Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

श्रद्धावान् (न)लभते ज्ञानम् ।.

य
यनावाला
Wed, 01/17/2018 - 16:14
🗣 79 प्रतिसाद
श्रद्धावान् (न)लभते ज्ञानम् ।....यनावाला ............................................................................................................. भगवद्गीतेतील 4 थ्या अध्यायात पुढील दोन श्लोक आहेत : 1) श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्पर: संयतेन्द्रिय: । ज्ञानं लब्ध्वा परां शान्तीं अचिरेणाधिगच्छति ॥39॥ अन्वय:- संयतेन्द्रिय: , तत्पर: , श्रद्धावान् ज्ञानं लभते । ज्ञानं लब्ध्वा (स:) अचिरेण (एव) परां शान्तिं अधिगच्छति । अर्थ : -- जितेंद्रिय आणि साधनपरायण अशा श्रद्धावंताला ज्ञान प्राप्त होते. ज्ञान मिळाल्यावर लौकरच त्या श्रद्धाळूला परम शांतीचा लाभ होतो. 2) अज्ञश्च अश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति । नायं लोकोSस्ति न परो न सुखं संशयात्मन:॥40॥ अन्वय :- अज्ञ: च अश्रद्दधान: च संशयात्मा विनश्यति । संशयात्मन: न अयं लोक: अस्ति, न पर: (लोक: अस्ति) न च सुखं (अस्ति)। अर्थ :-- श्रद्धारहित असलेला माणूस अज्ञानी आणि शंकेखोर असतो. तो नाश पावतो. ज्याच्या मनात (धर्मग्रंथातील वचनांच्या सत्यतेविषयी ) शंका येतात तो इहलोकाला तसेच परलोकालाही मुकतो. त्याला कधी सुख लाभत नाही. गीतेच्या चौथ्या अध्यायातील या दोन श्लोकांचा मथितार्थ असा की, गीतेतील वचने खरी आहेत यावर जो पूर्ण श्रद्धा ठेवतो तो ज्ञानी होतो. त्याला विनाविलंब परमशांती लाभते. जो शंकेखोर असतो तो अज्ञानी आणि अश्रद्ध होय. त्याचा नाश होतो. या वचनांच्या सत्यतेविषयी ज्याच्या मनात शंका उद्भवते त्याला ना अरत्र ना परत्र असे होते. त्याला कधीच सुख लाभत नाही. यावरून गीतेत श्रद्धेला अवास्तव महत्त्व दिले आहे, श्रद्धेचे उदात्तीकरण केले आहे हे स्पष्ट होते. गीतेतील ही वचने "श्रीभगवान् उवाच " म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराच्या मुखातून आली आहेत. म्हणून ती सत्य असलीच पाहिजेत असा समज निर्माण केला आहे. (गीतेत "धृतराष्ट्र उवाच, संजय उवाच, अर्जुन उवाच " असे म्हटले आहे. मात्र "श्रीकृष्ण उवाच" असे लिहिले नाही. "श्रीभगवानुवाच" असे म्हटले आहे. महाभारतात श्रीकृष्णाला श्रीभगवान असे केवळ गीतेतच म्हटले असावे. इतरत्र कुठे नसावे. हे इथे लक्षात घ्यावे.) वरील दोनांतील पहिल्या श्लोकात श्रद्धाळूला ज्ञान आणि परमशांती यांच्या लाभाची आशा दाखवली आहे. तर दुसर्‍या श्लोकात अश्रद्धाला भीती घातली आहे की त्याचा विनाश होतो. तो इहलोक आणि परलोक या दोघांनाही मुकतो. प्रत्येक धर्मग्रंथात आशा आणि भीती या दोन भावनांचा उपयोग करून धार्मिकांना जखडून टाकलेले असते. श्रद्धांच्या दाव्याला बांधलेले असते. सगळ्याच धर्मग्रंथांत श्रद्धेला अवास्तव महत्त्व दिले आहे. गीतेत अश्रद्धाला विनाशाची भीती घातली आहे तर बायबल आणि कुराण या धर्मग्रंथांत अश्रद्धाला मृत्युदंडाची शिक्षा द्यावी असे म्हटले आहे. धर्मग्रंथ ईश्वरप्रणीत आहेत. त्यांतील सर्व वचने ईश्वराचे बोल आहेत. त्यांच्या सत्यतेविषयी शंका घेणे , त्या विधानांची चिकित्सा करणे, म्हणजे प्रत्यक्ष ईश्वरावर अविश्वास दाखविणे आहे. म्हणजे एका अर्थी ईश्वराची निंदा करणेच (ब्लासफेमी) आहे. म्हणून या ईश्वर निंदकांना मृत्युदंड द्यावा असे धर्मग्रंथांत आहे. धर्मग्रंथांत श्रद्धेला अवास्तव महत्त्व देऊन अश्रद्धांना मृत्युदंडाच्या शिक्षेची भीती घालण्याचे कारण काय ते उघड आहे. धर्मग्रंथातील वचनांची चिकित्सा केली तर त्यांतील कित्येक वचने खोटी आहेत, बुद्धीला न पटणारी आहेत, असे सहज दिसून येते. एकदा हे कळले की धार्मिकांची श्रद्धा उडून जाईल. मग धर्मग्रंथांना, धार्मिक कर्मकांडांना, धर्मगुरूंना आणि धर्माला कोण मानणार ? श्रद्धाळूच नसले तर मंदिरांपुढे रांगा कोण लावतील ? मग देवापुढच्या दानपेट्या तुडुंब कशा भरतील ? देवस्थानांची उत्पन्ने कोटीच्या कोटी उड्डाणे कशी घेतील ? देवाला सोन्या-चांदीचे दागिने, वस्तू कोण वाहतील ? सोने मोठ्या प्रमाणात जमले नाही तर लंपास कसे करता येईल ? श्रद्धांचे विसर्जन झाले तर होम-हवने, अभिषेक-अनुष्ठाने, एकादष्णी-लघुरुद्र अशी निरर्थक कर्मकांडे कोण करतील ? मग पुरोहित-पुजार्‍यांना फुकाफुकी लक्षावधी रुपये कसे मिळतील ? स्वबुद्धीने विचार केला की श्रद्धा संपते. मग दहावे-अकरावे-बारावे-तेरावे, मासिक श्राद्ध अशी अन्त्यविधी कर्मकांडांची लांबच लांब माळ कोण कशाला करून घेतील ? म्हणून धार्मिकांची श्रद्धा दृढ राहायला हवी. ती मुळीच ढळूं देता नये. समाजसुधारक प्रबोधन करू लागले तर प्रखर विरोध करायला हवा. तात्त्विक विरोध करता आला नाही तर त्यांना धमक्या द्यायला हव्या. त्यालाही बळी पडले नाहीत तर त्यांचे खून पाडायला हवेत. पण काही करून श्रद्धा टिकवायलाच हवी. नाहीतर आपले अस्तित्वच टिकणार नाही. असे धर्ममार्तंडांना वाटणे साहजिक आहे. यासाठी धार्मिकांनी धर्मग्रंथावर श्रद्धा ठेवणे आवश्यक आहे. धर्मग्रंथातील वचनांविषयी शंका उपस्थित करायची नाही. संशय घ्यायचा नाही. केवळ श्रद्धा ! ती ढळू द्यायची नाही. श्रद्धेचे बळ मोठे असते. असे हितसंबंधी धूर्तांनी श्रद्धाळूंच्या मनावर सतत बिंबविले आहे. सत्य शोधनाची नावड निर्माण केली आहे. त्यामुळे ,"श्रद्धा म्हणजे अज्ञानात गुरफटून राहण्याची आवड आणि सत्यशोधनाची तीव्र नावड " अशी समर्पक व्याख्या करता येते. अर्थात श्रद्धाळूंना लुबाडण्याचे हे प्रकार गेल्या पाच-सहाशे वर्षांत ऊर्जितावस्थेला आले. तत्पूर्वी अशी लुबाडणूक नसावी. मात्र श्रद्धेच्या आधारे जनसामान्यांवर नियंत्रण ठेवलेले असे. राजसत्ता आणि धर्मसत्ता यांचा सर्वाधिकार जनता विनाअट मान्य करील याची दक्षता घेतलेली असे. या सत्ता अबाधित राखण्यासाठी जनसामान्यांच्या श्रद्धेचा पुरेपूर उपयोग केला होता. तर्कशुद्ध युक्तिवादाला, सुसंगत विचारसरणीला , डोक्यात उद्भवलेल्या शंका उपस्थित करण्याला धर्माच्या क्षेत्रात स्थानच नसते. तिथे अपेक्षित असते संपूर्ण शरणागती आणि असीम श्रद्धा. जो श्रद्धेचे विसर्जन करतो, गतानुगतिक होत नाही , स्वबुद्धी वापरतो, परंपरांची चिकित्सा करतो, आपला अनुभव-विवेक (कॉमनसेन्स) वापरतो त्याचीच बौद्धिक प्रगती होऊ शकते. श्रद्धावंत जन्मभर अज्ञानीच राहतो. तसा सुखी असतो. कारण तो त्या अज्ञानातच सुख मानतो. "श्रद्धावान् लभते ज्ञानम्।" हे गीता वचन न पटणारे आहे. माणसाने अज्ञानी राहावे, धर्माला शरण जावे, धर्मगुरूंना पूज्य मानावे. म्हणून अशी वचने सर्व धर्मग्रंथांत असतात. श्रद्धा हे ज्ञानप्राप्तीचे साधन असूच शकत नाही. श्रद्धा हे अज्ञानीपणाचे लक्षण आहे. श्रद्धाळू माणसे अज्ञानालाच ज्ञान समजतात. अतूट श्रद्धेविषयी कोणी काही म्हणो, श्रद्धेची कितीही वाखाणणी करो, गोडवे गावो, मला तर श्रद्धा ही माणसासाठी लाजिरवाणी भावना आहे असेच वाटते. श्रद्धावंत हा त्या श्रद्धाविषयाचा दास बनतो. तो श्रद्धेची चिकित्सा करूच शकत नाही. तसेच श्रद्धा ही अतिशय घातक असू शकते. निष्पाप, निरागस बालकांच्या संस्कारक्षम, संवेदनशील मेंदूत श्रद्धेचे संस्कार बिंबविणे हा मोठा अपराध आहे. बहुसंख्य माता-पिता शिक्षक हा अपराध करतात. श्रद्धा आणि भक्ती यांमुळे माणसाला मानसिक आधार मिळत असेल. मानसिक समाधान लाभत असेल. पण ते केवळ मानीव असते. श्रद्धा आणि भक्ती यांच्या योगे ज्ञानप्राप्ती होऊ शकत नाही. अगदी वेदकाळापासून आपल्या पूर्वजांची सूर्यावर श्रद्धा होती. त्यांनी सूर्याची उपासना केली. सूर्यामुळे प्रकाश मिळतो, उष्णता मिळते एवढे अनुभवाने समजत होते. ते प्रतिदिनी सूर्याला अर्घ्य देत असत. त्याची स्तुतिगीते गात असत. संध्या करताना म्हणायचा गायत्री मंत्र हा सूर्याच्या तेजाविषयी आहे. ते त्रिकाल संध्या करीत. (सकाळ-दुपार -संधाकाळ) . या श्रद्धेने, भक्तीने, स्तुतीने त्यांच्या मनाला बरे वाटत होते एवढेच. ग्रह सूर्याभोवती फिरतात हे ज्ञान त्यांना या श्रद्धेने प्राप्त झाले नाही. सूर्यदेवाने दिले नाही. वैज्ञानिकांनी शोधून काढले. ज्या पृथ्वीवर आपण राहतो तो सूर्याभोवती फिरणारा एक ग्रह आहे हेही त्यांना श्रद्धेने समजले नाही. भूमातेचीसुद्धा ते स्तुती, भक्ती करीत. "समुद्रवसने देवि, पर्वतस्तनमंडले विष्णुपत्‍नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे ।" असे म्हणत. पण पृथ्वीविषयी सत्यज्ञान त्यांना झाले नाही. ते ज्ञान "संशयात्मा" असणार्‍या वैज्ञानिकांना झाले. श्रद्धेमुळे ज्ञान प्राप्त होत नाही हे यावरून दिसून येते. श्रद्धेमागे कोणताही तर्कसंगत विचार नसतो. असते ती गतानुगतिक मेषवृत्ती. "देवावर अनेकजण श्रद्धा ठेवतात. म्हणून मी पण ठेवायला हवी." असे श्रद्धाळू मानतो. सत्य काय आहे हे जाणून घ्यायची ज्याला इच्छाच नसते असा माणूस सहजपणे श्रद्धेचा स्वीकार करतो. नुसते होय म्हणायचे. मान डोलवायची. बुद्धी वापरायची नाही. विचार करायचा नाही. हे सोपे, सुखकर वाटते. डोक्याला काही ताप नाही. श्रद्धेमागे कोणताही विचार नसतो. श्रद्धा ठेवण्याच्या अनिवार ओढीमुळे ती अपरिहार्यपणे बसते. अशी श्रद्धा घालविणे महाकर्मकठीण असते. श्रद्धावंत त्याच्या श्रद्धाक्षेत्रांतील विषयांवर विचार करतच नाहीत. कारण श्रद्धेमुळे त्यांची बुद्धी त्या क्षेत्रात ठप्पच झालेली असते. मात्र श्रद्धाक्षेत्राच्या बाहेरील विषयावर ते व्यवस्थित, तर्कसुसंगत विचार करू शकतात. कारण तिथे त्यांची बुद्धी कार्यप्रवण होते. माणूस हा मूलत: तर्कनिष्ठ प्राणी (रॅशनल आनिमल ) आहे. तर्कशुद्ध , सुसंगत विचार करणे, युक्तिवाद करणे हे माणूस असण्याचे प्रमुख लक्षण आहे. पण त्यासाठी त्याची बुद्धी स्वतंत्र, पूर्वग्रह विरहित हवी. मुक्त हवी. श्रद्धेने बरबटलेली नसावी. कशावर श्रद्धा ठेवली की तिथे बुद्धी गहाण पडते. ती स्वतंत्र राहत नाही. मग तर्कबुद्धी कुंठित होते. श्रद्धेला तर्काचे वावडे असते. किंबहुना तर्कबुद्धी जागृत झाली की श्रद्धा गळून पडते. बसलेली श्रद्धा उडून जाते. दहा-बारा हजार वर्षांपूर्वी माणूस रानटी अवस्थेत होता. गुहेत राहात होता. त्याच्या अंगावर कपडे नव्हते. शिकार करणे आणि फळे-कंदमुळे गोळा करणे हे त्याच्या उपजीविकेचे मार्ग होते. त्याकाळी त्याची तर्कबुद्धी विकसित झाली नव्हती. प्राथमिक अवस्थेत होती. विचार करायला वेळच नव्हता. अन्न शोधार्थ सबंध दिवस जात होता. हींस्र श्वापदांची , साप-विंचू अशा विषारी प्राण्यांची सतत भीती होती. त्याकाळीं त्याला श्रद्धेचा आधार वाटला असेल. श्रद्धेमुळे जगणे सुसह्य झाले असेल. पण आतां गतानुगतिक श्रद्धा , धार्मिक कर्मकांडे , इत्यादि सर्व गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत. परंपरेच्या नावाखाली आता त्यांना कवटाळून राहणे योग्य नाही. त्यात मानव समाजाचे हित नाही. म्हणून असल्या गोष्टींचा त्याग करायला हवा. त्यातच त्या व्यक्तीचे , समाजाचे आणि अंतत: देशाचे हित आहे. जगप्रसिद्ध निरीश्वरवादी रिचर्ड डॉकिन्स श्रद्धेविषयी लिहितात, "एडस्, डेंग्यु, स्वाईन फ्लू, झायका अशा साथीच्या रोगांमुळे मानवजातीवर भविष्यकाळी मोठे संकट कोसळणार आहे." असे भाकीत वर्तविण्याची एक पद्धत सध्या पडली आहे. पण मला वाटते श्रद्धा हा मानव जातीला जडलेला सर्वात भीषण आणि गंभीर रोग आहे. त्याची तुलना पूर्वीच्या देवीच्या साथीशी करता येईल. मात्र श्रद्धारोगनिर्मूलनाचे काम देवीनिर्मूलनाच्या कामापेक्षा अधिक बिकट आहे." *****************************************************************************************
वर्गीकरण
काथ्याकूट

प्रतिक्रिया द्या
46177 वाचन

💬 प्रतिसाद (79)
A
arunjoshi123 Fri, 01/19/2018 - 09:45 नवीन
पायथ्यागोरसच्या प्रमेयाची सिद्धता बुद्धिगम्य आहे.
त्या प्रमेयाच्या सिद्धतेसाठी जे बिंदू, रेषा नि प्रतले वापरली जातात ती असत्य, श्रद्धेच्या क्षेत्रातली, वास्तवात नसलेली, खोटारडी, केवळ संकल्पनात्मक, निसर्गात नसलेली, इ इ आहेत. असे असतानाही तुम्हाला का बरे हा प्रमेय बुद्धिगम्य वाटतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
म
माहितगार Fri, 01/19/2018 - 10:15 नवीन
प्रतिसादाच्या पहिल्या परिच्छेदात ' म्हणजे ‘ हा शब्द दोनदा वापरला गेला असला तरी त्यातून ' श्रद्धा ' संकल्पनेची निष्पक्ष व्याख्या पुढे येत नाही. केवळ यनावाला त्यांना व्यक्तिशः जाणवणारी काही वैशिष्ठ्य सब्जेक्टिव्हली मांडत आहेत असे वाटते. श्रद्धा शब्दाची निष्पक्ष व्याख्या इतर मिपा सदस्यांनी व्यवस्थित अभ्यासून यानावालांच्या निदर्शनास आणण्याची आवश्यकता असावी.
..."देव अस्तित्वात आहे." हे जर बुद्धीला पटत असेल ,त्याविषयी कोणत्याही प्रकारची शंका नसेल तर देवावर विश्वास ठेवावा. तिथे श्रद्धेची आवश्यकता काय ?
बेसिकली श्रद्धेच्या काही अयोग्य प्रयोजनांमुळे यनावाला श्रद्धेच्य प्रयोजनाबद्दल साशंक झाले आहेत. श्रद्धेची काही प्रयोजने अयोग्य ठरणे म्हणजे सर्व प्रयोजने अयोग्य असा सरसकट निर्ण यास येताना यनावाला दिसतात आणि इतरांनीही आपल्या सरसकट करणात सहभागी व्हावे असा त्यांचा अत्याग्रह स्पष्ट होत राहातो. देवावरच्या श्रद्धेचे प्रयोजना बद्दल इतर सश्रद्ध लोक उत्तरे देतील . मी माझे लक्ष श्रद्धेच्य इतर प्रयोजनां बद्दल अधिक अभ्यास करून लिहिण्याची आवश्यकता असावी पण तरीही मी तिकडे लक्ष केंद्रित करतो. केवळ भक्ती हा श्रद्धेचा एकमेव कॉम्पोनंट नाही निष्ठा आणि कर्तव्य हि दोन कॉम्पोनंट सोबतीस असतात आणि त्यांना आपले स्वतंत्र प्रयोजन असते जे श्रद्धावंत अधिक चांगल्या पद्धतीने राबवताना दिसतात म्हणून श्रद्धेस वेगळे प्रयोजन प्राप्त होते. राजस्थानातील काळवीट एका समूहांच्य श्रद्धेचा म्हणून निष्ठेचा म्हणून त्याची हत्या करू नये हे एक कर्तव्य झाले . समजा हि श्रद्धा नसलेले चार सिने कलाकार विशिष्ट काळवीट प्राणी दुर्मिळतेमुळे संरक्षित आहे संरक्षित प्राण्यांची हत्या करू नये कायदा मोडू नये या वर विश्वास आहे तरीही संवेदना हरवलेल्या मौजेच्य क्षणी काळवीट मारतात तेच श्रद्धा असलेले लोक काळवीट मारणे टाळतात एवढेच नाही श्रद्धा नसलेले लोक पैसे घेऊन कोर्टात खोटी साक्ष देण्याची शक्यता अधिक असू शकेल पण श्रद्धा असलेले पैसे घेऊन कोर्टात खोटी साक्ष देण्याची शक्यता नसेलच असे नाही पण अशी शक्यता कमी असेल असे मानण्यास जागा उरते . आणि म्हणून श्राद्धेच्य प्रयोजनाचे हे एक उदाहरण झाले. भारतात काही वनांचे संरक्षण देवराईच्य स्वरूपात आपसूकच झालेले दिसते ते केवळ स्थानिकांचा श्रद्धा मुळे . श्रद्धांची विविध प्रयोजनांबद्दल अधिक अभ्यास करून लिहिणे रोचक ठरू शकेल असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
अ
अर्धवटराव Fri, 01/19/2018 - 20:50 नवीन
तसा प्रयत्न केला होता असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
र
राही Fri, 01/19/2018 - 10:20 नवीन
खरे आहे. माहीतगारांच्या प्रतिसादावर तसे लिहायचेच होते. इंग्लिशमध्ये फेथ, बिलीफ, ट्रस्ट असे भिन्न छटा असणारे थोडेफार समानार्थी शब्द आहेत. मराठीत त्यासाठी स्पष्टीकरणाची वाक्ये लिहावी लागतात. भारतीय हिंदू मानसिकतेत श्रद्धा ही केवळ विश्वास, ट्रस्ट, फेथ न राहाता त्यात पावित्र्य आणि धार्मिकतासुद्धा मिसळलेली असते. त्यामुळे श्रद्धा आणि अश्रद्धा यांचा लढा हा शेवटी धर्म आणि अधर्म, मंगल आणि अमंगल असा (आपण म्हणता त्याप्रमाणे भावनेच्या पातळीवर) येऊन पोचतो. मग अश्रद्ध म्हणजे अधार्मिक, अहिंदू या निष्कर्षावरही काही लोक येऊन ठेपतात. खरेतर याला लढा म्हणूच नये कारण इथे तलवारींचा खणखणाट, रणदुंदुभींचा नभ व्यापणारा स्फुरणध्वनी अपेक्षित नसतो. इथे फक्त एका विचारधारेचा शाब्दिक विरोध असतो. आभासी माध्यमांत इतर काही साक्षात असे शक्य नसते. पण विरोध हा प्रखरच असावा, अशी अपेक्षा आणि समजूत असते. आणि प्रखर वाक्यांमुळे वीरश्री संचारते. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
म
माहितगार Fri, 01/19/2018 - 10:51 नवीन
विश्वासाचा संबंध बुद्धीशी आहे. तर श्रद्धेचा संबंध मनोभावनेशी आहे. एखाद्या गोष्टीची/तत्त्वाची/संकल्पनेची सत्यता बुद्धीला पटली तर विश्वास ठेवतात. बुद्धीला पटत नसता केवळ भावनेच्या आधारे सत्य मानणे म्हणजे श्रद्धा ठेवणे. हे सरळ सरळ माहित असताना बुद्धीने बुद्धीशी चर्चा करण्यावर जोर देण्या एवजी भाव्नांशी टाळता येण्यजोगा पंगा घेऊन भावनांवर लक्ष का केंद्रीत आपल्या मुख्य उद्दीष्टापासून दूर तर जात नाहीत ना अशी शंका वाटते. वस्तुतः "बुद्धीला पटत नसता केवळ भावनेच्या आधारे सत्य मानणे म्हणजे श्रद्धा ठेवणे." हि व्याख्याच स्ब्जेक्टीव्ह गृहीत धरणारी आणि म्हणून परिपुर्ण नाही. बुद्धीला पटणार्‍या गोस्।टींवरही मी भावनेच्या आधारे श्रद्धा ठेऊ शकतोच की. बुद्धीला पटणे हे सुद्धा सब्जेक्टीव्ह आहे. बेसिकली श्रद्धा = विश्वास + निष्ठा + भक्ती ( + कर्तव्य ) अशी तात्पुरती व्याख्या केली तर; श्रद्धावंतांना यनावाला विश्वास ठेवा, पण निष्ठा आणि कर्तव्या सोबतच भावना पासून दूर जाण्यास सांगत आहेत . सुज्ञ व्यक्तीस एकवेळ भावने पासून सांभाळून राहता येते, पण निष्ठा आणि कर्तव्य बदलताना , तडजोड करताना कोणतीही सुज्ञ व्यक्ती तुमच्या प्रपोझिशनचा कार्यकारण भाव तर्क सुसंगतता हजार वेळा तपासून पहाणार नाही का ? तुमच्या प्रपोझिशनचा कार्यकारण भाव आणि तर्क सुसंगतता तपासू इच्छिणाऱ्या प्रत्येकावर भावनेच्य आहारी गेला असे चुकीचे वर्गीकरण इतरांना नव्हे तुम्हाला स्वतः:लाच फसवत असते किंवा कसे. त्यामुळे आपल्या विचारांना रॅशनल असल्याचे स्व समर्थनार्थ प्रमाणपत्र इतरांनी कबूल करावे असे वाटतं असेल तर, विविध लॉजिकल फॉलसी खासकरून व्यक्ती आणि समूह लक्ष्य तर्कदोष यनावाला आणि इतर प्रबोधन करू इच्छितांनी टाळावे , तर्क सुसंगतते बद्दल असलेल्या शंकांना उत्तरे देणे जरुरी असावे असे वाटतें .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
र
राही Fri, 01/19/2018 - 13:24 नवीन
निष्ठा म्हणजे लॉयल्टी. यात थोडीशी दास्यत्वाची छटा येते. दास्य हे नवविधा भक्तिसाधनांपैकी एक साधन आहेच. आपल्याकडे जाणवते की श्रद्धेला भक्तीची डूब दिसते. आता अगदीच अवांतर : प्रेम, मोह, माया यांना विकारांमध्ये गणले गेले आहे. हे 'विकार' आहेत. विकारी म्हणजे बदल होण्याजोगे, अस्थिर. (आपल्या सगळ्यांना विकारी अविकारी शब्द माहीतच असतात.) माणसाचे उन्नयन म्हणजे हे भावनात्मक विकार दूर करून सद् असद्विवेकबुद्धी जागृत होणे. 'रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन्' अशा स्वाधीन अंतःकरणाच्या पुरुषाला समाधान प्राप्त होते..(राग म्हणजे प्रीती) वगैरे. (अशी अनेक वचने गीतेत आहेत. कित्येक विरुद्धार्थीसुद्धा आहेत. 'त्रैगुण्यविषया वेदा:, निस्त्रैगुण्यो भवार्जुन' असेही आहे. अनेक मार्ग वर्णिले आहेत. ज्याच्या मानसिकतेला जे प्रिय ते घ्यावे. तसेच अनेकांनी अनेक प्रकारे गीतेचा अर्थ सांगितला आहे. पण शेवटी विषयांमध्ये वाहावून न जाता विवेक जागृत करणे, बुद्धी स्थिर करणे, विवेकबुद्धीने निर्णय घेणे हे गीतेत सर्वत्र आहे. या अवस्थेला कसे पोचावे याचे अनेक मार्ग आहेत. सगळेच तीप्रत पोचतील असे नाही. किंबहुना नाहीच पोचत/ पोचणार. पण किमान ते उद्दिष्ट तरी असावे असा गीतेचा अर्थ मला जाणवला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
आ
आनन्दा Fri, 01/19/2018 - 15:16 नवीन
मी एक उदाहरण देतो... डार्विन ने एक सिद्धांत मांडला, त्याचे नाव उत्क्रांतीवाद.. तो बराच काळ असिद्ध होता.. पण तर्काच्या पातळीवर लोकांना पटत होता, त्यामुळे लोक त्यावर श्रद्धा ठेवत होते. काही लोक ही अंधश्रद्धा आहे म्हणून त्यांची हेटाळणी करत होते.. त्यातील काही श्रद्धावान लोकांनी त्या हायपोथीसिस वरून काही प्रयोग केले, आणि अनुभव घेतला, त्यावरून त्यांना ही खात्री झाली की हा हायपोथॅसिस खरा आहे, त्यानंतर निर्माण झाला तो विश्वास.. आईनस्टाईन बोललोय म्हणजे खरेच असणार ही श्रद्धा, आणि प्रयोगाअंती बसलेला तो विश्वास.. अध्यात्मात पण साधारण असेच आहे.. तुम्ही अगोदर श्रद्धा ठेवता, मग प्रयोग करून, प्रयत्न करून अनुभव घेता, आणि मग तुम्ही हळूहळू विश्वास आणि निष्ठा या पायऱ्या चढत जाता. दुर्दैवाने हा अत्यंत वैयक्तिक विषय असल्यामुळे त्याच्या प्रत्ययाची हमी देणे शक्य आहे पण आणि नाही पण, त्यामुळे हा सगळा वाद होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
A
arunjoshi123 Fri, 01/19/2018 - 12:01 नवीन
जी गोष्ट खरी नाही, तिचा त्याग करणे आवश्यक आहे,
का? सत्यतेचा नि त्याज्यतेचा संबंध काय? ब्रह्मांडात जे जे काय असत्य आहे ते ते सर्व केवळ सजीवांच्या चेतासंस्थेत आहे. सजीवांच्या चेतासंस्था वगळून विश्वाची कल्पना केली तर त्यात सर्व काही विशुद्ध सत्य आहे. मग म्हणून काय सर्व सजीवांनी आपली डोकी त्यागली पाहिजेत का? --------------------- अर्थव्यवस्थेत एखाद्या गोष्टीला (उदा. एक किलो आंबे) मूल्य असते, ते मोजता येते, त्याला अंकांत मांडता येते, त्याची अन्य गोष्टीशी (उदा. पेरु) तुलना करता येते, हे नसलेले पण मानलेले मूल्य दुसर्‍या नसलेल्याही आणि न मानलेल्याही गोष्टीने (उदा. पैसे) हस्तांतरित करता येते, इ इ ही सगळी असत्ये नाहीत तर काय? यनावाला आंब्याच्या पोटात हात घालून त्याचे मूल्य वा किंमत आम्हाला दाखवू शकतात का? इतक्या सगळ्या प्रकारच्या खोटारडेपणांचे एकमेकांवर मुकुट असताना आपण अर्थव्यवस्था मानतो ना? यनावाला पगार घेतातच ना? ------------------------ यनावाला, मनुष्यांनी मानायच्या गोष्टी सोडून (उदा. माझं नाव अरुण आहे.) जगात एकही केवल सत्य सिद्ध झालेलं नाही. प्रत्यक्ष केवल सत्य असोच, जगात केवल सत्य सिद्ध करायची फ्रेमवर्क देखील अजून प्रस्थापित झालेलं नाही. ------------------- तुम्ही कोणतेही शब्द उचलता नि लोकांना मूर्ख मानायला चालू करता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
प
प्रकाश घाटपांडे Fri, 01/19/2018 - 09:26 नवीन
यनावाला जेव्हा इतरांच्या श्रद्धेची चिकित्सा करतात त्यावेळी त्यांच्या श्रद्धा जशा दुखावल्या जातात तसेच इतर जेव्हा यनावालांच्या अश्रद्धेची चिकित्सा करतात तेव्हा त्यांच्याही अश्रद्धा दुखावल्या जातात. असे होणे स्वाभाविक आहे. पण यातून एक वैचारिक घुसळण होते हे नाकारता येत नाही.
  • Log in or register to post comments
ओ
ओरायन Fri, 01/19/2018 - 11:41 नवीन
यनावाला ,आपण नक्कीच चांगला प्रयत्न करत आहात..आपले मत मांडण्याचा..पण सर्व बुद्धिने समजायला पाहिजे हा अट्टहास चुकीचा वाटतो. अति तिथे माती ही म्हण इथेपण लागु पडते. जसे बुवा, माता करत दांभिक भोंदुच्या मागे फिरतांना बुद्धि गहाण ठेवणे जेवढे चुकीचे, तेवढेच मानवी बुद्धि ला ज्याचे आकलन होते, तेच व तेच खरे मानणे व त्यापलिकडे न बघणे हे पण तेवढेच चुकीचे... तुमचे म्हणणे, बुद्धीला पटत नसता केवळ भावनेच्या आधारे सत्य मानणे म्हणजे श्रद्धा ठेवणे. हे बरोबरच आहे. कारण श्रद्धा व तत्संबधीच्या गोष्टी ह्या बुद्धिच्या परिघात मुळीच येत नाहीत.. संभाव्य चांगल्या गोष्टी होण्यासाठी , मनाची ऐकाग्रता साधण्यासाठी, चिकित्सा टाळून, तरीही डोळसपणे केलेली गोष्ट म्हणजे श्रद्धा होय . हेच जर डोळसपणाने नाही केली तर ती अंधविश्वास ठरेल. डोळसपणे म्हणजे डोळे उघडे ठेवून.. काँमन सेन्स वापरून..तिथे बुद्धि ने फार चिकित्सा अपेक्षित नाही.
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Fri, 01/19/2018 - 11:44 नवीन
मा. यनावालासाहेब आपण व्यासंगी विद्वान आहात, ज्ञानीआहात. आपण करत आहात ते कार्य महान आहे. मात्र आपण श्रद्धा या प्रकारात केवळ माणसानं ईश्वरावर ठेवलेली श्रद्धा यावरच सातत्याने प्रहार करताना दिसता. समाजात अनेक घातक श्रद्धा आहेत. आपण त्यावर कधी प्रहार करणार? - अमुक पोषक द्रव्य दिल्याने मुल स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवते - अमुक एक मिठ खाल्ल्याने मुल जिल्हाधिकारी होते - नवर्‍याचा सदरा अमुक साबणाने धुतल्यास नवर्‍याचे वरिष्ठ त्याला परदेशी पाठवतात - अमुक मद्य प्राशन केल्याने अपरिचित मुली आपल्याशी प्रेमाने वागतात व मैत्री वाढवतात - अमुक सौंदर्यप्रसाधनाने काळ्या कुरुप मुली अल्पमोलात अल्पावधीत सुंदर व गोर्‍यापान होतात अशा अनेक श्रद्धा आजकाल बोकाळलेल्या दिसतात. देवावरची श्रद्धा निदान संस्काराने वा अनुकरणाने आलेली असते. वरील उल्लेखित श्रद्धा या अब्जावधी रुपये मिळवण्यासाठी कोट्यावधी रुपये ओतून रुजविल्या जात आहेत. या विरुद्ध प्रबोधन केल्यास समाजाचे व अर्थातच राष्ट्राचे भले होईल.
  • Log in or register to post comments
र
राही Fri, 01/19/2018 - 13:53 नवीन
अनेक श्रद्धा असतात हे म्हणणे योग्य आहे. पण त्या सर्वांशी एकाच वेळी एकाच माणसाने लढा द्यावा ही अपेक्षा व्यवहार्य नाही. काहीतरी चांगले करू इच्छिणारी पण सामान्य अशी माणसे कुठले तरी एक जीवितकार्य मानतात आणि त्यातच आयुष्य वेचतात. तेच प्रॅक्टिकल असते कारण मनुष्याची ताकद कमी असते. सगळीकडे एकाच वेळी भिडण्याइतकी नसते. आणि या आपण उल्लेखिलेल्या श्रद्धां /प्रथांविरुद्ध लढणारीही अनेक माणसे आहेतच. पण आपली उदाहरणे ही व्यावसायिक जाहिरातीतील आहेत. हे दावे खोटे आहेत असे वाटल्यास त्याविरुद्ध योग्य अथॉरिटीकडे धाव घेता येते.काही लोक ते करतातही आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळे काही दावे मागेही घ्यावे लागले आहेत. आमच्याइथे एक सद्गृहस्थ गळ्यामध्ये एक मोठा सादेचार फुटी फलक अडकवून गर्दीच्या ठिकाणी उभे राहात. त्या फलकावर वाटेल तिथे थुंकू नका असा संदेश आणि अशा थुंकण्याचे दुष्परिणाम तीन भाषांत लिहिलेले असत. लोक त्यांचीही टवाळी करीत. राष्ट्रहित अनेक मार्गांनी साधता येते. मी माझ्या घरातील वीजपाण्याचा वापर मर्यादित राखला तरीही राष्ट्रहित साधल्यासारखे होईल. विवेकबुद्धीने वागल्यानेही राष्ट्रहित साधेल. किंबहुना वीजपाण्याच्या बाबतीत मी विवेकाने वागतो असेही होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
प
प्रकाश घाटपांडे Sat, 01/20/2018 - 04:50 नवीन
वरील उदाहरणांना श्रद्धा म्हणणे मला पटत नाही. अतिशयोक्ति अलंकार हा जाहिरातींमधे आपले उत्पादनाची प्रभावी प्रतिमा लोकांमधे निर्माण करण्यासाठी,सर्वश्रुत करण्यासाठी व सर्वदूर पोहोचवण्यासाठी वापरतात. कित्येक म्हणी वाक्यप्रयोग यात अतिशयक्ती असतेच ना? कविता साहित्य यात आपल्या भावनोत्कटता व्यक्त करण्यासाठी हा प्रतिभालंकार आहे. आज मै उपर आसमा नीचे अस कधी असत काय? पण ती भावना चित्रित करणारे सुंदर गाण आपल्याला भावतच ना? या ज्योतिषाच काय करायच? मधे मी शुक्रतारा च उदाहरण दिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
म
माहितगार Fri, 01/19/2018 - 11:45 नवीन
यनावालांच्या लेखांचे मिपा पुस्तक असल्यास त्यात लेख जोडावा, आणि पुस्तक नसल्यास पुस्तक बनवावे अशी मिपा संपादकांना विनंती
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Fri, 01/19/2018 - 13:19 नवीन
ग्रह सूर्याभोवती फिरतात हे ज्ञान त्यांना या श्रद्धेने प्राप्त झाले नाही.
ग्रह सूर्याभोवती फिरतात ही एक श्रद्धाच आहे. काय कसे (वा कशाभोवती) फिरत आहे हे कळायला पाहणाराने ब्रह्मांडातल्या एका स्थिर जागी बसून फिरणार्‍या गोष्टींकडे पाहिले पाहिजे. अब्सॉल्यूट स्पेसमधल्या कोणत्याही एका बिंदूला पुन्हा कसं जायचं याचं गणित अजून सुटायचं आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 01/19/2018 - 15:23 नवीन
असंच नाही काही.. ज्याअर्थी मंगळाची सूर्याभोवती फिरण्याची गणिते करून आपले मंगळयान तिथपर्यंत पोचले त्याअर्थी हे सिद्ध झालेले आहे असे मानण्यास हरकत नसावी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
य
यनावाला Fri, 01/19/2018 - 17:04 नवीन
राही लिहितात,
"इंग्लिशमध्ये फेथ, बिलीफ, ट्रस्ट असे भिन्न (अर्थ) छटा असणारे थोडेफार समानार्थी शब्द आहेत.
हो. त्यांतील फेथ म्हणजे श्रद्धा तर बिलीफ म्हणजे विश्वास असे अर्थ ग्राह्य आहेत. सुप्रसिद्ध अमेरिकन निरीश्वरवादी सॅम हॅरीस लिखित : End of faith (एण्ड ऑफ् फेथ ) हे गाजलेले पुस्तक आहे. २/ तुम्ही दुसर्‍या एका प्रतिसादात निष्ठा शब्दाविषयी लिहिले आहे. श्रद्धेचा संबंध व्यक्तीच्या मनोभावनांशी आहे. विश्वास शब्दाचा बौद्धिक विचारांशी तर निष्ठेचा संबंथ आचरणाशी आहे. "अ" ची जर योगासनांवर निष्ठा असेल तर "अ" ने नियमितपणे योगासने केली पाहिजेत. "निष्ठा आचरणे कळे ।" असे म्हटले आहे.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Sat, 01/20/2018 - 08:20 नवीन
आपण समानार्थी शब्द सोडवणे बाजूला ठेऊ. ज्ञानप्राप्तीसाठी श्रद्धा आवश्यक तर नाहीच पण निश्चितपणे अडथळा असते असं आपलं प्रतिपादन. तुमच्या विद्यमान लेखाचं सार. त्यात तुमचं ज्ञानाचं उदाहरण! तुम्ही कोणता ग्रह कोणत्या तार्‍या भोवती फिरताना पाहिलात? किती चकरा पाहिल्या? सतत पाहिल्या? का मधे मधे जेवायला इ उठत होतात? कोणत्या वेधशाळेत पाहिला? भोवती म्हणजे काय? एका अर्थानं तुम्ही तुमच्या घरात शतपावली करत असलात तरी तुम्ही माझ्याभोवती फिरत आहात असं मी म्हणू शकतो. तसे हायपराबोला प्लॉट करता येतील. श्रद्धा न ठेवता तुम्हाला झालेल्या ज्ञानाची मला उलटतपासणी घ्यायची आहे. जे फिरत आहे तो एक ग्रह आहे हे कसं ठरवलंत? वा ज्या भोवती फिरत आहे हे तारा आहे हे कसं ठरवलंत? ग्रह म्हणजे काय? तारा म्हणजे काय? ती जी गती होती ती कोणत्या प्रकारची होती? किती होती? ते मागे असेच फिरत होते हे इतक्या ठामपणे कशावरून सांगता? "फिरतात" म्हणजे भविष्यातही फिरणार. कशावरून? ते कशामुळे असे फिरतात? एकाजागी निवांत का नाही थांबत? असला मूर्खपणा करण्याऐवजी हे सारे तारे व ग्रह विश्वाच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हीटीकडे का नाही जात नियमाप्रमाणे? मूळात हे आलेच कुठून? कधी? कशामुळे? कशाला? कृष्णाने वा भगवानाने वा परमात्माने वा त्यांच्या नावाने आपला मूर्खपणा खपवणाराने वा अजून कोणी जसे श्रद्धाळू लोकांना श्रद्धा मोड मधे तथाकथित ज्ञान देऊन फसवले आहे तसं ग्रह तार्‍याच्या गोष्टी सांगणारांनी तुम्हाला फसवलं नाही कशावरून? ===================== ज्ञानप्राप्तीचं उदाहरण देताना अर्धवट नि काहिही देऊ नये, थोडं वाचून इ इ द्यावं. मूळात ग्रहांची सूर्याभोवती जी गती आहे ती तुच्छ नि नगण्य आहे. ते खरे सूर्य जिकडे चालला आहे मंजे आपल्या ध्रुवीय अक्षाच्या दिशेने जात असतात. नि वास्तवात ही सगळी असेंब्ली आकाशगंगेच्या एकूण दिशेने अजून जास्त वेगाने जात आहे. आपले विश्व उकळत्या पाण्यातला एक बुडबुडा मानला तरी असे अनंत बुडबुडे क्षणोक्षण उत्पन्न होत आहेत (असे म्हणतात.). शिवाय स्पेसटाईम कुठे इतका वाकडा असू शकतो कि ताराच ग्रहाभोवती फिरत असू शकतो. असं असायला काही बॅन नाही. ====================== आता तुम्ही म्हणाल कि या सगळ्याचं नि माझ्या महान प्रमेयाचं काय देणंघेणं. यनावाला, प्रत्येकाला असा वरकरणी उथळ विचार करून झेंडा गाडायला आवडत नाही. काही लोक सकल, संपूर्ण, सुसंगत, समाधानकारक निदान करू इच्छितात. तुम्ही तुमच्या ज्ञानाचं कोणतंही पिस घ्या, त्याच्यावर इतके अनुत्तरित प्रश्न निघतात कि काढलेल्लं अनुमान चूक असायची शक्यता उरतेच. अंततः मनुष्यास सत्य प्रस्थापित करता येतेच का वा मूळात सत्य असे काही असतेच का असे विक्षिप्त प्रश्न उभे राहतात. अस्तित्वाचे, ज्ञानांचे, सत्यांचे इतके विरोधाभार विश्वात असले तरी व्यवहारातलं जीवन आपण मज्जेत जगत असतो. तुम्ही ज्याला ज्ञान म्हणता ते "सायंटिफिक मेथड" नावाच्या पद्धतीने विकसित केलेले आहे. मुद्दा असा आहे: १. आपण जी विधाने करता त्यांचा नि सायंटिफिक मेथडचा काहीही संबंध नसतो. एक बेसिक विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी आपण आपले प्रमेय या प्रद्धतीने मांडले पाहिजेत. २. अगदी या पद्धतीनं सिद्ध झालेल्या विधानाच्या सत्यतेचे पण पॅरामीटर असतात नि काही लिमिटींग स्टेटमेंट्स असतात. ३. या पद्धतीच्याच काही मर्यादा असतात. ======================== हा किंवा असे प्रतिसाद व्यक्तिशः यनावालांसाठी नाहीत. पण नास्तिकतेकडे कललेल्या लोकांसाठी आहेत. जनमानसात ईश्वर, धर्म यांच्या ज्या धारणा आहेत त्या पाहून त्या खोट्या वाटून नास्तिक बनणे इथे नास्तिकता संपत नाही. अशा व्यक्तिनं आपलं असं विश्वकारणाचं तत्त्वज्ञान विकसित केलं पाहिजे नि आपली निरिक्षणं या तत्त्वज्ञानात बसतात का हे पाहिलं पाहिजे. नैतर मग जगात तुमचे कंसेप्ट क्लिअर करायला खूप मंडळी बसली आहेत. श्रद्धेचे तत्त्वज्ञान सांगायला यनावाला आहेत. देशाचे तत्त्वज्ञान सांगायला नक्षल आहेत. कुटुंबांचं तत्त्वज्ञान सांगायला स्त्रीवादी आहेत. मूल्यांचं तत्त्वज्ञान सांगायला अभिव्यक्तिवादी आहेत. लिबरल आहेत. घटनावादी अधिकारवादी आहेत. भांडवलवादी आहेत. लिस्ट अनएंडिंग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
य
यनावाला Sat, 01/20/2018 - 16:08 नवीन
श्रद्धेची व्याख्या : जे विधान, जे तत्त्व, जो निसर्गनियम, जी संकल्पना, जी गोष्ट : १) पंच ज्ञानेंद्रियांतील एकाही इंद्रियाने प्रत्यक्ष अनुभवता येत नाही. अथवा २) जिच्या कथित गुणधर्मांचा कोणताही प्रत्यय येत नाही, अथवा ३) जी वैज्ञानिक प्रयोगाने सिद्ध करता येत नाही, अथवा ४) जी खरी असण्याची शक्यता अनुभवाने, कॉमनसेन्सने, किंवा तर्कसंगत युक्तिवादाने दाखविता येत नाही, अथवा ५) जिचे सत्यत्व मानवाच्या अधिकृत ज्ञानसंग्रहातील तत्त्वांच्या आधारे सिद्ध करता येत नाही, थोडक्यात म्हणजे जिची सत्यता माणसाच्या तर्कबुद्धीला कोणत्याही प्रकारे पटत नाही, पटविता येत नाही. ते तत्त्व, ती संकल्पना, ती गोष्ट पूर्वग्रहामुळे/शब्दप्रामाण्यामुळे केवळ भावनेच्या आधारे खरी मानण्याची मनोवृत्ती म्हणजे श्रद्धा होय. ...यनावाला
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 01/21/2018 - 00:10 नवीन
यनावाला, मानवी मन खरं मानावं की खोटं? मनाचं अस्तित्व वरीलपैकी कोणत्याही अटींत बसंत नाही. मानवी मनाच्या उदाहरणाने समाधान झालं नसेल तर स्वप्न खरं की खोटं ते ठरवून पहा. मला पडलेलं स्वप्न वरीलपैकी कोणत्याही चाचणीने सत्य वा असत्य ठेरवता येत नाही. मग मला काल रात्री स्वप्न पडलं आणि आज सकाळी ते लख्खं आठवतं ही श्रद्धा मानावी की अंधश्रद्धा? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
म
माहितगार Sun, 01/21/2018 - 05:09 नवीन
यना कृत तथा कथित व्याख्या मुलतः टिका आणि टिका ज्यात निष्कर्ष आधीच ठरवले आणि टिकेचे मुद्दे तेवढे शोधले सकारात्मक मुद्द्यांवर पाणी सोडले त्या मांडणीस ना परीपूर्णतेचा प्रयास होत ना समतोल येत ना व्याख्येच्या दर्जास प्राप्त होत. एकांगी पुर्वग्रहीत टिकेस व्याख्येचा दर्जा मिळू शकत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
ग
गॅरी ट्रुमन Sat, 01/20/2018 - 16:25 नवीन
अती विज्ञाननिष्ठ लोक असले काहीतरी लिहितात त्यामुळे मुळातच असल्या लोकांविषयी कधीही नसलेला आदर अजूनच कमी होतो. डिजगस्टींग
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Sat, 01/20/2018 - 16:31 नवीन
मी अलीकडेच विख्यात संतूरवादक पं शिवकुमार शर्मांची एक मुलाखत ऐकली. पंडितजींचे वय आता ८० असेल. ते सांगत होते की कित्येक वेळा संतूर उचलून मांडीवर ठेवणे आणि तिच्या तारांचा स्वरमेळ साधणे अत्यंत कर्मकठीण वाटावे इतकी त्यांची प्रकृती कधीकधी खालावते. पण कार्यक्रम सादर करताना त्यांना असा अनुभव येतो की एखादी 'दैवी शक्ती ' त्यांच्याकडून काही काम करून घेत आहे. त्या प्रभावाखाली ते तास दोन तास अत्यंत दर्जेदार वादन सादर करतात. तो प्रभाव ओसरला की पुन्हा वाद्य उचलणे जड जावे अशा स्थितीत परत जातात. वानगीदाखल हे एक उदाहरण दिले. तात्पर्य असे की टोकाची सश्रद्ध/ आस्तिक असलेली किंवा उघडपणे काहीशा अंधश्रद्धेकडे झुकलेली माणसे क्रीडा, संगीत, चित्रकला ते किरकोळ आकडेमोड लागणारे दैनंदिन व्यवहार ते मूलभूत विज्ञानातील अत्यंत क्लिष्ट समजल्या जाणार्‍या संशोधन क्षेत्रापर्यंत सगळ्याच क्षेत्रात लीलया संचार करताना, यशस्वी होताना आणि भरीव कार्य करताना दिसतात. त्यांच्या चिकीत्सा करण्याच्या, विश्लेषण करण्याच्या, सतत नवनवीन प्रयोग करण्याच्या किंवा आपल्या कार्यक्षेत्रात सतत काहीतरी शिकत राहण्याच्या क्षमतेत काडीमात्र उणीव येत नाही. क्रीडाक्षेत्रासारख्या अत्यंत बेभरवशाच्या आणि कमालीच्या स्पर्धात्मक क्षेत्रात सातत्य टिकवण्यासाठी आणि मनोबळ वाढवण्यासाठी श्रद्धाच कामी येते. कलेच्या प्रांतात अत्यंत आवश्यक असलेल्या सृजनशीलतेला, उत्कट भावदर्शनाला तर श्रद्धेच्या आणि भक्तीच्या पाठबळावरच बहर येतो. तळहातावर शिर घेउन निघालेल्या सैनिकालाही 'हर हर महादेव' ही गर्जनाच प्रेरणा देते. कधी काळी हाडाची काडे झालेल्या माउलीला आपल्या कुटुंबासाठी दळण दळण्याचे कष्टप्रद काम करतानाही 'जात्यावरच्या ओव्याच' पाठबळ देत असत. भारतात किती टक्के बायका जात्यावर दळण दळतात, दरवर्षी किती सैनिक धारातीर्थी पडतात किंवा किती कलाकारांना पद्म पुरस्कार मिळतात यांचा 'विदा' वाचून त्यापासून या सामान्यातल्या असामान्य माणसांना कुठलीच प्रेरणा मिळताना दिसत नाही. थोडक्यात 'भाव तेथे देव' इतकेच नसून भाव तेथेच मानवी जीवनातले सारे सत्य, शिव आणि सुंदर प्रकट होते असे म्हणावे लागेल. निव्वळ डॅटॉलने हात धुवून स्वच्छतेची काळजी घेणे वेगळे आणि त्यापलीकडे जाउन धूप दीप लावून, रांगोळी घातलेल्या पानावर जेवायला बसताना मांगल्य आणि पावित्र्य अनुभवणे वेगळे. असो. सश्रद्ध माणसे अत्युच्च बौद्धिक आणि तार्किक क्षमता अनिवार्य असलेल्या क्षेत्रात लीलया वावरू शकतात. वेदांतात व्यावहारिक, प्रातिभासिक आणि अध्यात्मिक सत्य असे म्हणतात ती संकल्पना कळत नकळत त्यांना उमगून जाते. त्यानुसार आवश्यक तेथे तर्क, चिकित्सा, विश्लेषण इत्यादिंचा वापर करून व्यावहारिक जीवन सफल करतानाच गुरूप्रचिती, आत्मप्रचिती वगैरे 'सब्जेक्टिव्ह' प्रचितीच्या गोष्टींना थोतांड न ठरवता आपापल्या रूचीनुसार, परंपरेनुसार किंवा प्रचितीनुसार एखाद्या सत्पुरूषावर श्रद्धा ठेवत आणि नित्यनेमाने ध्यान/ उपासना वगैरे करत जीवन अधिक परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहतात. उलट श्रद्धेचा तिरस्कार करणार्‍या आणि चिकीत्सेला फाजील महत्व देणार्‍यांना इहवाद्यांना त्यांनी बांधलेल्या काल्पनिक भिंतीपलीकडल्या भावविश्वाबद्दल काडीमात्रही प्रचिती नसते, अनुभव नसतो. त्यामुळे अशा लोकांनी श्रद्धेच्या बुरख्याआडून होणारी बुवाबाजी, फसवणूक, शोषण अशा अपप्रकारांबद्दल टीका करणे अगदी सयुक्तिक असले तरी सरसकट श्रद्धानिर्मूलनाचे त्यांचे प्रयत्न मात्र सत्य, शिव आणि सौंदर्याचेच निर्मूलन ठरत असल्याने माझ्यासारख्या सामान्य माणसाला एकांगी, अतिरेकी आणि दुर्दैवी वाटतात इतकेच. बाकी श्रद्धानिर्मूलनालाच कुणी आपल्या जीवनाचे ध्येय मानत असेल तर 'पिंडे पिंडे मतिर्भिन्नः' या उक्तीप्रमाणे समाजात काही प्रमाणात अशा व्यक्ती आणि त्यांचे अनुमोदक असणे साहजिकच आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांचा बुवाबाजी आणि शोषणापासून सामान्यजनांना सावध करण्यासाठी सदुपयोग होउन त्या योगे सतश्रद्धेच्या विराट वृक्षावर पोसलेल्या बांडगुळांचे काही प्रमाणात तरी निर्मूलन व्हावे अशी ईश्वरचणी प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो.
  • Log in or register to post comments
ज
जानु Sat, 01/20/2018 - 16:32 नवीन
व्याख्येतील क्र. १ ला खालील ४/५ क्र. च्या बाबी विरोधी नाहीत का?
  • Log in or register to post comments
न
नाखु Sun, 01/21/2018 - 04:01 नवीन
धाग्याचं फलित म्हणजे: मार्कृस लिहायला लागले यना किमानपक्षी दोनदा तरी धाग्यावर अवतरले जाता जाता मना यांना आणि कट्टर भक्त यांना विनम्र विनंती कुणालाही कसल्याही शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा वेळ वाया घालवू नये,, कारण तो सगळा कल्पनेच्या भावभावनांचा खेळ आहे अगदी दु:खद्द प्रसंगी सांत्वन असल्या मनाच्या शब्द बुडबुडे यात आपला अमूल्य वेळ वाया घालवू नये जुनाट नाखु पांढरपेशा बिनसुपारीवाला
  • Log in or register to post comments
प
पिगी Sun, 01/21/2018 - 05:39 नवीन
प्रतिसाद धागे सोडून वैयक्तिक आहे (म्हंटलं तर आहे, म्हंटलं तर नाही.) यनावालासाहेब यांचे लेख व जोशीसाहेब यांचे प्रतिसाद वाचनीय असतात. खरे सांगायचे तर मनोरंजक असतात. मी पूर्वीचे सर्व धागे वाचले आहेत, आणि खरंच खूप मज्जा येते. (दोघांचाही उपमर्द करायची ईच्छा नाहीये, प्रामाणिक काय वाटते ते सांगितले.) खरेतर यनावालांची वाचकांच्या पत्रव्यवहारातील पत्रे यापेक्षा जास्त चांगली असतात. (Assuming that दोन्ही यनावाला एकच व्यक्ती आहेत.) यनावालांचे मुद्दे बर्‍याचदा तत्वत: योग्य असतात पण ते ज्या प्रिमायसेसवर आधारित असतात ते भयंकरच गंडलेले असते. ज्यांनी अंशत: तरी सहमती दाखवली आहे अशांनाच ते सिलेक्टीव्हली प्रतिसाद देतात, आणि काहीवेळा अशा उपप्रतिसादात, विरोधकांवर टीका करतात. हे चूक आहे, पॅसिव-ॲग्रेसिव आहे. एकेरीने संबोधणे जसे चूक आहे तसेच, मी अज्ञानी आहे-तुमच्या प्रश्नांना नाही बाबा उत्तरे, किंवा जोशींबरोबर संवादात एंगेजच व्हायचे नाही हे एकेरीवर येवून अपमान करण्याएवढेच चूक आहे. जोशींचे मुद्दे फारफेच्ड वाटले तरी त्यावर सविस्तर उत्तरे देणे आवश्यक आहे. तेवढा वेळ नसेल (कारण ते प्रचंड बारीक तपशिलवार लिहीतात.) तर किमान मुख्य एक-दोन मुद्द्यांवर रितसर संवाद करावा. (आत्तापर्यंतचे जोशींचे ॲटीट्यूड बघता त्यांना असेही मान्य असावे) On a global scale, पुरोगामी लोकांच्या अशा फटकळ ॲटीट्यूडमुळेच extreme right विचारसरणी जोमात आहे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 01/21/2018 - 05:53 नवीन
On a global scale, पुरोगामी लोकांच्या अशा फटकळ ॲटीट्यूडमुळेच extreme right विचारसरणी जोमात आहे.
सहमत आहे. कथित पुरोगामी लोकांचा (extreme right सारखाच असलेला) एकांगी हेकेखोरपणाची जोड, ज्यांना बदलण्याची इच्छा आहे त्यांच्याशी संवाद नाकारणे, extreme right विचारसरणीस साहाय्यकारी होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिगी
A
arunjoshi123 Sun, 01/21/2018 - 11:50 नवीन
यनावालासाहेब यांचे लेख व जोशीसाहेब यांचे प्रतिसाद वाचनीय असतात. खरे सांगायचे तर मनोरंजक असतात.
वास्तविक मिसळपाववर बरेच लेखक अत्यंत अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण, तार्किक, सयंत, शुद्ध भाषेतील, तसेच संतुलित इ इ लिहित असतात. यातलं एकही विशेषण मला लागू होत नाही. मी फक्त टाईमपास म्हणून लिहित असतो. जालावर लिहिताना तुम्ही कुठेही मधेच तुमचा प्रतिसाद खुपसू शकता हे अशा फोरमचं अडव्हांटेज आहे. हेच प्रत्यक्ष बोलणं चाललं असतं तर मी बावरून साईडला उभा राहिलो असतो. आपल्यासारख्या तटस्थाचं मनोरंजन व्हावं असाच उद्देश ठेवून मी लिहित असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिगी
च
चौकटराजा Sun, 01/21/2018 - 12:45 नवीन
न हि द्न्यानेन सदृशं पवित्रं ए विदयते - आवडले श्रद्धावान लाभते ज्ञानं - न आवड्लेले आता खरे तर काहीही लिहिणार नव्हतो तरीही - जून महीना आहे. पश्चीम भारतात एक जागी चार जण बसलेले आहेत . चारही जन तापल्या उन्हात बसलेले आहेत . आकाशात एक ही ढग नाही . शुद्ध तर्क वाला - ( अॅण्ड आणि ऑर गेट चा फरक समजणारा ) - अहो तीच्र ताप आहे तरीही अचानक ढग येणे ५० टक्के शक्य आहेच ना ! विश्वास वाला - जून आहे , प भारत आहे उन असले म्हणून काय झाले पाउस येइल . अभ्यास वाला -माझा मोबाईल सांगतोय ढग अगदी मुंबई पर्यंत सरकत आहेत इतर घटक जुळले तर पाउस पडेल . श्रद्धा वाला - निसर्ग ( देव शब्द मुद्धाम काटला आहे ) इतका निर्दय नक्कीचं नाही . पाउस जरूर पडेल . असो सूद्न्यास अधिक काय सांगावे ?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा