Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आपण एवढे उद्धट का?

र
रविकिरण फडके
Fri, 08/26/2016 - 18:56
🗣 121 प्रतिसाद
['या सार्वजनिक सणांचे करायचे तरी काय' ह्यावर एक प्रतिक्रिया दिल्यानंतर आणि इतरांच्या वाचल्यानंतर काही विचार मनात आले तेव्हा लक्षात आले की हा थोडा general विषय होतो आहे. म्हणून हे नवीन लिखाण.] माझ्या स्वतःच्या आणि इतर जवळचे मित्र व आप्तेष्ट ह्यांच्या परदेशातील विविध अनुभवावरून असे दिसते की आपण भारतीय लोक एकूणच सामाजिक व्यवहारात दुसऱ्यांशी उर्मटपणे किंवा उद्धटपणे वागतो, आपल्यात बऱ्याचदा किमान सौजन्याचासुद्धा अभाव असतो. हे असे का? असे काय झाले की ज्यामुळे आपण भारतीय असे 'वैशिष्ठ्यपूर्ण' बनलो? मी कुणी अभ्यासू, सामाजिक शास्त्रज्ञ, वगैरे नाही. मला पडलेल्या प्रश्नाचा मागोवा scientifically कसा घ्यावा मला माहीत नाही. म्हणून हे पोस्ट. माझ्या मते दोन कारणे संभवतात; एक, आपल्या समाजात समता हे तत्व कधीच नव्हते. त्यास जातीभेद हे बहुधा प्रमुख कारण असावे. जातीच्या उतरंडीत कुणीतरी माझ्या वर असतो, कुणीतरी खाली. बरोबर कुणी नाही. त्यामुळे मी लांगुलचालन करतो किंवा उर्मटपणाने वागतो. दुसरा माझ्यासमान आहे, त्याला माझ्याइतकेच हक्क आहेत, हे आमच्या रक्तातच शिरलेले नाही. ह्याची उदाहरणे द्यायची गरज नाही इतक्या संख्येने ती आपल्याला दिसतात. शिकली सवरलेली माणसे असंस्कृतपणे वागतात, आणि भारतात असेच वागायला हवे असे ते मानतात. दुकानात चार कस्टमर्स पुढे असतानाही मध्ये घुसून आपणास हव्या असलेल्या गोष्टींची मोठ्या आवाजात ऑर्डर देणे, रांगेत घुसणे, कुणी आपल्यापुढे (आपल्या दृष्टीने) जरा हळू गाडी चालवत असेल तर त्याला 'तुम्हारे बाप का रास्ता है क्या' विचारणे, आजूबाजूला कुणी आहे नाही हे न बघता थुंकणे, इ. गोष्टी सामान्य आहेत. एकदा You Tube वर कुणीतरी रफी साहेबांची त्याला आवडणारी गाणी टाकली आणि त्यांची थोडीशी माहिती दिली होती. त्यात रफीच्या जन्मतारखेत एक चूक झाली; 1924 चे 1942 झाले. तर एकाने comment काय टाकावी? 'अबे, तू क्या दो पेग पिया था क्या?' आपण इतके असहिष्णू व असभ्यपणे वागतो. आपण ईशान्य भारतातील लोकांना त्यांच्या दिसण्यावरून हिणवतो. कारण उच्च नीचता भाव आपल्यात भिनलेला आहे. शहरीकरण: लहान गावात ह्या उद्धटपणाला आपसूकच मर्यादा पडतात. सगळेजण एकमेकास ओळखतात. बँकेत काउंटरवरील माणूस मला संध्याकाळी बाजारात नाहीतर सिनेमागृहात भेटतो. आम्ही नावाने एकमेकाला ओळखतो. त्यामुळे उद्धटपणाला किंवा अरेरावीला एक स्वाभाविक मर्यादा पडते. शहरात तसे होत नाही. मी कुणावरही जोरजोरात ओरडू शकतो, भांडण करू शकतो. शहरी जीवनात ताणतणावही खूप अधिक असतात ज्यांचा परिणाम क्षुल्लक गोष्टींवरून वाद आणि भांडणात होतो. ज्यांनी मुंबईतील लोकल गाडीतून बऱ्यापैकी प्रवास केला आहे त्यांना हा मुद्दा लगेच पटेल. आणि हे शहरीकरण वाढतच जाणार आहे. आणि त्याबरोबर आपला उद्धटपणाही. कारण हे शहरीकरण कसे झाले पाहिजे, माणसे इतक्या दाटीवाटीने राहत असताना कोणते नियम पाळले गेले पाहिजेत, ती सर्व घडी कशी घालायला हवी, ह्याबद्दल कोणताही विचार कुठल्याही पातळीवर झाला असण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. आता तो होणेही दुरापास्त आहे. सिस्टीम जेवढी जास्त बिघडते तेवढी ती रुळावर आणणे कठीण होऊन बसते. मी माझ्या मुंबईतील, आणि काही प्रमाणात अन्य शहरातील, अनुभवावरून हे विधान करतोय. आणि शिवाय, सुधारणेची काही गरज आहे हे मान्य करणे ही पहिली पायरी असते. तीच जर कुणालाही चढायची नसेल तर पुढे बोलणे बंद. काही उदाहरणे: 1) रस्त्यावरील वाहतूक: ह्याची एवढी दुर्दशा झाली आहे की काही बोलणे व्यर्थ ठरावे. वाहतूक सुरळीत असण्यासाठी जे जे म्हणून घटक असतात त्यातील एकही धड नाही. वाहतुकीचे नियम, ड्रायव्हर्स चे प्रशिक्षण, सिग्नल सिस्टीम, रोड मार्किंग्स...कुठलाही एलिमेंट घ्या. आपली सरधोपट पद्धत म्हणजे 'प्रॉब्लेम आहे? मग अधिक पोलीस तैनात करा' ही आहे. एक साधा प्रश्न विचारा की कोणत्याही सिग्नलला चार पाच ट्रॅफिक पोलीस कशासाठी हवेत? तेच पोलीस अन्य जास्त महत्त्वाच्या कामाला लावता येणार नाहीत? (आज परिस्थिती अशी आहे की पोलीस नसतील तर कुणीही कुठलाही सिग्नल पाळणार नाही! पण ते कारण नव्हे, परिणाम आहे.) पण हा प्रश्न आपले ट्रॅफिक पोलीस कमिशनर विचारीत नाहीत. ते आपली तीन वर्ष ड्युटी करतात आणि बदली झाली की जातात दुसरीकडे. ह्यातून वाढीला काय लागते तर उद्धटपणा, अरेरावीची वृत्ती, नियम मोडण्याची प्रवृत्ती, प्रसंगी हिंसाचार. 2) जवळपास 1965-70 पर्यंत मुंबईत बस स्टॉपवर लोक रांग लावून बसमद्धे चढायचे. आता आम्ही बस आली की तिच्यावर हल्लाच करतो. हे थांबवणे सहज शक्य होते. बेस्टने फक्त एवढेच करायचे होते की एक जाहिरात द्यायची; रांग नसेल तेथे बस थांबणार नाही. आणि नाही थांबवायची बस जर स्टॉपवर रांग नाही दिसली तर. पण हे तेव्हा नाही केले आणि आता करणे अशक्य आहे. 3) पाश्चिमात्य देशांत, निदान मी हे इंग्लंड मध्ये तरी पहिले आहे, तेही आज नव्हे तर 30 वर्षांपूर्वी, अगदी पोस्ट ऑफिस सारख्या ठिकाणीसुद्धा common queue multiple service windows ही पद्धत असते. आपल्याकडे हे अजूनही अपवादानेच दिसते. का? आपल्याला करता येणार नाही? मुंबईतील रेल्वे स्थानकावर तिकिटाच्या रांगेत उभे असताना अचानक एक खिडकी बंद झाल्यानंतर (उदा, भोजनासाठी) लोक ज्या रीतीने दुसऱ्या खिडकीवर धावतात ते ज्यांनी अनुभवले आहे त्यांना त्यातला त्रास कळेल. पण रेल्वेला त्याचे काय होय? ही बेपर्वा वृत्ती - वि डोन्ट केअर - मग सर्व लोकांत उतरते. 4) सर्वात महत्त्वाचे, शहरात आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही अशा रीतीने वर्तणूक ठेवण्याबद्दलचे नियम घालून देणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे ह्याकडे संपूर्ण दुर्लक्ष झाले. परिणामी, शहरे म्हणजे फक्त अवाढव्य वाढलेली खेडी असेच त्याचे रूप झाले. राहणे शहरात, मानसिकता मात्र खेडूतांची ह्या विरोधाचा जो काही परिणाम झाला तो आपणा सर्वांना दिसतोच आहे. शहरे कशी असावीत ह्याच्या सुस्पष्ट कल्पना जर राज्यकर्त्यांना असत्या आणि त्या त्यांनी अंमलात आणल्या असत्या तर ह्या भारतीय मानसिकतेला, जी मुळात असमानतेवर आधारलेली आहे, बऱ्याच प्रमाणात मुरड पडली असती. त्यायोगे सर्व समाज हळूहळू सुधारला असता. ती संधी आपण गमावली. सत्तर वर्षांपूर्वीच्या तुलनेत आता एकूण लोकसंख्या आणि शहरी लोकसंख्येचे प्रमाण, ही दोन्ही प्रचंड वाढली आहेत. त्याच्या जोडीला आणखी एक गोष्ट वाढली आहे ती म्हणजे, राजकीय पक्षांचा / नेत्यांचा बेजबाबदारपणा. हे सर्व फार घातक रसायन (potent combination) आहे ज्याचा केव्हाही स्फोट होऊ शकतो. नव्हे, तसे ते होतातच आहेत, फक्त लहान प्रमाणात. उदा. भारतात दर वर्षी एक दीड लाख लोक रस्ते अपघातात मरतात. लोकसंख्येचा विचार केला तरी हे प्रमाण फार जास्त आहे. इतर देशात ह्याच्यावर अतिशय गंभीरपणे विचार झाला असता. आपल्याकडे '80% अपघात हे मानवी चुकांमुळे होतात' असे निष्कर्ष काढले की काम भागते. मुद्दा असा आहे की कमीतकमी संघर्षाशिवाय माणसे आपापले व्यवहार करतील अशा सिस्टिम्स आखून दिल्या नाहीत व त्यांची कठोरपणे अंमलबजावणी केली नाही तर हम करेसो कायदा ही वृत्ती, अरेरावी, उद्धटपणा, मग्रुरी, ह्या गोष्टी वाढतच जाणार. नाहीतर, आपली असमानतेवर आधारलेली भारतीय मनोवृत्ती आणि त्यात अस्ताव्यस्त शहरीकरणाची फोडणी, म्हणजे 'आधीच मर्कट तशातही मद्य प्याला' अशी गट व्हायची. नव्हे, झालीच आहे. कालचा दही हंडीचा शिमगा दुसरे काय दर्शवितो? असो. हे माझे विचार झाले. तुम्हाला काय वाटते हे जाणून घ्यायला आवडेल.

प्रतिक्रिया द्या
21382 वाचन

💬 प्रतिसाद (121)
म
मुक्त विहारि Mon, 08/29/2016 - 13:38 नवीन
http://misalpav.com/node/36614
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
ब
बहुगुणी Mon, 08/29/2016 - 13:53 नवीन
समाजात उद्धटपणाची जागा सद्भावनेने घेतली की काय होतं हे या मुंबईतील घटनेसंदर्भात वाचण्यासारखं आहे. त्यातला मुस्लीम प्रवासी हिंदू रिक्शावाल्याबद्दल गौरवोद्गार काढतांना म्हणतो: The reason for hatred is not that only negativity prevails... but that easily only negativity sells... So unless "We" the people buy it positivity is not gonna sell.
  • Log in or register to post comments
फ
फेरफटका Mon, 08/29/2016 - 17:52 नवीन
१००० वर्षाच्या गुलामगिरी चा परिणाम असावा बहुदा, पण कुठल्याही नात्यात, संवादात, interaction मधे आपण आधी एक Hierarchy तयार करतो. त्यामुळे बरोबरीच्या नात्याने संवाद होऊच शकत नाही. एक जण 'सांगतो' आणी दुसरा 'ऐकतो' हेच संवादाचं स्वरूप असतं. त्यातून उद्धटपणा चा उगम होतो. वेगळं मत मांडणार्याला 'गप्प' करणे हे वादाचं / चर्चेचं मूळ उद्देश्य असतं.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 08/29/2016 - 17:58 नवीन
पण अशा गुलामगिरित तर अनेक देश शेकडो वर्ष होते, ते काही असे झालेले बघितलेत काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेरफटका
फ
फेरफटका Mon, 08/29/2016 - 18:42 नवीन
चांगला मुद्दा आहे. बाकीच्या देशांविषयी माहीती नाही आणी आपल्या देशाविषयी सुद्धा हे अभ्यासपूर्ण मत वगैरे नाहीये. माझ्या परीनं व्यक्त केलेला एक अंदाज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ब
बाजीप्रभू Mon, 08/29/2016 - 18:48 नवीन
धाग्याची शंभरी आजच व्हावी म्हणून दोन वाईड बॉल देतो. हा 99 वा
  • Log in or register to post comments
ब
बाजीप्रभू Mon, 08/29/2016 - 18:48 नवीन
आणि हा 100 वा. अभिनंदन
  • Log in or register to post comments
र
रविकिरण फडके Tue, 08/30/2016 - 13:29 नवीन
ह्या ब्लॉगला चांगला प्रतिसाद मिळाला ह्याचा आनंद वाटला. आनंद दोन कारणांनी; बऱ्याच जणांना ह्या विषयाबद्दल अगत्य आहे ह्याचा, आणि प्राप्त परिस्थितीत सकारात्मक बदल होईल अशी आशा वाटणाऱयांची संख्या नगण्य नाही, म्हणूनही. ह्यातील relevant अशा प्रतिसादांचे ढोबळ विश्लेषण केल्यानंतर लक्षात आले की एकंदरीत जनमताचे प्रतिबिंबच ह्यात पडलेले आहे. आजूबाजूला माणसे बोलताना आपण ऐकतो, त्यांची मते वाचकांच्या पत्रव्यवहारातून वाचतो, तर कधी टीव्हीवर ती व्यक्त होताना दिसतात, ती अशाच स्वरूपाची असतात. [प्रतिसादांची संख्या एकूण मिपाकरांच्या तुलनेत कमी, आणि लोकसंख्येच्या मानाने तर नगण्यच, शिवाय उपस्थित केलेला प्रश्नच loaded होता. त्यामुळे हा काही संख्याशास्त्राच्या दृष्टीने स्वीकारार्ह (statistically valid) सर्व्हे नव्हे, हा disclaimer आधीच देऊन ठेवतो!] टक्केवारीत बोलायचे झाल्यास, 'काही प्रॉब्लेम नाहीच आहे' असे दोन अडीच टक्के लोकांना वाटते. (म्हणजे सुधारणेचा प्रश्नच निकालात निघाला.) दहा ते पंधरा टक्के लोक आशावादी आहेत, त्यांना सुधारणा शक्य आहे आणि होईल असे वाटते. जवळपास ३५-४० टक्के लोक असे मानतात की स्वयंशिस्त हाच एक इलाज आहे, नुसते इतरांकडून अपेक्षा ठेवून काही होणार नाही. वीस ते पंचवीस टक्के लोक अशा मताचे आहेत की अतिशय वेगाने झालेले बदल हे समस्येचे मूळ कारण होत. तर दहा टक्के लोकांना वाटते की सिस्टिम काय आहे ह्याबद्दलचे अज्ञान किंवा चुकीची अंमलबजावणी ही समस्या आहे. १५-२० टक्के लोकांच्या मते हा आपल्या संस्कृतीचाच भाग आहे (आणि म्हणून त्यात बदल होणार नाही). एक महत्वाचा मुद्दा पुढे आला आहे तो म्हणजे, समाजाच्या काही घटकांकडे असलेले उपद्रवमूल्य, सौजन्य ह्या मूल्याच्या पूर्ण विरोधी काम करते. ही सर्वच मते ग्राह्य आहेत. पण पुढे काय? मी लेखात म्हटले होते, 'शहरीकरण कसे झाले पाहिजे, माणसे इतक्या दाटीवाटीने राहत असताना कोणते नियम पाळले गेले पाहिजेत, ती घडी कशी घालायला हवी, ह्याबद्दल कोणताही विचार झाला नाही'. ​हा विचार म्हणजे मला नेमके काय अभिप्रेत होते? ह्याचा खुलासा मी तेथे केला नव्हता कारण मग लेख फारच वाढला असता. तुमच्या परवानगीने मी तो ​खुलासा वेगळ्या लेखात करू इच्छितो. त्याचा केंद्रबिंदू असेल व्यवस्था विचार (System थिंकिंग). सर्व प्रतिसादांबद्दल आभार.
  • Log in or register to post comments
अ
अंतरा आनंद Tue, 08/30/2016 - 15:24 नवीन
​हा विचार म्हणजे मला नेमके काय अभिप्रेत होते? ह्याचा खुलासा मी तेथे केला नव्हता कारण मग लेख फारच वाढला असता. तुमच्या परवानगीने मी तो ​खुलासा वेगळ्या लेखात करू इच्छितो. त्याचा केंद्रबिंदू असेल व्यवस्था विचार
जरूर लिहा आणि लवकरात लवकर. लेखातली कळकळ पोचली. प्रतिक्रिया आवडल्या. आपण भारतीय उद्धट आहोत हे किमान मिपावर तरी सर्वांना मान्य झालं हे ही नसे थोडके.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रविकिरण फडके
प
प्रभाकर पेठकर Tue, 08/30/2016 - 17:38 नवीन
मराठी भाषा आणि भाषक रांगडे आहेत, उद्धट नाहीत. हा मूळ स्वभाव झाला. आधुनिकतेच्या काळांत कांही प्रमाणात उद्धटपणा डोकाऊ लागला असेलही. पण मुळात रांगडे असल्याकारणाने अनेकांना तो उद्धटपणा वाटतो. आता आपण जगात सर्वत्र वास करू लागल्यानंतर (केल्याने देशाटन.......) आपल्याला आपल्यातीलच उणीवा प्रकर्षाने जाणवू लागल्या आहेत. हे अर्थातच प्रगतीचे पहिले पाऊल आहे. समाजसुधारणेला आपण आपल्या पुढच्या पिढीपासून सुरुवात करावी आणि त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीला. निदान सुशिक्षित समाज तरी बदलत जाईल. सामाजिक जबाबदारीचे भान त्या समाजाला येईल. सरकारनेही वाढत्या गरजांनुसार सोयी सुविधा पुरविणे आवश्यक आहे म्हणजे ह्या बदलू इच्छिणार्‍या समाजाला वैफल्य येणार नाही. मी माझ्या पुढच्या पिढीला सुधारण्यास १९९० पासूनच सुरुवात केली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद
स
सुबोध खरे Tue, 08/30/2016 - 19:44 नवीन
+100
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
ब
बहुगुणी Tue, 08/30/2016 - 13:57 नवीन
आपल्याच डोळ्यातलं मुसळ शोधू पहाणारा आणि एका महत्वाच्या समस्येला धीटपणे भीडणारा (आणि शतकी :-) ) धागा काढल्याबद्दल अभिनंदन! 'व्य्वस्था विचार' काय असावा ते विशद करणारा दुसरा धागा जरूर काढा.
  • Log in or register to post comments
र
राही Tue, 08/30/2016 - 14:34 नवीन
जरूर लिहा. वाट पाहात आहोत, (आणि प्रतिसादासाठी लेखणी कळफलक सरसावून बसलो आहोत.)
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 08/30/2016 - 15:13 नवीन
तू रे कोण विचारणारं टिक्कोजीराव ?? =))
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 08/30/2016 - 16:17 नवीन
ए भाईगिरी करतो का? भायर भेट, तुला म्हायती का मी कोण आहे ते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ख
खटपट्या Tue, 08/30/2016 - 17:29 नवीन
काय झाले डांगेण्णा? थंड घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 08/30/2016 - 19:50 नवीन
श्या!! फाउल केलात तुम्ही खटपट्या भौ.. पुढचं वाक्य टाकायचं ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या Wed, 08/31/2016 - 00:36 नवीन
अहो वर्गातला हुशार, पहील्या बाकावर बसणारा मुलगा असा दंगा करू लागला तर आमच्या सारख्या मवाली लोकांना इन्फीरीयारीटी कॉम्प्लेक्स येतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अभ्या.. Wed, 08/31/2016 - 19:00 नवीन
खरच चुकला डॉयलॉग तुमचा विरुपाजी. "चल ए येडी हळद, चल निघ. ते उर्मट बिर्मट घरात शिकवायचे जाऊन. निघ आता" हा डॉयलॉग येत नाही काय तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या Wed, 08/31/2016 - 22:08 नवीन
नाय वो. लग्न झाल्यापास्नं उर्मटपना बंद झाला बगा. समोरची पार्टी डांबीस नीगाली. अभ्याभौ लग्न करु नका कदीच :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
र
रेवती Wed, 08/31/2016 - 22:35 नवीन
ही ही ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा