मुलांना कार आणि मुलीना बाहुल्या खेळायला आवडतात असा एक समज असतो . मला लहानपणी गाड्या फार आवडत. पुढे या क्षेत्रात मागील काही वर्षे काम करायला मिळतंय तेव्हाचा आनंद काय विचारता! या मालिकेची सुरुवात खरं तर जून २०१३ ला जाग्वार वरील लेखाने केली होती. त्यावेळी मिपा अचानक बिघडल्याने उत्साह जरा कमी झाला अन नंतर राहून गेलं. तिथले अनेक माहितीपूर्ण प्रतिसाद पण उडून गेले. असो. आता पुन्हा प्रयत्न करतोय.
चलती का नाम गाडी-१: टोयोटा रिकॉल
दुकानात नारळ पण वाजवून घ्यायचा आणि खराब निघाला तर परतीच्या बोलीवर आणायचा. अशा काळात आम्ही लहानाचे मोठे झालो. आता दुकानदार बहुतेक चौधरी आहेत, आणि हुशार झालेत. खराब नारळ बदलून देतात आणि बाकीच्या भाजीविक्रीतून वसूल पण करतात. सगळेच खूष.
इतकंच काय, बिग बाजारात रद्दीला पण काय भाव आलाय! अशा बदलत्या मार्केटचा परिणाम आतां वाहन उद्योगावर पण झालाय. गाडीला दोष आहे? मग बोलवा परत, द्या सुधारून- तेही मोफत! रिकॉल.
टोयोटा ने साडेआठ लाख गाड्या परत बोलावल्याने ऑटो उद्योगाच्या भुवया पुन्हा उंचावल्या आहेत. अरे, किती वेळा? नुकतंच सस्पेन्शन डिफेक्ट साठी पण त्याना असं करावं लागलं होतं. या एकाच कंपनीने गेल्या वर्षभरात अशा विविध कारणानी पन्नास लाख गाड्या मोफत सुधारून दिल्या आहेत.
मागच्या आठवड्यात सुझुकी ने 'डिझायर' परत बोलावल्या आणि आता टोयोटा इनोव्हा वगैरे.
यात फक्त एअर ब्याग वाल्या गाड्यांचा समावेश आहे. त्यात पुन्हा बर्याच मॉडेल्स ला फक्त ड्रायवरलाच एअर्ब्याग आहे.
आता बाजारात विश्वास टिकवून ठेवायचा तर हे आवश्यकच आहे. दिसायला वरकरणी सरळ वाटणारा हा विश्वास संपादनाचा प्रकार इतका खर्चिक की कंपनीच्या मालकांचे डोळे पांढरे होतील. मग कसे करत असतील हे सगळं? हा खर्च नफा मोजताना हिशेबात धरला होता का? थेट कंपनीच्या दर्जावर प्रश्नचिन्ह म्हणजे संबंधितांच्या नोकऱ्या जाणार का काय? असा प्रश्न छोट्या गुंतवणूकदाराला पण पडतोच. म्हणजे एकूण हा सारा प्रकार त्रासाचाच. रिकॉलमध्ये अनेक खर्च येतात . दुरुस्तीचा खर्च, कायदेशीर बाबींवर होणारा खर्च, आणि प्रतिमा सुधारण्यासाठी आणि जाहिरातबाजीचा खर्च. हा बहुतेक कंपन्या नियोजनाने बाजूला ठेवतात.
महागड्या गाड्या घेणाऱ्या ग्राहकाला आराम आणि सुरक्षितता हे दोन्ही हवेच हवे. मग खर्चिक फीचर्स सुधा बेसिक होऊन बसतात. स्पर्धेमुळे एकाने केले ते सगळे करू पहातात. आधीचे ऐकलेले/ पाहिलेले गाड्या बंद पडण्याचे आणि अपघाताचे प्रसंग आठवतात. मग मर्सिडीज किंवा टोयोटा सर्वात सुरक्षित वाटायला लागतात. त्यांच्या क्लबात जाण्यासाठी मग इतरांची पण धडपड!
गाड्या परत बोलावण्याचा पहिल्यांदा थेट परिणाम पुढील विक्रीवर होतो- दोन्ही प्रकारे!
पहिला संदेश जातो की डिझाईन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग नंतर विचार होतो की हरकत नाही, चला, पण प्रॉब्लेम आहे हे लक्षात आल्यावर तरी दुरुस्त करून देताहेत हे काय कमी आहे?
मग ती कंपनी माझ्या दृष्टीने चांगल्या यादीत जाते आणि असे न करणारे आपले दोष झाकून तसेच विकतात का काय? असा संशय निर्माण होतो.
अजून एक प्रश्न रहातोच, की तोच तो प्रॉब्लेम परत येतोय का दर वेळी नवा काहीतरी आहे? तोच असेल तरी यांना अजून कायम स्वरूपी उपाय मिळाला नाही ? असा प्रश्न येतो. आणि दरवेळी वेगळे काही दोष असतील तरी यांचं काहीच खरं नाही असाच संदेश जाणार! त्यातून जपानी कंपन्या म्हणजे '' प्राण जाय पार वचन ना जाय'' अशा बाण्याच्या. आणि जर्मन पण त्यांचे भाउबंद '' जस्ट इन टाईम'' पासून आतापर्यंत टोयोटा म्हणजे दर्जा, आणि त्यांच्या दर्जा नियंत्रण- उत्पादन पद्धती म्हणजे इतरांनी अनुभवाचे बोल म्हणून घ्यायच्या. मग लहानसा दोष दिसला तरी गाड्या परत बोलवायच्या म्हणजे मग असा संदेश जातो की बाजारात मिळणारी प्रत्येक गाडी सर्वोत्तमच आहे. आणि कंपनी आपल्यासाठी 'कायपण' करायला तयार आहे.
आता टोयोटा चा या वेळचा मुख्य दोष तरी काय होता? तर स्टीयरिंग सिस्टीम जवळील एअरब्याग कंट्रोल मोड्यूल वर पाणी गळून शोर्ट सर्किट होण्याची शक्यता लक्षात आली. मग आधी नाही का कळलं? तर नाही. जगभरात काही मोजके अपघात झाले आणि त्याचं विश्लेषण करताना हे लक्ष्यात आलं. मग सुरु- हे मोड्यूल अजून आपल्याच कुठल्या कुठल्या मॉडेल मध्ये जाते? बरं, ज्या गाडीत हे जात नाही तिथे त्या ऐवजी दुसरं काय बसवले आहे? त्याला काय धोका असू शकतो? कुठल्या कंपनीचं मोड्यूल होतं? वगैरे वगैरे. बरं, सुटे भाग कुठलेही असले तरी गाडीत ते सुटसुटीत मावणे, बसवणे महाकठीण. कशालाच जागा नसते, इतकं गच्च भरलेलं. आणि वेळेचा सतत दबाव. यातून अशा थोड्या गोष्टी राहून जातात. डिझाईनरकडून त्या परत होणं हा अपराध मानला जातो! आणि टीम मध्ये कुणाची तरी दुसरी वेळ असतेच.
यां व्यतिरिक्त वायपर मोड्यूल, सीट रेल या सर्व सुरक्षिततेच्या संबंधित भागांचाच समावेश एकूण दोषांमध्ये आहे. संदेश एकदम स्वच्छ स्पष्ट आहे- आम्ही सुरक्षिततेशी तडजोड करत नाही.
गेल्या वर्षी फियाट सिएना मध्ये एक वेगळा दोष होता. ड्रायव्हरने पेडल न दाबताच गाडी आपोआप पार्क मोड मधून बाहेर येत असे. म्हणजे गाडीतली इतर मोड्यूल्स गाडीच्या ''सध्याच्या स्टेटस'' प्रमाणे वागतात, त्यामुळे या दोषामुळे त्यांचे काम नको तेव्हा मधेच सुरु होणार! सारंच धोकादायक. मग? बोलवा परत, बदला सोफ्टवेअर.
आता आपल्याला वाटेल यातला खर्चिक भाग म्हणजे खराब असलेले सुटे भाग आणि ते बदलणे! त्याचा खर्च होत असेल. पण गम्मत तिथेच आहे. मुख्यत्वे हे दोष सोफ्टवेअरशी संबंधित आहेत. एका गाडीत वेगवेगळी जवळ जवळ पन्नास मोड्यूल्स. अपडेट फक्त दोषी मोड्यूल करायचं. गाडी येणार, नवे सोफ्टवेअरवर्जन टाकून, ऑटो टेस्ट करून बाहेर!
अर्थात सर्व वेळी सोफ्टवेअर चा दोष असतो असे नाही पण पूर्वीच्या काळी जेंव्हा गाडीत इलेक्ट्रोनिक्स अजिबात नव्हते त्या काळी महागडे भाग पण खराब असत, आणि बदलून दिले जात. कधी कधी तर केवळ ग्राहकाला एखाद्या गोष्टीचा '' वैताग'' येईल म्हणूनही रिकॉल्स होतात. गेल्या पन्नास वर्षात ८५०० रिकॉल्स झाले आहेत.
यांत्रिक किंवा काच, धातू- प्लास्टिक भागांमध्ये क्वचितच दोष सापडतात, कारण ते वेळोवेळी सुधारले जातात, आणि त्यांचे दर्जा नियंत्रण अधिक चांगले होते. पण सोफ्टवेअर चे तसे नाही. एका मोड्यूल च्या निर्मितीत अनेक देशातले अनेक घटक एकाच वेळी काम करत असतात. अतिशय किरकोळ बदल असेल तरी पूर्ण सोफ्टवेअर पुन्हा तपासण्याची पद्धत आणि त्यासाठी अंतरराष्ट्रीय नियमन आहे. आणि तेही तपासायचे म्हणजे संगणकावर नव्हे तर प्रयोग शाळेत- जिथे गाडीचे प्रतिरूप तयार असते आणि बाकीच्या सर्व मोड्यूल्स मध्ये अद्ययावत सोफ्टवेअरवर्जन असतो. आता हे परत परत करायचे म्हणजे तोच-तोच पणा आणि कंटाळा आलाच म्हणून समजा! मानवी चुकाना तर अक्षता देऊन आग्रहाचं निमंत्रण.
आणि सोफ्टवेअर म्हटलं की जगात कुणालाही आधी आठवतात ते भारतीय इंजिनियर्स! आज वाहन उद्योगाला इलेक्ट्रोनिक भाग पुरवणाऱ्या जगातल्या प्रत्येक कंपनीचं पुणे किंवा बंगळूरूला विकसन केंद्र आहे. शोधल्यास अपवाद सापडेल इतकंच. हे इंजिनियर्स बरीच मेहनत घेतात. बरेचदा असं म्हटलं जातं कि दुय्यम काम भारतात येतं, पण तसं नाही. अतिशय क्लिष्ट, तांत्रिक आणि महत्वाचं काम करणाऱ्या कंपन्यां पहात आहे. ऑटोमोटिव्ह आणि विमान वाहतूक क्षेत्रातले प्रकल्प करताना काटेकोर नियम पाळावे लागतात. हे करताना झालेल्या मानवी त्रुटी असे रिकॉल्स घडवून आणतात.
असं म्हटलं जातं, की टोयोटा, जनरल मोटर्स आणि फोर्ड ने जितक्या गाड्या रिकॉल केल्या तेवढ्या भारतीय कंपन्यांनी अजून बनवल्या पण नाहीत. भारताचा आताचा झपाटा पहाता ते विधान फार काळ टिकणार नाही.
असो, तर मंडळी, आपली काय टोयोटा नाय, तुमच्याकडे टोयोटा असेल तर ती रिकॉल केलीय का? हे पहायला टोयोटा वेबसाईट वर जाउन गाडीचा १७ अक्षरी VIN ( वाहन ओळख क्रमांक) टाकून पहा. तोपर्यंत मी पण जरा इथेच जाउन येतो! माझ्या इंडिकेतुन. :)
क्रमश:
- चलती का नाम गाडी-२ गुंतागुंत
- चलती का नाम गाडी- ३: नवी फीचर्स
- चलती का नाम गाडी- ४: प्रदूषण नियंत्रण ( युरो नॉर्मस )
- चलती का नाम गाडी- ५: वाहन चौर्य प्रतिबंधन
- चलती का नाम गाडी- ६: वाहन सुरक्षितता
- चलती का नाम गाडी- ७ : ऑटोमोटिव्ह अभियांत्रिकीमध्ये संधी
Book traversal links for चलती का नाम गाडी-१: टोयोटा रिकॉल
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
मारुती डीझायर परत शोरूम मध्ये
छान लेख.
मस्त !!!
होय. एंबेडेड कंट्रोलर्सच असतात.
सुंदर
ह्या पेक्षा पूर्वीच्या गाड्या
अंतर्गत सजावटीवर जरा जास्त खर्च केला तर
आमची भारतातील पहीली व शेवटची
सुंदर लेख!
मस्त लेख...
मला असा माझ्या दुचाकीचा अनुभव
मस्त लेख माहितीपुर्ण आहे.
+१ हेच म्हणायला आलो होतो.
लेख छानच आहे.
धन्यवाद!
+१
+१
छान!
बरं आहे बॉ " तो बील गेट्स
हाहाहा
:-)
माहितीपूर्ण लेखन आहे. आवडले.