Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

महाराष्ट्र विधानसभा २०१९, मतदान टक्केवारी

श
शाम भागवत
Tue, 11/19/2019 - 14:58
🗣 176 प्रतिसाद
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक टक्केवारीच्या साहाय्याने मी काही मते बनवायचा विचार करतोय. मात्र "हा म्हणाला", "तो म्हणाला" वगैरे सारखी राजकारणी लोकांची मते मी आधार म्हणून घेणार नाहीये. तर्क करताना कोणतेतरी सांख्यकीय गणित त्यामागे असावे असा उद्देश आहे. राजकीय धाग्यांवर बरीच हुशार लोक भरपूर लिखाण करतात. पण त्यासाठी टिव्ही, वर्तमानपत्रे यातील बातम्या यांचा आधार घेतात. मला वाटते हा आधार घ्यावाच पण तो कोणत्यातरी सांख्यकीय विश्लेषणाच्या साहाय्याने तपासून घ्यायला हवा. आपोआपच बिटवीन द लाईन्स वाचायची कला साध्य होऊ शकेल. तसेच ही माध्यमे आपल्याला शेंडी लावायची शक्यता कमी होऊ शकेल. विधानसभा निवडणूकी बरोबरच टक्केवारीच्या आधारे आपली लोकशाही कुढे चालली आहे त्याबाबत माझे मत मांडायचाही विचार आहे. पण ते कधी जमेल माहीत नाही. किंवा प्रतिसादामध्येच मी त्याबाबत लिहीन. मी एका धाग्यावर माझी मते मांडली होती. तीच परत देत आहे. त्यानंतर काही मतदारसंघांची उदाहरणे देत आहे. यासाठी अल्फाबेटीकली पहिल्या १० मतदारसंघांचा नमुना म्हणून मी अभ्यास केला व त्यातून वेगळे काहीतरी घडत असल्याचे जाणवणारे चार मतदार संघ निवडून त्याचे तक्ते जोडत आहे. याच पध्दतीने इतर जणं पण यात भर घालू शकतील. पण मतदान टक्केवारी व त्यातून निघणारा अन्वयार्थ असे त्याचे स्वरूप असेल तर बर होईल. सगळ्यांनाच एका वेगळया पध्दतीने विचार करायला किंवा शिकायला मिळू शकेल. इतकेच नव्हे तर बातम्यांवर विसंबून न राहता आपणही थोडेफार विश्लेषण करू शकू. राजकारणावरील धागा म्हणजे निव्वळ लाथाळ्या, हे मत बदलले तर अशा प्रकारच्या धाग्यावर अनेक हुशार लोकं भाग घ्यायला लागावीत हा या धाग्या मागचा मुख्य उद्देश आहे. --------------------------------------------- मी 13 Nov 2019 - 11:55 am ला मांडलेली मते पुढे देत आहे. १. मला तरी असेच वाटतेय की, राकाँ व काँग्रेसच्या साहाय्याने मुख्यमंत्री पद मिळवायचे शिवसेनेने अगोदरच ठरवलेले असावे. अन्यथा निवडणूक निकाल लागण्याची प्रक्रिया चालू असतानाच, सर्व पर्याय खुले असण्याची घोषणा झाली नसती. ती घोषणा, एका प्रदीर्घ घटनेतील एक टप्पा असावी असेच माझे मत बनले. शिवसेनेच्या हातात कोणतीच हुकमाची पाने नव्हती हे आता कळल्यावर, शिवसेनेचा आक्रमकपणा पाहून माझे हे मत जास्त पक्का झालंय. मनसे शिवसेनेचा कट्टर शत्रू. त्यालापण शिवसेनेची मते जाताहेत हे जाणवल्यावर माझा हा संशय जास्तच बळावला. हे तपासायला पुण्याचे उदाहरण पुरेसे आहे. अजून लढवलेल्या जागांवरची टक्केवारी जाहीर झाली नाहीये. ती मिळाली असती तर जास्त पुराव्यानिशी माझे मत मांडता आले असते. असो. २. त्यामुळे जिथे भाजपाचा उमेदवार उभा होता तिथे शिवसेनेची बरीच मते राकाँ व काँग्रेसला गेली आहेत. कारण या दोघांचा निवडणूक निकालानंतर पाठिंबा मिळवायचा असेल तर त्यांचे आमदार निवडून आले पाहिजेत ही तर शिवसेनेचीच गरज बनते व भाजपाचे १४४ आमदार होऊ नयेत ही जबाबदारी ठरते. ह्या दोन्ही गोष्टी पवारसाहेबांच्या फायद्याच्या असल्याने त्यांनीही तोंडभरून आश्वासने दिली असणे शक्य आहे. ३. १९६७ पर्यंत काँग्रेसला विरोधकांची भिती वाटत नव्हती. पण लोहियांची विरोधी पक्षांची युती बनवून काँग्रेस विरोधात एकास एक उमेदवार देण्याची नीती यशस्वी होते म्हणाल्यावर, विरोधकांची एकजूट होऊ नये यासाठी डावपेच आखणे हे काँग्रेसचे मुख्य धोरण बनले. त्यानुसारच पवारसाहेब राजकारण करतात व त्यात ते सद्या तरी सर्वात पाराविना आहेत असे वाटते. यावरून महाराष्ट्रात युती भारी पडतेय म्हणाल्यावर त्यात फूट पाडणे हेच आघाडीचे दिर्घकालीनधोरण असणार यात काही संशय नाही. थोडक्यात महाराष्ट्रातील निवडणुकांत काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रित लढणे व शिवसेना व भाजपाने वेगवेगळे लढणे हा एक मार्ग आहे जो आघाडीला सत्तेपर्यंत नेऊ शकतो. जर युती तुटली असेल तर ती फक्त ताणली जात राहील एवढेच फक्त पाहावयाचे आहे व परत जोडली जाऊ नये यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत. त्यासाठी शिवसेनेचे सरकार यावयाची जरूरी नाही. ४. परत निवडणुका झाल्या तर त्या शिवसेना व भाजपाने एकत्रित लढवू नयेत एवढीच आघाडीची इच्छा किंवा ध्येय असावे असे वाटतेय. यासाठी प्रथम राज्य यांना बाजूला केले. या राज्यच त्रासातून शिवसेना खूप मागे खेचली गेली. बाळासाहेबांची पुण्याईही कामी येऊ शकली नाही. त्याचा फायदा त्यांना २०१४ पर्यंत झाला. फोडा व झोडा पध्दतीत नेहमी रागीट माणसाला हाताशी धरले जाते. कारण रागाच्या भरात त्याच्यावर कब्जा मिळवणे सोपे असते. त्यामुळे यावेळी राऊतांद्वारे शिवसेनेला जाळ्यात पकडण्यात आलेय. राऊतांवरचा ऊध्वजींचा विश्वास हे हत्यार वापरले गेलंय. ५. पण मोदी उदयानंतर सगळंच गणित फिसकटायला लागलेय. शिवसेनेच्या बळावर मोठे होण्याची अगतिकता भाजपाची राहिलेली नाही. भाजपचे वाढते बळ त्याचा पुरावा आहे. त्यामुळे परत निवडणुका झाल्या व शिवसेना वेगळी लढली तर त्यांची आघाडीला गेलेली मते परत फिरतील. भाजपकडे या वेळेस इच्छुक जास्त झाले होते व जागा २०१४ पेक्षा कमी झाल्या होत्या. पण परत निवडणुका झाल्यास, लढायच्या जागा १५६ वरून २८८ झाल्यामुळे बंडखोरांचा प्रश्न सुटेल. भाजपातील लाॅयल कार्यकर्ते त्यामुळे खूश झाल्याने पुढच्या निवडणुकीत मतदान टक्केवारी वाढेल, जी शहांची नेहमीचीच रणनीती आहे. ६. जर शिवसेनेने पुढील निवडणुकीत आघाडीशी हात मिळवणी केली तर भाजपाला ते हवेच असेल. धृवीकरण भाजपाला नेहमीच फायद्याचे ठरत आले आहे. काँग्रेस विरोधातील आपला अवकाश शिवसेना आपणहून सोडून देत असेल तर भाजपा नक्कीच खूश होईल. भाजपा यापध्दतीनेच मोठी होत आली आहे. मात्र यासाठी संधीची वाट बघत बसायला लागते व त्यासाठी खूप पेशन्स लागतो. तो मोदी शहांकडे नक्कीच आहे असे वाटते. ७. थोडक्यात, भाजपा, काँग्रेस व राकाँ यांचे पुढील धोरण निव्वळ वेळकाढूपणाचे असेल असे वाटते. यासाठी एखादी कोर्टकेस वगैरे सारखा उपाय योजणे हा मार्ग मस्त. जो काँग्रेस नेहमीच अवलंबते. फक्त कोणाकडे तरी बोट दाखवता आले की झाले. राऊतांनी बोलणी पवारांशी केली. ते आता पवारांकडे बोट दाखवत असतील. पवार बोट दाखवताहेत काँग्रेसकडे. काँग्रेस बोट दाखवतीय केरळ काँग्रेसकडे. ८. पण जास्तीचं काहीही न देता शिवसेना जवळ येत असेल तर भाजपा ही संधी साधेल असं वाटते. दीड दोन महिने फडवणीस संपले संपले असं वाटत असताना परत उभे राहतात, असं बऱ्याच वेळेस झालंय. या वेळेसही हे होऊ शकते. या वेळेसही फडणवीस यांनी समारोपाच्या वेळी युतीच सरकार बनवेल असं म्हणूनच ते थांबले आहेत. ९. असंच होणं योग्य असेल. कारण राजकारणात डाव ओळखून प्रतिडाव टाकावा लागतो. बाकी सगळे गौण याचे भान राखावे लागते. जर युती तुटावी हा डाव असेल तर युती टिकवणे हाच प्रतिडाव असतो. शिवसेना कशी वागली याबाबत सर्वसामान्य भाजपा कार्यकर्त्यांना येणारा राग नेत्यांना पोटात ठेवावा लागतो. भाजप पुढेमागे युती तोडेलही. पण ती सोयीची वेळ ते ठरवतील. पवार साहेबांनी त्यांच्या सोयीने निवडलेली वेळ भाजपाने साधणे शहाणपणाचे ठरणार नाही. अर्थात हे सर्व राजकारणी माझ्यापेक्षा नक्कीच हुशार असणार म्हणा. :) --------------------------------------------------- २०१९ विधानसभेच्या टक्केवारीच्या गमतीजमती १. अक्कलकुवा (1) आघाडी
पक्ष २०१४ २०१९
राष्ट्रवादी २७.७८
काँग्रेस ३६.७९ ४१.२६
एकूण ६४.५७ ४१.२६
युती
पक्ष २०१४ २०१९
शिवसेना ५.९१ ४०.२१
भाजप १८.६८
एकूण २४.५९
इतर दखलपात्र पक्ष
पक्ष २०१४ २०१९
अपक्ष ४.५१ १२.६९
आप २.०२
एकूण ४.५१ १४.७१
२०१४ ला नागेश पडवी यांनी भाजपातर्फे उभे राहून १८.६८% मते मिळवली होती. तर आमश्या पडवी यांना ५.९१% मते मिळाली होती. खरं तर या जागेवर भाजपाने जास्त मते मिळवली असूनही ही जागा शिवसेनेला सोडायला लागली. मागच्या वेळेचा भाजपा उमेदवाराला ऐनवेळी माघार घ्यायला लावल्यावर त्याने चिडून जाऊन बंडखोरी केली. तरीही या वेळेस शिवसेनेला ४०.२१ टक्के मते मिळाली. मतांची ही वाढ आश्चर्यकारकच आहे. खरे तर २०१४ ला राष्ट्रवादी काँग्रेस२७.७८ टक्के व काँग्रेसला ३६.७९ टक्के मते मिळाली होती. म्हणजे आघाडीला एकूण ६४.५७ टक्के मते मिळाली होती. ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली होती व काँग्रेस जिंकणार हे नक्की होते. त्यात परत युतीमध्ये बंडखोरी झालेली. म्हणजे अगदीच एकतर्फी अशी ही लढत होती. पण या वेळेस काँग्रेसला ६४.५७ टक्क्यांच्या ऐवजी फक्त ४१.२६ टक्केच मते मिळाली. म्हणजे युतीकरूनही मागच्या वेळेपेक्षा फक्त ४.४७ टक्के एवढीच वाढ? मग राष्ट्रवादीची २७.७८ टक्कें पैकी ४.४७ काँग्रेसला मिळाली असतील तर राष्ट्रवादीची उरलेली २३.३१ कुढे गेली ????? २०१४ साली शिवसेना व भाजप यांना एकत्रित २४.५९ टक्के मते मिळाली होती. त्यात परत भाजपाचा बंडखोर उभा होता. म्हणजे मते मागल्यावेळेपेक्षा कमी व्ह्यायला पाहिजे होती. पण शिवसेनेला मिळाली चक्क ४०.२१ टक्के. काँग्रेसपेक्षा फक्त १.०५ टक्के कमी. अगदी नशीब बलवत्तर म्हणून ही जागा कॉग्रेसला मिळालेली आहे. निवडणूक निकालानंतरच शिवसेना राष्ट्रवादीजवळ आली असं का समजायचे? ----------------------------------------------------------------------- २. अहमदनगर शहर (225) आघाडी
पक्ष २०१४ २०१९
राष्ट्रवादी २९.७९ ४७.३३
काँग्रेस १६.३३
एकूण ४६.१२ ४७.३३
युती
पक्ष २०१४ २०१९
शिवसेना २७.७९ ४१.१९
भाजप २४.०८
एकूण ५१.८७ ४१.१९
इतर पक्ष
पक्ष २०१४ २०१९
aimim ४.०४
वंचित १.६९
बसप ०.३५ १.७२
एकूण ०.३५ ७.४६
इथे राष्ट्रवादीचा उमेदवार उभा होता. २०१४ ला आघाडीला एकत्रित ४६.१२ टक्के मते होती या वेळेस ती ४७.३३ टक्के झाली. म्हणजे आघाडीचा धर्म काँग्रेसने पाळला असे म्हणावे लागेल. मात्र २०१४ ला युतीला एकत्रित मते ५१.८७ टक्के असताना शिवसेनेला ४१.१९ टक्के मतेच मिळाली आहेत. शिवसेनेला अपेक्षेपेक्षा१०.६८ टक्के मते कमी मिळालेली आहेत. याचा अर्थ भाजपाची २४.०८ टक्के पैकी १०.६८ टक्के मते फुटली आहेत. पण त्याचा दुसरा अर्थ असा की, भाजपाच्या अंदाजे १४ टक्के लोकांनी युती धर्म पाळलेला असावा. २०१४ साली चारही प्रमुख पक्ष एकत्र लढल्यामुळे या चौघांनीच ९७.९९ टक्के मते मिळवली होती. बाकीचे सगळे मिळून २ टक्के होते. त्यात बसपा ५व्या क्रमांकावर होती व तिला ०.३५ टक्के मते होती. मात्र २०१९ साली या सर्व पक्षांना पालवी फुटलेली दिसून येते. याला कारण भाजपाची फुटलेली मते आहेत हे निश्चित होते. याचाच दुसरा अर्थ असा की, भाजपाची मते राष्ट्रवादीकडे गेलेली नाहीत. ------------------------------------------------ ३. अकोला पश्चिम (३०) इथे प्रथमदर्शनी असं वाटतं की काँग्रेसने वंचितशी आघाडी केली असती तर काँग्रेस जिंकली असती. त्यामुळे वंचितचा फायदा भाजपाला झाला अशीच सर्वसाधारण समजूत असते. पण २०१४ ची टक्केवारी पाहिली तर चित्र वेगळेच दिसते. युती
पक्ष २०१४ २०१९ वध/घट
भाजपा ४६.७७ ४३.२३
शिवसेना ७.३९
एकूण ५४.१६ ४३.२३ -१०.९३
आघाडी
पक्ष २०१४ २०१९ वध/घट
काँग्रेस ६.४० ४१.७०
राष्ट्रवादी १८.८५
एकूण ५४.१६ ४३.२३ +१६.४१
बीबीएम व वंचित
पक्ष २०१४ २०१९ वध/घट
बीबीएम १६.७२
वंचीत १२.२१
एकूण १६.७२ १२.२१ -४.४९
शिवसेनेची मते भाजपाला मिळालेली नाहीत तर ती चक्क काँग्रेसला गेलेली दिसत आहेत. (काँग्रेसचा पण पाठिंबा मिळेल असे तोंडी आश्वासन राष्ट्रवादीकडून शिवसेनेला मिळाले होते की काय?) तसेच भाजपाची मतेही ३ टक्के कमी झालेली दिसत आहेत. ही का कमी झाली याचा विचार भाजपाला करावाच लागेल. तर वंचितच्या समावेशामुळे पूर्वीच्या बीबीएमची काही मते (मुख्यत्वेकरून मुस्लिम मते असावीत) काँग्रेसकडे वळलेली दिसत आहेत. याचा अर्थ वंचितमुळे काँग्रेसच फायदाच झालेला दिसून येतो. अन्यथा काँग्रेसची मते ४.४९ टक्क्याने कमी झाली असती. त्यामुळे वंचीत व ओवेसी एकत्र आले तर भाजपाचा फायदा होतो तर वंचीतने ओवेसींची साथ सोडली तर काँग्रेस व राष्ट्रवादीचा फायदा होतो. असाही अर्थ काढता येऊ शकतो. २०१९ ला तरी वंचितमुळे लोकसभेला भाजपाचा व विधानसभेला काँग्रेसचा फायदा झालेला दिसून येतो. काँग्रेसच्या वाढलेल्या १६.४१ टक्के मतांचा असा हिशोब लावता येतो. ------------------------------------- टक्केवारीच्या आधारावरील हायपोथेसीसची उभारणी येथे आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. याच टक्केवारीच्या आधारे बातम्यांचा अर्थ लावता येऊ शकतो. उदाहरणासाठी एका बातमीचा अर्थ लावायचा प्रयत्न करू. लोकसभा निवडणुकांचा निकाल आल्यावर वंचितची आघाडीशी बोलणी चालू असल्याची बातमी आली होती. तसेच वंचितनी ओवेसींचा संबंध सोडल्याचे पण जाहीर केले होते. वंचितने ओवेसींशी संबंध तोडले तरच जागावाटपाबद्दल बोलणी करता येतील अशी एखादी अट आघाडीने वंचितला घातली होती की काय अशी दाट शंका येतीय. त्यानुसार वंचितने ओवेसींशी संबंध तोडल्यावर आघाडीचे काम झाले होते. आता वंचितशी आघाडी करायची जरूरी नव्हती यास्तव त्यानंतर वंचितला फक्त आशेवर ठेवण्यात आले, जेणेकरून वंचितने परत ओवेसींशी संगनमत करू नये. ही फक्त शंका आहे. पण तशीच एखादी गोष्ट परत घडली की दाट शंका येणारच ना? एनडीएशी संबंध तोडले तरच पुढची बोलणी करता येतील अशी अट शिवसेनेला घातली गेली होती. शिवसेनेने पण ती अट पाळण्यासाठी सावंतांना परत बोलावून घेतले. त्यानंतर चर्चेचा घोळ चालू ठेवून शिवसेनेला आशेवर ठेवले. आता भाजपानेच युती तुटली असल्याच जाहीर केल्यावर मात्र सगळंच बदललं आहे. शरद पवारांनी तर स्पष्टच सांगून टाकलंय की, शिवसेनेला सरकार बनवायला पाठिंबा देण्याबाबत त्यांची व सोनियांची अजून चर्चाच झालेली नाही. एक अंदाज असाही आहे की, राष्ट्रवादीला सरकार व्हावं असं वाटतंय. तसे झाले तर राष्ट्रवादी पुढील निवडणुकीपर्यंत आपली ताकद आणखी वाढवू शकेल. तर काँग्रेसला राष्ट्रवादीचा संशय येतोय. निवडणुकी अगोदरच शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये काहीतरी संगनमत झालेले आहे. संगनमत असायला हरकत नाही पण ते संगनमत काँग्रेसच्या मुळावर येत असेल तर काँग्रेसला कसे चालेल. तसे पुरावे मतदान टक्केवारीतून काँग्रेसला मिळाले असावेत. सरकार स्थापन झाले तर आणखी काय काय होईल काय माहीत? मला वाटते यामुळेच युती तुटेपर्यंत सोनियाजी शरदरावांच्या नाटकात काम करत राहिल्या. नंतर मात्र त्यांनी त्यांच्याबाजूने नाटकावर पडदा टाकला. टक्केवारीच्या आधारावरील हायपोथेसीस समाप्त. :)
वर्गीकरण
राजकारण टक्केवारीच्या दृष्टिकोनातून

प्रतिक्रिया द्या
75387 वाचन

💬 प्रतिसाद (176)
श
शाम भागवत Tue, 12/10/2024 - 11:32 नवीन
असू दे हो. मला व चंसूकु यांना बऱ्याच वेळेस अनेक गोष्टी टेबलावर आणण्यास त्यांची मदत झाली आहे. सुबोध खरे पण बऱ्याच वेळेस महत्वाची माहिती पुढे आणत असतात. गुरूजीपण बऱ्याच वेळेस खूप संदर्भ देत असतात. जर काही लोकांनी विरोधाची भूमिका घेतली नसती तर बऱ्याच गोष्टी पुढे आल्या नसत्या. असो.
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
श
शाम भागवत Tue, 12/10/2024 - 11:49 नवीन
@टीपीके, मी अभ्यासासाठी RBI ने 2000 सालापासून प्रकाशित केलेली माहीती घेतली होती. त्यामुळे अगोदरचे कॉंग्रेस + राष्ट्रवादीचे सरकारची कामगिरी पण तुलनेसाठी उपलब्ध होणार होती. तसेच मला सगळे आकडे डॉलरमधे पाहिजे होते. अन्यथा रुपया घसरल्याने कामगिरी सुधारलेली वाटली असती. तो संदेश तुम्हाला इथे पाहता येईल. मविआच्या काळात एफडीआय मधे महाराष्ट्र मागे पडला. याचाच अर्थ जगातील उद्योजक महाराष्ट्रात गुंतवणूक करायला तयार नव्हते कारण त्यांना महाराष्ट्रातले वातावरण उद्योगपूरक वाटत नव्हते. गंमत म्हणजे विरोधक सुध्दा महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग गुजराथेत पळवले असा आरोप करून याला पुष्टीच देत असतात. पण त्या विरोधकांनाही हे कळत नाही की असे बोलून आपणच मविआ सरकारच्या काळात उद्योगपूरक वातावरण नव्हते हे सांगत असतो. असो. ज्यांना कळायचा त्यांना मुद्दा नीट कळेल. मला तेवढेच पाहिजे आहे.
↩ प्रतिसाद: टीपीके
ट
टीपीके Tue, 12/10/2024 - 12:47 नवीन
म्हणजे एकूणच
गुजरातला प्रकल्प पाठवण्या व्यतिरिक्त काहीही दिवे लावले नाहीत
हा फक्त खोटारडेपणा आणि प्रपोगंडा आहे का? खरी परिस्थिती अगदी उलट आहे का?
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत Tue, 12/10/2024 - 13:09 नवीन
२-४ उद्योग नक्कीच गेले. कारण मविआ सरकारने काही हालचालच केली नाही. किंवा विरोध केला. परदेशी उद्योजकाला भेटच नाकारली. कोणते सरकार जास्त सवलती देते त्यावर उद्योजक निर्णय घेतात. इथे व्यावसायिक पघ्दतीनेच उद्योजकांना हाताळायचे असते. उद्धव ठाकरे तिथे कमी पडले. मला बजेटमधलं काही एक कळत नाही हे एका उद्योजकांच्याच बैठकीत उद्धवजी बोलले होते. अंबानीही हसले होते. हे पळवणे वगैरे म्हणणे चुकीचे आहे. पण सर्वसामान्याला सांगायला सोपे जाते म्हणून त्या आधारे केलेले राजकारण आहे.
↩ प्रतिसाद: टीपीके
ट
टीपीके Tue, 12/10/2024 - 13:41 नवीन
अच्छा, म्हणजे हे गुजराथला उद्योग जाणे हे मविआ च्याच काळात झाले तर, म्हणजे या तर चोराच्या उलट्या बोंबा. खरंच फार हिम्मत लागते अशा बोंबा मारायला. ठीक आहे, शेवटी राजकारण म्हंटले की अशी हिम्मत दुर्दैवाने (आपल्या) असायलाच पाहिजे.
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत Tue, 12/10/2024 - 14:05 नवीन
हे सगळे मुद्दे मविआच्या गळ्यात बांधता येतील. पण एवढं सविस्तर ऐकायला सामान्यांना वेळ नसतो किंवा कुवत नसते. सोमीवर मांडायला सोपं सोपं लागतं. उदा. आंतराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (IFSC) म्हणे गुजराथला पळवलं. ही खूप जूनी गोष्ट आहे. मोदींनी मुमं असताना ह्याची योजना गुजराथेत आणली. महाराष्ट्रालाही हे पाहिजे होते. मग मुंबईत उभारणी करायला महाराष्ट्रात परवांगी मिळाली. पण नंतरच्या १५ वर्षात कॉंग्रेस+ राष्ट्रवादीने काही केलंच नाही. मोदींनी मात्र सोडलंनाही. इतकी जुनी गोष्ट आहे ही, जाऊ दे. खणायचं म्हटलं तर बरच खणता येईल. पण त्याचा फारसा उपयोग सर्वसामान्यांना पटवण्यासाठी होणार नाही. शेवटी कष्ट व त्याचा उपयोग हे गणीतही पहायला लागतं. :)
↩ प्रतिसाद: टीपीके
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 12/10/2024 - 13:48 नवीन
कारण मविआ सरकारने काही हालचालच केली नाही. सहमत, वेदांता फॉक्सकॉन पळवल्यावर मविआ चे मामू एकनाथ शिंदेनी सांगितले होते ना? मोदीजी ह्याहून मोठा देणार आहेत म्हणे प्रकल्प?
↩ प्रतिसाद: शाम भागवत
म
मुक्त विहारि Tue, 12/10/2024 - 13:55 नवीन
मनोरंजक प्रतिसाद.... ना शेंडा ना बुडखा....
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 12/10/2024 - 14:11 नवीन
म्हणजे प्रकल्प पळवला असे का?
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Tue, 12/10/2024 - 14:57 नवीन
हे जर समजत असेल तर, प्रकल्प एका राज्यातून दुसऱ्या राज्यात का जातात? किंवा आधीच दुसरे राज्य का निवडतात? हे नक्की समजेल. बाय द वे, तुम्हाला प्रतिसाद देताना, वेळ कसा निघून जातो? तेच कळत नाही. बेड रीडनचे दुःख कमी होते. तुमच्या इतके मनोरंजन तर परमपूज्य राहुल गांधी पण करत नाहीत...
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
स
सुबोध खरे Tue, 12/10/2024 - 14:14 नवीन
टाटा चा एवढा मोठा उद्योग प्रकल्प सिंगूर हुन गुजरात मध्ये का गेला याचे साधे विश्लेषण केले तर लक्षात येते कि सत्तेत असलेल्या माणसाला आपल्या राज्याच्या भविष्याची चिंता असली तरच राज्याचा विकास होतो. जय भवानी टाक खंडणी अशी घोषणा असलेल्या मुखमंत्र्यांकडून उद्योग काय अपेक्षा करणार?
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Tue, 12/10/2024 - 14:59 नवीन
प्रत्येकाला जमतेच असे नाही.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 12/10/2024 - 15:23 नवीन
महाराष्ट्रात मोठे उद्योग यावे म्हणून यांनी नक्की काय केले? उलट अंबानीसारख्या मोठ्या उद्योजकाच्या घरासमोर स्फोटके ठेवायचा कट त्यांच्या काळात मुंबई पोलिस आयुक्तालयातच शिजला. कोणताही महत्वाचा प्रकल्प येणार असेल तर त्याला हे विरोध करणार- मग तो नाणार प्रकल्प असो, बारसू असो की जैतापूर असो. फडणवीसांनी पहिल्या टर्ममध्ये ज्या महत्वाकांक्षी समृध्दी महामार्गाचे काम सुरू केले त्याला त्यावेळेस यांनी विरोध केला होता. हे सत्तेत आल्यावर (खरं तर अनैतिक मार्गाने सत्ता ढापल्यानंतर) त्यांनी त्या समृध्दी महामार्गाचे नाव हिंहृसम्राट बाठा महामार्ग असे ठेवायचा हलकटपणाही करून दाखवला. मुंबईत मेट्रोलाही विरोधच केला. म्हणजे जिथेतिथे काही चांगले होणार असेल त्याला हे विरोध करणार असतील तरी मग प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले तर उलटी बोंब मारण्यातही पुढे असतात. उबाठासेना नावाचा घाणेरडा प्रकार लवकरात लवकर महाराष्ट्राच्या राजकारणातून पूर्णपणे अस्तंगत व्हायला हवा.
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
श्रिपाद पणशिकर गुरुवार, 11/28/2019 - 09:28 नवीन
"आमच दिया" ऐवजी आमचा दसरा असे वाचावे. *आटुकरेक्ट चा मुडदा बशिवला ;)
श
शाम भागवत गुरुवार, 11/28/2019 - 14:02 नवीन
@जॉनविक्क रोजगार निर्मिती वरील तुम्ही माडलेल्या मुद्यांबाबत. १. भांडवलाचा पुरवठा जेव्हा होतो तेव्हा उद्योगधंदे वाढतात. आपोआप रोजगार वाढतो. भांडवल आकर्षीत करण्यासाठी उद्योगपूरक परिस्थिती असणे आवश्यक असते. ती एका रात्रीत निर्माण करता येत नाही. तसेच उद्योगाला प्रोत्साहित करण्याची दिशा एखाद्या वर्षीच दिसून चालत नाही तर त्यात सातत्य आहे की नाही हेही आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दृष्टीने महत्वाचे असते. त्यामुळे भांडवल आकर्षीत करण्यासाठी सरकारने काय केले हे तपासायला लागते. ह्यासाठी Ease of doing business index चा विचार केला जातो. भारताचे या इन्डेक्स मधले स्थान खालच्या तक्त्यात दिले आहे. तसेच तुलना करण्यासाठी चीनचेही दिले आहे. चीन मधील वाढती गुंतवणूक, वाढता व्यापार, वाढता रोजगार व वाढता जीडीपी व त्यांचा या इंन्डेक्समधील नंबर याचा संबंध पाहिला तरी भारत सरकार कुठे कमी पडत होता ते लक्षात येईल. तसेच वरील तक्त्यावरून २०१४ ते २०१९ पर्यंत सरकारने काय केले ते तपासता येईल. तसेच अगोदरचे सरकार कुठे कमी पडत होते, तेही लक्षात येईल. देश २००९ २०१० २०११ २०१२ २०१३ २०१४ २०१५ २०१६ २०१७ २०१८ २०१९ भारत १३३ १३४ १३२ १३२ १३४ १४२ १३० १३० १०० ७७ ६३ चीन ८९ ८७ ९१ ९९ ९६ ८३ ८० ७८ ७८ ४६ ३१ यावर्षी कामगार कायद्यात बरीच सुधारणा सरकार करत आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी हा क्रमांक आणखी सुधारणार आहे. माझे मतः रोजगार वाढावा, भारतात भांडवल आकर्षीत व्ह्यावे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असे मला वाटते. त्यामुळे रोजगार वाढतच जाईल असे वाटते. . २. रोजगार वाढवण्यासाठी गृहबांधणी, रस्ते बांधणी व वाहन उद्योग हे तीन अत्यंत महत्वाचे उद्योग समजले जातात. यातील रस्ते बांधणीमधे सरकार प्रयत्नात कमी पडते आहे असे मला वाटत नाही. गृहबांधणी मधे काळा पैशाचा खूप मोठा उपयोग केला जात होता. नोटबंदीनंतर तो वापर थांबल्यामुळे या क्षेत्रावर खूप मोठा परिणाम झाला आहे. तसेच रेरा कायद्यामुळे पूर्वी सारखे हम करे सो कायदा ही प्रवृती असलेल्या लोकांना धंदा करणे अवघड झालेले आहे. आपण बर्‍याच वेळेस असे वाचत असतो की, अनेक फ्लॅटस रिकामे पडून आहेत. विकले जात नाही आहेत. असे का घडते? ज्या घरांची मागणी आहे, त्याचाच पुरवठा केला जात नाहीये, अशी माझी समजून आहे. मी याबाबत काही प्रश्न स्वत:लाच विचारले. त्या प्रश्नाच्या उत्तरातून माझी अशी समजूत झालेली आहे. अ) एक १५०-२०० चौ.फूटाची खोली व संडास बाथरूम अशा पध्दतीची घरे बांधली तर ती पडून राहतील का? ब) भारत स्वतंत्र झाल्यावर जर मुंबई पुण्यात अशा प्रकारची लाखो घरे उभी राहीली असती किंवा भाड्याने मिळू शकली असती तर झोपडपट्टी वाढली असती का? क) भाडे नियंत्रण कायद्यामुळे अशा प्रकारची घरे भाड्याने मिळत होती तो पर्यायही बंद झाला. परवडणारी घरे बांधणे व भाडयाने देणे हा उद्योग पूर्णपणे बंद झाला. चाळी बांधणे बंद झाले. ज्या जागेत १००-२०० जण राहात असत, तेवढ्याच जागेत ५०-६० माणसे राहू लागली. परवडणारी घरे बांधणे हाच यावर उपाय आहे. भारतीय जनतेची क्रयशक्ती विचारात घेता, ७० टक्के लोकसंख्येला ह्याचीच जरूरी आहे. ड) आजही पुढारलेल्या जगात घरे भाड्याने देणे हा व्यवसाय आहे. पण भारतात गृहनिर्माण क्षेत्रावर कायम राजकारण्यांचा, गुंठामंत्र्यांचा प्रभाव राहिलेला आहे. आलिशान गृहनिर्मितीमधे जास्त नफा असेल, तर सर्वसामांन्यासाठी घरे कोण कशाला बांधेल? आणि राजकारणी तरी त्यासाठी नियम का बनवतील? माझे मत: ही परिस्थीती योग्य प्रकारे बदलत आहे. स्वस्त घरबांधणी उद्योग जसा वाढेल तसा त्याचा परिणाम रोजगारावर नक्कीच होईल. वाहन क्षेत्रः अ) यातील मंदी ही बीएस६ या नियमांमुळे आलेली आहे. तसेच इलेक्ट्रीक दुचाकी धोरणांमुळे आलेली आहे. जर नवीन पध्दतीची वाहने येणार असतील तर ग्राहक थांबायची शक्यता वाढते. त्यामुळेच तात्पुरती मंदी आल्यासारखे वाटत आहे. ब) जर नवीन प्रकारची वाहने निर्माण करायची असतील तर जुन्या प्रकारच्या वाहनांची निर्मीती कमी करायलाच लागते. अन्यथा ती पडून राहतील. थोडक्यात उत्पादन कमी होणार हे कोणालाही कळेल. त्या सर्वांचा परिणाम रोजगार, जीडीपी वगैरे सगळ्यावरच होणार. पण हा सर्व प्रकार काही काळासाठीच असेल असे मला वाटते. क) २०१९ सरकारला मोदी सरकार येणार नाही व ही धोरणे बदलतील असा अनेकांचा अंदाज होता. मात्र मोदी परत आल्याने व धोरणे राबवण्यात कठोर असल्याने सर्वांची धावपळ उडालेली आहे. त्यामुळे परिस्थिती वेगाने बिघडली असावी अशी मला शंका आहे. मात्र २०२० साली ही परिस्थिती पूर्णपणे बदलेल असे वाटते. आपोआप रोजगाराला चालना मिळेल असे वाटते. एक निरिक्षण: वाहन उद्योग मंदीचे डांगोरा पिटून वाहन उद्योग सवलती मागत होता. जीएसटी कमी करा. रोड टॅक्समधे सवलत द्या. वगैरे वगैरे. राहूल बजाज यांच्या प्रतिक्रियेवरून माझे हे मत बनले. थोडक्यात सवलतींच्या आधारे उद्योग टिकवण्याची नफा वाढवण्याची जुनी पध्दत, याच्या बरोबर उलट जे स्वातंत्र्यानंतरच्या काही वर्षांनी जन्माला आले आहेत ते म्हणतात. नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे मागणी निर्माण करायच्या ऐवजी सवलती मागून मागणी वाढवणे गैर आहे. राहूल बजाज यांच्याच सुपुत्रांच्या प्रतिक्रियेवरून. अर्थमंत्र्यांच्या कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याच्या संबंधात ते म्हणतात. नवीन इलेक्ट्रीक स्कूटर निर्मीतीसाठी नवीन लाईन तयार करणे खर्चिक होते. अंदाजे ५०० कोटींचा खर्च येणार होता. त्यामुळे आहे त्या लाइनवरच काहीतरी थातूरमातूर सुधारणा करून ही निर्मीती करणे भाग होते. पण हा सगळाच प्रकार धेडगुजरी होता. अर्थमंत्र्यांनी जी करसवलत दिली आहे त्यामुळे यावर्षी आमचा ५०० कोटींचा टॅक्स वाचणार आहे. त्यामुळे आम्ही नवीन लाइन उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आम्ही आता आणखी चांगले प्रॉडक्ट बाजारात आणू शकू व तेही खूपच कमी वेळेत. मला वाटते वाहन उद्योगाबाबत मते बनवण्यासाठी वरील प्रतिक्रिया उपयोगी पडू शकेल. माझे मतः मी तरी वाहन उद्योगबाबत आशावादी आहे. ३. सरकारने आरसीइपी वर सही न करण्याचे धोरण स्विकारले. मेक इन इंडियावर खूप मोठा सकारात्मक परिणाम होणार आहे असे माझे मत आहे. चीन कडून होणार्‍या आयातीमुळे आपल्या इथले उद्योगधंदे बंद पडत होते. चीन त्याचा माल डंपिंग करत आहे हे लक्षात येऊनही आपण काही करू शकत नव्हतो. कारण हे सिध्द करणे सोपे नसते. भारतात लोकशाही असल्याने सरकारने उद्योगांना सवलती दिल्यातर त्याचा शोध घेता येतो. याउलट चीनने त्यांच्या उद्योगांना मदत केली तर मात्र आपण ते पुराव्या निशी मांडू शकत नाही. कारण एकच चीनची अर्थव्यवस्था बंदिस्त आहे. विनिमयाचा दरही चीन एकतर्फी ठरवते. हे म्हणजे एकाने (लोकशाही देशाने) सर्व नियम पाळावयाचे व त्याचे पुरावेही ठेवायचे. तर दुसर्‍याने (बंदिस्थ अर्थव्यवस्था) मात्र आम्ही सर्व नियम पाळतो असे घोषीत करून त्यावर इतरांनी विश्वास ठेवलाच पाहिजे असे सांगायचे. अशा प्रकारची स्पर्धा काय उपयोगाची? यात भारताची रोजगाराची वाट लागणार हे नक्कीच. तो प्रकार आता बंद होऊ शकेल. चीनच्या आयातीमुळे किती उद्योगधंदे बंद पडले याबाबत कोणी बोलत नाही. मात्र कांदा आयातीमुळे इथला शेतकरी मरतो त्याला मात्र मिडिया खूप प्रसिध्दी देते. मला वाटते मिडियाने असा सापत्न भाव दाखवू नये. एक उदाहरण देतो. इन्डोसोलर नावाची एक कंपनी आहे. २०१० साली सरकारने जाहीर केले की, सोलर एनर्जीमधे जो १००० कोटीची गुंतवणूक करेल त्याला २५ टक्के सरकार सबसिडी देईल. या कंपनीने तशी गुंतवणूक केली. पण सरकार २५० कोटी कंपनीला देऊ शकली नाही. मुक्त व्यापाराच्या करारावर सह्या केल्याने सरकार ती मदत देऊ शकली नाही. कंपनी कोर्टात गेली. हायकोर्टाने कंपनीच्या बाजूने निकाल दिला. तरीही सरकारने ती मदत आजतागायत दिलेली नाही. सुप्रिम कोर्टात काही अडलेय का ते माहीत नाही. परिणाम असा झाला की, कंपनीचे कर्ज २५० कोटींनी कमी न झाल्याने त्यावरचे व्याज कंपनीच्या बोकांडी बसले. यातच चिनचे सोलर पॅनेल आयात होऊ लागले. कंपनीच्या रॉ मटेरियलच्या खर्चात चीन फिनीश प्रॉडक्ट पुरवू लागली. कंपनीन अँन्टी डंपिंगची प्रक्रिया सुरू करण्याची विनंती सरकारला केली, पण उपयोग झाला नाही. कंपनी तोट्यात व नंतर दिवाळखोर बनली भारतातील अनेक कंपन्या अशाच पध्दतीने दिवाळखोर बनल्या आहेत. तर त्यामुळे भारतीय बँकिंग उद्योगाची वाट लागली आहे.
श
श्रिपाद पणशिकर गुरुवार, 11/28/2019 - 14:41 नवीन
शाम सर उत्तम _/\_ तुर्तास ऐवढेच लिहु शकतोय.
स
सर टोबी गुरुवार, 11/28/2019 - 16:06 नवीन
व्यवसाय सुलभतेचा निर्देशांक आणि पायाभूत सुविधांचा संबंध थोडाफार असू शकतो परंतु सरकारी परवानग्या, किचकट कार्यप्रणाली, राजकीय स्थैर्य वगैरे गोष्टी यावर प्रभाव टाकतात. हा निर्देशांक चांगला आहे म्हणून उद्योग सुरु होतीलच असे नाही. उदा. फडणवीस सरकारने काम करायला सुरवात केल्या केल्या आयफोनची अमेरिकेबाहेरची सर्वात मोठी फ्याक्टरी महाराष्ट्रात उभारण्याचा करार केला. त्याची अजून कुदळ देखील पडल्याचे कोणी ऐकले नाही. बी एस ६ ला अनुकूल असलेली वाहने घेण्यासाठी कोणी थांबून राहणार असले असते तर असा प्रकार प्रत्येक नवीन मानांकन लागू होण्यापूर्वी झाला असता. अशा नवीन मानांकनासाठी प्रवासी वाहने घेणारे थांबून आहेत हे एकवेळ तुमच्या समजुतीसाठी गृहीत धरू. परंतु व्यावसायिक त्यासाठी थांबून राहतील अशी शक्यता नाही. तेच गृहनिर्माणाच्या बाबतीत. उच्च राहणीमानाची घरे काही नव्याने बांधली गेली नाहीत. जाता जाता: आजच अर्थमंत्र्यांनी विकासाचा वेग कमी झाल्याचे मान्य केले आहे परंतु मंदी आहे हे त्या मान्य करायला तयार नाहीत. चला अर्थव्यवस्थेचा पोपट मेला आहे हे सरकारी पातळीवर मान्य करण्याची सुरुवात झालेली आहे.
श
शाम भागवत Fri, 11/29/2019 - 12:43 नवीन
सर टोबी, तुम्ही मांडलेल्या मुद्यांच्या अभ्यासासाठी काही आकडेवारी दिली असती तर तुमचे म्हणणे समजून घ्यायला मला मदत झाली असती. पण तुम्ही फक्त निकर्ष मांडले आहेत. काही हरकत नाही. आपण तुमचे म्हणणे आकडेवारीनुसार तपासून बघू. १) व्यवसाय सुलभता निर्देशांक चांगला आहे म्हणून उद्योग सुरु होतीलच असे नाही. हे तुमचे म्हणणे मान्य. आयफोनचे दिलेले उदाहरण ही मान्य. पण या एका उदाहरणावरून भारतात भांडवल आलेच नाही. गुंतवणूक आलीच नाही. उद्योग सुरू झालेच नाही हा तुमचा निष्कर्षाला आकडेवारी साथ देत नाहीये. मी गुंतवणूक करण्याच्या घोषणांबद्दल बोलतच नाहीये. तर प्रत्यक्षात आलेल्या गुंतवणूकीबद्दल बोलतोय. सगळे आकडे अब्ज डॉलरमधे आहेत. हे आकडे प्रत्यक्षात आलेल्या भांडवलाचे आहेत. परदेशातील भारतीयांकडून आलेले पैसे यात समाविष्ट नाहीत. कारण त्याचा व्यवसाय सुलभतेशी संबंध नसतो. २००० ते २०१२ पर्यंतच्या १२ वर्षात, भागभांडवल म्हणून आलेली एकूण एकत्रीत गुंतवणूक १७०.२९ आर्थीक वर्षप्रत्यक्षात आलेले भांडवल २०१२-२०१३२३.०० २०१३-२०१४२४.३० २०१४-२०१५३०.९३ २०१५-२०१६४०.०० २०१६-२०१७४३.४८ २०१७-२०१८४४.८६ २०१८-२०१९४४.३५ २०१९-२०२०१६.३३ फक्त पहिल्या ३ महिन्यांचा आकडा आहे. आत्तापर्यंतच्या तिमाहीतील हा सर्वात मोठा आकडा आहे. अजून ९ महिन्यांचे आकडे यात मिळवल्यावर हा आकडा आणखीन मोठा होऊ शकतो. २००० ते जून २०१९ पर्यंतच्या १९ वर्षात, भागभांडवल म्हणून आलेली एकूण एकत्रीत गुंतवणूक ४३६.३५ थोडक्यात गेल्या ५ वर्षात अंदाजे २०३.६२ अब्ज डॉलर इतकी रक्कम भांडवल म्हणून भारतात गुंतवली गेलेली आहे. २. व्यावसायीक वाहनांबद्दल थोडेसे. भारतातील वाहन उद्योग वाढत असताना व्यावसायीक वाहनांच्या मागणीत आलेली घट ही फक्त बीएस६ मुळे आलेली नाहीत. त्याव्यतिरिक्त आणखी कारणे नमूद करत आहे. अ) हायवेंचे प्रमाण वाढल्यामुळे प्रवासाचा वेळ वाचला. म्हणजेच ट्रीप जास्त होऊ लागल्या. ब) जीएसटी मुळे राज्यांच्या सिमांवरील जाणारा वेळ वाचला. तसेच ऑक्ट्रायमुळे होणारा वेळ वाचला. म्हणजेच म्हणजेच ट्रीप जास्त होऊ लागल्या. क) महामार्ग रस्त्यांची अवस्था सुधारल्याने दुरूस्तीसाठी वाहने अडकून पडण्याचा वेळ वाढला. म्हणजेच ट्रीप जास्त होऊ लागल्या. ड) सर्वात महत्वाचे म्हणजे अ‍ॅक्सल लोड ५०% टक्यांनी वाढवले. त्यामुळे एकाच ट्रीप मधे दीड ट्रीपचे सामान जाऊ लागले. खरे तर हा निर्णय वाहन व्यावासायीकांसाठी फायद्याचा असूनही, हा निर्णय गेली अनेक वर्षे कोणतेही सरकार घेत नव्हते. कोणाचे धाडसच होत नव्हते. कारण एकच. त्यामुळे वाहन क्षेत्रात मंदी आली तर? असो. पोपट मेला वगैरेला मी उत्तरे देणार नाहीये. :) :) तुमच्यामुळे मी माझे मुद्दे आणखीन सविस्तर मांडू शकलो याबद्दल तुम्हाला धन्यवाद. _/\_
श
शाम भागवत Fri, 11/29/2019 - 14:28 नवीन
हा धागा महाराष्ट्राच्या संदर्भात असल्याने हा परिच्छेद वाढवत आहे. परदेशातून भांडवल खेचण्यात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. २०१४ पर्यंत एकूण परदेशी गुंतवणूकीच्या ३०% एकटा महाराष्ट्र पटकावत असे. हे प्रमाण २०१४ नंतर वाढत जाऊन आता ते ५०% पर्यंत गेले आहे. जय महाराष्ट्र.
↩ प्रतिसाद: शाम भागवत
ख
खिलजि Sat, 11/30/2019 - 11:59 नवीन
मस्तय परीक्षण आणि मांडणी .. आवडली आहे .. सुंदर
↩ प्रतिसाद: शाम भागवत
ऋ
ऋतुराज चित्रे Fri, 11/29/2019 - 19:11 नवीन
सर्वात महत्वाचे म्हणजे अ‍ॅक्सल लोड ५०% टक्यांनी वाढवले. हीच सर्वात मोठी चूक झाली. जुने रस्ते आणि पुल असा वाढीव लोड सहन करू शकत नसल्याने त्यांची अवस्था आता धोकादायक झाली आहे. अपघाताचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण करून टाकली आहे ह्या वाहनांनी. सर्व क्षेत्रात मंदी असताना ह्या वाहनांना पुरेसा धंदा कोठून मिळतो? ह्या व्यवसायाची सद्यस्थिती कशी आहे? https://english.newstracklive.com/news/transport-business-is-in-recession-sc77-nu-1025250-1.html
आ
आनन्दा Sat, 11/30/2019 - 04:58 नवीन
ही बातमी ४ महिने जुनी आहे.. जर त्य स्थितीवर विश्वास ठेवायचा म्हणला तर एव्हाना संपूर्ण वाहन उद्योगचे दिवळे निघले असते. पण तसे कही झालेले दिसत नाही.
जुने रस्ते आणि पुल असा वाढीव लोड सहन करू शकत नसल्याने त्यांची अवस्था आता धोकादायक झाली आहे. अपघाताचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण करून टाकली आहे ह्या वाहनांनी.
यात मात्र तथ्य असू शकते.
↩ प्रतिसाद: ऋतुराज चित्रे
ऋ
ऋतुराज चित्रे Sat, 11/30/2019 - 11:04 नवीन
एव्हाना संपूर्ण वाहन उद्योगचे दिवळे निघले असते. अशा उद्योगांचे थेट दिवाळखोरी दिसत नसते, मंदीमुळे बँकाचे हप्ते थकले जाते ,पर्यायाने बँकांच्या ताळेबंदावर परिणाम होतो. वाहने जप्त करणे बँकांना परवडत नाही. हीच अधिक क्षमतेची वाहने मंदीमुळे धंदा नसल्याने बेकायदेशीरपणे रेती आणि गौण खनिजाची वाहतूक करतात. येथेही हात ओले करायला लागतात त्यामुळे नफा नाममात्र असतो. असो, खरंतर सोशल मीडियावर प्रत्यक्ष अनुभवापेक्षा सरकारी रंगरंगोटीलाच महत्त्व दिले जाते, मिपाही त्याला अपवाद नाही हे नोटाबंदि ते जी एस टी पर्यंत झालेल्या चर्चेनंतर आढळून आले आहे. विरोध करणारे आयडी उडवले गेले. वाहतूक व्यवसायाचा अनुभव असल्याने न राहवून खुलासा करावा लागला. वाचनमात्र राहणेच शहाणपणाचे आहे.
↩ प्रतिसाद: आनन्दा
श
शाम भागवत Sat, 11/30/2019 - 11:26 नवीन
वाहने जप्त करणे बँकांना परवडत नाही.
एकदम अचूक मुद्दा. ह्यामुळेच खरी आकडेवारी बाहेर येत नाही.
वाचनमात्र राहणेच शहाणपणाचे आहे.
आपण आपला मुद्दा संयत शब्दांत मांडायचा व मग वाचनमात्र राहावयाचे. हे जास्त संयुक्तिक वाटते. निदान प्रश्नाला वाचा तरी फुटते. असो.
↩ प्रतिसाद: ऋतुराज चित्रे
ऋ
ऋतुराज चित्रे Sat, 11/30/2019 - 12:51 नवीन
आपण आपला मुद्दा संयत शब्दांत मांडायचा व मग वाचनमात्र राहावयाचे. हे जास्त संयुक्तिक वाटते. बरोबर आहे,परंतू ते जुने रस्ते आघाडीच्या राजवटीतील असतील तर बोलायलाच नको. आघाडीच्या कार्यकर्त्यांकडेच रस्त्याची कंत्राटे असायची. असे अनावश्यक फाटे फुटले की गप्प बसणे योग्य वाटते.
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत Sat, 11/30/2019 - 13:32 नवीन
ते वाक्य टाईप केले तेव्हांच चूक होतीयं हे लक्षात आलं होतं. पण त्या मागचा विचार थोडा वेगळा होता. मायबोलीला ४ तासांपर्यंत दुरूस्ती करता येते. इथे करता येत नाही. हाच धागा मायबोलीवर पण आहे व तिथेही प्रतिसाद टाईप करणे चालू आहे. जाऊ दे. समर्थन करत बसण्यापेक्षा मुद्दा मांडतो. तेच महत्वाचे. आघाडीच्या कार्यकर्त्यांना कंत्राटे मिळू नयेत असं मला म्हणायचे नव्हते. पण... रस्ते बांधणीसाठी कोणाला पात्र करायचे याचा निकष पूर्वी नव्हता. आता मात्र पात्रता बघितली जातीय. आवश्यक मशिनरी, भांडवल आहे का ते तपासले जातंय. निविदा पदरात पाडून घ्यायची व मग सबकाॅंन्ट्रक्ट द्यायचं असे प्रकार कमी व्हायला लागले आहेत. त्यामुळे मोठ्या कंपन्या आधुनिक पध्दतीने रस्ते बांधायला पुढे यायला लागल्या आहेत. स्थानिक नविन लोकं पुरेसे भांडवल व मशिनरी घेऊन भाग घ्यायला लागली आहेत. तात्पर्य रस्त्यांचा दर्जा सुधारायला लागला आहे असे मला सुचवायचे होते. सुधारणेला वाव आहे. पण सुरवात झालीय. तरीपण माझी वाक्यरचना चुकली हे स्पष्टपणे मान्य करतो. _/\_
↩ प्रतिसाद: ऋतुराज चित्रे
श
शाम भागवत Sat, 11/30/2019 - 08:54 नवीन
हम्म्. पण त्याला इलाज नाही. ते जुने रस्ते आघाडीच्या राजवटीतील असतील तर बोलायलाच नको. आघाडीच्या कार्यकर्त्यांकडेच रस्त्याची कंत्राटे असायची. पण यात खोलात जायला नको. भूतकाळ नको उगाळायला. त्यापेक्षा पुढे बघू या. ज्योतिषदृष्ट्या २०१९ साल मोदींना खूप अवघड होते. निव्वळ विरोधकांच्या गलथान कारभारामुळे मोदी आरामात जिंकले. २०२० पासून परत दोन वर्षे मोदींची चांगली आहेत. त्यामुळे हा डिसेंबर महिना संपवायचा आहे. आरसीईपी करारावर सही नाकारल्याने चीनचा माल जसजसा कमी येऊ लागेल तसतशी परिस्थिती सुधारायला लागेल असं वाटतंय. अमेरिकेचा रोजगार याच पध्दतीने वाढलाय. आता तर जपानही करारावर सह्या करायचं टाळतीय असं वाटतंय. थोडक्यात द्विपक्ष करारांची संख्या वाढत जाईल असं मला वाटतं. द्विपक्ष करार करणयात मोदी प्रविण आहेत असं त्यांच्या ५ वर्षांच्या परराष्ट्रीय संबंधातून जाणवतंय. त्यामुळे तेच लाभदायक असेल. अवांतर: इन्डोसोलर कंपनीचा भाव वाढायला लागलाय!!! ₹०.२५ वरून ₹०.८० पर्यंत. :) :) :)
↩ प्रतिसाद: ऋतुराज चित्रे
श
शाम भागवत Sat, 11/30/2019 - 11:32 नवीन
करारावरील सही न केल्याने इथले उद्योग जसजसे वाढतील तसतसा वाहन उद्योग मंदीतून बाहेर येईल हे महत्वाचे वाक्य लिहावयाचे राहिलेच.
↩ प्रतिसाद: शाम भागवत
ग
गोंधळी Sat, 11/30/2019 - 16:01 नवीन
करारावरील सही न केल्याने इथले उद्योग जसजसे वाढतील तसतसा वाहन उद्योग मंदीतून बाहेर येईल हे महत्वाचे वाक्य लिहावयाचे राहिलेच. शाम सर जर करारावर सही न केल्याने इथले उद्योग वाढतील ते कस काय ? कारण याधी आपण या करारावर सही केल्याच वाचण्यात नाही आले. म्हण्जे भारतातील आधिची परिस्थिती जैसे थेच राहणार आहे. मग फक्त त्यामुळे उद्योग वाढतील ते कसे.? अमेरिकेने ट्रेड वॉर चालु केले आहे जे आपण नाही करु शकत चीन बरोबर. थोडक्यात द्विपक्ष करारांची संख्या वाढत जाईल असं मला वाटतं. द्विपक्ष करार करणयात मोदी प्रविण आहेत असं त्यांच्या ५ वर्षांच्या परराष्ट्रीय संबंधातून जाणवतंय. त्यामुळे तेच लाभदायक असेल. द्विपक्ष करार करणे हे मोदी यायच्या आधीपासुनचीच रणनिती आहे. मला वाटते हा मिडिआ मार्केटिंग मुळे असे होत आहे. या आधी कोणी येवढ्या प्रकारे स्वतः ची मार्केटिंग केली नव्हती. त्यामुळे भोळ्या लोकांना वाटते की अरे मोदीनी असे केले, तसे केले. हिंदुत्व (या मध्ये पाकीस्तान् ,तिन तलाक, राम मंदिर,काश्मीर ......) हा एक मुद्दा सोडला तर बाकी विकासाच्या आघाडीवर खुप मोठ काही काम केले आहे असे नाही दिसत. (आपण या मध्ये तुलना याआधीच्या सरकारशी करतो. पण मला वाटते मोदी फक्त आधीच्या सरकारने ज्या चुका केल्या त्या करत नाही आहे. पण जर का आपल्या देशाची जि क्षमता आहे त्या तुलनेत बघितल तर ते खुपच कमी दिसेल.) या उलट राजकीय फायद्यासाठी घेण्यात आलेल्या नोट्बंदी व सदोष GST या मुळ्ये खुप मोठे नुकसान झालेले आहे. बुलेट ट्रेन ही असाच लोकप्रियतेसाठी घेतलेला मुद्दा वाटतो.
↩ प्रतिसाद: शाम भागवत
आ
आनन्दा Sun, 12/01/2019 - 04:02 नवीन
नोटाबंदी बद्दल मला काहीच माहिती नाही, मल व्यक्तिशः तो निर्णय आवडला असला, तरी ते बहुतांश गट फीलिंग वरती आहे. त्यामुळे माझा पास. माझ्या मते नोटाबंदीचे मुख्य हेतू काहीतरी वेगळेच होते, जे मोठ्या तोंडाने सांगणे शक्य नाहीये. जसे अजित पवारांनी पहिले पाठींबा का दिला आणि नंतर का काढून घेतला याची आपल्याला असलेली माहिती वेगळीच असणार, आणि प्रत्यक्षात काय झाले होते ते कधीच बाहेर येणार नाही. उच्चस्तरावर सरकारकडे बरीच अधिक माहिती असते जी आपल्याला कधीच नसते. GST कोणीही राबवला असता तरी तितकाच सदोष असता. जिथे काळ्या पैश्याची समांतर अर्थव्यवस्था अजुन देखील आहे, तिथे जीएसटी राबवणे जवळजवळ अशक्यच होते. आता सुद्धा जीएसटी पूर्ण राबवला जात नाहीये. सरकारला अनेक पळवाटा माहीत आहेत ज्या काळापैसा निर्माण करतायत, पण सरकार गप्प बसुन आहे कारण बाह्य आणि अंतर्गत विकासदर. साधारन २०२१-२२ च्या नंतर पुन्हा एक मोठे ऑपेरशन होऊ शकते असे माझे मत आहे.
पण मला वाटते मोदी फक्त आधीच्या सरकारने ज्या चुका केल्या त्या करत नाही आहे
खरे तर हेच पुरेसे आहे.
बाकी विकासाच्या आघाडीवर मोठे काम
म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे आहे ते समजून घ्यायला आवडेल.
↩ प्रतिसाद: गोंधळी
ग
गोंधळी Sun, 12/01/2019 - 07:12 नवीन
नोटाबंदी बद्दल मला काहीच माहिती नाही, मल व्यक्तिशः तो निर्णय आवडला असला, तरी ते बहुतांश गट फीलिंग वरती आहे. त्यामुळे माझा पास. माझ्या मते नोटाबंदीचे मुख्य हेतू काहीतरी वेगळेच होते, जे मोठ्या तोंडाने सांगणे शक्य नाहीये. नोटाबंदी फसलेली आहे हे सिध्द होउनही मान्य करतच नसाल त्यास अंध भक्ती असेच म्हणावे लागेल. माझा मुद्दा खुप साधा आहे. सध्या वस्तुस्थिती न बघता मोदी या प्रतीमेला अवास्तवी महत्व देउन, खोटी मार्केटिंग व हवाबाजी करुन मोठ केल जात आहे. कारण प्रत्यक्षात तसे नाही आहे. बाकी आपल्या देशात फक्त वोटिंग पुरतीच लोकशाही आहे. कारण कामाच्या जोरावर लोक कोणाला निवडुन देत नाहीत आणि निवडुन आल्यावर त्यांना कुठ्ल्या गोष्टिंबद्दल जाबही विचारत नाही. फक्त भावनीक मुद्द्यांवर निवड्णुका जिंकल्या जातात. हे बघा मी काही व्ययक्तीकरीत्या मोदी विरोधक नाही आहे. उलट काँग्रेस पेक्शा भाजपा चांगल काम करु शकेल असेच मला वाटत आले आहे. आक्रमक हिंदुत्व हा भाजपाचा पाया आहे. त्यामुळे त्याबाबतीत ते योग्य करत आहेत. पण ज्या विकासाच्या मुद्द्यावर मोदी निवडुन आले होते. ते साध्य होत आहे असे दिसत नाही आहे जर का भक्तीचा चष्मा डोळ्यांवरुन काढ्ला व वस्तुस्थिति बघितली तर.
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Sun, 12/01/2019 - 10:49 नवीन
खरे आहे, मी काही प्रमाणात भक्त कॅटेगरी मध्ये जातो. कारण एखादी गोष्ट सरकारने की केली याबाबत खडानखडा माहिती नागरिक म्हणून मला असलीच पाहिजे असा माझा हट्ट नसतो. उदा - रघुराम राजनांनी NPA चा दट्ट्या आणला, त्याची फळे भोगतोय कोण? आणि त्याला जबाबदार आहे कोण? खरे तर आकडेवारी, म्हणजे सर्वच पातळीवरची इतकी फसवी असते की आपल्याला त्यातून तथ्य काढणे खूपच कठीण असते. अश्या परिस्थितीत आपण नियुक्त केलेल्या सरकारवर विश्वास ठेवणे इतकेच आपण करू शकतो. आता, भाजपा जेव्हा काशमीरमध्ये सरकारात सामील झाली तेव्हा अनेक लोकांनी तारे तोडले, आम्ही आमच्या नेत्यावर विश्वास ठेवून शांत बसलो. जेव्हा 370 रद्द झाले तेव्हा समजले की या लोकांनी किती दीर्घकालीन गेम खेळला होता.. साधारण 5 वर्षे चिकाटीने इतके गुंतागुंतीचे कंगोरे आणि stake holders असलेला खेळ खेळणे सोपे नाही. एखादा जरी फुटला सारी सगळं डाव उलटू शकतो. त्यामुळे मी नेहमीच म्हणतो, की आपल्याला असलेल्या तुटपुंज्या माहितीवरून आपण एखादा निष्कर्ष काढणे खूपच धोकादायक असू शकते. अर्थात म्हणून तो अधिकार काही बाद होत नाही. ज्यांना निष्कर्ष काढायचे आहेत ते काढतातच, आणि गदारोळ पण घालतात. पण 370 झाल्यापासून माझा भाजपीय राजकारणाकडे बघायचा दृष्टीकोन संपूर्ण बदलला आहे. आता मी समीक्षा करत नाही, अभ्यास करतो, समजून घ्यायचा प्रयत्न करतो. कारण इतके पाताळयंत्री राजकारण करण्यात प्रवीण आज भारतात केवळ शहा आणि पवारचं आहेत.
↩ प्रतिसाद: गोंधळी
ग
गोंधळी Mon, 12/02/2019 - 07:26 नवीन
आनन्दा जी आपण टर्की कडुन कांदा आयात करत आहोत. मग काश्मीर च्या मुद्द्यावर मलेशीयाला एक न्याय तर टर्की ला दुसरा असे का? यात मला दुट्ट्पी पणा वाटतो. कारण मा. मोदी यांनी त्यांना अत्यंत कण्खरपणे सुनावले होते पण त्यांनी याबात माफी मागितल्याच दिसल नाही.
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Mon, 12/02/2019 - 12:17 नवीन
कदाचित हेच कारण असेल While India’s bilateral trade with the two was only 2.9% of its total in the fiscal year ended March 31, New Delhi enjoys a trade surplus with Turkey and runs a deficit with Malaysia on account of its reliance on imported palm oil. अर्थात मोदी त्यांची धोरणे मला विचारून ठरवत नसल्यामुळे मी यावर काय माहिती देणार?
↩ प्रतिसाद: गोंधळी
ग
गोंधळी Tue, 12/03/2019 - 05:58 नवीन
अर्थात मोदी त्यांची धोरणे मला विचारून ठरवत नसल्यामुळे मी यावर काय माहिती देणार? ठिक आहे. मला उत्तर मिळाले व माफ करा तुम्हाला त्रास दिला. बाकी काय बोलणार आपल्या देशात ५ ट्रीलीयन ची अर्थव्यवस्था होण्यासाठी तुम्हाला त्याच गणित नाही आल तरी चालत नाही का?
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Tue, 12/03/2019 - 07:37 नवीन
पाच ट्रेलिअन च गणित मला यायची गरज नाही.. मला 5 लाखाचे गणित आले तरी पुरेल. माझ्यासारखे 1 करोड झाले तर आपोआप 5 ट्रेलिअन होईल. गरज आहे ती मी माझे 5 लाख प्रामाणिक पणे देण्याची!! आहे की नाही परफेक्ट भक्ताचा प्रतिसाद?
↩ प्रतिसाद: गोंधळी
ज
जॉनविक्क Tue, 12/03/2019 - 21:26 नवीन
की आपले गणित योग्य आहे ते सांगायचे आहे की दोन्ही दगडावर एकाच वेळी पाय ठेवायचा अट्टहास आहे ? भक्त असणे चूक न्हवे, चूक आहे नको तिथे फक्त तेच असणं योग्य असे ठसवणे बाकी आनंदाचा प्रतिसाद आंनदाने वाचण्यात आम्हास आनंदी आंनदच आहे.
↩ प्रतिसाद: आनन्दा
श
शाम भागवत Wed, 12/04/2019 - 06:44 नवीन
मी तर्कस्तानकडून घेतलेल्या कांद्याबद्दल समर्थन करत नाहीये. पण त्या कांद्याबद्दलची दोन मते खाली देत आहे. सकाळ पेपर्स https://www.esakal.com/pune/onion-turkistan-market-yard-pune-240400 महाराष्ट्र टाईम्स https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/ottoman-onion-entered-pune/articleshow/72338487.cms हल्ली कोणावर विश्वास ठेवायचा हा प्रश्नच आहे. :) त्यामुळेच मी इथे वाद घालण्याऐवजी माझे मत मांडून गप्प बसतो. वाचक योग्य, अयोग्य काय ते ठरवतच असतात.
↩ प्रतिसाद: गोंधळी
श
शाम भागवत Sat, 11/30/2019 - 16:47 नवीन
आपण बोलणी करत आलोय, पण करारावर सही पण केलेली नाही. पण प्रथमच आपण आपल्या अटी मान्य होत नसतील तर कणखरपणे त्यातून बाहेर पडायचे स्पष्ट करतोय. हाच कणखरपणा पाहून जपानही आपल्याला साथ द्यायला तयार होतोय. मी फक्त वाऱ्याची दिशा कशी आहे हे सुचित करतोय. जपान व अमेरिका तंत्रज्ञान द्यायला तयार होत असतील तर चीनमधले उद्योग भारतातही सुरू होऊ शकतात. चीनला पर्याय शोधणे सुरू झालंय. माझ्याकडे गुप्त माहिती वगैरे काही नाही. त्यामुळे तुमचे मतही चूकीचे म्हणता येणार नाही. पण चीनबद्दलचा अविश्वास व भारताबद्दलचा वाढणारा विश्वास ह्या दोन गोष्टींवर माझे विचार अवलंबून आहेत. या बाबत माझ्याकडे लिंका नाहीत किंवा कुठे काही वाचून हे लिहीत नाहीये. पण जसजसं व्यवसाय सुलभता वाढत जाईल तसतसं हे घडत जाईल. असो.
श
शाम भागवत Sat, 11/30/2019 - 16:48 नवीन
नोटबंदी, ३७०, जीएसटी, काश्मिर बाबत माझा पास. :)
↩ प्रतिसाद: शाम भागवत
आ
आनन्दा Sun, 12/01/2019 - 03:51 नवीन
अमेरिका - जपान वगैरे देश लोकशाहीवादी आहेत. त्याना चीनसारखी साम्राज्यवादी भूमिका घेउन जमीन खाणे शक्य नाही. त्यामुळे त्यांची भूमिका ही व्यापार्‍यासारखी असते. व्यापारामध्ये साधारणपणे दोन्ही बाजूना काहीतरी विन-विन असते, त्याशिवाय व्यवहार होत नाही. परस्पर विश्वासाशिवाय देखील व्यापार होत नाही. पूर्वी चीनला साथ दिली तेव्हा केवळ पैसा समोर होता. पण आता चीनचा विधिनिषेधशून्य भस्मासुर होउन त्यांच्यावर उलटलाय. त्याप्रमाणात भारताची भूमिका तत्वनिष्ठ असल्याचि साक्ष आहे. त्यामुळे भारताची भीती कधीच नव्हती फक्त पुर्वी भारत तत्वासाठी मित्राना वार्‍यावर सोडायला पण कमी करत नसे. आता ते थांबलेय. त्यामुळे भीती तर नव्हतीच, पण विश्वास पण वाढीस लागलाय. हा फरक आहे पुर्वी आणि आत्तामध्ये.
↩ प्रतिसाद: शाम भागवत
ज
जॉनविक्क Sun, 12/01/2019 - 09:22 नवीन
पण आता चीनचा विधिनिषेधशून्य भस्मासुर होउन त्यांच्यावर उलटलाय. हे विधान us व china ट्रेड वॉर च्यानु शनगाने आहे की इतर विदा उपलब्ध आहे म्हणून केले आहे ? ट्रेड वॉर हे वेगळं प्रकरण आहे असे वाटते
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Sun, 12/01/2019 - 10:17 नवीन
केवळ ट्रेड वॉर हा विषय अमेरिका आणि चीन मध्ये कळीचा नाही. चीनची साम्राज्यवादी भूमिका साम्यवादी आणि त्यामुळे हुकूमशाही आहे. अमेरिका बहुतांशी सॉफ्ट पॉवर वापरून अनेक देशांमध्ये कल्चरल शिफ्ट घडवून आणते. स्टेट लेव्हल डिप्लोमासी असतेच, पण त्याबरोबरच NGO किन्वा अन्य संस्थांच्या माध्यमातून लोकमत फिरवणे वगैरे देखील चालते. मी चीनला जितका ओळखतो तितका ते साम्राज्यवादी म्हणजे पैसे डंप करणे आणि परतफेड करता आली नाही की सरळ जमिनीवर कबजा घेणे, म्हणजे वेगळ्या प्रकारची वसाहतवाद राबवतो. चीनमध्ये जेव्हा परकीय गुंतवणूक झाली तेव्हा अनेक गोष्टीपैकी एक गोष्ट म्हणजे ease ऑफ business ही होती. आणि हे आपल्याकडे अजिबात नव्हते. मी ऐकलेला एक किस्सा सांगतो - 2004 साली आंध्रमध्ये चंद्राबाबू नायडू सरकार होते, त्यांनी apple बरोबर बोलणी करून manifacturing प्लांट हैदराबाद मध्ये सुरू करण्याची पूर्ण प्लांनिंग केली होती. बोलणी शेवटच्या टप्प्यात आली, जमीन वगैरे घेऊन झाली, आणि दुर्दैवाने निवडणुकांमध्ये सरकार पडले, नंतर आले काँग्रेस. त्यांनी चक्क तो प्रोजेक्ट डंप केला. कल्पना करा जर तो प्रोजेक्ट आला असता तर किती technology ट्रान्सफर झाली असती. आज जिथे चीन आहे, अगदी तिथे नाही, पण कुठेतरी मध्यात तरी आपण असतो. मला ज्याने सांगितलं त्याचं करिअर या प्रकरणात बरबाद झालं होतं, कारण तो embedded मध्ये करिअर करायची स्वप्न पाहत होता, आणि त्या घटनेनंतर embedded कायमचे चीन ला गेले. आज चीन सगळ्या जगात price war करून आपले फोन डंप करतेय. होप I am clear enough!!
↩ प्रतिसाद: जॉनविक्क
श
शाम भागवत Sun, 12/01/2019 - 12:50 नवीन
माझं मत थोडं वेगळं आहे. १९७७ साली जनता सरकार आले. त्यावेळी जॉर्ज फर्नांडीस उद्योगमंत्री झाले. समाजवादी असल्याने अमेरिकेला शिव्या घालणे हा त्यांचा एकमुखी कार्यक्रम असे. त्यांनी ताबडतोब अमेरिकन कंपन्यांना भारताबाहेर हाकलण्याचे धोरण स्विकारले. कोकाकोला गेली हे चांगले झाले. पण आयबीएम व इंटेल सारख्यांना पण हाकलले. अमेरिका खर तर जनता राजवटीकडे अपेक्षेने पहात होती. इंदिरा गांधीं रशियाकडे झुकल्या होत्या. पण त्यांची सत्ता गेली होती. त्या चक्क रायबरेलीतून पराभूत झाल्या होत्या. मोरारजी देसाईचा ओढा अमेरिकेकडे होता. रशियाची तळी उचलणारे तर त्याना सीआयएचे एजंट म्हणायचे. पण जॉर्ज साहेबांमुळे अमेरिकेचा भ्रमनिरास झाला. याच वेळेस अमेरिकेने आपले धोरण आमूलाग्र बदलले. भारताकडे पाठ फिरवून त्यांनी चीनशी संवाद साधायला सुरवात केली. तोपर्यंत अमेरिका चीन संबंध ताणलेले होते. चीन मधे अमेरिकन तंत्रज्ञान व भांडवल ओतले जायला लागले. चीनने सगळ्या सोयी सुविधा देऊ केल्या. फक्त एकच अट घातली. ५ वर्षांनी तंत्रज्ञान हस्तांतर झाले पाहिजे. आज चीन सगळे काही बनवू लागला आहे. त्याचा माल भारतात येऊन इथले उद्योगधंदे बंद पडायला लागले आहेत. कालच भूमिगत मेट्रोचे भुयार करण्यासाठी अगडबंब मशीन चीन मधून आयात होऊन पुण्यात आले आहे. अजून तीन येणार आहेत. ही मशिन्स खरेतर भारतात बनायला पाहिजे होती व चीनला निर्यात व्हायला हवी होती. सगळी अनुकुलता असूनही भारताची शक्ती अलिप्तता, अहिंसा, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, जातीयवाद यामधेच वाया जात राहिली आहे. २०१४ च्या निवडणूकीत प्रथमच जातपात, धर्म, पैसा, मुस्लिम व्होट बँक यांना तिलांजली मिळालीय. पण ही चांगली गोष्ट चालूच राहावी असं कोणालाच वाटत नाहीये. हम्म. हे सगळे आठवले की, फक्त निराश व्हायला होते. पण एक कबूल करायला पाहिजे. जॉर्जसाहेब प्रामाणिक होते. त्यांना त्यांची चूक कळली होती. मान्यही केली होती. एनडीएच्या नवीन मंत्रीपद भूषवताना वेगळे जॉर्जसाहेब पहावयास मिळाले होते. पण आता वेळ निघून गेली होती. आजही या सर्व चुका सुधारण्याचे प्रयत्न व्हायला पाहिजे आहेत. पण भारतातले व परदेशात गेलेले हुषार भारतीय डोळे उघडून बघायला तयार नाहीयेत. शेखर गुप्ता तर चक्क कबूल करताहेत की, स्वात्रंत्र्यानंतर प्रथमच काही लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळत होता. पण आम्हाला काही गोष्टी बघायच्याच नव्हत्या. (ही लिंक नेमकी सापडत नाहीये.) शेखर गुप्ता जे भाजपाच्या भक्त गणांपैकी नाहीत त्यांची वक्तव्ये. https://www.esakal.com/saptarang/saptrang-article-shekhar-gupta-169211 https://www.esakal.com/sampadakiya/editorial-article-shekhar-gupta-198038 थोडसं धाग्याच्या विषयाबाबत अगदी आत्ताची महाराष्ट्रातील निवडणूक लक्षात घेतली तरी असं दिसतंय की काँग्रेस व राष्ट्रवादीचा जनाधार कमी झालाय. तसेच भाजप व शिवसेनेचा जनाधार सुध्दा या निवडणूकीत कमी झालाय. पण भासवलं मात्र असं जातंय की काँग्रेस व राष्ट्रवादीने भाजपाचा जनाधार कमी करून आपला वाढवलाय. खोलात गेलं तर लक्षात येतंय की १९८० पासून काँग्रेस व राष्ट्रवादीचा एकत्रीत जनाधार कमी होण्याचा कल यावेळीही चालूच राहिलेला आहे. भाजप बंडखोरांचा अजून डाटा तयार झाला नाहीये त्यामुळे टेबल तयार करू शकलो नाही. पण जो अभ्यास झालाय त्यावरू असं लक्षात येतंय की यावेळेसही भाजपाचा जनाधार वाढलेलाच आहे. पण आता अभ्यास थांबवतोय. :) मुंबई महानगर पालिकेची निवडणूकीपर्यंत आराम करणार आहे. पक्ष १९८० १९८५ १९९० १९९५ १९९९ २००४ २००९ २०१४ २०१९ काँग्रेस(इं) ४४.५ ४३.४० ३८.२० ३१.०० २७.२० २१.१० २१.०० १८.१० १५.८७ काँग्रेस(चड्डी) २०.५० १७.३० राष्ट्रवादी २२.६० १८.७० १६.४० १७.४० १६.७१ एकूण ६५.०० ६०.७० ३८.२० ३१.०० ४९.८० ३९.८० ३७.४० ३५.५० ३२.५८
थोडक्यात १९८० पासून काँग्रेसचा जनाधार कमी होत असून त्याला अपवाद १९९९ चा आहे. पण त्यानंतरही काँग्रेस व राष्ट्रवादी यांचा जनाधार घसरत चाललेला असून तो ट्रेंड याही निवडणूकीत कायम आहे. भाजप बंडखोरांची मते लक्षात घेतली तर भाजपाचा जनाधार घटलेला नसून तो वाढलाय असं दिसतयं. यावेळचे सत्तांतर पाहिल्यावर मला तरी प्लासीची लढाईच आठवतेय.
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Sun, 12/01/2019 - 13:20 नवीन
माझं याबाबतीतील एक गृहीतक सांगतो, केवळ निरीक्षणावर आधारित, विदा नाही. स्वातंत्र्य मिळल्याबरोबर गांधी आणि नेहरू या नावाचं गारूड लोकांवर होते. त्यावेळेस काँग्रेसचा जनाधार चांगला होता. परंतु आणीबाणीपासून जी पिढी मोठी होत आहे त्यामध्ये काँग्रेसला जनाधार कमी आहे.. कारणे माहीत नाहीत. परंतु मी बऱ्याच ठिकाणी पाहतो, जिथे म्हातारे अजूनही काँग्रेस घुं असतात तिथे पुढची पिढी मात्र कुठेतरी दुसरीकडेच असते. .जशिजशी ही पिढी मतदारामधून कमी होत जातेय तसा प्रत्येक निवडणुकीगणिक काँग्रेसी पक्षांचा जनाधार कमी होतोय. अपवाद - राष्ट्रवादी, कारण राष्ट्रवादीचा मुळात विचारच वेगळा आहे.. त्याचा आणि काँग्रेसी विचारसरणीचा नावाव्यतिरिक्त काहीही संबंध नाही.
↩ प्रतिसाद: शाम भागवत
च
चौकस२१२ Wed, 12/04/2019 - 07:26 नवीन
"राष्ट्रवादीचा मुळात विचारच वेगळा आहे" नक्की कसा ? जाणून जियल आवडले, एक राष्ट्रीय इतिहास असलेला आणि गांधी कुटुंबाचा पक्ष दुसरा त्यात "आपलं जमत नाही" म्हणून पवार कुटुंबाचा "सवता सुभा" प्रादेशिक पक्ष ! उद्या शरद पवार "निवृत्त" झाले कि सगळी मंडळी कांग्रेस कडे स्वगृही जातील एकदा काही कामाने इस्लामपूर ( जयंत पाटीलांचा भाग , सांगली जवळ) होतो गावातील पाटलांच्या कडे काही काम होता म्हणून बसलो होतो ते पाटील जुने राजारामबापूंचे sathi त्यादिवशी समाजवादी ( कि त्यावेळी ते काँग्रेस मध्ये होते आठवत नाही ) आमदार डॉक्टर कुमार सप्तर्षी त्यानं भेटायला आले ,, सगळ्यांच्या बोलण्यातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी मद्ये काही फार फरक आहे असे वाटले नाही !
↩ प्रतिसाद: आनन्दा
य
यशोधरा Sun, 12/01/2019 - 13:53 नवीन
एक वेळ राष्ट्रवादीचा जनाधार जरा टिकला तरी चालेल पण काँग्रेसचा जनाधार कमी काय, पूर्ण नष्ट झाला तरी चालेल. बुद्धीभेद करणारे लोक. दुर्दैवाने, शिवसेनेच्या वागण्याने आणि सद्ध्याच्या राजकीय कोलांट्या उड्या आणि सत्तेसाठी स्वतःच्या धोरणांना हरताळ फासण्याच्या वृत्तीमुळे त्यांचाही जनाधार कमी होईल आता. भाजपाच्या चुका किंवा चुकीची पावलं त्यांनी लवकर कबूल करून सुधारावीत. कारण एक सामान्य मतदार म्हणून माझ्या मत असं आज की महाविकास आघाडी राज्यापुरती ठीक, पण त्यांच्या ताब्यात मला देश द्यायला आवडणार नाही.
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत Sun, 12/01/2019 - 16:00 नवीन
जाॅनविक्क साहेब, तुमच्या प्रेमळ विनंतीला मान देऊन यशोधराताईंनी मत मांडलंय. :)
↩ प्रतिसाद: यशोधरा
आ
आनन्दा Sun, 12/01/2019 - 16:28 नवीन
__/\__
↩ प्रतिसाद: शाम भागवत
य
यशोधरा Sun, 12/01/2019 - 16:40 नवीन
आपल्या धाग्यावरुन रजा घ्यावी की काय? :)
↩ प्रतिसाद: शाम भागवत
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा