काथ्याकूट

!!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!

Primary tabs

२००३ ते २००६ मी भूगाव पुणे येथे एका लिमिटेड कंपनीत प्रोडक्शन मध्ये इंजिनिअर म्हणून काम करत होतो. पगारवाढीसाठीचे डिस्कशन अगदी तोंडावर येऊन ठेपले होते. सोबत मार्च चे टार्गेट कम्प्लिट करायचे होते. आमची कंपनी ऍक्सेस कंट्रोल सिस्टम्स बनवायची. माझे काम PCB टेस्ट करणे, डिबग करणे, सिस्टिम नीट असेम्बल होतीये की नाही ते पाहणे आणि फायनल टेस्ट करून ती सिस्टिम QA ला देणे, आणि QA मध्ये काही प्रॉब्लेम आला तर तो दुरुस्त करून परत टेस्टिंग करून ती सिस्टिम QA ला देऊन मग फायनल पॅकिंग ला देणे असे होते.
एकदा QA ला दिलेली सिस्टिम बर्न इन टेस्ट मध्ये फेल गेली. आणि एक नाही तर त्या बॅच च्या सगळ्या च फेल जात होत्या. बर्न इन टेस्ट म्हणजे QA मध्ये त्या सगळ्या सिस्टिम्स २४ तास सुरु ठेवायच्या. आणि २४ तासांनी परत त्यांचे पूर्ण टेस्ट QA करत असे आणि मगच त्या पॅकिंग ला जात.
प्रॉब्लेम असा होता की, रात्री लावून गेलेल्या सिस्टिम्स दुसऱ्या दिवशी पहिल्या की त्यांचे LCD डिस्प्ले सातत्याने फ्लिकर होत असत. सिस्टिम रिस्टार्ट केली की नीट चाले. आणि थोड्यावेळाने परत फ्लिकर.
सिस्टिम डिस्पॅचचे टेन्शन होते. कस्टमर हाय प्रोफाइल होता. अशा वेळी RnD ला बोलावले. नेहमीप्रमाणे RnD आणि मी म्हणजे प्रोडक्शन यांच्यात ब्लेम गेम सुरु झाला. काही सिस्टिम RnD ने नेल्या, आणि त्यांच्याकडे बर्न इन ला लावल्या. तिथेही तोच प्रकार. RnD ने ते प्रॉडक्ट हँड ओव्हर करताना जी सॅम्पल सिस्टिम दिलेली ती पण तोच प्रॉब्लेम देत होती. RnD ने "तुम्ही [म्हणजे प्रोडक्शन ने ] ]सॅम्पल सिस्टिम म्यानिप्युलेट केली असणार असा तर्क लावला. [कारण एकदा पूर्वी प्रॉडक्शनने ऐनवेळी सिस्टिम पाठवायला न्हवती म्हणून थेट सॅम्पल सिस्टिम च कस्टमरला दिलेली].
दोन दिवस RnD आणि प्रोडक्शन दोघेही मॅनेजेमेंटच्या शिव्या खात होतो. सकाळी सातला ऑफिसात जात असू आणि रात्री १२ ला घरी येत असू.
का आणि कसे माहित नाही, मला थोडे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये intuition का काय म्हणतात ते आहे [निदान तेव्हा होते]. या सगळ्या घोळात एक गोष्ट RnD आणि आमच्याकडून दुर्लक्षित झाली होती. ते म्हणजे त्या सिस्टिम ज्या पॉवर वर चालत तो बॅटरी बॅकअप. त्या सिस्टिम एका बॅटरी बॅकअप किंवा थोडक्यात SMPS वर चालत असत. ते SMPS आम्ही मुंबईतील अंधेरी येथील एका व्हेंडर कडून घेत होतो. का कोणास ठाऊक मला त्या SMPS वर संशय होता. मी एक आमच्या सिस्टमला [जी फ्लिकर होत होती] लावलेला smps उघडला. त्यात नेहमीसारखे PCB आणि ट्रान्सफॉर्मर्स , कॉम्पोनन्ट होते. त्यात एक पॉवर मॉस्फेट एका हिट सिंक वर होता.
कारण मला माहित नाही, पण मला त्या हिट सिंक वर शंका आली. मी त्याला हात लावला तर तो तापला होता. आता खरेतर हिट सिंक पॉवर मॉस्फेट मधील हिट डिसिपेट करायलाच असतो आणि तो गरम होणे [शास्त्रीय भाषेत बरं] यात विशेष असे काही नाही. पण मी का ते माहित नाही तो हिटसिन्क त्या मॉस्फेट ला ज्या स्क्रूने जोडला होता, त्या स्क्रूला माझ्याकडेचा जाडा स्क्रू ड्रायवर लावला, मला तो हिटसिन्क जरा घट्ट आवळायचा होता.
मी स्क्रू ड्रॉयव्हरने त्याला पिळायला लागलो आणि १० एक सेकंदात सिस्टिम च्या LDC चे फ्लिकर बंद झाले. सुरुवातीस मला काही कळेना, की हा हिटसिन्क लूज असावे म्हणून प्रॉब्लेम येतोय का ... हिट सिंक पुरात नाहीये म्हणून ... आणि मी स्क्रू ड्रायवर लावला की अर्थिंग तरी मिळत असेल किंवा स्क्रूड्रायव्हर हिटसिंक म्हणून काम करत असेल.
मी लगेच माझ्या मॅनेजरला बोलावले आणि माझी थिअरी सांगितली. मग आम्ही स्टोअर मधून आमच्याकडचे काही हिट सिंक आणले आणि चार पाच सिस्टमच्या हिट सिंक्स ना हिट डिसिपेट होईल एक्सट्रा असे लावले. आणि रात्री बर्न इन सुरु करून घरी गेलो. दुसऱ्या दिवशी कंपनीत गेलो आणि सिस्टिम्स अधीरपणे पहिल्या....
...... सगळ्या सिस्टिम्स व्यवस्थित सुरु होत्या. मग RnD ला माझे निरीक्षण सांगीतले. त्यांनी त्या SMPS व्हेंडर ला आमचे निरीक्षण सांगोतले आणि पुण्यात भूगावला बोलावून घेतले. व्हेंडर दुसऱ्या दिवशी आला .... आला तो तयारीनेच .... तीन चार कामगार घेऊनच.... बहुदा त्याने त्याचा अभ्यास करून SMPS चे काय मॉडिफिकेशन करायचे आहे या तयारीनेच आला...
तर रूट कॉज असे होते की: त्या हिट सिंक खाली त्या हिट सिंक ला स्पर्श होणारा एक स्विचिंग ट्रान्सिस्टर होता. हिट सिंक गरम झाले की तो तापायचा आणि SMPS चे आउटपुट वर परिणाम होऊन आमच्या सिस्टिम्स ला फ्लिकर यायचे.
त्या दिवशीच सगळ्या SMPS चे हिट सिंक त्या स्विचिंग ट्रान्सिस्टर पासून जास्त उंचीचे स्क्रू लावून दूर केले... आणि सगळ्या सिस्टिम टकाटक ओके झाल्या.
माझे खूप कौतुक झाले.
काही दिवस गेले आणि पगार वाढ बाबत चर्चा करायचा दिवस आला. माझी अपेक्षा होती की या SMPS च्या भांडवलावर मला कंपनी बाय डिफॉल्ट भरगोस पगारवाढ देईल.
लिमिटेड कंपनीतील माझे असे पहिलेच अप्रेझल डिस्कशन होते. मॅनेजर आणि HR समोर मी बसलो. मॅनेजर ने मला विचारले की कौस्तुभ, कंपनीनें तुला पगारवाढ का द्यावी ? तू असे काय काम केलेस की तुला आहे त्यापेक्षा जास्त पगार द्यावा....
मी उडालोच .... पूर्ण ब्लँक झालो ... म्हणालो ... सर तुम्ही पहिलेच आहे ना की मी SMPS चा प्रॉब्लेम सोडवला ... सिस्टिम्स वेळेवर गेल्या... त्यासाठी मला पगार वाढ हवी ना ....
मॅनेजर : त्यात काय विशेष आहे ? तू इंजिनिअर आहेस, असे प्रॉब्लेम सोडवायलाच तर तुला कंपनी आहे तो पगार देते... तुझ्या जागी दुसरा इंजिनियर असता तरी त्याने हा प्रॉब्लेम सोडवला असताच ना ?
मी: (परत ब्लँक ) .... सर त्यावेळी RnD पण होते त्यांनाही कळाला नाही हा प्रॉब्लेम जो मला कळाला...
मॅनेजर : मग त्यात विशेष काय ? RnD चे ते कामच नाहीये. SMPS हा व्हेंडर कडून येतो.. त्यात RnD चा काय संबंध ......
मी : [पुन्हा हँग] .... सर पण प्रॉब्लेम मी शोधला ना ?
मॅनेजर : कौस्तुभ ... पुन्हा तेच .... तुझे कामच आहे ते ....
मी : आम्ही इतके १२ - १४ तास काम करतो त्याचे काय ?
मॅनेजर: म्हणजे तुमचे टाइम मॅनजमेंट बरोबर नाही .....
मी : [आता भडकलो .... ताड कन टेबलावरून उठलो ... चिडचिड करत म्हणालो ..] ठीक आहे गेली खड्यात पगारवाढ.... आहे त्यात मी भाजी भाकरी खाऊन राहीन .....
मॅनेजर आणि HR आवक झाले .,,,,
पुढे मला किती पगार वाढ मिळाली .... .... हा भाग महत्वाचा नाही .... या घटनेने जी दुनियादारी मला शिकवली ती महत्वाची आहे.

१. तुम्ही कितीही काम करा ....कितीहीवेळा ओव्हरटाईम करा .... पगारवाढीच्या वेळी तुम्ही काम केले आहे हे कंपनीला तुम्हीच सिद्ध करून द्यायचे असते.
२. तुमचा मॅनेजर तुमचा ऑफिस टाइम नंतर कितीही जवळचा मित्र असला, नातेवाईक असला तरी कंपनीत तो तुमच्या फायद्यापेक्षा कंपनीचा फायदा कसा होईल हेच पाहत असतो .... कारण त्याने कंपनीचा फायदा करून दिला आणि ते सिद्ध केले की त्याचा पगार वाढणार असतो.
३. तुम्ही काय काम केले या पेक्षा तुमच्या कामाने कंपनीला किती फायदा झाला तो डिजिटस मध्ये तुम्हाला उत्तमरीत्या तुमच्या अप्रेझल चर्चेत सांगता आला पाहिजे.
४. तुमच्या मॅनेजरला तुम्हाला किती पगार द्यायचा याचे बजेट दिलेले असते. त्या बजेट पेक्षा कमी पगारात तुम्हाला त्याने काम करायला लावले तरच त्याला त्याने तुमच्यावर वाचवलेल्या पैशाचा आकडा दाखवून त्याचा पगार वाढवून घेता येतो. म्हणजे कमीत कमी पगारवाढ देऊन कौस्तुभ नावाच्या हुशार इंजिनियरला मी कसे कंपनीसाठी काम करायला लावले ... वगैरे वगैरे ....
५. तुम्ही कंपनीत तुमचे एक स्थान निर्माण केले पाहिजे ... तुम्ही त्या कंपनीत असणे ही त्या कंपनीची गरज असली पाहिजे ... या उलट माझी नोकरी हीच माझी गरज आहे असे जेव्हा होते ... तेव्हा तुमची किंमत त्या कंपनीत शून्य असते ....
६. जिथे जिथे पैसे हा विषय आहे तिथे हे जग निष्ठुर आहे हे कायम लक्षात ठेवावे.... इथे कोणी कोणाचं नाही ....
७. आपल्या मॅनेजर किंवा टॉप मॅनेजमेंटला आपला मित्र कधीही समजू नका
८. कंपनी ही तिच्या स्टेक होल्डर्सचा फायदा करायला स्थापन झालेली आहे, तुमचा पगार वाढवायला नाही ... स्टेकहोल्डरला होणाऱ्या फायद्यात तुमचा काही महत्वाचा वाटा आहे हे सिद्ध केलेत तरच तुमचा पगार वाढेल.
९. पगार वाढीचा बेल कर्व्ह काय आहे त्याचा अभ्यास करा ...
१०. कंपनीला तिचा फायदा व्हायला लागणारे कौशल्ये कायम विकसित करत राहा ....
११. तुम्ही तुमच्यावर झालेल्या अन्याया विरुद्ध सात्विक संताप करून काहीही उपयोग नसतो ... उलट असे वागणारे नोकरच कंपनीला हवे असतात .... काही दिवस चीडचीड करतात .... धुसपूस करतात ... आणि पुन्हा कामाला लागतात. हे नोकर पगारापेक्षा कौतुकाचे भुकेले असतात. ...
तेव्हा तुमच्या पगारावर प्रेम करा .... तुमच्या होणाऱ्या कौतुकावर नाही ...

कौस्तुभ पोंक्षे
८००७६०५०८२

लेखात मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याशी सहमत.

अनेक वर्षे ईंडिविज्युअल काँट्रिब्युटर म्हणुन टेक्निकल काम करुन आणि नंतर काही वर्षापासुन टीम लीड करत असल्याने टेबलाच्या दोन्ही बाजू बघितल्या आहेत. पण थोड्याफार फरकाने मॅनेजर जे माझ्या अप्रेझल डिस्कशन मध्ये बोलतो तेच मुद्दे मी खालच्या लोकांचे अप्रेजल करताना बोलतो.

थोडक्यात तोंडावर "गेलास उडत" न सांगता तोंडाला पाने पुसायचा प्रकार म्हणजे ही डिस्कशन्स. तू मारल्या सारखे कर, मी ओरडल्यासारखे करतो, मग दोघे मिळून चहा (किवा दारू) प्यायला जाउ आणि पुन्हा कामाला लागू असा प्रकार.

त्यात सध्याच्या वातावरणात काम करण्यापेक्षा काम करतोय हे दाखवणे जास्त महत्वाचे असल्याने मोठ्मोठी मेल्स करणे, रात्री बेरात्री किवा विकांताला काम करणे, याचबरोबर क्लायंटबरोबर रिलेशन्शिप कशी वाढवली, प्रॉफिटेबिलिटी किती वाढवली, ऑटोमेशन किती केले, कॉस्ट सेविंग किती केले, टीममध्ये क्रॉस स्किलिंग किती केले , दुसर्‍या प्रोजेक्टला (डिलिवरी युनिटला) काय मदत केली, स्वतःची व्हिजिबिलिटी किती वाढवली अशा हजार भानगडी किवा क्रायटेरिआ असतात. ईतके करुनही नारळ द्यायची वेळ आल्यास कोणाचा नंबर लागेल सांगता येत नाही. विशेष्तः कॅप्टीव्ह किवा प्रॉडक्ट कंपनी मध्ये (अगदी गूगलमध्येही )तुमचे युनिट प्रॉफिटेबल नसेल तर रातोरात तुमचा मेल आय डी ब्लॉक होउ शकतो आणि "आउट ऑफ ऑफिस" चा मेसेज यायला लागतो आणि पर्सनल मेलवर फुल अँड फायनल सेटल्मेंट येते. नो सेंटीमेंट्स..

तेव्हा पगारावर प्रेम करा , कंपनीवर नको, हे धोरण उत्तम.

निनाद

कंपनीसाठी तुम्ही तुमचे रक्त-आटवून काम केले तरी, ज्या दिवशी तुम्ही राजीनामा द्याल किंवा तुम्हाला काढले जाईल, त्या दिवशी तुमच्या जागी दुसरी व्यक्ती २४ तासांत हजर असेल. त्यामुळे कामात फालतूची इमोशनल गुंतवणूक करू नका. तुमची खरी गुंतवणूक तुमच्या कुटुंबात आणि छंदांमध्ये असावी.

आपण जुना फोन बॅटरी बॅकअप कमी झाला की बदलतो. कॉर्पोरेटमध्ये तसेच असते. तुम्ही गेल्या १० वर्षात काय केले यापेक्षा आज तुम्ही काय देऊ शकता? याला महत्त्व असते. तुमची जुनी पुण्याई तुम्हाला नवीन ले ऑफ पासून वाचवू शकत नाही. उपयोगिता संपली की व्हॅल्यू संपते!

तुमच्या कंपनीतील ओळखींपेक्षा कंपनी बाहेरील ओळखी जास्ता महत्त्वाच्या आहेत. जेव्हा कंपनी नारळ द्यायची वेळ आणते तेव्हा तुमची बाहेरची नेटवर्किंग तुम्हाला दुसरी नोकरी मिळवून दे ऊ शकते. आपल्या कॉंपिटिटर सारख्या कंपन्यांशोधत रहा. तेथे नेटवर्किंग करत रहा.

जो प्रत्येक कामाला हो म्हणतो, त्याला सर्वात जास्त राबवले जाते आणि सर्वात कमी मान दिला जातो. कधीकधी नाही म्हणणे स्पष्टपणे सांगणे तुमची किंमत वाढवते. अवेलेबिलिटी जितकी कमी, तितकी तुमची डिमांड जास्त राहते भाऊ. कंपनी तुम्हाला 'स्टार एम्प्लॉई' किंवा 'रॉकस्टार' म्हणते, कारण शब्द फुकट असतात. पगाराचा आकडा वाढवणे महत्त्वचे हे नेहमी लक्षात ठेवा!

वरिष्ठांनी दिलेले तोंडी आदेश कधीही पाळू नका. त्यातही ते रिस्की असतील तर As discussed over call... if you do not agree with this please respond to this email correcting me असा ईमेल टाकून प्रत्येक गोष्टीचा लेखी पुरावा ठेवा. उद्या काही चुकले तर बळीचा बकरा नेहमी खालचा असतो, मॅनेजर नाही.

तुम्हाला राजकारण आवडत नसेल तरी चालेल, पण ते समजावून घेणे अनिवार्य आहे. कोण कोणाच्या जवळ आहे, निर्णय घेण्याची सत्ता कोणाकडे आहे, हे माहित असणे फार आवश्यक! सदैव सावध राहा. आपल्या प्रोजेच्त विषयी भरभरून बोलायला शिका. त्याला कसे ड्रमॅटिक बनवता येईल याचा विचार करा. तसे पॉईंट्स अभ्यासून ठेवा. ते सहजपणे बोलायची प्रॅक्टिस करत रहा.

सगळ्यात महत्त्वाचे नोकरी लागल्या दिवसापासूनच शेवटच्या दिवसाची तयारी ठेवा!

विजुभाऊ

जो प्रत्येक कामाला हो म्हणतो, त्याला सर्वात जास्त राबवले जाते आणि सर्वात कमी मान दिला जातो.

अगदी बरोबर

सुबोध खरे

लेख आणि त्याला आलेले प्रतिसाद हे परखड १०० % सत्य आहेत आणि नोकरीला लागणाऱ्या किंवा लागलेल्या प्रत्येकाने नक्कीच लक्षात घ्यावेत असे आहेत.

मी हिरानंदानी रुग्णालयात विभागप्रमुख होतो आणि मला सांगितले गेले कि ३५ टक्के लोकांना १० % , ३५ टक्के लोकांना २० % आणि ३० % लोकांना ३० % पगारवाढ सुचवा. मी त्याप्रमाणे आढावा घेऊन माझ्या हाताखालील तंत्रज्ञाना पगारवाढ सुचवली.

प्रत्यक्ष वैद्यकीय संचालकांचे चेले चमचे होते त्यांना ६० % पर्यंत पगारवाढ दिली.

या बद्दल माझ्यात वरिष्ठ तंत्रज्ञाने सांगितले कि सर तेथे ६० % पगारवाढ दिली गेली आहे पण तुम्ही तर आम्हाला ३० % च दिलीत.

मला याविरुद्ध तक्रार करायची आहे. मी त्याला म्हणालो जरूर तक्रार कर.मला जे सांगितलंय त्याप्रमाणे मी पगार वाढ सुचवली आहे.

मी यासाठी एच आर प्रमुखाला विचारले त्यावर तो म्हणाला तुमचा कोणी तंत्रज्ञ "आतील बातमी" द्यायला तयार असेल तर त्याला पगारवाढ देता येईल.
मी त्याला साफ झाडले आणि सांगितले असले धंदे मी कधी केले नाहीत आणि असं मागून पाठीत खंजीर खुपसणे मी कधी लष्करात केलेलं नाही. तुम्हाला असले धंदे करायचे असतील तर तुम्हीच माझ्या विभागात कुणाला संपर्क साधायचा असेल तर साधा.
मला पाच पैशाचा फरक पडत नाही.
हे सर्व बोलणे मी परत येऊन माझ्या तंत्रज्ञान सांगितले.

या नंतर माझ्या तंत्रज्ञाने लेखी तक्रार केली.
यावर सर्व विभागप्रमुखांची बैठक झाली तेंव्हा मी वैद्यकीय संचालकांना स्पष्ट म्हणालो तुम्ही जास्तीत जास्त ३० % पगारवाढीचा शिफारस केलीत पण स्वतःच्या चेले चमचे होते त्यांना ६० % पर्यंत पगारवाढ दिली.त्यावर ते असं काही नाही इत्यादि सारवासारव करायला लागले.

मी सर्व विभागप्रमुखां समोर त्यांना स्पष्टपणे म्हणालो तुम्ही खोटे बोलता आहात. जे आहे ते मी तोंडावर बोलायला लाजत नाही.
यावर हृदयरोग विभागाच्या प्रामुख्याने मला दुजोरा दिला.

यावर सी इ ओ ने बैठक आटपती घेतली.
मी केलेलं भांडण सर्व रुग्णालयातील तंत्रज्ञांमध्ये वाऱ्यासारखे पसरले कि डॉ खरे वैद्यकीय संचालकांना तोंडावर खोटारडे म्हणाले.

अर्थात मला नोकरी जायची मुळीच भीती नव्हती. कारण माझ्याकडे सज्जड एम डी पदवी आणि १८ वर्षांचा अनुभव होता त्यामुळे हे नाही तर दुसऱ्या रुग्णालयात सहज नोकरी मिळू शकली असती.

नंतर सर्व तंत्रज्ञान २०-३० आणि ४० % अशी पगारवाढ मिळाली.

अशा अनेक अनुभवातून व्यवस्थापनावर किती विश्वास ठेवायचा आणि कॉर्पोरेट जगतात लोक किती सहज थुंकी या बोटावरची त्या बोटावर करतात हे समजून आले.

असले अनुभव लष्करात मला आलेले नव्हते.

पुढे मी दोन वर्षे एशियन हार्ट रुग्णालयात नोकरी करून कॉर्पोरेट जगताला कायमचा रामराम ठोकला आणि स्वतःचा व्यवसाय सुरु केला.

स्वधर्म

आपण ज्या खाजगी संस्थेत काम करत होता त्याबद्दल आश्चर्य वाटले.

आय टी कंपन्यांमध्ये अगदी प्रवेश पातळीला ८ ते १०% पगारवाढ मिळत असे. वरीष्ठ पदावर (लेख आय टी मधल्या पन्नाशीतल्या पिढीवर आहे) अशा प्रकारची पगारवाढ गेली अनेक वर्षे अशक्य आहे, एवढेच नोंदवतो. कंपनी सोडून दुसर्‍या कंपनीत गेलात तरच २०% च्या वर पगारवाढ मिळू शकते. आहे त्या कंपनीत वरीष्ठ पदावर अशी पगारवाढ कदाचित फक्त स्टार्ट अप कंपनीतच मिळू शकेल. प्रस्थापित मोठया कंपनीत हे शक्य आहे असे वाटत नाही.

खटपट्या

सध्या च्या आयटी मध्ये जी काही बार्गेनींग करायची असते ती नेमणुकीच्या वेळेलाच करायची असते. तुमची कींमत तुम्हालाच ठरवायची असते. नंतर येणार्‍या पगारवाढ आणि बाकीच्या गोष्टी बोनस असतात.
नसेल परवडत तर दुसरी कंपनी शोधावी आणि इकडे राम राम करावा.

गणेशा

प्रिय कौस्तुभ...

तुम्ही लिहिलेले १००% खरे आहे, आणि प्रत्येक मुद्द्यांशी सहमत.. (बाकीचे रिप्लाय न वाचता लिहितोय, कारण त्यांच्या प्रमाणेच भाषा येऊ नये म्हणून )
विशेष करून मुद्दा १० नायलाजाने असू द्या पण करावाच लागतो आहे हि माझी सत्य परिस्थिती आहे.. आणखीन काय बोलणार...

आजच एका मित्राशी बोलणं झालं. मी जिममध्ये असताना leads call घेतला आणि त्याचा फोन आला. त्याला नवल वाटलं.
मी त्याला सरळ सांगितलं
समजा “मला कंपनी २ लाख पगार देते. त्या बदल्यात मी जेवढं काम येतं तेवढंच प्रामाणिकपणे करतो. जर मला stress घेऊन २.५ लाख कमवायचे असतील, तर ते मला नको आहेत. शांतपणे २ लाख मिळत असतील, तर ते माझ्यासाठी पुरे आहेत.”

हे काहींना चुकीचं वाटेल, पण यामागे कारणं आहेत. सगळी सांगता येणार नाहीत, पण थोडक्यात सांगतो.
१️. मागील ४ वर्षांचा प्रवास
पहिल्यांदा मी Spark शिकलो — जे माझ्या field च्या आसपासही नव्हतं. O2 client साठी big data solution तयार केला, जो machine learning algorithm साठी योग्य प्रकारे चालला. Junior resource ला train केलं — ते मला नेहमी आवडतं. नशिबाने चांगली पगारवाढ मिळाली.
पण Spark काम संपलं आणि database येतं म्हणून पुन्हा ETL / processing वर टाकलं. तिथेही उत्कृष्ट काम केलं. O2 – Virgin Media merging पूर्ण केल्यावर promotion मिळाली.
पण promotion नंतर काय?
PMO role दिला. Management विस्कळीत होतं आणि “तू capable आहेस, म्हणून हे कर” असा force.
खूप भांडण करून तो project सोडला. Value नव्हती.

२️. AI Architecture role
‘AI Architecture and Solution Designer’ role मिळाला. काम करताना लक्षात आलं — AI काही जादू नाही. data वरच सगळं चालतं. मला वयक्तिक रित्या AI अजिबात आवडले नाही, त्यात काम करायला तर नाहीच नाही.. त्यात माझ्या analytical skills ला अजिबात प्राधान्य नव्हते (हा वादाचा विषय असेल पण वयक्तिक माझे मत हेच आहे)
मी काम प्रामाणिकपणे केलं, पण team size कमी करताना माझीच निवड झाली. हे field मध्ये चालतंच.

३️. पुन्हा मूळ field मध्ये
१४ वर्ष database संबंधि काम केल्यावर वारंवार role बदलणं योग्य नाही असं ठरवलं. लोक शिकायला वेळ देत नाहीत, पण अपेक्षा मात्र खूप असतात.
Standard Chartered project वर Data Architect / Data Modeler role घेतला. अतिशय कठीण काम. सलग १२–१५ तास. Manager आणि जुनी team Singapore–Malaysia ला. India team वर विश्वास नाही. मदत त्यांनी केली नाही. कारण india team त्यांना replace करायला घेतली होती.
मी जुनी System tester कडून समजून घेतलं. एक वर्ष फार कठीण गेलं.
Role off घ्यायचा प्रयत्न केला तरी द्यायला तयार नव्हते.
पण घेतला.. खुप्प वरच्या लेवल चे पॉलिटिक्स होते येथे..

आणि त्याच वेळेस माझ्या सर्वात पहिल्या project मध्ये
Azure migration (माझ्यासाठी नवीन skill) आणि existing database/dashboard handling साठी role होता आणि त्यांना त्यांचा माहिती असलेला relaible माणुस हवा होता, आणि मी scb ला वैतागलेलो Politics टाळण्यासाठी शेवटी वर बोलून जुनी team join केली.

आता एकच ठरवलं आहे -
No tension. माझ्या पद्धतीने काम करणार.
IT मला तसं फारसं आवडत नाहीच. आणि आता जास्त वर्ष काढायची इच्छा नाही. आपले set करतोय मी स्वतःच स्वतः.. बस आता

हा शेवटचा project असेल IT मधला असं ठामपणे वाटतंय.
बास झालं.

-
गणेशा

मी एखादी कंपनी मला स्टॉक्स देत असेल तर मी अवश्य घेतो कारण कंपनीचा मी मालक झालो की मला माझा ओवरटाइम जस्टिफाई करता येतो. ९९ टक्के वेळेस त्या स्टॉक्सचा मला दहा रुपयाचा देखील फायदा होत नाही हा भाग वेगळा.

परंतु कंपनी जॉइन करताना कंपनीचे स्टॉक्स जरूर विचारावेत. शक्यतो प्रोडक्ट कंपन्या जॉइन करायच्या जेणेकरून आपले आपले डेडलाइन्स, आपले आपले स्टॅंडर्ड असे सगळे. पॉलिटिक्स कमी. जिथे पॉलिटिक्स आहे तिथे खेळायला लाजू नये. ते पार्ट ऑफ द पार्सल असते. एकदा ते स्वीकारले की आपण खेळत सुटावे. आपण नाही केले म्हणजे काही आपले फारसे भले होणारे नसते. एखाद्याची प्रकृती जर तशी नसेल तर त्यांने असे कामच करू नये. कारण चार लोक एकत्र आलेत आणि पॉलिटिक्स न खेळता त्यांनी काम केले आहे असे क्वचित घडत असते.

>> १. तुम्ही कितीही काम करा ....कितीहीवेळा ओव्हरटाईम करा .... पगारवाढीच्या वेळी तुम्ही काम केले आहे हे कंपनीला तुम्हीच सिद्ध करून द्यायचे असते. <<

मी एका पोरीचा अनुभव वाचला होता.

एखादे काम केले तर त्याचे अत्यंत विस्तृत डॉक्यूमेंटेशन तयार करून ठेवत असे. एखादे काम असे आपल्या डोमेन बाहेर भल्यासाठी केले तर ते जगाला किंवा योग्य स्टेक होल्डर ला सांगायला लाजू नये. सगळ्यांना सगळे लक्षात राहत नसते त्यामुळे आपण त्यांना आपण हे हे करत आहोत असे सतत रिमाइंडर देत राहावे. तर ही मुलगी अशा कामांचे डॉक्यूमेंटेशन करून इंटरनल ब्लॉग्स किंवा तशा गोष्टी करत असे आणि आणि कुणीही ना विचारता आपल्या मैनेजर किंवा इतर प्रोजेक्ट स्टेक होल्डरना पाठवत असे त्यांच्या अभिप्रायासाठी. तिला अभिप्रायांची काही घंटा पडलेली नसायची कारण तिला माहीत होते की कुणाकडे वेळच नसतो तेव्हडा. मात्र ओवर द टॉप ना करता ती असे रिमाइंडर देत राहायची.

त्यापुढची स्टेप म्हणजे ती स्वतःहोऊन आपल्या स्किप बरोबर (म्हणजे आपल्या बॉस चा बॉस) एक वन टू वन मीटिंग करत असे. आणि याच गोष्टी तिला परत सांगत असे. त्या मीटिंगला ती स्वतः होऊनच इम्प्रूवमेंट स्कोप मिटीग असे म्हणायची.

या सगळ्याचा परिणाम असा व्हायचा की तेवढेच काम करून तिची वाहवा मात्र सगळीकडे व्हायची. यात केले एक आणि सांगितले चार हा प्रकार नव्हता तर केले एक आणि सतत सांगत राहिले अर्धे अर्धे असा काहीसा प्रकार होता.

सुबोध खरे

काही वेळेस लघळ बॉस असेल चान्गल्या संस्थांमध्ये अशा पोरींना फार तर एखादे प्रमोशन मिळते आणि नंतर लोकांना लक्षात येते कि हा पोकळ वासा आहे.

वाहवा करणारे तोंडपुजे लोक तर चिकार असतात विशेषतः स्रियांच्या बाबतीत.

बाकी इतर ठिकाणी स्त्री असल्याचा फायदा उठवणाऱ्या पण बऱ्याच असतात

सोत्रि

डॉक,

वर उदाहरणात असलेल्या मुलीने ज्या अ‍ॅक्शन्स घेतल्या त्याला कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी म्हणतात आणि त्या खालील पैकी काही असू शकतात.

  • Strategic Communication & Personal Branding
  • Relationship and Network Building
  • Visibility in Hybrid/Remote Environments

तुमचा प्रतिसाद खुपच ढोबळ (उथळ), generalized आणि prejudice वाटतो आहे, फक्त पुरुषच बॉस असतात असं गृहीत धरून दिलेला. एकंदरीत टोन, त्या मुलीबद्दल काहीही डाटा पॉईंट्स नसताना, जजमेंटल झालेला आहे.

- (कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीस्ट) सोकाजी

सुबोध खरे

स्ट्रॅटेजी म्हणा की काहीही सोफिस्तिकेटेड नाव म्हणा!

हा सगळा चमको गिरी चा प्रकार आहे.

सतत रिमाईंडर देणे, वारंवार बॉस च्या बॉस बरोबर मिटिंग करणे, एखादे काम केले तर त्याचे अत्यंत विस्तृत डॉक्यूमेंटेशन तयार करून ठेवणे याला काय म्हणायचे?

मी स्त्राटेजिस्ट नाही किंवा सॉफीस्तिकेटेड नाही पण भंपक गोष्टीला भंपक म्हणण्याची हिम्मत ठेवणारा आहे!

*केवळ* असल्या चमको गिरी मुळे एखादी मुलगी कॉर्पोरेट जगात खूप वर चढू शकेल याच्यावर मी मुळीच विश्वास ठेवणार नाही!

कॉर्पोरेट जगातील उच्च पदस्थ इतके मूर्ख नक्कीच नाहीत.

बाकी मी काय आहे हे मला नक्कीच माहिती आहे!
त्याला दुसर्याकडून दुजोरा किंवा समर्थन मिळवण्याची मला मुळीच गरज नाही!

संबंधित मुलगी ही उथळ पाण्याला खळखळाट फार अशा प्रकारातली नव्हती.
किंबहुना हुशार कष्टाळू अशा वृत्तीची होती.

तिचा मुद्दा असा होता की आपण केलेल्या सगळ्याच गोष्टी इतरांच्या नजरेत येत नाहीत. नाहीतर तुम्हला पूर्ण सोशियोपॅथ जिनियस माणूस असावे लागते. उरलेल्या चांगल्या लोकांनी; चमकोगिरी करून पुढे जाणार्‍या मेडियॉकर लोकांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा या दोन तीन साध्या गोष्टी केल्या तर या चमको लोकांना मागे टाकता येईल असा तिचा होरा होता.

मी प्रतिसादात म्हणालो आहे केले एक आणि सांगितले चार असे न करता केले एक आणि सांगायचे एकच मात्र ते कन्सिस्टंटली. बरेच लोक करतात एक मात्र पाव देखील सांगत नाहीत आणि मग मागे पडतात.

मला ती पोस्ट शोधावी लागेल.

सोत्रि

सतत रिमाईंडर देणे, वारंवार बॉस च्या बॉस बरोबर मिटिंग करणे, एखादे काम केले तर त्याचे अत्यंत विस्तृत डॉक्यूमेंटेशन तयार करून ठेवणे याला काय म्हणायचे?

😀 😀 😀

त्याला नेमकं काय म्हणायचे हेच तर माझ्या प्रतिसादात सांगितलं हौतं.

असो, तुमचं चालू द्या!

- (कॅार्पोरेट स्ट्रॅटेजीस्ट) सोकाजी

सुबोध खरे

जर बॉसच्या बॉसला सतत भेटत असेल तर बॉसला ते कधीही आवडणार नाही.

(इथे मी लष्कराबाबत बोलत नाही कारण एक तर बॉसचा बॉस तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावणारच नाही आणि तसे झाले तरी बोस तुम्हाला लेखी ताकीद देईल).

पण कॉर्पोरेट जगात सुद्धा सतत आपल्या वरिष्ठाला भेटणे हे कोणत्याच बॉसला नक्कीच पचनी पडणार नाही आणि याचा परिणाम १०० % उलट होईल.

राहिली गोष्ट "अशा कामांचे डॉक्यूमेंटेशन करून इंटरनल ब्लॉग्स किंवा तशा गोष्टी करत असे आणि आणि कुणीही ना विचारता आपल्या मैनेजर किंवा इतर प्रोजेक्ट स्टेक होल्डरना पाठवत असे त्यांच्या अभिप्रायासाठी" ती असे रिमाइंडर देत राहायची.

हे सर्व लोक तिचे काम पाहत नसले/अभिप्राय देत नसले तरी चमकोगिरी केलेली लोकांच्या सहज लक्षात येते. त्याच्या कडे लोक दुर्लक्ष करत असले तरी अशी व्यक्ती आपल्या टीम मध्ये नको याची सर्व लोक खूणगाठ बांधून ठेवतात.

मग तुम्ही त्याला

Strategic Communication & Personal Branding
Relationship and Network Building
Visibility in Hybrid/Remote Environments

असली बोजड लिंकड इन मधली नावे द्या नाहीतर काहीही म्हणा.

जसं सध्या समोश्याचे वर्णन कसे केले जाते ते पहा "a delicate envelope of crispy, flaky pastry crafted to perfection. Within this deep-fried jewel lies a hidden treasure trove: a steaming, fragrant heart of spiced potatoes, peas, and tenderly cooked vegetables, all perfumed with a whisper of ginger, green chili, and aromatic spices.
Often accompanied by vibrant, zesty chutneys that dance on the palate, this iconic, savory pastry embodies a rich, sensory journey that transcends mere hunger. Whether enjoyed during festive celebrations or as a stolen moment of bliss on a bustling street, the samosa is more than a snack—it is a warm, flavorful embrace of Indian heritage and culinary artistry."

सोत्रि

डॉक,

कॉर्पोरेट जगात सुद्धा सतत आपल्या वरिष्ठाला भेटणे हे कोणत्याच बॉसला नक्कीच पचनी पडणार नाही आणि याचा परिणाम १०० % उलट होईल.

हे तुमचं गृहीतक आहे आणि त्या वैयक्तिक गृहीतकावर काही उपाय नाही.

कॉर्पोरेट जगात मेट्रिक्स मॅनेजमेंट, क्लायंट साईट प्लेसमेंट आणि रेपोर्टींग, मल्टीपल स्टेकहोल्डेर्स, अशा अनेक लेयर्स असतात. लष्करासारखं फक्त फ्लॅट टॉप-डाउन स्ट्रक्चर नसतं. ह्या सगळ्या कॉम्प्लेक्सीटीज ऑफशोअरींग मेन स्ट्रीम झाल्यापासून आहेत. त्यामुळे 'स्कीप लेवल' मिटींग्स कॉमन आहेत. त्या तुम्हाला माहिती नसणं शक्य आहे.

असली बोजड लिंकड इन

हे ही गृहीतक आहे आणि त्या वैयक्तिक गृहीतकावर काही उपाय नाही. तुम्हाला मॅनेजमेंट थियरीज माहिती नसणं शक्य आहे.

त्यामुळे फक्त गृहीतकांवर आधारलेले प्रतिसाद खुपदा ढोबळ (उथळ), generalized आणि prejudice वाटतात.

- (जे माहिती नाही ते शिकण्यास उत्सुक असलेला) सोकाजी

सुबोध खरे

मी स्त्राटेजिस्ट नाही किंवा सॉफीस्तिकेटेड नाही पण भंपक गोष्टीला भंपक म्हणण्याची हिम्मत ठेवणारा आहे!

सुबोध खरे

कॉर्पोरेट जगात मेट्रिक्स मॅनेजमेंट, क्लायंट साईट प्लेसमेंट आणि रेपोर्टींग, मल्टीपल स्टेकहोल्डेर्स, अशा अनेक लेयर्स असतात. लष्करासारखं फक्त फ्लॅट टॉप-डाउन स्ट्रक्चर नसतं. ह्या सगळ्या कॉम्प्लेक्सीटीज ऑफशोअरींग मेन स्ट्रीम झाल्यापासून आहेत. त्यामुळे 'स्कीप लेवल' मिटींग्स कॉमन आहेत.

असली जडजंबाल भाषा वापरून काहीही होत नाही

जाता जाता- मी केवळ लष्करात काम केलेलं नाही.

कॉर्पोरेट जगात व्यवस्थापन क्षेत्रात चार वर्षे उच्च पदस्थ विभागप्रमुख म्हणून काम करून काही डझन माणसांचे CR लिहून त्यांना बढती देणारा होतो.

पण ते असोच

सोत्रि

असली जडजंबाल भाषा वापरून काहीही होत नाही

ठीक! तुम्हाला माहिती नसलेलं जडजंबाल वाटून काही कळणार नाही हे मान्य. सो इत्यलम!

कॉर्पोरेट जगात व्यवस्थापन क्षेत्रात चार वर्षे उच्च पदस्थ विभागप्रमुख म्हणून काम करून काही डझन माणसांचे CR लिहून त्यांना बढती देणारा होतो.

त्या मुलीने स्वतःच स्वतः मार्केटींग करणं जर भंपकपणा (चमकोगिरी) तर हे असं स्वतःच स्वतः मार्केटींग करणं हा ही भंपकपणाच (चमकोगिरी)!

पण तेही असोच!

- (ऑब्जेक्टीव्ह) सोकाजी

त्या मुलीबाबत अगदी याउलट घडले. तिला प्रोमोशन्स तर मिळालेच. त्याहून मोठे काम तिने अनेक स्त्रियांनी देखील आपले अन डॉक्युमेंटेड एफर्ट्स कोणत्याही परताव्याशिवाय फक्त वाया जाऊ नयेत आणि त्याचा योग्य मोबदला मिळावा यासाठी हे ब्रॅग डॉक्युमेंट मेंटेन करण्याची कल्पना उचलून धरली.

>> कॉर्पोरेट जगात सुद्धा सतत आपल्या वरिष्ठाला भेटणे हे कोणत्याच बॉसला नक्कीच पचनी पडणार नाही आणि याचा परिणाम १०० % उलट होईल. <<

असे आता होत नसते. अनेक ठिकाणी उतरंड असते तीचा स्कोप मर्यादित असतो. बहुतेक नव्या ठिकाणी फ्लॅट उतरंड असावी असा प्रयत्न केला जातो. आमच्या इथे तर बॉसचा बॉस सोडाच,अगदी सीइओ ला सुद्धा त्याला वेळ असेल तर त्याला थेट तुम्ही गाठू शकता. कुणीही कुणाला प्रश्न विचारायला बाधा आणत नाही. आम्ही आमच्या स्कीपशी अगदी मोकळेपणाने आणि सतत बोलत असतो आमचा मॅनेजर तर याला अगदी उत्तेजन देतात. सगळीकडे ओपन डोअर पॉलिसी असतात.

जुनाट ठिकाणी किंबहुना जपान सारख्या ठिकाणी किंवा भारतातल्या अनेक विच सदृश्य कंपन्यांमधेच जुनाट विचारसरण्या असतात.

तुमचा मॅनेजर जर पक्षपाती नसेल तर अशी हायरार्की स्किप करण्याची वेळ येत नाही परुंतु मॅनेजर जर पक्षपात करणारा असेल तर असे प्रकार करणे आवश्यक ठरते.कित्येक वेळेला मॅनेजर आपल्या सबऑर्डिनेट ने केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतात अशा वेळेला काही स्मार्टनेस शोधुन आपले काम वरिष्ठांच्या नजरेत आणणे ही गरज ठरते. माझा एका कंपनीतल्या मॅनजरने स्वतः असे प्रकार करुन स्वतःसाठी स्टॉक ऑप्शन्,प्रमोशन वगैरे मिळवले पण हीच गोष्ट त्याच्या सबऑर्डिनेट ने करण्याचा प्रयत्न केला असता त्याला ते आवडले नाही. कालांतराने टीममधले जवळजवळ सगळेच जण टीम/कंपनी सोडुन गेले.

कपिलमुनी

मला पुढे पुढे करायला आवडत नाही.

मला चाटूगिरी चमचा आवडत नाही.

मी स्वाभिमानी आहे.

माझा काम बोलते.

मी तोंडावर बोलतो / स्पष्टवक्ता वगैरे

---------
मला एखादा माणूस माझे क्लायंट , डिपार्टमेंट सांभाळायला हवा असेल तर हे गुण अवगुण ठरतात.

डिप्लोमॅटिक असावे लागते.

करियरचा सुरुवातीला मी पण असाच फटकळ होतो. ४ लोकांचे काम मी करतोय . कामात चोख आहे. पण पुढे अनुभवने कळले, लाळघोटेपणा न करता स्वतःचे काम मांडणे, वरिष्ठांच्या सोबत उत्तम रिलेशन बनवणं वगैरे करता येते

विजुभाऊ

दक्षीण अफ्रिकेत असताना माझा मॅनेजर तेलगु देशीय भारतीय होता. तो संपूर्ण अफ्रिकेचे प्रोजेक्ट्स पहायचा. आणि मी फक्त दक्षीण अफ्रिकेचा.
अफ्रिकेतल्या दुसर्‍या देशातल्या एका प्रोजेक्ट चे पुरते बारा वाजले होते. त्या प्रोजेक्ट वर काम करणारे सगळे तेलगु देशीय होते.
एक दिवस मला मॅनेजरचा फोन आला आणि भेटायचे आहे असे म्हणाला.
मी त्याला घरीच बोलावले. घरी आल्यावर तो म्हणाला की या वर्षी अपरेजल मधे २० % रीसोर्स कमी करायचे टारगेट दिलेले आहे.
तुझ्या प्रोजेक्ट चे काम चांगले आहे पण माझा नाईलाज आहे. टारगेट अचीव्ह नाही केले तर अवघड होईल. मी तुला कमी करतोय. तु रीझाईन दे. मी तुला केपटाऊन मधल्या एका प्रोजेक्ट वर काँट्रॅक्ट वर घेतो. तुझे नुकसान होऊ देणार नाही.
माझ्या साठी ही खूपच धक्कादायक गोष्ट होती. मी एका दिवसाचा वेळ मागून घेतला. मॅनेजरला म्हणालो की हा माझ्या साठी अवघड निर्णय आहे. मला घरी कल्पना द्यायला हवी. आणि माझ्याकडे वर्क व्हिसा देखील नाहिय्ये.मॅनेजर म्हणाला चिंता करू नकोस . ते मी उपलब्ध करून देईन.
दुसर्‍या दिवशी सकाळी एच आर चा फोन आला. एच आर ने मला दरडावून रीझाइन करायचा आदेश दिला. नाहीतर टर्मिनेट करू असे सांगितले. मी कारण विचारले तर उत्तर दिले की तुझ्या बद्दलचे रीपोर्ट चांगले नाहियेत.
मी कंपनीच्या एका सिनियर व्हीपी ला फोन केला. तो म्हणाला की माझ्याकडे दोनच मिनिटे आहेत. तेवढ्यात बोल
मी फोनवर त्या वाट लागलेल्या प्रोजेक्ट चा उल्लेख न करता पूर्ण परिस्थिती सांगितली. माझे काम कसे व्यवस्थित आहे ते सांगितले. आणि काहिही कारणाशिवाय मला राजिनामा देण्याचा आदेश दिला आहे असे सांगितले. वरिष्ठा ने माझे बोलणे ऐकून घेतले. एकही प्रश्न विचारला नाही.
त्या बद्दल विचारल्यावर तो म्हणाला की संगितल्यानुसार मी तुझे ऐकून घेतले आहे. आता मी त्या मॅनेजरला विचारेन.
पुढच्या दोन तासानंतर मला त्या मॅनेजरचा फोन आला आणि वरिष्ठाकडे तक्रार का केली असे विचारले.
मी त्याला , मी काहीच कमीत केले नव्हते तरीही एच आर ने मला रीझाइन करायला कशासाठी सांगितले असे विचारले . त्यावर तो म्हणाला की मी एच आर ला टेन्टेटिव्ह असे सांगितले होते. माणसे कमी करणे हे एच आर चे ही टारागेट होते. त्याला ते अचिव्ह करायचे होते.
वरिष्ठाने जाब विचारला नसता तर माझी काहीही कारणाशिवाय गच्छन्ति नक्की होती.

दुसर्‍या एका कंपनीत एच आर ने माझ्या एका कलीग ला उद्यापासून आम्ही तुम्हाला टर्मिनेट करतोय असे सांगितले. कारण दिले की कंपनीकडे प्रोजेक्ट नाहिय्येत.
त्या कलीग ने एच आर ला सांगितले की तसे असेल तर तुम्ही कराराप्रमाणे तीन महिन्यांचा पगार द्या अशी मागणी केली.
एच आर ने तो करार एक तर्फी आहे. रीसोर्स ने जॉब सोडताना तीन महिन्यांची नोटीस द्यायची असा क्लॉज आहे असे सांगितले.
त्या ने असा एक तर्फी करार कोर्टात टिकणार नाही असे ठणकावून सांगितले. एच आर मॅनेजर नरमली. त्या कलीग ने पुढचे तीन महिने कंपनीच्या कामात मदत केली.
आणि तीन महिन्यांच्या शेवटी नवीन नोकरीत रुजू झाला. एच आर कडून चांगला बी जी वेरीफिकेशन आणि फीडबॅक घेतला.
तात्पर्यः एच आर ला ठणकावून सांगा. त्यानी तुम्हाला रीझाइन करायला सांगितले तर कारण विचारा. ईमेल वर ते हे कारण सांगणार नाहीत.पण तुम्हाला टर्मिनेट केले असा इमेल देणे या गोष्टीला ते खूपच घाबरतात. तुम्ही त्याला वकिलाचा सल्ला घेतोय असे सांगितले तरी ते नरम पडतात.

आम्हला राजीनामा इमेल वर किंवा मेसेजवर देता येत नाही. तो कागदावर सही करूनच द्यावा लागतो आणि तो एच आर ने शिक्क्यासहित स्वीकारावा लागतो.

त्याच पद्धतीने, एच आर आम्हला अशा धमक्या देउ शकत नाहीच वरती असे केले तर त्यांना दंड होऊ शकतो. आणि कंपनीला जास्तीचा भुर्दंड.

अर्थात एच आर गोड बोलुन काटा काढायचा प्रयत्न करतात पण जोवर प्रत्यक्ष फिजिकल सह्या होत नाहीत तोवर काहीही खरे नसते. त्यामुळे कितीही धमक्या दिल्या किंवा मने वळवली तरी मी सही करणार नाही असे म्हंटले की त्यांची आधी टरकते.

लेख आवडला, असे माझ्याबरोबर देखील झाले आहे! लोक फक्त काम काढून घेतात, मॅनेजर कितीही प्रेमळ असला तरीही मॅनेजरच असतो.
काही गोष्टी मला फार उशिरा कळल्या, जसे,
-कलीग तुमचा मित्र नसतो.
-कितीही कष्ट उपसले तरीही कंपनी ते विसरते,
-थोडे काम करून दिखावा मोठा करता यायला हवा,
-कंपनीत कुणाशीही भांडू नये, कोण कधी कुठे काटा काढेल ह्याची शाश्वती नसते.
काही वर्षाआधी मला mpsc चे प्रचंड खुळ होते, पण कॉर्पोरेट जगात पैसा जास्त मिळतो! कंपनी, देश बदलत राहिलो नी स्किल वाढवत राहिलो तर प्रचंड प्रमाणात देखील पैसा कमावता येतो.
आयटी वगैरे कंपन्यात तरी एक बरे असते की पैसा प्रचंड असतो, थोड्याफार नियमाना बांधलेल्या असतात, मेकॅनिकल वगैरे काम करणाऱ्यांना मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार असतो. पैसाही नसतो नी त्रासही असतो. ब्लू कॉलर जॉब काही झाले तरी करू नये.
मी पवनचक्कीच्या कंपनीत होतो. ओव्हर टाइम देत नसूनही जास्त वेळ काम करायला मला सांगण्यात आले, ज्याला मी स्पष्ट नकार दिला, ह्यावर मॅनेजरने बाकीचे लोक करताहेत ना हे सांगितले त्यावर मी ते त्यांच्या मर्जीने करताहेत त्यांना फुकट काम करायची हौस असेल तर करावे मी करणार नाही असे सगळ्यासमोर सांगितले, बाकीच्या लोकातही चलबिचल सुरू झाली, मॅनेजरने मला त्रास देणे सुरू केले, मी सरळ राजीनामा दिला, आधीच साईटवर बरेच राजीनामे पडले होते त्यामुळे मॅनेजरची तंतरली, त्याने मला कैबिनमध्ये बोलावून काय पाहिजे ते कर पण राजीनामा मागे घे. असे सांगितले, मी पुढील महिन्यात माझी इंजिनियरिंगची परीक्षा आहे मला अख्खा एक महिना सुटी पाहिजे तीही भरपगारी हे स्पष्ट सांगितले, त्याने लीव फॉर्म वर सही केली नाही फक्त तू जा काही झाल तर पाहू सांगितले, मी एक महिन्याने आलो, नी राजीनामा देऊन दुसरी कंपनी जॉइन केली.
जुन्या कंपनीतून भरभरून लोक इथे येत होते, त्या दुसऱ्या कंपनीच्या इंट्राविव घेणाऱ्याने मला पाहून डोक्याला हात लावून बसला नी म्हणाला, तु १.५ वर्षच झाले त्या कंपनीत नोकरी करतोय, वयही कमी आहे तरीही कंपनी का बदलतोय? ती कंपनी कशी चालेल? मी त्याला स्पष्ट स्नागीतले की मला पैसा हवा आहे, जो तिकडे मिळत नाहीये. ती कंपनी कशिका चालेना मला काय घेणेडेने? शेवटाई माण नाही हालवत मार्किंग करून मला hr कडे पगाराबद्दल बोलायला पाठवले.

मी अत्ता पर्यंत चार कंपन्या बदलल्या. पण एकदाही वाईट अनुभव आला नाही. मॅनेजर ने रजा कॅन्सल केली किंवा aprove केलीच नाही एकदाही नाही घडलं. ह्या वर्षातल्या केवळ तीन रजा शिल्लक राहिल्या आहेत. माझ्या कामाचं श्रेय दुसर्यांनी घेतल्याच आठवतही नाही.
प्रत्येक वर्षी increment चांगलंच झालं असं नाही पण कामाच्या प्रमाणात नक्कीच झालं. कोव्हीडच्या आदी एक वर्ष काही कामच नव्हतं तर increment ही कमीच झालेल. कोव्हीड नंतर मात्र कामाचा तुडवडा नाही, तर increment ही अपेक्षेनुसारच झालेल आहे. वरून बोनस वेगळा.
आत्ता पर्यंतच्या सगळ्या सहकार्यांबरोबर माझे संबंध चांगलेच होते. काम करताना हमरा तुमरीचे प्रसंग नक्कीच आले पण ते तेवढ्या पुरतेच.

शाम भागवत

रात्रीचं चांदणं नेहमीच अल्हाददायक असते. ते चांदणं कोणाला त्रास देत नसेल तर इतरही त्या चांदण्याला का बरे त्रास देण्याच्या भानगडीत पडतील?
:)

सोत्रि

व्वा! मस्त आणि अल्हाददायक प्रतिसाद!

- (अल्हाददायक) सोकाजी

मी अत्ता पर्यंत चार कंपन्या बदलल्या.

आप के खुशी का राज! (ह. घ्या)

पाषाणभेद

सरकारी खात्यात सर्वीस बुक नावाचा प्रकार असतो. त्यात चांगले वाईट कामाचा उल्लेख असतो. आपल्या वरिष्ठांची त्यावर सही असते. खाते बदलले तरी ते पुस्तक कायम असते. हे फिजीकल बुक असते, ईमेल नाही - हे महत्वाचे आहे.
(इथे उपस्थित सरकारी कर्मचार्‍यांनी यावर प्रकाश टाकावा.)
तर, कार्पोरेटमध्येही असला प्रकार सुरू करावा. त्यामुळे चांगले वाईट लेखी राहील आणि नोकरी बदलली तरी ते पुस्तक कायम असावे.