जसा जसा काळ पुढे सरकतोय, तसं तसं जग बदलतंय.....फार बदलतंय. मूलभूत गरजा सुद्धा बदलल्या आहेत. आधी अन्न, वस्त्र, निवारा ह्या तीन गोष्टी असल्या तरी आयुष्य निभत होतं. ह्या शिवाय जे काही हवं असायचं, त्या होत्या सुख सुविधा !! आता मात्र सगळंच बदललंय. अन्न, वस्त्र, निवाऱ्याखेरीज अजूनही खूप गोष्टी हव्या असतात जगायला आणि त्यांना सुख सुविधा म्हणून चालणार नाही.....त्या ही गरजाच झाल्या आहेत.
इंटरनेट ही अशीच माणसानं स्वत:साठी निर्माण केलेली गरज. आधी कॉम्प्युटर्स नव्हते तेव्हा ही आयुष्य चालत होतंच की. पण आता जरा नेट बंद झालं की जीव अगदी कासावीस होतो. नेट बंद झालं की एकदम out of touch वाटतं.