Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आठवणींतील काही : सुरस आणि चमत्कारिक

ह
हेमंतकुमार
गुरुवार, 11/05/2020 - 16:36
💬 104 प्रतिसाद
बातम्या हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होऊन बसलेला आहे. सध्या तर वृत्तमाध्यमांचा अक्षरशः महास्फोट झालेला आहे. आपण विविध बातम्या रेडिओ, वृत्तपत्रे, टीव्ही आणि आंतरजाल या सर्व माध्यमांमधून ऐकत, वाचत किंवा पाहत असतो. असा एखादाही क्षण जात नसेल, की जेव्हा एखादी बातमी आपल्या पुढे येऊन आदळायची थांबली आहे. काही वेळेस तर हे अजीर्ण होते. एकंदरीत बातम्यांमध्ये नको एवढी संख्यात्मक वाढ झाल्यामुळे त्यांचा गुणात्मक दर्जा मात्र यथातथाच झालेला आहे. या मुद्द्यावर आपण अन्यत्रही यापूर्वी चर्चा केलेली आहे. पण आज तो विषय नाही. आज मी तुम्हाला टीव्हीपूर्व काळाकडे घेऊन जाऊ इच्छितो. तेव्हा सामान्य माणसासाठी बातम्या समजण्याचे दोनच मुख्य स्त्रोत होते - एक रेडिओ आणि दुसरी वृत्तपत्रे. रेडिओचा बातम्याप्रसार हा तसा पहिल्यापासूनच संयमित राहिलेला आहे. ते त्या माध्यमाचे अंगभूत वैशिष्ट्य आहे. वृत्तपत्रांमध्ये मात्र अगदी आमूलाग्र बदल दशकांगणिक झालेले दिसतात. त्याकाळी वृत्तपत्रे कमी पानांची असत. मुख्य म्हणजे वृत्तपत्राचे पहिले पान भल्यामोठ्या पानभर जाहिरातीने सुरू न होता खरोखरच महत्त्वाच्या बातम्यांनी उठून दिसे. सकाळी उठल्यानंतर घरी आलेले वृत्तपत्र आधी आपल्या ताब्यात यावे यासाठी कुटुंबीयांमध्ये देखील स्पर्धा असायची. बातम्या आवडीने, चवीने आणि बारकाईने वाचल्या जात. अशा असंख्य बातम्या आतापर्यंतच्या आयुष्यात वाचल्या गेल्या आहेत. संस्कारक्षम वयामध्ये वाचलेल्या बातम्या अनेक प्रकारच्या होत्या. काही नेहमीच्या किरकोळ तर काही ठळक घडामोडींच्या. काही सुरस तर काही चमत्कारिक; काही थरकाप उडवणाऱ्या तर काही मनावर खोलवर परिणाम करणाऱ्या. अशा काही बातम्यांच्या निवडक आठवणी आज तुमच्यापुढे मांडत आहे. शैक्षणिक वयामध्ये आकर्षक वाटलेल्या अनेक बातम्यांची कात्रणे कापून ठेवलेली होती खरी, परंतु कालौघात आता ती कुठेतरी गडप झालेली आहेत. आता जे काही लिहीत आहे ते निव्वळ स्मरणावर आधारित आहे. त्यामुळे तपशीलात थोडाफार फरक झाल्यास चूभूदेघे. सुरुवात करतो एका रंजक वृत्ताने. अंदाजे ४० ते ४५ वर्षांपूर्वीचे. बातमीचा मथळा असा होता: “आंतरराष्ट्रीय टक्कलधारी संघटनेचे अधिवेशन” ‘ या संघटनेचे एक विशेष अधिवेशन अमुक तमुक ठिकाणी भरले होते. त्या परिषदेचे उद्घाटन भारताचे (तत्कालीन) राजदूत इंद्रकुमार गुजराल यांनी केले होते. या परिषदेत माणसांच्या- म्हणजे विशेषतः पुरुषांच्या- टक्कल या विषयावर रोचक चर्चा झाली. देशोदेशींचे अनेक टक्कलधारी लोक या परिषदेस आवर्जून हजर होते. त्यातील एका विशेष कार्यक्रमात विविध सहभागींना त्यांच्या डोक्‍यावरील टकलाच्या आकार व तजेल्यानुसार ‘सनशाइन’, ‘मूनशाइन’ अशा मानाच्या पदव्या देण्यात आल्या ! आपल्या अध्यक्षीय भाषणात गुजराल म्हणाले, की माझ्या घरात टक्कलाची परंपरा अनेक पिढ्यांपासून चालू असून मला तिचा सार्थ अभिमान वाटतो. एकूणच टक्कल हे माणसाचे वैगुण्य न समजता वयानुरूप होणारा शोभिवंत बदल समजण्यात यावा या मुद्द्यावर चर्चेचे सूप वाजले.’ ही खूपच रंजक बातमी होती यात वाद नाही. आतापर्यंत मी अशी बातमी एकदाच वाचली. त्यानंतर या संघटनेची वार्षिक अधिवेशने वगैरे झाली का नाही, याची काही कल्पना नाही. जाणकारांनी जरूर भर घालावी. एक बातमी आठवते ती शहरी स्त्रियांच्या वेशभूषेतील क्रांतिकारी बदलाबद्दलची. किंबहुना एका घटनेची जुनी आठवण म्हणून ती छापली गेली होती आणि माझ्या वाचनात आली. प्रत्यक्ष ती घटना घडल्याचा काळ माझ्या जन्मापूर्वीचा आहे. तो सामाजिक बदल आहे, शहरी स्त्रीने नऊवारी साडी झुगारून देऊन पाचवारी साडी आपलीशी केल्याचा. हे ज्या काळात घडले तेव्हा वृत्तपत्रातून अक्षरशः विविध विचार आणि मतांचा गदारोळ झालेला होता. त्यामध्ये स्त्रिया संस्कार विसरल्या इथपासून ते संस्कृती बुडाली, इथपर्यंत अगदी चर्वितचर्वण झालेले होते ! प्रत्यक्ष जरी तो काळ मी अनुभवलेला नसला, तरी या जुन्या आठवणींच्या बातमीने देखील माझ्या नजरेसमोरून त्याकाळचे वास्तव तरळून गेले. अजून एक रोचक बातमी म्हणजे एकदा वृत्तपत्रात जुन्या काळातील, म्हणजे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील लग्नपत्रिकांच्या आठवणींची बातमी तत्कालीन पत्रिकांसह छापून आली होती. त्यातील अगदी लक्षात राहिलेला एक मुद्दा फक्त लिहितो. तेव्हाच्या काही लग्नपत्रिकांमध्ये लग्न करण्याचा मूलभूत हेतू अगदी स्पष्टपणे नमूद केलेला असे ! त्याचा नमुना असा आहे: “आमचे येथे श्री कृपेकरून हा आणि ही यांचा शरीरसंबंध करण्याचे योजले आहे आहे.... तरी आपण वगैरे वगैरे वगैरे.” लग्नपत्रिकांचे बदलते स्वरूप आपण सर्वांनीच अनुभवलेले आहे. मात्र ही अजब व परखड वाक्यरचना वाचून खरोखर करमणूक झाली. तारुण्यातील एक सर्वाधिक लोकप्रिय विषय म्हणजे क्रिकेट. त्याकाळी क्रिकेटच्या सामन्यांचे रेडिओवरील धावते समालोचन अगदी मन लावून ऐकले जाई. ते मनसोक्त ऐकलेले असले तरीही दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात त्याबद्दल जे सगळे प्रसिद्ध होई, तेही अगदी अथपासून इतिपर्यंत वाचले जाई. त्यावरील चर्चाही अख्खा दिवसभर होई. त्यामुळे क्रिकेट संदर्भातील एक दोन आठवणी तर लिहितोच. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि अगदी मनावर कोरली गेलेली बातमी आहे ती म्हणजे इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानावर झालेल्या भारताच्या दारुण पराभवाची. त्या कसोटी सामन्यामध्ये आपला दुसरा डाव चक्क सर्वबाद ४२ वर संपला होता आणि जवळजवळ दोनशेहून अधिक धावांनी आपला पराभव झालेला होता. तेव्हा आमच्या आठवणीतील हा सर्वात दारुण पराभव होता. मुद्दा तो नाही. मुद्दा बातमी कशी छापली होती हा आहे. सर्वसाधारणपणे वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावर सर्वात वर काय असते ? तर अगदी ठळक टाईपात त्याचे स्वतःचे नाव. ही घटना घडली त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात “भारत सर्वबाद ४२” ही बातमी खुद्द वृत्तपत्राच्या नावाच्या डोक्यावर अशी सर्वोच्च स्थानी छापलेली होती. माझ्या आयुष्यात अशा प्रकारची बातमी मी प्रथमच पाहत होतो त्यामुळे ती कायमस्वरूपी लक्षात आहे. त्या घटनेपूर्वी भारत कसोटी सामन्यात कधीही ५० च्या आत सर्वबाद झालेला नव्हता. मात्र अन्य काही देशांनी तो अनुभव चाखलेला होता. तेव्हा भारतही आता त्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला, असे बातमीत रोचकपणे लिहिलेले होते. बाकी संपूर्ण संघाच्या 42 धावसंख्येतील निम्म्या धावा एकट्या एकनाथ सोलकर यांनी काढलेल्या होत्या आणि त्यामध्ये एक चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता, हेही बारकावे आज आठवतात. अजित वाडेकरांच्या क्रिकेट संघाने वेस्ट इंडीजमध्ये जाऊन कसोटी मालिका जिंकली होती. कदाचित तो अभूतपूर्व प्रसंग असावा. त्यानंतर जेव्हा आपला संघ मायदेशी परतला तेव्हा झालेल्या त्यांच्या स्वागताच्या बातम्या बराच काळ झळकत होत्या. त्यांचेही तेव्हा खूप अप्रूप वाटले होते. ब्लेझर घातलेले फोटोतले हसतमुख वाडेकर आजही चांगले आठवतात. आपल्या देशाच्या इतिहासात 1975 च्या दरम्यान पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली होती. ती प्रत्यक्ष लादण्यापूर्वीची रेडीओवरील एक बातमी चांगली आठवते. रात्री ८ च्या बातम्या लागलेल्या आणि एकीकडे रेडिओची खरखर चालू होती. त्यात बातमी सांगितली गेली, की अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान इंदिरा गांधी यांची लोकसभेवरील निवड अवैध ठरवली. रेडिओवर बातम्या सांगण्याची एक पद्धत असते. ती म्हणजे आधी ठळक बातम्या, मग विस्ताराने आणि शेवटाकडे पुन्हा एकदा ठळक बातम्या. या तीनही वेळेस मी तो ‘अवैध’ शब्द ऐकला. अगदी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा पटकन नीट अर्थबोध झाला नाही. आणि नंतर मी घरी विचारले सुद्धा की ‘रद्द केली’ असे न म्हणता ते ‘अवैध’ का म्हणत आहेत ? नंतर पुढच्या आयुष्यात अनेक अवैध गोष्टी पाहण्यात, वाचण्यात आणि ऐकण्यात आल्या, हा भाग अलाहिदा. सध्या वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर अगदी वरच्या भागात मधोमध राजकीय व्यंगचित्र असणे कालबाह्य झालेले आहे. परंतु एकेकाळी दर रविवारच्या अंकात तर ते हटकून असे. राजकीय आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या संदर्भातील एक व्यंगचित्र त्याकाळी खूप गाजले होते. ते आठवते. तेव्हा नुकताच काही कारणामुळे अमेरिकेच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर नवीन राष्ट्राध्यक्ष निवडून आले होते. पहिल्या अध्यक्षांच्या कारकिर्दीत हेन्री किसिंजर हे परराष्ट्रमंत्री होते. पुढे नव्या अध्यक्षांनीही या गृहस्थांना त्याच मंत्रिपदी कायम ठेवले. या अनुषंगाने एक सुंदर व्यंगचित्र पहिल्याच पानावर ठळकपणे आले होते. त्यात हेन्री किसिंजर मस्तपैकी हात उडवून म्हणताहेत, की “ते गेले आणि हे आले, मला कुठे काय फरक पडलाय ? मी आहे तसाच मस्त आहे !” पुढे या घटनेचा दाखला अनेकजण तत्सम प्रसंगांत देत असत. अशी मार्मिक व्यंगचित्रे त्याकाळात बऱ्यापैकी बघायला मिळत. शालेय वयात असताना ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये एक अत्यंत वाईट बातमी वाचनात आली होती. बातमी अशी होती: “मासिक पाळी दरम्यान शरीर संबंधास पत्नीने नकार दिल्यामुळे पतीकडून तिची हत्या “ शरीरसंबंध या विषयाबाबत धूसर आणि चाचपडते ज्ञान असण्याचे ते माझे वय. तेव्हा ही बातमी वाचली आणि एकदम सुन्न झालो. ठराविक मासिक काळातील संबंधास नकार हा बातमीतला भाग माझ्या दृष्टीने तेव्हा न समजण्यातला होता. परंतु एवढ्या कारणावरून एक पुरुष चक्क आपल्या बायकोचा खून करतो याचा जबरदस्त हादरा मनाला बसला. त्यानंतरच्या आयुष्यात दहा वर्षातून एखादी या स्वरूपाची बातमी वाचनात आली; नाही असे नाही. परंतु सर्वप्रथम अशी बातमी वाचताना त्या वयात झालेली स्थिती आणि त्यात ते दिवाळीचे दिवस, या गोष्टी आजही मनाला कुरतडतात. एखाद्या मोठ्या कालखंडातील बातम्यांचा लेखाजोखा सादर करणे हा काही या लेखाचा उद्देश नाही. तेव्हा आता माझ्या आठवणी थांबवतो. त्याचबरोबर तुम्हालाही एक आवाहन करीत आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाने आपापल्या आयुष्यात अशा रोचक, सुरस, धक्कादायक वगैरे प्रकारच्या बातम्या वाचलेल्या अथवा ऐकलेल्या असणारच. याबद्दलचे तुमचेही अनुभव लिहा. माध्यमांत अप्रकाशित घटनांबद्दलही लिहायला हरकत नाही. पण एक करा... नजीकच्या भूतकाळाबद्द्ल नका लिहू. तुमच्या आयुष्यात किमान वीस वर्षे मागे जा आणि तेव्हाचे असे जे काही आठवते ते लिहा. गुगल फिगल न करता आठवतंय तसेच लिहा. त्यातच खरी मजा असते. त्यातून स्मरणरंजन होईल. तेच या धाग्याचे फलित असेल. ************************************************

प्रतिक्रिया द्या
55659 वाचन

💬 प्रतिसाद (104)
र
रंगीला रतन Sat, 03/06/2021 - 15:48 नवीन
ऐकावे ते नवल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार Wed, 03/03/2021 - 15:32 नवीन
१९७१ मधील भारताच्या विविध क्षेत्रातील विजयकथा आणि काही अविस्मरणीय फोटो इथे आहेत: https://m-thewire-in.cdn.ampproject.org/v/s/m.thewire.in/article/politics/1971-the-year-india-felt-good-about-itself/amp?amp_js_v=a6&amp_gsa=1&usqp=mq331AQFKAGwASA%3D#aoh=16147809559798&csi=0&referrer=https%3A%2F%2Fwww.google.com&amp_tf=From%20%251%24s&ampshare=https%3A%2F%2Fthewire.in%2Fpolitics%2F1971-the-year-india-felt-good-about-itself
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 05/15/2021 - 11:00 नवीन
1980च्या दशकात ही जाहिरात केल्याबद्दल डॉक्टर लागूंची वैद्यकीय नोंदणी परिषदेकडून रद्द करण्यात आली होती Image removed.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 08/07/2021 - 04:28 नवीन
Image removed. आणि Image removed.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 08/07/2021 - 06:25 नवीन
हायला पुण्याचा छोटासा छापखाना सुद्धा जगदहितेच्छु (जगाच्या हितासाठी) असतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
त
तुषार काळभोर Sat, 08/07/2021 - 07:59 नवीन
शंकाच नाही! बाय द वे, आजही सरकारी दाखले, पोलीस पंचनामा, पोलीस तक्रार, न्यायालयीन अर्ज, वकिली कागदपत्र यातील भाषा अशीच असते. .... येणेकरून अर्जदारास दाखला दिला असे. .... सबब, अर्जदार यांसी विनंती कारणे अर्ज मंजूर करणे कामी मंजुरी दिली असे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ह
हेमंतकुमार Sun, 08/22/2021 - 15:26 नवीन
नुकतेच क्रिकेटवर ' १९७१ : द बिगिनिंग ऑफ इंडियाज क्रिकेटिंग ग्रेटनेस ' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यामध्ये 1946 मध्ये इंग्लंडला गेलेल्या भारतीय संघाची दयनीय अवस्था वर्णिली आहे. तेव्हा आपल्या खेळाडूंना खेळाडूंची खायची मारामार झाली होती. तरीही क्रिकेट नियामक मंडळाने त्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते. शेवटी खेळाडूंना वृत्तपत्रात निवेदन द्यावे लागले की आमच्या खाण्याकडे लक्ष न पुरवल्यास भूकबळी पडतील. हे वाचून वाईट वाटले. आजची खेळाडू आणि नियामक मंडळाची श्रीमंती थक्क करणारी आहे !
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 08/22/2021 - 18:54 नवीन
He बहुधा ते वर्ष आहे जेव्हा सुनील गावस्कर या नवख्या फलंदाजाने वेस्ट इंडीजमध्ये होलसेल धावा केल्या होत्या. आणि याच वर्षी अजित वाडेकर यांच्या नेतृत्वात इंग्लंड मध्ये पहिली कसोटी मालिका जिंकली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार Mon, 08/23/2021 - 01:48 नवीन
+११ वेस्ट इंडीज आणि इंग्लंडवर लागोपाठ विजय असे ते वैशिष्ट्य 1971 चे . तेव्हा संघ निवडताना पतोडी यांना डावलून अजित वाडेकर यांना कर्णधार केले होते. यावर खूप वाद झाला होता. पण वाडेकर यांनी आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
क
कंजूस Wed, 09/01/2021 - 15:34 नवीन
आजची खेळाडू आणि नियामक मंडळाची श्रीमंती थक्क करणारी आहे ! इतर आंतर राज्य/ शालेय खेळाडूंचे हाल पाहिलेत का? शाळांचे वर्ग बाकडी बाजूला करून राहायला देतात. शाळांचे टॉइलेट्स भयानक असतात. हे सर्व खेळ थंडीत असतात आणि काही सोयी नसतात. नेणारा मास्तर मात्र एका हॉटेल रुममध्ये राहतो. मागच्या एका प्रवासात खेळाडू भेटले होते त्यांनी सांगितले की सोयी फक्त क्रिकेटरांसाठीच मिळतात. बाकी खेळांना काही मिळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार Wed, 09/01/2021 - 15:42 नवीन
होय क्रिकेटपुरतीच आहे यावर दुमत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
ह
हेमंतकुमार Wed, 09/01/2021 - 12:40 नवीन
शोले (१९७५) चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पींची मुलाखत काल ऐकली. त्यातला रोचक किस्सा: सुरवातीस तो थेटरात खास चालत नव्हता. त्यामुळे ते निराश झाले होते. अशात एका थेटर मालकाने त्यांना प्रत्यक्ष खेळाचे वेळी बोलावले. त्यावर ते मालकांना म्हणाले, " अहो, मला तुम्ही काय रिकामं थेटर दाखवायला बोलावता आहात काय ?" मालक हसून म्हणाले, या तर खरं ! मग सिप्पी तेथे पोचले. चित्रपटाचा खेळ चालू झालेला होता. मालकांनी त्यांना आधी गप्पांमध्ये रंगवून ठेवले. चित्रपटाचे मध्यांतर झाले. आता मालक म्हणाले, चला माझ्याबरोबर. मग त्यांना खाद्य खाद्य-पेय विक्री विभागात घेऊन गेले. बघतात तर काय, तिथे नुसते खाद्यपदार्थ तयार होते परंतु ते विकत घ्यायला चिटपाखरू सुद्धा नव्हते ! सिप्पींना तरीही कळेना, " मला काय दाखवताहेत ?" मग मालकांनी खुलासा केला. "अहो, या खेळाची सर्व तिकिटे विकली गेलेली आहेत. आता मध्यंतर झालेले आहे. तरीसुद्धा एकही प्रेक्षक आतून बाहेर येऊन खाण्यापिण्यासाठी उत्सुक नाही. सर्वजण चित्रपटात खूपच रंगून गेलेले आहेत. त्यांना लवकरात लवकर त्याचा उत्तरार्ध पाहण्याची जाम उत्सुकता आहे. हेच तुमचे यश समजा !!" हे ऐकल्यावर सिप्पी धन्य झाले !
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Wed, 09/01/2021 - 12:49 नवीन
रॊचक किस्सा! शॊलॆ हा आता नुसता चित्रपट राहिला नसुन दंतकथा झाली आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
च
चौकस२१२ Sun, 09/05/2021 - 13:58 नवीन
इंदिरा गांधी जनता पक्षात ? पुण्यातील दुपारी निघनाऱ्या कोणत्यातरी ४ पानि दैनिकातील बातमी यातील प्रश्चचिन्ह महत्वाचे आत सविस्तर: "इंदिरा गांधी जनता पक्षात .. जातील का? " यावर चर्चा !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 09/05/2021 - 14:00 नवीन
कठीण आहे बुवा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
ह
हेमंतकुमार गुरुवार, 10/21/2021 - 06:11 नवीन
अलीकडेच एका वैद्यकीय नियतकालिकात वाचलेली ही सुरस बातमी : Image removed.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 11/13/2021 - 08:19 नवीन
आपला दिवाळी अंक वाचून झाला की इथे जरुर डोकवा: आठवणीतले काही : अत्यंत रोचक ! 'माणूस' साप्ताहिकाचा पहिला अंक १९६१ इथे : https://dspace.gipe.ac.in/xmlui/bitstream/handle/10973/48031/1961-06-01-01.pdf?sequence=2&isAllowed=y …. माणूसच्या पहिल्याच अंकात ब मो पुरंदरे, दि बा मोकाशी, श्री ग माजगावकर हे दिग्गज लेखक दिसत आहेत. सांगत्ये ऐका हा चित्रपट जोरात चालत असल्याची जाहिरात आणि इतर अनेक धमाल गोष्टी आहेत. एकंदरीत ही आठवणींची दिवाळी म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Sat, 11/13/2021 - 15:03 नवीन
अत्यंत रोचक! अगदी खरे. खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या. अंक डालो करून ठेवला..
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 11/13/2021 - 15:28 नवीन
माणूसच्या पहिल्या अंकात दि बा मोकाशी यांनी कथा लिहिलेली नसून रेडिओ व ट्रांजिस्टरचे कार्य याच्यावर तांत्रिक लेख लिहिला आहे. त्यांचे स्वतःचे रेडिओ दुरुस्तीचे दुकान होते. लहानपणी माझ्या जाण्या-येण्याच्या रस्त्यावर मी ते पहात असे. त्यात एक मध्यमवयीन व्यक्ती मन लावून रेडीओ दुरुस्त करत बसलेली दिसे. पण ते कोण आहेत याबद्दल काहीच माहिती नव्हती. पुढे कॉलेजला गेल्यावर त्यांच्या काही कथा वाचल्या आणि आवडल्या. एका वर्षी आमच्या कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन कथाकथन स्पर्धेला ते परीक्षक म्हणून आले होते. तेव्हा त्यांना अगदी जवळून पाहता आले. मग कोणीतरी सांगितले की ते रेडिओ दुरुस्ती करतात ना, तेच हे लेखक ! हे कळल्यावर विलक्षण आनंद झाला होता.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 12/07/2021 - 08:44 नवीन
माणूस :15 जानेवारी 1972 यातल्या काही विशेष गोष्टी : १. एका लेखात मद्रास राज्य, मद्रासच्या माननीय आरोग्यमंत्री असे उल्लेख आहेत. परंतु त्याच लेखात तमिळनाडू असाही उल्लेख आहे. २. निरोधच्या जाहिरातीत त्याची किंमत "पंधरा पैशांना ३( सरकारी मदतीने) "असे लिहिले आहे. ३. तीन हिंदी चित्रपटांचे एकत्रित परिक्षण असून त्यात प्रत्येकाची जवळपास संपूर्ण कथा सांगितलेली दिसते. त्या लेखाचा शेवट- "अशी ही तीन हिंदी चित्रपटांची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण" अशी केली आहे ! ४. दुकानाच्या जाहिरातीतील फोन क्रमांक ५ अंकी
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 12/22/2021 - 13:55 नवीन
हे एक सुरस आणि चमत्कारिक Image removed. २००७ पासून ही आहे असे दिसते
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 02/21/2022 - 14:52 नवीन
1987 सालातील एका महाविद्यालयीन वार्षिकाचे मुखपृष्ठ : अश्मयुग ते एकविसावे शतक छान चितारले आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 02/22/2022 - 13:12 नवीन
आजचा दिनांक वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणून इथेच ही नोंद करतो. दरवर्षी या दिनांकाला त्याची आठवण काढता येईल. चित्रावरून तुमच्या लक्षात येईलच की ही संख्या डावीकडून वाचली काय किंवा उजवीकडून, ती एकसारखीच असते (palindrome). Image removed. ... पण इतकेच त्याचे वैशिष्ट्य नाही. ही संख्या पूर्णपणे उलटी केली असता सुद्धा पहिल्या प्रमाणेच दिसते (ॲम्बीग्राम). Image removed.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 03/04/2022 - 05:17 नवीन
रशियाचा रुबल आणि भारताचा रुपया यांच्या विनिमयासंबंधी १८९७ पासून आजपर्यंतचा रोचक इतिहास :
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 03/27/2022 - 13:02 नवीन
पुरुषोत्तम आत्माराम चित्रे , दि पु चित्रे, 'अभिरुचि' या संबंधीचे सुरस किस्से इथे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 04/01/2022 - 17:24 नवीन
खरंच सुरस आणि चमत्कारिक चालू घडामोड ! एका तरुणाने अडीच लाखांची नवी मोटरसायकल निव्वळ एक रुपयाची नाणी देऊन विकत घेतली
  • Log in or register to post comments
M
mayu4u Fri, 09/23/2022 - 11:05 नवीन
घडा"मोड"!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार Fri, 06/24/2022 - 14:27 नवीन
(या माहितीसाठी वेगळा धागा नसल्यामुळे इथे लिहितो) जिवाणू (Bacterium) आपल्या डोळ्यांना दिसत नाही हे झाले सर्वसामान्य ज्ञान. परंतु नुकत्याच जाहीर झालेल्या माहितीनुसार पृथ्वीवरील सर्वात मोठा जिवाणू नुसत्या डोळ्यांना दिसतोय इतका मोठा आहे ! तो कॅरिबियन बेटामध्ये सापडला आहे. वैज्ञानिकांनी त्याला जीवाणूमधल्या माउंट एव्हरेस्ट ची उपमा दिली आहे !
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 06/24/2022 - 21:18 नवीन
कुमारेक, एकपेशीय जीव इतका मोठा असल्याचं नवल वाटतं. अंडं हा एकपेशीय जीव आहे, पण तो हालचाल करंत नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार Sat, 06/25/2022 - 02:18 नवीन
खरंच नवल आहे. अशा जीवाच्या बाबतीत 'सूक्ष्मजीव ' हा शब्द योग्य नसून त्याला नुसतेच जीव म्हटले पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ह
हेमंतकुमार Mon, 07/04/2022 - 07:28 नवीन
101 वर्षांपूर्वी डॉक्टर भास्कर केळकर यांना उच्च शिक्षणासाठी लंडनला जाण्यासाठी ब्रिटिश सरकारने दिलेला पासपोर्ट : Image removed. हा विशेष प्रक्रिया करून जतन केलेला आहे.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 07/04/2022 - 14:25 नवीन
१. भारत हा ब्रिटिश साम्राज्याचा भाग होता. तर भारतातून युके किंवा कोणत्याही इतर commonwealth देशात जाताना पासपोर्ट लागण्याची गरज का होती? २. आधुनिक 'राष्ट्रे' -Nation States साधारण पहिल्या महायुद्धानंतर अस्तित्वात आली. पासपोर्ट हा प्रकार त्यानंतर सुरू झाला की त्याआधी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार Mon, 07/04/2022 - 14:56 नवीन
१. माझ्याही मनात ती शंका आली होती. बहुधा असे असावे : जरी ब्रिटिश आपल्यावर राज्य करीत असले तरी त्यांचा मूळ देश आणि ते साम्राज्य करीत असलेले परकीय देश यात काहीतरी मूलभूत भेद केलेला असावा. तत्कालीन भारतीय हे 'इंडियन' नागरिकच धरले जात असणार ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
ह
हेमंतकुमार Mon, 07/04/2022 - 15:03 नवीन
कुठल्यातरी प्रकारचे 'पारपत्र' या प्रकाराचा उगम अगदी इसवीसन १४१४ पासून असल्याचे इथे म्हटले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
ग
गामा पैलवान Mon, 07/04/2022 - 20:52 नवीन
तुषार काळभोर, मला आठवतं त्याप्रमाणे स्वातंत्र्यापूर्व काळी कोणीही भारतीय नागरिक प्रवास करून ब्रिटनमध्ये जाऊ शके. अर्थात सरकारच्या परवानगीनेच. त्यासाठी पारपत्र असावे. तशीच सोय ब्रिटीश नागरिकांनाही होती. मात्र भारत स्वतंत्र झाल्यावर भारत व ब्रिटन सरकारे एक राहिली नाहीत. त्यामुळे संमतीपत्र ( = व्हिसा ) आवश्यक पडू लागला. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
ह
हेमंतकुमार Mon, 07/18/2022 - 15:31 नवीन
पाण्यासाठी दाही दिशा….. 1976 मध्ये इंग्लंडमध्ये देखील पाणी मिळवण्यासाठी रांगा लागल्या होत्या त्याची स्मृतीचित्रे इथे पाहता येतील: https://www-express-co-uk.cdn.ampproject.org/v/s/www.express.co.uk/news/weather/1642083/uk-heatwave-1976-drought-water-shortage-met-office-red-weather-warning-spt/amp?amp_gsa=1&amp_js_v=a9&usqp=mq331AQIKAGwASCAAgM%3D#amp_tf=From%20%251%24s&aoh=16581507685898&csi=0&referrer=https%3A%2F%2Fwww.google.com&ampshare=https%3A%2F%2Fwww.express.co.uk%2Fnews%2Fweather%2F1642083%2Fuk-heatwave-1976-drought-water-shortage-met-office-red-weather-warning-spt
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 07/24/2022 - 12:52 नवीन
छान स्मरणरंजन: मॅटिनीची मजा
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 08/14/2022 - 15:57 नवीन
१९६९ पासून सलग 53 वर्षे ओमान मध्ये नोकरी केलेल्या अशोक सभरवाल यांनी सांगितलेले अनुभव तेव्हा या लोकांचे पगार लाल रंगाच्या भारतीय नोटांमध्ये होत असत आणि बँकेतले खाते पौंडांमध्ये असे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 08/25/2022 - 08:59 नवीन
1983 मध्ये भारतातील पहिलीवहिली मारुती 800 कार श्री हरपाल सिंग यांना विकली होती. त्या कारचे पुनरुज्जीवन करून ती मारुती उद्योगने आपल्या कंपनीत बघण्यासाठी ठेवली आहे
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 09/18/2022 - 07:35 नवीन
मध्य प्रदेशातील इंदूरमधील जुन्या टाईपरायटर्सचे संग्रहालय सध्या कुतुहलाचा विषय ठरत आहे.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sun, 09/18/2022 - 08:11 नवीन
'आवाज', या दिवाळी अंकासाठी वाचनालयात बजाज स्कूटर सारखे अ‍ॅडव्हान्स बुकींग करावे लागत असे. कधीकधी दिवाळी अंक गुढीपाडव्याला वाचायला मिळत असे. अतिशयोक्ती वाटेल पण लहानपणी गावात सत्यपरिस्थिती होती. बहुतेक तरूण भारत एक 'शांता निसळ'नावाने हिन्दुस्तानी संगीतावर उत्कृष्ट स्तंभलेखन करीत असत. ते नाव आजही लक्षात आहे. नाटकाच्या मोठ्या जाहिराती पुर्वी वर्तमानपत्रात पाच दिवस सलग यायच्या पण बटाट्याची चाळ व वाऱ्यावरची वरात या पुलंच्या कार्यक्रमाची जाहिरात एक दोन लाईनची व एकच दिवस होत असे. तिकीटविक्री एकाच तासात संपवून बुकींग कारकून पुढील चार दिवस झोपा काढत असे. कोयनानगर भुकंप आमच्या आयुष्यातील पहीला अनुभव. सकाळी मोठी माणसे काही बोलताना दिसली व वर्तमानपत्रात मोठे मथळे छापले गेले. काहीच दिवसात पुणे चिपळूण जाताना भुकंपाचे खरे स्वरूप दिसले. बरेच आहेत पण आठवल्यावर.....
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 09/18/2022 - 08:14 नवीन
छान किस्से.
'आवाज', या दिवाळी अंकासाठी वाचनालयात बजाज स्कूटर सारखे अ‍ॅडव्हान्स बुकींग करावे लागत असे
>>> +१ आठवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी
M
mayu4u Fri, 09/23/2022 - 11:08 नवीन
किल्लारी भूकंपाच्या दुसर्‍या दिवशीची हेडलाईनः "उषःकाल होता होता काळरात्र झाली"
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 09/23/2022 - 12:07 नवीन
समर्पक. त्या संध्याकाळ किंवा रात्रीची एक आठवण तत्कालीन 'सकाळ'च्या संपादकांनी दुसऱ्या दिवशी लिहिली होती. बहुतेक तो अनंत चतुर्दशीचा दिवस होता ( चुभूदेघे). पुण्यामध्ये गणपतीची विराट मिरवणूक चालू होती आणि त्यातील एका मंडळाचे वाहन बैलगाडी होते. तर ते बैल एकाक्षणी अक्षरशा बिथरले आणि एकदम शांत झाले होते. बहुदा भूगर्भातील घडामोडी त्यांना भूकंपपूर्व जाणवल्या असाव्यात असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u
ह
हेमंतकुमार गुरुवार, 11/17/2022 - 04:42 नवीन
जुन्या वजनमापांची चित्रमय उजळणी Image removed.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 12/16/2022 - 04:43 नवीन
16 डिसेंबर : भारतीय विजय दिवस यानिमित्ताने फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यासंबंधी वाचलेली एक आठवण. आपल्या स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सैन्यात माणेकशॉ आणि आयुब खान हे दोघेही नोकरीस होते. तेव्हा दोघे चांगले मित्र होते. त्यावेळेस माणेकशॉ यांना त्यांची फियाट गाडी विकायची होती म्हणून त्यांनी आयुब खान यांना विचारले. खान यांनी होकार दिला आणि विक्रीची किंमत ठरली चार हजार रुपये. खान गाडी घेऊन गेले परंतु पैसे मात्र त्यांनी लगेच दिले नाहीत. माणेकशॉ यांनी पण ते मागण्याची घाई केली नाही. पुढे काळ लोटला. भारत व पाकिस्तान स्वतंत्र झाले. 1971 च्या दरम्यान हे दोघेही आपापल्या देशांचे सैन्यप्रमुख झाले. नंतर दोन्ही देशांचे युद्ध झाले व त्यात आपण जिंकलो आणि बांगलादेश स्वतंत्र झाला. काही दिवसांनी दोन्ही देशांची एक उच्चस्तरीय बैठक ठरली. त्यात हे दोघे एकत्र आले. जेव्हा ते चहापानासाठी एकत्र भेटले तेव्हा आयुब खान यांनी ते चार हजार रुपये माणेकशॉ यांनी घ्यावेत अशी विनंती केली. तेव्हा माणेकशॉ हसून म्हणाले,
“अरे मित्रा, तू गाडीचं काय घेऊन बसला आहेस ? त्यापेक्षा कितीतरी अधिक पट तू मला दिले आहेस- अख्खा बांगलादेश !”
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 02/17/2023 - 11:41 नवीन
जोशी-अभ्यंकर मालिका हत्याकांडाचा उलगडा करणारी वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विवेक वाघ यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 03/03/2023 - 11:41 नवीन
आजही शहरांमध्ये ही कला जिवंत आहे तर ! ती भांडी वापरणारे शौकीन देखील आहेत. Image removed. शालेय अभ्यासात कल्हईतील रसायनशास्त्रावर हमखास प्रश्न असायचे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 03/03/2023 - 13:05 नवीन
अशा कल्हई केलेल्या भांड्यांमध्येच काही ठिकाणी केली जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
N
Nitin Palkar Fri, 03/03/2023 - 14:47 नवीन
केवळ बिर्याणीच नव्हे तर पितळेच्या भांड्यांमध्ये काहीही शिजवायचे असले तर त्या भांड्याला कल्हई असावी लागते अन्यथा पदार्थ खराब होण्याची (कळकण्याची) शक्यता असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा