Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नास्तिक विचार मंच!!!!

ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर
Tue, 01/03/2017 - 16:47
🗣 79 प्रतिसाद
मराठी संकेतस्थळांवर अनेक आस्तिकतेशी संबंध असणारे धागे आहे.कुठला तरी बापू,महाराज ,योगी,कुणी ब्रह्मचैतन्य कुणी काय अन काय.या सगळ्या आस्तिकीकरणात नास्तिकांचा आवाज कुठेच ऐकायला येत नाही,त्यासाठी हा प्रपंच. मी ही आस्तिक होतो,वयाच्या सोळाव्या सतर्याव्या वर्षांपर्यंत.पुढे थोडे समजायला लागल्यापासून आणि विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यावर देव धर्म यातला फोलपणा व खासकरुन भारतीयांमधला भोळसटपणा लक्षात यायला लागला व हळूहळू मी /ठार नास्तिक झालो.देव नावचे अस्तित्वात नसलेले रसायन लोकांच्या अंगात कसे मिसळले आहे हे जाणवायला लागले.पुढे रिचर्ड डॉकीन्स या अवलिया वैज्ञानिकाची पुस्तक स्वरुपात ओळख झाल्यानंतर माझ्या आधीच्या विसंगत नास्तिक विचारांमध्ये एकसंधपणा आला .नास्तिकता ही मिरवता येते हे त्याने जगाला दाखवून दिले . असो,एका संशोधनानुसार नास्तिक लोक आस्तिकांपेक्षा जास्त हुशार असतात असे आढळून आले आहे. तर या धाग्यावर तुम्ही नास्तिक का आहात? नास्तिक का झालात ? हे थोडक्यात मांडावे. इथे लॉजिकल कारण सांगावे.अमुक बलात्कार झाला,देवदर्शनाला गेलेल्या भाविकांचा अपघात होऊन मृत्यु झाला म्हणून मी नास्तिक झालो वगैरे भावनिक आर्ग्युमेंट नकोत. धन्यवाद.

प्रतिक्रिया द्या
26683 वाचन

💬 प्रतिसाद (79)
ए
एस Wed, 01/04/2017 - 16:30 नवीन
एक उत्तरमीमांसा वगळता बारा दर्शनांपैकी सर्वच मूलतः निरीश्वरवादी आहेत. त्यातल्या लोकायत वगळता इतर दर्शनांनी ईश्वर या संकल्पनेच्या समान किंवा तिच्या जवळ जाणारी प्रतिपाद्ये काळाच्या ओघात आणि विशेषतः शंकराचार्यप्रणित अद्वैत विचाराचा उदय झाल्यानंतरच्या काळात स्वीकारल्याचं दिसतं. लोकायत हे दर्शन नास्तिक आणि निरीश्वरवादी असे दोन्ही आहे. ते सर्वात जुने तत्त्वज्ञान आहे. त्याच्या अभ्यासाची साधने विरोधकांनी नष्ट केल्यामुळे फारच दुर्मिळ आहेत. आणि लोकायत समजून घेण्यासाठी बहुतांशी त्यावर इतर दर्शनांनी केलेल्या टीकेचा (टीका म्हणजे भाष्य) आधार घ्यावा लागतो. 'किं त्वम् असि' या तत्त्वज्ञानाच्या चर्चेच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना तत्त्वज्ञाला 'जड आणि चेतन' याचे त्याच्या तत्त्वज्ञानात असलेले उत्तर सांगावे लागते. जेव्हा इतर दर्शनांना जडामध्ये असलेल्या चेतनेचे स्वरूप आणि तिचा उगम सांगताना अतार्किक संकल्पनांचे इमले बांधावे लागतात, तेव्हा लोकायताने 'चेतन हे जडाचेच स्वभाववैशिष्ट्य आहे' असे इतक्या प्राचीन काळातही ठामपणे सांगितले. इतकेच नाही, तर लोकायताने म्हणजेच चार्वाकदर्शनाने तत्त्वज्ञानातील इतर मूलभूत प्रश्नांचाही सखोल अभ्यास केला. त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे 'प्रमाण'. लोकायताने फक्त प्रत्यक्ष प्रमाण हेच एकमेव प्रमाण मानले. आणि तर्काच्या आधारावर केलेल्या अनुमानाला त्याच्या मर्यादांमध्ये मान्यता दिली. परंतु शब्दप्रमाणाला पूर्णपणे नाकारले. डॉ. आ. ह. साळुंखे यांनी लोकायताला खरेतर आस्तिकशिरोमणी मानावे असे म्हटले आहे, कारण हे एकमेव तत्त्वज्ञान केवळ प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्याच वस्तूंना त्यांच्या अस्तित्वाच्या आधारे मान्यता देते. यावर दत्तप्रसाद दाभोलकर यांनी मात्र लोकायताने 'नास्तिकशिरोमणी' ही ओळख अभिमानाने मिरवावी असे प्रतिपादन केले. कधीतरी भारतीय तत्त्वज्ञान आणि दर्शने यावर सविस्तर लेख लिहावा असे वाटते. लोकांमध्ये बरेच गैरसमज तर आहेतच, त्यांना बरीचशी मूलभूत माहितीदेखील नसते. आणि 'ऋणंकृत्वा घृतं पिबेत' सारखा तद्दन खोटारडेपणा चार्वाकांच्या नावावर खपवून मोकळे होतात. असो.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Wed, 01/04/2017 - 17:05 नवीन
कधीतरी भारतीय तत्त्वज्ञान आणि दर्शने यावर सविस्तर लेख लिहावा असे वाटते. लोकांमध्ये बरेच गैरसमज तर आहेतच, त्यांना बरीचशी मूलभूत माहितीदेखील नसते.
फिर देर क्यूं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
प
प्रचेतस Wed, 01/04/2017 - 17:14 नवीन
लेखाची वाट पाहातो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
आ
आनंदयात्री Wed, 01/04/2017 - 17:50 नवीन
>>कधीतरी भारतीय तत्त्वज्ञान आणि दर्शने यावर सविस्तर लेख लिहावा असे वाटते. लवकर लिहा. वेळ काढा (हवी तर सुट्टीहि काढा). धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
प
प्रसाद गोडबोले Wed, 01/04/2017 - 18:52 नवीन
वाह ! चार्वाक मतावर वाचायला आवडेल ! पण साळुंखेंचे नाव घेतलेत म्हणुन सांगतो कि कोणताही अभिनिवेश टाळुन लिहिता आले तर लिहा.
त्याच्या अभ्यासाची साधने विरोधकांनी नष्ट केल्यामुळे फारच दुर्मिळ आहेत.
ह्या असल्या विधानांना काय ऐतिहासिक आधार आहे ते ही लिहा ! पुस्तके, ग्रंथालये जाळणे ही हिंदुंची बुध्दांची किंव्वा जैनांची कोनाचीच संस्कृती नाही ! ही जाळपोळ अन तोडाफोडीची संस्कृती 'बाहेरुन' आलेली आहे ! अद्वैत मताचे प्रतिपादन करताना आचार्यांनी प्रामुख्याने बौध्द मताचेच खंडन केलेले दिसले, चार्वाक मत त्यातंच्या काळाच्या आधीच लोप पावलेले दिसुन येते त्याच्या कारणांचीही चिकित्सा व्हावी ! अभ्यासपुर्ण लेखन वाचायला आवडेलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस गुरुवार, 01/05/2017 - 01:52 नवीन
नक्कीच. डॉ. साळुंखेंचं नाव मुद्दाम घेतलं आहे. चार्वाक किंवा अन्य दर्शनांचाही अभ्यास करताना सर्वच संबंधित साधने विचारात घ्यायला लागतात आणि त्यांचा तौलनिक अभ्यास तटस्थपणे आणि चिकित्सक वृत्तीने करावा लागतो. मग ते डॉ. साळुंखे असोत, वा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन असत, वा मध्वाचार्य असोत वा आदिशंकराचार्य, वा अन्य कोणीही. अगदी 'नास्ति मृत्यु अगोचरः' चं 'ऋणं कृत्वा घृतं पिबेत' सारखं विडंबन करणारे लोकही असोत. पण येथे लोकायत हे मुळात तत्त्वज्ञान म्हणविण्याच्या लायकीचेच नाही असा अभिनिवेश आणि पूर्वग्रह टाळणे अत्यंत आवश्यक आहे. असाच अभिनिवेश आपल्या तथाकथित परंपरा आणि संस्कृतीच्या तथाकथित श्रेष्ठत्त्वाबद्दल बाळगणेही वैचारिक एकारलेपणाचे लक्षण आहे. जगातल्या सर्वच चांगल्या-वाईट गोष्टी जगातल्या सर्वच ठिकाणी सर्वत्र आणि सार्वकालिक स्वरूपात अस्तित्त्वात असतात - होत्या - असतील. तेव्हा चांगलं ते इथलं आणि वाईट ते बाहेरून आलेलं असा अभिनिवेशही काही कामाचा नाही. याची दुसरी बाजू म्हणजे अभिनिवेश जसा नको, तसा न्यूनगंडदेखील नको. तटस्थता अत्यंत आवश्यक आहे. प्राचीन भारताला खंडन-मंडनस्वरूप चर्चांची अभिव्यक्त होण्याची जशी परंपरा लाभली आहे (सहिष्णुता) तशीच जेत्यांची विचारधारा जित समुदायावर लादण्याचीही (असहिष्णुता) आहे. तेव्हा आपले पूर्वग्रह, अभिनिवेश, अहंकार किंवा न्यूनगंड इत्यादी वैयक्तिक बाबींचा परिणाम अभ्यासाच्या दिशेवर आज निष्कर्षांच्या सच्चेपणावर होऊ न देण्याची संपूर्ण जबाबदारी ही अभ्यासकावर असते. हे कायम लक्षात ठेवणे आवश्यक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 01/05/2017 - 02:37 नवीन
शब्दच्छल
जगातल्या सर्वच चांगल्या-वाईट गोष्टी जगातल्या सर्वच ठिकाणी सर्वत्र आणि सार्वकालिक स्वरूपात अस्तित्त्वात असतात - होत्या - असतील. तेव्हा चांगलं ते इथलं आणि वाईट ते बाहेरून आलेलं असा अभिनिवेशही काही कामाचा नाही
तत्त्वज्ञानाच्या चर्चेत शब्दच्छल नसावा अशी विनंती आहे . कृपया हिंदू बुद्ध किंवा जैन धर्मियांनी प्रो ऍक्टिव्हली पराधर्माच्या दुसऱ्या तत्त्वज्ञानाच्या लोकांची पुस्तके जाळल्याचे , इतिहासाची साधने नष्ट केल्याचे पुरावे द्यावेत . किंवा चार्वाकाचे तत्वज्ञान विरोधकांनी नष्ट केले हे विधान मागे घ्यावे ! आणि महत्वाचे म्हणजे श्रीमदाद्यशंकराचार्यानी अखंड भारत वर्षात फिरून बौद्धादि नास्तिक मतांचे खंडन आधीच केलेले आहे । ज्यांना ते पटलेले आहे त्यांना परत शून्यातून सुरुवात करायची गरज आहे असे मला वाटत नाही , त्यांना फक्त रिव्हिजन करणे पुरेसे आहे । बाकी साळुंखेना सर्वपल्ली राधाकृष्णन , मध्वाचार्य , श्रीमदाद्यशंकराचार्यांच्या पंक्तीत बसवले पाहून मौज वाटली ।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
न
नेत्रेश गुरुवार, 01/05/2017 - 01:21 नवीन
अमेरीकेतील व भारतातील बहुतांश वैज्ञानीक, डॉक्टर, उद्योजन हे आस्तिक आहेत. जगातली १ नंबरची महासत्ता, विज्ञान, तंत्रज्ञान यात आघाडीवरचा देश असलेली अमेरीकाही मोठ्या अभीमानाने आपल्या सर्व चलनावर आपला ऑफीशीयल मोट्टो 'In God We Trust' छापते. (या मुळे देवाचे अस्तित्व सिद्ध होत नाही, फक्त माहीती साठी लिहीले आहे). तळटीपः नास्तीकांचा व त्यांच्या मताचा पुर्ण आदर आहे.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 01/05/2017 - 05:34 नवीन
भीती कमी होते. अज्ञात गोष्टींचा भार स्वतःवर घेण्यापेक्षा, पुन्हा अज्ञात संकल्पनेवर टाकणं सोयीचं आहे. म्हणून ते तसं म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 01/05/2017 - 05:42 नवीन
अमीर त्याच्या मित्रांना म्हणतो, अनिश्चिततेत हृदयावर हात ठेवून म्हणा "ऑल इज वेल !" आणि पुढे सांगतो की हा मंत्र त्याला लहानपणी, गावातल्या वॉचमननी दिला होता. रात्री गस्त घालतांना भीती कमी व्हावी म्हणून वॉचमन तो मंत्र मोठ्यानं म्हणत असे. पण एक दिवस गावात चोरी होते! आणि मग पत्ता लागतो की वॉचमन अंध होता. इन गॉड वी ट्रस्ट हा अंधांचा, अनिश्चितता दूर कराण्याचा, दिलासा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
म
मराठी कथालेखक गुरुवार, 01/05/2017 - 07:56 नवीन
बरोबर आहे. ज्याला आपल्या पाठीशी कोणीतरी उभा आहे असे समजून आपल्या डोक्यावरील चिंतेचा भार कमी करता येतो, तशी गरज वाटते किंवा ते योग्य वाटतं त्यानं ते करावं.. प्रत्येकासाठी नास्तिक बनण्याचा आग्रह नाहीच. पण अस्तिकांनी "देव माझ्यावर रागावलाय, मी देवाचा लाडका/की नाहीये" ई नकारात्मक विचार मनात येवू देवू नयेत ...किंवा "देवच काय ते बघून घेईल" अस म्हणत प्रयत्नांची कास सोडू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
अ
अनन्त्_यात्री गुरुवार, 01/05/2017 - 06:22 नवीन
आस्तिक व / अथवा ईश्वरवादी दर्शनान्चे ईप्सित ब्रह्मज्ञान्/मोक्ष्/निर्वाण / शून्यावस्थाप्राप्ती यापैकी एक होते. मग नस्तिक व निरीश्वरवादी अशा लोकायत दर्शनाचे ईप्सित काय होते? सांख्य दर्शन हे (आस्तिक असले तरीही) निरीश्वरवादी आहे. मग त्यात व लोकायत दर्शनात नेमका फरक काय? यावर विस्ताराने (व गरज पडल्यास फ्लो-चार्ट वगैरे वापरून) माहिती द्यावी. मला वाटते मार्कस व एस या दोघानी हे मनावर घ्यावे.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक गुरुवार, 01/05/2017 - 08:15 नवीन
नास्तिक काय किंवा अस्तिक काय.. मोक्ष वगैरे सगळ्या संकल्पना आहेत. माझ्या मते आयुष्य हे एक टाईमपास आहे. तुम्ही रेल्वे स्टेशनवर आलात तर तुमची गाडी येईपर्यंत तुम्ही काय करता ? टाईमपास ? मग तुम्ही पत्ते खेळा, पुस्तक वाचा , इतरांशी गप्पा मारा , मैत्री करा, भांडण करा किंवा झोप काढा..तुमची मर्जी. तुमची गाडी कधी येणार ते तुम्हाला माहित नाही. पण ती आली की तुम्हाला जावं लागेल हे तुम्हाला आणि इतरांना माहित आहे. प्रत्येकाचीच गाडी येणार आहे, पण कुणाची कधी येईल ते माहित नाही. बरं ही गाडी कुठे नेते ते ही कुणाला माहित नाही, कारण गाडीतून एकदा गेलेला व्यक्ती पुन्हा कधीच फिरुन तिथे परत आला नाही. आता तुम्ही गाडी येईपर्यंत पुस्तक वाचलत किंवा झोप काढलीत तर तुम्ही गाडीत बसून निघून गेल्यावर कुणी तुमची आठवण काढणार नाही. पण तुम्ही प्लॅटफॉर्मवर काही जणांशी मैत्री केलीत , मोठमोठ्याने गाणी म्हंटलीत, लोकांशी मारामारी केलीत , प्लॅटफॉर्म झाडून स्वच्छ केलात ई ई तर तुम्ही गेल्यावरही लोक तुम्हाला काही काळ लक्षात ठेवतील. अनेक लोकांना या प्लॅटफॉर्मवरचा वेळ कसा घालवावा याची नीट समज नाही , पण तुम्ही लोकांना स्वतःच्या कृतीतून , भाषणातून प्लॅटफॉर्मवरील वेळेचा उपयोग स्वतःसाठी तसेच इतरांसाठी जास्तीत जास्त आनंद निर्माण करण्यासाठी कसा घालवावा याची शिकवण दिलीत तर कदाचित तुमचा एक पंथ तयार होईल. अपरिपक्व अशा मोठ्या समूहास तुम्ही सांगा की "बाबांनो तुम्ही प्लॅटफॉर्मवर नीट वेळ घालवलात तर आलेल्या गाडीत तुम्हाला छान सुविधा मिळतील, आणि तुम्ही नंतर अशा ठीकाणी पोहोचाल की तुम्हाला तिथे खूप खूप आनंद मिळेल आणि मग तुम्हाला इतरत्र कुठे जायची गरज राहणार नाही (मोक्ष). पण तेच तुम्ही इथे नीट वागला नाहीत तर मात्र तुम्हाला असेच एका स्टेशनवरुन दुसर्‍या स्टेशनवर प्रवास करत रहावा लागेल...प्रत्येक स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर पुन्हा पुन्हा गाडीची वाट बघत रहावं लागेल. खरतर आता या स्टेशनवर येण्यापुर्वी देखील तुम्ही दुसर्‍या स्टेशनवर वाट पहात होतात, आणि मग तुमची गाडी येवून तुम्हाला या स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर सोडून गेलीय... आता तुम्हाला यातलं काही आठवत नाही ही गोष्ट वेगळी. पण माझा अभ्यास खूप आहे. मी सांगतो हे असंच आहे. तुम्ही स्टेशनमास्तरला पाहिलं नाहीये. पण विश्वास ठेवा तो अस्तित्वात आहे. तो प्रत्येकाच्या गाड्याचे वेळापत्रक बनवत आहे" सध्या इतके पुरे :) मकले बाबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 01/05/2017 - 08:18 नवीन
माझ्या मते आयुष्य हे एक टाईमपास आहे. अगदी हेच एका धर्माचे तत्वज्ञान आहे, त्याच्या मते गाडीचे गंतव्यस्थान हेच स्थायी जीवन आहे :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक गुरुवार, 01/05/2017 - 08:23 नवीन
कोणता धर्म ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 01/05/2017 - 08:54 नवीन
बाबांनो तुम्ही प्लॅटफॉर्मवर नीट वेळ घालवलात तर आलेल्या गाडीत तुम्हाला छान सुविधा मिळतील, आणि तुम्ही नंतर अशा ठीकाणी पोहोचाल की तुम्हाला तिथे खूप खूप आनंद मिळेल आणि मग तुम्हाला इतरत्र कुठे जायची गरज राहणार नाही (मोक्ष) मोक्ष म्हणजे डेस्टीनेशनला मजा येईल हा वादा नाही. आत्ता, इथे, रोजच्या जगण्यात मजा येईल ही ग्वाही. मृत्यू सुद्धा तुम्हाला विचलीत करणार नाही ही निश्चिंतता. कारण तुम्ही विदेह आहात, हा अनुभव. पण तेच तुम्ही इथे नीट वागला नाहीत तर मात्र तुम्हाला असेच एका स्टेशनवरुन दुसर्‍या स्टेशनवर प्रवास करत रहावा लागेल...प्रत्येक स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर पुन्हा पुन्हा गाडीची वाट बघत रहावं लागेल. खरतर आता या स्टेशनवर येण्यापुर्वी देखील तुम्ही दुसर्‍या स्टेशनवर वाट पहात होतात, आणि मग तुमची गाडी येवून तुम्हाला या स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर सोडून गेलीय... आता तुम्हाला यातलं काही आठवत नाही ही गोष्ट वेगळी. पण माझा अभ्यास खूप आहे. मी सांगतो हे असंच आहे. तुम्ही स्टेशनमास्तरला पाहिलं नाहीये. पण विश्वास ठेवा तो अस्तित्वात आहे. तो प्रत्येकाच्या गाड्याचे वेळापत्रक बनवत आहे" ही आस्तिकांची किंवा सो कॉल्ड धार्मिकांची चलाखी आहे. स्टेशन मास्तरचा धसका घालून सगळ्यांना लाईनत ठेवण्याचा तो प्रकार आहे. बाकी, आयुष्य हा एक टाईमपास आहे, यात वाद नाही. टाईमपास म्हणजे स्वतःच्या मर्जीनं जगणं. असा टाईमपास करायचा ऑप्शन किती जणांकडे आहे ? तो निर्माण करण्याचा मार्ग म्हणजे मोक्ष. तो मिळवायचा मार्ग म्हणजे अध्यात्म.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक गुरुवार, 01/05/2017 - 10:06 नवीन
टाईमपास म्हणजे स्वतःच्या मर्जीनं जगणं. असा टाईमपास करायचा ऑप्शन किती जणांकडे आहे ? तो निर्माण करण्याचा मार्ग म्हणजे मोक्ष. तो मिळवायचा मार्ग म्हणजे अध्यात्म.
मोक्ष , अध्यात्म याबाबत माझा काही मुळातून अभ्यास नाही अ..फक्त ऐकीव माहिती आहे. पण तुम्ही म्हणताय त्या प्रमाणे स्वतःच्या मर्जीने जगता येणे हे धेय्य --> हे धेय्य गाठणे म्हणजेच मोक्ष --> मोक्ष मिळविण्याचा मार्ग म्हणजे अध्यात्म मग मला वाटतंय की निरिश्वरवादाशिवाय अध्यात्म अशक्य आहे. कारण ईश्वर असला की त्याचे नियम आले, त्याने घालून दिलेले (!!) टार्गेट्स पुर्ण करणं आलं, झालंच तर तो शेकडो CCTV cameras मधून आपल्यावर लक्ष ठेवूण असणार.. मग कुठलं आलंय स्वातंत्र्य !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 01/05/2017 - 11:40 नवीन
ईश्वर ही सुद्धा एक धारणाच आहे , त्यामुळे `निरिश्वरवादाशिवाय अध्यात्म अशक्य आहे', हे बरोबरे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 01/05/2017 - 06:44 नवीन
मागेही एकदा कुठल्यातरी धाग्यावर लिहिले होते. प्रत्येक वेळी आस्तिक नास्तिक, निरिश्र्वरवादी असली लेबले कशाला हवी आहेत? माझ्या मते या काही परस्पर विरोधी बाजू नाहीच आहेत. ही तर इश्वराच्या शोधाच्या मार्गावरील वेगवेगळी स्टेशन्स आहेत. आजचा आस्तिक हा उद्याचा नास्तिक असणार आहे आणि नास्तिक अज्ञेयवादी होणार आहे. आणि कदाचित पुढे अजुनही काही. ही संक्रमणे सुध्दा याच क्रमाने होतील असेही काही नाही. आजचा कट्टर नास्तिक उद्या एखाद्या देवळाच्या रांगेत सापडू शकतो. आपल्यातला प्रत्येकजण कधि ना कधितरी या आवस्थांमधून गेलेला असतोच. या प्रत्येक आवस्थेचे स्वतःचे महत्व आहे. त्यामूळे कुठलीच अवस्था श्रेष्ठ मानण्याचे कारण नाही की कुठली कनिष्ठ मानण्याचे. दुसर्‍याच्या अवस्थेबद्दल ना त्याला हिणवायची गरज आहे ना करुणा दाखवण्याची. किंवा स्वतःच्या एखाद्या आवस्थेबद्दल ना अभिमान बाळगायची गरज आहे ना न्युनगंड बाळगण्याची. स्वतःची आवस्था श्रेष्ठ मानून उगाच दुसर्‍याला आपल्या आवस्थे मधे ओढायचा प्रयत्न करणे चूकीचे आहे आणि स्वतःच्या आवस्थेबद्दल न्युनगंड बाळगून उगाच कुठल्यातरी स्वयंघोषीत महात्म्याच्या चरणी लोळण घेणे सुध्दा तितकेच चुक आहे. कोणतीच आवस्था आयुष्यभर टिकणार नाही हे सर्वप्रथम लक्षात घेतले पाहिजे. आणि हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा मग आपल्याला सध्या आपण ज्या आवस्थेत आहोत त्या आवस्थेचा मनमुराद आनंद लुटता येईल. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री गुरुवार, 01/05/2017 - 07:17 नवीन
अहो पैजारबुवा, "अन्तिम" शोधाच्या मार्गावरील वेगवेगळी स्टेशन्स आहेत असे म्हणायचे होते का तुम्हाला? कारण "इश्वराच्या" शोधाच्या मार्गावरील......" म्हटले की उत्तर डोळ्यापुढे ठेऊन गणित सोडवायला बसल्यागत वाटते. "कोणतीच आवस्था आयुष्यभर टिकणार नाही हे सर्वप्रथम लक्षात घेतले " तरी सन्क्रमणान्चा अभ्यासही आनन्ददायी असतोच की.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री गुरुवार, 01/05/2017 - 09:27 नवीन
भौतिकशास्त्रात सापेक्षता सिद्धान्ताचा विकास होण्यापूर्वी प्रकाशाच्या वेगमर्यादेने घातलेले कोडे समाधानकारकरीत्या सोडविता यावे यासाठी तसेच स्थल व कालाचे विभिन्नत्व आणि त्यापैकी प्रत्येकाचे केवलत्व प्रस्थापित करता यावे यासाठी "ईथर" नामक काल्पनिक द्रव्याचा "शोध" जसा तत्कालीन भौतिक शास्त्रज्ञाना लावावा लागला ...त्याप्रमाणेच ईश्वरवादातील अनेक तार्किक त्रुटिवर मात करण्यासाठी ईश्वरवाद्याना कर्म-सिद्धान्ताचा "शोध" लावावा लागला. फरक इतकाच की सापेक्षता सिद्धान्ताचा विकास झाल्यावर ईथर गरजेअभावी भौतिक शास्त्रातून हद्दपार केले गेले, मात्र कर्म-सिद्धान्त भलताच सोयिस्कर असल्यामुळे टिकून आहे व दीर्घायुष्यीही ठरेल.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 01/05/2017 - 09:49 नवीन
सापेक्षता सिद्धान्ताचा विकास झाल्यावर ईथर गरजेअभावी भौतिक शास्त्रातून हद्दपार केले गेले, याच्यावर थोडा लाईट मारु शकाल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री
स
संदीप डांगे गुरुवार, 01/05/2017 - 15:26 नवीन
चला, किमान गाण्याच्या बेचव भेंड्यांपेक्षा हे बरंय!
  • Log in or register to post comments
R
Ram ram गुरुवार, 01/05/2017 - 16:07 नवीन
मी कधी आस्तिक बनू पाहतो पण जमत नाही हे थोतांड आहे असे आतून वाटत राहते
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 01/05/2017 - 17:04 नवीन
नास्तिक असण्यात मिरवण्यासारखे काही नाही आणि आस्तिक असण्यात लाज वाटण्यासारखे काही नाही. हे आयुष्याकडे बघण्याचे दोन दृष्टीकोन आहेत जे परिस्थिती, संस्कार आणि अभ्यास यांनी घडत असतात. प्रत्येक व्यक्ती आपलं जीवन सुखी व्हावं यासाठी धडपडत असते. नास्तिक व्यक्ती ही धडपड करताना स्वतःवरील श्रद्धेचा आधार घेते तर आस्तिक व्यक्ती याला इतर बाह्य गोष्टींवरील श्रद्धेची जोड देते. मार्ग कोणताही असो मात्र या मार्गावरुन चालताना आपली स्वतःकडून आणि इतरांकडून फसवणूक होऊ नये याची काळजी घेतली की झालं.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 01/06/2017 - 04:07 नवीन
नास्तिक व्यक्ती ही धडपड करताना स्वतःवरील श्रद्धेचा आधार घेते तर आस्तिक व्यक्ती याला इतर बाह्य गोष्टींवरील श्रद्धेची जोड देते
इतका संत साहित्याचा वाचन/ अब्यास करूनही तुम्हाला ईश्वर / परमात्मा हि " बाह्य " गोष्ट वाटते ? अरेरे। एकदम मुक्ताईचा संवाद आठवला इतकी 1400 वर्षे तपस्या करून चांगदेव अजून ह्या पत्रा सारखेच कोरे राहिलेत कि =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Fri, 01/06/2017 - 04:22 नवीन
=)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
अ
अनन्त्_यात्री Fri, 01/06/2017 - 05:21 नवीन
ज्याच्या अस्तित्वाबाबत आस्तिकान्चीही अशी गोची होते: . . चारी (वेद) श्रमले,परन्तु न बोलवे काही साही (दर्शने) विवाद करीता, पडली प्रवाही . . नास्तिक तर त्याला मुदलातच नाकारतात. तेव्हा ह्या दुपेडी धाग्याची कताई चर्चेच्या चरख्यातून कायमच करता येईल....
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 01/07/2017 - 17:15 नवीन
संजय क्षीरसागर,
ईश्वर ही सुद्धा एक धारणाच आहे , त्यामुळे `निरिश्वरवादाशिवाय अध्यात्म अशक्य आहे', हे बरोबरे !
निरीश्वरवाद हीसुद्धा एक धारणाच आहे ना? मग ती पकडून अध्यात्म कसं बरं साधलं जाईल? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा