Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वेडे'कर'णारी बेडेकर मिसळ

स
सरनौबत
गुरुवार, 04/13/2017 - 15:34
💬 85
पुण्यातील रविवार सकाळ. खरं तर ही वेळ म्हणजे 'सकाळ' च्या बातम्या वाचत (चितळे च्या दुधाचा) चहा पीत आता ब्रेकफास्ट ला रूपाली, गुडलक आणि बेडेकर ह्यापैकी कुठे जायचं हे ठरवण्याची वेळ. पण बायको सुद्धा बरोबर येणार असेल तर हा प्रश्न सहज सुटतो (तिच्या इच्छेनुसार जातो. सकाळी सकाळी वाद कशाला ?!) मित्राबरोबर जायचं असेल तर मग भरपूर चर्चा होऊन ठिकाण निश्चित होतं. गेली ४ वर्षे मस्कत ला नोकरीनिमित्त स्थायिक असल्याने आता मात्र रविवार हा ऑफिस चा पहिला दिवस असतो (इकडे शुक्र -शनि वीकएंड!) पुण्यातील मित्रांच्या भाग्याचा हेवा करीत गप-गुमान ऑफिस ला जावं लागतं... तेव्हा बऱ्याच वेळा मन 'बेडेकर मिसळ' च्या आठवणीत रमतं. पहिल्यापासूनच भेळ आणि मिसळ ह्या दोन्ही 'ळ'कारान्त पदार्थांवर विशेष प्रेम. पक्का पुणेकर असलो तरी 'बेडेकर नाही तर, कुठेच नाही' असा माझा पुणेरी बाणा नाहीये. खरंतर ‘बेडेकर पेक्षा भारी मिसळ कुठे मिळते’ ह्यासाठी अनेक ठिकाणं पालथी घातली. पुण्यातील रामनाथ, श्री, श्रीकृष्ण, काटाकिर्र ह्या सुप्रसिद्ध ठिकाणी जाऊन मिसळ खाल्ली. मित्रांच्या आग्रहावरून डेक्कन वरच्या वाडेश्वर; अगदी टिम्बर मार्केट, पर्वती इंडस्ट्रियल इस्टेट ला देखील गेलो. कोल्हापूरच्या फडतरे, खासबाग, बावडा येथील मिसळ; शिरवळ ची श्रीराम मिसळ, सातारा हायवे येथील ‘विरंगुळा’ पासून पुणे-मुंबई हायवे वरील श्री दत्त पर्यंत सर्व ठिकाणांना भेटी दिल्या. पण ह्या मिसळी हृदयात ...सॉरी जिभेवर स्थान मिळवू शकल्या नाहीत. कुठे अति तिखट, तर कुठे तर्री (रस्सा) बेचव, तर अनेक ठिकाणी मिसळीच्या मानाने बटाटा भाजी चं proportion गंडलेलं. कुठे नुसत्या फरसाण वर रस्सा टाकून फसवणूक तर काही ठिकाणी मिसळी बरोबर चक्क गोडसर पाव!! रविवारी सकाळी ९ नंतर कधीही गेलं तरी ‘बेडेकर’ बाहेर कायम प्रचंड गर्दी! सुट्टी मुळे ऑफिस चा ट्रॅफिक नसल्याने कोथरूड वरून ‘बेडेकर’ ला १५ मिनिटात पोचल्याचा आनंद; बाहेर तुडुंब वेटिंग पाहिलं कि कुठल्या कुठे नाहीसा होतो. मग आधी मिसळीला 'नंबर' लावून Bike साठी पार्किंग शोधण्याची कसरत. अनेक लोकं (बापाचा रस्ता असल्यासारखे!) साईड-स्टँड वर गाड्या लावतात. मग त्यांच्या (नावाने शिव्या घालत) १-२ गाड्या मेन स्टॅन्ड वर लावून आपली गाडी त्यात घुसवायची. मग बाहेर 'ताट'कळत मिसळीच्या 'ताटा'ची प्रतीक्षा. बाहेर उभे राहून आत बसलेल्या लोकांना मिसळ चापतांना बघणे फार अवघड. मग ते frustration बाहेर काढण्यासाठी 'इतके पैसे कमावतात तरी बाजूची जास्त जागा का नाही घेत, कोथरूड ला branch का नाही काढत, कांद्याचे एक्सट्रा पैसे का लावतात, मराठी माणूस धंद्यात मागे का' असले परिसं'वाद'. २०-२५ मिनिटे वाट पाहिल्यावर एकदाचा आपला नंबर लागला कि ह्या चर्चेला आपोआपच पूर्णविराम मिळतो. काउंटर कडे जात असताना उजवीकडे लालभडक तर्री मोठ्या पातेल्यात उकळताना दिसते आणि जीव (त्या) भांड्यात पडतो. मिसळीच्या प्लेट्स घेऊन टेबलाशी बसलो कि स्टीलच्या मग मधली तर्री कधी एकदा आपल्या प्लेट मध्ये येते असं होतं. पोह्याचा खुसखुशीत चिवडा, मटकीची उसळ, बटाट्याची भाजी, जाड शेव आणि बारीक चिरलेला कांदा ह्या मिश्रणावर ती 'जादूई' तर्री ओतल्यावर स्वर्ग दोन बोटे उरल्याचा भास होतो. डाव्या हाताने पाव त्या रश्यात बुडवून त्याचा द्रोणासारखा आकार करून उजव्या हातातल्या चमच्याने त्यात मिसळ भरून पहिला घास खाल्ल्यावर जीवनाचे सार्थक झाल्यासारखं वाटतं. मग त्यावर १-२ चमचे तर्री प्यायल्यावर ब्रह्मानंदी टाळी लागते. 'ह्याचसाठी केला होता अट्टाहास'!!! मालक (पुणेरी असून देखील!) प्रेमाने ताक, लिंबू सरबत, कोकम इत्यादीचा आग्रह करतात. पण ह्या स्वर्गीय चवीत इतर काहीच ‘मिसळू’ नये असं वाटतं. म्हणून दरवेळी मी त्यांना नम्रपणे नकार देतो. पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे बायको देखील 'बेडेकर मिसळ प्रेमी' मिळाली. Hygiene आणि ambience च्या भ्रामक कल्पनेमुळे बेडेकर ऐवजी 'वाडेश्वर' ला मिसळ खाऊ म्हणणाऱ्या काही मित्रांच्या बायका पाहिल्या कि त्यांची कीव आणि स्वतः चा हेवा वाटतो. वेळेअभावी कधीतरी बेडेकर मिसळ पार्सल करून घरी आणून खाणे ठीक आहे. पण त्याची खरी मजा तिथल्या अरुंद टेबलावर (समोर सर्वस्वी अनोळखी माणसासमोर बसून!) खाण्यात आहे. मिसळ तिखट लागल्यास ताक पिण्यापेक्षा थोडा वेळ तिखटपणा सहन करून मग गरम चहा प्यायला तर तो अगदी 'अमृततुल्य' लागतो. तिखट जिभेवर गरम चहाची ‘किक’ किमान अर्धा तास तरी राहते. आता पुण्यात सुट्टीपुरतं थोडेच दिवस येणं होतं. त्यामुळे कमी दिवसांत सगळ्या आवडीच्या ठिकाणांना न्याय देणे अवघड होऊन बसतं. म्हणून आता आधी बेडेकर मिसळ, मग रुपालीत फिल्टर कॉफी आणि नंतर डेक्कनला जरा टाईम पास करून जाता जाता 'गुडलक' मध्ये चहा असे एका दगडात तीन पक्षी मारतो. ह्या पृथ्वीतलावर मिसळ अनेक ठिकाणी मिळते, पण ज्याच्यापुढे 'कर' जोडावे अशी फक्त बेडे'कर'.

प्रतिक्रिया द्या
21859 वाचन

💬 प्रतिसाद (85)
म
मोदक गुरुवार, 04/13/2017 - 15:44 नवीन
असहमत.
  • Log in or register to post comments
उ
उपेक्षित गुरुवार, 04/13/2017 - 16:38 नवीन
असहमत शी सहमत... पुर्वी अलका टोकिज च्या समोर बटाटा भाजी आणि झटका मिसळ मिळायची आयुष्यात खाल्लेली सर्वात बेस्ट मिसळ होती ती आता बंद झाले आहे ते हॉटेल :( बाकी बेडेकर/ श्री वगेरेला मिळणारी मिसळ अत्यंत सपक असते आणि रामनाथची कई च्या कै तिखट असते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
अ
अनुप ढेरे गुरुवार, 04/13/2017 - 15:46 नवीन
वाह मस्तं लिहिलय. पण लोक आता ही खरी मिसळच नाही वगैरे पिंका सुरू करतील.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 04/13/2017 - 15:49 नवीन
मस्त लिहिलंय.
  • Log in or register to post comments
स
सुमीत गुरुवार, 04/13/2017 - 16:50 नवीन
मिसळ ला चव पाहिजे ती अशी "बेडेकर" सारखी. तिख्टाचा जळजाळाट म्हणजे मिसळ नाही.
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 04/13/2017 - 16:51 नवीन
बेडेकरची मिसळ म्हणजे पाणचटाहूनी पाणचट अशा बर्‍याच लोकांकडून पोचपावत्या मिळाल्याने अजूनतरी त्या वाटेला गेलो नाहीय.
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 04/13/2017 - 17:40 नवीन
लेखन आवडलं. त्यातील भावनेशी सहमत. आता मिसळ करतेच! खूप दिवस झाले खाल्ली नाही. मुलाला आवडत नाही म्हणून मग कमीवेळा केली जाते. आधीच मिसळीच्या साहित्याची, पदार्थांची जमवाजमवी खूप असते, त्यात आम्हा दोघांसाठी मिसळ व मुलासाठी वेगळे काहीतरी करण्यासाठी तेवढा वेळ व शक्ती हवी. ;) मला बेडेकरांची मिसळ आवडते. आता पूर्वीपेक्षा चवीत फर पडलाय. तसेच मागील भारतवारीत प्रभाचा ब वडा खाल्ला व आता कुठला दुसरा खायला नको वाटतो. त्यांची मिसळही आवडली होती पण फार लवकर उपहारगृह बंद करतात. लक्षुमीरोडवरील, तुबामधील खरेदी आटोपून (आता खरेदी म्हणजे एखादा शर्ट, लेंग्याची नाडी, पर्सचा तुटलेला पट्टा दुरुस्ती, कुकरचा व्हॉल्व वगैरे) चालत प्रभाला येईस्तोवर ते बंद झालेले असते.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे गुरुवार, 04/13/2017 - 18:41 नवीन
प्रभाचा वडा बेष्टच. पण मालक तितकाच तिरसट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Fri, 04/14/2017 - 23:48 नवीन
तसे कॉम्बिनेशनच असावे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
स
सरनौबत Fri, 04/14/2017 - 10:06 नवीन
ग्राहक शक्यतो येऊ नयेत ह्याची पूर्णपणे खबरदारी घेतात प्रभा वाले. रविवारी बंद, इतर दिवशी १-२ तासात बटाटे वडा संपतो, वड्या बरोबर चटणी वगैरे काही नाही. पण इतकं असून देखील मी सुद्धा तिथेच वडा खायला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Fri, 04/14/2017 - 23:56 नवीन
वड्याबरोबर चटणी नाही तसेच वड्याच्या भाजीत हळद नाही वगैरे गोष्ती मीही पहिल्यांदा अनुभवल्या तरी व्यसन लागावं असा वडा आहे हे नक्की. ;) तेथील मालकांना माझ्या वडिलांनी त्यांच्या लवकर बंद होणार्‍या वेळांबद्दल विचारले असता त्यांनी निदान त्यादिवशी तरी बर्‍या आवाजात उत्तर दिले. तेथील ट्रॅफिकची मला कल्पना नाही पण मालक म्हणाले की ट्रॅफिक जॅम, पार्किंगला जागा नसणे या कारणाने ग्राहक तिथे थांबेनासे झाले. त्यांचे पदार्थ वाया जाऊ लागले. त्यांच्या म्हणण्यानुसार रोजचे पन्नास पन्नास वडे, पातेली भरून इतर पदार्थ वाया जायचे व लोक म्हणायचे की पार्किंग नाही तर कसे येणार. यावर सध्यातरी कोणाकडेच उपाय नाही. मग त्यांनी त्यांचे हिशोब घालून तेवढेच पदार्थ तयार करायला सुरुवात केली व दुकान बंद करून जायला लागले. वेळेच्या गणिताला नावे ठेवत का होईना ग्राहक येतातच, व्यवसाय आवश्यक तेवढा होतोच आहे. आता लहानसे उपहारगृह पार्किंगची व्यवस्था कशी करणार हा प्रश्न आहे हे पटले तरी चवीसाठी मला तो गैरसोयिचा वाटतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सरनौबत
स
सरनौबत Sat, 04/15/2017 - 09:26 नवीन
अगदी खरंय. इतर अनेक ठिकाणचे वडा-पाव गरमा-गरम असल्यामुळे आणि चटणी वगैरे मुळे चमचमीत लागतात. पण प्रभाचा वडा तसा नाही. आलं लसूण मुळे सारणाची चव उत्तम; शिवाय वरील बेसनाचे आवरण देखील अति जाड नाही. पार्किंग च्या समस्येमुळे झालेली समस्या ऐकून वाईट वाटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
म
मृत्युन्जय गुरुवार, 04/13/2017 - 17:58 नवीन
वाह वाह. बेडेकर म्हणजे अप्रतिम मिसळ. दहा गावच्या मिसळ खाउन झाल्यावर असे प्रामाणिक मत आहे की बेडेकर पेक्षा उत्तम मिसळ कुठेही मिळत नाही,. याचा अर्थ बाकीचे पाणचट मिसळ देतात असे काही म्हणणे नाही. पण बेडेकर म्हतल्यावर जी खास चव जिभेवर येते ती कुठेच नाही. बाकी हे मात्र मान्य केले पाहिजे की पुण्याबाहेरच्या ७५% (विदा उपलब्ध नाही. तरी मागितल्यास अपमान केला जाइल) लोकांना बेडेकर आवडत नाही आणि पुण्यातल्या ७५% पेक्षा जास्त लोकांना बेडेकरच सर्वोत्कृष्ट वाटते (विदा उपलब्ध नाही. तरी मागितल्यास अपमान केला जाइल)
  • Log in or register to post comments
प
पद्मावति गुरुवार, 04/13/2017 - 18:12 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments
म
मितान गुरुवार, 04/13/2017 - 18:36 नवीन
लेखन आवडले !
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 04/13/2017 - 19:00 नवीन
अगदी, अगदी!
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर गुरुवार, 04/13/2017 - 19:17 नवीन
बेडेकरांच्या मिसळीविषयी असहमत. लैच पांचट! श्रीची लै बरी त्यापेक्षा. रामनाथला 'कडक'चा माज ना करता लाईट किंवा मिडीयम घेतली तर चव चांगलीच आहे. काटा किर्रर्र चांगली आहे, तीपण आपल्या वकुबानुसार लाईट किंवा मिडीयम घ्यावी. सातारा रस्त्यावर वाळवेकर लॉन्स च्या गल्लीत पाच वर्षांपूर्वी एक गाडी होती, त्याची भजी अन मिसळ मस्त होती. आता आहे की नाही माहिती नाही. इथेच कौतुक ऐकलेली 'मंगला'समोरची मामा मिसळसुध्दा बेडेकरांच्या पेक्षा पांचट! नाशकाच्या निखारा मिसळचं लै कौतुक ऐकलंय, ती एकदा खायचीये. मी हडपसरच्या कॉलेजात असताना महादेव नगर मध्ये एक हनुमान हॉटेल होते. ती मी खाल्लेली ब्येष्ट मिसळ! आता हनुमानकाका पण नाहीत अन ते हॉटेल पण नाही.
  • Log in or register to post comments
र
रुपी गुरुवार, 04/13/2017 - 19:17 नवीन
छान लिहिलंय.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 04/14/2017 - 04:08 नवीन
कित्ती वर्ष झालीत असं वाटतं खाऊन! :) तिथले मालक आवर्जून विचारायचे ते आठवलं "अजून एक मिसळ देऊ का दोघात अर्धी अर्धी? गोड ताक आहे थंडगार देऊ का" किंवा "ताजं दही आहे घट्ट" किंवा कोकम सरबत आहे" मस्त आठवणी.... मिसळ म्हणजे फक्त लाल भडक रस्सा किंवा फक्त जीभ जाळणारी तिखट तर्री असेच असते अशा समजुतीने जाणार्‍या लोकांना ती बहुदा आवडणार नाही. (आणि खरं तर एका मिसळीची दुसर्‍याशी तुलना नकोच. खवय्याने कसे सगळ्यांचा आस्वाद घ्यावा.) (बेडेकर मिसळ प्रेमी) रंगा
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Fri, 04/14/2017 - 05:26 नवीन
वेगळी चव म्हणून आवडली होती पण नाशकातल्या मिसळी खाल्ल्यावर त्याच्यासारखं काहीच नाही हे समजलं. शिवाय मामलेदार हा एक जबरदस्त आॅप्शन जवळ असताना कशाला दुसरीकडे जायचं?कोल्हापूरची मिसळ पण भारी असते असं ऐकलंय पण तांबडा पांढरा सोडून मिसळ खाणं शक्य नाही.
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 04/14/2017 - 06:56 नवीन
पत्ता द्या.. (नाशिकच्या मिसळीचा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
आ
आषाढ_दर्द_गाणे Fri, 04/14/2017 - 05:47 नवीन
लेखन आवडलं! असं चवीनं खाणे आणि तितक्याच रसिकतेने वर्णन करणे एकदम भारी! त्याउप्पर असहमती वगैरे दाखवणं म्हणजे फारच उच्च संभाषा!
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 04/14/2017 - 06:55 नवीन
अहो.. आंबट चव असते हो त्या मिसळीला. मस्त फरसाण, बाकी मालमसाला, कच्चा कांदा, रसाळ लिंबू असे सगळे समोर असताना त्यात सांबार घातले तर कसे वाटेल..? तसे अनुभवले आहे म्हणून असहमती दर्शवली (आणि प्रतिसादात पुढील पंचनामा केला नव्हता) असो, प्रत्येकाची आवड असते त्याचाही आदर आहेच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आषाढ_दर्द_गाणे
स
सरनौबत Fri, 04/14/2017 - 09:54 नवीन
प्रस्तुत लेखाचा उद्देश 'तुमच्या श्रद्धास्थानांनां धक्का पोचवणे' हा नसून मला ज्या प्रकारची मिसळ आवडते त्याचे वर्णन आहे. फक्त बेडेकर मिसळ जर सर्वांना आवडणारी असती तर तिकडे ३-४ तास थांबून सुद्धा बसायला जागा मिळाली नसती. लोकांनी सजेस्ट केलेल्या आणि मला माहिती नसलेल्या 'मिसळी' मी जरूर try करेन. तसेच लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे म्हणून 'तिखट' मानून एन्जॉय करा कि राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Fri, 04/14/2017 - 13:16 नवीन
पहिला प्रयत्न आहे हे माहिती नव्हते. चांगले लिहिले आहे. ..आणि याबद्दल तुम्हाला एक मिसळ लागू.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सरनौबत
उ
उपेक्षित Fri, 04/14/2017 - 13:52 नवीन
प्रत्येकाच्या वयक्तिक आवडीचा पूर्ण आदर आहे हे मगाशी लिहायचे राहिलेच राव...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सरनौबत
क
किसन शिंदे Fri, 04/14/2017 - 06:24 नवीन
बेडेकर मिसळ अजून खाल्ली नसल्याने काही बोलता येणार नाही. हं..लेख मात्र मस्त लिहीलाय.
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 04/14/2017 - 08:13 नवीन
होय, पण आता कौतुक > निंदा झाल्याने उत्सुकता वाढलीये. (तरी मामलेदारला तोड नाहीच)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
क
किसन शिंदे Fri, 04/14/2017 - 08:15 नवीन
(तरी मामलेदारला तोड नाहीच)
बाडिस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
प
पाटीलभाऊ Fri, 04/14/2017 - 06:52 नवीन
मस्त वर्णन केलंय...!
  • Log in or register to post comments
ल
लाडू Fri, 04/14/2017 - 06:59 नवीन
अगदीच सहमत. आता रविवारी सकाळी जायलाच पाहिजे बेडेकर ला
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 04/14/2017 - 07:15 नवीन
मिसळपाव बद्दल प्रत्येक गावातला माणूस अशी मिसळ जगात कुठे मिळत नाही असे म्हणतो आणि प्रत्येक मिसळ तशी युनीकच असते. पुण्यात रामनाथ, काटा किर्र, मधूची गाडी, अतृप्त बुवांनी सांगितलेली मिसळ असे सगळे प्रकार ट्राय करून झाले. सांगली, नगर, कोल्हापूर, सरदवाडी, पिंपरी, चिंचवड, चाकण आणि सोमाटणे फाटा वगैरे ठिकाणेही धुंडाळून झाली. नेवाळे सारखी जहाल तिखट मिसळही खाल्ली (ही मिसळ खाण्यापेक्षा तेलात तिखट कालवून ते प्यावे - हे वैयक्तीक मत) सध्या आवडली आहे ती मोरया गोसावी जवळील कवी बंधूंची बालाजी मिसळ. बादवे - शुभम कॉम्प्लेक्स चिंचवड, येथे तीन प्रकारचा रस्सा असलेली एक मिसळ सुरू झाली आहे. ती पण आवडली. पण अजून शोध सुरू आहे तो कोल्हापूरात मिळणार्‍या मटणाच्या रस्श्यातल्या मिसळीचा - ही मिसळ कोणाला माहिती असेल तर प्लीज सांगा - लै उपकार होतील. ******* एकदा कोकणातून परत येताना वेळेचे गणित चुकले आणि जेवणासाठी वेळ घालवणे शक्य नव्हते. म्हणून एका हॉटेलात "मिसळपाव.. फक्त तर्री ऐवजी चिकनचा तांबडा रस्सा" अशी तिरपागडी ऑर्डर दिली. तो गल्ल्यावरचा मालकही साशंक नजरेने "चांगली लागेल..?" असे विचारत होता. पण काय सांगू म्हाराजा... गरम गरम तांबडा रस्सा, पाव, फरसाण आणि कांदालिंबू... झक्कास समीकरण जुळले. नंतर मी, बुलेट, एक साधे पान आणि ताम्हिणी घाट... व्वाह..!!
  • Log in or register to post comments
स
सरनौबत Fri, 04/14/2017 - 10:00 नवीन
जाणकार लोकं सांगतात कि अति तिखट मिसळ खाल्ली कि तेव्हा उजव्या हाताला आणि नंतर डाव्या हाताला वास येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
सुबोध खरे Fri, 04/14/2017 - 16:25 नवीन
एक परदेशी नागरिक कोल्हापुरी झणझणीत मिसळ खाऊन दुसऱ्या दिवशी म्हणाला कि आता मला कळले कि भारतीय लोक धुवायला पाणी का वापरतात टॉयलेट पेपर वापरला तर तो पेट घेईल -)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सरनौबत
त
तुषार काळभोर Fri, 04/14/2017 - 17:12 नवीन
योगायोगाने परवा गावच्या यात्रेला (आम्ही उरूस म्हणतो), घरी मटण होतं. बऱ्याच वर्षांपासून सवयीप्रमाणे गावातून घरी जाताना गावातली प्राचीन कालीन क्लासिक भेळ घेतली. बाकीच्यांनी मसाला-कांदा कालवून खाल्ली अन मी मटणाच्या रस्स्यात कालवून. मला आवडते. मटकी ऐवजी मटणाचा रस्सा टाकून केलेली भेळ मला जन्नत वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
आ
आषाढ_दर्द_गाणे Fri, 04/14/2017 - 17:35 नवीन
हे कोंबडी/ मटणाचे रस्से घालण्याचं वाचून माझी मिसळीप्रतीची उदासीनता गळून पडून उत्सुकता भलतीच चाळवलेली आहे! माहितीकरता धन्यवाद, करून पाहणेत यील. पण बटाट्याची भाजी मिसळीत घालणे माहित नव्हते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
ह
हतोळकरांचा प्रसाद Sun, 04/16/2017 - 08:04 नवीन
अशात आवडलेली मिसळ म्हणजे अरिहंत, चिंचवड! मस्त टेस्ट. उगाच बचकभर तिखट घालून केलेल्या मिसळी गल्लीबोळात किंवा नाक्यांनाक्यावर सापडतील. बेडेकर पण ओकेओकेच! मागे कालिजात असताना आरटीओ ऑफिसच्या कँटीन मध्ये मिळायची ती मिसळही आवडायची, आता मिळते कि नाही माहित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
द
दिपस्तंभ गुरुवार, 06/08/2017 - 22:13 नवीन
मस्त आहेImage removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
द
दिपस्तंभ गुरुवार, 06/08/2017 - 22:19 नवीन
What are these three samples ? It’s the power of 3 K- Khandeshi, Konkani and Kolhapuri. Khandeshi is mix of garam masalas, jeera (cumin seeds), saunf (fennel seeds) with khandeshi kala masala. Konkani is mix of green chillies which is fried first and then mixed with coriander, pudina as a coolant and spices. Kolhapuri is the sample / tarri which is generally served with misal. 17630161_1430027880353651_1910637583439706226_n Three Samples The misal preparation has matki , chakariphul ( type of garam masala) loads of farsaan and coriander garnishing. Home made papad, curd, and fresh buttered pav is the ideal combination. 17796503_1430027927020313_2123470876452329325_n Misal bowl The three samples are served piping hot and you can ask more for it. The attempt to experiment with three different flavours works quite well. And I think one of the rare places, who have tried to add twist to a sacred food like misal!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपस्तंभ
क
कबीरा Fri, 04/14/2017 - 07:26 नवीन
बेडेकर मिसळ, प्रभा चा बटाटा वडा, पुष्करणी ची भेळ, पूना बोर्डिंग हाऊस च जेवण, बादशाही चा बटाटा टोस्ट, मोतीबागेसमोरचा चहा ह्या गोष्टी अगदी सगळ्यात उत्तम नसल्या तरी ह्या ठिकाणी जाऊन जो एक नॉस्टॅल्जिक असा जो काही एक फील येतो ना आणि तिथे जाऊन खाऊन आल्यावर जी एक तृप्तता मिळते ती गोष्ट नॉन पुणेकरांना नाही कळणार हो.
  • Log in or register to post comments
स
सरनौबत Fri, 04/14/2017 - 09:57 नवीन
अगदी खरंय. वैशाली रूपाली पेक्षा अनेक ठिकाणी डोसा उत्कृष्ट मिळत असेल, पण आपल्याला तिथलाच आवडतो बुआ. ह्याचं कारण मुख्यतः नॉस्टॅल्जिक च आहे ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कबीरा
क
कबीरा Fri, 04/14/2017 - 08:37 नवीन
बाणेर मधील खासबाग, शिरवळ चे येष्टी कॅन्टीन, माणगांव मधील आनंद भुवन ही सुद्धा काही आवडती मिसळ केंद्रे..
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 04/14/2017 - 13:17 नवीन
बाणेर मधील खासबाग पत्ता द्या,...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कबीरा
क
कबीरा Sat, 04/15/2017 - 03:27 नवीन
महाबळेश्वर हॉटेल च्या पुढे पेट्रोल पंप आहे त्याला लागून डावीकडे आत एक रस्ता जातो त्या रस्त्यालाच montreal का काहीतरी एक उंच इमारत आहे त्याचाच तळमजल्याला खासबाग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
उ
उपेक्षित Fri, 04/14/2017 - 13:55 नवीन
माझ्या वयक्तिक अनुभवानुसार बर्याचदा एखाद्या आडबाजूला खंग्री मिसळ / चहा मिळून जातो फ़क़्त नजर शोधक पाहिजे...
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Fri, 04/14/2017 - 15:16 नवीन
कुणी पत्ता सांगेल काय ?
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Fri, 04/14/2017 - 15:17 नवीन
कुणी पत्ता सांगेल काय ?
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 04/14/2017 - 23:45 नवीन
बबनराव, प्रभा विश्रांती गृह, केसरीवाड्यासमोर, नारायणपेठ, पुणे वेळ ही दुपारी साडेचार रात्री साडेआठपर्यंत अशी लिहिली असली तरी सात वाजता सगळा खडखडाट असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
अ
अनुप ढेरे Sat, 04/15/2017 - 04:50 नवीन
सकाळी( विकांताला तरी ) पण चालु असतं. बहुधा ११ पर्यंत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ब
बबन ताम्बे Tue, 04/18/2017 - 13:31 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
  • 1
  • 2
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा