Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

‘शेजाऱ्या’चे ओझरते दर्शन

ह
हेमंतकुमार
Mon, 11/29/2021 - 10:18
💬 181 प्रतिसाद
गेल्या २५-३० वर्षांत आपल्यापैकी अनेक जणांच्या कुटुंबात वा नात्यात कोणी ना कोणी परदेशी गेलेले किंवा जाऊन आलेले आहे. पर्यटन, शिक्षण, नोकरी आणि व्यवसाय अशा अनेक हेतूंनी लोक परदेशात जातात. त्यामुळे अनेक कुटुंबांच्या गाठीशी परदेश प्रवासाचे विविध अनुभव साठलेले असतात. जेव्हा विविध कारणांमुळे होणाऱ्या कौटुंबिक मेळाव्यांना लोक एकत्र जमतात तेव्हा हटकून परदेशातील अनुभवांची देवाणघेवाण होते. असाच एक मेळावा एकदा आमच्या घरी भरला होता. त्या समूहातील ६ जण विविध देशांमध्ये जाऊन आलेले होते. अमेरिका कॅनडापासून ते ऑस्ट्रेलिया जपानपर्यंत अनेक देशांच्या अनुभवांवर गप्पा चालू होत्या. सांगणाऱ्यांच्या अनुभवांचे धबधबे कोसळत होते आणि ऐकणारे त्यात न्हाऊन निघत होते ! मला एकदम लहर आली आणि म्हटलं, आता जरा यांची फिरकी घेऊ. मग मी सर्वांना म्हणालो, “तुम्ही बरेच जण जगातील अनेक प्रगत व सधन देशांमध्ये जाऊन आलेले आहात. पण माझे एक वैशिष्ट्य आहे. मी अशा एका देशामध्ये जाऊन आलेलो आहे की जिथे तुमच्यापैकीच काय पण माझ्या माहितीतील अन्य कोणीही तिथे गेलेले नाही. मी ९९.९% खात्रीपूर्वक सांगू शकतो की तुमच्यापैकी कोणीही त्या देशाला आयुष्यात भेट देण्याची शक्यता नाही. तर आता माझा प्रश्न असा आहे की तुम्ही तो देश ओळखा” ! इतका वेळ हसत खिदळत गप्पा चालल्या होत्या. माझ्या या निवेदनानंतर एकदम सन्नाटा पसरला. अनेकांना आश्चर्य वाटले की मी एवढे छातीठोक कसे सांगू शकतोय. सगळ्यांचे चेहरे आश्चर्यचकित झालेले. मग मी म्हणालो, “प्रयत्न करा, सुरुवात तर करा ओळखायला, पाहिजे तर मी पैज लावतो”! मग आशिया, युरोप, दक्षिण अमेरिका व आफ्रिका या खंडांतील अनेक आणि काही अतिपूर्वेकडील देशांची नावे लोकांनी सांगितली. तरीपण अद्याप त्यांनी माझे उत्तर काही ओळखले नव्हते. मग मी थोडी भर घातली, “देश आपल्यासारखाच आहे. प्रगत किंवा सधन म्हणता येणार नाही. मग अजून काही न ऐकलेल्या देशांची नावे पुढे आली. तरीसुद्धा अजून उत्तर सापडत नव्हते. शेवटी एकमुखाने सगळे म्हणले, आम्ही हरलो बुवा. मग मी जाहीर केले, “मी ज्या देशाला भेट देऊन आलेलो आहे तो म्हणजे पाकिस्तान” ! माझे उत्तर ऐकल्याबरोबर मागच्यापेक्षाही अधिक सन्नाटा पसरला. अनेकांचे चेहरे वाकडे झाले. काहींच्या कपाळावर आठ्या उमटल्या. मग एक जण म्हणाले, “तुम्ही काही सरकारी अधिकारी, खेळाडू, सैनिक, कलाकार किंवा पत्रकार असे काही नाहीत ते माहित आहे. तसेच तुम्ही इतिहास संशोधक, राजकीय अभ्यासक किंवा गेला बाजार, जातिवंत पर्यटक देखील नाही. मग असं वाटतंय की कशाला मरायला हा माणूस गेला होता पाकिस्तानात ? तुम्ही तिम्बक्तूला गेलो असे म्हटला असतात तरी आमचा विश्वास बसला असता ! पण पाकिस्तान, छे, काहीतरीच काय“ ! मी हसलो आणि म्हणालो, “बरोबर आहे तुमचा तर्क. पण मी तिथे जाऊन आलोय हे वास्तव आहे. आता तिथे मी का जाऊन आलो ते मी तुम्हाला सांगतो”. .. वाचकमित्रहो, असा हा आमच्या आप्तस्वकीयांसमवेत घडलेला संवाद होता. थोडे पुढे जाऊन मी म्हणतो की, हा लेख जे वाचक वाचणार आहेत त्यांच्यापैकीही कोणी पाकिस्तानला गेले असण्याची शक्यता जवळजवळ नाही. पुन्हा एकदा मी हे विधान ९९% खात्रीने करतोय. अर्थात उरलेला १ टक्का मी बाकी ठेवतोय याचे कारण असे : ध्यानीमनी नसताना मी नाही का गेलो त्या देशात? तसा चुकून एखादा इथेसुद्धा सापडू शकतो. तर मग आता तुमच्याही मनात प्रश्न आला असेल, की कशाला उठून गेला हा बाबा तिकडे पाकिस्तानात ? 😀 तर आता ती कथा सांगतो. सुरुवातीला एक स्पष्ट करतो, की मी काही कामासाठी तिथे गेलो होतो आणि अगदी अल्पकाळ म्हणजे जेमतेम ३ दिवस वास्तव्य करून लगेच भारतात परतलो होतो. त्यामुळे रूढ अर्थाने हे पर्यटन नाही याची नोंद घ्यावी. आपल्याकडील ज्या लोकांचे नातेवाईक पाकिस्तानात आहेत असे लोक (व अन्य काही अपवाद) वगळता, सामान्य भारतीय नागरिक पाकिस्तानला हौसेने जाण्याचा विचार स्वप्नात देखील करत नाही. म्हणून माझा हा एक वेगळा अनुभव लिहिणे असा या लेखाचा हेतू आहे. ….. तर मग सुरुवात करतो. घटना आहे १९८० च्या दशकातल्या पूर्वार्धातील. तेव्हा मी नुकताच एमबीबीएस झालो होतो. आता पुढे काय करावे या विचारात एक गोष्ट अशी ठरवली, की अमेरिकेत जाण्याच्या डॉक्टरांसाठीच्या स्पर्धात्मक परीक्षेला बसावे. ही स्पर्धात्मक परीक्षा आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशांमध्ये होते पण त्याकाळी भारतात मात्र त्याची केंद्रे नव्हती. १९६० च्या दशकामध्ये भारतात ती केंद्रे होती पण पुढे ती बंद करण्यात आली. त्यामागील हेतू हा असावा की जर आपल्या देशात केंद्रच ठेवले नाही तर परीक्षेला बसणाऱ्या लोकांची संख्या आपोआपच मर्यादित राहते. आपले डॉक्टर्स शक्‍यतो आपल्याच देशात राहावेत हा या सगळ्या मागचा उद्देश असावा. ज्या देशांचे धोरण असे नव्हते, त्यांनी आपापल्या देशांमध्ये अमेरिकेच्या परीक्षेसाठी केंद्रे ठेवली होती. माझे एक नातेवाईक सिलोनला (आताच्या श्रीलंकेला) जाऊन ही परीक्षा देऊन आल्याचे मला माहित होते. तेव्हाची आमची कौटुंबिक आर्थिक स्थिती सामान्य होती. परीक्षेसाठी लागणारे डॉलर्समधील शुल्क अमेरिकेतील नातेवाईकांच्या मेहेरबानीने मिळाले. आता प्रत्यक्ष परीक्षेस जाऊन बसण्याचा खर्च एवढी बाजू आम्ही सांभाळायची होती. त्यामुळे जो काही प्रवासखर्च होईल तो कमीत कमी असावा असेच ठरवणे भाग होते. त्या काळी जे विद्यार्थी पुरेसे सधन होते ते अशा निमित्ताने सिंगापूर, फिलिपिन्स आणि तत्सम देशांनाही भेट देऊन परीक्षेच्या जोडीने सहल व मौजमजा करून येत. आम्ही जेव्हा परीक्षा केंद्रांच्या तक्त्यावर नजर टाकली तेव्हा लक्षात आले, की आपल्याला परवडण्यासारखी केंद्रे दोनच असून ती पाकिस्तानात आहेत. त्यापैकी एक म्हणजे कराची आणि दुसरे लाहोर. मग जरा आजूबाजूला चौकशी करून आम्ही अधिक माहिती काढली तेव्हा एक गोष्ट स्पष्ट झाली. भारतातील बरेच डॉक्टर्स या कामासाठी पाकिस्तानला जायचे. सर्वसाधारण आपल्या भौगोलिक प्रांतानुसार केंद्र निवडीची विभागणी झालेली होती. संपूर्ण उत्तर आणि मध्य भारतातील डॉक्टर्स लाहोरला जात. तेव्हा अमृतसर ते लाहोर ही रेल्वेसेवा सुद्धा उपलब्ध होती. त्यामुळे त्यांच्यासाठी हा प्रवास तर अगदी स्वस्तातला. तर पश्चिम आणि दक्षिण भारतातील विद्यार्थी कराची केंद्र निवडायचे. माझ्यासाठी मुंबई ते कराची हा विमानप्रवास हाच मार्ग सगळ्यात स्वस्त ठरणार होता. मग अर्ज भरला आणि कराचीची निवड केली. आता पुढचा टप्पा होता पाकिस्तानचा व्हिसा मिळवणे. तेव्हा काहीतरी कारणामुळे मुंबईतील पाकिस्तानी दूतावासाचे उपकेंद्र बंद होते. त्यामुळे दिल्लीला जाणे हाच एकमेव पर्याय शिल्लक होता. त्या आधी सांगितले पाहिजे, की मी नुकताच पदवीधर झालेला असल्याने माझ्या जवळ कुठल्याही प्रकारची आर्थिक बचत वगैरे नव्हती. किंबहुना पासपोर्ट म्हणजे काय हे फक्त ऐकून माहित होते. मग तातडीने मुंबईला जाऊन आयुष्यातील पहिला पासपोर्ट काढला. तेव्हाच्या पासपोर्टच्या पहिल्या पानाच्या मागच्या बाजूस एक ठळक सूचना दिलेली असायची : “ सदर पारपत्रधारकाला दक्षिण आफ्रिका सोडून जगातील अन्य सर्व देशांना जाण्यास परवानगी दिलेली आहे”. ok याचे कारण म्हणजे तेव्हा दक्षिण आफ्रिकेचे वर्णद्वेषी धोरण चालू होते. म्हणून भारताने त्यांच्याशी राजनैतिक संबंध ठेवलेले नव्हते. मग दिल्लीला जायचे ठरले. अशा तऱ्हेने आयुष्यातील पहिली दिल्लीवारी या कामाच्या निमित्ताने झाली. दिल्लीमध्ये त्यांच्या दूतावासात गेलो आणि परीक्षेसंबंधी माहिती दाखवल्यावर त्यांनी ७ दिवसांसाठी फक्त कराचीचा व्हिसा मंजूर केला (व्हिसावर तसे वाक्य बॉलपेनने लिहून त्यावर सेलोटेप लावला होता ते आठवते). आम्ही व्हिसा मिळवण्यासाठी जेव्हा दिल्लीला गेलो होतो तेव्हा तिथे कडाक्याची थंडी होती. तोपर्यंत महाराष्ट्र न सोडलेल्या मला उत्तरेतील मरणाची थंडी म्हणजे काय असते ते समजले. हे सर्व तांत्रिक सोपस्कार पूर्ण झाले. एकीकडे जमेल तसा अभ्यास चालू होता. अखेर परीक्षा जवळ आली. आता पहिला प्रश्न होता तो म्हणजे तिथे कराचीमध्ये राहायचे ठिकाण ठरवणे. त्याकाळी आपल्याकडे आंतरजाल तर जाऊद्या पण संगणक सुद्धा नव्हते. मग काही ओळखीच्या लोकांना कामाला लावले आणि थोडीफार माहिती काढली. आमची परीक्षा होती ‘ताज इंटरनॅशनल’मध्ये. नावावरुनच लक्षात आले की तिथे राहणे काही आपल्याला परवडायचं नाही. मग थोडेफार नकाशे पाहिल्यावर असे लक्षात आले की या परीक्षेच्या ठिकाणापासून दोन किलोमीटर अंतरावर ‘मेहरान’ नावाचे एक हॉटेल आहे जे आपल्या खिशाला परवडू शकेल. आणि मुख्य म्हणजे तिथे मिश्राहारी भोजन व्यवस्था होती. मग मेहरान हॉटेल मोजून ३ दिवसांसाठी फोनद्वारा आरक्षित केले. आता परीक्षा एक दिवसावर येऊन ठेपली होती. मुंबई ते कराची विमान प्रवासाचे तिकीट काढले होते. म्हटलं, चला या निमित्ताने आयुष्यातला पहिला विमान प्रवास घडतो आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशी मुंबईमध्ये विमानात बसलो. कुठलीही गोष्ट प्रथम अनुभवताना माणूस हरखून जातो तसे माझेही झाले. साधारण एक तास वीस मिनिटात कराचीला पोहोचलो. जेव्हा आपण भारतातून श्रीमंत देशांमध्ये जातो तेव्हाची प्रवासवर्णने वाचली की एक गोष्ट लक्षात येते. मुंबईतून जेव्हा विमान उडते तेव्हा आपल्याला सुंदर इमारतींच्या जोडीने झोपडपट्ट्यांचा महासागरही दिसतो आणि परदेशात विमान उतरत असताना मात्र एकदम सगळेच चकचकीत, लखलखीत, परीराज्यासमान दृश्य वगैरे दिसते. माझ्या या परदेश प्रवासात मात्र हा फरक उद्भवणार नव्हता. इथून उडताना आणि तिथे उतरताना दोन्हीकडे समानच दृश्य नजरेस पडले. अखेर कराचीमध्ये उतरलो. तेव्हा त्या विमानतळावर नूतनीकरणाचे वगैरे काम चालू होते. तसा तो सामान्य दर्जाचा वाटला. (पुढे काही वर्षांनी मात्र पाकिस्तानने त्यांचे सर्व विमानतळ अत्यंत शाही रीतीने सजवले होते. ते भारतापेक्षा अधिक डामडौलाचे आहेत असे वर्णन मी खुशवंतसिंग यांच्या एका पुस्तकात नंतर वाचले होते). विमानतळापासून हॉटेलकडे जाताना रस्त्यावर नजर टाकली. थोडा परिसर बघितला आणि लक्षात आले की या शहराचा तोंडवळा आणि रचना साधारण मुंबईप्रमाणेच आहे. एक प्रकारे ही पाकिस्तानची मुंबई म्हणता येईल. गरीबी -श्रीमंतीचा निकट सहवास हे दोन्ही शहरांचे समान वैशिष्ट्य. आम्ही ज्या टॅक्सीत बसलो होतो ती जपानमधून आयात केलेली कार होती तोपर्यंत भारतात मारुती कार सामान्य माणसाच्या हातात फारशी दिसत नव्हती. पाकिस्तानात बहुतेक कार उद्योग यथातथाच असावा. त्यामुळे तेव्हा ते परदेशी गाड्या थेट आयात करत होते. आमचे हॉटेल आल्यावर टॅक्सीतून उतरलो व आपल्या फियाटच्या सवयीनुसार धाडकन ते दार लावले ! तो मोठा आवाज ऐकल्यावर ड्रायव्हर माझ्यावर चांगलेच डाफरले. यावरून ही नाजूक प्रकारची गाडी आहे आणि दार हळुवार लावायचे असते हा धडा प्रथम मिळाला. मग हॉटेलच्या खोलीत पोचलो. दुसऱ्या दिवशी परीक्षा असल्याने फार काही करायला वाव नव्हता. अभ्यास करणे भाग होते. परीक्षेचा दिवस उजाडला. परीक्षा एकूण दोन दिवस होती रोज सहा तास. त्यापैकी दर दोन तासांनी थोडावेळ विश्रांतीचा असे. परीक्षेच्या २ सत्रांमध्ये त्यांनी दुपारच्या खाण्याची किरकोळ व्यवस्था केली होती. ही परीक्षा संपूर्ण वस्तुनिष्ठ स्वरूपाची होती उत्तरपत्रिकेवर योग्य त्या पर्यायांच्या पुढे पेन्सिलने खूण करायची होती. संपूर्ण परीक्षेत कुठेही पेन लागणार नव्हते. परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून स्कर्ट परिधान केलेल्या दोन जाडजूड अमेरिकी बायका आलेल्या होत्या. त्यांच्या देहबोलीवरूनच त्या कडक असल्याचे लक्षात आले. त्यांनी सुरुवातीला महत्वाची सूचना केली, “जेव्हा परीक्षेचा वेळ संपल्याची घोषणा होईल तेव्हा सर्वांनी आपापल्या पेन्सिली ताबडतोब खाली ठेवल्या पाहिजेत. या शिस्तीचे पालन न केल्यास तुमची उत्तरपत्रिका रद्द ठरवण्यात येईल”. ही सूचना ऐकल्यावर लगेच काही त्याचे गांभीर्य जाणवले नाही. दुपारच्या सत्रात वेळ संपल्याचे जाहीर झाल्यावरही (पेपर गोळा करेपर्यंत) तीन विद्यार्थी लिहीतच होते. हे त्या बायकांच्या लक्षात आल्यावर त्या तातडीने पळत त्या विद्यार्थ्यांकडे गेल्या. त्यांनी त्या मुलांना तुम्ही नियम मोडल्याचे सांगून लगेचच त्यांच्या उत्तरपत्रिकांवर काट मारून त्या रद्दबादल ठरवल्या. इतकी करडी शिस्त मी आयुष्यात प्रथमच पाहिली. परीक्षेच्या शुल्कामध्ये त्यांनी खाण्यासाठीचे पैसे घेतलेले होते. त्यातून त्यांनी एका कागदी खोक्यामध्ये आम्हाला अल्पोपहार दिला. ते खोके उघडून पाहिल्यावर त्यात फक्त एक केळ व एक कबाबचा तुकडा असे खाद्य होते. मला केळ अजिबात आवडत नाही. पण आता करतो काय ? थोड्याशा वेळात काहीतरी खाणे भागच होते. तेव्हा मी मिश्राहारी होतो ते एका दृष्टीने बरेच झाले. भुकेच्या वेळी जे अन्न समोर येईल ते खाण्यात शहाणपण असते. पुढे माझ्या मुलांना मी हा किस्सा सांगितला आणि एक सल्ला दिला, “जरी परंपरेने आपण घरी शाकाहारी असलो तरी जगाच्या पाठीवर कुठेही वेळप्रसंगी तरुन जायचे असेल तर सर्व काही खायची सवय असलेली बरी असते”. पहिल्या दिवशीचा पेपर संपल्यानंतर ताजमधून बाहेर पडलो आणि चालतच मुक्कामाच्या हॉटेलकडे जायचे ठरवले. तेवढेच टॅक्सीच्या पैशांची बचत आणि थोडेफार काहीतरी बघता यावे हा उद्देश. सहज रस्त्यावरील एक-दोन दुकानांमध्ये डोकावलो. दुकानाची रचना अगदी आपल्यासारखीच होती. दुकानदारांनी, “आप इंडियासे आये है ना” असे म्हणून स्वागत केले व आदराने बोलले. चहा मागवला. आपल्या व त्यांच्या प्रमाणवेळेत अर्ध्या तासांचा फरक असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. एकंदरीत पाहता पाकिस्तानी माणूस आपल्या कुठल्याही उत्तर भारतीय माणसाप्रमाणे दिसतो. तिथून भ्रमंती करीत हॉटेलात पोचलो. रात्री हॉटेलमध्ये अगदी पोटभर वरण-भात खाऊन घेतला तेव्हा कुठे जीव शांत झाला. परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी सर्वसाधारण पहिल्या दिवसाप्रमाणे सर्व काही झाले. आता कालच्या प्रकारानंतर विद्यार्थ्यांना कडक शिस्तीची कल्पना आलेली होती. त्यामुळे आज कोणीही वेळ संपल्यानंतर लिहित बसायची आगळीक केली नाही. अखेर पूर्ण परीक्षा संपली. एकंदरीत ही वस्तुनिष्ठ परीक्षा म्हणजे बुद्धीला खुराक होता. वस्तुनिष्ठ प्रश्नांचे अनेक अवघड आणि गोंधळात टाकणारे प्रकार इथे अनुभवायला मिळाले. एखाद्या विषयाचे सखोल वाचन असल्यासच आपण अचूक उत्तर देऊ शकतो हे लक्षात आले. परीक्षा केंद्राला टाटा केल्यावर पुन्हा एकदा चालतच रस्त्याने निघालो. साधारणपणे आपण भारतातच आहोत अशीच भावना होती. काही खास वेगळे असे त्या भागात तरी जाणवले नाही. रस्त्यांवरील अ/स्वच्छता आणि बे/शिस्त अगदी आपल्याप्रमाणेच. एकेकाळचे आपण भाऊ भाऊच आहोत हा विचार मनात बरेचदा येऊन गेला. आता उरलेल्या वेळात ओळखीने एकच कार्यक्रम ठेवलेला होता तो म्हणजे तिथल्या एका रूग्णालयाला भेट देणे. मग घाईत तिकडे पोचलो. दोन-तीन डॉक्टरांशी गप्पा झाल्या. त्यापैकी एक डॉक्टर मुकेश हा सिंधी होता. त्याने आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्याच्या कुटुंबामध्ये फाळणीच्या वेळेस बऱ्याच हत्या झालेल्या होत्या. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर कायमस्वरूपी खिन्नतेचे सावट होते. त्याचे काही नातेवाईक भारतात येऊन स्थायिक झाले होते. त्यापैकी काही तर पिंपरी-चिंचवडला असल्याचे त्याने सांगितले. त्यासंदर्भात 1947 साली एक एकतर्फी करार दोन्ही देशांदरम्यान झाल्याचे त्याच्याकडून समजले. या करारातील तरतूद अशी आहे : जर पाकिस्तानातील एखाद्या व्यक्तीला भारतात येऊन वास्तव्य करावेसे वाटले तर भारत सरकार विचार करून त्या व्यक्तीला एक वर्षाचा व्हिसा देते. पुढे दरवर्षी त्याचे नूतनीकरण काही अटींवर होऊ शकते. याला अनुसरून मुकेशचे काही नातेवाईक भारतात आले. त्यापैकी काहींना येथे स्थिरस्थावर होणे जमले व कालांतराने त्यांनी भारताच्या नागरिकत्वासाठी अर्ज केलेला होता. परंतु त्याच्या अन्य काही नातेवाईकांना इथे काही जम बसवता आला नाही. त्यातून निराश होऊन पुन्हा पाकिस्तानात परतही जावे लागले होते. हे सर्व पाहता मुकेशची मनस्थिती द्विधा होती. त्याच्या मनात आज ना उद्या मध्यपूर्वेतील देशांमध्ये दीर्घकाळ रहावे असे होते व तेथून जमल्यास पाश्चिमात्य देशांमध्ये जायचा त्याला प्रयत्न करायचा होता. मुकेशला मनापासून शुभेच्छा देत आम्ही ती रुग्णालय भेट आटोपती घेतली. आता लगेचच हॉटेलवर जाऊन सामानाची बांधाबांध करून परतीच्या प्रवासास निघायचे होते. त्यांनी व्हिसा जरी ७ दिवसांचा दिलेला असला तरी मला तिथे उगाच भटकणे परवडणारे नव्हते. मग काही तासातच आम्ही परीक्षेला बसलेले काही जण परतीच्या प्रवासासाठी कराची विमानतळावर हजर झालो. तिथे एकमेकांना आलिंगन देत निरोप घेतला. आमच्या सर्वांच्या बोलण्यात एक समान मुद्दा होता. भविष्यात आम्ही मनाप्रमाणे विविध देशांचे पर्यटन करू शकू. पण त्या पर्यटनाच्या यादीमध्ये एरवी पाकिस्तानचा समावेश चुकूनही झाला नसता. या परीक्षेच्या निमित्ताने आपण एकेकाळी अखंड भारताचाच भाग असलेल्या प्रदेशाला भेट दिली एवढे साध्य झाले होते. तसेच खुद्द परीक्षेचा अनुभवही अविस्मरणीय होता.(यथावकाश त्या परीक्षेचा निकाल लागून मी त्या परीक्षेत ८० पर्सेंटाइल गुणांनी उत्तीर्ण झालो). जेमतेम तीन दिवसाच्या या छोट्या मुक्कामात माझ्या मनात कराची म्हणजे दुसरी मुंबई एवढीच भावना निर्माण झाली. त्या काळी भारतात सिंधी लोकांनी चालवलेली ‘कराची स्वीट मार्ट’ अशी मिठाईची प्रसिद्ध दुकाने असायची. त्या दुकानांमधून आम्ही वेफर्स वगैरे आवडीने आणायचो. त्या दुकानांचे नाव ज्या गावावरून आले ती कराची आपण पाहिली असे एक मानसिक समाधान लाभले. तिथल्या सामान्य माणसांवर नजर टाकता ते आणि आपण सामाजिक वावरात तसे सारखेच आहोत हे दिसून आले. दोन राष्ट्रांमध्ये स्वातंत्र्यापासूनच वैरभाव निर्माण झालेला आहे खरा. परंतु तिथल्या काही सामान्य नागरिकांशी गप्पा मारताना तो काही जाणवला नाही. भविष्यात जर दोन देशांदरम्यानचे राजनैतिक संबंध कधी सुधारलेच तर निदान दोन्हीकडच्या नागरिकांना मुक्तपणे एकमेकांच्या देशात पर्यटनासाठी जाता येईल का, असा एक भाबडा विचार तेव्हाच्या तरुण मनामध्ये येऊन गेला. परंतु आजचे अजूनच बिघडलेले वास्तव आपण जाणतोच. असो. लेखातील घटनेनंतर पुढील आयुष्यभरासाठी पाकिस्तानला जाणे हा विषय मी बाद करून टाकलेला आहे. परदेश पर्यटन करायचे ठरल्यास कुटुंबाकडून अर्थातच अन्य देशांना पसंती मिळेल. पण, आयुष्यातील पहिला विमान व परदेशप्रवास आणि पहिल्या आंतरराष्ट्रीय परीक्षेचा अनुभव या कारणांसाठी का होईना पाकिस्तान माझ्या आठवणीत राहील. ........................................................................................................................................................

प्रतिक्रिया द्या
54576 वाचन

💬 प्रतिसाद (181)
श
श्रीरंग_जोशी Mon, 01/10/2022 - 18:47 नवीन
या लेखावरील चर्चेशी संबंधीत विषयावरच्या २ जानेवारीच्या बातमीचे दुवे:
  • Pilgrims from India arrive in Pakistan to visit a century-old Hindu temple
  • Hindu pilgrims visit Shri Paramhans Ji Maharaj samadhi
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 01/11/2022 - 04:17 नवीन
क्रांतीकारक भगतसिंग मुळचे फैसलाबादजवळच्या (पूर्वीचे लायलपूर/ ल्यालपूर) एका गावातील. तिथे त्यांचा जन्म झाला ते घर अजूनही आहे आणि तिथे एक छोटेखानी स्मारकही केले आहे. त्यासंबंधी अनेक व्हिडिओ युट्यूबवर उपलब्ध आहेत. त्यातील एक खाली देत आहे. या व्हिडिओत जरा इतिहासाची ऐशीकीतैशी केली आहे पण तो भाग सोडून द्यायचा. तिथे केलेल्या स्मारकात भारतीय क्रांतिकारकांचे फोटो लावले आहेत त्यात वासुदेव बळवंत फडके, राणी लक्ष्मीबाई यांचेही फोटो दिसले.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 01/11/2022 - 07:43 नवीन
भगतसिंग यांची हवेली छान जतन केलेली आहे. आवडले बघायला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार
ह
हेमंतकुमार गुरुवार, 01/13/2022 - 12:46 नवीन
करतारपुर कॉरिडोर मार्गे विना व्हिसा पाकिस्तानला जाता येते. त्यासंदर्भातील अशा बातम्या अधून मधून येत असतात : दुरावलेल्या भावांची 74 वर्षांनी भेट
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 01/16/2022 - 04:23 नवीन
ट्रेन टू पाकिस्तान हा चित्रपट आलेला आहे. पण बघवणार नाही असे वाटते . निर्णय होत नाही....
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sun, 01/16/2022 - 04:36 नवीन
हा चित्रपट जुनाच आहे की त्याच नावाने नवा चित्रपट बनवला आहे? कारण त्याच नावाने एक चित्रपट पूर्वी पण होता. मी कॉलेजात असताना घरी टिव्हीवर लागला होता पण नेमके त्याच वेळेस लाईट गेल्यामुळे तो चित्रपट बघता आला नव्हता. त्यानंतर खुशवंतसिंगांचे ट्रेन टू पाकिस्तान हे पुस्तक वाचले . त्यात फाळणीच्या वेळच्या हिंसाचाराचे थोडे उल्लेख आहेत पण जास्त करून गोष्ट एक लव्ह स्टोरी आहे. त्यामुळे ते बघताना फार त्रास व्हायला नको. मागे तमस म्हणून एक मालिकाही फाळणीच्या वेळच्या हिंसाचारावर होती. त्यातही अशा घटना घडल्या हे जास्त आडवळणाने दाखवले आहे. त्यापेक्षा भाग मिल्खा भाग मध्ये तेवढ्या भागाचे अधिक त्रासदायक चित्रण आहे असे वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार Sun, 01/16/2022 - 04:43 नवीन
या सिनेमाची माहिती : दिग्दर्शक पमेला रुक्स कलाकार : मोहन आगाशे, निर्मल पांडे, दिव्या दत्ता. त्याचा सारांशमध्ये ती प्रेते भरून आलेली ट्रेन हा उल्लेख आहेच. त्याच कारणास्तव मला ते बघायला नको वाटते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार
ह
हेमंतकुमार Mon, 02/07/2022 - 12:13 नवीन
इंटरनेटवरील भेटीतून प्रेमात पडलेल्या भारतीय-पाकिस्तानी समलैंगिक स्त्री जोडप्याची गोष्ट
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 02/10/2022 - 10:55 नवीन
एक अभ्यासपूर्ण लेख: याचकाची चहुबाजूंनी कोंडी व्हावी, तशी सध्याची पाकिस्तानची अवस्था आहे https://www.aksharnama.com/client/trending_detail/5816
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Fri, 02/18/2022 - 06:31 नवीन
तुमच्या शत्रू ला भिकारी ठेवलं तर त्याला मारायची गरज नसते. भारताने पाकिस्तान बाबतीत जागतिक स्तरावर सतत प्रचार करून दबाव जारी ठेवावा. अभी पाकिस्तान को और जलील होना है. नायजेरिया, सोमालिया, अफगाणिस्तान आदी देशांपेक्षा खालच्या तळाला पाकिस्तानची अर्थव्यवस्था पोचल्याशिवाय हे प्रयत्न सोडू नयेत. शेजारी राष्ट्रे समृद्ध असली तर चांगले वगैरे सर्व परिकल्पना आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार Fri, 02/18/2022 - 08:52 नवीन
**भारताने पाकिस्तान बाबतीत जागतिक स्तरावर सतत प्रचार करून दबाव जारी ठेवावा. >>> सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रावसाहेब चिंगभूतकर
T
Trump Sun, 02/20/2022 - 20:33 नवीन
नायजेरियातील उत्पन्न भारतापेक्षा खुप कमी नाही. तेल भरपुर आहे तिकडे. भाषांतरः भारत प्रति व्यक्ती $2,625.09 130 व्या क्रमांकावर आहे. नायजेरियापेक्षा 12% जास्त नायजेरिया $2,334.26 प्रति व्यक्ती 82 व्या क्रमांकावर आहे. मुळ संदर्भ
India $2,625.09 per capita Ranked 130th. 12% more than Nigeria Nigeria $2,334.26 per capita Ranked 82nd. https://www.nationmaster.com/country-info/compare/India/Nigeria/Economy
तुमच्या शत्रू ला भिकारी ठेवलं तर त्याला मारायची गरज नसते. भारताने पाकिस्तान बाबतीत जागतिक स्तरावर सतत प्रचार करून दबाव जारी ठेवावा. अभी पाकिस्तान को और जलील होना है. नायजेरिया, सोमालिया, अफगाणिस्तान आदी देशांपेक्षा खालच्या तळाला पाकिस्तानची अर्थव्यवस्था पोचल्याशिवाय हे प्रयत्न सोडू नयेत. शेजारी राष्ट्रे समृद्ध असली तर चांगले वगैरे सर्व परिकल्पना आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रावसाहेब चिंगभूतकर
श
शाम भागवत Mon, 02/21/2022 - 18:53 नवीन
भाषांतरः

🙏

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump
न
निनाद Wed, 03/02/2022 - 01:49 नवीन
निखिल वागळे सारखे लोक जेथे लिहितात तेथे विश्वासार्हता शून्य असते! अक्षरनामाचे संपादकीयात पेड न्युज वगैरेला थारा देत नाही असे म्हणतात त्यामुळे हे पोर्टल त्यातलेच आहे याविषयी संशय अजून वाढतो. अन्यथा इतके दाबून लिहायची गरज काय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार Fri, 02/18/2022 - 06:15 नवीन
पाकिस्तान व चीनच्या मैत्रीला लागली ओहोटी: https://idrw.org/china-pakistan-honeymoon-is-over-imran-khans-historic-visit-to-beijing-cannot-hide-that/
  • Log in or register to post comments
र
रामचंद्र Sun, 02/20/2022 - 20:08 नवीन
धाग्याच्या मूळ विषयासंदर्भात सांगायचं तर 'अष्टचक्री रोमायण'कार प्रवीण कारखानीस तसेच मनीषा टिकेकरांच्या पाकिस्तानभेटीवरच्या पुस्तकांमध्ये बरेच गंमतीदार प्रसंग आणि निरीक्षणं वाचायला मिळतात. टिकेकरांच्या पुस्तकात एक किस्सा आहे. तिथं एका ठिकाणी भारतीय नृत्याचा सराव विद्यार्थिनी करत असतात. तिथल्या परिस्थितीमुळे 'जमुना के पार मेरे कृष्णमुरारी'चे 'रावी के पार मियाँ अब्दुल की बारी' असा तो प्रकार त्यांना पहायला मिळतो.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 02/21/2022 - 03:09 नवीन
रंजक संदर्भ दिल्याबद्दल आभार ! *रोमायण'कार >>> हे रामायण शब्दाचे विडंबन आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामचंद्र
र
रामचंद्र Mon, 02/21/2022 - 03:17 नवीन
(बहुधा) १९७५ घ्या दरम्यान आठ तरुण मित्र चार मोटारसायकलींवरून खुष्कीच्या मार्गाने भारतातून रोमला जातात त्या प्रवासाची ती धमाल हकिगत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार Tue, 03/01/2022 - 22:45 नवीन
पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांसाठी भारतचं वाली; युक्रेनमध्ये अडकलेल्या पाकिस्तानी विद्यार्थ्यांची सुटका https://marathi.abplive.com/news/world/russia-ukraine-war-india-helps-pakistan-student-who-stuck-in-ukrain-1037210/amp
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 03/03/2022 - 16:03 नवीन
जैन भाविकांना पाकिस्तानी विसा मिळाला आहे. परंतु भारत सरकारने त्यांना जाण्यासाठी अजून परवानगी न दिल्याने ते तिकडे जाऊ शकत नाहीत. सदर विसा आता ७ मार्चला संपणार आहे
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 05/26/2022 - 10:11 नवीन
पाकिस्तानात हिंसाचार : इम्रान खान समर्थकांनी मेट्रो स्टेशन जाळलं; इस्लामाबाद शहराला युद्धभूमीचं स्वरुप
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 07/18/2022 - 04:54 नवीन
पुणेकर असलेल्या ९० वर्षीय श्रीमती रीना वर्मा या १९६५ पासून पाकिस्तानी व्हिसासाठी अर्ज करीत होत्या. त्यांचे वडीलोपार्जित घर 'प्रेम निवास' रावळपिंडीत असून त्यांना ते पाहण्याची तीव्र इच्छा होती. आतापर्यंत त्यांचा व्हिसा नाकारला जात होता. अखेर पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्री हिना रब्बानी यांनी विशेष लक्ष घालून आजींचा विसा मंजूर केला आणि आजी त्यांच्या मातृभूमीचे दर्शन घेऊ शकल्या !
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Tue, 09/20/2022 - 15:03 नवीन
नुकतेच कोणत्यातरी विषयावरील व्हिडिओ बघत असताना झेम (Zem) टिव्ही चॅनेलचा एक व्हिडिओ बघण्यात आला. व्हिडिओ आवडला मग त्याच चॅनेलचे आणखी काही विविध विषयांवरील माहितीपर व्हिडीओज बघितले. सुरुवातीला तर लक्षातही आले नाही की हे पाकिस्तानी चॅनेल आहे.नंतर समजले. या चॅनेलच्या सब्स्क्राईबरर्समध्ये अनेक भारतीय आहेत हे उघडच आहे. चॅनेलसंबंधी काही वैशिष्ट्यपुर्ण निरिक्षणे : १) व्हिडिओजमध्ये अनेकदा संदर्भाकरिता वा एखाद्या गोष्टीच्या तुलनेकरिता पाकिस्तानी संदर्भांबरोबरच ,भारतीय संदर्भही दिला गेला आहे. उदा: सहारा वाळवंटाबद्दलच्या व्हिडिओत सहारा वाळवंटाच्या क्षेत्रफळाची तुलना भारताच्या व पाकिस्तानाच्याही क्षेत्रफळाशी केला आहे. किवा एका ईराणी मेजवानीबद्दलच्या या व्हिडिओत डॉलरमधील आकड्यांची तुलना भारतीय व पाकिस्तानी रुपयांतील आकड्यांशी केली आहे. तर इलन मस्कच्या व्हिडिओत तर डॉलरच्या तुलनेकरिता फक्त भारतीय रुपयांचा संदर्भ घेतला आहे. २) या व्हिडिओजवरिल कॉमेंट्सवर नजर टाकल्यास दिसते की अनेक भारतीय प्रेक्षकांनी या व्हिडिओजना पसंत केले आहे. पण वेळोवेळी भारतीय संदर्भ दिलेत म्हणून पाकिस्तानी प्रेक्षकांनी निषेध केलाय असे कुठे दिसले नाही. ३) मुकेश अंबानीचे अँटेलिया हे घर, ताजमहाल , शाहरुख खान, बॉलिवूड अभिनेते , बॉलिवूडमध्ये लोकप्रिय पाकिस्तानी गायक ई भारतीय विषयांवर व्हिडिओज बनवलेले आहेत. तसेच अहमद शाह अब्दालीबद्दल एक छोटासा व्हिडिओ आहे त्यात अर्थातच पानिपतच्या युद्धाबद्दल संक्षिप्त माहिती आहे. हा व्हिडिओ सुमारे तीन वर्षापुर्वीचा आहे . तेव्हा प्रदर्शित होत असेलेल्या पानिपत चित्रपताच्या निमित्ताने बहुधा हा व्हिडिओ बनवला गेला असावा तरी त्यानंतर या चॅनेलने असे व्हिडिओज टाळले आहेत असे दिसते.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 09/20/2022 - 15:14 नवीन
सविस्तर माहिती दिलीत पाहतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी
ह
हेमंतकुमार Sun, 09/25/2022 - 14:25 नवीन
अनुवादित पुस्तक मराठीत द ‘एलओसी’’ - हॅपीमॉन जेकब मराठी अनुवाद - मिलिंद चंपानेरकर रोहन प्रकाशन, पुणे नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूंनी भारतीय व पाकिस्तानी सैन्यासोबत केलेल्या सहप्रवासाची ही कहाणी आहे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 10/26/2022 - 13:04 नवीन
पाकिस्तानातील दिवाळी : काही फोटो
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 11/13/2022 - 13:30 नवीन
फाळणी संदर्भात लाहोर शहरावर आधारित एका नाटकाचा चांगला परिचय: जिस लाहौर नइ देख्या...’ :
या म्हातारीला लाहोर शहराचा प्रचंड अभिमान असतो. ज्याने लाहोर पाहिले नाही‚ जो लाहोर शहरात राहिला नाही‚ त्याचा जन्म फुकट गेला, असे तिचे मत असते. आणि तेच नाटकाचे शीर्षकही आहे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 01/08/2023 - 06:36 नवीन
पाकिस्तान : आर्थिक कडेलोटाच्या मार्गावर ? गॅस सिलिंडरची किंमत १०,००० रुपये !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 01/08/2023 - 06:36 नवीन
पाकिस्तान : आर्थिक कडेलोटाच्या मार्गावर ? गॅस सिलिंडरची किंमत १०,००० रुपये !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 05/27/2023 - 17:30 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 10/04/2025 - 10:25 नवीन
मराठी भाषिक कराचीमध्ये कसे राहतात? खूप छान आहे चित्रफित ! ‘कराचीकर’ असलेल्या जय गायकवाडना मराठी बोलताना पाहून खूप आनंद झाला. प्रमाणभाषेतील काही औपचारिक शब्द देखील त्यांच्या बोलण्यात आलेले पाहून मस्त वाटले. कराचीत दीड दिवसाचा गणेशोत्सव असतो; तो अकरा दिवसांचा व्हावा अशी गायकवाड यांची इच्छा आहे. तसेच . . . “आभाळाखालची शाळा’ या ऑनलाईन उपक्रमातून 70 देशांतील लोकांना मराठी शिकवणाऱ्या पुण्याच्या दिलीप पुराणिक यांचेही अभिनंदन !!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा