अठ्ठावीस लक्ष रुपये
अठ्ठावीस लक्ष रुपये .......यनावाला
"पैशांचा पाऊस ! भोंदू बाबाने व्यावसायिकाला अठ्ठावीस लाख रु.ना गंडवले." या शीर्षकाची बातमी पुणे म.टा.(31-01-2017) मध्ये अनेकांनी वाचली असेल. ती अशी:-
मंदार अरविन्द वैद्य ( वय ४७ वर्षे, विठ्ठलनगर, सिंहगड मार्ग, पुणे) यांचा शिरवळ येथे कारखाना आहे. ते श्रद्धाळू आहेत. त्यांच्याकडे बुवा-बाबा-स्वामींचे येणे- जाणे असते. सागरनाथ नावाचा बुवा वैद्यांकडे आला. " तुम्हांला धंद्यात आर्थिक अडचणी आहेत. मी अक्षय धनाचा कुंभ देतो. हवे तेवढे धन मिळेल. " असे सांगून त्याने नऊ हजार रुपये मागितले. वैद्यांनी आनंदाने दिले. नंतर कांही दिवसांनी , "अडथळे आहेत. ते दूर झाल्याशिवाय कुंभातून धन येणार नाही. पूजा करावी लागेल. " अशी बतावणी करून चाळीस हजार रुपये घेतले.
त्यानंतर सागरनाथ कुंभ घेऊन आला. त्यांतून शंभर रुपयांच्या कांही नोटा पाडून दाखविल्या. अधिक नोटा पडेनात. "तुमच्यावर कोणी करणी केली आहे. आता स्मशानात जाऊन मोठा विधी करायला हवा. त्यासाठी बारा लाख रु.लागतील. मग नोटांचा पाऊसच पडेल." अशी आशा दाखवली. "पैसे न दिल्यास बारा भूतांचा कोप होईल" .अशी भीतीही घातली. वैद्यांनी मुदत ठेवी मोडून १२ लाख रु.दिले. त्यानंतर सागरनाथने आणखी पाच लाख रु.मागितले. वैद्यांनी तीही रक्कम सुपूर्द केली.
नंतर मंदार वैद्यांना सागरनाथच्या मुलाचा फोन आला. "करणी वडिलांवर उलटली आहे. ती परत उलटविण्यासाठी १० लाख रु.पाठवावे. नाहीतर वडिलांचा मृत्यू होईल. मग त्यांचे प्रेत आणून मी ते तुमच्या दारासमोर टाकीन. " वैद्य घाबरले. त्यांनी दहा लाख रु.पाठविले.
कांही दिवसांनी आणखी पैशांची मागणी आली. इतके पैसे गेल्यावर आतां मंदार वैद्यांना शंका आली की हा बुवा कदाचित् आपल्याला फसवित असावा. मग त्यांनी बुवाविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. पोलीसांनी सागरनाथ मीठानाथ परमार आणि चंदुलाल सागरनाथ परमार यांच्यावर जादुटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास चालू आहे.
....या प्रकरणावरून काय दिसते ?
मंदार वैद्य हे व्यावसायिक आहेत. त्यांनी भोंदू बाबाला २८लाख रु. दिले. त्याअर्थी त्यांची आर्थिक स्थिती उत्तम होती. म्हणजे ते आपला व्यवसाय चांगल्या कार्यक्षमतेने सांभाळत होते. यावरून ते व्यवहारज्ञानी, कार्यकुशल, होते. कारखान्याचे व्यवस्थापन चांगले असणार. म्हणजे मंदार वैद्य बुद्धिमान आहेत. त्यांचे वय ४७ वर्षे आहे. म्हणजे ते अनुभवी आहेत. अशा या व्यवहारज्ञानी, कार्यकुशल, सक्षम, बुद्धिमान, अनुभवी व्यावसायिकाचे २८ लक्ष रुपये एक फडतूस, ढोंगी बाबा लुबाडतो याचे महदाश्चर्य वाटते. या बुवाने चोरी केली नाही. दरोडा घातला नाही. खुनाची धमकी दिली नाही. वैद्य यांनी त्याच्या पायांवर डोके ठेवले आणि हातावर लाखो रु. ठेवले. कोणताही लेखी व्यवहार केला नाही. हे अचंबित करणारे आहे. अविश्वसनीय वाटते. पण असे घडले हे सत्य आहे.
असे घडण्याचे कारण काय ? यावर विचार करता एकच कारण संभवते. ते म्हणजे देव-धर्म आणि त्याच्याशी संबंधित विषयांवर मंदार वैद्य यांची असलेली श्रद्धा. अपरंपार श्रद्धेविना असे घडणे असंभवनीय आहे. श्रद्धा ही एक मनोभावना आहे. मन आणि बुद्धी यांचे उत्पत्तीस्थान मेंदूच आहे. आनंद, दु:ख, राग, प्रेम, लोभ, श्रद्धा, मद, मत्सर, काम अशा अनेक भावनांचा समुच्चय म्हणजे मन. माणसाचे मन श्रद्धा भावनेने लिप्त झाले की त्याची बुद्धी लुळी पडते. बुद्धीपेक्षा मन प्रबळ बनते. बुद्धी निष्प्रभ होते. बुद्धीची विचारक्षमता नष्ट होते. मेंदूवर श्रद्धेचे नियंत्रण येते. त्यामुळे सर्व निर्णय श्रद्धे अनुसार होतात. विवेक, चिकित्सा हे बुद्धीचे घटक मागे पडतात. मग व्यवहारज्ञान, क्षमता, बुद्धिमत्ता, अनुभव यांचा कांही उपयोग होत नाही.
श्रद्धेचे चार प्रकार आहेत. ते सोदाहरण असे:-
१) पारंपरिक श्रद्धा. (उदा. सोमवारी शिवपिंडीवर बेलपत्रे वाहावी.) २) गतानुगतिक श्रद्धा. (उदा.लालबागचा राजा नवसाला पावतो.)
३)आशावती श्रद्धा. ( उदा.श्रीयंत्राचे पूजन केले तर धनप्राप्ती होते.) ३) भयोद्भव श्रद्धा .( उदा.मृताचे धार्मिक अंत्यसंस्कार केले नाहीत तर त्याचा अतृप्त आत्मा कुटुंबाला पीडा देतो.)
प्रस्तुत प्रकरणात मंदार वैद्य यांची आशावती श्रद्धा दिसते. आपण इतकी वर्षे, अनेक धार्मिक कार्ये निष्ठापूर्वक केली आहेत. आता देव माझ्यावर कृपा करणार. तो कुणाच्या रूपाने, कसा -कधी येईल हे सांगता येणार नाही. पण तो येईल हे निश्चित. तो येणार. मला कृपाप्रसाद देणार. असे त्यांना मनोमन वाटत होते. ते देवाची प्रतीक्षा करीत होते. वैद्य अनेक बुवा-बाबांना भेटत होते. शेवटी सागरनाथबाबा न बोलावता, त्यांच्या घरी आला. कांही न विचारता , "तुम्हांला अक्षय धनाचा कुंभ देतो." असे आपण होऊन म्हणाला. वैद्यांना क्षणैक साक्षात्कार झाला असावा की या बाबाला देवानेच पाठविले आहे. त्याने नऊ हजार रु. मागितले. वैद्यांनी आनंदाने दिले. पुढे तो वारंवार पैसे मागू लागला. वैद्यांना वाटले देव आपल्या श्रद्धेची परीक्षा पाहतो आहे. आपण कमी पडता नये. देवाच्या कसोटीला उतरलेच पाहिजे. या विचाराने ते पैसे देत राहिले. त्यांना वाटले "मी कुणाला कधी फसवले नाही. कुणाचे कधी वाईट केले नाही. वाईट चिंतिलेसुद्धा नाही. मग माझे कशाला काही वाईट होईल ? देव आहे. देवाला डोळे असतात ना ? तो पहातो आहे ना ? माझे भलेच होणार. देवाने पाठविलेला हा बाबा मला फसवणे शक्य नाही. अंतीं तो माझे कल्याणच करील." असे त्यांना सारखे वाटत राहिले असणार.
शेवटी २८ लाख रुपये गेले तरी काहीच चांगले घडले नाही. हे ध्यानी आल्यावर ते श्रद्धेच्या ग्लानीतून थोडे बाहेर आले. "म्हणजे बुवा-बाबा श्रद्धाळू लोकांना लुबाडतात असे अंनिसवाले सांगतात ते खरे असते की काय ? " अशी पुसटशी शंका त्यांच्या मनात तरळली असावी. मग त्यांनी सागरनाथबाबा वि्रुद्ध पोलीसांत तक्रार दिली. पोलीसांनी जादुटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवला. पुढे काय झाले याची बातमी अद्याप वाचली नाही. नेहमीप्रमाणे पोलीसतपास चालू असेल.
व्यवसाय-धंद्यात प्रत्येक गोष्टीवर चिकित्सा करून योग्य निर्णय घेणारी बुद्धी श्रद्धा-क्षेत्रात चालेनाशी झाली. कारण मन श्रद्धेने ओतप्रोत भरले होते. त्यामुळे बुद्धीने कोणत्याही गोष्टीची चिकित्सा केली नाही. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतून बुद्धी बाजूला पडली. किंबहुना श्रद्धेने तिला बाजूला सारले. आणि सर्व नियंत्रण आपल्या हाती घेतले. श्रद्धा भावनेमुळे प्रबळ झालेल्या मनाने मेंदुद्वारे निर्णय घेतले. कर्मेंद्रियाने (हातांनी) ते कार्यवाहीत आणले. भोंदूबाबाने मागितले तेवढे पैसे त्या्ला दिले. शेवटी माणूस म्हणजे त्याचा मेंदू. तो मेंदू श्रद्धाभावनेच्या आहारी गेला म्हणजे अशी फसवणूक होणारच. याची अनेक उदाहरणे आहेत. श्रद्धाळू लोकांचा निरुपाय असतो. श्रद्धेपुढे त्यांचा मेंदू हतबल होतो. श्रद्धेच्या गुंगीतून बाहेर आल्यावर "मी त्या बाबाला इतके पैसे दिले तरी कसे? " याचे आश्चर्य स्वत: वैद्यांनाच वाटले असेल. श्रद्धेची झिंग ही अशी असते. श्रद्धाळूंची फसवणूक होणे अपरिहार्य असते. त्यावर एकच उपाय तो म्हणजे श्रद्धेचे
प्रयत्नपूर्वक विसर्जन करणे.
श्रद्धा ठेवणे हे दास्य (गुलामगिरी) पत्करल्याचे लक्षण आहे. मंदार वैद्यांनी भोंदूबाबावर श्रद्धा ठेवली म्हणजे त्यांनी आपली बुद्धी त्याच्याकडे गहाण टाकली. म्हणजे त्यांच्या बुद्धीचे नियंत्रण बाबाकडे गेले. त्यामुळे तो बुवा सांगेल ते सत्य मानून वैद्य त्याच्या आज्ञा पाळत गेले. दासाला स्वामीच्या आज्ञा पाळाव्याच लागतात. मग फसवणूक अटळ असते. महाराष्ट्र टाइम्स सारख्या प्रतिष्ठित दैनिकात छापून आलेली ही सत्य घटना आहे. श्रद्धावंतांनी यावर स्वबुद्धीने विचार करावा. "आमचे महाराज अशी बुवाबाजी करणारे नव्हेतच." अशा भ्रमात राहू नये.
******************************************************************************
ह्या दोन गोष्टि मेंदूत आणि वरच्या भावना मनात असतात असा शोध लावल्यासाठी तुम्हाला नोबल दिलं पाहिजे. तुमच्याच अंधश्रद्धा जास्त दिसताहेत.=))) लोल....