Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

इतकी शहाणीसुरती माणसं मुळी देवच का मानतात?

S
Shantanu Abhyankar
Wed, 02/10/2021 - 11:23
💬 169 प्रतिसाद
इतकी शहाणीसुरती माणसं मुळी देवच का मानतात? एका अवैज्ञानिक कल्पनेची वैज्ञानिक चिकीत्सा डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई. ‘इतकी शहाणीसुरती माणसं मुळी लग्नच का करतात?’, असा प्रश्न ‘लेकुरे उदंड झाली’, या नाटकात एका जोडप्याला पडलेला असतो. अर्थात यांचे रीतसर लग्न झालेलेच असते. याच चालीवर, ‘इतकी शहाणीसुरती माणसं मुळी देवच का मानतात?’, असा प्रश्न विचारता येईल. आस्तिकांच्या मते देव आहेच, आपले अस्तित्व तो विविध लीलांनी दाखवून देत असतो आणि नास्तिकांच्या मते देवाचे अस्तित्व सिद्ध करता आलेले नाही सबब तो नाहीच. तेंव्हा देव आहे का नाही ह्याची चर्चा फारशी उद्बोधक ठरणार नाही. पण देव मानणारे, ‘असे कसे काय बुवा देव मानतात?’ ह्या प्रश्नाचा शास्त्रीय मागोवा बरंच काही शिकवून जाईल. अशा काही मागोव्यांचा हा मागोवा. आधुनिक काळात मानसविद्येमध्ये महत्वपूर्ण संशोधन झाले आहे आणि या प्रश्नाच्या उत्तराची निदान रूपरेषा आता स्पष्ट आहे. जगातील यच्चयावत धर्मकल्पनांमध्ये विलक्षण साम्य आढळून येतं. आढळणारच; कारण यच्चयावत देव-दानव नरे निर्मिलेलेच आहेत. माणसाच्या मन-मेंदूचीच ही करामत. या सर्व-धर्म-समभावांची ही छोटीशी जंत्री. अतीनैसर्गिक शक्तींवर विश्वास. सचेतन आणि अचेतन शक्तींवर विश्वास. मरणोत्तर घटिताबद्दल दावे. ‘आपले’(धर्मबांधव) आणि ‘इतर’, असा सरासर भेद आणि इतरांप्रती दुष्टावा. नित्य आणि नैमित्तिक कर्मकांडे. स्वप्नांचा, शकुनांचा अर्थ लावणारे ठोकताळे. नृत्य आणि संगीत. काही शब्द आणि काही अन्नपदार्थांवर बंधने. पावित्र्य-अपावित्र्य, सोवळे-ओवळे अशा कल्पना, विभूति-शरणता, धार्मिक आणि म्हणून नैतिक अशा जबाबदाऱ्या, आपोआप होणारी दैवी शिक्षा आणि बक्षिसी, वगैरे, वगैरे. इतकी सारी साम्य आहेत म्हटल्यावर ज्या मनात आणि समाजमनात धर्म उगम पावला त्यांचाही अभ्यास आलाच. त्यातही बरीच साम्यस्थळे गवसली आहेत. भावनाप्रधान माणसं अधिक देवभोळी आणि विवेकप्रधान, विचार करणारी माणसं, अधिक नास्तिक असल्याचं आढळून आलं आहे. एकलकोंडी, समाजापासून तुटलेली माणसं, अनिश्चिततेच्या गर्तेतील माणसं, मृत्यू समोर दिसत असलेली माणसं; देवात सोबत शोधतात, आधार शोधतात. छुपी नास्तिक किंवा ‘भोंदू आस्तिक’ मंडळीही असतात. आसपासची इतकी सगळी प्रजा आस्तिक असताना आपले नास्तिकपण मिरवणे सोपे नसते. फायद्याचे तर नसतेच नसते. बरेचदा तोट्याचेच असते. तेंव्हा मनातून नास्तिक आणि तोंडदेखले आस्तिक असतात. मानसिकतेबरोबर सामाजिक रचनेचाही भाग येतो. उत्तम सामाजिक, आर्थिक, मानवविकास निर्देशांक असलेल्या देशी, नास्तिकांचे प्रमाण जास्त असते. समृद्ध, सर्वार्थी अर्थव्यवस्था असलेल्या देशात नास्तिक जास्त. इथे अस्मानी संकट आलं तर सुलतान मदतीला येईल अशी सोय असते. मग आपोआपच आभाळातल्या बापावरचे अवलंबित्व कमी होते. पण या सगळ्याला ओलांडून जाणारे, देवकल्पनेची उत्क्रांती मांडणारे, काही संशोधन आता पुढे येते आहे. उत्क्रांतीच्या ओघात आपले कपी वा मानवरुपी पूर्वज देव मानत नसावेत. मग नेमक्या कोणत्या टप्प्यावर हा देव नामक किडा माणसाच्या मेंदूत शिरला असावा बरे? ही कल्पना सर्व खंडात, सर्व संस्कृतीत आढळते. तेंव्हा भाषेचे प्रारूप जसे माणसाच्या मेंदूत आदिम काळापासून कोरले गेले आहे तसेच देव-धर्माचा एक तयार कोनाडा, एखादं मखर, काही रूपरेषा, मेंदूत आदिम काळापासून आहेच की काय? मेंदूत निश्चित असे ‘देवाचे केंद्र’ (God Centre), ‘चेतापेशींची खास वीण’ (Network) किंवा (तीर्थ)‘क्षेत्र’ (God Area) नाहीये. इतर अनेक कार्यांसाठी कार्यरत असणाऱ्या अनेक यंत्रणा, देवाधर्माचं करताना उद्दीपित होतात. या यंत्रणा देवकल्पनेच्याही आधीच्या आहेत. यांच्याच पायऱ्या करून, देवाचे देव्हारे सजवले गेले आहेत. म्हणजे देव, हा तर करायला गेलो एक आणि झाले भलतेच, असा प्रकार आहे. इतर व्यवहारांसाठी म्हणून जी कौशल्ये, उत्क्रांत झाली; त्यांचा उपयोग देवकल्पना, धर्मभावना वगैरे रुजायला झाला. हे काहीसं लिहिण्या-वाचण्यासारखं किंवा संगीतासारखं आहे. मेंदूत लिहिणे-वाचणे उपजत नाहीये. भाषा (व्याकरणाचे प्रारूप) आहे, दृष्टी आहे, चिन्हांची समज आहे आणि बोटांच्या नेमक्या हालचाली उपजत आहेत. या साऱ्यांचा उपयोग इतर अनेक गोष्टींसाठी होतो म्हणून ह्या उपजत आहेत. माणसाने आपलं डोकं वापरुन ह्या कौशल्यांचा वापर करून लिहिणे-वाचणे ही भलतीच गोष्ट शोधून काढली आहे. भाषेतील स्वर आणि व्यंजनांची नादमय रचना करून, सुरवातीला हृदयाशी ठेका जुळवत, संगीत ही भलतीच गोष्ट शोधून काढली. तसेच मुळात समाज-धारणा करणारी, लोकव्यवहार सुलभ करणारी, मनरचना देव-धर्म धार्जिणी ठरली आणि देवाधर्माचं तण माजलं असं ताजं संशोधन सांगतं. देव-कल्पनेचं बीज तरारून फुटेल अशी मेंदूच्या कार्याची मऊसर रचना उत्क्रांत झाली. तेंव्हा ही कशी उत्पन्न झाली?, कोणत्या औत्क्रांतिक ताण्याबाण्यातून उत्पन्न झाली?, ह्याचा शोध उद्बोधक ठरेल. मेंदूतील औत्क्रांतिक कोरीवकाम गवतात खसखस ऐकू आली तर आपल्या भटक्या पूर्वजांच्या मनात दोन शक्यता चमकायच्या, गवतात कोणी जनावर तर नाही? वाघ? का नुसतीच वाऱ्याची सळसळ? जर वाघ समजून लांबची वाट धरली आणि तिथे वाघोबा नसेलच तर थोडे सावध, थोडे दुरून निघून जाण्याने, फारसं काही बिघडलं नाही. पण जर वाघ असताना, वाघ नाही असं समजलं तर? तर मग जीवावर बेतेल ना! मग वाघोबा तुमचा चट्टामट्टा करेल, तुम्ही उत्क्रांतीच्या स्पर्धेतून बाद. तुमचा वंशखंड. वाघ आहे हा गैरविश्वास (श्रद्धा) आपलं फारसं काही बिघडवत नाही पण वाघ नाही असा फाजील विश्वास जीवावर बेततो. आपल्या पूर्वजांच्या लाखो वर्षाच्या अतूट साखळीचे आपण वारसदार. आपले पूर्वज सावधपणे वागले, नसलेल्या वाघोबालासुद्धा घाबरले, म्हणून आपण आहोत. थोडक्यात आपण सारे, अतीसावध, सतत वाघोबा शोधणाऱ्या, मेंदूंचे वारस (Hyperactive Agency Detection) आहोत. त्यामुळेच जिथेतिथे, ज्यातत्यात आपण वाघोबा शोधत असतो. निसर्गात वाघोबा क्वचित आणि वाऱ्याची सळसळ अधिक. पण आपल्या मेंदूला निरनिराळी टिंब जोडून वाघोबाचं संगतवार चित्र जुळवायची खोड आहे. भासणारी चित्रसंगती हेच सत्य असं आपला मेंदू मानून चालतो. आपण प्रत्येकवेळी सत्यान्वेषी विचार करत नाही. बहुतेक श्रद्धांमागे माणसाचे हे संगती-शोधक, संगती-रत मन आहे. ह्याच मनानी, मनानी लावलेल्या सावध संगतीने तर आपण आजवर तगलो आहोत, वाघापासून वाचलो आहोत. अतीसावध संगती बरोबर प्रत्येक घटीताला कर्ता आणि प्रत्येक कर्त्याला हेतू चिकटवण्याचीही आपल्याला अभिजात खोड आहे (Folk Psychology). हिसका दिला की फांदी तुटते, झाड हलवले की फळे पडतात, आपल्या हेतुतः केलेल्या कृतीतून काही परिणाम घडतो, हे लक्षात येताच तोच तर्क माणसांनी आसपास सगळ्यालाच लावायला सुरवात केली. हा कर्ता मग कधी प्राणी असतो, कधी मनुष्यप्राणी असतो वा कधी निसर्ग असतो. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे कोणीतरी ‘घडवणारा’ आहे आणि त्या घडवणाऱ्याचा काहीतरी ‘हेतू’ आहे, अशी समजूत मानवी मनात दृढ झाली. मग वाऱ्यात वरूण, पावसात इंद्र, जलाशयात अप्सरा आणि वडा-पिंपळावर हडळ सहजच सापडायला लागते. त्यातून वाऱ्या-पावसाची, जळा-पिंपळाची, एकूणच निसर्गाची ‘वागणूक’ इतकी बेभरवशाची, इतकी बेदरकार, की त्यांना कोणतेही नियम किंवा नियमन अशक्य. तेंव्हा त्यांच्या वागणुकीला ‘त्यांची इच्छा’ हे कारण फिट्ट बसणारे. गोष्टीरूप पुराव्यावर झटकन विश्वास हा देखील आपल्या संगती–रत मनाचाच छंद. माझ्या काकाचा कॅन्सर होमिओपॅथिने बरा झाला, मंत्राने सापाचे विष उतरले, वास्तूशास्त्राने भरभराट झाली, अशी विधाने सहज स्वीकारली जातात. संगतींचा सत्यान्वेषी शोध दरवेळी शक्य असतोच असं नाही. भासलेल्या संगतीची सत्यासत्यता पडताळून पहाणारी पद्धत म्हणजे विज्ञान. तर्कदुष्टतेचं हे पाप फक्त पूर्वजांच्या माथी मारण्यात अर्थ नाही. आजचेही बरेचसे तसाच विचार करत असतात. सृष्टी सत्असत् शक्तींनी भरलेली आणि भारलेली आहे, झाडापानाफुलाला आणि मानवनिर्मित गोष्टींनाही; ‘मन’ आणि ‘इच्छा’ आहे आणि ह्या साऱ्याची आपल्यावर कृपादृष्टी अथवा वक्रदृष्टी आहे; अशा कल्पना आजही सर्व संस्कृतीत आहेत. काही कृतींनी अथवा पूजा-प्रार्थनेनी, या अचेतन वस्तूंना पाझर फुटतो, त्या आपल्या भल्यासाठी सहाय्यभूत होतात, ही ह्याच विचाराची पुढची कडी. नव्या गाडीला नारळ फोडणे असो वा नव्या कॉम्प्यूटरची पूजा करणे असो, हे सारे प्रकार या चीजांना आपण स्वतंत्र ‘इच्छा’, ‘मन’ बहाल केल्याचे दर्शवतात. मोठ्या टोळ्या आणि देवकल्पना सुमारे २,५०,००० वर्षापूर्वी माणूस म्हणावा असा प्राणी या ग्रहावर उत्क्रांत झाला. अगदी परवा परवापर्यंत तो भटक्या शिकारी होता. शे-दीडशेच्या टोळ्या टोळ्यांनी रहात होता. याहून मोठा गट भटकत, शिकारीवर गुजराण करूच शकत नाही. शेतीचा शोध लागला आणि शे-दिडशे माणसाची टोळी हजारांची झाली. अर्थात आपल्या कपी पूर्वजांच्या टोळ्यात तर वीस-पंचवीसजणच असायची. त्या मानानी मानवी टोळ्या मोठ्ठ्याच मोठ्ठ्या म्हणायच्या. ह्या मोठ्या टोळ्या टिकायच्या आणि तगायच्या तर अंतर्गत सहकार्य अत्यावश्यक ठरते. सहकार्यासाठी काही खास जाणीवा असणे अनिवार्य ठरते. या अशा जाणिवांतून देव कल्पनेचा उगम झाला असावा. पुढे गावं, शहरं वसली. आता बरेचसे व्यवहार अनोळखी माणसांत होऊ लागले. छोट्याश्या टोळीत बनेल कोण, लबाड कोण, हे सहज ओळखणं शक्य होतं. तिथल्यातिथे शासन शक्य होतं. पण हजारोंच्या टोळीत हे कसं जमावं बरं? मग युक्त व्यवहारांना संरक्षण देणारे आणि फसवेगिरीला शासन करणारी अशी व्यवस्था आणि असे रखवालदार आले. हे अपुरेच. तेंव्हा ‘काल्पनिक रखवालदार’ आले. ह्या रखवालदारांच्या काठीला आवाज नसतो, ह्यांचे कुणालाही ज्ञात न होणारे विचित्र नेमानेम असतात. शिक्षा होते खास, पण ती मृत्युनंतरही असू शकते, पुढच्या जन्मीही असू शकते; अशा अनेक कल्पना आल्या. शपथ देणे, शपथ घेणे, दिव्य करणे, पापपुण्य, त्यांचा संचयाचे आणि क्षालनाचे अनेकविध मार्ग हे सारे ह्याच कल्पनांचे विलास. नागरी जीवनाबरोबरच, समाजव्यवहार सुरळीत चालू रहायला धर्मकल्पना विकसित झाल्याचं दिसतं. जगरहाटी चालायची तर सहकार्य वाढेल पण त्याचवेळी ऐतखाऊ पोसले जाणार नाहीत अशी रचना पुरवणाऱ्या दोन संस्था, धर्मसंस्था आणि राज्यसंस्था. टोळीपासून स्थिर समाज निपजला तशा ह्या दोन्ही संस्था उदयाला आल्या. धर्मामुळे समाजाच्या संघशक्तीला एक दिशा मिळते. गाव करील ते राव काय करील, या उक्तीचा प्रत्यय धार्मिक (अथवा इतर) संघटनेमुळे वारंवार येतो. एक मन, एक मनगट; असा समाज दिलेली उद्दिष्टे सफल करू शकतो. प्रत्यक्ष देवाजीची इच्छा न मानणाऱ्यास; या, अथवा पुढील, अथवा जन्मोजन्मी शिक्षा; म्हटल्यावर माणसं ऐकतात. शिस्त पाळतात. प्रचंड पिरॅमिड देखील बांधतात. पण शेवटी धर्मानी दिलेला ‘आदेश’, ‘दिशा’, ‘उद्दिष्ट’, म्हणजे धर्म-धुरीणांच्या दृष्टिकोनाची परिणीती. प्रत्यक्षात कुठलाही देव येऊन कोणताही आदेश देत नाही. तेंव्हा धर्माचार्य जी ठरवतील ती दिशा असाच मामला असतो. काल्पनिक कार्यकारणभावावर बेतलेली, वास्तवाची बूज न राखणारी ही दिशा अर्थातच चुकू शकते. नव्हे बरेचदा चुकते असाच इतिहासाचा दाखला आहे. टोळ्या म्हटलं की युद्ध आलीच. धर्माचे युद्धोपयोगी गुण तर आजही उधळले जात आहेत. लढायचं तर अनेक गुणांचा समुच्चय लागतो. सहकाऱ्यांप्रती निष्ठा, निधडी छाती, विजयाचा विश्वास, शौर्याचा उदोउदो, आपलीच बाजू नीतीची अशी खात्री आणि प्रणार्पणाची तयारी. धर्म हे सगळं सहज जुळवून आणतो. कर्मकांडातून लहानपणापासूनच धर्मसंघटनेला निष्ठा वाहिलेल्या असतात. आपलीच बाजू धर्माची असल्याचा विश्वास असतो, शत्रू दानव असल्याची खात्री असते, विजयाची खात्री असते आणि धर्मासाठी प्राणाहुती देणाऱ्यांना स्वर्गसुखाची गॅरंटी असतेच असते. शत्रूसंगे संगरासाठी धर्म असा एकोपा पुरवतो. म्हणून तो रूजला, वाढला. अर्थातच ज्याच्या बुडाशी धर्मपीठाची गादी, ज्याच्या तोंडाशी धर्मप्रवक्तेपदाचा माइक, त्याच्या हाती युद्धाचे रणशिंग अशी अवस्था होती आणि काही प्रमाणात आहे. धर्माधिष्ठित देशात एकदा ‘धर्मयुद्ध’ म्हटलं की प्रश्न बंद होतात. पण धर्मनिरपेक्ष देशात युद्धाच्या अपरिहार्यतेची साधकबाधक चर्चा शक्य आहे. नागर व्यापार उदीम बहरायचा तर विश्वासार्हता महत्वाची. ती विश्वासार्हता पूर्वी (आणि काही प्रमाणात आजही) धर्म बहाल करतो. तुमच्या धर्मबांधवांवर तुमचा चटकन विश्वास बसतो. ‘न्यू मराठा खानावळीला’ मराठाच भाजी पुरवतो आणि ‘अंजुमन इस्लाम’ शाळेचं बांधकाम स्वाभाविकपणेच मुसलमान कंत्राटदाराला मिळतं. आंतरधर्मीय विवाह म्हणजे महदाश्चर्याचा दुख:द धक्का. ज्यू, पारशी, मारवाडी, बोहरी इत्यादी समाज दुरदूरच्या देशी, पूर्वापार व्यापार करू शकले त्याचं एक कारण धर्मानी दिलेली ही हमी, हा ‘विमा’. आज विमा आणि विश्वासार्हतेच्या तत्सम साधनांमुळे धर्माचं हे अंग आता दुर्बल झालं आहे. पण संपलेलं नाही. उदाहरणार्थ, आंतरराष्ट्रीय व्यापारातही, भ्रातृभावाच्या सिमेंटनी लिंपलेली आणि परभावाच्या काटेरी कुंपणांनी राखलेली, ज्यूंची चिरेबंदी धर्मवर्तुळे आहेत. टोळ्यांनी रहाण्याची आपली आदिम सवय आपल्याला आप-परभाव शिकवून गेली आहे (Kin Psychology). आपला तो जातभाई, धर्मबंधू, देशबांधव. बाकीचे ते परजातीय, परधर्मीय, काफिर, शत्रु. टोळ्यांत एक सामाजिक उतरंड असते, खालच्यांनी वरच्यांना सलाम ठोकण्याच्या, आदर दाखवण्याच्या तऱ्हा असतात. वरीष्ठांचा अनादर म्हणजे टोळीतून बहिष्कार जणू ठरलेला. नेते, सामाजिक वरिष्ठांचा सन्मान, व्यवस्थेशी बांधिलकी हे सारं यातूनच येतं. ग्रंथप्रामाण्य, शब्दप्रमाण्य, बाबा वाक्यं प्रमाणं, हेही यातूनच येतं. आजही घरांघरांतून, शाळाशाळातून, हे मुलांच्या मनावर बिंबवलं जातं. लहानपणी असं प्रामाण्य आवश्यक आणि संरक्षक असतं. प्रत्येक प्रसंगी, प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक गोष्ट, पुराव्याने शाबीत करून पहाण्याची गरज नसते. एक सामायिक शहाणपणाचं संचित प्रत्येक समाजापाशी असतं. ते वापरणं नक्कीच परवडतं. पण या सवयीनी चिकित्सक विचार, जिज्ञासू वृत्ती आणि पुराव्याइतकाच विश्वास ही विचारधारा रोखली जाते. चिकित्सक अविश्वासाला धर्मात मुळीच थारा नाही. उपजत मानवी विचारधारेतही नाही. आंधळा विश्वास हा मानवी विचारधारेचा वहिवाटीचा मार्ग आहे, धोपट मार्ग (Default Pathway) आहे. हे धर्माला सोयीचेच आहे. माणूस हा विचारी प्राणी आहे म्हणे. तेंव्हा पुढ्यात आलेल्या माहितीचा तो योग्य शहानिशा करून, खात्री करून, काटेकोर शास्त्रीय निकष लावून; मगच स्वीकार वा नकार ठरतो; असं आपल्याला वाटत असतं. पण प्रत्यक्षात जे पुढ्यात येतं त्याकडे आपण आपल्या मगदुरानुसार, मतानुसार, श्रद्धांनुसार, पूर्वग्रहांनुसार बघतो. त्यातले सोयीचे तेवढे स्वीकारतो, आणि त्याच्या समर्थनार्थ युक्तिवाद शोधतो. जे गैरसोयीचे असेल त्याकडे दुर्लक्ष तरी करतो किंवा ते तर्कशुद्ध नसल्याचा तर्क लढवतो. (Biases and heuristics) अविश्वास दाखवणे, चिकित्सा करणे, कष्टसाध्य आहे, ते शिकावे लागते. जन्मजात तर्कदुष्ट मानवी बुद्धीला शिस्त लावायचं काम विज्ञान करतं. सिद्धतेच्या प्रमाणात विश्वास ही विज्ञानाची बाजू आणि ‘संशयात्मा विनश्यति’ ही सर्व धर्मांची शिकवण. प्रत्येक बाबतीत शंका घ्या, पुरावा तपासा, असं विज्ञान सांगतं; तर डोळे मिटून आधी विश्वास ठेवा, पुरावा कसला मागता? थेट प्रचीतीच पहा, असं धर्मशास्त्र सांगतं. बहुतेक सत्तांना, अर्थसंस्थांना, सामाजिक संस्थांना, राजकीय विचारांना ही दुसरी पद्धत सोयीची असते. निमूट स्विकारवादी बरे, शंकेखोर म्हणजे शंकासूर. समाजात रहायचं तर दुसऱ्याच्या मनातलं ओळखता येण्याला अनन्यसाधारण महत्व आहे (थिअरी ऑफ माइंड). ही कला माणसात उदय पावली आणि माणसाची जमात फळफळली. या कलेतून समोरचा कसा वागेल याचा अंदाज बांधता यायला लागला आणि सामाजिक अभिसरण सुरळीत व्हायला मदत झाली. सामनेवाला हा स्वतंत्र मन, विचार, बुद्धी आणि हेतु असलेला जातभाई आहे ही समज उगवली. अर्थात समोरच्याच्या कृतींमागे हेतू आहे हे ओळखणं तसं सोपं गेलं माणसाला, प्रत्येक गोष्टीला हेतू चिकटवायची खोड माणसाला होतीच! मनकवडेपणाबरोबरच इतर अनेक गुणांमुळे देवाधर्माच्या खेळात मानवी मन खिळून रहातं. शरीर आणि मन असं द्वैत आपण गृहीत धरून चालतो. ही मूळ धारणा, धर्म द्विगुणित, त्रिगुणीत, अनंतगुणीत करतो. अशरीर आत्मे-परमात्मे, भुते-खेते सर्व धर्मात ठाण मांडून आहेत ती या मूळ गृहितकाची अपत्ये. पण शरीराशिवाय मनाला स्वतंत्र अस्तित्व नाही अशी विज्ञानाची अद्वैतवादी शिकवण आहे. मनुष्याला इतरांच्या वेदनेची जाणीव असते आणि परपीडेपासून दुःख होते. शिवाय आजचे मदतरूपी (सत्)कृत्य, म्हणजे उद्याच्या परतफेडीची पेरणी असते. मी तुला तेंव्हा मदत केली तू आज मला मदत कर, अशी देवघेव असते. अशी देवघेव न्याय्य असावी ह्या अपेक्षेतून न्याय, हक्क, वगैरे जाणीवा विकसित झाल्या आहेत. आपल्या मेंदूतील चेतातंतूंच्या जाळ्यातील विवक्षित भाग समोरच्याच्या हालचालींनुसार उद्दिपीत होतो, असं आता लक्षात आलं आहे. म्हणजे समोरच्याने डावा हात वर केला, तर माझा डावा हात नियंत्रित करणाऱ्या चेतापेशी क्षणिक उद्दीपीत होतात आणि समोरच्याचा डावा हात कोणी जोरात पिरगळला तर माझ्याही मेंदूतील वेदनेच्या चेतापेशी क्षणिक उद्दिपीत होतात. स्वतःत वेदनेचे प्रतिबिंब पाहून, वेदनेला सहवेदनेचा आयाम देणारे हे दर्पण-चेतातंतू (Mirror Neurons). अनुकंपा, सहानुभूती आणि सहाय्य करण्याची उर्मी इथे उगम पावते. हेच पहा ना, आफ्रिकेच्या गवताळ सवाना प्रदेशात, कोट्यवधी वर्षापूर्वीचा, एका होमो इरेक्टस स्त्रीचा, सांगडा सापडला आहे. हिला, बहुधा कोण्या प्राण्याच्या मांसातून, अ जीवनसत्वाची विषबाधा झाली असावी. परिणामी सांध्यात रक्तस्त्राव होऊन ती मृत्यूपूर्वी काही महीने तरी जायबंदी असावी. अर्थात काही कोटी वर्षापूर्वी, कोणी जागेवर अन्नपाणी पुरवल्याशिवाय, इतके महीने, कोणी जगूच शकणार नाही. तेंव्हा सोबतचे होमो इरेक्टस तिची सुश्रूषा करत होते खास. थोडक्यात वेदनेला कारुण्याचा प्रतिसाद धर्माने शिकवलेला नाही तो तर माणसाच्या वागणुकीत आधीच वसलेला दिसतो. सहवेदनेबरोबर सह-सौख्यभावनाही आहे. सणासुदीला सगळेच खुशीत दिसतात, वर्ल्ड कप जिंकल्यानंतर चराचर सृष्टी आनंदाने डोलू लागते वगैरेमागेही हेच दर्पण तंतू आहेत. हा उपजत गुण धर्माच्या पुरेपूर कामी आला आहे. माणसाच्या मनी वसलेले असे अनेक गुण धर्मभावनेला उपयुक्त ठरलेले आहेत. धर्माशी निगडीत, आभास, साक्षात्कार, सृष्टीशी तादात्म्यभाव असे अनेक घटक आधुनिक मानसाभ्यासाचे विषय आहेत. मायकेल परसिंगर याने असं दाखवून दिलं आहे की आपली स्वत्वाची भावना, ‘आपण’ आणि ‘इतर व्यक्ती’ हा भेद करण्याची क्षमता, मेंदूच्या डाव्या आणि उजव्या अशी दोन्ही टेम्पोरल लोबमध्ये (कानशिलापुढील भाग) असते. जागेपणी आपण फक्त मेंदूच्या डाव्या भागतील क्षमता वापरत असतो. पण भीती अथवा नैराश्याच्या छायेत, संकटकाळी, गुदमरल्यावर, रक्तशर्करा घटल्यास उजव्या बाजूची क्षमताही बरोबरीने जागृत होते आणि आपल्या सोबत ‘अन्य कोणीतरी’ आहे असा अनुभव येतो. अगदी अस्साच अनुभव ‘देव टोपडे’ (God Helmet) घालून कृत्रिमरीत्या घेता येतो. ‘देव टोपडे’ ही परसिंगरची निर्मिती. हे टोपडे घालून अंधाऱ्या, शांत, खोलीत एकटेच बसायचं, ह्या टोपड्यातील यंत्रणा त्या व्यक्तीच्या मेंदूच्या उजव्या टेम्पोरल भागाला उद्दिपीत करते आणि त्या बंद खोलीत बरोबर अन्य कोणी असल्याचा भास त्या व्यक्तीला व्हायला लागतो. मदर मेरीपासून ते मेलेल्या आत्यापर्यंत आणि साईबाबांपासून ते आईबाबांपर्यंत; आपापल्या सुप्त इच्छा अपेक्षांनुसार, कुणाचेही दर्शन होऊ शकते. इतकेच कशाला टेम्पोरल लोब एपिलेप्सीच्या (एक प्रकारचा अपस्माराचा आजार) पेशंटना अगदी असेच उद्दीपन मिळते आणि अगदी असाच अनुभव येतो. या मुळे की काय, असे पेशंट बरेचदा आत्यंतिक धार्मिक असतात. चराचर सृष्टीशी एकरूप झाल्याचा अनुभव हा देखील असाच एक साक्षात्कारी अनुभव. ही झपूर्झा अवस्था प्राप्त होते तेंव्हा मेंदूतील फ्रॉन्टल लोब (कपाळा मागील भाग) उद्दिपीत असतो तर वामांगी परायटल लोब (डाव्या कानाच्यावरचा भाग) शांत स्थितीत असतो. हाच तो मेंदूचा भाग ज्यामुळे आपल्याला आपण सृष्टीपासून अलग आहोत ही जाणीव होत असते. आपण कुठे ‘संपतो’ आणि ‘सृष्टी’ कुठे सुरू होते, ते हा भाग आपल्याला सांगत असतो. तळमळीने केलेला देवाचा धावा, ध्यान-धारणा, नामस्मरण, भजन-कीर्तन वगैरे सांगीतिक संकेत, मंत्रजप अशा क्रियांनी या वामांगी परायटल लोबला तात्पुरती गुंगी येते, फ्रॉन्टल लोब उद्दिपीत होतो आणि ‘मी’ पण सरते. मंत्रचळ (Obsessive compulsive disorder) नावाचा एक आजार आहे. ह्यात ती व्यक्ति अगदी निरर्थक क्रिया वारंवार करत रहाते. सतत हात धुणे, एकच वाक्य बडबडत रहाणे, येरझाऱ्या घालणे असं काहीही. देवाधर्माचे ‘करणे’ या सदराखाली धडधाकट माणसेही असे प्रकार करताना दिसतात. वारंवार तीच तीच क्रिया केल्याने चिंता, भीती, वगैरे कमी होते आणि धीर, आत्मविश्वास वाढतो. जप, प्रदक्षिणा वगैरेंनी हाच परिणाम साधला जातो. ‘धर्म हा समाजाचा मंत्रचळ आहे आणि मंत्रचळ हा त्या त्या व्यक्तीचा वैयक्तिक धर्म आहे’; असं फ्रॉइडने म्हणून ठेवले आहे. भातुकली खेळताना किंवा नाटक पहाताना आपण सारासार विचार क्षणभर हेतुतः बाजूला ठेवतो. पडद्यावरच्या लटक्या जगात ठाकुर खरोखरच थोटा झाला आहे, जय खरोखरच मेला आहे, गब्बरचे हात जायबंदी झाले आहेत आणि बसंती अन् विरुचा खट्याळ शृंगार पुढे फुलणार आहे असं मानून चालतो आपण. ते विश्व आणि आपलं विश्व अशी मानसिक फारकत शक्य असते आपल्याला. (Decoupled Cognition) स्थळ, काळ, वेळेचा असा हेतुतः विसर, विपर्यास हा आपल्या मेंदूचा आणखी एक धर्म-धार्जिणा गुण आहे. ह्या गुणाचा एरवीही उपयोग होतो आपल्याला. ऑफिस मधली बाचाबाची आपल्याला पुनःपुन्हा आठवते आणि आपण प्रतिवाद तयार ठेवतो. उद्याच्या भिशीबद्दल बायकोला काय थाप मारायची ह्याची उजळणी आपण आजच करून ठेवतो. बॉसशी, बायकोशी, काय आणि कसं बोलायचं ह्याची तालीम त्यांच्या अनुपस्थितीत करतो आपण. मनातल्या मनात अदृश्य इतरेजनांशी असा मानसिक संवाद अगदी सहज शक्य आहे आपल्याला. प्रेतात्म्यांशी संवाद, देवात्म्याशी संवाद ही सुद्धा ह्याच गुणाची प्रचिती. लहान मुलं बाहुलीशी, टेडी बेअरशी बोलतात. देव म्हणजे मोठ्या माणसांचं टेडी बेअरच आहे. दोन व्यक्तीत संवाद होताना मेंदूत जे भाग प्रदीप्त होतात तेच भाग टेडीशी संवाद होतो किंवा देवाची प्रार्थना केली जाते, तेंव्हाही प्रदीप्त होतात. आपलेपणाची भावना, ही एक आदीम भावना आहे. या जगात माझं म्हणून कोणी आहे, मला माझे म्हणणारे कोणीतरी आहे या भावनेसाठी (Attachment) खास सर्किटस आहेत मेंदूत. कित्येक प्रार्थना काकुळतीने करूणाकराला ‘माझे म्हणा’ अशी आळवणी करतात; कित्येक भक्त, अशी आर्जवे करताना एखाद्या तान्ह्या मुलाने आईकडे ‘घे’ म्हणून हात पसरावेत तसे मूर्तीकडे किंवा आभाळाकडे हात फैलावतात, ते काही उगीच नाही. माणसं; मृत्यू, गैरसमज किंवा परदेशगमनामुळे हिरावली जाऊ शकतात पण देव कायमचा सखा, कायमचा सुहृद. आपलेपणाची ही घट्ट भावनिक गरज, देवाचा स्वीकार सुलभ करते आणि देवाचा त्याग अतिशय दुष्कर करते. बालपणी नात्यागोत्यांच्या व्यवस्थापनाची शिकवण आपल्याला मिळत असते. पालक, वडीलधारी माणसं, यांच्याकडून अपेक्षा आणि त्यांच्या जबाबदाऱ्या आपण शिकत असतो. मोठं होता होता इतर नातीही आपण याच कोंदणात बसवत जातो (Transference). नसलेल्या देवाशी असलेले नातेही सर्व धर्मियांनी या कोंदणात बसवलेले दिसते. त्वमेव माता, पिता त्वमेव, त्वमेव बंधू, सखा त्वमेव; अशी प्रार्थनाही सर्व धर्मात आढळते, ती यामुळेच. शुद्धाशुद्धतेच्या, पावित्र्य आणि अपवित्र्याच्या कल्पनांना देखील प्राचीन आयाम आहेत. स्वच्छतेकडे नैसर्गिक ओढा आहे आपला आणि शिसारी, किळस ही भावनाही नैसर्गिक आहे. वातावरण, वर्तन, विचार असं सगळंच पवित्र अथवा किळसवाणं वाटू शकतं आपल्याला. धर्म मिथके वास्तवाला किंचित किंचित पीळ देत असतात. किंचित पीळ मानवी मन सहज स्वीकारतं. मनाच्या ह्या गुणामुळे पुराणकथा सहज सत्य मानल्या जातात. अन्यथा पुराणकथा या परिकथाच असतात. तुमचं घर तुमचे इन्कमटॅक्सचे रिटर्न भरेल आणि सकाळ संध्याकाळ तुम्हाला चहा करून देईल, असं सांगितलं तर कुणाचाही विश्वास बसणार नाही. यात घराचं ‘घरपण’ हरवून गेलेलं आहे. पण वास्तू प्रसन्न होताच तुम्हाला गुप्तधन सापडेल, यावर चटकन विश्वास बसेल. यात वास्तूची बरीचशी गुणवैशिष्ठ्ये शाबूत आहेत आणि काही अवास्तव गुण खास चिकटवलेले आहेत. जी कथा कथांची तीच कथानायक आणि खलनायकांची सुद्धा. सर्व देव, दानव, देवदूत, एकूणच स्वर्गलोकातील आणि पाताळलोकातील लोक, म्हणजे मानवाची किंचित सुधारून किंवा बिघडवून घडवलेली आवृत्तीच. एकाच वेळी बऱ्याचशा मानवी आणि काही अतीमानवी गुणांनी युक्त अशी ही पात्रे असतात. ही खातात, पितात, हसतात, रूसतात, झोपतात, कोपतात, दोन बायकांनी कावतात, अगदी तुमच्या आमच्या सारखीच असतात ती. ह्या कथानायकांचे वागणे आदर्श असल्याचे सांगितले जाते. त्यानुसार आपली वागणूक बेतावी अशी शिकवण दिली जाते पण प्राचीन कथा पुराणांचा आजच्या जगण्याशी थेट संबंध नसतोच. कोणत्याही धर्माचा कितीही कट्टर माणूस धर्मग्रंथ शब्दश: पाळतच नसतो, पाळूच शकत नाही. नीती थेट धर्मग्रंथातून येत नाही. आजच्या भिंगातून बघत, बघत, धर्मशास्त्रातले सोयीचे ते वेचले जाते. आजचे धार्मिक पुराणातली वानगी गरजेनुसार घेतात अथवा सोडून देतात. मग कर्मकांडे प्रचलित सामाजिक नीती-अनीतीच्या कल्पना घट्ट करतात. त्यामुळे पौराणिक कथानकातील विरोधाभास दाखवून, धर्मभावना फारतर तीळभर ढळते आणि हा ढळ पळभर टिकतो. विरोधाभास दाखवून देणाऱ्याबद्दल कटुता मात्र मणभर साठते आणि मनभर दाटते. पुराणकथांबरोबरच कर्मकांडं हा तर धर्मावर हल्ला करण्यास अत्यंत सोपा, सोयीचा, सर्वात कमकुवत भाग असं नास्तिकांना वाटतं. पण काही कर्मकांडे समाजधारणा करतात, काही शेतीच्या चक्राशी निगडीत आहेत आणि काही तर चक्क मजेदार आहेत. सोडमुंज होताच, कोणी मुलगी देत नाही म्हणून मुलाने रुसून, संन्यास घेत, काशीयात्रेला प्रस्थान ठेवणे आणि मामाने मुलगी देतो म्हणताच परत फिरणे; अशी खेळकर आहेत काही. पण वरवर निरर्थक भासणारी ही कर्मकांडं धर्माचा कणा आहेत! कित्येक कर्मकांडे ही तर उघड उघड अविवेकी, निर्बुद्ध आणि निरर्थक भासतात. असतात. पण प्रत्यक्षात अशा कर्मकांडातील सहभाग हा नि:शंक निष्ठा निदर्शक असतो. निष्ठेचे, प्रामाणिक, आचरण्यास कठीण आणि नक्कलण्यास अवघड संकेत समाजव्यवहारासाठी आवश्यक असतात. सर्व कर्मकांडे म्हणजे निष्ठेची आचमने असतात. ऋण काढून साजरे केलेले सण, स्वतःला जाच करून केलेली व्रते, कष्टप्रद तीर्थयात्रा, अव्वाच्या सव्वा दानधर्म, देवाच्या नावाने अंगावर आसूड ओढणे, स्वतःला बगाडाला टांगणे, इत्यादीमुळे सामाजिक पतप्रतिष्ठा, स्विकार, वाढत असतो. उद्यापनाला व्रतार्थीच्या पायाचे तीर्थ घेण्यापर्यंत प्रथा परंपरा आहेत त्या हेच अधोरेखित करतात. अशा सहभागातून हळूहळू इथे प्रश्न विचारायचे नाहीत, हा कुलाचार आहे, सबब असाच चालू ठेवायचा, अशी धारणा गडद केली जाते. माणूस आपोआप त्या त्या कळपात सामावून जातो. हे सामावणे कळपाला आणि त्या व्यक्तीला सोयीचे असते. स्थलकाल लंघून, कर्मकांडे धर्मश्रद्धा संक्रमित करतात, फोफावत ठेवतात, तेवत ठेवतात. इथे वाईत भोंडल्याला ‘मिडल क्लास’ म्हणून नाके मुरडणारी मुलगी वॉशिंग्टनमध्ये गेली की हौसेनी चार सख्या जमवून फेर धरते. मानवी मन धर्मकल्पनेला धार्जिणे आहे हे आपण पाहीलंच आहे. पण कर्मकांडातून आत्मसन्मान, साफल्य, अत्यानंद, काळभय, समर्थ प्रेरणा, वेदना-शमन, तीव्र स्वकीयभाव; असे आत्यंतिक टोकाचे भावानुभाव उचंबळून येतात. सेरोटोनिन, डोपामीन, एपिनेफ्रीन, नॉर-एपीनेफ्रीन, ऑक्सिटोसिन आणि एंडोर्फीन अशी अती भावानुकूल रसायने मेंदूत स्रवत जातात. अनुभव मालिकांची बेरीज होत नाही, तर चक्क गुणाकार होतो. प्रत्येक घटितामागे कोणी हेतुधारी कर्ता-करवीता असतो हा तर माणसाचा आदिम मनगुण. मग या रसायनांच्या खेळात चल-अचल सृष्टीतील कोणत्याही सोयीच्या घटकाला तन-मन-हेतु वगैरे मानवी गुणांनी मढवले जाते. देवाचे देवत्व असे घट्टमुट्ट होत जाते. कर्मकांडानी आणि प्रार्थनेनी परिस्थितीत बदल होत नसला तरी प्राप्त परिस्थितीला तोंड द्यायला आस्तिकांना बळ मिळतं. धर्म ही खरोखरच अफूची गोळी आहे. मेंदू वैज्ञानिकांच्या मते कोणत्याही आनंदानुभूतीच्या वेळी, म्हणजे अगदी संभोगापासून ते संगीतापर्यंत आणि चॉकलेट पासून ते गांजासारख्या आनंद-औषधांच्या सेवनादरम्यान मेंदूतील जे भाग उद्दीपित झालेले दिसतात तेच देवाधर्माचं करतानाही होतात. इतकी लोकं देवाधर्माच्या भजनी लागतात ते काही उगीच नाही. आशा, आधार, सांत्वन, धीर, विश्वास, सुरक्षितता, निश्चितता, विस्मय, विरेचन, मृत्युंजय भावना आणि अडचणीच्या वेळी सामजिक आधार अशा सर्व भावभावनांचा स्त्रोत आहे धर्म. हे सगळं सोडून उघडं, नागडं, रौद्र, सत्य, ज्याला त्याला दाखवण्याचं कारणच काय? कारण लवकरच ह्या सकृतदर्शनी साध्या आणि उपयुक्त वाटणाऱ्या कल्पनातून शोषण सुरु होतं. अविवेकी निर्णयांची आणि चुकीच्या आडाख्यांची मालिकाच सुरु होते. उत्साहवर्धक असतात तशाच हतोत्साही करणाऱ्याही असतात ह्या कल्पना. चुकीच्या मार्गानेही ढकलतात त्या. विशेषतः देव-धर्म ही बाब वैयक्तिक न रहाता सार्वजनिक, राजकीय होते तेंव्हा तर असं होतच होतं. व्यक्तिगत धर्मही तापदायक ठरू शकतो. साधी, दानधर्मात रमणारी, कुणाच्या अध्यात न मध्यात, स्वांत:सुखाय देव मानणारी, देवभोळी माणसं; ही व्यक्तिश: चांगलीच असतात. त्यांचा धर्मही वैयक्तिक आणि इतरांना त्रास न देणारा असतो. पण हीच माणसं त्यांच्या धर्मियांच्या टोकाच्या धर्मांध विचारांना आदर आणि प्रतिष्ठा मिळवून देत असतात. धर्म आणि विज्ञान ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत वगैरे तत्वज्ञान ह्याच मंडळींना भावतं. पण असल्या बंडलबाजीमुळे विज्ञानाची समज बोथट होते. ह्या समजावून घेण्यात तीन संकल्पना महत्वाच्या. हे विश्व निर्हेतुक आहे, ह्याची जडणघडण सुघटित आणि सुरचित वाटत असली तरी ती निव्वळ अपघात मात्र आहे आणि मीच का? हा प्रश्न बराचसा अप्रस्तुत आहे. निर्हेतुक विश्व इतक्या अफाट, मती गुंग करणाऱ्या आणि गुंतागुंतीच्या विश्वाची निर्मिती आपोआप, निर्हेतुकपणे झालेली आहे अशी विज्ञानाची मांडणी आहे. त्यातही ही मांडणी सध्याची आहे, कदाचित उद्या काही वेगळे प्रत्ययास आले तर ही मांडणी बदलण्यास प्रत्यवाय नाही, अशीही विज्ञानाची मांडणी आहे. थोडक्यात ‘अंतिम सत्य’ वगैरे भानगड विज्ञानाला वर्ज्य आहे. ही मांडणी, सहसा सगळ्यांना वैफल्यवादी, अर्थशून्य आणि निराशाजनक वाटते. इतकी अनिश्चितता आणि निर्हेतुक करामत ज्यांना झेपत नाही ते आस्तिक बनून हरएक नैसर्गिक अथवा मानवी घटिताला हेतू आणि कारणे डकवतात आणि ‘अंतिम सत्य’ सापडल्याची तृप्ती कुरवाळत बसतात. अपघातमात्र विश्वरचना विश्वाची रचना कितीही सुघटित आणि सुरचीत वाटली तरी प्रत्यक्षात ही निर्मिती देव कल्पनेविनाही समजावून घेता येते. विश्वरचनेचा संपूर्ण उलगडा झाला नसला तरी देवाची जी सर्वोच्च करामत, जी की सजीव सृष्टी, तिच्या विलासाचा उलगडा बराचसा शक्य झाला आहे. सजीवांची शरीरे वरवर पहाता कितीही सुबक, सर्वांगसुंदर, सुघटीत आणि सुरचित वाटली तरी उत्क्रांतीचा अभ्यास असं दर्शवतो की उत्क्रांतीच्या अनाहूत ओघात सजीवांच्या शरीररचनेत कित्येक दोष, चुका, कमअस्सल कारागिरी आणि ओबडधोबड घडण उतरलेली आहे. सजीवांची शरीरे ही कोणा बुद्धीवान निर्मिकाच्या परिपूर्ण निर्मितीची सजीव लेणी नसून; निर्बुद्ध नैसर्गिक निवडीच्या, खळाळत्या प्रवाहाने घडवलेले गोटे मात्र आहेत. ह्यांची गोलाई प्रवाहाने घोटवलेली आहे कोणी सहेतुक घडवलेली नाही. सजीव शरीरे हा बुद्धिमंत निर्मितीचा पुरावा नसून निर्बुद्ध नैसर्गिक निवडीच्या प्रतापाचा पुरावा आहे. हाच कार्यकारणभाव निर्जीव सृष्टीलाही लागू आहे असा विज्ञानाचा दावा आहे. मीच का? जे भोग आपल्या वाट्याला आले ते आपल्याच वाट्याला का आले? हा तर चिरंतन प्रश्न. चवचाल बायकोपासून ते चमडीच्या कर्करोगापर्यंत कशासाठीही हा प्रश्न विचारता येतो, विचारला जातो. याला योगायोग वगळता कोणतेही कारण नाही आणि स्वीकार वगळता कोणताही उपाय नाही. हे समजावून घेणे अतिशय अस्वस्थ करणारे असले, तरीही अंतिमतः गोलमाल, निरर्थक विचारव्युहातून मुक्तीदायी असते. पण इतकाही विचार करण्याची गरज नाही. जर देव सर्वव्यापी, सर्वज्ञ आणि कनवाळू आहे तर मग दवाखान्यांची गरज काय? आरोग्य विम्याची गरज काय? आस्तिकांनी सीट बेल्ट लावायची गरज काय? असे अनेक प्रश्न उपस्थित करता येतील. या प्रश्नांना श्रद्धावानांकडे उत्तरेही तयार असतील. पण सत्य हेच की देवबिव कोणी आपली काळजी घेत नसतो. आपल्या मगदुरानुसार आपल्यालाच ते करावे लागते. पण आस्तिकांना हे सत्य कळले तरी वळत मात्र नाही. तसं बघायला गेलं तर आपापले देव वगळता अन्य देवतांवर आस्तिकांचा विश्वास नसतो. थोडक्यात ‘त्यांचा देव’ वगळता इतर देवांच्या बाबतीत ते नास्तिकच असतात. अल्लाचा बंदा राम-कृष्णावर विश्वास ठेवत नाही आणि सच्च्या रामभक्त येशूच्या बापाला जगाचा बाप मानत नाही. अशा हिशोबात नास्तिकांची संख्या जास्त भरेल!! दैनंदिन जीवनात धर्माचे स्थान पूर्वीसारखे सर्वव्यापी राहिलेले नाही. देवशरण, दैवशरण, निष्क्रिय, आंधळ्या, आस्तिकतेपेक्षा; प्रयत्नवादी, क्रियाशील, शोधक, डोळस, नास्तिक विचार उन्नत खराच. विज्ञान, विवेक, मानवता आणि उदारमतवादाची कास धरून माणसानी तूफान प्रगती केली आहे. पण धर्म संपेल का, या प्रश्नाचं उत्तर देणं अवघड आहे. धर्मामागे भगवंताचे अधिष्ठान नसले तरी त्यामागे मानसशास्त्रीय आणि उत्क्रांतीशास्त्रीय अधिष्ठान आहे. तेंव्हा धर्माला हद्दपार करणे, नजीकच्या भविष्यकाळात तरी, अशक्य नसले तरी अवघड आहे, असं वाटतं. नास्तिकांनी धर्माचा दुस्वास आणि धार्मिकांचा उपहास करण्याऐवजी दोहोंचा अभ्यास केला पाहिजे एवढं मात्र खरं. प्रथम प्रसिद्धी:- नवभारत डिसेंबर २०२० काही संदर्भग्रंथ :- Why We Believe In God(S) J. Anderson Thomson In Gods We Trust Scott Atran Religion Explained Pascal Boyer The Skeptic’s Guide to the Universe Steven Novella The Faith Instinct Nicholas Wade A History of God Karen Armstrong

प्रतिक्रिया द्या
40032 वाचन

💬 प्रतिसाद (169)
श
श्रीगुरुजी Fri, 02/12/2021 - 05:28 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
न
नगरीनिरंजन Fri, 02/12/2021 - 04:39 नवीन
देव आहे की नाही ते सध्या महत्त्वाचे नाहीय. देवाचा ताबा कोणाकडे आहे हे महत्त्वाचे आहे. कोणत्याही लोकप्रिय कल्पनेशी स्वत:ला जोडून त्याचा ताबा घेणे हे फायद्याचे असते हे फार थोड्या लोकांना कळते; बाकीचे ह्या कल्पनांना बळी पडून स्वत:ची लूटमार करून घेतात. देवभक्ती, देशभक्ती वगैरे भक्तींचा ठेका घेता आला पाहिजे; प्रत्यक्षात तुम्ही कितीही नीच असलात तरी.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 02/12/2021 - 10:29 नवीन
श्री गुरुमाऊली यांना जाहीर आवाहन - लिफ्ट/ ऐरफॉईल मुले विमान उडू शकते ..(आणि बिघाड होऊन होऊन पडू हि शकते ) सिद्ध झालाय - स्वामी बाबा / पीर बाबा आणि ख्रिस्ती संत भिंत उडवू शकतात .. शून्यातून माळा निर्माण करू शकतात... सिद्ध करा २०२१ साली ( पोथय्यात लिहलंय म्हणे ) अब्राहाम कोवूरांचे बक्षीस तयार आहे जिंका आणि मग त्यात भरपूर पोथ्या विकत घेता येतील (आणि मग आमच्यासारख्यांची तोंड कायमची बंद होतील ) (प्रतिसाद संपादित )
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 02/12/2021 - 12:49 नवीन
कोवूरांचे बक्षीस मिळविण्यात किंवा तुमच्यासारख्यांंची तोंडे बंद करण्यात किंवा कोणाला काही पटावे यासाठी आटापिटा करण्यात मला रस नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
प
प्रकाश घाटपांडे Fri, 02/12/2021 - 15:17 नवीन
नास्तिकांनी धर्माचा दुस्वास आणि धार्मिकांचा उपहास करण्याऐवजी दोहोंचा अभ्यास केला पाहिजे एवढं मात्र खरं.
नास्तिकेतेच्या अस्तिकतेच्या व अज्ञेयवादाच्या असंख्य छटा आहे. प्रत्येकाला असे वाटते की माझीच छटा ही योग्य आहे. एकाच रंगाच्या कितीतरी विविध छटा असतात. गुलाबाच्याच कितीतरी रंग रुपाच्या छटा आहेत. . पुरोगाम्यांमधे काय होतय कि समजा तुमचे माझे दहा पैकी आठ मुद्द्यांवर सहमती आहे व दोन मुद्यांवर मत भिन्नता आहे तर तुम्हाला दोन मुद्दे पटले नाहीत म्हणजे आठ मुद्दे ज्या कारणासाठी मला पटले आहेत त्या कारणासाठी तुम्हाला ते पटले नाही सबब आठ मुद्द्यांवर सहमतीचे काम करण्याऐवजी दोन मुद्यांवर तुमच्या माझ्या चुली वेगळ्या होतात
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Fri, 02/12/2021 - 15:42 नवीन
अज्ञेय आणि नास्तिक हे दोन शब्द म्हणून वेगळे आहेत. दोन्हीचा अर्थ तोच होतो. नास्तिक अज्ञेय असतो आणि अज्ञेय नास्तिक असतो. एकच गोष्ट सांगण्याचे दोन प्रकार आहेत. तुम्ही ड्रॅगन आणि हडळीच्या अस्तित्वाबद्दल जितके अज्ञेय असू शकतं तितकेच देवाच्या अस्तित्वाबाबत असू शकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Sat, 02/13/2021 - 06:23 नवीन
अज्ञेय आणि नास्तिक हे दोन शब्द म्हणून वेगळे आहेत. दोन्हीचा अर्थ तोच होतो.
आता काय बोलणार. बरं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु
च
चौकटराजा Fri, 02/12/2021 - 15:44 नवीन
मी व्यक्तीशः लेखकाला त्याच्या लहानपणा पासून ओळखतो . त्याचे वडील ही रॅशनल थिंकिंग चे पुरस्कर्ते होते. हा लेख त्यामुळे या विषयावर असा येणार अशा लेखकाकडून येणार हे मला अपेक्षितच आहे ! माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की लहान असताना आपण ज्या वातावरणात वाढतो त्या प्रमाणे बहुश: आपले मन घडते ! तरीही तो नियम शंभर टक्के नाहीच कारण एकाच आईवडिलांना रॅशनल . इरॅशनल व सेमी रॅशनल अशी मुले होऊ शकतात , सारखाच परिसर असताना देखील . याचें कारण प्रगत जनुक शास्त्र कधींतरी देईल . मला असे वाटते की मन आले की जसे ज्ञान आले तसा संभ्रम ही आलाच ! आल्या अनुभवांची चुकीची मांडणी ही मानवी मनच करू शकते . जिथे पुरावा देणे शक्य नसते अशा सर्व गोष्टीचा संबंध मनाशी असतो .माणसात असले वाद का होतात कारण भाषेचा , संवादाचा शोध आहे म्हणून ! कदाचित कुत्री भुंकताना देखील एकमेकांशी असा वाद घालत असतील ! पण असा संभ्रम जड सृष्टीत नसावा असे मनापासून वाटते म्हणूनच नास्तिकालाही तापल्या तव्यावर भाजते व अस्तिकालाही !
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Fri, 02/12/2021 - 16:42 नवीन
नास्तिकांचं संघटन.. संघटना म्हणली की नियम आले.. नियम असले की बंधने आली.. बंधनं म्हणलं की विचार खुंटले.. आणि विचार खुंटला म्हणजे तर्कबुद्धीचा अस्त!! (तर्कबुद्धी म्हणजे रॅशनालिटी किंवा बुद्धिप्रामाण्यवाद..) खूप जणांचं म्हणणं असतं की नास्तिकांनी संघटन करू नये कारण, नास्तिकता ही रॅशनालिटीचं (बुद्धिप्रामाण्यवादाचं) बायप्रॉडक्ट असतं आणि कोणतंही संघटन तुमच्या फ्रीथिंकिंग वर घाला घालतं.. पर्यायानं तुमची रॅशनालिटी अफेक्ट होते.. आणि हे बरोबरही आहे.. 'धर्माला विरोध करता करता आपण पण 'नास्तिक्य' नावाच्या दुसऱ्या धर्माला आमंत्रण तर देत नाही ना?' ही अनेकांच्या मनात भीती आहे.. मुळात 'नास्तिक' म्हणजे प्रचलित देवधर्म न मानणारी व्यक्ती, अशी साधी सरळ व्याख्या केली तर त्यात अनेक उपप्रकार पडतात.. 'देवाने माझ्यावर खूप अन्याय केला म्हणून मी देवाला मानत नाही', हि देवविद्वेषातून आलेली नास्तिकता अगदीच उथळ नास्तिकता आहे.. यांना 'अपॉर्च्युनिस्टीक नास्तिक' म्हणतात.. त्याचा विचार आपण इथे करणार नाहीत. कारण अशा स्थितीला तर्कबुद्धीची अथवा कुठल्याही वैचारिकतेची जोड नसते, आणि ती नास्तिकता 'दिवार' मधल्या बच्चन प्रमाणे 'खुश तो बहुत होगे तुम आज' असं म्हणत कधी ना कधी देवाच्या दारात जातेच! किंवा वास्तवात तर्कविसंगत (illogical) भूमिका घेऊ शकते.. अशा नास्तिकतेचं आणि नास्तिकांचं उत्तरदायित्व कोणताही विवेकवादी नास्तिक अथवा संघटना घेऊ इच्छित नाहीत.. (आणि विशेष म्हणजे बऱ्याच अस्तिक मित्रांना नास्तिकांची नास्तिकता ही याच प्रकारातली वाटत असते.. त्यांना कुठेतरी असा विश्वास असतो की, 'त्याला कधी न कधी देवाची गरज पडेलच किंवा देवाचा साक्षात्कार होईलच!') असो.. थोडक्यात सांगण्याचा उद्देश इतकाच की, मानवतावादी आणि वैज्ञानिक कसोटीवर टिकत नाही म्हणून 'देव' (आणि पर्यायाने धर्म) ही सारी संकल्पनाच नाकारणारे, देव/नियंता/रचनाकर्ता/उद्गाता या अर्थाने परमेश्वर नाकारणारे, अनेक विचारप्रवाह अस्तित्वात आहेत. तर्कनिष्ठ नास्तिक, अज्ञेयवादी नास्तिक, विवेकवादी नास्तिक, मुक्तचिंतक (फ्री थिंकर), जडवादी, इहवादी इत्यादी अशा काही सूक्ष्म फरकाने असलेल्या या सगळ्या निरिश्वरवाद्यांना ढोबळमानाने नास्तिक असे संबोधले जाते.. सगळे मुक्त विचारांचे असल्यावर संघटनेच्या संहितेला आणि नियमांना भीक कोण घालणार! आणि जर ठराविक साच्यात असंच राहायचं म्हणलं तर तर्कबुद्धी गहाण ठेवावी लागणार.. की जे नास्तिकतेच्या मूळ गाभ्यालाच छेद देणारं आहे.. आणि म्हणून या नास्तिकांना तुम्ही एका संघटनेत एकच नियम-बंधने घालून बांधून ठेवू शकत नाही. कारण, हे म्हणजे उड्या मारणाऱ्या अनेक बेडकांचं एकाच तराजूत घालून वजन करण्यासारखं आहे! पण, फक्त किमान समान कार्यक्रम ठरवून एकत्र येणे, ओळखीपाळखी करून घेणे, एकमेकांचे अनुभवकथन आणि रोजच्या जगण्यात नास्तिकता बाळगल्याने येणाऱ्या अडचणींचे अनुभव शेअर करणे, तर्कनिष्ठ साहित्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी आणखी काय काय करता येईल यावर चर्चा करणे, शिवाय होऊ पहाणाऱ्या नास्तिकांना जाहीरपणे नास्तिक आहोत हे मान्य करण्यापूर्वी अनेक शंका असतात, काही भावनिक बौद्धिक मार्गदर्शनाची गरज असते, अशी गरज आपली संघटना भागवू शकते. याव्यतिरिक्त शाळा-कॉलेजात व्याख्याने देणे, माध्यमांमध्ये लेख लिहिणे, इतपत नास्तिकांच्या मेळाव्याचे अथवा संघटनेचे उद्दिष्ट असू शकते, आणि त्यावर कोणाचा तात्विक आक्षेप असण्याचे कारण नाही/नसावे.. पण जर नास्तिक लोक भगतसिंगाच्या किंवा आणखी कोणाच्या रूपाने दुसरा देव उभा करणार असतील, त्यासाठी गाणी/आरत्या/कथा/कविता रचणार असतील, ते मूळ उद्देशालाच हरताळ फासल्यासारखे होईल.. दाभोळकर यांची हत्या ही घटना पुरोगामी वर्तुळात एक मैलाचा दगड असणारी घटना ठरली.. धार्मिक विद्वेषाच्या आणि उन्मादाच्या वातावरणात तर्कबुद्धीचा अंगिकार करणार्‍या प्रत्येकाला त्यात असुरक्षित वाटू लागलं.. ती गोळी कोणा एका व्यक्तीला नाही, तर आपल्या विचारांना लागल्याचं प्रत्येकाला जाणवू लागलं, आणि त्या असुरक्षितेतूनच आपले एक संघटन असावं असं नास्तिकांना वाटू लागलं.. इथं एक गोष्ट लक्षात घ्या, अंनिस असो वा सेवादल, किंवा डावे असोत वा समाजवादी, यातल्या कोणालाच (समाजकारणासाठी असो अथवा राजकारणासाठी) उघडउघड नास्तिक भूमिका घेता येत नाही, (आणि ते सगळे नास्तिक नसतातही).. म्हणून कुठल्याही दबावाला अथवा आजूबाजूच्या दैवभावनाप्रधान वातावरणाला बळी न पडता 'उघडउघड' नास्तिक भूमिका घेण्यासाठी म्हणून संघटना निर्माणाची पहिली पायरी म्हणून 'नास्तिक मेळावा' घेण्याचे ठरले.. जर तुम्ही संघटित असाल तर एक दबावगट निर्माण करता येतो. जर कोणी धर्मांध एखाद्याचा कोणत्याही प्रकारे छळ करत असेल, ट्रोल करत असेल, धमक्या देत असेल, तर त्याच्यावर संघटनेच्या माध्यमातून (अथवा कायदेशीर मदत मिळवून देऊन वगैरे) वचक ठेवता येतो.. इतकंच काय तर पोलीस यंत्रणा आणि राजकीय मुजोर यांच्यावर पण एक वचक ठेवण्यात त्याची मदत होते.. या गोष्टींसाठीही संघटन महत्त्वाचे असते.. दुसरी गोष्ट अशी की, भारतीय अतिप्राचीन इतिहासात चार्वाकांच्या रूपाने नास्तिक मतप्रवाह अगदी प्रबळ होता. हे 'लोकायत तत्वज्ञान' इतकं प्रसिद्ध होतं की त्याकाळच्या सगळ्या धर्मांना चार्वाकांनी तगडं आव्हान उभा केलं होतं. पण राजेशाहीच्या सहाऱ्यानं धर्म टिकून राहिले वगैरे तो भाग वेगळा.. पण इथे विशेष नमूद करायचे हे की, त्या प्रबळ परिस्थितीतही नास्तिकांचा धर्म बनला नाही, तर आता विज्ञानाच्या या प्रगत अवस्थेत तो बनेल, ही भीतीच काहीशी अनाठायी आहे.. तिसरा मुद्दा म्हणजे, सध्या काही प्रगत देश नास्तिक आहेत, तर काही देशांत नास्तिकांची संख्या जास्त आहे, तिथंही नास्तिकांचा धर्म बनला नाहीये, हेही तितकेच वर्तमान सत्य आहे.. म्हणून 'तुम्हीही धर्माच्याच वाटेने जाताय' असा हेत्वारोप करत नास्तिकांच्या एकत्र येण्याला विरोध करणे हे एकतर आपले अज्ञान असू शकते किंवा हा आपला बनाव असू शकतो.. आता चौथी गोष्ट ही की, जिथं पठडीबाज ज्ञान असतं एकतर्फी गृहितकं असतात आणि त्यावरच्या प्रश्न विचारण्याला बंधनं असतात, तिथंच धर्म जन्म घेतात. किंबहुना म्हणूनच त्या ज्ञानाचे धर्म होतात.. पण जिथं कालचं ज्ञान तपासून पाहण्याची सोय असते, नवीन ज्ञानाला सामावून घेण्याची प्रगल्भता असते आणि एकमेकांच्या मतमतांतरांना तर्काची कसोटी लावून सिद्ध करण्याची धमक असते, तिथं त्याचा धर्म/पंथ/कल्ट होऊच शकत नाही.. म्हणून आजपर्यंत विज्ञानाच्या कोणत्याही शाखेचा धर्म झाला नाही. मग विज्ञानाप्रमाणेच तर्कावर आधारित असलेल्या (बुद्धिप्रामाण्यवादाचंच बायप्रॉडक्ट असलेल्या) नास्तिकतेचा धर्म कसं काय होईल? सायन्स आणि रॅशनॅलिटी दोन्हीही सतत सत्याच्या शोधात असतात व सिद्ध झालेले सत्य मग ते कितीही त्यांच्या मनाविरुद्ध असू दे, ते स्वीकारण्याची वैज्ञानिकांप्रमाणे नास्तिकांचीही तयारी असतेच.. कारण 'वैज्ञानिक दृष्टिकोन असणे' हिच नास्तिकतेची पहिली पायरी असते.. पाचवा मुद्दा म्हणजे, धर्मासारखं किंवा धर्मांच्या इतर शाखांसारखं कोणाला नास्तिक 'बनवता' येत नाही. किंवा नास्तिकांच्या संघटनेत देखील नास्तिक बनविण्याचा कोणता विधी/फॉर्म्युला/परीक्षा अथवा सर्टिफिकेट नाहीये.. तुम्हाला स्वतःलाच प्रश्न पडले पाहिजेत, त्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न अभ्यासून/वाचून/चर्चा करून/पडताळून पाहून स्वतःच केला पाहिजे, हे अगदी स्वच्छ आहे.. खरंतर लहानपणापासून देवावलंबीत वातावरणात वाढल्याने नास्तिकता या मार्गाने मिळवावी लागतेय, पण जर लहानपणापासून देवधर्म विरहित वातावरणात एखाद्याला वाढवले तर त्याच्यासाठी देवधर्म नाकारणं ही अत्यंत 'सहजक्रिया' असेल! आणि सुखी आणि निर्भयचित्त आयुष्य जगण्यासाठी देवाची नव्हे तर सदसद्विवेकबुद्धीची गरज आहे हे त्याला काही अभ्यासाअंती पटवून घेण्याची गरज नसेल..आणि मग नास्तिकांच्या संघटनेचीही गरज उरणार नाही अन मेळाव्यांचीही.. - Dr Sachin Landge 21.01.2020
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Fri, 02/12/2021 - 17:24 नवीन
छान पोस्ट. तुमचे मतपरिवर्तन कसे काय झाले खरं ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
उ
उपयोजक Fri, 02/12/2021 - 18:00 नवीन
फक्त चर्चेचं जरा फाईन ट्युनिंग. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 02/13/2021 - 07:52 नवीन
आपला वरील प्रतिसाद ''नास्तिक चळवळ : काळाची गरज'' या धाग्यात टाकून ठेवा. प्रतिसाद उपयोजक आहे, सॉरी उपयोगी आहे. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
श
शा वि कु Fri, 02/12/2021 - 18:51 नवीन
डावे बऱ्याचदा नास्तिक असतात हे खरंच. पण फक्त डावे असतात असं नाही. उजव्यांच्या गळ्यातील ताईत आयन रँड, ती कम्युनिझम आणि सोशलिझम आणि आल्टरयूइझम तिन्हीच्या कट्टर विरोधात होती. ती तिच्या सुप्रसिद्ध कादंबरी, ऍटलास श्रग्ड मध्ये काय म्हणते- कमांडमेंट्स (धार्मिक आणि इतर) आदेशांबाबत-
If I were to speak your kind of language, I would say that man's only moral commandment is: Thou shall think. But a 'moral commandment' is a contradiction in terms. The moral is the chosen, not the forced; the understood, not the obeyed. The moral is the rational, and reason accepts no commandments.
अनुवाद- मी तुमची भाषा बोलत असतो तर म्हटलं असतं- माणसाची नैतिकतेची एकमेव ईश्वरी आज्ञा आहे- ‘दाऊ शाल्ट थिंक’. तू विचार करशील; पण नैतिकतेची ईश्वरी आज्ञा हा शब्दसमूहच विसंगत आहे. नैतिकता हा आपण स्वतःहून निवडण्याचा पर्याय आहे. कुणी लादण्याचा, साक्षात्काराचा किंवा मनमानी पर्याय नव्हे तो. नैतिकता ही बुद्धिनिष्ठ असते आणि बुद्धिप्रामाण्यात आज्ञेला स्थानच नाही. तर्कनिष्ठता आणि श्रद्धेबाबत-
Rationality is the recognition of the fact that existence exists, that nothing can alter the truth and nothing can take precedence over that act of perceiving it, which is thinking—that the mind is one's only judge of values and one's only guide of action—that reason is an absolute that permits no compromise—that a concession to the irrational invalidates one's consciousness and turns it from the task of perceiving to the task of faking reality—that the alleged short-cut to knowledge, which is faith, is only a short-circuit destroying the mind—that the acceptance of a mystical invention is a wish for the annihilation of existence and, properly, annihilates one's consciousness.
अनुवाद- विवेकनिष्ठा अस्तित्वाची ओळख मान्य करते. वास्तव कधी बदलत नाही. सत्याच्या अलीकडे, पलीकडे काहीही नसतं याची ओळख मान्य करते. माणसाची बुद्धीच मूल्यनिर्णय करू शकते, माणसाची बुद्धीच कृतीनिर्णय करू शकते. बुद्धिप्रामाण्य हे अंतिम आहे आणि त्यात तडजोड संभवत नाही. अविचाराला सवलत दिली की स्वतःची जाणीवही नाकारली जाते. सत्यापासून दूर, आभासांच्या खोट्या दुनियेतली होलपट सुरू होते. विवेकनिष्ठा हे सारं ओळखून असते. श्रद्धा हा ज्ञानाचा शॉर्टकट म्हणून मान्य केला की बुद्धिप्रामाण्याचं शॉर्टसर्किट होतं. कोणत्याही प्रकारचा चमत्कार मान्य करणं म्हणजे केवळ अस्तित्वाचाच नव्हे तर स्वतःच्या जाणिवांचाच नाश करण्यासारखं असतं हे विवेकनिष्ठेला माहीत असतं. नैतिकतेबाबत-
You who speak of a 'moral instinct' as if it were some separate endowment opposed to reason—man's reason is his moral faculty. A process of reason is a process of constant choice in answer to the question: True or False?—Right or Wrong? Is a seed to be planted in soil in order to grow—right or wrong? Is a man's wound to be disinfected in order to save his life—right or wrong?
अनुवाद- तुम्ही ‘नैतिक प्रवृत्ती’ची भाषा करता. जणू नैतिकता म्हणजे माणसाच्या विवेकबुद्धीहून काही निराळीच आहे. किंवा विरुद्धच आहे. माणसाची विवेकबुद्धी हीच त्याच्या नैतिकतेची धारणाशक्ती आहे, अमुक एक हे सत्य आहे की असत्य? या एकाच प्रश्नाचं उत्तर मिळवण्याचा ध्यास असतो विचारनिष्ठेचा! वाढीसाठी बीज मातीत पेरायचं- योग्य की अयोग्य? जखमेत जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून ती साफ करायची- बरोबर की चूक? अनुवाद- मुग्धा कर्णिक यांच्या अनुवादातून साभार.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Sat, 02/13/2021 - 03:33 नवीन
अध्यात्माबाबतीत-
They have cut man in two, setting one half against the other. They have taught him that his body and his consciousness are two enemies engaged in deadly conflict, two antagonists of opposite natures, contradictory claims, incompatible needs, that to benefit one is to injure the other, that his soul belongs to a supernatural realm, but his body is an evil prison holding it in bondage to this earth—and that the good is to defeat his body, to undermine it by years of patient struggle, digging his way to that glorious jail-break which leads into the freedom of the grave.
They have taught man that he is a hopeless misfit made of two elements, both symbols of death. A body without a soul is a corpse, a soul without a body is a ghost—yet such is their image of man's nature: the battleground of a struggle between a corpse and a ghost, a corpse endowed with some evil volition of its own and a ghost endowed with the knowledge that everything known to man is non-existent, that only the unknowable exists.
अनुवाद- माणसाला दुभंग केलं आहे त्यांनी. आत्मा शरीराचा धिक्कार करतो, शरीर आत्म्याला दोष देत रहातं. शरीर आणि शरीराची जाणीव हे दोघे एकमेकांचे शत्रू आहेत अशी त्यांची सततची शिकवण असते. दोघे एकमेकांशी झुंजत रहावेत, एकमेकांशी विसंगत रहावेत. दोघांच्या गरजा वेगवेगळ्या आहेत असं सांगितलं जातं सतत. एकाला जे भावतं ते म्हणे दुसऱ्याला दुखावतं. त्याचा आत्मा अध्यात्माच्या प्रांतात रमतो पण शरीर मात्र मातीत लोळतं म्हणे. पापाच्या कारावासात आत्म्याला बंदी बनवणारं शरीर त्याज्य मानतात ते; अशा पापी शरीराचा पराभव करणं, त्याचा शक्तिपात करणं हेच चांगलं आणि मग या शरीराच्या बंदीवासातून सुटका झाल्यानंतर तो आत्मा थडग्याच्या दिशेने मुक्तीच्या प्रवासाला आरंभ करतो. ते माणसाला शिकवतात, की तो या दोन परस्परविरोधी तत्त्वांनी घडलेला असल्यामुळे जगण्यास अपात्रच आहे. ही दोन्ही तत्त्वं मृत्यूचीच तर प्रतीकं आहेत. आत्म्याशिवाय शरीर म्हणजे प्रेत आणि शरीराशिवाय आत्मा म्हणजे भूत. तरीही ते माणसाची हीच प्रतिमा रंगवतात. भूत-प्रेताच्या संघर्षाची युती. प्रेताला कसलीशी पापमूलक, पापकारक इच्छाशक्ती असते आणि भुताला असतं अध्यात्मज्ञान. माणसाचं वास्तवाचं ज्ञान म्हणजे मिथ्या ज्ञान आणि अज्ञाताचं तथाकथित ज्ञान म्हणजे ब्रह्मसत्य. देवाबाबत-
The good, say the mystics of spirit, is God, a being whose only definition is that he is beyond man's power to conceive—a definition that invalidates man's consciousness and nullifies his concepts of existence.
अनुवाद- अध्यात्मवादी महंत म्हणतात, ईश्वर म्हणजेच सत्. ज्याचं सत्य स्वरूप जाणणं मानवाच्या शक्तीबाहेर आहे. या व्याख्येमुळे माणसाची जाणीव निरुद्देश ठरते, त्याची जगण्याची कल्पना निरर्थक ठरवता येते. तर, राईट विंग विचारवंताचे असे विचार आहेत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 02/13/2021 - 07:38 नवीन
विवेकनिष्ठा अस्तित्वाची ओळख मान्य करते. वास्तव कधी बदलत नाही. सत्याच्या अलीकडे, पलीकडे काहीही नसतं याची ओळख मान्य करते. माणसाची बुद्धीच मूल्यनिर्णय करू शकते, माणसाची बुद्धीच कृतीनिर्णय करू शकते. बुद्धिप्रामाण्य हे अंतिम आहे आणि त्यात तडजोड संभवत नाही. अविचाराला सवलत दिली की स्वतःची जाणीवही नाकारली जाते. सत्यापासून दूर, आभासांच्या खोट्या दुनियेतली होलपट सुरू होते. विवेकनिष्ठा हे सारं ओळखून असते. श्रद्धा हा ज्ञानाचा शॉर्टकट म्हणून मान्य केला की बुद्धिप्रामाण्याचं शॉर्टसर्किट होतं. कोणत्याही प्रकारचा चमत्कार मान्य करणं म्हणजे केवळ अस्तित्वाचाच नव्हे तर स्वतःच्या जाणिवांचाच नाश करण्यासारखं असतं हे विवेकनिष्ठेला माहीत असतं.
आवडले. कायम स्मरणात ठेवावा असा विचार. भिंती भिंतीवर असे कोट्स लिहून ठेवले पाहिजेत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु
ग
गामा पैलवान Fri, 02/12/2021 - 22:24 नवीन
लोकहो, डॉक्टर सचिन लांडगे यांचं एक विधान जाम खटकलं :
जिथं पठडीबाज ज्ञान असतं एकतर्फी गृहितकं असतात आणि त्यावरच्या प्रश्न विचारण्याला बंधनं असतात, तिथंच धर्म जन्म घेतात.
माझं मत असंय की हे प्रश्न न विचारायचं बंधन हिंदू धर्मात कधीच नव्हतं. अथ तो ब्रह्मजिज्ञासा, हे हिंदू सोडल्यास दुसऱ्या कोणत्याही धर्मात नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 02/15/2021 - 06:55 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
मराठी कथालेखक Mon, 02/15/2021 - 15:44 नवीन
लेख आवडला
  • Log in or register to post comments
ब
बाजीगर गुरुवार, 02/18/2021 - 10:36 नवीन
काळाच्या पुढचा लेख. अनेकांना झेपणार नाही, ब-याच लोकांना मिरच्या लागतील आणि ते फाटे फोडतील. कोणीतरी शुद्ध तार्कीक विचार करुन,विविध पैलूंवर विश्लेषक लिहीतोय याची कदर फार कमी लोक्स करतील. मला हा लेख खूप आवडला. न्यूटन च्या गतीविषयक नियमांच्या साॅलीड लेखासारखाच हा एक गोळीबंद लेख.साॅलीड स्ट्राँग. अभिनंदन शंतनूजी
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा