Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रतिजैविके समज आणि गैरसमज.

स
सुबोध खरे
Wed, 07/06/2016 - 16:22
🗣 349 प्रतिसाद
प्रतिजैविके समज आणि गैरसमज. सर्वप्रथम सूक्ष्म जीव म्हणजे काय? सर्वात सूक्ष्म म्हणजे विषाणू किंवा व्हायरस. हा सजीव आणि निर्जीव यांच्या सीमेवर असलेला, जीव आणि रसायन यामधील अवस्था. याचे स्फटिकिकरण करता येते आणि हे स्फटिक युगानू युगे तसेच राहू शकतात. हा फक्त दुसऱ्या पेशींच्या अंतर्भागात सक्रिय होऊ शकतो अन्यथा एखाद्या रसायनासारखा मृतप्राय असतो. उदा पोलियो एड्स कांजिण्या इ यानंतरचे काही जीव रिकेटसिया आणि क्लॅमिडिया हे जिवाणू आणि विषाणू यांच्या मध्ये आहेत. यानंतर येतात ते जिवाणू (म्हणजे बॅक्टेरीया) हे एक पेशीय जीव असून यात चयापचय क्रिया (metabolism) चालू असते. उदा स्टॅफिलोकॉकस, टायफॉईड याचे जंतू. या बरोबरच एकपेशीय बुरशीची निर्मिती झाली. उदा यीस्ट/ किणव जगाची सुरुवात झाली तेंव्हा सर्व प्रथम एक पेशीय वनस्पती आणि प्राणी तयार झाले. आणि त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली. यात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपाय शोधण्यास सुरुवात केली. जिवाणू आणि बुरशी (fungus) यांनी त्याच अन्नासाठी स्पर्धा सुरू केली यावेळेस बुरशीच्या पेशींनी जिवाणूची वाढ होऊ नये म्हणून काही गुंतागुंतीची रसायने निर्मिती सुरू केली.आणि ही रसायने त्या आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचे पाझरून तेथे असणाऱ्या जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करीत हीच रसायने म्हणजे अँटीबायोटिक्स किंवा प्रतिजैविके. यातील पाहिले प्रतिजैविक म्हणजे पेनिसिलीन. याचा शोध डॉ अलेक्झांडर फ्लेमिंग यांना योगायोगानेच लागला. जिवाणू जगत असताना त्याच्या पेशीभिंतीची(cell wall) ची झीज चालू असते. ही झीज तो जिवाणू दुरुस्त करीत असतो. पेनिसिलीन ही झीज दुरुस्त करण्याच्या कामात लागणाऱ्या रसायनांच्या कामात अडथळा आणते. यामुळे जिवाणूच्या भिंती सच्छिद्र बनतात त्यामुळे त्याची पेशी बाहेरील अतिरिक्त पाणी शोषून फुगून येते आणि जिवाणूंचा मृत्यू होतो. प्राण्यांच्या शरीरात पेशींना असलेली भिंत नसतेच तर फक्त एक पटल (membrane) असते त्यामुळे पेनिसिलिनचा प्राण्यांच्या( मानवाच्या) शरीरावर अजिबात परिणाम होत नाही. यामुळे पेनिसिलीन आणि त्याच्या गटातील किंवा तशाच तर्हेचे असलेलं केफ्लॉस्पोरीन गटातील प्रतिजैविकांचा मानवी शरीरावर परिणाम अत्यंत नगण्य होतो. १) विषाणू हे दुसऱ्या पेशींच्या अंतर्भागातच सक्रिय असल्यामुळे त्यांच्यावर प्रतिजैविकांचा मुळीच परिणाम होत नाहीत. यामुळेच प्रतिजैविके ही फक्त जिवाणूजन्य रोगात वापरली जातात विषाणूजन्य रोगात नाही. २) आपल्याला झालेला रोग हा जिवाणूजन्य आहे की विषाणूमुळे आहे की बुरशीमुळे झालेला आहे हे समजून येण्यासाठी साडेपाच वर्षांचा एम बी बी एस हा कोर्स केलेले आणि त्यावर अनेक वर्षे अनुभव घेतलेले डॉक्टर असतात. दुर्दैवाने केवळ लक्षणे पाहून लोक स्वतः औषधे घेतात, कारण मागच्या वेळेस शेजारच्या गण्याला किंवा आपल्या बंडूला अशाच लक्षणांसाठी आपल्या डॉक्टरने हीच औषधे दिलेली असतात. काही लोक मागच्या वेळेस हगवण लागली असताना डॉक्टरांनी एंटेरो क्विनॉल किंवा तत्सम औषध दिले होते म्हणून दुसर्या वेळेसही "स्वतःच" ते औषध घेतात. दुर्दैवाने त्याच्या मागील कार्यकारण भाव माहीत नसल्याने ते काही वेळेस होमियोपथिक डोस घेतात जो झुरळाला किंवा डासाला पुरेल इतका असतो नाहीतर व्हेटरनरी डोस घेतात. ६० किलोच्या माणसाला लागणारा डोस ऐवजी ४०० किलोच्या रेड्याला लागणारा डोस घेतात. ३) किंवा जवळच्या केमिस्टकडे जाऊन त्याच्या कडून घसा फार दुखतो किंवा हगवण लागली आहे या लक्षणांसाठी अशी औषधे मागून घेतात. केमिस्ट सुद्धा आपलं धंदा चालवण्यासाठी किंवा स्वस्तात लोकप्रियता मिळवण्याच्या मागे असल्याने सर्रास अशी औषधे देतात. १००% डॉक्टर असे केमिस्टकडे अर्धवट औषधे घेऊन आलेले रुग्ण रोज पाहत असतात आणि जवळ जवळ १००% केमिस्ट अशी औषधे देतात. अर्ध्य हळकुंडाने पिवळे होण्याचे यापेक्षा दुसरे उदाहरण नाही. १० नंतर २ वर्षे डिप्लोमा केलेले (डी. फ़ार्म) केमिस्टच्या दुकानात बसून डॉक्टरकी करत असतात. ना त्यांना त्यातील रसायन शास्त्राचा गंध असतो ना त्यामागील जीवशास्त्रीय प्रक्रियेचा. ४) लोक सुद्धा अशी औषधे का घेतात. -सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे डॉक्टरच्या फी चे पैसे वाचवणे. यानंतरची कारणे -- तेथे लागणारा वेळ वाचवणे आणि कधी कधी डॉक्टर बाहेरचे अरबट चरबट खाल्ले, दारू पिऊन नको त्या गोष्टी केल्या म्हणून आपली हजेरी घेतील या भीती मुळे. ५) मुद्दामहून पसरविले गैरसमज - बहुसंख्य होमियोपॅथ (८०% च्या वर आपल्या पाथीचा प्रचार करण्यासाठी सर्रास असे सांगताना आढळतात की ऍलोपॅथीचे डॉक्टर अँटीबायोटिक्स देऊन रोग "तिथल्या तिथे दाबून टाकतात". होमियोपॅथी मध्ये आम्ही रोगाचा मुळापासून नायनाट करतो म्हणून आमची औषधे स्लो असली तरी परिणामकारक असतात. आपली रेषा मोठी करण्यासाठी दुसऱ्याची रेषा लहान करण्याची ही हीन प्रवृत्ती आहे. याबद्दल मला अजून काही म्हणायचे नाही. ६) अँटीबायोटिक्स "उष्ण" पडतात. आयुर्वेदाच्या वैद्यांनी हा एक जाणून बुजून पसरविलेला गैरसमज आहे. ऍमॉक्सीसिलीन सारखेच प्रतिजैविक साधारण २५० ते ५०० मिग्रॅ (कॅप्सूल) दिवसात तीन वेळेस दिले जाते. परंतु गनोरिया सारख्या गुप्तरोगावर जेंव्हा रुग्ण परत येण्याची शक्यता कमी असे तेंव्हा आम्ही एक वेळेस ३.५ "ग्राम" म्हणजे २०५ मि ग्रॅम च्या १४ कॅप्सूलच्या समकक्ष औषध रुग्णास द्रवस्वरूपात देत असू शिवाय ते औषध (शरीरात जास्त काळ राहावे) मूत्रपिंडातून बाहेर पडू नये म्हणून २ ग्रॅम प्रोबेनेसीड हे दुसरे औषद्ध देत असू. शेकडो रुग्णांना असा एकच डोस देऊन त्यांचे गुप्त रोग बरे झालेले मी स्वतः पाहिलेले आहेत. सांगण्याचे तात्पर्य हे की औषध "उष्ण" पडते हा मुद्दाम पसरवलेला गैरसमज आहे. ७) आम्हाला अतिशय अशक्तपणा, चक्कर येणे, घाम येणे उलटीची संवेदना होणे किंवा तोंडाला चव नसणे अशी लक्षणे औषध घेतल्यावरच का होतात? आम्ही काय खोटं बोलतो का असे रुग्ण विचारतात. याचे साधे उत्तर असे आहे की आपल्या शरीरात जंतूंनी प्रवेश केलेला असतो तुमची प्रतिकार शक्ती जेंव्हा जंतूंचा नाश करण्यास कमी पडते तेंव्हाच तुम्हाला रोग होतो आणि हे शरीरात शिरलेले जंतू दर २४ तासात दुप्पट या वेगाने प्रजनन करीत असतात. तुमच्या शरीरातील खर्वनिखर्व जंतू जेंव्हा प्रतिजैविके दिल्यावर मृत्यू पावतात तेंव्हा त्यांच्या पेशीतील विषे तुमच्या शरीरात पसरतात. आणि यामुळे तुम्हाला अतिशय आजारी असल्याची ही सर्व लक्षणे दिसू लागतात. देवनारच्या कचरा मुंबई भर पसरलं तर मुंबईची काय परिस्थिती होईल तशीच ही परिस्थिती आहे. जोवर या सर्व कचर्याचा निचरा होत नाही तोवर आपल्याला आजारी असल्याची संवेदना असते. दुर्दैवाने बहुसंख्य आधुनिक डॉक्टरना या गोष्टी समजावून सांगायला (आणि रुग्णांना समजावून घ्यायला) वेळच नसतो. यामुळे काय होते रुग्ण दोनच दिवस औषध घेऊन बंद करतात आणि रोगाचे जंतू पूर्ण नष्ट व्हायच्या अगोदरच प्रतिजैविक बंद केल्याने शरीराच्या प्रतिकारशक्तीवर जंतुनाशाच्या अतिरिक्त कामाचा ताण पडतो आणि रुग्णाला अजूनच अशक्तपणा जाणवतो. या आगीत तेल ओतायला आणि आपली पोळी भाजून घ्यायला होमियोपाथ किंवा आयुर्वेदिक तज्ज्ञ तयारच असतात. ८) प्रतिजैविके ही शेवटी रसायनेच असतात त्यांचा आपला जसा परिणाम असतो तसे काही दुष्परिणाम असतोच. पण हे साईड इफेक्ट्चे तुणतुणे इतर पॅथीचे लोक इतके वाजवतात की लोकांना तेच जास्त खरे वाटू लागते. काही प्रतीजैविके यकृत (लिव्हर) मूत्रपिंड (किडनी) वर परिणाम करतात. त्यामुळे कोणत्या रोगात कोणते औषध घ्यायचे हे सुशिक्षित डॉक्टर ला नक्की माहिती असते. अर्ध शिक्षित किंवा अशिक्षित केमिस्ट कडून किंवा सर्वज्ञ रुग्णाने स्वतः अशी प्रतिजैविके घेतल्यास त्याला जबाबदार कोण? "अँटी बायोटिक च्या सेवनाने कीडनि निकामी होऊ शकते".हे अत्यंत अपुऱ्या माहितीवर केलेले अज्ञान मुलक विधान आहे. हे जर खरे मानले तर मूत्रपिंडाच्या संसर्गाला(urinary tract infection-- UTI ) कोणते औषध देणार? हा रोग ३३% स्त्रियांना केंव्हाना केंव्हा तरी होतोच. ९) औषध कंपन्या , केमिस्ट आणि डॉक्टर यांचे हितसंबंध गुंतलेले असतात. ही गोष्ट "नवीन" नाही. पण यात "अँटीबायोटिकच जास्त" घेतले जाते असे नसून बऱ्याच वेळेस झिंक सेलेनियम सारखी सूक्ष्म द्रव्ये किंवा जीवनसत्त्वे आणि खनिजे जिनसेंग, स्पायरुलीना सारखी सुपर फूड याचा मोठा वाटा आहे.शिवाय ही औषधे जीवनावश्यक वर्गात मोडत नसल्याने त्याच्या किमतीवर नियंत्रण नाही. याविरुद्ध बरीच प्रतिजैविके हिची जीवनावश्यक श्रेणीत असल्याने त्यांच्या किमतीवर निर्बंध आहेत. अशा टॉनिक सारख्या औषधांचा डोस कितीही दिवस देता/ घेता येतो. अँटीबायोटिक तुम्ही फार तर पाच दिवस घ्याल. यानंतर एक फार महत्त्वाचा विषय मी मांडू इच्छितो-- "अँटी बायोटिकला प्रतिकार करणाऱ्या जिवाणूंची वाढ" मुळात तुम्ही जेंव्हा दोन दिवस प्रतिजैविक घेता तेंव्हा सुरुवातीला त्याला सर्वात जास्त संवेदनशील(SENSITIVE) असणारे जिवाणू मरतात आणि जे जिवाणू त्या प्रतिजैविकाला कमी संवेदनशील(resistant) असतात ते जिवंत राहतात. यानंतर आपण जर प्रतिजैविक बंद केले तर हे कमी संवेदनशील(resistant)जिवाणू शरीरात जिवंत राहतात आणि त्यांची पुढची पिढी मुळात त्या प्रतिजैविकास कमी प्रतिसाद देणारी (resistant)जन्मास येते. ही प्रक्रिया वारंवार घडल्याने प्रतिजैविकास अजिबात दाद ना देणारे जिवाणू शिल्लक राहतात आणि जे संवेदनशील असतात ते जिवाणू नष्ट होतात. असे करत करत अनेक प्रतिजैविकाना दाद न देणारे(multi drug resistant) जिवाणू नैसर्गिक निवड तत्वाने(natural selection) जिवंत राहतात. अशा जिवाणूंचा फार वेगाने प्रसार होतो. अशाच जिवाणूची एक जात म्हणजे NDM १ पहा https://en.wikipedia.org/wiki/New_Delhi_metallo-beta-lactamase_1 १०) एकंदरीतच अँटी बायोटिक चे अनेक वाईट दूरगामी परिणाम असतात हा परत बऱ्याच इत्तर पॅथीच्या व्यावसायिकांनी जाणून बुजून पसरविलेला अत्यंत दुर्दैवी गैरसमज आहे. १९४२ मध्ये पेनिसिलिनचा वापर सुरू होण्याच्या अगोदर लोक शेकड्यानीच नव्हे तर हजारांनी प्लेग, कॉलरा, हगवण किंवा विषमज्वर या रोगांनी मरत होते. या काळात आयुर्वेद किंवा होमियोपॅथी सारख्या इतर पद्धती होत्याच परंतु त्यांना या कोणत्याही रोगाचा प्रसार थांबवता आला नाही ही वस्तुस्थिती आहे. कित्येक अकाली मृत्यू त्यांना थांबवता आले नाहीत ही वस्तुस्थिती नाकारून ते एकंदरीतच अँटी बायोटिकला शिव्या देताना आढळतात यापेक्षा दैवदुर्विलास दुसरा नसेल. बालविधवांच्या पिढ्याच्या पिढ्या अशा रोगांमुळे दुःखात खितपत पडलेल्या अशा कथा त्या कालच्या साहित्यात सहज वाचायला मिळतात.प्रत्येक एकत्र कुटुंबात अशी एखादी बालविधवा सर्रास असे. प्रतिजैविकांचा अतिरिक्त वापर करणार्यात केवळ इतर पॅथीचे व्यावसायिक केमिस्ट आणि स्वतः औषधे घेणारे रुग्णच नव्हे तर आधुनिक डॉक्टरही दिसतात याची काही कारणे १) रुग्णाला आजच्या झटपट काळात एक दिवसात बरे व्हायचे असते त्यामुळे तो डॉक्टरवर दबाव टाकताना दिसतो. :"डॉक्टर परवा माझे प्रेझेन्टेशन आहे तेंव्हा परवापर्यंत काहीही करून मला बरे करा. नवीन व्यवसाय सुरू केलेल्या डॉक्टरला याला नकार देणे शक्य नसते. आणि जुन्या डॉक्टरला नेहमी येणार माणूस असेल तर त्याला नकार देणे वैयक्तिक संबंधामुळे शक्य नसते २) जेंव्हा रोग निदान नक्की नसते की हा विषाणूमुळे रोग झाला आहे का जिवाणूमुळे अशा वेळेस डॉक्टर स्वतःच्या सुरक्षिततेचा उपाय( to be on safer side) अँटीबायोटिकचा एक कोर्स लिहून देतात.रुग्ण दोन दिवसात बरा झाला तर अर्ध्या वेळेस स्वतः हून औषध थांबवतो. ३) मोठ्या शल्यक्रियेनंतर सर्जन परत उगाच धोका( why take chances) नको म्हणून एकदम उच्च दर्जाचे प्रतिजैविक देतात. antibiotic resistanceची चिंता मी कशाला करू हा विचार त्यामागे असतो. ४) दीड शहाणे किंवा सर्वज्ञ रुग्ण डॉक्टरवर दबाव टाकतात आणि सांगतात की मला चांगले अँटी बायोटिक द्या. अशा वेळेस डॉक्टर "माझ्या बापाचे काय जाते" म्हणून लिहून देतात. हा विषय कित्येक पी एच डी करता येईल इतका खोल आणि विस्तृत आहे. त्यात खोलवर जाण्याची माझी लायकी नाही यास्तव इथेच थांबतो.

प्रतिक्रिया द्या
129460 वाचन

💬 प्रतिसाद (349)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 07/07/2016 - 17:20 नवीन
डॉक्टर साहेब, उत्तम लेख. आभार. _/\_ असेच नेहमी लिहित राहा. - दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
र
रुस्तम गुरुवार, 07/07/2016 - 17:30 नवीन
खूप चांगली माहिती मिळाली. धन्यवाद डॉक! __/\__ वाखुसाआ
  • Log in or register to post comments
न
निशाचर गुरुवार, 07/07/2016 - 23:39 नवीन
उपयुक्त माहिती साध्यासोप्या भाषेत दिल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
आ
आदिजोशी Fri, 07/08/2016 - 09:09 नवीन
कोणत्याही पॅथीमधे चांगल्या वाईट गोष्टी असतात. त्यामुळे ज्याला जे लागू पडते ते त्याने घावे हे माझे मत आहे. जोपर्यंत एखाद्या विषयात सरकारमान्य अभ्यासक्रम / पदवी मिळत आहे तोवर त्या गोष्टीला खोटे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. आयुर्वेद/होमिओपॅथीमधे रुग्णांना खोटं नाटं सांगून फसवण्यात येत असेल तर अ‍ॅलोपॅथीचे डॉक्टरही सलाईन लावण्यात आणि फुकटच्या टेस्ट करवण्यात पटाईत आहेत. डॉक्टरच्या चुकीच्या निदानामुळे जीव गेल्याच्या घटना दोन्हीकडे आहेत तसेच एका पॅथीमुळे बरे न होणारे रोग दुसर्‍या पॅथीमुळे बरे झाल्याची उदाहरणं सगळीकडे आहेत. त्यामुळे एका डॉक्टरने दुसर्‍या डॉक्टरला नावे ठेवणे म्हणजे काचेच्या घरात राहणार्‍याने दुसर्‍याच्या काचेवर दगड मारण्यासारखे आहे. त्यामुळे माझ्या मते पॅथी कुठलीही असो, न फसवणारा डॉक्टर मिळणे हे सगळ्यात महत्वाचे आहे.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 07/08/2016 - 09:17 नवीन
सर्व प्रतिसादाला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
च
चौकटराजा Fri, 07/08/2016 - 10:17 नवीन
डॉ स्वतः होऊन फसवत नाहीत ना ज्योतिषी. आपण विशिष्ट मानसिकतेने त्यांच्याकडे जात असतो.डिफरन्शियल डायग्नोसिस हे अधुनिक वैद्यकाचे वैशिष्ट्य आहे. ते अलोपथिक मेडिसिन पद्धतीचेच वैशिष्ट्य आहे असे नव्हे. आपली पॅथी ही सर्व समस्यांवर रामबाण उपाय आहे व ती समस्या मुळापासून नष्ट करण्यात पटाईत आहे असा दावा प्रायः अल्टर्नेट मेडीसिन या सदराखाली मोडणार्‍या सर्वांचा असतो. अलोपथीची प्रॅक्टीस करणारे बहुशः असा दावा करताना दिसत नाहीत. म्हणून डेंगीवर हुकमी उपाय नाही अशी कबुली द्यायला ते कचरत नाहीत. सिम्टोमॅटिक ट्रीटमेंट देताना त्याना कमीपणा वाटत नाही. अलीकडे काही सॉफ्टवेअर अशी निघाली आहेत की ती कोणतीही जोडतोड न करता मदरबोर्डमधील खराब झालेल्या सुट्या भागाची यादी सादर करतात. तसेच काहीसे एम आर आय करीत असतात. या सोयी जितक्या स्वस्त होतील तितके डिफरन्शीयल डायग्नोसिस अधिक करावे लागणार नाही. ते स्वस्त होतील की नाही हे काळच ठरवेल.पण अतिअनावश्यक चाचण्या डॉ करायला सांगत असतीत असे खूप प्रॅक्टीशनर आपल्या तरी पाहण्यात नाहीत बुवा. पोटाला पर्कशन करून मुतखडा शोधा अशी अपेक्षा आपण करायचीच कशाला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
स
सुबोध खरे Fri, 07/08/2016 - 09:39 नवीन
इतर पॅथी वाले आमच्या औषधांनी कर्करोगात प्रतिकारशक्ती वाढते किंवा केमोथेरपीचे साईड इफेक्ट्स कमी होतात असा दावा करतात त्यासाठी एक धोक्याची सूचना आपण घेत असलेली औषधे नैसर्गिक किंवा हर्बल असली तरीही ती केमोथेरपी मध्ये अडथळा आणू शकतात. तेंव्हा अशी औषधे घेण्यापूर्वी आपल्या कर्करोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. http://cancer.northwestern.edu/press_releases/2011/07_july/herbal.cfm http://www.cancer.gov/about-cancer/treatment/cam Clinically-relevant chemotherapy interactions with complementary and alternative medicines in patients with cancer. http://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/20653549
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 07/08/2016 - 10:12 नवीन
http://health.spectator.co.uk/the-war-on-homeopathy-isnt-working-we-need-to-call-a-truce/ https://www.theguardian.com/commentisfree/2010/jul/15/homeopathy-works-scientific-evidence https://www.homeopathic.com/Articles/Introduction_to_HomeopathyA_Great_Introductory_Article_for_Advocates_O.html http://pib.nic.in/newsite/PrintRelease.aspx?relid=138690 अजून अनेक आहेत. देशा परदेशातले रिसर्च आहेत. जुने ताजे सगळे आहेत. सावकाश टाकेन.
  • Log in or register to post comments
श
शलभ Fri, 07/08/2016 - 10:35 नवीन
मला वाटतं होमियोपथीसाठी वेगळा धागा काढा. इथे प्रतिजैविके आणि अलोपॅथी संबंधित माहिती येऊ द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट Fri, 07/08/2016 - 10:53 नवीन
शलभ, धाग्यात होमिओपॅथीला थेट चुकीचं ठरवलं गेलेलं असताना वेगळा धागा काढण्याचा प्रश्नच येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलभ
श
शलभ Fri, 07/08/2016 - 12:02 नवीन
तुम्हाला जे चुकीचं वाटतय ते होमिओपॅथीवाले प्रतिजैविके संबंधी काय गैरसमज पसरवतात हे आहे आणि ते कसं चुकीचे आहे ते सांगितलय. तुम्हाला चांगले अनुभव असतील होमिओपॅथी चे. मान्य. पण दुसर्‍या धाग्यावर येऊ द्या. हा आता तुम्हाला होमिओपॅथीवाले प्रतिजैविके वापरतात का ? असल्यास कशा प्रकारे ? नसल्यास जिवाणूजन्य रोगाचा ईलाज कसा करतात? ह्यावर माहिती येऊ द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट Fri, 07/08/2016 - 12:15 नवीन
हाह! शंभरवेळा धाग्या-प्रतिसादात होमिओपॅथी होमिओपॅथी म्हणा आणि होमिओपॅथी बद्दल माहितीला वेगळा धागा?? तुमच्यात कोर्टात एकावेळी एकाच बाजूच्या व्यक्तीला प्रवेश असतो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलभ
स
सुबोध खरे Fri, 07/08/2016 - 11:20 नवीन
एक ना धड भाराभर चिंध्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट Fri, 07/08/2016 - 12:16 नवीन
लोल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 07/08/2016 - 18:26 नवीन
@ वेल्लाभट "लोल" म्हणणे सोपे आहे. एक उदाहरण म्हणून संशोधन कसे असते हे दाखवत आहे. http://annonc.oxfordjournals.org/content/15/12/1798.full "Abstract" Background: Chemotherapy with ABVD (doxorubicin, bleomycin, vinblastine and darcarbacine) schedule is the standard treatment for advanced Hodgkin's lymphoma. In the present study, we prospectively evaluated the long-term efficacy and toxicity of six cycles of ABVD as treatment for early-stage Hodgkin's lymphoma. Patients and methods: From January 1990 to June 2002, 95 patients with stage I and II Hodgkin's lymphoma were treated with six ABVD cycles. Fifteen patients who met the criteria for mediastinal bulky disease also received further radiotherapy on the mediastinum. Results: After six cycles, 89 patients (94%) showed a complete response (CR) and six patients (6%) showed a partial response (PR). These PRs became CRs after radiotherapy. After a median follow-up of 78 months, 14 patients had relapsed and three had died. Overall survival and progression-free survival rates at 7 years were 96% and 84%, respectively. For patients with stage IA and IIA without mediastinal bulky disease, the survival rates were 97% and 88%, respectively. Conclusions: The administration of six ABVD cycles is an effective and safe treatment in patients with stage I and II Hodgkin's lymphoma. अशी एखादी सबळ पुरावा असलेली चाचणी दाखवा. ऐकीव माहिती द्यायची किंवा खाली दिलेली बातमी पुरावा( चौथा दुवा) म्हणून दिलीत. हे सोडुन द्या President Shri Pranab Mukherjee to inaugurate the International Convention on World Homoeopathy Day on 9th April, 2016. केविलवाणा प्रयत्न उद्या ज्योतिषाची कॉन्फरन्स मध्ये सादर होणारे पेपर्स पुरावे म्हणून द्याल. ते शास्त्रीय कसोटीवर टिकले पाहिजेत तर ते ग्राह्य धरले जातील. मी दिलेल्या सर्वच दुव्यांमध्ये आढळेल की होमियोपॅथी ने दिलेले बहुसंख्य संशोधन पेपर्स हे शास्त्रीय कसोटीवर "नापास" झाले म्हणून ऑस्ट्रेलिया युरोप आणि इंग्लंडात आता होमियोपॅथी च्या औषधांना विमा किंवा सरकारी परतावा देणे बंद झाले आहे किंवा होऊ पाहत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट Sat, 07/09/2016 - 05:13 नवीन
डॉक्टर तुम्हाला कुठलेही दुवे दिले तरीही तुम्ही हेच म्हणणार आहात हे माझ्या लक्षात केंव्हाच आलेलं आहे. दॅट्स व्हॉट आय मेन्ट बाय बींग रिसेप्टिव्ह अँड नॉट अ‍ॅडमन्ट. पण ठीक आहे तसंच असेल तर मग अजून दुवे देऊनही उपयोग नाही. @पिरा @डॉक आपला तो रिसर्च आणि दुसर्‍याचं ते सांगोपांग ही नवीन म्हण इथे वापरतो. चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
पिलीयन रायडर Fri, 07/08/2016 - 19:50 नवीन
ह्या तर बातम्या आहेत. लेख आहेत. I don't know how, but homeopathy really does work ह्या टायटलचा एक लेख आहे. हे दुवे कसे चालतील? रिसर्च पेपर्स लागतील ना. मागे म्हात्रे काकांनी कुठे तरी डिट्टेलमध्ये लिहीलं होतं की ह्या चाचण्या कशा होतात. तसे पेपर्स आहेत का? असल्यास नक्की द्या. अजुन एक कुतुहल. तुम्ही जेव्हा म्हणता की तुम्हाला ह्या पॅथीचा चांगला अनुभव आहे तेव्हा नक्की कोणत्या आजारांबाबत तुम्ही बोलत आहात? कारण आता वर वाचल्याप्रमाणे, सर्दी-ताप असे आजार शरीर स्वतःच दुरुस्त करते. एखाद्या मेजर आजारावर कुणी हे औषध घेतले आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
अ
असंका Sat, 07/09/2016 - 03:46 नवीन
सर्दी-ताप असे आजार शरीर स्वतःच दुरुस्त करते.
मग मॉडर्न मेडिसीन्वाले ह्या आजारांसाठी औषधं देत नाहीत का? आणि देत असतील तर का देतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
स
सुबोध खरे Mon, 07/11/2016 - 10:22 नवीन
विषाणूजन्य रोग -- यात सर्दी आणि बऱ्याच तर्हेचे खोकले येतात हे मर्यादित (self limiting)असतात. यात तीन ते दहा दिवसात रुग्ण स्वतःहून बरा होतो. हे रोग हवामान बदलले तर होणारे रोग आहेत. या रोगांमध्ये रुग्णाला आराम वाटावा म्हणून औषधे दिली जातात. उदा. फुफुसातील नसांचा दाह झाल्यामुळे वारंवार कोरडा खोकला येत असेल तर खोकला कमी/ बंद होण्यासाठी(antitussive) उदा. कोडीन सारखे औषध दिले जाते. पण जर खोकला जर घट्ट असेल तर तो प्रवाही होऊन त्यातील कफ बाहेर टाकणे सुकर व्हावे यासाठी (expecotrant) उदा. अडुळसा सारखी औषधे दिली जातात.आपल्या खकळ्यातून कफ पडून जाणे हे श्रेयस्कर असते कारण त्यातून जिवाणू किंवा विषाणूंचा शरीरातून निचरा होत असतो. जर विषाणूजन्य खोकला वाढून त्यात जिवाणूंचा प्रादुर्भाव झाला आणि आपल्याला हिरवा पिवळा कफ पडायला लागला तर त्यात प्रतिजैविक दिले जाते आणि नुसताच ऍलर्जी मुळे (उदा. काँग्रेस गवताची खोकला असेल तर antiallergy औषधे दिली जातात. सर्दी मध्ये पण अशाच तर्हेने औषधे दिली जातात. यामध्ये काही वेळेस रुग्णाची इतर परिस्थिती पाहूनही औषधे दिली जातात. उदा एखादा तरुण नोकरीसाठी मुलाखत देण्यास जाणार असेल तर सतत गळणारे नाक "काही काळासाठी" बंद कारण्यासाठी औषधे देतात. अगदी लहान मुलांना सर्दी झाली तर त्यांचे नाक फारच लहान असल्याने पटकन पटकन बंद होते आणि त्यामुळे ती दर अर्ध्या तासाने उठतात. मुलाला झोपवून आई बापानं झोप लागेपर्यंत परत आडवे ठेवल्याने नाक बंद होते आणि बाळ उठते. या कारणाने बाळ आणि त्याचे आईबाप रात्रभर जागे राहतात . आई बापानं दुसऱ्या दिवशी कामावर जायचे असले तरी रात्रभर झोप लागत नाही. मग बापाची बायकोवर आणि बायकोची बाळावर चिडचिड होते. अशावेळेस बाळाचे नाक उघडे ठेवण्यासाठी आणि झोप लागण्यासाठी त्याला sedative antiallergy औषध दिले जाते ज्यामुळे बाळ नाक कोरडे राहून रात्रभर झोपते. त्यामुळे आईबाप सुद्धा रात्रभर झोपून बाळाची काळजी जास्त चांगली घेऊ शकतात. अशा आजारांमध्ये आजार स्वतःहून बरा होईपर्यंत रुग्णाला आराम मिळेल( आणि जेणेकरून त्याची रजा फुकट जाणार नाही) अशा तर्हेची उपाययोजना केली जाते. दुर्दैवाने आपण भारतीय लोक खूप हुशार आहोत त्यामुळे कोरड्या खोकल्यासाठी दिलेले औषध आपण आपल्या नातेवाईक किंवा मित्रांना फुकट देतो सुचवतो यातून फुफ्फुसात असलेला कफ आतच राहून रुग्णाचा खोकला वाढतो. मग लोक आधुनिकी औषधांचे इफेक्ट्स जास्त आहेत म्हणून बोंब मारतात आणि इतर पॅथी वाले लोक आधुनिक वैद्यक रोग तिथल्यातिथे दाबून टाकतात असा अपप्रचार करायला हिरीरीने पुढे येतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
अ
असंका Tue, 07/12/2016 - 04:26 नवीन
डॉक्टरसाहेब, एवढा दीर्घ प्रतिसाद आपण दिला आहेत त्याबद्दल मःपूर्वक धन्यवाद. अनेक नवीन गोष्टी त्यातून कळल्या. खाली एखादा वावगा शब्द गेल्यास आगाउ क्षमस्व- डॉक्टरसाहेब मुद्दा हा नव्हता की नक्की काय उपाय केले जातात आणि तो उपाय करून काय साध्य होते. प्रश्न हा होता की हे सगळे उपाय अनावश्यकच आहेत तर का केले जातात ? वरचे दोन तीन प्रतिसाद वाचल्यावर काय अर्थ निघतोय बघा- १. होमिओपॅथी औषधं घेउन बरे झालात? त्यात काय शरीर स्वतःच बरं करतं...औषधांनी केलं काय? २. मॉडर्न मेडिसीन घेउन बरे झालात? हे झालं अमुक अमुक औषधांमुळे...ही औषधं मात्र आवश्यक होती.. हे असं म्हणणं अयोग्य वाटतं... (गैरसमज नको म्हणून भूमिका स्पष्ट करतो- एका मर्यादेपर्यंत होमिओपॅथी उपयुक्त आहे असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 07/12/2016 - 06:58 नवीन
असं का साहेब होमिओपॅथी औषधं घेउन बरे झालात? त्यात काय शरीर स्वतःच बरं करतं...औषधांनी केलं काय?. यात एकच गोष्ट सांख्यिकीच्या दृष्टीने सांगू इच्छितो.. जर औषध घेतल्याने १०० पैकी ९० माणसे बरी होत असतील आणि औषध न घेता ८९ माणसे बरी होत असतील तर १०० माणसांना औषध देऊन एकच जास्त माणूस बरा होणार असेल तर तो काकतालीय न्याय( कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक गाठ पडणे) असू शकेल. शिवाय एक माणूस बरा करण्यासाठी १०० माणसांना औषध द्यावे लागेल. या उलट जेंव्हा एखादे औषध घेऊन १०० पैकी ९० माणसे बरी होणार असतील आणि औषध न घेता फक्त २५ माणसे बरी होणार असतील तर हा फरक अतिशय महत्त्वाचा आहे.(statistically significant) म्हणणे लक्षात येण्यासाठी मी टोकाचे उदाहरण दिले आहे. सध्या उपलब्ध असलेल्या सांख्यिकीनुसार जगभरात झालेल्या असंख्य चाचण्यांत होमियोपॅथीची औषधे कोणतेही औषध नसलेली पांढऱ्या गोड गोळी (प्लासिबो)पेक्षा जास्त परिणामकारक नाहीत असे सिद्ध झालेले आहे. यामुळेच बहुतेक युरोपीय देशात, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत त्या उपचाराला सरकारी अनुदान किंवा विम्याचा परतावा दिला जात नाही किंवा बंद होण्याच्या मार्गावर आहे. ज्याचा विश्वास आहे त्याने स्वतःचे पैसे खर्च करून हवा तो इलाज करावा. पण जेंव्हा सरकारने आम्हाला हा उपचार स्वस्तात किंवा फुकटात उपलब्ध करून द्यावा ही मागणी येते तेंव्हाच हा प्रश्न येतो. ( हा प्रश्न मिसळपाव वर नाही) जेंव्हा सरकार तुमच्यासाठी पैसे खर्च करते तेंव्हा सरकारकडे असलेल्या मर्यादित साधनांचा सर्वोत्तम उपयोग झाला पाहीजे(optimum utilisation of resources.)या बद्दल दुमत असायचे कारण नाही. मुलाची फी भरायची आहे की नवा मोबाईल घ्यायचा आहे यामध्ये साधारणपणे वाद असणार नाही. वैयक्तिक पातळीवर गेलात तर कुणाला कुठच्या उपचार पद्धतीवर विश्वास आहे आणि कुणाला कुठल्या उपचार पद्धतीने फायदा होईल हे त्या व्यक्तीच्या प्रकृतीप्रमाणे असेल. बापूसाहेबाना लिहिलेल्या प्रतिसादात मी म्हणालो आहे की आजाराचे पूर्ण निदान झाल्यावर त्यावर कोणती उपचार पद्धती वापरावी हे त्या माणसाला ठरवु द्या. आज इतर पॅथी वाले विविध चाचण्या करूच नये आणि केल्या तर त्या केवळ पैसे काढण्यासाठीच असतात हा प्रचार( त्यात थोडेफार तथ्य आहे याबद्दल शंका नाहीच) आपली टिमकी वाजवण्यासाठी चालवला आहे त्यामुळे जनतेचे नुकसान होत आहे. उदा. जुन्या पाठदुखीबद्दल एक्स रे न करता इलाज करणे हे चूक आहे कारण त्यामुळे गंभीर आजाराकडे दुर्लक्ष होऊ शकते. पूर्ण निदान झाल्यावरच आणि खोटा दावा न करता वस्तुस्थिती समजावून देऊन इलाज करणारे होमियोपॅथ किंवा आयुर्वैद्य संख्येने फार कमी आहेत. आम्ही एड्स, कर्करोगासारखे गंभीर आजारसुद्धा खात्रीने बरे करून देतो हा अपप्रचार चालवला आहे याबद्दल माझा आक्षेप आहे. महाराष्ट्रात ८ कोटी लोक आहेत यात ५ % लोक जरी इतर पॅथीचा वापर करत असतील आणि यातील ५ % लोक जरी बरे झाले तरीही ते २ लक्ष लोक होतात. त्यामुळे आमच्या पॅथीने बरी झालेली "प्रच्चंड" उदाहरणे आहेत हा दावा सांख्यिकीवर कुठे उभा आहे ते सहज लक्षात येईल. आधुनिक वैद्यकशास्त्राची स्वतःच्या मर्यादा फार मोठ्या आहेत. आणि या मर्यादा उघडपणे सांगण्यास त्यांना लाज वाटत नाही. परंतु शास्त्र म्हणून एखादा रोग "बरा करतोच" असे आधुनिक वैद्यकशास्त्र म्हणत नाही. हाच आधुनिक आणि प्राचीन उपचार पद्धतीत फरक आहे. मी त्या प्रणालींच्या व्यावसायिकांच्या दाव्याबद्दल बोलत नाही.( उदा डॉ बात्रा साहेब टकलावर केस उगवण्यापासून, कर्करोग, वंध्यत्व, एड्स वर सगळ्यावर "खात्रीने" तो सुद्धा "साईड इफेक्टस शिवाय" इलाज करण्याचा दावा करतात). डॉ. बात्रा हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. मूळ मुद्दा असा आहे की आपल्याला जुनी सर्दी आहे किंवा शरीरावर चामखीळ आहे. एकदा निदान बरोबर झाले की त्यावर आपण कोणता इलाज करता हा आपली वैयक्तिक निवड (चॉईस). होमियोपॅथी किंवा आयुर्वेदिक उपचारांनी बरे झालेले अनेक रुग्ण मीसुद्धा पाहिलेले आहेत. तेंव्हा या पॅथी निरुपयोगी आहेत असे माझे म्हणणे नाही. आधुनिक वैद्यकशास्त्र हे जास्त खर्चिक आहे आणि जशी जशी त्यात प्रगती होत आहे तसे तसे उपचार जास्त उत्तम होत आहेत परंतु या सर्वांसाठी एक किंमत मोजायला लागते ती मोजण्याची मानसिकता भारतीय माणसांची नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून या पॅथी भारतात मोठ्याप्रमाणावर चालतात हीही एक वस्तुस्थिती आहे. आपल्या कार ला ABS प्रणाली (ANTI LOCK BRAKE SYSTEM) लावण्यापेक्षा आपण लिंबू आणि मिरची ( ५ रुपयात रोज नवी) लावण्यात समाधान मानतो हीच मनोवृत्ती आहे. परंतु जेवढ्या मोठ्या प्रमाणावर राजकारणी लोकांनी होमियोपॅथी आणि आयुर्वेदिक कॉलेज काढली आहेत आणि त्यातून बाहेर पडणारे अर्ध शिक्षित डॉक्टर यांचे पेव फुटले आहे. यामुळे त्यांनी आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मोठ्याप्रमाणावर अपप्रचार चालवला आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो आधुनिक औषधांचे साईड इफेक्ट्स या विषयाला होमियोपॅथीच्या तिसऱ्या वर्षात २० गुण ठेवलेले आहेत. हे म्हणजे "भारतीय सेना काश्मिरी मुसलमानांवर अत्याचार करते यावर पाकिस्तानात शाळेच्या इतिहासाच्या सातवीच्या पुस्तकात धडा आहे" तसेच आहे. संवेदनशील मुलांचे मन कलुषित करणे यासारखी हीन वृत्ती दुसरी नसेल. यामुळे होमियोपॅथीचा विद्यार्थी बाहेर पडला की पहिल्या दिवसापासून साईड इफेक्टसचा पारायण करायला सुरुवात करतो. ज्याने ज्या इतर पॅथीचा वापर करायचा आहे त्यानं तो डोळस पणे करावा इतकेच माझे म्हणणे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
अ
असंका Tue, 07/12/2016 - 07:33 नवीन
अरे देवा...उगाळावा तितका काळाच होत चाललाय की.... असो..हे परत काहीच माहित नव्हतं (विशेष करून २० मार्कांबद्दल). पण हे असं असलं तरी हा अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव भाग झाला. माझी होमिओपॅथीबद्दलची भूमिका अशी नाही. माझ्या माहितीतले होमिऑपॅथ काय होतंय ते लिहून घेउन औषध लिहून देतात इतरांबद्दल एक शब्द बोलत नाहीत. झालंच तर आमच्या घरीच होमिओपॅथीची खंडीभर पुस्तकं आहेत. यात एक गोष्ट अशी होते की सगळे उपाय थकल्यावर होमिओपॅथीकडे आम्ही जात नाही. होमिओपॅथी थकल्यावरच आम्ही इतर ठिकाणी जातो. त्यामुळे इतर उपायांनीच तुम्ही बरे झाले असं म्हणायला माझ्याकडे तरी स्कोप नाही. टेक धिस विथ अ पिंच ऑफ सॉल्ट, कारण "अर्र तुम्ही आधीच यायला पाहिजे होतंत" असंही डॉक्टर (मॉडर्न वाले) आम्हाला म्हणालेत. प्राणघातक ठरू शकतील अशा आजारांमध्ये मॉडर्न मेडिसीनकडेच वळलेलो आहे. तुमच्या अधिकार क्षेत्रात लुड्बूड केली त्याबद्दल क्षमस्व... परत एकदा धन्यवाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
व
वेल्लाभट Tue, 07/12/2016 - 07:51 नवीन
होमियोपॅथी किंवा आयुर्वेदिक उपचारांनी बरे झालेले अनेक रुग्ण मीसुद्धा पाहिलेले आहेत. तेंव्हा या पॅथी निरुपयोगी आहेत असे माझे म्हणणे नाही.
धिस इज अ हाइट डॉक. आमचं म्हणणं वेगळं नव्हतं काही. तुम्हाला हेच म्हणत होतो, की सरसकट खोटं तुम्ही कसं ठरवू शकता एखाद्या औषधाला जे गेली २०० वर्ष लोक घेतायत व बरे होतायत, आजही. तुमचा मुद्दा धरून इतरांना खोटं म्हणेपर्यंत ठीक होतं, पण तुमच्याकडून किमान हा दुतोंडीपणा अपेक्षित नव्हता. आता स्पष्ट आहे, वेळ कुणी कुणाचा फुकट घालवला ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 07/12/2016 - 09:56 नवीन
वा वेल्लाभट दुतोंडीपणा वेळ कुणी कुणाचा फुकट घालवला ते. काय भाषा आहे आपली? बैलगाडी सुद्धा हजारो वर्षे चालू आहे म्हणून ती तुम्ही मुंबईत किंवा दिल्लीत वापरता का? केवळ एखादे औषध २०० वर्षे चालू आहे म्हणून ते वापरावे याला काय आधार आहे. एखादे औषध परिणामकारक आहे हे सिद्ध करून दाखवा म्हणालो तर भराभर चिंध्या पाठवल्यात. आबासाहेबांनी त्याचे चिकाटीने विच्छेदन केले त्यावर उडवाउडवीची प्रतिसाद दिलेत. आपल्या सर्व प्रतिसादात लोकांनी काही घ्यावे असे काही निघाले का हे ही तपासून पहा. मग कुणी वेळ फुकट घालवला ते विचारा. आधुनिक औषधात केवळ २०० वर्षे चालू आहे म्हणून औषध दिले जात नाही तर परिणामकारक असेल आणि त्याहूनही अधिक परिणामकारक औषध नसेल तरच ते दिले जाते. मी जे म्हणालो आहे की इतर पाठी मध्ये साचलेपण आलेले आहे ते तुम्हीच आड मार्गाने म्हणता आहात. होमियोपॅथी निरुपयोगी आहे हे मी कुठे म्हणालो आहे हे सांगाल का? मी फक्त एवढेच म्हणतो की एकदा नक्की निदान झाल्यावर रुग्णाने ठरवावे की कुठली पॅथी वापरावी. आधुनिकी निदान तंत्रज्ञान हे केवळ पैसेकाढूपणाचे धंदे आहेत हा अपप्रचार चालवला आहे याबद्दल मी टिप्पणी केली. आजमितीस झालेल्या संशोधनात होमियोपॅथी ही प्लॅसिबोपेक्षा जास्त परिणामकारक सिद्ध झालेली नाही हे मी पुराव्यासकट दिले आहे. त्याचा लोकांना उपयोग होतो की नाही यावर मी बोलत नाही. याची अनेक कारणे आहेत. (तुम्ही वेगळा धागा काढा त्यावर मी सविस्तर चर्चा करेन असे मी तुम्हाला आव्हान देतो) सद्यस्थितीत होमियोपॅथी कोणत्याही संसर्गजन्य रोगात उपयुक्त ठरलेली नाही हे काळानेच सिद्ध केले. बाकी सोडा हो -- हा धागा प्रतिजैविकांवरच आहे तरी प्रतिजैविके येण्यापूर्वीच आपली २०० वर्षे घेत असलेली औषधे होतीच ना मग जगभरात कॉलरा, देवी, प्लेग विषमज्वर याला कोट्यवधी लोक बळी का पडले याचे साधक बाधक उत्तर आपण देऊ शकाल का? उगाच आक्रस्ताळे प्रतिसाद देऊन काहीही निष्पन्न होत नाही. आपला इगो दुखावला गेला आहे यामुळे आपण असे करत आहात असे मी समजतो.पण तो दुखावला जाईल असा माझ्याकडून कोणताही वैयक्तिक प्रतिसाद गेलेला नाही. जर तसे झाले असेल तर क्षमस्व. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 07/12/2016 - 10:21 नवीन
जाऊ द्या डॉक साब,समजणे समजावणे अन संयमाच्या पलीकडले आहेत काही लोक, तुम्ही बोलून उपयोग नाहीये, असे सुचवतो. (अनुभवाचे बोल) बाप्या अवांतर :- डॉक्टर साहेब, आधुनिक किंवा कुठल्याही इतर औषधशास्त्रात 'तिरसटपणाला' औषध आहे का हो? :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 07/12/2016 - 11:50 नवीन
बापूसाहेब प्रसिद्ध खगोलशास्त्र विशेषज्ञ श्री दा कृ सोमण यांनि माझ्या लहानपणी मला सांगितलेले एक वाक्य मी आजही उद्धृत करतो. मी त्यांना विचारले की एवढ्या कोट्यवधी किमी वर असलेल्या ग्रहांचा मानवी आयुष्यावर परिणाम होतो काय? त्यावर ते म्हणाले ग्रहांचा होतो की नाही ते माहीत नाही पण दुरा"ग्रहाचा" मात्र होतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 07/12/2016 - 12:30 नवीन
साधुवाद सर साधुवाद!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
व
वेल्लाभट Tue, 07/12/2016 - 11:07 नवीन
हे नमूद करून तुमचीच दोन वाक्य डकवतो डॉक्टर. - आतापर्यंत झालेली एकही शास्त्रीय चाचणी सज्जड पुराव्यानिशी हे सांगत नाही की होमिओपॅथी ही नक्कीच काम करते. - होमिओपॅथी काम करीत नाही हे सिद्ध करण्यासाठी पुरावे ढीगभर मिळतील. AND - होमियोपॅथी किंवा आयुर्वेदिक उपचारांनी बरे झालेले अनेक रुग्ण मीसुद्धा पाहिलेले आहेत. तेंव्हा या पॅथी निरुपयोगी आहेत असे माझे म्हणणे नाही. ही उघड विसंगती जर दिसत नसेल कुणाला, तर कठीण आहे. चालू द्या. आमचाही वेळ अमूल्यच आहे, कुणाला वाटला नाही तरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 07/12/2016 - 11:46 नवीन
विसंगती-- माझ्या जन्माच्या वेळेस केलेल्या पत्रिकेमध्ये हा डॉक्टर होईल लष्करात जाईल आणि तो सर्व मानमरातब सोडून येईल असे "लिहिलेले" आहे. मला दुर्दैवाने मुंबईत एम बी बी एस मध्ये प्रवेश साठी ०२ गुण कमी पडले. ए एफ एम सी मध्ये प्रवेश मिळाला म्हणून मी तेथे गेलो आणि नंतर लष्कर सोडूनही आलो. याला आपण काय म्हणाल योगायोग? फलज्योतिष हे जर सांख्यिकीच्या जोरावर सिद्ध करायचा प्रयत्न केला तर ते अनुमान धपक्याच्या पेक्षा जास्त चान्गले आहे हे सिद्ध झालेले नाही. पण माझ्या दृष्टीने ते भविष्य बऱ्याच प्रमाणात खरं ठरलं या बद्दल काय म्हणायचं ? म्हणून आयुष्यात एखादा महत्त्वाचा निर्णय हा केवळ ज्योतिषावर अवलंबून घ्यायचा का ? याला तुम्ही विसंगती म्हणा नाही तर दैवगती. या पेक्षा जास्त काही मी आपल्याला समजावू शकत नाही. परत मी एकच म्हणेन. आपला आजार काय आहे याचे नक्की निदान आधुनिक तंत्रज्ञानाने करून घ्या. यानंतर डोळे उघडे ठेवून कोणत्या पॅथीकडे जायचे ते ठरवा. जीवाशी येईपर्यंत उशीर करू नका. बाकी आपली मर्जी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
अ
अनुप ढेरे Tue, 07/12/2016 - 10:02 नवीन
अहो वेल्लाकाका, ते म्हणतायत की जे लोक बरे होतात ते प्लसिबो इफेक्टमुळे होतात. औषधांमुळे नाही. बाकी एवढं संयत भाषेत समजवणार्‍या माणसाबद्द्ल ही भाषा वापरलेली पाहून वाईट वाटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट Tue, 07/12/2016 - 10:59 नवीन
सॉरी ढेरे सर, त्याला माझा इलाज नाही. खरे साहेबांच्या युक्तिवादातल्या विसंगतीकडे बोट दाखवलं तर त्यात मि 'अशी भाषा' वगैरे काही वापरलेली मला वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 07/13/2016 - 01:31 नवीन
एवढं संयत भाषेत समजवणार्‍या माणसाबद्द्ल ही भाषा वापरलेली पाहून वाईट वाटलं. मी टू.....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
व
वेल्लाभट Sat, 07/09/2016 - 05:16 नवीन
तुम्ही दुवे नीट वाचलेले दिसत नाहीत. त्यात मेजर म्हणायला कॅन्सरपासून रोगांबद्दल लिहिलेलं आहे आणि होमिओपॅथी बद्दल. आता तेही सांगोपांग वाटू शकतं म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
आ
आबा Sun, 07/10/2016 - 17:09 नवीन
१) पहिली लिंक हेल्थ स्पेक्टेटर मधले हे आर्टिकल निरर्थक आहे, लेखाची सुरुवात "आय अ‍ॅम नॉट अ बिलिवर इन होमिओपथी... बद आय लव्ह द टेस्ट..." वगैरे अशी काहीतरी आहे पुढे होमिओपॅथी नष्ट होत नाही असा मुद्दा सिद्ध करण्यासाठी होमिओपथीची तुलना डूम्स डे या कार्टून व्हिलनशी केली आहे, तोच तर्क पुढे चालवला तर अ‍ॅलोपथीची तुलना "सुपरमॅनशी" करावी लागेल,.. असो at least he isn't guilty of over thinking his metaphors... सहाव्या पराग्राफ मध्ये त्या लेखामधलं एकमेव कोहेरंट वाक्य आहे "research is only as good as the hypothesis and the methodology used to prove or disprove that hypothesis"... वॉटर मेमरी सारखं नॉन अ‍ॅव्हॅगॅड्रो हायपॉथिसीस तर सोडाच पण एखाद्या होमिओपॅथिक औषधाचा प्लासिबोच्या पलिकडे परिणाम होतो हे सुद्धा यांना एफिकेशसली सिद्ध करता आलेलं नाही, याची लेखकाला कल्पना नसावी. या लेखामध्येच दिलेली चाचणीची एकमेव लिंक सुद्धा निगेटिव्ह रिजल्ट्स दखवते आहे. :) शेवटचा पराग्राफ तर आणखीच विनोदी आहे "होमिओपॅथीच्या टेस्ट्स घ्या, पॉजिटिव्ह आल्या तर ठीक, निगेटिव्ह आल्या तर ऊद्धटपणे होमिओपथी बंदी घालण्याऐवजी ब्रिटिश नॅशनल हेल्थ ऑर्गनायजेशनने (एन.एच.ए.) त्यांना पैसे द्यावेत की नाही यावर चर्चा करावी"... निगेटिव्ह निकाल आले तर पैसे द्यावेत की नाही याची चर्चा करावी ??!, या लेखकाने दुसर्‍याला ऊद्धट म्हणावं यासारखी मजा नाही... :) असो... "होमिओपथीच्या औषधांचा प्लासिबो पलिकडे परिणाम होत नाही हे ब्रिटिश होमिओपॅथीक असोसियेशन (बी.एच.ए.) स्वतःच अनेक टेस्ट्स नंतर कबूल केलेलं आहे", तरीही एन.एच.ए. त्यांना वर्षाला पाच दहा मिलियन पौंड देते, याच्या सारखा निर्लज्जपणा नाही. आता आयुष सुरू करून भारतही त्याच रांगेत जाउन बसला आहे... २) दुसरी लिंक लेखिका रॉबर्ट्स पूर्वी न्यूरोसायन्स मध्ये पी.एच.डी. करत होत्या, त्यांनी ते क्षेत्र सोडून होमिऑपथीची पदवी घेतलेली आहे. गार्डियन मधल्या या लेखात स्पष्टपणे मांडलेला (पण चुकीचा) असा एकच मुद्दा आहे, तो म्हणजे ब्रिटिश होमिओपथीक असोसियेशनने (बी.एच.ए.) , ब्रिटिश सरकारला दिलेल्या मेमॉरेंडमची लिंक (एच.ओ. १२). "होमिओपथी ला वैद्यक शास्त्राचा दर्जा मिळावा की नाही? (आणि एन.एच.ए. ने त्यांना पैसे द्यावेत की नाही?)" या प्रश्नावर संशोधन करण्या साठी ब्रिटिश सरकारने २००९ मध्ये एका समितीची स्थापणा केली होती, तिच्या अहवाला सोबत हे मेमॉरेंडम जोडलेले आहे (बाकिचा अहवाल वगळून फक्त हे मेमॉरेंडमच जोडण्यामधली लबाडी सोडून देऊ). अशीच मेमॉरेंडम्स अनेक डॉक्टर्स आणि संघटनानी दिलेली आहेत, ऊदा. होमिओपॅथेक फार्मासिसस्टस् असोसियेशन, रॉयल फार्मासिसस्टस् असोसियेशन (ती सर्व वरच्या अहवालासोबत जोडलेली आहेत). असो, तर अनेक पेपर्स वाचून डॉक्टर्स आणि वैज्ञानिकांच्या साक्षी घेऊन या समितीने "होमिओपथी हे मिथक आहे" असा निकाल दिला होता, एन.एच.ए. ने त्यांना पैसे देऊ नयेत अशीही सूचना केली होती (पान नं बेचाळीस). या अहवालाची लिंक लेखामध्ये न देण्यामागचे कारण समजण्यासारखे आहे, परंतू बी.एच.ए.च्या मेमॉरेंडमचा उल्लेख करताना त्यामध्ये दिलेले संदर्भ तरी वाचण्याचे कष्ट घ्यायचे (मी सर्व संदर्भ वाचलेले आहेत)! "५ पैकी ४ रेव्हूज मध्ये पॉजीटीव्ह निकाल येतात" अशी धडडीत खोटी माहिती इंटरनेट्च्या काळात देण्याची हिम्मत वाखाणन्याजोगी आहे, या दाव्यामधला खोटेपणा प्रोफेसर अर्न्स्टने सप्रमान दाखवला आहे (पान नं Ev 51). हा अहवाल मुळातून वाचावा अशी आपल्याला विनंती आहे, विषेशतः त्यामध्ये दिलेल्या वैज्ञानिकांच्या साक्षी. या लेखामधली पुढची थाप म्हणजे होमिओपथीचे मुख्य हायपोथिसिस हे प्रयोगातून सिद्ध करता येते. हे हायपॉथिसिस म्हणजे प्रचंड प्रमाणात विरल केलेल्या द्रावणामध्ये द्राव्याचे गुणधर्म शिल्लक राहतात. खरी गोष्ट अशी आहे की हे गृहीतक सिद्ध करण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न आजपर्यंत झाले आहेत. अनेक शास्त्रज्ञांनी आटोकाट प्रयत्न करूनही त्यांना थोडेही यश मिळालेले नाही. परंतु यातला एक उल्लेखणिय प्रयोग केला होता तो "जॅक बेन्वेनीस्त" (Jacques Benveniste) नावाच्या एका फ्रेंच शास्त्रज्ञाने इ.स. १९८८ मध्ये. बेन्वेनीस्तचा (अर्थातच चुकीचा) दावा असा होता की होमिऑपॅथीच्या औषधांइतक्या प्रचंड विरल केलेल्या द्रावणामध्ये सुद्धा विरघळवलेल्या पदार्थाचे गुणधर्म शिल्लक राहतात. जसे काही ते पाणी, त्यामध्ये पूर्वी विरघळवलेल्या (आणि अतिषय विरल केलेल्या) पदार्थांना लक्षात ठेवते. या गुणधर्माला बेन्वेनीस्तने "वॉटर मेमरी" म्हणजेच पाण्याची स्मरणशक्ती असे नाव दिले. बेन्वेनीस्तचा दाखला देऊन होमिओपॅथीचे व्यावसायिक असं सांगू लागले, की होमिओपॅथीच्या औषधांचा परिणामही वॉटर मेमरी मुळेच होतो. परंतु हा प्रयोग बेन्वेनीस्तला परत करून दाखवायला सांगितला असता त्याला तो अर्थातच कधीही जमला नाही. नंतर असेही समोर आले की बेन्वेनीस्तच्या गटामधल्या काही शास्त्रज्ञांना होमिओपॅथीच्या व्यावसायिकांनीच लाच दिली होती. नेचर मासिकामध्ये प्रसिद्ध झालेला हा पेपर कधीही माघारी घेतला नाही. अभूतपूर्व टीका झाल्यानंतर स्वतः नेचरच्या संपादकांनी तो प्रयोग पुन्हा करून पहिला (रिजल्ट अर्थातच निगेटिव्ह आला). या दरम्यान झालेल्या प्रचंड चर्चेवर संपादकांनी स्वतःही नंतर एक लेख लिहिला ज्यात सर्व प्रयोगाचा उहापोह केलेला आहे. वॉटर मेमरी तपासण्याचे अनेक प्रयत्न त्यानंतर झाले, परंतु असा कोणताही गुणधर्म अस्तित्वात नाही हेच वारंवार सिद्ध झाले. "वॉटर मेमरी" हा शब्दही विज्ञानाच्या क्षेत्रात आजकाल फक्त एक चेष्टेचा विषय म्हणून शिल्लक राहिला आहे. अनेक वेळा तोंडावर आपटूनही परत परत तीच टेप वाजवण्याएवढी हिम्मत कोठून येते कळत नाही. पण यांच्या थापा ऐकून आणि एकून विचार करण्याची क्षमता पाहून यांनी न्यूरोसायन्स सोडून दिलं हे बरं झालं असं वाटतं. एकून एक दावा खोटा असणारे असले लेख गार्डियन सारख्या ठिकाणी कसे छापतात असा प्रश्न मला पडला, परंतू विज्ञान विभागात न देता "Life and style" सेक्शन मध्ये दिला आहे ते पाहून प्रश्नाचे उत्तर मिळाले. होमिओपथी ही फक्त एक फॅशन आहे याचीच ती कबूली आहे. ३) तिसरी लिंक The page you requested could not be found. असा मेसेज येत आहे. मी बाकीची वेबसाईट चाळून पाहीली आणि त्यातले लेख वाचले. परंतू त्यातही वरती दिलेल्या थापा आणि टिपिकल जाहिराती आहेत. एखादे औषध काम करते असे कळाले की एफ.डी.ए. च अ‍ॅप्रूव्हल घेउन प्रमाणित करून घेण्याऐवजी पुलाखाली बसण्यार्‍या वैदू सारखी "मिरॅक्युलस", "मॅजीकल" वगैरे जाहीरात करत बसायची, आणि कोणी अंधश्रद्धा म्हणालं बोंबाबोंब करायची यामागचं लॉजिक कळत नाही. ४) चौथी लिंक बहुतेक तुम्हाला दुसरं काही सापडलं नसावं... अहो हे आयुषच्या उद्घाटना निमित्त दिलेले प्रणव मुखर्जींचे प्रेस रिलीज आहे. त्यातून काय सिद्ध होणार? माझा मुख्य मुद्दा असा आहे की होमिओपॅथीचा उपयोग होतो की नाही ही फार पुढची गोष्ट झाली (अर्थात यातही होमिओपथी नापासच होते). मुळात होमिओपथीचे औषध काम करू शकते हा दावा १० वी च्या केमेस्ट्रीच्या बेसीसवर सुद्धा नापास होतो. होमिओपाथ्सचं ठिक आहे, त्यांना धंदाच करायचा आहे, परंतू शिकले सवरलेले लोक सुद्धा बुद्धीभेद करतात तेंव्हा हसावे की रडावे कळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
अ
अनुप ढेरे Sun, 07/10/2016 - 17:55 नवीन
जबरी प्रतिसाद! आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आबा
म
मिहिर Mon, 07/11/2016 - 03:59 नवीन
जबरी प्रतिसाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
प
पिलीयन रायडर Mon, 07/11/2016 - 14:43 नवीन
+११ खरंच मस्त प्रतिसाद. मी सुद्धा त्या चारही लिंक्स उघडुन पाहिल्या होत्या. आणि वर साधारण तेच विचारलं होतं. पण आबांनी जशी पिसं काढली आहेत, तसं अजिबात मांडता आलं नसतं!! कुणी चार लिंक्स दिल्या की लगेच मुद्दा बरोबर होत नसतो ह्याचे हे उत्तर उदाहरण आहे. पण चर्चा पुढे जाण्यासाठी मात्र उपयोगी आहे असे दिसत नाही. इयत्ता दुशली ब सोबत बोलायला इतक्या सुंदर प्रतिसादांची गरजच नाहीये ना! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिहिर
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 07/12/2016 - 19:16 नवीन
आबा, अभ्यासाबद्दल नमस्कार. पण थोडं गांभीर्याने, हे वाचन टाईमपास म्हणून केलं असेल तर काहीच म्हणणं नाही. पण महत्त्वाचा आणि मौल्यवान वेळ ह्यासाठी दवडू नका अशी विनंती. तरीही वरवर विसंगत वाटेल असं वाक्य - ह्या लिंका आणि त्याला दिलेला प्रतिसाद ह्याचा स्वतंत्र लेख बनवा आणि तो प्रकाशित करा. पुढच्या वेळेस होमेपदीसाठी एवढा वेळ खर्च करावा एवढं त्याचं महत्त्व नाही. तरीही हे अधूनमधून दाखवत राहावं लागणार. काठावरचे, तळ्यात-मळ्यात करणारे बरेच लोक असतात. त्यांना ह्या अभ्यासाचा फायदा होईलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
व
वेल्लाभट Sun, 07/10/2016 - 19:43 नवीन
कस्स्सली मेहनत घेतलीत राव ! जाम हसायला येतंय. सॉलिड चिकाटी. वाह. ही कुठल्या प्रतिजैविकाने आली म्हणायची? :) करा. अजून प्रयत्न करा आपलं चांगलं म्हणताना दुसरं खोटं (वाईट पण नाही) म्हणा. माझं काय जातं. जगातली क्रमांक २ ची अवलंबली जाणारी उपचार पद्धती आहे होमिओपॅथी. तुमच्याच त्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन नुसार. याला पण खोटं म्हणणार का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आबा
आ
आबा Sun, 07/10/2016 - 20:12 नवीन
मी खोटं का म्हणालो त्याची कारणंही दिलीत, तुम्ही काय केलंत? :) आणि क्र. २ ला काही विषेश महत्व आहे का? क्रमांक १७ किंवा ५०० ची असती तर काय झालं असतं ? गोष्टी त्यांच्या अ‍ॅबसोल्यूट मेरीटवर खर्‍या किंवा खोट्या ठरवता येतात, त्याला वैज्ञानिक पद्धत म्हणतात (विसाव्या शतकात जन्माला आल्याबद्दल अभिनंदन). ३ पेक्षा २ मोठा हे कारकुनी दर्जाचं अ‍ॅनालिसिस झालं (ते कारकुनी लेव्हललाच ठीक आहे). होमिओपथी क्र. १ ची उपचार पद्धती जरी असली असती तरी ती खोटीच असली असती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 07/12/2016 - 19:20 नवीन
क्र. २ ला काही विषेश महत्व आहे का? क्रमांक १७ किंवा ५०० ची असती तर काय झालं असतं ?
बराच फरक पडतो, आबा. साखरेच्या गोळ्या खाऊन बरे होणाऱ्या 'उपचार'पद्धतीवर विश्वास ठेवणारे भोळसट एवढ्या प्रमाणात असतील तर त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. दोन-चार लोक भक्त असणं निराळं आणि मोठेच्या मोठे लोंढे भजनी लागणं निराळं. वैज्ञानिक पद्धतीवर विश्वास न ठेवणारे लोक किती मोठ्या प्रमाणावर आहेत ही गोष्ट नाकारता येण्यासारखी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आबा
व
वेल्लाभट Sun, 07/10/2016 - 19:56 नवीन
https://www.homeopathic.com/Articles/Homeopathic_research/Scientific_Evidence_for_Homeopathic_Medicine.html सिरियसली. ही लिंक काम करते. http://www.britishhomeopathic.org/evidence/the-evidence-for-homeopathy/ यातला भाग पेस्ट करतोय British Homeopathic Association > Evidence > The evidence for homeopathy The evidence for homeopathy There is a growing body of clinical evidence to show that homeopathy has a positive effect. Randomised placebo-controlled trials The widely accepted method of proving whether or not a medical intervention works is called a randomised controlled trial (RCT). One group of patients, the control group, receive placebo (a “dummy” pill) or standard treatment, and another group of patients receive the medicine being tested. The trial becomes double-blinded when neither the patient nor the practitioner knows which treatment the patient is getting. RCTs are often referred to as the “gold standard” of clinical research. Up to the end of 2014, a total of 104 papers reporting good-quality placebo-controlled RCTs in homeopathy (on 61 different medical conditions) have been published in peer-reviewed journals. 41% of these RCTs have reported a balance of positive evidence, 5% a balance of negative evidence, and 54% have not been conclusively positive or negative. For full details of all these RCTs and more in-depth information on the research in general, visit the research section of the Faculty of Homeopathy’s website. Also, see 2-page evidence summary with full references. The above figures are strikingly similar to data obtained from an analysis of 1016 systematic reviews of RCTs (and therefore of many more than that number of RCTs) in conventional medicine: 44% of the reviews concluded that the interventions studied were likely to be beneficial (positive); 7% concluded that the interventions were likely to be harmful (negative); and 49% reported that the evidence did not support either benefit or harm (non-conclusive). [El Dib RP, Atallah AN, Andriolo RB (2007). Mapping the Cochrane evidence for decision making in health care. Journal of Evaluation in Clinical Practice; 13:689–692.] Systematic reviews The most solid evidence for a treatment comes from critically assessing more than one RCT in a carefully defined way. This is known as a systematic review. Six out of seven major systematic reviews of RCTs in homeopathy have concluded (with important caveats) that homeopathy has an effect greater than placebo. Systematic reviews of RCTs in specific medical areas have presented positive conclusions for homeopathy in six: childhood diarrhoea, hay fever, post-operative ileus, respiratory tract infection, rheumatic diseases and vertigo (see Faculty of Homeopathy website for details). For full details of all 104 placebo-controlled RCT papers and more in-depth information on the research, visit the research section of the Faculty of Homeopathy’s website. This includes details of those RCTs that were either negative or non-conclusive. A grant-funded systematic review programme is providing further insight into these research findings.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आबा
आ
आबा Sun, 07/10/2016 - 20:21 नवीन
परत परत त्याच गोष्टी दाखवत आहात, मागच्या मेमोरँड्म मध्ये हेच पेपर्स आहेत. एकदा खोटं सिद्ध होउनही परत परत तेच सांगण्यामागचा ब्रिटिश होमिओपथीक असोसियेशनचा उद्देश समजण्यासारखा आहे, परंतू पुढचा अभ्यास वगैरे शहाजोगपणा करण्याआधी या लिंक तुम्ही स्वतःही वाचत नाही असं दिसतंय. एकूणच चिकाटीने विचार करण्याचीही तुम्हाला सवय असावी असं वाटत नाही... तस्मात शुभेच्छा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट Sun, 07/10/2016 - 20:56 नवीन
अरेच्चा! अस्सं झालं तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आबा
स
सुबोध खरे Tue, 07/12/2016 - 09:28 नवीन
पुढे काय उत्तर आहे आपले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट Tue, 07/12/2016 - 09:50 नवीन
नाही आम्ही दोन बाजूने बोलणार्‍यांशी प्रश्नोत्तरं करत नाही. वेळ फुकट जातो, राईट?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
क
कैलासवासी सोन्याबापु Mon, 07/11/2016 - 15:56 नवीन
आबा दंडवत स्वीकार करा पामराचा ___________/\______________
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आबा
स
सुबोध खरे Tue, 07/12/2016 - 07:02 नवीन
आबासाहेब दंडवत स्वीकार करा पामराचा. असेच म्हणतो. आपल्या चिकाटीचा आणि निगुतीने प्रतिवाद करण्याच्या पद्धतीचे आदर वाटतो परंतु झोपलेल्याला उठवणे सोपे आहे झोपेचे सोंग घेतलेल्याला उठवणे कठीण आहे. त्यामुळे आपण आपला वेळ वाया घालवू नका अशी विनंती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ग
गंम्बा Tue, 07/12/2016 - 07:14 नवीन
झोपेचे सोंग घेतलेल्याला उठवणे कठीण आहे. त्यामुळे आपण आपला वेळ वाया घालवू नका अशी विनंती आहे.
डॉक्टर साहेबांनी हा सल्ला देणे फार रोचक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
शान्तिप्रिय Fri, 07/08/2016 - 12:41 नवीन
धागा भरकटू न देणे महत्त्वाचे आहे हे सर्वांनी समजुन घ्या. प्रतिजैविके बदद्ल अनेक शंका दूर झाल्या आहेत. आंटी बायोटिक्स योग्य सल्ल्यानुसार योग्य प्रमाणात घेतल्यावर निश्चितच ती "आजार संपवतात" याबद्दल आता दुमत नाही.तसेच अलोपाथी ही उपचार पध्धती जास्तीत जास्त पारदर्शक आहे हे खरे. अवांतर : माझी आई, किडनी फेल्युअर ने दोन वर्षांपूर्वी गेली. आम्ही तेव्हा तिचे डायलिसिस चालू ठेवले होते .सुमारे ८ महिने सतत आठवड्यातुन दोनदा असे डायलिसिस चालू होते. तसेच होमिओ पाथी व आयुर्वेदिक अनेक उपचार केले.पण काहिहि उपाय झाला नाहि. परंतु, होमिओपाथ आणि आयुर्वेदिक डॉक्टरांनी डायलिसिस वर अशास्त्रिय टीका केली व आम्हीच कसे योग्य उपचार देतो असे सांगण्याचा प्रयत्न केला. किडनी फेल्युअर वर सुध्धा हुकुमी औषध अजुन कुठेच नाही व ऑरगन डोनेशन बद्दल जागरुकताहि कमी पडते.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा