Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्त्री-लैंगिकतेचे गूढ

ह
हेमंतकुमार
Mon, 03/28/2022 - 06:17
💬 150 प्रतिसाद
(लैंगिक सुख ही स्त्री-पुरुष जोडप्यांच्या जीवनातील एक कादंबरी असते. या कादंबरीतील महत्त्वाचे प्रकरण म्हणजे संभोगसुख. या प्रकरणातील फक्त स्त्रीच्या कळसबिंदू संबंधीचे शास्त्रीय विवेचन करणे हा या लेखाचा हेतू आहे. सहजीवनातील प्रेम, भावनिक जवळीक, मानसिक स्वास्थ्य, इत्यादी पैलू या लेखाच्या व्याप्ती बाहेरचे आहेत). स्त्री-पुरुष समागमाचे दोन हेतू असतात : वैयक्तिक शरीरसुख आणि पुनरुत्पादन. यापैकी फक्त पहिल्याच हेतूचा या लेखात विचार केलेला आहे - त्यातही प्रामुख्याने स्त्रीच्या दृष्टिकोनातून. संभोगातून स्त्री व पुरुष या दोघांना मिळणारे शरीरसुख हे वेगळ्या पातळीवरचे आहे. पुरुषाच्या बाबतीत ही प्रक्रिया अशी सहजसुलभ आहे : उद्दीपन >> संभोगक्रिया >> वीर्यपतन >> समाधान. बहुसंख्य पुरुषांत हा सर्व खेळ काही मिनिटात आटोपतो. स्त्रीसुखाच्या बाबतीत मात्र परिस्थिती इतकी सरळसोट नाही. कित्येक जोडप्यात संभोगांती पुरुष समाधान पावतो तर स्त्रीला मात्र ‘त्या’ सुखाची जाणीवही होत नाही. स्त्रीदेहाच्या बाबतीत लैंगिक ‘कळसबिंदू’ (climax) म्हणजे नक्की काय, त्याचे सुख अनुभवण्यासाठी करावा लागणारा खटाटोप आणि त्याचे यशापयश या सर्वांचा आढावा या लेखात घेतो. सुरुवातीस निसर्ग व उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून या विषयाकडे पाहू. एक प्रश्न मनात उद्भवणे अगदी स्वाभाविक आहे. निसर्गाने संभोगातील पुरुषाच्या कळसबिंदूची प्रक्रिया अगदी सोपी ठेवली आहे, मग स्त्रीच्याच बाबतीत ती गुंतागुंतीची का? याचे उत्तर सोपे आहे. पुरुषाचे वीर्यपतन हे पुनरुत्पादनासाठी अत्यावश्यक आहे. याउलट, स्त्रीच्या कळसबिंदूचा पुनरुत्पादनाशी थेट संबंध नाही. त्यामुळे सजीवांच्या उत्पत्ती दरम्यान ती प्रक्रिया फारशी विकसित झाली नसण्याची शक्यता आहे. किंबहुना निव्वळ संभोगातून कळसबिंदूची अनुभूती सर्व प्राण्यांमध्ये फक्त मानवी मादीलाच येते; अन्य प्राण्यांमध्ये तसे पुरावे नाहीत. पुरुषाचा कळसबिंदू हा अगदी उघड असून त्याचा परिणाम दृश्यमान आहे. परंतु स्त्रीचा बिंदू ही संबंधित स्त्रीनेच ‘आतून’ अनुभवण्याची गोष्ट आहे. या बिंदूच्या क्षणी शरीरात खालील घटना घडतात : 1. अल्पकाळ टिकणारी अत्युच्च आनंदाची अनुभूती. इथे स्त्री क्षणभर जागृतावस्थेतच्या काहीशी पलीकडे जाते. म्हणूनच हे परमसुख ठरते. 2. योनीचा भवताल, गर्भाशय आणि गुदद्वारा जवळील विविध स्नायूंचे तालबद्ध आकुंचन पावणे. यावर स्वनियंत्रण नसते. 3. वरील दोन्हींचा एकत्रित परिणाम म्हणून स्त्रीला तृप्ती आणि समाधान लाभते. हा कळसबिंदू सरासरी 30 सेकंद टिकतो. पण अपवादात्मक परिस्थितीत तो १ मिनिटाहून जास्त काळ टिकल्याचे काही स्त्रियांत आढळले आहे. ok (चित्र सौजन्य : Getty images) वरील वर्णन हे शास्त्रीयदृष्ट्या परिपूर्ण आहे खरे. परंतु वास्तवात काय दिसते ? निरनिराळ्या स्त्रियांच्या या अनुभूतीमध्ये लक्षणीय फरक दिसून येतात. अशा अनुभवांचे वर्गीकरण असे करता येईल : 1. काही स्त्रिया निव्वळ संभोगक्रियेतूनच कळसाला पोचतात पण यांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. तसेच ज्या स्त्रियांना ही अनुभूती येते ती ‘नेहमीच’ येईल असे नसते. या गटातील मोजक्या स्त्रियांत एकाच क्रियेतून ही अनुभूती अनेक वेळाही आल्याचे आढळले आहे. 2. काही स्त्रियांच्या बाबतीत संभोगाच्या जोडीनेच जननेंद्रियातील शिस्निकेला (clitoris) अन्य प्रकारे चेतवावे लागते (हस्तमैथुन). जननेंद्रियातील हा अवयव भरपूर चेतातंतूयुक्त असतो. त्यामुळे तो सर्वात संवेदनक्षम राहतो. 3. तर काही स्त्रियांच्या बाबतीत वरील दोन्ही उपाय जोडीने अमलात आणून सुद्धा कळसबिंदू येतच नाही. यावरून एक गोष्ट लक्षात येईल. पुरुषाचा कळसबिंदू हा सर्वांसाठी एकसमान आहे. परंतु स्त्रीच्या बिंदूबाबत मात्र खूप अनुभवभिन्नता आहे. या भिन्नतेतूनच अनेक संशोधकांचे कुतूहल चाळवले गेले. आधुनिक वैद्यकात या महत्त्वाच्या विषयावर गेली शंभर वर्षे संशोधन चालू आहे. त्याचा संक्षिप्त आढावा घेणे रोचक ठरेल. मेरी बोनापार्ट या संशोधिकेने या संदर्भात काही मूलभूत अभ्यास केला, जो पुढील संशोधकांसाठी पथदर्शक ठरला. या विदुषीना लैंगिक क्रियेत खूप गोडी होती परंतु त्यांना निव्वळ संभोगातूनच कळसबिंदू कधीच अनुभवता आला नव्हता. म्हणून त्यांनी या विषयाचा सखोल अभ्यास करण्याचा चंग बांधला. त्यासाठी त्यांनी अनेक स्त्रियांच्या जननेंद्रियांची बारकाईने तपासणी केली. त्यातून जो विदा हाती आला तो त्यांनी 1924 मध्ये टोपणनावाने प्रसिद्ध केला. या संशोधनाचे सार समजण्यासाठी स्त्रीच्या जननेंद्रियाची काही मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे. जननेंद्रियांचे वरून खाली निरीक्षण केले असता त्यात प्रामुख्याने तीन गोष्टी ठळक दिसतात : सर्वात वर असते ती शिस्निका. त्याच्याखाली काही अंतरावर मूत्रछिद्र आणि त्याच्या खाली योनीमुख. मेरीबाईंना त्यांच्या अभ्यासात एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे या तिन्ही गोष्टींमधील अंतर हे सर्व स्त्रियांमध्ये समान नाही. किंबहुना त्या अंतरात बर्‍यापैकी फरक आढळतो. या अंतरासंदर्भात त्यांनी एक थिअरी मांडली. * शिस्निका 👈

हे उभे अंतर ३.५ सेमी / त्याहून कमी

* मूत्रछिद्र 👈 * योनीमुख 👈 ज्या स्त्रियांमध्ये शिस्नीका ते मूत्रछिद्र हे अंतर ३.५ सेंटीमीटरपेक्षा कमी असते त्या स्त्रियांमध्ये निव्वळ संभोगातून कळसबिंदूस पोचण्याचे प्रमाण चांगल्यापैकी असते. याचे स्पष्टीकरण सोपे आहे. शिस्निका जितकी योनिमुखाच्या जवळ राहते तितके पुरुष लिंगाचे तिच्याशी सहज घर्षण होते. या थिअरीवर पुढे बराच काथ्याकूट झाला. काही अभ्यासांतून तिला पुष्टी देणारे निष्कर्ष मिळाले तर अन्य काही अभ्यासातून तसे मिळाले नाहीत. खुद्द मेरीबाईंनी स्वतःवर तीनदा शस्त्रक्रिया करवून घेऊन ते अंतर कमी करून घेतले. तरीसुद्धा पुढे त्यांना त्याचा अपेक्षित परिणाम जाणवला नाही ! यानंतरच्या ३ दशकांमध्ये अन्य काही संशोधकांनीही या मूळ संशोधनात भर घातली. विविध स्त्रियांमध्ये ते ‘ठराविक अंतर’ कमी किंवा जास्त का असते याचा सखोल अभ्यास झाला. त्यातून एक रोचक गोष्ट पुढे आली. प्रत्येक स्त्री जेव्हा स्वतःच्या गर्भावस्थेतील जीवनात असते तेव्हा त्या गर्भावर स्त्री आणि पुरुष हार्मोन्स अशा दोन्हींचा प्रभाव पडत असतो. ज्या गर्भांच्या बाबतीत पुरुष हार्मोनचा तुलनात्मक प्रभाव जास्त राहतो त्या स्त्रीत मोठेपणी ते ठराविक अंतर जास्त राहते. याउलट, ज्या गर्भावर स्त्री हार्मोन्सचा प्रभाव तुलनेने खूप राहतो त्या जननेंद्रियामध्ये संबंधित अंतर बऱ्यापैकी कमी राहते. मेरीबाईंची थिअरी पूर्णपणे सिद्ध झाली नाही पण ती निकालातही काढली गेली नाही हे विशेष. यापुढील कालखंडात अनेक संशोधकांनी अधिक अभ्यास करून आपापली मते मांडली. त्यामध्ये प्रामुख्याने मनोचिकित्सक डॉ. Sigmund Freud यांची दखल घ्यावी लागेल. त्यांच्या मते संभोगातून कळसबिंदूस पोचणे हे मुळातच स्त्रीच्या मानसिक जडणघडणीवर अवलंबून आहे. मुली वयात येत असताना प्रथम त्या मुलांप्रमाणेच शिस्निकेच्या हस्तमैथुनातून हे सुख अनुभवतात. पुढे जर त्यांची मानसिक वाढ उत्तम झाली तरच त्या हे सुख निव्वळ संभोगाद्वारे अनुभवू शकतात. त्यांच्या मते अशा प्रकारचे सुख अनुभवता येणे ही लैंगिकतेतील निरोगी आणि विकसित अवस्था असते. या थिअरीवर बरेच चर्वितचर्वण झाले. त्या विचारांचा एक दुष्परिणामही दिसून आला. आधीच बर्‍याच स्त्रियांना निव्वळ संभोगातून कळसबिंदूचे सुख मिळत नाही. त्यामुळे या माहितीतून अशा स्त्रियांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झाला. आज शंभर वर्षे उलटून गेल्यानंतर ही थिअरी पूर्णपणे मान्य केली गेलेली नसली तरी अजूनही काही प्रमाणात ती विचाराधीन आहे. १९६०-७० च्या दशकापर्यंत या संशोधनामध्ये अजून काही भर पडली. तत्कालीन संशोधकांमध्ये विल्यम मास्टर्स व व्हर्जिनिया जॉन्सन या जोडप्याचे महत्वाचे योगदान आहे. ते आणि अन्य काही संशोधकांच्या अभ्यासानंतर एका मुद्द्यावर बऱ्यापैकी एकमत झाले. तो म्हणजे, समागमादरम्यान जर स्त्रीची शिस्निका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या चेतविली गेली तरच स्त्रीला कळसबिंदू येतो; अन्यथा नाही. मास्टर्स व जॉन्सन यांच्या भरीव संशोधनानंतर या विषयाचे परंपरागत प्रारूप असे तयार झाले : लैंगिक सुखाची इच्छा >> उत्तेजित अवस्था>> कळसबिंदू >>> समाधान आणि पूर्वावस्था. स्त्रीला पुरेशी उत्तेजित करण्यासाठी संभोगपूर्व कामक्रीडांचे (चुंबनापासून इतर उत्तेजक क्रियांपर्यंत) महत्त्व आहे. परंतु त्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो. त्या क्रीडांतून उत्तेजना वाढते आणि परिणामी कळसबिंदूस पोहोचण्याची शक्यता वाढते. परंतु या मुद्द्याचे सरसकटीकरण करता येत नाही. इथेही विविध स्त्रियांमध्ये यशापयशाचे वेगवेगळे अनुभव आलेले आढळतात. अलीकडील संशोधनातून वरील परंपरागत प्रारूप हे अतिसुलभीकरण असल्याचे तज्ञांचे मत झाले आहे. ज्या स्त्रियांमध्ये अन्य घटकांमुळे कळसबिंदू येण्याची शक्यता कमीच असते (किंवा नसते), त्यांच्या बाबतीत संभोगपूर्व क्रीडांमुळे दरवेळी यश येईलच असे नाही. त्यामुळे या क्रीडा म्हणजे कळसबिंदूस पोहोचण्याचा खात्रीशीर उपाय म्हणता येत नाही. इथपर्यंतच्या संशोधनामध्ये मुख्यत्वे स्त्रियांच्या शारीरिक तपासणीवर भर दिला गेला होता. 1980 नंतर मानवी शरीराचा आतून सखोल अभ्यास करण्यासाठी विविध वैद्यकीय उपकरणे उपलब्ध झाली. सुरुवातीस अल्ट्रासाउंड आणि पुढे एमआरआय स्कॅन यांचा यापुढील संशोधनात चांगला उपयोग झाला. ज्या स्त्रियांना निव्वळ संभोगातून हे शरीरसुख मिळत होते त्यांच्या योनिमार्गाचा बारकाईने अभ्यास झाला. त्यातून योनीमार्गामधील एका अतिसंवेदनक्षम बिंदूची कल्पना मांडली गेली. या बिंदूला G असे नाव देण्यात आले. यापुढील संशोधनात मात्र अशा विशिष्ट बिंदूचे तिथले अस्तित्व थेट सिद्ध करता आलेले नाही. काहींनी असे मत व्यक्त केले आहे की हा बिंदू म्हणजे वेगळे असे काही नसून ते शिस्निकेचेच एक विस्तारित मूळ असावे. संभोगादरम्यानचे स्त्री-पुरुषांचे स्थान हाही एक कुतूहलाचा विषय आहे. बहुसंख्य जोडप्यांमध्ये स्त्री खाली आणि पुरुष वर ही पद्धत वापरली जाते. या प्रकारे ज्या स्त्रियांना कळसबिंदू येत नाही अशांच्या बाबतीत वेगळे प्रयोग करून पाहण्यात आले आहेत. परंपरागत पद्धतीच्या बरोबर उलट पद्धत (म्हणजे स्त्री वर आणि पुरुष खाली) आचरल्यास काही जोडप्यांना या बाबतीत यश येते. या उलट प्रकारच्या पद्धतीत शिस्निकेचे घर्षण तुलनेने सुलभ होते. अर्थात याही मुद्द्याचे सरसकटीकरण करता येत नाही. त्यात वैयक्तिक कौशल्यानुसार अनुभवभिन्नता राहते. सरतेशेवटी एक रंजक मुद्दा. काही स्त्रियांमध्ये त्या झोपेत असताना सुद्धा त्यांना कळसबिंदूचा अनुभव आलेला आहे. या स्थितीत त्या नक्की कुठल्या प्रकारे चेतविल्या गेल्या हे अजून स्पष्ट झालेले नाही. स्त्रीचे शरीरसुख या विषयावर एक शतकाहून अधिक काळ संशोधन होऊनही आज त्या विषयाचे काही कंगोरे धूसरच आहेत; त्यावरील गूढतेचे वलय अद्यापही कायम आहे. सामाजिक दृष्टीकोन परिपूर्ण लैंगिक ज्ञान हा शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. यासंदर्भात समाजातील विविध स्तरांचे निरीक्षण केले असता वेगवेगळे अनुभव येतात. एकूणच स्त्री-लैंगिकता हा विषय अजूनही काहीसा निषिद्ध मानला जातो. त्यावर खुली चर्चा करणे शिष्टसंमत नसते; बरेचदा दबक्या आवाजातच यावर बोलणे होते. अलीकडे विविध वृत्तमाध्यमे आणि दृश्यपटांमधून या विषयाची चांगली हाताळणी केलेली दिसते. २०१८च्या ‘लस्ट स्टोरीज’ या हिंदी चित्रपटातील शेवटची कथा हे या संदर्भात पटकन आठवणारे एक उदाहरण (https://en.wikipedia.org/wiki/Lust_Stories). कामक्रीडेदरम्यान पुरुषाने त्याचा कार्यभार उरकला तरीही स्त्रीच्या शरीरसुखाला गृहीत धरता येणार नाही, हा मुद्दा त्यात अधोरेखित झाला आहे. ज्या स्त्रिया ( व त्यांचे जोडीदार) अशा साहित्यांत रस घेतात त्यांच्या माहितीत यामुळे नक्कीच भर पडते आणि त्याचा त्यांना वैयक्तिक लैंगिक आयुष्यात फायदा होतो. मात्र समाजाच्या काही स्तरांमध्ये हा विषय पूर्णपणे निषिद्ध आहे. किंबहुना समागम म्हणजे पुनरुत्पादनासाठी केलेली आवश्यक क्रिया इतकेच त्याचे स्थान मनात असते. पुरेशा लैंगिक शिक्षणाअभावी या स्तरातील स्त्रियांना कळसबिंदूच्या मूलभूत सुखाची जाणीवही करून दिली जात नाही. अशा स्त्रियांच्या बाबतीत एकदा का अपेक्षित पुनरुत्पादन उरकले, की मग हळूहळू त्या क्रियेतील गोडी कमी होऊ लागते. ते स्वाभाविक आहे. त्या क्रियेतून मिळणारे अत्त्युच्च सुख जर एखाद्या स्त्रीने कधीच अनुभवले नसेल, तर तिच्या दृष्टीने समागम म्हणजे पुरुषी वर्चस्व असलेली आणि आपल्यावर लादलेली गचाळ क्रिया आहे असे मत होऊ शकते. ही भावना अर्थातच सुदृढ मनासाठी मारक आहे. त्यातून लैंगिक जोडीदारांमध्ये विसंवादही होतात. त्यादृष्टीने विविध माध्यमे आणि शिबिरांमधून या नाजूक पण महत्त्वाच्या विषयावर जोडप्यांचे समुपदेशन झाले पाहिजे. अलीकडे स्त्रियांची मासिक पाळी या विषयावर मुक्त आणि भरपूर चर्चा सार्वजनिक मंचांवर होताना दिसतात. तद्वतच स्त्रीच्या या अत्युच्च सुखाबाबतही पुरेशी जागृती होणे आवश्यक आहे. ..................................................................................

प्रतिक्रिया द्या
56345 वाचन

💬 प्रतिसाद (150)
ग
गवि Mon, 03/28/2022 - 06:45 नवीन
नेहमीप्रमाणे उत्कृष्ट मांडणी. महत्वाचा विषय.
  • Log in or register to post comments
न
नचिकेत जवखेडकर Mon, 03/28/2022 - 06:59 नवीन
सहमत. एका संवेदनशील विषयाची अतिशय संयत मांडणी. निळे चित्रपट हे वास्तव नाही हे समजून घेतलं तरी बरेच गैरसमज दूर होतील :).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
च
चौथा कोनाडा Mon, 03/28/2022 - 09:18 नवीन
महत्वाचा विषय. लेखातील तपशिल चपखल आहेत.
या बिंदूला G असे नाव देण्यात आले. यापुढील संशोधनात मात्र अशा विशिष्ट बिंदूचे तिथले अस्तित्व थेट सिद्ध करता आलेले नाही.
या बद्दल लेख वाचण्यात आले होते, पण "हा बिंदू म्हणजे वेगळे असे काही नसून ते शिस्निकेचेच एक विस्तारित मूळ असावे" हे प्रथमच वाचण्यात आले. या अनुषंगाने स्त्रिया मोठ्या प्रमाणात व्यक्त झाल्यातर आणखी जागरूकता येऊ शकेल.
  • Log in or register to post comments
न
नगरी Wed, 04/27/2022 - 15:22 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
N
nanaba Mon, 03/28/2022 - 09:58 नवीन
फक्त intercourse विचारा त घेतला आहे . Foreplay plays a major role, जे ह्या लेखात आलेलेच नाही..
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 03/28/2022 - 10:04 नवीन
सहमत. कळसबिंदू हीच लेखाची मध्यवर्ती कल्पना आहे. अन्य तपशील घेतलेले नाहीत. संभोगपूर्व प्रक्रियांमधून कळसबिंदूची प्राप्ती होतेच असे नाही. या संदर्भात बरीच उलट-सुलट चर्चा वाचण्यात आली. म्हणून तो मुद्दा टाळला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: nanaba
ह
हेमंतकुमार Mon, 03/28/2022 - 10:00 नवीन
स्वागत केल्याबद्दल वरील तिघांचे आभार ! ... १.
निळे चित्रपट हे वास्तव नाही हे समजून घेतलं
>> अ-ग-दी ! +१११ .. २.
G बद्दल लेख वाचण्यात आले होते,
>>> बऱ्याच वैज्ञानिक आणि अवैज्ञानिक नियतकालिकांमध्ये या बिंदूवर भरमसाठ चर्चा होत असते. ज्यांच्यामते तो आहे, ते हिरीरीने पटवून द्यायचा प्रयत्न करतात. पण त्याचे नक्की स्थान दाखवता येत नाही. त्यावर एक वैज्ञानिक म्हणाल्या, “ते कसे आहे ना, ‘हवा किंवा वारा दाखवा’ असं म्हणण्यासारखं आहे ! ‘तो’ आहे पण बिंदू म्हणून दाखवता येत नाही ... 😀
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 03/28/2022 - 10:17 नवीन
माहितीपूर्ण लेखन आहे. चर्चा सुरु ठेवा. पण, इतरही काही निसटलेला भाग असावा असे वाटले, म्हणजे 'बिंदूवर' पोचता येत असेल, जाता येत असावे. वगैरे. बिंदुगामी चर्चेच्या प्रतिक्षेत. लेखातला फोटो उच्च आहे. धन्यवाद. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 03/28/2022 - 13:31 नवीन
लेखातला फोटो उच्च आहे
असहमत ! या पेक्षा उत्तम फोटो वापरता आला असता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 03/29/2022 - 08:28 नवीन
>>>असहमत ! या पेक्षा उत्तम फोटो वापरता आला असता. क्षणभर असहमतीशी सहमती दाखवली आणि तुम्हाला समजा लेखकाने सांगितलं असतं की दुसरा फोटो टाका तर, तुम्ही कोणता फोटो टाकला असता ? मला तर वरील फोटो वरुन काल्पनिक चलचित्र डोळ्यासमोर आले की ती महिला आता उत्कलन बिंदूच्या सॉरी, कळसबिंदूच्या यात्रेला निघाली आहे, बस आता कोणत्याही तो क्षण आणि त्या क्षणी पापण्या हळूहळू कमळ पाकळ्याप्रमाणे अलगद मिटतील आणि मान डाव्या आणि उजव्या बाजुच्या घाटवळणांनी वळणे घेणा-या मोटारीप्रमाणे वळत राहील आणि आनंदलोकाच्या बागेत फुलपाखरी झालेलं मन या फुलावरुन त्या फुलावर काही वेळ विहरत राहील. आनंदावेग ओसरु लागला की मोग-याच्या गंधाने हळुहळु मलुल झालेले डोळे उघडू लागतील असा तो 'लै. गुढतेचा' प्रवास फोटो वरुन वाटला होता. च्यायला, तात्या आज या धाग्यावर असता तर एकसे एक फोटो टाकले असते आणि म्हणाला असता बिरुटेशेठ योग्य फोटो निवडा. आता फक्त आठवणी. मिस यू तात्या. -दिलीप बिरुटे (प्रवासी ) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
च
चौथा कोनाडा Tue, 03/29/2022 - 14:20 नवीन
च्यायला, तात्या आज या धाग्यावर असता तर एकसे एक फोटो टाकले असते आणि म्हणाला असता बिरुटेशेठ योग्य फोटो निवडा. आता फक्त आठवणी. मिस यू तात्या.

👍

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
न
नगरी Mon, 04/25/2022 - 15:18 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
न
नगरी Mon, 04/25/2022 - 15:20 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अ
अनिंद्य Mon, 03/28/2022 - 12:20 नवीन
क्लायमॅक्स साठी 'कळसबिंदू' छान शब्द आहे. आधी कधी वाचला नाही. लेख आवडला. ह्या एका बाबतीत 'सफर है मंजिल से ज्यादा हसीन' हेच खरे :-)
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 03/28/2022 - 12:54 नवीन
१.
इतरही काही निसटलेला भाग असावा असे वाटले,
>>> संभोगपूर्व कामक्रीडांचे (चुंबनापासून इतर उत्तेजक क्रियांपर्यंत) महत्त्व यावर एक नवा परिच्छेद मूळ लेखात संपादित करून घेतला आहे. त्यात या क्रीडांचे महत्व आणि मर्यादा दिल्यात. ... २.
'सफर है मंजिल से ज्यादा हसीन'
>>> छान . सहमत.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 03/28/2022 - 13:56 नवीन
आणि नेटकी मांडणी.
  • Log in or register to post comments
व
विंजिनेर Mon, 03/28/2022 - 20:18 नवीन
निसर्गाने संभोगातील पुरुषाच्या कळसबिंदूची प्रक्रिया अगदी सोपी ठेवली आहे, मग स्त्रीच्याच बाबतीत ती गुंतागुंतीची का?
उत्तर संकुचित वाटलं - विषेशतः पुनरुत्पादनाशी जोडलेला संबंध oversimplified/cherry picking क्याटॅगरीतला वाटला.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Tue, 03/29/2022 - 19:28 नवीन
>>मग स्त्रीच्याच बाबतीत ती गुंतागुंतीची का? डिस्कवरी का नॅशनल जिओग्राफीवर लायन्स प्राईड वरचे काही भाग पाहिले होते. त्यात काही सिंह (३-४ किंवा अगदी ५ ही असु शकतात) हे एका कळपाचे प्रमुख असतात ज्यात जवळपास १०-१२ सिहिंणी असतात.त्यात असे पाहिले होते कि एखादी सिहिंण माजावर आली कि हे सिंह आळीपाळीने तिच्याशी संभोग करत होते. त्या भागात तरी तो सिंह सिहिंणीमधला राजीखुशीचा मामला वाटला. पण दरवेळेला तसे नसावे. त्यामूळे इच्छा नसतानाही मादीला अश्या प्रकाराला सामोरे जावे लागत असावे. त्यामूळे निसर्गतः मादीची जडणघडणच अशी झाली असावी. म्हणजे उलट बाजुने विचार केला तर स्खलीत झालेल्या नराला पुन्हा दुसर्या माद्यांशी संकर करायची जबरदस्ती केली तर त्याची जी अवस्था होईल ती होऊ नये म्हणुन मादीची संभोगा बद्दल ची रचना अशा पध्दतीने गुंतागुंतीची झाली असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर
ह
हेमंतकुमार Wed, 03/30/2022 - 03:57 नवीन
त्याची जी अवस्था होईल ती होऊ नये म्हणुन मादीची संभोगा बद्दल ची रचना अशा पध्दतीने गुंतागुंतीची झाली असावी.
>>> विचार करण्याजोगा मुद्दा. उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून अधिक वाचावे लागेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
प
पुष्कर Tue, 03/29/2022 - 01:13 नवीन
महत्त्वाचा विषय, उत्तम मांडणी, वाचनीय. इतका चांगला लेख लिहिल्याबद्दल तुमचे एक वाचक म्हणून आभार मानतो.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 03/29/2022 - 03:59 नवीन
उत्तर संकुचित वाटलं - विषेशतः पुनरुत्पादनाशी जोडलेला संबंध
>>> इथे शास्त्रीय विवेचन आहे.
In men, orgasms are under strong selective pressure as orgasms are coupled with ejaculation and thus contribute to male reproductive success. By contrast, women's orgasms in intercourse are highly variable and are under little selective pressure as they are not a reproductive necessity.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Tue, 03/29/2022 - 04:58 नवीन
छान लेख! या विषयावर एक मजेशीर व्हिडीओ.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 03/31/2022 - 13:43 नवीन
कॉमी, मजेशीर व्हिडिओ आहे !

🤩

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी
B
Bhakti Tue, 03/29/2022 - 05:14 नवीन
नाजूक विषय अतिशय शास्त्रीय पद्धतीने लेख लिहून मांडल्याबद्दल अभिनंदन!
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Tue, 03/29/2022 - 17:28 नवीन
अभिनंदन. अवांतरः शरीरशास्त्र जर स्त्रीदेहाविषयी अशी सगळी मांडणी करतेय तर मग लेस्बीयन संबंधांचा (केवळ शारीरीक दृष्ट्या, मानसीक नाहि) आधार काय असावा? इतर प्राणीमात्रांमधे गंधस्त्राव, विशिष्ट प्रकारचे आवाज करणे वगैरे प्रकार होतात पार्टनरला आकर्षीत करायला. मनुष्यप्राण्यात तर असं काहि होत नाहि. तेंव्हा चुकुन एखादा गंध समलिंगी व्यक्तींना शरीरसंबंधाकडे आकृष्ट करतो म्हणावं तर तसंही दिसत नाहि.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 03/29/2022 - 17:39 नवीन
१.
मजेशीर व्हिडीओ.
>>> हा हा ! विविध मैथुने आवडली !! ... २.
नाजूक विषय अतिशय शास्त्रीय पद्धतीने
>>> होय, तसा प्रयत्न केलाय. ... ३.
लेस्बीयन संबंधांचा (केवळ शारीरीक दृष्ट्या, मानसीक नाहि) आधार काय
>>> मुद्दा रोचक आहे. सवडीने वाचन करून शोधावे लागेल
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 03/30/2022 - 07:23 नवीन
लेस्बीयन संबंधांचा (केवळ शारीरीक दृष्ट्या) आधार
>> या मुद्द्यावर काही वाचन केले असता काही गोष्टी अंधुकश्या समजल्या. मुळात (स्त्री अथवा पुरुष) समलैंगिकता का निर्माण होते हा गहन प्रश्न आहे. त्याचे ठाम असे उत्तर सापडलेले नसल्याने विविध जैविक थिअरीज मांडल्या गेल्या आहेत : १. व्यक्तीच्या X गुणसूत्रावरील डीएनए संबंधित विशिष्ट रचनेतील भेद. २. गर्भावस्थेत असताना आईच्या हार्मोन्सचा झालेला कमी-अधिक प्रभाव. तूर्त एवढेच म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ग
गवि Wed, 03/30/2022 - 04:52 नवीन
डॉक्टर, एक शंका आहे. फक्त नरालाच refractory period का असतो? वर काहीसा संदर्भ दिसतोय. पण यामागे निसर्गाची शरीर / मेंदू यांच्या दृष्टीने काही प्रोटेक्टिव्ह व्यवस्था आहे का?
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 03/30/2022 - 06:42 नवीन
फक्त नरालाच refractory period का असतो?
>>>> चांगला प्रश्न. पुरुषांमध्ये लागोपाठ संभोग करण्यासंबंधी जो अकार्यक्षमता कालावधी ( RP) असतो तो सर्वपरिचित आहे. मात्र या संदर्भात स्त्रियांमध्ये तुलनेने कमी अभ्यास झालेले आहेत. त्यामुळे फार मोजका विदा उपलब्ध आहे. पुरुष व स्त्री या दोघांमध्येही एका संभोगक्रियेनंतर प्रोलॅक्टीन हे हॉर्मोन मोठ्या प्रमाणात स्रवते. त्यामुळे लागोपाठ दुसऱ्या क्रियेत अडथळा येतो. पहिली क्रिया संपल्यानंतर स्त्रियांची शिस्निका अतिसंवेदनक्षम झालेली असते. ती पुन्हा चेतविण्याचा प्रयत्न केल्यास वेदना होतात. त्यामुळे लागोपाठ दुसरी क्रिया नकोशी वाटते. स्त्रियांत RP चा कालावधी पुरुषांच्या तुलनेत बराच कमी राहतो असे काही संदर्भ सांगतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ह
हेमंतकुमार Wed, 03/30/2022 - 06:42 नवीन
फक्त नरालाच refractory period का असतो?
>>>> चांगला प्रश्न. पुरुषांमध्ये लागोपाठ संभोग करण्यासंबंधी जो अकार्यक्षमता कालावधी ( RP) असतो तो सर्वपरिचित आहे. मात्र या संदर्भात स्त्रियांमध्ये तुलनेने कमी अभ्यास झालेले आहेत. त्यामुळे फार मोजका विदा उपलब्ध आहे. पुरुष व स्त्री या दोघांमध्येही एका संभोगक्रियेनंतर प्रोलॅक्टीन हे हॉर्मोन मोठ्या प्रमाणात स्रवते. त्यामुळे लागोपाठ दुसऱ्या क्रियेत अडथळा येतो. पहिली क्रिया संपल्यानंतर स्त्रियांची शिस्निका अतिसंवेदनक्षम झालेली असते. ती पुन्हा चेतविण्याचा प्रयत्न केल्यास वेदना होतात. त्यामुळे लागोपाठ दुसरी क्रिया नकोशी वाटते. स्त्रियांत RP चा कालावधी पुरुषांच्या तुलनेत बराच कमी राहतो असे काही संदर्भ सांगतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Wed, 03/30/2022 - 08:56 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Wed, 03/30/2022 - 09:47 नवीन
अकार्यक्षमता कालावधी ( RP) एक्न्दरीत निसर्गाची रचना बघता सर्वच गोश्टी विचार पुर्वक केलेल्या वाटतात. वात्सायन ते मस्तराम पर्यन्त साहित्य सम्पदा आसताना एकेकाळचा समजाभिमुख विशय निशीध कसा काय झाला. आज यावर सकारात्मक विचार होतोय . खजुराहो मन्दिरे याचे एक उदाहरण आहे. पस्तीस वर्शापुर्वीचे फोटो शेअर करत आहे, कुमार सर अभिनन्दन . Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 03/31/2022 - 08:37 नवीन
कर्नलसाहेब, फोटो दिसत नाहीयत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 03/31/2022 - 08:50 नवीन
कर्नलसाहेब, फोटो दिसत नाहीयत ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
प
प्रचेतस गुरुवार, 03/31/2022 - 15:31 नवीन
किती ती उत्सुकता :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च
चौथा कोनाडा Fri, 04/01/2022 - 09:10 नवीन

😃

या धाग्याचा "विषय"च असा आहे की उत्सुकता नाय दाखवली तर काय मजा ?

😜

😜

😜

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ह
हेमंतकुमार गुरुवार, 03/31/2022 - 08:55 नवीन
दिवसभर ते फोटो दिसत होते. एकदा दिसणारे फोटो 24 तासात का गायब होतात यासंबंधी टर्मिनेटर यांनी मार्गदर्शन करावे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी
च
चौथा कोनाडा गुरुवार, 03/31/2022 - 09:04 नवीन
सेन्सॉरड् ....... ? संमं ने गायब केले असावेत की काय अशी शंका येतेय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार Wed, 03/30/2022 - 10:15 नवीन
पस्तीस वर्षांपूर्वीचे फोटो शेअर करत आहे,
>>> ते छान व अनुरूप आहेत, हे वे सां न ल !
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Wed, 03/30/2022 - 11:36 नवीन
चांगला विषय आणि उत्तम मांडणी!
"स्त्रीसुखाच्या बाबतीत मात्र परिस्थिती इतकी सरळसोट नाही. कित्येक जोडप्यात संभोगांती पुरुष समाधान पावतो तर स्त्रीला मात्र ‘त्या’ सुखाची जाणीवही होत नाही."
स्त्रियांना प्रणयक्रिडेत कळसबिंदू गाठण्यात शिस्निकेला (clitoris) अनन्यसाधारण महत्व आहे हे कित्येक पुरुषांना माहितच नसते. लज्जा किंवा संकोच वाटत असल्याने बहुतांश स्त्रिया त्यांना नक्की कुठल्या क्रियेतून परमोच्च (लैंगिक) सुख प्राप्त होते ह्याची वाच्यता आपल्या जोडीदाराकडे करत नाहीत ही एक मोठी समस्या आहे!
"पुरुषाचा कळसबिंदू हा सर्वांसाठी एकसमान आहे. परंतु स्त्रीच्या बिंदूबाबत मात्र खूप अनुभवभिन्नता" आहे."
+१००० स्खलन झाल्यावर 'आपले समाधान झाले म्हणजे जोडीदाराचेही समाधान झाले असणार' अशा गैरसमजातून अतिशय निर्विकारपणे जोडीदाराच्या शरीरापासून अलग होऊन ढाराढुर झोपून जाणारे महाभागही भरपूर असतात. जोडीदार अतृप्त राहिलाय हे त्यांच्या गावीही नसते. मित्रांच्या बरोबरीने कुठल्याही विषयावर बिनधास्त मोकळेपणाने चर्चा / अनुभव शेअर करणाऱ्या भरपूर मैत्रिणीही लाभल्या असल्याने "स्त्रीच्या बिंदूबाबतची अनुभवभिन्नतेशी" बऱ्यापैकी परिचित आहे. त्यांच्याकडून मिळालेली काही माहिती शेअर करतो. "काही स्त्रिया निव्वळ संभोगक्रियेतूनच कळसाला पोचतात पण यांचे प्रमाण तुलनेने कमी आहे" हे तुम्ही लेखात लिहिलेलंच आहे आणि "काही स्त्रियांच्या बाबतीत संभोगाच्या जोडीनेच जननेंद्रियातील शिस्निकेला (clitoris) अन्य प्रकारे चेतवावे लागते" हे देखील अगदी बरोबर आहे. ह्या क्रियेत पुरुषाच्या हाताचे मधले बोट आणि जीभ ह्यांचा वापर केलेला स्त्रियांना विशेष आवडतो. काही जणींना संभोगाच्या जोडीने/नंतर शिस्निकेप्रमाणेच स्तानाग्रे, कानाच्या पाळ्या चेतवल्यावर Orgasm येते. शिस्निका, स्तानाग्रे आणि कानाच्या पाळ्या हे स्त्रीदेहाचे संवेदनशील भाग असतात त्यामुळे त्यांना चेतवून Orgasm येणे तसे स्वाभाविक वाटते पण एका मित्राचा अनुभव थोडा वेगळा वाटतो. Foreplay ते संभोग सर्व क्रिया झाल्यावर त्याने बायकोच्या कानात काहीवेळ जीभ घोळवल्या शिवाय तिला Orgasm येत नाही! असो, एका महत्वाच्या विषयावरील छान लेखासाठी आभार आणि बिरूटे सरांनी प्रतिसादात चित्राबद्दल लिहिलंय त्याच्याशी प्रचंड सहमत! अतिशय समर्पक चित्राची निवड केली आहेत तुम्ही 👍
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Wed, 03/30/2022 - 19:26 नवीन
स्खलन झाल्यावर 'आपले समाधान झाले म्हणजे जोडीदाराचेही समाधान झाले असणार' अशा गैरसमजातून अतिशय निर्विकारपणे जोडीदाराच्या शरीरापासून अलग होऊन ढाराढुर झोपून जाणारे महाभागही भरपूर असतात
पण मग स्खलन झाल्यावर पुरुषाने काय करणे अपेक्षित असते ? त्यापेक्षा स्खलन लांबवण्याचे प्रयत्न करुन स्वतःला आणि जोडीदार स्त्रीला अधिक वेळ आनंद देण्याचा प्रयत्न करणे अधिक वास्तववादी उपाय असू शकेल काय ? आणि स्खलन झाल्यावर थोडा वेळ (निदान लगेचचा काही काळ तरी) स्त्री देहाबद्दल खरंच आकर्षण जागृत असते ? संभोग ही पुनरुत्पादनाकरिता आवश्यक कृती - पण मानवात पुनरुत्पादनाशिवायही संभोग ही आनंदाकरिता करण्याची कृती आहे - हे सत्य आहे आणि ते मान्य केले तरी ते सगळ्याच व्यक्तींच्या बाबत सदासर्वकाळ लागू होत असेल का नक्की ? ह्या 'सत्याचा' विविध माध्यमांनी , जाहिरातींनी इतका मारा केलाय की संभोग न करणे म्हणजे काहीतरी अपराधच जणू असे झाले आहे. या दबावातून संभोग हा जबाबदारी म्हणून उरकला जातो मग जोडीदाराची तृप्ती दुर्लक्षिली जाते. यात फक्त पुरुषालाच दोष देणे योग्य कसे ? कदाचित हा एकुणच कुटूंबसंस्थेचा/ समाजरचनेचा दोष असू शकतो.. अगदी प्रत्येकाला नेहमीच ते ही वर्षानुवर्षे एकाच जोडिदारासोबत संभोगातुन आनंद मिळू शकेल हे कशावरुन ? मग अशा वेळी ते न करण्याचेही स्वातंत्र्य हवेच ना. स्त्री-पुरुष दोघांनाही - पण लग्नाच्या जोडीदारापैकी एकाला ते नको आहे आणि दुसर्‍याला ते हवेच आहे अशी परिस्थिती असेल तर ओपन मॅरेज , विवाहबाह्य संबंध वा घटस्फोट घेवून पुनर्विवाह यापैकी एखादा मार्ग चोखाळावा लागेल. विवाहसंस्थाही टिकवायची (ते ही अगदी आदर्श स्थितीत - जोडीदाराखेरीज इतर कुणाचा विचारही मनात आणायचा नाही वगैरे नियम पाळत) आणि संभोगातुन पुर्ण समाधानही मिळवायचे व द्यायचे ही दोन्ही धेय्ये साध्य करणे ही आदर्श वाटणारी कल्पना नेहमीच प्रत्यक्षात उतरेल ही अपेक्षा अगदीच भाबडी आहे. बहुतेक वेळेस कोणत्यातरी एकाच गोष्टीला प्राधान्य द्यावे लागेल. असो. जाता जाता : यानिमित्ताने नेटफ्लिक्स वरील Sex/Life ही वेबसिरीज सुचवू इच्छितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर
ह
हेमंतकुमार गुरुवार, 03/31/2022 - 06:01 नवीन
पण मग स्खलन झाल्यावर पुरुषाने काय करणे अपेक्षित असते ?
>>> चांगला मुद्दा. बहुसंख्य जोडप्यांमध्ये निव्वळ संभोगातून दोघांनाही एकाच वेळेस कळस बिंदूस पोहोचणे हे खूप दुर्मिळ असते. बऱ्याचदा पुरुष एका प्रमाणाबाहेर स्खलन लांबवू शकत नाही- विशेषता तारुण्यात. स्त्रीला कळसबिंदूचे सुख मिळणे तसेही तुलनेने अवघड आहे. त्यामुळे एकतर तिचा बिंदू आधी आणून देणे हा पर्याय राहतो, किंवा पुरुषाचा कार्यभार उरकल्यावर त्याने अन्य मार्गाने स्त्रीला चेतवून तिला बिंदूपर्यंत नेले पाहिजे. दोघांनाही अंतिम सुख नियमित मिळत राहिले तरच स्त्रीच्या बाजूने याची गोडी दीर्घकाळ टिकून राहील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी
त
तर्कवादी गुरुवार, 03/31/2022 - 10:00 नवीन
बऱ्याचदा पुरुष एका प्रमाणाबाहेर स्खलन लांबवू शकत नाही- विशेषता तारुण्यात.
काहीसा असहमत - माझ्या मते पुरुषाला जोडीदाराबद्दल अतिशय आकर्षण असेल (शारिरिक , भावनिक ई सगळ्या पातळीवर) तर स्खलन लांबवून त्याला अधिकाधिक आनंद मिळेल आणि अधिक आनंद /समाधान मिळवण्याकरिता तो प्रयत्न करेलच... व विशेष काही शारिरिक समस्या नसल्यास त्याला ते नक्कीच शक्य होईल बाकी पुरुषाकरिता कळसबिंदू ही समागमाची संपुर्णता असली तरी कळसबिंदू गाठला म्हणजे त्याला पुर्ण समाधान वा तृप्ती लाभलीच असे नाही.. त्यामुळे "खलन झाल्यावर 'आपले समाधान झाले म्हणजे जोडीदाराचेही समाधान झाले असणार' अशा गैरसमजातून अतिशय निर्विकारपणे जोडीदाराच्या शरीरापासून अलग होऊन ढाराढुर झोपून जाणारे महाभागही भरपूर असतात". पण केवळ स्खलन झालंय म्हणजे या महाभागाचं समाधानही झालंय हा निष्कर्ष कितपत योग्य आहे ? पुरुषासाठी तरि स्खलन = समाधान हे समीकरण १००% लागू आहे का ? नसल्यास इथे पुरुष हा अन्याय करणारा आणि स्त्री ही अन्यायग्रस्त अशीच मांडणी इथे अनावश्यक वाटते... तसेही स्त्रीच्या कळसबिंदूबद्दल अनभिज्ञ असलेल्या पुरुषाला त्याबद्दल दोषी ठरवणे अयोग्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार गुरुवार, 03/31/2022 - 10:32 नवीन
केवळ स्खलन झालंय म्हणजे या महाभागाचं समाधानही झालंय हा निष्कर्ष कितपत योग्य आहे ? पुरुषासाठी तरि स्खलन = समाधान हे समीकरण १००% लागू आहे का ?
>> माझ्या मते तरी याचे उत्तर होय असे आहे. याहून वेगळे समाधान म्हणजे तरी नक्की काय ? पुरुषाच्या कळसबिंदूची पाठ्यपुस्तकातील ही व्याख्या देतो :
Male orgasm is defined as a subjective, perceptual-cognitive event of peak sexual pleasure that in normal conditions coincides with the moment of ejaculation.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी
त
तर्कवादी गुरुवार, 03/31/2022 - 13:17 नवीन
माझ्या मते तरी याचे उत्तर होय असे आहे. याहून वेगळे समाधान म्हणजे तरी नक्की काय ? पुरुषाच्या कळसबिंदूची पाठ्यपुस्तकातील ही व्याख्या देतो :
माफ करा डॉक्टर, माझा वैद्यकीय क्षेत्राशी फारसा संबंध नाही. आणि आपल्या वैद्यकीय ज्ञानाला आव्हान देण्याचा माझा वकुब नाही. पण तरीही नमूद करावेसे वाटते की ही व्याख्याच म्हणते की Male orgasm is defined as a subjective, perceptual-cognitive event of peak sexual pleasure that in normal conditions coincides with the moment of ejaculation. यातील subjective , perceptual व in normal conditions या शब्दांचा अधिक खोल अर्थ लावण्याची गरज वाटते का ? तसेच शास्त्रीय व्याख्या orgasm वा ejaculation ची असू शकते .. pleasure वा समाधानाची नाही असे मला वाटते. स्खलन = समाधान इतके सुलभ समीकरण असते तर एखादा पुरुष कधी एखाद्या विशिष्ट स्त्री करिता वेडा झाला नसता, किंवा एक लैंगिक जोडीदार असताना दुसर्‍या स्त्रीकडे बघण्याची कधी इच्छाही झाली नसती .. फार काय एकूणातच त्याला स्त्रीची फारशी गरज वाटली नसती... स्खलन तर काय स्वहस्तेही होतेच की !! अवांतर : या निमित्ताने "Don Jon" या प्राईमवरील चित्रपटाचा अल्पपरिचय द्यावासा वाटतो. (स्पॉइलर अ‍ॅलर्ट : मी संपुर्ण कथाच संक्षिप्तपणे लिहित आहे.) adult comedy प्रकारातील या चित्रपटाच्या नायकाला पॉर्न बघण्याचे ( आणि अर्थातच ते बघत हस्तमैथुन करण्याचे) व्यसन आहे. जरी त्याला नियमितपणे वेगवेगळ्या मुलींशी लैंगिक संबंध ठेवायला मिळत असले तरी त्याला जास्त मजा पॉर्न मध्येच येते.. पुढे एक सुंदर मुलगी त्याची प्रेयसी बनते. तरी त्याचे पॉर्नचे व्यसन सुटत नाही. प्रेयसीला एकदा संशय येतो तेव्हा तो आपण कधीच पॉर्न बघत नाही - जे आता चालू होते ते केवळ अपघातानेच असे खोटे सांगून वेळ मारुन नेतो. तरी "पॉर्न बघणे हे कसे वाईट, व्यर्थ व मुर्खपणाचे ई ई वर" सुनावत त्याची प्रेयसी त्याला पुन्हा एकदा बजावते.. मग पुढे सार काही सुरळीत चालू असतं पण नायकाचे व्यसन काही सुटत नाही. पुढे या प्रेयसीला नायकाच्या या व्यसनाबद्दल पुरावाच हाती लागतो. त्याच्याशी भांडून ती त्याला सोडून देते. नायक कसलासा अर्धवेळ कोर्स करत असतो. तिथे एक विधवा- वयाने काहीशी मोठी स्त्री त्याच्याशी जवळीक करायचा प्रयत्न करत असते. आधी तो तिला अक्षरशः हुसकून लावतो पण प्रेयसीशी झालेल्या ब्रेकअप नंतर तिच्याशी संवाद साधतो.. पुढे त्यांच्यात प्रेम वगैरे होत नाही पण मैत्री व जवळीक होते. तो तिला आपल्या व्यसनाबद्दल सांगतो, त्याला खर्‍या आयुष्यातील स्त्रियांसोबतच्या संबंधापेक्षाही पॉर्न जास्त आवडते हे सांगतो तेव्हा ती अजिबात न चिडता त्याला नेमकेपणाने विश्लेषण करुन समजावते की त्याच्याबाबतीत असे का घडत आहे, तो कुठे चुकत आहे. त्यालाही तिचे म्हणणे पटते व तो पॉर्न पाहणे सोडतो आणि तिच्यासोबत संबंधात त्याला मजा वाटू लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार गुरुवार, 03/31/2022 - 13:50 नवीन
शास्त्रीय व्याख्या orgasm वा ejaculation ची असू शकते .. pleasure वा समाधानाची नाही असे मला वाटते.
>>> कळसबिंदू आणि वीर्यस्खलन ह्या एकदम घडणाऱ्या घटना आहेत असे त्या व्याख्येवरून दिसते. माझ्या मते हेच त्या क्षणीचे समाधान देखील आहे. अर्थात समाधान, मानसिक समाधान या शब्दांच्या आपण जेवढे खोलात जाऊ तेवढे ते अधिक गहन होत जातील. तुम्ही वेगळा विचार मांडल्याचा आनंद आहे. थोडीफार मतभिन्नता असूद्या.... त्यामुळेच तर मजा येते. छान चर्चा होते आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी
त
तर्कवादी गुरुवार, 03/31/2022 - 13:57 नवीन
कळसबिंदू आणि वीर्यस्खलन ह्या एकदम घडणाऱ्या घटना आहेत असे त्या व्याख्येवरून दिसते.
सहमत कळसबिंदू = वीर्यस्खलन याबद्दल दुमत नाहीच. मतभिन्नता आहे ती वीर्यस्खलन (किंवा कळसबिंदू ) = समाधान याबद्दल. असो.
थोडीफार मतभिन्नता असूद्या.... त्यामुळेच तर मजा येते. छान चर्चा होते आहे !
सहमत.. मलाही माझा काहीसा वेगळा मुद्दा मांडायला व्यासपीठ मिळाले,. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार गुरुवार, 03/31/2022 - 14:09 नवीन
कळसबिंदूच्या क्षणी परमानंद होतो हे तर सर्वमान्य आहे - निदान असे सर्व लैंगिक साहित्यात दिलेले आहे. सहज म्हणून मी या तीन इंग्लिश शब्दांचे अर्थ कोशात एकत्र बघितले. ते खाली डकवत आहे. तिन्ही शब्द एकमेकात कसे गुंतलेले आहेत हे लक्षात येईल : 1. ecstasy =a feeling or state of great happiness. खूप आनंद झाल्याची भावना किंवा स्थिती; हर्षोत्फुल्लता, परमानंद. 2. pleasure = the feeling of being happy or satisfied. आनंद किंवा समाधानाची भावना; सुख, संतोष. 3. satisfaction = the feeling of pleasure that you have when you have done, got or achieved what you wanted; something that gives you this feeling. तुम्हाला हवे ते मिळाल्यानंतर, प्राप्त झाल्यानंतर किंवा करता आल्यानंतर येणारी सुखाची भावना. सुखसमाधान, संतोष, संतुष्टता; समाधान देणारे काही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी
त
तर्कवादी गुरुवार, 03/31/2022 - 15:06 नवीन
कळसबिंदूच्या क्षणी परमानंद होतो हे तर सर्वमान्य आहे - निदान असे सर्व लैंगिक साहित्यात दिलेले आहे
तसे होणे अपेक्षित आहे.. पण तसे होते का हा प्रश्न.. लैगिंक साहित्यात तर बहुधा स्त्री-पुरुष दोघांनाही त्यावेळी परमानंद होतच असावा. आधीचाच प्रश्न पुन्हा विचारतो. कळसबिंदू = परमानंद असे सहजसोपे समीकरण असेल तर पुरुषाला नेहमीच परमानंद मिळायला हवा (अगदीच काही शारिरिक समस्या नाही असे गृहीत धरल्यास). आणि एखाद्या स्त्रीबद्दल अतीव ओढ, आकर्षण (पॅशन) वाटायचे काहीच कारण नाही.. पुरुषाला कळसबिंदू गाठायला कोणतीही स्त्री चालू शकेल - हस्तमैथुनामुळे तर स्त्रीची ही गरज नाही. माझ्या मते स्त्री व पुरुषातील शारिरिक, मानसिक , भावनिक असे सर्व पातळीवरचे आकर्षण , जवळीक हे जितके तीव्र तितकी या समीकरणाची शक्यता जास्त .. मग त्यावेळची मनस्थिती, शारिरिक स्थिती, आजूबाजूच्या वातावरणातील प्रसन्नता, निवांतपणा ई तात्कालिक गोष्टी अनुकूल असल्यास दोघांनाही परमानंद मिळणे कठीण असू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार गुरुवार, 03/31/2022 - 15:28 नवीन
**तसे होणे अपेक्षित आहे.. पण तसे होते का हा प्रश्न.. >>> माझ्यापुरते तसे दर वेळेला नक्की होते इतके सांगून मी थांबतो. :)) अन्य लोकांचे अनुभव मी नाही सांगू शकणार.:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा