Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भाव तेथे(च) देव:......यनावाला

य
यनावाला
Mon, 12/18/2017 - 16:40
🗣 73 प्रतिसाद
भाव तेथे(च) देव:......यनावाला आमच्या कोकणात गणेश चतुर्थीचे महत्त्व अन्य धार्मिक सणांच्या तुलनेत सर्वाधिक असते. उत्सव दीड दिवसाचाच, पण त्या काळात गणपतीच्या मूर्तीला सतत जिवापाड जपावे लागते. मूर्तीला कुठे तडा गेला, टवका उडाला, देवापुढील समई-निरांजन विझून अंधार झाला तर ते अगदी अशुभ मानतात. लहानपणी मी एकदा आईला विचारले," आई, या मूर्तीत खरोखरच देव असतो का? " त्यावर ती म्हणाली, " अरे, मानला तर देव. नाहीतर मातीचा बाहुला." ......म्हणजे देव हा केवळ मानण्यावर आहे. काल्पनिक आहे. त्याला खरे अस्तित्व नसावे. असे मला तेव्हापासून वाटू लागले. पुढे "गणपती म्हणजे मातीचा बाहुला." हेच बुद्धीला पटले. "जगनिर्माता, जगन्नियंता, पूजा-अर्चा-प्रार्थना-आरती-नैवेद्य यांनी संतुष्ट होऊन भक्तांवर कृपा करणारा, संकटात धावून येणारा देव अस्तित्वात आहे." हे विधान कोणत्याही तर्कसंगत युक्तिवादाने बुद्धीला पटविता येत नाही. देवाचे गुणवर्णन आहे की तो सर्वसमर्थ-सर्वसाक्षी-सर्वव्यापी-करुणेचा सागर-दीनांचा कैवारी-दुष्टांचा निर्दालक आहे. त्यांतील एकाही गुणधर्माचा कधीही प्रत्यय दिसत नाही. अनुभव येत नाही. मानवाच्या अधिकृत ज्ञानभांडारात देवाला स्थान नाही. आपण शाळा-कॉलेजात असताना भौतिकी, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, अशा विषयांचे जे ज्ञान शिकतो ते या अधिकृत ज्ञानसंग्रहातील असते. त्या विषयांच्या अभ्यासक्रमाच्या कोणत्याही पुस्तकात "देव अस्तित्वात आहे." असे विधान नसते. तसेच देव जर आहे तर आपले अस्तित्व सर्वांना पटावे असा काही प्रत्यय तो का देत नाही ? इतका दडून, दडून का राहातो ? याचे कारण कळत नाही. त्याला कसली अडचण आहे ? कोणती भीती आहे ? याचे उत्तर मिळत नाही. त्यामुळे "देव अस्तित्वात आहे." हे विधान खरे कसे मानायचे ? आस्तिक लोक ते विधान पूर्वसंस्कार, ग्रंथप्रामाण्य, शब्दप्रामाण्य, संतवचने यांच्या आधारे केवळ श्रद्धेने सत्य मानतात. "देव अस्तित्वात आहे. असेच आम्हाला वाटते. आमची तशी श्रद्धा आहे." एवढेच त्यांना देवअस्तित्वाच्या समर्थनार्थ सांगता येते. देवाच्या अस्तित्वाचा कोणताही पुरावा नाही. कुणी म्हणेल, "प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही पुरावा काय मागता? असे पुरावे देता येतात काय?" इथे एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. हा पुरावा म्हणजे न्यायालयात लागतो तसला लेखी पुरावा नव्हे. जे विधान तत्त्वत: खरे असण्याची शक्यता असते ते आम्ही सत्यच मानतो. त्यासाठी पुरावा मागत नाही. मग ते विधान प्रत्यक्षत: सत्य असो वा नसो. ते विधान खरे असणे शक्य असले म्हणजे झाले. ही शक्यता ज्ञान, वाचन, अनुभव -विवेक (कॉमनसेन्स) यांच्या आधारे आपल्याला समजू शकते. लेखी पुराव्याची आवश्यकता नसते. समजा तुम्ही म्हणालात की तुमच्याकडे पन्नास लक्ष रुपये किंमतीचा हिरा आहे. तर ते विधान मी तत्त्वत: सत्य मानणार. पुरावा मागणार नाही. कारण वैयक्तिक मालकीचा असा हिरा असू शकतो हे मला समजते. आणि तुमच्याकडे तो आहे असे तुम्ही स्वत: सांगत आहात. तेव्हा ते खरे आहे असेच मी मानणार. प्रत्यक्षात तो हिरा तुमच्याकडे आहे किंवा नाही याच्याशी मला काही कर्तव्य नाही. मात्र या हिर्‍यासंबंधी त्रयस्थाशी बोलताना, "अमुक एक गृहस्थ असे म्हणत होते." असे सांगणार. कारण तुमच्याकडे तसा हिरा आहे की नाही याची मला निश्चित अशी माहिती नाही. पण समजा कोणी एक म्हणाला की त्याच्याकडे परीस आहे. तर मी ते सत्य मानणार नाही. कारण ते खरे असण्याची शक्यताच नाही. ज्याच्या स्पर्शामुळे लोखंडाचे सोने होते असा मणी अस्तित्वात नाही हे मला समजते. आता, "माझ्याकडे परीस आहेच. " असा जर कोणी हट्टी दावा केला तर त्यासाठी पुरावा मागणे, तुमचा दावा सिद्ध करून दाखवा असे सांगणे, भाग आहे. तसेच ज्या विधानाने कुणाचे चारित्र्यहनन होते असे विधान सत्य असणे शक्य असले तरी काही आधाराविना मी ते सत्य मानणार नाही. "देव अस्तित्वात आहे." हे जर बुद्धीला पटत असेल ,त्याविषयी कोणत्याही प्रकारची शंका नसेल तर देवावर विश्वास ठेवावा. तिथे श्रद्धेची आवश्यकता काय ? पायथ्यागोरसच्या प्रमेयाची सिद्धता बुद्धिगम्य आहे. म्हणून त्यावर आपण विश्वास ठेवतो. तिथे श्रद्धेची आवश्यकता नसते. एखाद्या गोष्टीची/तत्त्वाची/संकल्पनेची सत्यता बुद्धीला पटली तर विश्वास ठेवतात. ती बुद्धीला पटत नसता भावनेच्या आधारे सत्य मानणे म्हणजे श्रद्धा ठेवणे काही आस्तिक म्हणतील, "देव अस्तित्वात आहे " हे आम्हाला सिद्ध करता येत नाही. ठीक आहे. मग "देव अस्तित्वात नाही" हे तुम्ही नास्तिक लोक सिद्ध करा ना!" एखादे विधान सत्य नाही, एखादी गोष्ट अस्तित्वात नाही हे सिद्ध करता येईलच असे नाही. ती गोष्ट अस्तित्वात आहेच असे जे दावा करतात त्यांच्यावरच ते अस्तित्व सिद्ध करण्याचे उत्तरदायित्व (जबाबदारी) असते. न्याय व्यवस्थेत सुद्धा हेच तत्त्व आहे. या संदर्भात "बर्टरॅंड रसेल यांची किटली (रसेल्स टी पॉट)" हे उदाहरण कदाचित् आपल्या वाचनात आले असेल. रसेल म्हणतात, "समजा पृथ्वी आणि मंगळ ग्रह यांच्या मधे कुठेतरी एक किटली आहे. ती आपल्या विवक्षित कक्षेत सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. मला तसा साक्षात्कार झाला आहे." असे विधान कोणी केले तर ते खोटे आहे हे आपल्याला कॉमनसेन्सने कळते. पण अशी किटली नाहीच हे सिद्ध करणे शक्य नाही. म्हणून ते विधान खरे मानायचे का ? ज्याचा खोटेपणा अनुभव-विवेकाने सहज समजतो पण तसे सिद्ध करता येत नाही अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. "एवंगुणविशिष्ट देव अस्तित्वात आहे ." हे विधान तशाच प्रकारचे आहे. ते सिद्ध करण्याचे उत्तरदायित्व (जबाबदारी) सर्वस्वी आस्तिकांवर आहे. एवंच काय तर "देव अस्तित्वात आहे." हे केवळ श्रद्धेनेच सत्य मानता येते. "आमची तशी श्रद्धा आहे." असे म्हटल्यावर पुढचे बोलणेच खुंटते. श्रद्धा ही एक मनोभावना आहे. आपण जाणताच की बुद्धी आणि भावना यांचा उद्भव माणसाच्या मेंदूत होतो. आनंद-दु:ख, क्रोध-मद-मत्सर इ.अनेक भावना आहेत. भावनांच्या समुच्चयाला मन म्हणायचे. ते अमूर्त आहे. व्यक्तीकडून भावनांचे प्रकटीकरण होते तेव्हा त्या भावनांचा आविष्कार दिसतो. त्यातून मनाचा प्रत्यय येतो. श्रद्धेला मनोभाव अथवा केवळ "भाव" असेही म्हणतात. संत साहित्यात "श्रद्धा " या शब्दापेक्षा त्याच अर्थाचा "भाव" हा शब्द अधिक वेळां वापरलेला दिसतो. तसेच श्रद्धाळू या अर्थी भाविक हा शब्द वापरला आहे. "श्रद्धा" हा शब्द ज्ञानेश्वरीत आहे. गीतेत आहे. पण तुकाराम गाथेत श्रद्धा हा शब्द मला अजून सापडलेला नाही. कुठल्यातरी अभंगात तो असेलही. पण माझ्या पाहण्यात नाही. ज्यात श्रद्धा हा शब्द आहे असा संत नामदेव, संत एकनाथ यांचा एकही अभंग माझ्या वाचनात नाही. "भाव" असा शब्द अनेक अभंगांत आहे. "भाव तेथे देव ." असे एक सुवचन आहे. ते पटण्यासारखे आहे. पुढील वचनांत "भाव" शब्दाचा अर्थ "श्रद्धा’ असाच आहे. * देह जाओ अथवा राहो । पांडुरंगी दृढ भावो॥ * भावबळे आकळे एरव्ही नाकळे। करतळीं आवळे । तैसा हरी ॥ * देव भावाचा भुकेला ॥ * भाव धरा S रे । अपुलासा देव करा रे ॥ * करीतसे ध्यास हृदयीं सकळ । भाव तो सबळ । धरियेला ॥ * भाव देवाचा उचित । भाव तोची भगवंत ॥...(या वचनात तर श्रद्धा म्हणजेच देव -दुसरा देव नाही- असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे.) * आमुचिया भावे तुज देवपण । हे का विसरोन । राहिलासी ? । असे तुकाराम महाराजांनी देवाला खडसावले आहे.तसेच "आम्ही तुझ्यावर श्रद्धा ठेवतो म्हणून तुला देवपण प्राप्त झाले आहे. (श्रद्धा नसती तर तू म्हणजे निर्जीव मूर्ती असे झाले असते.) या संदर्भात एक संस्कृत श्लोक आहे. तो असा:- न काष्ठे विद्यते देवो न पाषाणे न च मृत्तिके* । भावे हि विद्यते देवो तस्मात् भावो हि कारणम् ॥( *खरे तर हे रूप "मृत्तिकायाम्।" असे हवे. पण मूळ श्लोकात मृत्तिके आहे.ते तसेच ठेवले आहे.) अर्थ :- लाकडी मूर्तीत (उदा.पुरीचा जगन्नाथ) देव नसतो. दगडी मूर्तीत (उदा.बालाजी) देव नसतो. मातीच्या मूर्तीत देव नसतो.(उदा. गणपती). देव केवळ श्रद्धेत असतो. (म्हणजे श्रद्धेने मानता येतो.) म्हणून श्रद्धा हेच देवाच्या अस्तित्वाचे कारण आहे. वरील सत्य वचनांवरून कोणता तर्कसंगत निष्कर्ष निघतो ? निष्कर्ष असा निघतो की देवाचे अस्तित्व सत्य मानण्यासाठी श्रद्धा आवश्यक असते. श्रद्धा असेल तरच देव आहे. श्रद्धा नसेल तर देव नाही. कुणी म्हणतील की तुम्ही वरील वचने सत्य मानली म्हणजे तुम्ही शब्दप्रामाण्य मानता. तर तसे नव्हे. वरील वचने संतसाहित्यातील आहेत म्हणून सत्य आहेत असे म्हटलेले नाही. ती बुद्धीला पटतात, अनुभवाशी सुसंगत आहेत, म्हणून सत्य आहेत. "देवाच्या अस्तित्वासाठी श्रद्धा आवश्यक आहे. श्रद्धा नसेल तर देव नाही." असा निष्कर्ष निघाला. म्हणजे देवाचे अस्तित्व खरे मानण्यासाठी श्रद्धेची अट आहे, असे स्पष्ट झाले. आता, एखादी गोष्ट जर खरोखर प्रत्यक्षात अस्तित्वात असेल तर त्यासाठी कुठली अट असू शकते का ? आपण जाणतो की खरे अस्तित्व व्यक्तिनिरपेक्ष असते. तसेच ते अटनिरपेक्ष असले पाहिजे. थोडक्यात म्हणजे एखादी गोष्ट अस्तित्वात आहे हे सत्य असेल तर त्या अस्तित्वाला कोणतीही अट लागू असू शकत नाही. देवाचे अस्तित्व मानण्यासाठी श्रद्धेची अट आहे असे अनेक सत्य वचनांवरून दिसते. त्याअर्थी देव प्रत्यक्ष असित्वात नाही. देवाचे अस्तित्व केवळ मानीव आहे, हे सिद्ध होते. कांहीजण सांगतात:"ज्याला देव मानायचा असेल त्याच्यासाठी देव आहे. ज्याला मानायचा नसेल त्याच्यासाठी नाही. " ही दोन्ही विधाने भोंगळ आहेत. १) देव अस्तित्वात आहे. २) देव अस्तित्वात नाही. या दोन विधानांतील एक, आणि केवळ एकच, विधान सत्य असले पाहिजे. तिथे कोण्या व्यक्तीचा संबंध नाही. ******************************************************************************
वर्गीकरण
काथ्याकूट

प्रतिक्रिया द्या
30839 वाचन

💬 प्रतिसाद (73)
स
समाधान राऊत गुरुवार, 12/21/2017 - 20:44 नवीन
एक अध्यात्मीक रेडीओ हि टेप नेहेमी वाजवायचे. ....यनावाला == रेडिओ टेप
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
A
arunjoshi123 गुरुवार, 12/21/2017 - 07:58 नवीन
प्रिय यनावाला सर, आपल्या नास्तिक असण्याच्या, श्रद्धेविषयक काही निगेटिव विचार असण्याच्या अधिकाराचा व प्रक्रियेचा मला व्यक्तिशः पूर्ण आदर आहे. माझ्या काही शब्दांमुळे वा प्रतिक्रियांमुळे आपणांस वाईट वाटले असेल तर क्षमा असावी. ----------- सामाजिक मंचावर आपण विचार प्रकट करतो ते बहुजनांस दुखावणारे तसेच एकसुरी नसावेत अशी माफक अपेक्षा होती. विश्वकारण, ईश्वर, मनुष्य, ज्ञान, श्रद्धा, इ इ विषय गहन तर आहेतच शिवाय चर्चांतर्भूत आहेत. अजून सेटल झालेले नाहीत. --------------- कृपया तुमच्या विचारांचा विरोध करणारे लोक प्रामाणिकपणे तसे करत आहेत असे मानून उत्तरे देत चला. मागच्या धाग्यात तुम्ही "सहमतांचे आभार" असा प्रकार केला होता तो अजिबात आवडला नाही. बर्‍याच लोकांनी सल्ला देऊनही मी आपणांस अद्यापि संवाद्य नास्तिक मानतो. आकलन, क्षमता या बाबी असोत, पण सधेतुप्रवृत्त मनुष्याने नेहमी निरंतर संवाद ठेवला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
ज
जानु Wed, 12/20/2017 - 09:26 नवीन
याला म्हणतात विद्वत्ता!!! आम्ही किती ...आहोत ते सांगितल्या बद्दल आभार.
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Wed, 12/20/2017 - 10:08 नवीन
आपण नास्तिक वा निरिश्वरवादी असाल, हरकत नाही ती आपली वैचारिकता आहे आणि आपली भूमिका ठरविण्याचा पूर्ण अधिकार आपल्याला आहे. मात्र सर्वांनीच आपली भूमिका पूर्णतः मान्य करावी अशी जी भूमिका आपण घेत आहात ती इतरांचा अधिक्षेप करणारी आहे. आपल्याला मान्य नाही म्हणजे असे काही अस्तित्वातच नाही असे होउ शकत नाही आपण म्हणता:
थोडक्यात म्हणजे एखादी गोष्ट अस्तित्वात आहे हे सत्य असेल तर त्या अस्तित्वाला कोणतीही अट लागू असू शकत नाही.
. साहेब, आपण सूक्ष्म असे रोगजंतू डोळ्यांनी पाहू शकता का? ते पाहायचे तर सूक्ष्मदर्शक वापरणे बंधनकारक आहे. अर्थातच आपण याला अटसमजू शकता. मग आपल्या मते विनाअट दिसत नाहीत तर सूक्ष्मजंतू अस्तित्वातच नाहीत. दूरचे ग्रह पाहायचे तर शक्तिशाली दुर्बिण वापरावी लागते. मग मी माळावर उभा राहून नुसता आकाशाकडे पाहून " काहीही दिसत नाहे तेव्हा हे खगोलशास्त्रद्न्य खोटे बोलतात" असे म्हणावे का? सगळा वाद बाजुला ठेवुन देव नाहीत हे समजा एकवार मान्य केले, तरी जर कुणाला देव आहे या भावनेने बरे वाटत असेल तर त्यात गैर काय? देवाचा व्यापार करणे, देवदेवतार्जनाच्या नावाखाली लोकांना फसवणे वा लुबाडणे वा देवावर भरवसा ठेवून काहीही न करता बसणे हे निश्चितह वाईट. पण सर्व नित्याची कामे करत असता देवावर विश्वास ठेवून हात जोडले तर कुणाचे काय नुकसान आहे? शारिरीक व्याधींपेक्शा मनोविकार भयंकर असतात असे ऐकतो. अनेक मनोविकारांवर उपचार करताना डॉक्टर कधीही रुग्णाला तो खोटे वा अतर्क्य बडबडत आहे असे म्हणत नाही उलट आपला रुग्णाच्या कथनावर पूर्ण विश्वास आहे असे सांगतो आणि उपचार करतो. अनेकदा मनाचा कोंडमारा असह्य होउन अनेक आजार उद्भवतात. मन मोकळे करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि मन मोकळे करायचे तर देव उत्तम. जर आपण अस्तिक असाल तर आपले गार्‍हाणे देव ऐकेल हे समाधान असेल व जर नास्तिक असला तरी आपण कुणाला तरी शल्य सांगितले आणि ज्याला सांगितले तो तर दगड म्हणजे ते तो आणखी कुणाला सांगणार नाही वा त्याचा गैरफायदा सुद्धा घेणार नाही हे समाधान. मग सांगा देवावर विश्वास ठेवण्यात गैर काय? विश्वास अत्यंत महत्वाचा. एका बँक दरोड्यात एका धाडसी तरुणाने एका दरोडेखोराला झेप घेउन पकडले. अर्थातच त्याचे बरेच कौतुक झाले. त्याला पोलिस अधिकार्‍याने जेव्हा असे विचारले की सशस्त्र दरोडेखोरावर झडप घालण्याची हिम्मत त्याला कशी झाली तेव्हा तो अगदी सहज म्हणाला की त्याने त्या दरोडेखोराला सहा गोळ्या झाडताना पाहिले होते तेव्हा आता याचे पिस्तुल रिकामे असणार म्हणुन उडी मारली. पोलिसांनी कपाळाला हात लावला, म्हणाले बाबा रे काही पिस्तुले आठ बारीही असतात! हे सांगण्यामागचा हेतू इतकाच की मनात हिंमत असेल तर सामान्य माणूसही असामान्य कार्य करु शकतो. आपण हाती घेतलेल्या कार्यात नेहमी यश मिळेलच असे नाही पण जर जिंकणारच या आत्मविश्वासाने गेलं तर कामगिरी अधिक चांगली होते आणि असा आत्मविश्वास सर्वांकडे नसतो तेव्हा बालपणापासून 'परिक्षेला जाताना देवाला व मोठ्या माणसांना नमस्कार करावा' असे संस्कार केले जातात जेणे करुन आपण करत असलेल्या कामात कुणीतरी पाठीशी आहे हा विश्वास असतो. यात गैर काय? कुणी परिक्षेला वा मुलाखतेला जात असेल तर आपण शुभेच्छा देतो. त्या दिल्याने काही फरक पडत नाही पण त्या व्यक्तिला बरे वाटते आणि तो आत्मविश्वासाने जे येत आहे ते पूर्णपणे व्यक्त करु शकतो. अनेकांना आपण पीत नाही तेव्हा पेला घेतलेले समस्त बेवडे आहेत असा समज असतो. आपली वैचारिकता तशी तर नाही ना?
  • Log in or register to post comments
श
शाली Wed, 12/20/2017 - 10:21 नवीन
+++++१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
म
मराठी_माणूस Wed, 12/20/2017 - 10:31 नवीन
अनेकांना आपण पीत नाही तेव्हा पेला घेतलेले समस्त बेवडे आहेत असा समज असतो. आपली वैचारिकता तशी तर नाही ना?
एव्हढा एकच प्रश्न ह्या लेखाला (लेखमालेला ) धोबीपछाड घालायला पुरेसा आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
श
शाली Wed, 12/20/2017 - 10:34 नवीन
पुर्ण सहमत. मुळात हा वादच नको. नको असेल देव तर ठाम नको म्हणा, पुढे चला. हवा असेल तर पुर्ण विश्वास ठेऊन पुढे चला. मला तर कधी कधी नास्तिक जास्त आवडतात कारण आस्तिक देवाच्या अस्तित्वावर जितके ठाम असतात त्यापेक्षा कैकपटींनी नास्तिक देव नाही यावर ठाम असतात. ठामपणा जगायला बळ देतो. नास्तीकच देवाच्या जास्त जवळ पोहोचलेले असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 12/20/2017 - 10:42 नवीन
नास्तीकच देवाच्या जास्त जवळ पोहोचलेले असतात. हे वाचून नास्तिकांना फीट येऊन त्यांच्या तोंडाला फेस आला तर त्याला तुम्ही जबाबदार असाल ! ;) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाली
श
शाली Wed, 12/20/2017 - 13:46 नवीन
असा दृढनिश्चयी नास्तीक दाखवा डाॅक्टर, मी त्याची जबाबदारी आनंदाने घेईन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
माहितगार Wed, 12/20/2017 - 12:44 नवीन
अगदी अगदी ठाम नसण्या बद्दलची ठाम भूमिका आणि तरीही सर्व भूमिकात आम्हीच सर्वोत्कृत्ष्ट (ज्यांना पटत नाही त्यांनी वृथा म्हणावे हवे तर ) अभिमान बाळगतो. अनेक भूमिका स्विकारताना आपल्या भूमिकेतही असतो म्हणून त्याही भावना आदर पुर्वक पोचल्या .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाली
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 12/21/2017 - 06:12 नवीन
ईश्वर या संकल्पनेमुळे बहुसंख्यांना आपले मानसिक आरोग्य राखण्यास मदत होते. ईश्वर हा त्यांच्यासाठी स्वस्तातला सायकियाट्रिस्ट आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
स
सुखीमाणूस गुरुवार, 12/21/2017 - 19:56 नवीन
पटले एकदम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 12/20/2017 - 10:47 नवीन
ही दोन्ही विधाने भोंगळ आहेत. १) देव अस्तित्वात आहे. २) देव अस्तित्वात नाही. या दोन विधानांतील एक, आणि केवळ एकच, विधान सत्य असले पाहिजे. आणि जोपर्यंत त्यातले कोणतेही एक विधान सिद्ध होत नाही तोपर्यंत, कोणत्याही एकाच विधानाचा "अंतीम सत्य" असा दुराग्रह धरणारी व्यक्ती भोंगळ ठरते, नाही का ?
  • Log in or register to post comments
श
शाली Wed, 12/20/2017 - 13:36 नवीन
कुठून या वाद प्रतिवादात पडले! मी देव मानते, मला देव आवडतो, माझ्या मनात देवाविषयी शंका निर्माण होत नाहीत. मला फार जवळचा वाटतो तो. संध्याकाळी निरांजणात वात लाऊन ऊदबत्ती लावली की माझं आख्खं घर छान ऊत्स्हात येतं. त्यात देवाचा कीती हात मला माहित नाही. श्रध्देची, विश्वासाची जीतकी चिकीत्सा कराल तेवढा मोठा शून्य हाती येईल. ज्यात आनंद वाटतो त्या मताने चालावे माणसाने. यनावाला तुमच्याही मताचा आदर आहे पण मला एकून नाही पटत. पण तुमच्या लेखांमुळे आणि त्यावरच्या प्रतिक्रियांमुळे माझी श्रद्धा आणखी दृढ झाली. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Wed, 12/20/2017 - 18:45 नवीन
प्रो.विद्यासागरांसंबंधित एक किस्सा आठवला. रोज कॉलेजात स्टाफरूममध्ये गेल्यावर ते पाच मिनिटे तिथे असलेल्या देवाच्या तसवीरीसमोर प्रार्थना करत असत व त्यावर त्यांचे नास्तिक प्राध्यापक सहकारी हसत असत व टर उडवत असत. एकदा चर्चेत त्या कंपूने त्याना "देव नाहीच आहे आणि तुम्ही तुमच्या आयुष्यातली रोजची पाच मिनिटे वाया घालवत आहात" असे म्हणुन प्रा.विद्यासागरांना खिजवण्याचा प्रयत्न केला. त्यावर विद्यासागर स्मितहास्य करत शांतपणे त्यांना म्हणाले "बंधूंनो, जर देव अस्तित्वात नसेल तर माझ्या आयुष्यातली रोजची पाचच मिनिटे वाया गेली असे समजु पण जरा देव अस्तित्वात असेल तर तुमचे पूर्ण आयुष्यच वाया गेले असे समजावे लागेल"
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 12/20/2017 - 20:22 नवीन
यनावाला,
इथे माझ्या लेखांवरील अनेक प्रतिसादांतील विचार आणि उपस्थित केलेले प्रश्न हे माझ्या आकलनशक्तीच्या पलीकडचे असतात. त्यांवर कांही उत्तरे लिहिण्याची क्षमता आणि विद्वत्ता माझ्यापाशी नाही.
तुमची आकलनशक्ती कमी पडतेय हे कबूल केल्याबद्दल अभिनंदन. ती वाढवण्यासाठी काय उपाय चालू आहेत ते वाचायला आवडेल. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 12/21/2017 - 04:00 नवीन
एक्का काका आणि अरुणजोशी यांचा आपण फॅण झालोय :)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 12/21/2017 - 06:38 नवीन
नको, नको... थंडीच्या दिवसात फॅण/फॅन नको... उन्हाळ्यात विचार करता येईल ! ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 12/21/2017 - 18:46 नवीन
21 Dec 2017 - 9:00 am | स्पा एक्का काका आणि अरुणजोशी यांचा आपण फॅण झालोय :)
››› अखेर पांडू आला! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
ओ
ओरायन गुरुवार, 12/21/2017 - 06:03 नवीन
माझे फक्त माझ्यासाठी असलेले वा आतापावेतो बनलेले यासंदर्भातील मते. जरूरीचे नाही की ते बरोबरच असतील. १.देव न माऩणे = योग्य. २.दुसरा देव मानत असेल, तर त्याच्या ह्या मानसिकतेचा फायदा घेऊन त्याला फसवणे= बुवाबाजी= अतिशय अयोग्य. ३. देव मानणे = योग्य ४. अस्तिकांनी नास्तिकांना देव मानवा म्हणून वेठीस धरणे = अतिशय अयोग्य. ५. नास्तिकांनी अस्तिकांना कमी दर्जाचे अथवा कमी बुद्धिचे समजणे = अतिशय अयोग्य. मी स्वतं: ऐक सर्वधारण बुद्धिचा असुन , मला पुजा पाठ फारसे येत नाही. तरीही माझा देव या गोष्टी वर विश्वास आहे. माणसांतील अत्युच्च बुद्धिमत्ता असणारा माणुस जरी नास्तिकता अंतिम सत्य समजत असला किंवा असेल तरी मी त्याच्याशी याबाबतीत मी सहमत नसेल. कारण मानवी बुद्धिला सर्वकाही समजते यावर मी विश्वास ठेवू शकत नाही.
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक गुरुवार, 12/21/2017 - 07:35 नवीन
दुसरा देव मानत नसेल, तर त्याच्या ह्या मानसिकतेचा फायदा घेउन त्याला आपल्या राजकीय स्वार्थासाठी वापरून घेणे = तथाकथित पुरोगामी राजकारण = अतिशय अयोग्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ओरायन
A
arunjoshi123 गुरुवार, 12/21/2017 - 08:03 नवीन
योग्यायोग्यतेचा मुद्दा काढायची कल्प्नना भारी आहे. सत्य काय आहे यापेक्षा चांगलं काय आहे हे कधीही महत्त्वाचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ओरायन
N
nishapari गुरुवार, 12/21/2017 - 19:37 नवीन
आज सकाळी सकाळीच यनावालांचा नवीन मजेशीर लेख वाचायला मिळावा अशी इच्छा झाली होती .... न बघते तर काय देवाने माझी इच्छा पुरी केलेली दिसली .
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा