Welcome to misalpav.com
लेखक: सुजित जाधव | प्रसिद्ध:
हुश्श.. जिंकलो एकदाचे.! सलग दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले म्हणायचं. जे आजवर विश्व क्रिकेट मध्ये कोणत्याच संघाला जमलेलं नव्हतं. तश्या अनेक गोष्टी आहेत ज्या भारतीय क्रिकेट आणि वर्ल्ड क्रिकेट मधे पहिल्यांदाच घडत आहेत. पहिली म्हणजे वरती सांगितल्याप्रमाणे टी-20 वर्ल्डकप defend करणारा भारत पहिला संघ बनला. दुसरं, टी–20 WC होस्ट करणारी टीम पहिल्यांदाच वर्ल्डकप जिंकली. तीन, २०२३ ची ओडीआय WC फायनल तसेच साऊथ आफ्रिकेसोबत हरल्यामुळे पानौती ठरवल्या गेलेल्या अहमदाबादच्या मोटेरा म्हणजेच नरेंद्र मोदी मैदानावर आपण पहिल्यांदा महत्वाचा सामना जिंकलो. टी-20 विश्वचषक ट्रॉफी आपण एकूण तिसऱ्यांदा जिंकली, जे आजपर्यंत कोणत्याच संघाला जमलेल नाही (वेस्ट इंडीज आणि इंग्लंडच्या संघाने प्रत्येकी २ वेळा हा चषक जिंकला आहे). प्लेअर ऑफ द टूर्नामेंट खिताबाचा मानकरी ठरलेल्या संजू सॅमसनने शेवटच्या तीन सामन्यांत लागोपाठ तुफानी हाफ सेंच्युरीज ठोकून चमकदार कामगिरी केली त्याबद्दल त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्यात तो निम्मा वर्ल्डकप खेळलाच नाहीये. विश्वचषकाआधी त्याच्या १५ जणांच्या Squad मधील जागेवर सुद्धा काहींनी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते, कारण विश्वचषकाआधी खेळलेल्या ११ सामन्यांत त्याच्या नावावर फक्त १ अर्धशतक होते. खुद्द कप्तान सूर्यकुमार यादवने साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यागोदर पत्रकार परिषदेत संघात एकापेक्षा एक तगडे फलंदाज असताना सॅमसनसाठी स्पेस नाही करू शकत अशी हसत हसत प्रतिक्रिया दिली होती. एवढ सगळ असताना क्वार्टर फायनल समजल्या गेलेल्या सामन्यात दडपणाखाली ९७ नॉट आऊट , सेमी फायनल आणि फायनल मधे ८९ धावा करणं सोपं नव्हतं. त्यासाठी कठोर संघर्ष आणि परिश्रम आलेच. आता सर्वच क्रेडिट सॅमसनला देऊन चालणार नाही, कारण २०२४ प्रमाणेच हा विजय सुद्धा सांघिक विजय होता. बुमराह, अर्शदीप सिंह, ईशान किशन, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल सारखे खेळाडू मोक्याच्या क्षणी वारंवार चमकले. तसेच सूर्यकुमार यादव, वरुण चक्रवर्ती यांची भक्कम साथ यामुळे हा विश्वकप विजय सुकर झाला. जसप्रीत बुमराह आता भारतातीलच नव्हे तर जागतिक क्रिकेट मधील सर्वात घातक गोलंदाज बनला आहे यात शंकाच नाही. आणि गेल्या काही वर्षात त्याने हे वारंवार सिद्ध केलय. पूर्वी तुमच्या संघात जर वकार युनिस, वसिम अक्रम,ग्लेन मॅग्राथ, शेन वॉर्न, ॲम्ब्रोस, डेल स्टेन सारखे गोलंदाज असतील तर समोरच्या संघातील फलंदाज दबकून असायचे. जसप्रीत बुमराहचा सुद्धा तोच दबदबा निर्माण होताना दिसतोय. त्याच्या ओव्हर्स विकेट न गमावता कशा खेळून काढायच्या हेच एक लक्ष फलंदाजांच्या डोळ्यांसमोर असते. मोक्याच्या क्षणी अचूक यॉर्कर किंवा स्लोअर बॉल टाकून महत्वाची विकेट घेत सामना फिरवण्याचे त्याचे कसब फारच थोड्या भारतीय गोलंदाजांकडे होते. या विश्वकप स्पर्धेत इतर गोलंदाजांचा avergare इकॉनॉमी रेट 8.7 runs/over होता तर एकट्या बुमराहचा तो 6.21 इतका होता. यावरून भारताच्या विश्वविजयातील बुमराहच्या योगदानाचे महत्व लक्षात आले असेल. बुमराह व सॅमसन शिवाय अक्षर पटेलची middle overs मधील tight गोलंदाजी, हार्दिक पंड्या–तिलक वर्माची महत्वाच्या क्षणी आक्रमक फलंदाजी, ईशान किशनची सलामीला येऊन धडाकेबाज फलंदाजी (फायनल आधी त्याच्या बहिणीचे एका अपघातात निधन झाले तरीही तो दुःख बाजूला सारून फायनल खेळला आणि अर्धशतक देखील ठोकले.) सूर्यकुमार यादवची USA विरुद्धच्या सामन्यातील फलंदाजी, मधल्या षटकांतील उपयुक्त खेळ्या (cameo) आणि त्याचं कोच गौतम गंभीर सोबतचं coordination आणि कॅप्टन्सी यांचा या विजयात मोलाचा वाटा आहे. या सगळ्यांत एका खेळाडूला क्रेडिट द्यायचं आपण नेहमी विसरतो तो म्हणजे शिवम दुबे. शिवम दुबेने संघाला गरज असताना clutch innings खेळत जवळजवळ प्रत्येक सामन्यात संघाचा टोटल स्कोअर भक्कम करण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. त्याने या स्पर्धेत 39.06 च्या average व 169.06 च्या स्ट्राईक रेटने 235 धावा बनवल्या आहेत. 2024 च्या विश्वचषक विजयात देखील त्याचे योगदान मोलाचे राहिले होते. बाकी कोच झाल्यापासून सतत चर्चेत असलेला व अनेकदा क्रिकेट फॅन्स व समीक्षकांच्या टीकेला समोरा जावं लागलेल्या गौतम गंभीरला सुद्धा तितकेच श्रेय द्यावे लागेल. भक्कम संघबांधणी, धाडसी निर्णय, खेळाडूंना सततचे प्रोत्साहन, संपूर्ण स्पर्धेत अपयशी ठरून सुद्धा अभिषेक शर्मा सारख्या खेळाडूंना बॅक करणे यामुळे गंभीरची भूमिका सुद्धा महत्वाची ठरते. त्याच्याबद्दल एक stat चर्चेत येतोय ते म्हणजे त्याने खेळलेल्या, mentor किंवा कोच असलेल्या जवळजवळ प्रत्येक महत्वाच्या स्पर्धेत त्याचा संघ विजयी झालाय. बघा ना.. २००७, २०११ आणि २०२६ चे विश्वचषक, २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप, २०१२ आणि २०१४ मध्ये तो कर्णधार असताना कोलकताने जिंकलेल्या आयपीएल ट्रॉफीज, तसेच २०२१ मध्ये कोलकताने जेव्हा तिसऱ्यांदा आयपीएल जिंकली तेव्हा तो कोलकाताचा mentor होता. आहे की नाय इंटरेस्टिंग.! टी-20 विश्वचषक तिसऱ्यांदा खिशात घातल्यानंतर भारतीय संघ आता पुढील वर्षी आफ्रिकेत होणारा ODI विश्वचषक सुद्धा तिसऱ्यांदा जिंकण्यासाठी उत्सुक असेल. त्याबद्दल पुढील लेखात चर्चा करुयात. तोपर्यंत माझा हा लेख कसा वाटला त्याबद्दल नक्की कळवा. बाय.. बाय. .!


Comments

कोच झाल्यापासून सतत चर्चेत असलेला व अनेकदा क्रिकेट फॅन्स व समीक्षकांच्या टीकेला समोरा जावं लागलेल्या गौतम गंभीरला सुद्धा तितकेच श्रेय द्यावे लागेल. भक्कम संघबांधणी, धाडसी निर्णय, खेळाडूंना सततचे प्रोत्साहन, संपूर्ण स्पर्धेत अपयशी ठरून सुद्धा अभिषेक शर्मा सारख्या खेळाडूंना बॅक करणे यामुळे गंभीरची भूमिका सुद्धा महत्वाची ठरते. त्याच्याबद्दल एक stat चर्चेत येतोय ते म्हणजे त्याने खेळलेल्या, mentor किंवा कोच असलेल्या जवळजवळ प्रत्येक महत्वाच्या स्पर्धेत त्याचा संघ विजयी झालाय. बघा ना.. २००७, २०११ आणि २०२६ चे विश्वचषक, २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप, २०१२ आणि २०१४ मध्ये तो कर्णधार असताना कोलकताने जिंकलेल्या आयपीएल ट्रॉफीज, तसेच २०२१ मध्ये कोलकताने जेव्हा तिसऱ्यांदा आयपीएल जिंकली तेव्हा तो कोलकाताचा mentor होता. आहे की नाय इंटरेस्टिंग.!
ऑल क्रेडीट गोज टू जय शाह. जय शा साहेबांनी ऑफर केली तेंव्हा इच्छा नसतानाही नाही म्हणूच शकला नाही गंभीर (असे तोच स्वतः म्हणे) तेंव्हा क्रेडीट जय शाह यांचेच. हनुमानाला दिले क्रेडीट तरी हरकत नाही. हाय का नाय इंट्रेस्टिंग?

चेंडूफळीची हा खाजगी आणि धार्मीक संघ आहे. जेव्हा जेव्हा देशावरचे संकट असते तेव्हा तेव्हा शत्रू टीमशी निट बोलणे तर सोडाच पण हस्तांदोलन देखील करत नाहीत. जर एवढेच करायचे असते तर खेळणेदेखील सोडा ना? मग खेळतात तरी कशाला अन बक्षीसाचा धनादेश बरा चालतो यांना. पाहिजे तेव्हा पैसे घेवून हरणे आणि जिंकणे हे त्यांच्या स्वभावात आहे. मालक जे बोलेल तेच करावे लागते. मुख्य म्हणजे चेंडूफळी हा आळशी लोकांचा खेळ आहे. एका वेळी एकाच खेळाडूचा काही क्षणांसाठीच दमछाक होत असते. (केवळ यष्टीरक्षकच उड्या मारून मारून तुलनेने जास्त दमतो.)

ज्यांना क्रिकेट आवडत नाही, ते क्रिकेट बघत नाहीत,बघूही नये. तसेच या धाग्यावर पण त्यांनी प्रतिक्रिया द्यायची गरज नाही, या सारख्या धाग्याकडे त्यांनी दुर्लक्ष करावे

ते आहेच, पण हा बीसीसीआय चा संघ (भारत देशाचा अधिकृत क्रिकेट संघ नाही, bcci भारताच्या क्रीडा मंत्रालया अंतर्गत येत नाही) जिंकला किंवा हरला तरी देशभक्तीच्या नावाखाली क्रिकेटचे अंधभक्त फार त्रास देतात, रात्री डीजे वाजवणे काय, रस्ता अडवून गुलाल उधळणे, रस्ते अडवून मोठमोठ्या स्क्रीन लावून लोकाना बळजबरीने क्रिकेट पहा म्हणून सक्ती करणे डोक्यात जाते, तुम्हाला क्रिकेट आवडते तर घरात कलमडा आणि पहा! मोठी स्क्रीन लावून रस्ता अडवण्याची काय गरज? व्हॉट्सअपला स्टेटस ठेवणे तिथवर ठीक आहे, पण संबंध नसलेल्या समूहात “जिंकलो” म्हणून पिंक टाकायची काय गरज? जिंकलो तर घराबाहेर कपडे काढून नाच? इतराना त्रास कशाला द्यायचा? क्रिकेटर्स नी क्रिकेटला बाहेर देशात ( आपल्या आजूबाजूचे दरिद्री नि दळभद्री देश सोडले तर) कुणी कुत्र विचारत नाही.

भारत देशाचा अधिकृत क्रिकेट संघ नाही, bcci भारताच्या क्रीडा मंत्रालया अंतर्गत येत नाही
प्रतिसादातील प्रत्येक भावनेशी सहमत. एकेकाळी क्रिकेट आणि चित्रपट ह्यामुळे त्यावेळचा बराच वेळ प्रचंड वाया घालवला आहे. पण आज अक्षरशः किळस व वैताग येतो. सचिन युगात असताना एखादा सामना हरलो तर सूतक लागल्यासारखे काही दिवस मनस्थिती व्हायची. आता तर फायनल आहे हे ही माहीती नसते आणि त्यात भारत जरी असला तरी निकालाने मनोवस्थेवर काहीच फरक पडत नाही.खेळाडुंची नावे ही फार काही माहिती नाही. काहींना बघुन तर डोक्यात सणक उठते.

पूर्वीच्या काळी मनोरंजनाची साधने कमी होती, दूरदर्शन हेच चॅनल होते नी क्रिकेट थेट दाखवले जायचे, लोक त्यात आनंद शोधायचे, रेडिओवर क्रिकेट ऐकायचे, नाही म्हणायला २००३ ला bcci संघ जिंकावा म्हणून यज्ञ केला गेलेला पाहिला होता पण त्याचा उद्देश लोकांना त्रास देणे हा नव्हता. जसजशी मनोरंजनाची साधने वाढली तसतसे क्रिकेटभक्त विकृत होऊ लागले, प्रत्येकाने क्रिकेटरसात डुंबावेच अशी त्यांची विकृती असते ह्या करता ते प्रत्येक मार्ग अवलंबतात, रस्ते अडवून, डीजे, ढोल वाजवून लोकांना त्रास देणे, नको तिथे चर्चा सुरू करणे, व्हॉट्सअप समूहात फुसकुल्या सोडणे वगैरे वगैरे. अशा विकृतांना फटके देऊन सरळ करायला हवे.

पूर्वीच्या काळी मनोरंजनाची साधने कमी होती, दूरदर्शन हेच चॅनल होते नी क्रिकेट थेट दाखवले जायचे, लोक त्यात आनंद शोधायचे, रेडिओवर क्रिकेट ऐकायचे, नाही म्हणायला २००३ ला bcci संघ जिंकावा म्हणून यज्ञ केला गेलेला पाहिला होता पण त्याचा उद्देश लोकांना त्रास देणे हा नव्हता. जसजशी मनोरंजनाची साधने वाढली तसतसे क्रिकेटभक्त विकृत होऊ लागले, प्रत्येकाने क्रिकेटरसात डुंबावेच अशी त्यांची विकृती असते ह्या करता ते प्रत्येक मार्ग अवलंबतात, रस्ते अडवून, डीजे, ढोल वाजवून लोकांना त्रास देणे, नको तिथे चर्चा सुरू करणे, व्हॉट्सअप समूहात फुसकुल्या सोडणे वगैरे वगैरे. अशा विकृतांना फटके देऊन सरळ करायला हवे.
बरोबर

भारत देशाचा अधिकृत क्रिकेट संघ नाही, bcci भारताच्या क्रीडा मंत्रालया अंतर्गत येत नाही प्रतिसादातील प्रत्येक भावनेशी सहमत. एकेकाळी क्रिकेट आणि चित्रपट ह्यामुळे त्यावेळचा बराच वेळ प्रचंड वाया घालवला आहे. पण आज अक्षरशः किळस व वैताग येतो. सचिन युगात असताना एखादा सामना हरलो तर सूतक लागल्यासारखे काही दिवस मनस्थिती व्हायची. आता तर फायनल आहे हे ही माहीती नसते आणि त्यात भारत जरी असला तरी निकालाने मनोवस्थेवर काहीच फरक पडत नाही.खेळाडुंची नावे ही फार काही माहिती नाही. काहींना बघुन तर डोक्यात सणक उठते.
१००% सहमत. तो पांड्या की काय किती छपरी दिसत होत. ओकारी यायची बाकी होती.

कसं असतं की ज्यांना क्रिकेट अजिबात समजत नाही, अजिबात आवडत नाही, अजिबात पाहत नाही, क्रिकेटमध्ये अजिबात रूची नाही. . . तीच लोकं क्रिकेटसंबंधी कोणतेही लेखन दिसले की तात्काळ उठून कळफलक बडवायला प्रारंभ करतात. अश्यांमुळेच धागा पळतो. क्रिकेटची लोकप्रियता अश्या लोकांमुळेच वाढत आहे.

कसं असतं की ज्यांना क्रिकेट अजिबात समजत नाही, अजिबात आवडत नाही, अजिबात पाहत नाही, क्रिकेटमध्ये अजिबात रूची नाही. . . तीच लोकं क्रिकेटसंबंधी कोणतेही लेखन दिसले की तात्काळ उठून कळफलक बडवायला प्रारंभ करतात. अश्यांमुळेच धागा पळतो. क्रिकेटची लोकप्रियता अश्या लोकांमुळेच वाढत आहे.
हो ना. खरेच आहे. आणि जे जे क्रिकेट प्रेमी आहेत, वेळ घालवून क्रिकेट पाहतात, आठ आठ तास वाया घालवतात, घरच्यांना सिरीयला पाहू देत नाहीत, रिमोट देत नाहीत, सैपाकात मदत करत नाहीत, ते ते सट्टाबाजी असलेले क्रिकेट, पैसे देऊन मॅचा विकत घेतलेले क्रिकेट, आळशांचा खेळ असलेले क्रिकेट पाहत बसतात आणि अशा बघ्यांना बिसीसीआय पर मॅच एक पन्नास हजार लगेच युपीआय ने पाठवून देते. स्कोर लक्षात ठेवणारे, अरे काय कॅच घेतला, कशी विकेट घेतली, हा काय भारी दिसत होता, याच्या गर्लफ्रेंडने काय किस घेतला राव, विक्रम लक्षात ठेवणारे, क्रिकेटरला हिरो मानणारे, शेकहँन्ड न करता पाकिस्तानची कशी उतरवली असे म्हणणार्‍यांना बिसीसीआय आणखी २५ हजार जास्त देत असते. कालच अशा एका भक्त क्रिकेट बघ्याने तर १ लाख १०० हजार कमावले. डायरेक क्रेडीट झाली रक्कम. आता तो मोठा टीव्ही घेत आहे. सेम ते चाळीस पैसे मिळतात ना तसे आहे बघा.

तीच लोकं क्रिकेटसंबंधी कोणतेही लेखन दिसले की तात्काळ उठून कळफलक बडवायला प्रारंभ करतात. कारण आपल्याला क्रिकेट आवडते म्हणून, इतरानाही आवडावेच असा मंदहट्ट क्रिकेट पाहणाऱ्यांचा असतो, मग ते प्रत्येक ठिकाणी व्हॉट्सअप असो, की समोरासमोर चर्चा प्रत्येक ठिकाणी संबंध नसताना क्रिकेटचा विषय काढून पिडतात, मोबाईल मधे लाईव स्कोर दिसत असतो तरी स्कोर विचारुन त्रास देतात, बीसीसीआय चा संघ जिंकला की रस्ते अडवून दारू पिऊन धिंगणा घालतात! अश्याना चाप बसवा ह्यासाठीच कळफलक बडवावे लागते, त्या निमित्ताने क्रिकेटविकृतीबद्दल बोलणेही होते.

क्रिकेटाचा धागा आहे म्हणूनच पिंका टाकतोय! क्रिकेटविकृत लोकांच्या त्रासाच्या कथा क्रिकेटच्याच धाग्यावर टाकणार ना? इस्राईल इराण युद्धच्या धाग्यावर तर नक्कीच नाही! बरोबर ना?

मी काय म्हणतो धाग्याच्या नावातच क्रिकेट आहे आणि आपल्याला क्रिकेट आवडत नाही तर उगाच धागा उघडून का पिंका टाकायच्या.
धागा काही खाजगी मालमत्ता नाही की त्याला धागाकर्ता कुलूप लावेल. हे सोशल मिडीया आहे. धागा केला तर त्यावर प्रतिक्रीया येतीलच ना? अन काय वाचायचे ते वाचा अन नाही पटले तर सोडून द्या असे म्हणू नका. सोमिवर धागे, विडीओ उगम पावत असतात. आपली इच्छा असो नसो ते वाचत, बघावे लागत असतात.
क्रिकेट धागा लोकप्रिय करणारे क्रिकेट न आवडणारेच असतात. त्याचा लगेच प्रत्यंतर आला व पुढेही येणार.
क्रिकेट न आवडणारे असे कसे ठरवले? त्यातल्या तृटी, बेकायदेशीर पद्धती काढा की आधी. मग ठरवा काय ते. अन तसेही दिवसेंदिवस कंटाळवाणेपणे आळशासारखे खेळत राहणे आवडणार नाहीच. एक चेंडू फेकतो अन आराम. फलंदाज चेंडू टोलवतो अन आराम. क्षेत्ररक्षक चेंडू पकडतो, फेकतो अन आराम. परत चेंडू फेकतो अन आराम. श्या... आण्णा महाराज.... टण्ण. नुसता शो बिजनेस आहे.

कसं असतं की ज्यांना क्रिकेट अजिबात समजत नाही, अजिबात आवडत नाही, अजिबात पाहत नाही, क्रिकेटमध्ये अजिबात रूची नाही. . . तीच लोकं क्रिकेटसंबंधी कोणतेही लेखन दिसले की तात्काळ उठून कळफलक बडवायला प्रारंभ करतात. अश्यांमुळेच धागा पळतो. क्रिकेटची लोकप्रियता अश्या लोकांमुळेच वाढत आहे.
तसे नसावे. एकेकाळी क्रिकेटमधले रेकॉर्ड फिंगर टिप्स वर असायचे व मॅच असलेल्या दिवशीची उत्सुकता प्रचंड असायची. पण क्रिकेटचे अजीर्ण झाले आणि बरे झाले हे व्यसन सुटले कारण त्या दिवसात मॅच बघताना आई चा बराच ओरडा खाल्लेला आहे.अगदी वडिलांनी सुध्दा. ईव्हन त्यापूर्वी जेव्हा कॉमेंट्री रेडिओवर ऐकली जायची त्या दिवसांची जादू ही अनुभवलेली आहे. पण इथे आता सामना सुरु आहे आणि अगदी निर्विकार चेहर्याने सामना बघणे सुरु होते. बुमराह वगळता एकाही खेळाडुशी कनेक्ट होऊ शकलो नाही.मुळात सध्या ज्यांना आयडॉल मानले जावे अश्या किती खेळाडुंची नावे सांगता येतील.?माझ्यामते ह्या परंपरेतले शेवटचे खेळाडु विराट व रोहित असावेत. हीच गोष्ट चित्रपटांची. माधुरीला डोळे भरुन पाहण्यासाठी राजकुमार ह्या पडेल चित्रपटाला अगदी दुसर्या शोला गेले होतो. आता माधुरीची कुठली सिरियल वगैरे येते तेव्हा पटापट स्किप करत उरकतो. आणि त्या मिसेस देशपांडे सिरियल नंतर ते ही करेन का पुढे ह्याबाबत साशंक आहे. ( हा प्रतिसाद मुद्दामुन इथे लिहिला.कारण माधुरीबाबत कुणी धागा काढला आणि तिथे असा प्रतिसाद लिहिला आणि त्यावर धाग्याचे शीर्षक अमुक अमुक मग इथे आलाच कशाला असा कोणी औचित्यभंग करायला नको. (ह. घ्या.).) बाकी क्रिकेट अजुनही आवडते. युट्युबर जुन्या क्रिकेट च्या फिड्स येत राहतात.त्या नेहेमी पाहतो.

क्रिकेट खूप जास्त झालंय हे खरं आहे.‌पूर्वी वर्षात एखादी मालिका व्हायची. साधारणपणे ५ कसोटी सामने असायचे किंवा ३ कसोटी सामन्यांच्या २ मालिका असायच्या. एकदिवसीय सामने नियमित १९८३ नंतर सुरू झाले. तरीही एकूण सामन्यांची संख्या खूप कमी होती, कारण खेळणारे देशही कमी होते. आता जवळपास १० देश कसोटी सामने खेळतात, १४-१६ देश एकदिवसीय सामने खेळतात आणि वी-२० हा नवीन प्रकार २०+ देश खेळतात. त्यामुळे सामन्यांची संख्या अतोनात वाढलीये. त्यात भर म्हणून अनेक लीग सुरू झाल्या. मी प्रमुख संघांचे जवळपास सर्व कसोटी सामने व एकदिवसीय सामने पाहतो. बांगलादेश, अफगाणिस्तान अशांचे सामने पाहत नाही. वी-२० सामने केवळ विश्वचषक स्पर्धेतील व ते सुद्धा प्रमुख देशांचे पाहतो.

अंतिम सामना खूपच एकतर्फी झाला. मजा आली नाही. खूप जवळ सीमारेषा असल्याने षटकारांचा वर्षाव होत होता. संपूर्ण सामन्यात दोन्ही संघातील एकानेही पळून ३ धावा काढल्या नाहीत कारण सीमारेषा खूप जवळ असल्याने चेंडू लगेच सीमारेषेबाहेर जात होता. अश्या सामन्यात मजा येत नाही. तसे मी वी२० प्रकारातील इतर कोणतेही सामने पाहत नाही, आयपीएल नामक तमाशाही पाहत नाही. परंतु विश्वचषक स्पर्धेतील मोजकेच सामने पाहतो.‌ मला सर्वाधिक आवडतात ते कसोटी सामने व त्याखालोखाल एकदिवसीय सामने. वी२० प्रकार संपूर्ण बंद करावा अशी इच्छा आहे.

प्रत्येक सामन्यात जाहिरात करण्यासाठी १० मिनिटे देतात. वैयक्तिक पातळीवर, क्रिकेटचे सामने चालू असताना माझी घरातील सर्व कामे सुरळीत पार पडतात. विशेषतः, पुस्तके आणि मासिके वाचली जातात. असो, कुणी कितीही निंदा केली तरी, क्रिकेटचे सामने होणारच आहेत. आपला वैयक्तिक स्वार्थ साधायचा आणि मोकळे व्हायचे. उगाच डोक्याला शॉट करून घ्यायचा नाही....

उपांत्य फेरीचा क्रिकेट सामना चांगला झाला मजा आली होती. अंतिम सामना एकतर्फी झाला. मजा आली नाही, तरीही कशीबशी नाव काठावर लागल्यानंतर अंतिम सामन्यात पोहचून विजय मिळवला भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डच्या संघाचं अभिनंदन. -दिलीप बिरुटे

मी कधी क्रिकेट पाहत नाही पण त्या दिवशी जेवता जेवता काही वेळासाठी समोर इतर बघत होते म्हणून पाहिले तर न्यूझीलॅंड चा संघ काहीही प्रयत्न करताना दिसत नव्हता, मॅच फिक्स आहे हे स्पष्ट दिसत होते! अर्ध्या तासासाठी पाहिले नि उठलो, क्रिकेटभक्ताना आनंद मिळावा किंवा सट्टेबाजीसाठी असेल पण मॅच फिक्स आहे हे दिसत होते.

सकाळी एक प्रतिसाद लिहिल्याचा उद्देश सफळ झाला.
हे म्हणजे दुसरी बाजू वरचढ दिसायला लागली की आपण लगेच माझेच कसे बरोबर आहे ते सिद्ध करण्यासारखे झाले. उन्ह फार आहे. कोकम सरबत घेवूया.