Skip to main content

एक नवा इतिहास आणि भारताचा वाघ WAG 12

लेखक निनाद यांनी मंगळवार, 25/08/2026 10:57 या दिवशी प्रकाशित केले.

२१ ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय रेल्वेने एक नवा इतिहास रचला आहे. आपल्या देशात जगातील पहिली सर्वात लांब इलेक्ट्रिक डबल स्टॅक कंटेनर ट्रेन यशस्वीरीत्या धावली. या ट्रेनची एकूण लांबी १.३ किलोमीटर एवढी आहे. अशी कामगिरी जगात इतर कुठेही झालेली नाही. ही ट्रेन जेएनपीटी बंदरावरून वडोदरा येथील गतिशक्ती कार्गो टर्मिनलमधील कॉनकोरसाठी रवाना झाली होती. या ऐतिहासिक ट्रेनने तब्बल ४२२ किलो मीटरांचे अंतर अगदी सुरक्षितपणे पार केले.

या ट्रेनची तांत्रिक रचना खरोखरच कौतुकास्पद आहे. या एकाच ट्रेनमध्ये एकूण १८० कंटेनर्स लोड करण्यात आले होते. दोन वेगवेगळ्या माल गाड्या एकत्र जोडून ही महाकाय ट्रेन तयार करण्यात आली. पहिल्या ट्रेनचे नेतृत्व १२,००० हॉर्स पॉवरचा शक्तिशाली WAG 12 हे इलेक्ट्रिक इंजिन करत होते. या इंजिनाने ९० कंटेनर्स असलेले ४५ वॅगन्स सहज खेचले. तर दुसऱ्या ट्रेनला WAG 7 हे इंजिन जोडलेले होते आणि त्यावरही ९० कंटेनर्स लोड होते.

भारताचा WAG 12 हा काही साधासुधा लोकोमोटीव्ह नाही, तर आपल्या रेल्वेचा खराखुरा बाहुबली आहे! हा दोन भागांत जोड लेला आहे. पूर्णपणे विजे वर चालणाऱ्या या इंजिनची बॉडी एकदम दणकट आहे. ट्रॅकवर मजबूत पकड राहण्यासाठी यात खास चाके दिली आहेत. आणि इंजिन गरम होऊ नये म्हणून भारी इन्व्हर्टर अन् कुलिंग सिस्टीम बसवली आहे. चालकांसाठी ड्रायव्हर केबिनमध्ये एसी आणि डिजिटल स्क्रीन दिल्या आहेत, ज्यामुळे गाडी नियंत्रण सोपे झाले आहे. या इंजिनमध्ये शेकडो स्मार्ट सेन्सर्स बसवलेले आहेत. इंजिनचे तापमान, चाकांचा वेग, मोटरचा दाब, ओव्हरहेड वायरमधून मिळणारा विद्युत पुरवठा आणि ब्रेक सिस्टीमची स्थिती यावर हे सेन्सर्स २४ तास बारीक लक्ष ठेवून असतात. हा सर्व डेटा नेटवर्कद्वारे थेट रेल्वेच्या मुख्य कंट्रोल रूम  कडे पाठवला जातो.  जर धावत्या ट्रेनमध्ये काही तांत्रिक अडचण आली, तर कंट्रोल रूमा तील इंजिनिर्स दूर बसूनच कॉंपुटरवर संपूर्ण रिपोर्ट पाहू शकतात. तेथूनच लोको पायलटला स्क्रीनवर मेसेज पाठवून किंवा गाईड करून बिघाड कसा दुरुस्त करायचा, याचे मार्गदर्शन केले जाते. इंजिनमध्ये अत्याधुनिक जीपीएस बसवलेले आहे. यामुळे मालगाडी सध्या कोणत्या लोकेशनला आहे, तिछा वेग किती आहे आणि ती पुढच्या स्टेशनवर कधी पोहोचेल, याचा अचूक डेटा आणि रिअल टाईम मिळतो. यामुळे संपूर्ण फ्रे कॉ 'चे ट्रॅफिक मॅनेज करणे सोपे होते.

आपल्याकडे मालगाड्यांचा वेग वाढवणं खूप गरजेचे आहे. जुनी इंजिनं जास्त वजन घेऊन वेगाने धावू शकत नव्हती, त्यामुळे माल पोहोचायला खूप उशीर व्हायचा. 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर'साठी भारताला एका पॉवरफुल इंजिनची गरज होती. कमी वेळेत अन् कमी खर्चात जास्त माल नेणं आणि रस्त्यांवरच्या ट्रक्सचा ताण कमी करून प्रदूषण थांबवणं, हा यामागचा मुख्य उद्देश होता. अशी महाकाय इंजिनं जगात फक्त काहीच देशांकडे आहेत. मोदी सरकारने रेल्वे साठी आजवरचे विक्रमी बजेट दिले आहे. बिहारमधील मधेपुरा येथे फ्रान्सच्या अल्टॉम कंपनीसोबत मिळून देशातील सर्वात मोठा कारखाना उभारला आणि मेक इन इंडियाअंतर्गत अवघ्या काही वर्षांत WAG 12 सारखी महाकाय इंजिनं प्रत्यक्ष ट्रॅकवर धावू लागली. रशिया, चीन आणि अमेरिकेनंतर आता भारतही या खास क्लबमध्ये सामील झालाय. विशेष म्हणजे 'मेक इन इंडिया' अंतर्गत बिहारच्या मधेपुरा कारखान्यात ही इंजिनं आता आपल्याकडेच बनत आहेत. (हो बरोबर आहे बिहार बरोबर वाचले आहे!) मोदी सरकारने 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर' आणि WAG 12 इंजिन यांसारख्या प्रकल्पांना फक्त कागदावर न ठेवता, प्रत्यक्ष जमिनीवर उतरवाले आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने भारतीय रेल्वे आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्यासाठी 'मिशन मोड'वर काम केलं आहे हे दिसून येते आहे.

या नवीन प्रयोगामुळे भारतीय वाहतूक क्षेत्राला खूप मोठे फायदे होणार आहेत. आधी एकाच मार्गावर अनेक गाड्या चालवाव्या लागायच्या. आता दोन वेगवेगळ्या गाड्या एकत्र जोडून एकच मोठी ट्रेन चालवल्यामुळे ट्रॅकवरची गर्दी एकदम कमी झाली आहे. परिणामी, ट्रॅक मोकळे मिळतात, ट्रेनांची क्षमता वाढते अन् माल ठरलेल्या वेळेत पोहोचतो. 

रेलवेसाठी सर्वात महत्त्त्वाची गोष्ट म्हणजे खर्च! दोन वेगळ्या गाड्यां ऐवजी एकाच वेळी दुप्पट माल गेल्यामुळे इंधन, ड्रायव्हर अन् मेंटेनन्सचा खर्च अर्ध्यावर येतो. यामुळे संपूर्ण वाहतूक खर्च खूपच कमी होतो, ज्याचा थेट फायदा आपल्या अर्थव्यवस्थेला होतो. ही नवीन इंजिनं अन् ट्रेन पूर्णपणे विजेवर धावतात. यामुळे डिझेलवरचं आपलं अवलंबित्व तर संपलंच आहे, शिवाय रस्त्यां वरून धावणाऱ्या हजारो ट्रकांचा ताणही कमी झालाय. रस्ते मोकळे झालेत अन् हवेत पसरणारा धूर-प्रदूषण कमी होण्यास मोठी मदत झाली आहे. 

तशी जगात 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर' ही संकल्पना काही नवी नाही. जगातील ज्या देशांनी आपल्या अर्थव्यवस्थेला बुस्टर डोस दिला, त्यांनी सर्वात आधी मालवाहतुकीसाठी असे वेगळे मार्ग तयार केले.  अमेरिकेने रेल्वे मालवाहतुकीवर भर दिल्यामुळे तिथला माल एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्याचा खर्च खूप कमी झाला. तिथे रस्त्यांवरील ट्रक्सवरचा ताण कमी झाला आणि बंदरांवरून माल थेट देशाच्या कानाकोपऱ्यात वेगाने पोहोचू लागला. चीनने गेल्या दोन-तीन दशकांत हजारो किलोमीटरचे भारी-भरकम फ्रेट कॉरिडॉर उभारले आहेत. कोळसा, पोलाद आणि कंटेनर्सची वाहतूक इतक्या वेगाने झाली की त्यांच्या कारखान्यांना कधीच कच्च्या मालाची कमतरता भासली नाही. चीन जगाचा कार खाना  बनण्यामागे त्यांच्या या वेगवान माल वाहतुकीचा खूप मोठा वाटा आहे. 

भारतात हे बदल इतक्या वेगाने केवळ मोदी सरकारच्या प्रयत्नांमुळे हे घडते आहे यात शंकाच नाही. भारत आता ट्रॅकवर येतोय असे म्हणायला वाव आहे. मालगाड्यांचा सरासरी वेग २५ किमी/तास वरून थेट ६० ते ७५ किमी प्रती तास वर गेला आहे. म्हणजे माल आता अर्ध्यापेक्षा कमी वेळेत पोहोचतोय. जिथे आधीच्या काळात १० वर्षांत काही किलोमीटरचे ट्रॅक टाकणेही कठीण झाले होते, तिथे मोदी सरकारने हजारो किलोमीटर लांबीचे ईस्टर्न आणि वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर पूर्णत्वास नेले आहेत आहे त्यावर गाड्या धवून जागतिक विक्रम करत आहेत. या वेगा बद्दल भारतीय रेल्वे मंत्री अश्विनि वैष्णव यांचे अभिनंदन!

थोडक्यात सांगायचं तर, अमेरिका आणि चीनने जो रस्ता पकडून आपली प्रगती साधली, भारत आता त्याच 'फास्ट ट्रॅक'वर आला आहे. फ्रेट कॉरिडॉर मुळे भारत भविष्यात जागतिक व्यापाराचा एक मोठा पॉवरहाऊस बनेल यात माझ्या मनात शंका नाही!


वाचने 238
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर' हे दर वेळी टायपायचा कंटाळा आल्याने काही ठिकाणी शॉर्ट वापरले आहे. जमले तेव्हा कॉपी पेष्ट केले आहे. वाचनात खडा लागत असल्यास क्षमस्व!


एकंदरीत अजून एक खंदा पट्टीचा आणि लिहिता रेल फॅन मिपावर पाहून असीम आनंद झाला आहे. 

एक वाक्य थोडे खटकले ते हक्काने सांगतोय (हो बरोबर आहे बिहार बरोबर वाचले आहे!

फ्रँकली हे वाक्य अप्रस्तुत, अवास्तव आणि अवांछित वाटले स्पष्ट बोलता. 

एक रेल फॅन म्हणून मुंगेर रेल्वे इन्स्टिट्यूट, मुंगेर, बिहार आपल्याला ठाऊक असेलच न ?


In reply to by वृषभ खोंडे

मान्य आहे... मुंगेर  म्हणजे भारताचे बर्मिंगहॅम होते. धातूकाम, शस्त्रनिर्मिती आणि तांत्रिक कौशल्यासाठी खरे तर हा भाग पुर्वी प्रसिद्ध होता. आणि म्हणून तर इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (थकलो हे लिहून 😁 ) इथे आले. सर्वात जुन्या आणि महत्त्वाच्या शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थांपैकी एक आहे सर्वांनाच हा इतिहास माहित असेल नाही.


उत्तम माहिती आणि लेख

कोकण रेल्वेवर रो-रो सेवा आहे. त्यात आणि यात मला लेख वाचून वाटले ते फरक असे:

१. रो-रो मधे ट्रक जातात, कंटेनर नाही. काही संख्या वजनाचे लिमिट आहे का?

२. रो-रो साठीचे इंजिन कामी पॉवरचे असावे.

हे बरोबर आहे का?


In reply to by सौंदाऴा

रो-रो सेवा अजून चालू आहे का? त्याबद्दल काही प्रश्न आहेत. 
रेल्वेच्या जाणकारान्ना विनन्ती आहे की ही सेवा कितपत उपयोगी आणि किफायती आहे याबद्दल साङावे.

स्वत: चालू शकणारे एक वाहन (ट्रक) दुसर्या वाहनावर (ट्रेन) का ठेवतात? दोन्ही वाहनान्ची क्षमता पूर्ण वापरली जात नाहिये असे वाटते.
त्यापेक्षा, सामान जलद आणि सुरक्षित चढवणे आणि उतरवणे याची सोय केली तर चाङले नाही का? 

अशी कुठली विशेष परिस्थिती (युज केस) आहे का जिथे रो-रो गरजेची आहे?


In reply to by अनामिक सदस्य

स्वत: चालू शकणारे एक वाहन (ट्रक) दुसर्या वाहनावर (ट्रेन) का ठेवतात? दोन्ही वाहनान्ची क्षमता पूर्ण वापरली जात नाहिये असे वाटते

रेल्वे ला ट्राफिकची समस्या नसते. त्यामुळे ती वेगाने होऊ शकते.   ट्रक सारखे वाहन  छोट्या गावाला जाऊ शकते. याचा फायदा असा होतो की ज्या ठिकाणी रेल्वे ने माल पोहोचवला जाऊ शकेल तेथपर्यंत रेल्वेने आणि त्या पुढे ट्रकने नेता येतो.

ट्रक सारखे वाहन रेल्वे वर चढवण्यचा फायदा असा होतो की मालाच्या चढ उतरवण्यात वेळ जात नाही. ट्रक रेल्वेवर असल्यामुळे ट्रकचे इन्धन वाचते

 


In reply to by अनामिक सदस्य

अशी कुठली विशेष परिस्थिती (युज केस) आहे का जिथे रो-रो गरजेची आहे?

 

खुद्द कोकण ! घाटवाटांच्या रस्त्यांनी जाता ट्रक्स वेळ पण जास्त घेतात, इंधन पण आणि देखभाल खर्च सुद्धा वाढीव, रो - रो मध्ये हे प्रश्न (कोकणपुरते) निराकरण होतात. मूलतः रो रो सेवा ही दुर्गम जागांवर जिथे लोहमार्ग पोचले आहेत तिथे एक स्मार्ट सोल्युशन आहे. 

ह्याउलट उत्तर प्रदेशात किंवा गंगेच्या मैदानी खोऱ्यात जिथे मैलोनमैल सपाट जमीन आहे, भारतातले सगळ्यात मोठे एक्सप्रेसवे नेटवर्क आहे तिथे कंटेनर वाहू शकणारे फ्लॅट बेड रोलिंग स्टॉक रो - रो मध्ये लावणे म्हणजे वेळ, पैसा, मनुष्यबळ, अन् दोन परस्पर पर्यायी वाहतूक पर्याय वाया घालवणे होय.


रेल्वेला नेहमीच प्रश्न पडतो की एंजिने किती एचपी( आता वॉट्स?) बनवावीत. ४५०० का ६००० एचपी. 

बऱ्याच प्रवासी वाहक रेल्वे १६ डब्यांच्या असतात. मालगाड्या ५० डब्यांच्या. मालगाडीला दोन एंजिने लावतात. १६ ते २४ डब्यांसाठी स्टेशनांचे प्लॅटफार्मस आहेत. मालागाडीला त्यांची गरज नाही. अगदी १२००० एचपीची एंजिने बनवली तरी काही तोटे शिल्लक राहतात किंवा काही नवीन प्रश्न निर्माण होतातच.

नव्या एंजिनांत एसी केबीन, अत्याधुनिक यंत्रणा आहे म्हणता पण मालगाडीच्या गार्डकडे आणि त्याच्या ब्रिटिशकालीन रचनेकडे पाहिल्यावर वाईट वाटते. काहीही सोय नाही. रात्री डास किती चावत असतील. दिवाबत्ती ही नाही.

प्रवासी गाड्या आणि मालगाड्या यांमध्ये पूर्वी प्रवासी गाडीलाच प्राधान्य देऊन पुढे काढणे आणि मालगाडीला साइडिंगला बाजूला टाकणे असा अग्रक्रम पूर्वी होता. आता तो बदली झाला आहे. हे कोकण रेल्वेच्या पनवेल भागांत आता जाणवते. इथूनच जेएनपिटी बंदराला मार्ग जातो. त्या गाड्या उभ्या असतात. जेएनपिटीकडून पेण रत्नागिरीकडे किंवा उलट जाणाऱ्या गाड्यांना एंजिने रिवर्स करावी लागतात, प्लॅटफॉर्मस ब्लॉक होतात. एका वेळी दहा दहा गाड्या उभ्या असतात.  सांगायचा मुद्दा काही ठिकाणी अडचणी आहेत.

एका वेबसाईटवर भारतातील सर्व बंदरांची आकडेवारी, क्षमता दिलेली आहे. इराण अमेरिका युद्धामुळे तेल गॅस आणणारे जहाजाला लवकरात लवकर रिकामे/ मोकळे करणे गरजेचे झाले. अशा वेळी मोठ्या मालगाड्यांची गरज पडली. 

माहितगारांनी यावर उजेड पाडावा. 

 


असे काहीतरी वाचले की चांगले वाटते. लेख आवडला

उत्तम रस्ते, उत्तम रेल्वे (दळणवळण) , 

उत्तम दुरसंचार आणि वेगवान ईंटरनेट ची साधने (माहीती वहन)

स्वच्छ आणि मुबलक उर्जा ( जल, पवन,सौर, अणू, तेल, कोळसा उतरत्या क्रमाने)

परवडणारे, उत्तम आणि सहज उपलब्ध शिक्षण

स्वच्छ हवा, पाणी, अन्न, निवारा

सहज उपलब्ध आणि परवडणाऱ्या वैद्यकीय सुविधा

 

ईतके लिहुन दमलो. हे सर्व कधी मिळेल तो सुदिन