Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अठ्ठावीस लक्ष रुपये

य
यनावाला
Sat, 11/04/2017 - 16:15
🗣 138 प्रतिसाद
अठ्ठावीस लक्ष रुपये .......यनावाला "पैशांचा पाऊस ! भोंदू बाबाने व्यावसायिकाला अठ्ठावीस लाख रु.ना गंडवले." या शीर्षकाची बातमी पुणे म.टा.(31-01-2017) मध्ये अनेकांनी वाचली असेल. ती अशी:- मंदार अरविन्द वैद्य ( वय ४७ वर्षे, विठ्ठलनगर, सिंहगड मार्ग, पुणे) यांचा शिरवळ येथे कारखाना आहे. ते श्रद्धाळू आहेत. त्यांच्याकडे बुवा-बाबा-स्वामींचे येणे- जाणे असते. सागरनाथ नावाचा बुवा वैद्यांकडे आला. " तुम्हांला धंद्यात आर्थिक अडचणी आहेत. मी अक्षय धनाचा कुंभ देतो. हवे तेवढे धन मिळेल. " असे सांगून त्याने नऊ हजार रुपये मागितले. वैद्यांनी आनंदाने दिले. नंतर कांही दिवसांनी , "अडथळे आहेत. ते दूर झाल्याशिवाय कुंभातून धन येणार नाही. पूजा करावी लागेल. " अशी बतावणी करून चाळीस हजार रुपये घेतले. त्यानंतर सागरनाथ कुंभ घेऊन आला. त्यांतून शंभर रुपयांच्या कांही नोटा पाडून दाखविल्या. अधिक नोटा पडेनात. "तुमच्यावर कोणी करणी केली आहे. आता स्मशानात जाऊन मोठा विधी करायला हवा. त्यासाठी बारा लाख रु.लागतील. मग नोटांचा पाऊसच पडेल." अशी आशा दाखवली. "पैसे न दिल्यास बारा भूतांचा कोप होईल" .अशी भीतीही घातली. वैद्यांनी मुदत ठेवी मोडून १२ लाख रु.दिले. त्यानंतर सागरनाथने आणखी पाच लाख रु.मागितले. वैद्यांनी तीही रक्कम सुपूर्द केली. नंतर मंदार वैद्यांना सागरनाथच्या मुलाचा फोन आला. "करणी वडिलांवर उलटली आहे. ती परत उलटविण्यासाठी १० लाख रु.पाठवावे. नाहीतर वडिलांचा मृत्यू होईल. मग त्यांचे प्रेत आणून मी ते तुमच्या दारासमोर टाकीन. " वैद्य घाबरले. त्यांनी दहा लाख रु.पाठविले. कांही दिवसांनी आणखी पैशांची मागणी आली. इतके पैसे गेल्यावर आतां मंदार वैद्यांना शंका आली की हा बुवा कदाचित् आपल्याला फसवित असावा. मग त्यांनी बुवाविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. पोलीसांनी सागरनाथ मीठानाथ परमार आणि चंदुलाल सागरनाथ परमार यांच्यावर जादुटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास चालू आहे. ....या प्रकरणावरून काय दिसते ? मंदार वैद्य हे व्यावसायिक आहेत. त्यांनी भोंदू बाबाला २८लाख रु. दिले. त्याअर्थी त्यांची आर्थिक स्थिती उत्तम होती. म्हणजे ते आपला व्यवसाय चांगल्या कार्यक्षमतेने सांभाळत होते. यावरून ते व्यवहारज्ञानी, कार्यकुशल, होते. कारखान्याचे व्यवस्थापन चांगले असणार. म्हणजे मंदार वैद्य बुद्धिमान आहेत. त्यांचे वय ४७ वर्षे आहे. म्हणजे ते अनुभवी आहेत. अशा या व्यवहारज्ञानी, कार्यकुशल, सक्षम, बुद्धिमान, अनुभवी व्यावसायिकाचे २८ लक्ष रुपये एक फडतूस, ढोंगी बाबा लुबाडतो याचे महदाश्चर्य वाटते. या बुवाने चोरी केली नाही. दरोडा घातला नाही. खुनाची धमकी दिली नाही. वैद्य यांनी त्याच्या पायांवर डोके ठेवले आणि हातावर लाखो रु. ठेवले. कोणताही लेखी व्यवहार केला नाही. हे अचंबित करणारे आहे. अविश्वसनीय वाटते. पण असे घडले हे सत्य आहे. असे घडण्याचे कारण काय ? यावर विचार करता एकच कारण संभवते. ते म्हणजे देव-धर्म आणि त्याच्याशी संबंधित विषयांवर मंदार वैद्य यांची असलेली श्रद्धा. अपरंपार श्रद्धेविना असे घडणे असंभवनीय आहे. श्रद्धा ही एक मनोभावना आहे. मन आणि बुद्धी यांचे उत्पत्तीस्थान मेंदूच आहे. आनंद, दु:ख, राग, प्रेम, लोभ, श्रद्धा, मद, मत्सर, काम अशा अनेक भावनांचा समुच्चय म्हणजे मन. माणसाचे मन श्रद्धा भावनेने लिप्त झाले की त्याची बुद्धी लुळी पडते. बुद्धीपेक्षा मन प्रबळ बनते. बुद्धी निष्प्रभ होते. बुद्धीची विचारक्षमता नष्ट होते. मेंदूवर श्रद्धेचे नियंत्रण येते. त्यामुळे सर्व निर्णय श्रद्धे अनुसार होतात. विवेक, चिकित्सा हे बुद्धीचे घटक मागे पडतात. मग व्यवहारज्ञान, क्षमता, बुद्धिमत्ता, अनुभव यांचा कांही उपयोग होत नाही. श्रद्धेचे चार प्रकार आहेत. ते सोदाहरण असे:- १) पारंपरिक श्रद्धा. (उदा. सोमवारी शिवपिंडीवर बेलपत्रे वाहावी.) २) गतानुगतिक श्रद्धा. (उदा.लालबागचा राजा नवसाला पावतो.) ३)आशावती श्रद्धा. ( उदा.श्रीयंत्राचे पूजन केले तर धनप्राप्ती होते.) ३) भयोद्भव श्रद्धा .( उदा.मृताचे धार्मिक अंत्यसंस्कार केले नाहीत तर त्याचा अतृप्त आत्मा कुटुंबाला पीडा देतो.) प्रस्तुत प्रकरणात मंदार वैद्य यांची आशावती श्रद्धा दिसते. आपण इतकी वर्षे, अनेक धार्मिक कार्ये निष्ठापूर्वक केली आहेत. आता देव माझ्यावर कृपा करणार. तो कुणाच्या रूपाने, कसा -कधी येईल हे सांगता येणार नाही. पण तो येईल हे निश्चित. तो येणार. मला कृपाप्रसाद देणार. असे त्यांना मनोमन वाटत होते. ते देवाची प्रतीक्षा करीत होते. वैद्य अनेक बुवा-बाबांना भेटत होते. शेवटी सागरनाथबाबा न बोलावता, त्यांच्या घरी आला. कांही न विचारता , "तुम्हांला अक्षय धनाचा कुंभ देतो." असे आपण होऊन म्हणाला. वैद्यांना क्षणैक साक्षात्कार झाला असावा की या बाबाला देवानेच पाठविले आहे. त्याने नऊ हजार रु. मागितले. वैद्यांनी आनंदाने दिले. पुढे तो वारंवार पैसे मागू लागला. वैद्यांना वाटले देव आपल्या श्रद्धेची परीक्षा पाहतो आहे. आपण कमी पडता नये. देवाच्या कसोटीला उतरलेच पाहिजे. या विचाराने ते पैसे देत राहिले. त्यांना वाटले "मी कुणाला कधी फसवले नाही. कुणाचे कधी वाईट केले नाही. वाईट चिंतिलेसुद्धा नाही. मग माझे कशाला काही वाईट होईल ? देव आहे. देवाला डोळे असतात ना ? तो पहातो आहे ना ? माझे भलेच होणार. देवाने पाठविलेला हा बाबा मला फसवणे शक्य नाही. अंतीं तो माझे कल्याणच करील." असे त्यांना सारखे वाटत राहिले असणार. शेवटी २८ लाख रुपये गेले तरी काहीच चांगले घडले नाही. हे ध्यानी आल्यावर ते श्रद्धेच्या ग्लानीतून थोडे बाहेर आले. "म्हणजे बुवा-बाबा श्रद्धाळू लोकांना लुबाडतात असे अंनिसवाले सांगतात ते खरे असते की काय ? " अशी पुसटशी शंका त्यांच्या मनात तरळली असावी. मग त्यांनी सागरनाथबाबा वि्रुद्ध पोलीसांत तक्रार दिली. पोलीसांनी जादुटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवला. पुढे काय झाले याची बातमी अद्याप वाचली नाही. नेहमीप्रमाणे पोलीसतपास चालू असेल. व्यवसाय-धंद्यात प्रत्येक गोष्टीवर चिकित्सा करून योग्य निर्णय घेणारी बुद्धी श्रद्धा-क्षेत्रात चालेनाशी झाली. कारण मन श्रद्धेने ओतप्रोत भरले होते. त्यामुळे बुद्धीने कोणत्याही गोष्टीची चिकित्सा केली नाही. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतून बुद्धी बाजूला पडली. किंबहुना श्रद्धेने तिला बाजूला सारले. आणि सर्व नियंत्रण आपल्या हाती घेतले. श्रद्धा भावनेमुळे प्रबळ झालेल्या मनाने मेंदुद्वारे निर्णय घेतले. कर्मेंद्रियाने (हातांनी) ते कार्यवाहीत आणले. भोंदूबाबाने मागितले तेवढे पैसे त्या्ला दिले. शेवटी माणूस म्हणजे त्याचा मेंदू. तो मेंदू श्रद्धाभावनेच्या आहारी गेला म्हणजे अशी फसवणूक होणारच. याची अनेक उदाहरणे आहेत. श्रद्धाळू लोकांचा निरुपाय असतो. श्रद्धेपुढे त्यांचा मेंदू हतबल होतो. श्रद्धेच्या गुंगीतून बाहेर आल्यावर "मी त्या बाबाला इतके पैसे दिले तरी कसे? " याचे आश्चर्य स्वत: वैद्यांनाच वाटले असेल. श्रद्धेची झिंग ही अशी असते. श्रद्धाळूंची फसवणूक होणे अपरिहार्य असते. त्यावर एकच उपाय तो म्हणजे श्रद्धेचे प्रयत्‍नपूर्वक विसर्जन करणे. श्रद्धा ठेवणे हे दास्य (गुलामगिरी) पत्करल्याचे लक्षण आहे. मंदार वैद्यांनी भोंदूबाबावर श्रद्धा ठेवली म्हणजे त्यांनी आपली बुद्धी त्याच्याकडे गहाण टाकली. म्हणजे त्यांच्या बुद्धीचे नियंत्रण बाबाकडे गेले. त्यामुळे तो बुवा सांगेल ते सत्य मानून वैद्य त्याच्या आज्ञा पाळत गेले. दासाला स्वामीच्या आज्ञा पाळाव्याच लागतात. मग फसवणूक अटळ असते. महाराष्ट्र टाइम्स सारख्या प्रतिष्ठित दैनिकात छापून आलेली ही सत्य घटना आहे. श्रद्धावंतांनी यावर स्वबुद्धीने विचार करावा. "आमचे महाराज अशी बुवाबाजी करणारे नव्हेतच." अशा भ्रमात राहू नये. ******************************************************************************
वर्गीकरण
चर्चा (काथ्याकूट)

प्रतिक्रिया द्या
48775 वाचन

💬 प्रतिसाद (138)
त
तुषार काळभोर Sun, 11/05/2017 - 06:51 नवीन
आपण जवळजवळ सगळे कमी जास्त फरकाने एका वा अनेक प्रकारच्या श्रध्दांमध्ये गुरफटलेले असतो. श्रद्धा मनावर किती प्रभावी ठरते व बुद्धी किती कमजोर, त्यानुसार आपण श्रद्धेच्या किती आहारी जातो ते ठरत असावे का? मी सतरा वर्षांपासून संकष्टी चतुर्थीला उपवास धरतो, पण चतुर्थीला थेऊरला जाण्याला माझा विरोध असतो. गर्दीमुळे. एखाद्या चतुर्थीला उपवास मोडला तरी मला जास्त वाईट वगैरे वाटत नाही. "आमचे महाराज अशी बुवाबाजी करणारे नव्हेतच." अशा भ्रमात राहू नये. हे आवडलं. या भ्रमानेच बहुतेकांचा घात होत असेल.
  • Log in or register to post comments
य
यनावाला Sun, 11/05/2017 - 10:10 नवीन
धन्यवाद पैलवान . लेखाविषयी तुम्ही अनुकूल मत व्यक्त केले. ....यनावाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
ए
एस Sat, 11/04/2017 - 18:11 नवीन
अंधश्रद्धा म्हणता येतील अशा भोळसट प्रकारच्या श्रद्धा ठेवण्याविरोधी तुमचे नेटाने सुरू ठेवलेले कार्य कौतुकास्पद आहे. फक्त एक या लेखाविषयीने म्हणू इच्छितो की ज्या प्रकारच्या श्रद्धेमुळे वैयक्तिक आणि समाजाचे नुकसान होणार नसते अशा प्रकारची श्रद्धा निरुपद्रवी म्हटली पाहिजे. दुसरे म्हणजे काही प्रकारची श्रद्धा ही विश्वासातून आणि संस्कारातून निर्माण होते, जी देशाच्या हिताची असते. याचे उदाहरण म्हणजे देश ही संकल्पना. या संकल्पनेप्रमाणे इतरही अशा संकल्पना आपल्या रोजच्या व्यवहारात आपण सगळेच मानतो, ज्या म्हटल्या तर खऱ्या आहेत, आणि म्हटले तर त्यांच्यापलीकडे बरेच काही वैश्विक आहे. दुसऱ्या शब्दांत त्या फक्त एक विचार आहेत. त्या विचारांवर बहुसंख्यांची श्रद्धा असते. या प्रकारच्या श्रद्धा सामूहिक हिताच्या दृष्टीने आवश्यक म्हटल्या पाहिजेत. अर्थात हे सगळं अवांतर झालं. पण वरील उदाहरणाच्या बाबतीत असे मोठे, जाणते व्यावसायिक असे फसले कसे याचं आश्चर्य वाटल्याखेरीज राहत नाही.
  • Log in or register to post comments
य
यनावाला Sun, 11/05/2017 - 17:22 नवीन
तुम्ही म्हणता ते ठीकच आहे. बातमी वाचल्यावर मला ती खरी वाटेना. २८ लक्ष रु.दिले ? असे कसे शक्य आहे? पण म.टा. सारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्राने बातमी नांवानिशी प्रसिद्ध केली होती. त्यात पोलीस ठाणे तसेच तेथील अधिकारी यांची नांवे होती. त्यामुळे त्यामुळे बातमी खरी मानली. मग सगळे पृथक्करण केले आणि लेख लिहिला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
A
arunjoshi123 Mon, 11/06/2017 - 06:28 नवीन
यनावाला, झालेली घटना दुर्दैवी आहे. पण आपण तिचा संदर्भ बदलून, रम्य कल्पना करून जो श्रद्धा शब्दाबद्दल सुतावरून स्वर्ग गाठला आहे तो देखील दुर्दैवी आहे. ============================= गुगलवर "ब्लॅक मॅजिक स्पेशालिस्ट पुने" असं लिहा आणि येणारे रिझल्ट पोलिसांना द्या. आपणांस आणि अनिंसला माझा फुल्ल पाठिंबा (टोकन) आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
प
प्रचेतस Sat, 11/04/2017 - 19:07 नवीन
उत्तम लेख
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 11/04/2017 - 21:15 नवीन
https://en.m.wikipedia.org/wiki/Anubhav_Plantations हे 400 कोटी लोक कोणत्या श्रद्धेचे बळी आहेत? शेवटी लोभ हा वाईटच. त्याचा गैरफायदा घेणारे लोक सर्वत्र आहेतच. मग श्रद्धा असो व नसो लोभाविष्ट: नर: वित्तम बिक्षते नैवचापदं। दुग्धम पश्यती मार्जार:न तथा लगुडाहतीम। यनावाला फक्त श्रद्धेवरच एकांगी टीका करताना आढळतात
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 11/04/2017 - 21:15 नवीन
https://en.m.wikipedia.org/wiki/Anubhav_Plantations हे 400 कोटी लोक कोणत्या श्रद्धेचे बळी आहेत? शेवटी लोभ हा वाईटच. त्याचा गैरफायदा घेणारे लोक सर्वत्र आहेतच. मग श्रद्धा असो व नसो लोभाविष्ट: नर: वित्तम बिक्षते नैवचापदं। दुग्धम पश्यती मार्जार:न तथा लगुडाहतीम। यनावाला फक्त श्रद्धेवरच एकांगी टीका करताना आढळतात
  • Log in or register to post comments
D
Duishen Tue, 11/07/2017 - 14:20 नवीन
मला वाटत दोन बाबीमध्ये फरक करायला पाहिजे - एक श्रद्धा आणि दुसरा विश्वास.... श्रद्धा (Belief ) ही एखाद्या संकल्पना / न पाहिलेल्या बाबींवर असू शकते मात्र विश्वास (Trust ) साठी एखादी जिवंत व्यक्ती किंवा मूर्त कल्पना आवश्यक आहे. श्रद्धेमध्ये करार असत नाही पण विश्वासात करार असू शकतो. एखाद्या कंपनीत पैसे गुंतवणे, विम्यात पैसे गुंतवणे, बँकेत गुंतवणे किंवा ठेवणे याला व्यक्ती/ संस्था यामधील करार आहे. तेंव्हा ४०० कोटी श्रद्धेचे बळी नसून कायदेशीर करार मोडल्याचे बळी आहेत. फसवणाऱ्या व्यक्तीला शिक्षा देण्याचा इथल्या न्यायालयाला अधिकारही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 11/07/2017 - 15:14 नवीन
श्रद्धा (Belief ) ही एखाद्या संकल्पना / न पाहिलेल्या बाबींवर असू शकते मात्र विश्वास (Trust ) साठी एखादी जिवंत व्यक्ती किंवा मूर्त कल्पना आवश्यक आहे या अनुभव प्लांटेशन मध्ये पैसे गुंतवलेल्या किती लोकांनी सागाचे झाड पाहिलेले असेल याची शंका आहे. त्यातून किती लोक त्या श्री नटेशन ना ओळखत असतील किंवा त्यांना पाहिलं असेल? मग त्यांच्या वर विश्वास नक्की कोणत्या "जिवंत व्यक्ती किंवा मूर्त कल्पना" पाहून ठेवला? आता याला तुम्ही अंध विश्वास म्हणा किंवा श्रद्धा म्हणा हा सर्व शब्दाचा खेळ आहे. करार हा काही लेखीच असायला पाहिजे असे नाही तोंडी पण करार असू शकतो. याच भोंदू बाबाने तुम्हाला गुप्त धन मिळवायला मी मदत करेन म्हणून अगदी स्टँम्प पेपर वर लिहून दिलं तर तो करार कोणत्या आधारावर होईल? मी परत तेच म्हणतो कि यनावाला एक फसवणुकीचा मामला पकडून श्रद्धेवर एकांगी टीकेची झोड उठवत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Duishen
स
सुबोध खरे Tue, 11/07/2017 - 15:29 नवीन
मी गणपतीची पूजा करतो. यात श्रद्धा आली कि विश्वास आला? गणपतीची मूर्ती हि मूर्त कल्पना आहे ती संकल्पनाही आहे आणि प्रत्यक्ष गणपतीला कोणीही पाहिलेले नाही. मग गणपतीची पूजा करणारा अंधश्रद्धेचा बळी आहे का? आपण पराकोटीचे नास्तिक असाल तर ठीक आहे. ( असा कोणीही आजतागायत माझ्या पाहण्यात नाही). श्री कलबुर्गी यांनी हिंदू मूर्तीवर मूत्र विसर्जन केले पण अशा एखाद्या व्यक्तीला आपण आपल्या वडिलांच्या तसबिरीवर मूत्र विसर्जन करा सांगितले तर तो करेल का? कारण ती तसबीर हे एक प्रतीकच आहे जसे मूर्ती हेही एक प्रतीक आहे. प्रत्यक्ष व्यक्ती नाही.पण तरीही त्याबद्दल (वडिलांच्या तसबिरीबद्दल) वाईट गोष्ट करणे हे अशा माणसालाहि जमत नाही. याला आपण काय म्हणाल विश्वास कि श्रद्धा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 11/07/2017 - 15:32 नवीन
हायला मला पण "गोल" बोलायला जमायला लागलंय कि ! मिपा कि जय हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
D
Duishen Tue, 11/07/2017 - 22:49 नवीन
@सुबोधजी, माझ्या दृष्टीने कुठेलेही ईश्वर रूप घ्या ती संकल्पनाच आहे. "....आणि प्रत्यक्ष गणपतीला कोणीही पाहिलेले नाही." या मताशी मी सहमत आहे म्हणून माझ्या दृष्टीकोनातून ही श्रद्धा आहे. पण जेंव्हा गणपतीची मूर्ती दुध पिते असा समज सामोरा येतो; त्यावेळेस आपण त्याला श्रद्धा म्हणणार की अंधश्रद्धा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
D
Duishen Wed, 11/08/2017 - 00:14 नवीन
@सुबोध जी, श्रद्धा हा चिकित्सेचा विषय आहे हे अनेक जणांना अमान्य आहे! पण विश्वास हा नक्कीच चिकित्सेचा विषय आहे! 'अनुभव प्लांटेशन' साठी मुख्य व्यक्तीला भेटणे गरजेचे असतेच असे नाही. कर्मचारी वर्ग असणारच. तिथून विश्वासाची पायरी सुरु होते. आपल्या तर्काने विचार केल्यास जे रिलायंसचे / टाटा / एअरटेल चे सीम कार्ड वापरतात त्यापैकी कितीजण अंबानी, टाटा आणि भारती मित्तल यांना भेटले? ...मग अंबानी, टाटा आणि भारती मित्तल ही श्रद्धास्थाने मानावयाची का?... का इथे विश्वास काम करतो? ....जाहिरातींमध्ये या कंपन्यांनी दर दिवशी १ जीबी डेटा देऊ असे म्हणले आहे मग आपण ते श्रद्धाळू आहोत म्हणून ती जाहिरात मानतो की कंपनीवर विश्वास ठेवून जाहिरात मानतो? उद्या एखाद्या गटाने (ज्यात आस्तिक, नास्तिक, अज्ञेयवादी इ.इ.) ठरवले की अंबानी, टाटा आणि भारती मित्तल भेटावयाचे तर ते भेटूही शकतील ना! त्यांच्या अस्तित्वाची खात्री करता येण्याजोगी आहे. तशी खात्री अनुभव कं. च्या मुख्य माणसाची पण होऊ शकेल. दुसऱ्या एका प्रतिसादात तुम्हीही मान्य केले की "...प्रत्यक्ष गणपतीला कोणीही पाहिलेले नाही." पण अंबानी, टाटा आणि भारती मित्तल किंवा श्री. नटेश यांना कुणीही पाहू शकतं.समजा एखाद्या व्यक्तीने ईश्वराच्या एखद्या रूपावर आक्षेप घेतला तर त्या ईश्वराला मानणारे चिडतील, त्रागा करतील किंवा कलबुर्गी करतील पण अंबानी, टाटा आणि भारती मित्तल यांच्यावर कुणी निराधार आक्षेप घेतला तरीही समाज त्रागा करणार नाहीत किंवा त्यांचा कलबुर्गी होणार नाही. मला खात्री आहे की आपण - ज्या लोकांनी अनुभव कं पैसे गुंतवले त्यांच्या भावनांना श्रद्धा ठरवून श्री. नटेश सारख्या व्यक्तींना ईश्वरासारख्या उदात्त संकल्पनेच्या रांगेत बसवणार नाहीत. आता डेटा ऐवजी दुसरा प्रसंग विचारात घेऊ.. मंदिरात गेल्यावर हातावर प्रसाद ठेवला आणि प्रसाद खाण्याने आपल्या आयुष्याचे चांगले होईल असे वाटणे ही देवावरची श्रद्धा की देवावरचा विश्वास? जसे डेटाचा वापर पडताळता येतो तसा प्रसादाचा वापर पडताळता येणे शक्य आहे का?...प्रसादाचा अनुभव खूप व्यक्तीसापेक्ष असणार आहे. एखादा भाविक कदाचित फायदा होईल असा विचारही करणार नाही; एखादा भाविक कदाचित प्रसादामुळेच माझा अबक प्रश्न सुटला असे म्हणू शकेल. पण एखाद्या भाविकाला अपेक्षा असूनही चांगला अनुभव आला नाही/ त्याच्या/तिच्या समस्या सुटल्या नाहीत तर तो ईश्वराला जाब विचारेल का? एखाद्याला १ जीबी डेटा नाही मिळाला तर व्यक्ती कंपनीला जाब विचारू शकते पण प्रसाद खाऊन ही चांगला अनुभव नाही आला तर जाब विचारल्या जात नाही. तेंव्हा कंपनी असो किंवा सरकार असो, किंवा बँक असो आपल्याला जाब विचारण्याची सोय आहे कारण हा विश्वासाचा प्रकार आहे; पण देवाला जाब विचारल्या जात नाही कारण तिथे श्रद्धा आहे. जेंव्हा जेंव्हा एखादी व्यक्ती श्रद्धास्थान बनायला लागते त्यावेळेस त्या व्यक्तीच्या प्रभावाचा जेव्हडा परीघ आहे त्या परिघातील लोकांचे / व्यक्तींचे नुकसान होत जाते मग ती व्यक्ती कितीही चांगली असो किंवा वाईट... आणि मुळ गाभा हरवतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Sat, 11/04/2017 - 21:17 नवीन
400 कोटींचा अपहार झाल्याने लुबाडले गेलेले किंवा दिवाळखोरीत गेलेले लोक
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 11/04/2017 - 22:28 नवीन
यनावाला, श्रद्धेमुळे फसवणूक झाली. ठीके. धरा श्रद्धेला जबाबदार. पण कितीतरी वेळा श्रद्धेचा संबंध नसतांना फसवणूक होते. तेव्हा कोणाला जबाबदार धरणार? विषारी फळ खाल्ल्याने प्रकृती बिघडली तर खाणंच बंद करणार का? की अन्न पारखून खाणार? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
D
Duishen Tue, 11/07/2017 - 14:25 नवीन
विषारी फळ खाल्ल्याने प्रकृती बिघडली तर खाणंच बंद करणार का? की अन्न पारखून खाणार? अन्न पारखून खावे का नाही यापेक्षा विषारी फळ खाणे पूर्णत: बंद करावे हा एकमेव पर्याय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
माहितगार Tue, 11/07/2017 - 14:38 नवीन
चांगली फळे आणि सडकी फळे यात फरक असतोच ना ! यनावालांचा प्रयत्न स्तुत्य असला तरी दुसर्‍या टोकाचा दुराग्रहही तर्कसुसंगत ठरत नसावा किंवा कसे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Duishen
च
चामुंडराय Sun, 11/05/2017 - 00:15 नवीन
बाकी काहीका होईना, अठ्ठावीस दश प्रतिसादांची निःश्चिती !
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Sun, 11/05/2017 - 03:43 नवीन
मंदार वैद्य हे व्यावसायिक आहेत. त्यांनी भोंदू बाबाला २८लाख रु. दिले. त्याअर्थी त्यांचीआर्थिक स्थिती उत्तम होती. म्हणजे ते आपला व्यवसाय चांगल्या कार्यक्षमतेने सांभाळत होते. यावरून ते व्यवहारज्ञानी, कार्यकुशल, होते. कारखान्याचे व्यवस्थापन चांगले असणार. म्हणजे मंदार वैद्य बुद्धिमान आहेत. त्यांचे वय ४७ वर्षे आहे. म्हणजे ते अनुभवी आहेत. अशा या व्यवहारज्ञानी, कार्यकुशल, सक्षम, बुद्धिमान, अनुभवी व्यावसायिकाचे २८ लक्ष रुपये एक फडतूस, ढोंगी बाबा लुबाडतो याचे महदाश्चर्य वाटते. या बुवाने चोरी केली नाही. दरोडा घातला नाही. खुनाची धमकी दिली नाही. वैद्य यांनी त्याच्या पायांवर डोके ठेवले आणि हातावर लाखो रु. ठेवले. कोणताही लेखी व्यवहार केला नाही. हे अचंबित करणारे आहे. अविश्वसनीय वाटते. पण असे घडले हे सत्य आहे. असे घडण्याचे कारण काय ?
यनावाला यांनी मिसळपाव वर लेख टाकलेला आहे. म्हणजे ते शिकलेले असणार. त्यांनी वृत्तपत्रास पत्र देखिल लिहिले होते. म्हणजे त्यांना जगाचे अनेक व्यवहार माहित आहेत. त्या पत्राखाली प्रा. मंजे प्राध्यापक असे लिहिले होते. म्हणजे त्याअर्थी त्यांचीआर्थिक स्थिती उत्तम आहे. त्यांच्या लेखात व्याकरणाच्या चुका नाहीत, म्हणजे बुद्धीमान इ इ असणार. पेपर वाचतात म्हणजे जागृत देखील असले पाहिजेत. सुरुवातीच्या पदावरून प्राध्यापक बनायला वेळ लागतो. आपण त्यांनी १० वर्षे नोकरी केली असे मानू. सरकारने कधी त्यांच्या घरी चोरी केली नाही. दरोडा घातला नाही. खुनाची धमकी दिली नाही. ज्याला व्हॅलिड लेखी करार म्हणावं त्यासाठी लागणारा कोणताही "स्कोप आणि करेस्पाँडिंग कंसिडरेशन" असणारा लेखी करार त्यांच्यात सरकारमधे नाही. म्हणजे सरकार हे पैसे घेऊन यनावालांसाठी काय करणार आहे हे लिखित मधे यनावालांकडे नाही. तरीही यनावाला सरकाराला दरवर्शी आपल्या उत्पन्नाचे ३०% देत आहेत. अज्ञात संकेतस्थळी अज्ञात लोकांना ते हे पैसे सोपवत असतात. हे अचंबित करणारे आहे. अविश्वसनीय वाटते. पण असे घडते हे सत्य आहे. इतके पैसे गेल्यावर किमान मंदार वैद्यांना शंका तरी आली की हा बुवा कदाचित् आपल्याला फसवित असावा. पण यनावाला यांना अजूनही सरकारची पोलिसांकडे फिर्याद करावी असं वाटलेलं नाही. ================================================= मुद्दा असा आहे यनावाला, व्यवस्थेतला गुन्हा हीच व्यवस्था आहे असा कांगावा करू नये, मग ते सरकार असो नैतर धर्मव्यवस्था असो.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 11/05/2017 - 13:12 नवीन
यनावाला यांच्यावर व्यक्तिगत लिहिण्यापेक्षा आपण लेखाबद्दल प्रतिसादाबद्दल लिहिले पाहिजे असे वाटते. राहवलेच नाही म्हणून सांगितले, बाकी, आपली मर्जी. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
म
मराठी कथालेखक Sun, 11/05/2017 - 17:08 नवीन
सदर प्रतिसादक भान हरपून फक्त त्वेषाने प्रतिसाद लिहित आहे असेच दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
M
mayu4u Mon, 11/06/2017 - 04:34 नवीन
आणि अजोंचे प्रतिसाद टाळून अन्य प्रतिसाद वाचतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
A
arunjoshi123 Mon, 11/06/2017 - 06:21 नवीन
आणि यासाठी मी ईश्वराचा अत्यंत ऋणी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u
A
arunjoshi123 Mon, 11/06/2017 - 06:15 नवीन
आपण मी काय लिहिलं आहे त्यातल्या कोणत्याही एका विधानावर भाष्य करण्याची पात्रता दाखवा. मग काय अर्थ काढायचा तो काढा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
A
arunjoshi123 Mon, 11/06/2017 - 06:20 नवीन
आणि डॉ. दिलिपजी, याला वैयक्तिक लिहिणं म्हणतात. =============================== यनावालांच्या दुसर्‍या धाग्यात दुशियेन यांनी माझ्या प्रत्येक मुद्द्याचं खंडन केलं आहे. तिथे मी त्यांना प्रेमानं, सन्मानानं लिहिलं आहे. विधानं मागे घेतली आहेत. तुमच्या मुद्द्याच्या विरोध केला मंजे तुमचा विरोध केला या मानसिकतेत्नं बाहेर यायला हवं. (मलाही हे अवघड आहे, पण मी यासाठी काँशसली कमिटेड आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
A
arunjoshi123 Mon, 11/06/2017 - 06:11 नवीन
यनावाला यांच्यावर व्यक्तिगत लिहिण्यापेक्षा
मी त्यांच्याबद्दल काहीही वैयक्तिक लिहिलं नाही. रुपक आहे ते. ----------------------------------------------------------------- खालचा त्यातला मुद्दा महत्त्वाचा आहे - श्रद्धा नावाच्या व्यवस्थेतला एक गुन्हा निवडून ती संकल्पना घातक सिद्ध करणे मूर्खपणाचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
माहितगार Tue, 11/07/2017 - 14:44 नवीन
खालचा त्यातला मुद्दा महत्त्वाचा आहे - श्रद्धा नावाच्या व्यवस्थेतला एक गुन्हा निवडून ती संकल्पना घातक सिद्ध करणे मूर्खपणाचे आहे.
व्यक्तिगततेचा मुद्दा तुर्तास बाजूला ठेवला तर सरसकटीकरणामुळे विरोधाभास होत असावा असे म्हणण्यास जागा शिल्लक रहाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
प
पुंबा Mon, 11/06/2017 - 06:42 नवीन
मुद्दा असा आहे यनावाला, व्यवस्थेतला गुन्हा हीच व्यवस्था आहे असा कांगावा करू नये, मग ते सरकार असो नैतर धर्मव्यवस्था असो.
१. एक तर कर घेणे हा गुन्हा कसा झाला? कर देणे हे कायद्याने बाध्य आहे. सरकार ही व्यवस्था संविधान नावाचे सामाजिक कंत्राट करून तयार केलेली आहे. सर्व नागरिक त्या कंत्राटाचे स्टेकहोल्डर्स आहेत. सदर व्यवस्था चालावीत यासाठी जे कायदे केलेत ते लोकांच्या प्रतिनीधींनी केलेत. धर्मव्यवस्थेत असं काही आहे काय? २. दुसरं व्यवस्थेतला गुन्हा निपटवण्यासाठी स्टेटने निराळी व्यवस्था केलेली आहे. धर्मव्यवस्थेत कसली सोय आहे गुन्ह्याबाबत आवाज उठव्ण्याची? बाकी, हा प्रतिसाद वैयक्तिक नाही असला स्वतःचा समज करून घेऊ नकात. वैयक्तिकच आहे हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Mon, 11/06/2017 - 08:00 नवीन
बाकी, हा प्रतिसाद वैयक्तिक नाही असला स्वतःचा समज करून घेऊ नकात. वैयक्तिकच आहे हे.
हो का? मी एक अस्तिक, श्रद्धावंत, धार्मिक, इ इ मनुष्य आहे. तुमच्या न्यायाने यनावालांनी खालील विशेषणे मला वापरली आहेत - हास्यास्पद, असत्यवादी, श्रद्धाळू, बुद्धीहीन, तर्कहिन, कॉमनसेन्स नसलेले, विचारशक्ती बधिर असलेले, बुद्धाला अतींद्रीय शक्ती आहे असे मानणारे, मेंदू कुंठीत झालेले, पुरोहितांकडून धूळफेक करून घेतेलेले, फसवले गेलेले, बनवले गेलेले, सुबुद्ध नसलेले, तर्कबुद्धी नसलेले, वैज्ञानिक दृष्टिकोन नसलेले स्वत:ची बुद्धी न वापरणारे,अनुभवाचा, कॉमनसेन्सचा वापर न करणारे, शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, गतानुगतिकता मानणारे, स्वबुद्धीचा न वापरणारे, माणुसपणाचा खरा सन्मान न करणारे, गुलामगिरि, दास्यत्व पत्करणारे, शिक्षकांना प्रश्न न विचारणारे. ====================== श्रद्धावंतांची मूळात प्रतिष्ठेची लायकीच कमी असते हा विचार दूर सारून संतुलित बुद्धिने विचार करा कि कोण संयमी भाषा वापरत आहे नि कोण वैयक्तिक? "पाकाडे हरामखोर असतात" म्हटलं कि ते वाक्य सर्व पाकिस्तानी नागरिकांना लागू होतं हे नास्तिकी लॉजिकच्या बाहेर जातंय का? =================================================== आता एकेका नास्तिकी (कारण तुलना धर्माशी आहे.) गैरसमजाबद्दल बोलू.
एक तर कर घेणे हा गुन्हा कसा झाला?
सरकार मला जितकी सेवा देतं तितका त्याने कर घ्यावा, नै का? माझ्या उत्पन्नांचा वा खरेदींचा वा अशाच करपात्र व्यवहारांच्या मूल्यांचा आणि सरकार मला ज्या सेवा देत आहे त्यांच्या मूल्यांचा संबंध काय आहे? आय शूड बी बिल्ड फॉर व्हॉट आय हॅव बीन सर्व्ड! शिवाय सरकारने मला कोणत्या सेवा हव्यात, नकोत ते मला बिल करताना प्रत्यक्ष ठरवू द्यावे. कंपन्यांना कर लावताना खर्च, गुंतवणूक वगळून नफ्यावर कर आणि सामान्य नागरिकाला अख्ख्या उत्पन्नावर कर!! अर्ध्या लोकांना शेती करतात म्हणून उत्पन्न कितीही असले तरी कर शून्य!!! वेगळं असं "कर सरकार" नसतं, सगळे मुद्दे मिक्स होतात केवळ करासाठी सरकारवर मत देता येत नाही. सरकार स्वतः सेवा , उत्पन्न विकत घेतं तेव्हा कर शून्य. अनेक बाबींवर करदर वेगवेगळे! सरकार कराचं काय करणार आहेहे बजेट अगदी सरकार ९९% अधिकार्‍यांना पण आधी माहित नसते, मग आमचा काय पाड. सरकारी यंत्रणेचा खर्च्च अपरंपार आणि ती बरीच अक्षम. यात चिकित्सक नास्तिकांना न्याय कसा दिसतो. स्वतः सरकारनेच कायदे केले असल्याने ते कशाला याला गुन्हा म्हणेल? पण नास्तिक तर कशाचीही चिकित्सा करू शकतात ना? ====================================================
धर्मव्यवस्थेत असं काही आहे काय?
धर्मव्यवस्थेत शासन, व्यापारी, प्रजा इ इ साठी अनेक तत्त्वे आहेत. अर्थशास्त्र हा शब्द आपण वापरता तो एक धार्मिक ग्रंथ आहे त्या विषयावरचा. असं प्रत्येक धर्मात आहे. अर्थात आता धर्मव्यवस्था नसल्याने यांचं संकलित रुप देणं अवघड आहे. ------------------- धर्म हि देखील एक सामाजिक व्यवस्था होती, सर्वमान्य होती. तिचे मेरिट डिमेरीट न पाहता सरसकट फेकून दिली आहे. आपण तर सामाजिक रचना नावाचा प्रकार आहे का असाच प्रश्न विचारताय. ===============================
दुसरं व्यवस्थेतला गुन्हा निपटवण्यासाठी स्टेटने निराळी व्यवस्था केलेली आहे. धर्मव्यवस्थेत कसली सोय आहे गुन्ह्याबाबत आवाज उठव्ण्याची?
धर्मव्यवस्थेत अगदी छोट्या छोट्या नैतिक गुन्ह्यांपासून ते नीच गुन्ह्यांपर्यंत सर्वाना शिक्षा, न्याय इ ची सोय आहे. आजची जी पद्धत आहे - छोट्या लोकांना जास्त त्रास, शिक्षा म्हणजे कोंडणे, हजारो पळवाटा, उशिराचा न्याय, एकीकडे एक न्याय दुसरीकडे दुसरा, एकाच देशात वेग्वेगळ्या कोर्टांचे तेच, हुशार वकील दिला तर सुटका असले प्रकार धार्मिक व्यवस्थेत कमी होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
A
arunjoshi123 Mon, 11/06/2017 - 08:08 नवीन
https://www.mvnadkarni.com/files/Hindu%20Eco%20Philosophy.pdf यात चर्चेला घेतलेले विषय आपण पाहू शकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Sun, 11/05/2017 - 05:03 नवीन
मंदार अरविन्द वैद्य ( वय ४७ वर्षे, विठ्ठलनगर, सिंहगड मार्ग, पुणे) यांचा शिरवळ येथे कारखाना आहे. ते श्रद्धाळू आहेत.
ते श्रद्धाळू नाहीत. म्हणजे श्रद्धाळू हे विशेषण या माणसासाठी सर्वात उचित असं असतं तर सगळे लोक श्रद्धाळू असल्यामुळे अक्षयधनकुंभांचे शॉपिंग मॉल्स असते. सदर इसम एक आधुनिक कॅपिटॅलिस्ट, मटेरियालिस्ट आहे. त्यानं कै २८ लाख देव पाहायचे नैत दिले. (ते ही योग्य नसतं म्हणा) तो फक्त एक गुंतवणूकदार आहे आणि त्याच्यात आणि अन्य कोणत्या गुंतवणूकदारात काहीही फरक नाही. हा मनुष्य निर्लज्ज लोभी आहे. प्रकरण पैशाव्यतिरिक्त अन्य बाबींवर घसरलं (प्रेत घरासमोर टाकणे) तेव्हा त्याने गुंतवणुकीची रिस्क अव्हेरली.
त्यांच्याकडे बुवा-बाबा-स्वामींचे येणे- जाणे असते. सागरनाथ नावाचा बुवा वैद्यांकडे आला. " तुम्हांला धंद्यात आर्थिक अडचणी आहेत. मी अक्षय धनाचा कुंभ देतो. हवे तेवढे धन मिळेल. " असे सांगून त्याने नऊ हजार रुपये मागितले. वैद्यांनी आनंदाने दिले.
अक्षयधनकुंभ हि तसं तर एक सरकारी कल्पना आहे. त्यांचा कारखाना (मंजे त्याची मालक असलेली लिगल एंटीटी) हा एक अक्षयधनकुंभ आहे असं एक सरकारी गृहितक आहे. मंजे ही कंपनी अनंतकालीन, सदा नफा कमावणारी असते, असू शकते हे सरकारलाच अभिप्रेत आहे. ==================== किंबहुना सागरनाथाकडे "खरा अक्षयधनकुंभ" नाही म्हणून तर या माणसानं पोलिसांकडे तक्रार केली नाही ना??? =============== बुवा-बाबा-स्वामींचे येणे जाणे ही एक उत्तम गोष्ट आहे. ============== नास्तिक (अश्रद्धावंत) पार्टी बिघडावत असले तर त्यांचे येणे जाणे बंद करावे. =================== बाकी हे वैद्य एक श्रद्धाळू नसून एक अनप्रोफेशनल, अशिक्षित खरिददार आहे. ९००० रु मधे अनंत धन कसं विकत घेणे हे अर्थहिन विधान आहे - यावर अंधश्रद्ध देखिल विश्वास ठेऊ शकत नाही. आणि कारखाना चालवणार्‍या माणसानं धनाचं स्वरुप, धन काढायचे काळ, राशी, पद्धत, पेमेंट टर्म्स इ इ ची चौकशी करू नये? त्यालाच का विकत आहे, स्वतः का वापरत नाही, हे देखिल प्रश्न आहेतच. श्रद्धा आणि प्रश्न हे विरोधार्थी शब्द नाहीत. =============================== एरवी मला हेत्वारोप करायला आवडत नाही, पण यनावालांचा इतिहास पाहता नको तिथे श्रद्धेला बदनाम करायची त्यांची सवय पाहून इथे त्यांनी श्रद्धेला गोवलेलं आवडलेलं नाही. काळी जादू मंजे श्रद्धा का हो यनावाला? उगाच कुठून कुठेही घसरायचं. http://punemirror.indiatimes.com/pune/crime/bizmen-duped-of-rs-33-lakh-after-black-magic-lure/articleshow/56861872.cms हा वैद्य हवालात सामिल आहे. ===============================
On Sunday, a Sinhagad Road-based businessman also lodged a complaint against the trio at the Sinhagad Road police station, with the help of members of Maharashtra Andhshraddha Nirmoolan Samiti (MANS), for being duped of Rs 28 lakh.
श्रद्धा नावाच्या चांगल्या व्यवस्थेचे हे गुन्हेगार आहेत. त्यांना पकडण्यात अनिंसने केलेली मदत स्तुत्य आहे.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Sun, 11/05/2017 - 05:17 नवीन
मन आणि बुद्धी यांचे उत्पत्तीस्थान मेंदूच आहे.
अगायो, मन नावाचा कोणता प्रकार नसतो. असतो ही यनावालांची अपार अंधश्रद्धा आहे. त्यापेक्षा अक्षयधनकुंभ ही अंधश्रद्धा बरी. किमान काही दिसतं. काही ट्रिक होते.
यावर विचार करता एकच कारण संभवते. ते म्हणजे देव-धर्म आणि त्याच्याशी संबंधित विषयांवर मंदार वैद्य यांची असलेली श्रद्धा.
http://ncrb.nic.in/StatPublications/CII/CII2015/cii2015.asp
इथल्या सगळ्या गुन्ह्यांचं कारण लोकांची लोकशाहीवरची श्रद्धा!!! मस्तच कि. आनंद, दु:ख, राग, प्रेम, लोभ, श्रद्धा, मद, मत्सर, काम अशा अनेक भावनांचा समुच्चय म्हणजे मन. माणसाचे मन श्रद्धा भावनेने लिप्त झाले की त्याची बुद्धी लुळी पडते.
उगाच खपतंय म्हणून काहीही विकणार? आनंद, दु:ख, राग, प्रेम, लोभ, मद, मत्सर, काम आणि अशा सर्वच भावनांनी लिप्त झाले की माणसाची बुद्धी लुळी पडते. मग सोडून द्यायच्या का सगळ्या भावना??
विवेक, चिकित्सा हे बुद्धीचे घटक मागे पडतात.
ह्या दोन गोष्टि मेंदूत आणि वरच्या भावना मनात असतात असा शोध लावल्यासाठी तुम्हाला नोबल दिलं पाहिजे. तुमच्याच अंधश्रद्धा जास्त दिसताहेत.
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Sun, 11/05/2017 - 08:18 नवीन
ह्या दोन गोष्टि मेंदूत आणि वरच्या भावना मनात असतात असा शोध लावल्यासाठी तुम्हाला नोबल दिलं पाहिजे. तुमच्याच अंधश्रद्धा जास्त दिसताहेत. =))) लोल....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Sun, 11/05/2017 - 05:39 नवीन
श्रद्धेचे चार प्रकार आहेत. ते सोदाहरण असे:- १) पारंपरिक श्रद्धा. (उदा. सोमवारी शिवपिंडीवर बेलपत्रे वाहावी.) २) गतानुगतिक श्रद्धा. (उदा.लालबागचा राजा नवसाला पावतो.) ३)आशावती श्रद्धा. ( उदा.श्रीयंत्राचे पूजन केले तर धनप्राप्ती होते.) ३) भयोद्भव श्रद्धा .( उदा.मृताचे धार्मिक अंत्यसंस्कार केले नाहीत तर त्याचा अतृप्त आत्मा कुटुंबाला पीडा देतो.)
१. अपारंपारिक नास्तिकता - ब्रह्मांडाचे आपल्याला सबंध आकलन झाले आहे तेव्हा प्रत्येकच गोष्टीची चिकित्सा स्वतः करावी नि कशावरही विश्वास ठेऊ नये. (उदा. आपला बाप त्याने तसे म्हटले आहे म्हणून मानू नये. जेनेटीक्स स्वतः शिकावे आणि खात्री करून घ्यावी. अंततः मातीच्या कोणत्या ढेकळात आणि आपल्या बापात काही फरक नाही असे जाणावे ज्ञान होते.) २. रँडमली ओरियंटेड नास्तिकता - अन्य लोक काय करताहेत आणि आपण काय करत आहोत याचा काहीही संबंध न ठेवणे. एक रँडम बिहेविअर जनरेटर प्रोग्राम करून कधी काहीही करावे. (उदा. शास्त्रज्ञांनी सांगीतलेले विश्वाचे स्पूकी भौतिक स्वरुप सत्य आहे असे दुपारी मानू नये. सकाळी मानावे. ) ३. निराशावती नास्तिकता - http://aisiakshare.com/node/6281 इथे राजेश घासकडवी म्हणतात तसे मूळात निसर्ग असम्यक आहे, निसर्गतःच मनुष्य एक मूल्यहिन रानटी प्राणी आहे, उत्क्रांतीतून भांडाभांडी हा गुण उत्पन्न आला आहे इ इ मानावे. (उदा. दुसर्‍या गटाचा, टोळीचा माणूस आपल्याला ठार मारेल असे मानावे.) ४. अभयोद्भवाधमी नास्तिकता - आपल्याला जितकं दिसतंय कळतंय तितकंच भय आपल्याला आहे असं मानावं. मग भय नसेल तर आपण स्वार्थासाठी कसेही वागू शकतो असंही मानावं. मला काही भयच नसेल तर, आणि चान्स असेल तर आणि माझं एकट्याचं सगळं मस्तच होणार असेल तर मी सगळीकडे विध्वंस का माजवू नये? (उदा. जिवंत माणसाचे भूकेने प्राण गेले तरी देवाचे भय नसल्याने आपली तिजोरी कितिही भरत राहणे.)
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 11/07/2017 - 14:51 नवीन
प्रयत्न बरा आहे पण थोडा थांबून प्रयत्न केला असता तर आणखी चांगल जमू शकल असत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Sun, 11/05/2017 - 06:00 नवीन
प्रस्तुत प्रकरणात मंदार वैद्य यांची आशावती श्रद्धा दिसते.
प्रस्तुत लेखात यनावालांची अपारंपारिक नास्तिकता दिसते.
त्यांना वाटले "मी कुणाला कधी फसवले नाही. कुणाचे कधी वाईट केले नाही. वाईट चिंतिलेसुद्धा नाही. मग माझे कशाला काही वाईट होईल ? देव आहे. देवाला डोळे असतात ना ? तो पहातो आहे ना ? माझे भलेच होणार. देवाने पाठविलेला हा बाबा मला फसवणे शक्य नाही. अंतीं तो माझे कल्याणच करील." असे त्यांना सारखे वाटत राहिले असणार.
मी फक्त हवाला व्यवहार करतो असं पण वाटलं का?
"म्हणजे बुवा-बाबा श्रद्धाळू लोकांना लुबाडतात असे अंनिसवाले सांगतात ते खरे असते की काय ? " अशी पुसटशी शंका त्यांच्या मनात तरळली असावी.
अनींसवाले बुवांना सामील असतात का? एक आपली चिकित्सा!!! नसतात कशावरून? अनिंसवाले हिंदू आणि मुस्लिम धर्मांना भारतात बदनाम करायचा घाट तर घालून नसतील. http://antisuperstition.org/2-years-after-that-dark-day/ इथे पहिलंच वाक्य 2 years after that dark day, our organisation is bravely fighting against the brazen government machinery असं आहे. मागच्या लेखात घटनेचा हवाला दिला होतात नं? इथे चक्क त्या घटनेलाच ब्रेझन म्हणताय? सरकारी अंधश्रद्धांबद्दल अनिंसचा विरोध अजिबातच नाही. तीन रंगाच्या कापडाचा माणसानं आदर का करावा? काय आहे म्हणे विशेष त्या तीन रंगांत? किंवा एक विशीष्ट गीतात? सरकारनं आपल्या श्रद्धा अगोदर सोडल्या तर लोक मागे मागे सोडतील ना? भारतातल्या सग्ळ्या लोकांची, मला धरून, राष्ट्रध्वज, राश्ट्रगीत, देश, देव, धर्म यांच्याबद्दल चांगली श्रद्धा असताना अनिंस केवळ विशिष्ट श्रद्धा टार्गेट करते म्हणजे चिकित्सेला, तर्काला, बुद्धीमत्तेच्या वापराला बराच स्कोप आहे. ==================================================== यनावाला, अनिंसवरच शेकेल असं लॉजिक का मांडता?
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Sun, 11/05/2017 - 06:08 नवीन
काय तरी असते एकेकाची अंधश्रद्धा, आणि निलाजरं वर्तन! नुसत्या अर्थहीन लेखांच्या जिलब्या पाडायच्या, सतत समाजविघातक (हो, समाजविघातकच) अजेंडा घेऊन वावरायचं, आपलं पितळ (की जर्मल) उघडं पडलं की आपल्याच धाग्यांवरून पळून जायचं, एकही प्रतिसादाला, प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही, आणि काही दिवसांनी पुन्हा नव्या लेखात जुनीच गटारगंगा वाहवत ठेवायची. आधीच्या धाग्याबद्धल माफी मागा आणि मग काहीतरी चांगलं लिहायला शिका, मिपाकरांचा वेळ म्हणजे श्रद्धाहीनांचं वाळवंट नव्हे!
  • Log in or register to post comments
M
mayu4u Sun, 11/05/2017 - 11:46 नवीन
नक्की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख
A
arunjoshi123 Mon, 11/06/2017 - 06:34 नवीन
चिकित्सा आहे हो ती!!! नास्तिकी चिकित्सा नास्तिकांची पण करायची असते. त्यात चिडायला काय झालं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u
M
mayu4u Mon, 11/06/2017 - 08:26 नवीन
१. यनावाला यांचा अजेंडा काय? २. तो समाजविघातक कसा? असं विचारतो. आधीही हेच विचारलेलं, पण
चिकित्सा आहे हो ती
असं उत्तर मिळालं, जे मला समजलं नाही. ही माझ्या आकलनक्षमतेची मर्यादा असू शकेल, असं मानून सविस्तर उत्तराची नम्र अपेक्षा करतो. - (सदैव नवीन शिकण्यास तयार) मयुरेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
म
माहितगार Tue, 11/07/2017 - 14:59 नवीन
नास्तिकांचि चिकित्सा ठिक त्यांच्या लेखनावर वैचारीक टिका करण्याचा अधिकार आहे पण तसे करताना यनावालांचा चिकित्सेचा अधिकार हकनाक नाकारणे सयुक्तीक ठरत का ? यनावालांच्या टिकेमुळे तुम्हाला तुमची मते लिहिण्याची संधी मिळाली असाही विचार करता येऊ शकतो ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Sun, 11/05/2017 - 06:58 नवीन
व्यवसाय-धंद्यात प्रत्येक गोष्टीवर चिकित्सा करून योग्य निर्णय घेणारी बुद्धी श्रद्धा-क्षेत्रात चालेनाशी झाली. कारण मन श्रद्धेने ओतप्रोत भरले होते. त्यामुळे बुद्धीने कोणत्याही गोष्टीची चिकित्सा केली नाही. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतून बुद्धी बाजूला पडली. किंबहुना श्रद्धेने तिला बाजूला सारले. आणि सर्व नियंत्रण आपल्या हाती घेतले. श्रद्धा भावनेमुळे प्रबळ झालेल्या मनाने मेंदुद्वारे निर्णय घेतले. कर्मेंद्रियाने (हातांनी) ते कार्यवाहीत आणले.
यात श्री वैद्य यांची काय चूक आहे? सागरनाथांच्या श्रद्धाक्षेत्रात (फिल्ड ऑफ बिलिफ) मधे तुमचा मेंदू आला तरी असंच होइल. माणसाला फ्री विल नसते विज्ञानाप्रमाणे.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Sun, 11/05/2017 - 07:21 नवीन
श्रद्धा ठेवणे हे दास्य (गुलामगिरी) पत्करल्याचे लक्षण आहे.
हे तुमच्या घरच्यांना, विद्यार्थ्यांना, वाचकांना देखील लागू आहे. कोणताही कुटुंबसदस्य, प्राध्यापक, धागालेखक हा लबाड, फसवेगिरी करणारा असू शकतो. विद्यार्थ्यांनि अगोदर तुमची छाननी केली पाहिजे कि तुम्ही पैसे कमवायसाठी काही बाही खोटं नाटं तर शिकवत नाहि. लेखावरून वाटतं कि तुमचा मागच्या लेखात मच टावटेड कॉमन सेन्स श्रद्धा म्हटलं कि बिथरतो. दास्य ते हिटलरशाही या अख्ख्या रेंजमधलं सगळं तुम्हाला रँडमली आठवायला चालू होतं. ================ एक वाचक म्हणून मी आपल्याबद्दलच्या सर्व श्रद्धा टाकून देत आहे. मला गुलाम बनायचं नाही आपला. मला आता खालिल प्रश्नांची उत्तरं द्या - आपण खोटारडे आहात का? समजा तुम्ही नाही म्हटलं तर पुरावा द्या. आपण फ्रॉड आहात का? नाही ? पुरावा द्या. आपण अश्रद्ध आहात का? हो ? पुरावा द्या? ================================= मागे आपण घटनेत असं असं लिहिलं आहे असं म्हणालात. ग्रंथप्रामाण्यवाद्याप्रमाणे घटना का मानता? घटनेची तुम्ही काय चिकित्सा केली आहे? ================== डोकं बाजूला ठेवल्यामुळे आपण नास्तिकांचे दास्य स्विकारले आहे काय?
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Sun, 11/05/2017 - 07:30 नवीन
बादवे यनावाला, ८ नोव्हेंबरला गतवर्षी नोटबंदी झाली म्हणून देशाचे २% जीडीपी इतके नुकसान झाले असे तुमचे मत असेलच. सत्य तरी आहे तसं. वर सरकार म्हणत होतं कि म्हणे याने नुकसानापेक्षा फायदाच जास्त होणार आहे. तर १. जर फायदा नसेल तर २%*१२५ लाख कोटी = २.५ लाख कोटी इतकी फसवणूक मोदींच्यावर श्रद्धा ठेवल्याने लोकांची झाली. आपण आणि अनिंस त्या कायद्याखाली त्यांच्यावर कार्यवाही करा. ही फसवणूक वैद्य यांच्या रकमेच्या १० लाख पट आहे. २. जर फायदा असेल तर कुणाचं नुकसान करून कुणाचा फायदा केला आहे त्याचा रिपोर्ट मागा. आणि पुन्हा कार्वाई करा.
  • Log in or register to post comments
र
राही Sun, 11/05/2017 - 07:43 नवीन
य.ना.वाला यांचे लेख गेली अनेक वर्षे वृत्तपत्रे आणि मिपासारख्या सोशल मीडियामधून येत आहेत. ज्या अर्थी मिपावरच्या इतक्या निरर्गल टीकेने आणि खिल्लीने अजिबात खचून न जाता ठराविक कालावधीनंतर ते या विषयावरचे लेख पुन्हा पुन्हा टाकत राहातात त्याअर्थी त्यांनी हा विरोध गृहीत धरला असून हे काम एक वसा म्हणून स्वीकारले आहे. म्हणजे असे लिखाण पुन्हा पुन्हा हळुवारपणे hammer करण्यात त्यांचा निर्लज्जपणा दिसत नसून उलट धैर्य (संयम) आणि धाडसच दिसून येते. गेली कित्येक वर्षे त्यांच्या लिखाणावरचे अत्यंत आवेश आणि अभिनिवेशयुक्त प्रतिसाद वाचताना एक चिरंतन वास्तवाचा पुन:प्रत्यय येत राहिला आहे. ते म्हणजे जिथे आवेश आणि अभिनिवेश असतो तिथे आशय असतोच असे नाही. किंबहुना तो नसतोच. वरती कुणीतरी माफीनामा मागितला आहे. खरे तर हे दुर्लक्ष्य करण्याजोगेच. पण मौनातून अप्रत्यक्ष सहमती सूचित होऊ नये म्हणून लिहीत आहे की माफी मागण्याचे त्यांना काहीच कारण नाही. ना त्यांनी अश्लाघ्य अथवा उर्मट भाषा वापरली आहे किंवा ना त्यांनी देशद्रोही घटनाद्रोही असे लिखाण केले आहे. तेव्हा, य.ना. भाऊ आपण लिहीत राहालच आणि आमच्यासारख्या अनेक मूकवाचकांची आपल्या लिखाणाला मूकसंमती राहीलच. आपण प्रज्वलित केलेल्या या प्रबोधनाच्या छोट्याश्या दीपाला शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 11/05/2017 - 09:12 नवीन
सहमत आहे. आस्तिकांची असहिष्णुता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
र
राही Mon, 11/06/2017 - 02:26 नवीन
मोजक्या शब्दांत नेमका आशय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
सर टोबी Sun, 11/05/2017 - 09:25 नवीन
शब्दा शब्दाशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
च
चौथा कोनाडा Sun, 11/05/2017 - 09:35 नवीन
प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा