Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हिमालय, रॉली आणि मी. भाग २ : लेह - त्सो मोरीरी

क
किल्लेदार
Wed, 08/31/2016 - 06:20
💬 62
हिमालय, रॉली आणि मी. भाग १ : लेह - तुर्तुक माझा एक आवडता चित्रकार आहे, व्हिन्सेंट वॅन गॉग. सढळ हाताने आणि अतिशय कल्पकतेने केलेला रंगांचा वापर ही याची खासियत. कॅफे टेरेस ऍट नाईट हे त्याचे तैलचित्र बघितले आणि त्यावर फिदाच झालो. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर केलेला पिवळ्या रंगाचा वापर अफलातून आहे. याची चित्रे अतिशय ओबड-धोबड असली तरी एकंदर मांडणी आणि रंगसंगतीमुळे काळजाचा ठाव घेतात. फ्रांस मधल्या या चित्रकाराची चित्रं प्रत्यक्ष बघण्याचा योग आजतागायत कधी आला नाही पण माझी ती हौस हिमालयाने नेहमीच पूर्ण केली. आकाशाच्या प्रचंड कॅनव्हॉस वर काढलेली, अफलातून रंगसंगती असलेली त्याची ही चित्रे कुठे कुमाऊंमधल्या पंचचुली शिखरांप्रमाणे आखीव-रेखीव आहेत तर कुठे त्याच्याच शेजारी असलेल्या गढवाल मधल्या केदारनाथ किंवा चौखंबा सारखी ओबड-धोबड. हिमालयाची ही चित्रे सर्वत्र बघायला मिळतात. त्याचे हे कलादालन आपल्याकडे काश्मीर ते अरुणाचल प्रदेश एवढे लांबच लांब पसरलेले आहे. इतक्या प्रचंड कॅनव्हॉस मधल्या शक्य तेवढ्या फ्रेम्स डोळ्यांनी आणि आठवण म्हणून कॅमेराने टिपायचा मी आजवर प्रयत्न केला. त्यानेही उदार मनाने मला त्या घेऊ दिल्या. माझ्यावर कधी कॉपीराईट चा खटला त्याने भरलेला नाही. एवढी अफाट चित्रे काढायची म्हणजे कॅनव्हॉसही अवाढव्य हवा आणि कलर पॅलेटसुद्धा तेवढेच समृद्ध. मला वाटतं की लडाख हे आपल्या हिमालयाचे कलर पॅलेट आहे. याचा अनुभव आपल्याला लडाख मध्ये पदोपदी येतो. वातावरण स्वछ असेल तर दिल्ली-लेह विमानप्रवासात याची एक छोटीशी झलक आपल्याला बघायला मिळते. पण त्याची खरी मजा घेता येते रस्त्यानं मनसोक्त भटकताना. एखाद्या चित्रकाराच्या पॅलेटमधे दिसावेत असेच इतस्ततः विखुरलेले रंग आणि छटा ठिकठिकाणी दिसतात. पण हे पॅलेट बघायचे असेल तर मात्र फक्त चित्रे बघण्याचा अट्टाहास सोडून द्यावा. लेह ते त्सो मोरीरी हा माझा यावेळचा मार्ग मी फक्त त्सो मोरीरी बघावा म्हणून ठरवला नव्हता तर या मार्गावर असलेल्या अद् भुत रंगसंगतीने सुद्धा मला भुरळ घातली होती.

https://c7.staticflickr.com/9/8244/28797036510_c142798730_z.jpg

https://c4.staticflickr.com/9/8510/29006684491_b5479dfdb4_z.jpg

लेह ते त्सो-मोरीरी हा पल्ला बराच मोठा आहे. जवळपास सव्वादोनशे किमी. एका दिवसात जाऊन परत लेह ला येणं तर अशक्यच. त्यामुळे अगदी ब्राह्म-मुहूर्तावर मी आणि रॉलीने लेह सोडले. दोघांनीही निघताना पोट भरून खाऊन घेतले कारण या मार्गावर काहिही मिळण्याची शक्यता कमीच. रॉलीचाही थोडा जादा खुराक बरोबर घेतला. सर्वप्रथम शे-पॅलेसला सुप्रभात केले पण तो गप्प राहिला. त्याचे बहुदा सकाळचे स्तोत्र चालू असावे.

https://c7.staticflickr.com/9/8271/29225251182_e7b08b5c33_z.jpg

थोडे पुढे गेल्यावर लगेचच डावीकडे ठिकसे मोनास्टरी आणि उजवीकडे थोड्या आडवाटेवरच्या स्टाकना आणि माथो मोनास्टरीज आत्ताच जाग्या झाल्याश्या वाटत होत्या. त्यांनाही फारसा त्रास न देता मी पुढे निघालो. इथेच कुठेतरी स्टाकमो नावाचे छोटे, बघण्यासारखे गाव आहे पण आज काही वेळ नव्हता. असो ते परत कधीतरी.

https://c7.staticflickr.com/9/8707/29299638006_c7b1d7e0fa_z.jpg

https://c4.staticflickr.com/9/8332/29254219611_e20373c87e_z.jpg

https://c5.staticflickr.com/9/8242/29299441076_c5cf8eaeaf_z.jpg

उजवीकडे हिरवट निळी सिंधू नदी संथ वाहत होती आणि बराच वेळ आता ती मला सोबत करणार होती.

https://c6.staticflickr.com/8/7696/29006657141_ffcc19729b_z.jpg

https://c4.staticflickr.com/9/8318/29006653211_d3c875cc4b_z.jpg

कारू ला पोहोचलो तेव्हा हिमालयाच्या कलर पॅलेट मधले थोडे थेंब दिसू लागले. आता अगदी थेट त्सो मोरीरी पर्यंत माझा मार्ग त्याच्या या पॅलेट मधूनच होता. कारू ते उपशी गावापर्यंत बुलेट्स चा एक ताफा माझी सोबत करत होता. त्यानंतर तो ताफा धडधडत मनालीकडे वळला आणि मी आणि रॉली त्सो-मोरीरी कडे. मला हायसे वाटले.

https://c3.staticflickr.com/9/8824/28797057850_3bd7db65a4_z.jpg

https://c8.staticflickr.com/9/8465/29006677351_5a182eb9e9_z.jpg

साधारणतः हे अंतर सरळ सरळ कापायला सहा-सात तास पुरेसे व्हावेत पण मला मात्र दहा तासांपेक्षाही जास्त लागले आणि ते सुद्धा मी अंधार पडण्याच्या भीतीमुळे स्वतःला सतत पुढे पुढे ढकलत होतो म्हणून. अन्यथा एवढा कमी वेळ या भागाला देणे म्हणजे भरल्या ताटावरून घाईघाईने दोन घास खाऊन उठण्यासारखे आहे. रंगीत डोंगरांमधून नागमोडी वाहणारी सिंधू नदी आणि तिच्याशी स्पर्धा करू पाहणारे बी.आर.ओ.ने बांधलेले तसेच नागमोडी रस्ते, छोटे अरुंद पूल, रस्त्याच्या प्रत्येक वळणावर बदलणारे रंग आणि छटा, अचानक कुठूनसे वाटेवर येणारे बर्फाळ पाण्याचे प्रवाह आणि मधूनच माणसाचं अस्तित्व दाखवणारी लहान लहान खेडी. त्यांतली काही तर वस्ती उठून गेली आहे अशी शंका येण्याइतपत शांत. कुठेच कसली लगबग नाही की गडबड नाही. हे सर्व डोळ्यात साठवायचे म्हणजे भरपूर वेळ हवा. इथे घाई उपयोगाची नाही.

https://c6.staticflickr.com/9/8143/29083085005_7e5a48f878_z.jpg

https://c6.staticflickr.com/9/8223/29083059365_aa5fbcba05_z.jpg

https://c6.staticflickr.com/9/8440/29006598741_5e4822b5df_z.jpg

https://c1.staticflickr.com/9/8687/28797012440_254e56af08_z.jpg

https://c5.staticflickr.com/9/8436/29046128700_6b76ece26d_z.jpg

https://c1.staticflickr.com/9/8376/28710053904_16ebed0243_z.jpg

https://c5.staticflickr.com/9/8333/28797019180_fb9ff66f86_z.jpg

https://c3.staticflickr.com/9/8060/28978086482_3fec45d9b2_z.jpg

https://c6.staticflickr.com/9/8744/28465286293_9306276b63_z.jpg

https://c1.staticflickr.com/9/8217/29050476656_79197063b0_z.jpg

https://c5.staticflickr.com/9/8220/28797029380_53f16706c4_z.jpg

https://c7.staticflickr.com/9/8012/29046013230_1acfd89c5d_z.jpg

चुमाथांगहुन थोडे पुढे गेले की एक उजवीकडे एक छोटासा पूल आहे. इथूनच त्सो मोरीरी साठी वळलो आणि आधीच शांत असलेला रस्ता आणखिनच एकाकी झाला. सूर्य पश्चिमेकडे कलला होता आणि त्यात भर म्हणून डोक्यावर काळ्या ढंगांनीही गर्दी केली. मधेच सुमडो नावाचे एक लहानसे गाव दिसले पण कोणाही मनुष्यप्राण्याची चाहूल काही लागली नाही. एका वळणावर बर्फाळ ओढ्यात आरामात बसलेले याक आणि चरणारे काही जंगली घोडे मात्र मला थोडा दिलासा देऊन गेले. बर्फाचा हलकासा थर टाळूवर जमलेल्या आणि एखाद्या पिरॅमिडसारख्या दिसणाऱ्या टेकड्या, नुकतीच हिरवट लव आलेल्या मैदानातून गेलेला, जांभळी खडी असलेला रस्ता यातून मी आणि रॉली शक्य तिथे थांबत पण शक्य तितक्या जलद पुढे जात होतो. मधूनच पावसाचा आणि बर्फाचा हलका शिडकावा होत होता. काळजाला हात घालणारा निसर्ग त्याचवेळी काळजाचे ठोकेही चुकवू शकतो याचा प्रत्यय मला गेल्या वीस पंचवीस किमी मध्ये येत होता.

https://c7.staticflickr.com/9/8514/29304451886_d00747a43f_z.jpg

https://c1.staticflickr.com/9/8452/28796962240_53ba71537b_z.jpg

https://c1.staticflickr.com/9/8772/28462067864_606117cebd_z.jpg

एका छोट्या खिंडीतून रस्ता वळला आणि समोरचे दृश्य एकदम पालटले. लहान लहान डोंगरांनी वेढलेल्या एका विस्तीर्ण मैदानात गर्द टरकॉईज रंगाचा क्यागर त्सो आरामात पहुडला होता. पश्मिना मेंढ्यांचा एक लहानसा कळप खुरट्या कुरणांवर मनसोक्त चरत होता. इथेच तंबू गाडावा आणि निळ्या आकाशाखाली पडून रहावे अशी जबरदस्त उर्मी उफाळून आली खरी पण पाऊस आणि बर्फाच्या हलक्याश्या सपकाऱ्याने लगेच ती जिरली. क्यागर त्सो च्या कडेकडेने जाणारा काळा कुळकुळीत रस्ता आता ओला झाल्यामुळे निळ्या रंगात उजळून निघाला होता.

https://c6.staticflickr.com/9/8404/28712092653_cebe4529d0_z.jpg

https://c3.staticflickr.com/9/8185/28796944570_60e73d92d6_z.jpg

https://c8.staticflickr.com/9/8307/29083020015_41400ba242_z.jpg

https://c5.staticflickr.com/9/8068/28712097444_1a3b8f4b81_z.jpg

मनातली मरगळ कितीही कमी झाली तरी बाकी गात्रे काही बोलायची थांबत नाहीत. अंधार पडायच्या आत त्सो मोरीरी गाठून छप्पर शोधणे आता अत्यावश्यक होते. वर बघून देवाला विनंती केली की बाबा रे आता यापुढे ईष्ट स्थळी पोहोचेस्तोवर एकही चांगले दृश्य दाखवू नकोस नाहीतर माझे काही खरे नाही. डोळ्यांच्या बाजूला झापडं लावल्यासारखा मी भरधाव निघालो आणि यामुळे व्हायचे तेच झाले. मी रस्ता चुकलो. पण जर का चुकलो नसतो तर जे मला बघायला मिळाले त्याला मात्र मी मुकलो असतो. करझोक गावाच्या (रात्रीचे मुक्कामाचे ठिकाण) मी एकदम विरुद्ध किनाऱ्यावर होतो पण त्सो मोरीरीच्या या बाजूने जे काही समोर दिसत होते ते लाजवाब होते.

https://c5.staticflickr.com/9/8178/28978048652_47468e94d1_z.jpg

https://c2.staticflickr.com/9/8474/28465361433_60d37a8c1b_z.jpg

शेवटी हव्या त्या रस्त्याला लागलोच. रस्ता कसला ? वाळू, दगड आणि खडीने भरलेली रुंद पायवाटच. वाट लागणे म्हणजे काय हे आता बरोब्बर उमजत होते. बाहेर तर अंधारले होतेच पण आता आतूनही अंधारून यायला लागले.थोड्याही निष्काळजीपणाला इथे माफी नव्हती. एकदाचे छप्पर मिळाले, दोन चांगले घास गिळायला मिळाले. गडद निळा त्सो मोरीरी अंधारात हळूहळू आणखिनच गडद होत गेला.बाजूचे करझोक गाव शांत झोपले होते. पोटात गेलेले दोन घास आणि दिवसभराच्या रपेटीमुळे आता जेवढा गारवा होता त्यापेक्षा जास्त जाणवायला लागला. मी माझ्या तंबूत गेलो आणि उबदार स्लिपींग बॅगमध्ये शिरुन दिवसभरातल्या चांगल्यावाईट अनुभवांच्या आठवणींत "रम"माण झालो. रात्रीची पाच सहा तास गाढ झोप आणि सकाळी उठल्यावर समोरच नजरेस पडणारी त्सो मोरीरीची निळाई मनाची आणि शरीराची ताकद भरून काढायला पुरेश्या होत्या. नितळपणाची व्याख्या .... त्सो मोरीरी....

https://c3.staticflickr.com/9/8497/28796946490_1f08252df8_z.jpg

करझोक गाव....

https://c2.staticflickr.com/9/8373/28732053753_b3b0667b4d_z.jpg

कियांग

https://c3.staticflickr.com/9/8040/28978046282_de6be68d19_z.jpg

दगडांच्या छोट्या राशी. कृतज्ञता, इच्छा व्यक्त करण्याची तिबेटी पद्धत.

https://c1.staticflickr.com/9/8378/28796948920_4e219bf418_z.jpg

रॉली

https://c3.staticflickr.com/9/8006/28796954890_c43eb1dd08_z.jpg

https://c4.staticflickr.com/9/8312/29336909195_597dee36ea_z.jpg

Book traversal links for हिमालय, रॉली आणि मी. भाग २ : लेह - त्सो मोरीरी

  • ‹ हिमालय, रॉली आणि मी ....
  • Up

प्रतिक्रिया द्या
25961 वाचन

💬 प्रतिसाद (62)
स
सुहास बांदल गुरुवार, 09/01/2016 - 15:33 नवीन
काय झकास फोटो आहेत. एक नंबर !!!
  • Log in or register to post comments
श
शरभ Fri, 09/02/2016 - 14:06 नवीन
अशक्य सुंदर फोटो. - शरभ
  • Log in or register to post comments
र
रातराणी Fri, 09/02/2016 - 20:06 नवीन
लेख अजून वाचला नाही. फोटो बघून डोळ्यांचे पारणे फिटले!
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 09/03/2016 - 06:48 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
श
शलभ Sun, 09/04/2016 - 16:57 नवीन
खूपच सुंदर फोटो.. अप्रतिम.. आम्ही डोळ्यांनी बघून येऊ. पण असं वर्णन लिहायला आणि फोटो काढायला कसं जमणार..
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Mon, 09/05/2016 - 15:43 नवीन
किल्लेदार, मानाचा मुजरा घ्या. गेली 4 वर्ष 'ऐनवेळी टांगमारू' मित्रांमुळे इकडे जायचे कॅन्सल होतेय. पण आता थांबणे मान्य नाही.
  • Log in or register to post comments
क
किल्लेदार Tue, 09/06/2016 - 14:52 नवीन
हिमालयासारखा मित्र आणि रॉली सारखी मैत्रीण.... अजून कोण हवे तुम्हाला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
स
स्वीट टॉकर Tue, 09/06/2016 - 09:37 नवीन
फोटो आणि वर्णन, दोन्हीही अफलातून! पुढच्या लेखांची वाट पहात आहे.
  • Log in or register to post comments
क
किल्लेदार Tue, 09/06/2016 - 14:54 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वीट टॉकर
र
राघव Fri, 11/10/2017 - 10:30 नवीन
केवळ एक भाग परत वाचून भागत नाही हेच खरे. आजपर्यंत अनेकवेळा हे दोन्ही धागे बघून पारायणे झालीत.. तरिही वाटेल तेव्हा मधूनच एक राईड करून यावी तसे इथे येऊन जातो. भारीच. _/\_
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Sat, 11/11/2017 - 06:33 नवीन
fantabulous
  • Log in or register to post comments
क
किल्लेदार Sun, 11/19/2017 - 20:30 नवीन
☺️
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोंधळी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा