Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आठवणींतील काही : सुरस आणि चमत्कारिक

ह
हेमंतकुमार
गुरुवार, 11/05/2020 - 16:36
💬 104 प्रतिसाद
बातम्या हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होऊन बसलेला आहे. सध्या तर वृत्तमाध्यमांचा अक्षरशः महास्फोट झालेला आहे. आपण विविध बातम्या रेडिओ, वृत्तपत्रे, टीव्ही आणि आंतरजाल या सर्व माध्यमांमधून ऐकत, वाचत किंवा पाहत असतो. असा एखादाही क्षण जात नसेल, की जेव्हा एखादी बातमी आपल्या पुढे येऊन आदळायची थांबली आहे. काही वेळेस तर हे अजीर्ण होते. एकंदरीत बातम्यांमध्ये नको एवढी संख्यात्मक वाढ झाल्यामुळे त्यांचा गुणात्मक दर्जा मात्र यथातथाच झालेला आहे. या मुद्द्यावर आपण अन्यत्रही यापूर्वी चर्चा केलेली आहे. पण आज तो विषय नाही. आज मी तुम्हाला टीव्हीपूर्व काळाकडे घेऊन जाऊ इच्छितो. तेव्हा सामान्य माणसासाठी बातम्या समजण्याचे दोनच मुख्य स्त्रोत होते - एक रेडिओ आणि दुसरी वृत्तपत्रे. रेडिओचा बातम्याप्रसार हा तसा पहिल्यापासूनच संयमित राहिलेला आहे. ते त्या माध्यमाचे अंगभूत वैशिष्ट्य आहे. वृत्तपत्रांमध्ये मात्र अगदी आमूलाग्र बदल दशकांगणिक झालेले दिसतात. त्याकाळी वृत्तपत्रे कमी पानांची असत. मुख्य म्हणजे वृत्तपत्राचे पहिले पान भल्यामोठ्या पानभर जाहिरातीने सुरू न होता खरोखरच महत्त्वाच्या बातम्यांनी उठून दिसे. सकाळी उठल्यानंतर घरी आलेले वृत्तपत्र आधी आपल्या ताब्यात यावे यासाठी कुटुंबीयांमध्ये देखील स्पर्धा असायची. बातम्या आवडीने, चवीने आणि बारकाईने वाचल्या जात. अशा असंख्य बातम्या आतापर्यंतच्या आयुष्यात वाचल्या गेल्या आहेत. संस्कारक्षम वयामध्ये वाचलेल्या बातम्या अनेक प्रकारच्या होत्या. काही नेहमीच्या किरकोळ तर काही ठळक घडामोडींच्या. काही सुरस तर काही चमत्कारिक; काही थरकाप उडवणाऱ्या तर काही मनावर खोलवर परिणाम करणाऱ्या. अशा काही बातम्यांच्या निवडक आठवणी आज तुमच्यापुढे मांडत आहे. शैक्षणिक वयामध्ये आकर्षक वाटलेल्या अनेक बातम्यांची कात्रणे कापून ठेवलेली होती खरी, परंतु कालौघात आता ती कुठेतरी गडप झालेली आहेत. आता जे काही लिहीत आहे ते निव्वळ स्मरणावर आधारित आहे. त्यामुळे तपशीलात थोडाफार फरक झाल्यास चूभूदेघे. सुरुवात करतो एका रंजक वृत्ताने. अंदाजे ४० ते ४५ वर्षांपूर्वीचे. बातमीचा मथळा असा होता: “आंतरराष्ट्रीय टक्कलधारी संघटनेचे अधिवेशन” ‘ या संघटनेचे एक विशेष अधिवेशन अमुक तमुक ठिकाणी भरले होते. त्या परिषदेचे उद्घाटन भारताचे (तत्कालीन) राजदूत इंद्रकुमार गुजराल यांनी केले होते. या परिषदेत माणसांच्या- म्हणजे विशेषतः पुरुषांच्या- टक्कल या विषयावर रोचक चर्चा झाली. देशोदेशींचे अनेक टक्कलधारी लोक या परिषदेस आवर्जून हजर होते. त्यातील एका विशेष कार्यक्रमात विविध सहभागींना त्यांच्या डोक्‍यावरील टकलाच्या आकार व तजेल्यानुसार ‘सनशाइन’, ‘मूनशाइन’ अशा मानाच्या पदव्या देण्यात आल्या ! आपल्या अध्यक्षीय भाषणात गुजराल म्हणाले, की माझ्या घरात टक्कलाची परंपरा अनेक पिढ्यांपासून चालू असून मला तिचा सार्थ अभिमान वाटतो. एकूणच टक्कल हे माणसाचे वैगुण्य न समजता वयानुरूप होणारा शोभिवंत बदल समजण्यात यावा या मुद्द्यावर चर्चेचे सूप वाजले.’ ही खूपच रंजक बातमी होती यात वाद नाही. आतापर्यंत मी अशी बातमी एकदाच वाचली. त्यानंतर या संघटनेची वार्षिक अधिवेशने वगैरे झाली का नाही, याची काही कल्पना नाही. जाणकारांनी जरूर भर घालावी. एक बातमी आठवते ती शहरी स्त्रियांच्या वेशभूषेतील क्रांतिकारी बदलाबद्दलची. किंबहुना एका घटनेची जुनी आठवण म्हणून ती छापली गेली होती आणि माझ्या वाचनात आली. प्रत्यक्ष ती घटना घडल्याचा काळ माझ्या जन्मापूर्वीचा आहे. तो सामाजिक बदल आहे, शहरी स्त्रीने नऊवारी साडी झुगारून देऊन पाचवारी साडी आपलीशी केल्याचा. हे ज्या काळात घडले तेव्हा वृत्तपत्रातून अक्षरशः विविध विचार आणि मतांचा गदारोळ झालेला होता. त्यामध्ये स्त्रिया संस्कार विसरल्या इथपासून ते संस्कृती बुडाली, इथपर्यंत अगदी चर्वितचर्वण झालेले होते ! प्रत्यक्ष जरी तो काळ मी अनुभवलेला नसला, तरी या जुन्या आठवणींच्या बातमीने देखील माझ्या नजरेसमोरून त्याकाळचे वास्तव तरळून गेले. अजून एक रोचक बातमी म्हणजे एकदा वृत्तपत्रात जुन्या काळातील, म्हणजे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील लग्नपत्रिकांच्या आठवणींची बातमी तत्कालीन पत्रिकांसह छापून आली होती. त्यातील अगदी लक्षात राहिलेला एक मुद्दा फक्त लिहितो. तेव्हाच्या काही लग्नपत्रिकांमध्ये लग्न करण्याचा मूलभूत हेतू अगदी स्पष्टपणे नमूद केलेला असे ! त्याचा नमुना असा आहे: “आमचे येथे श्री कृपेकरून हा आणि ही यांचा शरीरसंबंध करण्याचे योजले आहे आहे.... तरी आपण वगैरे वगैरे वगैरे.” लग्नपत्रिकांचे बदलते स्वरूप आपण सर्वांनीच अनुभवलेले आहे. मात्र ही अजब व परखड वाक्यरचना वाचून खरोखर करमणूक झाली. तारुण्यातील एक सर्वाधिक लोकप्रिय विषय म्हणजे क्रिकेट. त्याकाळी क्रिकेटच्या सामन्यांचे रेडिओवरील धावते समालोचन अगदी मन लावून ऐकले जाई. ते मनसोक्त ऐकलेले असले तरीही दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात त्याबद्दल जे सगळे प्रसिद्ध होई, तेही अगदी अथपासून इतिपर्यंत वाचले जाई. त्यावरील चर्चाही अख्खा दिवसभर होई. त्यामुळे क्रिकेट संदर्भातील एक दोन आठवणी तर लिहितोच. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि अगदी मनावर कोरली गेलेली बातमी आहे ती म्हणजे इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानावर झालेल्या भारताच्या दारुण पराभवाची. त्या कसोटी सामन्यामध्ये आपला दुसरा डाव चक्क सर्वबाद ४२ वर संपला होता आणि जवळजवळ दोनशेहून अधिक धावांनी आपला पराभव झालेला होता. तेव्हा आमच्या आठवणीतील हा सर्वात दारुण पराभव होता. मुद्दा तो नाही. मुद्दा बातमी कशी छापली होती हा आहे. सर्वसाधारणपणे वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावर सर्वात वर काय असते ? तर अगदी ठळक टाईपात त्याचे स्वतःचे नाव. ही घटना घडली त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात “भारत सर्वबाद ४२” ही बातमी खुद्द वृत्तपत्राच्या नावाच्या डोक्यावर अशी सर्वोच्च स्थानी छापलेली होती. माझ्या आयुष्यात अशा प्रकारची बातमी मी प्रथमच पाहत होतो त्यामुळे ती कायमस्वरूपी लक्षात आहे. त्या घटनेपूर्वी भारत कसोटी सामन्यात कधीही ५० च्या आत सर्वबाद झालेला नव्हता. मात्र अन्य काही देशांनी तो अनुभव चाखलेला होता. तेव्हा भारतही आता त्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला, असे बातमीत रोचकपणे लिहिलेले होते. बाकी संपूर्ण संघाच्या 42 धावसंख्येतील निम्म्या धावा एकट्या एकनाथ सोलकर यांनी काढलेल्या होत्या आणि त्यामध्ये एक चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता, हेही बारकावे आज आठवतात. अजित वाडेकरांच्या क्रिकेट संघाने वेस्ट इंडीजमध्ये जाऊन कसोटी मालिका जिंकली होती. कदाचित तो अभूतपूर्व प्रसंग असावा. त्यानंतर जेव्हा आपला संघ मायदेशी परतला तेव्हा झालेल्या त्यांच्या स्वागताच्या बातम्या बराच काळ झळकत होत्या. त्यांचेही तेव्हा खूप अप्रूप वाटले होते. ब्लेझर घातलेले फोटोतले हसतमुख वाडेकर आजही चांगले आठवतात. आपल्या देशाच्या इतिहासात 1975 च्या दरम्यान पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली होती. ती प्रत्यक्ष लादण्यापूर्वीची रेडीओवरील एक बातमी चांगली आठवते. रात्री ८ च्या बातम्या लागलेल्या आणि एकीकडे रेडिओची खरखर चालू होती. त्यात बातमी सांगितली गेली, की अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान इंदिरा गांधी यांची लोकसभेवरील निवड अवैध ठरवली. रेडिओवर बातम्या सांगण्याची एक पद्धत असते. ती म्हणजे आधी ठळक बातम्या, मग विस्ताराने आणि शेवटाकडे पुन्हा एकदा ठळक बातम्या. या तीनही वेळेस मी तो ‘अवैध’ शब्द ऐकला. अगदी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा पटकन नीट अर्थबोध झाला नाही. आणि नंतर मी घरी विचारले सुद्धा की ‘रद्द केली’ असे न म्हणता ते ‘अवैध’ का म्हणत आहेत ? नंतर पुढच्या आयुष्यात अनेक अवैध गोष्टी पाहण्यात, वाचण्यात आणि ऐकण्यात आल्या, हा भाग अलाहिदा. सध्या वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर अगदी वरच्या भागात मधोमध राजकीय व्यंगचित्र असणे कालबाह्य झालेले आहे. परंतु एकेकाळी दर रविवारच्या अंकात तर ते हटकून असे. राजकीय आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या संदर्भातील एक व्यंगचित्र त्याकाळी खूप गाजले होते. ते आठवते. तेव्हा नुकताच काही कारणामुळे अमेरिकेच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर नवीन राष्ट्राध्यक्ष निवडून आले होते. पहिल्या अध्यक्षांच्या कारकिर्दीत हेन्री किसिंजर हे परराष्ट्रमंत्री होते. पुढे नव्या अध्यक्षांनीही या गृहस्थांना त्याच मंत्रिपदी कायम ठेवले. या अनुषंगाने एक सुंदर व्यंगचित्र पहिल्याच पानावर ठळकपणे आले होते. त्यात हेन्री किसिंजर मस्तपैकी हात उडवून म्हणताहेत, की “ते गेले आणि हे आले, मला कुठे काय फरक पडलाय ? मी आहे तसाच मस्त आहे !” पुढे या घटनेचा दाखला अनेकजण तत्सम प्रसंगांत देत असत. अशी मार्मिक व्यंगचित्रे त्याकाळात बऱ्यापैकी बघायला मिळत. शालेय वयात असताना ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये एक अत्यंत वाईट बातमी वाचनात आली होती. बातमी अशी होती: “मासिक पाळी दरम्यान शरीर संबंधास पत्नीने नकार दिल्यामुळे पतीकडून तिची हत्या “ शरीरसंबंध या विषयाबाबत धूसर आणि चाचपडते ज्ञान असण्याचे ते माझे वय. तेव्हा ही बातमी वाचली आणि एकदम सुन्न झालो. ठराविक मासिक काळातील संबंधास नकार हा बातमीतला भाग माझ्या दृष्टीने तेव्हा न समजण्यातला होता. परंतु एवढ्या कारणावरून एक पुरुष चक्क आपल्या बायकोचा खून करतो याचा जबरदस्त हादरा मनाला बसला. त्यानंतरच्या आयुष्यात दहा वर्षातून एखादी या स्वरूपाची बातमी वाचनात आली; नाही असे नाही. परंतु सर्वप्रथम अशी बातमी वाचताना त्या वयात झालेली स्थिती आणि त्यात ते दिवाळीचे दिवस, या गोष्टी आजही मनाला कुरतडतात. एखाद्या मोठ्या कालखंडातील बातम्यांचा लेखाजोखा सादर करणे हा काही या लेखाचा उद्देश नाही. तेव्हा आता माझ्या आठवणी थांबवतो. त्याचबरोबर तुम्हालाही एक आवाहन करीत आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाने आपापल्या आयुष्यात अशा रोचक, सुरस, धक्कादायक वगैरे प्रकारच्या बातम्या वाचलेल्या अथवा ऐकलेल्या असणारच. याबद्दलचे तुमचेही अनुभव लिहा. माध्यमांत अप्रकाशित घटनांबद्दलही लिहायला हरकत नाही. पण एक करा... नजीकच्या भूतकाळाबद्द्ल नका लिहू. तुमच्या आयुष्यात किमान वीस वर्षे मागे जा आणि तेव्हाचे असे जे काही आठवते ते लिहा. गुगल फिगल न करता आठवतंय तसेच लिहा. त्यातच खरी मजा असते. त्यातून स्मरणरंजन होईल. तेच या धाग्याचे फलित असेल. ************************************************

प्रतिक्रिया द्या
55659 वाचन

💬 प्रतिसाद (104)
व
विजुभाऊ Fri, 11/06/2020 - 07:07 नवीन
कपिल देव ने पाकिस्तानात केलेल्या पहिल्या मॅचमधील कामगिरीमुळे म टा ने बातमीचे हेडिंग दिले होते भारताचा ढाण्या वाघ.
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Fri, 11/06/2020 - 11:19 नवीन
घरी लोकसत्ता यायचा तो साधारण मी इयत्ता सातवी आठवी असताना वाचायला सुरूवात केली. फार काही कळत नव्ह्ते पण तेंव्हा नुकत्याच १९७७ च्या लोकसभा निवडणूका झाल्या होत्या. मुंबईहून मृणाल गोरे खासदार म्हणून निवडुन आल्या होत्या. त्यांचा महागाई प्रश्नावर महीलांचा लाटणे मोर्चा आणि पाण्यासाठी हंडा मोर्चा यामुळे त्या खूप फेमस होत्या. त्यांच्या विजयानंतर आणि इंदीरा गांधींच्या रायबरेलीतील पराभवानंतर लोकसत्तेने मथळा दिला , " दिल्ली वाली बाई पानी में, पानीवाली बाई दिल्ली में "
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 11/06/2020 - 11:58 नवीन
लहानपणी वाचलेल्या बातम्यांंमध्ये भोपाळ दुर्घटनेची बातमी आठवते.
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Fri, 11/06/2020 - 12:24 नवीन
राजकीय धाग्यांवर जेंव्हा धुळवड खेळली जाते तेंव्हा येणार तुमचा धागा सुखावह आणि आश्वासक वाटतो. जेंव्हा केंव्हा चटपटीत शीर्षकं देण्याचा विषय मनात येतो तेंव्हा आणीबाणीनंतर वर्तमानपत्रांनी जी कात टाकली त्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. एवढेच नाही तर त्या दरम्यान कोणत्या वर्तमानपत्रांनी लक्षवेधक बातमी दिली याची नंतर शहानिशा केली गेली आणि काही वर्तमानपत्रांचा गौरव करण्यात आला असे आठवते. चटपटीत शीर्षकं देण्यामध्ये जाहिरातदारांचा हात कोणी धरू शकेल असे वाटत नाही. राष्ट्रकुल बॅडमिंटन स्पर्धेत जेंव्हा प्रकाश पदुकोण अव्वल ठरला तेंव्हा एअर इंडियाने जाहिरात दिली ती अशी: "Singles or doubles, service is ours!". अशाच चटपटीत जाहिरातींमध्ये ब्रिटिश एअरवेजच्या जाहिराती अतिशय लोभस असायच्या. एका जाहिरातीत एक एक्सिक्युटीव्ह लांबच्या प्रवासाहून घरी येतो तेच आपल्या जुळ्या मुलांना भेट देण्यासाठी टेडी बेअरची जोडी घेऊन. आणि शीर्षक आहे: "Come home prepared for that important presentation!". जेंव्हा एका बाजूला असे मनोरंजक किस्से आठवतात तेंव्हा दुसरीकडे काही हलवून सोडणारे प्रसंगही आठवतात. भोपाळ दुर्घटनेचा सर्वात गाजलेले रघु राय यांचे प्रकाश चित्र असेच खूप काही बोलून जाते.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 11/06/2020 - 12:51 नवीन
वरील सर्वांना धन्यवाद !
भारताचा ढाण्या वाघ.
>>> अगदी !
दिल्ली वाली बाई पानी में, पानीवाली बाई दिल्ली में "
>>> होय, खूपच गाजले होते.
भोपाळ दुर्घटनेची बातमी
>>> Union Carbide आणि नंतरही अनेक लबाड्या...
"Singles or doubles, service is ours!".
>>> केवळ सुंदर !
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Fri, 11/06/2020 - 14:16 नवीन
लगान चे सकाळ मधील परिक्षण : 'इतिहासात कधीही न झालेला फसलेला क्रिकेटचा सामना' आणि खाली चित्रपटाचे वाभाडे काढले होते. मात्र पुढे या चित्रपटानेच इतिहास घडवला
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 11/06/2020 - 14:22 नवीन
लगान >>> सही ! यावरून ‘सत्यम शिवं सुंदरम’ च्या एका परीक्षणाचे शीर्षक आठवले : ‘लताच्या आवाजाने *नतला झाकण्याचा प्रयत्न !’
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sat, 11/07/2020 - 02:23 नवीन
१९६२ - भारताचा भारत चीन युद्धात नेफा आघाडीवर दारूण पराभव १९६४ नेहरूंचे निधन १९६५ भारतीय सेना लाहोर पासून अगदी जवळ १९६५ सिमला करार ---- लाल बहादूर शास्त्री यांचा ताश्कन्द येथे गूढ म्रुत्यू १९६६ गारफिल्ड सोबर्से चा विन्डीज सन्घ भारतात ..क्लाईव्ह लॉईड नावाचा २० वर्शाचा मुलगा त्या सन्घात . १९६९ मानव चन्द्रावर -- कोयनेचा भूकम्प - दख्खन पठार देखील भूकम्पाच्या शक्यते पासून मुक्त नसल्याची जाणीव . १९७१ जनरल नियाझी यान्ची शरणागती पकिस्तानचे दोन तुकडे १९७३ महाराष्ट्रात भीषण दुष्काळ १९७५ आणीबाणी १९७६ पुंण्यात जोशी अभ्यन्कर हत्याकांड १९७७ कोन्ग्रेसचा लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव १९८२ भारतात टी व्ही चे आगमन १९८५ भारतात पी सी चे आगमन १९९१ अर्थिक उदारीकरणाचा पाया
  • Log in or register to post comments
र
रानरेडा Sat, 11/07/2020 - 08:11 नवीन
१९८२ भारतात टी व्ही चे आगमन झाले नाहि - बऱ्याच आधी टीव्ही होते , माझ्याकडे पण होता १९८२ ला एशियाड बरोबर रंगीत प्रसारण सुरु झाले १९८५ आधी भारतात भारतात पीसी नव्हते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
ह
हेमंतकुमार Sat, 11/07/2020 - 08:16 नवीन
रानरेडा >> +1 भारतातील टीव्हीचे ‘आगमन’ शहरानुसार झालेले आहे. दिल्लीत तो खूप वर्षे आपल्या आधी होता. महाराष्ट्रातील शहरांत बहुतेक १९७४ ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रानरेडा
स
सुबोध खरे Sat, 11/07/2020 - 13:53 नवीन
मुंबईत दूरदर्शनचे आगमन २ ऑक्टोबर १९७२ साली झाले दिल्लीत नियमित प्रक्षेपण १९६५ सालापासूनच होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार Sun, 10/02/2022 - 08:13 नवीन
उद्घाटन झाल्याला आज पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त हा रंजक लेख इथे आहे असं झालं मुंबई 'दूरदर्शन'चं उद्घाटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
N
nutanm गुरुवार, 04/11/2024 - 02:15 नवीन
मुंबईत १९७२ ला t.v.आला.तेव्हा मि शाळेत असताना एका श्रिमंत मैत्रिणिकडे तेव्हा लगेच घेतला व मी मआझआ बहिण आमहि अजित वआडेकर,विश्वनाथ, गावस्कर यआचयआ संघआचि क्रिकेट मच तयआवर पाहिलि। मुंबईत t.v. १९७२ लआ आल्याच आठवतय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
क
केदार-मिसळपाव Sat, 11/07/2020 - 21:58 नवीन
शिर्षक गीत आहे का कोणाकडे? "आओ चले, क्यु चले डगर सफर देखो हम जब चले....."?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रानरेडा
व
विजुभाऊ Sat, 11/07/2020 - 03:08 नवीन
तेलगी चा घोटाळा उघडकीस येत होता त्याच वेळेस झी न्यूज ने एक जोरदार बातमी कव्हर केली होती. नाशीक मधे एका बंगल्यात नोटांनी भरलेली , नाणी तिकिटे यांनी भरलेल्या पेट्या सापडल्या होत्या. अगदी पाच पाच रुपयांची बंडलेही होती त्यात.मात्र तो बंगला अशा नोटांनी पूर्ण भरलेला होता. अगदी छतापर्यंत ढीग लागलेले दाखवत होते छगन भुजब़ळांवर संशयाची सुई जात होती. मात्र ही बातमी अगदी अल्पजीवी ठरली. दोनच दिवसातच कोणताच गाजावाजा न होता ती बातमी रहस्यमय रीत्या अदृष्य झाली
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 11/07/2020 - 03:28 नवीन
चौरा, सुरेख आढावा.
१९७३ महाराष्ट्रात भीषण दुष्काळ >>>
या निमित्ताने पुन्हा एकदा 1972- 73 मधली एक आठवण जागी झाली. तेव्हाच्या महादुष्काळानंतर लग्न समारंभांवर अशीच बंधने होती. एका मंगल कार्यालयाबाहेरच्या पाटीवर लिहिलेली एक पाटी मला अजून आठवते. त्यानुसार फक्त 40 लोकांना लग्नाचे जेवण द्यायला परवानगी होती. प्रत्यक्ष समारंभाचे ठिकाणी एक सरकारी अधिकारी येऊन ही पाहणी करीत असे. या काळात कापड देखील रेशनच्या रांगेत उभे राहून विकत घेतले होते. ..... विभा,
तेलगी चा घोटाळा उघडकीस येत होता
>>> खूप गाजलेले प्रकरण !
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sat, 11/07/2020 - 05:20 नवीन
१९८३ चा क्रिकेटचा वर्ल्डकप भारताने जिंकला तेव्हा एका वृत्तपत्रात ' एक दूजाँ के लिए ' असे त्या बातमीचे शिर्षक होते , कारण जेफ्री दूजॉने चिकाटीने फलंदाजी केली होती . तो बाद झाल्यावर भारताचा विजयाचा मार्ग सुकर झाला .
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sat, 11/07/2020 - 07:43 नवीन
भरपूर प्रतिसाद यावेत.
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य Sat, 11/07/2020 - 13:40 नवीन
सुंदर आठवणी. टकलू संमेलन तर लय भारी :-) माझ्या काकांना कात्रणवह्या बनवण्याचा छंद होता त्यांच्या तरुणपणी. त्यामुळे जुन्या अनेक बातम्यांची वृत्तपत्रातील कात्रणे वाचली आहेत - भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन, महात्मा गांधींचा खून, बुल्गानीन क्रुश्चेव्ह भारतभेट आणि त्यांची मिरवणूक, बांगलादेश मुक्तीयुद्ध, राकेश शर्माची अंतराळ मोहीम... अनेक
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 11/07/2020 - 14:01 नवीन
छान आठवणी. .....
महात्मा गांधींचा खून,
>>> यावरून हे डकवतो : Image removed.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 11/07/2020 - 14:11 नवीन
वरच्या पेपर वर १९४८ - १९६० असे लिहिले आहे त्याचा अर्थ काय असावा? तसेच बातमी लिहिण्याची पध्दत पण एकदम संयमीत आहे. शिवाय इतकी महत्वाची बातमी असून सुध्दा त्याच पानावर इतर बातम्याही छापल्या आहेत. आताच्या पध्दतीप्रमाणे गांधीजींचा पानभर आकाराचा फोटो आणि पेपरच्या नावाच्या वरती हेडलाईन छापली नाही. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ब
बाप्पू Sat, 11/07/2020 - 14:34 नवीन
मराठा फ्रॉम पुना यामध्ये मराठा असं का लिहिण्यात आलं असेल?? म्हणजे त्यावेळी मराठा ही जात संबोधली जात होती कि महाराष्टातील प्रत्येकाला मराठा म्हणायची पद्धत होती.. ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार Sat, 11/07/2020 - 14:37 नवीन
महाराष्टातील प्रत्येकाला मराठा म्हणायची पद्धत होती.. ??
बहुतेक असेच. "मराठी माणूस' या अर्थी .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू
त
तुषार काळभोर Fri, 11/13/2020 - 12:51 नवीन
मागील चाळीस-पन्नास-साठ वर्षे सोडली तर मराठा हा नेहमीच प्रदेशवाचक शब्द होता. अगदी पेशवे राज्यकर्ते होते, तेव्हाही अटकेपर्यंत धडक 'मराठ्यांनी' मारली होती. पानिपतात पराभव 'मराठ्यांचा' झाला होता. पेशवे व इंग्रज यांच्यातल्या लढाया अँग्लो-मराठा नावाने संदर्भित केल्या जातात. आणि त्याचं कारण, सिंहासनावर मराठा व्यक्ती होती हे नव्हतं. आता जी मराठा जात आहे, त्यांना कुणबी, पाटील अशी नावे होती. मागे (बहुधा) शशिकांत ओक यांनी एक लेख लिहिला होता, ज्यात लोणी-कंद गावातील ब्रिटीशकालीन काही कागदपत्रांच्या संदर्भाने लेखन होते. त्यात एक कागद जातीनिहाय लोकसंख्या व कर असलेला होता. त्यात सुद्धा कुणबी अशी नोंद होती. काही ब्रिटीश गॅझॅट्स मध्ये मराठा हा शब्द शक्यतो सैन्य, राज्य या संदर्भात वाचला आहे. उदा. मराठ्यांचं सैन्य. तर शेती करणार्‍यांत माळी आणि कुणबी अशी वर्णने वाचलीत. (रोचक अवांतर - आमचे नगरसेवक आमदार नावापुढे "पाटील" लावतात अन "कुणबी" दाखला काढून ओबीसी जागेवर निवडून आलेत. वरती परत "मराठा" मोर्चात पण असतात)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू
ह
हेमंतकुमार Sat, 11/07/2020 - 14:20 नवीन
ज्ञा पै, अगदी अपेक्षित आणि चांगली शंका. टाईम्स ऑफ इंडियाने त्यांच्या शतक किंवा त्यापुढच्या एखाद्या महोत्सवानिमित्त काही स्मरणिका अंक प्रकाशित केले होते. त्यापैकी हा एक आहे !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 11/08/2020 - 05:58 नवीन
1983 मधील एका बातमीची नोंद माझ्याकडे आहे. बातमी अशी आहे : पाकिस्तानात एका तरुणीला विवाहपूर्व संबंधातून मुलास जन्म दिल्याबद्दल फटक्यांची शिक्षा न्यायालयात सुनावण्यात आली. परंतु, नंतर बर्‍याच महिलांच्या विनंतीवरून ती सक्‍तमजुरीवर आणण्यात आली. ………………………… प्रत्येक दैनिकाच्या वयानुसार त्यामध्ये ‘पंचवीस/ पन्नास किंवा शंभर वर्षांपूर्वी’ अशी सदरे असतात. त्यात जुन्या काळचा काही रोचक मजकूर अथवा घटना दिलेल्या असतात. 1984 मध्ये मी ‘पन्नास वर्षापूर्वी’ या ‘सकाळ’च्या सदरात 1934 मधील एक बातमी वाचली होती. ती अशी: ‘प्रेमविवाह की विवाहोत्तर प्रेम यावर कॉलेजात परिसंवाद झाला’. ................................. 1980च्या दशकात शहरी भागात सुद्धा हुंडाबळी, महिलांना जाळले जाणे अशा घटना बऱ्यापैकी घडत होत्या. त्यासंदर्भात ‘जाळल्या जाणाऱ्या महिला’ हा केसरीचा चांगला अग्रलेख आठवतो.
  • Log in or register to post comments
र
रामचंद्र Mon, 02/21/2022 - 21:57 नवीन
अंदाजे ८९-९० सालादरम्यान दूरदर्शनवर दुपारचे प्रक्षेपण सुरू होणार अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या (तेव्हाचे 'बैंगन राजा' इ. लहान मुलांसाठीचे कार्यक्रम इ.). त्यावरून 'सकाळ'मध्ये आता परदेशाप्रमाणे आपल्याकडेही 'इडियट बॉक्स'चे प्रस्थ वाढणार, अशा आशयाच्या जोरदार चर्चा झडल्याचे आठवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार Tue, 02/22/2022 - 04:15 नवीन
आपल्याकडेही 'इडियट बॉक्स'चे प्रस्थ वाढणार,
+११ आठवतात. टीव्हीवरील झगमगाटी जाहिराती पाहून नाहिरे वर्गाला काय वाटेल, अशा मुद्द्यांवरही काही लेख त्याकाळी यायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामचंद्र
स
सुधीर कांदळकर Mon, 11/09/2020 - 04:03 नवीन
टक्कल संमेलन आवडले. विद्याचरण शुक्ला आणीबाणीनंतरच्या निवडणूकीत पराभूत झाल्याची बातमी नभोवाणी बातमी वाचकांत फारच प्रिय ठरली कारण ते तेव्हां नभोवाणी मंत्री होते आणि त्यांनी नभोवाणी सेवकांना बहुधा बराच उपद्रव दिला असावा. प्रत्येक बातमी वाचक/वाचिका ही बातमी एकाच बातमीपत्रात अनेक वेळा ठासून ठासून सांगत होता/होती ते ऐकूनच हसू येत असे. माझ्या मते कापड रेशनवर भारतात विकले जात होते ही बातमी चुकीची असावी. तो काळ मी अनुभवलेला आहे. राजकीय सूडातून उद्भवलेला गोबेल्स प्रचार असू शकतो. कृपया तपासून पाहावे. साम्यवादी देशात मात्र हे घडत होते अशा बातम्या होत्या. खर्‍याखोट्या कोण जाणे. टाईम्स ऑफ इंडिया चे १५० वर्षे विशेषांक माझ्या संग्रही आहेत. काही असो. लेख आणि त्यावरील सर्व प्रतिसाद आवडले. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 11/09/2020 - 05:07 नवीन
सुधीर, धन्यवाद. छान आठवणी.
माझ्या मते कापड रेशनवर भारतात विकले जात होते ही बातमी चुकीची असावी
>>>> अहो, ही निव्वळ बातमी नसून स्वानुभव आहे !101% खरा. मी माझ्या आजोबांचा हात धरून कापडाच्या रेशनच्या रांगेत उभा होतो. आम्हा भावंडांना आणलेले चौकडीचे शर्टाचे कापड अजूनही माझ्या पक्के स्मरणात आहे.
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Mon, 11/09/2020 - 16:02 नवीन
हे रेशनवर मिळणारे कापड म्हणजेच गरिबी हटाव का? स्वानुभव नक्कीच नाही पण माझी आजी म्हणायची की तीने 'गरिबी हटाव'च्या साड्या नेसून संसाराचा गाड रेटला. या साड्या नेमक्या कोणत्या हे माहिती नसलं तरी अत्यल्प किमतीत मिळत असाव्यात असा माझा समज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
R
Ranapratap Mon, 11/09/2020 - 18:30 नवीन
गरीबी हटाव ही साडी 10 की 20 रू ला मिळायची व शर्ट चे कापड 5 रू मीटर असायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.
ह
हेमंतकुमार Mon, 11/09/2020 - 16:07 नवीन
हे रेशनवर मिळणारे कापड म्हणजेच गरिबी हटाव का
>> नाही हो. हे दुष्काळ परिस्थितीत आले होते. तसेच तेव्हा आयात केलेला निकृष्ट 'मिलो' (पोळीसाठी) खावा लागला.
  • Log in or register to post comments
R
Ranapratap Mon, 11/09/2020 - 18:37 नवीन
74-75 ्चा काल असावा, निना कुलकर्णी चे नाटक हमिदाबई ची कोठी, जाहिरात होती, मी नुकतेच वाचायला शिकलो होतो, जोरात वाचले, हमिदा बाई ची कोठी, अन् मोठ्या काका ला विचारले, अरे कुठे आहे ही कोठी, आपल्याला जायला पाहिजे एकदा, घरात भूकंप, माझा गाल लाल.
  • Log in or register to post comments
म
मनो Mon, 11/09/2020 - 20:37 नवीन
गांधीहत्या आणि सावरकर याबद्दल लिहिण्याचं बरेच दिवस मनात आहे. केंव्हा मुहूर्त मिळतो पाहू. त्या लेखासाठी जमवलेल्या छायाचित्रातील ही काही इथे देतो आहे. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 11/10/2020 - 03:11 नवीन
राणाप्रताप, रोचक आठवणी. मनो, छान कात्रणे. जरूर लिहा. ............................................ 1996 साली महाराष्ट्रात ‘गोडबाबा’ नावाच्या एका भोंदूने धुमाकूळ घातला होता. त्याच्या मते त्याच्या शरीरातून गोड पदार्थ बाहेर पडत असतात वगैरे ! त्यामुळे त्याने ओंजळीतून सोडलेले 'गोड' तीर्थ पिण्यासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या ! त्या संदर्भातील हे कात्रण सापडले: Image removed.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 11/13/2020 - 10:41 नवीन
छापील भेटकार्डे हा प्रकार आता जवळजवळ संपुष्टात आलाय. पूर्वी अनेक प्रसंगी अशी भेटकार्डे दिली जायची. 1990 च्या दशकात एका निवृत्त झालेल्या व्यक्तीला मिळालेले हे भेटकार्ड : Image removed.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Fri, 11/13/2020 - 14:40 नवीन
सत्यकथा १९७०-७२ मधल्या काही जाहिराती. (फोटोंची साईझ मोठी आहे, जर काही गडबड/त्रास होत असल्यास सं. मं. ने प्रतिसाद उडवून टाकावा.) Image removed.

Image removed.

Image removed.

Image removed.

Image removed.

Image removed.

Image removed.

Image removed.

Image removed.

Image removed.

Image removed.

Image removed.

Image removed.

Image removed.

Image removed.

Image removed.

  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 11/13/2020 - 14:56 नवीन
अहो, दिवाळीचा सुंदर फराळ दिलात तुम्ही ! छान स्मरणरंजन. सत्यकथेची वार्षिक वर्गणी वाचून आता नक्कीच हसू येते . सुंदर ! धन्यवाद आणि सर्वांनाच दिवाळी शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Sat, 11/14/2020 - 01:56 नवीन
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ग
गामा पैलवान Fri, 11/13/2020 - 15:20 नवीन
कुमारेक, (स्मृती)रंजक धागा आहे. माझ्या आठवणीतला एक मथळा सांगतो. १९८६ साली ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. तेव्हा मद्रासला (म्हणजे आजच्या चेन्नईत) कसोटी सामना चालू होता, तो बरोबरीत सुटला. शेवटल्या सत्रात मी स्वत: दूरदर्शनवर बघितला होता. अतिशय रोमांचकारी सामना झाला होता. पारडं क्षणाक्षणाला इकडे तिकडे झुकंत होतं. अखेरीस मणिंदरसिंग पायचीत झाला व भारताचा डाव संपला. ऑस्ट्रेलियन गोलंदाज ग्रेग मॅथ्यूजने बराच रडीचा डाव खेळला होता. ऑस्ट्रेलियाकडनं पंचांवर दबाव टाकून, जवळजवळ धमकावून, अनुकूल निर्णय वदवून घेण्याचे प्रयत्नही घडले. तरीही भारतीयांनी डोकं थंड ठेवून लढत दिली. हे सगळं पुन्हा अनुभवायला मिळावं म्हणून मी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात तीच बातमी वाचून काढणार होतो. दुसऱ्या दिस्व्शी सकाळी लोकसत्ता आला. बातमीचा मथळा काहीतरी भव्य असेल अशी अपेक्षा होती. पण दणकून पोपट झाला. मथळा होता 'रोमांचक लढतीनंतर काव्यमय बरोबरी'. अत्यंत सपक मथळा बघून बातमी वाचायची इच्छाच मेली. नंतर खूप वर्षांनी लक्षांत आलं की हा मथळा poetic tie after a thriller याचं निर्बुद्ध भाषांतर होतं. असल्या निरर्थक कुबड्या हाती धरायला मराठी शब्ददरिद्री खचितच नाही. लोकसत्तेत मेकॉलेछाप खोगीरभरती झालेली असणार. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 11/13/2020 - 16:00 नवीन
'रोमांचक लढतीनंतर काव्यमय बरोबरी'.
अगदी हहपुवा भाषांतर ! भारी आठवण
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Fri, 11/13/2020 - 17:20 नवीन
>>> ओबामा यांनी यापूर्वी अनेक पुस्तके लिहिली आहेत, ज्यात ड्रीम्स फ्रॉम माई फादर, आणि 'चेंज वी कैन बिलीव इन' यांचा समावेश आहे. >>> आजचा सकाळ - ग्लोबल मधील एक बातमी, सरळ सरळ हिंदीतून जशीच्या तशी उचल :)
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 11/14/2020 - 04:30 नवीन
इंटरनेट वर हे एक सापडलं. प्रौढ अविवाहितेसाठी संधी! अरुस्टुक काउंटी, मैन मधील एक तरुण वधुसाठी स्वतःविषयी सांगतो - अठरा वर्षांचा तरुण, चांगले दात, (अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष) अँड्र्यू जॉन्सन, Star Spangled Banner ( राष्ट्रगीत) आणि ४ जुलै (मूळ स्वातंत्र्यदिन) यांचा समर्थक (थोडक्यात, यादवी युद्धानंतर युनायटेड स्टेट्स चा नागरिक, बंडखोर राज्यांचा विरोधक), सरकारकडून जमिनीचा तुकडा मिळवला आहे, त्यातला मागील वर्षी अठरा एकर साफ सपाट केलाय आणि दहा एकरांवर पेरणी केलीय." Image removed.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Sat, 11/14/2020 - 06:41 नवीन
राजस्थान मधे 'दारू दल' नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना!
१२-१५ वर्षांपूर्वी अशा मथळ्याची बातमी लोकसत्ता मधे वाचल्याचे आठवते... 'दारू दल' चे नोंदणीकृत कार्यालय एका बियर बार मधे आहे अशी मनोरंजक माहितीही होती बातमीत. मद्यपींनी काढलेल्या त्या पक्षाचे पुढे काय झाले कोणास ठाऊक! 😀
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य Sat, 11/28/2020 - 10:42 नवीन
निवडणुकीत (झिंगून) पडले असतील :-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर
ह
हेमंतकुमार Sat, 11/14/2020 - 12:29 नवीन
सरळ सरळ हिंदीतून जशीच्या तशी उचल >> +१
प्रौढ अविवाहितेसाठी संधी! आणि दारू दल' चे नोंदणीकृत कार्यालय एका बियर बार मधे
>>> भारीच !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 11/23/2020 - 05:09 नवीन
काही वर्षांपूर्वी सकाळच्या सप्तरंगमध्ये आलेला एक विशेष लेख आठवला. त्या लेखाचे लेखक जन्मठेपेची शिक्षा भोगून बाहेर आलेले गृहस्थ होते. त्यांना ती शिक्षा खुनासाठी झाली होती. शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर संबंधिताकडे समाजाने निव्वळ एक नागरिक म्हणून पाहावे अशी अपेक्षा असते. वास्तवात तसे होत नाही. या पार्श्वभूमीवर सदर व्यक्तीस सकाळने लेखनाची संधी दिली हे विशेष.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 12/20/2020 - 16:38 नवीन
1974 पासून कसोटी क्रिकेटमध्ये भारत सर्वबाद 42 ही नीचांकी धावसंख्या आठवणीत कायमची कोरली गेली होती. आता ती काढून टाकून त्या जागी सध्याची भारत सर्वबाद 36 ही नवीन नोंद केली पाहिजे !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 02/14/2021 - 07:15 नवीन
डिसेंबर १८९५ मध्ये वैज्ञानिक Roentgen यांनी त्यांच्या बायकोच्या हाताचा एक्स-रे काढला. हा जगातील जिवंत माणसाचा पहिला एक्स-रे होता. या क्रांतिकारक घटनेचे वैज्ञानिक जगतात स्वागत झाले खरे. परंतु तत्कालीन सामान्यजनांनी या घटनेकडे साशंकतेने पाहिले होते. लंडनच्या मार्च १८९६च्या Pall Mall Gazette मधल्या संपादकीयात याचे प्रत्यंतर येते. ते संपादक म्हणतात, “मानवी शरीराच्या आतील गोष्टी अशा ‘फोटो’ काढून चव्हाट्यावर आणणे हे असभ्य आहे ! अशा अनैतिक तंत्रज्ञानावर राज्यकर्त्यांनी बंदी घालावी !! “
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा