वेडे'कर'णारी बेडेकर मिसळ
पुण्यातील रविवार सकाळ. खरं तर ही वेळ म्हणजे 'सकाळ' च्या बातम्या वाचत (चितळे च्या दुधाचा) चहा पीत आता ब्रेकफास्ट ला रूपाली, गुडलक आणि बेडेकर ह्यापैकी कुठे जायचं हे ठरवण्याची वेळ. पण बायको सुद्धा बरोबर येणार असेल तर हा प्रश्न सहज सुटतो (तिच्या इच्छेनुसार जातो. सकाळी सकाळी वाद कशाला ?!) मित्राबरोबर जायचं असेल तर मग भरपूर चर्चा होऊन ठिकाण निश्चित होतं.
गेली ४ वर्षे मस्कत ला नोकरीनिमित्त स्थायिक असल्याने आता मात्र रविवार हा ऑफिस चा पहिला दिवस असतो (इकडे शुक्र -शनि वीकएंड!) पुण्यातील मित्रांच्या भाग्याचा हेवा करीत गप-गुमान ऑफिस ला जावं लागतं... तेव्हा बऱ्याच वेळा मन 'बेडेकर मिसळ' च्या आठवणीत रमतं.
पहिल्यापासूनच भेळ आणि मिसळ ह्या दोन्ही 'ळ'कारान्त पदार्थांवर विशेष प्रेम. पक्का पुणेकर असलो तरी 'बेडेकर नाही तर, कुठेच नाही' असा माझा पुणेरी बाणा नाहीये. खरंतर ‘बेडेकर पेक्षा भारी मिसळ कुठे मिळते’ ह्यासाठी अनेक ठिकाणं पालथी घातली. पुण्यातील रामनाथ, श्री, श्रीकृष्ण, काटाकिर्र ह्या सुप्रसिद्ध ठिकाणी जाऊन मिसळ खाल्ली. मित्रांच्या आग्रहावरून डेक्कन वरच्या वाडेश्वर; अगदी टिम्बर मार्केट, पर्वती इंडस्ट्रियल इस्टेट ला देखील गेलो. कोल्हापूरच्या फडतरे, खासबाग, बावडा येथील मिसळ; शिरवळ ची श्रीराम मिसळ, सातारा हायवे येथील ‘विरंगुळा’ पासून पुणे-मुंबई हायवे वरील श्री दत्त पर्यंत सर्व ठिकाणांना भेटी दिल्या. पण ह्या मिसळी हृदयात ...सॉरी जिभेवर स्थान मिळवू शकल्या नाहीत. कुठे अति तिखट, तर कुठे तर्री (रस्सा) बेचव, तर अनेक ठिकाणी मिसळीच्या मानाने बटाटा भाजी चं proportion गंडलेलं. कुठे नुसत्या फरसाण वर रस्सा टाकून फसवणूक तर काही ठिकाणी मिसळी बरोबर चक्क गोडसर पाव!!
रविवारी सकाळी ९ नंतर कधीही गेलं तरी ‘बेडेकर’ बाहेर कायम प्रचंड गर्दी! सुट्टी मुळे ऑफिस चा ट्रॅफिक नसल्याने कोथरूड वरून ‘बेडेकर’ ला १५ मिनिटात पोचल्याचा आनंद; बाहेर तुडुंब वेटिंग पाहिलं कि कुठल्या कुठे नाहीसा होतो. मग आधी मिसळीला 'नंबर' लावून Bike साठी पार्किंग शोधण्याची कसरत. अनेक लोकं (बापाचा रस्ता असल्यासारखे!) साईड-स्टँड वर गाड्या लावतात. मग त्यांच्या (नावाने शिव्या घालत) १-२ गाड्या मेन स्टॅन्ड वर लावून आपली गाडी त्यात घुसवायची. मग बाहेर 'ताट'कळत मिसळीच्या 'ताटा'ची प्रतीक्षा.
बाहेर उभे राहून आत बसलेल्या लोकांना मिसळ चापतांना बघणे फार अवघड. मग ते frustration बाहेर काढण्यासाठी 'इतके पैसे कमावतात तरी बाजूची जास्त जागा का नाही घेत, कोथरूड ला branch का नाही काढत, कांद्याचे एक्सट्रा पैसे का लावतात, मराठी माणूस धंद्यात मागे का' असले परिसं'वाद'. २०-२५ मिनिटे वाट पाहिल्यावर एकदाचा आपला नंबर लागला कि ह्या चर्चेला आपोआपच पूर्णविराम मिळतो. काउंटर कडे जात असताना उजवीकडे लालभडक तर्री मोठ्या पातेल्यात उकळताना दिसते आणि जीव (त्या) भांड्यात पडतो. मिसळीच्या प्लेट्स घेऊन टेबलाशी बसलो कि स्टीलच्या मग मधली तर्री कधी एकदा आपल्या प्लेट मध्ये येते असं होतं.
पोह्याचा खुसखुशीत चिवडा, मटकीची उसळ, बटाट्याची भाजी, जाड शेव आणि बारीक चिरलेला कांदा ह्या मिश्रणावर ती 'जादूई' तर्री ओतल्यावर स्वर्ग दोन बोटे उरल्याचा भास होतो. डाव्या हाताने पाव त्या रश्यात बुडवून त्याचा द्रोणासारखा आकार करून उजव्या हातातल्या चमच्याने त्यात मिसळ भरून पहिला घास खाल्ल्यावर जीवनाचे सार्थक झाल्यासारखं वाटतं. मग त्यावर १-२ चमचे तर्री प्यायल्यावर ब्रह्मानंदी टाळी लागते. 'ह्याचसाठी केला होता अट्टाहास'!!!
मालक (पुणेरी असून देखील!) प्रेमाने ताक, लिंबू सरबत, कोकम इत्यादीचा आग्रह करतात. पण ह्या स्वर्गीय चवीत इतर काहीच ‘मिसळू’ नये असं वाटतं. म्हणून दरवेळी मी त्यांना नम्रपणे नकार देतो.
पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे बायको देखील 'बेडेकर मिसळ प्रेमी' मिळाली. Hygiene आणि ambience च्या भ्रामक कल्पनेमुळे बेडेकर ऐवजी 'वाडेश्वर' ला मिसळ खाऊ म्हणणाऱ्या काही मित्रांच्या बायका पाहिल्या कि त्यांची कीव आणि स्वतः चा हेवा वाटतो.
वेळेअभावी कधीतरी बेडेकर मिसळ पार्सल करून घरी आणून खाणे ठीक आहे. पण त्याची खरी मजा तिथल्या अरुंद टेबलावर (समोर सर्वस्वी अनोळखी माणसासमोर बसून!) खाण्यात आहे. मिसळ तिखट लागल्यास ताक पिण्यापेक्षा थोडा वेळ तिखटपणा सहन करून मग गरम चहा प्यायला तर तो अगदी 'अमृततुल्य' लागतो. तिखट जिभेवर गरम चहाची ‘किक’ किमान अर्धा तास तरी राहते.
आता पुण्यात सुट्टीपुरतं थोडेच दिवस येणं होतं. त्यामुळे कमी दिवसांत सगळ्या आवडीच्या ठिकाणांना न्याय देणे अवघड होऊन बसतं. म्हणून आता आधी बेडेकर मिसळ, मग रुपालीत फिल्टर कॉफी आणि नंतर डेक्कनला जरा टाईम पास करून जाता जाता 'गुडलक' मध्ये चहा असे एका दगडात तीन पक्षी मारतो.
ह्या पृथ्वीतलावर मिसळ अनेक ठिकाणी मिळते, पण ज्याच्यापुढे 'कर' जोडावे अशी फक्त बेडे'कर'.
💬 प्रतिसाद
(85)
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर
Fri, 04/14/2017 - 16:20
नवीन
मिसळ खावी ती कोल्हापुरच्या फडतरेंचीच किंवा मग खासबाग.
बेडेकराची गोडसर पांचट कोकणस्थी मिसळ फक्त कोब्रांनाच आवडते असा आमचा कयास आहे.
- Log in or register to post comments
र
रानडेंचा ओंकार
गुरुवार, 06/08/2017 - 07:58
नवीन
कोब्रांना झणझणीत तांबडा पण आवडतो बरं!!!
- Log in or register to post comments
आ
आषाढ_दर्द_गाणे
Fri, 04/14/2017 - 17:37
नवीन
इथे मुंबईतल्या मिसळींवर काही वाचण्यात आले नाही अजून.
एकाच जागा माहीत होती, गिरगावातील सुभाष.
पण त्याची आठवण नाही उरली काही आता.
- Log in or register to post comments
म
मोदक
Fri, 04/14/2017 - 20:53
नवीन
मामलेदारचा उल्लेख आला आहे की वर.
का ठाण्याला मुंबईकर गावकुसाबाहेरचे समजतात? ;)
- Log in or register to post comments
आ
आषाढ_दर्द_गाणे
Fri, 04/14/2017 - 21:04
नवीन
इथे मिपावर मूक संमती कशी दाखवतात?
स्माईली आहे का कुठला?
:दात
- Log in or register to post comments
व
विखि
Fri, 04/14/2017 - 18:23
नवीन
बेडेकर लै आंबट गोड लागते, काटाकिर्र् ठिक, रामनाथ मस्त, नेवाळे नुसतच तिखट करतय, के ए म हॉस्पिटल समोर आप्पाची मिसळ पण चांगलीय ( हिरवा ठेचा पण मिळतो सोबत), कोथरुड शिवाजी पुतळा ची तांबे मिसळ पण खायला हरकत नाय, कर्वे रोड इन्कम टॅक्स गल्लीतली भडाईत मिसळ मस्तय( दुपारी १२ पर्यन्त सम्पुन जाते, जाणार असेल तर लवकर जायच) श्री मिसळ बरीय, तुळशीबाग ची श्रीकृश्न लै गोड( मिसळ चा फील नाय) तशीच वैद्य मिसळ हिरव्या रस्स्याची गोड, कोल्हापुर ची बावडा मिसळ मस्त, फडतरे पण, खासबाग नाय आवडली,
नाशीक ची अंबीका आवड्ली( काळ्या रस्स्याची)
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Mon, 04/17/2017 - 10:25
नवीन
तांबे मिसळ नक्की कुठेशी म्हणायची? इतकी वर्षे कोथरुडात राहुन माहिती नाही. एकदा चाखायलाच हवी.
शिवाजी पुतळ्यापाशी नविन राजमकमल मिसळ सुरु झाली आहे नारायणगावची. ती सुद्धा बरी आहे. पण भक्त होण्याइतकी चांगली नाही वाटली.
बाकी फडतरे बद्दल सहमत. एकदम बेचव मिसळ. खासबाग मात्र आवडते. पण ती देखील थोडीफार पांचट असते कधीकधी.
- Log in or register to post comments
उ
उपेक्षित
Tue, 04/18/2017 - 13:45
नवीन
कोथरूडला तुम्ही छ.शिवाजी पुतळ्याकडून बस stand कडे जी निमुळती गल्ली जाते (जुन्या नीना-रिची दुकानावरून) त्या गल्लीत आत शिरल्या शिरल्या उजव्या हाताला लयी जुनाट दुकान आहे तांबे मिसळ चे
बाकी मिसळ चांगली मिळते जाऊन या एक डाव
- Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया
Sat, 04/15/2017 - 07:52
नवीन
लेख चांगला लिहिलाय. बेडेकरांचे नाव ऐकून एकदा खूप वेळ रांगेत थांबून मिसळ खाल्ली होती. अजिबात आवडली नाही. तसेच गावी जाताना एकदा वेळात वेळ काढून कोल्हापूरला फडतरे मिसळ खाल्ली होती. त्यासाठी काहीही काम नसताना कोल्हापुरात २ तास थांबलो होतो. अतिशय पांचट वाटली फडतरे.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Sat, 04/15/2017 - 08:31
नवीन
मिसळीत--
>>कुठे अति तिखट, तर कुठे तर्री (रस्सा) बेचव, तर अनेक ठिकाणी मिसळीच्या मानाने बटाटा भाजी चं proportion गंडलेलं. >>
।
।
बटाटा भाजी कुठे असते यात?
- Log in or register to post comments
स
सरनौबत
Sun, 04/16/2017 - 13:26
नवीन
तर्री ओतण्यापूर्वी बघा एकदा... डोसा भाजी सारखी भाजी घालतात २ छोटे चमचे. तेवढा दम निघत नसल्यास एकदा काउंटर जवळ उभे राहून बघा, तिकडे समोर मिसळ भरण्याचे काम सुरु असते तिथे दिसेल.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Mon, 04/17/2017 - 05:02
नवीन
हा भाजीचा प्रकार वेगळा वाटला. मारवाडी लोक मिसळ चांगली करतात.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Sun, 04/16/2017 - 16:21
नवीन
बेडेकरांकडे जे मिश्रण मिळते त्याला मिसळ म्हणतात ?? _/\_
- Log in or register to post comments
र
रेवती
Sun, 04/16/2017 - 16:34
नवीन
तुम्हाला त्या पदार्थाला मिसळ म्हणायचे नसल्यास हरकत नाही. नवे नाव द्या.........अन्नपदार्थ असल्याने साजेसे काही सुचवा.
- Log in or register to post comments
N
nanaba
Mon, 04/17/2017 - 06:15
नवीन
मिसळ म्हणजे फक्त लाल भडक रस्सा किंवा फक्त जीभ जाळणारी तिखट तर्री असेच असते अशा समजुतीने जाणार्या लोकांना ती बहुदा आवडणार नाही.
>>अस अजिबात मत नाहिये. नुसती तिखटजाळ मिसळ आवडत नाहीच.
पण बेडेकर अतीच गोड वाटली. बिलकुल आवडली नाही.
- Log in or register to post comments
क
किल्लेदार
Mon, 04/17/2017 - 09:23
नवीन
बेडेकर मिसळीपुढे कर जोडावेसे वाटत नसले तरी तुमच्या लेखाला मात्र कर जोडतो. बाकी "इतकी वर्ष पुण्यात राहून बेडेकर मिसळ कशी खाल्ली नाही ? थू....!!!"अशी निर्भस्यना केली गेली म्हणून एकदा मित्रधर्म पाळायला खाल्ली आणि कशी वाटली मिसळ असे विचारल्यावर मात्र मूग गिळून गप्पा बसलो (मिसळीमध्ये मूग नसून सुद्धा). मिसळीची चव हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न असला तरी मिसळीबरोबर पाव स्लाइस ही कल्पना पण मला पटत नाही. हे म्हणजे भरीत-भाकरीचा चा बेत करायचा आणि भाकऱ्या थापायचा कंटाळा आल्यामुळे भरताशी पोळी खावी लागावी असे वाटते.
थोडक्यात काय तर वेडे करणारी मिसळ कशी खाल्ली नाहीस म्हणून लोकांनी वेड्यात काढू नये इतपत खाण्याइतकीच मला ही मिसळ वाटली.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Mon, 04/17/2017 - 14:16
नवीन
समस्त सांगली कोल्हापूर स्लाइसच खाते.
तिकडे मोठे स्लाईस असतात.
- Log in or register to post comments
स
सरनौबत
Mon, 04/17/2017 - 15:50
नवीन
मिसळ आवडत नसून देखील लेख आवडल्याबद्दल धन्यवाद. स्लाईस / पाव / without पाव ह्या ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे. स्लाईस तर्री ला मस्त शोषून घेते म्हणून मला पाव ऐवजी स्लाईस आवडतो.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Mon, 04/17/2017 - 11:40
नवीन
<<<मिसळीबरोबर पाव स्लाइस ही कल्पना पण मला पटत नाही.>>>
==>> अगदी सहमत..
- Log in or register to post comments
प
पिशी अबोली
Mon, 04/17/2017 - 16:55
नवीन
बेडेकर मिसळ मुळीच आवडलेली नसली, तरी तुमचं लेखन आवडलं.
त्या पत्र्या मारुतीच्या आडोशाला असलेला चहा मात्र आवडतो. बेडेकरची मिसळ थोडीशी कमी सपक असती तर हे कॉम्बिनेशन अतिशय आवडलं असतं..
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Tue, 04/18/2017 - 13:40
नवीन
पत्र्या मारुतीकडून जरा वर गेलं की चौकाच्या अलिकडेही एक चहा कॉफीची गाडी आहे. तेथील कॉफी आणि चहा अत्युत्तम आहे.
- Log in or register to post comments
प
पिशी अबोली
Tue, 04/18/2017 - 16:02
नवीन
कॉफी लवकरच ट्राय केली जाईल. :)
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Tue, 04/18/2017 - 16:26
नवीन
बन्दुक्षणी निवास? क्या बात! जबरदस्त आहे ते.
- Log in or register to post comments
प
पिशी अबोली
Tue, 04/18/2017 - 20:44
नवीन
येस्स.. बंदुक्षणीच.
- Log in or register to post comments
प
पिशी अबोली
Tue, 04/18/2017 - 20:46
नवीन
सॉरी, बन्दुक्षणी.
- Log in or register to post comments
इ
इडली डोसा
Tue, 04/18/2017 - 07:59
नवीन
एका काकांना रस्ता विचारला तर ते म्हणे " तुम्हाला बेडेकरच हवी असेल तर पत्ता सांगतो पण आमच्याकडेही चांगली मिसळ मिळते." =)
मग काय अजुन शोधाशोध करण्यापेक्षा आम्ही तिथेच मिसळ खाल्ली ती श्री मिसळ होती आणि चांगली होती.
बाकी बेडेकर खायचा योग पुन्हा कधी आला नाही.
- Log in or register to post comments
इ
इडली डोसा
Tue, 04/18/2017 - 08:00
नवीन
.
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 04/18/2017 - 15:18
नवीन
=))
- Log in or register to post comments
स
साहेब..
Wed, 04/19/2017 - 07:03
नवीन
लोळ!!
- Log in or register to post comments
क
किरण कुमार
Mon, 06/05/2017 - 09:43
नवीन
खरे तर अत्यंत टूकार प्रकारची मिसळ आहे ती, आवडण्यासारखी एकही गोष्ट नाही , कशात काहीही टाकून सपक पाणी ...........
इतर ठिकाणी झणझणीत तरी मिळतात
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 06/06/2017 - 09:10
नवीन
आणि मिसळीबद्दल म्हणाल तर....
आमची सौ. एकदम अप्रतिम मिसळ बनवते, त्यामुळे हल्ली मुद्दाम मिसळ खायला म्हणून जात नाही. ती मटकीची उसळ वापरते.
असो,
खिम्याचा रस्सा, फरसाणातली पापडी, रतलामी शेव, तळलेले मसूर आणि बारीक चिरलेला कांदा हे मला आवडलेले काँबिनेशन.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 06/09/2017 - 06:48
नवीन
खिम्याचा रस्सा, फरसाणातली पापडी, रतलामी शेव, तळलेले मसूर आणि बारीक चिरलेला कांदा
तों पा सु
केंव्हा बोलावताय खायला ?
- Log in or register to post comments
अ
असंका
Wed, 06/07/2017 - 20:21
नवीन
वेडे'कर'णारी मधले अवतरण चिन्ह नक्की काय सुचवायला वापरलंय?
- Log in or register to post comments
र
रानडेंचा ओंकार
गुरुवार, 06/08/2017 - 07:48
नवीन
बेडेकरांनी मिसळीत वांग घातलेलं बघितलं अन तेव्हाच मनातून बाद केल त्यान्ना. पुण्यात मिसळ आवडली ती 'नाद खुळा' ची, राजाराम पुलावरून डावीकडे वळून कर्वेनगर कडे जाताना आहे. हा माझा अनुभव आहे...
- Log in or register to post comments
स
सप्तरंगी
गुरुवार, 06/08/2017 - 14:38
नवीन
लिखाणाचा पहिलाच प्रयत्न झणझणीत आहे..
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2