ॐभवति! डोसां देहि!
भुकेवरुन आणखी एक गंमत आठवली. एम.ए.नंतर मला जर्नालिझम करायचं होतं. त्याकाळी प्रत्येक घरात फोन नसायचा. आमच्याही घरी नव्हता. माझं वर्षापूर्वीच लग्न झालं होतं. त्यामुळे मैत्रीणींचाही संपर्क राहिला नव्हता. मला जर्नालिझमची माहिती काढायची होती. प्रवेशाची प्रोसिजर समजावून घ्यायची होती. पण कशी घेणार?
त्यावेळी मोबाईल, गुगल वगैरे काही नव्हतं. व्होकेशनल गायडन्सचे कोर्सेस कधी सुरू व्हायचे, कधी संपायचे कळायचं नाही. मी एका निमशहरातून पुण्यासारख्या शहरात एखाद वर्षापूर्वी आले होते. अजूनही घराबाहेर पडलं की बावचळल्यासारखं व्हायचं. जर्नालिझमची इन्स्टिट्यूट कुठं आहे हे माहीत होतं.
एप्रिल महिना. मी एकेदिवशी नवऱ्याला म्हटलं,"मी आज जाते, चौकशी करते.
"तो म्हणाला,"जा.तिथं जवळच वैशालीत स्पेशल डोसा मिळतो. तो खाऊन ये. मी पण कामावर जातो. आज डबा नको. मी वाटेतच खाईन. तू पळ आता. आल्यावर भेटूच."
माझ्या हातच्या जेवणापासून सुटका झाल्याचा आनंद त्याच्या स्वरात जाणवत होता.
तेव्हा नऊ वाजले होते. मी बसनं डेक्कनला गेले. इन्स्टिट्यूटजवळ पोचले. भूक लागली होती. म्हटलं, डोसा खाऊन मग इन्स्टिट्यूटमधे आत जाऊ. पण मनात आलं, नको,आधी चौकशी करु आणि मग आरामात डोसा खाऊ.
मग इन्स्टिट्यूटला गेले. तिथं कळलं की आजच प्रवेश देणार आहेत. आजच रिटन आहे. इंटरव्ह्यूज आहेत. तिथला क्लार्क मला म्हणाला,"हा अर्ज पटकन भरा. मी सबमिट करुन घेतो. तुमची सर्टिफिकेटस् दाखवा."
मी बरोबर नेलेली सर्टिफिकेटस् दाखवली. अर्ज सबमिट केला. अर्ध्या तासात रिटन होती. मी तिथले काही न्यूजपेपर्स वाचले. रोजचा पेपर मी वाचायचीच. रेडिओ वरच्या बातम्या ऐकायचीच.
त्यामुळे चालू घटनांचं ज्ञान मला होतं. अर्थात तेव्हा आमच्याकडे टीव्ही नव्हता. एकूण टीव्ही फारसा प्रचलितही नव्हता.
मी रिटनला बसले. पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता. मी सहज चौकशी करायला आले होते. मला काय माहीत की आजच प्रवेश देणार आहेत. मी रिटन दिली. रिटन चांगली झाली. रिटन संपल्यावर काही खावं म्हटलं तर तिथल्या सुपरवायझरनं सांगितले की, लगेचच पेपर तपासून ,पास झालेल्यांचे इंटरव्ह्यूज घेणार आहेत.
मी वाट पाहत बसले. मनावर ताण आला होता. तिथं आलेल्यांपैकी एक-दोन जणींशी ओळख झाली. काय विचारतील यावर गप्पा मारत बसलो. भुकेनं चक्कर येणार असं वाटलं. "आरामात" डोसा खाण्याची शक्यता आणखी डळमळीत झाली होती. बरोबर नेलेलं पाणी प्यायले. पर्समध्ये एक वितळून मऊ पडलेलं चाॅकलेट होतं. ते तोंडात ठेवलं.
तेवढ्यात गलका झाला,"लिस्ट लागली. लिस्ट लागली."
मी नोटीस बोर्डसमोरच्या गर्दीत सामील झाले. मी रिटनमध्ये पास झाले होते. इंटरव्ह्यूजच्या यादीत माझं नाव होतं. मला आनंद झाला. भुकेची उफाळून येणारी जाणीव दाबून ठेवत मी लायनीत बसून राहिले. कल्पनेतला वैशाली डोसा पुन्हा पुन्हा आठवत होता.
आता गर्दी कमी झाली होती. रिटनमध्ये नापास झालेले घरी निघून गेले होते. लायनीतल्या प्रत्येकाला पंधरा ते वीस मिनिटे लागत होती. दुपारचे तीन वाजले होते. भुकेनं मी व्याकुळ झाले होते. बरोबर नेलेल्या बाटलीतलं पाणीही संपलं होतं. मनातला कुरकुरीत डोसा मऊ पडला होता. सांबार थंड झालं होतं.
किमान कुठंतरी पटकन पाणी शोधायला जावं म्हटलं तरी वाटत होतं, तेवढ्यात आपलं नाव पुकारले तर! कोणत्याही उमेदवाराची सनातन भीती असते ती. मी तशीच सुकलेल्या ओठांवरुन जीभ फिरवत बसून राहिले. माझा नंबर आला. मी आत गेले. चेहरा घामेजलेला, सुकलेला, घाबरलेला. मी इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर्ड होते की नव्हते? कळेना. मला आत्मविश्वास नव्हता.
इंटरव्ह्यू एकदाचा झाला. चक्क समाधानकारक झाला. मी माझ्यामते नीट उत्तरं दिली. तत्कालीन राजकीय घडामोडींचं मला माझ्यामते अचूक ज्ञान होतं.
सगळं काम फास्ट चालू होतं. मी इंटरव्ह्यूतही पास झाले. वीस मिनिटात सिलेक्टेड कॅंडीडेटसची लिस्ट लागली. तीत माझं नाव होतं. मला परमानंद झाला. आठ दिवसांत ॲडमिशनचे पैसे भरायचे होते.
मी बाहेर आले. संध्याकाळचे साडेपाच वाजले होते. वैशाली समोरच होतं. .....
..पण मी डोसा खायला गेले नाही. घरातून सकाळी बाहेर पडलेली मी अजूनही घरी आले नाही म्हणून नवरा काळजी करत असेल या विचाराने रिक्षानं तडक घरी गेले.
..हात्तेच्या.. घराला कुलूप होतं. नवरा अजून आलाच नव्हता. मी कुलूप काढलं . आणि गेले. आतडं पिळवटून टाकणारी भूक पोटात घेऊन काॅटवर पडले. पोटात एकाच वेळी भूक आणि एसिड झालं होतं.
पण मला खूप आनंदही झाला होता. मला ॲडमिशन मिळाली होती. माझं स्वप्न पुरं होणार होतं. मी पत्रकार होणार होते. पुढे चहा आणि वडापाववर दिवसरात्र बाह्यध्वनिमुद्रण, रेकॉर्डिंग, डबिंग, रिपोर्टिंग करावं लागणार असल्याची ती चुणूक होती.
त्या संध्याकाळी घरात दूध, गूळ, पोहे कालवून खाताना मी माझ्या करियरचीच स्वप्नं रंगवत होते...
आता त्याच्या थोड्याफार जवळ जाणारी चव शिवाजीनगर एसटी स्टँडसमोर असलेल्या स्वागतमध्ये मिळतेहो पुण्यात आल्यावर भुकेचा तडाखा इथेच शांत व्हायचा बराच वेळी.. मस्तच आहे चव!!