मला बाबा व्हायचं नाही!
मुलाचे वडील तो दहावीत असतांना एका अपघातात गेलेले. आई मुंबईत सरकारी खात्यात नोकरीला. एकटीने वाढवले, मुलाला इंजिनीअर केले. एकुलता एक मुलगा प्रेमविवाहासाठी हट्ट धरुन बसला ते आढेवेढे घेत करुन दिले. मुलगी त्याच्याच वर्गातली समवयस्क. दोघांच्याही वयाच्या २४ व्या वर्षी हे लग्न झाले.
लग्नाला आठ वर्ष होऊन गेलीत. अजून गुड न्यूज नाही. मध्यंतरी मुलीला गर्भाशयाचा आजार असल्याचे ऐकिवात आले. हे कुटूंब म्हणजे खरं तर मुलाची आई आपल्या गोष्टी बाहेर येऊ देत नाही, गुप्तता राखते. (त्याचवेळी इतरांच्या फाटक्यात पाय घालायला चवीचवीने पुढाकार घेते) त्यामुळे खरे काय ते काही कळत नव्हते. तसे आमच्या सर्व नातेवाईकांत बर्यापैकी मोकळेपणा, समजूतदारपणा असल्याने "बाप्रे, अजून पाळणा हलला नाही?" वाले कुत्सित टोमणे असे काही नाही. सर्व लोक नैसर्गिक उत्सुक असतात तेवढेच. सुरुवातीला वय कमी असल्याने असेल प्लानिंग म्हणून कोणी लक्ष दिले नाही. नंतर मुलाचे वय कमी असले तरी मुलीचे वय वाढत आहे ह्याने चिंता वाटायला लागली. पाच सहा वर्षे झाल्यानंतर मात्र कुतूहल वाढायला लागले. त्यात आम्हा लोकांत इतर सर्व बाबींबद्दल नियमित मोकळ्या चर्चा होतांना नेमकं ह्या जोडप्याच्या मूल प्रकरणाबद्दल काही विचारावे अशी परिस्थिती नव्हती. काही मदत (वैद्यकिय, सल्लामसलत, निव्वळ मनमोकळं करण्यासाठीही) लागल्यास करावी असे वाटूनही उपयोग नव्हता. कारण ह्याबाबतीत आपण काही विचारले तर त्यांच्या मनाला त्रास होईल म्हणून कोणीही हा विषय त्यांच्याकडे काढत नव्हते.
अचानक आता एवढ्यात कळले की मुलाला 'वडील व्हायची इच्छाच नाही' म्हणून. ह्याबद्दल तो साय्कॅट्रीस्टकडे जातो आहे. आम्हा सर्वांना चांगलाच धक्का बसला. एखाद्याला वडील व्हायची का इच्छा नसावी हे काही कोणास झेपले नाही. त्याला लहान मुले सांभाळणे, ती अवतीभवती असणे, त्यांची जबाबदारी घेणे हे महाभयंकर दबावाचे वाटत आहे. हे काहीतरी अनाकलनीय आहे असे वाटले. थोडं आणखी विचार करता लक्षात आले की ह्याचे मूळ त्याच्या आईच्या वागण्यात आहे का असा प्रश्न आला. स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्याच्या नादात, मिरवण्याच्या नादात "मी एकटीने किती खस्ता खावू मुलाला मोठे केले" हे ती सतत प्रसारित करत होती. त्याचा मुलाच्या मनावर भयंकर परिणाम झाला असे वाटते. जेणेकरुन 'मुले वाढवणे' म्हणजे फार कठिण, दुष्कर गोष्ट आहे असे त्याच्या सुप्त मनाने धरुन ठेवले असावे. दुसरी गोष्ट अशी की आईच्या अतिलाडाने, अतिलक्ष देण्याने, आयुष्य परिटघडीचे ठेवल्याने मुलाला आखीवरेखीव आयुष्याची सवय लागली आहे. त्यात त्याला मुलांमुळे येणारा अव्यवस्थितपणा, घडी बिघडण्याची भीती, आपल्या इच्छांना मुरड घालून मुलांची उस्तरवार करायला लागण्याने स्वातंत्र्यावर येणारे बंधन ह्या सगळ्याचा त्याला धसका बसला असावा असे वाटते.
ह्या सर्वात अतिशय केविलवाणी स्थिती झाली आहे ती मुलीची. तिला लहान मुलांची प्रचंड आवड आहे, मातृत्वासाठी ती आसुसलेली आहे. तिच्या आर्थोडॉक्स माहेराकडून काय ऐकून घेत असेल ते तिचे तिलाच माहिती. तिच्याबद्दल प्रचंड वाईट वाटत आहे.
दोघांचेही एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे. पण आयुष्य असा प्रश्न घेऊन उभं राहिल असे कुणालाही स्वप्नात वाटले नसेल.
मिपाकरांसमोर ही घटना मांडायचे कारण की असं काही तुमच्या बघण्यात आले आहे काय, ह्यावर काही उपाय आहेत का, किंवा एकंदर आपलं बहुमोल मत काय आहे? एखाद्याच्या व्यक्तिगत आयुष्यावर मिटक्या मारत ताशेरे ओढणे, उपदेश करणे, हा या धाग्याचा उद्देश नाही. एक महत्त्वाची केसस्टडी म्हणून ह्यावर गंभीर चर्चा घडावी ही इच्छा आहे. धन्यवाद.
पण तो मुलगा बाबा न होण्यासाठी नक्की काय करतोयं ?रात्री जेवण झाल्यावर ATM च्या लायनीत उभा रहात असेल.