Skip to main content

एक मृत्यू प्रमाणपत्र, 'बारनिशी' आणि पुणेरी अनुभूती!

लेखक माहितगार यांनी बुधवार, 26/08/2026 16:58 या दिवशी प्रकाशित केले.

 

जन्म असो वा मृत्यू प्रमाणपत्र, काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेने दिलेल्या मूळ प्रतीच दाखल कराव्या लागतात. अर्ज दाखल करून सहसा त्या मिळतात देखील. वडिलांच्या मृत्यू प्रमाणपत्राच्या प्रती संपत आल्यामुळे मी आधी जवळचे पालिका प्रभाग (क्षेत्रीय/वॉर्ड) कार्यालय गाठले; कारण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र जवळच्याच प्रभाग कार्यालयातून सहज मिळाले होते. प्रभागातील कॉम्प्युटराईज्ड सिस्टीम तेव्हाही पुणे शहराच्या सेंट्रलाईज्ड डेटाबेसशी संलग्न असावी असे वाटते. 

मध्यंतरी, मला वाटते २०१८ नंतर केव्हातरी, नव्या जन्म-मृत्यू नोंदणीच्या डेटाबेसचे राष्ट्रीय पातळीवर एकत्रीकरण केले गेले. त्याला 'Civil Registration System' असे काहीसे नाव आहे. नेमके माहीत नाही, पण बहुधा तेव्हापासून पुण्यातील जवळच्या कोणत्याही प्रभाग कार्यालयातून पूर्वी मिळणारे हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आता शिवाजीनगर परिसरातील घोले रोड कार्यालयातच जावे लागते.  

सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असण्याचे जे काही कारण असेल ते असो. उपनगरातील लोकांना मध्यवर्ती ठिकाणी जाण्याची अधूनमधून गरज पडणे यात विशेष काही नाही. सध्या चालू असलेली मतदार यादीची 'स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन' असो अथवा जन्म-मृत्यू नोंदणीचे केंद्रीयकरण असो, हे कायदे काँग्रेसकालीनच आहेत. लालू प्रसाद यांनी मतदार याद्या आधार कार्डाशी जोडण्यास अडथळा आणला नसता, तर एन.आर.सी. (भारतीय नागरिकत्व यादी) काँग्रेस काळातच अस्तित्वात आली असती. भाजप काळात केवळ उपलब्ध कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करून मागच्या दाराने एन.आर.सी. लागू होतच आहे, हे या निमित्ताने लक्षात आले. भाजपने विरोधी पक्षांची अजून एक मागणी शांतपणे मान्य केली. कदाचित तिचाही बांगलादेशी नागरिक ओळखण्यासाठी सरकारला भविष्यात उपयोग होईल, पण ते काळच ठरवेल.

*** ***

तसे पुण्यात कोणाची रात्रीच्या वेळी उशिरा अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली, तर भर मध्यरात्रीसुद्धा स्मशानभूमीतील अंत्यसंस्काराचा गेटपास/परवाना मागण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी भटकावे लागू शकते. त्यामानाने मृत्यू प्रमाणपत्रासाठी सहसा हाताशी पुरेसा कालावधी असतो.

माझ्याकडे फुर्सतही होती. मेट्रोने छ. संभाजी उद्यान स्टेशनला उतरायचे, मेट्रो स्टेशनची लिफ्ट आपल्याला प्रसिद्ध बालगंधर्व रंगमंदिराच्या दरवाजातच पोहोचवते. झाशीच्या राणीच्या पुतळ्याचे दर्शन घेत जंगली महाराज रस्ता क्रॉस केला की समोरच घोले रोडची सुरुवात होते. ६०० मीटरच्या अंतराला नेमके 'हाकेचे अंतर' म्हणताही येत / नाही आणि रिक्षाही सहज मिळत नाही. तसे जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, महात्मा फुले संग्रहालय, पुण्यातील महापौरांचे वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले घर... असा आजूबाजूला लागणारा परिसर संधी मिळाली तर पायीच फिरायला हवा, नाही का? अशा वेळी तीनचाकी अथवा चारचाकीचा विचारही मनास शिवणे म्हणजे स्वतःवरच अन्याय!?

  '!'(उद्गारवाचक चिन्ह) नंतर '?'(प्रश्नचिन्ह) का? त्याबद्दल नंतर सांगतो; संध्याकाळचे सव्वाचार वाजत आलेत, वॉर्ड ऑफिस बंद होण्यापूर्वी तिथे पोहोचलेले बरे. जन्म-मृत्यू नोंदणी २०१८ नंतरची असेल, तर तळ मजल्यावरच काम होऊन जाते. मला हवे असलेले प्रमाणपत्र २०१८ पूर्वीचे असल्यामुळे, सद्य डेटाबेसमध्ये ते अद्ययावत करण्याचा अर्ज तिसऱ्या मजल्यावरील 'जन्म-मृत्यू दुरुस्ती कार्यालयात' पोहोचायला हवा. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास तीसेक दिवस लागतात असे कळले. लागू देत, मला तरी कुठे घाई आहे! अर्थात, हा अर्ज त्यांच्या हातात परस्पर देता येत नाही; तो आधी बारनिशीत सादर करावा लागतो. 'बारनिशी' हा शब्द मी वीसेक वर्षांनंतर पुन्हा ऐकत होतो.

बारनिशी म्हणजे काय? वीस वर्षांपूर्वीपर्यंत तरी बारनिशी विभाग, पथ विभाग, क्षेत्रीय कार्यालय असे विशिष्ट मराठी शब्द तुम्हाला ठाऊक नसतील आणि तुम्ही वापरलेला पर्यायी शब्द जरी मराठी असला, तरीही पुणे महापालिकेच्या मुख्य कार्यालयात तुम्ही नवखे असल्याची ती पावतीच असे! ऐतिहासिक-सांस्कृतिक आठवण म्हणून पुणे महापालिकेचा बारनिशी विभाग हा फारसी शब्द मराठी असल्यासारखा जपतो. वीस वर्षांपूर्वीपेक्षा आता एक बदल झाला होता—बारनिशीसोबतच विभागाच्या पाटीवर 'आवक-जावक' असेही लिहिलेले होते. नवख्या व्यक्तींची होणारी जराशी भाषिक अडचण सोडली, तर पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांसोबतचा अनुभव सहसा सौजन्यपूर्ण आणि सर्वसाधारणपणे काम पार पाडणारा असतो असा माझा व्यक्तिगत अनुभव. (यात उपरोध नाही)

 हल्ली मी पालिकेचे ॲपही (App) यशस्वीपणे हाताळतो. त्यात डास वाढल्याच्या तक्रारीतही फोटो जोडणे सक्तीचे (Compulsory) असण्याच्या गमतीजमती आहेत, नाही असे नाही! तर, या बारनिशी विभागाने अर्ज घेतला; पण कागदपत्रांच्या अति संख्येमुळे आवक क्रमांक लगेच देणे शक्य नसल्याचे सांगितले. मी माझ्याच अर्जाचा फोटो फोनवरून घेतला आणि निघालो.

काम होण्यास महिना लागणार हे माहीत असले, तरी आवक-जावक क्रमांक मिळाला नसल्यामुळे आठवड्याभरानंतर अजून एक चक्कर मारून 'जन्म-मृत्यू नोंदणी दुरुस्ती विभागात' माझा अर्ज पोहोचला आहे व त्यांनी प्रोसेस सुरू केली आहे, याची खात्री करून घेतली.

*** ***

माझ्या स्वभावातील रुक्षता ठाऊक असल्यामुळे असेल कदाचित; छत्रपती संभाजी उद्यान, बालगंधर्व रंगमंदिर आणि जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, त्यांची कलादालने आणि तिकीट खिडकीवरील कार्यक्रमांची नावे माझ्या रुक्षतेची रुक्षतेनेच परतफेड करत असतात. महात्मा फुले संग्रहालय, महापालिकेचे जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन आणि समोरचे महापौर निवासस्थान... यांच्या ५० मीटरच्या आत महापालिका अजून एक जबरदस्त काम करते! जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनची आणि घोले रोड कचरा डेपोची कंपाउंड वॉल (भिंत) एकच आहे. त्यातल्या त्यात एक बाब चांगली—शहरातल्या कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास सामान्यांना जेवढा होतो, तेवढाच किंवा त्यापेक्षा जरा अधिकच शहराच्या महापौरांनाही व्हावा, याची महापालिका जी काळजी घेते ते कौतुकास्पदच! या परिस्थितीत जनतेचे योगदानही असते हे. वे. सा. न. ल.   आता तरी मेट्रो स्टेशन ते वॉर्ड ऑफिस हे ६०० मीटरचे अंतर पार पाडताना तीनचाकी अथवा चारचाकी न मिळण्याचे दुःख समजण्यास हरकत नसावी!

 

* शुद्धलेखन चर्चा आणि अनुषंगिका व्यतरीक्त अवांतर चर्चा टाळण्यासाठी आभार

*  तुमच्या  ग्राम पंचायत ते पालिकेतील चांगल्या आणि  स्ट्रेंज  अनुभवांची माहिती या निमीत्ताने प्रतिसादातून दिल्यास स्वागत असेल. 

* लेखन उद्देश्य मुलत: राजकीय  राजकीय नाही किंवा निव्वळ टिकेच्या सुराचा नाही तेव्हा अनुषंगिका व्यतरीक्त राजकीय चर्चा टाळण्यासाठी आभार

 

 

 

 

  

 

  

   

 

 

               


वाचने 78
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

कितीही, कुणीही सरकारी  यंत्रणेवर टिका करो पण माझ्या आतापर्यंत च्या अनुभवावरून मी म्हणतो की जर पेशन्स असेल तर सर्व कामे सुरळीत आणी न पैसे देता होतात.  

 

पालिकेतील एक अनुभव. नवीन घर खरेदी केले होते. संपत्ती करासाठी नाव बदली करायचे होते. ऑनलाईन अर्ज केला,सर्व कागदपत्रे जोडली. पावती मिळाली आणी पंचेचाळीस दिवसात काम होईल असे सुचित केले गेले.

एखादे काम हाती घेतले की तडीस नेल्याशिवाय चैन पडत नाही. शेहेचाळिसाव्या दिवशी सौम्य आठवणपत्र पाठवले. आठवड्याच्या अंतराने दुसरे. तिसरे मात्र विभाग प्रमुखांना काॅपी केले. उत्तर आले आठ्ठेचाळीस तासानंतर  ऑनलाईन  प्रमाणपत्र डाऊनलोड करा. ऑफिस सुरू झाल्यावर संबंधित कारकुनाचा फोन आला. स्पष्टीकरण देत काम झालेच आहे दोन दिवसाने चेक करा. 

 

दोन दिवसांनी रेकॉर्ड अपडेट झालेले आढळले.

मी ही धन्यवाद ची मेल करून पालिका प्रशासनाचे कौतूक केले.

 


लोकमान्य टिळकांचा जसा फावल्या वेळेत गणिते सोडवण्याचा छंद होता तसा माझा फावल्या वेळेत सरकारी कागदपत्रे पूर्ण करण्याचा छंद आहे. कारण ऐनवेळी कागदपत्रे नसतील तर धावपळ नी पैसा लागतो. 

 


सर्व कागदपत्रे कधी लागत असोत वा नसोत अद्ययावत ठेवणे मलाही आवडते. पण होईल तेवढे ऑनलाइनच. असे कुठे जाण्याची वेळ आली तर तेवढा पेशन्स नाही.


लग्न झाल्याबरोबर लग्न प्रमाणपत्र मिळवण्याच्या मोहिमेवर मी लागलो! आम्ही दोघेही धुळ्यातून असल्याने तिकडची महापालिका गाठून सोपस्कार पार पाडावे लागणार होते, महापालिका एक तारीख देईल नी मग त्या तारखेला हजार रहा साक्षीदारांसह! ताण होत, पण नंतर माहिती मिळाली की दोघांपैकी एक पुणे पालिकेच्या पत्त्यावर राहत असेल तर पुण्यातही काम होईल, माज्या आधारावर पुण्याचा पत्ता आहे, मग पुण्यात हे सर्व केले नी दिलेल्या तारखेला साक्षीदारांसह हजार राहून लग्न प्रमाणपत्र मिळवले! त्या पत्राच्या आधारावर आधार, पॅन, नी इतर कागदपत्रांवर सहज नावात बदल झाला, मग पासपोर्ट वगैरे काढले, पुढे मुलगा झाल्यावर त्याचे आधार काढायला ऑनलाईन पोस्टात नोंदणी केली, नियमाप्रमाणे लहान बाळाचे आधार पोस्ट खातर घाटी येऊन काढून देणार, त्यांचा फोन आला की बाळाला घेऊन पर्वती पोस्ट खात्यात हजर व्हा! त्याना नियम सांगितल्यावर काम होणार नाही बोलले, लगेच ट्विटरवर नरेंद्र मोदी, राहुल गांधी नी इंडिया पोस्ट ह्याना टॅग करून तक्रार केली! १० मिनिटात सर्व लवाजमा घरी पोहोचला नी काही दिवसात आधार कार्ड तयार झाले. त्यावरून पॅन, पासपोर्ट व इतर कागदपत्रदेखील!