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
व
विनटूविन गुरुवार, 07/21/2016 - 15:42 नवीन
चिंचवडचा मॉल केवळ स्टोअर्ड फ्रोजन माल विकतो. त्यांना बाहेरचे मार्केट असेल. आत गेलो नाही गेलो कुणाच्याही चेहर्‍यावर तिथे फरक पडत नाही. गर्दी कधीच नसते (चिटपाखरू ही नसते)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
म
मार्मिक गोडसे Sun, 06/12/2016 - 13:33 नवीन
भरपुर पाणी असेल तर - टनाला चार हजार ते साडेचार हजार भाव मिळतो.
महाराष्ट्रात उसाला FRP २३०० -२५००/टन आहे. साखर उतारा ९-११ % असतो. तुम्ही म्हणता त्या हिशोबाने साखरेचा उत्पादन खर्चच रू.४०-४५/किलो येतो.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 06/13/2016 - 17:08 नवीन
योग्य तप्शील मिळाला की (म्हणजे ऊस नक्की किती पाणी पितो, कोणाचे भले होते, स्टार्ट टू एन्ड काय लाइफसायकल आहे हे सगळे फस्ट हॅण्ड कळल्यावर) अधिक चर्चा करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
प
प्रसाद गोडबोले Mon, 06/13/2016 - 11:37 नवीन
आदरणीय मित्र नाखु, पोटतिडकीने लिहिलेला लेख कम माहीतीपत्रक धागा आवडला. मागे आमच्या दोन शेतकरी मित्रांशी झालेल्या चर्चेत त्यांनी असे मत मांडले की श्रीमंत होण्यासाठी जमीनी विकणे हाच शेतकर्‍याकडे असलेला एकमेव पर्याय आहे. पण आमचे अजुनही असे मत आहे की हुशार शेतकरी कधीच तोट्यात जात नाही . आमच्या मित्रांनी दिलेले - उस सोडुन फायद्याची शेती करुन दाखवा हे आव्हान आम्ही स्विकारले आहे . पुढे मागे आम्ही शेती करायला घेवु तेव्हा आपल्या मदतीसाठी अ‍ॅडव्हान्स मध्ये विनंती करुन ठेवत आहे :) अवांतर : अ‍ॅङ्रीकल्चराल प्रॉडक्ट्स वर ऑप्शन्स , फ्युचर्स , ऑप्शन्स ऑन फ्युचर्स वगैरे सारखे फायनान्शियल डेरीव्हेटीव्ह तयार केले अन अ‍ॅक्टीव्ह ट्रेडींग मार्केट बनवले तर शेतीत उत्पादनांवर प्रचंड फायदा कमावता येईल असा माझा अंदाज आहे. अर्थात हुशार सुशिक्षित शेतकर्‍यांनाच ! असो, ह्या विषयातील लिगल अ‍ॅस्पेक्ट्स पहाव्या लागतील , आमच्या अल्प ज्ञानानुसार पुर्वी भारतात अ‍ॅग्रीक्ल्चरल डेरीव्हेटीव्ज बॅन होते . सध्याची स्थिती माहीत नाही. पण कायदा म्हणाले की पळवाट काढता येईलच ! असो. आपला विनम्र आणि आशावादी मार्कस ऑरेलियस Vi veri universum vivus vici
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 06/30/2016 - 14:29 नवीन
ह्या विषयावर इथे चर्चा चालू आहे. परंतू अ‍ॅग्रीकल्चरल डेरीव्हेटीव्जमुळे शेतमालाला योग्य भाव मिळेल किंवा शेतकर्‍याचे आर्थिक नुकसान होणारच नाही अशी ह्या यंत्रणेत ताकद नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
म
मार्मिक गोडसे Mon, 06/13/2016 - 12:00 नवीन
अ‍ॅङ्रीकल्चराल प्रॉडक्ट्स वर ऑप्शन्स , फ्युचर्स , ऑप्शन्स ऑन फ्युचर्स वगैरे सारखे फायनान्शियल डेरीव्हेटीव्ह तयार केले अन अ‍ॅक्टीव्ह ट्रेडींग मार्केट बनवले तर शेतीत उत्पादनांवर प्रचंड फायदा कमावता येईल असा माझा अंदाज आहे
. हा ऑप्शन्स चांगला आहे. परंतू खोट्या गोडाऊन रिसिट दाखवून सट्टा खेळला जात असल्यामुळे व सेबीच्या अ‍ॅग्रीकमोडीटी वायदा व्यवहाराच्या धरसोड वृत्तीमुळे शेतकर्‍याला हेजिंगही करता येणार नाही, प्रचंड फायदा होणे तर दूरच.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Mon, 06/13/2016 - 17:58 नवीन
एक एकर शेतीत फारतर 20-30 टन ऊ स निघेल.. रेकार्ड एकरी 45 टनाच आहे. बाकी लिहीण्यासारख बरच आहे पण ते विदा कुठुन द्या..
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 06/13/2016 - 19:25 नवीन
कैच्या कै. एकरी रेकॉर्ड 98.6 असे दि हिंदू म्हणतेय. मला स्वतःला 90 टनेज पाडणारे लोक माहिती आहेत. 100 टन पाडून दाखवणारे हे बघ. Default Consultancy for sugarcane growers: (100 tonnes per acre yield) Dear farmers, We, Vasumitra life Energies Pvt. Ltd, provide consultancy for increasing sugarcane yield to 100 tonnes per acre or more. Consultancy includes everything starting from land preparation to harvesting. The following presentation explains briefly about the same. This presentation also has visual and documented results. Samved Humiphos (Phosphate Rich Organic Manure) We are working with 5 sugar factories based in Gujrat (1), Maharashtra (3) and Tamilnadu (1) to provide similar consultancy for their member farmers. महाराष्ट्र सरकारच्या मताने त्यांच्या साईटवर 35 ते 40 सरासरी आहे. रेकॉर्ड नव्हे. सरासरी. ही सरासरी सुद्धा कशी घसरलीय याचे उत्तर स्वतःच्या जिल्ह्यात सापडेल. ऊस करावा कि नाही हा वेगळा प्रश्न आहे पण कैच्या कै दावे नकोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ज
जेपी Tue, 06/14/2016 - 14:20 नवीन
ऊप्स माय मिस्टेक.. स्वत:ला अपडेट केल नाही.धन्यवाद. मी स्वत: पिकपेरा बदलुन एकरी उत्पादन वाढवणारे लोक्स पाहिले आहेत.हेक्टरी उत्पादन एकरात दाखवुन देण्याचे प्रकार घडलेत. परत चेक करतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
न
नाखु Wed, 06/15/2016 - 05:20 नवीन
सर्वांना धन्य्वाद.सहसा असल्या धाग्यांना अनुल्लेखाने मारले जाते (राजकारण्,धर्म्,शहर ई सारखा माल मसाला नसल्यामुळे असेल.पण भाजीपाला ई शेतीमाल दैनंदीन आवाश्यक बाब आहे.त्याच्याशी प्रत्येक मिपाकराचा किमान ग्राहक्,लाभार्थी+उप्भोक्ता म्हणून नक्कीच संबध आहे.आणि सगळे मिपाकर नेहमी राजकीय अभिनिवेषातून प्रतिसाद देत नाहीत याचीही जाण आहे. आप्ल्या भागात भाजीपाल्याचे भाव कसे आहेत.माहीतीतील कूणी थेट विक्री करून रास्त नफा मिळवते का अशी उदाहरणे द्यावीत. वरती अभ्याने एक सुंदर पथदर्शी उदाहरण दिले आहे. माझा शाळासोबती पानशेत्जवळ स्वतःची शेती कसतो.भाजीपाला थेट उपहारगृह आणि खानावळींना देतो (पानशेतवरून घरी धायरीला येता येता) आणि पैसे लगेच दुसर्या दिवशी त्यामुळे खेळते भांडवल सतत राहते. उधारीचा ससेमिरा करावा लागत नाही.महत्वाचे म्हणजे आधल्या दिवशी ग्राहकांची कमी जास्त मागणी असेल तर त्या नुसार भाजीपाला काढणे कमी+जास्त केले जाते (तो मुख्यत्वे वांगी,ढोबळी,गवार्,भेंडी हीच भाजी पीके घेतो) त्याने फक्त २ एकर क्षेत्राचे जोरावर शेती उत्प्नातूनच मुलाला अभियंता आणि मुलगी सनदी लेखापाल क्षेत्रात शिक्षण घेण्याइतपत भरारी घेतली आहे. शिवाय स्वतः शेतात राबत असल्याने (प्रसंगी मुलगी,पत्नी,आणि मुलगाही शेतात काम करतात्)नेवाश्याजवळ ४५ एकर जमीन घेतली आहे तिथे पाण्याची व्यवस्था करण्याचे आणि उसासारखे पीक घेण्य्साठी धडपड करीत आहे.

या विषयाच्या अनुषंगाने अग्रोवनमधील ही एक सुखद बातमी.

माहीती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करीत असताना त्याचा आपल्या शेतीसाठी आणि शेतीमाल विकण्यसाठी उपयोग करणारा आनंद नक्कीच तुम्हाला भावेल. पुण्यामध्ये माहिती तंत्रज्ञान कंपनीत कार्यरत असणाऱ्या आनंद उंडे या तरुणाने वडिलोपार्जित शेती आणि गीर गायींच्या संगोपनाकडे चांगले लक्ष दिले आहे. दर शनिवार, रविवार शेती आणि गोठ्याच्या नियोजनातून शाश्वत शेतीकडे त्याने पाऊल टाकले. शेती आणि पशुपालनासाठी मित्रांची चांगली साथ मिळाली आहे. पुणे शहरापासून ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या पणदरे (ता. बारामती) गावात आनंद शशिकांत उंडे याची वडिलोपार्जित शेती आहे. वडिलांच्या बरोबरीने त्यांचे शेतीवर जाणे असायचे. शिक्षण पूर्ण झाल्यावर आनंद माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीमध्ये रुजू झाला. वडिलांचे निधन झाल्याने नोकरी सांभाळत गेल्या सहा वर्षांपासून आनंदने दर शनिवार- रविवार गावी जात शेती सुधारण्याचा कार्यक्रम हाती घेतला. मित्रांचीही चांगली साथ मिळाली. गीर गायींच्या संगोपनाला सुरवात ः शेती सुधारण्याबरोबरीने आनंदचे लक्ष गीर गायींच्या संगोपनाकडे गेले. यासाठी कारण ठरले ते दै. ॲग्रोवनचे देशी गोवंश चर्चासत्र. याबाबत आनंद म्हणाला, की चर्चासत्रामध्ये गायींच्या संगोपनाची माहिती मिळाली. पशुपालकांच्या गोठ्याला भेट देऊन व्यवस्थापन समजाऊन घेतले. वलसाड (गुजरात) येथील शेतकऱ्याने ओएलएक्सवर गीर गायींची माहिती दिली होती. मी तेथे जाऊन जातिवंत गीर गाय निवडली. पशुतज्ज्ञांकडून गाय आणण्याचे सोपस्कार पूर्ण केले. अॉक्टोबर, २०१४ मध्ये दसऱ्याला गीर गाय आणली. दुसऱ्या वेताची गाभण गीर गाय मला वाहतूक खर्चासह ५४ हजार रुपयांना पडली. शेतातील वातावरणात रुळल्यानंतर ही गाय प्रति दिन सात लिटर दूध देऊ लागली. माझी तीन एकर शेती सांभाळण्यासाठी गडी असल्यामुळे गायीचे संगोपन सोपे झाले. दर आठवड्याला शनिवार- रविवार शेतीवर राहून शेती आणि गायीच्या पुढील संगोपनाचे नियोजन सुरू झाले. गायीला कालवड झाली. गावातील ओळखीच्यांना दररोज दुधाचा चाळीस रुपये लिटर या दराने रतीब सुरू केला. यातून किमान व्यवस्थापन खर्च निघू लागला. शेतीला शेणखत, गोमूत्राची सोय झाली. वर्षभरात ग्राहकांच्याकडून दुधाची मागणी सुरू झाली. याच काळात पुण्यात मित्रांच्या सहकार्याने देशी गायींच्या दुधाच्या मागणीचा अभ्यास केला आणि टप्प्याटप्प्याने गुजरातमधून गीर गायी आणल्या. पैशाची जुळणी करून शेताजवळ मुक्त संचार गोठ्यासाठी १५ गुंठे जागा घेतली. तेथे कूपनलिकेला पाणी लागले. सध्या गोठ्यात ३० गायी, २२ वासरे आहेत. गायी आणि वळूच्या पशुवैद्यकाकडून तपासण्या केल्या. गायींच्या व्यवस्थापनासाठी गोठ्यात कायमस्वरूपी दोन मजूर आहेत. दररोज त्यांच्याशी फोनद्वारे संपर्क असतो. शनिवार-रविवार शेतीवर जाऊन पुढील आठवड्याचे नियोजन करतो. माझी आई गावातच राहत असल्याने तिचे दैनंदिन व्यवस्थापनावर लक्ष असते. मुक्त संचार गोठा ः १) पाच गुंठे क्षेत्रावर मुक्त संचार गोठा. निम्म्या गोठ्यावर शेडनेटचे छत. गाभण गायी, दुधाळ गायी, वळू आणि वासरांसाठी स्वतंत्र कप्पे. गव्हाण आणि पाण्याची सोय. २) दूध काढण्यासाठी फक्त बांधिव गोठ्यात गायी बांधल्या जातात. इतर वेळी मुक्त संचार गोठ्यात सोडल्या जातात. ३) बांधिव गोठ्याचा आकार ः २८ बाय ३३ फूट. सोळा गायी आणि वासरे बांधण्याची सोय. ४) योग्य उंचीची गव्हाण. गव्हाणीमध्ये २४ तास पाण्याची सोय. ५) जनावरे धुतलेले पाणी, गोमूत्र स्वतंत्रपणे टाकीत जमा. शेणखतासाठी स्वतंत्र खड्डा. ६) मुक्त संचार गोठ्यामुळे गायींना पुरेसा व्यायाम, गरजेनुसार आहार, पाणी मिळाल्यामुळे दुग्धोत्पादनात सातत्य. ७) गोठ्यात एक वळू. पशुतज्ज्ञाच्या सल्ल्याने नैसर्गिक किंवा कृत्रिम रेतन. पशुवैद्यकाकडून आरोग्य तपासणी आणि लसीकरण. ८) जातिवंत कालवडी तयार करण्यावर भर. सध्या १० ते १२ लिटर दूध देणाऱ्या गायी तयार होताहेत. वर्षभर चारा नियोजन ः १) तीन एकर क्षेत्रापैकी दोन एकरांवर संकरित नेपिअर आणि हंगामानुसार मका, कडवळ लागवड. गावातील दोन मित्रांशी तीन एकरांतून वर्षभर चारापुरवठ्याचा करार. या मित्रांना वर्षभरासाठी चाऱ्याचा दर बांधून दिला. २) लोणी भापकर येथून वर्षभरासाठी दहा हजार कडबा पेंडीची एकदाच खरेदी. ३) एका गायीला ओला, सुका चारा कुट्टी तीस किलो सकाळ- संध्याकाळ दिली जाते. शिफारशीनुसार खनिज मिश्रणाचा पुरवठा, त्यामुळे गायींचे आरोग्य चांगले. मित्रांच्या सहकार्याने दुधाचे वाटप ः दुग्धेत्पादनाबाबत आनंद उंडे म्हणाला, की सध्या ३० पैकी १२ गायी दुधात आहेत. एक गाय प्रति दिन वासरू पाजून सात लिटर दूध देते. रोजचे सरासरी ९० लिटर दूध गोळा होते. सकाळी चार वाजता आणि सायंकाळी पाच वाजता दूध काढले जाते. दुधाला ४.८ फॅट, एसएनएफ ८.५ आहे. जवळील शेटफळ गढे गावातील मित्र अमोल कदमकडे १२ गीर गायी आहेत. त्याचे ४५ लिटर दूध जमा होते. संध्याकाळी काढलेले दूध एक आणि अर्धा लिटर पिशवी पॅक करून डीफ्रिजमध्ये ठेवले जाते, तसेच सकाळी चार वाजता काढलेले दूध पिशवी पॅक करून डीफ्रिज केले जाते.
दूध वाटपाबाबत आनंद म्हणाला, की पणदरेमध्ये मित्राची डेअरी आहे. त्याची गाडी रोज पुण्यात येते. त्याच गाडीतून माझ्या दूध पिशव्या पुण्यात पहाटे पाच वाजता येतात. हडपसर, बिबवेवाडी, कोथरूड, वारजे, सिंहगड रोड परिसरात माझे दीडशे ग्राहक आहेत. दूध वितरणासाठी स्थानिक वितरकांशी मी जोडून घेतले, त्यांना कमिशन देतो. माझी पत्नी ललिता तसेच मित्र सचिन परदेशी आणि त्याची पत्नी स्वाती वितरणाचे नियोजन करतात. ग्राहकांशी संवाद साधतात. मी पुण्यात मे, २०१५ पासून दुधाचे वितरण करीत आहे. सध्या दररोज १५० ग्राहकांना ७० रुपये दराने दुधाची विक्री होते. दरमहा दहा किलो तूप तयार करतो. ते १४०० रुपये किलो दराने विकतो. विभागानुसार ग्राहकांचे व्हॉट्सॲप ग्रुप आहेत. ग्राहक माझ्या बॅंक खात्यात दुधाचे बिल जमा करतात किंवा चेक देतात. मी पुणे परिसरातील देशी गायींचे संगोपन करणाऱ्या पशुपालकांचा गट तयार केला. यासाठी मित्र सचिन परदेशी यांची मदत होते. गटामध्ये चर्चा होते. फेसबुक, व्हॉट्सॲप, माहिती पत्रकांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत दुधाची माहिती पोचविली जाते.
सौरभेयी ब्रॅंडने विक्री ः बाजारपेठेत वेगळेपण जपण्यासाठी आनंदने सौरभेयी ब्रॅंड तयार केला. नंदिनी डेअरी फार्म नावाने व्यावसायिक नोंदणी केली. दूध पॅकिंगसाठी अन्न आणि प्रशासन विभागाच्या मानांकनाप्रमाणे निकष पूर्ण करून प्रमाणपत्र घेतले. प्रयोगशाळेतून दुधाची तपासणी केली. पिशवीवर दुधातील घटक छापले. आनंद दर शनिवार, रविवार ग्राहकांना शेती, गोठ्यावर नेऊन व्यवस्थापन दाखवितो, त्यामुळे ग्राहकांना दुधाबाबत खात्री तयार झाली. उत्पन्नाबाबत आनंद म्हणाला, की मित्रांच्या सहकार्याने हा व्यवसाय वाढवीत आहे. एका गायीचे रोजचे व्यवस्थापन आणि दूध वाहतूक, वितरकाचे कमिशन हा खर्च वगळता दूध विक्रीतून सरासरी १५० रुपये उरतात. घरचा हिरवा चारा असल्याने अतिरिक्त खर्च नाही. मिळणारा नफा मी शेती आणि पशुपालनात गुंतवितो. परिसरातील शेतकऱ्यांना शेणखत आणि गोमूत्र विक्रीतून वर्षाला अडीच लाख रुपये मिळतात. त्यातून मजुरांचा पगार, गोठा व्यवस्थापनाचा खर्च निघतो. सध्या दूध, शेण, गोमूत्र आणि कालवड हे उत्पन्नाचे स्रोत आहेत. आयुर्वेदिक कंपनीच्या मदतीने धूप कांडी, गोमूत्र अर्क, साबण, फिनेल, उदबत्ती, शाम्पूनिर्मितीचे नियोजन आहे. जमिनीची सुपीकता वाढली... शेतीबाबत आनंद म्हणाला, की एक एकरावर फुले २६५ उसाच्या जातीची लागवड आणि दोन एकरांवर चारापिकांची लागवड आहे. विहिरीमुळे शाश्वत पाणीपुरवठा आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सल्ल्याने पीक व्यवस्थापनात बदल करतो. शेणखताचा वापर आणि पाचटाचे आच्छादन असते. पिकांना माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन तसेच पाट पाण्यातून शेण, गोमूत्राची स्लरी देतो. एकरी ५८ टनांवरून ७४ टनांवर गेलो. बांधावर ४५ नारळाच्या झाडांची लागवड आहे. येत्या चार वर्षांत शहाळ्याचे उत्पन्न सुरू होईल. संपर्क ः आनंद उंडे ः ९८२२६२६८३४
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 06/15/2016 - 05:29 नवीन
उत्तम प्रतिसाद. तुमची शेतीविषयक आवड माहिती आहेच. एकदा प्रत्यक्ष भेटीत ह्या विषयावर तुमच्याशी सविस्तर चर्चा करावयाची आहे. लोणी भापकरचं नाव वाचून तिथली प्राचीन मंदिरे, असंख्य वीरगळ आणि यज्ञवराहाच्या मूर्तीची आठवण झाली. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ख
खटपट्या Wed, 06/15/2016 - 05:53 नवीन
हेच म्हणतो, प्रत्यक्ष भेटायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अभ्या.. Wed, 06/15/2016 - 06:36 नवीन
यज्ञवराहावरून आठवले, भाज्या पीकवायच्या असतील आणि जरा हलक्या प्रतीची जमीन ज्यादाची असेल तर जोडधंदा म्हणून वराहपालन हा छान पर्याय ठरू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
च
चौकटराजा Wed, 06/15/2016 - 06:39 नवीन
आत्मबंध यांच्या ओळखीत एक सुपर वराह त्यानी प्रेमाने पाळला आहे असे कळते. ( ह घ्या )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
च
चतुरंग Wed, 06/15/2016 - 06:53 नवीन
कोणत्याही गावाचे नाव काढले की याला मंदिरे आठवतातच! सर्व मिपाकरांसाठी एक कोडे - महाराष्ट्रातले एखादे गाव सांगा जिथे मंदिरे, लेणी, वीरगळ, गधेगाळ, शिलालेख (आणि इतर तत्सम गोष्टी) यापैकी काही आहे असे प्रचेतस सांगू शकणार नाही! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
स्पा Wed, 06/15/2016 - 06:56 नवीन
चोळेगाव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
प
प्रचेतस Wed, 06/15/2016 - 07:35 नवीन
लोणी भापकरवर एक लेखच लिहिला होता पूर्वी म्हणून ते प्रकर्षाने आठवले इतकेच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग Wed, 06/15/2016 - 06:48 नवीन
अतिशय सुंदर माहिती. (आत्ता लगोलग भारतात येऊन शेती करायला सुरुवात करावी असे वाटून गेले इतकी छान माहिती...) एकच शंका आहे तुपाचा दर प्रतिकिलो १४००रु (?) आहे? सहज म्हणून कात्रज डेरीचे रेट्स चेकवले तर तिथे एक किलोचा दर ३७०रु आहे. सौरभेयी ब्रँडचे अगदी उच्च दर्जाचे म्हंटले तरी ५००रु/किलो पेक्षा जास्त असेल असे वाटत नाही....अर्थात हल्ली भारतातल्या कुठल्याच गोष्टींच्या किमतींचे अंदाज बांधवत नाहीत! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
श
शाम भागवत Wed, 06/15/2016 - 08:41 नवीन
अस्सल देशी गाय असेल (म्हणजे संकरित नसेल) तर १ किलो तूपाचा भाव २००० पर्यंत ही जाऊ शकतो. हा प्रभाव बी२ टाईप दूधाचा आहे. पण अजूनही देशी गाईंचे महत्व लोकांच्या लक्षात आलेले नाही. डॉ. खानखोजेंमुळे ब्राझीलच्या हे लक्षात आले. आज सर्वात जास्त भारतीय वाणाच्या गाई ब्राझील मधे आहेत व अमेरिकेला बी२ टाईप दूध व दूग्धोपादीत वस्तू निर्यात करीत आहे. सरासरी २० लिटर दूध तेथील गाई देतात. मात्र त्यासाठी गाईच्या अंदाजे १० पिढ्या इतका वेळ देता आला पाहिजे. अवांतरः पण भारतात गायीच्या बाजूने काही बोलण्याची सोय राहिलेली नाही. धागा अवांतर करत करत नक्की कोठे जाऊन पोहोचेल ते सांगता येत नाही. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
म
मार्मिक गोडसे Wed, 06/15/2016 - 09:23 नवीन
आपला हा प्रतिसाद व वरील प्रतिसादावरून तुम्हालाच अवांतर करण्यात अधिक रस दिसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत Wed, 06/15/2016 - 11:44 नवीन
तिथे नादखुळा यांनी "रेशमी चिमटे" असा शब्द वापरलाय हो. म्हणून मी पण प्रयत्न करत होतो. अर्थात मला जमलय अस काही म्हणायच नाहीय्ये. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
न
नाखु Wed, 06/29/2016 - 12:09 नवीन
आधिच्याच लेखाचा एक पडताळणीदुवा
१) सेंद्रिय देशी गायीचे तूप - जागेवरून विक्री - प्रतिकिलो ३ हजार रुपये दर. तूप शिल्लक राहत नाही. ----- ३ किलो तूप महिन्याला खपते.
दर्जेदार मालाला उठाव असतोच पण तो दर्जाही उच्च आणि सातत्यपुर्ण असला पाहिजे. सेवेसी तत्पर नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
अ
अर्धवटराव Wed, 06/15/2016 - 08:22 नवीन
:(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
र
रंगासेठ गुरुवार, 06/23/2016 - 12:48 नवीन
छान माहिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
च
चौकटराजा Wed, 06/15/2016 - 06:43 नवीन
नाखुदा तुम्ही दुधाचा॑ व्यवसाय कुणाकडून तरी आपल्या परिसरात चालू करून घ्या. त्यात आगाउ एक वर्षाचे बील घेण्याची सोय करा.ग्राहकाचा फायदा व उत्पादकाला नफा व विक्रीची खात्री दोन्ही मिळेल.
  • Log in or register to post comments
स
स्पा Wed, 06/15/2016 - 06:49 नवीन
उत्तम धागा आणि डांगे, अभ्या काका, खटपट्या ,नाखुस यांचे कडक प्रतिसाद
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा