Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

यातून मार्ग काय?

उ
उपयोजक
Tue, 06/25/2019 - 19:11
🗣 111 प्रतिसाद
ही पोस्ट फेसबुकवरुन घेतली आहे.पोस्ट लिहिणारे लेखक व्यवसायानं पत्रकार आहेत.त्यांनी खेडेगावे,छोटी शहरे इथे कामानिमित्त फिरताना आलेला अनुभव मांडला आहे. तो एमकॉम झाला.मोठ्या मुश्किलीनं नोकरीला लागला.एका पतसंस्थेत महिना सात हजार पगारावर मॅनेजर म्हणून काम करतोय.त्याच्या कामाचं स्वरूप आहे,हरकाम्या. दुसरा ...तो एम.ए.बी.एड्.झाला.दहा वर्षांपूर्वी एका संस्थाचालकाला दहा लाख रूपये देऊन तो शिक्षक बनला.दहा वर्षे झाली खिशातनं पेट्रोल घालून त्यानं शाळा केली.उरलेल्या वेळेत पानपट्टी चालवली म्हणून त्याचं घर भागलं.आता त्यांची शाळा २५ टक्के अनुदानात आलीय.त्याच्या आयुष्यातला उमेदीचा काळ फुकट नोकरी करण्यात गेला.तरीही तो खूष आहे.पंधराव्या वर्षी का होईना,त्याला पूर्ण पगार मिळेल... अशी उदाहरणं आजुबाजूला कितीतरी आहेत. तोंडावर कसलीच रया नसलेले पण आपण कोणीतरी आहोत असा समज करून जगणारे तरूण सगळीकडे दिसतात.तोंडात काहीतरी मचमच चालू असलेले... कोणी एम.ए.,कोणी बी.ए.,बी.एड.,डी.एड.तर कोणी पॉलिटेक्निक तर कोणी बी.ई.झालेले.असे तरूण गावोगाव शेकड्यांनी आहेत.अपवाद वगळले तर, सगळेच व्यसनाच्या आधिन.तंबाखु, गुटखा,सिगारेट,गांजा,दारू यातच यांचा दिवस जातो.ज्यांच्या बापांची आर्थिक स्थिती चांगली आहे,ती पोरं बापाच्या जीवावर मजा करताहेत... मजा म्हणजे काय तर हेच गुटखा,गांजा,दारू.... ही पोरं काहीच काम करीत नाहीत.या सगळ्यांना त्यांच्या डिग्रीप्रमाणं सरकारी नोकरी हवीय..ती मिळणं शक्यचं नाही.शेतीकडं यावं अशी स्थिती नाही.शिवाय इथं ढोर मेहनत करावी लागते. त्यामुळं ही पोरं आयुष्यभर अशीच जगतील...बेकार हा शिक्का कपाळी घेऊन मरतील.माझ्या समोर गावात तिशीच्या आतील सात-आठ तरूण दारू पिऊन मेली... ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे,त्या मुलांची लग्न झालीत.त्यांना लेकरं झालीत...त्यांचं जीवीतकार्य संपलं.वंशाला दिवा लागला. ज्यांची आर्थिक स्थिती बेताची त्यांची लग्न रखडलीत.लग्न हाच त्यांच्या चिंतेचा विषय.ती चिंता विसरायला गांजा आणि दारू हेच औषध. ग्रामीण भागात शारीरिक कष्टाची कामं सोडली तर,दुसरी कुठलीच कामं नाहीत.या पोरांची अशी कामं करण्याची क्षमता नाही, इच्छाशक्तीही नाही.ही पोरं म्हणजे बापांसाठी ब्याद आहेत.धरलं की चावतयं,सोडलं की पळतयं,अशी बापांची अवस्था आहे.सगळे बाप कदरून गेलेत.माझ्या एका मित्रानं, व्यसनी पोराच्या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी,त्याच्या खुनाचा घाट घातला होता.ऐनवेळी रिक्षावाला तयार झाला नाही म्हणून तो प्लान अंमलात आला नाही.मित्रानं स्वत: हा किस्सा सांगितला,तेव्हा मी हादरून गेलो.परिस्थितीनं गांजून गेला की, माणूस किती टोकाला जाऊ शकतो,यांचं हे उदाहरण. सडकेवर पानटपरी वा बार परिसरात रेंगाळणाऱ्या कोणाही पोराला म्हणा,काहीतरी करायला हवं रे बाळ... तो म्हणतो,काय करू ते सांगा काका?...यांचं उत्तर ना माझ्याकडं आहे, बापाजवळ आहे ना आणखी कोणाकडं. छोट्या-छोट्या गावात पावलापावलावर चहाच्या टपऱ्या,पानपट्ट्या आहेत.त्यातील काहींचं बरं चाललंय.अनेकांना नीट रोजगारही मिळत नाही...अशा स्थितीत चहाची टपरी टाक असा सल्ला कसा द्यायचा? कोणत्याही व्यापाऱ्याला,दुकानदाराला बोला,तो म्हणतो,गिऱ्हाईकचं नाही.मालाला उठाव नाही.अनेकांनी नोकर कमी केलेत.नवा एकही रोजगार नाही.असं एकही क्षेत्र नाही,जिथं या पदवीधारकांना संधी आहे.. कारकुनी कामंच राहिली नाहीत.सगळीकडं ठप्प आहे. तरीही देशभरात दरवर्षी लाखो,करोडो मुलं दहावी,बारावी,पदवी, पदव्यूत्तर ची कागदं घेऊन बाहेर पडताहेत.सगळ्यांना माहित आहे,नोकरी मिळणार नाही.तरीही प्रत्येकजण नोकरीसाठीच शिकतोय.या शिक्षणातून त्याला कुठलं तंत्र अवगत होत नाही ,कुठली कला येत नाही की, व्यावहारिक शहाणपण. निर्माण होतो तो अहंगंड....आपण कोणीतरी आहोत...यात रमायला आहे मोबाईल डाटा आणि दारू,गांजा.तो यांना वास्तवाची कधीच जाणीव करून देत नाही.आपलं भवितव्य काय? यांचं कोणाकडंच उत्तर नाही.तरीही समाजात सगळं काही सुरळीत सुरू आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर,मी परवा पतसंस्थेतल्या त्या एम.कॉम.मित्राला सहज भेटलो.तो बोलला,बाकी काही असो बघा, देशाला मजबूत सरकार मिळालं ...तेवढं काश्मीरचं ३७० कलम हटविलं अन् समान नागरी कायदा आणला की,देशाची गाडी रूळावर येईल.मोदीला तेवढ्या साठीच तर मी मतदान केलोय... मी एका वाक्यानंही त्याचा प्रतिवाद केला नाही.त्याच्या आयुष्यात आता यापेक्षा अधिक चांगलं काही घडण्याची शक्यता नाही.काल्पनिक शत्रूंशी लढण्यातच तो अच्छे दिन चे अनुभव घेणार,असं दिसतयं.साक्षात ब्रम्हदेव त्याला समजावायला आला तरी,त्याच्या विचारात बदल होणार नाही.... देशाचं भवितव्य आता लिहलं गेलयं... सध्या फक्त वाट बघायची... लोक भावनेवरून भाकरीवर कधी येतात त्यांची.. महारुद्र मंगनाळे ------------------------------------------------------ ------------------------------------------------------ आता यातल्या काही मुद्दयावर माझी मतं मांडतो.ती १००% बरोबरच आहेत असा दावा नाहीये. सात हजार पगारावर मॅनेजर म्हणून काम करतोय.त्याच्या कामाचं स्वरूप आहे,हरकाम्या. एम कॉम होऊनही सात हजाराच्या वर पगार देऊ नये इतपत सदर इसमाची पात्रता असेल तर याला किती गोष्टी जबाबदार आहेत पहा. आपला कल कॉमर्सकडे नाही हे याला स्वत:लाही समजलं नाहीये.किंवा याला एम कॉम होईपर्यंत कुणी सांगितलेलंही दिसत नाही.किंवा सांगितलं असलं तरी याने दुर्लक्ष केलं.आता ते दुर्लक्ष का केलं? तर आपला कल नेमका कुठं आहे हे सांगणारी सक्षम यंत्रणा,सोय सदर व्यक्ती इयत्ता १० वी पास झाल्यानंतर त्याच्यापर्यंत पोहचली नसावी किंवा हा त्या सुविधेपर्यंत पोहचला नसावा.खेडेगावातला १० वी झालेला मुलगा किंवा त्याचे पालक आपण पुढील करियरचा निर्णय कलचाचणी देऊन घ्यायला पाहिजे इतके जागृत असतात का? बरं कलचाचण्या तरी कितपत विश्वासार्ह असतात ते खालील लिंकमधे वाचा.त्यामुळे त्यावर किती अवलंबून रहावं हा ही प्रश्न आहेच. https://www.loksatta.com/chaturang-news/aptitude-test-180674/lite/ या सगळ्यांना त्यांच्या डिग्रीप्रमाणं सरकारी नोकरी हवीय..ती मिळणं शक्यच नाही. मान्य! सरकारी नोकरी सगळ्यांना मिळणारंच नाही.पण सरकारी नोकरीत 'असं काहीतरी' नक्की असावं ज्यामुळे ही अपेक्षा होत असावी.नाही का? सरकारी नोकरी असली की लग्न पटकन होतं.(अपवाद क्षमस्व!) शासकीय नोकरीमुळे स्थिरता,आर्थिक सुरक्षितता त्या अनुषंगाने येणारं चांगलं मानसिक स्वास्थ्य हे सुद्धा फायदे आहेतच की! ते कसे नाकारणार? की चांगलं मानसिक स्वास्थ्य ही गोष्ट तितकी महत्त्वाची नाहीये? खाजगी नोकरीत इतकं मानसिक स्वास्थ्य असतं का? सरकारी नोकरीइतकी सुरक्षितता,स्थिरता असते का?कधीही निरोप दिला जाण्याची शक्यता खाजगी नोकरीत अधिक नाही का? किमान वेजेसचा नियम कारखान्यांमधे पाळला जातो का? स्वत:चा व्यवसाय हा सुद्धा मार्ग आहे पण सुरु केलेला प्रत्येक व्यवसाय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतो का? व्यवसाय करणं इतकं सोपं असतं का? शिवाय लग्न हा मुद्दा लक्षात घेता छोट्या व्यवसायिकाच्या तुलनेत वरच्या पदावरचा सरकारी नोकरदार मुलीच्या आईवडिलांना जास्त भावला तर ते चूक कसं? खाजगी नोकरीतही किरकोळ पगाराच्या नोकर्‍या भरपूर उपलब्ध आहेत.पण चांगल्या किंवा जास्त पगाराची अपेक्षा ठेवणं हे चूक कसं? तितका पगार देण्याइतपत घेतलेल्या उच्च शिक्षणात 'दम' नसेल तर असे अभ्यासक्रम सुधारणं किंवा बंद करणं ही शासनाची जबाबदारी नाही का? हेच अभ्यासक्रम मोठ्या शहरातल्या टॉपच्या संस्थेतून पूर्ण केल्याने चांगल्या नोकरीची हमी मिळते.पण अशा संस्थांनाही विद्यार्थी संख्येचे बंधन असतेच.सगळेच तिथे शिकायला जाऊ शकत नाहीत.शिवाय काही धनदांडगे लोक पैशाच्या जोरावर आपल्या 'सुमार बुद्धीच्या' पाल्यासाठी सीटस विकत घेण्याची शक्यताही आहेच.सर्वांना हे शक्यही नाही आणि समाजविघातकही आहेच. मग यातून बोध काय घ्यावा? खेड्यातल्या,छोट्या शहरातल्या लोकांनी,गरीबांनी अशा दर्जेदार,नामांकित संस्थामधून शिक्षण घेण्याचा विचार सोडून द्यावा का?पण महागाई मात्र सगळ्यांना समान आहे.त्याचं काय करणार?महागाईला तोंड देऊन चार पैसे खिशात शिल्लक राहणं गरजेचं आहे.समाजाच्या दृष्टीने तुम्ही आर्थिकदृष्ट्या गरीब या कॅटॅगिरीत गेलात की लग्नाबिग्नाचा विचार मनातून काढून टाकण्याशिवाय पर्याय राहत नाही.किंबहूना हेच वास्तव आहे. यावरुन नोकरी सरकारी असली तर चांगलीच पण खाजगी असली तरी ती भरपूर पगारवाली असणं किती गरजेचं आहे हे लक्षात येईल. ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे,त्या मुलांची लग्न झालीत.त्यांना लेकरं झालीत...त्यांचं जीवीतकार्य संपलं.वंशाला दिवा लागला. ज्यांची आर्थिक स्थिती बेताची त्यांची लग्न रखडलीत.लग्न हाच त्यांच्या चिंतेचा विषय. लग्न होणं हीच आयुष्याची 'इतिकर्तव्यता' आहे का? तर हो! बर्‍याचजणांबाबत ती निदान गरज तरी आहे हे तरीे नाकारता येणार नाही.शिवाय यात गैर असं काहीच नाही. सडकेवर पानटपरी वा बार परिसरात रेंगाळणाऱ्या कोणाही पोराला म्हणा,काहीतरी करायला हवं रे बाळ... तो म्हणतो,काय करू ते सांगा काका?...यांचं उत्तर ना माझ्याकडं आहे, बापाजवळ आहे ना आणखी कोणाकडं. छोट्या-छोट्या गावात पावलापावलावर चहाच्या टपऱ्या,पानपट्ट्या आहेत.त्यातील काहींचं बरं चाललंय.अनेकांना नीट रोजगारही मिळत नाही...अशा स्थितीत चहाची टपरी टाक असा सल्ला कसा द्यायचा? कोणत्याही व्यापाऱ्याला,दुकानदाराला बोला,तो म्हणतो,गिऱ्हाईकचं नाही.मालाला उठाव नाही.अनेकांनी नोकर कमी केलेत.नवा एकही रोजगार नाही.असं एकही क्षेत्र नाही,जिथं या पदवीधारकांना संधी आहे.. कारकुनी कामंच राहिली नाहीत.सगळीकडं ठप्प आहे. हे वाचल्यावर केवळ कष्टाची मनापासून तयारी असणं हे सुद्धा तितकं पुरेसं नाहीये हे नीट ध्यानात येईल.बाजारात कामही हवं. तरीही देशभरात दरवर्षी लाखो,करोडो मुलं दहावी,बारावी,पदवी,पदव्यूत्तर ची कागदं घेऊन बाहेर पडताहेत.सगळ्यांना माहित आहे,नोकरी मिळणार नाही.तरीही प्रत्येकजण नोकरीसाठीच शिकतोय.या शिक्षणातून त्याला कुठलं तंत्र अवगत होत नाही ,कुठली कला येत नाही की, व्यावहारिक शहाणपण. निर्माण होतो तो अहंगंड... शिक्षण घेणारे सगळे असेच होतात का स्वभावानं,वृत्तीनं? यात रमायला आहे मोबाईल डाटा. सध्या म्हणे युट्युब हा एक चांगला गुरु आहे.वापर कसा करायचा हे वापरकर्त्यावर अवलंबून आहे. देशाला मजबूत सरकार मिळालं ...तेवढं काश्मीरचं ३७० कलम हटविलं अन् समान नागरी कायदा आणला की,देशाची गाडी रूळावर येईल.मोदीला तेवढ्या साठीच तर मी मतदान केलोय... मी एका वाक्यानंही त्याचा प्रतिवाद केला नाही.त्याच्या आयुष्यात आता यापेक्षा अधिक चांगलं काही घडण्याची शक्यता नाही.काल्पनिक शत्रूंशी लढण्यातच तो अच्छे दिन चे अनुभव घेणार,असं दिसतयं.साक्षात ब्रम्हदेव त्याला समजावायला आला तरी,त्याच्या विचारात बदल होणार नाही.... देशाचं भवितव्य आता लिहलं गेलयं... सध्या फक्त वाट बघायची... लोक भावनेवरून भाकरीवर कधी येतात त्यांची.. यात लेखकानं आपला राजकीय द्वेष व्यक्त केलाय असं मला तरी वाटलं.सध्याच्या अवस्थेला केवळ ५ वर्षांपूर्वी आलेलं सरकारंच तेवढं जबाबदार कसं? हे काही समजलं नाही. शेवटचा राजकीय विद्वेष वगळला तरी परिस्थितीचं वर्णन बर्‍यापैकी वास्तव दर्शवणारं आहे.व्यसंनांचं समर्थन कदापि नाही.तो यातून बाहेर पडायचा मार्ग खचितच नव्हे. प्रत्येकाला पुणे-मुंबई-ठाणे गाठणं शक्य नाही.तिथल्या राहण्याच्या ठिकाणांची भाडी,घरांच्या किंमती पाहता ते कितपत 'परवडेल' हा प्रश्नच आहे.कारण मिळालेला सगळा पैसा घरावरच खर्च होणार असेल तर मुंपुठात येऊन फायदा काय? पण मग यातून मार्ग काय? तिढा सुटावा कसा? मांडा आपापले विचार,आपले अनुभव. _/\_
वर्गीकरण
प्रकटन माहिती चौकशी समाज जीवनमान

प्रतिक्रिया द्या
55220 वाचन

💬 प्रतिसाद (111)
ज
जॉनविक्क Tue, 06/25/2019 - 20:36 नवीन
स्थलांतर करणे हे अत्यावश्यक आहे. बंगळुरात आजही अनेक चांगले जॉब्स फ्रेशर साठी उपलब्ध आहेत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात. सरळ तिकडची वाट धरावी.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 06/25/2019 - 21:23 नवीन
पालकांची जबाबदारी आहे की मुलांना लहानपण पासून सत्य परिस्थिती ची जाणीव करून देणे .मुलांच्या लाडा पाई त्यांना सर्व सुविधा ऐपत नसताना सुद्धा पुरविणे हे चूकच आहे . मुलांना सर्व कामाची सवय हवी कोण तच काम छोट नसते हे त्यांच्या मनात भरवल पाहिजे . BE करताना किंवा तत्सम शिक्षण चालू असताना छोटी मोठी कामे त्यांच्या कडून करून घेतली पाहिजे . अगदी ड्रायव्हिंग शिकणे,लाईट ची fitting करणे,गाड्या दुरुस्त करणे ही काम सुधा यायलाच हवीत. नोकरी जशी हवी तशी नाही मिळाली तर खचून न जाता जगता आल पाहिजे . आणि प्राथमिक गरजा भागतील एवढे पैसे कमविणे आपल्या देशात अवघड नाही . थोर लोकांचे जीवन चरित्र वाचली की निराशावादी विचार येणार नाहीत .मी विठ्ठल कामात चे पुस्तक वाचले होते सर्व वैभव निघून गेल्यावर सुद्धा त्यांनी एअरपोर्ट chya समोर five star hotel उभ करून दाखवले . तेव्हा त्यांच्या खिशात कधी कधी 100 रुपये सुद्धा नसायचे
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar गुरुवार, 06/27/2019 - 10:06 नवीन
पालकांची जबाबदारी आहे की मुलांना लहानपणा पासून सत्य परिस्थिती ची जाणीव करून देणे. हे १०१टक्के खरे आहे, त्याबरोबरच आपल्या देशातील शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल घडवायला हवे आहेत. सरकारी नोकऱ्यांना असलेले वलय हळूहळू कमी होतेय तरी देखील नजीकच्या भविष्यात ते पूर्णपणे नाहीसे होणार नाही. दरवर्षी किमान सव्वा कोटीने वाढणाऱ्या लोकसंख्येला सरकार (कोणत्याही पक्षाचे) रोजगार पुरवू शकेल अशी अपेक्षा ठेवणे हे चुकीचेच आहे. स्वयं रोजगाराच्या दृष्टीने लहानपणापासूनच मुलांचा कल घडवणे आजची गरज आहे. समाजाची मानसिकता बदलण्यास काही वेळ जाईल.... पण त्यासाठी सर्वच स्तरांतून प्रयत्न व्हायला हवेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
ग
गड्डा झब्बू गुरुवार, 06/27/2019 - 10:16 नवीन
विठ्ठल कामत हा बोगस माणूस आहे. एक त्याचा उल्लेख सोडला तर कधी नव्हे ते तुमचा प्रतिसाद पटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
च
चौथा कोनाडा Fri, 06/28/2019 - 10:48 नवीन
या माणसाच्या बोगसपणा बद्दल अर्धवट ऐकण्यात/वाचण्यात आहे. तपशील समजू शकतील का ? आणि त्या माणसाने त्याच्या काळात जर कर्तृत्व करून दाखवले तर त्याचा उल्लेख अस्थानी कसा ? डीएसके यांनी आधीच्या काळात ठसा उमटवला होता !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
आ
आनन्दा Wed, 06/26/2019 - 05:24 नवीन
स्किल आणि अनुभव ही आजच्या जगात सर्वात मोठी शिदोरी आहे. अनुभव नसताना कमी पगाराची नोकरी नाकारणे याच्याइतका करंटेपणा दुसरा काहीही नाही. दिलेले काम जर प्रामाणिकपणे केले, आणि डोळे उघडे ठेवुन केले, तर भविष्य नक्कीच उज्ज्वल असते.
  • Log in or register to post comments
स
सूर्यपुत्र Wed, 06/26/2019 - 08:48 नवीन
१०-१५ लाख रुपये देऊन ४-५ हजाराची नोकरी कुणी का स्विकारत असेल? साधी एफ.डी. जरी केली तर व्याज जास्त मिळेल ना? नोकरी करायची गरज काय? -सूर्यपुत्र.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 06/26/2019 - 09:53 नवीन
अगदीच चार पाच सुरुवातीला असतील पण माझ्याच बघण्यातली दोन उदाहरणे सांगतो. एक जण बर्‍याच अंशी सधन परिवारातला, घरचा चांगला चालणारा धंदा, शेती. तालुकाही नाही अशा गावात बीएससी झाला. एमएसस्सी पण पार पडले. कधीही अभ्यास नावाची चीज केली नाही. एक गुण मात्र जबरदस्त अंगात. कुठे कशाची गरज आहे हे पटकन कळते. येनेकेन्प्रकारेण ते मिळवणारच. एमएसस्सी झाल्यावर बीएड केले. सारे पाठ वगैरे दुसर्‍याकडून करुन घेतले अ‍ॅक्चुअली. पैसे टाकून. परिक्षेतही तेच. बीएड झाले की नोकरीचा थोडासा शोध घेतला. अगदी थोडासा. शेजारच्या गावात एक ज्युनिअर कॉलेज होते. ट्रस्टी समाजातीलच. तरीही १५ लाख मागितले. १० लाख रोख, पाच पगारातून वळती. सुरुवातीला पगार १२ हजार. दर महिन्याला २ च हजार घ्यायचा. आता सर म्हनून स्टेटस आले. शिकलेली, बिएड केलेलीच पोरगी केली. कॉलेजात इतर कामे म्हनजे रजिस्टर, विध्यापीठातला पत्रव्यवहार, इंटरनेटवरुन रिझल्ट आनि इतर प्रक्रीया(ह्यात मात्र तो पहिल्यापासून हुशार), सरकारक्डून काही सोपवलेली कामे जसे की मनकीबातचे प्रसारणासाठी सारी सोय करणे, इ लर्निंग म्हणले की प्रोजेक्टरपासून इतर मटेरिअल अ‍ॅडजस्ट करणे, विद्यापीठातील लोकांना भेटणे अशी कामे हुशारीने करतो. शिक्षकाचे मुख्य काम शिकवणे हे मात्र विचारु नका. सतत इतर उपक्रम राबवत असल्याने (स्नेहसंमेलन, ट्रीप्स, सभा. कॉलेजातील इतर इव्हेंट) मुलांमध्ये प्रिय. सकाळचे कॉलेज असल्याने दुपारी घरी येऊन शांतपणे धंदा सांभाळतो. संस्थाचालकाचा इतका विश्वास की आता तो आगामी उपप्राचार्य आहे. (पीएचडी किंवा एमफीलची तयारी सुरु आहे, ते कसे व्हायचे ह्याची पूर्ण माहिती काढून झाली आहे) सगळे आयोग बियोग लागू होऊन आता महिन्याला ५५ हजाराचे मीटर पडते आहे. त्यामुळे गावात आरामसे भागून एक्स्ट्रा मानमरातब देखील आहे. थोड्याच वर्षात स्वतःची शिक्षणसंस्थाही काढायचा प्लान आहे. दुसरा गरीब घरातला पण अभ्यासात हुशार. फक्त पुस्तकी अभ्यासात. प्युअर पोपट. बाकी जगाचे काडीचेही ज्ञान नाही. एक लांबचे मामा शिक्षणसंस्था चालवायचे त्यांच्याकडे शिकायला राहिला. तोही एमेस्सी बीएड करुन मामाच्या संस्थेत नोकरीला लागला. पैसे द्यावे लागले नाही पण मामाची पोरगी करुन घेतली. तीही बीएड. आता दोघेही नवराबायको संस्थेवर आहेत. नवर्‍याची पीएचडी झाली आहे. दोघांचा मिळून पावणेदोन लाख पगार घरात येतो. तोही अशा गावात की जेथे ५०० रुपयात महिन्याची भाजी मिळते. गव्हरमेंट नोकरी असल्याने कर्जे पटापटा मिळतात, समाजात स्टेटस असते, मुले आदर्श म्हनून पाहतात, राजकारणी लोक जरासे का होईना दबून असतात. ड्युटी अवर थोडे असलेने व सुट्ट्या दाबून असलेने पत्रकारिता, शेती, व्यवसाय अगदी मल्टीलेव्हल मार्केटिंग सारखे धंदे नोकरी सांभाळून सुखनैव करता येतात. काही शिक्षक ही प्रोसीजर न सांभाळता गधामेहनत करत बसतात. शेवटपरयंत शिक्षकच राहतात. पेपर तापासणी, अंतर्गत राजकारण व टोटलच टेन्शन हे फार थोड्या शिक्शकांना असते. बाकी प्रवाहाची दिशा ओळखून आरामसे मार्गक्रमणा करतात. नवीन पिढी घडवायची, संस्कार करायचे, ज्ञानोपासना करत करत ज्ञानाचे दान करायचे असले संस्कार आता कालबाह्य झालेले आहेत. विद्यार्थ्यांना फक्त पास आणि डिग्रीचा शिक्का हवाय त्यासाठी क्लासेस कुठे लावायचे हे चाम्गले माहीत असते पण जोपर्यंत क्लासेस सर्टिफिकेट वाटू शकत नाहीत तोपर्यंत महाविद्यालयांची गरज आहे आणी अशा ठिकाणी नोकरी करणे हे बँकेत एफडी करण्यापेक्षा कधीही चांगला सौदा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूर्यपुत्र
ज
जॉनविक्क Wed, 06/26/2019 - 10:21 नवीन
परंतु हीच व्यवस्था आज सो कॉल्ड पदवीधर तयार करत आहे जे लवकरच नैराश्याने ग्रासून जाणार कारण घेतलेल्या डिग्रीचा उपयोगच नाही, पण पदवीधर आहेत मात्र ढीगभर म्हणून नोकरीच्या बाबतीत नेमके डिमांड कुणालाच नाही, आणि राग पुन्हा व्यवस्थेवर काढायला मोकळे. आपण दोन टोकाची उदा. दिलीत, आपले अनुमानही रास्त आहे पण त्यात एक अभ्यासात हुशार व दुसरा व्यवहारात हुशार आहे. पण यामधील जो वर्ग आहे तो खरा चाचपडत आहे त्याच्या स्व(गुणांचा)चा पुरेसा विकास झालेला नाही आणि त्यासाठी एक व्यवस्था असणे अत्यावश्यक आहे ज्यातून त्यांच्यातील स्पर्धात्मकतेचा सांप्रत स्थिती प्रमाणे बळी जाणार नाही. व्यवस्था विजेते नाहीत तर स्पर्धक निर्माण करण्यात अपयशी ठरत आहे हा मूलभूत प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Wed, 06/26/2019 - 14:43 नवीन
झैरात म्हणाल पण ह्या अधल्या मधल्यांचं काये ते असं आहे बघा. https://www.misalpav.com/node/37424 :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क
R
Rajesh188 Wed, 06/26/2019 - 10:01 नवीन
मी जेव्हा 12 वी ला होतो तेव्हा माझ्या वर्गातील मुलगा महाराष्ट्रात 25 वा आला होता . पण व्यवहारिक विचार करून पुढे शिकण्याचा विचार सोडून दिला आणि घरच्या उद्योगात लक्ष घातले . डॉक्टर होण्यासाठी 25 लाख खर्च करण्या पेक्षा तेच पैसे उद्योगात लावले तर जास्त return मिळतील हा विचार करून. Kg पासून पूर्ण शिक्षणाचा पैसा save केला तर मला नाही वाटत नोकरीची गरज लागेल
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Wed, 06/26/2019 - 10:59 नवीन
खरंच अापल्या (बीए, बी काॅम, बी एससी) पदव्यांचा उदरनिर्वाहासाठी काय उपयोग अाहे, हा गेल्या कित्येक वर्षांपासून अनेकांना पडलेला प्रश्न अाहे. हे केलेली अनेक मुले लोकसेवा अायोगाच्या परीक्षा देण्यासाठी ३-४ वर्षे घालवतात. पण नंतर निराश होऊन तो विचार सोडून देतात. तोही एक भूलभुलैयाच अाहे. अापली व्यवस्था इतकी सगळ्या बाजूंनी सडली अाहे, की कुठूनही पहा, चांगलं काही हाती लागेल, हे दुर्मिळच. अपवाद अाहेत, पण अगदी तुरळक. प्रश्न मोठा अाहे, हळूहळू सुधारणा होत अाहे, पण भरडले जाणारे अाहेतच.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 06/26/2019 - 17:30 नवीन
तो चौकात उभा होता !.... आजच तिसरा इंटरव्यू दिला होता. इथेही जॉब लागणार पण पगार पुन्हा 12000च सांगितलेला. इंजिनिअरिंग पूर्ण होऊन चार महीने झालेले, पण चांगले पैसे देईल असा जॉब मिळत नव्हता. MBA करावे तर एंट्रेन्सला मार्क कमी. खिशात हात घातला. 20 रु निघाले. एक सिगरेट आणि तीन हेपीडेंट घेऊन चालू लागला. दहावीचे यश , बारावीपर्यंतचे कौतुक आठवत होते. आता किती फाटली तेही कळत होते. गावात शेती बघावी तर इथली चैन सुटत नव्हती. शेवटी वडिलांना फोन लावला , "पप्पा मी MPSC ट्राय करणार आहे." बापाला पोरगं क्लास वन ऑफीसर होण्याचे स्वप्न पडले आणि पोराला तीन वर्ष कमवण्याच्या कटकटीतून सुटका ! आता तो क्लास शोधतोय आणि विश्वास नांगरे पाटलांच भाषण ऐकतोय !.... लागला हा पण लाईनीत. .. अक्षय राजगे यांच्या वॉलवरुन साभार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
स
स्वधर्म Mon, 07/01/2019 - 15:35 नवीन
हे पर्यायच मला कळत नाहीत. केवळ मल्टी अाॅप्शन प्रश्न सोडवता अाले, म्हणून एखादा सरकारी नोकरीत थेट साहेब होणे, गाडी, ड्रायव्हर, बंगला, घरकामाला माणूस हे ३०-३५ व्या वर्षी अचानक मिळणे, हे खरंच काय अाहे? त्या माणसाकडे बौध्दिक क्षमता, स्मरणशक्ती नक्कीच वरचढ अाहे, पण त्याच्यात अाणि इतरांच्यात ईतका फरक अाहे का? इतर कुठल्या देशात असं असतं का? जाणकारांनी प्रकाश टाकावा. एमपीएससी, युपीएससी चा अभ्यास करणार्या ९९% मुलांना फक्त याच गोष्टींचं अाकर्षण असतं, म्हणून ते हा मार्ग निवडतात असे मत बनलेले अाहे. लोकांची सेवा वगैरे सगळं नंतर सांगतात. १% असतीलही प्रामाणिक. दुसरे म्हणजे सरकारी नोकराला कमी करणे, कितीही गुन्हा केला तरी अत्यंत अवघड असते, हे पण अाणखी एक कारण अाहे या अाकर्षणाचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
क
कंजूस Wed, 06/26/2019 - 15:04 नवीन
पैसे मिळवणे म्हणजे आपल्याकडची एखादी गोष्ट विकायची, सेवा द्यायची. कोणत्या गोष्टीला सध्या बाजारात मागणी आहे आणि ते आवाक्यात आहे का हे पाहावे. उगाच रड काढण्यात काही उपयोग नाही.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 06/26/2019 - 15:05 नवीन
सर्वाना सरकारी नोकरीच हवी आहे आणि त्या साठी आरक्षण सुद्धा परंतु वस्तुस्थिती कुणालाच जाणून घ्यायची नाही. १९९६ साली आपली लोकसंख्या होती ९७ कोटी २००१ साली आपली लोकसंख्या होती १०७ कोटी म्हणजे २०१४ ते २०१९ या ५ वर्षात भारताच्या लोकसन्ख्येत १८ वर्षापेक्षा जास्त अशा १० कोटी लोकांची वाढ झाली. केंद्र राज्य आणि स्थानीक स्वराज्य संस्था असे मिळून भारतात सरकारी नोकर आहेत २.२५ कोटी. म्हणजे १०० % सरकारी नोकरांना नोकरीतून काढून टाकले तरी (७. ७५) पावणे आठ कोटी तरुणांना रोजगार देणे सरकार ला शक्य नाही. पण प्रत्येकाला सरकारी नोकरीच हवी आहे आणि त्यासाठी आरक्षण सुद्धा. मेरा भारत महान
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Wed, 06/26/2019 - 15:44 नवीन
हो हवीच आहे कारण जागा कितीही कमीजास्त असोत... प्रत्यक्ष Administration हे सरकारी नोकरांच्या हातीच असते. म्हणूनच या नोकरीची किंमत कधीच कमी होत नाही रिगार्डलेस ऑफ तुम्ही कर्मचारी म्हणून कोणत्या हुद्यावर आहात. आणि अर्थातच सरकारी नोकरी म्हणजे सर्वस्व न्हवे. तरीही त्याचे मोल, योगदान फार मोठे आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 06/26/2019 - 16:35 नवीन
प्रत्येकाला सुंदर बायकोच पाहिजे आहे. पण आपली लायकी काय आणि आपल्याला मिळण्याची शक्यता किती हे गृहीत न धरता अपेक्षा केली तर पदरात निराशा सोडून काय पडेल. दर वर्षी जर ३ % सरकारी नोकर निवृत्त होत असतील तर एकंदर भारत भर नोकऱ्या किती उपलब्ध होणार? सात ते आठ लाख आणि १० कोटी गरजू तरुण असतील तर १००० पैकी फार तर ७० ते ८० तरुणांना नोकरी मिळणार आहे. बाकीच्या ९२० तरुणांनी हा विचार करायला नको का? जो उठतो तो विश्वास नांगरे पाटलांनी सांगितलंय म्हणून लोकसेवा आयोगाच्या वाऱ्या करत राहिला तरी काय होणार आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क
ज
जॉनविक्क Wed, 06/26/2019 - 17:26 नवीन
जे लायक आहेत त्यांच्यातल्याच मारामारीचा विचार सुन्न करत आहे, जे अपात्र आहेत (आणी संख्येने बरेच) त्यांचेबाबत तर विचारही करवत नाही. :( असो, मी फक्त सरकारी नोकरी महत्वाची का, तेथे मी अथवा माझ्यातलाच कोणी का असावा असे सर्वाना वाटते याबाबत उहापोह केला आहे. मला स्वतःला अमर्याद व स्पर्धात्मक असे खाजगी क्षेत्र जास्त भावते कारण तो माझा पिंड आहे. मी एक महिनाही सरकारी कर्मचारी म्हणून समाधानाने काम करू शकणार नाही हे माझ्या अल्पमतीचे वास्तव. त्यापलीकडे काहीही नाही. बाकी मला सर्वकाही यशस्वी घडवणारी व्यवस्था अभिप्रेतच नाही मला अशी व्यवस्था असावी वाटते जी कोणाची किमान उमेद खच्ची करणार नाही. माणूस सुखी उमेद जीवन्त आहे तो पर्यंतच असतो यशापयश आणि सुख ही सर्वस्वी वेगळी बाब आहे ज्याला अनेक कांगोरे असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अभ्या.. Wed, 06/26/2019 - 17:34 नवीन
मला सर्वकाही यशस्वी घडवणारी व्यवस्था अभिप्रेतच नाही मला अशी व्यवस्था असावी वाटते जी कोणाची किमान उमेद खच्ची करणार नाही. माणूस सुखी उमेद जीवन्त आहे तो पर्यंतच असतो यशापयश आणि सुख ही सर्वस्वी वेगळी बाब आहे ज्याला अनेक कांगोरे असतात.
हजारो वेळा सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क
स
सुबोध खरे गुरुवार, 06/27/2019 - 06:35 नवीन
मी फक्त सरकारी नोकरी महत्वाची का साडे अठरा वर्षे श्रेणी १ राजपत्रित अधिकारी म्हणून उच्च पदस्थ सरकारी नोकरी करून ती सोडून ४ वर्षे कॉर्पोरेट जगात काम करून गेली १० वर्षे स्वतःचा व्यवसाय करीत आहे. एवढ्या अनुभवामुळे जी वस्तुस्थिती आहे ती मांडली आहे. आजकाल दहावीत ९०% पेक्षा जास्त गुण मिळवणे फार सोपे झाले आहे.( ज्याला पूर्वी ६० % मिळत असत त्याला आजकाल ९० % मिळू लागले आहेत) यामुळे प्रत्येक मुलाला आणि आईबापाला आपण/ आपले मूल फार प्रज्ञावंत आहे असा साक्षात्कार होतो सी बी एस इ मध्ये २०१८ ला सव्वा लाख मुलांना ९० % च्या वर गुण मिळाले https://www.businesstoday.in/latest/trends/cbse-class-10-results-declared-class-10-board-exam-results-cbse-nic-in/story/277952.html महाराष्ट्र राज्य बोर्डात ६३ हजाराच्या वर मुलांना ९० % च्या वर गुण मिळाले. https://www.hindustantimes.com/education/maharashtra-ssc-result-2018-pass-percentage-slightly-up-as-more-students-score-above-90/story-0Af11uZDLPkVqWHqY9s7aO.html अशीच स्थिती इतर राज्यांची आणि ICSE बोर्डाची आहे. असे एकंदर ७-८ लाख विद्यार्थी भारतात दर वर्षी शिक्षणाच्या बाजारात उतरतात. अशा लाखो गुणवंत प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना (आणि त्यांच्या पालकांना) आपल्याला मग कमीत कमी आय आय टी किंवा एम्स मध्ये तरी प्रवेश मिळणारच असे वाटू लागते.त्यांच्या स्वप्नांच्या महालाचे भाडे वसूल करणाऱ्यासाठी भरपूर क्लासेस उपलब्ध आहेतच. खुल्या प्रवर्गाला "भारतभर" एम्स च्या ६१२ जागा आहेत. आय आय टी मध्ये "लोकप्रिय" विषयांच्या साधारण २५०० जागा आहेत. महाराष्ट्रात खुल्या प्रवर्गाला एकंदर सरकारी मेडिकलला १२०० जागा आहेत. हे क्लास वाले मग विश्वास नांगरे पाटलांसारख्या लोकांच्या नावाचा फायदा उठवून व्हॉट्स अँप वर ढकलपत्रे पाठवत राहतात. मग ही मुले ज्यांना "आय आय टी /एम्स मिळालेले नसते" ती दोन तीन चार वर्षे राष्ट्रीय किंवा स्थानीक लोकसेवा आयोगाच्या वाऱ्या करीत राहतात. आपली लायकी काय आहे?कुवत किती? आपल्याला याची आवड आहे का? हा विचार न करता अशी तरुण मुले धाव धाव करत उरी फुटताना पाहून फार त्रास होतो. एक वर्ष मेडिकल प्रवेशाच्या क्लास मध्ये शिकवून हि गोष्ट मी माझ्या डोळ्यांनी पहिली आहे आणि त्याचा त्रास होतो म्हणून तेथे शिकवणे सोडून मी माझ्या मूळ वैद्यकीय व्यवसायात पडलो (आणि अतिशय सुखी आहे).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/27/2019 - 06:43 नवीन
+१ CBSE gave 56 ‘extra’ marks in Class XII boards सगळ्यांना सरसकट जास्तीचे ५६ गुण देणे हा प्रकार अनाकलनिय आहे. हा प्रकार अनेक वर्षे चालू आहे असे या बातमीत लिहिले आहे. परिक्षेत तृटी असली तर परिक्षेची प्रक्रिया सुधारायची की सगळ्या मुलांना सरसकट गुणांची भेट द्यायची ???!!! (कपाळावर हात मारणारी स्मायली)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ज
जॉनविक्क गुरुवार, 06/27/2019 - 14:26 नवीन
क्लास च्या मार्केटिंग ला बळी न पडणे हा आपणास सध्याच्या बेरोजगारीच्या समस्येवर यथोचित उपाय आहे असे वाटते. असेल असेल, मलाच हे समजायला जड जात असेल, पण प्रयत्न नक्की करून बघेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ज
जॉनविक्क गुरुवार, 06/27/2019 - 14:34 नवीन
कारण आपण सरकारी नोकरीच्या मृगजळा मागे धावणाऱ्यांचे वास्तव विषद करत आहात व योग्य बोलत आहात. आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क
R
Rajesh188 गुरुवार, 06/27/2019 - 10:33 नवीन
ह्या वर एक गमती दार खरा घडलेला किस्सा आठवला. माझा मित्र होता नुकतंच डॉक्टर ची पदवी घेवून बाहेर पडलेला . त्याला सुंदर बायको हवी होती गोरी ,उंच,लांब केस असलेली आणि नोकरी सुद्धा करणारी आणि घर सुद्धा सांभाळणारी. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ९६ कुळी. पाहिले एक वर्ष खूप मुली बघितल्या पण सर्व अटींची पूर्तता करणारी मुलगी मिळाली नाही .दुसऱ्या वर्षी एक अट कमी केली तरी मुलगी मिळाली . अशी ५ वर्ष गेली प्रत्येक वर्षी एक अट कमी होत गेली आणि शेवटी बायको ही फक्त स्त्री असावी एवढी एकच अट शिल्लक राहिली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मराठी कथालेखक Wed, 06/26/2019 - 16:01 नवीन
बी कॉमला काहीच भविष्य नाही असे मला वाटत नाही. बी कॉम, एम कॉम करुन अकाउंटिंग क्षेत्रात काम करता येते, SAP , Tally यावर काम करता येते. मी IT professional आहे, आमच्या कंपनीत finance division मध्ये असे लोक SAP वर काम करतात. आमचे invoices (म्हणजे आमच्या ग्राहकांप्रति) वगैरे बनवणं ही कामे करतात. इतरही काही गोष्टींवर कॉमर्सचे लोक काम करतात. किती पगार असतो ते मला माहीत नाही पण पोट भरण्या इतपत नक्कीच असणार. अर्थात अशी चांगली नोकरी करण्याकरिता ज्ञान चांगलं असावं लागतं. नुसताच उत्तीर्ण झालाय पण विषयातलं मुलभूत ज्ञान नाही अशी स्थिती असेल तर कोण नोकरीवर ठेवणार ? तरुणांनी हाती घेतलेलं काम / शिक्षण निष्ठेने करायला हवं. एक उदाहरण देतो. काही वर्षापुर्वी मला एक सरकारी नोकरी मिळाली होती. त्या नोकरीची अट होती की रुजू झाल्यानंतर एक वर्षाच्या आत मी MSCIT ही परीक्षा उत्तीर्ण करणे गरजेचे होते. खरं तर ही नोकरी मिळण्या आधी मी आय टी क्षेत्रात होतो आणि माझे संगणकाचे MS Office ई चे ज्ञान चांगले होते त्यामुळे मला खरंतर MSCIT ची काहीच आवश्यकता नव्हती. पण आता सरकारी अट होती तर ती पुर्ण करणे गरजेचे होते. मग मी एका संस्थेत प्रवेश घेतला. MSCIT चे धडे हे ऑनलाईन आपल्या सोयीच्या वेळेनुसार घेता येतात. मी हे सगळे धडे घेतले.. संस्थाचालकाशी कसलीही सेटिंग करण्याचा प्रयत्नही केला नाही. माझ्या मनात हे पण होते की कदाचित मला आतापर्यंत माहीत नसलेल्या २-५ % गोष्टी जरी शिकायला मिळाल्यात तरी चांगलेच. आणि खरंच सांगतो MSCIT चे धडे अतिशय छान आहेत , सोप्या भाषेत आहेत, प्रत्येक धड्यात assignments आहेत त्या सोडवून आत्मविश्वास वाढतो. यानंतर परीक्षेकरिता मी मला मिळालेल्या तारखेस मला मिळालेल्या केंद्रावर गेलो.. परीक्षा खूपच सोपी वाटली. पण तिथे आलेल्या अनेक मुलांना काहीच येत नव्हते , निव्वळ टवाळकी करत होते ते आणि शेवटच्या काही मिनटांत केंद्रचालकाने त्यांना मदत केली. या मुलांनी MSCIT चे धडे घेतलेच नसावेत हे अगदी स्पष्ट होतं.. फक्त सरकारी नोकरी डोळ्यासमोर ठेवून त्यांना प्रमाणपत्र हवे होते ज्ञानाशी काहीच देणे घेणे नव्हते. अशा मुलांबद्दल का सहानुभूती वाटावी ?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 06/26/2019 - 17:03 नवीन
भारताची लोकसंख्या आज १२५ कोटी chya आसपास आहे त्या मुळे बेरोजगारी खूप प्रमाणात वाढली आहे . आपल्या कडे पहिल्या पिढी मध्ये ५ मुल प्रत्येकाला असायची तेव्हाच कठोर पने लोकसंख्या नियंत्रणात आणायला हवी होती. संजय गांधी नी survat तर केली होती पण त्यांना आंधळा विरोध झाला आणि आता लोकसंख्येचा कडेलोट झाला आहे . तरी सुद्धा बेशरम विचारवंत लोकसंख्या वाढ ही देशाच्या प्रगती ला अनुकूल असले असल्या फालतू थियरी मांडत आहेत .
  • Log in or register to post comments
ह
हणमंतअण्णा शंक… Wed, 06/26/2019 - 18:32 नवीन
https://youtu.be/V7oiro8tYA4 हा शिंपल व्हिडीओ आपल्या ज्ञानात डीचकीभर भर घालेल अशी अपेक्षा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
च
चौथा कोनाडा Wed, 06/26/2019 - 18:12 नवीन
या लेखाला अनुसरूनच ऑटोमेशनबद्दल बोलतो. १. ऑटोमेशन अर्थात स्वयंचलकरण प्रत्येक उद्योगात झालेय, कारखान्यात, बँकांमध्ये, कार्यालयात .... प्रत्येक ठिकाणी. याचा परिणाम असा झालाय, जिथं १० माणसं लागायची तिथं फक्त २ माणसं लागतात. आणखी टाईट केले कि एकात पण भागते. २. लेखात उल्लेखलेला एम कॉम वाल्याची तशी चूक नाही, तो उरलेल्या ८ मध्ये फेकला गेला आहे. जी आहे टी सात हजाराची नोकरी करण्यावाचून त्याला पर्याय नाही. ३. जे तरुण माध्यम बुद्धीचे आहेत म्हणजे (साधारण ७५% ते ८५-८८% वाले हे ज्यांना चांगल्या पैकी पगार मिळायचा व प्रगती व्हायची ते खालच्या वर्गात ढकलले गेले आहेत. ) ४. याचा परिणाम असा होणार आहे कि एवढं शिक्षण, त्यात गुंतवणूक करून योग्य पगाराची नोकरी मिळत नाही म्हणून हे शिक्षण घेणे बंद होणार. हे शिक्षणक्षेत्रातील तीव्र स्पर्धा याने या क्षेत्रात संस्था बंद पडणार, तिथंही बेरोजगारी ! ५. हे सर्वच क्षेत्रात थोड्या फार फरकाने सुरु आहे. ६. या सर्वांना सेवा क्षेत्रातच जावे लागणार जिथं संधी उपलब्ध आहेत. ७. इन्फोसिसचे माजी सीएफओ मोहनदास पै यांनी हाच मुद्दा नुकताच अधोरेखित केला आहे. उत्तम शिक्षण झालेल्या युवकांना फक्त १०-१५ हजार वाल्या नोकर्या कराव्या लागताहेत हे चिंताजनक आहे. बेकारी वाढण्याचे एक कारण आहे. याचा युवा पिढीवर फारच वाईट परिणाम होत आहे. यातून मार्ग काय? ...... अवघड आहे !
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक गुरुवार, 06/27/2019 - 09:51 नवीन
शिक्षणक्षेत्रातील तीव्र स्पर्धा याने या क्षेत्रात संस्था बंद पडणार, तिथंही बेरोजगारी ! सहमत! यामुळेच सध्या शासन पॉलिटेक्निकची जमेल तिथे जाहिरात करतंय.गावागावात पोरांची शोधाशोध सुरु आहे.फि मधे सवलत देतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
च
चौथा कोनाडा Mon, 07/01/2019 - 17:33 नवीन
बरोबर. आता तर पॉलीटेकनिक बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. डिप्लोमा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जेव्हढे पैशे घालावे लागतात त्या प्रमाणात पगार मिळत नाहीत, या यावर्षी आयटीआय जोरात आहेत. हा प्रत्यक्ष वर्किंग जॉब असल्यामुळे नंतर स्वयं-रोजगार देखील करता येईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
आ
आदिजोशी Wed, 06/26/2019 - 18:47 नवीन
आपल्याच मुलांना काय धाड भरली आहे? काही जणांना खरोखर प्रचंड अडचणी असतात. पण, सर्वसाधारणपणे रिकाम्या बसणार्‍या बहुसंख्य लोकांना कमी कष्टात भरपूर पैसा हवा असतो. खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पनांपाई आहेत त्या संधीही घालवून बसतात. एक उदा.: आमच्या एका भावाची अचानक नोकरी गेली. हवी तशी नोकरी मिळेना. मेकॅनिकलची पोरं १२-१५ हजारात येत असल्याने ह्याला पूर्वीइतका पगारही कुणी देईना. शेवटी लोनवर गाडी घेऊन टूरीस्टचा धंदा सुरु केला. लगेच गर्भश्रीमंत झाला नाही पण निदान रस्त्यावर यायला लागलं नाही. वहिनीनेही घरच्याघरी डबे, ट्यूशन, वगैरे करून हातभार लावला. जवळपास ३ वर्षांनी नव्या प्रमोटर्सनी कंपनी पुन्हा चालू केली. शक्य होतं तितक्या सगळ्यांना परत घेतलं. गाडी पुन्हा रुळावर आली तरी वहिनीने सुरु केलेले डबे, ट्यूशन अजूनही चालू ठेवले आहेत. पडेल ते काम करायची तयारी आणि चिकाटी ह्यामुळे संसार वाचला त्यांचा.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 06/26/2019 - 19:56 नवीन
१० वी १२ वी अधीक इंजीनियरिंग य अप्याटर्न ने सगळा गोंधळ केलेला आहे. इंजिनीयर होऊन बक्कळ पगाराची नोकरी आय टी त मिळते या समजामुळे बर्‍याच पिढ्या चुकीचे करीयर निवडून वाया गेलेल्या आहेत. सध्या आय टी ची अवस्था आणि पुढे ऑटोमेशन मुळे होणारी अवस्था पाहिल्यास आय टीतल्या नोकर्‍या कमीकमी च होत जाणार आहेत हे नक्की या सगळ्या बेकार तरुणांना सैन्यात , अर्ध सैनीकी बलात कामे मिळत नाहीत का? की त्याना त्याबद्दल माहितीच नसते.? स्वतःचे उद्योग म्हणजे पानटपरी , चहाचा ठेला एवढेच नसते. अगदी कमी भांडवलात बरेच उद्योग आहेत , इलेक्ट्रीशियन , सुतार , बिल्डींग मेंटेनन्स इत्यादी आणि तत्सम सेवा उद्योगात बिहारी लोक भरपूर कमावतात हे या तरुणाना दिसत नाही का? की अमूक दादा, तमूक साहेब, फलाणा नाना, राजे.... वगैरे पुढार्‍यांच्या मागे मागे करून वय वाया घालवतोय हेही त्यना कळत नाही कधी कधी वाटते की या तरुणाना काहीच करायचे नाहिय्ये. त्याना स्वतःच्या नाकर्तेपणा चे खापर कशावर तरी फोडायचे आहे.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 06/26/2019 - 20:33 नवीन
की अमूक दादा, तमूक साहेब, फलाणा नाना, राजे.... वगैरे पुढार्‍यांच्या मागे मागे करून वय वाया घालवतोय हेही त्यना कळत नाही कधी कधी वाटते की या तरुणाना काहीच करायचे नाहिय्ये. त्याना स्वतःच्या नाकर्तेपणा चे खापर कशावर तरी फोडायचे आहे
अजिबात नाही, असे कितीसे फिरतात राजकारण्यांमागे? फार कमी आहेत. केवळ त्या नेत्याच्या प्रेमाखातर, त्याच्या ग्लॅमरपायी फिरणारे तर फार कमी. टेम्पररी स्वार्थ असतात तेवढे पूर्ण करायला बघतात. आणि खापर बिपर काही नाही, त्या मुळशी पॅटर्न मधल्या बकासुरासारखे होतंय. प्लास्टिक समजा मग. चौथा कोनाडा साह्य्बांनी बोलल्याप्रमाणे सेवा व्यवसायात पैसा आहे आणि पिढी तिकडे डाय्व्हर्ट होतीय. ऑफिस नोकर्‍या नसेनात का, आज डॉमिनोज चा पिझ्झा घरपोह्च मागवला की येणारा हमखास इथलाच कुठलातरी असतो. स्विगी, झोमॅटो चा पार्सल देणारा मुलगा दिवसभर रात्री १२ पर्यंत बाइकवर तंगडत असतो, अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टाच्या डिलिव्हरी देणारी मुले अशीच जळगाव, अमरावती, नांदेड, सोलापूरची असतात. ओला उबरवर गावभर कॅब चालवत फिरणारी मुले उस्मानाबाद, लातूर, परभणीची असतात. कसे का होईना महिना १५-२० हजार कमीतकमी कमावतात. अभिमान वाटतो त्यांचा. घर बसल्या पार्सल मागवणारी पिढी जशी वाढतेय तशी हि सर्व्हिस इंडस्ट्री जोमाने बहरतेय. आज पोलिसांना किंवा तुमच्या सोसायटीला माहित नसेल इतका डेटा त्या डिलिव्हरी बॉइजकडे जमा होतोय. एखादा खरोखर भारी आंत्रप्रुनर असला तर अशा नेटवर्कचा कसला जब्री उपयोग करुन घेऊ शकेल. एव्हाना छोट्या स्तरावर ते सुरुही झालेय. गुगलवाले भले प्रत्येक उपयोगकर्त्याचा डेटा सांभाळत असेल, त्याचा व्यापारी उपयोग करत असेल पण जोपर्यंत ड्रोनने घरात पार्सल येत नाहीये, इलेक्ट्रिक जीपीएस ड्रिव्हन टॅक्स्या सुरु होत नाहीयेत आणि व्हर्चुअल फूड बाजारात येत नाहीये तोपर्यंत सर्व्हिस इंडस्ट्री वाढत जाणारच. बाकी इतर उद्योगात भले प्रप्रांतीय वरचढ होत जातील पण त्यांचीही एक सद्दी असते. काळ बदलेल, पिढी बदलेल पण काळानुसार बदलतील ते तगतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
आ
आनन्दा गुरुवार, 06/27/2019 - 07:21 नवीन
माझ्या एका मित्राने ६ महिने स्विगी चा जोब केला.. केवळ हे शोधायला की कोणत्या भागात कोणत्या पदार्थांची मागणी जास्त आहे.. आता एखादे किचन टाकायचा विचार करतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/27/2019 - 07:26 नवीन
सर्वसामान्य लोक नोकरी मिळवण्यासाठी स्वखर्चाने जोडे झिजवत राहतात. तुमच्या मित्राने कल्पकतेने आपल्या व्यवसायासाठी अत्यावश्यक असलेली माहिती मिळविण्याचे काम करत असतानाच, त्यापासून पैसे कमावण्याची कल्पकता दाखवली आहे. तुमचा मित्र नक्कीच खूप पुढे जाईल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
अ
अभ्या.. गुरुवार, 06/27/2019 - 07:33 नवीन
ज्जे ब्बात. यईच है स्पिरिट. जमाना डेटाबेस चा आहे. जास्तीत जास्त किंमत आता त्यालाच येणार आहे. तुम्ही गुगलसारखे हायफाय सुविधा नका वापरु पण जो डेटा क्रियेटिव्हली कलेक्ट करताहात त्याची किंमत इतकी आहे की गुगलसुध्दा तो पर्चेस करायला पुढे येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
अ
अभ्या.. गुरुवार, 06/27/2019 - 08:03 नवीन
आणि महत्त्वाचे म्हणजे कस्टमरनुसार बेंड व्हायला कंपन्या तयार आहेत. त्यासाठी काही गावठी, दुर्गुण अशा समजल्या जाणार्‍या गोष्टींना पण किंमत असते. किंबहुना त्याच गुणांचा वापर करुन आपले साध्य गाठणारे यशस्वी झालेले पाहिलेत. माझे दोन मित्र सेल्स मध्ये अतिशय हुशार. फक्त भाषा तेवढी घाटी. कितीहि प्रयत्न केला तरी टोन बदलायला तयारच नाहीत. व्यसनेही गायछापसारखी. पण त्याच्या जीवावर कुणाशीही बोलबच्चन करण्यात पटाईत. आटोमोटिव्ह सेल्समध्येच दोघेजण. एकजण टाटा ला. टाटाचे मॅक्सिमम कअस्टमर कॅबवाले(झेस्ट्,इंडिका) नाहीतर पोलिटिकल (सफारी, सुमो). अशे कस्टमर हँडल करायला हा गडी परफेक्ट. दुसरा जेसीबी चे अर्थमुव्हर्स विकतो. हा ही तसाच. कारण त्याचे क्लायंट ही तसेच. दोघांचाही करीअर ग्राफ अगदी चढता आहे हे सांगायला नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
च
चौथा कोनाडा Fri, 06/28/2019 - 10:59 नवीन
+१ असे कितीतरी गावठी वाटणारे पण बोल्ड धडाडीचे सुपरफिट तरुण पाहिलेत ! सध्याच्या काळात असल्या गुणकौशल्याला फार महत्व आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
च
चौकटराजा Sun, 06/30/2019 - 13:39 नवीन
कोणत्याही अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राचा भाग अधिक असणे हे ती अर्थव्यवस्था कधीही धोक्यात येऊ शकते याचे द्योतक आहे . भारताची अर्थव्य वस्था अशीच आहे ! ती फुगलेली आहे. कारण सेवा क्षेत्र माणसाची सोय वाढविते साधन संपत्ती नाही . सध्या फोटो स्टुडिओ या सेवा क्षेत्राची काय अवस्था आहे ? नोकरी गेली बेकारी वाढली की कोण पिझा घरपोच मागवेल ? तसे पहाता उत्पादन क्षेत्र व शेती यातही अतिरिक्त उतपादनाची स्थिति ही वाईटच पण जगात सर्व देशात शेती क्षेत्र विषम पसरल्याने तिथे धोका कमी कारण निर्यातीची शक्यता .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 06/30/2019 - 14:52 नवीन
कोणत्याही अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राचा भाग अधिक असणे हे ती अर्थव्यवस्था कधीही धोक्यात येऊ शकते याचे द्योतक आहे . भारताची अर्थव्य वस्था अशीच आहे ! ती फुगलेली आहे. कारण सेवा क्षेत्र माणसाची सोय वाढविते साधन संपत्ती नाही. खाजगी सेवा आपण तेव्हाच स्विकारतो, जेव्हा आपल्याकडे तिच्यासाठी मोजायचे पैसे असतात आणि/किंवा ते काम करायची आपली इच्छा नसते किंवा ते काम आपण स्वतः करू शकत नाही. सरकारी सेवा बहुदा आवश्यक सेवा असतात आणि त्या जनतेच्या भल्याकडे पाहून निर्माण केल्या जातात. त्याविरुद्ध, सर्व खाजगी सेवा मागणी-आणि-पुरवठा तत्वावरच निर्माण झालेल्या असतात. त्यामुळे, खाजगी सेवा क्षेत्र आपणहून लहान-मोठे होत नाही किंवा करता येत नाही. ते विकास-समृद्धीच्या (पक्षी : जनतेच्या हाती खेळणार्‍या पैश्याचा) बरोबरीने लहान-मोठे होत जाते. उदाहरणार्थ, अमेरिकेतिल "खाजगी सेवाक्षेत्राची" उलाढाल सुमारे युएस$१० ट्रिलियन आहे. हे प्रमाण तेथिल "सकल (उत्पादन + सेवा) खाजगी क्षेत्र उलाढालीच्या (खाजगी जीडीपी)" सुमारे ८०% आहे. (संदर्भ : THE SERVICES SECTOR: HOW BEST TO MEASURE IT?) हाच प्रकार सर्व लहान मोठ्या विकसित देशांत दिसून येईल. त्या मानाने, भारतिय सेवाक्षेत्राचा जीडीपीतिल हिस्सा केवळ ७.३९% आहे (http://statisticstimes.com/economy/sectorwise-gdp-contribution-of-india.php). जसजशी भारतिय अर्थव्यवस्था (आणि दर माणशी उत्पन्न) वाढत जाईल , तसतसा सेवा क्षेत्राचा टक्का वाढत जाईल. इथे हे ल़षात घ्यायला पाहिजे की, अर्थव्यवस्था कितीही वाढली आणि लोकांच्या हाती कितीही जास्त पैसा खेळू लागला तरी, सर्वसामान्य माणसाच्या उत्पादन (घर, गाडी, एसी, फ्रिज, इ) विकत घेण्यावर मर्यादा असते व बहुतेक उत्पादने अनेक वर्षे काम देत राहतात. सेवा क्षेत्राच्या बाबतीत असे होत नाही... दर दिवशी अथवा वर्षातून अनेकदा दर वेळेस नवीन सेवा घेता येते... उदा : रेस्तराँमध्ये जाणे, सहलीला जाणे, मोबाईल सेवा, घरपोच वाणसामान/वस्तू/जेवण मागवणे, घरकाम, देखभाल, इ. त्यामुळे, उत्पादन क्षेत्राला एका ठराविक मुदतीनंतर स्थिरतेला (स्टॅग्नेशन) तोंड द्यावे लागते. ती समस्या सेवा क्षेत्रात लवकर येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
च
चौकटराजा Mon, 07/01/2019 - 14:52 नवीन
उत्पादन क्षेत्राला एका ठराविक मुदतीनंतर स्थिरतेला (स्टॅग्नेशन) तोंड द्यावे लागते. ती समस्या सेवा क्षेत्रात लवकर येत नाही. प्रथम उत्पादन क्षेत्रात संपृक्तता येऊन तेथील रोजगार कमी होईल व नंतर त्याचा परिमाण सेवा क्षेत्रावर होऊन त्यात बेकारी निर्माण होईल हे आपले म्हणणे युक्तच आहे पण उत्पादन स्थिरता हा माणसे कमी करण्याचा एकमेव निकष असत नाही . जीवघेण्या स्पर्धेमुळे अनेक घटकांचे वास्तविकरण करावे लागते त्यात सर्वात महाग घटक म्हणजे मनुष्य बलाचा नंबर प्राधान्याने लागतो .बजाज आटो मध्ये हेच झाले . बाजारात मागणी होती तरी देखील जीवघेण्या स्पर्धेमुळे १९९१ नंतर तिथे मोठ्या प्रमाणावर मनुष्य बळ कमी करून यंत्रे खरेदी करण्यात आली . अर्थ अभ्यासक श्री अच्युत गोडबोले यांचा एक लेख काळ निर्णय नावाच्या दिनदर्शिकेत वाचल्याचे आठवतेय . दहा एक वर्षात बँकेतील फ्रंटऑफिस वर्ग मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात येईल असा त्यांचा कयास आहे . लोकसंख्या वाढल्याने मागणी वाढते व रोजगार ही वाढतो हे सांप्रत खरे आहे भारत देशात .पण यात उत्पादन क्षेत्रात माणसांचा कमीतकमी वापर आज भारत देशात माणुसकी म्हणून एकदम कमी करण्यात येत नाही .१९९४ मध्ये मी खाजगी नोकरीत होतो तेंव्हा आख्खे व्हाउचर प्रिंटर वर नॅ रेशन सकट होत असे. आज २५ वर्षांनी सरकारी बँकेत ते हातानेच लिहिले जाते. आजही प्रत्येक बँकेत पासबुक मशीन नाही .रोजगार टिकविण्याचा प्रयन्त आज तरी होत आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 07/01/2019 - 17:36 नवीन
प्रथम उत्पादन क्षेत्रात संपृक्तता येऊन तेथील रोजगार कमी होईल हे दर वेळेस आणि आता वाटते तेवढ्या तीव्रतेने होईलच असे नाही... इतिहास असे सांगतो कि तसे फार तीव्रतेने आणि किंवा फार काळ होत नाही. अश्या प्रत्येक क्रांतिकारी बदलामुळे, उत्पादन व्यवस्थेवर आणि त्यातील मानवी संसाधनावर परिणाम झालेले आहेत. परंतू, नवीन व्यवस्था नवीन संधी निर्माण करते आणि मानवी कल्पनाशक्ती त्यातून तगून जाण्याचे अनेक (बर्‍याचदा अधिक चांगले) यशस्वी मार्ग काढते असा अनुभव आहे. हे इतिहातात बर्‍याचदा घडलेले आहेत. त्यातील काही महत्वाचे बदल असे म्हणता येतील... १. शिकारी आणि नैसर्गिक स्त्रोतांपासून अन्न गोळा करण्याची (हंटर-गॅदरर) जीवनशैली ---> शेतीव्यवस्थेवर आधारलेली जीवनशैली २. केवळ मानवी आणि/किंवा प्राण्यांची क्रयशक्ती वापरून काम करणे ---> यंत्रे वापरून कामे करणे ३. यांत्रिक क्रांती ---> संगणकिय क्रांती एक क्रमांकाच्या बदलामध्ये झालेल्या विरोध आणि/किंवा काळजीबद्दल लिखित-ऐकीव पुरावे नाहीत. पण, इतर दोन बदलांमध्ये, "आता जुनी कौशल्ये असलेल्या माणसांचे काय? त्यांच्या जीवनाची साधने नाहीशी झाल्यामुले ते बेरोजगार होऊन भुके मरतील अशी मोठी हाकाटी झाली... वेळप्रसंगी ते बदल होऊ नयेत यासाठी जोराचे प्रयत्नही झाले. हा विरोध बहुतांशी, 'अज्ञात भविष्याची काळजी' आणि/किंवा 'जुन्या व्यवस्थेत पक्के झालेल्या हितसंबंधाना बाधा', या कारणांनी होता. नवीन बदलांमुळे होणार्‍या मानवी जीवनाचा विकासामुळे मिळणार्‍या फायद्यांच्या रेटा, त्या विरोधावर नेहमीच मात करत राहीला आहे. तसे झाले आणि ते फायदे दिसू लागले की विरोध करणारे लोकही त्या फायद्यांचा जास्तीत जास्त उपयोग करण्यामागे लागतात ! :) हे एक प्रकारे, निसर्गाच्या निवडीचा (Survival of the fittest) भाग आहे... त्यामध्ये फरक इतकाच की, आता फक्त 'नैसर्गिक बदल' हाच एक घटक न राहता, त्यात 'मानवी बुद्धीने घडवलेले बदल' हा एक घटक सामील झाला आहे... आणि तो दिवसे दिवस जास्त, जास्त सबळ बनत चालला आहे. थोडक्यात, भविष्याबद्दल निराश/नकारात्मक होण्याइतके मानवी बुद्धीला कमी लेखायला नको. तिच्यातल्या लोभ-लालचेमुळे तिने मानवाला अनेकदा अडचणीत आणण्यात आले आहे. मात्र, स्वतःच्या जीवनाबद्दलच्या त्याच लोभ-लालचेने (ज्याला आपण स्वसंरक्षण किंवा self preservation म्हणतो) मानवाला दर वेळेस त्या अडचणींतून बाहेर काढले आहे... किंबहुना, पूर्वीपेक्षा जास्त चांगल्या अवस्थेत आणून सोडलेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
R
Rajesh188 Wed, 06/26/2019 - 20:09 नवीन
मुंबई मध्ये श्रीमंत लोकांच्या घरी नोकर आणि जेवण बनवणारे ह्या नोकऱ्या सुधा खूप उपलब्ध असतात .एक इमारती मध्ये जेवढे फ्लॅट त्याचा तिप्पट नोकऱ्या असतात त्या प्रकारच्या . कमीतकमी पगार १००००/१२००० असतो आणि राहणे आणि जेवण फ्री सर्व ठिकाणी बिहारी तरुण काम करतात . जो पगार मिळतो तो पूर्ण शिल्लक . Maharashtra मध्ये तरुण बेकार फिरतील पण अशा नोकऱ्या करणार नाहीत . लहान मूल म्हणजे नुकतंच जन्म झालेले सांभाळणे साठी ४०००० ते पन्नास हजार पगार मिळतो त्या मध्ये सुद्धा बंगाली आणि गुजराती,मारवाडी स्त्रिया काम करतात पण आपल्या स्त्रिया हे काम करत नाहीत . कमी पना वाटतो
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Sun, 06/30/2019 - 09:21 नवीन
विमाननगर हा पुण्याच्या पूर्वेकडील अलीकडेच 10-15 वर्षांत विकसित झालेला भाग. आय टी कम्पन्या, फिनिक्स मॉल, अनेक हाऊसिंग सोसायट्या असलेल्या या भागात संध्याकाळी फुटपाथवर प्रचंड संख्येने पाणीपुरी, कच्छी दाबेली, डोसा वगैरे खाण्यापिण्याच्या हातगाड्या लागतात आणि खवय्यांची गर्दी ही खूप असते. पण हातगाड्या गाड्या कुणाच्या ? तर बिहारी, राजस्थानी आणि मोमोज बनवणाऱ्या पूर्व भारताकडील तरुणांच्या. खूप मेहनती , त्यामुळे पैसा पण चांगला मिळतो. यात मराठी तरुण कुठे आहे? तो आहे फक्त फ्लेक्स वर. ते बिहारी राजस्थानी तरुण हप्ते देऊन सुद्धा(हप्ते कोण घेतं सांगायची गरज नाही) चांगला व्यवसाय करतात. मध्ये इंटेरिअर करता सुतार शोधत होतो. यच्चयावत सगळी राजस्थानी पोरं आणि खूप स्कील्ड. त्यांना पुण्या मुंबईत बेरोजगारीची समस्या बिलकुल भेडसावताना दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
म
मराठी कथालेखक Sun, 06/30/2019 - 15:44 नवीन
मध्ये इंटेरिअर करता सुतार शोधत होतो. यच्चयावत सगळी राजस्थानी पोरं आणि खूप स्कील्ड.
मी चार वर्षांपुर्वी भिंतीच्या खोबणितले कपाट , ड्रॉवर ई बनवून घेतले होते .. राजस्थानी कारागीर होते. पण ते नीट बनले नव्हते, सांगूनही त्यांना नीट दुरुस्त करता आले नाही. ड्रॉवर्स नीट नसल्याने यथावकाश चॅनेल्स खराब झालेत. कसेबसे वापरत होतो. अलीकडे दुसर्‍या एका राजस्थानी सुताराला दाखवले , या दुस्रुस्तीखेरीज आणखी एक कामपण आहे असे सांगितले. दोन्ही कामाचे मिळून त्याने मला प्रस्तावित खर्च सांगितला तो खूप जास्त वाटला म्हणून त्याला होकार दिला नाही. फक्त दुरुस्तीचे तेवढे काम करण्यास तो तयार नव्हता. नंतर काही दिवसांनी मी urbanclap वरुन सुतार बोलावला. त्याने वाजवी खर्चात माझ्या ड्रॉवर दुरुस्तीचे काम केले. तो कम करत असताना मी बघत होतो.. तो अतिशय मन लावून काम करत होता. जोडणी स्वतःच्या मनासारखी होई पर्यंत तो करत राहिला. म्हणजे 'हे अजून ठीक करा' असे मला सांगावे लागले नाहिच...आणि हा एक मराठी सुतार होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
ब
बबन ताम्बे Sun, 06/30/2019 - 17:16 नवीन
मला मराठी पेंटर, सुतार , गवंडी, बाल्कनीचे ग्रील बनवणारा फॅब्रिकेटर थुका लावणारेच मिळाले. बरं काम दिले या सद्हेतुने की मराठी माणसाने मराठी माणसाला वर आणले पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
न
नाखु Mon, 07/01/2019 - 06:54 नवीन
रंगकाम करणारा आणि घराचे बांधकाम करणरा (मराठी माआसणूस म्हणून आवर्जून मराठी माणसाला दिले) काम अर्धवट सोडून गेले उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागले मनस्ताप झाला तो वेगळाच. अगदी लहान बाळाला संभाळून या रंगार्या लोकांचे चहापाणी घरच्यासारखे केले तरीही साफसफाई न करता जात असत आणि त्यावरूनच बोललं तर राग आला. एकजात मराठी रंगारी आणि बांधकाम क्षेत्रातील कामगारांचे कटू अनुभव घेतले आहेत. चौकात बिडी फुंकत दिवस घालवतील पण तुमचं अक्षरशः अर्ध्या दिवसात होणारे काम करायला तयार होणार नाहीत. घर पहावे बांधून अनुभवी पांढरपेशा मध्यमवर्गीय नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
च
चौकटराजा Mon, 07/01/2019 - 08:58 नवीन
एकूणात मराठी माणूस " बंडल " आहे असा माझा आयुष्यभराचा अनुभव आहे . तरीही गुन्हेगारी मात्र उत्तर भारतीयांत जास्त आहे असाही अनुभव आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ध
धर्मराजमुटके Mon, 07/01/2019 - 15:11 नवीन
थोडक्यात काय तर मराठी माणूस कामात ही मागे आणि गुन्हेगारीतही मागेच ! कुठेतरी पुढे या म्हणावं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा