जवळून अनुभवलेले क्वारंटाईन - COVID-19
फारच निराशा वाटतेय आज
आमच्या इथे नवग्रह मंदिरापाशी सापडले तसेच २ बिल्डिंग सोडून च्या बिल्डिंग मध्ये सापडले
आत्ता किराणा आणि दूध वाल्यांचा पण संशय यायला लागलाय चांगली गोष्ट म्हणजे सगळे बंद आहे
सामान संपत चालले आहे
सामान कसे आणावे दूध तर जास्त साठवू शकत नाही ना ऑनलाईन आमच्या भागात उपलब्ध नाही
अजूनही इथे औषध फवारणी झाली नाहीये आणि घरपोच देण्याची व्यवस्था पण नाही नुसतेच बंद करून ठेवलेय
सदाशिव पेठेत पण मेडिकल दुकानात सापडले त्यामुळे मेडिकल पण ३ दिवस बंद आहेत
काय होणार कळत नाही
******************************
प्राजक्ता २१ यांचा हा प्रतिसाद वाचून बरेच दिवस टंकाळा करत असलेला अनुभव शब्दबद्ध करूयाच असा विचार केला.
लॉकडाऊनच्या दुसर्याच आठवड्यात आमच्या सोसायटीमध्ये एक पेशंट सापडला. मी जिथे राहत आहे तेथील अनेक रहिवासी "अत्यावश्यक सेवा" गटातील असल्याने सोसायटीमध्ये लवकरच करोना पेशंट सापडेल याची शक्यता वाटत होतीच. त्याप्रमाणे एक दिवस संध्याकाळी बातमी आली की अमुक अमुक फ्लॅटमधील तमुक तमुक सरांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे.
नंतर एकच धांदल उडाली आणि सोसायटीचे सर्वच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुप खर्याखोट्या माहितीने भरून वाहू लागले.
"नक्की काय झाले आहे" ही माहिती खूप कमी लोकांना होती आणि बहुदा त्यांना या कठीण परिस्थितीत "सबसे तेज" वगैरे व्हायचे असावे.. करोना पॉझिटिव्ह असलेल्या सरांचा मेडिकल रिपोर्टच कुणीतरी ग्रुपवर पाठवला. मात्र या मेसेजकडे लोकांनी दुर्लक्ष केले असावे कारण थोड्यावेळाने चर्चा सुरू झाली, की ज्या सरांना करोना झाला आहे त्यांचे नांव गुप्त ठेवायला हवे वगैरे वगैरे..
मी या सगळ्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करून ऑफिसचे काम करण्यात गुंतवून घेतले.
यथावकाश कॉर्पोरेशनचे लोक गेटवर पहार्यासाठी येऊन बसले आणि सोसायटीच्या सगळ्या वाटा रोखल्या गेल्या. एक फ्लेक्सही आणून लावला. त्यावर "या परिसरातील एक रहिवासी करोनाबाधीत आढळल्याने या भागातील प्रवेशावर सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्बंध घालण्यात आले आहेत" अशी सूचना आणि "उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल" असा लाल रंगात आदेशही रंगवला होता. सोबत आपत्कालीन विभाग, तक्रार निवारण अधिकारी यांचे फोन नंबर आणि एक ट्विटर हँडल अशी सर्व माहिती होती.
सोसायटीमधील कांही लोकांनी पुढाकार घेऊन एक टास्क फोर्स स्थापन केला आणि पुढील पद्धतीने क्वारंटाईन / आयसोलेशनची काळजी घेतली.
१) प्रत्येक बिल्डिंगचे लिडर ठरवले. सोसायटीत १५ बिल्डिंग आहेत. त्या १५ लिडर्सनी मिळून आपआपल्या बिल्डींगमध्ये फ्लोअर लिडर ठरवले. सोसायटीच्या ग्रुपवर सूचना देऊन सामुदायिक गोंधळ व प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तरे देण्याऐवजी; सर्व महत्वाच्या सूचना त्या त्या लिडर्सना दिल्या गेल्या आणि बिल्डिंगनुसार त्या पुढे सरकवल्या गेल्या.
२) भाजी, दूध यांची सोय सोसायटी / कॉर्पोरेशनने मिळून केली आणि शक्य आहे त्या सर्व प्रकारच्या भाज्या, रोजचे दूध, दही, ताक वगैरे सोसायटीच्या गेटवर मिळेल याची व्यवस्था केली. अॅमेझॉन, बिग बास्केट आणि सुपर डेली वगैरे सर्व डिलिव्हरी एजंट्सना गेटपाशीच थांबवले गेले. याची सुरूवात खरेतर लॉकडाऊन नंतर लगेच झाली होती, त्यावेळी मेन गेट उघडे असायचे. पॉझिटिव्ह पेशंट सापडल्यानंतर गेट बंद झाले व वस्तूंची डिलिव्हरी गेटवरून होऊ लागली.
३) सोसायटीमध्ये राहणार्या वय वर्षे ६० च्या वरच्या सर्व ज्येष्ठ लोकांची एक यादी करण्यात आली आणि त्यांना असलेले आजार विस्तृतपणे नोंदवून त्याचा एक डेटाबेस तयार केला.
यानंतरच्या आठवड्यात आंम्ही राहतो त्या बिल्डिंगमध्येच आणखी एक पॉझिटिव्ह केस सापडली.
मग आमच्यासाठी नियम आणखी कडक झाले. पूर्वी बिल्डिंग ते मेन गेट असे जाऊ शकत होतो; ते ही बंद झाले. लोकांना घरातून बाहेर पडायचे नाही याच्या सक्त सूचना दिल्या गेल्या. लिफ्ट बंद करण्यात आली आणि जिन्याच्या प्रवेशद्वाजवळ बॅरीकेट रचून जिना बंद करण्यात आला.
यानंतर जे सामान आंम्हाला गेटपर्यंत जाऊन घ्यावे लागत असे ते सामान घरात कसे मिळेल याची आखणी करण्यात आली आणि बिल्डिंग लिडर्सनी सिक्युरीटी गार्डच्या मदतीने रोज आमच्या बिल्डिंगचे सामान गेटपासून तळमजल्यापर्यंत आणले जाईल याची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर क्रमाक्रमाने फ्लोअर लिडर तळमजल्यावर येत आणि आपल्या मजल्यावरचे सामान घेऊन जात.
साधारणपणे अशी व्यवस्था होती..
१) संपूर्ण सोसायटीसाठी, भल्यापहाटे दुधाच्या पिशव्या तर दुपारी कधीतरी भाजीच्या पिशव्या सोसायटी गेटवर पोहोचत असत. (भाजी व फळांची लिस्ट एक दिवस आधी गोळा केली जाई)
२) त्यातल्या आमच्या व पहिला पेशंट सापडलेल्या बिल्डिंगच्या पिशव्या वेगळ्या करून सिक्युरिटी गार्ड त्या त्या बिल्डिंगच्या तळमजल्यावर पोहोचवत असत.
३) सिक्युरिटी गार्ड कडून हिरवा झेंडा मिळाला की बिल्डिंग लिडर पहिल्या मजल्यावरच्या फ्लोअर लिडरला सूचना देई की तळमजल्यावरून सामान घेऊन जाणे. पहिल्या मजल्याचा लिडर सामान घेऊन घरात पोहोचला की मग दुसर्या मजल्यावरचा लिडर बाहेर पडून तळमजल्यावरून सामान घेऊन जाई.. अशा प्रकारे एका मजल्यावरच्या लोकांचा दुसर्या मजल्यावरील लोकांशी १००% संपर्क टाळला गेला.
हे सर्व कम्युनिकेशन वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप बनवून केले गेले. (सोसायटी लिडर्स, बिल्डिंग लिडर्स आणि फ्लोअर लिडर्स)
यथावकाश सोसायटीवर आलेले निर्बंध आणखी कोणत्याही पॉझिटिव्ह केस शिवाय हटवले गेले.
नंतरची चांगली बातमी म्हणजे आमच्या सोसायटीमधील दोन्ही पॉझिटिव्ह पेशंट बरे होऊन घरी परतले. त्यावेळी त्यांचे स्वागत घंटा / थाळ्या वाजवून आणि रोषणाई करून करण्यात आले.*********************************************************** आता हे झाले सोसायटीच्या पातळीवर.. आपल्या घरामध्ये आपण काय करू शकतो याचा विचार केला आणि पुढील गोष्टी ठरवल्या. तुम्हाला त्या उपयोगी पडतील अशी अपेक्षा आहे. घरी महत्वाच्या वस्तूंची साठवणूक, घरकामाची विभागणी वगैरे मुद्दे सोडून देऊ.. आत्तापर्यंत सर्वांना याचा अंदाज आला असेलच. १) सोसायटीमध्ये जे लोकं पुढाकार घेऊन सर्व गोष्टी मॅनेज करत आहेत त्यांना सहकार्य करा. त्यांना सर्व गोष्टी समजायला थोडा वेळ लागेल त्यामुळे लगेच त्यांच्या कामावर टीकाटिप्पणी करण्याऐवजी थोडा वेळ द्या. २) जगभरात कशी वाईट परिस्थिती आहे आणि भारतात / महाराष्ट्रात / पुण्यात / गल्लीत किती रूग्ण सापडले वगैरे अनावश्यक ब्रेकिंग न्युजचा ताण येत असेल तर सरळ टीव्ही बंद करा आणि दुसरे एखादे हलके फुलके चॅनेल किंवा पुस्तकं यांच्याकडे मोर्चा वळवा. ३) सतत टीका करणारे, फेसबुकवर वचावचा भांडणारे आणि नेहमी निगेटिव्ह राहणार्या लोकांना फाट्यावर मारा. आपली मनस्थिती उत्तम ठेवा. ४) होम वर्कआऊट सारखे एखादे अॅप मिळवा आणि शक्य तितका व्यायाम करा. मला या अॅपबद्दल सायकल सायकल ग्रुप / निनाद आचार्य कडून कळाले. ५) आपल्या आजुबाजूच्या मेडिकल / किराणा दुकानदारांचे नंबर हाताशी ठेवा. क्वारंटाईन असताना ते आपल्याला आवश्यक त्या वस्तू सोसायटी गेटवर पोहोचवू शकतात. ६) हात धुवत राहणे आणि बाहेरून घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुणे / आंघोळ व सर्व कपडे धुणे यांत कोणताही आळस करू नका. ७) क्वारंटाईन दरम्यान झोपेचे शेड्युल सांभाळणे अत्यंत आवश्यक आहे. मी सुरूवातीला पहाटे ४ पर्यंत जागे राहून वेब सिरीज बघणे, पुस्तके वाचणे वगैरे उद्योग केले पण आता ते दुरूस्त करण्याचा प्रयत्न करतो आहे. ****************************************************** एकूण काय.. थोडे दिवस क्वारंटाईन मध्ये काय होणार हा प्रश्न पडला, पण सोसायटीमधील दक्ष नागरिकांच्या मदतीने कोणाचीही कोणतीही गैरसोय झाली नाही. सर्वांनी आपआपल्या परीने प्रश्नांवर मार्ग शोधले व सर्वांनी शक्य तितके सहकार्य केले. हा झाला माझा अनुभव.. तुमचेही अनुभव लिहा आणि आपल्या सर्वांच्या उपयोगी कांही सूचना असतील तर नक्की सांगा. ******************************************************
नाही.>>>तसेच एरिया सील केल्यावर आसपासची दुकानं पण बंद असतात ना मग सामानाची व्यवस्था कुठून केलीत ?फक्त आमची सोसायटी सील केली होती. सोसायटी जवळची म्हणजे साधारण ५०० / ७०० मीटरपेक्षा लांब असलेली दुकाने सुरूच होती. त्या भागातील दुकानदारांचे मोबाईल नंबर आमच्यासोबत शेअर केले गेले. किराणा मालाची व्यवस्था त्या त्या दुकानदारांनी केली. भाजी आणि दुधाच्या पिशव्या अशाच पध्दतीने उपलब्ध करून देण्यात आल्या. हे सर्व सामान गेटमधून आत दिले जात होते. सोसायटीच्या आतून कोणालाही बाहेर जाण्याची आणि कोणालाही बाहेरून आत येण्याची परवानगी नव्हती.>>>सामानाचा पुरवठा व्यवस्थित होण्यात प्रशासनाची कितपत मदत झाली ? या २०-२१ दिवसाच्या काळात पालिका /पोलीस सोसायटीत येत होते का ? सर्व रहिवाशांच्या तब्येतीचे अपडेट्स घेतले जात होते का ?फळभाजी विक्रेता आणि किराणा दुकानदारांचे नंबर वगैरे व्यवस्था प्रशासनाने केली. पालिकेचे अधिकारी सोसायटीला नियमीतपणे भेट देत होते.. पोलिस पाहिले नाहीत. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या येऊन सॅनिटायझेशन, धूर मारणारी यंत्रे आणून फ्युमिगेशन असे बरेच कांही सतत सुरू होते. वयस्कर लोकांच्या तब्बेतीचे अपडेट घेतले जात असावेत. आमच्या तब्बेतीचे अपडेट्स कुणीही विचारले नाहीत.>>>तसेच बरे होवून परतलेल्या रुग्णांचे स्वागत केले गेले असे तुम्ही लिहिले आहे पण हाच दृष्टीकोन नेहमी होता आणि आहे का ? म्हणजे जेव्हा त्यांच्यामुळे आपली सोसायटी/बिल्डिंग सील झाल्याचे कळाले तेव्हा काय प्रतिक्रिया होती ?आणि आता त्यांच्याशी वा त्यांच्या कुटूंबियांशी इतरांचे वर्तन कसे आहे ?सोसायटीमध्ये राहणारे बहुतांश लोक अत्यावश्यक सेवेत असल्याने आजिबात नकारात्मक सूर उमटला नाही. "त्यांच्यामुळे ही परिस्थिती आपल्यावर ओढवली आहे" असा विचार मुळीच केला गेला नाही. उलट एकदा एका पेशंटच्याच घरी कोणत्यातरी वस्तूची आवश्यकता असताना तातडीने त्या त्या गोष्टी त्यांच्याकडे पोहोचवल्या गेल्या. सिक्युरिटी गार्डच्या जेवणाची काळजी सोसायटीमधील सर्वांनी उत्साहाने पार पाडली आणि जनरल औषधे किंवा कांहीही गोष्टींची आवश्यकता लागल्यास सर्वांनी बिन्धास्त सोसायटी गृपवर मेसेज पाठवून सोसायटीमध्येच सगळ्या गोष्टींची सोय शोधली.सिक्युरिटी गार्ड्सनी घरी जाण्याचे प्रमाण कमी केले होते. क्लब हाऊसमध्ये त्यांच्या विश्रांतीची सोय केली होती.>>>तसेच जर फ्लोअर लीडर पुरुष असतील तर त्या फ्लोरवरील स्त्रियांना वैयक्तिक आरोग्याशी संबंधित जिन्नस मागवताना संकोच वाटला असेल काय ? यातून कसा मार्ग काढला ?सर्वसाधारणपणे स्त्रिया वैयक्तिक आरोग्याशी संबंधित गोष्टींची इतकी हातातोंडाची लढाई करत नाहीत. पण जर कांही अडचणी आल्या असतील तर ते प्रश्न त्यांच्या त्यांच्या ग्रुपद्वारे सोडवले गेले असतील. कारण मेन ग्रुपवर असा कांहीच विषय निघाला नाही.>>>एकूणात हा सगळा फार कठीण प्रकार आहे असे दिसते. त्यातही २०-२१ दिवस म्हणजे आणखीच कठीण. लॉकडाऊन होते म्हणून त्यातल्या त्यात ठीक असे कदाचित म्हणता येईल. एकदा लॉकडाऊन उठले आणि लोक कामावर जावू लागलेले असताना जर एखाद्या सोसायटीत रुग्ण सापडला तर असे सील कसे करणार ?आता असे आहे.. ही अभूतपूर्व परिस्थिती आपण आपल्या आयुष्यात पहिल्यांदा बघत आहोत आणि प्रार्थना करूया की हे सगळे लवकर संपेल. आपण / सरपंच / नगराध्यक्ष / महापौर / आमदार / मुख्यमंत्री / पंतप्रधान / राष्ट्रपती हे सर्वजण ही परिस्थिती पहिल्यांदाच बघत आहेत. लॉकडाऊन होईल आणि महिनोन्महिने रेल्वे / विमान सेवा बंद राहतील असे आपल्याला कधीतरी वाटले होते का..? ९/११ ला अमेरिकेने सर्व विमाने विमानतळावर उतरवली हे बहुतेक अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदा घडले होते. आज भारतात तसेच घडते आहे. "लॉकडाऊन होऊन सोसायटी सील कसे करणार..?" हे जसे जानेवारी २०२० मध्ये कुणालाच माहिती नव्हते त्याच प्रमाणे "लोकं कामाला जाऊ लागले आणि रूग्ण सापडला की सोसायट्या कसे सील करणार..?" हे त्या त्या वेळी बघू आणि उत्तरे शोधू.बरोबर.. आपण सुशिक्षीत आहोत आणि सरकार / समाजाकडून सतत अपेक्षाच करण्यापेक्षा समाजाला आपआपल्या कुवतीनुसार नक्की परत देऊ शकतो. त्यामुळे किमान आपल्यासारख्या लोकांनी कुणाकडूनच काहीच अपेक्षा करू नये.तसंही मोदींनी सांगितलं आहेच की तुम्ही तुमचं काय ते बघां (आत्मनिर्भर व्हा)..तुमचा हा निष्कर्ष म्हणजे सिलेक्टिव रिडींगचे उत्तम उदाहरण आहे. अर्थात माझा देश उद्योग आणि उत्पादनात आत्मनिर्भर व्हायचा प्रयत्न करत असेल तर त्याचे मला आजिबात वाईट वाटणार नाही. अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मानभावीपणा करत कुणाला अशा एखाद्या गोष्टीची टवाळी करावी असे वाटत असेल तर त्याने स्वत:च्या निष्ठा नक्की कुणाच्या पायावर वाहिलेल्या आहेत हे नक्की तपासून पाहण्याची आवश्यकता आहे - हे माझे वैयक्तिक मत.