Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अठ्ठावीस लक्ष रुपये

य
यनावाला
Sat, 11/04/2017 - 16:15
🗣 138 प्रतिसाद
अठ्ठावीस लक्ष रुपये .......यनावाला "पैशांचा पाऊस ! भोंदू बाबाने व्यावसायिकाला अठ्ठावीस लाख रु.ना गंडवले." या शीर्षकाची बातमी पुणे म.टा.(31-01-2017) मध्ये अनेकांनी वाचली असेल. ती अशी:- मंदार अरविन्द वैद्य ( वय ४७ वर्षे, विठ्ठलनगर, सिंहगड मार्ग, पुणे) यांचा शिरवळ येथे कारखाना आहे. ते श्रद्धाळू आहेत. त्यांच्याकडे बुवा-बाबा-स्वामींचे येणे- जाणे असते. सागरनाथ नावाचा बुवा वैद्यांकडे आला. " तुम्हांला धंद्यात आर्थिक अडचणी आहेत. मी अक्षय धनाचा कुंभ देतो. हवे तेवढे धन मिळेल. " असे सांगून त्याने नऊ हजार रुपये मागितले. वैद्यांनी आनंदाने दिले. नंतर कांही दिवसांनी , "अडथळे आहेत. ते दूर झाल्याशिवाय कुंभातून धन येणार नाही. पूजा करावी लागेल. " अशी बतावणी करून चाळीस हजार रुपये घेतले. त्यानंतर सागरनाथ कुंभ घेऊन आला. त्यांतून शंभर रुपयांच्या कांही नोटा पाडून दाखविल्या. अधिक नोटा पडेनात. "तुमच्यावर कोणी करणी केली आहे. आता स्मशानात जाऊन मोठा विधी करायला हवा. त्यासाठी बारा लाख रु.लागतील. मग नोटांचा पाऊसच पडेल." अशी आशा दाखवली. "पैसे न दिल्यास बारा भूतांचा कोप होईल" .अशी भीतीही घातली. वैद्यांनी मुदत ठेवी मोडून १२ लाख रु.दिले. त्यानंतर सागरनाथने आणखी पाच लाख रु.मागितले. वैद्यांनी तीही रक्कम सुपूर्द केली. नंतर मंदार वैद्यांना सागरनाथच्या मुलाचा फोन आला. "करणी वडिलांवर उलटली आहे. ती परत उलटविण्यासाठी १० लाख रु.पाठवावे. नाहीतर वडिलांचा मृत्यू होईल. मग त्यांचे प्रेत आणून मी ते तुमच्या दारासमोर टाकीन. " वैद्य घाबरले. त्यांनी दहा लाख रु.पाठविले. कांही दिवसांनी आणखी पैशांची मागणी आली. इतके पैसे गेल्यावर आतां मंदार वैद्यांना शंका आली की हा बुवा कदाचित् आपल्याला फसवित असावा. मग त्यांनी बुवाविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. पोलीसांनी सागरनाथ मीठानाथ परमार आणि चंदुलाल सागरनाथ परमार यांच्यावर जादुटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास चालू आहे. ....या प्रकरणावरून काय दिसते ? मंदार वैद्य हे व्यावसायिक आहेत. त्यांनी भोंदू बाबाला २८लाख रु. दिले. त्याअर्थी त्यांची आर्थिक स्थिती उत्तम होती. म्हणजे ते आपला व्यवसाय चांगल्या कार्यक्षमतेने सांभाळत होते. यावरून ते व्यवहारज्ञानी, कार्यकुशल, होते. कारखान्याचे व्यवस्थापन चांगले असणार. म्हणजे मंदार वैद्य बुद्धिमान आहेत. त्यांचे वय ४७ वर्षे आहे. म्हणजे ते अनुभवी आहेत. अशा या व्यवहारज्ञानी, कार्यकुशल, सक्षम, बुद्धिमान, अनुभवी व्यावसायिकाचे २८ लक्ष रुपये एक फडतूस, ढोंगी बाबा लुबाडतो याचे महदाश्चर्य वाटते. या बुवाने चोरी केली नाही. दरोडा घातला नाही. खुनाची धमकी दिली नाही. वैद्य यांनी त्याच्या पायांवर डोके ठेवले आणि हातावर लाखो रु. ठेवले. कोणताही लेखी व्यवहार केला नाही. हे अचंबित करणारे आहे. अविश्वसनीय वाटते. पण असे घडले हे सत्य आहे. असे घडण्याचे कारण काय ? यावर विचार करता एकच कारण संभवते. ते म्हणजे देव-धर्म आणि त्याच्याशी संबंधित विषयांवर मंदार वैद्य यांची असलेली श्रद्धा. अपरंपार श्रद्धेविना असे घडणे असंभवनीय आहे. श्रद्धा ही एक मनोभावना आहे. मन आणि बुद्धी यांचे उत्पत्तीस्थान मेंदूच आहे. आनंद, दु:ख, राग, प्रेम, लोभ, श्रद्धा, मद, मत्सर, काम अशा अनेक भावनांचा समुच्चय म्हणजे मन. माणसाचे मन श्रद्धा भावनेने लिप्त झाले की त्याची बुद्धी लुळी पडते. बुद्धीपेक्षा मन प्रबळ बनते. बुद्धी निष्प्रभ होते. बुद्धीची विचारक्षमता नष्ट होते. मेंदूवर श्रद्धेचे नियंत्रण येते. त्यामुळे सर्व निर्णय श्रद्धे अनुसार होतात. विवेक, चिकित्सा हे बुद्धीचे घटक मागे पडतात. मग व्यवहारज्ञान, क्षमता, बुद्धिमत्ता, अनुभव यांचा कांही उपयोग होत नाही. श्रद्धेचे चार प्रकार आहेत. ते सोदाहरण असे:- १) पारंपरिक श्रद्धा. (उदा. सोमवारी शिवपिंडीवर बेलपत्रे वाहावी.) २) गतानुगतिक श्रद्धा. (उदा.लालबागचा राजा नवसाला पावतो.) ३)आशावती श्रद्धा. ( उदा.श्रीयंत्राचे पूजन केले तर धनप्राप्ती होते.) ३) भयोद्भव श्रद्धा .( उदा.मृताचे धार्मिक अंत्यसंस्कार केले नाहीत तर त्याचा अतृप्त आत्मा कुटुंबाला पीडा देतो.) प्रस्तुत प्रकरणात मंदार वैद्य यांची आशावती श्रद्धा दिसते. आपण इतकी वर्षे, अनेक धार्मिक कार्ये निष्ठापूर्वक केली आहेत. आता देव माझ्यावर कृपा करणार. तो कुणाच्या रूपाने, कसा -कधी येईल हे सांगता येणार नाही. पण तो येईल हे निश्चित. तो येणार. मला कृपाप्रसाद देणार. असे त्यांना मनोमन वाटत होते. ते देवाची प्रतीक्षा करीत होते. वैद्य अनेक बुवा-बाबांना भेटत होते. शेवटी सागरनाथबाबा न बोलावता, त्यांच्या घरी आला. कांही न विचारता , "तुम्हांला अक्षय धनाचा कुंभ देतो." असे आपण होऊन म्हणाला. वैद्यांना क्षणैक साक्षात्कार झाला असावा की या बाबाला देवानेच पाठविले आहे. त्याने नऊ हजार रु. मागितले. वैद्यांनी आनंदाने दिले. पुढे तो वारंवार पैसे मागू लागला. वैद्यांना वाटले देव आपल्या श्रद्धेची परीक्षा पाहतो आहे. आपण कमी पडता नये. देवाच्या कसोटीला उतरलेच पाहिजे. या विचाराने ते पैसे देत राहिले. त्यांना वाटले "मी कुणाला कधी फसवले नाही. कुणाचे कधी वाईट केले नाही. वाईट चिंतिलेसुद्धा नाही. मग माझे कशाला काही वाईट होईल ? देव आहे. देवाला डोळे असतात ना ? तो पहातो आहे ना ? माझे भलेच होणार. देवाने पाठविलेला हा बाबा मला फसवणे शक्य नाही. अंतीं तो माझे कल्याणच करील." असे त्यांना सारखे वाटत राहिले असणार. शेवटी २८ लाख रुपये गेले तरी काहीच चांगले घडले नाही. हे ध्यानी आल्यावर ते श्रद्धेच्या ग्लानीतून थोडे बाहेर आले. "म्हणजे बुवा-बाबा श्रद्धाळू लोकांना लुबाडतात असे अंनिसवाले सांगतात ते खरे असते की काय ? " अशी पुसटशी शंका त्यांच्या मनात तरळली असावी. मग त्यांनी सागरनाथबाबा वि्रुद्ध पोलीसांत तक्रार दिली. पोलीसांनी जादुटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवला. पुढे काय झाले याची बातमी अद्याप वाचली नाही. नेहमीप्रमाणे पोलीसतपास चालू असेल. व्यवसाय-धंद्यात प्रत्येक गोष्टीवर चिकित्सा करून योग्य निर्णय घेणारी बुद्धी श्रद्धा-क्षेत्रात चालेनाशी झाली. कारण मन श्रद्धेने ओतप्रोत भरले होते. त्यामुळे बुद्धीने कोणत्याही गोष्टीची चिकित्सा केली नाही. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतून बुद्धी बाजूला पडली. किंबहुना श्रद्धेने तिला बाजूला सारले. आणि सर्व नियंत्रण आपल्या हाती घेतले. श्रद्धा भावनेमुळे प्रबळ झालेल्या मनाने मेंदुद्वारे निर्णय घेतले. कर्मेंद्रियाने (हातांनी) ते कार्यवाहीत आणले. भोंदूबाबाने मागितले तेवढे पैसे त्या्ला दिले. शेवटी माणूस म्हणजे त्याचा मेंदू. तो मेंदू श्रद्धाभावनेच्या आहारी गेला म्हणजे अशी फसवणूक होणारच. याची अनेक उदाहरणे आहेत. श्रद्धाळू लोकांचा निरुपाय असतो. श्रद्धेपुढे त्यांचा मेंदू हतबल होतो. श्रद्धेच्या गुंगीतून बाहेर आल्यावर "मी त्या बाबाला इतके पैसे दिले तरी कसे? " याचे आश्चर्य स्वत: वैद्यांनाच वाटले असेल. श्रद्धेची झिंग ही अशी असते. श्रद्धाळूंची फसवणूक होणे अपरिहार्य असते. त्यावर एकच उपाय तो म्हणजे श्रद्धेचे प्रयत्‍नपूर्वक विसर्जन करणे. श्रद्धा ठेवणे हे दास्य (गुलामगिरी) पत्करल्याचे लक्षण आहे. मंदार वैद्यांनी भोंदूबाबावर श्रद्धा ठेवली म्हणजे त्यांनी आपली बुद्धी त्याच्याकडे गहाण टाकली. म्हणजे त्यांच्या बुद्धीचे नियंत्रण बाबाकडे गेले. त्यामुळे तो बुवा सांगेल ते सत्य मानून वैद्य त्याच्या आज्ञा पाळत गेले. दासाला स्वामीच्या आज्ञा पाळाव्याच लागतात. मग फसवणूक अटळ असते. महाराष्ट्र टाइम्स सारख्या प्रतिष्ठित दैनिकात छापून आलेली ही सत्य घटना आहे. श्रद्धावंतांनी यावर स्वबुद्धीने विचार करावा. "आमचे महाराज अशी बुवाबाजी करणारे नव्हेतच." अशा भ्रमात राहू नये. ******************************************************************************
वर्गीकरण
चर्चा (काथ्याकूट)

प्रतिक्रिया द्या
48775 वाचन

💬 प्रतिसाद (138)
त
तर्राट जोकर Sun, 11/05/2017 - 12:55 नवीन
सहमत आहे. ज्यांच्या शेपटावर पाय पडतोय तेच कळवळून फुत्कार टाकत आहेत. यनावाला कुठलीतरी जालीम नस दाबत आहेत ज्यामुळे सगळे तळमळत आहेत. यनावाला यांना इतक्या शिव्या पडत आहेत ह्याचा अर्थ त्यांच्या बोलण्यात काहीतरी दम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
M
mayu4u Sun, 11/05/2017 - 13:09 नवीन
सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
म
माहितगार Tue, 11/07/2017 - 15:18 नवीन
ज्यांच्या शेपटावर पाय पडतोय तेच कळवळून फुत्कार टाकत आहेत. यनावाला कुठलीतरी जालीम नस दाबत आहेत ज्यामुळे सगळे तळमळत आहेत. यनावाला यांना इतक्या शिव्या पडत आहेत ह्याचा अर्थ त्यांच्या बोलण्यात काहीतरी दम आहे.
तुम्ही विज्ञानवादाचा प्रसार करू इछित असालतर लॉजीकल फॉलसीज शिल्लक असणे श्रेयस्कर ठरते किंवा कसे . List of fallacies
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
न
निशाचर Sun, 11/05/2017 - 12:58 नवीन
प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 11/05/2017 - 13:17 नवीन
प्रतिसादाशी सहमत. मपावरची टीका अतिशय तिखट असते तरीही आपल्या विचारांशी तडजोड न करता प्रामाणिकपणे ते लिहित असतात. आणि त्यांचं लेखन आवर्जून वाचायला आवडते. य.ना. भाऊ आपण लिहीत राहालच आणि आमच्यासारख्या अनेक मूकवाचकांची आपल्या लिखाणाला मूकसंमती राहीलच. आपण प्रज्वलित केलेल्या या प्रबोधनाच्या छोट्याश्या दीपाला शुभेच्छा. असेच म्हणतो...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
य
यनावाला Sun, 11/05/2017 - 16:59 नवीन
सर्वश्री प्रचेतस, सरटोळी, चौथा कोनाडा, तर्राट जोकर, mayu4u , निशाचर, आणि माझे मित्र प्रा.दिलीप बिरुटे या सर्वांचे हार्दिक आभार. तुमच्यामुळे इथे लेखन करायला बळ मिळते. ....यनावाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
M
mayu4u Mon, 11/06/2017 - 12:46 नवीन
तुम्ही देणं अत्यन्त गरजेचं आहे. कृपया याचा गांभीर्यानं विचार करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
य
यनावाला Sun, 11/05/2017 - 16:44 नवीन
@राही आपल्या समर्पक प्रतिसादार्थ धन्यवाद ! निरर्गल टीका आणि खिल्ली यांनी मुळीच विचलित होत नाही. त्यांना लिहूं द्या. लेखनावरून लिहिणार्‍याची संस्कृती कशी आहे, आकलनशक्ती किती आहे, मानसिक संतुलन बिधडले आहे की कसे, अशा अनेक गोष्टी सुबुद्ध वाचकांना कळतात. म्हणून "जो जे वांच्छील तो ते लिहो ।" मिसळपाववर लिहिण्याचे मुख्य कारण म्हणजे मोठा वाचकवर्ग लाभतो. इथे पंधरा लेख लिहिले. त्यांतील "सहप्रवासी" या लेखाची २४००० वाचने झाली. अन्य दोन लेखांची प्रत्येकी ११०००वाचने तर उर्वरित लेखांची दोन ते पाच हजार वाचने झाली आहेत. वाचनसंख्या प्रतिमाह वाढत आहे. प्रस्तुत लेखाची दोन दिवसांत १०००वाचने झाली. हे उत्साहवर्धक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
A
arunjoshi123 Mon, 11/06/2017 - 10:01 नवीन
लेखनावरून लिहिणार्‍याची संस्कृती कशी आहे, आकलनशक्ती किती आहे, मानसिक संतुलन बिधडले आहे की कसे, अशा अनेक गोष्टी सुबुद्ध वाचकांना कळतात.
लेखनाचा संबंध लेखनापुरता मर्यादित ठेवावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
म
माहितगार Tue, 11/07/2017 - 18:06 नवीन
... लेखनावरून लिहिणार्‍याची संस्कृती कशी आहे, आकलनशक्ती किती आहे, मानसिक संतुलन बिधडले आहे की कसे, अशा अनेक गोष्टी सुबुद्ध वाचकांना कळतात.
सर, सुबुद्ध वाचकांना आपल्या लेखांच्या वाचनाशिवाय सुद्धा वर्तन आदर्श असेल. आणि आपण उर्वरीतांसाठी लिहित असाल तर त्यांच्याकडे विवेक नाहीच निर्बुद्धच आणि मानसिक संतुलन बिघडलेले असे गृहीत धरता त्यांच्यावर दुषणे देण्यात वेळ खर्च करण्यात आपण त्यांच्यापेक्षा अधिक शहाणे असा अहंकार जोपासण्यापलिकडे नक्की काही हशिल आहे ? तसे कुणि किती अभिमान आणि किती अहंकार जोपासावेत ज्याची त्याची मर्जी. जर तुमचे आवाहन विवेकाला असेल तर आपणच केवळ विवेकी आहोत या अहंकाराला मुरड घालण्याची कुठे जागा शिल्लक आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
ए
एस Sun, 11/05/2017 - 18:11 नवीन
प्रतिसाद आवडला. विशेषतः आज विचारवंत, बुद्धिप्रामाण्यवादी, लेखक, कलावंत, साहित्यकार इत्यादी वर्गाला झुंडशाहीच्या जोरावर हाडहुडूत करण्याची विकृती ज्या प्रकारे समाजात पसरवली जात आहे, त्या पार्श्वभूमीवर यनावालांसारखे लिखाण नेटाने करत राहणे आणि अशा विकृतींचा जमेल तसा विरोध करत राहणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
र
राही Mon, 11/06/2017 - 02:24 नवीन
सहमत आहे. यानिमित्ताने माध्यमांतल्या समविचारी लोकांनी आता मौन सोडून सहमत हा एक शब्द लिहून पाठवावा आणि ' साय्लेंट मेजॉरिटी' ची जाणीव करून द्यावी असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
प
पगला गजोधर Tue, 11/07/2017 - 15:37 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
प
पुंबा Mon, 11/06/2017 - 06:33 नवीन
पुर्ण सहमत.. गटारगंगा म्हणायचं असेल तर वैयक्तिक, लॉजिकल असल्याचा आव आणून काही तरी शब्दबंबाळ फेकाफेक करणार्‍या प्रतिसादांना म्हटलं पाहिजे. यनावालांचा मागचा लेख पटला नसला आणि सरसकट सगळ्या श्रद्धांना घाऊक विरोध ही भुमिका आतातायी वाटत असली तरीही सदर लेख पुर्णपणे पटला आहे.
गेली कित्येक वर्षे त्यांच्या लिखाणावरचे अत्यंत आवेश आणि अभिनिवेशयुक्त प्रतिसाद वाचताना एक चिरंतन वास्तवाचा पुन:प्रत्यय येत राहिला आहे. ते म्हणजे जिथे आवेश आणि अभिनिवेश असतो तिथे आशय असतोच असे नाही. किंबहुना तो नसतोच.
ह्याला +१११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
स
सुचिता१ Mon, 11/06/2017 - 06:56 नवीन
यनावालांचा लेख तर उत्तम आणि आशयपूर्ण आहेच. पण ततुमच्या प्रतीसादाशी ११०% सहमत . मूक वाचकांच्या विचांरांना तुमही चपखल शब्दात मांडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
A
arunjoshi123 Mon, 11/06/2017 - 08:34 नवीन
उत्तम आणि आशयपूर्ण लेखात बुद्धीमांद्य असलेले आणि गुलामगिरी करणारे ही विशेषणं एक नास्तिक म्हणून कदाचित तुम्हाला लागू नसतील. =============== उत्तमपणाचं म्हणाला तर आरुषिचा खून झाला म्हणून मनमोहन सिंग यांना शिक्षा करा इतकं उत्तम लॉजिक लेखात आहे. कारण लॉ अँड ऑर्डरसाठी अंततः ते जबाबदार आहेत, जसं प्रत्येक अशा गुन्ह्यासाठी श्रद्धा ही एकच गोष्ट जबाबदार आहे!?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचिता१
A
arunjoshi123 Mon, 11/06/2017 - 06:58 नवीन
ते म्हणजे जिथे आवेश आणि अभिनिवेश असतो तिथे आशय असतोच असे नाही.
ते म्हणजे जिथे आवेश आणि अभिनिवेश नसतो तिथे देखील आशय असतोच असे नाही. आवेश, अभिनिवेश आणि आशय या असंबंधित संकल्पना आहेत. तुम्हाला आशय पाहायला आवडलं तर तो पाहा. नाहीतर शेवटपर्यंत आवेशाबद्दलच भांडत बसा. ============================== लेख टाकणे आणि लेंड्या टाकणे यांमधे फरक आहे. श्रद्धावंतांचे तत्त्वज्ञान धाग्यात यनावालांना अनेक प्रश्न विचारले आहेत, अनेक प्रकारे विरोध केला आहे, अनेकांनी माझ्याप्रमाणे आवेश फुल थ्रॉटल न करता अत्यंत संयमाने देखील प्रश्न विचारले आहेत. यनावालांनी काहीही उत्तर दिलेले नाही. ===================
वरती कुणीतरी माफीनामा मागितला आहे. खरे तर हे दुर्लक्ष्य करण्याजोगेच. पण मौनातून अप्रत्यक्ष सहमती सूचित होऊ नये म्हणून लिहीत आहे की माफी मागण्याचे त्यांना काहीच कारण नाही. ना त्यांनी अश्लाघ्य अथवा उर्मट भाषा वापरली आहे किंवा ना त्यांनी देशद्रोही घटनाद्रोही असे लिखाण केले आहे.
याचा संदर्भ मागच्या धाग्याशी आहे. मी स्वतःला श्रद्धावान नि अस्तिक नि धर्मवादी नि परंपरावादी इ इ समजतो. अशा लोकांबद्दल त्यांनी काय भाषा वापरली आहे ते कळण्यासाठी तो लेख पुन्हा वाचा. बुद्धिहिन, तर्कहिन, दास्यत्ववादी, बेअक्कल, इ इ शब्दांचा वर्षाव केलाय त्यांनी माझ्यावर. ------------------------------------------------ लक्षात घ्या हि भाषा त्यांनी हेतूपुरस्सर नाही वापरली. त्यांच्या नास्तिकत्वाचे रिझल्ट्सच तसे येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
म
मूकवाचक Mon, 11/06/2017 - 09:14 नवीन
आमच्यासारख्या अनेक मूकवाचकांची आपल्या लिखाणाला मूकसंमती राहीलच ... माझी श्रद्धानिर्मूलनाला विरोध करणार्‍यांना मूकसंमती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
म
माहितगार Tue, 11/07/2017 - 15:05 नवीन
ते म्हणजे जिथे आवेश आणि अभिनिवेश असतो तिथे आशय असतोच असे नाही. किंबहुना तो नसतोच.
'किंबहुना तो नसतोच' मध्ये दुसर्‍या बाजूचा दुराग्रह असू शकतो की नसतोच ? 'डोंगराचा मागे धूर दिसतो' या विधानाचे कोणत्याही बाजूने एकेरी अर्थ काढणे कितपत तर्कसुसंगत असते या बद्दल साशंकता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
म
माहितगार Tue, 11/07/2017 - 15:15 नवीन
य.ना.वाला यांचे लेख गेली अनेक वर्षे वृत्तपत्रे आणि मिपासारख्या सोशल मीडियामधून येत आहेत.... गेली कित्येक वर्षे त्यांच्या लिखाणावरचे अत्यंत आवेश आणि अभिनिवेशयुक्त प्रतिसाद वाचताना एक चिरंतन वास्तवाचा पुन:प्रत्यय येत राहिला आहे. ते म्हणजे जिथे आवेश आणि अभिनिवेश असतो तिथे आशय असतोच असे नाही. किंबहुना तो नसतोच... समर्थनार्थ प्रतिसाद कदाचित घाईत आल्यामुळे List of fallaciesची आठवण येते . यनावालांच्या लेखनात अंध नास्तिकता अथवा सरसकटीकरण असावे पण त्याबद्दल त्यांच्या लेखनाच चिकित्सा करता येते . माफीनाम्याची मात्र गरज दिसते असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
म
मराठी_माणूस Sun, 11/05/2017 - 07:52 नवीन
लेखाची चिकित्सा न करता येत रहाणार्‍या लेखाला आधीच संमती ? ही सुध्दा एक अंधश्रध्दा
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 11/05/2017 - 13:13 नवीन
श्रद्धा निर्मुलनाचे वर्ग ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sun, 11/05/2017 - 15:52 नवीन
एखाद्या माणसाला तू फारच जाडा आहेस म्हणालात तर तो वजन कमी करण्याची शक्यता शून्य आहे कारण माणूस नकारात्मक मनोवृत्ती स्वीकारतो. अर्थात मूळ हेतू केवळ त्या माणसाला दूषणेच द्यायची असतील तर गोष्ट वेगळी. पण जर समाज प्रबोधन करायचे असेल तर टीका टोकाची असून चालत नाही. आपण सडेतोड वागतो याचा दुराभिमान बाळगण्यापेक्षा अतिश्रद्धावान लोकांना त्यांच्या अतिरेकाची हळुवारपणे जाणिव करून दिल्यास जास्त फायदा होईल असे वाटते.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 11/07/2017 - 09:08 नवीन
अगदी सहमत आहे! सुबोधजी http://www.misalpav.com/comment/616321#comment-616321 इथे मी त्याविषयी मांडले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Sun, 11/05/2017 - 15:53 नवीन
एखाद्या माणसाला तू फारच जाडा आहेस म्हणालात तर तो वजन कमी करण्याची शक्यता शून्य आहे कारण माणूस नकारात्मक मनोवृत्ती स्वीकारतो. अर्थात मूळ हेतू केवळ त्या माणसाला दूषणेच द्यायची असतील तर गोष्ट वेगळी. पण जर समाज प्रबोधन करायचे असेल तर टीका टोकाची असून चालत नाही. आपण सडेतोड वागतो याचा दुराभिमान बाळगण्यापेक्षा अतिश्रद्धावान लोकांना त्यांच्या अतिरेकाची हळुवारपणे जाणिव करून दिल्यास जास्त फायदा होईल असे वाटते.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 11/05/2017 - 17:41 नवीन
तजो,
यनावाला कुठलीतरी जालीम नस दाबत आहेत ज्यामुळे सगळे तळमळत आहेत.
त्याचं काये की यनावालांची अंधश्रद्धा केवळ देवाधार्मापुरतीच मर्यादित आहे. तिला व्यापक स्वरूप मिळंत नाही म्हणून आम्ही सगळे आस्तिक तळमळत आहोत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
D
Duishen Tue, 11/07/2017 - 16:05 नवीन
त्याचं काये की यनावालांची अंधश्रद्धा केवळ देवाधार्मापुरतीच मर्यादित आहे. तिला व्यापक स्वरूप मिळंत नाही म्हणून आम्ही सगळे आस्तिक तळमळत आहोत. गामा जी, एक समजले नाही...देवधर्म ही संकल्पना व्यापक नाही असे आपले मत आहे का?...आणि जर व्यापक आहे तर देव-धर्मापुरत "मर्यादित" कसे असू शकेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
त
तर्राट जोकर Sun, 11/05/2017 - 17:58 नवीन
गापै, पळपुटी कारणे आहेत ही. स्वतःची हतबलता लपवण्याची. आत कुठेतरी हे सर्व चुकीचे आहे हे जाणवते पण सोडवत नाही म्हणून तळमळ होते. बोले तो एक पैर इधर, एक पैर उधर और बीच में..... ज्याची श्रद्धा अपरंपार त्याला असल्या हजार लेखांनी काही भोकं नाही पडायची.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 11/05/2017 - 22:30 नवीन
तजो, सर्व चुकीचं आहे असं म्हणता तुम्ही. पण सर्व म्हणजे नक्की काय? यादी करता येईल का? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
च
चौकटराजा Mon, 11/06/2017 - 02:21 नवीन
श्री वैद्य यांचे वैयक्तिक नुकसान झाले असे त्याना वाटत असेल तर मला त्याचे दु: ख आहे. त्याना आपण एक साधूला २८ लाखाची " दक्शिणा" दिल्याची श्रद्धापूर्वक सार्थकता वाटत असेल तर मला अत्यानंद आहे. शेवटी सूज्ञपणा वा मूर्खपणा या परिणामसापेक्ष गोष्टी आहेत तशा त्या दृष्टीकोन सापेक्षही .
  • Log in or register to post comments
N
nishapari Mon, 11/06/2017 - 08:04 नवीन
स्मशानात मोठा विधी करावयाचा आहे, कोणीतरी करणी केल्यामुळे धन मिळणे थांबले आहे ,करणी उलटली व 10 लाख न दिल्यास प्रेत आणून दारात टाकू अशी आश्वासने आणि धमक्या देऊन पैसे घेणारी व्यक्ती साधू कशी ? साधू या पदवीचे काही निकष असतात का ? माझ्यामते तरी स्वतः दारिद्र्यात जीवन जगत असताना शिवाजीमहाराजांनी आपणहून पाठवलेला नजराणा ज्यांनी आम्ही विठ्ठलाचे भक्त या धनाची आम्हाला जरुरी नाही असे म्हणत परत पाठवून दिला ते संत तुकाराम यांना साधू म्हणता येऊ शकेल ..... संत तुकाराम , एकनाथ, ज्ञानेश्वर , नामदेव यापैकी कुणीही अमुक पूजा करा देव तुम्हाला संपत्ती देईल असे कुणाला सांगितल्याची कथा आजवर वाचनात आलेली नाही किंवा इतके द्रव्य मला द्या मीच ती पूज / विधी संपन्न करतो त्यानंतर तुम्हाला भरपूर धन मिळेल असे सांगितल्याची कथाही कधी ऐकली नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
A
arunjoshi123 Mon, 11/06/2017 - 08:24 नवीन
यनावालांच्या मते संत तुकाराम , एकनाथ, ज्ञानेश्वर , नामदेव हे सर्व नास्तिक असणार. घटनेत तसं लिहिलं आहे असा त्यांना अर्थ निघत असणार. ================= आणि हे संत धार्मिक होते हे त्यांना माहित असेल तर यनावालांची विशेषणमाला त्यांना लागू आहेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: nishapari
प
पगला गजोधर Tue, 11/07/2017 - 16:03 नवीन
धार्मिक व आध्यात्मिक, यात आपण करू पाहत असलेली, सरमिसळ पाहून मला वाईट वाटले. संतांचे कार्य आध्यात्मिक.... ज्ञानदेवांना शुद्धीप्रत्रक मागणारे धार्मिक ठेकेदार... यानावाल्यांच्या संयत भाषेला, असं जिंगोइस्टिक उत्तर पाहून निराशा वाटली. असो बाकी चालू द्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
D
Duishen Wed, 11/08/2017 - 13:50 नवीन
संत परंपरा विशाल होण्यासाठी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे सर्व संतानी व्यक्ती आणि ईश्वर यामधील मध्यस्थ आणि कर्मकांड नाकारले. व्यक्ती ईश्वराशी सरळ जोडू शकते त्यासाठी मध्यस्थ वा कर्मकांडाची गरज नाही हा नवीन विचार त्याकाळात रुजवला आणि एकाही संताला तत्कालीन समाजव्यवस्थेने सहज स्वीकारले नाही. ज्ञानदेवांना अवघ्या १९ व्या वर्षी समाधी घ्यावी लागली तर तुकोबाचा मृत्यू संशयास्पद राहिला आहे. यातील काही संतांना तर धर्म मानणाऱ्या व्यक्तींनी धर्मविरोधी म्हणून नाकारलेही होते. देवभोळेपणाचा गैरफायदा घेतल्याचे आजही अनेक उदाहरण सापडतील. आसाराम बापू किंवा राम-रहीम ही तर आत्ताची उदाहरणे! त्यांच्या मागे जाणारी जनता श्रद्धावान होती हे नाकारता येत नाही. घोळ केला तो मध्यस्थाने ...म्हणजे आसाराम बापू आणि राम-रहीम सारख्या व्यक्तीने. ...आणि माध्यम वापरले ते लोकांची श्रद्धा! आसाराम बापू आणि राम-रहीम या मध्यस्थांवर विश्वास ठेवून आणि ईश्वरावरील श्रद्धेचा वापर होऊन जनता फसल्या गेली. त्यामुळे कोणावर विश्वास ठेवून पुढचे पाउल टाकावे यासाठी तरी चिकित्सा आवश्यक ठरते. जशी विश्वासाची चिकित्सा आवश्यक, तशी श्रद्धेची! वरील नमूद लेखात मांत्रिकाने श्रद्धेचा गैरवापर केला हे नक्की! हा लेखाचा एक गाभा म्हणून बघण्यास हरकत नसावी. दुसरी बाजू श्री. मंदार यांची... ते पूर्वीही सश्रद्ध होते आणि या घटनेनंतरही कदाचित सश्रद्ध राहतील. पण एक व्यक्ती म्हणून श्री. मंदार यांचा विचार केल्यास त्यांची पूर्वीची श्रद्धा आणि या घटनेनंतरची श्रद्धा सारखीच असेल काय?! श्री. मंदार यांचा श्रद्धा सोबत लोभ या दोन्ही भावना होत्या हे नाकारता येत नाही! शिवाय चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला आणि चुकीच्या कारणासाठी, हे पण जाणवत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
च
चौकटराजा Mon, 11/06/2017 - 12:32 नवीन
साधू म्हणजे साधणारा या अर्थी मी वापरला आहे संत या अर्थी नव्हे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: nishapari
A
arunjoshi123 Mon, 11/06/2017 - 08:26 नवीन
जगात केवल (अबसॉल्यूट) असं काही नसतं हा एक नास्तिकी विचार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
स
सतिश गावडे Mon, 11/06/2017 - 04:35 नवीन
मुळात अंधश्रद्धा असं काही नाही. असते ती फक्त श्रद्धा. एखाद्या गोष्टीच्या असण्याविषयी, सत्यतेविषयी असलेला विश्वास ज्याला कोणत्याही पुराव्याची आवश्यकता नाही म्हणजे श्रद्धा. अंधश्रद्धा हा शब्द चळवळींनी (बहुतेक अंनिसने. नक्की माहिती नाही) जन्माला घातल्या. दैनंदिन जीवनातील, देव विषयक निरुपद्रवी (काही वेळा उपयुक्तही) श्रद्धांसाठी त्यांनी श्रद्धा हा शब्द तसाच ठेवला. तर समाजघातक, हानिकारक श्रद्धेसाठी अंधश्रद्धा हा नवा शब्द जन्माला आला. डॉ. दाभोलकरांनी काही वर्षांपूर्वी लिहिलेली पुस्तके वाचली तर या "अंधश्रद्धा" किती भीषण होत्या याची कल्पना येते. अंनिसने याला बराच आळा घातला. कुणी कितीही नाक मुरडले तरी अंनिसने खुप चांगले काम केले आहे या बाबतीत. आता राहिला प्रश्न श्रद्धेचा. श्रद्धा माणसासाठी सहाय्यकारीही असू शकते. देवविषयक श्रद्धा तर बहुतेक वेळा असतेच. देव माझ्या पाठीशी आहे ही कल्पनाही माणसाला संकटाला सामोरे जायला बळ देते. कुणाचा स्वतःवर विश्वास असतो तर कुणाचा देवावर. अशा श्रद्धेला कुणी आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही. मात्र ही श्रद्धा जेव्हा लाउडस्पीकरने बोलू लागते, रस्त्यावर मंडप घालून रहदारीला अडथळा निर्माण करते, ढोल बडवते किंवा कानठळ्या फोडणारे आवाज करणारे फटाके फोडते त्याला कुणी आक्षेप घेतला तर त्यात गैर काहीच नाही. काही लोक श्रद्धेला आक्षेप घेतला की चवताळून उठतात. "तुम्हाला आम्हीच दिसतो किंवा आमचेच दिसते, ते किंवा त्यांचे दिसत नाही" असा आक्षेप हे लोक घेतात. या आक्षेपातच या चिडण्यामागील उत्तर दडलेले आहे. श्रद्धेला विरोध हा व्यक्तिगत न घेता एका विशिष्ट समूहाला विरोध म्हणून घेतला जातो. या व्यक्तींच्या अस्तित्वाविषयी कल्पनांमध्ये (आयडेंटिटी) या समूहांचा एक घटक असण्याचाही समावेश असतो. त्यामुळे एखाद्या समुहाच्या प्रथांना विरोध हा आपल्याच अस्तित्वाला विरोध समजला जातो आणि मग टोकाचा प्रतिसाद येतो.
  • Log in or register to post comments
M
mayu4u Mon, 11/06/2017 - 04:46 नवीन
बेशर्त सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
न
नाखु Mon, 11/06/2017 - 07:24 नवीन
संतुलित आणि नीरक्षीर प्रतिसाद देणार्या धनाजीराव यांचे अभिनंदन सगळ्यांसारखे आपले ही मातीचे पाय आहेत पण ते लपविण्यासाठी अट्टाहास न करणारा सश्रद्ध डोळस नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u
A
arunjoshi123 Mon, 11/06/2017 - 08:19 नवीन
उत्तम प्रतिसाद.
काही लोक श्रद्धेला आक्षेप घेतला की चवताळून उठतात. "तुम्हाला आम्हीच दिसतो किंवा आमचेच दिसते, ते किंवा त्यांचे दिसत नाही" असा आक्षेप हे लोक घेतात.
अबसॉल्यूट श्रद्धेला अनक्वालिफाइड आक्षेप (यनावाला टाईप) घेतला तर मी चवताळून उठतो. नास्तिकतेच्या १०० गोष्टी न पाहता श्रद्धेवर सरसकट टिका योग्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सुबोध खरे Mon, 11/06/2017 - 08:35 नवीन
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक नक्की कसा ठरवायचा? आताच माझ्या कडे एक ५५ वर्षांच्या बाई आल्या होत्या स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्ण आहेत. चौथ्या स्टेजला पोहोचून जेवढे उपलब्ध आहेत तेवढे उपचार टाटा रुग्णालयात झाले आहेत. यजमान रेल्वेत असल्याने ३२ लाख रुपये खर्च रेल्वेने दिला आहे. रोग सर्वत्र पसरला आहे. पोटात छातीत पाणी झालं आहे. आयुर्वेदिक उपचार करुन पाहू या श्रद्धेने त्या माझ्या मित्राकडे उपचारासाठी गेल्या आहेत.त्याने सद्य स्थिती काय आहे यासाठी सोनोग्राफीसाठी त्यांना माझ्याकडे पाठवलं आहे. (या आयुर्वेदाचार्याला आपली क्षमता आणि मर्यादा माहित आहे). आम्ही दोघेही त्यांचा उपचार सवलतीत करत आहोत. आता प्रश्न असा आहे कि अशा "श्रद्धेने" आलेल्या बाईंना सडेतोडपणे सांगायचे का कि हि तुमची श्रद्धा नसून अंधश्रद्धा आहे. कि आपण "प्रयत्न करू" म्हणून त्यांचे काय जे दोन चार महिने शिल्लक आहेत ते ( खोट्या का होईना) आशेवर पण आनंदात जातील याचा विचार करायचा. हे उपचार काही फुकट किंवा स्वस्त नाहीत. आणि त्याचा उपयोग होणार नाही हे त्यांच्या ३० वर्षाच्या मुलाला मी आणि माझ्या मित्राने सांगितले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
A
arunjoshi123 Mon, 11/06/2017 - 09:48 नवीन
आता प्रश्न असा आहे कि अशा "श्रद्धेने" आलेल्या बाईंना सडेतोडपणे सांगायचे का कि हि तुमची श्रद्धा नसून अंधश्रद्धा आहे.
यावर गावडे यांचे मत अत्यंत संतुलित आहे. ----------------- यनावालांचे मते बहुधा वैज्ञानिक सत्य लपवले तर ... ते चूक असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
च
चौकटराजा Mon, 11/06/2017 - 12:43 नवीन
कोणीही या जगात पूर्ण चिकित्सावादी नाही की पूर्ण श्रद्धावादी. यस धिस इज बेसिक. श्रद्धा हा प्रत्यक्ष जीवनात घेतलेला शॉर्टकट असतो. काही वेळेस तो अनुभवावर आधारित असतो काही वेळेस स्वकल्पनेवर. चिकित्सा त्यामानाचे कष्टाची व वेळखाउ प्रक्रिया आहे. आपण एखाद्या डॉ. कडे जातो ते कुणाच्या तरी संदर्भाने. ही झाली श्रद्धा . आपण ज्याने आपल्याला विशिष्ट डॉ कडे जायला सांगितले आहे हा याचा खालील प्रमाणे अभ्यास करून निर्णय घेतला तर ती चिकित्सा. १. त्या माणसाला डॉ. कडून काही कमिशन मिळत असेल का .२. तो त्याचा नातेवाईक आहे का? ३.त्याला आलेल्या अनुभवांची जंत्री व संबधित अनुमाने यात काही संबंध आहे का? ४. डॉ ची पदवी खरी आहे का.......... वगैरे. श्रद्धा व चिकित्सा या मनाच्या प्रवासाच्या दोन पध्दती आहेत त्याचा देव, धर्म, सुडो सायन्सेस, नितीमत्ता, तत्वज्ञान याशी निश्चित असा काही संबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
य
यनावाला Mon, 11/06/2017 - 17:03 नवीन
विश्वास-श्रद्धा-निष्ठा माणसाच्या मेंदूत बुद्धीचा उगम होतो. मानवी बुद्धीचे निरीक्षणशक्ती, स्मरणशक्ती, तर्कशक्ती, कल्पनाशक्ती, इत्यादि नऊ घटक आहेत. बुद्धी अमूर्त आहे. तिला वस्तुरूप अस्तित्व नाही. तसेच मेंदूत काम-क्रोध-मद-मत्सर-मोह-दंभ, प्रेम,आनंद, दु:ख अशा अनेक भावनाही उद्भवतात. श्रद्धा हीसुद्धा एक भावना आहे. या सर्व भावनांच्या समुच्चयाला मन म्हणायचे. मन अमूर्त आहे. मनाला वस्तुरूप अस्तित्व नाही. पण माणसाच्या ठिकाणी भावनांचे आविष्कार दिसतात. दु:ख झाले की माणूस खिन्न होतो. प्रसंगी रडतो. आनंद झाला की हसतो. या आविष्कारांवरून भावना ओळखता येतात. बुद्धी आणि मन यांचा उद्भव मेंदूत होतो. मेंदू मूर्त आहे. त्याला वस्तुरूप अस्तित्व आहे. जी गोष्ट खरी नाही, तिचा त्याग करणे आवश्यक आहे, हे बुद्धीला कळते पण भावनेला ती सोडवत नाही. अशी गोष्ट भावनेच्या प्रभावामुळे खरी मानण्याची मनोवृत्ती म्हणजे श्रद्धा. श्रद्धेमागे कोणताही तर्कसंगत विचार नसतो. थोडक्यात म्हणजे जिची सत्यता माणसाच्या तर्कबुद्धीला कोणत्याही प्रकारे पटत नाही, पटविता येत नाही ती गोष्ट पूर्वग्रहांमुळे केवळ भावनेच्या आधारे खरी मानण्याची तर्कविहीन मनोवृत्ती म्हणजे श्रद्धा होय. "देव अस्तित्वात आहे." हे जर बुद्धीला पटत असेल ,त्याविषयी कोणत्याही प्रकारची शंका नसेल तर देवावर विश्वास ठेवावा. तिथे श्रद्धेची आवश्यकता काय ? पायथ्यागोरसच्या प्रमेयाची सिद्धता बुद्धिगम्य आहे. म्हणून त्यावर आपण विश्वास ठेवतो. तिथे श्रद्धेची आवश्यकता नसते. एखाद्या गोष्टीची/तत्त्वाची/संकल्पनेची सत्यता बुद्धीला पटली तर विश्वास ठेवतात. बुद्धीला पटत नसता भावनेच्या आधारे सत्य मानणे म्हणजे श्रद्धा ठेवणे. विश्वास आणि श्रद्धा यांच्यांशी अर्थ साधर्म्य असलेला "निष्ठा" असा एक शब्द आहे. .विश्वास आणि श्रद्धा यांचा संबंध माणसाच्या विचारांशी आहे तर निष्ठेचा संबंध आचाराशी आहे. (या तीन शब्दांचे अर्थ स्पष्ट करण्य़ासाठी स्वतंत्र लेख लिहिला आहे. तो कधीतरी इथे देईन)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ट
ट्रेड मार्क Mon, 11/06/2017 - 23:35 नवीन
या सर्व भावनांच्या समुच्चयाला मन म्हणायचे इथेच तर सगळं स्पष्टीकरण फसलं. एखाद्या मानवाला मेंदू, फुफ्फुसं, हृदय ईई अवयव असतात तसं मन कुठे असतं हे कोणी दाखवू शकेल काय? मनाला वस्तुरूप अस्तित्व नसतं म्हणताय पण तरी ते मानायचं मग आत्म्यालाही वस्तुरूप अस्तित्व नसतं मग आत्मा का नाही मानायचा? सगळ्या मानवी भावना लिहिल्यात आणि श्रद्धा ही पण एक भावना आहे म्हणताय, मग सगळ्या माणसांत सगळ्या भावना सारख्याच प्रमाणात असाव्यात हा अट्टाहास का? एखादी व्यक्ती जशी सतत चिडकी असते तर काही आनंदी असतात. तसंच काही व्यक्ती श्रद्धाळू असतात हे का मान्य होत नाही? या सर्व भावना सतत कमी जास्त होत असतात. एखादी श्रद्धाळू व्यक्ती काही कारणाने अश्रद्ध होऊ शकते आणि उलटही होऊ शकतं. भलेभले डॉक्टर सुद्धा एखाद्या क्रिटिकल पेशंटसाठी सर्व प्रयत्न करून झाल्यावर आता सर्व देवाच्या हातात आहे म्हणतात. अश्या पेशंटचे आयुष्यभर देवाला नावं ठेवणारे वडील सुद्धा आयुष्यात पहिल्यांदा देवापुढे हात जोडताना दिसतात. वर कोणीतरी म्हणल्याप्रमाणे अतिशय अडचणीत असताना देव माझ्या पाठीशी आहे ही भावनाच कित्येकांना विपरीत परिस्थितीतून तारून नेते. माझ्याकडे माझे स्वतःचे असे काही अनुभव आहेत की जे कुठल्याही स्पष्टीकरणापलीकडचे आहेत. दुर्दैवाने त्यावेळेला कॅमेरा असण्याएवढी ऐपत नसल्याने तुम्ही ज्याला प्रूफ मानाल असं काही नाहीये. पण अनुभव म्हणून सांगू शकतो. आणि हो त्यातले काही अनुभव जसे प्रूफ न दाखवता येण्यासारखे आहेत तसेच काही (सोय असती तर) प्रूफ दाखवता आले असते असे आहेत. वर तुम्ही ज्याचे उदाहरण दिले आहे त्यातला बाबा म्हणजे एक भामटा आहे आणि त्याला फासलेला एक लोभी मूर्ख मनुष्य आहे. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे त्याने माणसावर श्रद्धा ठेवली आहे देवावर नव्हे. नेहमीप्रमाणे या प्रतिसादाला तुम्ही उत्तर द्याल अशी अपेक्षा नाही पण निदान वाचाल तरी अशी अपेक्षा ठेवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
D
Duishen Tue, 11/07/2017 - 15:07 नवीन
"देव अस्तित्वात आहे." हे जर बुद्धीला पटत असेल ,त्याविषयी कोणत्याही प्रकारची शंका नसेल तर देवावर विश्वास ठेवावा. तिथे श्रद्धेची आवश्यकता काय ? जिथे विश्वास असतो तिथे श्रद्धेची आवश्यकता नाही.... हे वाक्य खूप आवडले. जी गोष्ट सिद्ध झाली तिथे विश्वास असू शकतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
प
प्रकाश घाटपांडे Tue, 11/07/2017 - 09:17 नवीन
यनावाला म्हणतातच श्रद्धा व अंधश्रद्धा यातील फरक म्हणजे एक शब्द दोन अक्षरी आहे तर दुसरा चार अक्षरी. मला गंमत वाटते कि मराठीत आपण अंधश्रद्धा म्हणतो पण हिंदीत त्याला अंधविश्वास म्हणतात. श्रद्धा हा शब्द खर तर हिंदीत देखील आहेच की! दाभोलकर आपल्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा या पुस्तकात म्हणतात कि " श्रद्धा म्हणजे भावनेचे विचारामध्ये विकसित झालेले सत्याधिष्ठीत कृतीशील मूल्यात्मक रुप." "उपलब्ध वस्तुस्थितीला ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या सहाय्याने प्रश्न विचारल्यानंतर जी टिकते त्याला विश्वास किंवा श्रद्धा म्हणतात.जी टिकत नाही त्याला अंधश्रद्धा म्हणतात" आता कुणी म्हणेल की या शाब्दिक कसरती आहेत. मला ते एका अर्थाने ते मान्यही आहे. जोपर्यंत आपल्या मेंदूत भावना नावाचा घटक आहे तो पर्यंत माणुस कमी अधिक प्रमाण अंधश्रद्ध असणार आहे. [आपल्या तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट या न्यायाने माझी ती श्रद्धा इतरांची ती अंधश्रद्धा! माझी श्रद्धा ही समाजाला हानिकारक नाही म्हणून ती अंधश्रद्धा ठरत नाही. श्रद्धा ही आत्मिक बळ देते. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. या पद्धतीची मांडणीही समाजात होताना दिसते. परंतु तसे पाहिले तर श्रद्धा ही मुळातच अंध असते. त्या मुळे अंधश्रद्धा म्हणजे पिवळा पितांबर म्हटल्या सारखे आहे. चिकित्सेशिवाय ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा. तसेच चिकित्सेशिवाय एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याचे नाकारणे ही पण एक श्रद्धाच! विश्वास हा पुराव्यावर आधारलेला असतो. त्यामुळे त्याची चिकित्सा होउ शकते. श्रद्धेची चिकित्सा होत नाही]. ( उधृत अस्मादिकांचे मनोगत 'यंदा कर्तव्य आहे') आता श्रद्धेची सर्वसमावेशक स्थल,काल,व्यक्ती निरपेक्ष अशी व्याख्या होउ शकत नाही हे मान्य केले पाहिजे. ती संकल्पना आहे. सतीची प्रथा हा एके काळी धर्मश्रद्धेचा भाग होता आता ती निखालस अंधश्रद्धा आहे. म्हणजे कालबाह्य व समाजविघातक असे ते क्रुर कृत्य आहे. तात्पर्य काय तर आपली विवेकबुद्धी ठरवते श्रद्धा-अंधश्रद्धा. वयाच्या विसाव्या वर्षी असलेल्या श्रद्धा अंधश्रद्धा या संकल्पना वेगळ्या असतील वयाच्या चाळीस पन्नासाव्या वर्षी त्या वेगळ्या असू शकतात. आपल्या ज्ञानात अनुभवात काही भर पडत असतेच ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
D
Duishen Tue, 11/07/2017 - 16:39 नवीन
मराठीत आपण अंधश्रद्धा म्हणतो पण हिंदीत त्याला अंधविश्वास म्हणतात. विचार करण्यासारखा मुद्दा आहे. चिकित्सेशिवाय ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा. तसेच चिकित्सेशिवाय एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याचे नाकारणे ही पण एक श्रद्धाच! विश्वास हा पुराव्यावर आधारलेला असतो. त्यामुळे त्याची चिकित्सा होउ शकते. श्रद्धेची चिकित्सा होत नाही पूर्णत: सहमत. छान मांडणी केली आहे...चिकित्सा अतिशय महत्त्वाची आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
अ
अर्धवटराव Fri, 11/10/2017 - 09:06 नवीन
श्रद्धा - अंधश्रद्धा वगैरे पसार्‍याबद्दल नो कमेण्ट्स. त्या घोळात शिरायचच नाहि. वर कुठेतरी भावना, तर्कबुद्धी वगैरे भानगडी वाचल्या. त्याबद्दल एक अवांतर... मानवी जीवनात, किंबहुना कुठल्याही जीवंतपणात, भावनेचा रोल तर्कबुद्धी, चिकीत्सा वगैरे भानगडींपेक्षा फार मोठा आणि सखोल आहे. आपलं आजपर्यंतचं सर्व्हायव्हलच मुळी भावना नामक सिस्टीममुळे झालय. पुढेही यात बदल होण्याचे चान्सेस शुण्य आहेत. जीवनाचा एक यःकश्चीत भाग जाणिवेच्या कक्षेत येतो आणि त्यापेक्षाही लहान भाग तर्कबुद्धीच्या परिघात येतो. जीवन एक अखंड साखळी आहे. त्यातल्या एक-दोन लिंक्स तर्कबुद्धीच्या कक्षेत येतात. त्या लिंक्सच्या अलिकडे-पलिकडे जीवन नावाची ऑर्गेनीक प्रोसेस अत्यंत ऑर्गनाइज्ड पद्धतीने चाललेली असते व ती भावनेनेच सपोर्टेड असते. तर्कबुद्धीला उगाच स्ट्रेच करुन भावनांना दुय्यम समजणं म्हणजे नळाची तोटी फिरवणे तहान लागण्यापेक्षा जास्त महत्वाचं मानण्यासारखं झालं. भावना विश्व (इन्क्लुडींग श्रद्धा) हे जगण्याचं मेकॅनीझम आहे व तर्कबुद्धी जगण्यातली चैन आहे. समाजसुधारणेच्या नावाखाली आपला इगो गोंजारताना आपण ज्या फांदीवर बसलो आहोत तिच्यावरच कुठाराघात करणारी शेखचिल्ली वृत्ती फायद्याची तर नाहिच, प्रसंगी नुकसान करणारी आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Sun, 11/12/2017 - 05:57 नवीन
तर्कबुद्धीला उगाच स्ट्रेच करुन भावनांना दुय्यम समजणं म्हणजे नळाची तोटी फिरवणे तहान लागण्यापेक्षा जास्त महत्वाचं मानण्यासारखं झालं.
:) विवेचब आवडले.म्हणून तर आयक्यू बरोबर ईक्यू देखील तितकाच महत्वाचा आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा