Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

'शेतकरी व कॅशलेस व्यवहार'

स
संदीप डांगे
गुरुवार, 12/08/2016 - 23:54
🗣 148 प्रतिसाद
आप्पासाहेब जोगळेकर यांच्या कार्ड पेमेंटचे २ % , दुकानदार आणि आपण ह्या धाग्यावर म्हात्रेसर व मार्मिक गोडसे यांच्यातल्या 'शेतकरी व कॅशलेस व्यवहार' चर्चेनुसार दिलेला हा प्रतिसाद. अर्धवटराव व सही रे सई यांनी सुचवल्यानुसार वेगळा धागा काढत आहे. थोडं लिखाण अजून जोडलं आहे. काही उडवलं आहे. मूळ प्रतिसादः http://www.misalpav.com/comment/907299#comment-907299 ------------------------------------------------------------------ मे २०१६ ते ऑक्टोबर २०१६ ह्या सहा महिन्यातला सर्व काळ (२४ बाय ७) मी अनेक शेतकर्‍यांसोबत काम केले. तेही एका गावातल्या नव्हे तर नाशिक, नगर, पुणे ह्या तीन्ही जिल्ह्यातल्या सुमारे १६ तालुक्यांतल्या अनेक गावांमधल्या. यात अनेक कोट्याधिश ते कफल्लक असे सर्व प्रकारचे शेतकरी बघितले. शेतकर्‍यांपासून मागे जाणारी व पुढे जाणारी सर्व सप्लाय चेन बघितली. बीयाणे, औषधे, अवजारे, मोटारगाड्या, पंप, वीजपुरवठा, मोबाईल-रेंज, बॅन्कांची उपलब्धता, होणारे व्यवहार हे सर्व ८ नोव्हेंबरचा तमाशा सुरु व्हायच्या आधीच बघितले होते. आपल्या नागरी व्यवस्थेमधे अनेक स्तर आहेत. प्रत्येक स्तर हा दुसर्‍यापेक्षा भयंकर वेगळा, मध्यम वेगळा, किंचित वेगळा ह्या प्रकारात दिसतो. ह्यातल्या कोणत्याही स्तरातल्या व्यक्तिला दुसर्‍याच्या स्थितीकडे 'दुरुन डोंगर साजरे' ह्या उक्तीनुसार बघावे लागते. मजा आणि त्रास हे प्रत्येक स्तरातल्या त्या त्या स्थितीप्रमाणे त्या त्या व्यक्तिला मिळतातच. त्याची तुलना होऊ शकत नसते. त्यामुळे दुसर्‍याची स्थिती प्रत्यक्ष भोगल्याशिवाय, बघितल्याशिवाय समजत नाही हे मागच्या सहा महिन्यात कळलेलं आहे. दोन जिल्ह्यातली, दोन शहरातली, दोन गावातली, दोन वस्तीतली, इतकंच काय तर अगदी आजूबाजूला शेत असलेल्या दोन शेतकर्‍यांचीही परिस्थिती जमीन-आसमान असते. जजमेंटल होण्यात अर्थ नाही. म्हात्रे सर व मार्मिक गोडसे, दोघांच्याही मुद्द्यात अर्धसत्य आहे. ते पूर्ण चुकीचे किंवा पूर्ण बरोबर नाही. आता कोण कोणत्या अ‍ॅन्गलने बघतो इतकंच तिथे बाकी राहतंय. तसेच कोण्या एकाचा अ‍ॅन्गल हा पूर्ण सकारात्मक किंवा पूर्ण नकारात्मक आहे असेही म्हणू शकत नाही. ग्रामीण अर्थव्यवस्था (म्हणजे व्यवहाराची पद्धत) शहरी भागापेक्षा कैक बाबतीत वेगळी पडते. तिथे अनेक समस्या आहेत. (त्या समस्या आहेत म्हटले की ७० वर्षांची घाण इत्यादी मुद्दे पुढे केले जातात, पण नवीन धक्काव्यवस्था आणतांना सत्य लक्षातच घ्यायचे नाही का?, हा प्रश्न मला सतत पडत आहे.) पण अनेक सुविधाही आहेत हे सत्यही नाकारले जाऊ शकत नाही. (म्हणजे सत्तर वर्ष झाले तरी सर्वत्र बैलगाड्याच चालू आहेत असे दिसत नाही). पण ढोबळमानाने कोणतंही एक चित्र हे ग्रामीण व्यवस्थेचं मूर्तिमंत उदाहरण आहे असे म्हटले जाऊ शकत नाही. उदा. नाशिक शहरापासून अवघ्या पंधरा किमीवर असलेल्या, वीस वर्षांपासून टोमॅटोचीच शेती करत असलेल्या एका साठ वर्षीय शेतकर्‍याला करप्या रोगामुळे आपला दोन एकर टोमॅटो अर्धा जळेपर्यंत काय अ‍ॅक्शन घ्यावी हे कळु नये हे माझ्या आकलनाबाहेर जाते. त्याच नाशिकपासून दुसर्‍या बाजूला असलेल्या वीस किमी वर एखादा बावळट दिसणारा अर्धशिक्षित शेतकरी कोणतं किटकनाशक नेमकं कसं काम करतं ह्याच्या केमिकल अ‍ॅनॅलिसिसवर अचूक शास्त्रीय चर्चा करुन पीएचडी झालेल्या शेतीतज्ञाला घाम फोडू शकतो हेही बघितलंय. त्यामुळे प्रगत-आधुनिक शेतकरी व आत्महत्या करणारे शेतकरी हे एकाच गावात असू शकतात. एकमेकांचे मित्रही असू शकतात. समस्या व सुविधा हातात हात गुंफून अशा काही फेर धरुन नाचतात की स्तब्ध व्हायला होतं. बी बीयाणे औषधे घ्यायला शेतकरी जवळच्या दुकानात जातात. हे जवळचे दुकान १ किमी पासून २०-२५ किमी इतके असू शकते. (ह्यापेक्षाही जास्त दूर असू शकते, पण ती थोडीशी दुर्मिळ बाब आहे, असत्य नव्हे). सामान आणायला सायकल, बाइक, बस, बैलगाडी, टेम्पो, पिकअप पासून फॉर्चुनर घेऊन जाणारे शेतकरी आहेत. मोठ्या गावात, तालुक्यात, जिल्ह्याच्या ठिकाणी अत्याधुनिक व्यवस्था असलेली दुकाने आहेत तशीच अगदी टपरीवजा चालणारी दुकानेही छोट्या-मोठ्या गावांमधे, रस्तोरस्ती आहेत. आधुनिक दुकानात संगणकिकृत बील मिळते, हे संगणक थेट इन्टरनेटशी जोडलेले असतात, दुकानदार थेट नेटबॅन्किंगही करतात, किंवा बॅन्केत जाऊन आरटीजीएस सुविधांचा वापर करुन कंपन्यांना पेमेंट करतात. काही दुकानदार कच्च्या चिठ्ठ्या लिहून पावती देतात, पण असे प्रमाण खूपच कमी आहे कारण नुकसान भरपाई क्लेम करण्यासाठी पक्की बिलं लागतात. पण दुकान कसेही असो, शेतकर्‍यांकडून बीलाचे पैसे घेतांना ९९% केसेस मधे 'रोखच' घेतली जाते हे. अगदी मोठी बीले जी वार्षिक चुकवली जातात - जसे की डाळींब, द्राक्ष, यांचे उत्पादक-शेतकरी - ती चेकने चुकवली जात असावीत असा अंदाज आहे. देणेकर्‍यांने उधार बुडवू नये म्हणून आजकाल दुकानदार संघटना उधारखाते सुरु करण्याआधी अनामत किंवा ब्लॅन्क चेक ठेवून घेते. (ह्यात दुकानदार काळा-पांढरा पैसा कसा निर्माण करतात हा स्वतंत्र विषय आहे. येणारी-जाणारी सर्व बिले अधिकृत असूनही दुकानदार करचुकवेगीरी करु शकत असतील असे मला वाटते, प्रत्यक्ष कसे होते ते बघितले नाही त्यामुळे सांगु शकत नाही.) नक्की प्रमाण सांगता येणार नाही पण उधार व रोख हे दोन्ही प्रकार दुकानात मजबूत चालतात. बियाणे व खते ह्यासाठी आगावू रोख मोजावी लागते तर वेळोवेळी लागणारी औषधे, दुय्यम खते ह्यासाठी साधारणपणे उधारी दिली जाते. हंगाम सुरु होण्याआधी बियाणे व खते ह्यांच्यासाठी दुकानदाराने कंपन्यांना आगावू रक्कम भरून बुकींग केलं तरच माल दुकानात पोचतो. साधारण सर्वांना मार्चाखेर उधारखाती चुकवावी लागतात. शेतकरी पिक विकले जाईल तसे उधारी चुकवत जातो. जिथे पिके अल्प काळाची व नगदी, चटकन पैसा देणारी (भाजीपाला, फळे इत्यादी) जास्त प्रमाणात होतात तिथे रोख वर जास्त भर आहे, तर जिथे जास्त काळ चालणारी व घुमून फिरुन पैसा देणारी पिके (ऊस, कापूस इत्यादी) आहेत तिथे उधारी जास्त होते. तर ह्या व्यवस्थेत मुद्दा आहे की शेतकर्‍याला मोबाईल-कार्ड-चेक वापरुन व्यवहार शक्य आहेत का? ह्याचे उत्तर 'नरो वा कुंजरोवा' असेच देता येईल. कॅशलेस व्यवहार शक्य आहेतही आणि नाही सुद्धा. सर्वात महत्त्वाची ती सुविधा व क्षमता. काही गोष्टी समर्थक व विरोधक दोन्ही पक्षांनी डोळे उघडे ठेवून पूर्वग्रह बाजूला ठेवून समजून घेतल्याच पाहिजेत. ही आताची चालू परिस्थिती आहे, भविष्यात काय होईल याबद्दल अटकळी बांधणे तूर्तास दोन्ही पक्षांनी सोडले पाहिजे. बॅन्कांचे जाळे पुरेसे नाही, रेंज नाही, साक्षरता नाही, वीज नाही, ह्या गोष्टी आहेतही आणि नाहीपण. मिश्रसत्य. मुख्य गावापासून सुमारे २५-५० किमी दूर असलेल्या गावांमधे लाखोची उलाढाल होत नाही हे सत्य नव्हे. फक्त ती रोज रोज होत नाही हेही सत्य आहे. अशा दुरच्या गावातल्या लोकांना महत्त्वाचे सामान, औषधे, बीयाणे, खते आणायला मुख्य जवळच्या गावात जावे लागते जिथे बॅन्का, रेंज, वीज, सगळं असतं. तिथे ते व्यवहार मोबाईल, कार्डने करु शकतात. स्वतःच्याच गावातले व्यवहार छोट्या रकमेचे मोबाईल रेंज, वीज वगैरे असेल तरच शक्य आहे किंवा नाही. हे बायनरी आहे. तिथे कॅशच लागेल व लोक कॅशच वापरतील. रोख व्यवहारांवर बंदी तर आणलेली नाही तेव्हा तिथे कॅशलेसचा उगाच बाऊ करण्यात अर्थ नाही असे समर्थक लोक म्हणत आहेत. पण ही भविष्यातली नाही, तर आत्ता करंट सिचुएशन बघून म्हणणे योग्य आहे काय हे तपासावे लागेल. बॅन्क कर्मचारी व इतर व्यवस्था खूप वेगाने, पूर्ण जोर लावून काम करत आहे. कोणीही हातावर हात धरुन बसलेलं नाही हेही सत्य आहे. पण बॅन्का तयार नसतांना अचानक हजार स्वाईप मशिनची गरज त्या एखाद्या गावात कशी 'ताबडतोब' पुरवू शकतील? त्यासोबत 'अचानक' लाखभर खातेधारकांना कार्ड-मोबाईल बॅन्किंग शिकवणे कसे शक्य होईल? असे अनेक प्रश्न एका रात्रीतून अचानक सुटतील असे मानणारे इथे कुणी असतील असे वाटत तर नाही. असतील तर गांजाचा अंमल पुरेपुर चढलाय असं समजूया. ठिक आहे, थोडा वेळ लागेल, मग तोवर काय करायचं? उधारी करायची, अमुक तमुक करायचं. किती काळ? महिना, दोन महिने, तीन महिने? सतत नकारात्मक का बोलता असं अनेक जणं इथं विचारतील. 'नुसतं' सकारात्मक 'बोलून'ही उपयोग नाही किंवा 'जग बघा कुठे चाललंय' असं कुत्सितपणे बोलुन अमेझॉन-गो च्या कल्पनेचा (प्रोटोटाईप-कन्सेप्ट) विडियो टाकून उपयोग नाही. ते 'कुठे तरी जाणारं जग' प्रत्यक्षात असेल आणि मग कुणी तक्रार करत असेल तर खरंच त्याला जोड्याने मारण्यालायकच समजले पाहिजे. सरकार आता पूर्ण १४ लाख कोटीची करन्सी आणणार नाहीच असे दिसते आहे, म्हणजे 'लेसकॅश' हे वास्तव असणार. लेसकॅश व सुविधांची कमतरता ह्या दोन्ही अवस्था सद्यस्थितीत वास्तव आहेत. तुम्ही विरोधक असा किंवा समर्थक, हे वास्तव नाकारु शकत नाही. आता मी गेला महिनाभर नाशकातच आहे, बाहेर कुठेही गेलो नाहीये, त्यामुळे इतर ठिकाणी नक्की काय स्थिती आहे ह्यावर मत देणं उचित नाही. पण एवढं इमॅजिन करु शकतो की बॅन्क-चेक-कार्ड-मोबाइल-रेंजही नाही आणि रोख पैसाही नाही, (ग्रामीण भागातील बॅन्केत पुरेसा रोख-पुरवठा होत नाहीये. देशभरातले ३५% एटीएम चालू आहेत - जे अल्पावधीत कॅशलेस होतात) अशा अवस्थेत काय सकारात्मक विचार करता येईल-बोलता येईल. परंतु अशा अवस्थेतल्या लोकांना प्रत्यक्ष भेटल्या-बोलल्याशिवाय नक्की काय परिस्थिती आहे ह्याबद्दल सकारात्मक-वा-नकारात्मक बोलणे योग्य ठरणार नाही. (फोनवर संभाषणं झालेली आहेत पण ती ग्राह्य धरता येत नाहीत, त्या बोलण्यात दोन्ही प्रकारचे पूर्वग्रह डोकावतांना दिसले. संभाषणकर्त्याचे वैयक्तिक मत व त्याचीच प्रत्यक्ष परिस्थिती यात विसंगती दिसत होती. काही लोक सावध राहून बोलत होते हे विशेष.) चेकद्वारे मोठ्या आकड्यांचे व्यवहार. मोठ्या आकड्यांचे व्यवहार चेकद्वारे होत असतात. पण दोन-तीन लाख पर्यंत रकमा साधारण रोख हाताळल्या जातात. दुसरं असे की व्यापार्‍याने चेक देऊन फसवण्याचे प्रकार घडू शकतात म्हणून चेक-आधारित व्यवस्थेवर विश्वास कमी आहे. (त्याचेही अनुभव ह्या सहा महिन्यात दिसलेच आहेत) चेक बाउन्स झाला तर कोर्टकज्जेगिरि करत बसणे परवडत नाही (ह्यात सरकार काय मदत करु शकणार ते माहित नाही). काही चेक क्लिअर व्हायला १५ दिवस लागलेले हा माझा स्वतःचा अनुभव आहे. घोडेगावात एका लोकल बॅन्केचा इशु केलेला चेक चाळीस किमी दूर नारायणगावात आणून भरावा लागतो कारण ती दुसरी प्रायवेट बॅन्क घोडेगावात नाही. तिथून ती प्रा. बॅन्क पुण्याला (लो. बॅन्क सोबत टाय-अप असलेल्या प्रा. बॅन्केला) चेक कुरियर करते. ती प्रा. बॅन्क सर्व तपासून तो चेक घोडेगावला कुरियर करते. असे बरेच उपद्व्याप 'इकडून तिकडे' होतात. १२-१५ दिवसांनी चेक पास होतो व अकाउंटला पैसे दिसतात. (कुणाला विश्वास नसेल तर व्य नि करा. बॅन्केचे नाव व नंबर देतो स्वतः चौकशी करुन खात्री करु शकता.) शेतकरी इतके दिवस नाही थांबू शकत, शेतातलं पीक नाही थांबू शकत, मजूर नाही थांबू शकत, गाडीभाड्यावाला आणि असे अनेक देणेकरी नाही थांबू शकत. गावाखेड्यांमधले व्यवहार असे रेंगाळले तर जीडीपी नक्कीच गटांगळ्या खाईल. दोन चार दिवसांची म्हणून ही अडचण रेटत रेटत लोकांनी महिनाभर काढली. आता पुढे अजून किती शक्य आहे ते कळेलच व त्याचा परिणामही येत्या सहा महिन्यात कळेलच. चेकव्यवहाराची व्यापार्‍यांचीही बाजू आहे पण इमानदारी-हातचलाखीच्या अध्यातमध्यात असल्याने ती मांडत नाही. असे लॉन्ग-रुट-चेक-क्लिअरिंग सारखे अनेक प्रश्न असतात, आहेत जे आपण इथे लॅपटॉप समोर बसून टिकटिक करत नाही इमॅजिन करु शकत. कुणी मांडले तर त्यावर शहाजोगी ओवरस्मार्टगीरी दाखवणे इतकेच सद्यस्थितीत आपल्या हातात असते. समस्यांवर उपाय आपल्याला दिसतात, की अरे हा उपाय आहे, तो उपाय आहे, अमकं करु शकतात, तमकं करु शकतात. हे बोलणे सोपे आहे, पण अचानक पायावर न चालता हातावर चालायला लावण्याचा अट्टाहास चुकीचा आहे. कॅशलेस व्यवहारांना माझा विरोध नाही, कधीच नव्हता फक्त अपुरी व्यवस्था असतांना व जनमानसाला काहीच पूर्वसूचना न देता धाडकन तीव्र नोटाटंचाई लादली जाणे व त्याला कॅशलेसचे गोंडस नाव देणे पटलेले नाही. जिल्हा बॅन्का ह्यांच्यात खाते असलेल्या 'ग्राहकां'चे पैसे अडकलेले आहेत असे दिसते. इथे जिल्हा बॅन्केचा मुद्दा जेव्हाही आलाय तेव्हा त्या कशा भ्रष्ट झाल्यात व त्याद्वारे पैसे काळ्याचे पांढरे होतील म्हणून बंदी योग्यच आहे असाच विचार दिसला. परंतु जिल्हा बॅन्केत ज्यांचे खाते ते सर्व सदस्य भ्रष्टाचारीच आहेत, बाकी कोण्या सामान्य माणसाचे तिथे जणू खातेच नाही असे नव्हे. पाच पन्नास संचालक म्हणजे जिल्हा बॅन्क नव्हेत. शेकडो खातेदार आहेत ज्यांचे केवळ ह्याच बॅन्केत खाते आहे व त्यातच त्यांचे सर्व पैसे आहेत. ते पैसे त्यांना मिळत नाही आहेत अशा बातम्या वर्तमानपत्रात येत आहेत. ह्यातले खरेखोटे कोणाला माहित असल्यास स्पष्ट करावे. पण जिल्हा बॅन्क बंद म्हणजे घोटाळेबहाद्दरांना चाप एवढाच मर्यादित विचार करु नये. असो. ह्या सर्व चर्चांमधे एक प्रकारचा प्रचंड मोठा गॅप आला आहे. खूप खोल व लांब दरी आहे. एकाचे बोलणे दुसर्‍याला ऐकु जात नाहीये. त्यामुळे काही काळ गप्प राहिलेलेच बरे असे मला वाटत आहे. कोणीही कोंबडं झाकलं आणि कोणीही बांग दिली तरी सूर्य उगवायचा राहणार नाही व तो कोणत्या दिशेला उगवेल हे समर्थक-विरोधकांना दिसणारच आहे. इथे व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोप-अपमान-धुरळा उडवून प्रत्यक्षप्राप्त समस्यांवर कोणतीही उपाययोजना होणार नाही. शहरी भागातल्या लोकांना त्यांच्या स्वतःच्या गरजेपुरती माहिती मिळाल्याचा उपयोग सोडता सर्व चर्चांचे फलित मला तरी शून्य दिसत आहे. कुठल्याही प्रकारचा फायदा होत नसतांना एकमेकांना मूर्ख सिद्ध करुन दाखवण्याच्या नादात वेळ घालवणे हाच कुठल्याही चर्चेचा केवल उद्देश होत असेल तर थांबावेच. कोणासाठी ते मनोरंजनाचे साधन असेल तर चालुद्या! एन्जॉय! :) तुर्तास, ह्या विषयावरचे हे माझे शेवटचे प्रकटन. आता ह्या विषयावर थोडा काळ जाऊ देऊन, आढावा घेऊन लेखन करणे योग्य राहिल असे वाटल्याने विश्रांती घेत आहे. इतर सदस्यांना चर्चा करावयाची असल्यास करावी. मी भाग घेऊ शकणार नाही, क्षमस्व! (तशीच गरज असल्यास व्यनि व खरडवहीत उपलब्ध असेन) धन्यवाद!

प्रतिक्रिया द्या
29862 वाचन

💬 प्रतिसाद (148)
म
मोदक Fri, 12/09/2016 - 03:45 नवीन
>>>८ नोव्हेंबरचा तमाशा सुरु व्हायच्या आधीच बघितले होते लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेले प्रतिनिधी, प्रदीर्घ अनुभव असलेले मंत्री आणि RBI चे गव्हर्नर यांनी मिळून घेतलेला निर्णय हा निव्वळ "तमाशा" असेल तर लेख कोणत्या अजेंड्याने लिहिला आहे ते कळाले व पुढे वाचण्याची तसदी घेतली नाही. प्रतिसाद लिहिता लिहिता हे दिसले >>>कोणीही कोंबडं झाकलं आणि कोणीही बांग दिली तरी सूर्य उगवायचा राहणार नाही व तो कोणत्या दिशेला उगवेल हे समर्थक-विरोधकांना दिसणारच आहे. हे जर तुमचे मत असेल तर या घडीला वेट अँड वॉच मोड योग्य आहे. निर्णय = तमाशा, उद्देश तोंडावर आपटले असे बोलून दाखवून लोकांचा बुद्धीभेद करण्याचे नक्की काय प्रयोजन आहे..?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 12/09/2016 - 04:43 नवीन
लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेले प्रतिनिधी, प्रदीर्घ अनुभव असलेले मंत्री आणि RBI चे गव्हर्नर यांनी मिळून घेतलेला निर्णय हा निव्वळ "तमाशा" असेल तर लेख कोणत्या अजेंड्याने लिहिला आहे ते कळाले व पुढे वाचण्याची तसदी घेतली नाही.
हे पटले नाही...या हिशोबाने घोटाळे करतानासुद्धा घेतलेले निर्णय हे कोणत्यातरी घटनात्मक अधिकारी पदावरच्या व्यक्तीनेच घेतलेले असतात याकडे डोळेझाक करून चालणार नाही =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Fri, 12/09/2016 - 05:26 नवीन
हा निर्णय एक घोटाळा आहे असे सिद्ध झाले तर खुशाल तमाशा, दलाल, देशद्रोही वगैरे लेबले वापरावीत. एकीकडे म्हणायचे की "निर्णय चांगला कि वाईट हे 31 डिसेंम्बर नंतर ठरणार आहे" मग याच निर्णयाला आत्ता घाईघाईने तमाशा म्हणायची नक्की काय मजबुरी आहे..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 12/09/2016 - 06:53 नवीन
हा निर्णय एक घोटाळा आहे असे सिद्ध झाले तर
हो हे महत्वाचे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
साहना Fri, 12/09/2016 - 09:02 नवीन
लोकशाही मार्गाने निवडून आले ह्याचा अर्थ सरकार तमाशा करू शकत नाही असा होत नाही. सरकारच्या सगळ्याच निर्णयांना लोकांनी तोंड दाबून सहन करावे असेही होत नाही. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकरने सॉक्रेटिस ला विष पिऊन आत्महत्या करायला लावली. लोकशाही != सर्व काही चांगले. लेखाने आपण निष्पक्ष इत्यादी असण्याचा आव आणलेला नाही. `एका युक्तीच्या गोष्टी चार` असाही आव आणलेला नाही. बुद्धी भेद वगैरे करण्याचा प्रश्नच नाही. लेखक खरोखर प्रत्यक्षांत शेतकऱ्यांबरोबर काम करतात आणि त्यांचे स्वतःचे अनुभव RBI किंवा मोदींपेक्षा जास्त क्रेडिबल आहेत ह्यात काहीही शंका नाही. उगाच घरी बसून अकलेचे तारे तोडण्यापेक्षा लेखकाचे अनुभव १००% जास्त चांगले ज्ञानदाई आहेत. आपणास आपली गुलामी लखलाभ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Fri, 12/09/2016 - 09:16 नवीन
सर्वप्रथम तुमचा नैतीकतेचा कंपास शोधा आणि मग सूचना करायला या. बाकी डुआयडी असलात तर रामराम घ्या आणि वाटेला लागा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना
न
नितिन थत्ते Fri, 12/09/2016 - 09:30 नवीन
मिसळपाववर डु आयडी असे संबोधून सदस्याला नामोहरम करण्याची रीत निर्माण झालेली आहे. दुर्दैवाने त्याला कुणी संपादक हातभार लावत असतात. मिपावर सदस्यत्व सुरुवातीला मिळत असे तसे ओपनली मिळत नाही. सरपंचांंनी (किंवा कुणीतरी) मंजूर केल्यावरच मिळते. त्या अर्थी त्या आयडीधारकाचा आगापीछा सरपंचांना माहिती असावा. त्या अर्थी त्या सदस्याने दुसर्‍या नवीन आयडीने वावरणे संस्थळाच्या मॅनेजमेंटला मान्य आहे. असे असताना अशा प्रकारे डु आयडी म्हणून झोडणे योग्य नाही. (जुना मिपाकर) नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Fri, 12/09/2016 - 09:34 नवीन
अहो काका, मी संपादक नाही. त्यामुळे हातभार वगैरे लावण्याचे माझ्या प्रतिसादाला उद्देशून बोलत असाल तर ते असत्य आहे. अशा प्रकारे डु आयडी म्हणून झोडणे योग्य नाही. त्या आयडीने वापरलेल्या भाषेशी तुम्ही सहमत आहात का..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
क
कपिलमुनी Fri, 12/09/2016 - 11:45 नवीन
बाळासाहेब ठाकरे कोणत्याही घटनात्मक पदावर नव्हते याची आठवण झाली ! =)) ==))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Sat, 12/10/2016 - 05:54 नवीन
ए मुनी.. गपे. काहीही काय राव. कशाला अशी तुलना करतोस. बाळासाहेब बाळासाहेब होते. __/\__ थत्तेचाचांनी सोयीस्कर पिंक टाकून धाग्यावरून रजा घेतली काय..? की अडचणीचा प्रश्न म्हणून उत्तर देत नाहीयेत..? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 12/09/2016 - 04:22 नवीन
डांगे तुम्ही देशद्रोही आहात, तुमच्यासारखे कुंपणबशे अरबी समुद्रात बुडवून टाकले असते पण आम्हाला मासे आवडतात अन ते आम्हाला प्रदूषित करायचे नाहीयेत. तुम्ही आमच्या देशभक्तीच्या मॉडेल डेफिनिशन अन २१ अपेक्षितच्या उत्तरात बसत नाही, तसंच कॅशलेस, कॅशफुल, विशफुल, विशलेस सगळे शेतकरी तहहयात हरामखोर असतात, ते टॅक्स भरत नाहीत, ते फुकट खातात, त्यांची जात पण फालतू असते, आम्हीच काय ते मेहनतीचे खातो, त्यामुळे शेतकरी सुद्धा देशद्रोही आहेत. स्कोरसेटलिंग समाप्त. आता लेख वाचतो शांतपणे, नंतर काय ती प्रतिक्रिया देतो. =))
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 12/09/2016 - 04:37 नवीन
काही मुद्दे वास्तव असतीलही पण २-३ लाखाचे व्यवहार हे "लहान" असतात हे पटले नाही...इथे ५ हजाराच्या वरचे व्यवहारासुद्धा मोठे वाटतात मला....ते जरा दुरुस्त कराच नाहीतर त्याचाही ट्रक ड्रायव्हर व्हायचा =))
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 12/09/2016 - 04:40 नवीन
सहमत आहे टक्या, केल्याने होत आहे रे, आधी 'केलेच' पाहिजे!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
संदीप डांगे Fri, 12/09/2016 - 04:41 नवीन
सर्व लेख १००% खोटा व पैसे घेऊन भाजपची बदनामी करण्यासाठी लिहिला आहे. झालं समाधान? खुश....??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 12/09/2016 - 04:47 नवीन
हे असे तुम्हाला वाटते....मला नाही ....त्यामुळे तुम्हाला स्वतःला लेबल चिकटवून घ्यायचे असल्यास माझी हरकत नाही पण कॉमन सेन्स नावाचा काही प्रकार असतो त्यात फक्त काळे आणि पांढरे असेच असते ना त्याला आपण काय करणार त्यामुळे technical mistake कशी डोळेझाक करणार =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 12/09/2016 - 04:54 नवीन
एक काम करा. प्रत्यक्ष अनुभव घ्या मग टेक्निकल मिस्टेकींबद्दल बोललं तर योग्य राहिल. इथल्या कोणाच्या मानण्या न मानण्याने रोखीने मोठे व्यवहार करणार्‍यांच्या अस्तित्वात काहीही फरक पडत नाही. उकसवायचे प्रयत्न असतील तर चालु द्या! शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 12/09/2016 - 06:54 नवीन
इथल्या कोणाच्या मानण्या न मानण्याने रोखीने मोठे व्यवहार करणार्‍यांच्या अस्तित्वात काहीही फरक पडत नाही
हेच्च महत्वाचे आहे ना...लाखात व्यवहार करणार्यांना कॅशलेस व्यवहार करणे जमत नाही की जमवून घेत नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 12/09/2016 - 07:33 नवीन
मुद्दा का बदलत आहात आता? आधी म्हणता कि 2-3 लाखाचे व्यवहार रोखीत होतात हे पटत नाहीत, ट्रक सारखं आहे काय, टेक्निकल मिस्टेक आहे काय. आता म्हणताय कि लाखात व्यवहार करणार्यांना कॅशलेस जमत नाही की करायचे नाही इत्यादी. चेंजिंग गोलपोस्ट?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
व
विशुमित Fri, 12/09/2016 - 07:44 नवीन
<<<<,काही मुद्दे वास्तव असतीलही पण २-३ लाखाचे व्यवहार हे "लहान" असतात हे पटले नाही.>>>> - २-३ लाख कॅश सहसा आमच्या घरात असतेच आणि लागते सुद्दा देणी देण्यासाठी. ऑक्टोबर महिन्याचा माझा तपशील सांगतो- येणे आले : उसाचे दिवाळीतील हफ्ता- ३५,००० उसाचे बियाणे (रोख विकले)- ४०,००० सोयाबीन (रोख विकले)- ३५००० बाजरी (रोख)- १५००० ओली मका (रोख विकली)- २०,००० दुधाचा दिवाळी बोनस आणि पगार- २०,००० ३ बोकडे विकली (रोख)- १५००० एकूण- रु.१८०००० त्यातील रु. १७०००० तर मी खते, औषधे बियाणे वाल्याचीच उधारी भागवली. मागच्या वर्षी तर पाईप लाईन तर रोख २.५ लाख खर्च करून केली होती. अजून काही येणी आणि देणी बाकी आहेत पण नोव्हेंबर महिन्यातील सुगमसंगीतामुळे (तमाशा म्हंटले तर देशद्रोही म्हणायचे सोन्याबापू मला) थोडा ब्रेक लागला आहे. डिसेंबर-जानेवारी मध्ये उसाची बिलं, नंतर गहू, मग टोमॅटो चे पैसे येतील... त्यामुळे बघा विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा..बाकी चालू द्यात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
आ
आनंदी गोपाळ Fri, 12/09/2016 - 17:12 नवीन
पण २-३ लाखाचे व्यवहार हे "लहान" असतात हे पटले नाही...इथे ५ हजाराच्या वरचे व्यवहारासुद्धा मोठे वाटतात मला.
हा व्यक्तिगत परिप्रेक्ष्य आहे. तुम्ही महिना ३०-४० हजाराचा व्यवहार करता, तोच शेतकरी वर्षातून एकदाच करतो. तो साडेचार-पाच लाखाचा होतो. धंदेवाल्याचं गणित अन नोकरदाराचं गणित वेगळं असतं. फुटपाथवर उदा. पाणिपुरी विकून रोज २००० रुपयांचा गल्ला गोळा करणार्‍या माणसाचं "इन्कम" ६०,००० होत नाही. ते ८-१० हजाराच्या दरम्यान कुठेतरी थांबतं, कारण त्या इन्कममधे अगदी ५०% नफा समजला तरी बॅकेण्डला किमान ३-५ पार्टनर्स असतात. तेव्हा माझ्यासारख्या हातावर पोट असणार्‍या व कोणताही पेन्शन प्लॅन वा महिन्याअखेरच्या पगाराची हमी नसणार्‍या, त्याचवेळी जगातल्या पाचपन्नास लोकांसाठी रोजगार निर्मिती करणार्‍या स्वतंत्र व्यावसायिकांचे बोलणेही थोडे डोळे व कान उघडे करून ऐकण्याचा यत्न करून पहावे असे सुचवितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ए
एस Fri, 12/09/2016 - 04:41 नवीन
संयत लेख.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 12/09/2016 - 04:42 नवीन
अय्यो, तुम्हाला पण देशद्रोहाची हवा लागली!! ?? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ग
गणामास्तर Fri, 12/09/2016 - 05:33 नवीन
देशद्रोही विरुद्ध भक्त =)) https://youtu.be/qStXxdRJtms ढुशक्लेमर: सदर व्हिडियो फक्त १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी (AIB चा असल्यामुळे)
  • Log in or register to post comments
स
साहना Sat, 12/10/2016 - 05:28 नवीन
सोल्जर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर
ग
गणामास्तर Sat, 12/10/2016 - 18:56 नवीन
मिठी बातें बोलकर दिलको चुरा ले गया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना
प
पगला गजोधर Sat, 12/10/2016 - 20:33 नवीन
मित्रो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर
व
वरुण मोहिते Fri, 12/09/2016 - 06:28 नवीन
दोन्ही बाजूंचा आढावा घेणारा ...ग्रामीण महाराष्ट्रातच नाही देशात शहरात परिस्थिती निश्चित कठीण होती . जेवढे मिपा वाचतात ते कित्येक वर्षांपासून कार्ड पेमेंट करत आहेत . तरी पण ज्यांना त्रास झाला पण तो देशभक्ती पाकिस्तान ह्या विविध मुद्द्यांवर खपवला गेला . असो मी देशद्रोही नाही त्यामुळे पाकिस्तानात जायच्या भयामुळे इथेच थांबतो :))))))
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 12/09/2016 - 07:06 नवीन
बेटर टु स्टॉप नाऊ टिल मार्च २०१७.
  • Log in or register to post comments
य
याॅर्कर Fri, 12/09/2016 - 07:20 नवीन
अभ्यासू निरीक्षण आहे, आपण ग्रामीण भाग फिरला असल्याने लेखातले मुद्दे वास्तव आणि तटस्थ आहेत.
  • Log in or register to post comments
न
नया है वह Fri, 12/09/2016 - 07:35 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
R
Ram ram Fri, 12/09/2016 - 07:52 नवीन
+१ सहमत
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Fri, 12/09/2016 - 08:03 नवीन
अगदी मोठी बीले जी वार्षिक चुकवली जातात - जसे की डाळींब, द्राक्ष, यांचे उत्पादक-शेतकरी - ती चेकने चुकवली जात असावीत असा अंदाज आहे.
च्या ऐवजी अगदी मोठी बीले जी वार्षिक अदा केली जातात - जसे की डाळींब, द्राक्ष, यांचे उत्पादक-शेतकरी - ती चेकने अदा केली जात असावीत असा अंदाज आहे. असे केले तर ?
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 12/09/2016 - 08:14 नवीन
शुद्ध प्रमाण मराठीत नेमकं काय असावे हे लिहिण्याच्या ओघात सुचले नाही, बिलं चुकती करणे असं म्हटलं जातं त्यामुळे चुकवली हा शब्द वापरलाय, अदा करणे अमराठी आहे, प्रमाण मराठीत कोणता शब्द आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Fri, 12/09/2016 - 08:17 नवीन
भरणा करणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
भ
भटकंती अनलिमिटेड Mon, 12/12/2016 - 06:30 नवीन
देणी चुकती करतात आणि बिलं अदा करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मराठी कथालेखक Fri, 12/09/2016 - 09:10 नवीन
अदा करणे पेक्षा 'चुकती केली' अधिक योग्य ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
व
वरुण मोहिते Fri, 12/09/2016 - 08:33 नवीन
लागते कॅश १० लाख पण काही वेळा लागते मला म्हणून मी अप्रामाणिक का?? ७० रुपयांची भाजी घेयचीये पण २००० सुट्टे नाहीत म्हणून कोणी अप्रामाणिक का ? कित्येकदा काही व्यवहारांना रोकड लागते कारण ते भारत भर होत असतात . दर वेळी तुमची वीज बँकिंग एटीम चालू असतील किंवा सगळंच सुरळीत असेल असं तर नाही ना . ह्या सुविधा द्या मग निर्णय घ्या. देशासाठी त्रास घ्या म्हणजे आणीबाणी च्या वेळी देशासाठी आहे हे असं बोलण्यासारखं झालं.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Fri, 12/09/2016 - 09:15 नवीन
मी कल्पना करतोय .. डान्सबार मध्ये पोरगी डान्स करतेय आणि कस्टमर तिच्या एकेका ठुमक्याला मोबाईल काढून पेटीएम करतोय किंवा पोरगी डान्स करतानाच स्वाईप मशिन शरीराच्या वेगवगेळ्या भागांवर बॅलन्स करतेय आणि कस्टमर स्वाईप करतोय.. :) बाकी डान्सबारची मालिका पुढे सरकवाना राव.. या (नसलेल्या) नोटांचा कंटाळा आलाय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
म
मराठी कथालेखक Fri, 12/09/2016 - 09:19 नवीन
कस्टमर तिच्या एकेका ठुमक्याला मोबाईल काढून पेटीएम करतोय
त्या साठी कस्टमर QR code इथून scan करतोय. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
व
विशुमित Fri, 12/09/2016 - 09:50 नवीन
कहर...!! जेवणानंतर ढेकर द्याची सोडून हसून हसून पोट गलबलायला लागलं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
व
वरुण मोहिते Fri, 12/09/2016 - 11:02 नवीन
घेतो मनावर आज उद्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 12/09/2016 - 09:57 नवीन
तुमच्या चांगल्या प्रतिसादाची प्रत वेगळ्या धाग्याच्या रुपाने इथे टाकली हे चांगले केले आहे. पण तेथेच न थांबता माझ्या तेथिल प्रतिसादात... अशी माहिती ही पहिली मजबूत व वास्तव पायरी आहे. आता हे जमिनी ज्ञान वापरून लोकांना काय व कशी मदत करता येईल? स्थानिक स्तरावर काय उपयोगी पडेल आणि काय नाही? यात आमच्यासारखे शहरी लोक काही सकारात्मक वाटा उचलू शकतील काय? यावर एक धागा काढा.

हे एक खूप सकारात्मक काम होइल. ते कराच अशी आग्रहाची विनंती आहे.
...मी केलेल्या विनंतीवजा सूचनेप्रमाणे लेखातल्या समस्यांवर जमिनीवर उपयोगी उपाय सूचवू शकलात तर ते जास्त स्पृहणिय काम होईल.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 12/09/2016 - 10:14 नवीन
"हा प्रॉब्लेम आहे" असे म्हणणार्‍यानेच सोल्युशन सांगावे ही अपेक्षा वाजवी नाही. पण हरकत नाही !!! "प्रॉब्लेमच कुठे आहे? प्रॉब्लेम म्हणून ओरडणारे त्यांचा काळा पैसा गटारात गेला म्हणूनच ओरडतायत" पासून "प्रॉब्लेम आहे आणि तो सोडवायला हवा" इथपर्यंत प्रवास झाला हे ही नसे थोडके.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
स्वधर्म Fri, 12/09/2016 - 10:29 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 12/09/2016 - 10:36 नवीन
मी काय म्हटले हे तुम्हाला समजले नाही की समजले नसल्याचे दाखवताय ? ज्याला समस्या नीट माहीत आहे तोच उत्तम उपाय शोधू शकतो, अशी सर्वसामान्य शास्त्रीय धारणा आहे. :) समजलेल्या समस्येवर उपाय शोधून काढणे खरे सकारात्मक काम असते. नुसते समस्या, समस्या असे म्हणत राहण्याने राजकारण करता येते पण ज्याच्या बाजून आपण बोलतो आहोत त्याला त्याचा उपयोग शून्य असतो. समस्येचा भाग होणे खूप झाले, उपायाचा भाग होण्याची तयारी असली तरच पुढच्या चर्चेला अर्थ आहे. नाहीतर वादावादी आणि खूसपटे काढणे अगोदरच खूप झाले आहे... त्याबाबतीत, राम राम :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
म
मार्मिक गोडसे Fri, 12/09/2016 - 10:32 नवीन
७-८ वर्षापुर्वी लोणार ते माहुर प्रवास केला, रात्रीच्या प्रवासात रस्त्याच्या आजुबाजुला गाडीच्या प्रकाशाशिवाय दुसरा प्रकाश दिसत नव्हता. दुसर्‍या दिवशी परतीच्या प्रवासात तुरळक लोकवस्ती दिसली. जेथे चहासाठी थांबलो तेथे दिवसाही वीज नव्हती, रात्री ११ - सकाळी ९ वजेपर्यंत वीज असते असे कळले. रस्त्यात बरीच शेती दिसली, परतू पीक कसले आहे हे आमच्यातल्या कोणालाही सांगता येत नव्हते. कोणी बाजरी म्हणायचे तर कोणी ज्वारी म्हणायचे , एकंदरीत आम्ही सगळेच ह्या बाबतीत अडाणी होतो. शहरापेक्षा ग्रामीण जीवन फारच खडतर असते हे तेव्हा लक्षात आले. मुंबईत लोकल २ मि. उशीरा आली तर जीव कासावीस होतो, एक दिवस पाणी बंद ठेवले तर तडफड होते, ह्याउलट ग्रामीण भागात लोकं तासनतास रस्त्याच्या कडेला एस.टी. ची वाट बघत असतात, पाण्यासाठी पायपीट करावी लागते . मुलभूत गरजांसाठी इतके कष्ट पडत असतील तर तेथील आर्थिक व्यवहारही अविकसीतच असणार. हे सर्व अभ्यासण्यासाठी जाणीवपूर्वक ग्रामीण अर्थव्यवस्था समजून घेऊ लागलो. देशपातळीवरचा एखादा निर्णय ग्रामीण पातळीवर यशस्वी होईल की नाही ह्याचा आढावा घेऊ लागलो, त्यामुळे खर्‍या अडचणी समजू लागल्या, त्याच मी प्रतिसादातून नेहमी व्यक्त करतो. कोणी त्यातून गैरअर्थ काढत असेल तर त्याला तितक्याच जोमाने मी प्रतिवाद करत असतो.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Fri, 12/09/2016 - 11:32 नवीन
पंतप्रधानांनी नोटाबंदीची योजना राबवण्यापूर्वी त्यातून उद्भवणार्‍या समस्यांचा फार अभ्यास केला नव्हता हे दिसतेच आहे. गोपनीयता हाच मुद्दा केल्याने त्यांची अडचण झाली. त्यात नवीन नोटांचा आकार बदलल्याने एटीम मशीन कॅलिब्रेट करावी लागल्याने अडचणीत भरच पडली. बनावट नोटांना आळा घालण्याच्या नावाखाली फक्त ५०० च्या नव्या नोटा छापल्या असत्या तर कोणालाही संशय आला नसता व आहे त्या आकारात छापल्याने एटीम मशीन कॅलिब्रेट करावी लागली नसती. सर्व तयारी पुर्ण झाल्यावर ८ नोव्हें. प्रमाणे ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केली असती तर अगदी पहिल्या दिवसापासून पुरेसे चलन उपलब्ध झाले असते व सुट्या पैशाची समस्या उद्भवली नसती.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Fri, 12/09/2016 - 12:08 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Fri, 12/09/2016 - 14:21 नवीन
आणि हो, तो २००० नोटेचा बायपासही काढावा लागणार नाही, तसेच २०००च्या नोटा छापायचा व पुढेमागे रद्द करण्याचा खर्चही होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
च
चिगो Sat, 12/10/2016 - 13:39 नवीन
२०००ची नोट रद्द करणार आहेत का? माझ्यामते अश्याप्रकारे नोटा रद्द करुन त्या-त्या करंसीची विश्वासार्हता घालवणे योग्य नाही. मी बाहेरच्या देशातून आलेल्या पर्यटकांचाही विचार करतोय. उद्या मी समजा अमेरीकेला फिरायला गेलो, जातांना माझे कायदेशीर पैसे दोन हजार डॉलर्समधे घेऊन गेलो १०० डॉलर्सच्या नोटेत, आणि त्यादेशातल्या सरकारने १०० डॉलर्सची नोट बेकायदेशीर ठरवली, तर मी काय करणार? (परदेशात कार्ड वापरुन पैसे काढायला/ पेमेंट करायला उगाच जास्तीचा खर्च येतो, असा अनुभव आहे.) त्यामुळे, नोटबंदीला सरकार वार्षिक राष्ट्रीय कार्यक्रम बनवणार नाही, ही अपेक्षा.. डांगे साहेब, उत्तम लेख.. 'कॅश'ला विनाकारण व्हिलेनाईज/क्रिमीनलाईज करण्यात अर्थ नाही.. पण सांगावं कुणाला? नोटबंदीनंतर एक शेर सुचला होता, तो टाकतो.. "कुछ ऐसा नशा चढा हैं, हुक्मरानों पें वफादारी का, यारों.. कि अब जो भी सच बोले, वो गद्दार कहलवाता हैं.." चलने दो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा