श्रद्धावान् (न)लभते ज्ञानम् ।.
श्रद्धावान् (न)लभते ज्ञानम् ।....यनावाला
.............................................................................................................
भगवद्गीतेतील 4 थ्या अध्यायात पुढील दोन श्लोक आहेत :
1) श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्पर: संयतेन्द्रिय: ।
ज्ञानं लब्ध्वा परां शान्तीं अचिरेणाधिगच्छति ॥39॥
अन्वय:- संयतेन्द्रिय: , तत्पर: , श्रद्धावान् ज्ञानं लभते । ज्ञानं लब्ध्वा (स:) अचिरेण (एव) परां शान्तिं अधिगच्छति ।
अर्थ : -- जितेंद्रिय आणि साधनपरायण अशा श्रद्धावंताला ज्ञान प्राप्त होते. ज्ञान मिळाल्यावर लौकरच त्या श्रद्धाळूला परम शांतीचा लाभ होतो.
2) अज्ञश्च अश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति ।
नायं लोकोSस्ति न परो न सुखं संशयात्मन:॥40॥
अन्वय :- अज्ञ: च अश्रद्दधान: च संशयात्मा विनश्यति । संशयात्मन: न अयं लोक: अस्ति, न पर: (लोक: अस्ति) न च सुखं (अस्ति)।
अर्थ :-- श्रद्धारहित असलेला माणूस अज्ञानी आणि शंकेखोर असतो. तो नाश पावतो. ज्याच्या मनात (धर्मग्रंथातील वचनांच्या सत्यतेविषयी ) शंका येतात तो इहलोकाला तसेच परलोकालाही मुकतो. त्याला कधी सुख लाभत नाही.
गीतेच्या चौथ्या अध्यायातील या दोन श्लोकांचा मथितार्थ असा की, गीतेतील वचने खरी आहेत यावर जो पूर्ण श्रद्धा ठेवतो तो ज्ञानी होतो. त्याला विनाविलंब परमशांती लाभते. जो शंकेखोर असतो तो अज्ञानी आणि अश्रद्ध होय. त्याचा नाश होतो. या वचनांच्या सत्यतेविषयी ज्याच्या मनात शंका उद्भवते त्याला ना अरत्र ना परत्र असे होते. त्याला कधीच सुख लाभत नाही. यावरून गीतेत श्रद्धेला अवास्तव महत्त्व दिले आहे, श्रद्धेचे उदात्तीकरण केले आहे हे स्पष्ट होते. गीतेतील ही वचने "श्रीभगवान् उवाच " म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराच्या मुखातून आली आहेत. म्हणून ती सत्य असलीच पाहिजेत असा समज निर्माण केला आहे. (गीतेत "धृतराष्ट्र उवाच, संजय उवाच, अर्जुन उवाच " असे म्हटले आहे. मात्र "श्रीकृष्ण उवाच" असे लिहिले नाही. "श्रीभगवानुवाच" असे म्हटले आहे. महाभारतात श्रीकृष्णाला श्रीभगवान असे केवळ गीतेतच म्हटले असावे. इतरत्र कुठे नसावे. हे इथे लक्षात घ्यावे.)
वरील दोनांतील पहिल्या श्लोकात श्रद्धाळूला ज्ञान आणि परमशांती यांच्या लाभाची आशा दाखवली आहे. तर दुसर्या श्लोकात अश्रद्धाला भीती घातली आहे की त्याचा विनाश होतो. तो इहलोक आणि परलोक या दोघांनाही मुकतो. प्रत्येक धर्मग्रंथात आशा आणि भीती या दोन भावनांचा उपयोग करून धार्मिकांना जखडून टाकलेले असते. श्रद्धांच्या दाव्याला बांधलेले असते.
सगळ्याच धर्मग्रंथांत श्रद्धेला अवास्तव महत्त्व दिले आहे. गीतेत अश्रद्धाला विनाशाची भीती घातली आहे तर बायबल आणि कुराण या धर्मग्रंथांत अश्रद्धाला मृत्युदंडाची शिक्षा द्यावी असे म्हटले आहे. धर्मग्रंथ ईश्वरप्रणीत आहेत. त्यांतील सर्व वचने ईश्वराचे बोल आहेत. त्यांच्या सत्यतेविषयी शंका घेणे , त्या विधानांची चिकित्सा करणे, म्हणजे प्रत्यक्ष ईश्वरावर अविश्वास दाखविणे आहे. म्हणजे एका अर्थी ईश्वराची निंदा करणेच (ब्लासफेमी) आहे. म्हणून या ईश्वर निंदकांना मृत्युदंड द्यावा असे धर्मग्रंथांत आहे.
धर्मग्रंथांत श्रद्धेला अवास्तव महत्त्व देऊन अश्रद्धांना मृत्युदंडाच्या शिक्षेची भीती घालण्याचे कारण काय ते उघड आहे. धर्मग्रंथातील वचनांची चिकित्सा केली तर त्यांतील कित्येक वचने खोटी आहेत, बुद्धीला न पटणारी आहेत, असे सहज दिसून येते. एकदा हे कळले की धार्मिकांची श्रद्धा उडून जाईल. मग धर्मग्रंथांना, धार्मिक कर्मकांडांना, धर्मगुरूंना आणि धर्माला कोण मानणार ?
श्रद्धाळूच नसले तर मंदिरांपुढे रांगा कोण लावतील ? मग देवापुढच्या दानपेट्या तुडुंब कशा भरतील ? देवस्थानांची उत्पन्ने कोटीच्या कोटी उड्डाणे कशी घेतील ? देवाला सोन्या-चांदीचे दागिने, वस्तू कोण वाहतील ? सोने मोठ्या प्रमाणात जमले नाही तर लंपास कसे करता येईल ? श्रद्धांचे विसर्जन झाले तर होम-हवने, अभिषेक-अनुष्ठाने, एकादष्णी-लघुरुद्र अशी निरर्थक कर्मकांडे कोण करतील ? मग पुरोहित-पुजार्यांना फुकाफुकी लक्षावधी रुपये कसे मिळतील ? स्वबुद्धीने विचार केला की श्रद्धा संपते. मग दहावे-अकरावे-बारावे-तेरावे, मासिक श्राद्ध अशी अन्त्यविधी कर्मकांडांची लांबच लांब माळ कोण कशाला करून घेतील ?
म्हणून धार्मिकांची श्रद्धा दृढ राहायला हवी. ती मुळीच ढळूं देता नये. समाजसुधारक प्रबोधन करू लागले तर प्रखर विरोध करायला हवा. तात्त्विक विरोध करता आला नाही तर त्यांना धमक्या द्यायला हव्या. त्यालाही बळी पडले नाहीत तर त्यांचे खून पाडायला हवेत. पण काही करून श्रद्धा टिकवायलाच हवी. नाहीतर आपले अस्तित्वच टिकणार नाही. असे धर्ममार्तंडांना वाटणे साहजिक आहे.
यासाठी धार्मिकांनी धर्मग्रंथावर श्रद्धा ठेवणे आवश्यक आहे. धर्मग्रंथातील वचनांविषयी शंका उपस्थित करायची नाही. संशय घ्यायचा नाही. केवळ श्रद्धा ! ती ढळू द्यायची नाही. श्रद्धेचे बळ मोठे असते. असे हितसंबंधी धूर्तांनी श्रद्धाळूंच्या मनावर सतत बिंबविले आहे. सत्य शोधनाची नावड निर्माण केली आहे. त्यामुळे ,"श्रद्धा म्हणजे अज्ञानात गुरफटून राहण्याची आवड आणि सत्यशोधनाची तीव्र नावड " अशी समर्पक व्याख्या करता येते.
अर्थात श्रद्धाळूंना लुबाडण्याचे हे प्रकार गेल्या पाच-सहाशे वर्षांत ऊर्जितावस्थेला आले. तत्पूर्वी अशी लुबाडणूक नसावी. मात्र श्रद्धेच्या आधारे जनसामान्यांवर नियंत्रण ठेवलेले असे. राजसत्ता आणि धर्मसत्ता यांचा सर्वाधिकार जनता विनाअट मान्य करील याची दक्षता घेतलेली असे. या सत्ता अबाधित राखण्यासाठी जनसामान्यांच्या श्रद्धेचा पुरेपूर उपयोग केला होता. तर्कशुद्ध युक्तिवादाला, सुसंगत विचारसरणीला , डोक्यात उद्भवलेल्या शंका उपस्थित करण्याला धर्माच्या क्षेत्रात स्थानच नसते. तिथे अपेक्षित असते संपूर्ण शरणागती आणि असीम श्रद्धा.
जो श्रद्धेचे विसर्जन करतो, गतानुगतिक होत नाही , स्वबुद्धी वापरतो, परंपरांची चिकित्सा करतो, आपला अनुभव-विवेक (कॉमनसेन्स) वापरतो त्याचीच बौद्धिक प्रगती होऊ शकते. श्रद्धावंत जन्मभर अज्ञानीच राहतो. तसा सुखी असतो. कारण तो त्या अज्ञानातच सुख मानतो. "श्रद्धावान् लभते ज्ञानम्।" हे गीता वचन न पटणारे आहे. माणसाने अज्ञानी राहावे, धर्माला शरण जावे, धर्मगुरूंना पूज्य मानावे. म्हणून अशी वचने सर्व धर्मग्रंथांत असतात. श्रद्धा हे ज्ञानप्राप्तीचे साधन असूच शकत नाही. श्रद्धा हे अज्ञानीपणाचे लक्षण आहे. श्रद्धाळू माणसे अज्ञानालाच ज्ञान समजतात. अतूट श्रद्धेविषयी कोणी काही म्हणो, श्रद्धेची कितीही वाखाणणी करो, गोडवे गावो, मला तर श्रद्धा ही माणसासाठी लाजिरवाणी भावना आहे असेच वाटते. श्रद्धावंत हा त्या श्रद्धाविषयाचा दास बनतो. तो श्रद्धेची चिकित्सा करूच शकत नाही. तसेच श्रद्धा ही अतिशय घातक असू शकते. निष्पाप, निरागस बालकांच्या संस्कारक्षम, संवेदनशील मेंदूत श्रद्धेचे संस्कार बिंबविणे हा मोठा अपराध आहे. बहुसंख्य माता-पिता शिक्षक हा अपराध करतात.
श्रद्धा आणि भक्ती यांमुळे माणसाला मानसिक आधार मिळत असेल. मानसिक समाधान लाभत असेल. पण ते केवळ मानीव असते. श्रद्धा आणि भक्ती यांच्या योगे ज्ञानप्राप्ती होऊ शकत नाही.
अगदी वेदकाळापासून आपल्या पूर्वजांची सूर्यावर श्रद्धा होती. त्यांनी सूर्याची उपासना केली. सूर्यामुळे प्रकाश मिळतो, उष्णता मिळते एवढे अनुभवाने समजत होते. ते प्रतिदिनी सूर्याला अर्घ्य देत असत. त्याची स्तुतिगीते गात असत. संध्या करताना म्हणायचा गायत्री मंत्र हा सूर्याच्या तेजाविषयी आहे. ते त्रिकाल संध्या करीत. (सकाळ-दुपार -संधाकाळ) . या श्रद्धेने, भक्तीने, स्तुतीने त्यांच्या मनाला बरे वाटत होते एवढेच. ग्रह सूर्याभोवती फिरतात हे ज्ञान त्यांना या श्रद्धेने प्राप्त झाले नाही. सूर्यदेवाने दिले नाही. वैज्ञानिकांनी शोधून काढले. ज्या पृथ्वीवर आपण राहतो तो सूर्याभोवती फिरणारा एक ग्रह आहे हेही त्यांना श्रद्धेने समजले नाही. भूमातेचीसुद्धा ते स्तुती, भक्ती करीत. "समुद्रवसने देवि, पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे ।" असे म्हणत. पण पृथ्वीविषयी सत्यज्ञान त्यांना झाले नाही. ते ज्ञान "संशयात्मा" असणार्या वैज्ञानिकांना झाले. श्रद्धेमुळे ज्ञान प्राप्त होत नाही हे यावरून दिसून येते.
श्रद्धेमागे कोणताही तर्कसंगत विचार नसतो. असते ती गतानुगतिक मेषवृत्ती. "देवावर अनेकजण श्रद्धा ठेवतात. म्हणून मी पण ठेवायला हवी." असे श्रद्धाळू मानतो. सत्य काय आहे हे जाणून घ्यायची ज्याला इच्छाच नसते असा माणूस सहजपणे श्रद्धेचा स्वीकार करतो. नुसते होय म्हणायचे. मान डोलवायची. बुद्धी वापरायची नाही. विचार करायचा नाही. हे सोपे, सुखकर वाटते. डोक्याला काही ताप नाही.
श्रद्धेमागे कोणताही विचार नसतो. श्रद्धा ठेवण्याच्या अनिवार ओढीमुळे ती अपरिहार्यपणे बसते. अशी श्रद्धा घालविणे महाकर्मकठीण असते. श्रद्धावंत त्याच्या श्रद्धाक्षेत्रांतील विषयांवर विचार करतच नाहीत. कारण श्रद्धेमुळे त्यांची बुद्धी त्या क्षेत्रात ठप्पच झालेली असते. मात्र श्रद्धाक्षेत्राच्या बाहेरील विषयावर ते व्यवस्थित, तर्कसुसंगत विचार करू शकतात. कारण तिथे त्यांची बुद्धी कार्यप्रवण होते.
माणूस हा मूलत: तर्कनिष्ठ प्राणी (रॅशनल आनिमल ) आहे. तर्कशुद्ध , सुसंगत विचार करणे, युक्तिवाद करणे हे माणूस असण्याचे प्रमुख लक्षण आहे. पण त्यासाठी त्याची बुद्धी स्वतंत्र, पूर्वग्रह विरहित हवी. मुक्त हवी. श्रद्धेने बरबटलेली नसावी. कशावर श्रद्धा ठेवली की तिथे बुद्धी गहाण पडते. ती स्वतंत्र राहत नाही. मग तर्कबुद्धी कुंठित होते. श्रद्धेला तर्काचे वावडे असते. किंबहुना तर्कबुद्धी जागृत झाली की श्रद्धा गळून पडते. बसलेली श्रद्धा उडून जाते.
दहा-बारा हजार वर्षांपूर्वी माणूस रानटी अवस्थेत होता. गुहेत राहात होता. त्याच्या अंगावर कपडे नव्हते. शिकार करणे आणि फळे-कंदमुळे गोळा करणे हे त्याच्या उपजीविकेचे मार्ग होते. त्याकाळी त्याची तर्कबुद्धी विकसित झाली नव्हती. प्राथमिक अवस्थेत होती. विचार करायला वेळच नव्हता. अन्न शोधार्थ सबंध दिवस जात होता. हींस्र श्वापदांची , साप-विंचू अशा विषारी प्राण्यांची सतत भीती होती. त्याकाळीं त्याला श्रद्धेचा आधार वाटला असेल. श्रद्धेमुळे जगणे सुसह्य झाले असेल.
पण आतां गतानुगतिक श्रद्धा , धार्मिक कर्मकांडे , इत्यादि सर्व गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत. परंपरेच्या नावाखाली आता त्यांना कवटाळून राहणे योग्य नाही. त्यात मानव समाजाचे हित नाही. म्हणून असल्या गोष्टींचा त्याग करायला हवा. त्यातच त्या व्यक्तीचे , समाजाचे आणि अंतत: देशाचे हित आहे.
जगप्रसिद्ध निरीश्वरवादी रिचर्ड डॉकिन्स श्रद्धेविषयी लिहितात,
"एडस्, डेंग्यु, स्वाईन फ्लू, झायका अशा साथीच्या रोगांमुळे मानवजातीवर भविष्यकाळी मोठे संकट कोसळणार आहे." असे भाकीत वर्तविण्याची एक पद्धत सध्या पडली आहे. पण मला वाटते श्रद्धा हा मानव जातीला जडलेला सर्वात भीषण आणि गंभीर रोग आहे. त्याची तुलना पूर्वीच्या देवीच्या साथीशी करता येईल. मात्र श्रद्धारोगनिर्मूलनाचे काम देवीनिर्मूलनाच्या कामापेक्षा अधिक बिकट आहे."
*****************************************************************************************
तुमचे लेखन वाचून मला अनेकदा असे वाटत आले आहे की आपल्या लेखाला सामुग्री मिळावी म्हणून तुम्ही (वेड घेऊन पेडगावला गेल्यासारखे करून) कुशंकांची भुते उभी करता आणि नंतर त्यांना उद्ध्वस्त करण्याचा बहाणा बनवता जिथे खड्डयाची मुळातच गरज नव्हती तेथे एक खड्डा खणून नंतर तो बुजवायला तुम्ही बाहेर पडता. हे थोडेसे tilting at the windmills सारखे वाटते.याबाबत तुमचे अमुल्य मत काय आहे ? मलाही तुमचे मत जाणून घेण्याची उत्सुकता आहे. :)